सोमवार, २७ एप्रिल, २०२६

पाटल्या नावाची एक नशा........

 

पाटल्या नावाची एक नशा........

 


अंबाजोगाईच्या मातीला एक वेगळाच गंध आहे आणि इथल्या माणसांना एक वेगळाच बाज. माझ्या दैनंदिन आयुष्यातील एक सोनेरी पान म्हणजे पवनसुत हनुमान मंदिराच्या दर्शनाचा तो प्रहर. वेळ ठरलेली असायची आणि त्या वेळेसोबतच नियतीने जणू एक भेटीचा योगही ठरवून दिलेला असायचा.

 

मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर पडल्यावर डोळ्यासमोर जे दृश्य उभे राहायचे, ते आजही काळजाच्या कोपऱ्यात लख्ख कोरलेले आहे. समोरून एक पहाडासारखा उंच आणि धिप्पाड देहाचा माणूस चालत यायचा. पांढरी शुभ्र टोपी, अंगात पांढरा सदरा, तेवढ्याच रुबाबातील पांढरे धोतर, डोळ्यांवर चष्मा आणि हातात एक छत्री. हा केवळ एक माणूस नव्हता, तर ते जुन्या काळच्या घरंदाज संस्कृतीचे चालतेबोलते प्रतीक होते.

 

त्यांना पाहताच माझे हात आपोआप जोडले जायचे. तो मजबूत बांध्याचा माणूस तेवढ्याच आत्मीयतेने थांबायचा आणि अतिशय प्रेमाने विचारणा करायचा, "काय चाललंय प्रसाद, कसा काय आहेस?". त्यांच्या त्या एका वाक्यात संपूर्ण जगाची विचारपूस असायची. अंबाजोगाईच्या बदलत्या काळात अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व आणि असा वेष आता दुर्मिळ होत चालला आहे. हे व्यक्तिमत्व म्हणजे कळंबआंब्याचे पाटील. मुबलक शेतीवाडी असलेले घरंदाज पाटील, पण पेशाने 'तलाठी'. महसूल विभागातील प्रत्येक बारकावा त्यांच्या जिभेवर असायचा. पण त्यांची ओळख केवळ त्यांच्या पदापुरती मर्यादित नव्हती. अंबाजोगाईच्या प्रसिद्ध भट्टगल्लीतील संस्कारांचा वारसा त्यांच्याकडे होता. जिथे गणेश पार आहे, त्या भट्टगल्लीतले लोक म्हणजे एकाहून एक दिग्गज. तिथल्या गप्पांमधला तो अस्सलपणा आणि बोलण्यावर असलेला तो खास 'भट्टगल्ली संस्कार' समोरच्याला थक्क करून सोडायचा.

 

एकीकडे हा जुना वारसा आणि दुसरीकडे अंबाजोगाईची आधुनिक ओळख असलेली 'आदर्श कॉलनी'. बाहेरून आलेल्या लोकांनी वसवलेली ही कॉलनी, जिथे प्राध्यापक आणि विद्वानांची मांदियाळी आहे. अंबाजोगाईतील इरसाल पुणेरी. याच कॉलनीत गणिताचे प्रसिद्ध शिक्षक पा.य.दीक्षित यांचे घर आहे, जिथे माळ्यावर बसून मुले गणिताचे शिकायचे. त्या दीक्षित घराच्या शेजारीच उत्तरेला तोंड असलेले एक लंबूळके घर आहे. त्याच घरात, त्या धिप्पाड देहाच्या आणि महसुली ज्ञानाच्या वारशात जन्मलेल्या एका ' पाटलाची' ही गोष्ट आहे. ही केवळ एका माणसाची गोष्ट नाही, तर ती अंबाजोगाईच्या गल्लीबोळांतून प्रवाहित होत आलेल्या एका समृद्ध कालखंडाची साक्ष आहे.

 

पाटलाचा थाटच न्यारा! यांच्या तोंडून कधी सरळ वाक्य बाहेर पडेल, हे खुद्द देवालाही ठाऊक नसावं. बोलताना हाताची लांब लांब बोटं हवेत फिरवत, कवटीतल्या डोळ्यांना मोठं मोठं करत जेव्हा पाटील बोलायला लागतात, तेव्हा समोरचा माणूस अर्धा गार पडतो. त्यांच्या चेहऱ्याचा हावभाव आणि आवाजाचा तो जरब... विचारूच नका! पाटलांच्या बोलण्यातला तो 'विशिष्ट' ताठा आणि आवाजातली ती धार अंबाजोगाईच्या मातीचा अस्सल नमुना वाटत असे.

 

या पाटलांच एक खास वैशिष्ट्य म्हणजे, इतर पाटलांसारखे हे 'रंगीबेरंगी' नाहीत. स्त्रिया आणि मुलींपासून हे पाटील कायम 'दोन हात लांब' असतात. या बाबतीत पाटील प्रचंड सुसंस्कृत आणि 'संयमी' आहेत. चुकून जरी कोणी या विषयावर काही बोलायला लागलं, की पाटलांचा पारा चढलाच म्हणून समजा! मुळचे पाटील असल्यामुळे लहानपणापासूनच दुसऱ्यांना आपल्या नियंत्रणात ठेवणं, वर्चस्वाखाली ठेवणं आणि थोडी 'दडपशाही' करणं, हा गुण पाटलांमध्ये उपजतच आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे, हे गुण त्यांच्या वडिलांमध्ये अजिबात नव्हते. पण आपल्या या  पाटलांमध्ये मात्र हे गुण अगदी ठासून भरलेले आहेत. योगेश्वरीच्या मोहिते गुरुजींकडे ट्युशनला जाणारा हा मुलगा तिथेही आपली 'पाटीलकी' गाजवायचा. पाटलांच्या बोलण्यात जितकी 'बोली-पाटीलकी' होती, तितकीच जबरदस्त पाटीलकी त्यांच्या अक्षरातही होती.

 

जेव्हा पाटलांचं तोंड बंद असतं आणि त्यांचा चुलबुलेपणा थोडा शांत होतो, तेव्हा त्यांच्या हातात वही आणि पेन आलं की कागदावर अक्षरशः 'मोती' उतरतात. इतकं सुंदर, वळणदार आणि मोत्यासारखं अक्षर की पाहणाऱ्याने पाहतच राहावं! मला पाटलांच्या कशाचाच हेवा वाटत नाही, पण त्यांच्या त्या राजबिंड्या अक्षराचा मात्र मनापासून हेवा वाटतो.  पाटील म्हणजे जिवंत 'अनप्रेडिक्टेबिलिटी'! ते कधी काय बोलतील, काय करतील आणि कुणाचं कसं 'कल्याण' करतील, याचा अंदाज बांधणं म्हणजे वाळवंटात पाण्याचा शोध घेण्यासारखं होतं. त्यांची अनिश्चितता हीच त्यांची ओळख होती. पाटलांच्या आयुष्यात मित्रांचं स्थान मोठं होतं. सुरुवातीला सुनील मोहरील आणि उटीकर यांसारख्या दिग्गज प्राध्यापकांच्या मुलांसोबत वावरणारे पाटील, काळानुसार बदलले. पुढे सुंदर जगताप आणि दत्तात्रय सुरवसे यांसारखे सवंगडी आले. या सगळ्यांचा 'बॅकिंग पॉईंट' असायचा तो म्हणजे योगेश्वरी कॅन्टीन! चहा, चर्चा आणि जगाच्या भल्याभल्या बाता तिथेच रंगायच्या. अंबाजोगाईत पाटलांच्या जोड्याला तोड आजही नाही.

 

बारावीच्या वर्षात जेव्हा सगळी मुले अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेली असायची, तेव्हा आमचे पाटील दत्तात्रयाला जाऊन शांतपणे सांगायचे, "घाबरू नकोस, मी या वर्षी ड्रॉप घेतोय!". एकदा का पाटलांनी ठरवलं, की साक्षात यमदेव जरी समोर आले तरी पाटलांचा निर्णय बदलणं अशक्य! एक वर्ष गॅप घेतला, मन लावून अभ्यास केला, ९० टक्क्यांच्या वर गुण मिळवले आणि संभाजीनगरच्या (औरंगाबाद) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engineering) साठी थाटात प्रवेश मिळवला!

 

संभाजीनगरमधील मौजे एकनाथ नगरमध्ये पाटलांचा एक आलिशान महाल होता, जिथे ते खऱ्या अर्थाने राजेशाही आयुष्य जगायचे. पाटलांचा सर्वात लाडका खेळ कोणता असेल, तर तो म्हणजे 'रम्मी'! "लावा रे डाव!" असं म्हटलं की पाटलांचे डोळे चमकू लागायचे. मग ते अभियांत्रिकीचे दिवस असोत किंवा मित्रांच्या लग्नाचे सोहळे, पाटलांचे रम्मीचे डाव नेहमीच रंगात असायचे. पाटलांची जीवनशैली ही पूर्णपणे 'उफराटी' होती. सूर्य माथ्यावर येईपर्यंत पाटील कधीच बिछान्यातून उठायचे नाहीत. त्यांची रात्र मात्र अभ्यासासाठी असायची. त्यांच्या या 'रात्रीच्या खेळामुळे' बिचारे संदीपन आणि दत्तात्रय मात्र पुरते हैराण व्हायचे.

 

पुढे संभाजीनगरमधील एका भव्य दिव्य प्रासादात पाटील राहायला आले. तिथे घराच्या ओट्यावर पाटील जेव्हा आपली हाडे लपवण्यासाठी अंगाभोवती टॉवेल गुंडाळून बसायचे, तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखं असायचं. बाहेरची हाडं मात्र दर्शनी असायची. शासकीय अभियांत्रिकीचे विद्यार्थी आणि तेही असे 'कुपोषित' अवतारात पाहताना संभाजीनगरकरांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू उमटायचं. असे हे  पाटील... कधी विजीगिषु, कधी रम्मीचे शौकीन, तर कधी कमालीचे शिस्तप्रिय अभ्यासक.

 

 

इंजिनिअरिंगच्या त्या धडपडणाऱ्या दिवसांत पुस्तकी ज्ञानापेक्षा आम्ही माणसांची समीकरणं जास्त शिकलो आणि त्या समीकरणांतलं सर्वात अजब उत्तर म्हणजे आमचा लाडका 'पाटल्या' अर्थात सुरेंद्र पाटील. सुरेंद्र म्हणजे केवळ एक इंजिनिअर नाही, तर प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा, मित्रांच्या गराड्यात हक्काने वाकड्यात शिरणारा आणि तरीही सर्वांना हवाहवासा वाटणारा एक अतरंगी हिरा आहे.

 

अंबाजोगाईच्या मातीत जेव्हा आमची ही इंजिनिअर मित्रांची गँग एकत्र यायची, तेव्हा सफरींचे बेत हवेत तरंगू लागायचे. कुणाकडे 'होंडा' असायची, तर कुणाकडे 'राजदूत'. मग सापुतारा असो, बीडची कपिलधारा असो किंवा रामलिंग; आमचं हे टोळकं भर दुपारी निघायचं आणि रात्रभर कुठेही मुक्काम ठोकायचं. तो स्वतः व्यसनांपासून चार हात लांब असला, तरी मित्रांच्या अतरंगी हट्टापायी धावपळ करायला तो कधी मागे हटला नाही. मित्रांच्या आनंदातच त्याचा आनंद असायचा, मग त्यासाठी कितीही खस्ता खाव्या लागल्या तरी पाटल्या तयार असायचा.

 

आमच्या मैत्रीच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय प्रकरण म्हणजे तो १५-१६ दिवसांचा साऊथचा दौरा. कोणताही प्लॅन नाही, कोणतंही हॉटेल नाही की रूम नाही; गाडीतच झोपायचं आणि मिळेल त्या गावात थांबायचं. कन्याकुमारीपर्यंतचा हा बेधडक प्रवास केवळ सुरेंद्रसारख्या अतरंगी सोबत्यामुळेच यशस्वी झाला. एकदा सौताड्याच्या धबधब्यावर पावसानं आमची वाट अडवली. रात्रीच्या वेळी एका चहाच्या टपरीवर आसरा घेतला. झोप येईना म्हणून सुरेंद्रने कुठूनतरी पत्त्यांचा जोड शोधून आणला आणि चक्क त्या टपरीवाल्याला सोबतीला घेऊन पहाटेपर्यंत पत्त्यांचा डाव रंगवला. परिस्थिती कशीही असो, त्यातून मजेचा रस्ता कसा काढायचा हे पाटल्याला चांगलंच ठाऊक होतं.

 

सुरेंद्रच्या कामाची पद्धतही त्याच्यासारखीच अतरंगी. ज्या कामात त्याचं मन रमत नसेल तिथे तो 'हिडीस-फिडीस' करून आपलं नावडतेपण जाहीर करायचा. पण एकदा का जबाबदारी खांद्यावर घेतली की ती चोख पार पाडायचा. शिवजयंतीला दौलताबादहून पळत मशाल आणणं असो किंवा निवडणुकीच्या प्रचारात हिरिरीने लीड घेणं असो; सुरेंद्रने नेहमीच पुढाकार घेतला. तो सरळ बोलायला थोडा वाकडा असला, तरी त्याचं मन मात्र आरशासारखं स्वच्छ आहे. कॉलेजच्या त्या दिवसांपासून आजपर्यंत त्याची मैत्री आजही तितकीच टवटवीत आणि आश्वासक आहे. असा हा आमचा सुरेंद्र पाटील— मैत्रीच्या वाटेवरचा एक खरा 'राजदूत' आणि अतरंगी आठवणींचा कायमचा सोबती!

 

सुरेंद्रसोबतच्या ट्रेकिंगच्या आठवणी म्हणजे एक अतरंगी थरारच होता. अंकाई-टंकाईचा किल्ला असो किंवा सह्याद्रीच्या कडेकपारी शिदोरी घेऊन गडावर चढाई करणे ही आमची पद्धत होती. खिशात पैसे नसायचे, पण जिद्द मात्र डोंगराएवढी असायची. औरंगाबाद-परभणी पॅसेंजरच्या टपावर बसून प्रवास करतानाचा तो वारा आणि सुरेंद्रच्या गप्पा... हे सुख आजच्या अलिशान गाड्यांमध्येही नाही. 'विना तिकीट' प्रवास करण्यातील ती मजा आणि पकडले जाण्याची ती भीती, या सगळ्या प्रवासात सुरेंद्रने नेहमीच एक वेगळी ऊर्जा भरली.

 

 

आमच्या ग्रुपमधील पहिलं लग्न म्हणजे 'लटपटेच सुंदर लग्न ! परभणीतल्या त्या लग्नात सुरेंद्र आणि आमच्या गँगने जो धिंगाणा घातला, तो आजही सुंदरच्या सासरवाडीचे लोक विसरलेले नाहीत. रात्रभर रंगलेला पत्त्यांचा तो अजब डाव— जिथे कोणीच हरत नव्हतं, पण कोणाचे तरी पैसे कोणाच्या तरी खिशात जात होते— हा एक मजेचा भाग होता. वरातीमधला तो उत्साह आणि गोंधळ पाहून "लग्न नीट लागतंय की नाही?" अशी भीती वाटण्यापर्यंत आमची मजल गेली होती.

 

'प्राध्यापक' पाटील

 

आमचा पाटील कधी प्राध्यापकी करेल, असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. याचं मुख्य कारण म्हणजे पाटलांचा तो अतरंगी थाट. ज्या माणसाचा जोडा अंबाजोगाईत मिळत नसे आणि जो खास परळीहून आपले 'ब्रँडेड' पायताण आणायचा, तो माणूस गडू-पुस्तकांच्या जगात रमेल याची शाश्वती कोणालाच नव्हती. पण पाटलांच्या कोशात एक मोठा शब्द होता— 'स्ट्रगल' (Starting Struggle!).

 

पाटलांच्या 'स्टार्टिंग स्ट्रगल'ची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती प्राध्यापकी पेशापासून. पाटील वर्गात उभे राहिले की कसं 'झाक' शिकवायचे! इतकं भन्नाट की पोरं अक्षरशः वेडी व्हायची. आता एखादा AD अधिक वेडा होणं आम्हाला मान्य होतं, पण पोरं आणि पोरी सुद्धा पाटलांच्या शिकवण्यावर आणि त्यांच्या त्या 'रुबाबदार' व्यक्तिमत्वावर 'फिदा' होऊन वेडे व्हावे, हे केवळ पाटलांनाच शक्य होतं. पण नियतीचा खेळ बघा! पाटलांची हुशारी शेवटी फळाला आली आणि त्यांची निवड MSEB मध्ये झाली. पाटील आता कॉलेज सोडून सरकारी सेवेत जाणार, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पण खरी गंमत पुढेच होती. आपल्या लाडक्या प्राध्यापकाने कॉलेज सोडू नये म्हणून चक्क विद्यार्थ्यांनी 'स्ट्राइक' (संप) पुकारला!

 

सरकारी नोकरीसाठी कॉलेज सोडणाऱ्या शिक्षकासाठी विद्यार्थ्यांनी संप करावा, हे ऐकून आम्हालाही वाटलं— "पाटील, मानलं तुम्हाला! तुम्ही लय ग्रेट आहात!". अहो, जोड्यापासून सुरू झालेली ही गोष्ट थेट विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचली, यातच पाटलांच्या 'स्ट्रगल'चं आणि त्यांच्या 'करिष्म्याचं' यश दडलेलं होतं.

 

'पडघा नरेश': मैत्रीचा राजवाडा आणि माणुसकीचं क्वार्टर

 

इंजिनिअरिंगनंतरचा तो संघर्षाचा काळ आजही आठवला की अंगावर काटा येतो. आपण सगळेच करिअरच्या वाटा शोधत, नशिबाचे दरवाजे ठोठावत होतो. त्याच वेळी आमच्या सुरेंद्रला MSEB (महावितरण) मध्ये पहिली पोस्टिंग मिळाली ती थेट 'पडघा' येथे. पण ती केवळ एक सरकारी नोकरीची वर्दी नव्हती, तर आम्हा सर्व भटक्या मित्रांसाठी एका हक्काच्या विसाव्याची 'लॉटरी' होती!

 

पडघ्याचा तो 'राजवाडा' आणि मित्रांची जत्रा

 

पडघ्याला सुरेंद्रला मिळालेला तो टू-बीएचके फ्लॅट म्हणजे आम्हा मित्रांसाठी एखाद्या पंचतारांकित राजवाड्यापेक्षा कमी नव्हता. मुंबई किंवा औरंगाबादहून कोणीही निघालं की त्याचं पहिलं हक्काचं स्टेशन ठरायचं ते म्हणजे— पडघा. तिथे राहणाऱ्या मित्रांच्या कायमस्वरूपी गर्दीमुळे आणि सुरेंद्रच्या त्या दिलदार आदरातिथ्यामुळे आम्ही त्याला प्रेमाने 'पडघा नरेश' म्हणायला लागलो.

दिवसा आमचे 'नरेश' साहेब सरकारी ड्युटीवर रुजू व्हायचे आणि उरलेले 'प्रजाजन' (म्हणजे आम्ही मित्र) तिथून खडवली स्टेशन गाठून लोकलने मुंबईत आपलं नशीब आजमावायला जायचो. संध्याकाळी मात्र त्या फ्लॅटमध्ये वेगळाच माहोल असायचा. भांड्यांच्या घासण्यापासून ते डब्यांच्या नियोजनापर्यंतची सगळी कामं मैत्रीच्या सोहळ्यात पार पडायची. सुरेंद्रने केवळ आपल्या खोलीची चावीच नाही, तर आपलं हृदयही मित्रांसाठी कायम उघडं ठेवलं होतं.

 

 

सुरेंद्रचा स्वभावच असा की, जिथे जाईल तिथे तो माणसांची मनं जिंकूनच परतणार. एमएससीबीच्या त्या पडघा केंद्रात सुरेंद्रचा दरारा आणि प्रेम असं काही अजब होतं की, तिथले कामगार त्यांच्यावर जिवापाड प्रेम करायचे. "काय पाहिजे साहेब?" असं म्हणत चार-पाच जण नेहमी त्यांच्या मदतीला हजर असायचे. कामगारांमध्ये मिसळून राहणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं आणि त्यांच्यासोबत आपल्या गावाकडच्या गप्पा मारणं, या गुणामुळेच सुरेंद्र तिथे खऱ्या अर्थाने 'नरेश' म्हणून वावरला.

 

 

सुरेंद्र पाटील यांचा स्वभाव हा मुळातच कष्टाळू आणि जिज्ञासू. करिअरच्या सुरुवातीलाच त्यांनी सोपे मार्ग निवडले नाहीत. पडघा येथे 'हाय व्होल्टेज' लाईनचा अनुभव घेण्यापासून त्यांची ही धडपड सुरू झाली. नवीन गोष्टी आत्मसात करायच्या, त्या तपशिलात जाऊन समजून घ्यायच्या आणि त्या व्यवस्थित अमलात आणायच्या, हा त्यांचा खाक्या! तिथून त्यांची बदली झाली सोयगावला. मराठवाडा आणि खानदेशच्या सीमेवरचा तो डोंगराळ भाग; पण सुरेंद्र पाटील यांनी तिथेही आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला.

 

सोयगावच्या त्या बॅचलर दिवसांत सुरेंद्र पाटील यांनी एक विलक्षण मित्रत्व जपलं होतं. पोलीस, महसूल, कृषी, बँक आणि सिंचन अशा विविध विभागांतील तरुण अधिकाऱ्यांचा त्यांचा एक 'कोहेजिव्ह' ग्रुप होता. ही केवळ मैत्री नव्हती, तर संकटाच्या काळात एकमेकांसाठी उभं राहणारं एक संरक्षक कवच होतं. कामाच्या बाबतीत मात्र ते तितकेच कडक होते. ना.धो. महानोरांसारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाकडे थकबाकीसाठी दिलेली भेट असो किंवा वसुलीत नंबर वन राहण्याचा मान असो; सुरेंद्र पाटील यांनी आपल्या कामाचा दरारा निर्माण केला होता.

 

संभाजीनगरचे (छत्रपती संभाजीनगर) परिमंडळ कार्यालय आणि सुरेंद्र पाटील यांचे नाते म्हणजे निष्ठेचे एक वेगळेच समीकरण होते. सोयगावमध्ये आपल्या कामाची चमक दाखवून ते जेव्हा झोन ऑफिसला रुजू झाले, तेव्हा त्यांनी कामाची एक नवी व्याख्याच तिथे मांडली.

 

सुरेंद्र पाटील यांची कामातील गुंतवणूक एवढी अफाट होती की, अवघ्या काही दिवसांतच संपूर्ण झोनची 'डिपेंडन्सी' त्यांच्यावर निर्माण झाली. "सुरेंद्र पाटील नसेल तर हे काम कसं होणार?" अशी एक अनामिक धास्ती कार्यालयात निर्माण व्हायची. सकाळी कार्यालयात पाय ठेवल्यापासून ते रात्रीपर्यंत ते कामात पूर्णपणे बुडून जायचे. 'हा माझा पोर्टफोलिओ आणि तो तुझा' असा संकुचित विचार न करता, समोर येईल ते प्रत्येक काम ओढून करण्याची त्यांची सवय त्यांच्या सहकाऱ्यांसाठी एक मोठी ताकद ठरली.

 

सुरेंद्र त्यावेळी तांत्रिकदृष्ट्या ज्युनिअर इंजिनीअर म्हणून कार्यरत असले, तरी प्रत्यक्ष चीफ इंजिनीअर (CE) सुद्धा महत्त्वाच्या गोष्टींसाठी सुरेंद्र यांच्यावरच विसंबून असायचे. झोनमध्ये अनेक प्रकारचे वरिष्ठ अधिकारी आले— काही स्वभावाने मृदू होते, काही अत्यंत शिस्तप्रिय आणि कडक होते, तर काही विक्षिप्तही होते. मात्र, या सर्वांना हाताळण्याची आणि आपल्या कामातून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याची अफाट क्षमता सुरेंद्र यांच्यात होती. ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलायला इतर जण कचरत, तिथे सुरेंद्र आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर हक्काने संवाद साधत असत.

 

एका बाजूला तांत्रिक कामाचे क्लिष्ट स्वरूप आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय जबाबदाऱ्या, या दोन्ही आघाड्यांवर त्यांनी चोख कामगिरी बजावली. आपल्या हाताखालील ज्युनिअर इंजिनीअर्स आणि असिस्टंट इंजिनीअर्सना सोबत घेऊन त्यांनी झोनचे काम एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. पद कोणतेही असो, पण माणसाने आपल्या कामातून आपली जागा निर्माण करावी, हे सुरेंद्र पाटील यांच्या या कार्यकाळाकडे पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवते.

 

शेतकऱ्यांचा 'प्रकाशदूत'

 

संभाजीनगर झोनमधील यशानंतर सुरेंद्र पाटील यांच्या कारकीर्दीला २००६ च्या सुमारास पदोन्नतीचे एक नवे वळण मिळाले आणि ते औरंगाबाद ग्रामीण सर्कलमध्ये रुजू झाले. ग्रामीण भागात काम करताना त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचे अनधिकृत वापर आणि विस्कळीत नोंदणी. मात्र, सुरेंद्र पाटील यांनी या आव्हानाचे रूपांतर एका ऐतिहासिक मोहिमेत केले.

 

त्या काळात अनेक शेतकऱ्यांकडे वीज वाहिनी जवळून गेलेली असायची, पण त्यांच्या पंपांची अधिकृत नोंदणी नसायची. सुरेंद्र यांनी केवळ कार्यालयात न बसता प्रत्यक्ष 'फिल्ड'वर उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतःच्या कल्पनेतून आणि वरिष्ठांच्या सहकार्याने घरोघरी जाऊन कृषी पंपांचे कनेक्शन देण्याची आणि ते 'रेग्युलराइज' करण्याची एक व्यापक मोहीम हाती घेतली. शेतकऱ्यांना मोटिव्हेट करून, त्यांना अधिकृत वीज जोडणीचे महत्त्व पटवून देत त्यांनी ग्रामीण भागातील विजेचे चित्र बदलून टाकले.

 

सुरेंद्र पाटील यांनी राबवलेली ही मोहीम आणि त्याचे त्यांनी केलेले प्रभावी प्रेझेंटेशन इतके प्रभावी ठरले की, त्याचे पडसाद थेट मुंबईपर्यंत पोहोचले. खुद्द महाराष्ट्र राज्याच्या चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टरनी (CMD) त्यांच्या या कार्याचे विशेष कौतुक केले. एका सर्कलमध्ये सुरू झालेली ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रासाठी कौतुकाचा विषय ठरली आणि त्या झोनचा मान राज्यस्तरावर उंचावला. केवळ तांत्रिक काम न करता, लोकांशी संवाद साधून शासकीय योजना त्यांच्या दारापर्यंत नेण्याचे कसब सुरेंद्र पाटील यांनी या काळात सिद्ध केले. शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकाशाची नवी पहाट आणणाऱ्या या 'पडघा नरेश' आणि 'संभाजीनगरच्या विश्वासाने' ग्रामीण भागातही आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळाच दरारा निर्माण केला.

 

सुरेंद्र पाटील नावाचा झपाटा!

 

सुरेंद्र पाटील यांच्या कारकीर्दीतील 'विटोळकर इंजिनीअर्स' हा काळ म्हणजे एका लहानशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होण्याचा काळ होता. २००८ मध्ये सरकारी नोकरीची सुरक्षित चौकट मोडून जेव्हा ते खाजगी क्षेत्रात उतरले, तेव्हा विटोळकर कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर केवळ ७ कोटींच्या आसपास रेंगाळत होता. पण सुरेंद्र नावाचं वादळ तिथे धडकलं आणि पहिल्याच वर्षी या ७ कोटींच्या टर्नओव्हरला त्यांनी चक्क १०७ कोटींच्या शिखरावर नेऊन ठेवलं. ज्या प्रकल्पासाठी त्यांनी नोकरीचा त्याग केला होता, तो हाताचा प्रकल्प निसटला तरी सुरेंद्र डगमगले नाहीत. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन अशोका बिल्डकॉन लिमिटेडला आपल्या कामाचे प्रेझेंटेशन दिले आणि ४० कोटींचे ॲडव्हान्स प्रोजेक्ट खेचून आणले. हे केवळ प्रकल्प नव्हते, तर तो सुरेंद्र यांच्या आत्मविश्वासावर उमटलेला शिक्का होता.

 

विटोळकर कंपनीसाठी ७-८ कोटींचे प्रकल्प हाताळणे हीच मोठी गोष्ट होती, तिथे सुरेंद्र यांनी चक्क २६० कोटींचा अजस्त्र प्रकल्प अंगावर घेतला. या महाप्रकल्पाचा पसारा थक्क करणारा होता:

·         सुमारे ३२ नवीन सबस्टेशन्सची उभारणी.

·         १३० हून अधिक ॲडिशनल सबस्टेशन्सचे जाळे.

·         ३००० डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर सेंटर्स आणि तब्बल ३००० किलोमीटर लांबीची वीज वाहिनी.

·          

हा सगळा डोलारा सांभाळण्यासाठी सुरेंद्र यांनी झपाटल्यासारखं काम केलं. सकाळी ८ वाजता कामावर गेल्यावर रात्रीचे १-२ वाजेपर्यंत ते डिझाईनिंग आणि प्लॅनिंगमध्ये गढून जायचे.

 

केवळ तांत्रिक काम न करता, नवीन मुलांना कामावर घेणे, त्यांना तयार करणे आणि एका अफाट टीमला सोबत घेऊन हा प्रकल्प वेळेत पूर्ण करणे, हे सुरेंद्र पाटील यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे 'मास्टरक्लास' उदाहरण ठरले. कंपनीने केवळ आर्थिक पुरवठा करायचा आणि प्रत्यक्ष कामाचा धडाका सुरेंद्रनी लावायचा, असे ते यशस्वी समीकरण होते. त्यांच्या कामाचा आवाका इतका मोठा आहे की, त्याला खरोखर चॅलेंज नाही. असा हा आमचा सुरेंद्र पाटील— जो संकटातही संधी शोधतो आणि आपल्या जिद्दीच्या जोरावर इतिहासाचे टर्नओव्हर बदलून टाकतो! इतरांच्या कंपन्या शिखरावर नेल्यावर याला स्वतःची ओढ लागली आणि २०११ मध्ये यानं स्वतःची 'सुकन्या इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड' ही कंपनी रजिस्टर केली. आज तो स्वतःचा डोलारा समर्थपणे सांभाळतोय.

 

आपला 'पाटल्या': काळ्या आईचा लाडका आणि प्रयोगांचा बादशाह!

 

काही माणसं तांत्रिक जगात वावरत असूनही आपलं मूळ विसरत नाहीत आणि सुरेंद्र पाटील हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. हातामध्ये इंजिनिअरिंगच्या पदव्या आणि डोक्यात एमएससीबीचे व्होल्टेज असले, तरी सुरेंद्रच्या काळजात मात्र नेहमी काळया आईच्या सेवेची आणि मातीच्या सुगंधाची ओढ असायची. कॉलेज जीवनापासून सुरू झालेली ही 'शेतीची ओढ' त्याच्यासाठी केवळ छंद नव्हती, तर तो त्याच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग होता.

 

सुरेंद्रचे शेतीतील प्रयोग म्हणजे एखादा थ्रिलर सिनेमाच! कॉलेजमध्ये असतानाच त्याने मित्रांसोबत 'टिकवूड प्लांटेशन' मध्ये गुंतवणूक करून आपल्या शेतीप्रेमाचा श्रीगणेशा केला होता. पण हा गडी तिथेच थांबला नाही. नोकरीच्या मध्यमवर्गीय चौकटीत राहूनही त्याने जे धाडस दाखवलं, त्याला तोड नाही. तो चक्क हरियाणाला गेला आणि तिथे स्वतः पारखून, निवडून आणलेल्या म्हशींचा दुग्धव्यवसाय सुरू केला. इंजिनिअर माणूस जेव्हा गोठ्यात उतरतो, तेव्हा तो तिथल्या म्हशींनाही 'मॅनेज' करायची ताकद ठेवतो, हे याने सिद्ध केलं!

 

जिथे चांगलं पीक येतं, तिथे स्वतः जाऊन पाहणं, शिकणं आणि आपल्या शेतीत राबवणं ही सुरेंद्रची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. फळबागांच्या आणि विविध पिकांच्या अभ्यासासाठी त्याने पन्नास हून अधिक ठिकाणांना भेटी दिल्या. मग ते पारंपारिक शेती असो किंवा आधुनिक 'मशरूम शेती' सारखे नवनवीन प्रयोग; सुरेंद्रने प्रत्येक गोष्ट तितक्याच उत्साहाने आणि तांत्रिक अचूकतेने हाताळली.

 

सुरेंद्र सरळ बोलायला थोडा वाकडा असला, तरी शेतीच्या बाबतीत त्याचं ज्ञान अगदी सरळ आणि सखोल आहे. 'पडघा नरेश' म्हणून वावरताना किंवा संभाजीनगरच्या झोनमध्ये काम ओढून करतानाही, त्याचं एक लक्ष नेहमी आपल्या वावराकडे असायचं. कामाचा आवाका इतका मोठा की त्याला चॅलेंज नाही, पण त्या अफाट धावपळीतही त्याने मातीचा सुगंध जपलाय.

 

सुरेंद्र पाटील: 'मैत्रीच्या पंढरी'चा स्वप्नद्रष्टा शिल्पकार!

 

आपला सुरेंद्र म्हणजे केवळ प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा अतरंगी हिरा नाही, तर तो मैत्रीला पुढच्या पिढीपर्यंत नेणारा एक दूरदृष्टी असलेला 'राजदूत' आहे. निवृत्तीनंतर हॉटेलमध्ये तासाभरासाठी भेटून कोरड्या गप्पा मारण्यापेक्षा, त्याने मांडलेली 'सामायिक हक्काच्या जागेची' संकल्पना त्याच्या विशाल हृदयाची साक्ष देते.

 

सुरेंद्रची तळमळ अशी आहे की, आपण कॉलेजमध्ये जोडलेली ही मैत्री आपल्यापुरती मर्यादित न राहता पुढच्या पिढीमध्येही प्रवाहित व्हावी. सर्वांनी एकत्र येऊन आठवडा-पंधरवडा राहता येईल, अशी एक स्वावलंबी जमीन असावी, जिथे कोणावरही आर्थिक ओझं नसेल आणि जो प्रकल्प स्वतःच्या उत्पन्नातून चालेल. ही केवळ एक जमिनीची गुंतवणूक नाही, तर ती निवृत्तीनंतरच्या आनंदाची एक 'फिक्स्ड डिपॉझिट' आहे.

 

या विचारामागे सुरेंद्रची मोठी सामाजिक दूरदृष्टी आहे. या व्यासपीठामुळे डॉक्टर, वकील, पोलीस आणि इंजिनिअर असे विविध क्षेत्रांतील मित्र आणि त्यांचे नातेवाईक एका छताखाली येतील. संकटाच्या वेळी कोणालाही मदतीसाठी वणवण करावी लागू नये, तर एकमेकांच्या संपर्काचा आणि अनुभवाचा फायदा सर्वांना मिळावा, हा त्यामागचा शुद्ध आणि सात्विक हेतू आहे.

 

सुरेंद्रचा विचार केवळ स्वतःपुरता किंवा आपल्या ग्रुपपुरता मर्यादित नाही. ज्या भागात हा प्रकल्प उभा राहील, तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळावा आणि त्यांचं जीवनमान सुधारावं, ही त्याची सामाजिक बांधिलकी आहे. "कोणाला तात्पुरती मदत करण्यापेक्षा, त्याला स्वतःच्या पायावर उभं करा," या तत्त्वावर त्याचा गाढा विश्वास आहे.

 

आजच्या जबाबदाऱ्यांच्या धबडग्यात जिथे माणसं स्वतःच्या कुटुंबापुरती मर्यादित होत आहेत, तिथे आपला सुरेंद्र भविष्यातील 'नात्यांची सुंदर बाग' फुलवण्याचं स्वप्न पाहतोय. तो सरळ बोलायला थोडा वाकडा असला, तरी त्याचे हे विचार मात्र आरशासारखे स्वच्छ आणि हिमालयासारखे उत्तुंग आहेत.

 

असा हा आपला पाटल्या— जो केवळ विजेचे खांब उभे करत नाही, तर माणसांच्या मनामनात प्रेमाचे दिवे लावण्याचं काम करतोय. सुरेंद्र, तुझ्या या स्वप्नवत प्रकल्पाला आमच्या सगळ्यांचा खंबीर पाठिंबा आहे!

 

सुरेंद्रच्या अतरंगी आणि बेधडक व्यक्तिमत्त्वाचा एक अत्यंत हळवा आणि नाजूक भाग म्हणजे त्याचे आई-वडील, त्याची पत्नी आणि त्याच्या दोन लाडक्या मुली. व्यावसायिक यशाची शिखरे सर करत असतानाही सुरेंद्रने आपली मुळे कधीच ढळू दिली नाहीत. आपल्या वृद्ध आई-वडिलांना स्वतःसोबत ठेवून त्यांची ज्या पद्धतीने तो बर्दास्त ठेवतो, ते आजच्या काळात खरोखरच आदर्शवत आहे.

 

सुरेंद्र केवळ स्वतःच्या कुटुंबापुरता मर्यादित नाही, तर आपल्या प्रत्येक नातेवाईकाच्या हाकेला धावून जाणारा तो एक हक्काचा आधारवड आहे. घराण्यातील अनेक लग्नांची जबाबदारी उचलणे असो किंवा कोणाला कामाला लावून स्वतःच्या पायावर उभे करणे असो; सुरेंद्रने हे सगळे अतिशय आपुलकीने आणि सढळ हाताने केले आहे.

 

जेव्हा माझ्या आईला कॅन्सर झाला होता, तेव्हा आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. त्याच वेळी सुरेंद्रच्या बहिणीच्या नवऱ्याला लिव्हर सोरायसिसचा त्रास झाला होता. सुरेंद्रने त्यांना बरे करण्यासाठी जणू जंग जंग पछाडले होते. संकटाच्या काळात समोरच्याला धीर देणे आणि स्वतः खंबीर राहणे ही सुरेंद्रची खरी ताकद आहे.

 

सुरेंद्र कोणाचे ऐकत नाही. प्रत्यक्षात तो मित्रांच्या शब्दाला मान देणारा एक संवेदनशील माणूस आहे. आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर, जेव्हा मित्रांनी त्याला सल्ला दिला, तेव्हा त्याने कोणताही वाद न घालता अतिशय शांतपणे तो सल्ला ऐकून घेतला. बसमध्ये बसताना त्याने दिलेली ती कबुली— "मित्रांनो, मी तुमचं सगळं ऐकून घेतलं आहे आणि योग्य निर्णय घेतला आहे,"ही त्याच्यातील प्रगल्भतेची साक्ष देते.

 

आपल्या सगळ्यांचे स्वप्न असलेल्या 'मैत्रीच्या बागेला' मूर्त स्वरूप देण्यासाठी सुरेंद्र आम्हाला धट्टाकट्टा हवा आहे. त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे केवळ त्याच्यासाठी नाही, तर आपल्या सर्वांच्या स्वप्नांसाठी महत्त्वाचे आहे. सुरेंद्रने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे, कारण तो आपल्या या मोठ्या मित्रपरिवाराचा कणा आहे. सुरेंद्र, तुझी ही 'नात्यांची बाग' अशीच फुलावी आणि तू तुझ्या कुटुंबासह आणि मित्रांसह निरोगी, दीर्घायुषी राहावे, हीच आमची मनापासूनची सदिच्छा!

सुरेंद्र पाटील :- 9545457007

1 टिप्पणी:

पराग(लालू) शाह म्हणाले...

खूपच छान प्रकारे सुरेंद्र पाटील यांची गुण आणि ख्याती मांडणी..हार्दिक शुभेच्छा