रविवार, १८ मार्च, २०१२

निर्मात्यानी प्रत्येकाला मदत करण्यासाठी धावून जाता येत नाही म्हणून खूप सारे परिस्थितीचे दाहक अनुभव देऊन, तयार केलले असत त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून.

उमेश वैद्य (काका )
दूरदर्शन, इलेक्ट्रोनिक्स खेळ आणि शिकवण्या यांचा बोलबाला माझ्या लहानपणी नव्हता. उन्हाळ्यात आंब्याच्या कोया, पावसाळ्यात रोवना पाणी, श्रावणात झोका, मकरसंक्रांतीच्या काळात पतंग उडवणे असे अनेक खेळ वेगवेगळया ऋतूत खेळायचो. तर काही बारमासी खेळ होते गोट्या, चिंचेचे चिंचुके, विट्टीदांडू, लपंडाव,चोरपोलिस, कधी कधी सूर पारंब्या, लगोर, चेंडूची बक्कम बुक्की. हे खेळ कुणी मला शिकवले ते आठवत पण नाही. एका पिढी कडून दुसऱ्या पिढी कढे ते सहज संक्रमित झाले.

या खेळांच वैशिष्टय म्हणजे यासाठी साधन म्हणून फार गोष्टी लागायच्या नाहीत. त्यामुळे खर्च नसल्यातच जमा. गल्लीतील चार पाच पोर जमली की खेळ सुरु. कुणी पंच नाही आणि कुणी मार्गदर्शक पण नाही. पण खेळ कुण्या एकट्याला खेळता यायचा नाही, सवंगडी बरोबर असलाच पाहिजे! या खेळांसाठी कधी कुठले बक्षीस मिळाले हे पण आठवत नाही. खेळांच्या स्पर्धाचे  आयोजण कुणी राजकीय पुढारी किंवा खेळाच्या संघटना करायच्या नाहीत. दुसरे लहानपणाचा निखळ आनंद या खेळातून घेता आला. सहज सर्वांगाला व्यायाम व्हायचा. सहजीवनातील अनेक गोष्टी सहज शिकता यायच्या.

जिवाभावाचे मित्र असायचे. टोपण नाव घेऊन व त्यातही बिघाडकेल्या शिवाय कुणी कुणाला साद घालायचे नाही. बाळ्या, पिंट्या, शिव्या, चम्या, बाप्या असे अनेक आमचे मित्र. पाळण्यात घालून मोठया हौसेनी घरातील लोकांनी नाव ठेवलं होत “हर्षवर्धन”.त्याला आम्ही सर्व म्हणायचो “चम्या” आणि ते सुद्धा त्याच्या कुटुंबातील लोकांसमोर. बऱ्यापैकी सहजता होती. कोण कुठल्या जातीचा आहे हे माहित असायचे पण त्याच्या बरोबर खेळू नको, कारण तो वेगळ्या जातीचा आहे हे कधीच कानावर पडल नाही. आमच्यात भांडण व्हायचे, अबोले पण आम्ही धरायचो. भांडण आई पर्यंत पोहोचायचे. दोन आया पण कडकडून भांडायच्या. “परत त्यांच्या घरात गेलास न .... तर बघून घेईल.” अस पण अनेक वेळा ऐकायला  मिळायचे.

दोन चार दिवस व्हायचे एकमेकाशिवाय करमायचे नाही. आमच्याकडे नव्हते न व्हीडीओ, कॉम्पुटर, मोबाईल गेम्स आणि खूप सारी खेळणी !!! आमचे मित्र हेच खरे आमचे साथीदार. एखादा मित्र मध्यस्ती करायचा. मग ज्यांची भांडणं झाली आहेत ते दोघ मित्र आपापल्या अंगठ्या जवळच बोट व मधले बोट एकमेकाला जोडायचे.  ते दोन बोट, भांडण ज्याच्याशी झालय त्याच्या बोटांवर ठेवायचे. मग दोघही ती दोन बोट आपल्या ओठाला लाऊन बोटांचे चुंबन घ्यायचे व आमची मग “दो” व्हायची. आमची डिस्क फोर्मेट व्हायची. परत सर्व काही अगदी पहिल्या सारखे. त्या दिवशी मध्यस्ती करणाऱ्या मित्राचा रुबाब फारच असायचा. अशी मध्यस्ती मी पण अनेक वेळा केली आहे. खुपच आत्मसन्मान व आत्मविश्वास वाढतो. मला कधी कधी वाटत, गणितातील अति अवघड प्रमेय किवा कोडे, संगणकावरचा खूप अवघड पातळीचा  खेळ  जिंकल्यावर किवा एखाद्या विषयात पहिले आल्यावर सुद्धा, खऱ्या खुऱ्या जगण्यातील जो आत्मसन्मान किवा आत्मविश्वास वाढतो त्या पेक्षा खूप जास्त हा अश्या प्रकारच्या भांडण झालेल्या मित्रांची दो करून दिल्यावर वाढत असेल.
वडिलांचे नसणे, आईची वैधव्यातून निर्माण झालेली अस्वस्थता, नातेवाईकांचे कुत्सित बोलणे या सर्व गोष्टींची धग ही माझ्या मित्रांमुळे व त्यांच्या बरोबर खेळत असणाऱ्या खेळांमुळे कधीच जाणवली नाही.
आज घरात खूप खेळणी आहे. खूप काळजी घेणारे आई आणि बाबा आहेत. अगदी आजच झळकलेला चित्रपट घरीच पाहण्याची सोय आहे. रस्त्यावर येणाऱ्या कुल्फीची किवा रंगीत गारेगारची वाट पण पाहावी लागत नाही. घरच्या फ्रीज मध्ये आई आईस्क्रीम तयार करते. पण सहज नावानी हाक मारता येतील व त्यांच्याशी मनमुराद दंगा मस्ती करता येतील अशी मित्र नाहीत. जवळ जवळच्या घरातील मुलं मित्र असणं थोड अवघड झालंय कारण कुंपणाच्या भिंतींपेक्षा मनातील भिंती खुपच उंच झाल्या आहेत.

अंबाजोगाईची शिशुविहार सुरू करताना हे सीधे, साधे, सपाट सत्य मनाशी पक्क ठरवलं की कुठल्याही प्रकारची खेळणी वापरायची नाही. शाळेतील मित्रांबरोबर व ताई,दादांबरोबर खेळायचे. शाळेतील आपल्या मित्रांच्या ओढीने व ताई दादाच्या प्रेमा पोटी यावे. स्कूल बस अजिबात नाही. आपल्या आई,आजी,आजोबांच्या बोटाला धरून यायचे. बाबांच्या गाडीवर यायचे. मग थोडया दिवसांनी शाळेतील दोन आया मैत्रिणी होतात व दोन बालवीर मित्र. दोन बालवीर सोबत व त्यांच्या आया एकमेकांशी गप्पा मारत शाळेत येतात व घरी जातात.पुढे आईंची मैत्री घट्ट होते व मग त्या आलटून पालटून सोडायला येतात.    मस्त सहजीवन सुरु होते.


प्राथमिक शाळेत असताना शाळेतील गुरुजी लंगडी पाणी, खो-खो, कबड्डी खेळ घ्यायचे. योगेश्वरी महाविद्यालयातील हजारीसर आम्हा मित्रांना कॉलेज मध्ये कुस्ती शिकवायचे. ती ही लाल मातीच्या आखाड्यातील.क्रिकेटची ओळख थोडी उशिराच झाली. बाकीचे खेळ फार माहित नव्हते. आजोबा खूप व्यायाम करायचे. ते आज ९३ वर्षाचे व फुर्तीले आहेत. त्यांचे शिकवलेले शीर्षासन फार लहानपणा पासून करायचो.


आईने आपार कष्टातून नवीन वसाहतीत घर बांधले. अवती भवती फक्त दोन तीन घर होती. आमच्या बरोबर बाईआजी राहायच्या. त्यांचे खरे नाव सुभद्राताई भातंब्रेकर. खूप आधार होता त्यांचा. आमच्या वसाहतीचे नाव रामकृपा वसाहत. आमच्या समोरच नवीन केशव नगर उभे रहात होते.बांधकाम एक दोन घरांचेच झाले होते. बाकी मोकळे पटांगण. माझा दिवसातील बराच वेळ मित्रांबरोबर जायचा. आई शाळेतून आली की मग आमची स्वारी घरी यायची. तसं तिचा घरातूनच दिलेला आवाज सहज आमच्या पर्यंत कुठही असलो तरी पोहोचायचा. आजूबाजूला फार वाहतूक व वर्दळ नसायची. आज थोडया जोरातच आईने हाक मारली.
घरी थोडा घाबरतच आलो होतो.

“अरे! मुन्ना ती बघ समोर शाखा भरली आहे. जा लवकर.” आईने न चिडता थोडया उत्साहाने सांगितले.

समोर बघतो तो २०-२५  जण आमच्या समोरच्या मैदानावर खेळत होती. मी तिथेजाई पर्यंत खेळ संपला होता व मुलं गोल करत होती. मी त्यांच्यात सामील होणार तोच मला एका महाविद्यालयातील तरुण थांबवत म्हणाला

“अरे प्रणाम घेतलास का ?

मला त्याचे बोलणे काही समजले नाही. मग त्याने मला दगडांनी गोल केलेली जागा दाखवली. तो पहिल्यांदा सावधान मध्ये त्या गोलाकडे तोंड करून उभा राहिला. मग त्याने उजवा हात जमिनीस समांतर छाती समोर धरला व मान खाली केली व शेवटी हात खाली घेतला.

“कर आता असे.” तो खमक्या आवाजात मला म्हणाला.

त्याने केलेली कृती मी केली.

“आता माझ्या कडून प्रणाम घे.” तो म्हणाला आणि माझ्याकडे तोंड करून सावधान मध्ये उभा राहिला. व जी कृती गोलाकडे पाहून केली ती आम्ही एकमेकांकडे पाहून केली.

मला काही कळत नव्हत पण तो सांगेल ते मी करत होतो. त्याने मला गोलात उभे राहयला सांगितले. माझे काही मित्र होते. त्याच्या जवळ जाऊन मी उभा राहिलो. मग सूर्य नमस्कार झाले. आम्हा सगळ्यांना त्यांनी बसायला सांगितले. मग गाणे झाले.प्रत्येकाला आपले पूर्ण नाव, वर्ग व शाळा सांगायला सांगितली. मी पण माझे नाव जोरात सांगितले.

“ काय रे मित्रांनो ! आजचे खेळ आवडले न ?” त्या तरुणाने सर्वाना विचारले.

“हो...हो.....” सर्व मुल मोठ्यांनी म्हणाली.

“मग उद्या येणार का खेळायला? असेच दररोज खेळत जाऊ पण एक करायचं उद्या येताना एका नवीन मित्राला घेऊन यायचे.” प्रेमळ पणे युवक बोलला.

आम्ही सगळे परत जोरात म्हणालो. “हो ....हो ...”

नंतर प्रार्थना होऊन शाखा संपली. मुलं पळत सुटली.

“अरे इकडे या....थोड थांबा” तो सर्वाना थांबण्यास सांगत होता. आम्ही काही मुलं थांबलो. त्याने आमचे नाव परत विचारले. घर कुठ आहे ते विचारले.

“तुम्ही सर्वानी मला नाव सांगितलं पण माझ नाव माहित आहे का तुम्हाला?”

“सांगा की मग.” आम्ही सगळ्यांनी विचारले.

“माझं नाव उमेश प्रभाकरराव वैद्य.” त्याने नाव सांगितलं.

उमेशदादा व आमची थोडया दिवसात चांगली मैत्री झाली. थोडा ठेंगणा, गव्हाळ रंग, फार नाही पण थोडे कुरुळे केस, हनुवटी वर काळ्या रंगाची जन्मखूण. हालचालीत खुपच गती होती व बोलण्यात आपलेपणा व आश्वासकता. तो शाखेचा मुख्य शिक्षक होता. आमचे शाखेत जाणे नियमित झाले. नाही गेलं तर आई रागवायची. तस घरातल्या लोकांनी माझी अनेक नाव ठेवलेली पण अनेकदा वापरला जायचं ते “कुत्र मारी भंम्पक.” मला कुत्रीची पिल खूप आवडायची. अशी अनेक पिल्लं मी घरी घेऊन यायचो.त्यांना मग मी पाळायचो. रात्री मी त्याला घराबाहेर बांधून ठेवायचो. रात्री पिल्लू प्रचंड केकाटायचं. आई चिडायची दोन चार पदव्या देत त्या पिल्लाला सोडून द्यायची. दुसऱ्या दिवशी मग माझा पिल्लाचा शोध सुरु व्हायचा. असे अनेक उपद्व्याप मी करायचो. निदान चांगल वळण लागेल म्हणून आई मला शाखेत जा म्हणून रागवायची.


माझे अनेक मित्र सुरवसेंचा बाळू व शिवा,माहूरकरांचा बाळू व दिपू डबीरांचा संदीप हे सगळे शाखेत जायचे. शाखेत आम्ही खूप वेग वेगळे खेळ शिकलो. वाघ शेळी, लीडर लीडर, शिवाजी म्हणतो, खाऊगां, गावगुंड, झूल झूल झेंडा झूल, अग्नीकुंड,हनुमानाची शेपटी, सुदर्शन चक्र असे अनेक काही बसून तर काही धक्का बुक्कीचे. खूप मजा यायची.

उमेशदादा बरोबर गोराप्पान थोडा उंच व घोगऱ्या आवाजाचा श्रीकांतदादा पण असायचा. खुपच प्रभावी व्यक्तिमत्व होते त्याचे. ते पण आमच्या कडून खेळायचे. मग दोन संघ केले की एकीकडे उमेशदादा व दुसरीकडे श्रीकांतदादा. मग घनघोर युद्ध ! शाखा संपली की मग दोघांच्या एक, एका हाताला आम्ही धरायचो मग ते मध्ये आणि आम्ही ग्रहा सारखे एकमेकांना पकडायला पळायचोत. ते मध्य भागी आमच्या बरोबर आसा प्रमाणे फिरायचे. खूप वेळ हा खेळ चालायचा. आता उद्या खेळू म्हणून आमच्या बरोबर ते रोज एकाच्या घरी पाणी प्यायला यायचे.आमचे दादा घरी आले की खूप मस्त वाटायचे.


आईनी मला नवी व महागाची चप्पल घेतली होती माझ्या हट्टा पोटी. ती नको म्हणत असतानाही मी मोठ्या ऐटीत शाखेत घालून गेलो होतो.शाखा झाली.खूप खेळलो होतो.खुपच तहान लागली.आज मला कुठलच पद नव्हते. खेळ झाले की हळूच घरी पळून गेलो. अस बऱ्याचदा व्हायचे. पाणी पिलो, थोडा बसलो आणि मग लक्षात आले चप्पल राहिली न शाखेत. बाहेर येऊन पहिले तर शाखा संपलेली. मी संघस्थानावर गेलो व चप्पल जिथे काढून ठेवतात तिथे पहिले. चप्पल काही नव्हती. तोंडचे पाणी पळाले होते. आवडलेली चप्पल नाही व आईला काय सांगणार? दुःख आणि भीती मिश्रित विचित्र अवस्था होती. ५ -१० मिनिटे मी चप्पल तिथेच शोधत होतो. अंधार पडला होता. हताश होऊन मी घरी गेलो व आईला सांगितले.

“जा, त्या दादाच्या घरी जाऊन विचार.” रागातच आज्ञा केली मातोश्रीनी.

उमेशदादाच व श्रीकांतदादा चे घर एकमेकाच्या  जवळच होते. मी त्यांच्या घरी निघालो.
आज मी पळून पण आलो होतो व त्यात चप्पल हरवलेली. खुपच घाबरलेल्या आवाजात मी श्रीकांतदादा ला

विचारले,  “दादा, माझी चप्पल राहिली रे आज शाखेत.”

“बघ हीच आहे का ?” त्याने मला एक चप्पल दाखवली.

एकदम जान आल्या सारख मोठ्यांनी म्हणालो, “हो...हो हो हीच रे.”

चप्पल पायात घातली व आमची स्वारी भांडयात जीव पडल्यानी थोडया आनंदातच घरी निघाली.

दादांच्या घरी पहिल्यांदाच गेलो होतो. कुर्डूकरांच्या घरची दक्षिणेकडील बाजू. घर कसले दोन मोठ्या खोल्या. एक वालवडकरांची  (श्रीकांतदादाचे) तर दुसरी वैद्यांची. १६ वर्ष ते सोबत राहिले. वालवडकर गुरुजी, गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक, खूप उंच, सावळा रंग, डोळ्यावर चष्मा, धोतर घालायचे. तर उमेश दादाचे वडील प्रभाकरराव कन्नडहून आलेले व शेती खात्यात नौकरी करायचे. त्यांना लोक प्रेमानी मामा म्हण्याचे. मामा पण खूप उंचेपुरे, धष्टपुष्ट, गोरे, थोडे घारे डोळे,मस्त मिश्या,उजव्या गालावर उठून दिसणारी काळी जन्मखुण, सदा अर्ध्या बाह्याचा पांढरा मस्त इस्त्री केलेला सदरा व  गडद काळी प्यांट.

२० वर्ष कन्नड व औरंगाबादला नौकरी केल्यावर मामांची बदली अंबाजोगाईला झाली.ते खूप चांगले खेळाडू होते. कबड्डी, व्हॉलीबॉल हे त्यांचे कन्नडला असतानाचे आवडते खेळ.खुद्द अंबाजोगाईत ते फार कमी राहिले. पण कुटुंब अंबाजोगाईत होत. बायको,चार मुलं व दोन मुली अस जम्बो कुटुंब. मामानी भूम परंडा ते अहमदपूर पर्यंत अनेक ठिकाणी नौकरी केली. शनिवारी ते अंबाजोगाईला यायचे रविवार मुक्काम व सोमवारी परत नौकारीवर. त्यांचा सारा प्रवास हा सायकलवर चाले. दिवसाला ४० किलोमीटर पर्यंत सायकल प्रवास करायचे. त्यामुळे त्यांची देहयष्टी मस्त होती.

मामा, अंबाजोगाईत असताना त्यांचा आवडता खेळ होता ब्रिज. अंबाजोगाईत फक्त तीन लोकच ब्रिज खेळायची. स्वामी रामानंदतीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे पहिले डीन डॉक्टर डावळे दुसरे कॅप्टन अशोक पाटील व तिसरे वैद्य मामा. तिघांमध्ये प्रचंड फरक पण खेळ कुठल्याही लोकांना एकत्र आणू शकतो. डॉक्टर डावळेन कडे त्यांचे खेळणे कित्येक तास रविवारी चालायचे. त्याच बरोबर मांजरा प्रकल्प वसाहतीत असणाऱ्या सभागृहात शटल तेथिल व गावातील लोकांबरोबर खेळायचे. बॉल बॅडमिंटन पण मामांचा खूप आवडता खेळ.पण गावात खेळण्याची सुविधा नव्हती. मामाचे मुथा नावाचे दोन व्यापारी बंधू  मित्र होते. मुथा बंधू,मामा व इतर व्यापारी मित्र यांनी मिळून गुरुवारपेठमध्ये जाजू यांच्या हवेलीतील मोकळ्या पटांगणात अंबाजोगाई मधिल पहिले बॉल बॅडमिंटन चे मैदान तयार केले. पिवळा लोकरीचा बॉल, लाकडी फ्रेमची व नायलॉन दोऱ्याने विणलेली बॅट, मैदानाच्या मधोमध दोन मीटर उंचीच्या दोन पोलला नेट जे मैदानाला दोन भागात विभागते. पाच पाच जणांचे दोन संघ एकमेका विरुद्ध खेळायचे. या सांघिक खेळाची जननी ही आपली भारतमाता. मला हे अगदी अलीकडे पर्यंत माहित नव्हते. मी त्याला विदेशी खेळ समजायचो. तंजावरच्या राजघराण्याचा हा खेळ. मामाच्या मुळे अंबाजोगाईत सुरु झाला.


काही दिवसानंतर पोलिस स्टेशन मध्ये पण मैदान तयार करण्यात आले व सर्व शासकिय अधिकारी तिथे खेळायला यायचे. व्यावसायिक किवा वयानी थोडे जेष्ठ असलेले लोकच हा खेळ खेळायचे. मामानी खोलेश्वर महाविद्यालयाच्या धाटसराना, बॉल बॅडमिंटन महाविद्यालयाच्या मैदानात सुरु करणाची विनंती केली. खोलेश्वर विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सोनवणे गुरुजींनी पण पुढाकार घेतला व महाविद्यालयाच्या प्रांगणात खेळ सुरु झाला. महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, डॉक्टर भाऊसाहेब देशपांडे सारखे मान्यवर खेळायला येऊ लागले.या सर्वांचे मार्गदर्शक होते मामा. ऊन थोड उतरलं की मामा मैदानावर यायचे. आम्ही लहानपणी कित्येक तास हा खेळ पहात असूत. बॉल बाहेर गेला की आणून द्यायचे काम आमचे. मामांमध्ये खिलाडूवृत्ती नसानसात भिनली होती. प्रोत्साहन देणे, नव्या पिढीला हुरूप देणे व नकळत त्यांचा खेळ अधिक प्रभावी होईल ते पहाणे. तरुणांमध्ये मामा आपले वय विसरून खेळत असत. वयाच्या ७५ वर्षां पर्यंत ते हा खेळ खेळत होते.


अंबाजोगाईतील अनेक तरुण बॉल बॅडमिंटन हा खेळ राष्ट्रीय पातळीवर खेळले. सध्या तहसील मध्ये नायब तहसीलदार असणारे शंकर (राजा) बुरांडे हे अंबाजोगाईतील पहिले राष्ट्रीय खेळाडू. त्याच्या नंतर राजा चिमणगुंडे  ते अगदी माझा मित्र हर्षवर्धन जोंधळे उर्फ चम्या हे सगळे राष्ट्रीय पातळीवर खेळले. शंकर (राजा) बुरांडेनी पुढे मामांचे काम हजारी सरांच्या मदतीने चालू ठेवले.


मामाचे कुटुंब मोठे होते. ते सर्व एकाच खोलीत रहात.पहिले दोन मुल अभ्यास व झोपण्यासाठी मित्रांच्या घरी जात. नौकरीसाठी म्हणून मामा आठवडयातील सहा दिवस बाहेरगावीच असत. या सर्वामुळे उमेश वैद्य जे मामांचे तिसरे चिरंजीव आठवीत जाताच घरच्या व्यवहारिक कामाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर पडली. मामांचा पगार होता २८० रुपये त्यातील २०० रुपये ते उमेशदादाला द्यायचे. महिन्याभरचा सगळा व्यवहार त्यातून भागवावा लागायचा. लहानपणा पासूनच एक कर्तेपण उमेशदादा कडे आले होते.

मी माध्यमिक शाळेत गेल्या पासून श्रीकांतदादा व उमेशदादाचं शाखेवर येण जसे बंद झाले तसे माझे पण. पुढे त्यांचा संपर्क पण फार राहिला नाही. श्रीकांतदादा वायुदलात वैमानिक झाला व पुढे तो विंग कमांडर –ग्रुप कॅप्टनपण झाला. तो आता पण भेटला की खूप आतून आपलेपण वाटते . उमेशदादाची भेट मात्र एकदम जवळ पास वीस वर्षांनीच झाली. त्यांचा मुलगा ओंकार प्रबोधिनीच्या शिबिरात २००२ मध्ये आला, त्याच्या सोबत. सगळे मुलं त्यांना काका म्हणायची आणि त्यांच्या सोबत माझ्यासाठी पण ते उमेशदादा चे वैद्य काका झाले.


२०० रुपयात घर खर्च भागवायचा किराणा, भाज्या, कपडे, सर्व मुलांच्या शिक्षणाचा खर्च. तस सगळं तंगीत पण व्यवस्थित भागायचे कारण कुणाचे फाजील लाड नसायचे. गरजेच्या गोष्टी तेवढ्या घेतल्या जायच्या. खरच गांधीजी म्हणतात ते खर ही वसुंधरा आपल्या सर्व गरजा पुऱ्या करू शकते परंतु हाव नाही. आज मध्यमवर्गीय घरात लाखानी पैसा येतो पण .........?


वर्षातून सर्व भावा बहिणींना दोन ड्रेस शिवायचे. पांढरा सुती सदरा व खाकी चड्डी. मामांचा खिलाडूपणा वैद्य काकान मध्ये पण आला होता. मामा बॉल बॅडमिंटन पिचवर तर काका होम पीचवर आपापले खेळ मस्त खेळत होते. मामाचा एक खाक्या होता बारावी पर्यंतच्या शिक्षणाची जवाबदारी सर्व मुलांची त्यांची. बारावी नंतर मात्र सर्वानी स्वतः काम करून स्वतःच्या खर्चानी शिकायचे. त्यामुळे महाविद्यालयाच्या शिक्षणासाठी काकांनी योगेश्वरी महाविद्यालयात प्रवेश घेतला. १२ पास झाला म्हणून मामांनी त्यांना पहिल्यांदाच रंगीत हिरव्या रंगाचा शर्ट घेतला होता. तो नवा नवा शर्ट घालून काका महाविद्यालायाचे प्राचार्य श्री ए.सी. चौधरी यांच्या कडे फी माफीचा अर्ज घेऊन गेले.

प्राचार्य खाली मान घालून वाचत होते. फी माफीचा अर्ज काकांनी समोर केला.

अर्ज न वाचता प्राचार्यांनी त्यांच्याकडे पाहिले व विचारले काय आहे हे ?

“सर, फी माफ करण्या बद्दल विनंती अर्ज आहे.” काकांनी उत्तर दिले.

“नवे कापडे घालण्याची हौस आहे पण फिस भरण्याची ऐपत नाही का?” थोड रागातच चौधरीसर बोलले.

ते अस बोलताच काकांनी सरळ आपल्या अंगातील नवा शर्ट काढला व तो प्राचार्यांसमोर ठेवला. अगदी

बिनधास्त आणि रोखठोकपणे. मग व्हायचे ते झाले. सर प्रचंड संतापले. शांतपणे काका सगळ ऐकत होते . आज ही तोच बिनधास्त पणा काकांमध्ये पहावयास मिळतो व कधी कधी त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या पण. मामांचा मुलगा म्हटल्यावर ही गोष्ट सरांनी मामानां घरी येऊन पण सांगितली. आपल्या कर्माचे धनी आपण मग सामोरे गेलं पाहिजे हे त्यांच्या वागण्यातून बऱ्याचदा दिसते.

कॉलेजची फिस काही प्रमाणात माफ झाली तरी बराच खर्च होता. शेती शाळेतील बागेतील लिंबाची बोली दरवर्षी व्हायची. काका चढ्या बोलीने ते सर्व लिंब घ्यायचे व त्यातील काही भाजी मंडीच्या बीटवर व काही मोठी लिंब घराघरात जाऊन विकायची. अनेक अनुभव यायचे मोठ्या मोठ्या लोकांचे व त्यांचे मोठे पण समजायचे. व्यवहारात माणूस चांगला ओळखता येतो हे खरे. फक्त १२ वी शिकलेल्या काकांचे व्यवहारीक जाणतेपण पहिले की आवाक होतो आम्ही. काका प्रबोधिनीच्या कामात सक्रिय झाल्या पासून प्रबोधिनीतील सगळे व्यवहार म्हणजे बाजारातील घेण्या देण्याचे हे सर्व काकांनी केले. एका नव्या पैश्याची कधी खोट खावी लागली नाही.

पहिलं वर्ष होताच काकांना टेलीफोन ऑपरेटरची नौकरी लागली. पुढ शिकण्यापेक्षा काकांना नौकरी करणे भाग होते. कुटुंबाचे आयुष्य अधिक सुसह्य करण्यासाठी ते अगत्याचे होते. दररोजची ओढाताण त्यांनी अनुभवली होती.सगळ जुळून आणतानाची तारांबळ खुपच भांबावणारी. दैनंदिन कुटंबातील व्यवहारात पूर्ण नाही पण थोडा तरी सक्रिय सहभाग कामाच्या व निर्णयांच्या बाबतीत मुलांचा असला पाहिजे का ? वर्तमानात यशस्वी होण्यासाठी व उज्वल भविष्यासाठी आपण जी त्यांची कुटुंबाच्या व्यवहारापासून नाळच तोडून टाकतो त्यामुळे ते करिअर मध्ये  यशस्वी होतीलही !  पण त्यांच्या स्वतःच्या जीवन जगण्याच्या व कौटुंबिक पातळीवर त्यानां  योग्य ते यश मिळेल का? की त्यासाठी पण आपल्याला भविष्यात “Art of adjusting and Living happy family Life” चे crash courses सुरु करावे लागतील?


नौकरी, मोठा मित्रपरिवार, कुटुंबातील जबाबदारी या सर्वांसमवेत काकांचं आयुष्य मस्त चालू होत. आता त्यांच्या आयुष्यात आगमन झाले मनीषा मधुकरराव देशपांडे, राहणार धामणगाव, शिक्षण D. Ed यांचे. त्या बीडला शिकत असताना लग्नाचा प्रस्ताव देण्यासाठी मित्राचा आधार घेऊन काका तीनदा गेले पण तिन्ही वेळा त्यानां माघार घ्यावी लागली. नेमके काका ज्या ज्या वेळी प्रस्ताव घेऊन गेले त्यावेळी मधुकरराव देशपांडेंची उपस्थिती बीडला होती. शेवटी एक बीडची मोहिम  फत्ते  झाली व हिरवा सिग्नल मिळाला. मामाना हुंडा नको पण लग्न मुलीच्या वडिलांनी करून द्यावे ही इच्छा होती. मधुकररावांच्या आठ लेकरान मधील लाडक्या शेंडेफळाच लग्न होते. त्यांच्या कडे हे घरातील शेवटचे  कार्य, चांगले करून देण्या इतपत पुंजी नव्हती. शेवटी एक महिना आधी काकानी बिनधास्त स्वभावानुसार नोंदणी कार्यालयात लग्नाची नोंदणी करून टाकली व पुढील महिना मग अनेक क्षेपणास्त्रांना नेटानी तोंड देत एकही लाल रक्ताचा थेंब न गाळता स्वतःच्या पैश्यांनी आपले हात पिवळे करून घेतले !!


३१ डिसेंबर काही कामासाठी काका अहमदनगरला गेले. काम झाल्यावर नवीन वर्षाच्या शुभेच्छा सासरे बुवांना व सासुबाईना देण्यासाठी काकांना जवळ असलेल्या सासुरवाडीला का नाही जावे वाटणार? त्यात बाळंतपणासाठी वैद्यकाकु माहेरी गेल्या होत्या न ! एक तारखेला वैद्यसाहेबांचे धामणगावला आगमन झाले. दिवस आनंदात गेला. रात्री काकुना प्रसुती वेदना सुरु झाल्या. डॉक्टर प्रसाद रसाळ त्यांच्या घरातच राहणारे

फँमिली डॉक्टर होते. त्यांनी नाडी परीक्षा केली. थोड नाराजीतच ते भाऊनां ( काकुंचे वडील ) म्हणाले,

“भाऊ, मनीला ताबडतोब नगरला न्यावे लागेल. मी म्हणालो होतो न तुम्हाला आधीच. थोड अवघड आहे बाळंतपण”

सर्वत्र अस्वस्थता पसरली. नगरला न्यायचे तर जीप लागणार. गावात एकाकडेच जीप होती व चालक जवळच्या तांड्यावर राहायचा. काका डॉक्टर रसाळ यांच्या मोटारसायकल वर पाठी मागे बसून तांड्यावर निघाले. तांड्यावर चालकाच्या घरी पोहोंचले. तो थोड्यावेळा पूर्वीच एक मृतदेह पोचऊन आला होता येण्यासाठी त्याने असमर्थता दर्शविली. शेवटी काय करायचे ? एक मोठा यक्ष प्रश्न.
काकांचे मित्र डॉक्टर कुंभार धामणगावला प्राथमिक आरोग्य केंद्रात होते. काकांनी डॉक्टर कुंभार यांची मदत घेण्याचा प्रस्ताव डॉक्टर रसाळ समोर ठेवला.

“हे शासकिय लोक कसली मदत करणार ?” आपल्या सारख्या लोकांना तर अजीबात नाही.” थोडया नाराजीत डॉक्टर रसाळ बोलले.

“विचारून तर पाहू नाही दिली तर दुसरा पर्याय शोधू” काका म्हणाले

शेवटी दोघही डॉक्टर कुंभारांकडे पोहोंचले. काकांनी सर्व माहिती दिली.

“मग इथच करू की डिलिव्हरी....” डॉक्टर कुंभार म्हणाले.

“तू पहिल्यांदा घरी चल, पहा आणि मग ठरऊ” काका डॉक्टर कुंभाराना म्हणाले.

सर्वजण घरी आले. काकूंची परिस्थिती पाहून डॉक्टर कुंभार यांनीपण नगरला नेण्याचा सल्ला दिला. सोबत त्यांची जीप दिली. पण जीपचा हेडलाईट काम करत नव्हता. शेवटी ऑपरेशन थेटर मधील इमर्जन्सी दिवा रस्ता दाखवायला घेऊन काकू त्यांच्या आई, काका व डॉक्टर रसाळ यांना घेऊन डॉक्टर कुंभारांच्या  चालकाने जीप नगरच्या रस्त्याला लावली.

काकूंची अवस्था नाजूक होती आणि ती अधिक बिघडत होती. रस्ता कच्चा, खूप धक्के बसत होते. कडयाच्या जवळ जीप पोहोंचली. डॉक्टर रसाळ सतत काकूंची तपासणी करत होते.

“डॉक्टर गांधींच्या रुग्णालयाकडे जीप न्या.” त्यांनी थोडया अस्वस्थतेनी आज्ञा केली.

डॉक्टर गांधीनी काकूंना गाडीतच तपासले व नगरला नेण्याचा सल्ला दिला. नगरला जाण्याशिवाय आता पर्याय नव्हता. एक दीड तासांचा अजून प्रवास. या सर्व गडबडीत डॉक्टर रसाळ त्यांचा स्टेथोस्कोप डॉक्टर गांधींच्या रुग्णालयात विसरले. आता फक्त नाडीच्या परीक्षणा शिवाय दुसरा मार्ग नव्हता.

गाडी थोडी पुढे गेली तोच काकूंना एकदम झटका आला व त्यांची शुद्ध हरपली. डॉक्टर रसाळनी जीप  थांबवायला लावली. काकांना त्यांनी बोलावले व काकूंच्या छातीवर दोन्ही हातानी जोरात दाब देऊन मसाज करायला सांगितले. काकांनी मसाज देण सुरु केल. जीप पुढे निघाली. जीप मध्ये प्रचंड अस्वस्थता होती. रस्त्याहून ऊस वाहून नेणाऱ्या बैलगाडयांची लांबच्या लांब रांग होती. साईड मिळत नसल्याने जीप खुपच धीम्या गतीने जात होती. वेळ जात होता तसे सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वेगानी पडत होते. काका मात्र न थकता  काकूंच्या चेहऱ्याकडे पाहत जोरात सर्व शक्तीने दाब देऊन त्यांच्या हृदयाला मसाज देत होते. थांबणे शक्य पण नव्हते, वेळ व अंतर कटता कटत नव्हते. साडे अकरा वाजता त्यांनी कडा सोडले व सकाळी ४.३० ला ते नगर जवळ पोहोंचले. खुपच वेळ लागला.


वेळ आली की प्रत्येक गोष्टी अवघड होऊन बसतात व प्रत्येक क्षण आपली परीक्षा पाहतो. केवळ आपल्या हातात आहे ते करता येत. मनुष्य खुपच अगतिक होतो. नियती समोर तो स्वतःला खुपच खुजा समजतो. अशी वेळ स्वतःवर आल्यावरच तिची दाहकता अनुभवते. शब्दपण तोकडे पडतात हे सर्व सांगताना. या अश्या अनुभवांचा खोल संस्कार संवेदनशील मनावर होतो व अश्या कुठल्याही परिस्थितीत कुणासाठीही मदतीला धावून जाण्याची आणि कधीकधी तर बोलावलं नसतानाही. परिस्थितीची दाहकता अनुभवलेल्या माणसाला तटस्थ राहताच येत नाही. त्याला कितीही शाररिक, मानसिक व कधी कधी आर्थिक हानी पण होते व मन विषण्ण होते मदत करून लोक त्यांच्याशी  कोत्या वृतीने जेव्हा वागतात. जर तो अश्या वेळी हरला तर नियती पण त्याला हरवते योग्य वेळी योग्य मदत न उपलब्ध करता.

काकांना  असे अनेक लोकांना मदत करण्यासाठी धावून जाताना मी पाहिलं आहे. प्रबोधिनीत असू किवा बाहेर कुठही अशी परिस्थिती असली व काकांना आपण सांगितलं की काकांची साद असते,

“हा आलोच....शून्य मिनिटात.”

खूप आधार वाटतो अश्या वाक्यांचा. भूतलावर अशी माणसे आधीच कमी त्यात आपल्यामधे दडलेल्या स्वार्थामुळे त्यांचे मन पण आपण बोथट करतो. नकळत आपल्या कडून अशी चूक घडू नये व काकां सारखे मदतीला धावून जाणाऱ्या माणसाना पण खूप शक्ती मिळावी असे हलाहल पचवण्याची.

त्यांचे मदतीचे हात हे त्यांचे नसतात
तर निर्मात्यानी, प्रत्येकाला मदत करण्यासाठी धावून जाता येत नाही म्हणून
खूप सारे परिस्थितीचे दाहक अनुभव देऊन, तयार केलले असत त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून.

“डॉक्टर चक्रवर्तीच्या रूग्णालया कडे न्या.” इतका वेळ मनीचे मनगट आपल्या हातात पकडून नाडी पाहणारे डॉक्टर रसाळ गडबडीने म्हणाले.

रुग्णालय समोर जीप पोहोंचली. डॉक्टर चक्रवर्ती ह्या विदेशातून शिकून आलेल्या महिला डॉक्टर,विश्रांतीसाठी वरच्या मजल्यावर असलेल्या आपल्या निवासस्थानी झोपण्यासाठी गेल्या होत्या.

“डॉक्टर प्रसाद आलाय, फक्त एवढच सांगा डॉक्टरांना.” जोरातच रुग्णालयाच्या स्वागत कक्ष्यात बसलेल्या व्यक्तीला खूप अधिकारानी डॉक्टर रसाळानी आज्ञा केली.

तो करारी आवाज ऐकताच समोरचा माणूस सरळ उठला व डॉक्टर चक्रवर्तीनां सांगायला गेला. बरोबर १० मिनिटात डॉक्टर खाली आल्या. डॉक्टर प्रसाद रसाळनी असे आडलेले अनेक रुग्ण त्यांच्या कडे अनेक वेळा, वेळी अवेळी आणलेले होते. ते ही कुठलीही कट न घेता, म्हणूनच डॉक्टर चक्रवर्ती सारख्या प्रतिथयश डॉक्टरांच्या ऑपरेशन थेटर मध्ये त्यांना सहज प्रवेश असे.

काकूंना ऑपरेशन थेटर मध्ये घेण्यात आले. सर्व काही औपचारीकता पूर्ण झाल्या. आपल्याला वाटतील आर्थिक...अहो त्याचा तर विषय पण नव्हता त्या वेळी सगळ विश्वासावर व्हायचे.

सकाळी ६.१५  मिनिटांनी ओंकार साहेबांचे आगमण झाले पण त्यांनी सर्व डॉक्टरांना भंडावून सोडले.स्वारीचे आगमन मौनात झाले होते. कुठल्याही प्रकारच्या रडण्याला स्थान नव्हते. परत अस्वस्थता .....आता तर डॉक्टर चक्रवर्ती पण घाबरून गेल्या. काय करावे कुणाला सुचत नव्हते. डॉक्टर रसाळ पुढे आले आणि त्यांनी ओंकारला सरळ पाण्यानी भरलेल्या पिंपात बुडवले. नाकातोंडात पाणीजाताच स्वारी रडायला लागली व सर्वाना हायसे वाटले. काकू अजून बेशुद्धच होत्या. त्यांना अतिदक्षता विभागात हलवले व ओंकारला नवजात अर्भकाच्या दक्षता विभागात.

डॉक्टर रसाळ बाहेर आले व त्यांनी एक पुस्तक काकांना वाचायला दिले.

“वाच हे ! तुझ्या बायकोला ही समस्या होती.” इतक्या वेळ खूप ताणात असलेल्या डॉक्टर रसाळ यांना थोडं ताण मुक्त अवस्थेत असल्याचे पाहून काकांही सब कुछ ठीक असल्याची जाणीव झाली. काकूंना व ओंकारला आता भेटता येणारच नव्हतं.

काका पुस्तक वाचायला लागले.

“इक्लेमप्शीया” नावाच्या समस्येशी काकू लढत होत्या. यात गरोदर स्त्रीचा प्रसूती पूर्वीचा रक्तदाब अचानक खुपच वाढतो व त्यातच झटका येऊन ती स्त्री बेशुद्ध होते. आई बेशुद्ध झाल्याने गर्भात असलेले बाळ गुदमरून जाते. भारतात अश्या प्रकारची समस्या २००० मधील एखाद्या स्त्रीला होते व त्यातून आई व बाळाचे वाचण्याचे प्रमाण खुपच कमी. एखादी आई व बाळ वाचली तरी पुढे खुपच समस्या त्यांना येतात.

काका, जे होईल त्याला सामोरे जाण्यास तयार होते. सकाळी १०.३० ला त्यांना काकुना भेटता आले. त्या बेशुद्धच होत्या व ओंकारला ११ वाजता दुसऱ्या रुग्णालयात, तो एका बंदिस्त काचेच्या पेटीत शांत झोपला होता.
काय वाटले असेल काकांना? मला विचार पण करवत नाही.खरंतर नियती अश्या वेळी विचार करायला वेळ देत नाही एक आव्हान संपले की दुसरे आव्हान दत्त म्हणून समोर उभे राहते. प्रसुतीच्या वेळी रक्तस्त्राव खूप झाल्याने काकूंना रक्त देण्याची नितांत आवश्यकता होती. काका पुढचे आव्हान स्वीकारून कामाला लागले.


दुपारी ४.३० वाजता काकूंना शुद्ध आली. सर्वाना आनंद झाला पण त्यांना कुणालाच ओळखता येत नव्हतं. परत वेगळ संकट. पुढचे ४  दिवस त्या कुणालाच ओळखत नव्हत्या. चार  दिवसांनी त्याना थोडं थोड आठवायला लागले व ओंकारला पण आता काकूंच्या जवळ आणल. एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला. काकुंचे कमरे खालील अंग प्राणहीन झालेले होते. काहीच हालचाल त्यांना करता येत नव्हती. काका व त्यांच्या आई (वहिनी) त्यांची सुश्रुषा तहानभूक विसरून करत होते. सतत नवीन संकट खूप ताण निर्माण करत होत. पैश्याची पण खूप आवश्यकता होती. काकांच्या परळीच्या मित्रांनी ते दायित्व स्वीकारले. दररोज परळीहून येणाऱ्या बसच्या चालका बरोबर ते काकांना दोन हजार रुपये पाठवायचे. त्या सर्वांच्या मूक मदतीने काका नगर सारख्या अनोळखी ठिकाणी लढत होते. शेवटी १८ दिवसांचा हा जन्म मृत्यूचा संघर्ष संपला. काकूनां रुग्णालयातून  सुट्टी मिळाली.


“कुठल्याही प्रकारच जास्त क्षमतांचे औषधे ओंकारला द्यायचे नाहीत. या सर्व प्रसंगा मुळे त्याला पुढील पाच वर्ष सतत झटके येत राहतील. बेशुद्ध होऊन काळानिळा पडेल. खूप काळजी घ्यावी लागेल. खुपच जपावे लागेल.” डॉक्टरांनी काकांना ओंकारची घ्यावयाची काळजी व्यवस्थित समजून सांगितली.
संकटातून तावूनसुलाखून  बाहेर निघाल्यावर पुढचे आयुष्य आनंदात जगण्यासाठी वैद्य परिवार सज्ज झाला पण मनातल्या एका कोपऱ्यात अस्वस्थता होती. ओंकार समोर ही जाणवू  पण द्यायची नव्हती. लाडाचा मन्या होतान तो त्यांचा!  मनाला झालेले दुःख चेहऱ्यावर कधी येऊ दयायचे नाही ही कला काका खुपच बखुबीने शिकले.

“होता है ...चलता है.” अनेक जण अस्वस्थ होऊन बोलायला लागले की काका त्याला सहज समजून सांगतात.

मामा व काकांच्या आईने ओंकारची खुपच काळजी घेतली. त्यांचा खुपच आधार होता त्यांना. स्वतःच्या मुलांचे जेवढे लाड केले नसतील तेवढे लाड मामांनी ओंकारचे केले. त्या दोघांचे खूप अतूट नाते होते. त्यांनी स्वतःहूनच ओंकारची जबाबदारी घेतली होती. ओंकार पण शांत होता पण महिन्यातून त्याला २-३ दा तरी झटके यायचे.
काका कार्यालयात गेले होते व मामा खेळण्यासाठी बाहेर गेले होते. आता ते मोठ्या घरात रहात होते. घरात काकू,काकांची आई व ओंकार होते. अचानक ओंकारला झटका आला तो काळानिळा होऊन बेशुद्ध पडला. दोघांना काय करायचे ते समजेना. काकू डॉक्टरांना कडे पळत गेल्या. तेवढ्यात  काका घरी आले. त्यांनी ओंकारची अवस्था पाहिली व सरळ त्याला उचलले व पाण्यानी भरलेल्या टिपात बुडवले. पाणी नाका तोंडात गेल्यावर ओंकार शुद्धीवर आला.

काकांच्या भाषेत,  “डॉक्टर रसाळचा हा गावठी उपाय करावा लागे”

ओंकार पाच वर्षांचा झाला व त्याला येणारे झटके थांबले. तो आता सामान्य मुलांसारखा शाळेत जाऊ पण लागला. खूप शांत स्वारी होती मनोबांची! त्यांनी पण खूप सहन केलं होत न कळत्या वयात. मामांच्या खिलाडूवृत्ती मुळे व काकांना असलेल्या होम पिचच्या अनुभवामुळे ही  ग्रीष्माची दीर्घकाळाची धग वैद्य कुटुंब न होरपळून जाता तेजस्वी होऊन बाहेर पडले. वडीलधाऱ्या मंडळींचे घरात असणे खुपदा असे धक्यात शॉकअब्सोर्बर सारखे असते पण त्याची किंमत खुपदा आमच्या सारख्या खुपच सुखात वाढलेल्यांना कळत नाही व ते आमच्या सुखी संसारातील अडगळ बनायला लागतात. तर वडीलधाऱ्या मंडळींनां नव्या उभारणाऱ्या संसारात आपल्याला आलेल्या अनुभवाच्या आधारे लढ म्हणण्याची शक्ती द्यायची असते पण आधारा ऐवजी  आपल्या अस्वस्थतेचे शॉक जर ते देत राहिले तर सुंदर संसाराचा आखाडा व्हायला वेळ लागत नाही. वैद्य कुटुंबात संघर्ष अजिबातच नव्हता असे नाही पण घरातील सर्व  लोकांना एकमेकांचे महत्व माहित होते म्हणून शेवट पर्यंत आजोबाचे प्रेम ओंकार अनुभऊ शकला तर काका व काकूंची अगदी आतून केलेल्या सेवेनी मामांचे आयुष्यातील फाल्गुन,कुटुंबातील सर्वांबरोबर  आल्हाददायक झाला. एक खात्रीचा व हक्काचा आधार मामांच्या रुपाने काका व काकूंना मिळत राहिला. हे सर्व कुठल्या मॉल मध्ये नाही मिळत.


ओंकार शाळेत जाऊ लागला तसे काकूनी पण शाळेत जाण्यास सुरुवात केली. त्या हाडाच्या शिक्षक. मुलांबद्दल प्रचंड आस्था. ओंकार पण त्यांच्या तालमीत घडत होता. खुपच छान भाषण करायचा. अगदी आकाशवाणीच्या लहान मुलांच्या कार्यक्रमात त्याचे भाषण झाले होते. अनेक स्पर्धेत यश मिळवायचा. प्रबोधिनीतील लहान मुलांच्या संचयनीचे उदघाटन करण्यासाठी ऋषीतुल्य नानाजी देशमुख आले होते. त्या कार्यक्रमाचे सूत्र संचलन ओंकारनी केले होते. त्यावेळी तो ४ थीत होता. याचं खरं श्रेय होत काकूंना. त्या खूप सुंदर लिहून द्यायच्या. ओंकारच्या उमलत्या वयात काकुंचे संवेदनशील संस्कार झाले. खुपच कमी पण हळूवार व नम्रपणे सर्वांशी ओंकार बोलायचा.


बजाज एम ८० वर ओंकार,काका व काकू यांना अनेक वेळा जाताना पहिले. ओंकारला घेऊन काका पहिल्यांदा प्रबोधिनीत घेऊन आले ते शिबिरासाठी आणि ओंकार प्रबोधिनीत रमू लागला. काकांनी आता त्याचा हात माझ्या हातात दिला होता. २० वर्षांपूर्वी  माझा हात काकांच्या हातात होता. आम्ही दोघांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. माझ्या येवढा ओंकार उपद्व्यापी कार्टा नव्हता. २० वर्षां पूर्वी ज्यांना मी दादा म्हणायचो ते काका आज त्यांच्या मोठेपणा मुळे मला दादा म्हणतात.


प्रबोधिनीतील मुक्त विद्या केंद्रात ओंकार चांगलाच रमला. फक्त २५-३० मुलं त्यावेळी होते. संगणक प्रशिक्षण, वाचनालय, संध्याकाळची उपासना व क्रीडादल,गीतासंथा वर्ग अश्या अनेक उपक्रमात तो सहभागी होत होता. त्याला अभिव्यक्त होण्याला चांगले व्यासपीठ मिळत होते. त्याने केलेली एक छोटी कविता आजही वाचली की कौतुक वाटते.

असे अंगी सगुण हे, त्यावरून तो विजय मेळवे.
याच गुणांच्या तू आधारे, झेप घे झेप घे  १
जोपास या गुणांना रे, वाढव या गुणांना रे
वाढव आपली शान रे, तू याच गुणांच्या आधारे   २
याच गुणामुळे तुला रे, शाब्बासकी मिळेल मोठ्यांची रे
तू त्यांच्या आशिर्वादमुळे रे मोठा हो मोठा हो  ३


काका व काकू त्याला संध्याकाळी उपासने नंतर आपल्या एम ८० वर न्यायला यायचे. रस्त्यावर बऱ्याच वेळ मग आम्ही गप्पा मारायचोत. काका मध्येच कधीतरी आपला हात समोर करून म्हणायचे, “ या हाताला काम द्या.” त्यांच्या म्हणण्याची पद्धत इतकी विनोदी होती की मला खूप हसू यायचे. ओंकार मुळे हळूहळू काका व काकू पण उपासनेला येऊ लागले.

७ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ओंकार व त्याच्या बरोबर स्वयंअभ्यास करणारे प्रणव, अरविंद, चंद्रशेखर हे सर्व मित्र गुणवत्तेनी पास झाले. तालुक्याच्या गुणवत्ता यादीत त्यांचे नाव झळकले. वि. र. जोशी सर ज्यांनी मला ७ वीला शिकवले व ज्यांच्या सर्वात जास्त आधाराने व मदतीने मी अंबाजोगाईत प्रबोधिनीचे काम करू शकलो. त्यांचे मार्गदर्शन या सर्वाना मिळाले. ७ वी शिष्यवृत्ती ८,९ MTS १० ची NTSE परीक्षेत एक नवा आदर्श जोशी सरांच्या मार्गदर्शनाने आम्ही रूढ करू शकलो. पुढे तर मराठवाड्यात पण मोठ्या संख्येनी मुलांनी यशस्वी व्हावे यासाठीचे  यशस्वी प्रयत्न प्रबोधीनीच्या माध्यमातून केले.

फक्त शिष्यवृत्तीच नाही तर स्वयंपाक करण्याचे शिबीर पण आम्ही घ्यायचोत. सर्व मुल ४-५ दिवस राहण्यासाठी माझ्या घरी म्हणजेच प्रबोधिनीत यायचे. मग आम्ही बाजारात जाऊन भाजीपाला व इतर सामान घेऊन येत असू.भाजी निवडणे, कांदा कापणे, फोडणी देणे, कुकर लावणे, पुऱ्या तळणे असे अनेक अनुभव मी व माझ्या सोबतची १०-१२ मुलं घ्यायची. आपणच तयार केलेले, कच्चे, करपलेले आम्ही आनंदात खायचो. या काळात आम्हाला कळले काका एक उत्कृष्ट स्वयंपाकी आहेत. त्यांनी शिबिरात केलेली पावभाजी आम्ही ताव मारून संपवली होती. काकांना कितीही माणसांचा आणि कुठलाही स्वयंपाक सहज करता येतो. BSNL मधील cash counter वर नोटा मोजताना त्यांचे हात ज्या सफाईने फिरतात, तेवढ्याच सफाईने २०० जणांचे भजे प्रबोधिनीत करताना त्यांच्या हातातील झाऱ्या तेलाच्या कढईत फिरतो. अनेक पक्वान्न ते खूप प्रेमाने नियमित पणे सर्वाना करून खाऊ घालत.  अश्या अनेक पंगतींचा अनुभव आम्ही घेतला आहे. अगदी पिठलं भात ते कोजागिरीचे खास दुध.


प्रबोधिनीत दर वर्षी गणपती बसायचा. मुलं व माझ्या कुवतीनुसार सर्व चाले. या वर्षी ढोल-बर्ची पथक बसवण्याचा विचार होता. ढोल प्रशिक्षणासाठी पुणे युवक विभागाचा मार्गदर्शक ढोल घेऊन आम्हाला शिकवायला आला. सर्वात पहिल्यांदा ढोल शिकले काका. आम्हाला काही जमता जमत नव्हता. त्यावेळी काकांना प्रबोधिनीच्या गणेश मंडळाचे अध्यक्ष सर्व मुलांनी केले. खूप नवीन कल्पना या वेळी राबवल्या. “उद्याचा भारत” या विषयावर अनेक विचारप्रणालीचे कार्यकर्ते, विविध धर्माचे धर्मगुरु व विविध संघटना व संस्थाचे प्रमुख लोकांचे व्याख्याने प्रबोधिनीत ९ दिवसांमध्ये आयोजित करण्यात आले. अनंतचतुर्दशीला विसर्जनाच्या मिरवणुकीत काका व मी ढोल वाजवत होतो. मध्येच एक ढोल फुटला मग एका बाजूचा ताशा करून आम्ही गणरायाचा निरोप घेतला.


गणेशोत्सव संपला व वैद्य कुटुंब प्रबोधिनीचे कुटुंब झाले. अमोल पाटणकर निवासी पूर्ण वेळ कार्यकर्ता त्याचे तर वैद्य काका व काकू पालकच होते. सर्व मुलं क्रिकेटचा सामना मामांबरोबर पाहायचे. सामना जिंकल्यावर मामांकडून आईस्क्रीम,भेळ,चिवडा यांचा पण आस्वाद घेतला जायचा. दिवसा काका काकू बाहेर असले तरी मामांबरोबर अर्ध्याच्या आसपास प्रबोधिनीचे मुलं ओंकार निवासात मस्त संवाद साधत सामना पहात असत. ७८ वर्षांच्या मामांचा उत्साह तर मुलांच्या वरचा.


ओंकार, काका व मामा प्रबोधिनीत सक्रिय झाल्यावर मग काकू कश्या मागे राहणार? त्यांनी १ली  ते ४ थीच्या मुलांसाठी दर रविवारी आनंदगट सुरु केला. त्यांच्या शब्दात सांगायचे तर, “ प्रथम वाटले होते, की रविवारी असल्यामुळे मुलं यायला कंटाळा करतील. पण छे ! दूरदर्शनलाही बाजूला सारून मुलं आनंद गटाला येऊ लागले आणि परीक्षेच्या काळात पण. परीक्षेच्या काळात अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नमंजुषे सारखे कार्यक्रम घेतले. त्यामुळे परीक्षेची तयारी झाली पण आनंदात.”


काकू खूप कल्पक शिक्षक आहेत व खुपच उपक्रमशील असल्याने थोडयाच काळात आनंदगटात येणाऱ्यांची संख्या वाढली. आनंद गट,मग ४ थी शिष्यवृत्ती व नंतर ७ वी शिष्यवृत्ती व ८ वीच्या मुलींचा विद्याव्रत संस्कार अश्या अनेक उपक्रमात काकूंचा सक्रिय सहभाग वाढत गेला.

लहान मुलांसमोर गोष्टीशिवाय सोडलंतर काकू कधीही एखादा विषय घेऊन बोलल्या नव्हत्या. त्यांनी त्यांचे पहिले अभ्यास पूर्ण भाषण प्रबोधिनीत केले तर काकांनी रजेच्या अर्जा शिवाय कुठलेही लेखन केले नव्हते पण अमोलच्या आग्रहाने त्यांना प्रबोधिनीच्या दुसऱ्या कार्यवृत्तात “श्रमदान” नावाचा छोटा लेख तर “मु.पो,वाघाळा” हा मोठा लेख लिहून घेतला.

रविवारचे वाघाळा गावासाठी काम, विवेकवाडी प्रकल्पासाठी सकाळ, संध्याकाळी व गरज पडल्यास मध्यरात्री अगदी शून्य मिनिटात ते उपस्थित असायचे. सरपंच सहली  मध्ये तर सर्व व्यवस्थांची तयारी  काकांनी केली होती.

ओंकार ७ वी तून पुढे जात जात १२ वी ला गेला. प्रबोधिनीत त्याच्या मित्रांचा खुपच घट्ट मैत्रीचा गट बनला होता. कुठही ते बरोबरच असायचे.

कुठलाही संघटक ज्यावेळी संघटनेचे काम सुरु करतो तेव्हा त्याने एक हक्काची मदत मिळवणारे स्थान शोधले पाहिजे असे आ. एकनाथजींनी लिहिलेल्या “सेवा साधना” या पुस्तकाचा अभ्यास करताना अनेकदा वाचले होते ते कसे असावे यावर अनेक बुद्धीला ताण देऊन गटचर्चा आम्ही केल्या होत्या. अश्या हक्काच्या मदतीचा अनुभव प्रत्येक्ष घेता आला ते अंबाजोगाईत. वैद्य कुटुंब हे प्रबोधिनीचे हक्काच्या मदतीचे स्थान आहे. असा एकही कार्यक्रम, उपक्रम, सोहळा नाही की ज्यात संपूर्ण वैद्य कुटुंबाचा सहभाग नाही असे फारच क्वचित वेळा झाले असेल.

ओंकारची बारावी सुरु झाली होती. मामांच्या गुडघ्याचे दुखण्याने  त्यांच्या फिरण्यावर बंदी आणली होती. त्यात त्यांना हर्नियाचा त्रास सुरु झाला. ऑपरेशन लातूरला झाले. काकांच्या मोठया भावाकडे ते होते. लातूरला जाणेयेणे ही वाढले. आज रविवार होता.ओंकारला नवीन sack घ्यायची होती म्हणून काकाना त्याने फोन केला. काकांनी त्यास बोलाऊन घेतले. काकांचे मित्र पुजारी पण त्यांच्या सोबत होत. Sack घेतल्यावर ओंकार स्कुटी वर निघाला काका पाठीमागून पुजारींसोबत चालत येणार होते. खूप पाऊस पडल्यामुळे भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा खाण्याचा त्यांचा मूड होता. शेंगा खात खात काका पुजारीकाकां बरोबर निघाले. खूप दिवसांनी असे रमत गमत ते निघाले होते. गप्पाही रंगत होत्या. थोडया वेळानी फोन वाजला.

“ओंकारचा accident झाला तुम्ही लवकर घरी या.” काकूंचा फोन होता.

काका त्वरित घरी निघाले.

ओंकार गाडी चालवत मोहन टॅाकीजजवळ आला होता.तिथे पाण्यानी भरलेला एक खड्डा होता. त्याला तो पाण्यानी भरला असल्याने समजला नाही. गाडीपण थोडी वेगात होती. गाडी खड्यात जाताच, ओंकारचा तिच्यावरील ताबा सुटला. ब्रेक दाबण्याच्या ऐवजी त्याने एक्सिलेटर वाढवले. गाडी वेगाने उसळली व तिने दिशा बदलली. खूप वेगात ती जागच्या जागी फिरली व ओंकारचा पाय धाडकन जवळच्या विद्युत खांबाला लागला. तोच उलट्या दिशेनी गाडी फिरली. ३६० अंशाच्या कोनातून व परत त्याचा पाय विद्युत खांबाला धडकला व तो खाली पडला. जवळच साखरे नावाचे गृहस्थ होते. त्यांनी त्याला नाव विचारले.

“ओंकार वैद्य.” ओंकारनी सांगितले.

“उमेशचा का ?” साखरेनी विचारले.

“हो ....पण मला घरी न्या आधी.” ओंकार त्यांना म्हणाला.

साखरेनी ओंकारला रिक्षात टाकले व घरी नेले. काकू घरीच होत्या. त्यांनी काकांना व आमच्या सर्वांनाच फॅमिली डॉक्टर अतुलला फोन केला. कार घेऊन अतुल पोह्चला व काकापण. पाहताक्षणी फोन फ्रयाक्चर असल्याचे लक्षात आले .

अतुल व काकांनी ओंकारला गाडीत घातले आणि रुग्णालयात निघाले. आज नेमका रविवार होता व अंबाजोगाईतील सर्व डॉक्टरांची दवाखाने बंद होती. शेवटी लातूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला. वेदना शामक इंजेक्शन अतुलने ओंकारला गाडीतच दिले व ते लातूरला निघाले. रक्त पण खूप वाहत होते.काकांनी ओंकारचा पाय घट्ट धरून ठेवला होता.

मला डॉक्टर भाऊसाहेब देशपांडे व डॉक्टर काळेनी घडलेला प्रकार सांगितला. काकांना फोन लावताच कळले ते लातूरला निघाले आहेत. विवेकानंद रुग्णालयाच्या अपघात विभागात ओंकारला घेऊन जात होते. अभिजीत प्रबोधिनीचा पूर्ण वेळ कार्यकर्ता लातूरला आपल्या घरी व तेथून औरंगाबादला जात होता. माझा फोन जाताच तो गाडीतून उतरला व सरळ रुग्णालयात गेला. कागद पत्राचे काम त्यांनी पूर्ण केले. तोपर्यंत काका व अतुल ओंकारला घेऊन पोहोंचले. अनेक ठिकाणी जखमा व हाडांना इजा झाली होती. प्राथमिक उपचार झाले. ऑपरेशन करावे लागणार होते. उपचारासाठी त्याला ५२ दिवस रुग्णालयात ठेवावे लागले. काकू व काकांनी ओंकारची खुपच काळजी घेतली त्याला बरे होण्यासाठी सहामहिने तरी लागणार होते. त्याच्या बारावीच्या परीक्षेचे काय होणार? खूप अस्वस्थ असायचा तो पण त्याने धीराने सर्वाला तोंड दिले. त्याच्या मित्रांनी खुपच मोलाची साथ दिली.


ओंकार परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला पण काकांची व काकूंची परीक्षा अजून चालूच होती. मामांची तब्येत वरचेवर ढासळत चालली होती. काका अनेक आघाड्यांवर लढत होते. ते उत्कृष्ट परिचारक झाले होते.खूप आस्थेनी व आपुलकीने ते मामांची सेवा करत होते.

ओंकारनी अंबाजोगाईतच इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. तो त्या वर्षीच्या गणेश मंडळाचा अध्यक्ष होता. मामा खूप आजारी असतानाही अनंतचतुर्दशीच्या आरतीला आले. त्यांच्या हस्ते आरती झाली. मामांची ती शेवटची प्रबोधिनीची भेट. त्यानंतर त्यांना देवाज्ञा झाली. काका,काकू त्या पेक्षाही ओंकारला खूप मोठी पोकळी जाणवत होती.

सर्व संकटाना सामोरे जाण्याचे व त्यातून तावूनसुलाखून निघायची सवय वैद्य कुटुंबियांना झाली होती. मी पण एका मोठ्या आजारातून बाहेर पडलो होतो. काका व मी दररोज संध्याकाळी ४ किलोमीटर फिरायला जायचो. मी प्रबोधिनीची पहिली प्रतिज्ञा पुण्यात घेतली पण दुसरी मात्र अंबाजोगाईत घ्यावी अशी इच्छा माझी व प्रबोधिनीच्या आ. संचालकांची होती. ओंकार, काकू व काकांनी म्हणजे संपूर्ण कुटुंबांनी प्रबोधिनीची  पहिली राष्ट्रसेवेची प्रतिज्ञा घेतली. मी ज्यावेळी तिसरी प्रतिज्ञा घेतली त्यावेळी पण सोबत दुसरी प्रतिज्ञा घेणारे एक काका होते.

२००८ च्या सप्टेंबर मध्ये मी लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझी  इच्छा होती लग्न प्रबोधिनीच्या पद्धतीने व अंबाजोगाईतीलच कुणी तरी त्याचे पौराहित्य करावे.अंबाजोगाईत अश्या प्रकारे लग्न आधी कधी लागले नव्हते त्यामुळे पौराहित्य करणारे साहजिकच कुणी नव्हते. माझ्या समोर हे करण्यासाठी उभ्या राहिल्या त्या वैद्य काकू. केवळ ४-५ दिवसांची तयारी करण्यासाठीचा वेळ होता. काकुनी खूप तयारी करून, मस्तच पौराहित्य मोठया अधिकारवाणीने केले. काकांनी त्यांना तत्परतेनी सहाय्य केलं. अंबाजोगाईत महिला पुरोहित म्हणून लग्न लावणाऱ्या त्या पहिल्याच होत्या.    

ओंकार महाविद्यालयात चांगलाच रमला होता.पुढील सातही  सत्रांमध्ये महाविद्यालयात पहिल्या पाचात होता. महाविद्यालयाचे शेवटच्या सत्राची परीक्षा देऊन झाल्यावर त्याच्याशी पुढील १० वर्षाच्या त्याच्या स्वतःच्या नियोजनाबद्दल आमची साधक बाधक चर्चा झाली. पुढील काही संगणकाच्या सॉफ्टवेअरचा अभ्यास करण्यासाठी तो पुण्याला गेला. त्याचे प्रयत्न पण आता योग्य दिशेनी चालू होते. शेवटच्या सत्राचा निकाल लागण्याच्या आधीच त्याची  एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड पण झाली. सगळे जण खूप आनंदात होते. परत त्याचे मित्र व तो एकत्र पुण्याला आले होते. निकालानंतर प्रशिक्षणासाठी निवड करण्याचे  कंपनीचे पत्र पण त्याला मिळाले. निकाल लागला व ओंकार चक्क एका विषयात नापास झाला होता. एक फारच मोठा धक्का होता. कधीही आणि कुठल्याच आणीबाणीच्या परिस्थितीत त्याचा क्लास पण चुकला नव्हता. आता चक्क नापासच. ओंकारने गुण पाहिले व तो म्हणाला,  “येवढे तर मार्क्स मला एका पेपरमध्ये  पडायला पाहिजेत. माझ्या दुसऱ्या पेपरचे मार्क्स यात धरले नाहीत किवा माझा एक पेपर तपासला नाही.”
तो खूप अस्वस्थ होता पण त्याबरोबरच त्याला विश्वास पण होता हे मार्क चुकीने आलेले आहेत. आपल्या शिक्षण पध्दतीत अश्या अनेक गडबडी होताना आपण पाहतो पण नेमकी ती आपल्या बाबतीत घडली की मग तोंडचे पाणी पळते. परत ज्यापद्धतीने याची पडताळणी होते तीही वेळखाऊ व तापदायक प्रक्रिया असते. यामुळे किती तरी मुलांचे आयुष्य उध्वस्त होताना आपण पाहतो.


काका, अंबाजोगाईच्या प्रामाणिकपणे काम करणारे व अश्या वेळ प्रसंगी धावून जाणारे विद्यापीठ प्रतिनिधी अविनाश लोमटे बरोबर विद्यापीठात गेले. ओंकारचे म्हणणे खरे ठरले. त्याच्या एका पेपरचे गुण धरलेच नव्हते. योग्य तो बदल करून गुण पत्रिका मिळाली. ओंकार आता पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियर आहे.
काकानी आता पन्नाशी गाठली तरी ते अजून तरुण आहेत. ते नेहमी म्हणतात, “माझ्या समोर आदर्श आहे मामांचा. आता मला मामांसारखे जगायचे आहे.” आपल्या अवती भवती अगदी कुटुंबातही आपण इतरांसाठी आदर्श ठरू शकतो. माझ्या सारख्या माणसाला मामांपेक्षा काका भावत असतीलही पण ओंकारला मात्र काका, काकू व मामांचे खूप छान आदर्श आहेत. अस आपले आयुष्य आपल्या कृतीतून एकमेकाला आदर्श करून वैद्य कुटुंबाने प्रबोध कुटुंबाचा आदर्श मात्र आम्हा सर्वांसमोर ठेवला.


माझ्या इस्त्रायल दौऱ्याची तयारी काकानी माझ्या एवढीच केली होती. व्हिसा मिळण्यासाठी तातडीने १ लक्ष रुपये भरायचे काम बँकेची वेळ अगदी संपलेली असताना व मी अंबाजोगाईत नसताना बिपिन क्षीरसागर व काकांनी अगदी तातडीने केले होते. इस्त्रायल दौरा झाल्यावर मी अंबाजोगाईत आलो व मला थोडे राजकारणाचे वेध लागले. मी एका राष्ट्रीय पक्षाचे  महाराष्ट्र राज्याचे इलेक्ट्रोनिक्स व मिडिया विंगचा प्रमुख म्हणून काम करायचे हे पक्षाच्या प्रमुखाशी बोलून निश्चित झाले होते. मुंबईतून परळीला येणाऱ्या ट्रेन मध्ये बसलो. मोठ काम होत.बर्थ वर पहुडलो व अंबाजोगाईतील गेल्या काही वर्षांच्या प्रबोधिनीच्या कामाचा पट डोळ्यासमोरून पुढे जात होता. काका काही केल्या डोळ्यासमोरून जात नव्हते. या सर्व लोकांनी तन,मन आणि धनानी केलेले काम डोळ्यासमोर येत होते. त्यांच्यामुळे कुणालाही माहित नसलेला माणूस आज प्रसाददादा चिक्षे म्हणून लोकांना माहित झाला होता. आता त्या सर्वांना सोडून वेगळ्या वाटेनी फक्त आपला विचार करून मोठे व्हायचा मार्ग धरायचा? प्रबोधिनीसाठी स्वतः मध्ये प्रचंड बदल करणारे काका सतत दिसत होते. त्यांनी अनेक मोठे व आनंदी राहण्याचे मार्ग सोडून प्रबोधिनीचा मार्ग धरला होता. सावलीसारखे ते सतत बरोबर होते. किती स्वार्थी झालो होतो मी? गाडी परळीला पोहचली.

 मी रात्र भर स्वतःशी झगडत होतो. परळीत उतरलो व मुंबईत जाण्याचा विचार पूर्णतः बाद करून अंबाजोगाईच्या बसमध्ये बसलो व शांत झोपी गेलो..........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: