गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

सातासमुद्रापार ‘मनोहर अंबाजोगाई’ नेणारा राहुल नरवणे..


समुद्र सपाटी पासून मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे गाव म्हणजे अंबाजोगाई. बालाघाटच्या डोंगररांगात वसलेले हे टुमदार गाव. पौराणिक,सांस्कृतिक, ऐतिहासिक व शैक्षणिक विलक्षण वारसा असणारे हे गाव. मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणजे अंबाजोगाई. युद्धात धारातीर्थी पडलेल्या आपल्या सैनिक भावासाठी बांधलेलं एकमेव मंदिर असणारे गावं. आधुनिक काळातील  हे हैदाबाद मुक्ती संग्रामाचे केंद्र. ह्या सर्व स्वातंत्र्य चळवळीची सुरवातच इथल्या शैक्षणिक संकुलातून झाली. राष्ट्रीय संस्कारासोबतच अनेक उमदे कलावंत या गावाने महाराष्ट्राला दिले.


लहान मुलात एक उपजत कलावंत असतो. आपली शिक्षण पद्धती, भोवतालचे वातावरण व परिस्थितीचा रेटा हळूहळू त्याच्यातील कलावंत मारून टाकतो.अशा सर्वांचा मग जगण्याच्या बाजारात अस्तित्वासाठी जीवघेणा संघर्ष सुरु होतो. अपेक्षांच्या मृगजळाच्या मागे धावणे त्यांचे थांबता थांबत नाही.

अंबाजोगाई तालुक्यातील उजणी गावात असाच एक छोटा कलावंत स्वतःला घडवत होता. प्रचलित शिक्षणाच्या जीवघेण्या शर्यतीत तो कधी रमला नाही. निर्सगाचा विस्तीर्ण रंगमंचावर निर्माण होणाऱ्या कलाकृती पाहात अमूर्ताची ओढ लागलेला हा छोटा म्हणजे राहुल नरवणे. रंग, पेन्सिल,कुंचला व शुभ्र पांढरा कागद व त्यावर निर्माण होत होते अनोखे चित्र. राहुलच्या चित्रांमध्ये एक वैशिष्ठपूर्ण वेगळेपण असायचे. चांगालाच अबोल असणारा राहुल त्याच्या चित्रातून मात्र बखुबीने बोलका व्हायचा. त्याने ठरवले की चित्रकलेचा शिक्षक व्हायचे. लातूर मध्ये कला शिक्षकाची पदवी परीक्षा पास झाला. कलेच्या शिक्षणाच्या मंदिरात स्वच्छ पावलाने प्रवेश करणे अशक्यच होते. शिक्षणाचे मंदिरं आता संस्थाने झाली होती. राहुल कुठलाही पैशांचा व्यवहार करून शिक्षक होण्यास तयार नव्हता. त्याने ठरवले की तो आपली साधना चालू ठेवणार व त्याने सरळ पुणे गाठले.


पुढील शिक्षणाला सुरवात केली. एक अनोखा संकल्प केला की यापुढे शिक्षणासाठी घरातून पैसा घायचा नाही. एका भल्या मोठ्या हॉटेलमध्ये तो चित्रकाराचे काम करत शिकत होता. एखाद्या कलेचा साधक होत असताना फक्त त्या कलेतील कौशल्य शिकणे हे पुरेसं नसते. त्या सोबतच अनुभवावे लागतात जगण्याला सुंदर करणारे अनेक मार्ग. राहुल आता आपल्यातील अभिजात पूर्णत्वाच्या अभिव्यक्तीचा अनुभव घेण्याच्या पथाचा पांथस्थ झाला होता. सवाई गंधर्व महोत्सवात तो चिंब भिजत होता.गूढ अशा मानसशास्त्र तो शांत मनाने समजून घेत होता. मनसोक्त वाचन, अनेक चित्रपट पाहणे आणि समजून घेणे. त्याच बरोबर नाटकाचा रंगमंच सजवायची तर त्याला वेगळीच उर्मी होती.नवल म्हणजे नगर रचना शास्त्र, वास्तुशास्त्र व मूर्ती शास्त्र याची ओळख करून घेताना तो स्वतःला विसरून जाई. अगस्त्य तलावाच्या सभोवताल असलेल्या एका रक्तरंजित, लाल वाळूच्या खडकावर वसलेले बदामीत तर तो कित्येक दिवस फक्त चित्र काढण्यासाठी जात होता. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून "भारतीय विद्या शास्त्राचे" शिक्षण घेतले. खूप खूप फिरला. उघड्या डोळ्यांनी आणि शांतमनाने जे दिसेल त्याने आपले अनुभव विश्व वेगाने विस्तारत होता. प्रत्येक चित्रात किंवा मूर्तीत कोणती न कोणती गोष्ट लपलेली असती ती समजे पर्यंत तो अविश्रांत श्रमत होता.काळ्याभोर दगडातून नको ते भाग काढत आणि पाहिजे ते अधिक सुंदर सजवत शिल्पकार मोहक शिल्प साकार करतो. त्याप्रमाणेच राहुलापण आपल्यातील कलाकार समृद्ध करत होता.


भारतीय लोक आपल्याला लाभलेला अलौकिक वारसा जतन करण्यात मात्र खूप कमी पडतात ही खंत मात्र त्याला सारखी बोचत होती. त्यात धर्मापुरीच केदारनाथाचे भग्न मंदिर पाहताना तो अस्वस्थ होई. प्रत्येक भेटीत काही मूर्ती चोरीला गेलेल्या असतं तर मंदिराचा काही भाग अजून ढासळलेला असे. त्याने निश्चिय केला या पुढे आपल्या जेवढे काही शक्य आहे तेवढे वेगेवेगळ्या स्वरुपात जतन करून ठेवायचे. एका अशाच विलक्षण सकाळी तो आणि त्याचे मित्र आपले कॅमेरे घेवून धर्मापुरीत पोहोंचले. दिवस असा भारून टाकलेला होता. जे काही टिपता येईल ते टिपत होते. सरते शेवटी एक छानसा लघुपट "केदारेश्वर मंदिर" तयार झाला. १२ जानेवारी २०१५ला हा लघुपट पुणे फिल्म फेस्टिव्हल मध्ये दाखवण्यात आला. त्याला पुढे अनेक पुरस्कार मिळाले.
राधेश व मानसीची राहुलची ओळख झाली व एक नवीन आव्हान त्यांनी स्वीकारले. अंबाजोगाईला साकार करण्याची त्यांची इच्छा होती. सुरु झाला एक विलक्षण अंगावर शहारे आणणारा प्रवास.


दर शनिवार,रविवार राहुल व मित्रांचे अंबाजोगाईस येणे सुरु झाले. भरपूर भटकणे,लोकांना भेटणे, अंबाजोगाई समजून घेणे. पुण्याला गेल्यावर जे काही समजून घेतले आहे ते नीट लिहून ठेवणे. पुढे पुढे तर राहुलला लक्षात आले की नौकरी करत अंबाजोगाई साकार करणे अशक्य आहे. त्याने सरळ नौकरीला लाथ मारली. अंबाजोगाईचा कोनांकोना तो समजून घेत होता. महिन्याच्या मागे महिने जाऊ लागले. वर्षे गेली.खर्च खूप होता. जवळ होती फक्त थोडीशी शिल्लक. त्यात चित्रीकरण सुरु झाले. अतिशय महागडा कॅमेरा सोबत घेवून राहुल व त्याचे मित्र अंबाजोगाईत पोहांचले. चित्रीकरणात अघटीत घडले. कॅमेराचे भिंग जमिनीवर पडून फुटले. भिंगाची किंमत होती साठ हजार रुपये. त्याच बरोबर तज्ञलोकांचे मानधन, प्रवासखर्च असे लाखावर रक्कम लागणार होती. जवळ फुटका पैसा राहिला नव्हता. राहुलला नौकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. जखमी अंतकरणाने राहुलनी पुढील १८ महिने नौकरी करून आपल्यावरील कर्ज फेडले. यासोबतच त्याला आलेले खुपसे घायाळ करणारे अनुभव. तो डगमगला नाही. हलाहल पचवून निळ्याशार झालेल्या नटराजाचा वारसा तो जगत होता. जवळपास ६० पेक्षा जास्त वेळा त्याने पुणे अंबाजोगाई प्रवास केला असेल. त्यातून निर्माण झाले मोठे भांडार. त्याचे संकलन करून लघुपट तयार करणे प्रचंड जिकीरीचे काम होते, राहुलने आपले सर्वस्व त्यात ओतले. त्यातून साकारलेली भव्य रंगमंचावर संगीत, नृत्य,प्रकाशाच्या अद्भुत मिलनातून मनोहर अंबानगरी. कुठलाही संवाद नसलेला १२ मिनिटांचा लघुपट.


राहुलला अनेकानी वेड्यात काढले. संवाद नसलेला अंबाजोगाईवरील लघुपट कुणाला भावेल कसा ? समजेल कसा ? तुला नेमके काय साध्य करायचे आहे ? असे एकना अनेक प्रश्न,लोकांची टीका, बोचरे आरोप तो शांतपणे सहन करत होता. लघुपट तयार झाला पण तो थांबला जवळपास महिनाभर. आपल्या अंतर्म्याला साक्षी ठेवून दृढ अंतकरणाने लघुपट मनोहर अंबानगरी पुणे फिल्म फेस्टिव्हल मध्ये प्रकाशित झाला. प्रेक्षक व जाणकारांना तो मुलखाचा भावून गेला. मनोहर अंबानगरी आता थांबणार नव्हती.


'ब्रिक्स फिल्म फेस्टिवल'मास्को, रशिया, कंबोडिया येथे होणाऱ्या 'साऊथ ईस्ट एशिया फिल्म फेस्टिवलचा 'ऑनरेबल अवॉर्ड' आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे अमेरिकेतील 'ओरेगन' (Oregon) राज्यातील प्रमुख शहर 'युजीन' मधील 'द आरकॉलॉजी चॅनेल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल' मध्ये बेस्ट फिल्म अवार्ड मिळाला. इथे राहुलने अंबाजोगाई बद्दल कित्येक तास तेथील चाणाक्ष लोकांच्या बरोबर चर्चा केली.९ देशातील ११ फिल्म फेस्टिवलमध्ये मनोहर अंबानगरीला स्थान मिळाले. सातासमुद्रापार मनोहर अंबाजोगाईचा भव्य वारसा नेणारा राहुल नरवणे आहे केवळ ३४ वर्षांचा. भग्न अशा सकलेश्वसाचा मंदिरात काळोख्या रात्री राहुलचे मन त्याला बोलू लागते,

''अगम्य, गूढ, अनाकलनीय
तरी हवेहवेसे . .
अतर्क्य, अस्पष्ट, धूसर
तरी मोहवणारे . .
आकाराचा आभास अस्पष्ट आहे.
वास्तूची जाणीव ही अशक्य आहे.
ती आहे एवढचं वास्तव आज आहे.
तिचं अस्तिव आज ही भान हरवणार आहे.
त्याची निर्मिती अफाट आहे.''

सकलेश्वराच्या मंदिराचे उत्खलन पुरातत्वशास्त्र विभागाने सुरु केले आहे तर केदारेश्वराच्या मंदिराची उभारणी चालू आहे.

राहुलाला आता ओढ आहे पूर्ण मराठवाडा साकारण्याची .....राहुल तुझ्या दिव्य प्रवासासाठी पाहिजे तिथे नक्कीच सोबत, मदत आणि खूप साऱ्या शुभेच्छा !!

https://www.youtube.com/channel/UCg2cZAcD4FihD75hL32ep0A

https://www.youtube.com/channel/UCg2cZAcD4FihD75hL32e