शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५

व्यापक विश्व आणि विश्वास असणारा प्रशांत !!



सातारा जिल्ह्यातील वाई एक आगळे वेगळे गाव. कृष्णेच्या काठी वसलेले हे छोटे गाव अनेक थोरामोठ्यांची जन्मभूमी किंवा कर्मभूमी.गावाला धार्मिक,ऐतिहासिक आणि सामजिक पार्श्वभूमी. मराठी विश्वकोशाचे जनक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वाईचे. त्यांच्या घरापासून आठवे घर हे पांडुरंगराव दिवेकरांचे. पांडुरंगराव व त्यांची पत्नी नीताताई दोघेही शिक्षक.स्त्री शिक्षण संस्थेचे ते लाईफ मेंबर होते. वाई हे सामाजिक गाव. स्वतःच्या पलीकडे जाऊन काम करणे हे गावाचा उपजत स्वभाव आहे. तेथील घाटांची स्वच्छता करणे किंवा कृष्णामाईचा उत्सव असेल त्यात मंडप उभारण्या पासून जेवणावळी वाढण्या पर्यंत सर्व काम खूप तळमळीने करणे हे गावातील प्रत्येकाला वाटे.त्यामुळे नकळतच येथील लहानांपासून थोरांवर  स्वतःच्या पलीकडे जाऊन व्यापक विचार करण्याचा संस्कार होत असे. दिवेकरांचे कुटुंब असेच एक व्यापक विचार करणारे होते. पांडुरंगरावांचे वडील डॉक्टर. आपला पेशा त्यांनी व्यवसाय म्हणून न करता सेवा म्हणून केला तर नीताताईंचे वडील स्वातंत्र्यसैनिक अनेक चळवळीत त्यांचा सहभाग होता. प्रशांत दिवेकर या कुटुंबातील मोठा मुलगा.

लहान वयापासूनच कुटुंब,परिसर आणि शाळेचा व्यापक विचार करण्याचा संस्कार प्रशांतवर झालेला होता. शाळा राष्ट्रीय विचारांची होती. शाळेत पाठ्यपुस्तकं अतिशय तळमळीने शिकवणारे शिक्षक होते तसेच देशभक्ती आणि सामाजिक कामाचे संस्कार देणारे शिक्षक पण होते. गावातून पूर्णवेळ राष्ट्र कार्य करण्यासाठी जाणाऱ्या तरुणाचा आदर्श प्रशांत समोर होता. तो पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर जायचा. अनेक गणमान्य व्यक्ती त्याच्या घरी यायचे. प्रशांतच्या आईचे वडील बेळगावचे. ते कडवे काँग्रेसी होते. तसेच ते चांगले उद्योजक होते. अनेक संस्थाना देणग्या ते देत असतं. प्रशांतची मावशी अपंग होती. ती अपंग संघटनेची काम करायची. तिच्याबरोबर अनेक ठिकाणी प्रशांत जायचा. लहान वयातच प्रशांतचे भावविश्व व्यापक बनत होते.

महाविद्यालयात असताना त्याने विज्ञान शाखा घेतली. दिवस आनंदाचे होते. भरपूर खेळणे आणि प्रचंड वाचन करणे हा प्रशांतचा स्वभाव बनला.कथा कादंबऱ्या पासून ते तत्त्वज्ञानाचे ग्रंथ असे चौफेर वाचन त्याचे होते. अर्थात त्यामुळे त्याचे विचार विश्व खूप व्यापक बनले. वाईच्या सार्वजनिक ग्रंथालयाचा पुरेपूर वापर त्याने करून घेतला होता. हिंदू वसंत व्याखानमाला,कृष्णा माईचा उत्सव यातील व्याख्याने यामुळे अनेक दिग्गज माणसांचे दर्शन त्याला होत होते.पदवीचे शिक्षण चालू असतानाच महाविद्यालयातील शिक्षक होण्याचे विचार प्रशांतच्या मनात दृढ होत होता.घरातले वातावरण पण त्याला अनुकूलच होते.

पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर प्रशांतने B.Ed. केले व पुढे M.Ed करण्यासाठी तो पुण्यात आला होता. सकाळीच महाविद्यालय असल्याने दिवसाचा बराच वेळ मोकळा मिळायचा. भरपूर भटकंती पण त्याने या काळात केली. त्याचे वडील आणि ज्ञान प्रबोधिनीचे माधवराव देशपांडे हे एकमेकांचे परिचित. माधवराव त्यावेळी औषधी वनस्पतीचा एक प्रकल्प प्रबोधिनी तर्फे राबवत होते. प्रशांतचा वनस्पतीशास्त्राचा अभ्यास चांगला होता. वडिलांनी प्रशांतला प्रबोधिनीत माधवरावांना संपर्क करण्यास सांगितले आणि त्याचे प्रबोधिनीत येणे वाढले. वेल्ह्यात असो की सिन्नरला तो माधवरावांच्या बरोबर जायचा. असेच एकदा तो ग्रामविकसन कार्यालयात बसला असताना ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे प्राचार्य श्री विवेक पोंक्षे तिथे आले होते.माधवरावांनी प्रशांतची ओळख पोंक्षेसरांशी करून दिली.

“बघा विवेकराव हा तरुण M.Ed. करतोय. तुम्हाला शिक्षक म्हणून हवा आहे का ?चांगला उमदा पोरगा आहे !!” माधवराव पोंक्षेसरांना म्हणाले.

सरांनी लगेच एक अर्ज करण्यास सांगितले. त्यानंतर दोन महिन्याने एक पत्र प्रशांतला मिळाले. प्रत्यक्षात ते पत्र दोन महिने आधीच पाठवलेले होते व शिक्षक पदाच्या भर्ती साठीचे होते. प्रशांतने थेट प्रबोधिनी गाठली. त्याने झालेला प्रकार सांगितला. पोंक्षे सरांनी प्रशांतला दादा नवाथेनां भेटण्यास सांगितले. दादांनी चक्क दोन तास प्रशांतशी गप्पा मारल्या. त्यात प्रचलित शिक्षकाच्या मुलाखती सारखे काहीच नव्हते.त्या गप्पा चौफेर होत्या. दोन दिवसांनंतर शिक्षक प्रशिक्षणाला येण्याचा निरोप प्रशांतला मिळाला व प्रशांत शिक्षक म्हणून प्रबोधिनीत रुजू झाला.  

तत्त्वज्ञान, विज्ञान, राजकारण, समाजकारण यात पराकोटीच्या विवेकाने वावरणाऱ्या विवेकराव पोंक्षेनी आपल्यातील माणूस कधीच मरू दिला नव्हता. त्यांचा वावर तसा सर्वत्र. तसे त्यांचे आप्त ही सर्वत्र. त्यांच्या ह्या सर्व दूरू संचाराने अनेकांशी आत्मिक नाते सरांचे  निर्माण झाले होते. वाड्या, वस्ती,तांड्यातील अंत्यज व गिरीजनांपासून विकसित देशातील ज्ञानवंताच्या पर्यंत हा सर्व नात्यांच्या भावबंध होता.ज्ञान प्रबोधिनीच्या प्रशालेचे ते प्राचार्य असले तरी प्रत्येक शिक्षकाचे ते अभिमित्रच होते.प्रशांत विवेकसरांच्या सहवासात रमू लागला. संपर्क,सहवास आणि सामूहिक कृतीतून शिक्षण हे तो प्रत्यक्ष अनुभवत होता. प्रशालेतील प्रज्ञावंतांचे शिक्षण ते ग्रामीण भागातील प्रज्ञावंत विद्यार्थी शोधून त्यांच्या विकासासाठीची ग्रामीण प्रज्ञा विकास योजना अशा दोन्ही ठिकाणी प्रशांत रमू लागला. शाळेतील पहिला दिवस मजेदार होता.प्रशांतचा विषय होता विज्ञान आणि प्रत्यक्षात त्याला शिकवण्यासाठी गणित विषय दिलेला. पोंक्षेसरांना त्याने हे सांगितले. त्यावर हसून ते म्हणाले,

“ शिकवायला लाग, तुला जमेल नक्की.”

पुढे हळूहळू तो अनेक विषय शिकवू लागला.फार दीर्घकाळ तो प्रबोधिनीत शिकवेल असे त्याला वाटत नव्हते. स्टेपिंग स्टोन सारखा प्रबोधिनीतील अनुभव त्याला उपयोगी पडेल असेच त्याला वाटत होते.

काळाच्या पोटात मात्र काही तरी वेगळेच लिहिलेले होते. पोंक्षेसर,प्रियाव्रत देशपांडे, अजय शेलार यासर्वांच्या बरोबर दिवाळीच्या सुट्टीत प्रशांत २५ दिवसांचा अभ्यास दौरा करण्यासाठी ईशान्य भारतात निघाला. हा अभ्यास दौरा त्याच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी देवून गेला.या काळात तो जे काही प्रबोधिनीत बोलले जात होते तो ते प्रत्यक्ष अनुभवत होता. सोबतच्या व्यक्तींशी त्याचे दृढ नाते निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्याच सोबत ईशान्य भारताशी पण.शिक्षण म्हणजे काय हे त्याला हे त्या दौऱ्यात कळले. इतर कुठे तो शिक्षक झाला असता तर चांगला पाठयपुस्तक शिकवणारा शिक्षक झाला असता. आता मात्र प्रत्येकात दडलेलं पूर्णत्व व्यक्त करणे हे म्हणजे शिक्षण असे तो शिकत होता. पोंक्षे सरांच्या व्यक्तिमत्वाचा चांगलाच प्रभाव प्रशांतवर या काळात घडला.१९९९ सालचा हा दौरा प्रशांतच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा ठरला.

तीन वर्षे प्रबोधिनीत शिक्षक म्हणून काम केल्यावर आदिवासी विकास विभागाच्या एका आश्रम शाळेसाठी असणाऱ्या पात्रता परीक्षेत तो उतीर्ण झाला. प्रत्यक्ष बोलावणे येईल असे वाटत नव्हते. शासनाचा सावळा गोंधळ असतो. कॉल आल्यावर वडिलांचे मत होते की भीमाशंकरच्या डिंबे येथील आश्रम शाळेत रुजू व्हावे. आर्थिक सुरुक्षितता असावी असे त्यांचे मत होते. शनिवार रविवार प्रबोधिनिसाठी द्यावेत आणि इतर वेळ आश्रमशाळेत शिकवावे. वडिलांचा प्रभाव बराच प्रशांतवर होता.त्यांच्या मनाविरुद्ध काही करण्याची इच्छा त्याची अजिबात नव्हती. शेवटी त्याने आश्रम शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. तिथल्या अकरावी बारावीच्या विद्यार्थ्याना तो शिकवू लागला.

तीन वर्षे तो आश्रम शाळेत शिकवत होता. रविवारी काही झाले तरी तो पुण्यात यायचा. पोंक्षेसर, मिलिंद नाईक, प्रवीण पायगुडे,शिवाजी कोंडे या प्रबोधिनीतील त्याच्या मित्रांशी नाळ मात्र तुटली नव्हती.याच काळात स्वामी विवेकांदांची स्मृती शताब्धी होती. आपल्या प्रबोधिनीतील मित्रांच्या सोबत प्रशांतने भीमाशंकर भागात अनेक व्याख्यानांचे आयोजन केले. तो परिसरातील अनेक शाळेत पण जाऊ लागला होता. याच काळात त्याच्या मनात एक विचार अनुभवाने पक्का होत होता.शिक्षणात काही करायचे असेल तर शासकीय रचनेत काम करायला मर्यादा आहेत.त्यात त्या विभागाचा कारभार प्रचंड भ्रष्ट. याच काळात लग्नाचा विचार पण चालू होता. परत प्रबोधिनीत जायचे म्हंटले तर कमी पगार मिळणार. त्या पगाराला स्वीकारेल अशाच मुलीशी लग्न करणे योग्य होते. याच काळात वडिलांचे निधन झाले. आता आईला प्रबोधिनीत काम का करायचे हे पटवून देणे सोपे होते. शेवटी प्रशांत परत प्रबोधिनीत आला.आश्रम शाळेत असताना पण त्याचे शिकवणे प्रभावीच होते. पण प्रबोधिनीत असलेल्या शिक्षणाची विविधता. कामात मिळणारे नवनवीन अनुभव आणि मुख्यतः कामासाठी मिळणारे स्वातंत्र्य हे खूपच प्रशांतला भावणारे होते.प्रबोधिनीत तो विविध विभागांच्या कामात तो सहभागी होत असे.

प्रबोधिनीच्या शाळेत अनेक शिक्षक येतात. काही काळ काम करतात.चांगल्या पगाराची नौकरी मिळाली की ते निघून जातात. प्रशांतच्या बाबतीत नेमकं उलटे घडत होते. तो चांगल्या पगाराची नौकरी सोडून परत प्रबोधिनीत आला होता. याचे कारण समजून घेताना दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एक म्हणजे त्याला भावलेली प्रबोधिनीची सतत नवीन काही तरी करत राहण्याची उर्मी आणि त्यासाठी मिळणारे स्वातंत्र्य आणि दुसरे म्हणजे दोन्ही आजोबांच्या  साधेपणाचा संस्कार. त्यामुळे तो केवळ प्रबोधिनीत परत आलाच नाही तर प्रचंड ताकदीने त्याने काम करायला सुरुवात केली.

मुलांचे अनेक अभ्यास दौरे काढण्यास सुरुवात केली. विद्याव्रत संस्काराच्या कामात तो हिरीरीने सहभाग घेवू लागला. ग्रामविकसनच्या कामात पण तो प्रासंगिक सहभाग घेवू लागला. अनेकांना प्रबोधिनी तो दाखवू लागला. छात्र प्रबोधन मधील काम असे अनेक ठिकाणी तो सहभागी होऊ लागला.याच काळात त्याचा आत्मविश्वास पण कमालीचा वाढला. गरज पडली तर मोठी आर्थिक कमाई करण्याची क्षमता त्याची आता झाली होती. विद्यार्थ्यांना शिकवणे या सोबतच तो पोंक्षेसरांच्या बरोबर तो शिक्षक प्रशिक्षण घेण्याचे काम करत होता. शिक्षकाचे प्रशिक्षण किती महत्वाचे आहे हे त्याला आश्रम शाळेतील अनुभवा नंतर लक्षात आले होते. एकुणात प्रशांतचे व्यक्तिमत्व सर्व स्पर्शी होत होते. 

ज्ञान प्रबोधिनी,सोलपुरच्या प्रशालेत आता एका प्रमुखाची नितांत गरज होती. त्यासाठी म्हणून प्रशांतला जबाबदारी देण्यात आली. प्रमुख म्हणून त्याने दोन वर्षे चांगले काम केले. मुलगा मोठा झाल्यावर त्याला परत येणे गरजेचे होते. परत आल्यावर तो तीन दिवस शाळेत शिकवायचा आणि तीन दिवस शिक्षक प्रशिक्षांचे काम करायचा.याच काळात त्याची संघटनात्मक घडण पण होत गेली. त्याने प्रबोधिनीची तृतीय प्रतिज्ञा पण घेतले.विद्याव्रत संस्काराच्या शिबिरांच्या तो मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याने त्यातील मर्म आणि प्रबोधिनीचे मर्म त्याला समजू लागले होते.

आजच्या घडीला त्याने प्रबोधिनीच्या माध्यमातून व अनेक सहकाऱ्यांच्या सोबत  २५ एक हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे.जवळपास पन्ना संस्थाशी त्याच्या संपर्क आलेला आहे.दोनशेच्या वर शाळेत तो प्रशिक्षणासाठी जाऊन आलेला आहे. जवळपास आठ राज्यात त्याने काम केले आहे.एक विद्यार्थी म्हणून सुरु झालेला प्रशांतचा जीवन प्रवास एक शिक्षक प्रशिक्षक म्हणून विस्तारट गेला. त्याला भविष्यात ज्ञान प्रबोधिनीचे संचित विचारत नेण्याची आस आहे.

ज्ञान प्रबोधिनीचा अन्यराज्यात विस्तार व्हावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. तामिळनाडूचा शिलेदार आहे प्रशांत जोरदार काम चालू आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: