सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८

स्वच्छ,प्रवाही आणि नितळ पाण्यासारखे जीवन जगण्यासाठीची 'पाण्याची गोष्ट'.

१८.  गावोगावी भगीरथ उभे करण्याचे पवित्र कार्य 



उन्हाचा पारा चांगलाच चढत होता. तापमानाबरोबर दाहकता व तीव्रता चांगलीच दाह देत होती. पळस लालबुंद झाला होता. जुन्याचा शिमगा करून नव्या वसंताची नवती फुटू लागली.पाण्याची गरज चांगलीच वाढायला लागली. त्यासोबतच पाणी मुरवण्याच्या कामाची सुरवात. ओसाड रानात, डोंगराळ भागात व दऱ्याखोऱ्यात जाणवायला लागते एक भयाण भकास पण. विवेकवाडीत दुपारच्या वेळेस राऊतकाका अवाक होऊन मला म्हणत होते, बघा की दादा या बायांनी दोन दिवसात पाच एकरावरची ज्वारी काढली. काय म्हणायचं ? आपल्याला नुसतं उभारायला नको वाटायलं आणि दोन दिवसात अर्धा तास जेवायचं सोडलं तर सगळच उरकून टाकलं ह्या बायांनी.” दिवस पण योगायोगाने जागतिक महिला दिन. मला पण सहजच माझ्या आयुष्याला एक छानसे वळण देणाऱ्या कणखर स्त्रियांची आठवण प्रकर्षाने झाली.

नदी, नारी और नीर इन तिनोकी एक अलगसी गरिमा भारत में है लेकिन दु:ख की बात यह है की इनका पूजन भारत में होता है लेकिन सन्मान तो उतना नहीं होता.” जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंगांचे वाक्य सहजच आठवून गेले.

रात्री हातोला गावात ग्रामसभा होती. गाव ‘सत्यमेव जयते वॉटरकप’ स्पर्धेत सहभागी झाले होते. त्याचा शुभारंभ. पाण्याचे नाते असणारे अनेक जण यात सहभागी होणार होते. माझा मित्र संतोष शिनगारे सोबत गेल्या दोन वर्षांचा पाण्याचा लेखाजोखा घेत आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. तिथे सगळेच पुरुष. संतोषला तर आज महिलांची ग्रामसभा घ्यायची होती. तितक्यात लगबगीने आमचा तरुण मित्र आला. तो म्हणाला, महिला नक्कीच चांगल्या संख्येने येतील. घरचं सगळं आवरून यायला वेळ लागेल.” 

त्याची धावपळ जोरात चालू होती. हळूहळू संख्या वाढू लागली. महिलांची संख्या पण लक्षणीय होती. सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. आत्ता माझी वेळ. काय बोलावे हे समजत नव्हते. मी सहजच प्रश्न केला समोरील ग्रामस्थांना,
आपल्यापैकी किती जणांनी हुंडा घेतला नाही ?”
समोरून एकही हात वर आला नाही. माझ्या डाव्याबाजूने मात्र एक आवाज खंबीर पणे म्हणाला,
दादा मी नाही घेतला हुंडा.”

माझे लक्ष त्या आवाजाकडे गेले तो होता त्या तरुण मित्राचा आवाज. हसऱ्या चेहऱ्याने तो हात वर करून उभा होता. सहजच तिथे असणाऱ्या महिलांना विचारले, “हुंड्याची जमवा जमव करत असताना तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरील घालमेल आठवते का ? डोके डोलावली गेली. सर्व पुरुषांना विचारले, “तुमच्या घरातील बहिणीच्या लग्नाच्या वेळचा तणाव आठवतो का ?” सर्वांच्या माना डोलावल्या गेल्या. हे सगळे आपल्याला आठवते,जाणवते तर आजच्या महिला दिनानिमित्त इथे असणाऱ्या सर्व तरुण तरुणींनी संकल्प करायचा का की आम्ही हुंडा घेणार पण नाही आणि देणार पण नाही. किंचितशी शांतता सर्वत्र पसरली. सर्व तरुण तरुणींना समोर बोलावले. योगायोगाने मेडिकल कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर पण त्याच दिवशी सुरु होत होते. त्या सर्व विद्यार्थ्यांना पण सहभागी होण्याची विनंती केली. तरुण तरुणींनी जोरदार आवाजात संकल्प केला,
आम्ही हुंडा घेणार नाहीत आणि आम्ही हुंडा देणार नाहीत.”
पुढे काय बोलणार हा परत प्रश्न.
तुम्ही मतदान केले का ?
हो केले ”
फुकट की काही घेवून ?”
तरुण मित्र उभा राहिला व मोठया आत्मविश्वासाने म्हणाला,
दादा आमच्या गावात एक रुपया पण आम्ही दिला नाही सरपंच निवडणुकीत.”
असा एकही रुपया मतदाराला न देता निवडून येणारा नवीन सरपंच तो तरुण मित्रच होता जयसिंग चव्हाण.
निवडणुकीत जसे गाव पेटले होते तसे गाव पेटेल का ? मतदानाला आतुर असणारी लोक पाण्यासाठी श्रमदान करणार का ? जयसिंग तू स्वतः जसा निवडणुकीसाठी रात्रंदिन कष्ट घेतले तसे गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी घेणार का ?”

तेवढ्याच आत्मविश्वासाने जयसिंग म्हणाला, “ हो नक्कीच ! ”गावकऱ्यांनी टाळ्यांची आतषबाजी केली.” आम्ही लोक फुकट काही देत नाहीत. तुम्हा गावातील लोकांना लोकसहभाग द्यावा लागेल. फुकट मिळते ते पचत नाही. बघा विचार करा आणि ठरवा.” असे म्हणून मी बसलो.
जयसिंग हिरीरीने उठला व माईकचा ताबा घेतला.


मी गावकऱ्यांच्या साक्षीने तुम्हा सर्वांना आश्वासन देतो की या कामासाठी लोकसहभाग म्हणून माझ्या कुटुंबांकडून एक लक्ष रुपये”
काही काळातच अनेकांनी पण आपला वाटा जाहीर केला. ‘गाव करी ते राव न करी’ या म्हणीप्रमाणे आता गाव तर तयार झाले. आपण पण निवडणुकीत एक पैसा खर्च न करता स्वच्छ मार्गाने निवडून येणाऱ्या जयसिंग चव्हाण व त्याला निवडून देण्याऱ्या गावातील नदी, नारी आणि नीरच्या विकासासाठी काही वाटा उचणार का ? आपल्याला जमेल तसा खारु ताईचा का असेना त्याला मोलच नाही. गावोगावी भगीरथ उभे करण्याच्या पवित्र कार्यात सहभागी होऊ या.




१९.  सगळंच काही अदभूत घडतंय......!!

उन्हाचा पारा ४३ अंशाच्या वर गेला. अंगाची लाही लाही होतेय. मी व इरफान व्हरकटवाडीला गेलो श्रमदान त्यांचे कमी झालंय म्हणून माझ्या चेहऱ्यावर नाराजी होती. तोच प्रकार थोडा फार निमल्याला झाला.

दुसऱ्या दिवशी १७ LBS ( ४८० घनमीटर) करूनच व्हरकटवाडीच्या गावकऱ्यांनी पाणी पिले.
निमल्यातील तरुणवीरांनी तर चंगच बांधला त्यांनी १५ X 20 चे शेततळे चक्क एकाच दिवसात एक मीटर खोंदून गुणांकाच्या दृष्टीने ९०० घनमीटरचे टार्गेट केवळ एका दिवसात पूर्ण केले. हजार लोक एकत्र येवून जेवढे काम होते तेवढे केवळ शंभराच्या जवळपास असणाऱ्या हजारो हत्तीचे बळ असणाऱ्या वीरांनी केले.

पुण्यात १२वीचा अभ्यास करणारा पर्जन्य प्राजक्ता प्रशांत थोडा उदास होता. त्याला मराठवाड्याच्या दुष्काळ हटवण्यासाठी काहीच करता येत नाही. तसेच त्याचे कुटुंब पण. पर्जन्यने “दुष्काळाशी दोन हात” नावाचा फेसबुकवर एक ग्रुप बनवला व आईच्या मदतीने त्याने ८४ हजार रुपये मदत गोळा केली. त्यातून काही कोटी रुपयांचे पाणी साठवले जाईल.

गावातून लोकवाटा जमत नाही म्हणून काही लोक नाराजी व्यक्त करत होते. मी पर्जन्य व आमच्या विवेकवाडी परिवार, डोंबिवलीचे उदाहरण ग्रामसभेत दिल्यावर पठाण मांडाव्याच्या ८० वर्षाच्या जोगदंड आजीने जवळ जपून ठेवलेली शंभराची नोट माझ्या हातात ठेवली. तीन गावात मिळून लाख रुपयांचा लोकवाटा जमा झाला.
सगळंच काही अदभूत घडतंय......!!


२०.  वेदने वर सहवेदनेचा विजय....कधी आसू कधी हासू !!!

१ मे महाश्रमदान. राहुल व्यवहारे थोडा उदास वाटत होता.
 

राहुल बरा आहेस न ?” हो दादा एवढंच उत्तरं. काही वेळानी कळले की राहुलच्या आजोबांचा रात्री मृत्यू झाला. त्याच्या वडिलांनी व त्याने ठरवले आजोबांच्या अंत्यसंस्कारासाठी येण्यापेक्षा “दुष्काळाशी दोन हात” करणाच्या यज्ञाचा स्वतः वर संस्कार करणे जास्त महत्वाचे. राहुल अंबाजोगाईतच थांबला. इथल्याच काम करणाऱ्या आजोबांमध्ये तो आपले आजोबा शोधत होता.
मागच्या वर्षीच मला श्रमदानासाठी यायचे होते. मनोरुग्ण असणाऱ्या एका महिलेची एक दिवसाची मुलगी मी दत्तक घेतली तिचा बाप तिला सांभाळायला तयार नव्हता म्हणून. ती आजारी होती. नाही जमले.” ३० तारखेला स्वतःच्या अंगावर आठ शस्त्रक्रिया झालेल्या चिपळूणच्या अश्विनीताई लग्नाचा वाढदिवस असताना पण अंबाजोगाईत आल्या. हातोल्यात राहून त्यांनी सलग २ तास श्रमदान केलं.

हातोल्याचा गणेश चव्हाण चक्क गेल्या काही दिवसांपासून फक्त २ तास झोपतो आहे आणि दिवसभर बेफान काम करतो. निमल्याच्या गावकऱ्यांनी दिवसभर रखरखत्या उन्हात काम केलं. दोघांना ऊन लागून उलटया झाल्या पण बहाद्दर मागे फिरले नाहीत.

आनंदगावाची कथाच न्यारी.सगळेच गाव श्रमदानासाठी उपस्थित होत. सकाळी ३ वाजता सगळ्या महिला उठल्या व घरचे सगळे आवरून गावाच्या महाश्रमदाना साठी सज्ज.लोकसहभाग जमत नाही असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.तिथे माझी प्रेरणा माझ्या साथीला होती. केवळ १५ मिनिटात १ लक्ष ३५ हजार रुपये जमा झाले. एका छोटीने सगळे लोक मला पैसे देतात पाहून स्वतः जवळचा एक रुपया मला आणून दिला.

विनायक पटवर्धन, मुंबईचे नौदलाचे माजी सैनिक. माझ्या सोबत चक्क काही ओळखपाळख नसताना काम करण्यासाठी आले. दिवसभर रखरखत्या उन्हात काम करतात. एक तारखेला मला कळले की गावातील इंधनासाठी त्यांच्या कुटुंबातील पाच जणांची ५० हजार रुपये लोकवर्गणी दिली. तन,मन, धनाने काका मराठवाड्याचे झाले आहेत.बावचीचे शिवा व विष्णू तसे अनाथ व वृद्ध पण जोरदार श्रमदान करतात, विष्णूने १० रुपयाच्या तीन नोटा लोकवाटा म्हणून माझ्या हातात आणून दिला. 

बावचीच्या ग्रामसभेत लोकवाटा पन्नास हजार रुपये जमा झाला,

स्पर्धा सुरु होण्याच्या एक दिवस आधी गरिबीमुळे व कर्जापोटी निमल्याच्या महादेवच्या बायकोने आत्महत्या केली होती. ग्रामसभेत मी लोकवाट्याचे आवाहन केल्यावर काही वेळानी चक्क महादेव उठला व त्याने शंभराची नोट पुढे केली. तुझ्याकडून नको म्हणालो.

गावपाणीदार झाले पाहिजे दादा ! लेकरांचे आई बाप मेले नाही पहिजेत !”

काय चाललंय हे ...उर भरून येतो, मन सुन्न होत. वेदने वर सहवेदनेचा विजय होतोय हे मात्र नक्की. कधी आसू कधी हासू.

२१.  मास्तर तुम्ही सुद्धा ... नाही नाही मास्तर तुम्हीच हे करू शकता !!!

रस्ता कटता कटत नव्हता. वातानुकूलित गाडीत पण घाम येत होता. घसा कोरडा. शरीराची क्षमता कमालीची ताणली जात होती. त्यात नेमका रस्ता कळेना. आमचा चालक व मी परेशान. आता येईल मग येईल. चुकलो तर नाही ? असे सर्व करत शेवटी कसे तरी लंगोटवाडी करत सक्करवाडीला पोह्चंलो. रस्ता होताच की नाही अस वाटत होतं. गाडीतून उतरलो तेच तळपत्या उन्हाचा चटका बसला. कसे तरी सावरून समोर पाहिलं तर सगळे ग्रामस्थ सकाळ पासून श्रमदान करत होते. दुपारचे दोन वाजले होते. माझी वाट पाहात रणरणत्या उन्हात त्यांना उभ पाहिल्यावर काळीज हलले व एक नवीनच शक्ती आली.

अमोल आणि सुखदेव हे दोघे या गावातील गुरुजी गेल्या महिन्यापासून गावातच ठाण मांडून बसले आहेत. अवघ्या तिशीतील आहेत. अमोलगुरुजींना छोटस बाळ काही दिवसांपूर्वीच झालं आहे. पण त्याला पाहण्याचा आनंद मात्र त्यांना त्यागावा लागला. धरणी मातेला इतकं सुंदर सजवल आहे सरकटवाडीच्या गावकऱ्यांनी. स्पर्धेतील श्रमदानाचे २० पेकी २० गुण मिळवणारे हे गाव झाले.व्हरकटवाडीचे रामगुरुजीच्या छोटया मुलीला चांगलाच ताप आला होता. रात्रंदिन फक्त दुष्काळाशी लढायचे हे फक्त डोक्यात. ताप वाढतच गेला. गावाने गुरुजींना सक्तीच्या रजेवर पाठवलं. लेकराला दवाखान्यात नेण्यासाठी. स्पर्धेतील श्रमदानाचे २० पेकी २० गुण मिळवणारे हे दुसरे गाव.

सुरेशगुरुजी बावचीचे दिवसरात्र काम करतात. स्वतःचे तीन लाख घालून मशीन चालू राहिली पाहिजे यासाठी त्यांनी चंग बांधला आहे. गावतळे व महाश्रमदान दलितांच्या जमिनीत घेवून त्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला. बाबासाहेब आत्ता नक्कीच खुष झाले असतील.सौदागरगुरुजी आनंदगावचे. विनाअनुदानित संस्थेत काम करतात. गावासाठी इतके झोकून दिलंय की बोलून बोलून घसाच बसला. काही किलोनी वजन कमी झाले. पण वीर फारच जोरात पळतोय हो गाव पाणीदार होण्यासाठी.

बाळूगुरुजी पळसखेडचे मागच्यावर्षी आपल्या गावाला राज्यात तिसरे बक्षीस मिळवण्यात त्यांचा मोठा वाटा. बाळू गुरुजी तिथेच थांबले नाहीत आता इतर गाव पाणीदार करण्यासाठी रात्रंदिवस पळत आहेत.

काही खर नाही या देशाचे म्हणणाऱ्या तथाकथित लोकांच्या तोंडावर आमच्या या मास्तरांनी जोरदार चपराक मारली आहे. लोकशिक्षणातून लोकसंघटन करत परिवर्तनाची उर्जा संक्रमित करणारे हे मास्तर. मास्तर तुम्ही सुद्धा ...हे वाक्य फारच गाजले. मास्तर तुम्हीही काही तरी करू शकता अस वाटतंय नाही नाही मास्तर तुम्हीच हे करू शकता !!!

२२.  सब कुछ झूट”....फिर क्या है असली सच ?

गावात गेलो की ऐकायला मिळायचे,
माय बाप सरकार जे करल तेच होईल न. आम्ही गरीब बापडे काय करणार ? हालाकीत जगण्याचं नशीब घेवूनच आम्ही जन्माला आलो आणि मरू बी तसंच.”
शहरात गेलो की ऐकायला मिळायचे,
गावातून पैसा उभारणे अशक्यच. यांना सवय लागलीय फुकटात सगळं करण्याची. स्वतःच्या गावासाठीच काहीच करणार नाहीत. निवडणुकीत हजाराची नोट मिळाली की खूष. गावातील तरुण म्हणजे राजकीय लोकांचे हुजरे.”

सब कुछ झूट. आपला देश बदलणे अशक्यच. गावातून अराजकीय नेतृत्व उभे होणे अशक्यच आणि राजकारणी चांगले काही गावात होऊच देणार नाहीत. यासगळ्या प्रस्थापित विचारधारेला सरळ मोडीत काढत महाराष्ट्रात काही प्रमाणात तरी खरंच “तुफान आलंया”.
निमला या धारूर तालुक्यातील गरीब गावा पासून सुरुवात करून आम्ही घेतलेल्या ७ ग्रामसभेतून २,४९,७०० रुपयांचा लोकवाटा जमा झाला. आ पर्यंत २० लक्ष ४८ हजार रूपयांच मशिनचे काम ज्ञानप्रबोधिनीने १३ गावात केलं. आपल्या सोबतच भारतीय जैन संघटना,मानवलोक व इतर संस्थांनी यापेक्षाही जास्त आणि अनेक गावांसाठी केले. त्यासाठी काही करोड रुपयातील इंधनाचा खर्च गावकऱ्यांनी केला. सरकारच्या जलयुक्त शिवाराची याला मोठी जोड मिळाली.
ज्ञान प्रबोधिनीच्या सर्व मित्रांनी अगदी अमेरिकेतील Save Indian Farmers पासून मुंबई,पुणे सारख्या शहरातून ३५ लक्ष रुपये निधी गोळा झाला.पाणी फौंडेशन च्या आवाहनामुळे भारतीय जैन संघटनेकडे तर यापेक्षाही किती तरी अधिक निधी झाला आहे.

ज्ञान प्रबोधिनी ज्या १३ गावात काम करते तिथे ६७ हजार ८०० घन मीटर श्रमदान झाले तर एकूण महाराष्ट्रात कमीत कमी १० लक्ष घनमीटर तरी श्रमदान झाले असेल. १ घनमीटर खोदण्याची मजुरी निदान सगळी कडे १०० रुपये आहे. आता पाहा किती रुपयांचे श्रमदान गावकऱ्यांनी आपल्या गावात केले. यात शहरी भागातून श्रमदानासाठी आलेल्या मित्रांचा पण मोलाचा वाटा आहे.

प्रत्यके गावातून तरुण अराजकीय नेतृत्व उभे रहात आहे. चवथी पास असणारा आमचा निमाल्याचा वैजनाथ ते अगदी जायभायवाडीतील डॉक्टर सुंदर जायभाय.
सगळ्यात जबरदस्त बदल जो जाणवतो आहे ते घर न सोडणाऱ्या हजारो महिला श्रमदानासाठी घराबाहेर पडत आहेत व त्यांना त्यांच्या घरातल्यांची तेवढीच साथ आहे. हे सर्व पूर्ण नाही हं ! अजून खूप काही करायचे आहे. आपण पण या न आमच्या सोबत. आपला मेंदू आपल्या प्रिय सद्प्रेरणेच्या ताब्यात द्या आणि बघा मग काय होतंय “सब कुछ झूट. आपला देश बदलणे अशक्यच.” हे वाक्य मोडीत काढूया... काही तरी भव्य कृती करू या.


२३.  मनुष्याच्या घामावर जर ही जेसीबी मशीन चालली असती तर..?

बालाघाटच्या डोंगररांगाच्या कुशीत अनेक वाड्या, तांडे आणि वस्त्या वसल्या आहेत. जिंदा दिलाची आणि दणकट शरीराची ही माणसे अनेक आघात सहन करत जगत आहेत. अनेक वर्षांची शेतातील नापिकी आणि त्यामागे असणारे पाण्याचे दुर्भिक्ष व दुष्काळाचा घाला यामुळे नशिबाला आलेले भटकेपण. या साऱ्या भटक्यांच्या वाटयाला वाघिणीचे दूध म्हंटले जाते ते शिक्षण काही आले नाही. “ सिंचनासाठी पाणी नसणे-नापिकी शेती- पिढ्यानपिढ्याचे भटकेपण- शिक्षणापासून दूर” हे दुष्टचक्र त्यांच्या मागे लागले ते सुटलेच नाही. आयुष्य हे असेच खितपत जगायचे असते हेच त्यांच्या सवयीचे झाले.

हे असे किती दिवस चालणार ? काही तरी केलं पाहिजे का नाही ? काय करावे यासाठी मतभेद असू शकतो पण या आपल्या भावंडाचे आयुष्य थोडे तरी सुकर झाले पाहिजे असे तर प्रत्येकालाच वाटत असणार. आम्ही सुरु केलीय “दुष्काळाशी दोन हात” करण्याची मोहीम. रोजचा दिवस कधी प्रचंड आनंदाचा जातो तर कधी प्रचंड खिन्नता दाटून येते.

रात्री १२ वाजेपर्यंत दिपेवडगावच्या बैठकीत महाश्रमदानाचे नियोजन केले आणि सांगून आलो की ५०० घनमीटर काम झाले पाहिजे तरच मी गावात येणार. गावातील लोक चार वाजल्यापासून उठली. कुठल्याही घरात चूल पेटली नाही. सगळे कामाला. सकाळी ७ वाजताच मला फोन, “ दादा या न ५०० घनमीटर झाले.” “हो येतोच,” म्हणून मी थांबलो. त्यानंतर फोन वर फोन. शेवटी मी ज्यावेळी गावात गेलो त्यावेळी १००० घनमीटरचे नियोजीत काम पूर्ण करून. २००च्या वर लोक उत्साहाने काम करत होती. ग्रामसभेत लोकवाट्याचे आवाहन केले तर १५ मिनिटात ५० हजारापर्यंत लोकवाटा जमा. भन्नाट वाटले.

माझी गाडी निघाली परळी तालुक्याकडे. सपाट भाग संपून आम्ही डोंगरात घुसलो. इंदिरानगर तांड्यावर पोहोंचलो. गाडीतून उतरताच फुल फुल कृतींनी आणि वाणीने म्हणत माझे स्वागत झाले. लमाण ( बंजारा ) पारंपारिक वेशातील उपसरपंच आजीबाई जिने पाणी फौंडेशनचे प्रशिक्षण घेतले आहे; ती माझा हात हातात घेवून म्हणाली, “ लई वाट पाहत होतो तुमची सकाळ पासून श्रमदानचालू हाय.बरं झालात आलाव.” काळजात चर्रर्र झाले दुपारचे २.३० वाजले होते. उन्हाचा पारा ४३ अंशाच्या पुढे सरकला होता.

इंदिरानगर तांड्याची लोकसंख्या ५००च्या आसपास. गावातील ७५% लोक ऊसतोड कामगार. गावात पिण्याच्या पाण्याची केवळ एकच विहीर. शासनाने १९० फुट खोल एक बोअरवेल घेतली होती. त्याला काही पाणी लागले नाही. बाकी गावात एकही विहीर किंवा बोअरवेल शेतीच्या सिंचनासाठी नाही. रब्बीचे क्षेत्र शून्य असलेले हे गाव. एक भयानक काळोख माझ्या डोळ्यासमोर. एका एक्कराच्या कॉलनीत घरगुती पाण्यासाठी ४० बोअरवेल घेणारा आमचा शहरी समाज माझ्या डोळ्यासमोर आला.

विस्तीर्ण पसरलेल्या त्याडोंगर रांगातून आम्ही श्रमदानचालू असणाऱ्या शेततळ्याच्या जागी आलो तर एकदम मला हिंदी चित्रपट पाहतोय असे वाटत होते. काही लमाण वेशातील स्त्रिया घेर धरून हलकीच्या तालावर नाचत होत्या. कणखर शरीराचे माणसे बेफामपणे खोद काम करत होते. मुले व स्त्रिया माती व मुरमाचे टोपेले उचलून टाकत होत्या. मी ते अनोखे दृश्य भान हरपून पाहत होतो. पुढच्या अर्ध्या तासात काम न करता मला तीन वेळा पाणी प्यावे लागले. माझ्या तांड्याच्या भावांच्या अंगांअंगातून घामाचे पाझर येत होते पण मला एकही जण पाणी पिताना दिसला नाही. काय ही अलौकिक शक्ती.


२ लक्ष रुपयाचा लोकवाटा करून त्यांनी मशीनच्या मदनीने २० हजार घनमीटर खोद काम पण केले पण आत्ता पैसे संपले. शेतीची मशागत करावी लागणार. खत व बियाणांसाठीच पैशाची मारामार चालू आहे तर मग लोकवाटा कसा जमणार? जेसीबीला डिझेल लागते आणि त्यासाठी पैसा. मनुष्याच्या घामावर जर ही मशीन चालली असती तर तांड्याला पैशाची गरजच पडली नसती. त्यांच्या घामाच्या सोबतीला आपण त्यांना डिझेलसाठी नक्की मदत करू. तुम्ही सर्व जण आमच्या सोबत आहे तर इंदिरानगर तांडा एकटा कसा करणारदुष्काळाशी दोन हात”. या आपण सारे मिळून आपल्या माणुसकी प्रचीती देवू या !!

२४.  अतिमागास जिल्ह्यात
भलतच काही घडतंय ...!!!

भारत सरकारच्या नितीआयोगाचा २३ एप्रिल २०१८ अहवाल पाहून थोडा थक्कच झालो. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा अविकसित जिल्ह्यात भारतात तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा. शिक्षणाच्या बाबतीत तर दुसऱ्या क्रमांकावर व शेतीच्या बाबतीत चवथ्या क्रमांकावर. पाण्याचे काम करण्यासाठी अतिशय आव्हानात्मक जिल्हा. त्यात अजून अवघड म्हणजे परंडा तालुका. नेहमी दुष्काळाच्या गर्तेत असलेला. काही तरी केले पाहिजे हे सारखे वाटत होते. मागच्या वर्षी धारूर तालुक्यातील जायभायवाडी वॉटर कप स्पर्धेत दुसरे आले आणि यावेळी धारूर तालुक्यात जबरदस्त वातावरण खूप जोरात काम सुरु झाले अनेक गावात.

असेच काही करता येईल का परंडा तालुक्यात ? परंडा तालुक्यातील पाणी फौंडेशनचा समन्वयक राहुलशी बोललो. त्याने मला तालुक्यात येण्याचे आमंत्रण दिले. परंडा तालुक्याच्या अगदी सीमेवर व मराठवाड्याच्या पण सीमेवर असलेल एक छोटेस गाव सक्करवाडी चांगले काम करतंय असे सांगितले. मी पण लगबगीने तिकडे निघालो. दोन जबरदस्त मास्तर वीरांशी भेट झाले. अमोल अंधारे व सुखदेव भालेकर याच्याशी फोनवर भेट बोलणे झाले. सक्करवाडीला भेट द्यायचे ठरले.
पहिली भेट लिंबाखालची. दुपारचे ३ वाजलेले. गावकऱ्यांना व गावाला समजून घेण्याचा प्रयत्न. सुखदेव भालेकर तर जवळच्या शिंदेवाडीचे सक्करवाडीत तळ ठोकून आहेत.माझी पाहिली भेट तशी वादळीच होती. मी फारच स्पष्ट शब्दात माझी मते गावकऱ्यांना व दोन्ही शिक्षकांना सांगितली. मनात विचार करून निघालो की आता परत हे लोक काही आपल्याला या गावात बोलावणार नाहीत. कडुलिंबाच्या झाडा खाली झालेली बैठक फारच कडू डोस देणारी होती.

माझ्या डोक्यातील ग्रह मात्र अमोल आणि सुखदेवसरांनी खोटा केला. एवढे कडू बोलून सुद्धा त्यांनी माझ्याशी फारच मधुर नाते निर्माण केले. मी दिलेल्या सूचना तंतोतंत अंमलात आणल्या. गावातील लोकांनी जीवाचे रान केले. त्याला साथ सोबत पाणी फौंडेशनच्या सर्व टीमची होती. काही दिवसातच आमचे नाते कित्येक वर्षाचे दृढ नाते आहे असे वाटायला लागले. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या कुटुंबाची घटक झाली व प्रसाद त्यांचा पण जीवाभावाचा “दादा” झाला.

दादा एक गोड बातमी सांगायला फोन केला.” अमोल सरांचा फोन.
काय म्हणताय सर सांगा की.”
दादा आपले वॉटर कप स्पर्धेचे टार्गेट पूर्ण झाले.”
म्हणजे तुम्ही आता राज्याच्या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचे प्रबळ दावेदार”
मला पण खूप आनंद झाला. स्पर्धेतील टार्गेट पूर्ण करणारे मराठवाड्यातील सक्करवाडी पाहिले गाव होते. मी सरांना सांगितले की आता एक दिवसभर मी गावात राहणार.
सकाळीच निघालो. दुपारी १२.३० पर्यंत पोहोंचलो. आत्ता गाव लागले होते कामाची गुणवत्ता सुधारण्याच्या कामाला.


अंगाची लाही लाही करणारे ऊन. गावकरी मात्र खुपच मस्तीत काम करत होते. शेवटी मी विनंती केली. आत्ता काम थांबवा. अमोल सरांनी सहभोजनाची व्यवस्था आता मात्र आंब्याच्या झाडाखाली केली होती. मस्त जेवण झाल्यावर ग्रामसभा चालू झाली.
एवढे कष्ट केल्यावर तुम्हाला बंद डोळ्यासमोर काय दिसतंय ते मी त्यांना पाहायला सांगितले.

हिरवंगाव परिसर, चांगली शेती, चांगले गाव.”
मी अनेकांना विचारात होतो. सगळ्यांच्या डोळ्यांसमोर हेच चित्र होते.
एक जण मात्र थोडा वेगळे चित्र पाहात होता.

गाव वॉटर कप स्पर्धेतील पाहिले बक्षीस घेत आहे.”

त्याच्या डोळ्यांसमोरील चित्र सगळ्यांनाच भावले. ग्रामसभा चक्क तीन तास चालली. नाचत, गात तर कधी प्रचंड हशा व शेवटी जायभायवाडीत जे घडले तेच झाले. आपल्या विवेकवाडी परिवार, डोंबिवलीचा सुहास कुलकर्णी म्हणजे आमचा अण्णा याने परिवारा तर्फ गावाला मदत म्हणून म्हणून एक लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर देवू केले.
भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या अतिमागास जिल्ह्यातील,अतिमागास तालुक्यातील “सक्करवाडी” वॉटर कपसाठी प्रबळ दावेदार आहे.
सक्करवाडीचा दुष्काळाविरुद्ध लढा देण्याची प्रेरणा सर्व महाराष्ट्रात पसरू दे आई भवानी !!!




२५.  साप चावला तरी थांबणार नाही....

भ्याव नसलेला भिवंन्ना काळे जेसीबी चालकाचे रात्रंदिवस काम करत जेसीबी मालक झाला. रात्रीची जेसीबी चालवण्यात त्याचा भारी हातखंडा. सिंगनवाडीच्या डोंगरावर तो काम करत होता. रात्रीची पाळी सुरु करण्याच्याआधी पाणी पिण्यासाठी तो अंधारात चालत असताना त्याचा पाय नेमका सापावर पडला. साप त्याचा पायाला चांगलाच डसला. सोबतच्या चालकांनी व गावकऱ्यांनी भयाण पावसात त्याला अंबाजोगाईच्या मेडिकल कॉलेजमध्ये आणले. सकाळी भिवंन्नाला भेटायला गेलो तर मर्द म्हणतो कसा,
साप डसला बघा. तरास लई झाला. सकाळच्याला ऑपरेटरला जा म्हटंल. मशिन बंद राहिली नाही पाहिजे. जेवढी चालवता येईल तेवढी चालव.गावाचं नुस्कान नाही झालं पाहिजे.”
मी त्याचा राकट हात हातात घेवून त्याच्या भावूक डोळ्यात पाहात राहिलो.

लंगोटवाडीच्या रणजितला लग्नाची हळद लागणार होती. पण घात होऊन व्हराडाच्या गाडीला अपघात झाला. रणजितच्या आजीचा त्यात मृत्यू झाला. गावातील श्रमदान बंद झाले. मंदिरा जवळच्या ग्रामसभेला रणजित समोरच बसला होता.
गावांनी परत जोरात श्रमदान सुरु करावं. खरी श्रद्धांजली आजीला त्यातूनच मिळेल.”
मी सुन्न होऊन रणजितचे वाक्य ऐकत होतो. गाव परत पेटले.

व्हरकटवाडीचे लिंबाजी वर्षापूर्वीच मरता मरता वाचले. आत्ता सत्तरीच्या वर वय पण गेले. श्रमदान करणाऱ्या लोकांना डोंगरदऱ्यात डोक्यावर पाण्याची घागर घेवून ४३ दिवस पाणी पाजत आहेत.
तर लिंबांबाईनी मागच्या वर्षी सलग ४५ दिवस खाडा न करता सलग श्रमदान केलेला विक्रम यावर्षी पण कायम ठेवला. यावर्षी त्यांचा पाय चांगलाच मुरगाळला होता. सहज पाय दाखवा म्हणालो तर चांगलीच सूज पायावर होती. पण श्रमदानात एक दिवसाचा बी खाडा नाही.
जिजाचा पोरगा नुकताच जन्मला होता. जगतो की मरतो सांगता येत नव्हते. फार जड अंतःकरणाने त्याला दवाखान्यात जावं लागले पण त्याचा दुसरा जीव मात्र गावातच होता. काल लेकराला थोडं बर वाटलं. जिजा पेढे घेवून श्रमदानाला हजर.

आमचे कॅप्टन मुंजाभाऊ भोसले. सत्तरीच्या वर वयं. दुपारी दोन असू की रात्रीचे ८ कधीही मुंजाभाऊ डोंगरावर जाणार व सलग समपातळीतील चर सलग खोदत राहणार.या माणसांनी तर कहरच केला. एक दिवस सलग २५ मीटरचा चर एका पाळीत खोदून काढला.
इतिहासात ऐकले होतं की देव, देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती असे म्हणणारे सरदार होते.वर्तमानात असे प्राण हातात घेवून दुष्काळाशी लढणारी मर्द मराठे गावोगावी दिसत आहेत.

२६.   करोडो मोलाचे सुख....

परळी तालुक्यातील डोंगररांगात वसलेला ऊसतोड कामगारांचा एक छोटा तांडा म्हणजे इंदिरानगर. सिंचनासाठी एक पण विहीर नसलेला, अनेक सोयीसुविधांपासून वंचित असणारे हे छोट गाव. पाण्याच्या कामासाठी पैसा यांच्या कडे कसा असणार ? यांच्या कडे होती जिकर, मेहनत आणि अफाट ताकद. अगदी छोट्या मुला पासून ते वयोवृद्ध महिलांच्या मध्ये पण. स्पर्धेच्या शेवटच्या काही दिवसात गावातील कामाने वेग घेतला आणि मोठा प्रश्न समोर आला तो मशीन मिळण्याचा. याकाळात सगळ्या मशीन गुंतलेल्या होत्या. मशीनच्या कामातील पूर्ण मार्क तांड्याला मिळणे जवळपास दुरापास्त झाले होते. श्रमदानाचे टार्गेट त्यांनी केव्हाच पूर्ण केले होते. शेवटचा दिवस साडेतीन हजार घनमीटर काम कमी पडत होते. कितीही प्रयत्न केला तरी एका दिवसात मशीनने तेवढे काम होणे शक्य नव्हते.

हार पत्करणार ते गौरसैनिक कसले. मुळातच बंजारा आणि प्रचंड ताकत. त्यांनी शक्कल लढवली शेवटच्या दिवशी सगळ्या गावाने मिळून एक दीड किलोमीटर लांबीची एक मीटर उंचीची व एक मीटर रुंदीची दगडी पोळ रचायचे ठरले. सकाळी सुरु करायचे आणि रात्री बारालाच थांबायचे. दीड किलोमीटर लांबीची दगडी पोळ पूर्ण झाली. मानवी श्रमदान पूर्ण झाल्यावर त्यानंतर होणारे श्रमदान मशीनच्या कामात धरले जाणार होते आणि तेही ३ गुणांका सह म्हणजे ४५०० घनमीटर काम पूर्ण झाले व तांडा स्पर्धेच्या पूर्व परीक्षेत पास झाला. यासर्व कामाचे फलित म्हणजे कुणाला फारसा माहिती नसणारा इंदिरानगर तांडा परळी तालुक्यात दुसऱ्या क्रमांकावर येवून सहा लक्ष रुपयांचे बक्षीस त्यांनी पटकावले.

हे सर्व काम करताना आम्ही स्वतःचे फोटो किंवा सेल्फी घेण्याचे खूप टाळले होते. गावकरी नाराज व्हायचे. काम पूर्ण झाल्यावर व बक्षीस मिळाल्यावर तुमच्यासोबत फोटो काढेल असा माझ्या बोलण्याचा सूर असायचा. आज इंदिरानगर तांड्याला खास कार्यक्रम होता. सगळ्यांच्या बरोबर फोटो काढल्यानंतर एक घोगरा आवाज कानावर आला नव्हे नव्हे सरळ त्यांनी मला खेचून बाजूला घेतले आणि समोरच्या पोराला म्हणाल्या “आमचा बी फुटू काढा की दादा संग” पारंपारिक बंजारा वृद्ध स्त्रियांनी एक सॉलिड फोटो काढायला लावला. “ तांड्यावर येत जा आम्हाला बरं वाटतय ! याद येती न तुझी” असे प्रेमाने बोलत एक आजी म्हणालीआपल्या दुगाचाच फुटू काढ,” तिची ती प्रेमळ फर्माईश आणि त्यानंतर मिळालेला खास बुंदीचा लाडू.करोडो मोलाचे सुख देवून गेला पाणीदार इंदिरानगर तांड्यावर.

बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१८

पाण्याची गोष्ट २ :- यंदाचा दुष्काळ भयाण..जमीन,झाडं, प्राणी, पक्षी, नाही तर मानसं पण करपू लागली.


१६.    दारूचे वाडगे व कोयता हातात घेणाऱ्या तरुणाच्या हाती कुदळ आणि फावडे.......



जिवंत राहण्यासाठी काही ही करण्याची नुसती ताकद आमच्या मनगटात आहे. नुसती ताकदच नाही तर बिनधास्त पणे आम्ही ते करतो जीवाची पर्वा न करता. मंग ऊस तोडी असो की दारू गाळण्याचे काम असो.
 
"कुणाच भ्याव नाही आपल्याला."

अवघ्या १५० उंबऱ्यांचे व ८५० लोकसंख्येचे एक छोटे गाव म्हणजे राडीतांडा- राडी लमाण तांडा. अगदी लहानपणापासून दारू गाळायची चूल आमच्या कोवळ्या हातांनी पेटवायला आम्ही शिकलो तर हातात कोयते घेवून ऊस तोडीसाठी शाळा सोडून गावोगाव फिरस्ते होण्याची सवय सहज अंगवळणी पडल.

यंदाचा दुष्काळ भयाण..जमीन,झाडं, प्राणी, पक्षी, नाही तर मानसं पण करपू लागली.
 
"आम्हाला बी जगायला पाणी लागते हो.....काम नाही हाताला...."

गावात नवीन तरुण ग्रामसेवक आला. विनोद देशमुख.....जमीनदार पण काही तरी करायचे म्हणून ग्रामसेवक पद त्याने घेतलेले. घरून विरोध असून विनोदला काही तरी करून दाखवायचे होते. आपल्या हुकुमती कल्पकतेने त्यांनी अनेक गावांचा कायापालट केला. दोन वेळा राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळाला.

पाण्याची समस्या भयाण होती. याच काळात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा अंबाजोगाई तालुक्यात सुरु झाली. राडी तांड्यानी भाग घेतला. खास त्याच्यासाठी घेतलेल्या ग्रामसभेत माझा मित्र रवी देशमुखने मला राडी तांड्याला नेले. विनोद व सरपंच श्री राठोड यांनी चांगलीच तयारी केली होती. अख्खे गाव ग्रामसभेला होते. मला सभेचे अध्यक्ष करण्यात आले.

"दुष्काळ मदत कार्याला ज्ञान प्रबोधिनी नक्की मदत करेल पण तुम्ही दारू पिणे कोण कोण सोडणार....."
असे म्हंटल्यावर कुणीच पुढे यायला तयार नाही. एकाने दारू सोडली तर १०,००० रुपये पाण्याच्या कामासाठी. असा प्रस्ताव मी ठेवला. सर्वत्र शांतता होती....शेवटी गणेश उठला....

" सेवालाल महाराजांची शपथ घेवून मी सांगतो की यापुढे मी दारू पिणार नाही."
त्यानंतर एक एक करत १० जणांनी दारू सोडण्याची जाहीर शपथ घेतली व ज्ञानप्रबोधिनीकडून १ लक्ष रुपयाचे जेसीबी मशीनचे ठरले.
 
आज सकाळी सहा वाजताच सर्व तरुण लोक तयार होती. १३७ तरुण आपल्या हातात आज कोयत्याच्या जागी कुदळ,टिकाव व फावडे घेवून आपल्या विस्तीर्ण गायराना वर पाणलोटाचे काम करण्यासाठी तयार होती. जोरात काम सुरु झाले. मजबूत हाताला अजूनसाथ देण्यासाठी जेसीबीचा एक मजबूत हात १५० तासांसाठी प्रबोधिनीने उपलब्ध करून दिला.....एक नवी निर्माण कार्याची चळवळ सुरुझाली......आपले पण तन, मन आणि धनाची साथ या तरुणांना हवी आहे.....आपण त्यांना हताश नाही करणार......जमेल तशी मदत करा....

१७. कैसे जीते है यँहा लोग ....यहाँ क्यू रहते है ”
आनंद कुलकर्णी माझा एक छोटा मित्र आज अचानक फोन न करता आला. खुपच अस्वस्थ वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावरून व सप्टेंबरच्या थंडीत देखील त्याला दरदरून घाम सुटला होता. तो स्वतः आल्यावर मला पाणी मागतो पण आज मी उठलो व त्याला पाणी दिले. थोडया इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या; पण आनंदचा मूड काही वेगळाच होता.
शेवटी त्याच्या मनातील विचारांना त्यांनी वाट करून दिली. कापऱ्या आवाजात तो म्हणाला,

दादा, आमच्या गावातील शेतकरी बाळूने आत्महत्या केली. त्याचा पोरगा डिप्लोमा करत होता. फिस भरण्यासाठी पैसे नव्हते. माझ्या बाबांनी त्याला मदत करायची ठरवली होती. पण त्यांनी मदत देण्याच्या आधीच स्वतःला संपवले.”

बीड जिल्ह्यातील हे आत्महत्त्येचे सत्र काही थांबत नव्हते. मुंबईचे काही तरुण मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती तेथील लोकांना समजावी म्हणून महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी सार्वजनीक ठिकाणी उपवासाला बसणार होती. परिस्थितीत नेमकी समजून घेण्यासाठी दहा जण अंबाजोगाईला आली. त्यांना उपलब्ध पाण्याची परिस्थिती पाहिली. इथले तलाव पाहिले. इथली पाणी साठवून ठेवण्याच्या भांड्यांनी गच्च भरलेली स्वंयपाक घरं पाहिली. १५ ते २० दिवसांनी येणारे पाणी आणि आत्ता पुढे कसे होईल या सर्व प्रश्नाची उत्तरं मला पण देता येत नव्हती.

एक तरुण सहज म्हणून गेला, “ कैसे जीते है यँहा लोग ....यहाँ क्यूँ रहते है ? ”

नाना आणि मकरंदनी पुढाकार घेतला. त्याचा परिणाम खूप चांगला दिसू लागला.
परिस्थिती खूपच बिकट असणार हे लक्षात येत होते.

नरेंद्र गोडसे ज्ञान प्रबोधिनी, डोंबिवलीच्या वृंदाताईचा मुलगा.

दादा, आज आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे रियूनियन होते. आम्ही सर्वानी एक व्हॉटसएप ग्रुप केला आहे व त्यात झालेल्या चर्चेतून आम्हाला काही तरी आर्थिक मदत करावयाची आहे तू थोडं मार्गदर्शन करशील का ? “

“हो नक्की करेल की पण तुमच्यातील काही जणांनी येवून येथील परिस्थिती समजून घ्यावी. काय उपाय करता येईल व त्यातून काय मदत करता येईल याचे वेगवेगळे मार्ग समजून घ्यावीत व मग आपण ठरवू मदत कोणती करायची.”

नरेंद्रसोबत अमित दातार व त्याची इतर अनेक मित्र अंबाजोगाईला आली. त्यांनी येथील परिस्थिती आपल्या मित्रांना समजून सांगितली. स्वतः पाहून आल्या मुळे त्यांच्या सांगण्यात खुपच वास्तवतेच भान होते. चांगला प्रतिसाद मिळाला. लगेच एक लक्ष रुपये जमा पण झाली.

तुम्ही इकडे येवून ठरवा आता कोणती मदत करायची.” अमितला माझे ठरलेले उत्तर असे. अमित ....सोबत परत आला त्यांनी परिस्थिती पाहिली व गुरांच्या पाण्याची व्यवस्था ही तात्पुरती मदत म्हणून सुरु करण्याचे ठरले.

मार्च सुरु झाला तसे अमितचे फोन परत सुरु झाले.

दादा, आता पुढील रकमेचे काय करायचे आहे ?”

माझे उत्तर तेच होते. “ या इथे आपण मिळून ठरवू.” यावेळी अमित सोबत अजून तीन जण होते. आम्ही अनेक गावांना भेटी दिल्या. अंबाजोगाई तालुक्यात पाणी फौंडेशनच्या माध्यमातून वॉटर कपस्पर्धे मुळे एक नवीन चळवळ सुरु झाली होती. ती ज्या गावामुळे सुरु झाली त्या गावाला आम्ही भेट दिली व ज्या सामान्य माणसांमुळे सुरु झाली त्या गोविंद जाधव व त्याच्या टीमला आम्ही भेटलो. गावाचा सरपंच प्रमोद भोसले ज्ञान प्रबोधिनीच्या ग्रामीण प्रज्ञा विकास कार्यक्रमाचा विद्यार्थी. अमित व त्याच्या मित्रांचे व गोविंद भाऊ आणि प्रमोदचे नाते जुळायला वेळ लागला नाही.

कुंबेफळमध्ये काम सुरु करण्याचे ठरले. परत प्रश्न काम कोण करणार. अमित स्वतः परत काल अंबाजोगाईला आला. जेसीबीने विहिरींचे पुनर्भरण करण्याचे काम सुरु झाले. आज मनिष त्याचा दुसरा मित्र पण आला. ते दोघंही कुंबेफळ मध्ये राहणार आहे. गोरापान अमित, कुंबेफळच्या ग्रामस्थांसोबत श्रमदान करू लागला. काल रात्री मी अमित कसा आहेस म्हणून त्याला भेटायला गेलो. सहज त्याला प्रश्न केला, “कसं वाटतय ?”

एकदम मस्त.”

यायचं का अंबाजोगाईला ?”

नाही रे, मी गावातच राहतो.”

मी प्रमोदला म्हणालो, “अमितचा असा पाहुणचार करा की आख्खे कुंबेफळ मुंबईला गेले तर त्यांची काळजी अमित घेईल.”

दुष्काळाशी लढाई करणाऱ्या कुंबेपळकरांना हे आव्हान फार आवघड नव्हते....सर्व जण हसून म्हणाले नक्की दादा...मी अमितकडे पाहिले तो म्हणाला, “ येवू देत न आम्ही पण कमी नाही पडणार.”

सकाळपासून अमितला फोन लावतोय. तो काही फोन उचलत नाही. शेवटी आत्ता फोन उचलला, “ ते फोन चार्जिंगला लावून काम करायला गेलेत.” कुंबेफळच्या एका ग्रामस्थानी सांगितले.
मी अमितच्या फोनची वाट पाहतो आहे तो मात्र मस्त कुंबेफळांच्या सोबत ४२ अंश तापमानाच्या भर उन्हातील कामात रमला आहे.


१८.         महानगरातील लोकांना दुष्काळाशी काय देणे घेणे......

घराच्या बाहेर पडणे म्हणजे स्वतः हून स्वतःला भाजून घेणे असे अंगाची लाही लाही करणारे ऊन...काल दुसरीच संतोषच्या फोन येवून गेला होता. मी राडी तांड्यावर आम्ही करत असलेल्या कामाचे छायाचित्रण करण्यासाठी सत्यमेव जयते चे छायाचित्रकार ख्रिस्तोफर लोबो व प्रसाद बरोबर खूपच व्यस्त होतो. काम झाल्यावर मी संतोषला फोन केला.

नमस्कार, दादा कुठेयत ? भेटायचे होते.”

दुसऱ्या दिवशी भेटायचे ठरले. सकाळी ११ ला मी रविवार पेठेतील संतोषच्या घरी गेलो. त्या भागात पोहोंचताच माझे मन भूतकाळात गेले.

अंबाजोगाईतील मंडी बाजारातील एकदम नवीन सुरु झालेले रसिक क्लॉथ सेंटर. दुकानात प्रवेश करताच खूप प्रेमाने हसून या म्हणणारे प्रेमचंदजी कुंकूलोळ. शुभ्र पांढरे कपडे व तशीच नेटकी पांढरी गांधी टोपी. रसिक माझ्या शाळेतील त्यांचा मुलगा. माझा चांगला मित्र. संतोष त्याचा धाकटा भाऊ. प्रेमचंदजींच्या मृदू स्वभावामुळे आम्हाला ते खूप आपले वाटायचे. काळाची गती खूप न्यारी असते. संतोष आपल्या शालेय जीवनाच्या एका धक्यातून बाहेर पडतो न पडतो तोच प्रेमचंदजीचे निधन झाले. रसिक व संतोषसाठी हे सर्व खूप अवघड होते. आजोबांचा मात्र
संतोषवर खूप जीव. त्यांनी सरळ संतोषला व्यवसायाचे धडे द्यायला सरुवात केले.
 

आपल्या कामाच्या ठिकाणी प्रचंड चोखंदळ असणारा संतोष आपल्या मित्रांच्या बाबतीत प्रचंड हळवा. अविनाश मुडेगावकर त्याच्या खास मित्रांपेकी एक. पुण्यात करमेनासे झाले की सरळ गाडी काढून अंबाजोगाईत यायला त्याला फार वेळ लागत नाही. मित्रांच्या प्रत्येक  कार्यात,अडीनडीला धावून जाणारा जीवाभावाचा सखा.
मी त्या जुन्या वाड्यात प्रवेश केला. समोर संतोष उभा होता. ऊन चांगलेच तापले
होते.


मग दादा अजून काय काय चालले आहे ? ”

सध्या तरी ज्ञान प्रबोधिनी तर्फ दुष्काळाचे काम जोरात चालू आहे.”

कुठे आणि कसे चालू आहे ?”

माझ्या मनात विचार आला की हा उगीच टाईमपास तर करत नाही न ...पुण्यातील बिल्डरला काय दुष्काळाशी देणे घेणे. मी सहज त्याला म्हणालो, “चल मग येतोस का पाहायला ?” माझी स्वतःची तयारी फार जाण्याची नव्हती. संतोष लगेच म्हणाला, “चला मग निघू आपण. सोबत अविनाशला घेऊ.” आता मला पण जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. एरवी अविनाश दुपारी बाहेर पडणे अवघड त्यात त्याला ही कल्पना नाही की आपल्याला राडी तांड्याला जायचे आहे. त्यात तो पत्रकार साहेब.....पण अविनाश पण लगेच तयार झाला.

फुर्तीले ग्रामसेवक विनोद देशमुखला सोबत घेवून आम्ही भर मध्यान्ही निघालो. माझ्या डोक्याला तरी रुमाल होता पण संतोष मात्र डोक्यावर काही न घालता आमच्या सोबत फिरत होता. श्रमदानातून केलेले १४०० सलग समतल चर,ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून होणारा माती बंधारा, जेसीबी आणि पोकलेननी चाललेले नाला खोलीकरण व बाध बंदिस्ती, शोषखड्डे, संगणकीकृत ग्रामपंचायत यासर्व गोष्टी खूप समजून घेऊन संतोष ऐकत होता.
 त्याला पोकलेन व जेसीबी फारच आवडते. “फार जबदस्त काम करते हे मशीन आपण त्या कामाच्या जवळ जाऊ की.” संतोष मध्ये लपलेला छोटं मूल जाग झालं. तेवढ्या उन्हात आम्ही पोकलेननी चाललेले काम पाहण्यासाठी अर्धा किलोमीटर चालत गेलोत. सर्व काही खूप समजून घेत चालले होते.

दुपारची चारची वेळ झालेली होती, अविनाशनी जेवण पण नव्हते केले. त्याला भुकेची जाणीव झाली. संतोष मात्र सर्व पाहण्यात दंग. शेवटी आम्ही परत निघालो.....

आपल्या भागातील लोकांसाठी काही तरी केलं पाहिजे. पुण्या मुंबईचे लोक फार करत आहे आपण पण केले पाहिजे. मला काही तरी करावे वाटते.” संतोष शांत आवाजात मनातून बोलत होता.

तुला काय करायला आवडेल.”

तुम्हाला काय वाटते ते सांगा दादा मी करतो.”

या भागातील लोक ऊस तोड कामगार. रोजगार हमीचे नोंदणी झालेले फक्त चाळीस टक्के लोक. इतर लोकांच्या हाताला रोजगार नाही. ते प्रचंड काम करत आहेत पण त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था झाली पाहिजे न .....माझे बोलणे संतोष शांत पणे ऐकत होता.

ठीक आहे ! दादा, जे लोक स्वतःच्या हातानी हे पाण्याचे काम करत आहेत न त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला देण्याचा माझ्या परीने मी वाटा उचलतो. ही सुरुवात आहे अजून काय करता येईल ते पाहतो .” संतोषनी आपला संकल्प केला.
 

आज सकाळी मी व विनोद तांड्यावर गेलो व संतोषने दिलेली पहिली रक्कम. माझा
प्रिय मित्र मनोज सुपेकर जो फरीदाबादला आहे, माझा दुसरा मित्र विशाल सिंग जो त्रिवेंद्रमला आहे तर माझा एक छान मित्र आदित्य घाटे जो सध्या अमेरिकेला आहे. या सर्वांच्या मदतीचे धनादेश आज आम्ही ग्रामस्थांकडे सुपूर्त केले....
 

सर्व उपस्थित लोकांच्या चेहऱ्या वर खूप समाधान होते. उद्या अजून जोशानी लोक कामाला लागतील.....मी हळूच गणेशला म्हणलो अजून पाच लोकांनी दारू सोडली पाहिजे ही जबाबदारी तुझी ....तो हसत म्हणाला, “का नाही दादा नक्की सोडतील..”



१९.        दुष्काळ नक्की हारणार........ कारण माणुसकी जिंकली आहे !!!

स्पर्धेतील दोन जबरदस्त प्रतिस्पर्धी पण एकमेकांचे चांगले मित्र. एक काळ क्रिकेटचे मैदान गाजवणारे आज आपल्या गावासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत.खापरटोनचा गौत्तम चाटे व राड़ी तांड्याचा विनोद देशमुख. दोघांनी काम प्रचंड केले. काल निवांतपणे माझ्या घरी एकमेकांची मज्जा घेत नाष्टा केला ...मैत्री जिंकली !!!!

खापरटोनचा गौतम चाटे खुपच अस्वस्थ होता. त्याच्याकडील बांधबंदिस्ती होणे स्पर्धेच्या काळात शक्य नव्हते. त्याची अस्वस्थता पराकोटीला पोहोचली होती. ज्ञान प्रबोधिनीची एक जेसीबी राडीतांड्या वर काम करत होती तर दुसरी कोळकानडी. दोन्ही जेसीबीचे चालक खूप कुशल व २० ते २२ तास काम करणारे. विनोद देशमुख व हाऊ देशमुखला मी गौतमची अस्वस्थता सांगितली. खरं पाहता ही तिन्ही गावे एकमेकांचे प्रतिस्पर्धी. विनोद व हाऊने आपले दिलदारी दाखवली व खापरटोनला जेसीबी पाठवण्यास तयारी दर्शवली....माणुसकी जिंकली !!

रात्री ९.३० ला अनिकेतदादा लोहियाचा मला फोन आला. “प्रसाद, सकाळी सहा वाजल्या पासून मी घरी गेलो नाही. राडी तांड्याला येणे जमेल का माहीत नाही. माझ्या जवळ गाडी पण नाही.”

दादा प्रचंड थकला होता त्यात त्याला छळणारे आजारपण. मी थोडा लहान भावाच्या अधिकाराने हट्ट केला...”दादा तू येच काही करून मुलांना प्रेरणा मिळेल व त्यांच्या मनातील ठिबक सिंचनाचा प्रश्न संपेल.”
 

दादा रात्री १०.३० ला आला व त्याने राडी तांड्याच्या ठिबक सिंचनाचा प्रश्न मानवलोकच्या माध्यमातून संपवला ....सगळे संपले रात्री १२ वाजता .....परत माणुसकी जिंकली !!!

हाऊ देशमुख कोळकानडीत काम करत होता. त्याने गावाला एक छान वळण लावले. फक्त आपले गाव चांगले होऊन नाही चालणार तर अनेक गाव चांगली झाली पाहिजेत ...त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे...एका प्रवासात मी त्याला बोलत होतो. समस्त महाजनचे सगळे मित्र दुष्काळ मदतीसाठी मुंबईहून आली होती. मी हाऊला त्यांना मदत करण्यास सांगितले. आज हाऊ फक्त स्वतःच्या गावासाठी नाही तर समस्त महाजनच्या माध्यमातून ४० गावांच्या पाणी प्रश्नासाठी मदत करत आहे ......परत माणुसकी जिंकली !!!!

सत्यमेव जयतेचे दिग्दर्शक सत्यजित भटकळ व सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी ग्रामसभा घेण्यासाठी श्रीपतरायवाडीला आले होते. दोघांचे बोलणे झाले खरं तर कार्यक्रम संपला होता. सत्यजितजीनी मला बोलण्यास सांगितले. का ते माहीत नाही ....मी बोलायल उठलो व माझ्या मनातील खंत बोलून दाखवली. श्रीपतरायवाडीत लोक सहभाग जमत नव्हता.त्यांच्या समोर मी गावकऱ्यांनी लोकसहभाग जमा करावा असे आवाहन केले ...सर्वत्र शांतता होती....एक छोटा मुलगा उठला व त्याने आपल्या खिशातील दहा रुपये दुष्काळ निवारणासाठी लोकसहभाग म्हणून दिले ......परत माणुसकी जिंकली !!!!!!

आपला प्रचंड व्यस्त कार्यक्रम पूर्ण करून सत्यजित भटकळ व अतुल कुलकर्णी परत मुबईला निघणार होते. मी सहज त्यांना म्हणाला की ज्ञान प्रबोधिनीने केलेले वरपगाव मधील नदी पुनर्जीवनांचे काम पाहणार का ? त्यांनी लगेच हो म्हणाले. पाच मिनिटासाठी आलेले ते दोघं अर्धा तास थांबले. ते प्रचंड काम पाहून ते खूष झाले. निघताना सत्यजित सरांनी मला घट्ट मिठी मारली तर अतुल कुलकर्णीनी माझा हात घट्ट हातात घेत म्हटले पाऊस पडल्यावर मी नक्की परत येणार.....परत माणुसकी जिंकली !!!

स्पर्धेचा उद्या शेवटचा दिवस ......संध्याकाळी मी शांतपणे विवेकवाडीत गेलो. निघताना गेल्या ४५ दिवस चालक म्हणून साथ देणाऱ्या खंडूने मला चारचाकी शिकण्यासाठी मागे लागला व त्याने मला चालकाच्या जागी बसवले....मी तयार नव्हतो पण खंडूचा आग्रह मोडवत नव्हता. मी चक्क एक किलोमीटर गाडी स्वतः चालवली ....आता नवीन शिकण्यासाठी काही तरी मिळाले....

मी, सागर कोटेचा, हाऊ राहिलेल्या गावात मशीन देण्याचे काम करत होतो. आकाश पूर्ण भरून आले होते. सागर कोटेचा बीडचा पण समस्त महाजनच्या माध्यमातून आम्ही सोबत काम काम करत होतो. सकाळी ७ वाजता तो बीडहून यायचा व रात्री मग बारा, एक ..माहित नाही पण सागर ने प्रचंडकाम केले. अंबाजोगाईच्या कामात सागरचा खूप मोलाचा वाटा आहे. आम्ही बोलत असताना आकाश पूर्ण काळवंडून गेले. जोरात वारा व त्यासोबत पाऊस सुरु झाला .......दुष्काळ नक्की हारणार कारण माणुसकी जिंकली आहे !!!




२०.        मी खूप तृप्ततेने हसलो......!!!!

ड्रोनने छायाचित्रीकरण करताना सरपण, लाकडे, अशा गोष्टी येत होत्या.”

 विनोद, दादा, हे राडीतांडा आहे. त्या गोष्टी तर इथं असणार.”
 

काल विनोदचा फोन आला, “दादा कधी येता तांड्याला ?”
 

का रे काय झाले ?”
 

तांडा लई सुंदर दिसायला आहे.”.......मी मनातून हसलो !

खापरटोनच्या चांगदेवनी गेल्या ४५ दिवसात प्रचंड काम केलं.
काल त्याचा फोन आला, “काय चाललंय दादा, वरपगाव मध्ये आलो आहे. तुझं काय चालू आहे ?”
निवांत झोप काढली बघा. गेले तीन दिवस झोपलोच नव्हतो. आणि सगळ्यात महत्वाचे काल आपण गावातील दोन तलाव जे जोडायचे होते ते तलाव, रात्र भर काम करून जोडले बरंका !!”
तलाव जोड प्रकल्प हा बहुतेक लोक सहभागातून आणि खूप कमी पैशात मराठवाड्यात पहिल्यांदाच झाला असेल आणि आपल्या सगळ्या जेसीबीच्या ऑपेरेटेरला नवीन कपडे केले हं !!” .......मी मनातून खूष झालो !!


आता या पुढे वरपगाव मध्ये मशीन चालणार नाही. तुम्ही चूक काम केले.
 

चुकलं दादा. आता तुम्हीच मार्ग सांगा.” माळी सर व अंकुश शिंदे म्हणाले.
 

आधी चूक दुस्र्स्त करा मग पुढचे पाहू.”
 

काल सकाळी माळीसरांचा फोन आला, “ दादा. रात्र भर जागून काम नीट करून घेतले. रात्रीचे जेवण पण तिथेच केले. पावसामुळे लई थंडी वाजत होती पण काम लई मस्त झाले.”
वरपगाव मध्ये ज्ञान प्रबोधिनी, मित्र व गावकरी यांच्या मदतीने २ किलोमीटर नदीचे पात्र पुनर्जीवित केले.......मला मनातून समाधान वाटले !!!


काल सकाळी १० वाजता प्रमोद भोसलेचा (सरपंच, कुंबेफळ)  फोन आला.

दादा कालच्या पावसामुळे आपण ज्या ७० बोअर व विहिरींचे पुनर्भरण केले होते त्यासर्वांना पाणी आले. विहिरी चांगल्या भरल्या. तुम्ही या आपण सगळे पाँईंट पाहू.” प्रमोद प्रचंड खूष मी पण !!!!
कोळकानडीचा हाऊ देशमुख, कुंबेफळचा प्रमोद व मी अनेक गावात फिरून आलो होतो. प्रचंड भूक लागली होती. मी हाऊला गावात काही तरी खायला करायला सांगितले. गावात गेलो तर तेथील तयार केलेल्या मोठया गाव तलावात पहिल्या पावसात ५ फुट पाणी साचल्याचे कळले. नदी प्रवाहात केलेल्या डोहात बरच पाणी साचलेले होते. केवळ १० मिमी पावसात जवळचे बोअरवेलचे कोरडे पडले होते ते दोन तास चालायला लागले. सगळे पहिल्या नंतर नदीच्या काठीच एका मस्त झाडाखाली भरपेट जेवण केलं....
 

लई जेवण झालं दादा.” हाऊ म्हणाला ....मी खूप तृप्ततेने हसलो!!!!!


२१.  वास्तवातील “कल्पनेचा फिनिक्स”....

आपण अनेक कल्पनेतील कथा ऐकत असतो. अशाच एका वास्तवातील कल्पनेच्या फिनिक्सला आपल्या समोर परत ती अफाट फिनिक्सभरारी घेताना पाहून त्यांच्या स्वतःची अर्धांगिनी “कल्पना” ज्यावेळी म्हणते,
 

मला पाहिजे होता तसाच तो आता झाला आहे.”

हे वाक्य ऐकताना पण मला एक जबरदस्त अनुभूती येते. तिने स्वतः त्याची फिनिक्स भरारी जवळून अनुभवली होती.

तसा तो बेदरकार,बिनधास्त,कलंदर काही जण आवारा पण म्हणत असतील. त्यांच्या नावाचा अर्थ पण स्वतःचे घर नसलेला. मला सापडलेला त्याच्या अस्तित्वाचा अर्थ मात्र स्वतःचे घर फक्त आपले न मानता सर्वांची घरे आपली मानणारा असा तोअनिकेत” !!!

घरात समाजसेवेचा वारसा असला तरी आपल्या मस्तीत जगणारा अनिकेतदादा लोहिया मी पाहतो तसा तो हरहुन्नरी. त्यात माझ्या खूप जवळच्या मित्राच्या बहिणीचा नवरा. म्हणजे आमच्या कल्पनाताईचा तो नवरा. उंचापुरा, सगळ्या आधुनिक स्टाईल जोपासणारा. वेगळा वाटायचा.
मानवलोक व मनस्विनी हे अंबाजोगाईत बाबूजी व भाभीनी उभी केलेली परिवर्तनाची चळवळ. बाबूजींनी पसारा खूप वाढवला होता. त्या पसाऱ्याचे कार्यवाहपद अनिकेतदादाकडे आल्यानंतर अनेक कुचकट वाक्य मी स्वतः पण ऐकली होती. अनिकेतदादाला बाबूजींनी निर्माण केलेला वारसा जपावयाचा होता, वाढवायचा होता त्या सोबत स्वतःची वेगळी ओळख निर्माण पण करायची होती. अतिशय अवघड जबाबदारी त्याने कशी स्वीकारली हेच मला कळत नव्हते.

खांडसरीचा प्रकल्प अयशस्वी झाल्याने त्याच्या वाट्याला आधीच खूप बदनामी आली होती. “मानवलोकची मसनवाट हा पोरगा करणार” असे अनेकांनी बोलून पण दाखवले. यासर्व परिस्थितीत दादाची मात्र एक विलक्षण बदलाची व संघर्षाची यात्रा चालू झाली होती. तो झपाटल्यागत कामाला लागला. प्रचंड प्रवास, अनेक लोकांना भेटणे, अनेक कार्यक्रम या सर्वात स्वतःला अंर्तबाह्य बदलणे फार जीव घेणे असते याचा अनुभव मी स्वतः पण घेतलेला आहे. अनिकेतदादाच्या स्वतःच्या शब्दात सांगायचे झाले तर, “ वाल्याचा वाल्मिकी होण्यासारखे ते होते.”
मला हे त्याचे वाक्य काही पटले नाही फार जास्तच स्वतःचे केलेले परखड मूल्यमापन वाटले. ताईला मी त्याचे हे वाक्य सांगितले. त्यावर तिची खूपच बोलकी प्रतिक्रिया होती, “ तो कधीच वाल्या नव्हता. अफाट सामर्थ्य असणाऱ्या शक्तीला नीट दिशा मिळत नव्हती म्हणून त्याच्याकडून काही चुका व्हायच्या पण मुळात त्याची प्रवृत्ती नवनिर्माणाची होती. त्याच्या शक्तीला योग्य ती दिशा मिळाली आणि मग त्याचे कर्तृत्व अधिक देखणे झाले.

नवीन उपक्रम,नवीन संकल्प,नवीन क्षितिजे दादाला खुणावत होती व तो एका नंतर एक ते पूर्ण करत होता. त्याच्या सोबत अनुभवलेला पाहिला उपक्रम म्हणजे गरीब शेतकऱ्याच्या मुला मुलींचा सामुहिक विवाह सोहळा. कल्पना ताई म्हणते ते पहिल्यांदा मला यात जाणवले. दादा प्रचंड स्पष्ट वक्ता. मनात काही न ठेवता तो जे काही मनात आहे ते मोकळेपणाने बोलणारा.

तो एकदा का भडकला की आठ दिवस घर तणावात.” कल्पनाताई

पण त्याने स्वतःला पूर्णपणे बदलले परिस्थिती खूप शांतपणे हाताळणे, समजून घेवून वागणे. त्रासदायक गोष्टीना पण शांतपणे सामोरे जाणे हे तो अगदी सहजपणे करत होता. अंबाजोगाईत झालेल्या सक्षम जलनीती परिषदनंतर मात्र त्याचे काम प्रचंड वाढले. घराची पूर्ण भिस्त कल्पनाताईंवर. दादाची दगदग प्रचंड वाढली. त्याने स्वतःच्या प्रकृतीकडे पण लक्ष दिले नाही. असाच एक मोठा प्रवास करून तो औरंगाबाद व तिथून बीडला आला. तिथून त्याचे गुढघे दुखायला लागले. अंबाजोगाई येई पर्यंत त्याचे सगळे सांधे आखडून गेले होते. त्याला कुठलीच हालचाल करता येत नव्हती. त्याला चक्क उचलून घरात न्यावे लागले.

एका भयानक जीवघेण्या संघर्षाची सुरुवात झाली. नेमके काय झाले हे कळत नव्हते. आपले शरीर ज्यावेळी आपल्याला छळते त्यावेळी इतर त्रास फार किरकोळ वाटायला लागतात. एक जीव घेण्या नैराश्याच्या खोल खाईत आपण स्वतःला जळताना स्वतःच पाहात असतो. हे सगळे सहन करणे खूप कठीण होते. दादाला स्वतःला व आमच्या कल्पनाताईला पण.

स्वतःची नोकरी आठ तास, मुलांच्या सगळ्या गोष्टी,घरात येणारे जाणारे खूप, बाबूजींची काळजी आणि त्यात दादाचे हे भयानक आजारपण .....मुळात खूप वेगळ्या धाटणीत तयार झालेल्या ताईला हे सांभाळणे कठीण पण तिला समजले होते आता यावेळी खचून नाही चालणार. तिने,घरातील सर्वांनी,मानवलोकच्या सर्व कार्यकर्त्यांनी व दादाच्या सर्व मित्रांनी दादाला एक जबदस्त प्रेरणा देण्याचे आव्हान स्वीकारले.

राजेंद्रसिंह राणाच्या सोबत स्वीडनला त्यांना मिळालेला पुरस्कार घेण्यासोबत जाणाऱ्यांच्या यादीत अनिकेतदादाचे नाव होते. त्याला पश्चिमीदेशातील सर्व महत्वाच्या लोकांसमोर मानवलोकनी केलेले आपल्या भागातील काम सादर करण्याची संधी मिळणार होती. दादाला मात्र स्वतःला स्वतः उभारता येत नव्हते. त्याचा जीवघेण्या आजारपणा मुळे आयुष्यभर असेच पडून रहावे लागणार का? हा छळनणारा विचार त्याच्या मनात घर करू लागला. त्यावेळी मात्र कल्पनाताई व मानवलोकच्या सर्व परिवाराने चंगच बांधला.....अनिकेत दादांनी या विदेश मोहिमेस गेलेच पाहिजे.

यासर्वाचा खूप चांगला परिणाम दिसू लागला. दादाच्या प्रकृतीत चांगले बदल दिसू लागले. तो झपाट्याने बरा होऊ लागला. पूर्ण बरा नसताना त्याने स्वीडन दौरा पूर्ण केला.

तो जो बाहेर पडला न तो त्याने परत पहिलेच नाही. झपाटल्यागत त्याने कामात झोकून दिले.” कल्पनाताई

स्वीडन नंतर मग सुरु झाला होळना नदी पुनर्जीवनाचा प्रकल्प. यात प्रचंड भगीरथ प्रयत्न करावे लागणार होते. दादा पूर्ण बरा झाला नव्हता पण नदी मात्र पुनर्जीवित करण्याचे सर्व काम त्याने पूर्ण केले. बीड जिल्यातील भयानक दुष्काळ. एक मोठं आव्हान होते. अनेक गावांना मदत करणे. लोकांना प्रोत्साहन देणे. काम नीट चालले आहे का नाही ते बघणे अगदी काम नाका तोंडाशी आले होते. पण पट्टीच्या पोहणाऱ्याला भोवऱ्याची किंवा तुफानाची काय भीती ....

जब नाव जल में छोड दी
तुफानोमे ही मोड दी
दे दी चुनोती सिंधूको फिर आर क्या और पार क्या ........

एक भन्नाट काम दादाचे चालू होते. त्याची काम करण्याची जिद्द आम्हाला ही प्रेरणा देत होती. त्याला दोन तीन दिवसातून एकदा तरी भेटल्याशिवाय आतून पेटल्यागत वाटायचे नाही. कधी सकाळी तर कधी भर दुपारी तर कधी भर मध्य रात्री आम्ही एकमेकांना भेटत होतो.
एक प्रचंड ऐतिहासिक काम अंबाजोगाईने अनुभवले.....पण मी मात्र पाहत होतो एका 

फिनिक्सभरारीला....... आणि वास्तवातील “कल्पने”च्या “फिनिक्स”ला


२२.  आज मात्र मनातून जोरात म्हणावे वाटत होते, “ अभिनंदन शेपवाडी

शेपवाडी अंबाजोगाई लगतचे गाव. बरीचशी जमीन आता प्लॉटींगसाठीची. आता चांगला भाव मिळणार. या गावात जलसंधारणाची कामे होतील असे काही वाटत नव्हते. २०१२ ला ज्ञान प्रबोधिनीचा पाण्याच्या जागर याच गावातून सुरवात केला. गावातील तरुण राम शेप,कैलास शेप,सिद्धार्थ वेडे, रमेश शेप ही मंडळी ज्ञान प्रबोधिनीच्या जलसंधारणाच्या कामात आपले गाव सोडून इतर गावात मला मदत करायची.

यावर्षी पाणी फौंडेशनचे प्रशिक्षण घेवून कैलास,नागनाथ व रमेश शेप तसेच रेखा ताई आल्या. त्यानंतर गावाची ग्रामसभा घेण्यात आली. बाळासाहेब शेप,अंकुश ढोबळे, व गावातील जेष्ढ मंडळी उपस्थित होती. संख्या मोजून ३० ते ३५. प्रशिक्षण घेवून आलेल्या लोकांचे अनुभव ऐकत होतो. जल आरोग्याच्या दृष्टीने गाव अत्यंत आजारी. उन्हाळ्यात सर्व विहिरी, कुपनलिका बंद. शेवटी टँकरनी गावाची तहान भागायची. अनुभव ऐकतानाच बालासाहेब शेप इतका खूष झाला की आपल्या गावातील चार जण काय जबरदस्त पाण्यावर बोलत आहेत. त्यानंतर माझे बोलणे सगळ्यांनी एकूण घेतले जवळपास ४५ मिनिटे. नंतर संतोष शिनगारे (पाणी फौंडेशन ) आला. तो पण सर्वांना बोलला.

यासर्वाचा एकूण परिणाम असा झाला की पहिल्याच ग्रामसभेत ६० हजार लोकवर्गणी जमली. बालासाहेब शेप व अंकुश ढोबळेनी ग्रामपंचायतचे १४ वित्तआयोगाची काही लाख रक्कम जलसंधारणाच्या कामासाठी वापरायचे ठरले. मला थोडी साशंकता होती नक्की काम होईल का ?
एक दिवस गावाला एक जेसीबी देण्यासाठी म्हणून मी बालासाहेब शेप कुठे काम करायचे म्हणून फिरत होतो. इतके अवाढव्य काम त्यासर्वांनी केले होते की आत्ता आपण कुठे काम करायचे याचा शोध आम्ही करू लागलो. जवळपास चार तास मी व बालासाहेब शेप गावात फिरत होतो व गावातील त्यांनी केलेले पाणी मुरवण्याठीचे मोठे मोठे बॉक्स पाहात होतो. एक एक बॉक्स ११० मी लांब, ३ मीटर रुंद, ३ मीटर खोल. असे असंख्य बॉक्स शेपवाडी परिसरात तयार केले होते. आम्ही दोघंच सर्वत्र फिरत असल्याने फोटो काढणारे कुणीच नव्हते. शेवटी बालूभाऊ म्हणाला, “आत्ता दादा आपला फोटो काढणारा पण कुणी नाही. एका बॉक्स जवळ आपला सेल्फी काढू.”. त्याचा उत्साह प्रचंड होता.

आज जोरात पाऊस झाला आणि पावसाचा जोर शेपवाडीत होता. कैलास काल दिवसभर आमच्या बरोबर प्रबोधिनीने केलेले काम पाहण्यासाठी फिरत होता.

दादा, पावसाचा जोर फार आहे...थोडा कमी झाला की जातो आणि फोटो काढतो.”
थोड्यावेळानी

दादा पावसानी सगळे बॉक्स पूर्ण भरले आहेत.” प्रचंड खुशीत कैलास बोलत होता.

मी अभिनंदन करायचे म्हणून बालासाहेब शेपला फोन केला. मी बोलण्याच्या आधीच बालू भाऊचा खुशीत आवाज, “ अभिनंदन दादा !!!” मी त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर तो केलेल्या कामाबद्दल भरभरून बोलत होता. आज मात्र मनातून जोरात म्हणावे वाटत होते, “ अभिनंदन शेपवाडी “


२३.  "दादा हे लिहीत असताना डोळ्याच्या कडा अलगद पाणावतात .."

उन्हाचा चटका आता चांगलाच बसतोय. मागच्या वर्षी पेक्षा जास्त वाटतय का ? हो थोडं जास्तच आहे !!

झुंबरचे वडील सुरेख ब्याँड वाजवायचे.उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक छोटया गावात झुंबरचा जन्म झाला. कशी बशी शाळा ९ वी पर्यंत तो शिकला. त्यानंतर नोकरी करायची म्हणून जवळच्या वाठवडा गावातील एका हायस्कूलमध्ये तो सेवक म्हणून रुजू झाला.
वाठवडा गावाचे भाग्य की झुंबरचे पण हा तरुण झपाटल्या गत स्वतःत बदल करायला लागला. त्यांनी परत पुस्तक हातात घेतले. ज्योतिबा,बाबासाहेब व शिवप्रभूंचा वारसा जपत झुंबर स्वतःला फुलवत होता. पाहता पाहता त्याचे एम. ए. नुसते नाही तर एम.एड पण झाले. तो आता शाळेत सेवक असला तरी छान मुलांना शिकवायला लागला. वाठवडा तसे दुष्काळी गाव.

नमस्कार सर मी प्रसाद चिक्षे बोलतोय ! कसं चाललंय श्रमदान ?”

अतिशय नम्र आणि गोड आवाजात प्रतिसाद आला,

जोरात चालू आहे सर . आत्ता पर्यंत ७००० घनमीटर काम झालंय. आता टार्गेट पूर्ण करण्यासाठी ८००० बाकी आहे. ते होऊन जाईल.”

“किती जण काम करत आहेत?”  ३५० ते ४०० लोक दररोज करत आहेत.”
मशीनचे काम किती झालंय. “एक मशीन चालू आहे. पण २ लाख घन मीटर काम करायचे आहे खूप अवघड वाटतंय दादा.”

झुंबर सरांचा स्वर थोडा कापरा झाला.

मी येतो भेटायला तुम्हाला.”
बाकी खुशाली विचारात मी फोन ठेवला.

झुंबर पिंपळकर हे एक अफलातून व्यक्तीमत्व वाठवड्यात त्यांची स्वतःची थोडी पण जमीन नाह; पण गाव पाणीदार करण्याच्या चळवळीतील हा पक्का कार्यकर्ता. ३८ कलांचा तो स्वामी. सगळी वाद्य अफलातून वाजवतो. कुंगफू, कराटेचा चांगला खेळाडू. अनेक क्षेत्रात सुवर्णपदक मिळवणारा. पिळदार शरीरयष्टीचा पण अतिशय नम्र. एक लोभस व्यक्तीमत्व.

पिढी जात लोहार काम करणारा व स्वतःची थोडी पण जमीन नसणारा राम टिंगरे उर्फ दादा तर तडफदार तरुण. अगदी शून्यातून त्याने मोठे वर्कशॉप उभे केले. पाणी फौंडेशनचे तांत्रिक प्रशिक्षण घेवून आल्यावर दादा फुलटाईम गावाच्या पाणलोटाच्या कामात पार बुडून गेला. आज दादा बरोबर १२० तरुण या कामासाठी वेळ देत आहेत.

कसलीच झोप नाही बघा. रात्री दोनला झोपलोत काम करून आणि सकाळी ६ वाजता सगळ्यांसोबत श्रमदानाला हजर राहतोत.”

दादा, झुंबरसर, गावातील तरुण मुलं व १८ बचत गटाच्या महिला. सगळ्या एकदिलाने कामाला लागल्यात. झुंबर सरांच्या पत्नी त्यांच्या सामाजिक कामाबाबतीत फार अनुकूल नसायच्या. “लष्कराच्या भाकरी कशाला भाजायच्या ?” असा त्यांचा सूर असायच्या. काही दिवसांपूर्वी त्यांची गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया झाली. यावेळी मात्र ताई मागे नाही राहिल्या. मी गावाची पूर्ण फेरी मारून झाल्यावर सरांनी फुलवलेली सुंदर नर्सरी पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेलो तो ताईंची भेट झाली. हसत चेहऱ्यांनी त्या म्हणाल्या,

तुमचे बोलणे ऐकले हं मी आणि आम्ही जोरदार काम करू.”

त्या विस्तीर्ण माळरानावर वसुंधरेचा मळवट भरणारी झुंबरसर, दादा व वाठवडा गावातील सर्व गावकऱ्यांची मेहनत नक्कीच वाठवडा हिरवेगार व निळेशार करेल. सगळे पाहिल्या नंतर मी झुंबर सरांना बाजूला घेतले. त्यांचा हात हातात घेतला. हाताच्या स्पर्शानेच समजले की गेला महिना त्यांनी किती काम केले आहे. त्या योद्ध्यांचा हात हातात घेवून मी म्हणालो, “कधीही थोडं जरी अस्वस्थ वाटले काही कमी पडतंय वाटले तर लगेच सांगा. ज्ञान प्रबोधिनी व आम्ही सगळे आहोत सोबत.”

तोच डोंबिवलीहून अनिकेतचा फोन आला.

दादा, बँकेत या वर्षीच्या कामासाठी आम्ही सर्वांनी जमा केलेली रक्कम भरली आहे पाहून घेशील.”
मी फोन झुंबरसरांना दिला.त्यांचा चेहरा अजून फुलला. चांगल्या कामाला आणि निस्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्यांना मदतीची कमी नसते. आपण सर्वजण आपले गाव पाणीदार करणाऱ्या आपल्या भावा बहिणींना थोडी मदत करूयात का ?

वरील लेखन मी दादाला वाचण्यासाठी पाठवले ...दादाचा प्रतिसाद खूप भावून गेला,

दादा आम्ही या श्रमदान रुपी महासागरात उतरल्या पासुन जिवनाचा खरा अर्थ काय असतो हे आम्हाला उमजले आपल्या सारखी निस्वार्थ प्रेम करनारी दुर्मिळ मानस आम्हाला श्रमाच्या अथांग महासागरात मिळाली. दादा, हे लिहीत असताना डोळ्याच्या कडा अलगद पानावतात ......”


२४.  माझ्या प्रेरणेचा सहवास व तिच्याशी एकरूप होण्याचा बेफाम दिवस.

मराठवाड्यातील पाणी प्रश्न खूप गुंतागुंतीचा आहे. अंगाची लाही होत असताना पाण्यासाठी काम करणारी सर्व मंडळी पाहिली की खूप छान वाटते. महाराष्ट्रदिनी वॉटर कप स्पर्धे निमित्य महाश्रमदान आयोजित करण्यात आले होते. गावाकडे चला हा नारा देवून श्रमदानाची चळवळतून गावाची सामुहिक शक्ती जागवून गाव पाणीदार करण्याचा सर्वांचा प्रयत्न चालू आहे.

सकाळी लवकरच उठून बाहेर पडायचे. सोबतच पाणी, जेवण. चार तालुक्यात प्रवास. रात्री उशिरापर्यंत भेटणे बोलणे. मला सकाळी ६ वाजताच बाहेर पडायचे होते. म्हणजे सकाळी ४.३० उठावे लागणार. जेवण सोबत घेवून जातो. आईने आज कमाल केली तिला नको म्हणत असताना ती रात्रभर जागी राहिली व सकाळी ४ला स्वयंपाकाला लागली. तिचे वय ७२ वर्ष. मी दुपार भर झोपते पण तुझ्या जेवणाचा डबा करून देते. सकाळी आईला उठून स्वयंपाक करताना पाहिले. मी काय बोलणार ?


अतुल आमचा चालक सकाळी ५ ला त्याला फोन केला. तो तयार होता. अगदी बरोबर वेळेवर आला. त्याला पण आज वेळच महत्व इतके वाटले. मी काय बोलणार ?
बप्पा माझा मित्र त्याला सोबत न्यायचे होते. आधी त्याला काहीच कल्पना दिली नव्हती. तो नुकताच उठून नवीन घराचे वॉटरिंग करत होता. त्याला श्रमदानासाठी चल म्हणालो. तो काही मिनिटात तयार झाला. मी फक्त पाहत होतो. मी काय बोलणार ?

अगदी वेळेवर आम्ही वाठवड्यात पोहोंचलो. मस्त मराठमोळ स्वागत. गावाबरोबरच अनेक ठिकाणची लोक आली होती. तीन दिवस गावात मुक्काम ठोकून असलेली अमित,अनिकेत आणि ऋषिकेश जबरदस्त धुंदीत होती. एकमेकांना हसून शुभेच्छा देत होती. श्रमदानासाठी सर्वजण सज्ज होती. याची सुरवात पण खूप न्यारी होती. आपला तिरंगा फडकून व राष्ट्रगीताने. हा अनुभव खूप वेगळा होता. भारतमाता की जय सर्वजणांनी जोरात घोषणा दिल्या. सर्व काही मी अनुभवत होतो. मी अजून काय बोलणार होतो ?

अनेक संघ तयार केली गेली. सर्वांच्या हातात कुदळ,फावडे आणि टोपले. अगदी शिस्तीत सर्वजण कामाला लागली. अगदी म्हाताऱ्या आजोबा पासून ते छोटया मित्रांपर्यंत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. मी मात्र पाहात होतो. मी काय बोलणार ?
हजाराच्या वर माणसे शिस्तबद्ध काम करत होती. स्वयंसेवक त्यांना मदत करत होती. सगळे इतके व्यवस्थित की मला काही बोलावे वाटेल का ?


डॉक्टर राऊत,झुंबरसर, राम दादा व त्यांच्या सर्व दोस्तांची अफाट मेहनत व चेहऱ्यावरील उत्साह पाहून मी काय बोलणार ?

तिथून निघालो पळसखेडला. तिथले श्रमदान मी पोहोंचे पर्यंत संपणार होते पण अनेक जण भेटणार होती अंबाजोगाई आणि केज तालुक्यातील. पळसखेडला पोहचलो तेच एका माऊलीने स्वागत केले. श्रमदानाच्या तयारीची ग्रामसभा मी घेतली होती. त्यात काही गोष्टी सांगितल्या होत्या. ती माऊली म्हणाली,

आम्ही सगळे व्यवस्थित केलं हाय ह् तुम्ही सांगितल्या परमाने.”

तिच्या चेहऱ्यावरील आनंद अदभूत होता. ते पाहून मी काय बोलणार होतो ?

मराठवाड्याच्या पाणी चळवळीचे प्रमुख म्हणजे बाबूजी ( द्वारकादासजी लोहिया ) समोरच होते. त्यांना अभिवादन करताच त्यांनी माझा हात हातात घेतला. अखंड आयुष्य पाण्यासाठी वाहिलेल्या बाबूजींचे हात हातात असताना मी काय बोलणार ?

सगळ्यांचे हसरे चेहरे. कष्टाचा लवलेश नाही. सगळे धुंद...मस्त ...मी काय बोलणार ?
शेवटी माझ्या प्रेरणेचा सहवास व तिच्याशी एकरूप होण्याचा बेफाम दिवस. मी काय ते एवढंच बोलू शकतो.

२५.  ब्रेकिंग न्यूज.......

जायभायवाडी”.....जिथे जायचं भ्याव वाटतं असं धारूर तालुक्यातील खड्या डोंगरात वसलेले छोटे गाव. एसटी नाहीचं पण मोबाईलची रेंज पण नाही. सव्वा दोनशे लोकसंख्या असलेले आणि चहूबाजूंनी उंच डोंगररांगा असलेले ऊसतोड कामगारांचे गाव. डॉक्टर सुंदर जायभाय यांना आपले गाव नुसते सुंदर करायचे नव्हते तर स्वावलंबी करायचे होते. डॉक्टरांनी पाणी फौंडेशनचे प्रशिक्षण घेतले व सरळ ठरवून टाकले आत्ता पुढील दीड महिना आपला दवाखाना बंद. कामाला सुरुवात केली आणि लोकांची साथ गावाचे वातावरण बदलले. लोक श्रमदान करू लागले.

मी गेलो गावात त्यावेळी. काम सुरु होऊन महिना झाला होता. मानवी श्रमदान बऱ्या पेकी झाले होते.खरा प्रश्न होता मशीनच्या कामाचा जवळपास ४० हजार घनमीटर काम करायचे होते. त्याधी जवळपास पाच मशिन गावात आल्या आणि त्या अवघड कामाला भिवून पळून गेल्या. 

‘जायभायवाडी नको रे बाबा’ असाच सगळ्यांचा सुर होता. इरफान,अभिजीत व अनिल महाजन बरोबर आम्ही गावकऱ्यांची एक जोरदार बैठक घेतली आणि कामाला सूर मिळाला. दुसऱ्या भेटीच्या वेळी मी सगळ्यांना सांगून टाकले केवळ ७ ते ८ दिवसात आपल्याला दुप्पट मानवी श्रमदान करायचे, मशीनच्या कामाचे टार्गेट पूर्ण करायचे. कसे करायचे ते ठरवू, होत कसे नाही. पाणी फौंडेशनचे सगळे मित्र,बीजेयस,गावकरी व ज्ञान प्रबोधिनीची टीम कामाला लागली. काही तरीच वेगळं घडायला लागले. दररोज एक ब्रेकिंग न्यूज मला ऐकायला मिळायला लागली.

एका दिवसात नदीचे काम पूर्ण झाले, दुसऱ्या दिवशी तीन माती नाला बंध पूर्ण. वशिष्ठभाऊ मशिनच्या कामावर लक्ष देवून होते. एक चालक निघून गेला होता व एकच जण मशिन चालवत होता.रात्री एक वाजता चालकाला झोप येत होती. मशिन बंद ठेवणे जमणारे नव्हते. वशिष्ठभाऊचे डोकं गरगर फिरायला लागले आणि त्यांनी सरळ मशिन चालवायला घेतली. या आधी त्यांनी कधीच मशिन चालवलेली नव्हती. त्यांनी चक्क पुढचे दोन तास मशिन चालवली व त्या दिवशीचे टार्गेट पूर्ण केले.

रामकिशन जायभाय यांनी चार तासात ६.७५ घनमीटरचे खोद काम केले. गावातील श्रमदानाचा मोठा विक्रम होता. रोज नवीन विक्रम व्हायला लागले. गावांनी आपल्या टार्गेटच्या दुप्पट श्रमदान केले आणि अजूनही चालू आहे.

धर्मराज डॉक्टरांचा उजवा हात. बैलाची झुंज लागली. ती सोडवण्यासाठी धर्मराजला जाणे गरजेचे होते. झुंज सुटली एका बैलाला त्याने वाचवले पण दोन्ही बैल त्याच्या अंगावर. तो जवळच्या खड्यात कोसळला. डोक्याला सहा टाके पडली,पाठीला जबर मार बसला. त्याला पूर्ण विश्रांती सांगितली. दुसऱ्या दिवशी सकाळीच धर्मराज श्रमदानाला हजर. “गाव लढतय सार मी कसा पडून राहू”. त्याला समजून सांगणे कठीण. तो कामाला लागला.

तिकडे वाठवड्यातून वेगळ्याच ब्रेकींग न्यूज येत होत्या. सगळ्या मशिन घड्याळाच्या  तासांप्रमाणे काम करत होत्या. राम दादा,झुंबर सर त्यांची मित्र रात्री तीन तीन वाजे पर्यंत जागून काम करत होती व सकाळी उठून ६ ला श्रमदानाला हजर. दोन दिवसात एकूण श्रमदानाचे टार्गेट पूर्ण होईल आणि मशीनच्या कामाचे गोवर्धन पर्वता एवढे २ लक्ष ४० हजार घनमीटरचे काम पूर्ण करण्याचा त्यांचा निकराचा प्रयत्न आहे.

लोकवाटा कमी पडतोय अशी मी खंत म्हणून दाखवली तर दुसऱ्या दिवशी मजुरी करणाऱ्या बचत गटाच्या ताईनी प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे १७ हजार रुपयाचा लोकवाटा जमा केला.डोंबिवलीच्या मित्रांनी अडीच लाख रुपये आपल्या मराठवाड्यातील मित्रांच्या मदतीसाठी जमा केले.

काशीदवाडीचा सरपंच ४० दिवस रजा घेवून गावात कामासाठी तळठोकून. शेपवाडीत तर १० फुटला पाणी लागले मागच्या वर्षीच्या कामाची फलश्रुती. यातच अभिनेता गिरीश कुलकर्णीची भेट सगळ्यांना सुखावून गेली. सगळीकडे काही न काही ब्रेकिंग न्यूज आहेत आणि प्रत्येक गावात नवीन कर्तृत्व समाजासाठी उभे रहात आहे.



२६.  अन पाऊस पडायला लागला......

पाच किलोमीटरहून पाणी अनाव लागायचं प्यायाला. तिथंच आंघोळी अन कपडे धुणं. छोटया पोरास्नी बाजीवर बसून आंघोळ घालायची. खाली पडणाऱ्या पाण्यातून भांडी घासायची अन भांडे घासलेल्या पाण्यातून घर सारवायचं.” वशिष्ठ भाऊनी गावाचा पाण्याचा इतिहास सांगितला.

मला कळतंय तसं उस तोडाया जातो मी. माझे वडील बी जायचे,” सचिनचे वडील म्हणाले.
सकाळी साडेतीन चारला उठायचे. चारला कारखान्याचा भोंगा झाला की ऊस तोडायला बैलगाडी घेवून जायचं. दिसभर उस तोडायचा. सांच्याला तर कधी रातरच्याला परत यायचं. गड्यांनी गाडी मोकळी करायची तर बाईनी रातचा आणि दुसऱ्या दिसाची भाकरी अन कालवण करायची. रातरच्याला थोडं झोपायचे ते बी कधी कधी नाही. असं कारखाना चालू असं पर्यंत कधी तीन तर कधी कधी पाच महिने बी.” एकनाथच्या वडिलांनी त्यांची दिनचर्या सांगितली.
 

जीवाच पाणी हुतय.लई तरास पण काय करणार शेतात काही पिकत नाही. दुसरं काम नाही नगदी उचल मिळती. मग जावच लागतंय. लेकरं इथ ठिवून जाताना जीव जळतो. पर इलाज नाही.” एकनाथची आई म्हणाली

एक मोठा बॉक्स पारले बिस्कीटाचा आणला पोरांली खायला. त्यांनी हातांनी बी करून खाल्लं. पण घरच्यांनी जा म्हणालं म्हणून ट्रेनिग ला जाऊ शकले. आता तुम्ही आलात न पाऊस पडणार बघा” सचिनची आई म्हणाली.

मी आल्यावर पाऊस पडल्यावर मला तर लोक आपल्या गावातच ठेवून घेतील की.” मी म्हणालो.


नाही पर पाऊस पडलंच आज.” सचिनची आई परत म्हणाली.

या वर्षी आम्हाला बी जाव लागणार ऊस तोडायला औंदा. दोन पोरींची लगन झालीत. याचं शिक्षण पैसा लागणार.” गोविंदची आई म्हणाली.

सोन्या माळाच्या पल्याड आमच शेत हाय पाणी बी हाय.पर लाईट नाही न. शेतात राहतोया पण पाऊस नसल्याने तिथं भकास वाटतंय.” एकनाथचे वडील म्हणाले.

विजयची आई मागच्या वर्षी मोठया पावसाच्या पुरात वाहून गेली. प्रेत पण मिळाले नाही. त्याच्या घरी गप्पा रंगल्या त्याचे वडील मंडपाच काम करतात आणि फार मस्त मृदंग वाजवतात. तोच पत्रावर टपटप आवाज यायला लागला. जायभायवाडीला पाऊस पडायला लागला.

सचिन आईला सांग पाऊस आला बरका.” मी हसतच सचिनला म्हणालो.
तोच मस्त फ्रेश होऊन विष्णू तिथे आला. मग आम्ही हसऱ्या विष्णूच्या घरी गेलो.

आज फवारून घेतलं. म्हणून आंघोळ करून घेतली. विष्णूनी खत बी पेरून घेतला. त्यो आला तसं काम उरकून घेतले.” विष्णूचे वडील म्हणाले.

जेवण करूनच जा न आता.” सगळे आग्रह करत होती. परत येतो सांगत परत अंबाजोगाईला निघालो.
वाटेत कोळपिंप्रीला भेट दिली. भर पावसाळ्यात पण टँकरने पाणी घ्याव लागायचं या गावाला. समोर दिसणारा हापसा हापासायला सुरुवात केली व ३० व्या हाताला पाणी आलं. गाव टँकर मुक्त झालं होतं.

अंबाजोगाईला पोहचलो तोच सचिनचा जायभायवाडीहून फोन आला, “ दादा पोहोंचलात का ? तुम्ही गेल्यावर अजून जोरात पाऊस आला. अजून आभाळ भरून आहे.” सचिन खूप आनंदात सांगत होता. मी हसून त्याला म्हणालो, “ आईला सांग ह्.”

सांगितले दादा, गुड नाईट.”

गुड नाईट सचिन”

( वर ज्या मुलांची नावे लिहिली आहेत ती अकरावीचे शिक्षण घेण्यासाठी जायभायवाडीहून अंबाजोगाईला आली आहेत. त्या आठ मुलांची अंबाजोगाईत राहण्याची सोय ज्ञान प्रबोधिनीत करण्यात आली आहे. आज आमची जायभायवाडीला या सर्व मित्रांच्या घरी गृहभेट होती.)


२७.  माणूस मेला तरी आम्ही पैसे वसूल करणार. तुमच्या घरासमोरचे प्रेत पण हलू देणार नाहीत.”

कोळपिंपरी धारूर तालुक्यातील एक दुष्काळ ग्रस्त गाव. या गावाच्या पाचवीला टँकर पूजले होते. पावसाळ्यातील एखादा महिना सोडला तर रोज गावात पाण्यासाठी टँकर लागायचे. यासर्वांना त्रस्त गावकरी आपल्यावर काही आर्थिक संकट आलंकी सावकाराकडून कर्ज काढायची. गावात सावकारांचा व फायनान्सच्या माणसांचा वावरत वाढला आणि पाहता पाहता गाव सावकारी कर्जात बुडाले.

माणूस मेला तरी आम्ही पैसे वसूल करणार. तुमच्या घरासमोरचे प्रेत पण हलू देणार नाहीत.” अशी सावकारी भाषा असायची. ही सर्व परिस्थिती सुरेश सोळुंके पाहत होते.लातूरला एका संस्थेवर ते शिक्षक म्हणून काम करत होते. त्यांनी गावात परत यायचा निर्णय घेतला.आपल्या शेती बरोबरच त्यांनी एक शेतकरी बचत गट स्थापन केला आणि एका नव्या पर्वाला सुरवात झाली. गटाचे नाव ठेवले स्वामी विवेकानंद शेतकरी बचत गट. गटाचे काम चांगले वाढू लागले. हळूहळू गटातील सदस्यांची संख्या शंभरावर गेली. गटाचे भांडवल पन्नास लाखापर्यंत गेले. आडीनडीला चाळीस हजार तर दवाखान्यासाठी दोन लाखापर्यंत कर्ज देण्याची व्यवस्था केली. जवळपास गावातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती गटाचा सदस्य झाला. पाहता पाहता गाव बऱ्यापेकी सावकारमुक्त झाले.

यासर्वाचे खरे कारण होते पाण्याचे दुर्भिक्ष. गावातील तरुण मंडळ हर्षल,तुषार, गोविंद व त्यांची सगळी मित्र यांनी या वर्षीच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवले.प्रशिक्षण घेवून परतल्यावर श्रमदानाला सुरुवात झाली. सुरवातील शाळेतील दहा पंधरा मुलं आणि हे तरुण मित्र. काही काळातच सुरेश सोळुंकेच्या स्वामी विवेकानंद शेतकरी बचत गटाची जोड पण त्यांना मिळाली. मशीनच्या कामासाठी लोकसहभाग हवा होता त्यासाठी बचत गटांनी २१ हजार रुपये मदत केली व मशीनचे काम पण सुरु झाले. याच काळात मला याबद्दल माहिती माझा मित्र रवी देशमुखने दिली व मदत करण्याची विनंती केली.

गावाला भेट दिल्यावर मला सर्व परिस्थिती समजली. तालुक्याच्या गट विकास अधिकारी कांबळेताईना मी सत्य परिस्थिती विचारली. त्यांनी पण दुजोरा दिला. ज्ञान प्रबोधिनीतर्फे जेसीबी मशीन लागेल तेवढा वेळ देण्याचे आम्ही ठरवले पण मशीनसाठीचे इंधन मात्र गावांनी द्यायचे. ही खूप अवघड गोष्ट होती. हर्षल व त्याच्या मित्रांनी अनेक शक्कलीने लोकवाटा जमा करण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता गावातून एक लक्ष व बाहेरून एक लक्ष रुपये उभी राहिली.

श्रमदानाला येणाऱ्या गावकऱ्यांची संख्या वाढली. काम जोरात सुरु झाले. ७५ हजार घनमीटर पर्यंत काम झाले. मोठा पाणी साठा गावात होणार होता. थोडा पाऊस झाला गावाचे टँकर बंद झाले. गावाला धारूर तालुक्यातून वॉटर कप स्पर्धेत पहिले १८ लाखाचे बक्षीस मिळाले. अभिनंदन करण्यासाठी मी गावात गेलो व गावातील हापश्याला किती पंप मारल्यावर पाणी येते ते पाहिले तर ३३ पंप मारावे लागले मग पाणी आले.

अजून पाहिजे तसा पाऊस नाही पडला न.” सर्वांनी हर्षलच्या बोलण्याला दुजोरा दिला. मी फक्त हसलो. दोन दिवसात चांगला पाऊस झाला.
 

काल संध्याकाळी हर्षलचा मेसेज आला.

कालच्या साहित्य संमेलनात बोलवून आमचा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद. आणि हापश्याला आता एका पंपातच पाणी यायलंय .समस्त कोळपिंपरी”
गावाचा पाण्याचा प्रश्न आत्ता बऱ्यापैकी संपला. गाव आत्ता मुख्यमंत्री आदर्श गाव योजनेसाठी निवडले गेले.

२८.  आपले पाण्याचे नाते असेच वाढवत जा ही मनातून शुभेच्छा !!!

आई-वडील आजारी, डोक्यावर कर्जाचा डोंगर हे एकीकडे तर बायको पहिल्यांदाच प्रसुत होणार, नवीन बाळाचा जन्म, कुठे लक्ष दिले पाहिजे? त्यांनी कुणासाठी वेळ दिला पाहिजे? ते तरुण आहेत,स्वप्नाळू आहेत पण घराच्या बाबतीत तितकेच भावूक पण आहे. प्रश्न ज्यावेळी जीवघेणे होतात त्यावेळी धुसमुसून रडतात पण एकांतात. ते आजीबात कोरडे किंवा शुष्क नाही.फक्त स्वतःच्या बडेजावपणासाठी कुटुंबाला वाऱ्यावर सोडता पण येत नाही.

याच वेळी त्यांच्या आजूबाजूला पडलेला दुष्काळ त्यांना अस्वस्थ करतोय. हा दुष्काळ आपले पोट भरण्याचे साधन म्हणून त्यांना अजिबात आवडत नाही. त्यांना वाटतंय काही तरी केलं पाहिजे. प्रयत्न चालू असतो पण मार्ग काही मिळत नाही. चहुबाजूनी प्रश्नांच्या चक्रव्यूहात ते आडकले होते. आणि त्यांना विचारण्यात आले. आता तुम्ही जे काम करताय ते सोडून दुष्काळाशी दोन हात करण्याच्या चळवळीचे तुम्ही शिलेदार होणार का ? ही हाक होती एका कल्पनेची. पैसा,स्थिरता, प्रसिद्धी, यश याबाबतीत काहीच सांगता येणार नव्हतं. कल्पना खूप चांगली होती आणि पूर्ण निस्वार्थीपणाने योजिलेली होती.

त्यांनी दिले झोकून स्वतःला. तारुण्याचे हेच तर लक्षण असते. ही कहाणी आहे दोन भावांची, संतोष व इरफान. अरे हे दोघे कसे भाऊ असू शकतात? रक्ताच्या नात्याने भाऊ नाहीत तर रक्तातील पाण्याच्या नात्याने ते एकमेकांचे भाऊ. संतोष शिनगारे केज तालुक्यातील आवसगावचा तर इरफान शेख शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उमरदरा गावचा. तारुण्यातील स्थिरतेसाठी संघर्ष जो असतो न तो सर्व प्रकारे हे दोघे करत होती. अतिशय सामान्य कुटुंबातील हे दोन तरुण त्याच्यात काही तरी समाजाचे ऋण फेडण्याचे रक्तबीजे होती. दोघांचे नाते जुळले ते ही पाण्याचे डॉक्टर अविनाश पोळ यांच्याशी. महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाने यासर्वांचे नाते जोडले अमीर खान,सत्यजित भटकळ यांच्याशी. यासर्वांचे नाते दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या सर्व व्यक्ती,चळवळी, संस्था व शासनाशी. यातून एक नाविन्यपूर्ण प्रकिया उभी राहिली पाणी फौंडेशन व सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा.

पहिलेच वर्ष. मला फोन आला. “मी संतोष शिनगारे बोलतोय दादा. तुम्हाला भेटायचे आहे व पाणी फौंडेशन बद्दल काही सांगायचे आहे.”

मी अंबाजोगाईत आलो की भेटू आता सध्या बाहेर आहे.”

दोन तासांनी आमची भेट सुरभी उपहारगृहात झाली. अगदी उमदे तरुण ते सरळ साधी. मला थोडी काळजी होती की हे ग्रामीण भागात इतक्या भीषण समस्येवर काम करू शकतील का ? त्यांच्यात तळमळ होती. मी माझ्या परीने सगळी मदत करण्याचे वचन दिले. सुरवातील खूप सहज वाटणाऱ्या प्रक्रियेचे पदर जसे जसे उमलत गेले त्यावेळी सर्वाना करावा लागणाऱ्या प्रयत्नाची शर्थ लागली.
संतोष व इरफान कंबर कसून कामाला लागले. अंबाजोगाई तालुक्यातील चाळीस गावांनी सहभाग घेतला. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. तहान,भूक व झोप हरपून ही दोघं व त्यांचे सहकारी कामाला लागली. पहिल्याच दणक्यात लाखोंची बक्षीसे अंबाजोगाई तालुक्यातील गावांना मिळाली.

दुसरे वर्ष अधिक आव्हानात्मक होते. ३ तालुक्यांचे १० तालुके झाली व ४० गावांचे  एकदम ४०० गावं झाली. संतोष व इरफान वर मराठवाडा क्षेत्र संघटक महणून जबाबदारी आली. काम वाढले तसे कष्ट पण वाढणार होते. कष्टाला मागेपुढे पाहणारे ते कसे मराठवाडा वीर असणार. पाऊस चांगला पडला आता ग्रामीण भागातील बांधवांच्या चेहऱ्यावर असणाऱ्या आपलेपणाचे व आशीर्वादाचे कवचकुंडले घेवून ते यावर्षी परत रणांगणात उतरले दुष्काळाला हरवण्यासाठी. यावर्षी पण परत लाखो रुपयांची बक्षीस गावांना मिळाली.

यात खरे बक्षीस मिळाले ते पाण्याचे पण त्याहून जास्त मोठे म्हणजे आपण आपल्या गावाला आपल्या स्वतःच्या दोन हातानी दुष्काळ मुक्त करू शकतो या आत्मविश्वासाचे. सामन्य माणसं जर कुदळ खोरे घेवून बाहेर पडली व जिकिरीने कामं करू लागली तर काहीच कमी पडत नाही हे लक्षात आले. संतोष व इरफान हे दोन सामान्य तरुण पण असामान्य प्रयत्न करणारी यांना जोड मिळाली अनेक लोकांची.

आपली लोक फार जबरदस्त काम करू शकतात. त्यांना फक्त त्याची जाणीव करून दिली पाहिजे.काही लागत नाही. माणसाला माणसे जोडत जायची. आपले प्रश्न चुटकी सरशी मिटतात. ” 

दोघांच्या बोलण्यातून प्रचंड तळमळ जाणवते.

त्याच बरोबर कुठे तरी खंत की जी त्यांची मित्र,भाऊ काही मोठी आणि काही छोटी व त्यांच्या हातात करण्यासारखे खूप काही आहे पण ते फार काही करत नाहीत. असो पेटली ज्योत विजणार नाही. घेतला वसा टाकणार नाही हे मात्र त्यांच्या मेंदूत पुरते भिनले आहे. तीच त्यांची आत्मप्रेरणा आहे स्वतःला भिरकावून देण्यासाठीची.

पग पग पगले कहे तो, हम क्या आपने सपने छोडे.”

रात्री मस्त पाऊस पडला होता. इरफानचा सकाळीच फोन आला. “ नमस्ते दादा, कॉम्पिटिशन डायरेक्टर म्हणून प्रमोशन झाले.”

अभिनंदन, पण आता तुला मुंबईत राहावे लागणार. सामान्य माणसाशी संपर्क तुटला की रे. ”

नाही दादा लातूर किंवा अंबाजोगाईतून परवानगी मिळाली आहे आणि या चळवळीत युवकांना अधिक अधिक जोडून घेण्याचे काम पण मला देण्यात आले.”
दुसऱ्या दिवशी संतोषचा फोन आला त्याला मराठवाड्याचे प्रमुख करण्यात आले आहे. आत्ता या वर्षी २५ ते ३० तालुके असणार आहेत. २९ वर्षांच्या संतोषला व ३१ वर्षाच्या इरफानला हे नवीन दायित्व पेलणे सहज शक्य आहे कारण त्यांना आत्ता कामाचे गुपित समजले आहे. आपल्या माणसांवर मनातून प्रेम करा व स्वतः न भिता कामात झोकून द्या सारे जग तुमच्या पाठीशी उभे राहते.

देशाला देव मानणाऱ्या व या धरणी मातेच्या उनाड माळावर फुललेल्या रानफुलांना कशाची तमा असणार ? त्यांचे फुलणेच दुष्काळी भाजून काढणाऱ्या उंन्हात झाले आहे. आपले पाण्याचे नाते असेच वाढवत जा ही मनातून शुभेच्छा !!!