वसुंधरेचा साधक @७५ मा. सुभाषराव देशपांडे
ओळख ....
१९९४
सुभाषरावांचे कार्यालय. मी किल्लारी मदत कार्यासाठी तिकडे जाण्याची तयारी करण्यासाठी त्यांना भेटायला पहिल्यांदाच आलेलो.कार्यालयात प्रवेश करताच त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित. अवतीभोवती तीन चार तरुण कार्यकर्ते. संतोष गोंधळेकर त्यातील एक होता. त्याला मी ओळखत होतो. तो उपग्रहाने काढलेला एक मोठा फोटो सुभाषरावांना समजून सांगत होता. विषय पाणलोटक्षेत्राच्या विकासाचा होता परंतु त्याचा अभ्याससुद्धा अगदी ताज्या तंत्रज्ञानाच्या मदतीने चालू होता. माझ्या मनात कुतूहल मिश्रित जिज्ञासा होती. तिथेले वातावरण फारच रम्य होते. अतिशय अवघड,आधुनिक विषय विलक्षण सहजतेने, हसत समजून घेतला जात होता. अवघड विषय इतक्या सहजपणे व प्रसन्नतेने समजून घेतले जातात हा माझा पहिलाच अनुभव होता.
पुण्यातील दत्तमंदिराची जागा प्रबोधिनीला मिळालेली होती. तिथे तृतीय प्रतिज्ञा घेतलेल्या व घेणाऱ्या प्रबोधकांची चिंतन बैठक होती. त्या बैठकीच्या शेवटी आ.सुभाषरावांनी पुढील पाच वर्षे वैराग्यपूर्ण तृतीय प्रतिज्ञा घेतली. अगदीच मोजके कार्यकर्ते होते. मी अनुभवत असलेला ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा पहिलाच प्रतिज्ञाग्रहण समारंभ होता. त्यानंतर सुभाषरावांनी त्यांचे मनोगत थोडक्यात मांडले. त्यांच्या बोलण्याचा व एकूण समारंभाचा अनुभव वेगळाच होता. काहीतरी निर्मळ,नितळ,स्वच्छ,गतिशील,मृदू,नम्र परंतु कणखर असे काहीसे माझे भावविश्व त्यावेळी मला अनुभवयास मिळत होते. ते निश्चितच मी पहिल्यांदा अनुभवत होतो. (प्रसंग 2010 मधील)
अंबाजोगाईत सुभाषराव आम्हाला ज्ञान प्रबोधिनीन्यासाची घटना समजून देण्यासाठी व नवीन घटना कशी करावी याचे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले होते. त्याच दिवशी त्यांची रात्रीची परत जाण्याची बस होती. आम्ही बस स्थानकावर गेल्यावर लक्षात आले की चुकून आरक्षण उद्याचे केलेले होते. कुठलाही उद्वेग मात्र सुभाषरावांच्या चेहऱ्यावर नव्हता. मी मात्र थोडा चिंतेत होतो. त्यांनी हसतच तिकीट आपल्या हातात घेऊन पाहिले. ‘‘अरेच्या !! खरंच की उद्याचे आरक्षण आहे. काही तरी घोळ झाला म्हणायचे.चला तुझ्या सहवासात अजून एक दिवस राहता येईल.’’ आम्ही घरी आलो सुभाषराव खुर्चीत आरामात बसले व आमच्या गप्पा सुरु झाल्या. माझ्या मनात मात्र प्रबोधिनीच्या प्रार्थनेच्या दोन ओळी मात्र सारख्या आवर्तने करत होत्या.
निष्ठा,विवेक प्रगटो मन पूर्ण शुद्ध
वर्तू आम्ही दृढ प्रसन्न निध्येय धुंद.....
मी ज्या ज्या वेळी त्यांना भेटतो त्यावेळी माझ्या मनात सहजच या ओळी घुमत असतात.
ग्रामविकसन विभागाचा प्रशिक्षण वर्ग अंबाजोगाईत होता. दिवसाचा शेवट झाल्यावर सगळेच निवासासाठी गेले. व्यवस्था लागल्यात का म्हणून मी पाहण्यासाठी गेलो तो सुभाषराव व माधवराव यांच्यात जोरदार जुगलबंदी चाललेली होती. दिलखुलास हसणे,विनोद,शाब्दिक कोट्या सगळेच कसे उत्साही व आपुलकीने भारलेले होते. तसे ते कुणीच रक्ताचे नातवाईक नव्हते, न खूप लहानपणापासूनचे मित्र. एवढे निकोप,समृद्ध नाते दोन सहकारी कार्यकर्त्यांचे कसे असावे याचा प्रत्यक्ष तो अनुभव होता.
तीर्थरूप आप्पांच्या राष्ट्र्कार्याचा व संघटन कार्याचा मंत्र म्हणजे प्रबोधिनीची प्रार्थना तर त्यांच्या आध्यात्मिकतेचे फलित म्हणजे उपासना.संस्थात्मक कामाची उपलब्धी म्हणजे प्रबोधिनीची घटना. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना मी वाचले होते की, “एक तरी ओवी अनुभवावी ज्ञानेशाची l” तसेच काहीसे प्रबोधिनीच्या प्रार्थनेचे आहे. प्रबोधिनीची प्रार्थना समजून घेताना मला पदोपदी सुभाषराव आठवतात.
परिसस्पर्श
मुळशी तालुक्यातील छोट्याश्या कोळवण गावातील हे देशपांडे. पुण्यात शुक्रवार पेठेत राहायचे. वडील व आई एकदम सज्जन. अगदीच नाकासमोर चालणारे साधी सरळ माणसे. सुभाषरावांना दोन बहिणी व एक मोठा भाऊ. १९६५ मध्ये टिळक स्मारक मंदिरात विवेकानंद जयंतीच्या दिवशी ज्या काही निवडक बुद्धिमान मुलांना प्रबोधशाळेसाठी निवडले गेले होते त्यातील एक म्हणजे विनायक देशपांडे म्हणजेच आपले सुभाषराव. त्यादिवशी पासून ते आजतागायत ते प्रबोधिनीशी असे काही एकरूप झाले ते आतापर्यंत. त्यांना समजून घेणे म्हणजेच प्रबोधिनीला समजून घेण्याचा एक प्रयत्न होतो.
सुभाषराव सरस्वती मंदिर शाळेत शिकत व संध्याकाळी प्रबोधशाळेत यायला लागले. अभ्यासात त्यांचा वकूब अफलातून होता. शरदरावच्या शब्दात सांगायचे झाले तर, ‘‘सुभाषराव म्हणजे मूर्तिमंत अभ्यास.’’ त्याच बरोबर सुंदर अक्षर व ओघवी वकृत्व हे त्यांचे विशेष कौशल्य. खो-खो तील ते पट्टीचे खेळाडू. शाळेच्या संघाकडून खेळायचे. प्रबोधशाळेत अभ्यास झाला की संध्याकाळी मैदान असायचे. ती. आप्पांचे परिस्थितीज्ञानाचे तास, वामनरावांचे भूमितीचे,यशवंतरावांचे भाषेचे तर भास्करराव कोल्हटकरांचे विज्ञानाच्या तासांत ते रमून गेले. ती.अण्णा त्यांना बीजगणित शिकवायचे. अभ्यास व मैदानासोबतच भरपूर अभ्यास सहली व सायकल सहली असायच्या. रायगडाची मोहीम तर गो.नी दांडेकरांच्या मार्गदर्शनाखाली झाली. १९६७ च्या कोयना भूकंपानंतर धावून जाणारे आप्पा व अण्णांना पाहून त्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना अप्रूप वाटायचे. १९६८ मध्ये सिंहगड पायथ्याच्या कल्याण गावात ज्ञान प्रबोधिनी दगडी बंधारा बांधत होती. त्यात श्रमदान करून कल्याणच्या ग्रामीण जगताचा अनुभव त्या वर्षीच्या ११वी च्या तुकडीला समृद्ध करणारा होता. पुढे जाऊन हेच सुभाषराव अनेक गावांना समृद्ध करणारे होतील याचीच ती सुरवात म्हणावयास काही हरकत नाही. अकरावीला बोर्डाच्या गुणवत्ता यादीत ते आले.
मित्रांच्या सोबतचे त्यांचे जीवन खूपच रम्य व मिश्कील होते. भाऊ कुलकर्णी त्यांचे गल्लीतील मित्र. ते नेहमी सोबत असायचे. शुक्रवार पेठेतील शिंदेआळीत भाऊंचे घर तर अगदी टोकाला सुभाषरावांचे घर. दोघे प्रबोधशाळेत एकत्र जायचे. त्यांना सर्वजण जोडगोळी म्हणायचे. मजेची गोष्ट मात्र हे एकमेकांना ‘गबाळ्या’ ह्या नावाने हाक मारायचे. आपल्या व्यक्तिगत जीवनात व सामाजिक जीवनात प्रचंड व्यवस्थित असणारे सुभाषराव स्वतःवर सहज विनोदात्मक बोलायचे.त्याचा अनुभव आपल्याला आजही येतो.
पुढचे शिक्षण विज्ञान शाखेचे घेण्यासाठी ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे महाविद्यालयात व नंतर दोन वर्षांनी कला शाखेसाठी फर्ग्युसन महाविद्यालयात जाऊ लागले व संध्याकाळी मैदानावर. आजचे ज्याला दल आपण म्हणतो त्याला मैदान म्हणण्याची पद्धत त्यावेळी होती. १९६९ मध्ये प्रशाला सुरु झाली व त्याच काळात दलाची रचना बसायला लागली. युवक विभाग आकारास यायला लागला. युवक सचिव होते शरदराव. त्यावेळी प्रशालेतील मुलांचे पण दल चालायचे. त्या सोबतच प्रबोधिनीत इतर शाळेतील मुलांना पण सहभागी होता यावे यासाठी प्रबोध विभाग सुरु केला होता. त्याचे प्रमुख होते सुभाषराव. प्रबोधिनीचा देशभर विस्तार होण्यासाठीची सुरवातीची रचना म्हणजे हा प्रबोध विभाग. त्यात सुभाषरावांच्या सोबत होते अनंतराव अभंग. दोघे मिळून प्रचंड प्रयत्न करायचे. विविध मुले प्रबोध विभागात यावीत यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न असत. पुढे महाविद्यालयातील तरुणांच्या संघटनेच्या कामाला सुभाषराव भिडले. अनेक महाविद्यालयातील प्राचार्यांना जाऊन ते भेटले व दलावर येणाऱ्या मुलांना महाविद्यालयातील शारीरिक शिक्षणाच्या तासातून सूट द्यावी ही विनंती केली. दलावर त्यांचे शारीरिक शिक्षणच होते हे त्यांनी सगळ्यांना ठाम पणे सांगितले. प्रबोधिनी हिंदुस्तान व्यापी व्हावी यासाठीचे सुरवातीच्या प्रयत्नात युवक प्रबोधिनी म्हणून सुभाषरावाचा सहभाग होता.
हा सगळा काळ म्हणजे त्यांना प्रबोधिनीचा व ती.आप्पांचा परिसस्पर्श लाभण्याचा काळ होता. आप्पांचे सर्वांच्यावर विलक्षण निर्मळ प्रेम होते. त्या शुद्ध सात्विक प्रेमात अनेक लोक जवळ यायची. एकत्र आलेले सगळेच टिकतात असे नाही. टिकण्यासाठी त्यांना विचार द्यावा लागतो. विचारांची बैठक पक्की झाली म्हणजे माणूस कर्तबगार बनत नाही. त्याला कर्तबगार करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम किंवा प्रकल्पांचे दायित्व त्यांना द्यावे लागते. त्यातून कर्तबगार झालेल्या व्यक्तीला समर्पित होण्याचे भान निर्माण करायचे. ते केवळ राष्ट्रार्थ भव्य कृती करून आपले कर्म हिंदुभूमिच्या चरणी अर्पण करणाऱ्या जिवंत तपस्वींच्या सहवासातूनच शक्य होते. असे मनुष्य निर्माणाचे शिक्षण सुभाषराव घेत होते.
आपले काम हीच साधना व कर्तृत्वसंपन्न समर्पित जीवन हेच साध्य या प्रबोधिनीच्या नेतृत्वघडणीच्या प्रकियेसोबतच सुभाषरावांचे लौकिक शिक्षणातील यश अतुलनीय होते. त्यातील पहिला क्रमांक त्यांनी कधीच सोडला नाही. इतिहास, मानसशास्त्र,सांख्यिकी घेऊन पदवी व समाजशास्त्र व व्यवस्थापन शास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण अशी ती. आप्पांच्या मार्गदर्शनात त्यांची वाटचाल चालू होती.
विस्तार कार्यकर्त्यांची बैठक होती. त्या बैठकीच्या सुरवातीला पद्य असायचे. माझा प्रयत्न असायचा की ते पद्य जे प्रत्यक्ष जगले आहेत अशा व्यक्तीने आम्हाला शिकवले तर आमच्यावर वेगळे संस्कार होतात. असेच एक अतिशय अवघड पद्य म्हणजे
असु अम्ही सुखाने पत्थर पायातील
मंदिर उभारविणे हेच आमुचे शील॥धृ॥
आम्हास नको मुळी मान मरातब काही
कीर्तीची आम्हा हाव मुळीही नाहि
सर्वस्व अर्पिले मातृभूमिचे ठायी
हे दैवत अमुचे ध्येयमंदिरातील ॥१॥
पद्य संपूर्ण वाचले व समोर सुभाषराव उभा राहिले. त्यांना केवळ पद्य शिकवण्यासाठी आम्ही बोलावले. त्यांच्या आवाजातील ते पद्य एक दिव्य अनुभूती होती.
अभयाचा साधक
गीतेच्या १६ व्या अध्याय खूपच नेमका आहे. आपल्यातील पूर्णत्व प्रगटीकरण म्हणजे शिक्षण. पूर्णत्वाच्या प्रगटीकरणाचा अनुभव कसा घ्यायचा असा नेहमीच प्रश्न येतो. त्यावेळी हा १६ वा अध्याय मदतीला येतो. त्यात सांगितलेले दैवी गुण सहज प्रगट व्हायले की समजायचे आपले शिक्षण योग्य होत आहे. प्रबोधिनीचा प्रबोधक म्हणजे आयुष्यभराचा विद्यार्थी. या ईश्वरी गुणातील सर्वात पहिला व अतिशय महत्वाचा गुण म्हणजे अभय. भय –निर्भय –अभय असा प्रवास असतो. ती.आप्पांच्या सहवास सुभाषरावांचे असेच शिक्षण चालू होते. आयुष्यात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी बाह्य भौतिक गोष्टींचा आधार घेत आयुष्याला स्थिरत्व देण्याचा प्रयत्न करणाऱ्यातील सुभाषराव नव्हते. आज्ञांकितता सहज जमणे हे निर्भयाकडे नेते. आपल्या लौकिक शिक्षणाचा ती. आप्पा सांगतील तो मार्ग निवडणे याला मोठे धैर्य लागते. धोपटमार्गा सोडू नको अशी एकूण समाजात परिस्थिती असताना संघटनेला वेळ देता येईल असा अभ्यासक्रम निवडणे, त्यातही अगदी एकाग्र होऊन व अतिशय सुक्ष्मतेला जाऊन अभ्यास करणे, विद्यापीठात पहिले येऊन परत प्रबोधिनीच्या धारक विभागात उत्पादनाचे कामात झोकून देणे ही तर अभयाच्या प्रवासाची सुरवात होती.
७ ऑक्टोबर १९७८, नवरात्रीचे दिवस. ज्ञान प्रबोधिनीचे प्रबोधक व काही गावकरी शिवापूरला सहविचार करत होते. कंजार भाट १९६९ साली शिवापूर परिसरात आला व दारूचे व्यसन लाऊन अनेकांचे घर उद्धवस्त करत स्वतः लखपती बनला. समाजसंस्थापनेच्या कामात विपत्ती आणणारे असे बांडगुळ नष्ट केले पाहिजेत असा सगळ्यांच्या बोलण्याचा सूर होता. रामभाऊ डिंबळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ठरवले की आज टेकडीजवळच्या दारूच्या गुत्यावर जाऊन निदर्शने करायची. गुत्याची जागा पण बेकायदेशीर बळकावलेली. तरुण प्रबोधकांना पाहताच कंजारभाटांमधला एक माथेफिरू हातात कोयता घेऊन गरगर फिरवीत झोपडीतून बाहेर आला , “एकेकाला खापलून काढील फुडं याल तर !”तो म्हणाला.
“कोण कुत्री आलीयेत रं ? इचार दारू पायज्ये का कुनाला !”
वातवरणात विलक्षण ताण आला. इतक्यात “अरे, हा बघ मी आलो पुढे ! कर काय करायचे ते !” सुभाषराव पुढे सरसावले.
कंजारीही आवेशाने त्यांच्यावर कोयता घालणार इतक्यात सोबतचे गावकरी विजेच्या वेगाने पुढे आले. कोयत्याचा हात तिथेच पकडला. मोठी हात घाई झाली. दारूची पिंपं पालथी झाली,कच्चा माल दहा दिशांना पसरला.
अशा प्रकारे तीन ठिकाणचे दारूचे गुत्ते नष्ट करून सगळे प्रबोधक पोलिसचौकीत हजर. त्यांना पुढे कस्टडी, केस असे बरेच दिवस चालू होते. तुम्हाला आता निदान दहा वर्षे तरी तुरंगात राहावे लागणार असे सगळ्यांना सांगितले जात होते. प्रत्यक्षात सर्व आंदोलक निर्दोष सुटले. अशा परिस्थितीत पण नेटाने व खंबीरपणे सामोरे जाणारे सुभाषराव त्या घटनेतील एक प्रबोधक. ( प्रसंगवर्णन आ.लताताई चिरवसंत स्मृतिवन )असे जीवावर आले तरी घाबरायचे नाही हा तर नंतर त्यांचा स्वभावाच बनला. त्यातून निर्विवादपणे त्यांच्यातील अभयाचे गुण व्यक्त व्हायला लागले. कुठल्याही प्रसंगाला धीराने सामोरे जाणे हे त्याच्याकडून सहज घडू लागले. शासकीय भ्रष्ट यंत्रणेशी त्यांनी दिलेला निकराने लढा अनेक प्रसंगातून आपल्याला जाणवतो.
व्यक्तीत अभयाची प्रतिष्ठा करण्याच्या चार प्रक्रिया विनोबांनी सांगितल्या. १) आपल्या स्वतःला ‘स्व’च्या पुढे विस्तारित करा. आपल्यातील गुणांचा उपयोग केवळ उपजीविकेसाठी करण्यापेक्षा समाजहितासाठी करणे म्हणजे विस्तारत जाणे. २) प्रत्येक गोष्ट एकाग्रतेने करा. परिस्थिती,विषय साकल्याने,समग्रतेने अगदी मुळापासून समजावून घेणे म्हणजे एकाग्रता ३) प्रत्येक प्रकियेतील सूक्ष्मता समजून घ्या. वर-वरचे व भौतिक आधार किंवा संसाधने हे निमित्यमात्र असतात. आपल्याला सूक्ष्मातील जाणीवा, बदल व त्यांचे आकलन हे जास्त महत्वाचे.४) विशुद्ध व्हा !! आपल्या भावना,विचार, प्रक्रिया व कर्म अगदीच विशुद्ध असू द्या. सुभाषरावांचे आयुष्य समजून घेताना आपल्याला त्यांच्या प्रत्येक कृतीत,व्यवहारात,आचरणात या चारही प्रक्रिया अनुभवयास येतात.
अजितरावांच्या भाषेत अजातशत्रू , प्रत्येकासाठीचा खंबीर व शांत आधारस्तंभ, अनेकांचा अधिमित्र, सर्वाना बांधून ठेवणारा दुवा.
रामभाऊंच्या भाषेत सांगायचे झाले तर अगदीच मनोहर माणूस, व्यासंगी,आयुष्य कळणारा माणूस.
शरदरावांच्या भाषेत सांगायचे झाले तर समतोल, न डगमगता, टोकाला न जाता, सगळ्यांना बरोबर घेऊन कुठल्याही प्रश्नांच्या मुळाशी जाऊन कुणाला न सुचलेला मार्ग काढणारा चतुरस्त्र. मूर्तिमंत अभ्यास म्हणजे सुभाषराव.
उद्योगी संघटक
१९६७ ते १९६८ असे एक वर्ष सुभाषराव ती.आप्पांच्याकडे राहायला आले. खूपच मंतरलेला काळ होता तो. ज्ञान प्रबोधिनीची नवनवीन तोरणे बांधली जात होती. एकीकडे प्रशाला सुरु करण्याचे प्रयत्न सुरु होते तर ती स्वायत्त चालावी म्हणून उद्योग उभारणीचा विचार कोटीभास्करांशी चर्चा करून प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न सुरु झाला. जसे हे प्रशालेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष तसेच प्रबोधिनीच्या उद्योजकतेच्या आघाडीचे पण सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हटल्यास वावगे होणार नाही.
१९६९ मध्ये कोथरूडमध्ये धारक विभाग सुरु करण्यात आला. पुढील वर्षे तो कोथरूडमध्ये होता. धारक तयार करून ते फॅनच्या कंपनींना पुरवणे यातून त्याची सुरवात झाली. १९७० मध्ये प्रबोधिनीच्या वास्तूचा तळमजला पूर्ण झाला व सगळा धारक विभाग तिथे हलवण्याचे ठरवण्यात आले. सुभाषराव योगायोगाने याच काळात सहा महिने मोकळे होते. आप्पांनी त्यांना त्या कामात जुंपून जायला सांगितले. पुढील सात वर्षे ते ह्या विभागात काम करत होते. गंमत म्हणजे धारकातील ओ की ठो माहित नसणारे सुभाषराव चक्क त्या उद्योगातील उत्पादन विभाग सांभाळायचे. सर्वांच्या अथक प्रयत्नांनी धारक विभाग एकदम उर्जितावस्थेत आला. अगदीच भारतभर त्याची कार्यालये उभारली जाऊ लागली. जबरदस्त घोडदौड त्याकाळात चालू होती. दहा लक्ष रुपये निव्वळ नफा मिळवण्यापर्यंत विभागाने मजल मारली. १५० लोक या विभागात काम करत होते.प्रबोधन कप्यासिटर हा ISO नामांकित ब्रँड झाला. आजची प्रबोधिनीची वास्तू उभी करण्यात धारक विभागाचा मोठा वाटा आहे. छोट्या क्षमतेपासून ते गाडी मोठ्या धारक बँक तयार करण्यापर्यंत या विभागाची मजल मारली होती. अनिलराव देशमुख, जयंतराव आठल्ये व सुभाषराव यांचा त्यामध्ये मोलाचा वाटा होता.
वेल्हे भागात याच काळात खांडसरीचा प्रकल्प उभारत होता. अनेक जण त्याकामाला लागले होते. आदरणीय अण्णा त्याचे प्रमुख. १९७७ मध्ये सुभाषरावांना खांडसरीच्या कामासाठी पाठवावे अशी विनंती अण्णांनी ती.आप्पांना केली.सुभाषराव लगेच खांडसरीच्या मोहिमेवर. १९८०-८१ मध्ये खांडसरी खूपच जोरात चालू होती. दररोज २०० टन ऊसाचे गाळप व्हायचे. १२ रुपये किलोची स्वच्छ साखर आपण विकत होतो. त्यानंतर मात्र मोठ्या कारखान्यांच्या साखर लेव्हीची पद्धत बदलण्याचा शासन निर्णय झाला व महाराष्ट्रातील लहान क्षमतेचा सर्व खांडसरी उद्योग लयास गेला. प्रबोधिनीची खांडसरी पण त्याला अपवाद नव्हती. पण त्या निमित्ताने १९८१ साली प्यायला पाणी नसल्यास ऊस कसा पिकवणार ? असे प्रश्न सुभाषरावांना समजू लागले. त्यांच्या पाण्याच्या अभ्यासाची सुरवात यातूनच झाली.
प्रबोधिनीचे उद्योगातील मोलाचे योगदान म्हणजे यंत्रशाळा. अनिलराव रिसबुडानी सुरवात केलेला हा विभाग खूप वाढत गेला. 2500 ग्रामीण तरुणांना अगदी वेल्डिंग पासून अत्याधुनिक यंत्र वापरायला शिकवण्यात आले. त्यातून शंभरावर उद्योग या भागात उभारले. यातही सुभाषरावांचे योगदान होते. याच काळात फावल्या वेळात ज्ञान प्रबोधिनीचा प्रकाशन विभागाचे प्रमुख म्हणून पण सुभाषराव काम करत होते. संत्रिकेच्या पोथ्या ते प्रबोधिनीचा दुसरा खंड अंशतः प्रकाशित करण्याचे काम त्यांनी केले. अन्य प्रकाशनांच्या निमित्ताने पुणे परिसरातील १५ ते २० छापखाण्यात त्यांचा लीलया संचार होता. याच बरोबर धर्मनिर्णय मंडळाचे सहकार्यवाह ते होते. प्रकाशित साहित्याची मोठी पिशवी घेऊन सर्वत्र त्याच्या विक्रीसाठी फिरण्याचे काम ते मस्तीत करत होते.अगदी छात्र प्रबोधनचे सुरवातीचे अंक छापणे सुद्धा प्रकाशन विभागाच्या मदतीने चालू होते.
श्री.अत्रेय व दादा नवाथे यांच्या संकल्पनेतून IMLDची सुरवात प्रबोधिनीत करण्यात आली त्याचे सहप्रमुख म्हणजे सुभाषराव. कामं सारखी बदलली पण सुभाषरावांना मात्र त्याचा काहीच फरक पडत नसे. कामातून शिकत जाणे हे महत्वाचे.उद्योगाची वाटचाल चालू होती.एक न्यास म्हणून उद्योग चालवण्यात खूप मर्यादा असतात हे लक्षात येत होते. अनेक अडचणी दत्त म्हणून समोर उभ्या राहत होत्या. एका नंतर एक उद्योग बंद होत होते. उद्योग बंद करणे ही सोपी गोष्ट नाही. कामगारांचे संप, हाणामाऱ्या, कोर्टकेसेस,शासनाची बेबंदशाही एक ना अनेक संकट समोर उभी होती. उभारणे आणि विस्तारित करणे खूप आनंदाचे असते. उभ्या केलेल्या व्यापाला नीट व्यवस्थित निस्तारणे खूपच जिकीरीचे व दु:खाचे काम असते. सुभाषराव गमतीत म्हणतात, ‘‘अनेक कार्यकर्ते विस्तार प्रमुख होते मी मात्र निस्तार प्रमुख झालो.’’ अगदी गेल्या काही वर्षापर्यंत त्यांचे हे काम शांतपणे चालू होते. त्यातून तितिक्षा,पाठपुरावा, वकिलाला लाजवेल असे ड्राफटिंग यात मात्र ते तरबेज झाले. डोक्यावर बर्फ,तोंडात साखर,पायाला भिंगरी असे त्यांच्या कामाचे स्वरूप कित्येक वर्षे राहिले. भ्रष्ट व्यवस्थेशी संयमाने, सत्याची कास धरत धीरोदात्तपणे दोन हात करणारे सुभाषराव हाडाचे संघटक कार्यकर्ता आहेत. ‘‘शेवटी युवक विभागात जे शिकलो तेच जगात वापारायला शिकायचे.’’ हे सांगायला मात्र ते विसरत नाहीत.
अनोखे सुभाषराव
प्रबोधिनीच्या नवीन इमारतीचं काम चालू होतं. दुसऱ्या मजल्यावरच्या व्हरांड्यात आम्ही दोघे तिघे मित्र गप्पा मारीत उभे होतो. चौकात खाली वाळूचा ढीग पडला होता. विसू गुर्जरला लहर आली. ‘चल मारायची का उडी ?’
तो मला म्हणाला ‘चल तिघेही पाठोपाठ मारू...’मलाही स्फुरण चढलं. दुसऱ्या मजल्यावरून छलांग मारून विसू झेपावला सुद्धा. मी ही इकडे तिकडे न बघता दाणकन उडी ठोकून दिली.पायात झिणझिण्या आल्या. वाळूच्या ढिगावरून बाजूला होई-होईतो पाठोपाठ धप्पकन आवाज आला. आमच्यातील तिसरा भिडू म्हणजे अनिल. तो उडी मारून आला होता आणि पायावर पडण्याऐवजी बच्चमजी हातावर पडला होता. झालं ! सणसणीत फ्रॅक्चर. नंतर लोखंडी सळई घालून ३ महिने गडी जायबंद. ( आम्ही असे घडलो )
हे सगळे वर्णन करणारे व विसूभाऊच्या सोबत उडी मारणारे म्हणजे आपले सुभाषराव. बैठकीतले सुभाषराव व मध्यवर्ती मधील विसूभाऊ पाहिल्यावर असे काही अचाट त्यांनी केले असेल असे स्वप्नात पण वाटत नाही. अशाच स्वप्नात वाटणाऱ्या अनेक उड्या विविध कलेच्या प्रांतात त्यांनी सहजच घेतलेल्या आहेत. सुभाषराव खूप छान सोपे आणि अगदीच समजेल असे लिहितात. त्यांनी लिहिलेल्या लहान मुलांसाठीचे लेख,कथा अगदीच नाटकं वाचताना मन हरपून जाते. त्याच्या लेखणीतून उतरलेले पात्र पण खूप मस्त असतात. उत्तमतेवर लिहितानाचा उत्तम वाघ कधीच विसरत नाही. स्वीकारशील स्वदेशी, हट्टी व्हा, हट्टी व छात्र प्रबोधन मधील त्यांचे लेख असेच मस्त आहेत.
ललित लेखनातील त्यांची हातोटी अफलातून आहे. प्रबोधिनीच्या दुसऱ्या खंडातील त्यांचा लेख ‘हिंदुस्थानच्या पंतप्रधानांची ज्ञान प्रबोधिनीला भेट’ खूपच प्रवाही आहे. प्रत्यक्ष समोर तो क्षण उभा राहतो. तर तिसऱ्या खंडातील ती.आप्पांशी आत्मिक नाते सांगणारा लेखाची सांगता करताना लिहिलेल्या चार ओळी त्यांची वेगळीच ओळख करून देतात.
तू जगून म्हटले काही
मी वाचित अर्था आहे
जागेन तुझ्या स्वप्नी मी
हे स्वप्नच सारे आहे.....
मी असाच मध्यंतरी एका अपघातानंतर जायबंदी होतो. मोकळ्या वेळात अंबाजोगाईतील एका कविमित्राच्या कवितांवर लिहिले व सर्वाना पाठवले. दुसऱ्या दिवशी मेल बॉक्स उघडला. समोर सुभाषरावांचे त्याला उत्तर होते. थोडे घाबरत घाबरतच मेल उघडला. नक्कीच काही तात्त्विक उपदेश असेल वाटत होते. निघाले मात्र वेगळेच.
जिवंत बालाजीच्या श्रीमंत कविता आवडल्या.
कालच पुण्यात ग्रेस च्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला. हृदयनाथ मंगेशकर आणि
डॉ. द. भि. कुलकर्णी होते.
अप्रतिम रंगला. गायन व समीक्षा अशी जुगलबंदी होती. ग्रेसला दुर्बोध म्हणण्याचा
अबोधपणा करू नका, असे सांगणे होते.
अवघे २८ वर्षे आयुष्य लाभलेल्या बालकवींची व ग्रेसची जातकुळी एक वाटते, असे
द.भि.म्हणाले.
बालाजीला शुभेच्छा.
कवितेतून उतरतं ते मन असतं
मनातून उतरतं ते वन असतं
वनातून उतरतो तो वणवा असतो
म्हणून कविता जाळत जाते --
इतरांना आणि कवीलाही!
यातील कवितेच्या ओळी त्यांच्या होत्या. ते अतिशय कर्तबगार कवी आहेत. त्या क्षेत्रातील त्यांची लीला रामभाऊंकडून ऐकण्यात वेगळीच मजा असते. त्यांनी अनेक दिवाळी शुभेच्छा कविता दोघांनी मिळून रचलेल्या आहेत.सुभाषराव नाटकात उत्तम काम करायचे. प्रबोधिनीत नाटक बसवण्यात पण ते चांगलेच पुढे असायचे. एकलव्य नाटकातील ते द्रोणाचार्य व त्यांची झालेली फजिती त्यांच्याच शब्दात वाचताना पोट धरून हसायला येतं..ते छान गातात पण. शिवापुरातील थोरले देशपांडे वाड्यात आदरणीय आण्णांच्या सहवासात ते अनेक पद्य म्हणायला शिकले.अनेक पद्य त्यांना तोंडपाठ आहेत.नाटक,सिनेमा, काव्यमैफिली,साहित्यिक संवाद यांचे अतिशय सुंदर रसग्रहण ते करू शकतात.शारदेच्या मंदिरातील हा साधक पाण्याचे काम करताना पुढे कमालीचा शुद्ध झाला.
फेसबुकवर फावल्या वेळात माझे अचाट पराक्रम चालू असतात. असाच एकदा पुनर्जन्मावर काहीसे प्रश्न लिहिले. त्यावर मात्र सुभाषराव म्हणतात , ‘‘पुनर्जन्म नाही हे मानून आज कामाला लाग.’’ मी मनात हसलो व कामाला लागलो.
आम्ही कृती नित करु झिजवोनि काया !!
‘‘दिनांक १५ चा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीचा. दुपारी ३ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत गणेश विसर्जन मिरवणूक चालू होती. पायाचे तुकडे होईपर्यंत आम्ही सगळे खेळत होतो.लयबद्ध ढोलगर्जना आसमंत दुमदुमवून टाकत होती.ती धुंदी अशी होती की,वेळेचं भान उरत नसे. आजही तशा मिरवणुकीत ताशा वाजवताना मला आजूबाजूचं जग विसरायला होतं.’’
‘‘परीक्षा जसजशी जवळ येत गेली, तसतसे अभ्यासाचे रोजचे तास आप्पा वाढवत असत. एका कागदावर आलेख काढलेला असे. मार्चमध्ये तर अभ्यास दिवसाला १८ तासांपर्यंत जाऊन पोहोचला.’’
‘‘सकाळी लवकरच उठायचे. ६.१५ ची उपासना झाली की कामाला लागायचे. रात्र कधी होते हे पण कळायचे नाही. धारक विभागाचे काम खूपच जोरात सुरु होते.’’ सुभाषराव.
मे मधील मराठवाड्यातील मोकाट उन्हाळा. सकाळी पाचाच्या आधीच सगळे उठले होते. महाश्रमदानात त्यांनी खरेखुरेच श्रमदान केले होते चांगले तास दीड तास. शेपवाडीला शिवार फेरी होती भरदुपारी. गावातील कार्यकर्ते उत्साहाने सगळा शिवार फिरून दाखवत होते. विवेक गिरिधारी मला म्हणाला आता थोडं आवरते घे. मी सुभाषरावानां, “ थांबूया का?” म्हणून विचारले. “अरे! आता तर सुरवात केली. सगळे पाहूनच थांबू.” पुढे तीन तास त्यांनी प्रचंड आस्थेने सगळे शिवार पाहून घेतले. चेहऱ्यावरील उत्साह अजिबात कमी नाही. थोडे फार जेवण झाले की दुसरी शिवार फेरी करण्यासाठी ते तयार होते. दरवर्षी त्यांच्या अंबाजोगाई फेरीत असा निदान १२ ते १५ तास शिवार फिरण्याचा अनुभव घेता येतो.
पाण्याचे काम सुरु झाले व सुभाषरावांच्या शिवार फेऱ्या सुरु झाल्या. त्याच सोबत कित्येक तास त्या विषयातील अभ्यास करणे सुरु झाले. पाण्याचा कामाचा इतिहास, विज्ञान,मानसशास्त्र, समाजशास्त्र व तंत्रज्ञान सगळेच ते कोळून प्याले. हे सगळे असूनही नवीन होणारे प्रत्येक काम समजून घेण्यासाठी ते प्रचंड उत्सुक असतात.
सुभाषराव स्वाभाविक कर्तव्यपरायण, अत्यंत सज्जन, सहजगत्या समर्पित आहेतच ; त्याहीपेक्षा त्यांना कशाचा ताठा नाही. त्यांच्या बरोबर काम करताना कुठलाच आडपडदा येत नाही. सगळ्या गोष्टी ते साकल्याने समजून घेतात. त्यांच्या कामातील आणि विचारातील व्यवस्थितपणा मुलखाचा वेगळा आहे. कण्हत कुथत कुठेच काम नसते. असे असले तरी व्यवहारातील भाबडेपणा अजिबात नाही. त्यांना लोकांच्या लबाड्या लगेच कळतात. त्यांना कुठलाही माणूस भ्रमात ठेवु शकत नाही. हे सगळे मात्र खूप वेगळेच आहे. अशी माणसं प्रेरक माणसांपेक्षा प्रभावी ठरतात.
ससेवाडी मधील पाण्याचे काम तर एका वेगळ्याच उंचीवर गेले. अगदीच ग्रामस्थांच्या बैठका,प्रशिक्षणे, पाझर तलावांच्या जागा निश्चित करणे,गावातील वाद,लोकांचे दुटप्पी वागणे, गावापातळीवरील राजकारण यासर्वांना पुरून उरले ते सुभाषराव व अतिशय तज्ञ अभियंत्याला लाजवेल अशा अभ्यासाच्या जोरावर अनेक पाझर तलाव बांधले गेले.
कामाचे तपशीलवार नियोजन करून होणाऱ्या कामाचे अगीच बारकावे समजून घेण्यात समोरच्या माणसाला छोटेछोटे प्रश्न विचारत त्याला कार्यकुशल करण्याची त्यांची हातोटी कमालीची आहे.अंबाजोगाईतील कामात त्यांनी मला इतक्या कुशलतेने अगदीच बारकाव्यांचे निवेदन करायला प्रेरित केले. हळूहळू तर जेसीबीच्या कामाचे सगळ्या गावातील दररोजचे तपशील त्यांना मी पाठवू लागलो. त्यातून होणारे घनमीटर मधील काम बरोबर होतंय न व नेमके कोणते काम चालू आहे यावर त्यांची बारीक नजर होती.
काही उदाहरणे ......
‘अहवाल ठीक झाला आहे.
वाचक वर्ग वेगवेगळा असल्यास यात थोडा-थोडा फरक करत हाच आशय पाठविता येईल.
टेबल मधील आकड्यांना 'युनिट्स' द्यायला हवीत.’
‘काम वेगाने चालू दिसते. त्या-त्या गावातील अपेक्षित घनमीटर किती? काम पूर्ण होऊन एखाद्या गावातील मशिन दुसऱ्या गावात गेले असे झाले का?’
‘दुष्काळ निवारण कामाचा अर्थ संकल्प पाहिला. ठीक आहे.
त्या त्या कामातील लोकवाटा वेगळा दाखवून नक्त निधीची आवश्यकता वेगळी दाखवावी.
ग मधील पंप इ. आवश्यक आहे ?
अर्धवेळ अकौन्टट मुलगी नेमून तिच्याद्वारे मध्यवर्तीशी संपर्क ठेवावा.
बजेट मध्यवर्तीला पाठवून रक्कम २ हप्त्यात ट्रांसफर करून मागावी.
3 quotations, Taxable
Invoice, applicability of Service Tax, Deduction of TDS,
depositing deduced
amounts in JP's tax accounts या गोष्टींसाठी मध्यवर्ती चिंतेत असते.
मोठी बिले म्हणून पुण्यातून द्यावीत.
२०१५-१६ चे ऑडीट तेथे करून घ्यावे व येथे सर्व ओरिजिनल कागदपत्रे पाठवावीत.
‘कच्चा म्हणून ठीक आहे. रकमा कशा गुणाकाराने आल्या ते पुढच्या पायरीला मांडावे .
गावांची नावे , तलावाचे नाव इ . तपशील घालावेत .
विज्ञान - तंत्रज्ञान केंद्र खर्च वेगळ्या बजेट मधून करावा . दुष्काळ निवारणाशी मिक्स अप नको .
वार्षिक अंदाजपत्रकाला बरेच होम वर्क करून महिनावार मांडणी करावी लागेल.’
सुभाष देशपांडे .
प्रशिक्षक संघटक .....
ज्ञान प्रबोधिनी म्हटले की समोर सर्वप्रथम येते ते शिक्षण. शिक्षण कसे असावे ? याचे उदाहरण प्रबोधिनी समाजाला घालून देते. परंतु हे शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षण नाही तर माणसं घडविणारे शिक्षण आणि ते पण कोणत्याही वयाच्या माणसांचे. त्यामुळे प्रबोधिनीतील प्रबोधक हा शिक्षक ही असणार व प्रशिक्षक पण.आपण जे शिकलो ते लोकांना देत त्यांना जोडून घेण्याची ही पद्धती. सुभाषराव याला थोडेच अपवाद असणार.
गेली २५ वर्षे सुवर्णाताई व सुभाषरावांची दर १५ दिवसानंतरची कमीत कमी तासाभराची बैठक कधीही चुकली नाही.त्यातून आकाराला आले बचतगटाचे व स्त्री शक्ती ग्रामीणचे विस्तारित सशक्त काम. असेच एकदा सुवर्णाताई व बागेश्रीताईनी कार्यसंकल्प बनवला. तो सुभाषरावानां दाखवला. त्यातील सुचवलेले तांत्रिक बदल त्यांनी पाहिले. त्यात मात्र एक नवीनच मुद्दा त्यांना टाकलेला आढळला. प्रमुखांची दिल्ली अभ्यास सहल. दोघींच्या कल्पनेत तो विषय नव्हता. सुभाषरावांनी तो सुचवला म्हणजे आता केलाच पाहिजे असे दोघींनी ठरवले व जोरदार ग्रामीण महिलांची अभ्यास सहल दिल्लीला झाली. आपल्या अशक्य जे वाटते असे काही तरी दर वर्षीच्या कार्यसंकल्पात घालून ठेवायचे हे सहजच शिक्षण सुभाषरावांनी दोघींचे केले.
प्रबोधिनीतील कार्यकर्त्यांच्या पासून ते शासनाच्या अधिकाऱ्यांचे, उद्योगातील वरिष्ठांचे, सामाजिक संस्थांमधील कार्यकर्त्यांचे, शेतकऱ्यांचे, महाविद्यालातील मुलांचे सामाजिक उद्योजकतेचे असे अनेक प्रशिक्षणे सुभाषरावांनी घेतले आहेत.
१९९२ मध्ये तर रामभाऊंच्या फियाट मध्ये व्हिडिओ कॅमेरा व इतर प्रशिक्षण साहित्य घेऊन ते व सुभाषराव व त्यांचे इतर सारे सहकारी प्रशिक्षण घेत महाराष्ट्रभर फिरले. ते होते लघुपाटबंधारे खात्यातील शासकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण. जवळपास १५० बंधाऱ्यांचे पाणी शिवारभर खेळवता येण्या साठीचा अतिशय सूक्ष्म अभ्यास, प्रभावीपणे तो संक्रमित करण्याची पद्धती याचा चांगलाच अनुभव अधिकाऱ्यांना आला. त्यातून निर्माण होणाऱ्या पाणी वापर संस्थाची रचना. एकूणातच ते प्रशिक्षण शासकीय धोरणावर प्रभाव टाकणारे ठरले.
प्रशिक्षण देणारा कधीकधी मात्र स्थिरावतो. सुभाषराव मात्र नेहमीच विद्यार्थी राहिले. २००६ला त्याने अजून एक शिकण्याचे आणि शासनाला व राजकीय कार्यकर्त्यांना धडा शिकवण्याचे मोठे काम केले. जागतिक बँकेचा ‘जलस्वराज्य प्रकल्प’ थेट वाशीम व हिंगोली जिल्ह्यासाठी प्रबोधिनी तर्फे घेण्यात आला. जिल्हापरिषदेच्या अगदीच मुरलेल्या शासकीय व राजकीय यंत्रणेला त्यांनी थेट आव्हान दिले. आम्ही चोऱ्या करणार नाहीत आणि चोऱ्या करू देणार नाहीत.
मुंबईच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील मित्राचा मला फोन आला. ‘‘देशपांडेसर कोण आहेत प्रबोधिनीत ? ते विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण घेण्यासाठीचे शासनाने नेमलेले तज्ज्ञ आहेत.’’ सामजिक उद्योजकता हा विषय होता. महाविद्यालयातील मुलं त्यात परत ख्रिस्ती चर्चने चालवलेले ते महाविद्यालय.मुलांचे शिक्षण थोडे आणि सोंगेच फार होती. सुभाषरावांना जमेल का अशा मुलांचे प्रशिक्षण घ्यायला. मी सुभाषरावांना सगळे सविस्तर सांगितले. ‘‘अरे काय घेऊन पाहू त्यांचे, नाही झाले तर आपले तरी नक्कीच प्रशिक्षण होईल ...चल जाऊ सोबत,’’ उदघाटनाच्या कार्यक्रमात गोंधळ घालणारी पोरं मात्र सुभाषरावांचे सत्र सुरु झाल्यावर एकदम शाळेतील मुलांच्या सारखे शांत व उत्साही होते. माझा मित्रच काय, मी पण अवाक् होऊन एकमेकांच्याकडे पाहात होतो.
मुळातच संघटनेचा भक्कम पाया असणारे सुभाषराव माणसांना शिकवण्यात तज्ञ तर आहेतच पण माणसे जोडण्याची त्यांची ताकद फार कमी लोकांना माहित आहे. दत्ता सायगावकर( हिंदू सोसायटी,कॅनडा ) यांच्याशी सुभाषराव २३ वर्षे नित्य संपर्कात होते. प्रबोधिनीचे सगळे वृत्त ते आवर्जून त्यांना पाठवत. त्यांनी मृत्युपूर्वी प्रबोधिनीला एक कोटी रुपयांची देणगी दिली. असेच एक नाव म्हणजे केएसबी पंप्स चे निवृत्त चेअरमन श्री. अनंत सेटलवाड. गेली १५ वर्षे ते नियमित प्रबोधिनीला देणगी देतात. अशा अनेक लोकांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे.
अतिशय हळुवारपणे तर कधी अगदीच कठोरपणे आपल्या कामाचे सत्य दर्शन आपल्याला व्हावे, त्या कामातून आपल्याला प्रेरणा मिळावी,आनंद मिळावा. एवढेच नाही तर ते काम आपल्या आयुष्याचे व्हावे यासाठी सुभाषरावांचा प्रयत्न चालू असतो. गेले ४६ वर्षे त्यांच्या सोबत असणारे रामभाऊ म्हणतात, ‘‘आजही सुभाषरावांच्या बरोबर काम करायचे म्हंटले की नवा हुरूप येतो. मित्र म्हणून ते तर अगदीच राजा माणूस आहेत.’’ आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत कसे परस्परपूरक व्हायचे हे शिकावे तर ते सुभाषरावांच्याकडून.
९३-९४ सालची गोष्ट!
सुवर्णाताई गोखले
तेव्हाचा ग्राम विकसन विभाग ३ लोकांचा होता. माधवराव, हर्षाताई व सुभाषराव!
आपल्याकडे हातपंपाचा कुठलासा प्रकल्प चालू होता. त्यासाठीच्या भित्तीपत्रकासाठीची काही छपाई, मुद्रण विभागातून चालू होती. प्रुफ तपासून अंतिम झाले. पण छपाईला जाण्यापूर्वी त्यात दोन शुद्धलेखनाच्या चुका लक्षात आल्या.
खरतर चुका तशा फारच किरकोळ होत्या.
त्यावर चर्चा झाली.हे पत्रक काही सदाशिव पेठेत लावायला छापत नाही. ग्रामीण भागात तर लावायचंय, चुका इतक्या किरकोळ होत्या की काहींना दाखवल्या शिवाय लक्षातही येत नव्हत्या.
...
आता छपाई साठी पॉझिटिव्ह सुध्दा करुन झाल्या होत्या... नाही म्हटलं तरी एक दिड हजार खर्च जास्त करावा लागणार होता. प्रकरण सुभाषरावांकडे गेलं.
त्यांनी विचारलं,, “चुका आहेत ना?” “हो!” “मग दुरुस्ती करायची! इतरांना कळताहेत का? हा निकष वापरायचा नाही तर आपण उत्तमच करायचं .... आपल्यासाठी!!
आपल्याला आपण बिनचूक आहोत असा विश्वास हवा. इतरांना चुका सापडतात असा निकषच नाही!' .... 'मग त्यासाठी किंमत मोजावी लागली तर मोजायची! पण पुढच्या वेळी अशी चूक होणार नाही याची कसून काळजी घ्यायची.”
उत्तमतेचा आग्रह असा छोट्या छोट्या गोष्टी मधून सुध्दा लाऊन धरायचा असतो हे मी तेव्हाच शिकलो !!
मैत्र ....
१.
सुभाषराव,
एक लोभस तरी कणखर व्यक्तिमत्व .प्रबोधशाळेत १९६६ व १९६७ मध्ये सुभाषरावांशी फारसा संबंध आला नाही. नंतर १९६८ ते ७२ मी बाहेर असल्यामुळे त्यांच्याशी फारच कमी संपर्क होता.
खऱ्या अर्थाने सुभाषरावांचा सहवास लाभला तो करंजवणे येथे.१९८० च्या सुरवातीला मी करंजवणे येथे दुग्धघट विभागप्रमुख म्हणून दाखल झालो त्यावेळी खांडसरी विभागाची आवरा आवर चालू होती.पण सुभाषराव यांचा मुक्काम पुढे काही महिने होता.त्यावेळी सकाळी उठल्यावर विहिरीला किती पाणी आहे हे पाहून दिनक्रम ठरवावा लागत असे पण सुभाषराव नेहमी प्रमाणे हसतमुखाने वावरत असत.
या कालावधीत सुभाषरावांच्या वागण्याचे अनेक पैलू अनुभवायला मिळाले. एकदा सकाळी तेथील वाळवनकट्ट्यावर ( आधी येथे साखर वाळवत असत म्हणून ) नेहमी प्रमाणे उपासना चालू होती. त्यावेळी पुण्याहून काही माल घेऊन एक ट्रक आला व त्यातील काही माणसानी जोरात बोलावयास सुरवात केली.उपासना संपल्यानंतर सुभाषरावांनी जो रुद्रावतार धारण केला त्यामुळे त्यांचा आवाज बंद झाला. संयत रागावण्याचा तो एक वस्तुपाठ होता.
शहरापेक्षा गावात तिखट खाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यात ज्या मावशी जेवण तयार करायच्या त्या भाजीत मूठभर मिरच्या घालायच्या. सुभाषरावाना तिखट चालत नाही म्हणून ते जेवायला बसताना कपाळावरचा घाम पुसायला रुमाल घेउन बसत. पण कधी तक्रार केल्याचे ऐकलं नाही.
तेथे नेहमीच शेतकऱ्यांची शिबिरे घेतली जायची. अश्यावेळी सगळ्यांचे शांतपणे ऐकून घेऊन सूत्रसंचालन करणे म्हणजे तारेवरची कसरत असते पण सुभाषराव ते लीलया करत असत. तसेच खेळीमिळीने बैठक योग्य सुरावर संपविणे यातही त्यांचा हातखंडा आहे.
संध्याकाळी काम संपल्यावर समोरील टेकडीवर बसून विविध विषयांवर चर्चा करणे हा त्यांचा आवडीचा छंद होता.
नंदकुमार कानडे
२.
१९६४ नंतर १९७३ पर्यंत प्रबोधिनीच्या संपर्कात नव्हतो.१९७३ मध्ये अनिल राव रिसबूड यांचे बरोबर ईम्प्रिंग्नेशन प्लांन्ट तयार करण्यासाठी प्रबोधिनीत आलो आणि पुढील १० वर्ष मा. आप्पांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झोकून देऊन काम केले.
ह्या काळात सुभाषरावांच्या बरोबर काम करण्याचा योग आला.अनिलराव देशमुख, सुभाषराव व माझी एक टीम म्हणून काम सुरू केले.
हे मंतरलेले दिवस होते.
मी प्रामुख्याने विक्री, अनिलराव डेव्हलपमेंट व सुभाषराव उत्पादन बघायचे.
विचारांच्या स्पष्टतेबरोबर माणसांना हाताळण्याची सुभाष रावांची हातोटी वाखाणण्याजोगी होती.
एका कंपनी मध्ये संप केलेल्या १०-१५ जणांना आपण घेतले होते, त्यातील काही सर्वगुणसंपन्न होते, त्यांना हाताळणे सोपे काम नव्हते.
गुजरात ईलेट्रिसिटी बोर्डाच्या अनेक आँर्डर्स असायच्या. पण प्रत्यक्ष कमी वेळात मोठ्या संख्येने कपँसिटर कसा बनवायचा असा प्रश्र्न सुभाष रावांना पडला होता.त्याचे उत्तर २४ तासांतच त्यांना मिळाले.सुहास जोशी, श्रीकांत भाटे यांना मदतीला घेऊन मी एक कपँसिटर २४ तासांत आप्पांच्या टेबलावर ठेवला.त्यानंतर सगळी चक्र च फिरली आणि सुभाष राव जोमाने कामाला लागले.मा.आप्पा देखील स्वत: पेंटिंग करायला आले.
नंतर महिना ४०००/५०००/६००० केव्हीएआर अशी उत्पादनाची चढती मांडणी सुरू झाली.
बाहेरच्या देशातील मोठ्या पाहुण्यांच्या स्वागताची योजना,त्याचा तपशील,हे एकदा सुभाषरावांनी हातात घेतले की ते चोख असणारच.
खरंच आहे, ज्याला व्यवस्थापन जमले,त्याला काहीच अशक्य नाही.!
जयंतराव आठले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा