गुरुवार, ११ जून, २०२६

कराड नावाची एक सोज्वळ जरब !!

कराड नावाची एक सोज्वळ जरब !!



 

कराड असो वा बीड जिल्हा... सध्या या नावांची आणि ठिकाणांची सर्वत्र खूप चर्चा सुरू आहे. पण, माझ्या अवघ्या भावविश्वावर ज्यांनी अधिराज्य गाजवलं आहे, ते 'कराड' मात्र खरोखरच अफलातून आहेत. रोज सकाळी जेव्हा मी प्रकाशाच्या पहिल्या किरणांच्या संपर्कात येतो, निसर्गाच्या साक्षीने दिवसाची नवी सुरुवात होते... नेमक्या त्याच वेळी, माझ्या सोबतीला कधी कधी असते एक भव्य-दिव्य, अथांग आणि अलौकिक व्यक्तिमत्त्व— ते म्हणजेच 'कराड'! दिसायला अत्यंत सोज्वळ, चेहऱ्यावर नेहमीच एक विलक्षण स्मितहास्य, गोरापान वर्ण, उंच आणि धिप्पाड शरीरयष्टी... आणि त्यातूनही त्यांची एक विशिष्ट ढंगात चालण्याची लकब, पाहणाऱ्याच्या मनावर न विसरता येणारी छाप पाडते. गेल्या ३० वर्षांपासून त्यांची सोबत असणारी तीच जुनी, जिवाभावाची सेकंड हँड स्प्लेंडर बाईक... कधी शुक्रवारच्या आठवडी बाजारामध्ये हातामध्ये पिशवी घेऊन चालताना, तर कधी कुठेही अचानक समोर येऊन उभे ठाकणारे हे व्यक्तिमत्त्व!

 

​२०१२-१३ च्या सुमारास ते माझ्या आयुष्यात आले आणि तेव्हापासून आजतागायत त्यांनी माझ्या मनावर जणू अधिराज्यच गाजवलं आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे नेमके पैलू किती आहेत आणि ते किती अथांग आहेत, हे समजून घेण्याचा मी जेव्हा जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा तेव्हा एका प्रचंड मोठ्या आणि विलोभनीय चक्रव्यूहात पडल्यासारखं होतं. त्यांचा वेध घेणं जितकं आव्हानात्मक, तितकंच सुखावह आहे.

 

​ताडोबाच्या जंगलातील तो थरार...

 

​उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की निसर्गाच्या सान्निध्यात भटकंतीचे वेध सर्वांनाच लागतात. तसाच एक बेत आखून काही मित्र ताडोबाच्या जंगलातून प्रवासाला निघाले होते. पहाटेची साडेपाचची वेळ होती. चहूकडे घनदाट, अथांग पसरलेले जंगल, पक्ष्यांची किलबिलाट आणि त्या शांततेत रस्त्यावरून धावणारं फक्त त्यांची एकच गाडी. निसर्गाचे ते निवांत रूप अनुभवत असतानाच, पाठीमागून एका अवजड वाहनाचा मोठा आवाज आला.

 

​रस्ते बांधकामाचे साहित्य घेऊन जाणारा एक भलामोठा ट्रक अतिशय वेगाने त्यांच्या गाडीला मागे टाकून पुढे गेला. त्या निर्जन आणि वळणावळणाच्या रस्त्यावर ट्रकचा तो अनियंत्रित वेग पाहून त्या मित्रांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मनात आले, "एवढ्या वेगात या जंगलाच्या रस्त्यावर गाडी चालवणे धोक्याचे आहे..." आणि दुर्दैवाने ती शंका काही क्षणांतच खरी ठरली!

 

​काही अंतरावर पुढे जातात तोच, तो भलामोठा ट्रक रस्त्याच्या मधोमध एका कुशीवर पलटी झालेला दिसला. अपघाताचे ते भीषण दृश्य पाहून सर्वांच्या काळजाचा ठोकाच चुकला आणि त्यांची गाडी जागीच थांबली. अपघाताच्या त्या अत्यंत गंभीर प्रसंगात, काय करावे हे सुचायच्या आत कराड गाडीतून सर्वात आधी खाली उतरला. ट्रकच्या केबिनमध्ये चालक आणि इतर काही माणसे अडकलेली होती. गाडी पलटी झाल्यामुळे केबिनची दारे जाम झाली होती आणि आतल्या लोकांचा जीव गुदमरत होता, ते मदतीसाठी व्याकुळ झाले होते.

 

​अशा वेळी थरथरत न बसता कराड यांनी कमालीचे प्रसंगावधान राखले. त्यांनी बाजूलाच पडलेली एक जड लोखंडी पहार उचलली आणि कुठलाही विचार न करता ते थेट ट्रकच्या केबिनवर चढले. पहारीचे सपासप घाव घालून त्यांनी केबिनच्या काचा फोडल्या आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून, आत अडकलेल्या प्रत्येक प्रवाशाला सुखरूपपणे बाहेर काढले.

 

​माणसांना बाहेर काढल्यानंतरही त्यांचे कर्तव्य संपले नव्हते. त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेला फोन केला आणि संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. जोपर्यंत ती रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही आणि सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयाकडे घेऊन गेली नाही, तोपर्यंत कराड तिथून एक पाऊलही हलले नाहीत.

 

​आजच्या 'सोशल मीडिया'च्या आभासी युगात जिथे अपघात झाला की लोक आधी मोबाईल सरसावून फोटो काढण्यात, रील्स बनवण्यात किंवा प्रसिद्धी मिळवण्यात व्यस्त असतात, तिथे कराड यांना स्वतःचा एक फोटो काढण्याचा किंवा आपण केलेल्या या साहसाची दवंडी पिटण्याचा साधा मोहही झाला नाही. संकटसमयी देवासारखा धावून जाणारा आणि कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता माणसांचे प्राण वाचवणारा हा मित्र खरोखरच 'देवमाणूस' ठरला. मानवतेची ही निस्पृह आणि निस्वार्थी सेवा त्या मित्रांच्या मनावर कायमची कोरली गेली आहे.

 

​जेव्हा वेळेचे संकट धावून आले...

 

​तो काळ होता सर्वत्र आंदोलनाचे पेव फुटलेला. रस्ते बंद, मनं अस्वस्थ आणि अशा वातावरणात मला एका अत्यंत महत्त्वाच्या व्याख्यानासाठी हैदराबादला जायचे होते. परळीहून माझी ट्रेन होती, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. कनेरवाडीजवळ पोहोचताच समजले की रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला आहे आणि वाहतूक ठप्प झाली आहे.

​घड्याळाचे काटे पुढे सरकत होते आणि माझ्या काळजाची धडधड वाढत होती. 'परळीला वेळेत कसं पोहोचायचं?' हा यक्षप्रश्न समोर उभा होता. अशा वेळी आमच्या मालकांनी माझ्या मदतीसाठी एका जबरदस्त माणसाला धाडले—ते म्हणजे 'कराड'!

 

​कराड आले आणि त्यांनी परिस्थितीची सूत्रे आपल्या हातात घेतली. संकटातही शांत राहून योग्य मार्ग कसा काढायचा, हे त्यांच्याकडे पाहून शिकण्यासारखे होते. त्यांनी अत्यंत हुशारीने, खुश्कीच्या मार्गाने आणि कल्पकतेने गर्दीतून वाट काढत मला परळी रेल्वे स्टेशनवर पोहोचवले; तेही ट्रेन सुटण्याच्या अगदी काही क्षण आधी! कराड यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि वेळेच्या अचूक नियोजनामुळे मी हैदराबादला वेळेत पोहोचलो आणि माझे व्याख्यान अतिशय अफाट, म्हणजेच 'अफलातून' झाले.

 

​खाकी वर्दी आणि कराडांचे चातुर्य

 

​दुसरी आठवण मे महिन्याच्या रणरणत्या उन्हाळ्यातील आहे. आम्ही एका गावामध्ये पाण्याचे काम समजून घेण्यासाठी, म्हणजेच एका महत्त्वाच्या सर्वेक्षणासाठी निघालो होतो. उन्हाचा पारा चढलेला होता आणि रस्तेही शांत होते. लोखंडी सावरगाव संपले आणि अचानक ट्रॅफिक पोलिसांनी आमची गाडी अडवली.

​गाडी मी स्वतः चालवत होतो. माझ्याकडे गाडीची सर्व कागदपत्रे, लायसन्स अगदी व्यवस्थित होते. अगदी इन्शुरन्सही लागू होता. पोलिसांनी गाडी थांबवल्यानंतर मी मोबाईलमध्ये त्याची 'सॉफ्ट कॉपी' शोधू लागलो. पण ऐनवेळी नेटवर्कअभावी किंवा घाईगडबडीत ती सॉफ्ट कॉपी सापदर्यला थोडा वेळ लागत होता. खाकी वर्दी समोर उभी आणि मनात थोडी धाकधूक वाढू लागली होती.

 

​तितक्यात तिथे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आले आणि त्यांनी अचानक माझ्याकडे पाहून अत्यंत आदराने म्हटले, "साहेब, तुम्ही जा..."

 

​मला क्षणभर काही कळालेच नाही! सर्व कागदपत्रे न पाहताच हे पोलीस अधिकारी मला इतक्या आदराने जाण्यास का सांगत आहेत, याचे गुपित मला थोड्या वेळाने समजले. माझ्यासोबत असणाऱ्या कराड यांनी पोलीस अधिकाऱ्यांना बाजूला नेऊन अत्यंत कौशल्याने समजावून सांगितले होते की, मी किती थोर आणि समाजोपयोगी काम करत आहे. त्यांनी पोलिसांना पटवून दिले की, हा माणूस थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून ते आमीर खान आणि सत्यजित भटकळ यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तींसोबत काम करतो. अशा महत्त्वाच्या कामात जर वेळ वाया गेला, तर किती मोठे नुकसान होऊ शकते, याची जाणीव कराड यांनी आपल्या प्रभावी भाषेत पोलिसांना करून दिली होती. कराड यांच्या त्या शब्दांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव असा पडला की, पोलिसांनी आम्हाला सन्मानाने आणि पटकन पुढे जाण्याची परवानगी दिली.

 

​कराड यांच्यासोबतच्या अशा कित्येक आठवणी माझ्या मनाच्या कोपऱ्यात जतन करून ठेवलेल्या आहेत. संकटसमयी धावून जाणे, प्रसंगावधान राखणे आणि आपल्या माणसाला सुरक्षितपणे उद्दिष्टापर्यंत पोहोचवणे, हा कराड यांचा स्वभाव आहे. त्यांच्यासारखा सुज्ञ, हुशार आणि खंबीर सोबती पाठीशी असणे, हे खरंच भाग्यच म्हणावे लागेल!

 

​दोन पिढ्यांचे 'कराड वैभव'’

 

​आपल्या परिघात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची एक स्वतंत्र वेळ असते, पण माझ्या आयुष्यात एका अनोख्या क्रमाने दोघे आले—खरं तर, लहान कराडांच्या आधी, 'मोठे कराड' माझ्या वैचारिक विश्वात आले!

 

​माझ्या जगण्याच्या आणि वैचारिक जडणघडणीत 'कराड' या आडनावाला खूप मोठं आणि अढळ स्थान आहे. योगायोग असा की, हे दोघेही माझे शिक्षक राहिले; एक विज्ञानाचे तर दुसरे मराठीचे. जेव्हा मी योगेश्वरीच्या मराठी विभागाच्या वैभवाचा विचार करतो, तेव्हा डोळ्यांसमोर उभं राहतं एक उजळ आणि सात्त्विक व्यक्तिमत्त्व—आदरणीय 'ल. ज्ञा. कराड सर'!

 

​शुभ्र पांढरा शर्ट परिधान करून, अत्यंत तन्मयतेने जेव्हा ते वर्गात मराठी शिकवायचे, तेव्हा तो वर्ग केवळ एका विषयाचा न राहता चैतन्यमय सोहळ्याचा व्हायचा. त्यांच्या बोलीभाषेच्या ढंगात एक वेगळीच नजाकत होती. ते जेव्हा बोलू लागायचे, तेव्हा शब्दाशब्दांतून मराठी भाषेला एक नवा साच, एक नवा डौल चढायचा. अतिशय नितळ, निरागस, निर्मळ आणि स्वच्छ अंतरंग असणारे आमचे कराड सर आजही मनाच्या गाभाऱ्यात आदराचे सर्वोच्च स्थान पटकावून आहेत.

 

​आणि याच थोर शिक्षकांचे चिरंजीव, म्हणजेच ज्यांनी माझ्या मनावर २०१२-१३ च्या सुमारास अधिराज्य गाजवायला सुरुवात केली, ते आपले शंकर कराड! म्हणजेच—अंबाजोगाईच्या शेअर मार्केटमधले 'झुनझुनवाला'!

 

​तो लहानपणापासूनच कमालीचा हुशार, प्रामाणिक आणि तितकाच सरळमार्गी. अभ्यासात नेहमीच अग्रस्थानी राहणारा आणि कोणत्याही गैरमार्गाला न शिवणारा. त्याच्या याच सचोटीच्या जोरावर त्याने दहावीत विशेष प्राविण्य मिळवले, बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि तुळजापूरमधून आपले मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

 

​त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला बंगलोर आणि त्यानंतर लखनऊसारख्या मोठ्या शहरांमध्ये चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. करिअरची गाडी उत्तम चालली होती, पण कौटुंबिक जबाबदारी आणि घराची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. घराला त्याची गरज आहे हे ओळखून, एका क्षणात त्या सुबत्ता आणि मोठ्या शहरातल्या नोकऱ्यांवर पाणी सोडून तो २००७ च्या सुमारास अंबाजोगाईत परतला. एक इंजिनिअर तरुण जेव्हा शहराकडून गावाकडे येतो आणि सारणीकर कॉम्प्लेक्समधील एका छोट्याशा ५/८ च्या गाळ्यात 'गुरू हायटेक सर्विसेस' नावाचे टू-व्हीलरचे गॅरेज सुरू करतो, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. पण त्याचा स्वतःवर आणि स्वतःच्या कष्टावर पूर्ण विश्वास होता.

 

​गॅरेजच्या व्यवसायातही त्याची प्रामाणिकता वाखाणण्याजोगी होती. इतर मेकॅनिकसारखे ग्राहकांना फिरवून जास्त पैसे उकळणे त्याला कधी जमलेच नाही. तो ग्राहकाला गाडीच्या समस्येविषयी अगदी समजावून सांगायचा, त्यामुळे सुरुवातीला व्यवसायाची गती थोडी संथ होती. पण, "सत्याचा मार्ग कठीण असतो, पण तोच अंतिम असतो," यावर त्याचा विश्वास होता.

 

​त्या काळात घरातील परिस्थिती आव्हानात्मक होती. वडील सेवानिवृत्त झाले होते, लहान भावाचे शिक्षण सुरू होते. अशा वेळी त्याने आपल्या अचूक आर्थिक नियोजनाच्या जोरावर कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा अत्यंत सुबकपणे बसवली. गॅरेज चालवत असतानाच, गंगाखेडच्या भाऊजींच्या वाळूच्या गाड्यांमुळे त्याला या व्यवसायाची ओळख झाली. व्यवसायात रस वाढला. व्यवसायातील चोख व्यवहार आणि प्रत्येकाशी आदराने बोलण्याचा त्याचा स्वभाव यामुळे त्याने या क्षेत्रातही आपले नाव कमावले.

 

​तो कमालीचा काटकसरी आहे. स्वतःसाठी अनावश्यक खर्च करणे त्याला कधी आवडत नाही. आजही तो जवळपास ३० वर्षांपूर्वीची, १९९७ ची आपली लाडकी स्प्लेंडर गाडी तितक्याच अभिमानाने वापरतो. ती गाडी कदाचित त्याच्यासाठी लक्ष्मीचे रूप आहे. तो नवीन गाडी घेऊ शकत होता, पण तरीही तो सेकंड हँड कार घ्यायला निघाला होता; त्याला समजवून सांगून 'डिझायर' कार घ्यायला लावली. त्याच्या घरात आजही साधा डबा टीव्ही आहे, यावरूनच त्याची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी दिसून येते.

 

​व्यवसायाच्या प्रवासात त्याने एलआयसी एजंट, फायनान्स अशा अनेक गोष्टींमध्ये हात आजमावला, पण शेवटी वाळू आणि त्यानंतर राख (Fly Ash) व्यवसायात त्याने स्वतःला सिद्ध केले. शासकीय नियम कडक झाल्यानंतरही त्याने आपल्या पारदर्शक व्यवहारामुळे व्यवसायातील पकड मजबूत ठेवली.

 

​कुटुंबाचा आधारस्तंभ

 

​घरात एक भाऊ आणि तीन बहिणी... या भावंडांमध्ये तो मोठा की लहान हा प्रश्न गौण ठरतो, जेव्हा त्याची भूमिका एका खंबीर पालकासारखी असते. बहिणी लग्नानंतर आपल्या घरी गेल्या तरी त्यांचे माहेरपण या भावाच्या रूपाने अखंड जागे असते. बहिणींच्या आयुष्यात काहीही घडामोडी असो, मुलांचे शिक्षण असो वा इतर कोणताही कौटुंबिक निर्णय, त्यांचा पहिला फोन या भावालाच जातो.

 

​"आमच्या घरात काहीही झालं की आधी त्याला फोन करा," हा बहिणींचा आणि त्यांच्या पतींचा (भावोजींचा) त्याच्यावर असलेला अढळ विश्वास, त्याच्या परिपक्वतेची आणि सुजाणपणाची साक्ष देतो.

 

​केवळ सख्ख्या बहीण-भावांपुरतेच त्याचे प्रेम मर्यादित नाही, तर पुढच्या पिढीशी म्हणजेच भाचे-भाच्यांशीही त्याचे नाते तितकेच घट्ट आहे. मुले सतत त्याच्या संपर्कात असतात. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणे, त्यांच्या सुखादुःखात धावून जाणे आणि कुठे काही कमी पडत असेल तर तिथे खंबीरपणे उभे राहणे, हा त्याचा सहज स्वभाव आहे.

 

​काही लोक मित्रांमध्ये किंवा बाहेरील जगात रमतात, पण या माणसाची व्याख्या वेगळी आहे. जेव्हा बहिणी, भाचे किंवा नातेवाईक घरी येतात, तेव्हा त्याचे बाहेरील जग जणू थांबते. मित्रांना, बाहेरील कामांना बाजूला सारून तो पूर्ण वेळ आपल्या कुटुंबाला देतो. त्याच्यासाठी त्या क्षणी घरी आलेला प्रत्येक पाहुणा आणि त्याचे कुटुंब हेच सर्वस्व असते.

​अशी माणसे आजच्या काळात दुर्मिळ होत चालली आहेत. कुटुंबावर मनापासून प्रेम करणारा, प्रत्येकाची काळजी घेणारा आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा हा 'कुटुंबवत्सल' माणूस म्हणजे त्याच्या कुटुंबाला लाभलेले एक सुंदर वरदानच आहे. त्यांच्या या मायेच्या सावलीत संपूर्ण कुटुंब आनंदाने बहरत आहे, हेच या नात्याचे सर्वात मोठे यश आहे.

 

​निसर्गाचा ध्यास

 

​शंकरच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी अनेक निसर्गरम्य पैलू आहेत. ते अंबाजोगाईच्या पक्षी विश्वाचा एक अविभाज्य भाग आहेत. तिथल्या विस्तीर्ण निसर्गात, पक्षीजगतात मुक्त मुशाफिरी करणारे ते आपल्या भागाचे जणू 'सलीम अली'च आहेत! पक्ष्यांची भाषा, त्यांचे ऋतू आणि निसर्गाशी असलेलं त्यांचं नातं अचंबित करणारं आहे.

 

​पेशाने मेकॅनिकल इंजिनिअर असलेले शंकर कराड तांत्रिक विश्वात रमणारे वाटू शकतात. परंतु, त्यांचे खरे हृदय धडकते ते निसर्गाच्या कुशीत, पाखरांच्या चिवचिवाटात! निसर्ग, पर्यावरण आणि पक्षी या विषयांबद्दल त्यांना प्रचंड जिव्हाळा आणि ओढ आहे. अगदी अल्पावधीतच त्यांनी पक्षीजगताचा इतका सखोल अभ्यास केला आहे की, आज ते या क्षेत्रातील तज्ज्ञ मानले जातात.

 

​त्यां च्या या अभ्यासाची अचूकता थक्क करणारी आहे. डोळ्यांना न दिसणाऱ्या, केवळ पाना-फांद्यांमध्ये दडलेल्या पक्षाच्या नुसत्या आवाजावरून ते तो पक्षी कुठला, त्याची प्रजाती कोणती, हे न चुकता अगदी अचूक सांगतात. इंजिनिअरिंगच्या अचूकतेचा हा अनोखा वापर त्यांनी निसर्गाचा वेध घेण्यासाठी केला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 

​ध्येयवेडा माणूस आणि सोबतीला मित्रपरिवार

 

​शंकर कराड यांच्या स्वभावाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा 'ध्यास'. एकदा का त्यांनी एखादे काम हातात घेतले, की ते पूर्णत्वास नेल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. त्या कामाचा पिच्छा पुरवणे आणि ते तडीस लावणे, हाच त्यांचा बाणा आहे.

 

​त्याचसोबत, त्यांचा गोतावळाही मोठा आहे. सर्व प्रकारच्या, सर्व स्तरांतील व्यक्तींशी त्यांचे स्नेहाचे आणि सलोख्याचे संबंध आहेत. प्रत्येकाला आपलेसे करणारा हा मित्र खऱ्या अर्थाने 'हुशार आणि हुन्नरी' आहे. शंकर कराड हे केवळ निसर्गाचे वाचक नाहीत, तर ते निसर्गाशी संवाद साधणारे ऋषितुल्य मित्र आहेत. इंजिनिअरिंगच्या चौकटीबाहेर पडून जंगलाच्या वाटा धुंडाळणारा हा माणूस आपल्या सोबतीला नेहमीच समृद्ध अनुभवांचे कोंदण घेऊन चालतो.

 

​'अभिजीत-शंकर'

 

​आजच्या काळात, जिथे अवतीभवती जातीपातीचे विखारी राजकारण आणि कटुतेचे वातावरण तयार झाले आहे, तिथे खऱ्या मैत्रीचे अस्तित्व एखाद्या थंड वाऱ्याच्या झुळुकीसारखे वाटते. सध्या वंजारी आणि मराठा समाजात सामाजिक पातळीवर एक वेगळंच तेढ निर्माण होताना दिसत आहे. पण याच वादळी आणि आणीबाणीच्या प्रसंगात, समाजातल्या या तेढाला छेद देत, मैत्रीचा एक अनोखा आणि तेजोमय प्रकाश उभा राहिला आहे— तो म्हणजे अभिजीत गाठाळ आणि शंकर कराड यांच्या मैत्रीच्या रूपाने!

 

​पहिलीपासून शाळेत एकाच बाकावर बसलेले हे दोन मित्र. एकाच ताटात जेवणारे आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सावलीसारखे सोबत उभे राहणारे. त्यांची ही मैत्री केवळ दोन व्यक्तींची नाही, तर दोन भिन्न विचारसरणींची आहे. गाठाळ कुटुंब हे विचारसरणीने प्रचंड नास्तिक, तर दुसरीकडे कराड कुटुंब कमालीचे धार्मिक आणि परंपरेला मानणारे. पण या दोन्ही परस्परविरोधी प्रवाहांना जोडणारा पूल म्हणजे त्यांची निष्कलंक मैत्री!

 

​"विचारांचे किनारे कितीही भिन्न असले, तरी अंतःकरणाची ओढ एक असेल तर मैत्रीचा महासागर बनायला वेळ लागत नाही."

 

​या मैत्रीची खरी प्रचिती आली ती अभिजीतच्या लग्नाच्या वेळी. अभिजीतच्या विचारसरणीनुसार त्याचे लग्न नोंदणी पद्धतीने (रजिस्टर मॅरेज) ठरणार होते आणि घरात कोणताही धार्मिक विधी होणार नव्हता. परंतु, अभिजीतची आई आणि बहीण मनातून कुठलीतरी संस्कृती आणि परंपरेला मानणाऱ्या होत्या. आपल्या घरात पारंपरिक पद्धतीने काही विधी व्हावेत, अशी त्यांची सुप्त इच्छा होती.

 

​अभिजीतच्या या संपूर्ण लग्नात, त्याच्या कुटुंबाच्या आणि आईच्या मनासारखं करून देणारा एकच हक्काचा माणूस पुढे सरसावला— तो म्हणजे 'शंकर कराड'. शंकरने कुठलीही कसूर न ठेवता धावपळ सुरू केली. त्याने जणू अशी काही जादूची कांडी फिरवली की, रजिस्टर लग्नाच्या अवघ्या अर्धा तास आधी, प्रत्यक्ष सात फेरे तर झालेच, सोबतीला यज्ञ-हवन, मंगलाष्टका आणि सर्व पारंपरिक विधी अगदी साग्रसंगीत पार पडले. अभिजीतच्या आईच्या डोळ्यातील समाधान शंकरने आपल्या अथांग प्रयत्नांनी मिळवून दिले.

 

​आज शंकर गाठाळ कुटुंबासाठी केवळ एक मित्र राहिलेला नाही, तर तो त्या कुटुंबाचाच एक अविभाज्य सदस्य बनला आहे. जेव्हा अभिजीतची आई आणि शंकर यांच्यात संवाद होतो, तो क्षण पाहणाऱ्यालाही एक वेगळाच, समृद्ध करणारा अनुभव देऊन जातो.

 

​अभिजीत आणि शंकर हे केवळ दोन व्यक्ती नाहीत, तर दोन वेगवेगळ्या विचारधारांचे, दोन भिन्न सामाजिक प्रवाहांचे प्रतिनिधित्व करतात. पण जोपर्यंत दोन्ही बाजूंच्या मनात निर्मळता आणि एकमेकांबद्दल आदर असतो, तोपर्यंत या प्रवाहांचे रूपांतर एका विशाल महासागरात व्हायला वेळ लागत नाही.

 

​आजच्या घडीला समाजाला तुष्टीकरणाच्या, विघटनाच्या आणि जातीपातीच्या राजकारणाची गरज नाही. आज गरज आहे ती समाजाला एकसंध ठेवणाऱ्या विचारांची. अशा या विस्कळीत काळात, सामाजिक सलोखा आणि खऱ्या प्रेमाचा संदेश देणाऱ्या 'अभिजीत-शंकर' या जोडगोळीची आणि त्यांच्यासारख्या पवित्र मैत्रीची या समाजाला नितांत गरज आहे!

 

शंकर कराड :- 9923050707


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: