सर्वांच्या प्रेरणेने मनातील सुप्तइच्छेचे मुर्त रूप उद्या साकार होणार.....
गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातील पाच शाळांमध्ये बऱ्याच भेटी होत आहेत. विद्यार्थ्यांना शिकवणे व शिक्षकांशी गप्पा मारणे त्यांना समजून घेणे खूपच वेगळी अनुभूती देते. प्रत्येक शाळेत काहीतरी खास आहे. शिक्षकांशी बोलताना मुख्यतः ग्रामीण भागातील शिक्षण कसे बदलले पाहिजे यावर चर्चा होते. शिक्षकांचे अनुभव खूप बोलके असतात. खूप मेहनत घेणारी ही शिक्षक व कुठलीही अनुकूल परिस्थिती नसताना शाळेत प्रचंड उत्साहाने येणारी मुलं पाहिल्यावर असे नक्कीच वाटते प्रयत्न नक्कीच चालू आहेत.
या सर्वातून मी काही गोष्टी समजून घेतल्या. शिक्षण कसे किंवा कोठे दिले जाते या बरोबर विद्यार्थी,शिक्षक व समाज यांच्या प्रेरणे वर बरच काही अवलंबून आहे. प्रेरित शिक्षक जर विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याच्या प्रेरणेचे संक्रमण करू शकले तर विद्यार्थी नक्कीच चांगले शिकतात व प्रेरक समाज व साथीदार सोबत असतील तर शाळेचे रूप पालटायला फारसा वेळ लागत नाही. याची प्रत्यक्ष अनुभूती मला येत गेली.
“नमस्कार राजेसाहेब, आज येवू का शाळेत ?”
“या की दादा काहीच प्रॉब्लेम नाही ....या या या.” राजेसाहेब किर्दंत,कोद्रीच्या जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नेहमीच्याच उत्साही व आश्वासक आवाजात प्रतिसाद दिला.
श्री गजानन महाराजाची पालखीतील वारकरी बंधूना केळी देण्याची आमची सेवा विवेकवाडी परिसरात चालू होती. तोच घाई गर्दीतून रवी, अमर, शरद हे माझे मित्र व प्रबोधिनीचे पालक तर पांडुरंग सोळुंके हा संगणक व्यापारी व तज्ञ मला गाडीतून उतरताना दिसले.
“ दर्शनासाठी इतक्या लांब का ?” मी शरद लोमटेला विचारले.
“ नाही कोद्रीला निघालो आहे.”
“मी पण कोद्रीलाच निघालो आहे. इथला कार्यक्रम संपला की येणार आहे.”
तो पर्यंत रवी, अमर व पाडुरंग पण जवळ आले.
“कोद्रीला काय विशेष”
“ ई लर्निग सुरु करायचे आहे म्हणून ती शाळा पाहायला जातो आहोत.”
“ मस्त...चांगलंय.”
“या मग... आम्ही जातो पुढे.” असं म्हणत रवी देशमुख व त्याचे सर्व मित्र कोद्रीकडे रवाना झाले.
गेल्या काही वर्षात मी कोद्रीची शाळा बदलताना पाहतो आहे. शाळेतील आठ शिक्षक एक मस्त टीम उभी राहिली आहे. राजेसाहेब व त्यांचे सहकारी शाळेसाठी खूप कल्पक. प्रेरणात्मक प्रयत्न करत आहेत. एकदम शाळेचे रूपच पालटून गेले. स्वच्छ, सुंदर, हिरवीगार शाळा सर्व शिक्षकांनी उभी केली आहे. उन्हाळ्यात व सध्याच्या दुष्काळी वातावरणात पुनर्भरणाचे अनेक प्रयत्न केल्या मुळे शाळेतील कुपनलिकेला अजूनही पाणी आहे. त्यामुळे गावाची फारमोठी पाण्याची व्यवस्था शाळेनी केली आहे. याचसोबत परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे लावून परिसर हिरवागार केला आहे. पक्षांच्या व मुलांच्या चिवचिवटात शाळा भरते. शाळेची प्रत्येक भिंत बोलकी व प्रत्येक कोपरा काही तरी वेगळा.
आपल्या शाळेत आधुनिकातील आधुनिक सोयी असाव्यात हा मानस राजेसाहेबांनी आमच्या नगरच्या स्नेहालय भेटीत व्यक्त केला होता. त्यांना समाजाचे पण योगदान हवे होते. सहकारी शिक्षकांनी तर प्रति शिक्षक दोन हजार रुपये जमा पण केले होते. त्या वेळच्या मुख्याध्यापकांनी सहा हजार तर राजेसाहेबांनी पाच हजार असे शिक्षकांचे तेवीस हजार रुपये जमा झाले. त्याना सर्वांना आपल्या शाळेत ई लर्निगची आधुनिक शिक्षण पद्धती सुरु करायची होती.
हेमंत राजमाने एक खूप वेगळे व्यक्तीमत्व अंबाजोगाईत होऊन गेले. फार काळ त्याला आयुष्य नाही लाभले पण तो जे काही जगाला त्याने त्याच्या सभोवतालच्या व्यक्तींवर व परिसरावर एक वेगळीच छाप टाकली. मुन्ना राजमाने हे नाव आजही अंबाजोगाईतील त्याच्या मित्रांना खूप प्रेरक आहे. मदतीसाठी अर्ध्या रात्री धावून जाणे, दिलदार वृत्ती, निर्मळ प्रेम यामुळे मुन्ना किती जगला या पेक्षा तो कसा जगला यामुळे त्याची प्रेरणा घेवून त्याच्या मित्रांनी २०१३ साली कै, हेमंत राजमाने बहुदेशीय सेवाभावी संस्था सुरु केली. हेमंतने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते पण त्याचे अन्य मित्र पण बरेच होते. त्या सर्व मित्रांनी हेमंतच्या स्मृती मृत्यू नंतर ही जपून ठेवल्या. आजही हेमंत त्यांच्यासाठी एक प्रेरणेचा स्त्रोत आहे हे रवी देशमुख ज्यावेळी किती आत्मियतेने त्याबद्दल बोलतो यातून समजते. यासर्व मित्रांनी अनेक समाजासाठीचे कार्यक्रम अंबाजोगाईत स्वतःच्या खर्चाने संस्थेच्या नावाने घेतले.
सुवर्णकारसर हे शिक्षण विभागातील एक चांगले व्यक्तिमत्व त्यांच्या सुचणेवरून रवी व त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी ई लर्निग प्रणाली एकाद्या जिल्हा परिषद शाळेत सुरु करण्याचे ठरवले व त्यानुसार त्यांनी पाच सहा शाळांना पण भेटी दिल्या. सर्वांच्या एक मताने शेवटी जिल्हा परिषद,कोद्री या शाळेची निवड झाली.
सगळेच जण कामाला लागले. अनेकांचे मदतीचे हात पुढे येवू लागले. जवळगावच्या चित्रकला शिक्षक श्री. हारे यांनी वर्ग खोली सुंदर करून दिली. शिक्षकांनी जमा केलेल्या रकमेतून प्रत्येक वर्गाचे सॉफ्टवेअर विकत घेतले. कै.हेमंत राजमाने स्मृती बहुदेशीय सेवा संस्थेनी बाकी सगळी पन्नासहजार रुपयांची साधने विकत घेवून दिली. महिन्याभरात तर सर्व रचना सज्ज झाली. आता गावकरी कसे मागे राहतील त्यांनी पण दुष्काळ असताना यासाठी मदत गोळा करायला सुरुवात केली.
राजेसाहेबांचा काल फोन आला,
“ नमस्कार दादा, इकडे तुमच्या या मित्राला बोला.”
“नमस्कार कोण बोलतंय ?” मी थोड्या कुतूहलाने विचारले.
“मी रवी देशमुख...परवा ई क्लास रूमचे उदघाटन आहे तुम्ही नक्की या.”
“हो नक्की येतो.” कुठलाही विचार न करता मी हो म्हणालो.
सर्वांच्या प्रेरणेने मनातील सुप्तइच्छेचे मुर्त रूप उद्या साकार होणार आहे. शिक्षक, समाज व चांगले कार्य करणारी सेवा संस्था यांच्या सर्वांच्या प्रेरणेने एक आधुनिक विद्या मंदिराची सुरुवात होणार आहे.