देशातील
सुप्त मनुष्यशक्तीचा आत्मसन्मान वाढविणारी गतिशील संघटना म्हणजे ज्ञान प्रबोधिनी.
सुरुवातीस हे विधान समजायला खुपच अवघड जायचे.पण हळूहळू समाज दर्शन होत गेले व
त्याचा दररोज नवा अर्थ उमजू लागला. आपल्याला अवती भोवती अनेक ठिकाणी असं काही करता
येईल का? थोडं डोळसपणे पाहिले की अनेक गोष्टी उमजतात.
अंबाजोगाईतील
गणेशोत्सव, त्यात प्रबोधिनीचा सहभाग जोरदार असायचा.शिस्तबद्ध मिरवणूक, सतत काही नवीन
हे आता नित्याचे झाले आहे. मोठेमोठे ढोल कमरेला बांधून कित्येक तास वाजवायचे
यासाठी बरीच शाररिक क्षमता लागते. ढोलाला ताशा व झांजा यांची साथ असते. या
सर्वांचा समन्वय साधून विविध रचना असतात. अशा अंबाजोगाईतील प्रबोधिनीचा वाद्य गट १६ रचना वाजवतो. दरवर्षी एखाद्या
रचनेची निर्मिती होते. अतिशय जोश पूर्ण व वीररसपूर्ण असे हे वादन असते. समन्वय न
बिघडू देता आपल्या संपूर्ण ताकदीने प्रत्येक जण वाजवत असतो त्याच प्रमाणे
एकमेकांना प्रेरणा देत असतो.फक्त जोरात वाजवणे हा वाद्य गटाचा खरा हेतू नाही.
गणेशोत्सवात अतिशय विचित्रपणे गणराया समोर अनेक जणांना नृत्य करताना आपण पाहतो.
काही शुद्धीत असतात तर काही सोमरसाचे सेवन करून स्वर्गीय नृत्य करत असतात. यासाठी
त्यांना साथ असते ती चित्रपटातील कर्णकर्कश्य गाण्याची. प्रबोधिनीचे संस्थापक
संचालक आ. आप्पासाहेब पेंडसे हे सर्व दृश्य पहात होते. गणेशोत्सवात एक आदर्श घालून
देण्यासाठी त्यांनी वीररस युक्त,जोशपूर्ण व अतिशय गतिशील असे बर्ची नृत्य सुरु
केले. वाद्यगटाचे खरे दायित्व हे या बर्ची नृत्याला साथ देण्याचे.बर्ची नृत्य हा
प्रकार अंबाजोगाईतील मुली व मुलं हे पहिल्याच वर्षी शिकले. त्याचे सादरीकरण अनेक
ठिकाणी झाले.
अंबाजोगाईतील
गणेशोत्सव व गणेश विसर्जन मिरवणूक इतर ठिकाणांपेक्षा काही वेगळी नव्हती. जे सर्व
ठिकाणी होते ते इथे पण होत होते. सर्व वयोगटातील मुलं मोठ्या संख्येने प्रबोधिनीत
येऊ लागल्यानंतर अंबाजोगाईतील विसर्जन मिरवणूकीत सहभागी व्हायचे ठरवले.खूप सराव
केला. खूप उत्साहात व जोशात मिरवणूक निघाली. रात्री साडे नऊच्या आसपास सादरीकरण व
परीक्षण शिवाजी चौकात झाले. शिवाजीचौकात मोठया संख्येने अंबाजोगाईकर विसर्जन
मिरवणुकीतील मंडळांचे सादरीकरण पाहण्यासाठी येतात. प्रबोधिनीच्या सादरीकरणाच्या
थोड्या आधी महेंद्रभाई व प्रशांत दिवेकर पुण्याहून आले. त्या आधीच आशुतोष बारमुख
आम्हाला मदत करण्यासाठी आला होता. एकदम जबरदस्त प्रात्यक्षिक झाले आणि अगदी
दिलेल्या वेळेत. अंबाजोगाईकरांना एक वेगळे व आकर्षक प्रात्यक्षिक पहावयास मिळाले.
प्रबोधिनीच्या मंडळाला त्या वर्षीचे पहिले पारितोषिक मिळाले.
गणेश
विसर्जन मिरवणुकीत माझा पण पहिल्यांदाच असा कर्ता सहभाग होता.त्यामुळे ते वातावरण
खूप जवळून अनुभवता आले. खूप काही करण्याची संधी होती. तरुणाईची प्रचंड उर्जा
वाहताना दिसली. पण मनात एक मोठी खंत होती.जय भवानी जय शिवाजी म्हणणाऱ्या आम्हा
लोकात भवानीदेवीला फारसे स्थानच नव्हते. गणेश मिरवणुकीत फार महत्वाचे स्थान
स्त्रियांना नव्हते. प्रेक्षक म्हणून त्यांची उपस्थिती मोठी होती. त्यांचा सहभाग त्यावेळी
असणाऱ्या वातावरणात वाढवणेही शक्य नव्हते. दोन वर्षांनी आम्ही मुलीचे ढोल पथक
बसवले. खूप मेहनत घेतली पण निसर्गाने त्यावेळी खुपच मोठ संकट उभे केले. मिरवणूक
चालू झाली व पाऊस धोधो पडू लागला. सर्वांची निराशा झाली. साडे आठ, नऊच्या आसपास
पाऊस थोडा थांबला व एक प्रात्यक्षिक सावरकर चौकात करता आले. ज्या प्रमाणात प्रयत्न
केला होता त्या प्रमाणात नवा पायंडा पाडण्यास आम्हाला यश नाही आले.
मागच्या
वर्षी मात्र आम्ही पूर्ण तयारीने उतरलो. युवतींचा वाद्य गट मोठा होता. मलाही
अंबाजोगाईच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचा दहा वर्षांचा अनुभव होता. शिवाजी चौकात
अनेक गणेश मंडळांच्या प्रमुखांना स्वागत स्वीकारताना बघितलं होत. अंबाजोगाईत २५-३०
तरी नोंदणीकृत गणेश मंडळ आहेत. पण गेल्या दहा वर्षांत मला एकही महिला गणेश मंडळाची
अध्यक्ष असल्याचे दिसले नाही. प्रबोधिनीचे गणेश मंडळ पण त्यास अपवाद नव्हते. त्याच
वेळी निर्णय घेतला या वर्षी आपल्या गणेश मंडळाची अध्यक्ष महिला असेल. पण कोण हे
दायित्व स्वीकारणार ? मन थोडं अस्वस्थ होतं. प्रबोधिनीतील सर्वांना माझी कल्पना
आवडली. पण अध्यक्ष कोण होणार या बाबत प्रश्नच होता. सर्व जण विचार करत असताना सगळ्यांच्या
तोंडून नाव आले मीराताई. सर्वांनी एकमताने मीराताईंची निवड केली. अगदी नोंदणी पासून
अनेक ठिकाणी सर्वांना आश्चर्य वाटत होतं. शिवाजी चौकात नगराध्यक्षांच्या हस्ते
मीराताईंनी स्वागत स्वीकारले. तो अंबाजोगाईतील ऐतिहासिक क्षण होता.
ज्ञान
प्रबोधिनीचे विस्तार कार्य अंबाजोगाईत सुरु झाल्यापासून मीराताई कार्यरत
होत्या.माझ्या मावशीच्या घराजवळच त्या राहायच्या. गीता प्रबोधिनी सुरु झाल्यावर
त्या श्रोत्या म्हणून यायच्या. पुढे शिशुविहार सुरु झाले. लता मावशी बरोबर त्यांनी
त्याची जबाबदारी घेतली.
मीराताईंचे
वडील मूळ धनेगाव धरणाजवळच्या काळेगाव सावरगावचे. कृष्णाबाई व किसनरावांच्या
मीराताई दुसऱ्या क्रमांकाचे अपत्य. पहिले खंडेराव हे मीराताईंचे ५ वर्षांनी वडील
बंधू. ताईंपेक्षा लहान बहिण हिरा. कृष्णाबाईंचे लग्न त्यांच्या नवव्या वर्षीच सोळा
वर्षांच्या किसनरावांशी झाले होते. आजोबा मारोतीराव गावातील इनामदार. बरेच लोकांचे
येणेजाणे होते. मीराताई आजोबांच्या फारच लाडक्या. आजोबा त्यांना प्रेमाने अहो
मीराबाई म्हणून हाक मारायचे. वडील शिक्षक असल्याने ते बऱ्याच वेळा बदलीच्या गावाला
असायचे. आई कधी त्यांच्या बरोबर तर कधी सावरगावला. तसे मस्त कुटुंब होत
कुलकर्णींचे ! सर्व काही मजेत चालले होते.
खंडेराव
खूप हुशार होते. त्यांना शिक्षणासाठी औरंगाबादच्या काकांकडे ठेवले होते.
बारावीच्या परीक्षेचा खूप चांगला अभ्यास त्यांनी केला होता. इकडे मीराताई
सावरगावला ७ वीत शिकत होत्या. खंडेराव चांगल्या श्रेणीत १२ वी पास झाले. त्यानां
डॉक्टर व्हायचे होते. काकांचा मात्र त्यांनी कृषीमहाविद्यालयात प्रवेश घ्यावा असा
आग्रह होता. काका थोडे रागीट होते. खंडेरावांनी आपल्या आवडी नुसार शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयात प्रवेश घेतला. या बाबत त्यांनी काकांना अंधारातच ठेवले. वैद्यकीय
महाविद्यालयात प्रवेश घेतला खरा पण काही दिवसात ते खूप आजारी पडले. त्यांना मधुमेह
निघाला. इन्सुलिनचे इंजेक्शन सुरु झाले. त्तीन महिने ते काही महाविद्यालयात जाऊ
शकले नाहीत. आजार थोडा आटोक्यात आल्यावर ते महाविद्यालयात गेले. महाविद्यालयाच्या
प्रमुखांनी त्यांना पालकांचे आजारी असल्याचे पत्र घेऊन येण्यास सागितले. खंडेराव काकांकडे
गेले व त्यांनी त्यांना पत्र देण्यास सांगितले.
वैद्यकीय
महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे व ते ही न सांगता हे पाहून काका चिडले व रागात
म्हणाले, “माझं जर ऐकायचे नसेल तर इथे राहायचे नाही व मी तर या पत्रावर सही पण
करणार नाही.”
खंडेराव
पण थोडे अस्वस्थच झाले व त्यांनी सरळ सावरगावची वाट धरली. आजोबा व वडिल त्यांची
समजूत काढत होते. काकांचे बोलणे खंडेरावांनी थोडे मनावरच घेतले होते. ते काही
औरंगाबादला काकांकडे जाण्यास तयार नव्हते. याच काळात त्यांची प्रकृती अधिकच
बिघडली. इन्सुलिनचे इंजेक्शन दररोज घ्यावे लागायचे ते चारपाच दिवस घेतले नाही.
आजार अधिकच बळावला. त्यांना अंबाजोगाईच्या दवाखान्यात नेण्यात आले. अंबाजोगाईतील
डॉक्टर काही दाखल करून घेण्यासाठी तयार नव्हते. “आजार विकोपास गेला आहे. इथे उपचार
होणार नाहीत. औरंगाबादला न्यावे लागेल.” डॉक्टर सांगत होते.
औरंगाबादला
जाणारी फक्त एकच बस आणि ती ही गेली होती. आता सकाळीच बस. दुसरे कुठले वाहन मिळणे
अवघड. शेवटी राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. ती रात्र काही खंडेराव काढू शकले नाहीत.
रात्रीच त्यांचे निधन झाले.
मोठा
झालेला वंशाचा दिवा असा अचानक गेल्याने कृष्णाबाईना फार मोठा धक्का बसला होता.
त्यांना यातून सावरणे खुपच अवघड गेले. “आता दोनच मुली, त्यांची लग्न झाली की त्या
निघून जाणार मग आम्हाला कोण सांभाळणार?” या भीतीने कृष्णाबाई नेहमी चिंतीत
असायच्या. आत्ता त्या तिशीत पोहोचल्या होत्या. त्यांनी निर्णय घेतला एक अपत्य होऊ
द्यायचे.
चवथ्या
अपत्यासाठी कृष्णाबाईना दिवस गेले. पण त्यांच्या मनासारखे काही झाले नाही. चवथी
मुलगी झाली. याचा धक्का त्यांना परत बसला. त्यांनी ते फारच मनावर घेतले. मुलीची व
आईची तब्येत फारशी चांगली नव्हती. अडीच महिने झाले. रात्री कृष्णाबाईना फणफणून एकशे
चारपर्यंत ताप आला. धनेगावच्या वसाहतीतील डॉक्टराना दाखवले. त्यांनी अंबाजोगाईला
नेण्याचा सल्ला दिला. पण परत तीच समस्या बस एकच आणि तीही सकाळी. त्या रात्रीच
कृष्णाबाईंनी प्राण सोडले. मीराताई, हिरा, आणि छोटं पिल्लू ज्याचे अजून नाव पण
ठेवले नव्हते यांचे मातृछत्र हरवले. कुठल्याही लहानग्यांची आई जाणे फारच अवघड असते
पण अडीच महिन्याच्या तान्ह्या बाळाचे आई जाणे म्हणजे फार कठीण. माय मरो आणि मावशी
जगो असं म्हणतात न त्या प्रमाणे बाळाची जिम्मेदारी मावशीने घेतली व ती त्याला घेऊन
आपल्या घरी गेली. पुढे शिकण्यासाठी मीराताईं कळंबला काकांकडे गेल्या.
एक
दिवस मावशी लहान बाळाला घेऊन सावरगावला आली. ती थोडी अस्वस्थच होती.
“या
पुढे नाही सांभाळता येणार मला.” तिने घरातील सर्वाना सांगितले.
किसनराव
व मारोतीराव समोर मोठाप्रश्न उभा राहिला. लहान लेकराला सांभाळणे खूप कठीण होते.
शेवटी मीराताईनां कळंब हून परत बोलावण्यात आले. त्या दिवसापासून १३ वर्षाच्या
मीराताई अडीच महिन्याच्या बाळाच्या आई झाल्या. स्त्रियांमध्ये हे मातृत्व जन्मतःच
असते असं मला वाटते.माझी भाच्ची, शिशुशाळेतील अनेक मुली ज्यावेळी त्यांच्या
बाहुल्यांच्या आई होऊन, अगदी आई प्रमाणे वागतात त्यावेळी हे खूप जाणवतं. बाहुलीची
आई होणं आणि खऱ्या बाळाची आई होणं, यात खूप फरक आहे. पिल्ल्याला सकाळी उठल्यापासून
त्याची शी-शु,स्नान, दुध पाजणे , त्याचे कपडे घालणे,जोजावणे,झोपवणे या सर्व गोष्टी
मीराताई खूप तत्परतेने करत होत्या. या सर्वाबरोबर त्या घरच्या सर्वांचा स्वयंपाक
आणि तो ही चुलीवर करत असत. इनामदारांच्या घरात अनेक लोकांचे येणे जाणे. त्यांची
व्यवस्था सगळ सगळ मीराताई खूप शांत पणे करायच्या. घरात दुसरं कुणी बाई माणूस नव्हते.
खूप कष्टानी ताई घर सांभाळत होत्या. मैत्रिणीबरोबर भातुकलीचा खेळ खेळण्याचे
त्यांचे वय, पण त्या वास्तवातील गृहिणीचे व आईचे काम करत होत्या.
किसनरावांना
अनेकांनी दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. तीन तीन मुली त्यांचे कसे होणार? मोठा
प्रश्न होता. आजोबा मात्र याच्या विरोधात होते. त्यांची दोन लग्ने झालेली.
त्यामुळे वास्तवाचे चटके त्यांनी सोसले होते. किसनरावांनी काही दुसरे लग्न केले
नाही.रात्री लहान बाळाला झोपवणे खूप कठीण काम. आजोबा व मीराताई यांच्या मध्ये लहान
बाळ असे. मध्येच ते श्वास कोंडून रडत जागे होई. दिवसभर खूप अंग मेहनत करून झोपलेल्या
मीराताईंना आजोबा उठवत. मग त्या त्याला
पाणी पाजून थोडे मांडीवर घेऊन थोपटून शांत करत.
दिवसांमागून
दिवस जात होते. त्या दिवशी मामी सावरगावला आली होती. आज मीराताईंना खुपच काम पडले
होते. मीराताई, मामी व लहान बाळ आज सोबत झोपले होते. सर्वांना गाढ झोप लागली होती.
नित्याप्रमाणे मीराताई सकाळी उठल्या. काही वेळानी त्या बाळासाठी दुध घेऊन आल्या.
दुध चमच्याने भरवण्याचा त्या प्रयत्न करत होत्या पण बाळ काही दुध पीत नव्हते.
त्याच्या तोंडातून ते बाहेर पडत होते.
मीराताईंनी
आजोबांना हाक दिली. आजोबा लगेच आले. त्यांनी बाळाला पाहिले. त्यांना समजायचे ते
समजले होते. बाळ शाश्वत निद्रेत गेले होते. एक दीड वर्षाच्या काळात मीराताईंनी तीन
मृत्त्यू पहिले होते. प्रचंड दुःख सहन केल्यावर व खूप अनाहूत संकटांना सामोरे
गेल्यावर न डगमगता सामोरे जाण्याची वृत्ती माणसांमध्ये निर्माण होत असावी. तो मग
प्रत्येक गोष्टीला अगदी धिटाईने न डगमगता हसतहसत तोंड देतो. ते हास्य त्यांचे नित्याचे
बनते. कितीही पैसे देऊन हा अलंकार आपल्याला बाजारात मिळत नाही. ते जीवन संघर्षाचे
बक्षीस असते. मीराताईंच्या चेहऱ्यावरील हास्य व त्यांची निडर वृत्ती मला नेहमी
अचंबित करते.
वयात
आलेली मुलगी म्हणजे पहिल्यांदा तिचे लग्न लाऊन देणे ही त्यावेळची जगरहाटीच होती.
त्यात आई नसल्याने अधिकच चिंता. धनेगाव धरणावर शामसुंदर देशपांडे नावाचा एक चांगला
अविवाहित तरुण आला होता. मीराताईंच्या वडिलांना मुलगा चांगला वाटला. मीराताईचे
लग्न त्यांच्या पंधराव्या वर्षी शामसुंदर देशपांडेशी झाले. वर्षभरात त्यांना किरण
हा पहिला मुलगा झाला. या सर्वात मीराताईंची मनातून असलेली शिकण्याची इच्छा मात्र
अपूर्णच राहिली. यासर्व प्रवासात मात्र त्या एक खूप चांगल्या गृहिणी व आई झाल्या
होत्या. किरण थोडा मोठा झाल्यावर मात्र त्यांनी दहावीची परीक्षा १७ नंबरचा फॉर्म
भरून व स्वतः घर सांभाळत अभ्यास करून दिली. त्या दहावी पास झाल्या. पुढे D.Ed
करण्याची इच्छा होती पण घर सांभाळणे पण गरजेचे होते. याच काळात SP काकांची (
मीराताई चे पती) बदली माजलगावला झाली. वैद्य काकांचे ते मित्र त्यामुळे आम्ही
त्यांना काका म्हणायचो. त्यांना माजलगावला असताना स्वप्नाली झाली. वडिलांच्या
निवृतीनंतर त्यांची जबाबदारी पण मीराताईंनी घेतली. घरात सासू,सासरे व वडील असे तीन
वृद्ध लोक,मुलं व काकांची चोख व्यवस्था ताई ठेवायच्या.
मीराताईंनी यातून वेळ काढून त्यांनी
बालशिक्षणाचा एक अभ्यासक्रम पूर्ण केला. काही तरी करण्याची त्यांची इच्छा होती.
अगदी मुलींच्या शाळेत मधल्या सुट्टीत खाऊ विक्रीची व्यवस्था पण त्या करण्यास तयार
होत्या. कोणताच संकल्प पूर्ण होत नव्हता. मुलं पण आत्ता मोठी झाली होती.
अंबाजोगाईत
प्रबोधिनीचे काम सुरु केल्यावर विवेक कुलकर्णी सर अंबाजोगाईत आले होते. त्यांनी
अगदी माझे दिवसातील मिनट आणि मिनिटांचे नियोजन करून दिले त्याच बरोबर जागेच्या
वापराचे. दुपारी ११ ते २ मध्ये जागा मोकळी असायची कारण त्या काळात गावातील मुलं
शाळेत असत. काय करावे या काळात? माझ्या समोर मोठा प्रश्न होता. याच काळात मला कळले
की गणेश पिंगळे सरांच्या पत्नीने ज्ञान प्रबोधिनी,सोलापूरचा शिशु अध्यापिका
अभ्यासक्रम केलेला आहे. माझे विचार चक्र चालू झाले. चला या काळात बालवाडी सुरु
करावी. पिंगळे ताईंशी या बाबत बोलणे झाले पण त्यांना शक्य नव्हते. मग चोथवे
काकूंना विचारले पण त्या आधीच एका बालवाडीत शिकवत होत्या. शेवटी लतामावाशीने मीराताईंच्या
नावाचा प्रस्ताव माझ्या समोर ठेवला. मी लगेच तो स्वीकारला, कुठलेही कागद पत्र न पाहता.
माझा विश्वास त्या कागद पत्रापेक्षा व्यक्तीच्या कार्यावर जास्त आहे.
लतामावशी
बरोबर मीराताईंनी शिशुविहारची सुरुवात केली. २५ मुलांचा गट घेण्याचे ठरले. काही
दिवसातंच त्या मुलांच्या लाडक्या झाल्या. त्यांच्यात दडलेल्या सुप्त शक्तीला
प्रबोधिनीच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ मिळाले. थोड्या दिवसांमध्ये शिशुशाळेला
अंबाजोगाईच्या बालशिक्षणात लौकिक मिळाला. दुसऱ्यावर्षी चोथवे काकू आल्या. मुलांची
संख्याही वाढली. आता शिशुशाळेत २५० मुले आहेत. मीराताईंचा मुलगा अमेरिकेत मोठा
इंजिनिअर आहे. मुलीचे लग्न होऊन तिला मुल झाले. ताई आता आजी झाल्या आहेत. दम्याचा
खूप त्रास असून सुद्धा शिशुशाळा व प्रबोधिनी म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्या नित्य
जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे. त्यांनी प्रबोधिनीची द्वितीय प्रतिज्ञा घेतली.
जीवनाचे बरेच अनुभव घेतलेली व संकटांशी दोन हात करत जीवन संग्राम करणारे सहकारी
सोबत असले की काम अधिक सुखद होते.
दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवन भर अविचल चलता है ............
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा