बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०

इस्रायल....!!

प्रकरण १

शेवटी आमचे इस्रायला जायचे ठरले.....

खूप शिकावे व भरपूर पैसे मिळवण्यासाठी परदेशात जावे असे समजत्या वयात वाटत होते. पुढे परदेशात शिकण्यासाठी जावे व त्यासाठीचे प्रयत्न पण झाले. असे स्वप्न पाहत असतानाच आयुष्याची दिशा बदलली. अमेरिकेचा तो अरुणाचलचा कधी झाला हे कळलेच नाही. वर्षभर कन्याकुमारी व त्यानंतर चार वर्षे अरुणाचल असे भारतातील अगदीच नयनरम्य भागात राहणे झाले.

 कन्याकुमारीतील खवळणाऱ्या अथांग महासागरातून हिरण्मयाचे आरोहण प्रचंड उर्जा देऊन जायचे. रात्री दर्याच्या आलापात झोप कधी लागायची ते कळायचे पण नाही. भारताचे दक्षिण टोक ते अगदीच भारताचे ईशान्य टोक; आसमंतात प्रचंड बदल होता. अरुणाचा उदय होत असताना सोनेरी होणाऱ्या हिमालयाच्या डोंगररांगा. हिरव्यागार घनदाट अरण्याच्या अपार शांततेला आपल्या निखळ आणि मंजुळ नादाने अनोख्या भावविश्वात नेणाऱ्या प्रचंड वेगाने वाहणाऱ्या सरिता.इतरत्र सगळा भारत सकाळच्या साखर झोपेत असताना अरुणाचलात मात्र आदित्य सर्वांनाच कार्यप्रवण करण्यासाठी आपला आविष्कार सर्वदूर करत आसमंत उजळून टाकतो.प्रत्येक दिवस नवीन अनुभव आणि अनुभूतीचा.

 

देखणा निर्सग व कामाचे प्रचंड आव्हान यात स्वत्व हरपून जाई. कुठले इतर खास पर्यटन करण्याची गरजच भासली नाही. अरुणाचलहून अंबाजोगाईला परतलो ते अभ्यास व कामात इतका बुडून गेलो की माझे विश्वच अंबाजोगाई व परिसर होता. प्रत्येक छोटे मूल व माणूस यांना समजून घेत मेंदूच्या अपार विश्वात ते अनुभवविश्व एक नवीनच गाव निर्माण करत होते. काही तरी करून दाखवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती व दररोजचे काम करण्यासाठी लागणाऱ्या अगदीच काही रुपये मिळवण्याची धडपड. कार्यक्षेत्र सोडूनचे जग खूप सुंदर असते,खूप विकसित असते, नव्यानव्या भव्य आविष्काराने सजलेले असते असे स्वप्न पण कधी पडलेच नाही.

 

सकाळच्या न्याहारीच्या वेळी सुनीलजी गोयल सहज म्हणाले,

 

‘‘ प्रसादजी आप परदेस गये है क्या ?’’

 

‘‘नहीं भाईसाब. अपने पास समय ही कहाँ है ?’’

 

‘‘जायचे असेल तर कोणत्या देशात जाणे पसंत कराल ?’’

 

क्षणाची पण उसंत न घेता म्हणालो, ‘‘ इस्त्रायल !!’’

 

‘‘अरे तुमचा आणि माझा आवडता देश तर एकच निघाला !!’’

 

पुढचे तासभर आम्ही इस्रायलच्या गप्पात पूर्ण बुडून गेलोत. कन्याकुमारीच्या प्रशिक्षणात आम्हाला दाखवलेला Victory at Entebbe हा चित्रपट आणि त्यानंतरची गट चर्चा. यातून इस्त्रायलशी अपार सख्य जुळले.

सुनीलजी म्हणजे मुलखावेगळा माणूस. त्यांच्या विचारांचा आणि क्षमतांच्या ताकदीचा सहजासहजी अंदाज येणे अशक्य.

 

‘‘ मग ठरवले आपण मिळून पुढच्या वर्षी इस्रायलला जायचे .तुम्ही पासपोर्ट काढून घ्या.’’ बोलण्याचा शेवट करत सुनीलजी उठले. मी हसत त्यांना निरोप दिला व आपल्या दररोजच्या कामात मशगुल झालो.

अचानक एके दिवशी सुनीलजींचा फोन, ‘‘पासपोर्ट तयार है क्या ?’’

 

‘‘अरे भाईसाब आप तो भारी मजाक करते है I मेरे जैसा फटीचर आदमी थोडे ही विदेश जा सकेगा ?’’ मी सहज बोलून गेलो.

 

‘‘अपने को न मार्च में निकलना है ।मैंने तिकीट तो निकाल दिया I आप जल्दीसे पासपोर्ट निकालो I समय कम है अपने पास I’’ सुनीलजी इतक्या सहजतेने बोलत होते की जसे काही आम्हाला उठून जवळपासच्या गावात मित्राला भेटायला जायचे आहे.

 

मी मात्र पार उडालो. मला यावर काही बोलताच येत नव्हते. स्वतःच्या भावनांचा आणि विचारांचा अजिबात अंदाज येत नव्हता. मी पासपोर्टच्या कामाला लागलो त्याचसोबत त्या चिमुकल्या अस्तिवाच्या परंतु अफाट कर्तृत्वाच्या देशाचा अभ्यास करण्यात पुरता गढून गेलो.आम्ही चांगले महिनाभर तिथे राहणार होतो. सगळा अभ्यास करून नियोजन करण्याचे काम माझ्यावर होते तर इतर सगळ्या व्यवस्था करण्याचे काम सुनीलजींनी स्वतःकडे घेतले. अशा प्रकारे शेवटी इस्रायला आमचे जायचे ठरले. सोबतीला होते लातूरचे संजय कांबळे व जालन्याचे सुरेशराव केसापूरकर.

 


प्रकरण २

 

इस्रायल अभ्यास दौरा एक संजीवक आव्हान...

 

इस्रायलची ओळख शाळेत असतानाच झाली. पोटभरेसर नवीनच शाळेत इंग्रजीचे शिक्षक म्हणून रुजू झाले होते. डेव्हिड व गोलियथचा धडा रंगून शिकवताना इस्रायलच्या छोट्या पण बहादूर डेव्हिडशी एक वेगळेच नाते जुळले.ख्रिसमस आला की रेडिओहून प्रभू येशुच्या गोष्टी ऐकायला मिळायच्या. त्यांच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंतच्या गोष्टी ऐकताना इस्रायलची अनेक गावं ओळखीची झाली होती. मुहम्मद पैगंबरांच्या जन्नत'च्या यात्रेची सुरवात जेरुसलेम येथेच झाली.

 

अडॉल्फ हिटलरच्या भयाण छळ छावण्या व त्यात त्यांनी केलेला ज्यू लोकांच्या अमानुष छळाबद्दल वाचताना अंगाचा थरकाप व्हायचा. ६० लक्ष ज्यू लोकांची क्रूर हत्या व त्यातील १५ लाख छोटी मुले. विकृत हिटलरला ज्यू लोकांचा निर्वंश करायचा होता आणि अतिशय क्रूरपणे. आपल्या देशाला हजारो वर्षे पारखे झालेले हे यहुदी बांधव जगभर विखरले. प्रत्येक ठिकाणी त्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. भारतात मात्र त्यांना मिळालेली वागणूक त्यांच्यासाठी वैशाख वणव्यात शरदाचे चांदणे होती. म्हणूनच की काय ते आपल्याला प्रेमाने होदूम्हणजेच प्रिय मित्र म्हणून संबोधतात.

 

पुढे महाविद्यालयात गेलो आणि ओळख झाली अल्बर्ट आईनस्टाईनची. जगात सर्वात बुद्धिमान आणि सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक म्हणून प्रसिद्धी मिळविणारे अल्बर्ट आईनस्टाईनचे मला प्रचंड आकर्षण होते.जगामध्ये केवळ 0.2 % लोकसंख्या असणारे ज्यू २० % नोबेल पारितोषिकाचे मानकरी आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना अनेक असामान्य ज्यू शास्त्रज्ञांशी सख्य जुळले. यासोबतच हॉलीवूडचा स्टीफन स्पीलबर्गचा जुरासिक पार्क पाहिला व त्याच्या प्रेमातच पडलो. एका नंतर एक असे त्याचे चित्रपट पाहण्याचा सपाटा लावला.

एक नाही तर अनेक गोष्टी होत्या ज्यांमुळे माझे व इस्त्रायचे व तेथील ज्यू लोकांशी भावनिक व वैचारिक ऋणानुबंध होते. कन्याकुमारीला गेलो आणि मग तर त्या देशाची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले.

  

इनमिन आपल्या बीड जिल्ह्याच्या दुप्पट क्षेत्र असणारा हा देश जगात आपल्या तेजाने,कर्तृत्वाने,ज्ञानाने व शौर्याने झळाळत आहे. इथला प्रत्येक पुरुष आणि स्त्री हे चांगला योद्धा तर आहेच त्यासोबतच ते चांगले शेतकरी,संशोधक आणि व्यापारी आहेत. भारतासारखाच हजारो वर्षांची परंपरा असणारा मध्यपूर्वेतील हा देश आपल्या भोवताली असणाऱ्या प्रचंड शक्तीशाली राष्ट्रांना पुरून उरतोय. २००६ पर्यंत जन्मलेल्या प्रत्येक माणसाने युद्ध अनुभले आहे तर आताच्या बहुतेक प्रत्येक चाळीशीतील नागरिकांनी प्रत्यक्ष युद्ध लढलेले आहे.

देवाने दिलेल्या आपल्या मधाच्या आणि दुधाच्या भूमीचे अस्तित्वच केवळ ज्यू लोकांनी आपल्या मनात जतन करून ठेवले होते. आपल्या अपार प्रयत्नांनी उरातील स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात आणले. कशी असेल ही मधाची आणि दुधाची भूमी ? कशी असेल डेव्हिड, प्रभू येशुची जन्मभूमी ? खुंखार व जिगरबाज मोसाद या गुप्तहेरांचा हा देश कसा असेल ? भूमध्य समुद्र, तांबडा समुद्र आणि समुद्र सपाटीपासून सगळ्यात खोल असणारा अजब मृत समृद्ध कसा असेल ? वाळवंटात नंदनवन फुलवत जगाला शेतीचे नवे आदर्श दाखवणारा हा देश कसा असेल ? बदामीचे वाळवंट, जॅार्डन नदी व तिबेरीयाचे महाकाय सरोवर व त्यांच्या एका काठाशी असणाऱ्या गोलनच्या टेकड्या कशा असतील ? जगातील सगळ्यात अशांत अशा जेरुसलेममधील आईनस्टाईने स्थापन केलेल्या विश्वविद्यालयात कसे शिकवले जात असेल ? कसे असेल येथील शिक्षण, तरुण आणि राजकारणी ? कसा करत असतील आपल्या आयुष्याचा विचार ? किबुत्झ व मोशावतच्या नव्या सामूहिक जीवनाचा आविष्कार करत मृतप्राय झालेल्या आपल्या हिब्रू भाषेला पुनर्जीवित करत प्रत्येक आव्हानांना सिंहाच्या छाव्यासारखे सामोरे जाणणारे हे बेन इस्रायलींचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे ? अशा अनेक गोष्टी समजून घ्यायच्या होत्या.

 

आमच्या ओळखीचा एकही इस्रायली माणूस नव्हता. प्रत्यक्ष जायचे कसे ? राहायचे कुठे ? कोण मदत करणार ? आमच्या मनात फक्त प्रचंड इच्छा होती की इस्त्रायल समजून घ्यायचा. आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहत व आपल्या बुद्धीने समजून घ्यायचा. कुठलाही सरकारी पाहुणा म्हणून फुकटची सहल अनुभवायची नव्हती. सगळेच काही विचित्र होते फक्त हे घडून आणण्यासाठीची जिकर मात्र प्रचंड वाढत चाललेली होती. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडवायच्या व वाट शोधत आपले साध्य गाठायचे हे मात्र आमच्यात भिनत चालले होते. नैराश्य,भयगंड व भयाण चिंतेच्या पार्श्वभूमीवर माझ्यासाठी इस्रायला अभ्यासदौरा एक संजीवक आव्हान होते.

 

प्रकरण ३

 अनेक अग्निपरीक्षा देत विमान इस्रायलकडे झेपावले....

  स्वप्न पाहणे तसे सोपे असते. एखादे नियोजन करणे पण तसे सोपे असते. प्रत्यक्ष कृती ज्यावेळी सुरु होते त्यावेळी मात्र त्यातील प्रश्न,अडथळे,खाचखळगे समजायला लागतात. असेच काही अगदीच सुरवातीला घडले. माझ्यासमोर सगळ्यात मोठे आव्हान होते पासपोर्ट मिळवण्याचे. कुठलाही शासकीय कागद सहजासहजी मिळणे फारच अवघड. पहिल्यांदाच हे ठरवलेले होते की कुठल्याही दलालाची मध्यस्थी करून कुठलेही काम करायचे नाही. त्यात आम्ही इस्रायलचा अभ्यास दौरा कुठल्याही सहल नेणाऱ्या कंपनीबरोबर नियोजित केलेला नव्हता. त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्वतःला करावयाची होती.

 अंबाजोगाईतील पोस्टऑफिस,रेशनदुकानदार, नगरपालिका,तहसील कार्यालय, न्यायालयपरिसर,पोलीस स्टेशन व शेवटी पोलीस अधीक्षक कार्यालय,बीड अशा सगळ्याच शासकीय कार्यालयात माझ्या चकरा सुरु झाल्या. बीडच्या कार्यालयात पासपोर्टचा अर्ज करण्यासाठी सगळे कागदपत्र जमा करणे एक मोठे जिकीरीचे काम होते तेव्हा. इरादा नेक असेल तर आपको पत्थर भी मदत करता है I इथे तर अंबाजोगाई व बीड येथील आपली माणसे. मला इस्रायला जायचे म्हटल्यावर सगळीच कामे फारच गतीने व प्रेमाने झाली. अंबाजोगाई पोलीस स्टेशन वरील शिंदे नावाचे ठाणे अंमलदार तर भारीच माणूस. प्रत्येक भेटीत त्यांनी काम तर केलेच त्यावर प्रेमाने प्रत्येक वेळेस चहा स्वतःच पाजला. शेकडोने असलेल्या झेरोक्स साक्षांकित करण्याचे काम डॉ. प्रसादने मला प्रचंड हसवत केले. माझ्या विद्यार्थी मित्रांनी माझ्या प्रत्येक गोष्टीची तयारी आणि गृहपाठ फारच बारकाईने करून घेतला. पोलीस अधीक्षक कार्यालय,बीड मधील पासपोर्टचे काम करणारे दराडेसाहेब यांनी खूप आपुलकीने काम केले. मी बीडला आल्याची खबर सुधीरमामाला उर्फ अच्युत बाहेगव्हाणकरला कधी कळायची हे मला न उमगलेले कोडे. मी अर्ज दाखल करत असताना तो दत्त म्हणून माझ्यासमोर. त्यानंतर मग मला फारसे काही करावेच लागले नाही. शेवटी एक मुंबईवारी करावी लागली व पासपोर्ट बहाल झाला.

 

आता सगळ्यात मोठा प्रश्न होता व्हिसा मिळण्याचा. इस्त्रायला व्हिसा सहजासहजी मिळणे अवघड. सुनीलजी ते सगळे बघत होते. आम्ही चार जण म्हणजे चार प्रकार. एकत्र येऊन नियोजन करणे फारच अवघड होते. शेवटी एका रात्री ११.३०ला वेळ जुळून आला व आम्ही सोबत बसून सगळे तात्पुरते नियोजन व खातेवाटप केले. बघता बघता जाण्याची तारीख जवळ येत होती.

 

अचानक सुनीलजीचा फोन आला, ‘‘ दादा !! आप काम एक काम तुरंत करना पडेगा I आपके बँक खातेमें एक लाख रुपया जिसमे है उसके पासबुकका स्कॅन कॉपी मुझे भेज देना I’’

 

‘‘भाई साब मै अभी लातूर में हूं I इतनी जादा रकम तो मेरे पास कैसे हो सकती है ?’’

 

‘‘ये तो करनाही होगा I आपके लिये तो ये नामुमकीन नहीं है I मैं आठ बजे तक राह देखता हूं I’’ सुनीलजींचा आदेश.

मला तर तोपर्यंत अंबाजोगाईत पोहोचनेच अशक्य होते. शेवटी मित्र बिपीन क्षीरसागरला व उमेश वैद्यना (काका) फोन लावला व परिस्थिती सांगितली व व्यवस्था करायला सांगितली. त्यांनी काय केले माहिती नाही पण मला आठच्या आत बँकेच्या पासबुकची स्कॅन कॉपी मेल वर मिळाली.

अनेक खिशांचे पांढरे कुर्ते शिवून घेण्यापासून ते अगदीच सामानाची नीट रचना करण्यापर्यंत सगळ्यात या दोघांनी खूपच मदत केली. परळीहून मुंबईस जाणाऱ्या ट्रेनमध्ये एकदाचा बसलो.

 

सकाळी एका हॉटेलमध्ये आवराआवर करून आम्हाला इस्रायलचा दूतावास गाठायचा होते. अजून व्हिसा मिळालेला नव्हता. मागचे तीन महिने खटाटोप करून मी एका विद्यापीठचे निमंत्रण पत्र मिळवण्यात यशस्वी झालो होतो. हैफाच्या रोटरी क्लबच्या एका बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण पण मिळाले होते. रात्रीचे विमान होते. व्हिसा अजून मिळालेला नव्हता. मनात प्रचंड शंका होत्या. इस्रायलच्या दूतावासाच्या बाहेर प्रचंड सुरक्षा व्यवस्था भरपूर तपासण्या झाल्यावर आम्हाला शेवटी प्रवेश मिळाला. तिथल्या अधिकाऱ्यांनी आमची विचारपूस केली. आम्ही काढलेली तिकिटे व निमंत्रण पत्र दाखवली. शेवटी आमच्या हातात व्हिसा पडला.

हे सगळे होईपर्यंत दुपार झालेली होती. आम्हाला इस्रायलचे चलन मिळवण्यासाठी थॅामस कूकचे कार्यालय गाठायचे होते. व्हिसा दाखवल्यावर आम्हाला केवळ प्रत्येकी एक हजार शकेल एवढीच रक्कम मिळाली. त्यापेक्षा जास्त मिळणे शक्य नव्हते. मोठा प्रश्न होता. चांगलेच महिनाभर राहणार होतो. चार हजार शकेलने काय होणार होते. काहीच मार्ग नव्हता. भारतात फोन करण्यासाठीचे कार्ड आम्हाला तेथून मिळाले. पोटात थोडं फार टाकून आम्ही आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघालो.

आम्ही निवडलेली विमानसेवा पण इस्रायली होती. EA-LA चे इस्रायली विमानसेवेचे नाव. जगात सर्वात उंचावरून उडणारे हे प्रवासी विमान. पूर्ण प्रवास समुद्रावरून कारण आखाती देशावरून इस्रायली विमान उडण्यास बंदी होती. सलग आठ ते नऊ तासांचा प्रवास. त्याआधी सगळ्यात अवघड म्हणजे आमची सुरक्षा तपासणी. प्रचंड अस्वस्थ करणारी ती अग्निपरीक्षाच असते. आम्ही विमानतळावर वेळेत पोहोचलो. सुरक्षा तपासणीसाठी जाताना माझे विमानाचे तिकीट मी शोधू लागलो. अगदीच सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. पण मला नेमके आता ते सापडत नव्हते. अचानक हे काय विपरीत झाले ? मी सगळे सामान तपासात होतो. साथीदार मदत करत होते. तिकीट काही सापडत नव्हते. तोंडचे पाणी पळाले. अस्वस्थता पराकोटीला पोहोचली. विमानाचे तिकीटच नाही म्हणजे डोळ्यासमोर सगळाच अंधकार होता. विमानतळावरील सगळे लोक माझ्याकडे पाहत होते आणि मी अस्वस्थतेने तिकीट शोधत होतो. पंधरा मिनिटांनी जीव भांड्यात पडला. माझ्या व्हिसाच्या पाकिटात तिकिटाचे पाकीट ठेवले गेले होते. धावतच जाऊन सुरक्षा तपासणीसाठी उभा राहिलो.

चौकशी भयानक होती. जवळपास चाळीस मिनिटे आम्हाला वेगवेगळे करून प्रत्येकाला दोनशेच्यावर प्रश्न विचारले. भंडावून गेलो होतो सगळेच. कुठल्याही क्षणी आमच्या उत्तरात काही संशयास्पद आढळले तर आमचे जायचे ते रद्द करू शकत होते. तोंडी तपासणी संपली व मग आमच्या सामानाची तपासणी. प्रत्येक वस्तू बाहेर काढून तपासली जात होती.

माझा संगणक मात्र ते आम्हाला देण्यास तयार नव्हते. जमा केलेली सगळीच माहिती माझ्या संगणकात नीट सुरक्षित ठेवलेली होती. तो आमच्यासाठी फार मोठा दिशादर्शक होता. ज्या शहरांना व स्थळांना आम्हाला भेटी द्यायच्या होत्या त्याची माहिती. तेथील भारतीय लोकांची नावे व फोन नंबर. सगळेच काही त्यात होते. मी प्रयत्न करून सर्वच क्षेत्रातील महत्वाच्या लोकांशी संपर्क केला होता.

आम्ही त्यांना विनंती करत होतो व आमचे सगळेच संपर्क व माहिती त्यातच आहे असे सांगून पण ते तयार होत नव्हते. शेवटी उच्चाधिकारी संगणक तपासून पाहतील व काही अयोग्य वाटले नाही तर पाठवण्यात येईल असे उत्तर मिळाले. जवळपास दोन तास आमची कसून तपासणी झाली. विमान सुटण्याची वेळ होऊन गेली होती. आमच्यामुळे विमानाचे उड्डाण रखडले होते. शेवटी अगदीच धावतच विमान पकडण्यासाठी जावे लागले.

एकदाचे आम्ही विमानात बसलो.सगळे सामान व्यवस्थित ठेवून आम्ही आमच्या जागेवर बसलो.आमची इस्रायलला जाण्याची हौस आता पूर्ण होणार होती. आमच्या पासपोर्टवर इस्रायलाला भेट दिल्याची मोहर म्हणजे आम्हाला अनेक देशात यापुढे प्रवेश बंदी होती. सगळेच काही माहिती असून आम्ही मात्र अगदीच खुशीत होतो. सर्व अग्निपरीक्षा देत आमचे विमान आकाशात उडाले. इस्रायच्या शहरांचे विहंगम दृश माझ्या कल्पना विश्वात रंगवत होतो.

 


प्रकरण ४

इस्रायलच्या भूमीतील पहिला दिवस !!

तसे स्वप्नातच आहोत का असे काही वाटत होते !! इस्रायलला भेट देता येईल हे खरं तर स्वप्न पण कधी पहिले नव्हते. टेन कमांडमेंट्सहा चित्रपट पाहताना मोजेसचे शौर्य आणि त्याची तपश्चर्या मनाला दिव्यतेच्या गर्भगृहात नेणारी होती. इजिप्तच्या सम्राटाचे गुलाम असणारे ज्यू बांधव व त्यांच्यावरील अनन्वित अत्याचार भेदरून टाकणारे होते. भव्यदिव्य पिरामिड्स व तेथील पुरातन शहरे आज जगातील आश्चर्य आहेत पण त्यांच्या निर्मितीसाठी ज्यू बांधवांच्या अनेक पिढ्या उध्वस्त झाल्या होत्या. चित्रपट फारच सुंदर आहे. मांडणी आणि भव्यदिव्य पार्श्वभूमीवरील चित्रीकरण अफलातून आहे. मोजेसने आपल्या बांधवाना गुलामगिरीतून मुक्त केले आणि परत आपल्या दिव्यशक्तीने देवभूमीकडे त्यांना घेऊन गेला. आपल्या दुरावलेल्या मातृभूमीत सामूहिकरित्या प्रचंड मोठ्या संख्येने परतण्याची जगातील ती पहिलीच वेळ होती. ‘Exodus’ असे त्याला म्हणतात व त्या नावाचा चित्रपट खूपच अद्भुत आहे. मरूभूमीतील तीच दुधाची आणि मधाची सुपीक भूमी इस्रायल.

 

उध्वस्त केलेले त्यांचे पहिले पवित्र मंदिर राजा सोलेमाननी परत बांधले. जेरुसलेम मधील त्या पवित्र मंदिराला परत जमीनदोस्त करण्यात आले आणि ज्यू बांधवांची पवित्रभूमी परत अत्याचारी शत्रूंच्या ताब्यात गेली. पुढच्या वर्षी जेरुसलेमला भेटूअसे अभिवादन करत आपल्या पवित्र परंपरेला आणि प्रिय मातृभूमीला त्यांनी आपल्या भावविश्वात जिवंत ठेवले होते.थीओडोर हेर्ट्‌झलने त्यांच्या मनातील या इच्छेला साकार करण्याचे प्रयत्न सुरु केले. सर्व युरोपात राष्ट्रवादाची भावना अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चांगलीच वाढीला लागली होती. जोपर्यंत ज्यू लोकांवर होणारे अन्याय, अत्याचार अस्तित्वात आहेत, तोपर्यंत सामाजिक समरसता अशक्य आहे आणि यावर एकमेव मार्ग म्हणजे बहुसंख्य ज्यूंनी संघटित होऊन स्वतःच्या देशात स्थलांतर करणे हा होय, असे त्याचे मत होते. थीओडोरने द ज्यूईश स्टेटहा ग्रंथ लिहिला (१८९६). त्यात त्याने ज्यूंचा प्रश्न हा सामाजिक वा धार्मिक प्रश्न नाही, तर तो राष्ट्रीय प्रश्न आहे, असे स्पष्ट केले.

 

हिटलर अत्याचार सुरु झाले आणि परत एकदा प्रचंड इर्षेने व अफाट संकटाला तोंड देत ज्यू बांधव आपल्या देवभूमीकडे समूहाने निघाले. स्वतःच्या देश त्यांनी मोठ्या साहसाने,त्यागाने आणि असीम इच्छाशक्तीच्या जोरावर व सामूहिक चतुराईने मिळवला. बेन गुरियन हे स्वतंत्र इस्रायलचे पहिले पंतप्रधान.

हे सगळे आठवत झोप कधी लागली हे कळलेच नाही. विमानातून उताण्यासाठीची प्रवाशांची घाई सुरु झाली आणि जाग आली.

आमचे विमान उतरणार होते बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर. ओह !! परत एकदा सुरक्षा तपासणी. मनात थोडी धास्ती होती. विमानातून उतरलो व प्रवेश द्वारातच बेन गुरियनच्या सुबक आणि सुंदर मूर्तीने आमचे स्वागत केले. माझ्या पासपोर्टवर इस्रायल भूमीत उतरल्याची मोहर लागली. आता मात्र एकदम आश्चर्याचा धक्का बसला. कुठल्याही त्रासाशिवाय किंवा सुरक्षा तपासणीशिवाय आम्ही सुखरूप बाहेर आलो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आम्हाला इस्त्रायली चलन म्हणजे शकेल गरजेपुरते बदलून मिळाले. बहुतेक सगळे सामान आले परंतु माझा संगणक मात्र आलेला नव्हता. विमानतळावर तक्रार केली. "भारतातून तो पाठवला तर आम्ही तुमच्यापर्यंत त्याला नक्की पोहचता करू. काळजी करू नका.तुमचा संगणक सुरक्षित असेल."असे उत्तर मिळाले. ते सगळे ठीक होते पण आता पुढील मार्ग तेवढा सोपा नव्हता. माझ्या मनात कमालीचा अंध:कार होता. खास इस्रायली पद्धतीने आमचे स्वागत केले गेले. आम्ही तेल अवीवला जाणार होतो.

  

विमातळावरील घड्याळ चांगलेच दोन तास मागे होते.अबब !! चांगलेच चार हजार किलोमीटर प्रवास करून आम्ही पश्चिमेकडे आलेलो होतो. अजब वेशातील लोकांनी आमचे स्वागत केले खरे पण हळूहळू पुढे जातो तो लक्षात येत गेले की लोक भरतेच स्वरूप धारण करून आलेले होते. काही तरी विचित्र परंतु कुतूहल वाढवणारे होते. आमची टॅक्सी मर्क्युरी हॉटेलकडे चांगल्याच वेगाने निघाली. तेल अवीव अतिशय आखीव रेखीव व सुंदर नियोजित खास वसवलेले खूप आधुनिक शहर. कित्येक वर्षे ती इस्रायलची राजधानी होती. जसे जसे आम्ही तेल अवीवमधील शहरातून जात होतो तसे अचंबित होत होतो. विविध मुखवटे घातलेले, चित्र विचित्र पोशाख केलेले लोक आम्हाला रस्त्याने जाताना दिसत होते.

 

हॉटेलच्या समोर उतरलो तर हॉटेल बंद होते. मोठ्या प्रयासाने आमच्यासाठी हॉटेलचे दार उघडले गेले. आम्ही आधीच खोलीचे आरक्षण केलेले होते. आता लक्षात आलेले होते की आज ज्यू बांधवांचा आनंदाचा सण पुरीमहोता. त्यामुळे आज सुट्टी व सगळेच लोक वेगवेगळ्या स्वरुपात नटून सण साजरा करत होते.

मस्त न्याहारीतील अनोळखी खाद्य प्रकारांचा आम्ही स्वाद घेत होतो. निवांत पोटभर खाणे दोन दिवसात झालेले नव्हते. पोटपूजा झाल्यावर थोडी विश्रांती व मग आम्ही बाहेर पडलो. रस्त्यांवर शुकशुकाट होता. सगळीच दुकाने बंद होती. आम्ही भारतीय दुतावासात जाण्यासाठी निघालो. दूतावास पण बंद होता. भारतीय पद्धतीने आम्ही मोठ्याने आवाज देऊन कुणी बाहेर येते का ते पाहत होतो परंतु आमचे सगळेच प्रयत्न व्यर्थ होते. संगणक नसल्याने कुणाशी संपर्क पण करता येत नव्हता. शेवटी हतबल होऊन समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलो पण मन काही तिथे रमत नव्हते. एक अफलातून दुकान उघडे दिसले. काही मदत मिळते का ते पाहण्यासाठी तिथे गेलो. ते एका ख्रिश्चन महिलेचे दुकान होते. धातूंपासून फारच सुबक मूर्ती बनवलेल्या होत्या. आमच्यातील दोघे मूर्ती पाहत होते तर मी व सुनीलजी त्या महिलेशी गप्पा मारायला सुरवात केली. आज पुरीम व संध्याकाळपासून उद्या संध्याकाळपर्यंत सबाथम्हणजे इस्त्रायल मधील पवित्र सुट्टी. या दिवशी सगळे ज्यू बांधव सुट्टी घेतात. सगळेच जवळपास बंद असते. आमच्या समोर खूप मोठा प्रश्न उभा !! काय करावे हे समजत नव्हते.

 

हॉटेलवर परतो व सहज मोबाईलचा डेटा चालू करून गुगल सर्च केले. एकदम आनंदात मी सगळ्यांना सांगितले नेट चालू आहे. काही वेळानी मी बंद केले व माझ्या फोन मधील दोनशे रुपये संपले. अवघड होते सारेच असे म्हणत असताना अचानक प्रवीणजी घुगेंचा फोन आला. अरे !! फोन तर येतोय !! मस्त थोडे बोललो व फोन कट झाला. माझे उरलेले तीनशे रुपयांचे बैलेंस सगळेच संपले. परत सगळीकडे शांती.आम्ही सार्वजनिक फोन वरून फोन करण्यासाठीचे कार्ड ( ATM कार्ड सारखे ) विकत घेतले होते पण ते कसे वापरायचे हे मात्र कळत नव्हते. कुणाला विचारणार हा मोठा प्रश्न होता. आम्ही इस्रायल मध्ये सुखरूप पोहोचलो हे पण कुणालाही घरी सांगता येत नव्हते. आम्ही अशांत मनाने शेवटी थोडा वेळ विश्रांती घेण्याचे ठरवले.

 

दुपार अशीच निवांत गेली. अचानक सुरेशराव केसापुरकर एकदम उत्साहात आमच्या खोलीत आले. चला लवकर तयार व्हा !! तुम्हाला एक अजब गोष्ट दाखवतो. त्यांचा उत्साह आणि आनंदाचे कारण काही आम्हाला समजेना. आम्ही सगळे हॉटेलच्या बाहेरील रस्त्यावर आलो तो सगळेच आश्चर्याने एकमेकांच्याकडे प्रचंड आनंदाने पाहत होतो. रडवेल्या झालेल्या संजय कांबळेच्या चेहऱ्यावरील अपार आनंद ओसंडून वाहत होता. आम्ही सगळेच ते दृश्य पाहून मुलखाचे आनंदी झालो होतो. सकाळपासूनची निराशा पूर्णतः संपून ‘‘आनंदाची डोही आनंद तरंग..’’असे काही झाले होते.

 


प्रकरण ५

 होय !! मी तोच मी भारतीय आहे ! ज्यांनी तुमचे साम्राज्य संपवले...

 

आम्ही सगळेच धावतच समोरच्या रस्त्यावर गेलो. समोर पाहतो ते भारतीय साडी नेसलेल्या अनेक स्त्रिया. अगदीच धोतरातील काही पुरुष मंडळी. परकर पोलकं घातलेल्या छोट्या मुली. हातामध्ये टाळ व मृदुंग. मस्त उत्साहात ती सगळी मंडळी नामघोष करत चाललेली होती. अफाट भक्ती व प्रचंड उत्साह प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर होता. प्रत्येकाच्या गळ्यात तुळशीमाळा. काही क्षण आम्ही एकदम ते सगळे अगदीच अवाक् होऊन पाहत होतो. माझ्या तर अंगातून वेगळाच चैतन्याचा संचार झाला. आम्ही सहजच त्यांच्या भक्ती फेरी मध्ये सहभागी झालो. मुखातून नाद घुमू लागला, ‘‘हरे रामा हरे रामा, रामा रामा हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे..!!’’ सकाळपासूनची सगळी निराशा कुठल्या कुठे पळाली होती. आम्हाला आता पुढील महिन्याभरासाठीची हक्काची आपली माणसे मिळाली होती.

 

अर्थात ती सगळी रशियन ज्यू होती व इस्कॉनचे अनुयायी होते. भारतीय नसले तरी आपली परंपरा जपणारे पाळणारे म्हणजे आपलीच माणसं की !! काय कमाल असते ना राव ! त्यांची आमची काही ओळख नव्हती. ते खरंच काही मदत करतील का ? याची कल्पना पण नव्हती फक्त आपल्या परंपरेचे व संस्कृतीचे त्यांचे नाते हे आम्हाला किती आश्वासक आणि आधाराचे वाटत होते. भक्ती फेरीत पत्रक वाटणाराऱ्या एका तरुणाशी दोस्ती केली. संध्याकाळी सत्संगाला येण्यासाठीचं आमंत्रण मिळाले. पत्ता व मोबाईल क्रमांक घेतला. चांगलेच दोन तास त्यांच्या बरोबर भक्तीफेरी आणि नामसंकीर्तन झाले. भारतात असताना असे कधी केले नव्हते !!

त्यानंतर मात्र बराच खटाटोप व प्रयत्न करून कार्डच्या मदतीने भारतात फोन लावण्याचा प्रयत्न सफल झाला. आईला आम्ही सुखरूप पोहोचलो हे कळवले. सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी आपली खुशाली कळवली. फार मोठा प्रश्न सुटला होता. संध्याकाळी आम्ही सत्संगाला निघालो. मनात खूप आशा होती की आता सगळेच मार्ग मिळणार !!

 रात्रीच्या प्रकाशात आम्ही काही काळ चालतच निघालो. तेल अवीवच्या दक्षिणेचा अतिशय जुन्या काळातील वसाहत म्हणजे जाफा. हिब्रू मध्ये त्याचा उच्चार होतो याप्फो !! परिसरातून जाताना जुन्या बायबलच्या गोष्टींच्या विश्वात मी जात होतो. गंमत म्हणजे ज्यू,ख्रिश्चन व मुस्लीम यासर्वांचा पितामह म्हणजे इब्राहीम किंवा अब्राहम. तो ईश्वराचा देवदूत म्हणून त्याला तिन्ही धर्मात मान्यता. जुन्या बायबल मधील खूप मोठा भाग तिन्ही धर्माचा आशय आहे.

 

जाफा भागातील पुरातन इमारती खूप देखण्या होत्या. आज पुरीम असल्याने सुंदर साज रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती. सकाळचे तेल अवीव मला मुंबईपेक्षा वेगळे वाटत नव्हते. आता मात्र खरंच आपण इस्रायल मध्ये आलो असे वाटत होते. जाफा भागाच्या मध्यवर्ती चौकातील घड्याळाचे मिनार १९०६ मध्ये चुनखडीच्या दगडात बांधलेले आहे. तुर्क (उस्मानी) साम्राज्याच्या रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करताना सुलतान अब्दुल हमीद २ ने ते बांधले.ह्या तुर्क साम्राज्याचा शेवट भारतीय सैन्यांनी पहिले महायुद्ध चालू असताना १९१७ मध्ये केला. इस्रायला तुर्क साम्राज्याच्या वज्र मुठीतून मुक्त करणारे जांबाज भारतीय सैनिक होते. ९०० भारतीय सैनिकांनी या युद्धात बलिदान केलेले होते.

 

‘‘होय !! मी तोच मी भारतीय आहे ! ज्यांनी तुमचे साम्राज्य संपवले.’’ असे मनात म्हणत प्रचंड अभिमानाने त्या मिनाराकडे नजर भिडवून पाहत होतो. आज त्याच जाफा मधील एका घरात भक्तिभावाने सत्संग सुरु होता. जबरदस्त चैतन्याचा हुंकार देत शंखनाद झाला व आरतीला प्रारंभ झाले. भगवंताची आरती व प्रवचन झाले. प्रसाद मात्र फारच स्वादिष्ट. एका नंतर एक रुचकर व मधुर पदार्थ समोर येत होते. आम्ही त्याचा मनसोक्त पोट भरून आस्वाद घेतला. चांगलेच पोट भरल्याने आता सुस्ती पण जाणवत होती.

 

 तिथे असणाऱ्या काही बांधवाना आम्ही स्वतःची ओळख करून देत विनंती केली,

‘‘आम्हाला शाळा पाहायची आहे. शेती पाहायची आहे. युवकांना,शिक्षकांना व उद्योजकांना भेटायचे आहे. आम्हाला तुम्ही मदत कराल का ? आम्हाला तुम्ही इस्रायल पाहण्यासाठी समजून घेण्यासाठी कृपया मदत कराल का ? आम्हाला तुमचे मार्गदर्शन हवे आहे.’’

मी एका दमात त्यांना सगळे सांगून टाकले. आम्ही आश्वासक उत्तराची अपेक्षा करत होतो. बहुतेक जण आपले खांदे उडवत व डोळे मिचकावत म्हणत होते, ‘‘ Sorry !! We can not !!’’ मग आम्ही दुसऱ्या बांधवांच्याकडे जात त्याला हरे कृष्ण म्हणून अभिवादन करत !! तो पण खूपच आत्मीयतेने हरे कृष्ण म्हणे. आमचे पुढे प्रश्न विचारून झाले की उत्तर असे, ‘‘Sorry !! We can not !!’’ एकमेकांच्याकडे निराशेने पाहत आमच्यातील दुसरा आपले प्रयत्न सुरु करे !! आम्हाला शेवटी निराशा घेवूनच सत्संगातून बाहेर पडावे लागले. परत जाताना मात्र आम्ही अजिबात एकमेकांना चकार शब्द न बोलता बुध गृहाकडे ( हॉटेल मर्क्युरी) प्रस्थान केले. अगदीच चुपचाप फारसे एकमेकांशी न बोलता शांत झोपी गेलो. प्रचंड थकवा व भरपेट प्रसादाचा स्वाद घेतल्याने कधी गाढ झोप लागली ते कळले पण नाही.



प्रकरण ६ 

ज्यू आहोत ! त्याहीपेक्षा अनंतपटीने आम्ही भारतीय आहोत !!


लहानपणी सकाळी जागे व्हायला गजराच्या घड्याळाची गरजच कधी पडली नाही. आईने सकाळी रेडिओ लावताच आकाशवाणीवरील सुरुवातीची धून लागायची. अतिशय मंजुळ असा तो नाद होता. आज मला सकाळी जाग आली व मी त्या बहारदार नादविश्वात हरवून गेलो. भारतीयांच्या मनावर कित्येक दशके राज्य करणाऱ्या आकाशवाणीच्या signature tuneचे रचनाकार होते वाल्टर कॉफ़मैन. आकाशवाणीच्या त्या भूपाळीने जागे होणारे आम्ही थोडेच होतो. आईचा आवाज आल्याशिवाय ते अशक्य होते. मस्त गुलाबी थंडीतील झोप फारच मनभावन.

हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या सुलोचना त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तुम्हाला आठवतो का राजकपूरचा बूटपॉलिश. त्यातील अंकल डेव्हिड फारच काळजात घर करून बसला होता. पुढे अमोल पालेकरच्या गोलमाल मध्ये तर बहार आणली होती त्यांनी. पंडित नेहरू तर म्हणायचे कुठलाही कार्यक्रम डेव्हिडच्या निवेदनाशिवाय पूर्णच होणे अशक्य !! हो हो तोच तो डेव्हिड अब्राहम चेऊलकर. याच काळात रूपवती नादिरा अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवत होती. पुणे तिथे काय उणे म्हणायचे. पुण्यातील ससून हॉस्पिटल ज्यांनी उभे केले ते डेव्हिड ससून. हो हॉस्पिटल म्हटले की डॉक्टर आलेच. महात्मा गांधीचे खास डॉक्टर कोण असतील बरे ? तुम्हाला माहित नाही नं ? ते होते डॉ. अब्राहम सोलेमन इरुलकर.

वाल्टर कॉफ़मैन, सुलोचना, अंकल डेव्हिड, रूपवती नादिरा, डेव्हिड ससून, डॉ. अब्राहम आपल्या अपार प्रेमाने सांगत होते

" स्वागत आहे मित्रा तुझे ज्यूंच्या पवित्रभूमीत आणि तुझ्या प्रवासासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा !!"

मी परत गाढ झोपीच्या कुशीत गेलो. अचानक समोर एक भारदस्त व्यक्ती पाठमोरी उभी होती. त्याने ऑलिव्ह ग्रीन रंगाचा भारतीय भूदलाचा गणवेश घातलेला होता.त्याने एक जबदस्त गिरकी घेतली. आता तो अगदीच समोर होता माझ्या. ओह !!

 


जनरल जे. एफ. आर. जेकॉब.

 ‘‘हो मला माझ्या ज्यू असण्याचा आनंद आहे त्याहीपेक्षा अनंतपटीने मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे !’’

 १९७१चे युद्ध. ढाका ताब्यात घायचा होता. पाकिस्तानी सैन्य ढाक्याच्या रक्षणाला. जनरल नियाजी त्यांचा प्रमुख होता. ढाक्यात मध्ये २६,४०० पाकिस्तानी सैनिक होते आणि भारतीय सैनिक केवळ तीन हजार आणि ते ही ढाक्यापासून ३० किलोमीटरवर. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉने जनरल जेकॉबला हुकूम दिला,

 " जनरल नियाजीला शरण यायला तू भाग पाडायचे."

 जनरल जेकॉब मोहिमेवर निघाले. हा बहाद्दूर वाघ सरळ नियाजीच्या छावणीत निर्भयतेने घुसला. त्याने सरळ नियाजीला आव्हान दिले,

 ‘‘बिनशर्त जाहीर शरणागतीसाठी तयार हो नाही तर तुमचे हाल खूप भयाण होतील. तुझ्याजवळ केवळ तीस मिनिटे आहेत.’’ अशी जगावेगळे ललकारी आधुनिक इतिहासात आतापर्यंत कुणीच दिलेली नव्हती.

 ‘‘शरणागती अशक्य !! तू काय स्वतः फार मोठा समजतोस का ? पाकिस्तानच्या जनरल नियाजीशी तू बोलत आहेस.’’ नियाजी प्रचंड क्रोधात बोलत होता. त्याचा आवाज चांगलाच वाढला होता.

संयुक्त राष्ट्र युद्ध विरामाची भाषा करत होते. चीन व अमेरिकेचा चांगलाच दबाव होता. यावेळी पाकड्यांंचा असा पराभव करायचा की त्यांच्या पुढील अनेक पिढ्या नुसत्या आठवणीने कापतील.प्रचंड दिलेरी आणि आत्मविश्वास जनरल जेकॉबच्या चेहऱ्यावर आणि आवाजात एक जबरदस्त जरब....ते परत म्हणाले,

 ‘‘जाहीर शरणागती पत्रकावर सही कर. मी तीस मिनिटांनी परत येतो.’’

 नियाजीला घाम फुटला,अंगात कापरे भरली. जनरल ३० मिनिटांसाठी बाहेर आला. आपला सिगार पेटवला. त्याने अतिशय जोखीम पत्करली होती. शत्रूच्या गुहेत घुसून त्याला शरण ये म्हणून सांगण्याचे जबर आव्हान त्यांनी दिले होते. वातावरणात एक प्रकारचा प्रचंड ताण जाणवत होता. पाकिस्तानी सैनिक वाघासारख्या डौलदार फिरणाऱ्या जनरल जेकॉबला पाहत होते. कुठल्या मातीत आणि संस्कारात हा माणूस बनला आहे? कसलीच भीती नाही !!

 तीस मिनिटे होताच जनरल जेकॉब नियाजीसमोर बसले. टेबलावर शरणागती पत्र होते. जनरल नियाजीच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, ‘‘ मग ! तयार आहेस न शरणागतीला ?’’ कर्दनकाळ म्हणू प्रसिद्ध असणाऱ्या नियाजीच्या डोळ्यात चक्क पराभवाचे अश्रू होते. तो अजिबात बोलू शकत नव्हता. जनरल जेकॉबने शरणागती पत्र आपल्या हातात घेतले. हात उंच करून त्यांनी नियाजीला परत विचारले, ‘‘ शरणागतीला कबूल आहेस का ?’’

 एक विचित्र शांतता होती. त्या शांततेला अफाट ताकदीने भेदत परत जनरल जेकॉबची ललकारी, ‘‘ नियाजी, शरण येणार की नाही ?’’ नियाजीच्या डोळ्यातील अश्रू अधिकच वाढले.

 ‘‘ तू बोलत नाहीस म्हणजे शरणागतीला तू तयार आहेस असा अर्थ मी घेतो.’’ असे निर्वाणीचे बोलत जनरल उठले. नियाजी अगदीच पराभूत आवाजात विनंती करत होता, ‘‘जाहीर शरणागती नको. आपण ते गुप्तपणे करू.’’

 ‘‘ ते अशक्य आहे. तुम्ही तुमच्या हत्यारांसह भारतीयांच्या समोर जाहीर शरण आला पाहिजेत.’’

जनरल जेकॉब आपल्या करारी वाणीने आणि भेदक आवाजाने नियाजीला आपण जे म्हणतोय तेच गुपचूप ऐकण्यास भाग पडत होते.

 १६ डिसेंबर १९७१, जनरल नियाजी आपल्या ९० हजार सैन्यासह जाहीरपणे भारतीय सैन्याला शरण आला. इतिहास अवाक् होऊन ते दृश्य पाहत होता. सगळे जग भारताच्या शौर्याचा तो क्षण पाहत होते. जगाच्या इतिहासात एवढ्या संख्येने सैनिकांची जाहीर शरणागती हा एक नवा इतिहास रचला गेला.

 जनरल जेकॉबचा करारी आवाज माझ्या कानात घुमला.माझ्या अंगात एक तेजस्वी ताकद आली. मी एका वेगळ्याच चैतन्याने व ताकदीने अंगावरची रजई बाजूला सारली. भारत माताकी जय म्हणत मी वेगळ्याच दिव्य शक्तीने प्रत्येक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी माझ्या मित्रांच्यासोबत पराक्रमी डेव्हिडच्या भूमीत नवा अनुभव घेणार होतो.

 ( मी लिहिलेला जनरल जेकॉब व जनरल नियाजी मधील संवाद काल्पनिक नाही. ती खरोखर सत्य घटना आहे. त्यावर एक short Film मुक्ती नावाने बनली. त्याची लिंक मी खाली देतो वेळ मिळेल तशी नक्की पाहा. अंगावर शहारे येतात.)

https://www.youtube.com/watch?v=6bGdIAf2J_k

 


प्रकरण ७

 शत्रूंचा कर्दनकाळ असणाऱ्यांच्या भूमीत !!!

  

तेलअवीव मध्ये फारसे राहून आम्हाला जे साध्य करायचे होते ते होणार नाही हे लक्षात आले. इस्रायलच्या उत्तरेला असलेल्या तिबेरीया या शहरात आम्ही जायचे ठरवले. जाताना नाझारेथमध्ये काही काळ थांबायचे हे आधीच ठरलेले होते. सैबाथ असल्याने बस वाहतूक नव्हती.टॅक्सीने जायचे ठरले. रोमन कॅथॉलिक पंथाच्या लोकांसाठी नाझारेथ हे खूप महत्वाचे ठिकाण. देवाचा गॅब्रिअल नावाच्या देवदूताने मेरी नावाच्या यहुदी कुमारिकेच्या स्वप्नात येऊन तिला सांगितले होते की, "तुझ्या पोटी ईश्वराचा अवतार जन्माला येईल." मेरीचे जोसेफशी लग्न झालेले होते. नाझरेथ हे मेरीचे गाव होते. पुढे या मेरीच्या पोटी येशु ख्रिस्ताचा जन्म झाला. हिब्रू भाषेत यशुआ हे येशुचे मूळ नाव. त्याच्या जन्मापासून सुरु होणारी कालगणना म्हणजे आपण वापरत असेलेली रोमन कालगणना.

घोषणेचे चर्च (The Church of the Annunciation) हे अतिशय महत्वाचे असे कॅथॉलिकांचे चर्च येथे आहे. येशुचे वडील सुतारकाम करत. येशुचे बालपण मुख्यतः नाझारेथ मध्येच गेलेलं आहे. आजच्या घडीला अरबांचे सगळ्यात मोठे शहर अशी पण या शहराची ओळख आहे. त्याच्या अगदीच जवळ खास येशूच्या जन्माच्या वेळी नाझारेथ व तेथील संस्कृती कशी होती असे जिवंत ऐतिहासिक नाझरेथ उभा केलेले आहे. आपल्याला खरोखर दोन हजार वर्षांच्या पूर्वीचा अनुभव व प्रत्यक्ष जीवन अनुभवता येते.

 इस्रायली लोक पर्यटनक्षेत्र हे खूपच महत्वाचे मानतात. कित्येक लक्ष लोक दरवर्षी पर्यटक म्हणून इस्रायलला येतात. प्रचंड मोठ्या प्रमाणात परकीय चलन इस्रायलला या माध्यमातून भेटते. आपल्या भारताचा वारसा तर कित्येक हजार वर्षांचा आहे. परंतु आपण पर्यटनक्षेत्रात खूपच मागे आहोत हे पदोपदी जाणवत होते. नाझारेथहून आम्ही निघालो टायबेरियर किंवा टायबेरियाला.


टायबेरिया हे ज्यू लोकांच्या महत्वाच्या चार शहरातील एक शहर. गालील समुद्राच्या पश्चिमे वसलेले हे टुमदार शहर आणि राजकीयदृष्ट्या खूप महत्वाचे.

दुसरा रोमन सम्राट टायबीअरिअस ज्युलिअस सीझरच्या सन्मानार्थ टायबेरिया हे नाव या शहराचे रोमनांनी ठेवलेले आहे. Sea Of Galilee हे मध्ये पूर्वेतील सगळ्यात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. या भागावर सिरीया व जॉर्डन हे दोन्ही देश हक्क सांगतात. या भागातूनच जॉर्डन नदी वाहते. ख्रिश्चन धर्मात या नदीला व सरोवराला खूप महत्वाचे स्थान आहे. येशूने पाण्याहून चालण्याचा पहिला चमत्कार सरोवरात केला तर बाप्तिस्मा हा ख्रिस्ती धर्मातील प्रवेशाचा एक विधी आहे. पाण्यात डुबकी घेवून तो केला जातो. येशुचा बाप्तिस्मा जॉर्डन नदीत झाला. जगातील अनेक लोक बाप्तिस्मा घेण्यासाठी इथे येतात.

प्रचंड मोठ्या जलस्त्रोतामुळे या भागावर सिरीया व जॉर्डेन हे दोन्ही देश हक्क सांगतात. इस्रायलने ह्या भागातील पाण्याच्या वापर करून आपले क्षेत्र खूपच समृद्ध केले. सतत घडणाऱ्या संघर्षाचे रुपांतर चक्क युद्धात झाले. १९६७ मधील सहा दिवसांचे युद्ध इस्रायलाच्या पराक्रमाची व शौर्याची मोठी घटना आहे. इजिप्त,सिरीया व जॉर्डेन असे तिघे प्रचंड बलाढ्य राष्ट्र एकत्रपणे छोट्या इस्रायलशी लढत होते. डेव्हिडच्या छोट्या देशाने केवळ सहा दिवसात या तिन्ही देशांचा सपशेल पराभव केला. इजिप्तच्या हवाईदलाचे प्रचंड नुकसान झाले.


जनरल मोशे डायन हा इस्रायलाचा खरा लढवय्या शूर. प्रत्येक युद्धात त्याची भूमिका अतिशय महत्वाची होती. ह्या युद्धात तो संरक्षणमंत्री होता. मी सहजच आपल्या सगळ्या संरक्षणमंत्र्यांच्या नावावरून नजर फिरवली. मला एकाही मंत्र्याला सैनिकी पार्श्वभूमी दिसली नाही.

टायबेरिया जवळील एका किबुत्झ मध्ये मोशेचा जन्म झाला. शेती बरोबरच त्याचे शस्त्राशी नाते जुळले. १४ वर्षांचा असताना तो गनिमी काव्याने युद्ध लढणाऱ्या ज्यू संघटनेचा ( Haganah) सैनिक झाला. दुसऱ्या विश्व युद्धात त्याने आपला डावा डोळा गमवला.

इस्रायलची स्थापना झाली आणि दुसऱ्या दिवशीची सहा बलशाली अरब देशांनी एकत्रितपणे आक्रमण केले. पहिल्या अरब इस्रायल युद्धात (१९४८) मोशे जेरुसलमच्या युद्ध मोर्च्याचा कमांडर होता. जवळपास दहा महिने चाललेल्या या युद्धात चिमुकला इस्रायला विजयी झाला. १९५३ ला तो इस्रायलच्या सुरक्षा दलाचा चीफ ऑफ स्टाफ झाला. १९५६ साली स्यूज़-सिनाई युद्ध झाले. त्यात इजिप्तचा सिनाई भाग इस्रायलने ताब्यात घेतला. १९६७चे सहा दिवसांचे युद्ध अतिशय नियोजनबद्ध व गनिमी काव्याने लढले गेले. त्यात मोशेची भूमिका खूपच महत्वाची होती.


१९७३ मध्ये इस्रायल देशातील सर्वात मोठ्या सण साजरा करत होते. अचानक इजिप्तने युद्य पुकारले त्याला Yom Kippur युद्ध असे म्हणतात. इस्रायल जरी विजयी झाला तरी त्याला बरीच हानी सोसावी लागली होती. मोशे यावेळी संरक्षण मंत्री होता. अचानक होणाऱ्या युद्धात पण आपली अजिबात हानी झाली नाही पाहिजे अशी ज्यू जनतेची इच्छा होती. याखातर त्यांनी मोशे डायनला राजीनामा देण्यास भाग पाडले. देशाच्या पुढे कुठलाच माणूस मोठा नाही. देशकारण करतानाची छोटी चूक पण इस्त्रायली नागरिक स्वीकारत नाहीत हे त्यांचे विशेषता.इस्रायला जबदस्त लढवय्या आणि विजयी सैनिक म्हणून मोशे डायन जगातील मित्रांसाठी व शत्रूसाठी नेहमीत एक अप्रूप व कुतूहल राहिलेला आहे.

देशभक्त आणि शत्रूंचा कर्दनकाळ मोशे डायानची जन्मभूमी टायबेरिया मध्ये प्रवेश करत होतो आणि मला हा सगळा इतिहास डोळ्यासमोर दिसत होता. जगातील अतिशय संवेदनशील अशा भागात आम्ही प्रवेश करत होतो. इस्रायलची धार्मिक,सांस्कृतिक,शैक्षणिक व शेती आणि पाणी क्षेत्रातील प्रगती पुढील आठ दिवसात आम्ही अनुभवणार होतो. या प्रवासात आम्हाला भेटला एक जगावेगळा तरुण राजकारणी. तो आमचा खास मित्र बनला. आम्हाला आमच्या पद्धतीने इस्रायल दाखवणारा तो आमचा जिवाभावाचा सच्चा मित्र झाला.


प्रकरण ८
इस्रायल मधील राजकारण समजून घेताना ..... !!


फक्त पर्यटक म्हणून आम्ही इस्त्रायला आलेलो नव्हतो. आम्हाला एकूणच या देशाला व येथील लोकांना समजून घ्यायचे होते. तेल-अवीव,जेरुसलेम,हायफा सारख्या मोठ्या शहरांपेक्षा आम्ही टायबेरियस आमच्यासाठी जास्त योग्य ठिकाण होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमच्या राहण्याची चांगली आठ दिवसांची व्यवस्था येथे क्लब हॉटेल मध्ये सुनीलजींनी करून ठेवलेली होती. आम्ही तसे एक दिवस आधीच तिथे पोहोचत होतो. सरळ क्लब हॉटेल गाठले. एकही रूम मोकळी नव्हती. ते प्रचंड मोठे होते व एकही रूम मोकळी नाही हे नवल वाटले. शेवटी एक दिवस बाहेर छोट्या हॉटेल मध्ये राहायचे ठरले. भारतीय माणूस एक फार महत्वाची गोष्ट नेहमी करतो. बाहेर गावी जाताना भरपूर जेवणाची सामुग्री सोबत नक्कीच असणार !!! आम्ही त्याला अजिबात अपवाद नव्हतो. संजय कांबळेनी मस्त सोलापुरी कडक भाकरी व शेंगाची चटणी आणलेली. तिच्यावर आम्ही चांगलाच ताव मारला. थोडे आवरून जवळच्या एका बागेत गेलो व तेथून एक सिनेगॉग पाहण्यासाठी गेलो.


सिनेगॉग हे ज्यू धर्मीय लोकांचे प्रार्थनाघर आहे. सिनेगॉगमध्ये प्रार्थनेसाठी एक मोठी खोली असते. अभ्यास व चर्चांसाठी अनेक लहान खोल्या असतात. सिनेगॉग ही एक पवित्र वास्तू असून तिचा वापर केवळ धार्मिक कामांकरिताच करणे बंधनकारक आहे. आधुनिक सिनेगॉगमध्ये धार्मिक शाळा, ग्रंथालय, स्वयंपाकघर इत्यादी सोयी असू शकतात.


भेटल्यानंतर एकमेकांना अभिवादनासाठी वापरण्याचा हिब्रू शब्द म्हणजे ‘शालोम’. आता आम्ही त्याचा चांगलाच उपयोग करत होतो.समाजदर्शन होत असताना आम्हाला एक गोष्ट मात्र फारच भावून गेली. आई-वडील आपल्या मुलांना घेवून एकत्र फिरायला जातात. कुटुंब म्हणून त्यांचे एकमेकांशी असलेले नाते खूपच उठून दिसणारे होते. जिथे कुठे आम्ही जात होतो तिथे सहकुटुंब सहपरिवार आलेले अनेक कुटुंब दिसत. मला आजकाल आपल्या भागात हे क्वचितच दिसते.खास करून वडील मुलांसाठी खूप चांगला वेळ देतात.


दुसऱ्या दिवशी आम्ही क्लब हॉटेल मध्ये राहायला गेलो. आमचे पहिले लक्ष्य होते संध्याकाळी होणारी रोटरी क्लबच्या बैठकीला जाणे. सगळी आवराआवर झाली की पहिल्यांदा बैठकीच्या ठिकाणांना आम्ही भेट दिली. त्यानंतर मग Sea Of Galilee व परिसरातील ऐतिहासिक वास्तूंना भेटी. संध्याकाळची रोटरी क्लब मधील बैठक खूपच छान झाली. डॉ. याकोब व त्यांच्या इतर मित्रांशी भरपूर चर्चा झाली. आमची अडचण त्यांनी समजून घेतली. त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आम्हाला मदत करण्यासाठी एका माणसाला फोन केला. तो आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर दहा वाजता क्लब हॉटेल मध्ये भेटणार होता. जेवण रोटरीच्या बैठकीत झालेले होते त्यामुळे आता निश्चिंती होती.


Sea Of Galileeच्या परिसरात रात्री फिरत असताना चांगलीच वर्दळ होती. आम्ही मस्त मराठीत जोरदार गप्पा मारत फिरत होतो. अचानक आवाज आला, ‘‘तुम्ही मराठी का ?’’ आम्ही अवाक् होऊन आजूबाजूला पाहिले. भारतीयांच्या सारखा दिसणारा इसम आमच्याकडे अफाट प्रेमाने पाहत होतो. ‘‘मी तालकर, माझे वडील सामसन तालकर. त्यांना चांगली मराठी येते.’’ त्यांनी लगेच आम्हाला फोन लावून दिला. सामसन तालकरांशी उद्या भेटायचे ठरले. आता अंगात चांगलाच उत्साह संचारला होता. मस्त झोप लागणार होती.



सकाळी तयार झालो व बरोबर वाजता आम्हाला फोन आला, ‘‘ Hello, I am Dror Lallush speaking. I am just down in hotel.Please do come to meet me.’’


अरे वा !! द्रोर लालुश खाली आलेला होता. आम्ही सगळे तयारच होतो. त्याला भेटण्यासाठी आम्ही खाली गेलो. भरपूर गप्पा झाल्या. आम्ही सांगतो ते तो सगळे लिहून घेत होता. त्याने आम्हाला जे काही पाहायचे होते त्याची एक चांगली लिस्ट केली. त्याच्याबद्दल आम्ही विचारल्यावर आम्ही थोडे हवेतच उडालो. द्रोर टायबेरियाच्या महानगरपालिकेचा उपमहापौर होता. त्याच बरोबर तो या शहरातील शैक्षणिक विभागाचा प्रमुख होता. मस्त मध्यम उंचीचा,गोरापान,घोगऱ्या आवाजाच्या द्रोरच्या वागण्यात एक वेगळ्याच प्रकारचा रुतबा तर होताच पण त्याहीपेक्षा त्याच्या बोलण्यात प्रचंड प्रेम होते. त्याला आजूबाजूची सगळीच लोक ओळखत होती. प्रत्येकाला आपुलकीने अभिवादन करत त्यांची खुशाली तो विचारायला अजिबात विसरत नव्हता. माझ्यापेक्षा केवळ दोन वर्षांनी तो मोठा होता.

‘‘ तर माझ्या प्रिय मित्रांनो तुम्ही आता अजिबात काळजी करू नका !! तुमचा मित्र द्रोर आता तुमच्यासाठी सगळे काही करेल. तुमचा इस्रायलमधील निवास तुमच्या कायमच स्मरणात राहील असा होईल. मी थोड्या वेळात पालिकेतील काही काम पूर्ण करून येतो. आपण दुपारी इस्रायलमधील सगळ्यात पहिल्या किबुट्झमध्ये जाऊ.’’
आमचा आनंद गगनात मावत नव्हता. थोड्या वेळात सामसन तालकर भेटायला आले. मराठीतून भरपूर गप्पा झाल्या. त्यांनी पण आम्हाला सगळीच मदत करण्याचे आश्वासन दिले.



किबुट्झ या शब्दाचा अर्थ 'एकत्र करणे' आहे, तथापि पहिल्या किबुट्झिमला 'क्वूटझॅट' असे म्हणतात ज्याचा अर्थ ‘गट’ असा आहे. अनेक देशात विखुरलेले ज्यू बांधव पॅलेस्टाईनमध्ये परत येण्यास विसाव्या शतकाच्या सुरवातीस सुरवात झाली. समाजवाद व झिओनिझम यांचा संगम करत सामूहिकरीत्या शेती करण्याची पद्धती त्यांनी विकसित केली. किबुट्झ मध्ये सामूहिक मालकीची शेती असते. सर्व कुटुंबाच्या मुलांची देखभाल पण सामूहिकरित्या केली जाते. पहिला किबुट्झ हा किबुट्झ डेगानिया होता जो गालील समुद्राच्या अगदी दक्षिणेस आहे . तो तरुण ज्यूंच्या एका गटाने तयार केला होता. ज्यांनी पूर्वी शेती आणि मानवी वस्तीसाठी दलदल असलेली जमीन सुपीक करण्याचे काम केले होते. ज्यूज नॅशनल फंडाने ही जमीन विकत घेतली आणि जमीन सुपीक बनविण्यासाठी कठोर श्रम करून शेतीवर आधारित एक समुदाय निर्माण केला. डेगानियाची स्थापना झाल्यावर, गालील समुद्राच्या सभोवतालच्या आणि इज्रेल खोऱ्यात अनेक किब्बुटझिमची स्थापना झाली.


इस्राईलच्या स्थापनेत किबुट्झचा प्रभाव खूपच महत्वाचा आणि मोठा आहे. १९६० च्या दशकात फक्त ४% इस्त्रायली किबुट्झिममध्ये राहत असत. इस्रायलच्या संसदेच्या मध्ये मात्र १५ % सदस्य किबुट्झिममध्ये राहणारे होते.

सगळं काही द्रोर खूपच प्रेमाने, अभिमानाने व खूप विश्वासाने सांगत होता.आमच्या सगळ्याच प्रश्नांची तो उत्तरे पण देत होता. शेती,दुग्धविकास,पाण्याचे नियोजन व आधुनिकतेसोबतच किबुट्झमध्ये झालेले बदल पण तो सांगत होता. कोकोपासून चॉकलेट तयार करण्याचा उद्योग पण आम्हाला येथे पाहायला मिळाला. आम्हाला भेटताच लोक नमस्ते म्हणत अभिवादन करत. त्यासोबतच राजकपूरचे ‘मेरा जुता है जापानी’ ऐकायला मिळे. एका युवतीने चक्क माधुरीचे तेजाब मधील ‘एक-दो-तीन’ म्हणून दाखवले. भेटलेले बरेच युवक भारतात येवून गेलेले होते हे मात्र नवलच वाटत होते.


सगळे काही पाहिल्यावर आम्ही परतण्यास निघालो. द्रोर स्वतःच गाडी चालवत होता. आमच्याशी बोलत असताना त्याला अनेक फोन येत होते. अगदीच प्रेमाने तो प्रत्येकाशी बोलत होता. अचानक त्याने गाडी थांबवली. आम्ही समोर पाहिले तर दोन युवती आपल्या गाडीशी काहीतरी खटपट करत होत्या. द्रोर खाली उतरला सोबतच आम्ही पण उतरलो. गाडीचे चाक पंचर झाले होते. त्या युवतींना चाक काही बदलता येत नव्हते. द्रोर ने लगेच आपला कोट काढून गाडीत ठेवला. त्याने स्वतः जॅक लावला. चाकाचे बोल्ट चांगलेच जाम झालेले होते. भरपूर ताकद लागणार होती. द्रोर ने एकट्याने ते सगळी बोल्ट काढले. दुसरे चाक बसवले व आपले हात धुतले. त्या दोघी युवती धन्यवाद म्हणून निघून गेल्या. आम्ही मात्र अचंबित होऊन द्रोरला विचारले,
‘‘अरे ,तू तर शहराचा उपमहापौर अशी मदत तू कशी काय केलीस ?’’
द्रोरचे उत्तर फारच अचंबित करणारे होते,

‘‘ यात काय विशेष ? आमच्याकडे राजकारण म्हणजे जनतेचे सेवा करण्याचा विभाग. आमच्या बांधवांना सगळ्याच पद्धतीची मदत करणे हे आमचे कर्तव्य.मित्रांनो मी मदत केली त्या माझ्या इस्रायली भगिनींनाच ना ? मी उपमहापौर असण्याच्या आधी एक माणूस आहे. माणूस मधून अडचणीत असणाऱ्यांना मदत करणे आपले कर्तव्य नाही का ?’’

त्याच्या प्रश्नाला आमच्याकडे उत्तर नव्हते. माझ्या डोळ्यासमोर येत होते गावातील तरुण नगरसेवक, सरपंच. कडक पांढरेशुभ्र कपडे घातलेले व आपले लोक त्यांना मदत मागून चातकासारखे प्रतीक्षा करणारे . द्रोरने सरळ गाडी मुख्य बाजारात नेली. एका ठिकाणी गाडी पार्क करत तो आम्हाला घेऊन आला एका दुकानात. त्याने काही पदार्थांची ऑर्डर केली. आमच्या हातात ते पदार्थ पडल्यावर त्याने आम्हाला खाण्याची पद्धत सांगितली. पहिला घास घेतला.

‘‘एकदम सॉलिड !! काय मस्त आहे हे !! अरे हे काय आहे द्रोर ?’’

‘‘ हे आहे फलाफल. आमच्या देशातील खास खाण्याचा पदार्थ.’’

आम्ही मस्त मिटक्या मारत पहिली ऑर्डर संपवली व दुसरी दिली. दोन फलाफल खाल्यानंतर पोटच भरते. तृप्तीची ढेकर देत आम्ही क्लब हॉटेल मध्ये पोहोचलो. उद्या आम्ही पाहणार होतो इस्रायलमधील शाळा व समजून घेणार होतो देशभक्त नागरिक घडवण्याची जगा वेगळी पद्धती...




प्रकरण ९
जगाला समृद्ध करणारे व देशभक्त घडवणारे शिक्षण !!!
(इस्रायल मधील शिक्षण )


गुगल, ऑर्कुट, यूट्यूब (लॅरी पेज, सर्जी ब्रिन),ऑरॅकल(लॅरी एलिसन ),फेसबुक(मार्क झुकरबर्ग ),अनेक अँटीव्हायरस अगदीच काय तर डेल ( मायकेल एस. डेल) संगणकांची कंपनी या सर्वांचे आविष्कार करणारे आहेत ज्यू लोक. एकेकाळी शेती क्षेत्रात ६० % लोक आपली उपजीविका भागवणारे आता त्या क्षेत्रात केवळ २ % आलेत. जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत २० % लोक ज्यू आहेत .जेव्हा त्यांची जगातील लोकसंख्या केवळ ०.२ % आहे. जगाची अर्थव्यवस्था, मिडिया व सैनिकी साहित्य इत्यादी क्षेत्रात ७० % वर्चस्व असणाऱ्या या लोकांनी पहिल्या बँकेचा आविष्कार केला. आजचा जमाना स्टार्टअपचा आहे. जगात सगळ्यात जास्त स्टार्टअप सुरु करणारे ज्यू लोक आहेत.


एक काळ असा होता की त्यांना आपल्या मुलांना जिवंत ठेवण्यासाठी जीवाचे रान करावे लागत होते. त्यांच्या मुलांच्यासाठी भोवताल अजिबात सुरक्षित नव्हता. कधी त्यांना मारून टाकले जाईल हे कुणालाच माहित नव्हते. एक बलवान देशप्रमुख चक्क १० लाख छोट्या जीवांना मारून टाकतो हे भयंकर होते. ज्यू आईबाप मात्र मुलांना खंबीरपणे सांगत होते की ,"तुमचा विश्वास तगडा करा. तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही सुरक्षित असाल." चक्क हिब्रू भाषेत आत्मविश्वास आणि सुरक्षितता या दोन्हींना एकच शब्द आहे ביטחון.
इस्रायली तरुण स्टार्टअप मध्ये का पुढे आहेत ? याबद्दलचा एक टेड टॉक ऐकत होतो. बोलणारा माणूस एकूण प्रगती सांगत असताना त्याने दीर्घ श्वास घेतला व म्हणाला,


‘‘ आम्ही व्यापार,उद्योग,संशोधन,दूरसंचार व संगणक,अर्थकारण या सर्व क्षेत्रात पुढे असण्याचे खरे कारण म्हणजे ज्यू 'आई' हे आहे.’’


ज्यू माता मुलांमध्ये हा आत्मविश्वास निर्माण करतात. मुलांनी आपल्या मनासारखे वागावे म्हणून काल्पनिक भय निर्माण करून त्यांना रोखणे हे अजिबात तिथे होत नाही.ज्यू लोकांना जेवढा त्यांचा देश,देव आणि धर्म प्रिय आहे तेवढेच त्यांना त्यांचे मुलं प्रिय आहेत. आपल्या मुलांच्यासाठी स्वतःचे करियर पण सोडून देतात. सगळे जग आज मुलांना आपल्या भविष्याची पुंजी समजतात. ते मोठे होण्यासाठी त्यांच्यासाठी भरपूर पैसा खर्च करतात. सगळ्या सुखसोयी त्यांच्यासाठी असतात. आपले स्वप्न पूर्ण करणारे आपले मुलं असावे यासाठी भरपूर काही करतात. ज्यू आई-वडील मात्र मुलांना अशा भौतिक सुविधांपेक्षा जास्त आत्मविश्वास देतात, निर्भयता देतात, स्वतःचे अगदीच भव्य दिव्य स्वप्न स्वतः पाहायला शिकवतात. विचारांचे व भावनांचे स्वावलंबन,प्रश्नांना व समस्यांना भिडण्याचे धैर्य देतात.तो शाळेत जातो आणि शिकायला लागतो की आपल्या इतर मित्रांशी घट्ट नाते कसे करायचे ? एकत्र सोबत काम करत,शिकत एकमेकांवर प्रेम करत एकत्रितपणे यश कसे मिळवायचे ? ही शिकवण सगळ्या ज्यू कुटुंबानी त्यांच्या मुलांना दिलेली देणगी असते. यशस्वी झालात की तुम्ही आनंदी व्हाल असे सगळे जग म्हणत असताना ज्यू मुलं अगदी उलटे शिकतात. तुम्ही आनंदी असलात की नक्कीच यशस्वी व्हाल !!




आज आम्हाला द्रोर पहिल्यांदा घेऊन गेला तो बालवाडीत. आम्ही ती पाहण्यासाठी गेलो तर आम्हाला लक्षात आले की ती जमिनीच्या खाली बंकर मध्ये आहे अतिशय सुरक्षित ठिकाण. कुठलाही बॉम्ब हल्ला झाला तरी मुलं एकदम सुरक्षित राहतील याची काळजी घेतलेली असते. आम्ही बालवाडीत प्रवेश करताच आम्हाला पहिल्यांदा दिसला इस्रायलचा नकाशा व राष्ट्रध्वज !! तिथले वातावरण अफलातून होते. एकदम मोकळेपणा व अगदीच घरातच असल्यासारखा आपलेपणा. आम्हाला पाहून मुलं घाबरून गेली नाहीत ना लाजून दूर गेली. एक वेगळाच विश्वास त्यांच्यात होता. गंमत म्हणजे एक पुरुष शिक्षकसुद्धा त्या लहान मुलांना शिकवत होता. बालवाडीला पुरुष शिक्षक शिकव तो हे फारच दुर्मिळ चित्र.(बालवाडीचा व्हिडीओ कॉमेंट मध्ये दिला आहे .)




प्रत्येक शाळेची खूप चांगली सुरक्षा व्यवस्था असते. बालवाडी पाहून झाल्यावर आम्ही प्राथमिक शाळेत गेलो. मुलांचा आत्मविश्वास दिसून तर येतच होता त्यासोबतच त्यांच्यातील कलागुणांनी त्यांची वर्ग खोली समृद्ध होती. आम्ही वर्गात प्रवेश केल्यावर वर्गात फार काही फरक पडला नाही. मुले आपली कामे करत होते. बहुतेक मुलं द्रोरला ओळखत होती. तो पण काहींची आस्थेने चौकशी करत होता. त्यांच्यातील संवाद एकदम मैत्रीपूर्ण होते. शिक्षकांनी मला भारताबद्दल माहिती सांगायला विनंती केली. मी इंग्रजीतून बोलत होतो. द्रोर व त्यांचे शिक्षक त्यांना ते हिब्रू मध्ये समजून सांगत होते. इस्रायलमधील बहुतेक प्राथमिक शाळा ह्या सरकारच्या तर्फे चालवल्या जातात व शिक्षण हे मात्र हिब्रू माध्यमातूनच असते. आपल्या देशाबद्दल,संस्कृतीबद्दल कृतीशील आदरभाव जपण्याचे शिक्षण खास करून दिले जाते. आपली संस्कृती,देश व धर्म याचा अभिमान मुलांमध्ये याच काळात निर्माण केला जातो.





त्यानंतर आम्ही गेलो ते माध्यमिक शाळेत. मुलं भारीच होती. वर्गखोली कुठल्याही विकसित देशांच्या शाळेच्या सारखीच मस्त व भव्य दिव्य होती. वर्गाच्या एका भिंतीकडे माझे खास करून लक्ष गेले. अनेक फोटो तिथे लावलेले होते.त्यावर हिब्रू भाषेत काही तरी लिहिलेले होते. कोपऱ्यात एक अग्नीपुंज होता.मी द्रोरला त्या फोटोंबद्दल विचारले. याच शाळेत शिकलेले,याच वर्गात बसणारी ती सगळी मुलं होती. शत्रूंबरोबर झालेल्या युद्धामध्ये ते शहीद झालेले होते. वर लिहिलेल्या मजकूराबद्दल मी विचारले.


आशय होता, ‘‘आम्हाला तुमची नेहमीच आठवण होते. तुमचे पवित्र आणि सुंदर आयुष्य आम्हाला नेहमीच प्रेरणा देईल. आपण आपला देश कसा मिळवला आणि त्यासाठीचे तुमच्यासारख्या साहसी मित्रांचे बलिदान हे आम्ही कधीच विसरणार नाहीत. आम्ही नक्कीच तुमच्यासारखे बनू.’’

मी काही काळ सुन्न होतो. शेवटचा प्रश्न विचारायचा म्हणून मी मुलांना विचारले,

‘‘ तुम्ही खरंच त्या शूर मित्रांसारखे होणार का ?’’

‘‘हा काय प्रश्न झाला का ? होणार का म्हणजे ? आम्ही आहोत तसे आत्ताच. गरज पडली तर त्यांनी जे केले ते आम्ही नक्कीच करू.’’ एका चुणचुणीत मुलांच्या उत्तराने आम्ही गप्पगार झालो.


आम्ही गप्पगार झालेले द्रोरच्या लगेच लक्षात आले. तो हसत म्हणाला, ‘‘ माझ्या प्रिय मित्रांनो !! तुम्ही आमच्या छोट्या मुलांशी आता सामना केला. चला, आता पाहूया आमचे सैनिक बनतात कसे ?’’

आम्ही त्याच्याबरोबर अकरावी व बारावीला शिकणाऱ्या मुलांना भेटण्यासाठी निघालो. वर्गात गेलो तो सैनिकी पोशाखात मुलं होती. चांगलीच धिप्पाड व ताकदीची. लहानपणापासून मुलांच्या बौद्धिक ताकदीबरोबरच शारीरिक ताकद चांगली असली पाहिजे याची फार चांगली काळजी घेतली जाते. मुलं बोलण्यात एकदम तरबेज होती. त्यांना आता इंग्रजी चांगली समजत होती. मी सांगत असलेल्या भारतातील बहुतेक गोष्टी त्यांना माहिती होत्या.


भरपूर खेळणे, प्रयोगशाळेत प्रयोग व प्रकल्प करणे त्यासोबतच देशाचा इतिहास व संस्कृती समजून घेणे हे ते खास करून करतात. त्यांच्या भावी आयुष्याबाबतीत विचारल्यावर मात्र मी चकित झालो. जगात काही तरी अकल्पित, अस्तिवात नसणारे परंतु मानवी समाजाला पुढे घेऊन जाईल असे काही तरी करायचे होते त्यांना. खूप मोठ्या पगाराची नोकरी करण्यापेक्षा सगळ्यात जास्त पगार देणाऱ्या कंपनी स्थापन करण्याचे अनेकांचे स्वप्न होते. आमचा देश व आम्हीची ज्यू संस्कृती जगातील सर्वांनाच खूप प्रगत करण्यासाठी आहे. आम्हाला युद्ध नको तर खरोखर शांती हवी आहे. आमचे अस्तिवच मान्य करायला अरब लोक तयार नाहीत म्हणून आम्हाला लढावे लागेल आणि त्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग पण नाही. त्यांचे विचार खूप स्पष्ट, नेमके व आत्मविश्वासाने ओतप्रोत होते.
देशातील सर्वोच्च नेते, सैनिकी अधिकारी, मोठे शास्त्रज्ञ,उद्योजक, नावाजलेले कलावंत सगळेच वेळ काढून शाळेत जातात. मुलांशी बोलतात व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात. त्यांना एकूणच आयुष्य समजून घेण्यासाठी मदत करतात. त्यांच्या सर्वांच्यासाठी भविष्यातील इस्त्रायल अधिक समृद्ध असण्यासाठी हे अगत्याने करणे असते. द्रोर अनेक गोष्टी आम्हाला समजून सांगत होता. ‘‘शिक्षण हा आमच्या देशाचा प्राण आहे.’’ असे म्हणत तो आम्हाला घेऊन परत हॉटेलकडे निघाला.


‘‘आम्हाला तरुणांना भेटायचे आहे द्रोर. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांना !!’’ मी आपली आमची पुढची फर्माईश केली.


‘‘Oh!! Youths!! Very difficult ... Israeli Youths are the busiest community in the world. Still I will try my friends.’’ द्रोरच्या बोलण्यात पहिल्यांदाच अवघड शब्द आला होता. आम्हाला मात्र इस्रायली तरुणांना भेटण्याची आस लागली होती....



प्रकरण १०
सामान्य युवक ते लढवय्या सैनिक ...एक जबरदस्त प्रवास !!

कौटुंबिक व शैक्षणिक वातावरण समजून घेतल्यावर आम्हाला महाविद्यालयातील तरुणांबद्दल जास्तच उत्सुकता होती. द्रोरच्या मनात काही तरी वेगळेच होते. त्याला आम्ही एकूणच इस्रायलची सुरक्षा व्यवस्था समजून घ्यावी असे वाटत होते. कुटुंब,शाळा व मग IDF म्हणजे इस्रायल सुरक्षा दल अशा क्रमाने आम्ही पुढे जावे असे त्यांनी सांगितले. त्याचे म्हणणे अगदीच बरोबर होते. बारावीपर्यंतची शैक्षणिक प्रकिया आम्ही प्रत्यक्ष पाहिली होती. आता बहुधा सगळ्याच तरुणांना सैनिकी प्रशिक्षण सक्तीचे होते. युवकांसाठी तीन वर्षे व युवतींसाठी दोन वर्षे. धार्मिक आधारावर काही लोकांना ह्या सक्तीच्या प्रशिक्षणातून सूट आहे.


द्रोर आम्हाला हे सगळे समजावून सांगण्यासाठी गोलानच्या टेकड्यांवर नेत होता. आम्ही आता इस्रायलच्या सीमेवर जाणार होतो. जिथून आम्हाला सिरीया व जॉर्डनचा भूभाग दिसणार होता. गोलनच्या टेकड्या हा जागतिक राजकारणातील अतिशय संवेदनशील भाग. सहा दिवसांच्या युद्धात इस्रायलने हा भाग सिरीयाकडून आपल्या ताब्यात घेतला.



योम किपुर ( जून १९६७ ) हा ज्यू लोकांचा खूप मोठा सण ज्यावेळी सैन्य दलातील अनेक सैनिकांना सुट्टी दिलेली असते. बरोबर मोका साधून अरब देशांनी इस्रायलवर आक्रमण केले. सीरियाने जोरदार हल्ला गोलानच्या टेकड्यांवर केला. अतिशय अवघड परिस्थिती इस्रायली सैन्यावर आलेली होती. आपला तळ राखता येईल का ही पण शंका होती. दैव बलवत्तर सिरीयाच्या सैन्यांनी माघार घेतली. या युद्धात इस्रायली सैन्याचे खूप मोठे नुकसान झाले.अनेक सैनिक धारातीर्थी पडले. त्यामुळे गोलानच्या टेकड्या व सिरीयामधील दरीला 'अश्रूंची दरी' असे पण म्हटले जाते.आपल्या परिश्रमाच्या व सृजनाच्या जोरावर या टेकड्यांवर इस्रायलने नंदनवन केलेलं आहे. गोड द्राक्षे व त्यापासून तयार होणारे विविध पेय निर्माण करण्याचे उद्योग ही या भागाची खास विशेषता !!




अनेक युद्ध व सततचे होणारे अतिरेकी व रॉकेल हल्ले यामुळे इस्रायलच्या अस्तित्वालाच धोका आहे. सतत सावध व युद्ध सज्ज राहणे अगदीच गरजेचे असते. त्यात अरब देश अधिकच तयारी करत असल्याने व त्यांची सैन्यदलाची संख्या अधिक असल्याने इस्रायलच्या प्रत्येक नागरिकाला सैनिकी शिक्षण बंधनकारक आहे. अतिशय अवघड आणि प्रचंड ताकदीचे देशभक्त घडवण्याची ही प्रकिया.


इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या भरती प्रशिक्षणाला ‘तिरोनट’ असे हिब्रू भाषेमध्ये म्हणतात. सामान्य नागरिक ते एक सैन्य दलातील योद्धा अशा परिवर्तनाची सुरवात ती असते. परिवर्तन इंडक्शन सेंटरपासून सुरू होते, जिथे प्राथमिक गोष्टी पूर्ण केल्यावर ते ब्रिगेड प्रशिक्षण केंद्रावर जातात. तेथे त्यांचे मूलभूत प्रशिक्षण सुरू होते जे नागरिकांना सैनिक बनवते. मूलभूत प्रशिक्षणात ते लढाऊ सैनिकांची मूल्ये आणि मूलतत्त्वे शिकतात, ज्यात नियमित आणि लष्करी शिस्त, शारीरिक प्रशिक्षण, फील्ड आठवडे, शस्त्र प्रशिक्षण, शूटिंग आणि आयडीएफच्या तत्त्वांचा समावेश आहे. मूलभूत प्रशिक्षण अंदाजे चार महिने असते आणि अंतिम मोर्चासह समाप्त होते. अतिशय अवघड असे हे प्रशिक्षण असते. युवकांचा बाहेरील जगाशी जवळपास संपर्क नसतोच. मोर्चाच्या शेवटी सैनिकांचा शपथविधी होतो. ज्यामध्ये ते अधिकृतपणे आयडीएफ मध्ये सामील होतात. इस्रायल मधील पवित्र, ऐतिहासिक अशा ठिकाणी हा शपथविधी होतो. भारावून टाकणारे वातावरण असते.


समारंभाचा शेवट त्यांच्या प्रगत प्रशिक्षणाच्या सुरूवातीचे प्रतीक आहे. प्रत्येक सैनिकाला ब्रिगेडची भूमिका सोपविली जाते आणि चार महिन्यांपासून वर्षाच्या प्रशिक्षणानंतर ते ऑपरेशनल ड्युटी सुरू करण्यास सक्षम होतात.प्रगत प्रशिक्षणाच्या दरम्यान गटात काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अगदीच छोट्या गटा पासून मोठ्या तुकडीसोबत काम करताना लागणाऱ्या कौशल्यात त्यांना तरबेज केले जाते. तंदुरुस्ती, तत्परता आणि लष्करी उपकरणांची योग्य काळजी यावर जोर दिला जातो. या टप्प्यावर ते लढण्याचे वेगवेगळे तंत्र व मंत्र शिकतात.
उदाहरणार्थ, कॉम्बॅट इंजिनिअरिंग कॉर्पस मायनिंगफील्ड्स, बोगदे आणि सुरुंगांच्या टेकड्यांसारख्या अडथळ्यांना हाताळण्यासाठी गाड्या चालवतात. त्याच वेळी, कॉम्बॅट इंटेलिजेंस कॉर्प्स माहिती गोळा करण्यात आणि जमिनीवरील धोके ओळखण्यात माहिर होतात. शोध आणि बचाव युनिटचे विशेष प्रशिक्षण देखील आहे ज्यात भूकंप, त्सुनामी आणि पारंपारिक किंवा अपारंपरिक दहशतवादी हल्ल्याच्या वेळी विशेष मोहीम राबविणे समाविष्ट आहे.



आयडीएफ लढाऊ सैनिक बनण्याची अंतिम आणि सर्वात मोठी पायरी म्हणजे “मसा कम्टा” - बेरेट मार्च. सैनिक शस्त्रे, दारुगोळा आणि स्ट्रेचर्स घेऊन रात्रभर कूच करतात. जवळपास ४० मैलांचा अतिशय अवघड प्रवास त्यांना करावा लागतो. त्यानंतर खास समारोह आयोजित केला जातो. कुटुंबाच्या उपस्थितीत समारंभपूर्ण त्यांना युनिट बेरेट मिळते. एकूणच या प्रशिक्षणात देशाच्या व ज्यू लोकांच्या इतिहासाची व विविध लढाया व चढायांची ओळख त्यांना होते. अतिशय शिस्तबद्ध दिनक्रम असतो. मानसिक व शाररीक दृष्ट्या प्रचंड ताकदीचे, सावध, सतर्क व खास करून चाणाक्ष योद्धे या प्रशिक्षणातून तयार होतात.


इस्रायलच्या सैनिकी ताकदीचा व पराक्रमांचा अनुभव घेतल्याने प्रत्येक तरुणात जबर आत्मविश्वास निर्माण होतो. आपत्ती व्यवस्थापन, नेतृत्व व संघटन कौशल्यात प्रत्येक युवक तरबेज होतो. द्रोर व त्याचा भाऊ रोनेन आम्हाला खूप व्यवस्थित सगळे समजून सांगत होते. स्वतः ते त्या प्रक्रियेतून गेलेले असल्याने आमच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे पण दिली. गोलानच्या टेकड्यांवर चढाई करून आम्ही वरच्या सपाट भागावर आलो. समोर सिरीयाचा प्रदेश डोळ्यासमोर होता. संयुक्त राष्ट्रांचे सैनिकी ठाणे समोरच होते. सुळक्यासारख्या बाहेर आलेल्या टेकडीवर इस्रायलचे सैनिकी ठाणे होते. तंत्रज्ञाच्या दृष्टीने अतिशय प्रगत रडारचा वापर करून सिरीया मधील हालचालींवर काही शे किलोमीटर पर्यंत कडवी नजर ठेवण्यात येत होती. आम्ही ज्या भागात उभे होतो तेथे सुंदर युद्ध संग्रहालय होते. क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या दृष्टीने जगात सर्वात जास्त संग्रहालय असणारा हा देश आहे.


प्रत्यक्ष युद्धात यश मिळत नाही हे कळल्यावर आता अरब देशांनी युद्धाची पद्धती बदलली आहे. आता छुपे युद्ध होते. नागरी भागातून इस्रायलवरच्या महत्वाच्या ठिकाणावर,शाळांवर असे हल्ले अचानक होतात. २००३चे युद्ध पाहताना सद्दाम हुसेन अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलमध्ये ‘स्कड’ क्षेपणास्त्रे सोडत होता. त्यांना मार्गावरच उध्वस्त करण्यासाठी ‘पॅट्रीओट’ नावाचे बचाव करणारे क्षेपणास्त्रे इस्रायलमध्ये बसवले होते. मला त्यावेळच्या परिस्थितीची आठवण झाली. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी इस्रायलने एक अफलातून प्रकिया विकसित केली त्याला नाव दिले आयर्न डोम (Iron Dome).


आयर्न डोम एक मोबाइल ऑल-वेदर एअर डिफेन्स सिस्टम आहे. कुठल्याही भागातून रॉकेट किंवा क्षेपणास्त्रे सोडली गेली तर लगेच इस्रायलच्या सुरक्षा रडारला ते टिपता येतात. कुठल्या भागाच्या दिशेने ते जात आहे याचा अचूक अंदाज घेतला जातो. त्या भागात लगेच सायरन वाजतो. किती वेळात शेल्टर मध्ये गेले पाहिजे याची कल्पना प्रत्येक नागरिकाला दिलेली असते. शेल्टर म्हणजे जमिनीखालील सुरक्षित निवारा. याच काळात त्याभागातील बचाव करणारी रॉकेट किंवा क्षेपणास्त्रे सोडली जातात. हवेतच शत्रूचे रॉकेट किंवा क्षेपणास्त्रे उध्वस्त केली जातात. आजच्या घडीला दरवर्षी हजारो रॉकेटचा मारा इस्रायलवर करण्यात येतो. आपल्या भागात पडलेले प्रत्येक रॉकेट इस्रायल मध्ये जपून ठेवलेले आहे.


आम्ही खरं तर अतिशय संवेदनशील अशा भागात होतो. द्रोर व रोनेन आम्हाला सगळीच माहिती अगदीच निवांत देत होते. त्यांनी खास गोड संत्री आम्हाला खाण्यासाठी आणल्या होत्या. माहिती सांगतच तो एक एक फोड आम्हाला काढून देत होता. पृथ्वीवरील अतिशय शांत व आल्हाददायक भागात आम्ही सहलीसाठी आलोत असाच निवांतपणा त्याच्या वागण्यात होता. त्याला जबदस्त विश्वास होता की आम्ही सगळे अतिशय सुरक्षित देशात आहोत !!!


भूमिगत खंदक,संग्रहालय व परिसराचा पूर्ण आस्वाद घेत ज्ञानार्जन केल्यावर आम्ही परतीला निघालो. संध्याकाळी द्रोरच्या घरीच जेवणाला आम्हाला बोलावले होते व सोबत असणार होते बरेचसे तरुण इस्रायली मित्र !!!



प्रकरण ११

जगातील सर्वात व्यस्त तरुण..

गोलानच्या टेकड्या पाहून झाल्यावर आम्हाला आता बरेच निवांत वाटत होते. द्रोर व रोनेनसारखे मित्र मिळाल्याने एकूणच अभ्यास दौरा नक्कीच चांगला होणार हा विश्वास वाढला. आमच्या दौऱ्यात एक कुटुंब समजून घेणे हे पण आम्ही ठरवले होते. द्रोरच्या आई व वडिलांना भेटलो व मग द्रोरच्या घरी गेलो. द्रोरला त्यावेळी दोन मुली होत्या. आता तीन मुली व एक मुलगा आहे. सैबाथच्यावेळी तो खूप चांगला वेळ घरातील लोकांसाठी देतो. एकत्र जेवणे,फिरायला जाणे, गप्पा मारणे हे तर अगत्याने होते. आम्हा सर्वांचे स्वागत खूपच छान केले. खास शाकाहारी जेवणाची व्यवस्था केलेली होती. जेवणाच्या सोबतच आम्हाला अनेक तरुणांशी गप्पा मारता येणार होत्या.


ज्यू लोकांच्या घराच्या समोर एक पंजाचे चिन्ह असते त्याला ‘हम्सा’ ( देवीचा हात ) असे म्हणतात. कुणाची वाईट नजर आपल्या घराला व कुटुंबाला लागू नये म्हणून प्रत्येक घराच्या बाहेर ‘हम्सा’ लटकवलेला किंवा लावलेला असतो. रक्षणासोबतच सुबत्ता, समाप्ती,सुख,शांती घरात नांदावी म्हणून ‘हम्सा’ प्रत्येक घरात असतो. गंमत म्हणजे हे प्रतीक मुस्लीम अरब व ख्रिश्चनसुद्धा आपल्या घराच्या समोर लावतात. प्रतिकांचे अर्थ फक्त वेगळे असतात ...



दुसरे प्रतीक आपल्या सगळीकडेच दिसते ते म्हणजे ‘मेनोरा’. जुन्या बायबलमध्ये ‘मेनोरा’चे वर्णन केले गेले आहे. सात दिवे असलेला प्राचीन हिब्रू दीपस्तंभ. जेरूसलेमच्या मंदिरात मोझेस ( मोशे )ने उभारलेला हा दीपस्तंभ. दिवे लावण्यासाठी दररोज शुद्ध गुणवत्तेचे नवीन ताजे ऑलिव्ह ऑईल जाळले जात असे. इस्रायलचे हे राष्ट्रीय व धार्मिक प्रतीक आहे. आपल्याला इस्रायलाच्या राष्ट्रध्वजावर एक चांदणी दिसते तिला डेव्हिडची चांदणी किंवा डेव्हिडची ढाल म्हणतात. राजा डेव्हिडने ही शत्रूंबरोबर लढताना अशा आकाराची चमत्कारी व शक्तीशाली ढाल वापरली होती. शत्रूच्या विरुद्ध विजय मिळून देणारी ही ढाल आता इस्रायलचे राष्ट्रीय प्रतीक आहे. अशा अनेक प्रतिकांची ओळख आम्हाला झाली.



रात्री आठच्या आसपास तरुण-तरुणी येण्यास सुरुवात झाली. इस्रायली समाजव्यवस्था बरीचशी मोकळी आहे. मुली किवा महिला रात्री अगदीच मोकळे फिरू शकतात. अत्याचार होत नाहीत असे अजिबात नाही पण एकूणच प्रमाण बरेच कमी आहेत. आपले तरुण ज्यावेळी कॉलेज मधील मुक्त वातावरणाचा अनुभव घेत असतात त्या वयात इस्रायली तरुण सैनिकी प्रशिक्षण घेत असतात. प्रशिक्षणात सगळाच देश त्यांचा पाहून होतो. प्रशिक्षणात मिळणारे विद्यावेतन ते फारच जपून वापरतात. सैनिकी प्रशिक्षणानंतर ८० % तरुण एकातरी दुसऱ्या देशात जाऊन येतात. भारतात ऋषिकेश,कुलू,मनाली,गोवा सोबतच योग प्रशिक्षणाच्या अनेक केंद्रात बरेचसे इस्रायली तरुण आपल्याला आढळतात. दोन तीन महिन्याचा परदेश प्रवास झाल्यावर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सुरु होते. त्यावेळी त्यांचे वय जवळपास २२ च्या आसपास असते.


मुंबई शहरापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या ह्या देशात ९ विश्वविद्यालये आहेत. त्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जा खूपच चांगला आहे. महाविद्यालये भरपूर आहेत. शिक्षण महाग आहे. महाविद्यालयात शिक्षणासाठी गेल्यावर बहुतेक मुलं आपल्या स्वतःचा खर्च स्वतः करतात .त्यासाठी त्यांना नोकरी करणे गरजेचे असते. महाविद्यालयातील ६ ते ७ तास व नोकरीचे ७ ते ८ तास असा बराच वेळ त्यांचा कॉलेजमध्ये व कामाच्या ठिकाणी जातो. व्यक्तिगत कामासाठीचा वेळ जर सोडला तर त्यांच्याकडे मोकळा वेळ मिळणे जवळपास अशक्यच असते. कामाशिवाय कुणाशी भेटणे बोलणे व टाईमपास करणे जवळपास अशक्यच असते. असे जरी असले तरी उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण तरुणांमध्ये खूपच जास्त आहे. सुट्टीच्या काळात हे लोक काही समाजसेवी संस्थामध्ये स्वयंसेवक म्हणून जातात तर काही लोक जग पाहण्यासाठी भरपूर प्रवास करतात. ते हे सगळे स्वतःच्या कमाईवर करतात.


स्वावलंबी व व्यस्त असले तरी त्यांचे कुटुंबाशी नाते चांगले असते. कौटुंबिक सहली, समारंभ यासाठी ते बरेच प्राधान्य देतात. आपल्या वेळेच्या बाबतीत प्रचंड चोखंदळ व भविष्याच्या बाबतीत कमालीचे जागरूक असतात. तरुण मित्र अतिशय मोकळेपणाने सगळ्या गोष्टी सांगत होते. मी गेलो त्यावेळी सोशल नेटवर्किंगचे प्रमाण फार कमी होते. परंतु आपले छंद,खेळ व मनोरंजन यासाठी ते ठरवून वेळ काढतात.जगातील सर्वात व्यस्त तरुण म्हणून त्यांची ओळख होते. भरपूर गप्पा व मस्त जेवण झाले. आज सर्वांनी बराच वेळ आमच्यासाठी काढला होता. भारताबद्दल प्रचंड कुतूहल होते. रात्र चांगलीच झाली होती. द्रोरच्या घरातील सुंदर बगीच्यात मस्त सोहळा पार पडला....

सतत होणाऱ्या लढाया व आतंकवादी हल्ले यामुळे इस्रायलची आरोग्यव्यवस्था कशी असेल ? उद्योग कसे असतील ? खास करून शेती व जल व्यवस्थापन कसे असेल ? आमच्यापुढे असे अनेक प्रश्न होते. आमच्या शाळा तर पाहून झाल्या होत्या. आम्हाला आता पाहायचे होते रुग्णालये, कारखाने,विश्वविद्यालये सगळ्यात महत्वाची इस्रायलची शेती .....


प्रकरण १२

एका दिलेर बापाची गोष्ट ......


डोरोन अल्मोग एक दिलेर व जबर सैनिक. इस्त्राईल डिफेन्स फोर्स मधील मेजर जनरल. अनेक चढाया आणि पराक्रम या वीराच्या नावाने आहेत. पॅराट्रूपर्स ब्रिगेड ह्या अतिशय युद्धात तरबेज असणाऱ्या सैनिकांच्या पथकामधील तो एक वीर. अल्मोग कुटुंबातील चार मुलांमधील सर्वात मोठा मुलगा. तो शरीराने जसा शक्तिशाली,काटक व लवचिक होता तसाच मनाने प्रचंड खंबीर व दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा तर तीक्ष्ण आणि चाणाक्ष बुद्धी लाभलेला. १९६९ मध्ये इस्त्राईल डिफेन्स फोर्स मध्ये त्याची कारकीर्द सुरु झाली. पराक्रमाच्या बळावर त्याने अनेक चढाया व लढ्यात आपल्या पराक्रमाने शत्रूला पण दिपवून टाकले. लवकरच तो कंपनी कमांडर झाला. त्याचे नेतृत्व अफलातून होते.


१९७२ मध्ये पश्चिम जर्मनीच्या म्युनिचमध्ये आयोजित उन्हाळी ऑलिंपिकमध्ये अतिरेक्यांनी अकरा इस्रायलचे ऑलिंपिक चमूचे सदस्य बंधक बनवले होते व शेवटी त्यांची हत्या करण्यात आली. याचा बदला घेण्यासाठीच्या कमांडो पथकात डोरोन अल्मोगची निवड करण्यात आली. अतिरेक्यांना शोधून शोधून त्यांचा खात्मा केला होता.
योम किप्पुर युद्धाच्या वेळी तो दक्षिणेच्या वाळवंटात इजिप्तशी लढत होता. पुढच्या क्षणी जिंवत राहू का याची अजिबात कल्पना नव्हती. त्याचा छोटा भाऊ एरन पश्चिमेला गोलानच्या टेकड्यांवर सिरीयाशी लढत होता. तो आपल्या रणगाडा कंपनीसह जोरदार लढा देत होता. अचानक सुरु झालेल्या युद्धामुळे तसे अवघड जात होते. अरब देश पण यावेळी प्रचंड ताकदीने लढत होते. एरनच्या रणगाडा चकमकीत उध्वस्त झाला. तो घायाळ होऊन जमिनीवर पडला. रक्तबंबाळ अस्वस्थेत तो मदतीची हाक देत होता. तशा अवस्थेत सात दिवस तडफडून एरन शहीद झाला.

युद्धानंतर एरनच्या मृत्यची बातमी डोरोनला कळाली. तो परतल्यावर गोलानच्या टेकड्यांवर वस्तुस्थिती पाहण्यासाठी गेला. एरनच्या शेवटच्या सात दिवसातील अवस्था त्याला कळल्यावर तो प्रचंड अस्वस्थ झाला. त्याच्या काळजात प्रचंड चीड होती. मनाने त्याने एक निर्धार केला की कधीच युद्धभूमीत जखमी सैनिकाला एकटे सोडणार नाही.आपल्या भावाचा विरह डोरोनला खूप त्रास देत होता.

१९७६ ला अघटित घडले. फ्रान्सच्या प्रवासी विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले व ते विमान युगांडाच्या एन्टेबे विमानतळावर नेले. १०६ इस्रायली नागरिकांना बंधक बनवले होते. आधी अशाच घटना घडलेल्या होत्या त्यावेळी अतिरेक्यांच्या मागण्यापुढे इस्रायली सरकारला शरण यावे लागले होते. यावेळी मात्र त्यांनी निश्चय केला होता की कुठल्याही परिस्थितीत अतिरेक्यांच्या मागण्या मान्य करायच्या नाहीत. कुठल्याही अतिरेक्याला नागरिकांच्या बदल्यात सोडायचे नाही. इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसाद व सैनिकी अधिकारी एक अतिशय अवघड मोहिमेचे नियोजन करत होते. एन्टेबे इस्रायल पासून ४००० किलोमीटरवर होते. युगांडाचे शासन अपहरण करणाऱ्यांना मदत करत होते. इस्रायली अधिकाऱ्यांनी चर्चा सुरु ठेवली. वाटाघाटी जवळपास आठवडाभर चालू होत्या तर दुसरीकडे एन्टेबे मोहिमेची तयारी होत होती. शेवटी शंभर जांबाज कमांडोजची तुकडी मोहिमेवर निघाली. एन्टेबे

विमानतळावर पहिला उतरणारा होता डोरोन अल्मोग. नीट सगळे समजून घेऊन त्याने इतरांना उतरण्यासाठीचे संकेत दिले. केवळ ९० मिनिटात सगळ्या बंधकांची मुक्तता केली व सगळ्यांना घेऊन विमान इस्रायलच्या दिशेने निघणार होते. विमानात शेवटी बसणारा होता डोरोन अल्मोग. मोहीम फतेह झाली. जगाला अशक्य वाटणाऱ्या या मोहिमेला चमत्कारासारखे यशस्वी करण्यात डोरोन अल्मोगचे योगदान मोठे होते.

अशा अतिशय अवघड मोहिमा सफल करणारा डोरोन अल्मोग १९७८ मध्ये दीदी फ्रिदाशी विवाहबद्ध झाला. संसार आता अगदीच व्यवस्थित चालू होता. डोरोनच्या आयुष्यात थोडे स्थैर्य आले होते. नित्झानचा त्याच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. सगळे काही चांगले चालले होते. इथिओपिया मधून आपल्या ७००० ज्यू बांधवाना इस्रायल मध्ये सही सलामत आणण्याच्या ऑपरेशन मोशे मध्ये डोरोन सहभागी होता.

याच काळात त्याला आयुष्यात दुसरी आनंदाची घटना घडली. एका नव्या छानशा छोट्या जीवाने त्याच्या कुटुंबात जन्म घेतला होता. फारच गोड लेकरू होते ते.आपला छोटा भाऊ एरन परत जन्माला आला असेच त्याला वाटत होते. डोरोन व त्याच्या पत्नीने त्याचे नाव एरन ठेवले. आपल्यापेक्षा तो अधिक तडफदार,बुद्धिमान,कर्तृत्ववान व मातब्बर व्हावा अशी डोरोनची प्रांजळ इच्छा होती. तो जसा जबरदस्त सैनिक होता तसा हळवा बाप व माणूस पण होता.

काही महिने खूप आनंदात गेले. दिदीला एरेनच्या वागण्यात काही तरी वेगळेपण जाणवायला लागले. तिने तिची अस्वस्थता डोरोनला सांगितली. भरपूर विचार केल्यानंतर तज्ञ डॉक्टरांना भेटायचे ठरले. डोरोन व दिदीवर आभाळ कोसळले. त्यांनी पाहिलेले सुखद स्वप्न क्षणात उध्वस्त झाले. एरेनला स्वमग्नता (autism) व मेंदूचे मंदत्व अशा जिवंतपणे मरणयातना भोगाव्या लागणाऱ्या रोगाचे निदान झाले. तो कधीच त्यांना आबा (बाबा) व इमा ( आई ) म्हणू शकणार नव्हता. त्याच्या पूर्ण आयुष्यात तो कधीच त्यांना बोलणार नव्हता ना त्यांच्या डोळ्यात डोळे घालून सुखदुःखाचा अनुभव घेऊ शकणार होता.




अल्मोग परिवारावर परत एकदा भयाण वीज कोसळली होती. भावाच्या मृत्यूनंतर आता आपल्या लाडक्या एरनची दुहेरी जन्मठेप डोरोन व दिदी असाह्य करत होती. शत्रूला क्षणात चकमा देत परास्त करणारा डोरोनला नियतीसमोर हात टेकावे लागत होते. त्याच्यातील कडव्या सैनिकाला आता एरन आव्हान देत होता,


‘‘ आबा, तुम्हाला आता लढावे लागेल. आमच्यासारखी मुलं दुहेरी जन्मठेपेची शिक्षा अनुभवतात. पहिली शिक्षा आमचा देह आम्हाला देतो. आमच्यामुळे आत्मसन्मान गमावलेले पालक मग आम्हाला कुठल्यातरी मदतगृहात ठेवतात जिथे आम्ही भयाण मरणप्राय यातना आणि तिरस्कार अनुभवतो. आबा !! जसे इतर पालक आमच्या सारख्या मुलांकडे तिरस्काराने पाहतात तसेच तुम्ही माझ्याकडे पाहणार का ? इमा, तुझ्या उदास आणि निराशा भरलेल्या भकास डोळ्यांत मला प्रेम आणि आत्मीयता जाणवेल का ? चला तुम्हाला दाखवतो ते घाण,कोंदट आणि तिरस्कारांनी भरलेले मदतकेंद्र जिथे आमची उपेक्षा केली जाते. आबा, मी पण माणूस आहे रे तुझ्यासारखाच ! जास्त काळ नाही पण जेवढा जगेल तेवढाच तुमच्या मायेच्या छायेत मला जगू देशील का रे ? तू सैनिक आहेस न ? आता आपल्याच समाजातील अमानवी प्रथा व समस्यांच्या विरुद्ध लढशील का ?’’


शत्रूला जबर आव्हान देणाऱ्या डोरोनसमोर एरन त्याने स्वप्नात पण न पाहिले ते आव्हान उभे करत होता. तानखमध्ये (Hebrew Bible) मध्ये सांगितल्याप्रमाणे ईश्वराने ही भूमी अब्राहम आणि त्याच्या वंशजांना दिली त्यात एरेन पण होताच. आपल्या समाजातील असामान्य काम करणारे लोक अतिशय सामान्यपणे आपल्या अशा दुर्बल मुलांशी वागताना त्याने अनुभवले होते. त्याच्यातील योद्धा व एरनबद्दलचे अपार प्रेम त्याला मात्र वेगळ्याच पवित्र वाटेवर घेवून जात होते.


समाजातील अशा दुर्लक्षित व आर्त बांधवांशी समाजाच्या अमानवी व्यवहाराच्या विरुद्ध लढण्याचे अनोखे युद्ध आता डोरोन लढणार होता. मार्ग अतिशय अवघड होता पण इरेला पेटलेल्या डोरोनसाठी कसलीच गोष्ट अशक्य नव्हती. ज्या रुक्ष,भकास आणि तप्त वाळवंटात त्याने अनेक रोमांचक मोहिमा केल्या होत्या त्याच वाळवंटात त्याने आपुलकीचे व प्रेमाने ओथंबलेले व आस्थेची उब असणारे नवीन गावच उभा करायला घेतले. एरेनसारखे अनेक लहान मोठे लोक यांच्यासाठीचे आपले गाव ‘अलेह नेगेव’. पंचवीस एकर मोकळया जागेत नंदनवन उभे केले जात होते. अनोख्या पद्धतीने डोरोन सगळ्या आपल्या बांधवांचे आयुष्य सुंदर करत होता.


त्याची भावना व काम एवढे पवित्र होते की, चारी दिशांनी सर्व भेद विसरून मदत यायला सुरवात झाली. अतिशय नयनमनोहर गाव उभे राहिले.एरन मात्र फक्त वर्षभरच या गावात राहू शकला. त्याच्या देहातील चैतन्य देह सोडून या गावाच्या कणाकणात सामावले गेले. आता त्याचा कायमचा निवास होता डोरोनच्या काळजात. डोरोन आता अधिकच परिश्रम घेत होता. गावात येणाऱ्या प्रत्येक असाह्य बांधवात त्याला आता त्याचा एरन दिसत होता. गावात एक छोटीशी बालवाडी सुरु केली. ती होती अगदीच चांगल्या मुलांसाठी. त्यांच्यावर आपल्या आर्त बांधवाना सहजपणे स्वीकारण्याचे संस्कार डोरोन व त्याचे सहकारी करत होते.


इस्रायलमधील सर्वोच्य नागरी पुरस्काराने मेजर जनरल डोरोन अल्मोगला सन्मानित करण्यात आले. जगाच्या प्रसिद्ध व्यासपीठावरून आपली अफाट प्रेम आणि करुणेच्या विश्वातील कथा प्रचंड धीराने आणि धैर्याने सांगत असताना सगळे श्रोते अश्रूंनी ओथंबलेले होते. तो सांगत होता,


‘‘मला मिळालेला सन्मान हा खरं तर एरनला मिळालेला आहे. मी फक्त त्याच्या आयुष्याचा प्रतिनिधी मधून तो घेतला. आजच्याच दिवशी दहा वर्षांच्या पूर्वी एरन आम्हाला सोडून गेला. त्याने मला अधिक नम्र, कमी स्वार्थी व कमी मगरूर बनवले. एरन माझा सर्वात मोठा गुरु होता.’’


डोरोन अल्मोगचे बोलणे संपले. सगळे सभागृह टाळ्यांनी निनादत होते. डोरोन मात्र आता खूप वर्षांनी आपल्या अश्रूंच्या सहवासात पावन होत होता.



प्रकरण १३
ईश्वराच्या स्वप्नातील देश निर्माण करणारे लोक !

आपल्याकडे सुबत्तेची व्याख्या करताना कृष्णाच्या गोकुळाचे उदाहरण दिले जाते. ईश्वराने दिलेली दुधाची आणि मधाची भूमी असे इस्रायलचे जुन्या बायबलमध्ये वर्णन आहे. साहजिकच हे वाचताना मला तिथे नेमका पाऊस किती पडतो हे समजून घ्यायचे होते. सगळा काही अभ्यास केल्यावर मात्र एकदम अचंबित झालो. इस्रायलचा उत्तर भागात ४०० मिमी ते ५०० मिमी पाऊस पडतो व दक्षिण भागात(वाळवंट) १०० मिमी पाऊस पडला तरी कमाल झाली. पाण्याच्या दृष्टीने अतिशय समृद्ध असलेल्या उत्तर भागात आपल्या मराठवाड्यातील पावसापेक्षा कमी पाऊस पडतो. दक्षिण भाग म्हणजे वाळवंटात आपल्या देशात सगळ्यात कमी पाऊस पडणाऱ्या जेसलमेरपेक्षाही निम्माच पाऊस पडतो. थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्याकडे दुष्काळी भागात किंवा वाळवंटात जेवढा पाऊस पडतो त्याच्यापेक्षा बराच कमी इस्रायल मध्ये पडतो. त्यात अर्धे इस्रायल वाळवंट !! मग हा प्रदेश ईश्वराने दिलेला समृद्ध भाग कसा म्हणायचा ? असा मुळातील प्रश्न मनात घेऊन मी इस्रायलला गेलो होतो.

माझ्या पूर्ण प्रवासात पाण्याची वानवा मला अजिबात जाणवली नाही. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे वाया जाणारे किंवा घाण झालेलं पाणी पण अजिबात दिसले नाही. उलट मागील काही वर्षांत जागतिक हवामान बदलाचा सगळ्यात जास्त तडाखा मध्यपूर्वेतील देशांना बसला, त्यात इस्रायल येतो. इस्रायलची लोकसंख्या त्याच्या निर्मितीनंतर जवळपास ११ पट वाढली आहे. शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले. उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्यात कमालीची वाढ झाली.आज ‘पाण्यासाठी दाही दिशा ।आम्हा फिरविशी जगदीशा’ असे म्हणताना मात्र जगात इस्रायल पाण्याचे अधिक्य असणारा देश आहे. ते सर्व समजून घेताना मजा येत होती.


इस्रायलमधील पाण्याची मालकी ही व्यक्तिगत नसून ती राष्ट्रीय आहे. म्हणजेच पाणी हे राष्ट्रीय संपती आहे. पाण्याची चांगलीच किंमत मोजावी लागते मग ती पिण्यासाठी असो की शेतीसाठी किंवा उद्योगासाठी. पाण्याचे व्यवस्थापन अतिशय व्यवस्थित केले जाते. घरगुती,सार्वजनिक व उद्योगासाठी वापरात येणाऱ्या ८५ % पाण्याला शुद्ध करून शेतीसाठी वापरले जाते.प्रत्येक शहरात व गावात अशा शुद्धीकरण प्रकियेची व्यवस्था असते. शेतीसाठी लागणारे ६० % पाणी इथे चक्क सेकंडहँड पाणी वापरले जाते. शेतीसाठी पाणी देण्याची सगळ्यात किफायतशीर पद्धत म्हणजे ठिबक सिंचन . ही इस्रायलची जगाला दिलेली सगळ्यात मोठी भेट आहे. सिम्चा ब्लास व त्यांचा मुलगा येशा याहू या दोघांनी ठिबक सिंचनाचा शोध लावला. आज ११० देशात नेटाफिम हा त्यांनी सुरु केलेला उद्योग ठिबक सिंचनाचा मोठा व्यापार करतो.


अगदीच पाण्याच्या थेंबाथेंबाचे नियोजन केले जाते. शेतीतील पाणी वाया जाणार नाही किंवा त्याचे बाष्पीभवन पण होणार नाही यासाठी पॉलीहाउस,पॉलीटनेल आणि मल्चींग यांची देणगी पण इस्रायलने जगाला दिली आहे. शेतीबाबत अधिकचे तपशीलात लिहील.

प्रवास करत असताना काही फळझाडांच्या बुडाशी प्लास्टिकचे आळे दिसले. चौकशी केली असता कळले की झाडावर पडणारे दवबिंदू एकत्र करून ते पाणी पण वापरले जाते.


समुद्रातील खारे पाणी शुद्ध करून वापरण्याची किफायतशीर पद्धती इस्रायलने शोधून काढली आहे. जगातील सर्वात मोठा असा शुद्धीकरण प्रकल्प इस्रायल मध्ये आहे. असे अनेक प्रकल्प त्यांनी आपल्या समुद्रकिनारी उभे केले आहेत. शुद्ध केलेले पाणी पिण्यासाठी नागरिकांना दिले जाते. आज जगातील ४० देशांना या समुद्राचे पाणी वापरण्यासाठी इस्रायल मदत करत आहे. गंमत म्हणजे सगळ्यात जास्त पाणी निर्यात करणारा देश म्हणून इस्रायल भविष्यात असेल.सध्या अनेक अरब देशांत पाणीपुरवठा करण्यास इस्रायलने सुरुवात केली आहे.


इस्रायलमध्ये पावसाळा ऑक्टोबर ते मार्च असा सहा महिन्याचा असतो. जेव्हा कधी सागरावर ढग दिसायला लागताच इस्रायली हवामान खात्याची यंत्रणा सज्ज होते. काही क्षणात उपग्रहाच्या मदतीने ढगांचा आकार, त्यातील पाण्याची क्षमता अचूक समजून घेतली जाते. वाऱ्याचा वेग व दिशा नीट समजून घेऊन कृत्रिम पाऊस पाडणारे विमान आकाशात झेपावतात. आपल्या भूभागावर येणाऱ्या प्रत्येक ढगाला येथेच बरसावे लागते.


पाण्याच्यासाठी एक राष्ट्रीय प्रकल्प इस्रायल ने उभा केला आहे. 'नॅशनल वॉटर कॅरियर ऑफ इस्राईल 'हा इस्राईलमधील सर्वात मोठा जल प्रकल्प आहे. देशातील उत्तरेकडील गालील समुद्रापासून उच्च लोकसंख्या असलेले केंद्र व कोरडे दक्षिणेकडे पाणी हस्तांतरित करणे आणि पाण्याचा कार्यक्षम वापर सक्षम करणे आणि देशातील पाणीपुरवठ्याचे नियमन करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.


इस्रायलचे पहिले पंतप्रधान बेन गुरीअन हे आपल्या निवृत्तीनंतर वाळवंटात जाऊन राहिले. ते म्हणायचे,

‘‘बुद्धिमान सृर्जनशील ज्यू तरुण मुलांच्यासाठी वाळवंट हे खरे आव्हान आहे.’’

त्यांच्या प्रेरणेने अनेक तरुणांनी आपली कर्मभूमीची वाळवंट बनवली. इस्रायलमधील हा वाळवंटाच्या जागी कधी समुद्र होता. भूगर्भागातील पाणी काढून त्यांनी भूमीवर मोठी जलाशये निर्माण केली व त्यात मत्स्योद्योग सुरु केला. माशांची विष्ठा हे खूप चांगले जैविक खत असते. त्या खताच्या जोरावर त्यांनी आपली शेती आणि फळबागा फुलवल्या.

तुफान प्रयत्न व आपल्या कुशाग्र बुद्धीने व अफाट सृजनाच्या जोरावर आपल्या देशाचा पाणी प्रश्न तडीस नेला. आता या पाण्याबाबतच्या ज्ञानावर ते सगळ्या जगाला आपले मित्र बनवत आहेत. जगातील बहुतेक देश इस्रायलची मदत आपल्या देशाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी घेत आहेत. त्यातून इस्रायलसाठी निर्माण झाली मोठी बाजारपेठ.


बंजर व वाळवंटी आपल्या भूभागाला पाणीदार करून हिरवा शालू नेसवला. त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ईश्वराच्या वचन भूमीत खरोखर गोकुळ निर्माण केले. ‘ईश्वराच्या स्वप्नातील देश निर्माण करणारे लोक ! ’ असेही म्हटल्यास वावगे होणार नाही.

६ टिप्पण्या:

madhyam pr म्हणाले...

अप्रतिम लेखमाला

nisarg.maza म्हणाले...

जबरदस्त लेख

kapscool म्हणाले...

अप्रतिम, इजराईल उभा राहिला डोळ्यांसमोर...

kapscool म्हणाले...

ह्या पुढील प्रवास पण घडवा, लेखाच्या प्रतीक्षेत...

Unknown म्हणाले...

Very detailed explanation about Israiel.

प्रसाद चिक्षे (Prasad Chikshe) म्हणाले...

धन्यवाद सर्वांचे