भय ..?
भीती ...?
(भाग १ )
3 वर्षांचा असेल. वडिलांचा मृत्यू
झाला. तसे मृत्यू म्हणजे काय असते हे कळण्याचे वय ते नव्हते. शेजारच्या ताईने मला
अंत्ययात्रेचे दर्शन मात्र घडवले. मला फक्त काही चित्ररूप आठवणी लक्षात
आहेत.मनातून चांगलाच भेदरलेलो होतो. नकळत मनात एक अनाहूत भीती मात्र बसली. आमच्या
घराच्या समोरून बऱ्याच अंत्ययात्रा जायच्या. त्या मला दृष्टीस पडताच काही तरी भयाण
वाटायचे. अंगात कापरे भरायचे. आई किंवा आजी घरात असेल तर त्यांना पळत जाऊन
बिलगायचो. नसल्या तर परिस्थिती फारच बिकट असायची. घबराटीमुळे आलेला घाम, थरथरणारे शरीर आणि अगदिच वेगाने होणारा श्वासोच्छ्वास व हृदयाची
धडधड चांगलीच जाणवायची. महिन्यातून असा एकदा तरी असा अनुभव यायचा.
बाकी भुताखेतांची भीती मात्र कधी
अनुभवल्याचे लक्षात नाही. एकूणात भीती वाटल्यावर काय होते आणि त्याची जाणीव कशी असते हे फार लहानपणीच कळायला लागले. बराच काळ हे अनुभव घेत
होतो. पुढे हळूहळू या भीतीवर मात करता आली.
चवथीची परीक्षा झाली व
उन्हाळ्याच्या सुट्टीत भरपूर मजा केली. शाळा सुरू होणार याची वाट पाहत होतो. पण
अचानक एके दिवशी अंग खूपच दुखायला लागले. शाररिक वेदनेचा तसा अनुभव मी घेतलेला
नव्हता. चांगलाच आजारी पडलो. विषाणू संसर्ग होता. ताप चांगलाच महिनाभर कमी जास्त
व्हायचा. आईला शाळेत जावे लागायचे मग मी घरी एकटा. त्याच काळात नकळत मृत्यू बद्दल
विचार यायला सुरुवात व्हायची. मृत्यू नंतर काहीच नसणार. आपण संपून जाणार ही भीती
मनात काळाकुट्ट अंधार निर्माण करायची. यावेळच्या भीती मुळे शारीरिक बदल फारसे
जाणवायचे नाहीत पण भावनिक कल्लोळ मात्र प्रचंड असायचा. विचारांची वादळ पण खूप
असायची. भीतीची जाणीव आता मन आणि विचारांच्या पातळीवर घेत होतो. मन उदास आणि निराश
व्हायचे.औदासिन्यतेचा अनुभव भीती मुळे मी पहिल्यांदाच घेत होतो.
ह्या दोन्ही लहानपणाच्या अनुभवाने
खूप काही शिकवले. त्रास नक्कीच झाला. यातून सावरण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे
याचे प्रयत्न मात्र सुरू झाले. पुढे दहावीत गेल्यावर परीक्षेची भीती अर्थात
अपयशाची म्हणजेच मनासारखे झाले नाही तरची भीती अनुभवली. काही वेळा पलायन करून व
कारणे सांगून परीक्षा बुडवली पण. हे सर्व किती काळ चालणार होते ? भीतीला सामोरे गेलंच पाहिजे न असा विचात मनात चमकून गेला.माझे
प्रयत्न सुरू झाले. भीती वाटायली की देवा समोर जाऊन उभा राहायचे,भरपूर रडून मोकळे व्हायचे. भीतीचा विचार मनातून काढून टाकण्यासाठी
भरपूर खेळायचे. गात्र प्रचंड श्रम करून थकली की मन थोडं शांत होते. परीक्षेची भीती
जावी म्हणून रामरक्षा स्तोत्र व मारुती स्तोत्र म्हणू लागलो. असे वेगवेगळे प्रयत्न
चालू असायचे.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना
रात्री खूप वेळ जागायचो. अशाच एका मध्य रात्री आमच्या मुलाच्या हॉस्टेल समोरली
मोकळ्या मैदानावरील नळावर पाणी पाणी पिण्यासाठी गेलेलो. नळावर कुणीतरी पाणी पीत
होते. अंगात काळे कपडे होते. मी थोड्यावेळ थांबलो. ती व्यक्ती पाणी पिऊन बाजूला
झाली. मी पाणी पिऊ लागलो. तोच माझ्या पाठीवर कुणी तर हात ठेवला. मी मागे वळून
पाहतो तो प्रचंड मेकप असलेली ती काळ्या वेशातील तरुणी होती. ती विचित्र आणि भेसूर
हसली.मी मात्र कमालीची घाबरलो. अंगात असलेल नसेल तेव्हढ्या ताकदीने मी पळत माझ्या
खोलीकडे निघालो. दार मीच लावलेलं होते पण मला उघता येईना. मी सरळ हॉस्टेल मधील
संडासात लपून बसलो.जवळपास अर्धातास. यावेळची भीती काही तरी वेगळीच होती.ती व्यक्ती
नेमकी कोण होती हे मात्र कळले नाही. भीती मुळे शरीर,मन आणि बुद्धीवर झालेला परिणाम मात्र चांगलाच अनुभवला होता.
वेगवेगळ्या परिस्थितीत भीतीची भयाण
जाणीव मात्र चांगलीच अनुभवली होती.
आपल्याला नकोशी असणारी भय ही भावना
संपवता येईल का ? निर्भयता साधता येईल का ? असे काही प्रश्न त्यावेळी नव्हते पडले. आलेल्या परिस्थितीवर मात
करून पुढे जायचं एकवढंच माहित होते. बाकी प्रचंड भिलो आहे असे फारसे प्रसंग तो
पर्यँत तरी अनुभवले नव्हते.
पदव्युत्तर शिक्षणासाठी पुण्यात
होतो.ज्ञान प्रबोधिनीशी संपर्क आता. हळूहळू हे नाते घट्ट व्हायला लागले. किल्लारी
भूकंपातील काही अनुभव मात्र स्वतःचे परीक्षण करण्यासाठी खूप उपयोगी ठरले. त्यानंतर
अण्णासाहेब हजारेंचा स्वीय सहाय्यक म्हणून त्यांच्या उपोषण स्थळी म्हणजे आळंदीला
त्यांच्यासोबत मुक्कामी होतो.
"मी मृत्यूला घाबर नाही. निर्भयता हे
मूल्य मी जोपासले आहे. त्याचीच पूजा अर्चना केलेली आहे.भ्रष्टाचाराच्या विरुध्दची
ही लढाई आम्ही निर्भयपणे लढू !!"
अण्णांच्या बोलण्यातून अशा
वाक्यांची ओळख झाली. काय असते निर्भयता ? खरच माणूस भय मुक्त होऊ शकतो का ? असे अनेक प्रश्न मनात वादळ निर्माण करायची. अण्णा फक्त बोलत नाहीत
तर ते निर्भयता प्रत्यक्ष जगतात याचा अनुभव पदोपदी यायचा. नवल वाटायचे आणि कुतूहल
!! शेवटी एका निवांत क्षणी अण्णांना विचारले, " तुमची भीती कशी काय गेली ? तुम्ही एवढे निर्धास्त कसे ? काय करावे लागते यासाठी ?" माझे खूप सारे प्रश्न मी एका दमात सांगून टाकले.
अण्णा माझ्या चेहऱ्याकडे हसून पाहत
होते. ते शांत होते. मी मात्र प्रचंड उत्सुकतेने त्यांच्या बोलण्याची वाट पाहत
होतो.
निर्भयता समजून घेताना ...
(भाग २)
"अरे तुला का हा प्रश्न पडला ?" अण्णांनी मला हसत विचारले.
त्यांचे म्हणणे अगदीच खरे होते. मी
अगदीच रात्रंदिवस त्यांच्या बरोबर होतो. असा प्रश्न कुणीही त्यांना विचारलेला
नव्हता. मी विचारण्याची कारणं थोडी वेगळी होती.
काय बोलावे हेच मला कळत नव्हते. खरं
तर गेल्या दोन वर्षांपासून मी बराच गोंधळलेला होतो. त्याची दोन कारणं होती.
महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला
असताना मी अंबाजोगाईला चांगला एक महिन्यासाठी आलेलो होतो. आमच्याकडे एक नवीन
किरायदार राहायला आलेले. त्यांची एक मुलगी मला आवडू लागली. मी आपले प्रेम व्यक्त
करण्यासाठी माझ्या अनेक अनुभवी मित्रांचा सल्ला घेतला. ते अगदीच बिनधास्त होते या
बाबतीत. 'तू मला आवडतेस हे सांगायला थोडीच
फार मोठी शक्ती लागते ? ' हे त्यांचे अनुभवाचे बोल होते. माझी
मात्र हिंमत होत नव्हती. शेवटी एके दिवशी सांगायचे पक्के करून मी तिच्या कॉलेज
मध्ये गेलो. सोबत पत्र होते. मी कॉलेजात गेलो खरं पण माझ्या अंगाला चांगलाच घाम
फुटला होता. मी मुलांच्या गर्दीतून मार्ग काढत पुढे जात होतो खरा पण आता तोंडाला
कोरड पडली होती. समोर ती मुलगी दिसली आणि आता अंगात कापरे भरली. माझा स्वतःचा पाय
उचलणे मला जवळपास अशक्य झाले होते. ‘भ्रमंती वच मे मन’ असे काही तरी होत
होते. मी सरळ माघारी फिरलो. पळत पळतच घरी आलो.मला माझ्या भेकडपणाची प्रचंड लाज
वाटत होती. आपल्या मित्रांच्या सारखे आपण निडर किंवा बिनधास्त नाही तर भेकड भागू
बाई आहोत. अंग चांगलेच थरथर कापत होते. मी घरी आलो आणि प्रचंड रडत झोपी गेलो.
उठल्यावर थोडा सावरलो होतो. आपण इतके घाबरट कसे ? नेमकं काय कारण आहे आपण हे छोटे साधे दिव्य करू शकलो नाहीत.
कित्येक दिवस मी माझ्या भेकडपणाची समीक्षा करत होतो.
दुसरे आमच्या महाविद्यालयातील मित्र
अमोल कुलकर्णी फारच टेरर ...कसलीच भीती त्याला नाही असे वाटायचे. त्याच्या बद्दल
अपार कुतूहल होतं. कमरेला त्याच्या रामपुरी असायचा. महाविद्यालयातील इलेक्शन नंतर
प्रचंड भांडणे झाली. अमोलला मारण्यासाठी शंभराहून जास्त मुलं आलेली. त्यांनी सरळ
रामपुरी काढला. कुणाची हिंमत झाली नाही अमोलच्या जवळ जाण्याची.
मी ह्या दोन्ही अनुभवांचा खूप विचार
करत होतो.अण्णांची निर्भयता मला माझ्या कल्पनेतील निर्भयते पेक्षा वेगळी होती.
अमोल सारखा रामपुरी पण त्यांच्या जवळ नव्हता. निर्भयतेची छटा काही वेगळीच होती.
मला मात्र हे सगळे अण्णांना
सांगण्याची खरं तर हिंमत नव्हती.
"मी भित्रा आहे अण्णा !!. जे लोक मी
निर्भीड पाहिले आहेत त्यांच्या पेक्षा तुमची निर्भयता थोडी वेगळी आहे. तुम्हाला जे
जमू शकते ते मला जमू शकते का ?" मी माझ्यातील
सर्व शक्ती एकत्र करून डोळ्यातील आसवांचा साक्षीने अण्णांना उत्तर दिले.
"असे होय !! अगदीच सोपे आहे ना! विवेकानंदांचा अभ्यास कर मग जमेल." अण्णा हसतच म्हणाले.
"काय असतो विवेकानंदांचा अभ्यास? कसा करायचा? कुणी शिकवेल का ?" असे अनेक प्रश्न.
"कन्याकुमारीला जा तिथे विवेकानंद
केंद्र आहे; तिथे तुझा अभ्यास चांगला
होईल."
अण्णांनी मला मार्ग दाखवला. त्या
दिशेने जायचे का नाही हे ठरवायचे होते. एक मात्र नक्कीच कळले होते की तुम्हाला
काही समजून घ्यायचे असेल तर प्रचंड आस लागते. उगी कुतूहल म्हणून असे प्रश्न पडू
शकतात. मनात आस असली की मात्र तुम्ही झपाटून जाता. भयमुक्त किंवा निर्भयता
येण्यासाठी मनात ही आस असावी लागते.आपला तो स्वभाव बनणे यासाठीची ती सुरुवात असते.
स्वामी विवेकानंद फार छान म्हणतात, " तुमच्यात नचिकेताची श्रद्धा निर्माण झाली पाहिजे." मी असे
नाही म्हणणार की माझ्यात श्रद्धा निर्माण झाली होती. मनात मात्र आस होती. आतून
वाटत होतं की हे सगळे समजून घ्यावे. शिकले पाहिजे. दुसरे मी आता मनोमन स्वीकारले
होते की मी भित्रा आहे. आपण जे आहोत ते स्वीकारत नाहीत. एकदा स्वीकारले व
स्वतःमध्ये बदल करण्याची आस असली की मार्ग दिसायला लागतो.
मी कन्याकुमारीला जायचा निर्णय
घेतला. असा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला खूप काही सोडावे लागते. त्यासाठी मी तयार
होतो. विवेकानंदपूरम मध्ये प्रवेश करताच पहिले वाक्य दृष्टीस पडले,
‘‘Abhih, Abhih. We have to become Abhih, fearless, and our task
will be done. Arise, awake, for your country needs this tremendous sacrifice.’’
चांगला वर्षभर कन्याकुमारीतील
विवेकानंद केंद्रात राहून प्रशिक्षण घेतलं. भारतमातेचे चरण कमल, तीन सागरांचा गर्जना करणारा हुंकार आणि स्वामीजींच्या ध्यान भूमीत
मी निर्भयता म्हणजे काय हे समजून घेण्यास सुरुवात तर केली ....
निर्मळ आनंदापासून दूर राहायचे का ?
(भयाचे व्यवस्थापन)
भाग ३
कन्याकुमारीच्या प्रवासात मी
अल्बर्ट श्वाइट्जरचे चरित्र पूर्ण वाचून काढले. आफ्रिकेच्या जंगलात त्याने
रुग्णसेवा सुरु केली होती. जबदस्त काम होते त्याचे. त्याच सोबत सतत विचार मात्र
चालू होते. शेवटी कुठे तरी विचार थांबून प्रत्यक्ष प्रयत्न सुरू करणे गरजेचे होते.
माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मी सदा सर्वकाळ भयग्रस्त नक्कीच नसतो. त्याच बरोबर
भयाचा त्रास परिस्थिती व आपली क्षमता यावर अवलंबून असतो. भय म्हणजे माणसातील अदिम
भावना; म्हणजे हजारो वर्षांचे ते संचित.
त्याचे मुळातून अस्तित्व संपवणे थोडे अवघडच. भयाचे व्यवस्थापन मात्र नक्की करता
येते. त्यामुळे थोडं सजक आणि जागृत राहून स्वतःचे निरीक्षण करण्यास सुरुवात
केली.भीतीच्या व्यवस्थापनात हे जागृत असणे खूप महत्वाचे असते.
कन्याकुमारीतील विवेकानंदपूरमचा
परिसर खूपच रमणीय व शांत होता.माझे प्रशिक्षण सुरू होण्यास चांगलाच दोन महिन्याचा
अवकाश होता. दोन तीन दिवसांनी मला पहिले काम सांगण्यात आले. परिसराची स्वच्छता आणि
झाडांना पाणी देणे. मी ते आवडीनं करत होतो. त्याच बरोबर येणाऱ्या पर्यटकांना मदत
पण करत होतो.
काही दिवस झाल्यावर मात्र मला
स्वच्छतागृह साफ करण्याचे काम दिले. दुसऱ्या दिवशीपासून हातात ब्रश,बादली, ऍसिडची व साबणाची बाटली घेऊन मला
निघावे लागत होते. आता मात्र थोडं अस्वस्थ वाटत होतं. मी स्वतःचा चेहरा रुमालाने
पूर्ण बांधून घेतला. मला लोक भंगी तर समजणार नाहीत न ? मला स्वच्छता गृहातील घाणी पेक्षा लोकांची भीती वाटत होती. ते मला
काय समजतील अशी भीती. आधी मराठी आवाज कानावर पडला की मी मदतीसाठी त्यांच्याकडे जात
असे. आता मात्र मराठी आवाज कानावर पडला तर एकदम भीती वाटायची. कुठे कुणी ओळखीचे तर
नाही न ? आपल्याला संडास साफ करताना पाहिले
तर ? दोन तीन तासाच्या या कामात कधी कधी
माझी अस्वस्थता आणि भीती पराकोटीला पोहनचायची.मला हे काम नको हे सांगायची पण हिंमत
नव्हती. मला हे काम करताना अशी भीती आणि लाज वाटते असे पण सांगता येत नव्हते.
सांगितले तर केंद्रातील लोक काय म्हणतील ?
संध्याकाळी निर्वाणष्टक म्हणतात
मात्र छान वाटायचे. मी मग त्याचा अर्थ समजून घेऊ लागलो.याच सोबत एकनाथजीनी
लिहिलेलं सेवा साधना हे पुस्तक आणि स्वामीजींचे हिंदू तेजा जाग रे !! माझ्या
प्रश्नांना पहिले उत्तर मिळाले.
आपण जे काही करतो त्याचा हेतू शुद्ध
असला की आपल्याला वेगळीच ताकद मिळते. आपण जे काही काम करतो ती सेवारूप साधना आहे
समजून करायचं. त्यानंतर मात्र मी चेहऱ्याला रुमाल बांधणे बंद केलं. लोक काय
म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा मी जे काम करतोय ते अधिक चांगले आणि गतीने होईल
याचा विचार करायला लागलो. आपला हेतू जर शुद्ध असेल आणि प्रामाणिक असेल तर आपली
भीती नक्कीच कमी होते....
लोक काय म्हणतील ही भीती इतक्या
सहजासहजी जात नाही. त्यावर सतत प्रयत्न करत राहावे लागते. आपल्यातील भय हे
अहंकाराचे व स्वार्थाचे प्रतिरूप असते. अहंकार आणि स्वार्थ तर प्रचंड तपस्या करून
जात नाहीत.उलट कधीकधी तर साधने बरोबर ते वाढतात. स्वामीजींनी याला खूप छान उत्तर
शोधले आहे. आपला ‘स्व’ विस्तारित न्या !! ‘स्व’ चा विस्तार केल्यावर आपली ओळख
संकुचित न राहता व्यापक बनते.आपला स्वार्थ संकुचित न राहता व्यापक बनतो. मी प्रसाद
चिक्षे न राहता आता विवेकानंद केंद्राचा जीवनव्रती आहे. मी एका मोठ्या व्यापक
कामाचा भाग आहे. मी संडास साफ करतोय ते ह्या व्यापक कामातील महत्वाचे काम आहे.
व्यापक योजनेतील कुठलेच काम कमी नसते. त्यामुळे कामाची प्रतवारी करणे मी कमी
करण्यास सुरुवात केली. आता मात्र तेच काम करताना मजा येत होती.
विवेकानंद केंद्राचे नागेंद्रजी
त्यावेळी आमच्या प्रशिक्षणात खास लक्ष देत होते. ते स्वतः अमेरिकेच्या अंतराळ
संशोधन संस्थेतील जेष्ठ संशोधक. त्यांनी आम्हाला एक अभ्यास दिला. दररोज आपले
स्वतःचे निरीक्षण करून ते टिपून ठेवायचे. मग आठवडा भराचा आढावा घ्यायचा. ते करताना
मला अनेक गोष्टी जाणवल्या. भजन संध्येत भजन म्हणण्याची भीती. इंग्रजी मोठ्याने
वाचण्याची व बोलण्याची भीती. संस्कृत प्रार्थना म्हणण्याची भीती. भाषण करण्याची
भीती. समुद्राचे प्रचंड आकर्षण पण छोट्या बोटीतून स्मारकावर जाण्याची प्रचंड भीती
वाटायची. खरं तर रात्री शीला स्मारकावर राहणे म्हणजे मस्तच योग. खवळलेल्या
समुद्राच्या लाटांनी प्रचंड वेगाने यावे व शिलेवर आघात करावा. त्यातून उसळणारे
पाण्याचे थेंब वरून खाली येताना चकाकणाऱ्या मोत्यासारखे दिसतात. शीला स्मारकावर
राहण्याच्या अनुभव प्रत्येकजण भरभरून सांगायचा. मी मात्र चक्क तीन महिने शीला
स्मारकावर रात्र अनुभवण्याची हिंमत केली नाही. शांतपणे ते समजून घेताना मला लक्षात
आले की आपल्याला एकटे राहण्याची पण भीती आहे.
स्वतःचा अभ्यास करताना मनातील
दडलेल्या अनेक भीती मला जाणवत होत्या. त्यांची कारण मीमांसा केल्यावर लक्षात आले
की हे आपल्यामध्ये अनेक वर्षांपासून आहे. ठरवून मी एक एक गोष्ट समजून घ्यायला
लागलो व त्यावर उपाययोजना करायला लागलो. माझ्या लक्षात आले अरे जमतंय की. फारसे
अवघड नाही. चुका होतील म्हणून,लोक हसतील म्हणून, फजिती होईल म्हणून, पाण्यात बुडूत म्हणून आपण किती तरी छान गोष्टींचा आनंद घेण्यापासून
पारखे राहत आहोत. थोडा संघर्ष केला तर सहजच जमते की. ‘विचारांचा संघर्षच प्रत्यक्ष संघर्षा पेक्षा भयानक असतो.’ अशी उपरती झाल्या पासून मी अनुभव घेण्यासाठी मागे राहायचे नाही
ठरवले.
पोहता येत नसले म्हणून काय
समुद्राच्या लाटांशी मस्ती नाही करायची का ? सुरांची ओळख नाही म्हणून आपल्या जमेल तशा सुरात भजनात रंगून जायचे
नाही का ? असा विचार मी करायला लागलो. अर्थात
नागेंद्रजींच्या स्वतःच्या भीती तटस्थपणे समजून घेण्याच्या व त्यावर एक एक करून
मात करण्याची पद्धती मला भयाचे व्यवस्थापण करण्यास खूप उपयोगी ठरल्या.
भय किंवा निर्भयता ही मनाची स्थिती
आहे. त्यामुळे निर्भयता येण्यासाठी आपले मन चांगल्या विचारांने भरून आणि भारून
टाकणे. सद्विचार आणि सदभावना
सद्विचार आणि सदभावना सोबतच आपण करत
असलेले काम किंवा कर्म पवित्र भावनेने कर्तव्यतत्परपणे करणे म्हणजे सद्आचार...
ह्या सर्व विश्वाची अर्थात समष्टीची
व्यवस्था अतिशय सुनियोजित आहे. कारण या विश्वाच्या कणाकणाने परब्रह्म शक्ती
संचारीत आहे. त्या शक्तीची निर्मळ आणि नम्रपणे प्रार्थना केल्याने निर्भयता नक्कीच
वाढते.
आपण करत असलेले काम आपल्या
लोकांच्यासाठी देशाच्यासाठीची पुजाच आहे असे समजून करणे. असे विचार करणाऱ्या
संमित्रांच्या बरोबर नित्य संवाद आणि सहवास असणे म्हणजेच सत्संग यामुळे निर्भयता
वाढीला लागते.
सद्विचार,सदभावना,सद्आचार,सत्संग आणि प्रार्थना ह्या पंचसूत्रीचा वापर केल्यास निर्भयता
वाढीस लागते.
असा सगळा अभ्यास चांगला झाला पण ते
प्रत्यक्ष जगणे महत्वाचे असते. स्वतः अनुभव घेतल्यावर आपला मूल्यांवरील किंवा
तत्वांच्या वरील विश्वास वाढतो. असे अनेक अनुभव घेण्यासाठी मी अरुणाचल प्रदेशकडे
निघालो.....
निर्भयतेचा पहिला अनुभव ..
(भाग ४)
अरुणाचल प्रदेश म्हणजे शिवभूमी.
शिवाचे रूप ज्या ज्या अलंकारांनी नटले आहे ते सर्व अलंकार या भूमीला अलौकिक
सौंदर्याने नटवतात. त्याच्या मस्तकाच्या वरील जटांसारखी या भागाची भौगोलिक
रचना.नागमोडी वळणे घेत जाणारी रस्ते. त्याभोवती कीट्ट हिरवा अंधार भासवणारी घनदाट
जंगले. माणसाळलेल्या जगातील एखाद्या आगंतुकाला दिवसासुद्धा गुढ रात्रीची धडकी
बसावी अशी शांतता. सगळा आसमंत सृष्टीच्या अदभूत निर्मितीच्या अनाहत नादाने
झंकारतो. प्रचंड वेगाने उसळी मारत वाहणाऱ्या नद्या वं त्यांच्याशी एकरूप होणासाठी
उंचावून स्वतःला भिरकावून देणारे धबधबे. बांबूच्या वनातून मनाला रोमांचित करत एका
वेगळ्याच विश्वात नेणारा वेणूनाद निर्माण करत अंगात शिडशिडी भरवणारा वारा.
अथर्ववेदाची रचनाच नटराजाच्या गणांनी इथेच केली असावी. आपल्या क्षुल्लक अस्तिवाची
जाणीव करून देत स्वतःच्या जीवनाकडे साक्षेपी वृत्ती निर्माण करते ही शिवभूमी.
भीती, अस्वस्थता ज्या वेळी पराकोटीला जाते त्यावेळी विचार करणारा माणूस
त्यामागची कारणं शोधायला लागतो. ती कारणं शोधण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म. “मी” चा शोध. स्वतःच स्वतःला आधार
होण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म. “ स्व –भावा” चा शोध म्हणजे अधात्म.
अरुणाचल मधील दापोरीजो मधील
पावसाळ्यातील सकाळ. चहा घेत मी व जानिया बसलो होतो. तादो दुल्होम थोडा घाईतच
अरुणज्योती कार्यालयात आला. गडबडीतच व थोडया भेदरलेल्या अवस्थेत तो म्हणाला, “भैय्या, भैय्या कुपोरीजो स्कूल में एक बच्चा
मर गया I ”
जानिया व मी लगेच उठलो, “क्या बोलता है ?”
“सही में भैय्या विकेवी ( विवेकानंद
केंद्र विद्यालय ) में एक बच्चा मर गया,पुरे गाव में खबर है
I” नेहमी मस्ती करणाऱ्या बेदोच्या
(तादो दुल्होम)बोलण्यावर आमच्या दोघांचा
विश्वास काही बसत नव्हता.
बेदोने आईची शप्पथ घेऊन सांगितले की
बातमी खरी आहे. आम्ही तिघही मोटरसायकलवरून लगेच कुपोरीजोला निघालो.शाळेत पोहोचतो
बातमी खरी होती.
दुपार पर्यंत तकारचे वडील आले.
मृतदेह दापोरीजो मधील त्यांच्या भावाच्या घरी हलवण्यात आला. इकडे लहान मुलांमध्ये
खुपच भीतीचे वातावरण पसरले होते. त्यांना सावरण्याचा सर्वं शिक्षक कसोशीने प्रयत्न
करत होते.थोडी व्यवस्था लागल्यावर बेदो, जानिया व मी परत दापोरीजोला निघालो. अंत्यविधी दुसऱ्या दिवशी होता.
त्यामुळे आम्ही सर्वं जण कार्यालयात परत आलो.
सूर्य मावळतीला आला होता. एक
कार्यकर्ता कार्यालयात आला व म्हणाला, “वो मच्चा के लोग बहोत घुस्से में है उनका बच्चा मर गया न ? ....वो विकेवी( विवेकानंद केंद्र विद्यालय ) को बहोत गाली दे रहे है
....वहाँ तो एक भी टीचर नही है न .....उनको बहोत बुरा लगा वो बहोत गाली दे रहे है
......”
मी मच्चांच्या घरी निघालो. जानिया व
इतर कार्यकर्ते मला जाऊ देण्यास तयार नव्हते. त्यांना समजून सांगितले. पण त्यांचे
एकच म्हणणे, “सर मत जाओ, खतरा हो सकता है I ”
“चलो फिर आप सब लोग. वो लोग बी मेरे
भाईही है न मुझे कुच्छ नही करेंगे ..” मी असे म्हटल्यावर सगळेच जण माझ्या बरोबर निघाले. दहा बारा जण होतो
आम्ही. आम्ही मच्चांच्या घरी गेलो. वातावरणात थोडा ताण होता.
जानियाला मी सांगितले, “ रातभर यहाँ ही रुकेंगे.”
त्याच्या डोळ्यात थोडी काळजी होती.
त्याने बऱ्याच कार्यकर्त्यांना बोलून घेतले होते. ते मला कुठही एकटे बसू देत
नव्हते. शेवटी मी घरासमोरील मोकळ्या जागेत अनेक जणांबरोबर बसलो.
काही लोक चिडून म्हणाले, “ये ठीक नही हुंआ.”
मी पण मान डोलावली.
“आप लोग हमारे बच्चोंकी हिपासत ठीक
नही करता I उसको मार डाला आप लोगोने I ”
वातवरण एकदम गंभीर बनले होते.
“ऐसा नही है, वो तो हमारे भी तो बच्चे ही है न ?” मी शांत पणे उत्तर दिले.
“नही हमारे बच्चे, आपके कैसे हो सकते है? आप तो हिंदू है और बाहरसे आया है I”
आता अनेक जण जवळ जमा झाले होते.
वातावरणातील तणाव,भीती प्रचंड वाढली होती. मला मात्र
फारशी भीती वाटत नव्हती.मला खर तर माझच नवल वाटत होतं. अनेक वेळा मला अगदीच
छोट्याछोट्या गोष्टींची भीती वाटायची आज मात्र मी खूपच शांत होतो.
“आप जो बोल रहे है वो तो मैने सपने
में भी नही सोचा है ...आप सब मेरे भाई है....” मी
माझ्या मनातील शुद्ध भाव व्यक्त
केला.
“आप हमारे भाई हो ही नही सकते I आप बोल रहे है ना आप हमारे भाई है, तो फिर आप गाय मास खायेंगे क्या? जो हम लोग लोग खाते है ? थोडा नशेल असलेल्याला एका ने माझ्या समोर गाईचे मास खाण्याचे
आव्हान ठेवले.
आता सगळेच जण शांत होते. मी क्षण भर
विचार केला व उत्तर दिले, “क्यूँ नही जरूर खा सकता हूँ I”
“ए निजीर ( मुली ) थोडा गाय मास तो
लेके आओ, सर को खाने के लिये I” जवळील एका मुलीला त्याने आवाज देऊन गाय मास केळीच्या पानात मागून
घेतले.
सर्वं जण खुपच शांत होते. मी गाय
मास असलेले केळीचे पान हातात धरत सर्वांना म्हटले,
“मै खुदको सही साबित करणे के लिये ये
गाय मास नही खा रहा हूँ.... बल्की मेरे भाई मेरे सच्चाई के उप्पर शक कर रहे है और
उनका शक गलत हे I ये सिर्फ मुझे ही नही बल्की यहाँ के
सब लोगोंको मालूम है और खास करके आपको तो यह सच पक्का मालूम है I आपके मन में जो मेरे विवेकानंद केंद्रके बारेमे भ्रम पैद्दा हुआ है
उसको निकालाने के लिये ये मै जरूर खाऊगां I ”
असे म्हणत मी माझा हातात गाय मास
घेतले व खाणार हे पाहताच तो नशेतील इसम झटकन माझ्या कडे धावला व त्यांनी माझ्या
हातातील गाय मास हिसकावूनच घेतले व डोळ्यात पाणी आणून म्हणाला,
“मत खाओ.... मै गलत हूँ.... मैने ऐसा
नही बोलना चाहिये था l”
त्याने मला मिठीत घेतले व तो धाय
मोकून रडत होता मला पण रहावले नाही.....माझ्या डोळ्यातून ही अश्रूंचा पाट वाहू लागला.
आमच्या दोघांच्या मनातील निर्माण झालेलं किल्मिश त्या शुद्ध भावांच्या अश्रूंच्या
निर्झरात वाहून गेले.......
अरुणाचल मध्ये असो की पुढे माझ्या
कार्यक्षेत्रात मी असे अनुभव न डगमगता घेतले. छोट्या छोट्या गोष्टींना घाबरणारा मी
अशा परिस्थितीत का घाबरत नाही ?
तुमच्या भावना जर शुद्ध असतील तर
तुमच्यात हिंमत येते,निर्भयता येते.
निर्भयतेतून काय मिळते ?
(भाग ५)
अरुणाचल ......उगवत्या सूर्याचा
प्रदेश. भारताच्या ईशान्येकडील अचंबित करणारे देखणे सौंदर्य. दर दहा कोसाला भाषा
बदलते हे जर आजच्या जगात अनुभवायचे असेल तर नक्कीच अरुणाचलला गेले पाहिजे. भाषा, वेशभूषा, परंपरां मध्ये प्रचंड विविधता
आपल्याला आजच्या युनिकोडच्या जगात पाहायला मिळते.
उंच हिमालयाच्या कुशीत,घनदाट जंगलाचे पांघरून घेऊन नटलेला अरुणाचल. जंगलातील जैविक
संपत्तीबरोबर भूगर्भात दडलेले अपार भांडार, जलस्त्रोतांपासून हजारो मेगावॅट विद्युत निर्माण करण्याची क्षमता, इथल्या उंच पर्वतांमुळे संरक्षण दृष्ट्या अतिमहत्वाचा हा प्रदेश.
एकूणच ईशान्य भारत सर्वच दृष्टीने
खूप महत्वाचा. या भागाची ९६% सीमा ही पाच देशांना लागून असलेली आंतरराष्ट्रीय
सीमा. ३२ किमीच्या चिंचोळ्या भूभागाने तो आपल्या मातेशी जोडलेला. मग बलशाली
ड्रॅगनची वाईट नजर नेहमीच त्याच्यावर असणार. १९६२ मध्ये या भागाच्या अर्ध्याच्या
अधिक भूप्रदेशावर त्यांनी कब्जा केला. पण अतिप्राचीन परंपरेशी व संस्कृतीशी अतूट
नाळ असलेल्या येथील लोकजीवनावर झालेल्या राष्ट्रप्रेमाच्या संस्कारामुळे,महामेरू हिमराजामुळे व महाविस्तीर्ण ब्रम्ह-पुत्रमुळे माओच्या पुत्रांना इथून जावे लागले.
दांगेरीया बाबांची( शंकराची ),किरीतांची,हिडींबा,घटोत्कच, भीष्मक व रुक्मिणीची ही भूमी..
गुवाहाटीची कामाख्या ही कांचीकामकोटीच्या शंकराचार्यांची कुलदेवता. लाचीत बोर्फुकन
(Lachit
Borphukan) हा मुघलांशी मराठ्यांच्या
छाव्यासारखा लढला.
आपला भारत एकसंघ राहण्यासाठी आता
युद्धाची गरज नव्हती. प्रेमाच्या, आपुलकीच्या आणि
सेवेच्या अदृश्य धाग्याने समर्थ भारत उभा राहू शकणार होता.
अंत्यसंस्कार करून आम्ही कार्यालयात
परतलो. घडलेली घटना माझ्या मेंदूला एक वेगळेच आव्हान देत होती. रस्त्यावरून जाताना
कुत्रा मागे लागेल म्हणून घाबरून चालणारा मी ! पाल,सरडा,झुरळ यासारख्या अगदीच फारशी इजा न
करणाऱ्या जीवांना आपण घाबरतो. मग नेमकं असे काय होते की आम्ही आलेल्या संकटाला
शांतपणे सामोरे गेलो. माझं लहानपण तसे सरळ साध गेलेलं होतं. आपली छोटी टोळी करून
गुंडगिरी करणारे अनेक मित्र होते. टोळीत असताना एखादा काडीमुडी पहिलवान प्रचंड
निडर असल्यासारखा वागायचा. तोच जर एकटा असेल तर मात्र चित्र काही वेगळं होतं. ‘‘आमच्या गल्लीत ये मग दाखवतो तुझी.’’ असे म्हणणारे पण मी खुपदा पाहिले आहेत.
एकूणच एक गोष्ट मात्र लक्षात आली की
गटात असले की आपली भीती नक्कीच कमी होते. त्यात त्या गटाचे उद्देश चांगले असतील तर
अधिक निर्भयपणे आपण काम करू शकतो. विवेकानंद केंद्राचे अरुणाचल मधील काम अफाट
होते. अनेक कार्यकर्त्यांनी आपली उभी आयुष्य अरुणाचलच्या विकासासाठी खर्ची घातलेली
आहेत. त्यांच्या सर्वांच्या अनुभवांच्या कथा प्रचंड प्रेरणा देणाऱ्या होत्या.
व्यक्तिगत शुद्धभावाच्या सोबतच निस्वार्थपणे काम करणाऱ्या गटाचा,संस्थेचा किंवा संघटनेचा भाग होऊन काम केल्याने निर्भयतेचे अनेक
अनुभव तुम्हाला घेता येतात. अनेक आव्हाने तुम्ही सहज पेलू शकता.
तसे माझे वय फारसे नव्हते आणि सामाजिक
कामाचा फारसा अनुभवपण नव्हता. आपल्या कामाशी अनेक लोक जोडत जायचे हे मात्र चांगलेच
शिकत होतो. अनेक जिवाभावाची कार्यकर्ते सोबतीला होती. दिवसभर जंगलातून वेगवेगळ्या
गावी फिरायचो. दमछाक व्हायची प्रचंड. अरुणाचली बांधवांच्या घराच्या रचनेत अगदी
मध्यभागी सतत पेटलेली चूल असते. त्यातून निघणाऱ्या धुराच्या मुळे अगदीच प्रौढ वयात
अनेकांना डोळ्यांची समस्या जाणवते. अधिक माहिती घेतल्यावर कळले की नीट उपाय झाले
नाही तर अनेकांना मोतीबिंदू होतो. मी काही तरी करण्याचा विचार स्थानिक डॉक्टरांना
बोलून दाखवला.
“कशाला या फंद्यात पडतोस. आपले
शिक्षणाचे काम चालू देत. अरुणाचली लोक विचित्र आहेत. तू काही करायला जाशील. चुकून
जरी काही विपरीत घडले तर तुझ्या जीवावर बेतेल.” असा थोडा निर्वाणीचा सल्ला मिळत होता. आपल्या जीवाच्या भीतीने
चांगले काम करायचेच नाही तर मग काय चूप बसायचे.मी आमच्या जेष्ठ जीवनव्रतींना माझी
अस्वस्थता सांगितली.
‘‘अतिशय जोखीम आहे. खूप काम करावे
लागेल आणि अगदीच बारीकसारीक गोष्टी खूप काळजीपूर्वक कराव्या लागतील. मी इथे डॉक्टर
घेवून येण्याच्या व्यवस्था करतो. बाकी अर्थकारण व सगळी व्यवस्था तुला करावी लागेल.’’
‘‘हा मी तयार आहे आपण नक्कीच करू.’’
‘‘ लाग मग कामाला !! ’’
आश्वासकता असली की भय कमी होते !!
आम्ही डोळ्यांची तपासणी व
मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन केलेलं होते. चुकून जरी काही घडले तर
मात्र परिणाम एकदम वाईट होणार होते. माझ्या सोबतच्या अरुणाचली तरुणांना माझं
म्हणणं पटलं होतं. सामूहिक जबाबदारीने काम करण्याचे ठरले. मला एकदमच हलके वाटत
होते. सामूहिक जबाबदारी असली की भीती एकदम कमी होते.
नेत्र तपासणी व मोतीबिंदू
शस्त्रक्रिया शिबीर हे केवळ विवेकानंद केंद्राचे न होता पूर्ण जिल्ह्याचे
व्ह्यावे. ते सगळ्यांना आपले वाटावे म्हणून आम्ही
केंद्राचे संस्थापक आ. एकनाथजींची
योजना वापरली. त्यांनी विवेकानंद शिलास्मारक उभे करताना मानसी एक रुपया
स्मारकासाठी अशी योजना केली व त्यातून चार कोटी रुपये जमा झाली. आम्हाला चाळीस
हजार पाहिजे होते. मी ज्या भागात होतो तेथे तागीन,आदी व हिल्समिरी जनजातीचे लोक होते. त्यांच्यात आजीला आने व
आजोबाला आतो म्हणतात. आम्ही शाळेतून, महाविद्यालयातून, शासकीय
कार्यालयातून आवाहन केले की एका आने किंवा आतोच्या शस्त्रक्रियेसाठीचे एक हजार
रुपये जमा करून त्यांनी एका आजी आजोबांना दत्तक घ्यावे. काही दिवसातच जिल्हाभरातून
४५ हजार रुपये जमले.
नेत्र शिबिराचा व्याप फारच मोठा
होता. आधी सर्व जिल्हाभर प्रचार. मग दापोरीजो येथे नेत्र तपासणी. त्यातून
मोतीबिंदू असणारे रुग्ण सापडणे व त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून पुढे सात दिवस
त्यांची सगळी काळजी घेणे. खूप मनुष्यबळ व रचनाबांधणी आवश्यक होती. केंद्राचे अनेक
ज्येष्ठ जीवनवृत्ती दापोरीजो मध्ये दाखल झाले. शिबिराच्या दिवशी जवळपास हजारच्यावर
रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यातून ४७ जणांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायचे ठरले. महाविद्यालय व शाळेतील अनेक
तरुण लोक मदतीला होती. आम्ही पूर्ण जिल्हा रूग्णालयच ताब्यात घेतले. त्याचा पूर्ण
कायापालट केला. एकदम टापटीप झाले सगळे. दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया सुरु झाल्या.
त्यानंतर आने व आतोंची काळजी घेणे फार महत्वाचे होते.
जेवण, डोळ्यात औषध टाकणे, स्वच्छता इत्यादि २४ बाय ७ असे कामाचे नियोजन करावे लागले.
सात दिवस कसे गेले ते समजले नाही.
पण खूप काही शिकवून गेले. माझ्या सात पिढ्यांनी सुद्धा जे समजून घेतले नव्हते
त्याची प्रत्यक्ष अनुभूती या सात दिवसात झाली. आजी आजोबांचा निरोप घेताना मन दाटून
येत होते. पुढील काही दिवसांनी ते चष्मे घेण्यासाठी येणार होते.
सगळे कसे निर्विघ्न घडले होते. जीव
थोडा भांड्यात पडला होता. जर शस्त्रक्रिया झालेल्या आजी आजोबांनी नीट काळजी घेतली
नाही व संसर्ग होऊन त्यांची दृष्टीच गेली तर काय ? माझे मन आता अस्थिर होऊ लागले होते. १५ दिवसांनी चांगलीच भीती मनात
घेवून आम्ही जिल्हा रुग्णालयात दाखल झालो. सर्व व्यवस्था केली. चष्मा देणारा पण
दिब्रुगडहून आला होता. अकरा वाजेपर्यंत बरेच आजी आजोबा आले. त्यांचे डोळे तपासून
त्यांना चष्मा आम्ही देत होतो. प्रत्येक जण आता पाहू शकत होते. एक आजोबा तर उड्या
मारत म्हणत होते,
“कापा दो ! कापा दो ! कापा दो !” (म्हणजे मला दिसतंय).
काही आजींच्या डोळ्यातून पाणी येत
होते. काही खूप खुश तर काही खूप शांत.
माझ्या मनात मात्र त्या विलोभनीय
दर्शनामुळे निर्माण झालेल्या सार्थकतेची प्रसन्न शांतता होती...आता पर्यंत फार कमी
अनुभवली होती मी ती!
आज मात्र सगळेजण हसत हसत आपल्या घरी
गेले. बरोबर १७ दिवसानंतर अनेक रात्रीच्या जागरणामुळे मी थोडं जास्त वेळ व गुलाबी
थंडीत उबदार रजईत निद्रा देवतेच्या संपूर्ण अधीन झालो होतो.कसली भीती,चिंता नसली की झोप छान लागते.
खड खड खड खड कुणी तरी दरवाजा वाजवत
असल्याच्या आवाज आला. मी बघतो तो चांगलेच उजाडले होते. मी दरवाजा उघडला तो समोर एक
चष्म्यातल्या आजीबाई उभ्या. चेहऱ्यावर खूप सुरुकुत्या, अंगावर पारंपारिक तागीन कपडे.
मी आजीला नमस्कार केला व म्हटले,
“नो आने दोद्के” (आजी या बसा )
तो पर्यंत जानिया सोकी उठला होता.
त्याने आजीची विचारपूस केली. आजी दहा किलोमीटर वरून चालत आलेली होती. त्याने तिला
हालहवाल विचारले व येण्याचे कारण पण.
आजी आपल्या भाषेत म्हणाली,
“लेका, तुमच्या मुळे मला आता दिसायला लागले. फार अवघड झालं होत. बाहेरच
पडता येत नव्हत. सगळ आयुष्य परस्वाधीन पण आत्ता मला माझे सगळे काही करता येते.
तुम्ही माझी सेवा केली. एक रुपया पण घेतला नाही.”
जानिया मला ती बोलत असलेली वाक्य
डोळ्यात पाणी आणून सांगत होता.
आजी उठली व तिने आपल्या जवळच्या
कपड्यातून एक केळीच्या पानाची पुडी काढली व माझ्या हातावर ठेवत ती म्हणाली,
“मी तुला काही फार मोठ देऊ शकत नाही
पण आज तुझी आठवण झाली म्हणून हे तुझ्यासाठी घेऊन आले.”
जानियानी मला तिच्या भावना
सांगितल्या.
मी केळीच्या पानाची पुडी उघडली.
त्यात एक उकडलेले अंड होतं.
आज आठवण झाली म्हणून सकाळीच ४ वाजता
उठून दहा किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या आजीच्या चेहऱ्याकडे मी पहात होतो. मला
काय बोलावे हेच कळत नव्हते. फार अनोखी अनुभूती होती. मी याआधी मनाची अशी अस्वस्था
कधीच अनुभवली नव्हती.
भेकडपणे आम्ही जर असे चांगले काम
टाळले असते तर असा अनुभव मला तरी नक्कीच आला नसता. आता मात्र मला असे आव्हाने
निडरपणे स्वीकारण्याचा नादच लागला होता. मनाच्या त्या अनोख्या अनुभवासाठी ! असे अनेक अनुभव घेण्यासाठी !!
निर्भयतेने केलेले सामूहिक आणि
प्रामाणिक प्रयत्न माणसाला खूप काही देतात ....
बेलगाम थैमान घालणाऱ्या भयाचा अनुभव
...
(भाग ६)
भारत परिभ्रमणात असताना स्वामीजी
वाराणशीत होते. रस्ता अरुंद होता. लाल तोंडाच्या माकडे तिथे प्रचुर प्रमाणात होती.
स्वामीजींना जाताना पाहताच ते त्यांच्या मागे लागली. अचानक माकडांचे आक्रमण.
स्वामीजी घाबरून पुढे पळायला लागले. माकडे अधिकच विचित्र आवाज करत मागे. हे सगळं
एक वृद्ध साधू पाहत होता.
“अरे घाबरतोस काय !! त्यांचा सामना
कर !! सामोरे जा त्यांना !!”
वृद्ध साधूचे शब्द स्वामीजींच्या
कानावर पडले. ते त्यासरशी मागे वळले आणि माकडांच्याकडे धावून गेले. तो माकडांनी
तेथून पळ काढला.
स्वामी विवेकानंदांची ही गोष्ट मी
शाळेतील मुलांना खूपच रंगून आणि अभिनय करून सांगत असे. नकळत माझ्यावर पण त्याचा
संस्कार व्हायचा.
विवेकानंद केंद्राचे संस्थापक
माननीय एकनाथजी रानडे विमान प्रवासात असताना विमान खराब झाले. एकनाथजी एक विलक्षण
व्यक्तिमत्व. ते सरळ वैमानिकाला भेटले. त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले,
“घाबरू नका. मी हाती घेतलेले काम
ईश्वरी आहे. ते पूर्ण होई पर्यंत मी काही मरणार नाही. त्यामुळे विमान सुरक्षित
उतरेल !!”
कसला जबदस्त विश्वास !!
एखादे चांगले काम करताना ह्या
अनुभवांचे स्मरण केले की मनात प्रचंड ताकद यायची.
महाविद्यालयात असताना माझ्या एका
मित्राला इतर मित्रांच्या मोठा गट जबर मारहाण करत होता. मला नेमकं काय घडतंय याची
कल्पना नव्हती. मी मारहाण होऊ नये म्हणून असफल प्रयत्न केले. समुहात ज्यावेळी
हिंसा हाबी असते व ते अराजक वागत असतात त्यावेळी मनात निर्माण होणारी हतबलता व
भीती काही वेगळीच असते. होतंय ते चांगले नाही हे कळत असून आपण फक्त मूक साक्षीदार
बनतो घटनेचे. स्वतःची पण लाज वाटले आणि नकळत त्या अराजक समूहाची भीती. असे कित्येक
अनुभव मी घेतलेले होते.
दापोरिजोला जात असताना आसाम मध्ये
फसवल्या गेल्यामुळे प्रचंड चिडलेली तरुण युवक बस मध्ये चढली. अरुणाचलचा चेकपोस्ट
पार पडताच त्यांनी बसमध्ये भयाण गोंधळ सुरु केला. बस मधील आसामी आणि गोरखा
बांधवाना त्यांनी नाहक मारायला सुरु केले. काही लोक त्यांना थांबण्याचा प्रयत्न
करायला लागली तो ते त्यांच्यावर तुटून पडले. शिव्या आणि मारहाण...कधी कुणाला
मारतील हे सांगता येत नव्हते.
नेहमी खास खिडकीची जागा आधी आरक्षित
करून अरुणाचलचे देखणे सौंदर्य अनुभवण्यात मी स्वतःला विसरून जात असे. आज मात्र बस
मधील काळा हैदोस आपण प्रचंड असुरक्षित आहोत याची जाणीव करून देत होता. चालक व वाहक
कुठल्याही पद्धतीने ते सर्व थांबण्यास समर्थ नव्हती. त्या तरुणांचा आवेगच इतका
भयाण होता की बस मधील लहान लेकरं त्यांच्यातील सर्व सामर्थ्याने आक्रंदत होती.
इतका भयाण आणि असुरक्षित भोवताल मी आधी कधीच अनुभवला नव्हता.
अंधाराचे साम्राज्य आता बाहेर होतेच
त्याही पेक्षा भयाचा अंधार जास्तच गडद बस मध्ये होता. एका तरुणाने आपल्या हातातील
बांबूची काठी माझ्या कानाला लावली. मला त्याचा अजिबात अंदाज नाही अशा अविर्भावात
मी अगदीच चूप होतो. मनात मात्र आता आपला क्रमांक म्हणून भेदरला होतो.
“कुठला रे तू ? आणि कुठे चालला आहेस ?”
बराच वेळ शांत वातावरणात त्याचा
आवाज माझ्या कानाच्या जवळ घुमला !! मी त्याच्याकडे तोंड करून म्हणालो,
‘‘महाराष्ट्रातून आलोय. व्हीकेवी
कुपोरीजोला चाललो आहे.’’
‘‘ उठ इथून...आणि पुढे जाऊन उभा राहा
....’’ दुसऱ्या तरुणाने मला आदेश दिला. मी
शांतपणे उठलो आणि पुढे जाऊन उभा राहिलो. माझ्या जागेवर त्यातील एक तरुण बसला.
मारहाण टळली होती पण मनात भीती मात्र होती. थोडा सुटकेचा निश्वास सोडल्यासारखे
झाले होते. मी त्यांच्यापासून बराच लांब असल्याने मारहाण होण्याची शक्यता नव्हती.
बिथरलेली चार पाच तरुण भोवताल किती
भयभीत करू शकतात याचा अनुभव घेत होतो. विचार आणि भावना आता गोठल्याच होत्या.
मध्यरात्री बसार नावाच्या गावी ते तरुण उतरले. जाता जाता बसच्या काही काचा फोडून
गेले.
पूर्ण प्रवासात मी आनंदाने हसण्याचा,रंगलेल्या गप्पांचा अनुभव अजिबात घेतला नाही. भयाण निशब्द शांतता
आणि त्यावर चित्रित होणारा हैदोस मनात काळोखाचे घरटे करून ठेवत होता.
कसे जायचे याला सामोरे ? कसे थांबवायच्या अशा घटना ? कसे कोरे करायचे मनावरील भेसूर चित्रांना ? असंख्य प्रश्न .....उत्तर मात्र नाही.
काळ हे खूपच प्रभाव औषध आहे. काही
महिन्यानंतर सर्व काही पूर्ववत झाले.
२६ जानेवारी १९९६ सकाळचे झेंडा वंदन
विवेकानंद केंद्र विद्यालयातच केले. दापोरीजो मधील मुख्य कार्यक्रम रीजो मैदानात
होता. रीजो म्हणजे भूमीचा सपाट भाग. नेहमी शाळेतील कार्यक्रम झाला की विद्यार्थी व
शिक्षक सर्वजण या रीजो मैदानात मोठया उत्साहात पार पडणाऱ्या राष्ट्रीय सणाच्या
सोहळ्यात सहभागी व्हायचे. अख्खे गावच्या गाव २६ जानेवारी व १५ ऑगस्टला रीजो
मैदानावर असे. लहान मुलांपासून मोठया व्यक्तींपर्यंत अनेक लोकांचे अभिव्यक्ती
सादरीकरण व्हायचे. एकच जोश असायचा. ‘भारतमाता की जय’ व ‘जय हिंद’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमुन
जायचा. राष्ट्रगीत सुरु असताना सर्वजण खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचे.त्यानंतर
केशरी, पांढरा व हिरवा पारंपारिक वेश घालून
पोनुंग नृत्य करत महिला राष्ट्रध्वज अवतरित करायच्या. सर्व गावाचा तो सण. अशा
प्रकारे संपूर्ण गावाच्या सामूहिक देशभक्तीच्या अनुभवांनी मन शांत व प्रसन्न
व्हायचे.
आज हे सर्वं होणार नव्हते.
अरुणाचलच्या विद्यार्थी संघटनांनी २६ जानेवारी १९९६ या दिवसावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला
होता. शाळेतील झेंडा वंदन झाल्यावर मी दापोरीजोला निघालो. प्राचार्यांनी मला न
जाण्याचा सल्ला दिला. विद्यार्थी संघटनांचा बंद म्हणजे नक्कीच काहीतरी विपरीत
होणार. उन्मत्त,बेफिकीर आणि बेलगाम तरुणाच्या
सामूहिक हैदोस. माझे मन थांबायला तयार नव्हते. तर दुसरीकडे मागील प्रवासातील अंधार
काळजात अस्वस्थता निर्माण करत होता. काहीही झाले तरी चालेल पण यावेळी आपण हिंमत
करून जायचे.
‘‘ प्रसादजी तुम्ही स्वतःहून संकट का
घेताय आपल्या अंगावर ?’’ प्राचार्यानी मला परत काळजीने
विचारले.
मला माझ्या आईचे वाक्य आठवले. ‘अचाट शक्तीचे पुळचट प्रयोग.’
आज नक्कीच मी तसे काही करत नव्हतो.
भीतीने अनुभवापासून दूर जाण्यापेक्षा प्रत्यक्ष भीतीचा मुकाबला करा. एक दिवस
नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल. काही प्रकाशाचे किरण तुम्हाला मार्गदर्शनासाठी
नक्कीच मिळतील.
गावात पोहोंचलो तर सर्वत्र शांतता.
नेहमी दिसणारी वर्दळ एकदम अजिबात नव्हती. बाजार पूर्ण बंद. नेहमी या दिवशी खूप
मोठया प्रमाणात सजून धजून लोक रस्त्यावर येत. आज मात्र चिटपाखरू नव्हते. शांत
रस्त्यावर पोलिसांच्या गाडीचा सायरन घुमत होता. मी पुढे गेलो तर पोलिसांनी मला
अडवले. त्यातील काही ओळखीचे असल्याने त्यांनी मला काही न विचारता पुढे जाण्यास
सांगितले.
रीजो मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर
मुलांचा घोळका होता. ते कुणालाही मैदानाकडे जाऊ देत नव्हते. तितक्यात पोलिसांची
गाडी परत आली, मुलं तिथून पळाली. मी रीजो
मैदानाकडे निघालो आहे म्हटल्यावर पोलिसांनी मला ओळख पत्र विचारले. मी काही शासकीय
कर्मचारी नाही व मैदानात काही गडबड होऊ नये म्हणून कुठल्याही इतरांना रीजो
मैदानावर जाण्यास बंदी होती. त्यात मोटारसायकल घेऊन तर अजिबात नाही. त्यांनी मला
परत जाण्यास सांगितले.
“सर, बहोत दिकदारी है, आप वापस जाओ.
बच्चे लोक झमेला करेंगे तो गडबड होगा.”
मी कार्यालयात मोटारसायकल लावून
चालत रीजो मैदानावर निघालो. माझे सहकारी कार्यकर्ते पण आज माझ्यावर नाराज होती.
‘माझे वागणे अरुणाचल विरोधी होते. आज
सगळे लोक गुपचूप घरी बसले असताना तुम्ही मात्र मैदानावर जात आहेत हे बरोबर नाही.
भारत सरकार अरुणाचलच्या विरोधी निर्णय घेतंय त्याला तुमचा पाठींबा आहे असेच
म्हणायचे का ?’
एकटे पडण्याची भीती भयानक असते !!
'आज आपल्या सर्व भारतीयांचा सण आहे.
मी त्यात सहभागी झालो नाही तर मी अरुणाचली पण नाही आणि भारतीयपण नाही. तुम्हाला
माझे म्हणणे नक्की पटेल. भारतीय होण्यातच सच्चा अरुणाचली होण्याचा आनंद आहे.'
मी आज माझ्या जिवाभावाच्या
सहकाऱ्यांच्या मध्येच एकटा पडलो होतो. मनात तगमग होती पण जे होईल त्याला सामोरे
जायचे ठरवले होते.
मैदानात केवळ बोटावर मोजण्या ऐवढेच
सरकारी कर्मचारी होते. विद्यार्थी संघटनांचा बराच धाक लोकांमध्ये होता. ध्वजारोहण
होऊन राष्ट्रगीत सुरु झाले तर अचानक मोठमोठ्यांनी वेडे वाकडे आवाज लपून बसलेली
मुलं काढत होती. कुत्र्यां आणि डुकरांच्या शेपटीला फटाके लाऊन त्यांना मैदानात
सोडण्यात आले. सर्वं काही बदलल्यासारखे आणि विचित्र वाटत होते. मन हे सर्वं
स्वीकारायला तयार नव्हते. सर्वत्र हतबलता होती. राष्ट्रगीत संपले व मैदान पूर्ण ओस
झाले.
आज मनात काहूर होता. खूप अस्वस्थ
होतो. का घडले असे? मनात सारखे प्रश्न होते.
डोकं परत सुन्न झाले. २६ जानेवारीवर
बहिष्काराचा निर्णय हा तिराप व चांगलांग जिल्ह्यातील बांगलादेशी चकमा व हजोंग
निर्वासितांची हकालपट्टी अरुणाचल प्रदेश मधून करण्यासाठी होता. ९ जानेवारीला
न्यायालयाने या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय दिला होता. या
निर्णयाला विरोध व चकमा व हजोंग निर्वासितांची हकालपट्टी यासाठी हे आंदोलन सुरु
झाले होते.
माझे अस्वस्थ मन मला काही शांत बसू
देत नव्हते. मी जिल्हा ग्रंथालयात जाऊन या बद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली.
चकमा व हजोंग हे मूळ पूर्व पाकिस्तानातील चितगाव हिल्स भागातील बौद्ध नागरिक.
तेथील त्यांची जमीन खूप सुपीक. त्या भागात पूर्व पाकिस्तानी शासनाने कर्नाफुली (Karnaphuli) नदीवर १९६० मध्ये काप्ताई (Kaptai) धरण बांधण्याचा निर्णय घेतला व त्या
धरण्याच्या पाण्याखाली चकमा व हजोंग लोकांच्या जमिनी बुडाल्या. या सर्वाला चकमा व
हजोंग यांचा विरोध होता. त्यांच्या विरुद्ध मोठा हिंसाचार घडून आणून त्यांना
देशातून परागंदा होण्यास भाग पाडले. चकमा व हजोंग निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे
भारतात येऊ लागले.
अरुणाचल मधील दियुम (Diyum) भागात मुख्यत्वे करून त्यांचे पुनर्वसन भारत सरकारने केले.
त्यावेळी अरुणाचलला राज्याचा दर्जा मिळाला नव्हता. आता त्यांची संख्या चांगलीच
वाढली होती व त्यांना नागरिकत्वाचे सर्वं अधिकार द्यावेत असा निर्णय न्यायालयाने
दिला. अरुणाचल मधील अनेक लोकांना हे रुचणारे नव्हते. त्यातल्या त्यात ते ज्या
भागात होते त्या भागातील राजकीय पुढाऱ्यांचे भविष्य पण धोक्यात येणार होते.
त्यातून एक सामूहिक भय निर्माण करण्यात आले. यामुळे अशा प्रकारचे आंदोलन होईल असे
मात्र वाटत नव्हते. मी मग या आंदोलनावर असलेल्या परिणामकारी घटकांचा अभ्यास करायला
लागलो. यावर नक्कीच काही तरी केलं पाहिजे यासाठीची तयारी करत होतो......
हो आणि मला बेलगाम,हैदोस घालणाऱ्या तरुणाईला त्यांच्यातील सामूहिक भय संपवून निर्माणाचा मार्गावर आणण्याचा मार्ग सापडला. मी आता अधिकच वेगाने
पुढील योजना तयार करू लागलो....
आधार अश्रू .....
(भाग ७)
भय रहित जगण्याची ओढ म्हणजे
अध्यात्माची ओढ.काहीतरी अनाकलनीय अशा भयाने आपल्याला पूर्णतः संपून टाकलेले असते
त्यावेळी एक भयाण पोकळी आपल्या काळजात निर्माण करते. गात्रांमध्ये एक वेगळेच कापरे
भरते,स्वस्थ बसता पण येत नाही. कुठलासा
तरी त्याला आधार हवा असतो आणि तो ही जीवंत बोलणारा, आपला वाटणारा. त्याचे नसणे त्याला अधिकच अस्वस्थ करते आणि शेवटी
त्याचा तोच स्वतःचा आधार बनतो.वाट काढतो त्या अंधाऱ्या,अदृश्य,अनाकलनिय भयातून.तो मार्ग करून देतो भावनांना आपल्या अश्रूंच्या
द्वारे. अश्रू म्हणजे मानवी निर्मितीतील निसर्गाचा एक अदभूत चमत्कारच. निरभ्र
मनावर ज्यावेळी काळोख्या अक्राळ,विक्राळ ढगांचे
आवरण चढते व त्याचे निर्मळ निळेपणच संपते त्यावेळी त्या काळ्या मेघातील अश्रू बरसू
लागतात. अश्रू म्हणजेच जिवंतपणाची खुण. त्यामुळे नवी हिरवाई निर्माण होते नव्या
उमेदी निशी. सहज कल्पना करतो जर अश्रू ही देणगी माणसाला नसती तर ?
अचानक मला दिब्रुगडहून तातडीने
बोलावण्यात आले. मनात आता विचारांनी थैमान घालायला सुरवात केली.
"आपलं काही चूकलं तर नाही न ? आपण काही चुकीचे तर केले नाही न ? आपल्याला आता परत कन्याकुमारीला पाठवणार किंवा एकदम घरी .....? कार्यक्षेत्रातून असे अचानक परत बोलावण्याची कारणं काय असणार ? "
असे खूप सारे विचार डोक्यात घेवून
मी निघालो खरा पण रात्रभर बस मध्ये झोप काही लागली नाही. बाहेर प्रचंड पाऊस पडत
होता. दुथडी भरून वाहणाऱ्या ब्रम्हपुत्रच्या पात्रातून प्रवास करत दिब्रुगडला
पोहोंचलो. तयार होऊन कार्यालयात गेलो.
‘‘काही तरी खाऊन घे मग बोलू आपण.’’
कार्यालय प्रमुख असलेल्या जेष्ठ
जीवनव्रती भूषणजींनी मला थोडं गंभीर चेहऱ्याने सांगितले. मला अजूनच जास्त धडकी
बसली. माझं जेवणात अजिबात लक्ष नव्हते. मी कसे तरी घास गिळत होतो. कसली भीती वाटली
की माझ्याकडून हे नकळत होत असे. खिडकीतून बाहेर पडणारा मुसळदार पाऊस व विस्तीर्ण
ब्रम्हपुत्र मनात भीतीचे काहून अजूनच वाढवत होते.
‘‘ सांगा भुषणजी ...मला इतके तातडीने
का बोलावले ?’’
भूषणजी माझ्या जवळ येवून बसले.
त्यांनी जवळील कागद माझ्या हातात ठेवला.
"इटानगरला गेला होता. तिथल्या
ऑफिसमधून इकडे यायला थोडा वेळ झाला. पण इथे येताच मी
तुला इकडे येण्यासाठी तातडीने निरोप
पाठवला."
मी थरथरतच तो कागद उघडला. तो होता
टेलिग्राम ( तार ) दहा दिवसांपूर्वी आलेला.
‘‘Start immediately mother is serious.’’
माझ्या मामाने मला केलेला होता.
भूषणजीनी माझा हात हातात घेतला.
‘‘तुझ्याकडे घरील कुणाचा फोन नंबर आहे
का ? आपण फोन करून बोलू त्यांना.’’
माझ्या मामाचा फोन नंबर माझ्याकडे
होता.आम्ही खुपसे प्रयत्न केले पण फोन लागत नव्हता. मी विचार करत होतो त्या पेक्षा
वेगळे कारणं होते पण ते अजूनच मनात भय निर्माण करणारे होते. मनात आता नाही नाही ते
विचार येण्यास सुरवात झाली. डोळ्यासमोर आई उभी राहात होती.
भूषणजी सतत प्रयत्न करत होते पण
व्यर्थ !! शेवटी गावातील STD बूथ वरून फोन लावण्यासाठी मी बाहेर
पडलो.
पडणाऱ्या पावसाला आता माझ्या
डोळ्यातील अश्रू आव्हान देत होते.
‘‘बघू तू जास्त बरसतोस की मी ?’’
माझ्या हातातील छत्री नीट धरण्याचे
भान पण माझ्यात नव्हते. मी पूर्ण भिजून गेलेला होतो आणि चांगलाच कुडकुडत होतो.
दिसे-भासे ते ते सारे-विश्व नाशिवंत,
मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा,
दुःख मुक्त जगला का रे- कुणी जीवनात?,
क्षणिक तेवी आहे बाळा- मेळ माणसांचा,
वियोगार्थ मिलन होते- नेम जगाचा
पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा..
आई लहानपणी आम्हाला झोपवताना गीत
रामायणातील हे गाणे म्हणायची. आज ते प्रकर्षाने कानात घुमत होते. STD बूथ वरून दोन तास प्रयत्न केल्यावर मामाला फोन लागला.
‘‘आई कशी आहे ?’’ फक्त एवढेच बोलू शकलो.
‘‘काळजी करू नकोस. आई एकदम ठीक आहे.
आईचे ओपेरेशन यशस्वी झाले. तिचे गर्भाशय काढण्यात आले. आता ती हॉस्पिटलमधून
माझ्याकडे आली आहे राहायला. काळजी करण्याचे काहीच कारण नाही.’’
मी फक्त ऐकत होतो.
ब्रम्ह्पुत्रच्या भयाण पुराने सगळेच
उध्वस्थ केले होते. रस्त्यावरील ब्रिज वाहून गेलेले होते. वाहतूक ठप्प होती.
रेल्वेसेवा आणि विमानसेवा पूर्णतः थांबलेली होती.
सतत वाहणाऱ्या अश्रूधारा कोरड्या
पडल्यावर वास्तवाची जाणीव होते आणि सुरु होतो भीती व दुःख विरेचनाचा प्रवास....
मरता मरता वाचलो ......
(भाग ८ )
मला काही आईला भेटायला जाता येणार
नाही हे आता मनाशी पक्के झाले होते. आईशी फोनवरून बोलणे झाले. तिच्या प्रकृती
मध्ये बरीच सुधारणा आहे हे कळवल्यावर थोडा धीर आला. बाहेर पडणारा प्रचंड पाऊस आणि
गेल्या काही दिवसांपासूनचा मनातील काल्पनिक हैदोस खूप काही शिकवत होता. मी चक्क
कागदावर मला कशाची भीती या काळात वाटत होती याची यादी केली तर ती चांगलीच मोठी
झाली. ती यादी समजून घेताना माझ्या कल्पना शक्तीचे भय वाढवण्यात किती महत्वाचे
स्थान आहे ते लक्षात आले. आपण आणीबाणीच्या परिस्थिती असलो की असे नेहमीच घडते.
नकळत आपल्या अनुभवातून तयार झालेल्या धारणाच्या आधारे आपण स्वतःशीच अशा वेळी बोलत
असतो. मानसशास्त्रीय भाषेत त्याला Self-talk असे म्हणतात. भयाच्या व्यवस्थापनात Self-talkचे व्यवस्थापन करणे खूपच गरजेचे असते. अगदी सुरवातीला ते करणे खूपच
अवघड जाते किंवा आपण अगदीच चूक पद्धतीने ते करतो. मी तर ते अगदीच अतिरेकी पद्धतीने
करत असे.
लहानपणी एकटाच क्रिकेट खेळत बसायचो
कित्येक तास. महाविद्यालयात गेल्यावर मात्र खेळ कमी झाला. भयभीत किंवा अस्वस्थ
झालो की स्नानगृहातील पाण्याच्या शॉवर खाली जाऊन उभा राहात असे. कापरं अंगात
भरल्यावर मग दात कुडकुडायला लागत व भावनांची व विचारांची आंदोलने कमी होत.
थंडाव्याची जाणीव असह्य झाल्यावर मग ओल्या कपड्यानिशी आपल्या खोलीत येवून लाकडी
खुर्चीवर शांतपणे बसून राही.एखादी जोरात शिंक येई मग अजून बर वाटे. हळूहळू तर
शिंका ही माझी ओळख बनली. शिंकानी थकून जाऊन विचार व भावना पण शून्य होत.
कन्याकुमारील असताना आमच्या
प्रशिक्षणाचे प्रमुख रमणमूर्ती सुरवातीला खूपच मनाला लागेल असे बोलायचे. ते काय
बोलतील याची भीती वाटायची. सकाळी वेळेवर उठलो नाहीत. कामात एखादी चूक झाली. जेवण
वाढत असताना गडबड झाली की त्यांचे बोचरे बोलणे. त्या बोलण्याची आणि अगदीच त्यांची
पण भीती वाटायची. भावनांना भरती आली की प्रचंड आवाज करत, उसळत किनाऱ्यावर आदळणाऱ्या सागराच्या लाटा अंगावर घेत त्यांना
आव्हान द्यायचो संपवा मला. तुमच्या वेगात शक्ती आहे की माझ्या भावनिक आवेगात.
सुरुवातीला माझी हार व्हायची व धरणीच्या कुशीत पडायचो. उठून परत त्या अजस्त्र
लाटांना आव्हान द्यायचो. सागरी
किनाऱ्यावरील या द्वंदात शांत
झाल्यावर नित्यक्रमात सामील व्हायचो.
अशा चुकीच्या पद्धतीने भयाचे व्यवस्थापण
तात्पुरते व्हायचे. ते काही रामबाण उपाय नव्हते. उलट त्यातून शारीरिक व्याधी मात्र
मागे लागल्या.
अरुणाचल मधील युवकांच्या हिसंक
वागण्यातून नकळतपणे माझ्या मनात भीती बसल्याची जाणीव मी दापोरिजोच्या बस मध्ये
बसलो की लक्षात आली. मी बसलेल्या लोकांमध्ये तरुणाचा गट तर नाही न हे पाहत होतो.
काही अनुभव आपल्या मनात चांगलेच घर करून बसतात याचा चांगलाच अनुभव आला. शांत झोप
लागणे थोडं अवघडच होती. आधी घाटांच्या रस्त्यांवरून बस जाताना एकदम थ्रिलिंग
वाटायचे. आज मात्र अवघड वळण घेत असताना पोटात गोळा येत होता. मध्यरात्री मात्र झोप
लागली.
अचानक बस मध्ये गोंधळ सुरु झाला. मी
उठतो तो लक्षात आले काही तरी गडबड झाली आहे. बस मुख्य रस्ता सोडून दरीत घसरली
होती. लोकांमध्ये प्रचंड घबराट होती. दरीतील मोठ्या झाडामुळे ती अधिक खोलवर मात्र गेली नव्हती. बाहेर
पाऊस आणि अंधार !! मी स्वतःला सावरले ....आपण मरता मरता वाचलो हे लक्षात आले.
गाडीच्या काचा फुटून इजा झाल्याने चेहऱ्यावरून रक्त वाहतंय याची जाणीव झाली. आता स्वतःला सुखरूप बसच्या बाहेर काढणे गरजेचे होते. प्रत्येकजण हाच
प्रयत्न करत होता. मी थोड्या मोठ्या आवाजात ओरडलोच,
“अरे भाई धोका नही है I सब लोग धीरज रखो I पहले छोटे
बच्चोंको और औरत लोगोंको बाहर निकालेंगे I”
माझ्या बोलण्यात जोर होता आणि जरब
पण होती. नकळत मी माझ्या हातात नेतृत्व घेतले. गाडीची मागची काच नीट फोडली.
त्यातून मुलांना व स्त्रियांना बाहेर काढले. मग नंतर आम्ही बाहेर पडलो. सगळे जण
सुखरूप बाहेर पडलो. बाहेर आल्यावर मात्र चांगलीच धडकी बसली. ते झाडं नसते तर आज
कुणीही वाचले नसते. मला माझ्या वागण्याचे मात्र कुतूहल वाटत होते. इतक्या संयमाने
आपण कसे सगळे सहज केले ? असाच संयम, धीर, विश्वास आणि खास करून निर्भयता
नेहमीच आपल्यात आली तर काय मस्त होईल !!!
आता पुढील काही काळ निवांत बसण्या
शिवाय दुसरे काहीच काम नव्हते. मी आपले माझ्या मनातील अरुणाचली तरुणाची, रस्त्यांची व प्रवासाची भीती काढण्यासाठी काय केले पाहिजे ?....एकंदरीतच भयभीत झाल्यावर त्याच्या परिणामांची आपल्या सुप्त मनातील
तीव्रता
नरकाचा रस्ता.....
(भाग ९)
दापोरीजो आणि परिसरातील तरुणाशी
संपर्क सुरू केला. गप्पा गोष्टी करता करता संवादाला सुरुवात झाली. त्यांचे
भावविश्व समजून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. माझ्यासारख्याच अनेक भीती त्यांच्यात
होत्या. त्या व्यक्त होताना मात्र आक्रमकता यायची.बोली भाषेत शिव्या नसल्यात जमा.
त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून आक्रमकता व्यक्त व्हायची नाही. त्यामुळे सहजच
चिडचिड झाली की त्याचे रूपांतर सरळ मारामारीत व्हायचे. प्रचंड ताकद आणि काटक शरीर.
त्यांच्यातील उर्जेला सकारात्मक अभिव्यक्ती नाही मिळाली की ऊर्जा स्वार्थी राजकारणी
लोकांची हत्यारं बनायची. आपल्या सारख्या न दिसणाऱ्या भारताच्या इतर भागातील
लोकांच्याकडून ( नेपक ) मिळालेली क्रूर वागणूक त्यांना अधिकच आक्रमक बनवायची.
त्यात जर शिक्षणासाठी पूर्वांचल सोडून इतर भागात गेल्यावर
"तुम्ही नेपाळी आहेत की चिनी ?"
असे विचारल्यावर त्यांच्या काळजावर
झालेला आघात त्यांच्या मनात भेदांची दरी निर्माण करायचा. मुंबई,दिल्ली,कोलकता, पुणे सारख्या शहरातील भौतिक प्रगती पाहिल्यावर आपला मागासलेपणा
त्यांना जास्तच जाणवायचा.
असे अनेक कारण मी समजून घेत होतो.
तसे मनानी खूप लाघवी,प्रेमळ असतात ही मुलं. त्यांच्या
सोबत भरपूर फिरलो.खरा अरुणाचल समजून घेत होतो.शिबिरं,साहस सहली,पदयात्रा आणि खेळ यांच्या सोबतच
हिंदीतील देशभक्तीपर गीते त्यांच्याकडून भाषांतरित करून घेत असताना त्यांची भाषा
पण मला आता समजायला लागली होती. खूप काही शिकवले त्यांनी मला. मी जर भिऊन
त्यांच्याशी मैत्र जोडण्याचा प्रयत्न केला नसता तर खूप काही मुकलो असतो मी.
योगायोगाने याच काळात माझ्या कामाचे
स्वरूप बदलले. विवेकानंद केंद्र शिक्षा प्रसार विभागात मला शाळेतील तरुण मुलांच्या
सोबत काम करायला मिळाले.
आता माझ्या मनात एक अवघड आणि जबदस्त
आव्हानाला या तरुण मित्रांच्या सोबत सामोरे जावे असे वाटत होते.
त्याच्या सोबत भारतातील मोठ्या
शहरात जाण्यापेक्षा आपण म्यानमारला जायचे. भारतातून म्यानमारला जाणाऱ्या अतिशय
अवघड रस्त्याबद्दल मी वाचले होते. भीती वाटेल असेल आव्हान सामूहिकपणे करायचे ठरले
तर भीती कमी होते.
दुसऱ्या महायुद्धात जनरल जोसेफ
वार्रेण स्टिलवेल चीन –ब्रम्हदेश –भारत व थायलंड या भागातील मित्र राष्ट्रांच्या सेनेचा प्रमुख झाला.
त्याने या भागाचा भौगोलिक अभ्यास प्रचंड केला व जपान विरुद्ध रणनीती आखली. डिसेंबर
१९४२ मध्ये त्याने पुरवठ्याची सेवा 'Service of Supply' (SOS) म्हणून १७२७ किलोमीटर लांबीचा रस्ता बनवायचे काम युद्ध पातळीवर
हातात घेतले. अतिशय निष्णात लोकांना त्यांनी या कामासाठी नेमले. भारतातून हा रस्ता
अरुणाचल व आसाममधून ६१ किलोमीटर लांबीचा जातो. पुढे या रस्त्याचे नामकरण स्टिलवेल रोड म्हणून करण्यात आले.
सकाळी पाच वाजता सगळे तयार होते.
सहाच्या आसपास बिहार रेजिमेंटच्या दोन शक्तिमान (मोठया ट्रक) आल्या. आज आम्ही स्टिलवेलरोडहून म्यानमार मध्ये जाणार होतो. जयरामपूर सोडले व
नामपोंग (Nampong) साठी निघालो.
नामपोंगला (Nampong) बिहार
रेजिमेंटच्या कमांडरचे कार्यालय होते. त्यांच्याशी आम्ही भेटलो व मग पंगसौ पास (Pangsau Pass) ह्या स्टिलवेलरोडच्या १२ किलोमीटरच्या अतिशय दुर्गम भागातून आम्ही
जाणार होतो. दोन देशातील सीमेवरचा रस्ता असल्याने खूप काळजी घ्यावी लागणार होती.
आमच्या बरोबर आमच्या एवढेच किंबहुना जास्तच असतील एवढे बिहार रेजिमेंटचे सैनिक, अर्धे आमच्या गटाच्या पुढे व अर्धे आमच्या गटाच्या पाठीमागे असा
आमचा पायी प्रवास सुरु झाला.
आम्ही ज्या रस्त्याने प्रवास करणार
होतो त्याला नरकाचा रस्ता ("Hell gate" or "Hell
Pass") असे दुसऱ्या महायुद्धात म्हटले
जायचे. घनदाट जंगलातून या रस्त्याने जाणे खुपच धोकादायक होते. कमांडर सरांनी
दिलेल्या सर्वं सूचनाचे पालन करत आम्ही शांतपणे निघालो. मी मुलांना जाताना काही
किस्से त्या रस्त्याचे,जनरल स्टिलवेल बद्दल व एकंदरीत काही
ऐतिहासिक घटनांबद्दल सांगत होतो. ३ ते ३.३० तासांचे ते अंतर तसे अरुणाचलच्या
मुलांसाठी फार अवघड बाब नव्हती.
नामपोंग (Nampong) पासून हा सुरू झालेला रस्ता म्यानमार मधील पंगसौ (Pangsau)या गावापर्यंतचा म्हणून या भागाला पंगसौ (Pangsau) पास असे म्हणतात. मुलांचे व शिक्षकांचे दोन गट झाले एक गट समोर
असलेल्या सैनिकांशी गप्पा मारत तर दुसरा गट शेवटी असलेल्या सैनिकांशी गप्पा मारत
चालला होता. मस्त गप्पा रंगल्या अगदी त्यांच्या गावापासून ते म्यानमार, चीन, अतिरेकी या सर्वांबाबत चांगली
प्रश्नोत्तरे होत होती. सैनिक त्यांचे जिवंत अनुभव सांगत होते तर मुलं त्यांना
त्यांच्या ऐकिवात असलेल्या महितीच्या आधारे प्रश्न विचारत होते.
दीड तासानंतर आम्ही नाष्टा
करण्यासाठी एक झऱ्याच्या ठिकाणी थांबलो. मुलांचे सैनिकांना प्रश्न विचारणे संपून
ते आता सैनिकांच्या प्रत्येक वस्तू पाहत होते. पायातील बुटांपासून स्वयंचलित
मशीनगन पर्यंत. एक छान मैत्रीचे नाते मुलांचे आणि सैनिकांचे झाले होते. ज्याची
आम्ही कधीही उत्तरं मुलांना देऊ शकत नव्हतो ती उत्तरं त्यांना भारतीय सैनिक देत
होते. पतकाई(Patkai) डोंगररांगातून चाललेला प्रवास तसे
पाहता अवघड होताच. डोंगर चढणे खूप थकवणारे असते आणि त्यात सतत चढाई असल्यावर जास्त
थकवा येतो पण भारतीय सैनिक व आमचे अरुणाचली युवा सैनिक यांच्या जोशाने आलेला थकवा
पार निघून जायचा.
आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
पंधरा मिनिटे झाले असतील.एकदम जंगलातून काही हालचाली जाणवल्या. सैनिक लगेच दक्ष
झाले. त्यांनी आम्हाला शांत पडून राहण्यास सांगितले. काही सैनिक जंगलात घुसले.
पुढचे पाच दहा मिनिटे मात्र सगळ्यांच्या हृदयाची ठोके चांगलीच वाढली होती. सर्वत्र
शांतता होती. जंगली किड्यांचा फक्त आवाज येत होता.
सैनिक बांधव जंगलातूनच दोघांना
पकडून घेऊन आले. त्यांच्या तोंडावर पांढऱ्या रंगाचे चट्टे पट्टे होते. हात
डोक्यावर ठेऊन त्यांना मेजरच्या समोर उभे करण्यात आले.त्यांच्या पाठीवर बांबूच्या
पिशव्या होत्या. मेजरनी त्यांना गुडघ्यावर बसायला सांगितले. आम्ही लांबून हे सगळे
पाहत होतो. सुभेदारांनी त्यांच्या पाठीवरील पिशव्या त्यांना उलट्या करायला
सांगितले. त्यांनी त्या जमिनीवर रिकाम्या केल्या. हे सगळे चालले होते खाणाखुणा
करून. पकडलेल्यांच्या आवाजावरून त्या स्त्रिया आहेत येवढ मात्र समजले. मेजरने
आम्हा सर्वांना जवळ बोलावले व जमिनीवर पडलेल्या वस्तू दाखवल्या. त्यात मिठाचे पुडे, आगपेटीचे पुडे अशा वस्तू होत्या.
मेजर सांगू लागले, “म्यानमारच्या या महिला आहेत.त्या नेहमी अशा चोरून भारताच्या
सरहद्दीत येतात मुख्यतः मिठाचे पुडे, आगपेटीचे पुडे घेण्यासाठी. अगदी जीवावर उदार होऊन येतात. त्यांच्या
देशात ह्या वस्तू फार जास्त किमतीत मिळतात आणि ते ही बराच प्रवास केल्यावर.
भारतातील व्यापाऱ्यांना त्या कोंबड्या विकून त्याबदल्यात हे सामान घेऊन जातात.”
मुलांसाठीच काय माझ्यासाठी अचंबित
करणारी ही गोष्ट होती. मीठ देऊन, आगपेटीचे पुडे
देऊन ईशान्य भागातील बांधवांना १९व्या शतकात मिशनरीज धर्मांतरीत करायची हे वाचले
होते, ऐकले होते. आज त्याचा अनुभव घेत
होतो. अगदी जीवावर उदार होऊन त्या दोन महिला या गोष्टी घेण्यासाठी भारताच्या
हद्दीत आल्या होत्या. मेजर व इतर सैनिकांना हे नवीन नव्हते. मी नामपोंगमध्ये
राहणाऱ्या मुलांना त्या महिलांशी त्यांच्या भाषेत बोलायला सांगितले तर आम्हाला
समजले त्यांचे बोलणे त्या महिलांना समजत नव्हते व महिलांचे त्यांना. १२ किलोमीटर वरील
लोकांचे बोलणे एकदम न समजणारे कसे? हा प्रश्न मी मुलांना विचारला तर मुलांनी मला सांगितले,
“सर वो लोग अलग है”
“मग या भागातील सगळे नागा एक आहेत हे
एक असत्यच आहे की? कारण ग्रेटर नागालँडची मागणी करणारे
लोक हे कसे काय म्हणतात आम्ही सगळे एक आहोत?”
“सर वो लोग हमारी भाषा के कारण एक है
या हमारी संस्कृती एक है बोलके नागलीम नही मांगते. वे सब ख्रिस्तान है ना इसलिये
नागालीम मांग रहे है.”
मी पुस्तकात वाचलेलं प्रत्यक्ष
अनुभवत होतो. त्या महिलांना मेजरने सोडून दिले. पण तो आम्हाला हे सांगायला विसरला
नाही की कधी कधी अशाच महिला अंमली पदार्थ पण घेऊन येतात. पकडले व शिक्षा केली केली
तर Human right वाले ओरडतात.
म्यानमार,लाओस आणि थायलंड या तीन देशाला
गोल्डन ट्रँगल म्हणतात. अफुच्या उत्पादनात हा भाग जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची तस्करी या भागातून होते.
आमचा प्रवास चालू होता व समोर एकदम
विस्तीर्ण क्षितीज दिसू लागले. थोडे पुढे गेलो तर एक दगड दिसला त्यावर लिहिले होते,
“यहाँ भारतकी सीमा समाप्त होती है”
आम्ही चढून खूप उंचावर आलो होतो.
घामेघूम झालो होतो. थंड हवेच्या स्पर्शाने एकदम हलके हलके वाटले. आमचे स्वागत तिथे
असलेल्या भारतीय सैनिकांनी केले. तिथला सैनिकी तळ, टेहळणी नाका आम्ही पाहिला.
“बर्मा जायेंगे क्या ? और देखेंगे क्या है ?” मेजरने मुलांना विचारले. एका जोशात मुलांचा आवाज होता.
“बिलकुल जायेंगे ...”
काही औपचारिक गोष्टी मेजरने
म्यानमारच्या पंगसूच्या कमांडरशी बोलून पूर्ण केल्या व आम्ही पंगसूच्या एका चेक
पोस्ट वर पोहोंचलो. तेथील म्यानमारच्या काही सैनिकांशी भेटलो ते होते आपल्या कडील
रामोश्यांसारखे. त्यांची भाषा काही समजत नव्हती. इकडे तिकडे फक्त आम्ही पहात होतो.
दुरून लेक ऑफ नो रीटर्न दिसत होते व चीन-जपान युद्धात अनेक विमानांना जलसमाधी करून
दिल्याचे आठवण करून देत होते. आम्ही परतायला निघालो. भारतात परत आलो व सीमेवरच्या
त्या अंतिम दगडाजवळ जाऊन मी थांबलो. एकटाच, शांत, थोडा वेळ डोळे बंद करून टागोरांची
कविता मनातल्या मनात म्हणत होतो.
“Where the mind is without fear and the head is held high..”
जवळ कुणी आल्याची जाणीव झाली.
बालीजान मध्ये दहावीत शिकत असलेला तासो जवळ आला व मला म्हणाला,
“ सर, मै भारतीय हूँ इसका मुझे अभिमान है”
त्याच्या छोट्या डोळ्याकडे मी
पहिले. जे तो बोलत होता तेच त्याचे डोळे बोलत होते.
संघटीतपणे आव्हान घेतली,संकटांचा सामना केला व सतत चांगले अनुभव घेत राहिले तर निर्भयता
येण्यास मदत होते.
प्रेम कसे करावे ?
(भाग १० )
आपल्या सारखा सामान्य माणूस भयभीत
असला की त्याला आधार लागतो. निदान मला तरी लागतो. परीक्षेची भीती वाटायली की मी
आईच्या जवळ चक्क रडत असे. माझ्या अतिरेकी वागण्याने मी माझ्या पोटावर खूपच
अत्याचार केलेले आहेत आणि त्यातून निर्माण झाला निद्रानाश,चिंतारोग आणि भयगंड. ज्यावेळी भय व त्यातून निर्माण झालेली
अस्वस्थता वाढली की मला अजूनही आईचा खूपच आधार वाटतो. प्रिय आणि कणखर व्यक्तींच्या
सहवासात अभय वाटते. ज्यावेळी आपला self-talk स्वतःच्या नियंत्रणात नसतो त्यावेळी त्यावेळी मनातील जे काही आहे
ते आपल्या खात्रीच्या व्यक्तीशी बोलल्यास भीती कमालीची कमी होते. आपल्याकडे
गुरु-शिष्य परंपरा त्यातूनच निर्माण झालेली असावी.
दिब्रुगड येथे महालयामध्ये आमची
निवासाची व्यवस्था होती. सतत पडणारा पाऊस त्यामुळे बाहेर फिरणे जवळपास अशक्य. या
काळात सर्वात मोठी साथ होती माझा मित्र योगेश झोपेनी दिलेल्या मस्त गाण्याच्या
कॅसेट्स व माझ्या आईने घेऊन दिलेल्या कॅसेट प्लेयरची.
ग्रेसच्या कविता आणि गाणी माझ्या
साथीदार होत्या.
‘भय इथले संपत नाही. मज तुझी आठवण
येते’ ...असंख्य वेळा मी हे गीत ऐकलेलं.
त्याच सोबत ‘ती आई होती म्हणुनी’ तर अफाट ताकदीचे गाणे.
आपला self-talk ची अयोग्य तीव्रता कमी करण्यास संगीत आणि गाण्याचा खूपच चांगला
उपयोग होतो.
अरुणाचलच्या बहुतेक जिल्ह्यांची
नावे त्या भूभागातून वाहणाऱ्या नद्यांच्या नावावरून दिली आहेत. मी ज्या जिल्ह्यात
काम करत होतो तेथील गावांची नावे म्हणजे इथल्या बंधूंची आडनावे. मारो बस्ती मध्ये
राहणाऱ्या सर्व बांधवांची आडनावे मारो.
कुपोरीजो मधील विवेकानंद
केंद्राच्या प्राथमिक शाळेतील मुले खुपच गोड दिसायची. त्यांचे हिंदी बोलणे पण फार भारी. तशी फार इरसाल ही पोरं. साप, पक्षी, विंचू हे सहज पकडायची. जंगलाचे ते
राजेच होते. अप्पर सुभांशिरीन जिल्ह्याच्या अतिअंतर्गत भागातून मुलांना
शिकण्यासाठी कुपोरीजोच्या शाळेत आणले जायचे.मारो ही एक अशीच दुरस्थ बस्ती. जवळपास
३० किलोमीटर दूर.
तिथला तागे हा तिसरीत शिकत होता.
तागेचे वडील तो काही महिन्याचा असतानाच देवाघरी गेले होते. त्याच्या आनेची (आईची)
इच्छा होती तागेनी खूप मोठे व्हावे. दिसायला तागे अगदी बाल हनुमानाचे रूप. खुपच
मस्त दिसायचा. तसा तो चांगलाच इरसाल पोरगा. आम्ही सगळे त्याला पांडे म्हणायचो.
पांडे व त्याच्या तीन मित्रांशी माझी पण खूप मस्त मैत्री झाली होती. ताई गंगो,मित्ती गंगो,डॅनी मार्दे हे
पांडेचे जिगरी दोस्त. ताई गंगो,मित्ती गंगो दोघे
भाऊ दापोरीजोचे तर डॅनी मार्दे दुम्पोरीजोचा. या
तिघांचा जन्म थोडया सुधारलेल्या भागातील. फार जंगली जीवनाचा अनुभव नाही. घरचे जीवन
पण सुशिक्षित व समृद्ध होते.
मी कुपोरीजो मध्ये असल्यावर या
चौघांशी निदान अर्धा एक तास तरी रात्रीच्या जेवणानंतर गप्पा मारत असे. ते मला
प्रसादजी सर म्हणायचे. त्यांच्यामुळे मला शाळेतील व अरुणाचलातील बऱ्याच गोष्टी पण कळायच्या.
“पांडे, आप इतना तगडा कैसे है? बहोत दुध, मक्खन, घी खाता होंगा?”
“नही न सर, हमलोग मे दुध सिर्फ माँ का ही पिते है. जिसका दुध पियेंगे वो माँ
बन जाती है.”
९ मार्च १९९७, पूर्ण खग्रास सूर्यग्रहण ईशान्य भागात दिसणार होते. ग्रहणात उघड्या
डोळ्यांनी सूर्याकडे पहायचे नाही, नाहीतर डोळे खराब
होतील. शिक्षक हे सगळे सर्वं विद्यार्थ्यांना बजावून सांगत होते.
रात्री शांत झोपी गेलो. अचानक
माझ्या खोलीचा दरवाजा जोरात ठोठावला गेला.
“प्रसादजी उठो ...जल्दी उठो” कुमारवेल सर जोरात हाक मारत होते.
“क्या हुआ सर ?” मी दरवाजा उघडत विचारले.
“पांडे और उसके दोस्त होस्टेल मे नही
है I”
बराच वेळ शोधल्या नंतर आम्ही
शाळेबाहेर शोधण्याचा निर्णय घेतला. तीन दिशांना तीन गटानी जायचे ठरले. मी पण एका
मोठया मुलाला घेऊन मोटारसायकलहून दापोरीजोच्या दिशेनी निघालो. मध्यरात्रीचा एक
वाजला होता. मी सावकाश झाडांमध्ये मोटारसायकलचा प्रकाशझोत टाकत हळूहळू पुढे जात
होतो. साधारण ४/५ किलोमीटर गेल्यावर अचानक मागे बसलेला मुलगा ओरडला,
“ सर , वो देखो वो लोग भाग रहे है I”
“कहा है? .....ठीकसे देखो I”
“वो देखो न सर, नीला शर्ट है और वे भाग रहे है I”
अरुणाचली मुलांची नजर फारच जबरदस्त.
मी गाडी थांबवली. मागे बसलेला मुलगा उतरला व सरळ झाडांमध्ये घुसला. ही मुलं प्रचंड
निर्भीड, कशाची भीती अशी नाही. मी गाडी लावून
त्याच्या मागे धावत निघालो. मी जोरात ओरडलो,
“पांडे रुको ...भागो मत I”
तोपर्यंत माझ्याबरोबर आलेल्या
मुलाने पांडेला पकडले होते. पांडेला पकडले हे पाहताच ताई गंगो,मित्ती गंगो,डॅनी मार्दे हे
पण पळायचे थांबले.
“अरे कहा भाग रहे थे इतनी रात मे? सब लोग परेशान हो गये ना I ”
माझ्या या बोलण्याला फक्त माना खाली
करून त्यांनी प्रतिसाद दिला. मी अनेक प्रश्न विचारत होतो पण एक जण पण तोंड उघडायला
तयार नाही. शेवटी आम्ही पाच जण गाडीवर बसलो. ताई गंगो,मित्ती गंगो फारच लहान होते त्यांना पेट्रोलच्या टाकीवर बसवले तर
डॅनी,पांडे यांना मागे. माझ्या बरोबर
आलेल्या मुलाला तिथेच एका घरात थांबायला सांगितले. गाडीवर पण मी त्यांना अनेक
प्रश्न विचारत होतो पण एक शब्द बोलत नव्हते. शाळेत कित्येक तास गप्पा मारणारे हेच
का? हा प्रश्न मनात पडत होता.
एकदाचे शाळेत पोहोंचलो. कुमारवेल सर
प्रेयर हॉल समोर काही मुलांसोबत उभे होते. गेल्या तासाभरा पासून ते खुपच अस्वस्थ
होते. मुलांना पाहताच ते जवळ आले. पांडेला जवळ घेऊन विचारले,
“क्यू गया था ?”
मुलं चूप. एक दोनदा सरांनी विचारले
पण पोर शांत. ताई गंगो मात्र जोरात रडायला लागला.
सर खुपच चिडले होते त्यांनी चांगला
प्रसाद चारी जणांना दिला. पण बहाद्दर काही बोलायला तयार नाहीत. जोरजोरात मात्र
रडायला सुरुवात केली. सर अजून चिडले. मग अजून प्रसाद. मग अजून रडणे.
शेवटी मी ताई गंगोला बाजूला नेले.
शांतपणे त्याला विचारले,
“अभि आपको कोई भी नही मारेगा और
डाँटेगा भी, सिर्फ बताओ क्यू भाग गये थे I ”
ताई व माझी जास्त दोस्ती होती. तो
थोडा वेळ शांत होता व मग बोलू लागला,
“सर कल तो सूर्य ग्रहण है ना? पांडे की मां बस्ती मे रहती है Iउसको तो यह मालूम नही है न? अगर उसने सुरज की तरफ देखा तो उसकी आँखे खराब हो जायेगी न सर ? पांडे ने हमलोग को ये बताया I फिर मित्ती बोला रात मे भागते भागते बस्ती मे जायेंगे और उसे ये
बताके फिर वापस आयेंगे I फिर हम सब लोग तैयार हुये और पांडे
के माँ को बताने के लिये बस्ती जाने के लिये भाग निकले I”
माझे डोके सुन्न झाले. मी ताईला
माझ्या मिठीत घेतले. हे चिमणे जीव ३० किलोमीटर लांब असणाऱ्या आईला सांगायला
रात्रभर जंगलातून पळत जाणार होते.
कुठून आली ही प्रचंड निर्भयता आणि
त्यातून आपल्या आईसाठी आणि आपल्या मित्रासाठी अपार धैर्य दाखवण्याची ताकत. निर्मळ
प्रेमातून निर्भयता येते.
मी विचार करू लागलो असे प्रेम आपण
कुणावर खरच केल आहे का ?
ईश्वरा वाचव रे त्याला....
(भाग ११ )
मला रहाट पाळण्याची प्रचंड भीती.
मेरी-गो-फेऱ्यात (Merry go round) मामांनी बळजबरी
बसवले तर त्याच्या गोल फिरण्या बरोबर पोटात निर्माण होणारे गोळे आणि आरडा-ओरड करत
रडत कसा तरी पूर्ण केलेला तो पाच मिनिटांचा प्रवास अजूनही अगदीच आठवतो. परत कधीच
रहाट पाळण्यात बसलो नाही न मेरी-गो-फेऱ्याचा आनंद घेवू शकलो. पोहायला शिकायला गेलो
खरा पण पाण्याची भीती अशी बसली की शिकणे राहूनच गेले. भाषण स्पर्धेसाठी गेलो आणि
भीतीने झालेली फजिती अनुभवली व अगदीच विवेकानंद केंद्रात प्रशिक्षण चालू असे
पर्यंत ती उराशी बाळगून होतो. सुगम गायनाची शाळेत स्पर्धा होती. आम्ही फारच जोशात
भाग घेतला. पहिल्या काही ओळी गायल्यावर समोरील विद्यार्थामध्ये प्रचंड हशा पिकला.
ते आपल्याला हसत आहेत हे समजल्यावर तर आम्ही मुलखाचे औरंगजेब झालो. डोंगर चढणे
फारच जोशात व्हायचे उतरताना मात्र चक्क ४ x ४ म्हणजे दोन्ही हात आणि दोन्ही
पायांच्या मदतीने.
भल्या सकाळी उठून अंधारतच मरुतमलाई
पर्वत सर करणे आणि तेथून सूर्योदय पाहणे हा आमच्या केंद्राच्या प्रशिक्षणातील
महत्वाचा भाग होता. अंधारातून तो खडा पर्वत चढणे अतिशय भयावह असायचे. सुरवातीला तर
आमच्यातील अनेक जण जिथे आहोत तिथेच बसून राहायचे. एकदा का पर्वताच्या शिखरावर
गेल्यावर जीव भांड्यात पडायचा. भोवतालच्या निसर्गाचे रूप इतके मनोहर होते की
पुढच्या वेळी ते सुख अनुभवण्यासाठी आमची अंधारात पर्वत चढण्याची भीती तर गेलीच पण
पर्वत वेगाने चढण्याचे नवे उचांक आम्ही स्थापन करत होतो.
प्रवास जरी भयभीत करणारा असला तरी
गंतव्य स्थान जर अनोखा आनंद देणारा असेल तर प्रयत्नाने आपण भीतीवर मात करू शकतो.
पुण्याची काही मंडळी अरुणाचल पाहण्यासाठी चक्क पावसाळ्यात आलेली. ते दहा
दिवस विविध स्थळांना भेटी देणार होते. प्रवासाची सुरवात छान झाली. अम्लीयांगला
जाण्यासाठीचा घाटाचा रस्ता सुरु झाला. सगळेच कसे मस्तीत व आनंदात होते. आमची जीप
छान नागमोडी वळणे घेत पुढे जात होती. आता अवघड घाट सुरु झाला. गाडीचा वेग कमी
झाला. चांगलाच चढ होता.आमचा चालक पण चांगलाच तरबेज. काही अंतर पुढे गेलं की उतार
सुरु होणार होता. आमचा उत्साह मात्र शिगेला पोहंचला होता. गाण्याचा ठेका चांगलाच
धरला होता. अचानक गाडी थांबली.
“सर जल्दीसे नीचे उतरो सर !!” चालकाचे घाबरलेल्या आवाजातील वाक्य कानावर पडताच माझ्या हृदयाचा
ठोका चुकला. मी सर्वाना खाली उतरायला सांगितले व शेवटी उतरून चालकाला विचारले काय
झाले. स्टेअरिंग तुटून चक्क वर आले होते.
मी पाठीमागील भयाण दरी पाहिली आणि निश्वास सोडला. त्याने समय सूचकता दाखवत
हँडब्रॅकनी गाडी थांबवली होती. आम्ही सगळे सुरक्षित होतो पण पुढील १५ मिनिटे कुणीच
कुणाशी बोलले नाही. भयाण शांततेचा अनुभव. पुढील सात दिवस पावसाचा असा कहर होता की
आम्ही केवळ सात दिवसात ४० किलोमीटर अंतर पार करू
शकलो होतो.
अरुणाचल मधील विविध उपनद्यांना नाला
किवा पगली नदी म्हणतात. पगली नदी म्हणजे पाऊस नसला की नदी असल्याची काहीच खुण रहात
नाही व पाऊस सुरू झाला ती एकदमं रौद्र रुप. उंच डोंगररांगातून प्रचंड वेगाने
येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाण्याचा वेग तुफान असतो. अशा थोडया थोडया अंतरावर
वाहणाऱ्या अनेक पगल्या नद्या अरुणाचलच्या सपाट भागात अनुभवता येतात. अम्लीयांगहून
परतत असताना अशीच एक पगली नदी लागते. जवळ येवून पाहतो तो काय एक बस चक्क त्यातून
वाहून गेलेली दिसली. पाण्याचा वेग भयाण होता. आम्हाला चक्क तीन दिवस थांबावे
लागले.
पाऊस थांबला. सकाळी ११च्या दरम्यान आर्मीच्या एका गाडीत बसून आम्ही दोरा नाल्याच्या काठी आलो.
पाणी थोडे कमी झाले होते. सोबत राजपूत जवान होते. त्यांनी थोडा अंदाज घेतला. गाडी
पाण्यातून जाणे शक्य नव्हते. काही जवानांना पुढे जाणे आवश्यक होते. आम्ही दोरा
नाल्याच्या चढावाकडे निघालो. एका ठिकाणी पाणी थोडे कमी होते. राजपूत जवानांनी
पाण्याचा अंदाज घेतला व एक एक जवान पाण्यात उतरत होता. अंतर फार नव्हते.फार तर ५०
मीटर असेल.खोली पण फार नव्हती. पण वेग प्रचंड होता.पन्नासच्या आसपास जवान
एकमेकांचे हात धरून पुढे पुढे सावकाश जात होते. अखेर पहिला जवान दुसऱ्या काठावर
पोहोंचला. मग आम्ही एक एक जण जवानांच्या हाताची मदत घेत पाण्यातून चालू लागलो. मी
मध्यावर आलो तर एकदम एका जवानाचा जोरात आवाज आला,
“अरे भाई संभल के ........”
मी मागे पहिले तर संतोषचा हात सुटला
होता. त्याच्या पाठीवर मोठी बॅग होती. त्यातच त्याचा पाय निसटला व तो पाण्यात वाहत
जात होता. माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला.संतोष प्रचंड वेगाने वाहून जात होता. संपले
आता सगळेच. विचार एकदम थांबले. “ईश्वरा वाचव रे
त्याला.” एवढच काय ते मी करू शकत होतो.
प्रचंड ताकदीचे सैनिक आमच्याबरोबर होते पण सगळेच हतबल. मी शेवटी आकाशाकडे पाहिले.
डोळ्यात नकळत पाणी. पण त्याचे व आमचे दैव बलवत्तर होते. एका दगडाला त्याची बॅग
अडकली व तो तेथेच अडकला. थोडं हायसे वाटले. जवानांनी त्याला काहीच न करता शांत
थांबायला सांगितले. जवानांच्या मदतीने तो परत आला.
मी एकदाचा दुसऱ्या काठावर पोहोंचलो
तोच माझ्या मागे असलेल्या रंजनाताई व वीणाताई पाण्यात पडल्या पण यावेळी जवानांनी
त्यांना लगेच सावरले.
रंजनाताईच्या पायाला चांगलीच दुखापत
झाली. आम्ही सर्व जण दुसऱ्या काठावर सुखरूप पोहोंचलो. सतत अनेक प्रश्न विचारत
राहणारा संतोष आता एकदम शांत झाला होता. त्या अनुभवा नंतर संतोष विवेकानंद केंद्राचा
जीवनव्रती म्हणून केंद्रात दाखल झाला आणि काही काळा नंतर त्याने संन्यास घेतला.
अत्युच्य भयाचे अनुभव पचवल्यावर
माणसात एक निडरता येते. अशा अनेक अनुभवातून तावून सुलाखून बाहेर पडल्यावर नकळत
तुमची तुमच्या कामावरील निष्ठा, श्रद्धा वाढते.
नकळत एक विश्वास मनात निर्माण होतो.
“भित्यापाठी ब्रम्ह राक्षस” असे न राहता
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” अशी नकळत श्रद्धा मनात निर्माण होते.माणूस अधिक आव्हानांना
धैर्याने सामोरे जातो. त्याला आयुष्य समजून घेण्याची एक वेगळीच उर्मी मिळते.
दिव्यध्येयाकडे त्याची वाटचाल सुरु होते. आयुष्याचा प्रवासातील अनेक सुंदर
क्षितिजे त्याला खुणावत राहतात आणि तो पुढे जात राहतो.
दारू, मांसाहार आणि मी !!!
(भाग १२ )
असाच खेळत असताना स्वतःचा तोल पण न
सांभाळता येणारा एक व्यक्ती दिसला. माझ्या मनाचा थरकाप उडाला. ती व्यक्ती म्हणजे
माझ्या खूप चांगल्या मित्राचे वडील होते. त्यांना नीट चालता पण येत नव्हते. अचानक
ते कोलमडले. मी त्यांना आधार देण्यासाठी धावलो. त्याच्या लालबुंद डोळ्यांकडे पाहत
असताना त्यांच्या तोंडातून येणारा प्रचंड आंबलेला वास सहन होत नव्हता. त्याच्या
तोंडातून गळणारी लाळ अंगावर पडत होती. ते मला
सगळे सहन करण्याच्या पलीकडचे होते. एक एक पाऊल जसे दोघे पुढे जात होतो तसे पुढे
पाऊल टाकणे नकोसे वाटू लागले. ते कधी आक्रंदत होते तर कधी विचित्र स्वरात हसत
होता. काही पाऊले पुढे गेले की मला मिठीत घेवून आपल्या आत्मीयतेचे प्रदर्शन करत
होते. मिठीत गेल्यावर मात्र एक विचित्र घालमेल जाणवे. आपल्या संपूर्ण जीवशक्तीने
मिठीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतो. पुढील प्रवास नकोसा झाला होता पण
त्यांना त्या परिस्थितीत सोडता पण येत नव्हते.
सभोतालची नित्य ओळखीची चेहरे
आमच्याकडे अगंतुकासारखे पाहत होती. चिडून जाऊन त्यांना म्हणावे,
‘‘ ये चांडाळा तुला नाही का लक्षात येत
मला सोबत करणे जमणे अशक्य आहे थोडी मदत कर ना.’’
मनातले शब्द सभोतालच्या लोकांच्या
नजरेकडे बघताच मनातच विरून जायचे.
घरी पोहोंचलो एकदाचे. दारुपिवून
रस्त्यावर चालताना जगातील अभयाचा नृपती वाटणारा तो पती आपल्या पत्नीचा शाब्दिक व
शारीरिक मार खाताना किती केविलवाणा कोपऱ्यात एखाद्या गुलामा सारखा,अपराध्या सारखा बसला आले हे पाहताना नवल वाटले. मी मात्र सरळ पळत सुटलो वाऱ्यागत आपल्या घराकडे. इतक्या वेगाने पळत
होता की विचारच मंद झाले. डोळ्यातून वाहणारे अश्रू धावण्याचा वेग अधिक वाढवत होते.
मी इतक्या वेगाने कधीच धावलो नव्हतो.
मी अनेक लोकांना भ्यायचो. माझे
आजोबा तर मुलखाचे रागीट पण या प्रसंगा नंतर मात्र दारू पिलेल्या माणसांची प्रचंड
भीती काही तरी विचित्र आणि वेगळी होती. मी चक्क काही दिवस घराच्या बाहेर खेळणेच
सोडून दिले होते.
तसा मी अरुणाचल मध्ये येवून दोनच
दिवस झालेले. शाळे पाठीमागच्या दुगी बस्तीत गावच्या प्रमुखाच्या (गाव बुढा)
मुलाच्या लग्नानंतरच्या शुभेच्छा समारंभासाठी शाळेतील सर्व शिक्षकांना जेवणासाठी
बोलावले होते. मी सर्वांसोबत गेलो. अरुणाचली घर बांबू व जंगलात मिळणाऱ्या तोकु पत्त्याची
(पानांची )बनवलेली असतात. घराच्या मध्यभागी चूल असते. त्याच्या भोवती बसून पंगत
चालते. एका भांड्यात सर्वांना काही तरी पिण्यास देण्यात आले होते. मी शाळेतील
शिक्षकांना त्याबद्दल विचारले असता कळले.ती “अपांग” म्हणजे Rice Beer आहे.
‘‘ बिअर म्हणजे दारू ?’’
“हो दारूच आहे ती.” मी मात्र पार हादरून गेलो होतो.
आपल्याकडे चहा जसा अतिथ्याचे प्रतीक
आहे तसे सगळ्या अरुणाचल मध्ये “अपांग”.
“इथे सगळीच लोकं अपांग पितात आणि आपण
जर ती पिली नाही तर त्यांना खूप वाईट वाटते. त्यामुळे तुम्ही घ्या ती !”
माझ्या अंगातून जबरदस्त वीज चमकून
गेली. माझा चेहरा कावराबावरा झाला. सर्व लोकांच्या ते लक्षात आले.
अपांग विशिष्ट पद्धतीने घेतली की ती
चढत नाही असे सांगून मला ती कशी पिली जाते याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
“ अरुणाचलमध्ये काम करायचे असेल तर
तुम्हाला अपांग घ्यावीच लागणार न ?”
आता मात्र मी अधिकच घाबरलो. चला
होईल ते होईल म्हणून मी पहिला घोट घेतला. थोडी आंबूस चव. पहिले काही घोट घेतल्यावर
मला चढल्यासारखे वाटू लागले. अपांग पिण्याचा बराच आग्रह होतो. मला मात्र माझ्या
लहानपणाच्या प्रसंगाची आठवण होत होती. बाकीच्यांचे दोन तीन पेले पिवून झाले माझे
मात्र काही घोट. आता मला इतर लोकांची भीती वाटायला लागली.
जेवणाला सुरुवात झाली. भात, उकडलेली रस्साभाजी व मीठ असा मेनू. मस्त पोटभर जेवण झाल्यावर आम्ही
दुगी परिवाराचा सस्नेह निरोप घेतला. कीर्र अंधारातून आम्ही चालत परत शाळेत निघालो.
रातकिड्यांच्या आवाजाने आसमंत थोडे भय निर्माण करणारा होता. सोबत विजेरी गरजेची
कारण पायामध्ये कोणते जंगली मित्र (साप, नाग, विंचू,इत्यादी ) येतील याची शाश्वती नाही.
शेवटी आम्ही त्यांच्याच विश्वात राहत होतो. जाताना गप्पा चांगल्याच रंगल्या.
“क्यूं प्रसादजी कैसी लगी “अपांग” ?” एका शिक्षकाने विचारले.
“ठीक रही” मी उत्तर दिले.
“घुम रहा है क्या ?”
“नही तो” मी थोडे अधिकच विश्वासाने बोललो.
“आपने जो आज सब्जी खाई वो कैसी लगी ?”
“ठीक थी”
“पहले खाई है कभी ?”
“हां,बहुत बार खाई है”
“आपको समझा क्या, किसकी सब्जी थी ?”
“सोयाबीन चंक्स की थी”
“अरे सर, आपको थोडी गलतफहमी हुई ऐसा लगता है” शिक्षकाने थोडे हसतच उत्तरं दिले.
“क्यू क्या हुआ ?”
“अरे प्रसादजी वो सुअर के मास की
सब्जी थी” शिक्षक हसत बोलला. त्याच्या बरोबर
सगळे शिक्षक हसले.
मला मात्र अंबाजोगाईतील रस्त्यावर,गटारात असलेले डुकरे डोळ्यासमोर दिसत होती. मी एकदम शांतपणे माझ्या
निवासस्थानी गेलो. पण मनातून आपण काय खाल्ले आहे हे काही जात नव्हते. नकळत मनातले
तोंडात अवतरले. मळमळ सुरु झाली. दार उघडून आत सरळ स्वच्छता गृहात गेलो. एका
पाठोपाठ एक अशा अनेक उलट्या झाल्या.
पुढे मी पट्टीचा “अपांग” पिणारा झालो. मांसाहार करणारा मी
फक्त गाय आणि माणसांचे मास सोडून बहुतेक पाण्यातील, जमिनीवरील, आकाशातील आणि अगदीच काय बिळातील
सर्व जीव अगदीच चवीने खात असे. मजेत काही जीवनव्रती मला म्हणायचे,
“ प्रसाद !! अभी पक्का अरुणाचली बन
गया है I”
आमच्या ज्येष्ठ जीवनव्रतीनी मला
संयमाचा आणि शक्यतो टाळण्याचा सल्ला दिला. मला मात्र ते समजले नाही. माझ्या अपांग
पिण्याचे आणि मांसाहाराचे लोक कौतुक करायले की मला अधिकच चेव यायचा. याचा परिणाम
व्हायचा तो होणारच होता.....
एकांती वेदना...
(भाग १३)
काल मी जे काही लिहिले याबद्दल
आपल्यातील अनेकांना ते खूपच धाडसाचे वाटले. अंबाजोगाईत परतल्यावर आणि भरपूर काम
केल्यावर मी एका मोठ्या आजाराला सामोरे गेलो. भयाचे भयाण अस्तित्व माझ्या मनात
होते. त्यावेळी अनेक तज्ञ लोकांना मी भेटलो. त्यातून मला समजले की आपले जीवन जेवढे
पारदर्शक असेल तेवढी आपली भीती कमी. बघा न तुम्ही काही तरी लोकांच्यापासून लपून
ठेवण्याचा प्रयत्न करता तेवढे ते लोकांना कळले तर कसे ? ही भीती मनात खूप असते. एकदम पारदर्शक होणे खूप कठीण. आपल्या
भोवतालच्या लोकांपासून सुरुवात करून हळूहळू ते वर्तुळ वाढवत नेलं तर भय व्यवस्थापन
करण्यास त्याची खूप मदत होते हा माझा अनुभव आहे.
मी अरुणाचल मध्ये गेलो होतो ते
तेथील लोकांना जगण्याचे अधिक चांगले आयाम कळावेत म्हणून. प्रत्यक्ष मात्र आपल्याला
इथल्या लोकांनी ग्रेट म्हणावे अशी सुप्त लोकेषणा नक्कीच माझ्या मनात होती.
सगळे कसे सुरळीत चालले आहे. एक
छानशी लय तुमच्या दिनक्रमाला आणि एकूण जगण्याला असली तर मन प्रसन्न राहते. विचार
नेमके होतात. वर्तन संतुलित होते. आरोग्य निरामय होते. असे आपले व्यक्तिगत आयुष्य
असले की निर्भयता येण्यास खूप मदत होते. मी चांगले काम करत होती. चांगल्या
संघटनेचा भाग असल्याने ते अधिक उपयोगी आणि परिणामकारक होत होते. तर दुसऱ्या बाजूला
कामाबरोबरच माझे स्वतःचे व्यक्तिगत आचार मात्र थोडे बिघडत गेले.
एका बैठकीसाठी आसामला जाण्यासाठी
निघालो होतो. पूर्ण रात्र प्रवासात जाणार होती. झोपण्याची तयारी केली. दिवा
मालवण्यात आला. उघड्या डोळ्याने गेले वर्ष आठवत होतो. गाडीच्या हेलकाव्यांसोबत मन पण हेलकावे घेत होते. असं काही व्हायला लागले की मला सहज डुलकी
लागे. गाडीने आता चांगलाच वेग पकडला होता.
मध्यरात्र, किती वाजले हे समजण्यासाठी माझ्याकडे घड्याळ नव्हते. पोटात अचानक
अस्वस्थता जाणवू लागली. थोडी जळजळ होती. एका ठिकाणी जेवण्यासाठी बस थांबली.स्वच्छता
गृहात जाऊन येण्यासाठी निघालो. पोट काही साफ झाले नाही पण आता वेगळ्याच वेदना
जाणवू लागल्या. एखादी सुई टोचावी असे पोटातून काही तरी टोचत होते. वेदना वाढल्यावर
परत स्वच्छता गृहात जाऊन आलो. वेदना
वाढतच होत्या. कळत नव्हते नेमके काय होत आहे. असंख्य सुया कुणी तरी पोटात टोचत आहे
अशा असह्य वेदना. त्या सहन होण्याच्या पुढे स्थिती गेली होती. तोंडावर व डोक्यावर
पाणी मारले. जोरात दोन्ही हातांनी पोट दाबले पण कुठलीही मात्रा लागू पडेना. वेदना
असह्य होत होत्या.शेवटी आता जे होईल ते स्वीकारायचे हे ठरवून पडून राहिलो काही
काळ. ते पण आता जमत नव्हते. शेवटी विकत घेतलेल्या केळीच्या चकत्या काढल्या व
बकाबका एका पाठोपाठ खात सुटलो. फार न चावता फक्त गिळत होता. थोडं बर वाटले.उपाय
लागू पडला. मन व शरीर थोडं शांत झाले.
आजूबाजूला खूप लोक असताना सुद्धा
कुणालाही सांगता येत नव्हतं.अशी लोकात एकांती वेदना सहन करणे किती अवघड हे
पहिल्यांदा समजले. अशा असह्य वेदनेची जाणीव एकटेपणाने अनुभवली होती. गेले दोन
प्रहर नरक वेदनेचा अनुभव घेतला होता. वेदना शांत झाल्या व झोप लागली.
शिलापथारला उतरलो आणि परत तसाच
त्रास सुरु झाला.भयाण होते ते .....
दिब्रुगडला गेल्यावर पहिल्यांदा
डॉक्टरांच्याकडे गेलो. निदान निघाले अमिबियासिस (आमांश) आणि पोटाचा विकार. पुढे पोट इतकं कमजोर झालं की
रात्ररात्र झोप लागत नसे. मी बरेच काळ ते अंगावर काढले. शेवटी सातत्याने होणारा
त्रास असह्य होऊ लागला. झोपणे-उठणे वेळेवर नव्हते. कामाचे नियोजन नीट पाळता येत
नव्हते. यासर्वाचा परिणाम माझ्या कामावर होत होता. शेवटी काही दिवसांची सुट्टी
घेवून उपचार करण्यासाठी घरी आलो. आता अमिबियासिस क्रोनिक ( जीर्ण आमांश ) झाला
होता. पचन क्षमता दुर्बळ झाली होती. व्यायाम तर केंव्हाचा बंद झाला होता. आपल्याला
या परिस्थिती पुढे काम करता येईल का ? अशी भकास भीती मनात दाटून येत होती. याला सर्वस्वी जबाबदार मी
होतो. अशा चुका मी माझ्या आयुष्यात पुढेही खूप वेळा केल्या. शारीरिक आजार तुमच्या निर्भयतेच्या प्रवासातील महत्वाचे गतिरोधक
असतात याची चांगली उपरती झाली. कळतंय पण वळत नाही अशीच काहीशी स्थिती.
खरतरं मी सुरवात करतानाच थोडा खंबीर
राहिलो असतो तर हे प्रकरण घडलेच नसते. चांगल्या कामाची पण नशा असते.
खाण्यापिण्याचे नियम मी पाळले पाहिजे होते.
'युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु।
युक्त स्वप्ना-व-बोधस्य, योगो भवति दु:खहा।
हे व्रत जे मी कन्याकुमारीत शिकलेलो
होतो ते पूर्ण विसरून गेलेलो होतो. त्यातून विचित्र व्याधी निर्माण झाल्या. योग्य
खाणे-पिणे, योग्य प्रकारे खेळणे-बागडणे, झोपणे-जागे होण्याबाबतच्या योग्य सवयी, तसेच आपले काम, आपल्या कर्तव्य
योग्य प्रकारे करणे म्हणजेच योग. योगाचा साधक संकट काळाच कधीच धैर्य गमावत नाही.
माझे व्रत पालन मात्र पूर्णपणे थांबले होते. त्यामुळे चांगलाच आता भयग्रस्त झालो
होतो. गंमत म्हणजे माझ्या सोबत काम करणाऱ्या अरुणाचली कार्यकर्त्यांनी अपांग पिणे
आणि मांसाहार करणे बंद केले होते.
वयाच्या पंचेविशितच मला दोन जीर्ण
व्याधींनी घेरून टाकले. सर्दी व जीर्ण आमांश आणि पोटाचे विकार...
मी मांसाहार आणि अपांग घेणे कायमचे
बंद केलं !!
स्त्रियांची भीती ....!!
(भाग १४ )
कन्याकुमारीच्या प्रशिक्षणानंतर तीन
महिने प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. बस मधून जात असताना केरळ काही
वेगळाच दिसत होता. हिरवाई व पुष्करणी ने सजलेल्या त्या प्रांतातून वाहणाऱ्या नद्या
वेगाने सागराच्या ओढीने कुठलीही खळबळ न करत संथपणे वाहत पुढे जात होत्या.हा प्रदेश
सुरु होताच काही सुंदर पर्वत रांगा दिसतात. सागर आणि पर्वताचे संगम स्थान म्हणून सर्वात
पहिल्यांदा आलेल्या म्लेंच्छांनी याला “मलबार” म्हंटले तर त्या क्रोधिष्ठ
ब्राम्हणाच्या पुत्राने आपला परशु इथल्या सागरात फेकला त्यामुळे तेथील पाणी जाऊन
भूमी दिसु लागली परशु सारखी. तसा चिखलाचे प्रचंड अस्तिव असल्याने त्याला चेरलम असे
पण म्हंटले जाई. सुंदर पुष्करणीतील कमल पुष्पे.कौलारू घराच्या भोवतीचे नारळाची उंच
उंच झाडी तर कमरेच्या भोवती धोती गुंडाळलेले काटक व राकट कृष्णवर्णी माणसं दृष्टीसमोरून वेगाने मागे जात होते. मी ते सर्व सौंदर्य अनुभवत होतो. साहजिकच चेहऱ्यावर एक शांत हसू
होते आणि मनात कृतार्थ भाव.
पुढील थांब्यावरून गाडी बदलायची
होती. आता तामिळनाडू सुरु होणार होता.
बस मध्ये चढल्यावर सगळे नवव्रती
जागा शोधू लागले. मी शेवटी चढलो. भगिनीच्या बाजूला जागा मोकळी होती. सहजपणे तिथे
जाऊन बसलो. बसताच ती भगिनी चेहऱ्यावर कोणताही विचित्र भाव प्रगट न करता उठली व
बाजूच्या मोकळ्या जागेत जाऊन उभी राहिली. मला ते खुपच अस्वस्थ करणारे होते. तिच्या
कृतीने मी लगेच उठलो व तिला बसायला सांगून मागे जाऊन उभा राहिलो. अतिशय खजील होऊन
मान खाली घालून. माझी हिम्मत पण होत नव्हती आजूबाजूच्या लोकांच्या नजरेस नजर
देण्याची. माझ्याकडून असे काही तरी असभ्य घडलं पण नव्हत. बस पुढे जात होती.
पुढच्या थांब्यावर अनेक लोक उतरली व
काही चढली. मला जागा पण मिळाली आणि बाजूची जागा आता रिकामी होती. चढणाऱ्यात जास्त
भगिनी होत्या. त्या उभ्या होत्या पण
माझ्या बाजूला कोणी येवून नाही बसली. मी अधिकच अस्वस्थ झालो. बेचैनी बसच्या
हादऱ्यां बरोबर अधिकच वाढत होती.
खिडकीततून बाहेरच्या पुष्करणीत
दिसणारे सुंदर कमळाची फुल आता आकर्षित करत नव्हती. मनाला नेमके काय बोचते आहे याचा
पण अंदाज येत नव्हता मी अधिकच अस्वस्थ
होत होतो. सगळे नवव्रती सकाळी लवकरच उठल्याने चांगल्याच डुलक्या मारत होते तर काही
एकमेकांच्या खांद्यावर मस्त डोके विसावून शांत झोपी गेले होते. मला मात्र आज
डोळ्यात झोप असून झोप लागत नव्हती.
पुढचा थांबा आला आणि बस मधील अनेक
भगिनीच्या बाजूच्या जागा मोकळ्या झाल्या. यावेळी मात्र अनेक पुरुष बस मध्ये चढले.
माझ्या बाजूला एक तरुण येवून बसला. पण कोणताही पुरुष, भगिनींच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेवर बसला नाही. आता मात्र
मला थोडं बर वाटले. बाजूला बसलेल्या तरुणाला विचारले,
“ ते का उभे आहेत व मोकळी जागा असताना
का बसत नाहीत.”
मी अचंबित तर झालाच पण त्याही
पेक्षा जास्त निवांत झालो. आपण कोणतेही मोठे महापाप नाही केले हे समजल्यावर
मनातल्या मनात स्वतःवरच हसलो. त्या तरुणाकडून समजले की बस मध्ये पुरुषां शेजारी
महिला व महिलां शेजारी पुरुष द्रविड भूमीत बसत नाहीत ही त्यांची रीत आहे.
आता मात्र मी अधिकच सावध होऊन वागू
लागला. आपले स्वतःचे असणे व लोकांना ते कसे वाटावे याचे काही वैचारिक चित्र
रंगवायला सुरुवात केली आहे. महाविद्यालयात असताना आपल्याला पण एक छान मैत्रिण
असावी. तिच्याशी तासंतास गप्पा माराव्यात. तिला खूप मदत करावी. असे काही वाटायचे
पण आता नकळतच गेल्या काही काळाच्या अस्वस्थतेचा अनुभव घेतल्यावर मात्र नकळतच
महिलांची भीती वाटायला लागली.
आसाम मध्ये आल्यावर कार्यालयात काही
तरी आरडाओरडा चालू आहे हे लक्षात आले.
“आता तुला आमच्या सोबत राहता येणार
नाही. तुझा मार्ग आता वेगळा आहे.”
एका व्रती बंधूला सांगण्यात आले. ते
कानावर पडले व खोल मनाच्या भोवऱ्यात गरगर फिरत अस्तिव शून्य असल्याची भावना
काळाकुट्ट अंधार निर्माण करत होती. अंगातील पेशी न पेशी कंपित झाली होती. तो
राजबिंडा व्रती बंधू मान खाली घालून आपल्या शरमेने व अपमानाने पराजिता सारखा उभा
होता. त्याचा गोरापान चेहरा एकदम काळवंडला होता. त्याच्याकडे पाहतांच मी अधिकच
व्याकुळ झालो.
त्याचा अपराध असा होता की त्याने
कार्यक्षेत्रातील एका महिला कार्यकर्तीला प्रेमपत्र लिहिलेलं होतं. अचानक डोक्यात
सहस्त्र सूर्याचा प्रकाश पडल्या सारखे वाटले. मनोमन एक संकल्प केला की आपल्याला
स्वतःला ज्यामुळे अपमानित व्हावे लागेल. शरमेने जिवंत राहून सुळावर चढवला जाण्याचा
अनुभव घ्यावा लागेल असे कोणतेही कृत्य सोबती भगिनीबरोबरच नाही तर इतर कोणत्याही
स्त्री बरोबर कधीही नाही होणार याचे वचन मी माझ्या अंतस्थ परमेश्वरी शक्तीला दिले.
काही महिन्याच्या अंतरानंतर
घडलेल्या ह्या दोन घटनांनी मी अधिकच सावध आणि भयभीत होत असे. कुणी महिला
कार्यकर्ता दिसली की चार हात दूर. बोलणे तर सोडाच वर डोळे करून पाहणे पण अशक्य.
अरुणाचल मधील परिस्थिती खूपच वेगळी
होती. एकदा प्रचंड पाऊस पडत असताना मी कुपोरीजीहून दापोरीजोला निघालो होतो.
मुसळदार पाऊसात समोरचा रस्ता दिसणे अवघड. वळणावर अचानक आवाज आला,
“अरे सर रुको, जल्दी से रुको I” मी गाडी थांबवली
तर काही स्त्रिया पावसात उभ्या होत्या.
त्यातील एक महिला तशा पावसात
जमिनीवर पडलेली होती. तिला इतर स्त्रियांनी उठवले.
“ सर इसको जल्दी से मेडिकल मे लेके
जाना पडेगा I”
“मै कैसे लेके जाऊंगा ?”
“इसको आपके पिच्छे बिठायेंगे और उसके
पिच्छे मै I”
“अरे ऐसा नाही होगा I मै किसी औरत को मेरे गाडी से नही ले जा सकता I हमारा ये नियम है I”
“इधर एक औरत मर रही है और आपको आपका
नियम याद आता है I पागल आदमी हो तुम I आपको तो लेकेही जाना पडेगा I”
त्यातील एक महिला चांगलीच चिडली.
तिने माझी गाडी समोरून धरली. इतर तिघीने आजारी महिलेस गाडीवर बसवले व अजून एक
महिला तिला पकडून मागे बसली.
“चलो जल्दी, नही तो यही मरेगी ये I”
प्रचंड पावसात अंगात भरलेली हुडहुडी
आता मनात निर्माण झालेल्या भीतीने अजूनच वाढली. पुढील चार किलोमीटर मी कशी गाडी
चालवली असेल ते मलाच माहित. शेवटी त्या दोघींना रुग्णालयात सोडून मी कार्यालयात
आलो.
अरुणाचली महिला खूपच मोकळ्या असतात
तशाच खमक्या...!!
आलेल्या एकूण अनुभवातून मात्र मी
अजून सावध झालो. पुढे माझी ही भीती कमी होत गेली. विवेकानंद केंद्रातील ज्येष्ठ महिला
जीवनव्रतीना मी माझी भीती सांगितली. त्या हसत म्हणाल्या,
“मन स्वच्छ ठेवायचे रे !! मन स्वच्छ
आणि नजर साफ असली की विचार पण निर्मळ होतात. मग असभ्य वर्तनच नाही तर अयोग्य भावना
पण मनात येत नाहीत.आपल्याला स्वामीजींची शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणायची.”
अंबाजोगाईत शिकणाऱ्या सर्व ईशान्य
भारतातील मुलींचा मी स्थानिक पालक असे !!
मला मात्र माझ्या निर्भयाच्या
प्रवासातील एक महत्वाची शिकवण मिळाली. मन स्वच्छ,नजर साफ, विचार निर्मळ असले की निर्भयता
येते.
अपयशाची,आर्थिक असुरक्षितेची भीती ......
(भाग १५ )
अंबाजोगाईत आल्यावर ज्ञान
प्रबोधिनीचे काम सुरु करण्याचे ठरले. अरुणाचल मध्ये विवेकानंद केंद्राच्या कामाची
चांगलीच रुजवण आधी झालेली होती. त्यामुळे काम करणे सोपे होते. अंबाजोगाईत मात्र
प्रबोधिनीचे काम शून्यातून उभे करायचे होते. सगळं काही मला करावे लागणार होते.
मनात थोडी धास्ती होती की कसे जमणार हे सगळे ? दुसरीकडे मनात मात्र एक विश्वास होता की आपले गाव आहे नक्कीच
चांगले काम करता येईल.
मी अनेकांना भेटण्यास सुरुवात केली.
शाळेत असताना समाजाच्यासाठी काही तरी करण्याचे व थोर देशभक्तांचे चरित्र
सांगणाऱ्या गुरुजींना खास करून भेटलो. खूप कौतुक करतील माझ्या कामाचे असे मनातल्या
मनात वाटत होते. घरी जाताच त्यांच्या पाया पडलो. मी केलेलं काम आणि करावयाचे काम
याबद्दल भरभरून बोललो. ते शांतपणे ऐकत होते. मी प्रतिसादासाठी थोडा थांबलो. ते
हसले आणि बोलायला लागले.
“ तू करतोयस ते काम चांगले आहे. मला
वाटते समाज हा ज्वालामुखी सारखा आहे. तो अशा प्रकारे अनेक काम करणाऱ्या लोकांना
आपल्यात गिळंकृत करतो व तृप्तीची ढेकर देतो आणि निवांत झोपी जातो. काही फरक नाही
पडत त्याला. हे सर्व करण्यापेक्षा तू चांगली नौकरी कर. भरपूर पैसे मिळव आणि
आनंदाने आणि सुखाने राहा.”
माझ्यासाठी तो खूप मोठा धक्का होता.
मला वाटत होते की ते माझे कौतुक करतील व कामात सोबत करतील. अपेक्षेच्या अगदीच उलट
घडले होते. नकळतच मनात काहूर निर्माण झाला. मी एकदमच शांत बसलो.
“ कळतंय न मी काय म्हणतोय ते ? नीट विचार कर !! आपल्या स्वतःचे आधी चांगले बस्तान बसवायचे.
समाजसेवा,देशसेवा हे सगळे आपले सगळे काही
व्यवस्थित झाल्यावर करायची काम आहेत.”
मी एकदम शांत बसलो होतो.
त्यांच्याबद्दल प्रचंड आदर मनात असल्याने काहीच बोललो नाही किंवा प्रतिवाद पण केला
नाही. फारसे काही न बोलताच त्यांचा निरोप घेतला.
असे अनेक अनुभव येत होते. मी
अंबाजोगाईतील माझ्या मित्रांना,शिक्षकांना आणि
परिचित अनेकांना भेटलो. शेवटी प्रबोधिनीचे काम सुरु करायचे म्हणून भेटलेल्या
जवळपास पन्नास लोकांना पहिल्या भेटीसाठी निमंत्रण दिले. सर्व व्यवस्था करून मी वाट
पाहत होतो. मनात भीती होती किती लोक येतील ? वाटेकडे डोळे लाऊनच बसलो होतो. पाचची वेळ टळून गेली. कुणीच फिरकले
नाही. माझी तगमग चांगलीच वाढली होती. १५ मिनिटां नंतर मात्र मला वि.र.जोशीसर
येताना दिसले. मला ते येतील अशी अजिबात अपेक्षा नव्हती.
“अरे अजून कुणीच नाही आले का ?”
“नाही आले सर अजून कुणी.” माझा आवाज थोडा रडवेलाच होता.
“येतील ...आपण वाट पाहू.”
सरांच्या बोलण्याचा आधार वाटला.
ते मला एकूणच मी केलेलं काम आणि
करावायचे काम याबद्दल बोलत होते. माझे मात्र फारसे लक्ष आज बोलण्यात नव्हते.
“अजून लोक का येत नाही ? कधी येतील ? आपण जे करणार आहोत ते खरंच बरोबर
आहे का ? आपली वाट चुकली तर नाही न ?”
माझ्या अंतर्मनात हे सगळे विचार
चालू होते. चांगलास तासभर वेळ होऊन गेला. वि.र.सरांच्या शिवाय कुणीच आले नव्हते.
“चला आपण दोघे तर दोघे !! बैठक सुरु
करू. सांग तुझ्या मनात काय करायचे आहे ?”
सरांच्या बोलण्याने आमची बैठक सुरु
झाली. मी माझ्या मनातील कल्पना सरांना सांगितल्या.
“ वा !! असे काही तरी नक्कीच केले
पाहिजे. मी आहे तुझ्या सोबत.” सरांचे बोलणे
खूपच आश्वासक होते. मला थोडा धीर आला. आम्ही दोघांनी प्रबोधिनीचे काम सुरु करण्याचे ठरवले.
थोडे फार पैसे आपल्याला लागतील
कामासाठी म्हणून येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात मी तासिका तत्वावर काम करावे
म्हणून माझा बायोडेटा प्राचार्यांना देण्यासाठी गेलो. हातात निराशा घेवून परत आलो.
पाहिजे तसे यश मिळत नव्हते. मनात अपयशाची भीती वाटायला लागली. मी अंबाजोगाईत
आल्यानंतर मी जे काही ठरवत होतो ते यशस्वी काही होत नव्हती.
अरुणाचलात असताना काही कोटी
रुपयांच्या योजना आखण्याचे काम काही हजार लोकांच्या सोबत केलेले होते. परतलो ते
तेव्हा माझी स्वतःची कमाई मात्र शून्य रुपये होती. उलट पक्षी घरी परतत असल्याने
प्रवास खर्चाचे दोन हजार रुपये आई कडूनच घेऊन ते संघटनेला परत केले होते.
अंबाजोगाईत काय करायचे ? कसे करायचे ? हे भले मोठे प्रश्न होते. सगळ्यात म्हणजे माझ्या स्वतःचे असे शून्य
रुपये माझ्याकडे होते. त्याच बरोबर शून्यातून सगळे उभे करावे लागणार ही भावना पण
होती.
विवेक कुलकर्णीसरांचे पत्र आले की
ज्ञान प्रबोधिनीतील प्रज्ञा मानस विभागा तर्फे अभिक्षमता चाचणीचे प्रशिक्षण ठेवले
आहे. त्याचे काही शुल्क होते ते भरून मला प्रशिक्षण घेता येणार होते. त्यासाठी मी
पुण्याला यावे असे त्यात लिहिलेले होते. पुण्याला जाण्यायेण्याचा खर्च,प्रशिक्षणाचा खर्च असे एकूण दोन तीन हजार रुपये लागणार होती. माझ्याकडे
तर शून्य होते. आईकडून पैसे घेऊन प्रशिक्षण घ्यावे असे मनात वाटत होते.वयाच्या
तिशीत आल्यावर व भरपूर मोठा अनुभव घेतल्यावर आपल्याकडे काहीच नाही ही भावना फारच
त्रास देत होती. त्याच अस्वस्थतेत आईकडून पैसे घेतले. जाण्यासाठी बसस्थानकावर
गेलो. बस येण्यासाठी काही काळाचा उशीर होता.मनात मात्र विचारांचा प्रचंड हैदोस
चालू होता. अस्वस्थता पराकोटीला गेली होती. आपल्याकडे काहीच नाही ही भावना प्रचंड
व्यापली होती. भयाण अशी विचित्र मनस्थिती.काहीच समजत नव्हते. अंगात कापरं भरली,घाम फुटला,घशाला कोरड पडली. मी सरळ घरी परत
आलो. आईने विचारले का रे परत आला ? काहीच उत्तर न देता स्वतःला खोलीत कोंडून घेतले व धायमोकून काही
तास रडत होतो. रडता रडताच झोपी गेलो. उठलो ते परत तीच अस्वस्थता.
स्वतःचे पैसे नसण्याची भावना इतकी
छळू शकते याचा अनुभव मी घेत होतो. थोडा शांत झालो व विचार करू लागलो की हे नेमके
काय आहे ? पैसे नसण्याची भावना आहे की आर्थिक
असुरक्षिता आहे ? की परावलंबी असल्याची भावना आहे ? भावनिक अस्वस्था आता थोडी शांत झाली होती. विचारांचे आंदोलन मात्र
अजून शांत नव्हते झाले. राहून राहून येणारे रडण्याचे उमाळे आता थोडे थांबले होते.
थोडा तटस्थपणे विचार करायला लागलो.
शून्यातून काही निर्माण करणे असे
नसते तर खरं तर शून्यासमोर एक एक आपल्या प्रयत्नांनी लावत जाणे हे महत्वाचे आणि
खरे सत्य असते. गंमत म्हणजे जिवंत राहण्यासाठी खरंच किती रुपयांची गरज लागते असा
विचार करायला लागलो. माझ्या जेवणाच्या तेवढ्या गरजा होत्या. त्यापण मी कमी केल्या
व चक्क भात व भाजी मिश्रित वरण असे कार्यक्षम राहण्यासाठीचा आहार घेण्यास सुरवात
केली. सुदैवाने आई बहिणीकडे गेली असल्याने माझे हे प्रयोग करण्यासाठी मी स्वतंत्र
होतो. अगदीच ३५० रुपयात महिना काढण्याचे कौशल्य मी शिकलो. त्याच सोबत ते ३५० रुपये
व कामासाठी लागणारे १५० असे पाचशे रुपये प्रत्येक महिन्यात मिळतील असे प्रयत्न
सुरु केले. त्यानंतर मात्र पैसा हा माझ्या असुरक्षिततेचा विषय राहिला नाही. शून्य
अवस्थेचे भय पार नाहीसे झाले. उलट शून्य अस्वस्थेचे महत्व आणि गरज जास्त
प्रकर्षाने जाणवू लागली. सुरक्षिततेचा सुखद व रेशमी कोश गळून पडला व
असुरक्षितेच्या भयपटाचा अनुभव घेण्यापेक्षा अभयाचा ध्यास घेण्यास सुरुवात झाली.
प्रसाददादा नावाचा बागुलबुवा ......
(भाग १६)
अंबाजोगाईत सुरुवातीचे दोन वर्षे
माझी दिनचर्या खूपच चांगली होती. परिणामी माझे आजारपण खूपच कमी झाले.सकाळी लवकर
उठून उपासना आणि व्यायाम, दिवसा अगदीच न चुकता केलेला
स्वाध्याय. अनेक संघटनांचा अभ्यास. स्वामीजींच्या समग्र लेखनाचा अभ्यास.
यासर्वांमुळे मानसिक ताकद खूपच वाढली होती. घरातील जेवण असल्याने प्रकृती चांगली
होती.अनेकांशी संपर्क जोरात चालू होता. त्याच बरोबर भविष्याचे नियोजन.
प्रबोधिनीच्या ज्येष्ठ प्रबोधकांच्या मार्गदर्शना खाली पुढील तीन वर्षांचे नियोजन
केले. माझा मित्र सुबोध कुलकर्णीची खूपच मोठी मदत हे सर्व करता झाली.
कामाची सुरुवात झाली. आता पुण्याहून
आणि अंबाजोगाई मधून खूप चांगली मदत होत होती. एक एक उपक्रम वाढत जात होता.
प्रबोधिनीत येणाऱ्या प्रबोधकांची संख्या वाढत होती. अनेक तरुण कार्यकर्ते सोबत
होती. दोन वर्षांच्या नंतर मात्र एकदम काम खूपच वाढले. याचा परिणाम नकळत माझ्यावर
होण्यास सुरवात झाली. व्यायाम बंद झाला. स्वाध्याय होत नव्हता. कामाच्या
व्यवस्थापन पुरता बुडून गेलो होतो. काम माझ्याच घरातून होत असल्याने मी कित्येक
दिवस घराच्या बाहेर पण पडत नसे. विद्यार्थ्यांची संख्या आता तीन आकड्यात गेली
होती. पुढील दोन वर्षात तर ती चार आकड्यांच्या मध्ये गेली. वार्षिक उत्पन्न काही
लक्ष रुपयांचे झाले. ज्ञान प्रबोधिनीचे अंबाजोगाईतील काम मनुष्य घडणीचे व गट
बांधणीचे करण्याचे ध्येय नकळत बदलून आम्ही सेवा पुरवणारे केंद्र बनलो.
याचा परिणाम माझ्यावर जास्त होत
चालला होता. शिशुविहार मधील मुलांची संख्या वाढत गेली. शाळेच्या अगदीच
सुरुवातीच्या महिन्यात मुलं प्रचंड रडत. छोटे लेकरं ते !! आपल्या सुरक्षित
कुटुंबातून एकदम मोठ्या अनोळखी वातावरणाशी जुळण घेताना त्यांना खूपच अवघड जात
होते. संख्या वाढलेली असल्याने रडणाऱ्या मुलांना शांत करणे खूपच अवघड होऊन बसले
होते. मी शेवटी रडणाऱ्या मुलांना शांत करण्यासाठी त्यांना अंधाऱ्या खोलीची भीती
दाखवू लागलो. त्यांचे रडणे जर कमीच नाही झाले तर चक्क दोन सटके देवून त्यांना चूप
बसवत होतो. याचा परिणाम पुढे अजून वाईट झाला. शिशुविहार मधील ताई मुलगा काही
खोड्या करायला किंवा त्रास द्यायला तर चल तुला दादाकडे घेवून जाते अशी भीती दाखवू
लागल्या.
इतर शाळेत जाणाऱ्या
विद्यार्थ्यांच्यासाठी प्रबोधिनीत प्रबोध शाळा,मुक्त विद्याकेंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्र,उपासना केंद्र व शिबिरे असे अनेक उपक्रम होती. प्रबोधिनीतील शिस्त
खूपच जास्त. अगदी एक मिनिट वेळ झालेला चालणार नाही. गृहपाठ आणि साप्ताहिक नियोजन
केले नाही तर शिक्षा. पुढे संख्या वाढल्यावर मी मुलांना शिकवण्यापेक्षा शिस्त
लागण्याचे काम करत होतो. आधी संख्या कमी असल्याने शिस्त लावत असताना दलावर
त्यांच्याबरोबर खेळणे,मस्ती करणे, सहभोजनाची मजा घेणे असे बरेचसे उपक्रम होते ज्यातून माझ्याबद्दल
मुलांना प्रचंड प्रेम आणि आदर होता. घरी काही खटकले तर मुलं माझ्याकडे येवून बसत.
त्यांची अस्वस्थता सांगत. मोकळे होत असतं. खूपच आश्वासक वातावरण होते. आता संख्या
हजारात गेल्याने मी ते आश्वासक वातावरण काही देवू शकत नव्हतो. कार्यकर्ते अजून
तेवढ्या ताकदीचे घडलेले नव्हते. त्यांनी फक्त माझी शिस्त पालनाची कठोर पद्धत
आत्मसात केलेली होती. यापुढे जाऊन प्रसाददादा आता पालकांचे हक्काचे मुलांना भीती
दाखवणारे हत्यार झाला होता. मुलांनी काही चूक केली की त्याची तक्रार
प्रसाददादाकडे. मग प्रसाददादा आपल्या बळाचा वापर करून मुलांना भीती दाखवत.
पालकांच्या मनासारखे वागण्यास भाग पाडायचा. पालक खुश !! हमखास यश मिळवून देणारे
सेवाकेंद्र अशी आमची प्रतिमा झाली. मी ज्ञान प्रबोधिनीचे मनुष्य घडणीचे केंद्र
चालवतो आहे हे विसरून मी पालकांच्या मनातील सुधारणा केंद्र चालवतोय असे झाले होते.
परिणामी मुलांच्या मनात माझी चांगलीच दहशत होती. कधी कधी चांगलीच शिक्षा केल्यावर
मुलांची चड्डी ओली होत असे.
ज्ञान प्रबोधिनी म्हणजे जबदस्त काही
तरी करणारी संघटना आहे मग सार्वजनिक ठिकाणी मुलांचे सादरीकरण कसे अफलातून झाले
पाहिजे याची प्रचंड इर्षा मनात असे. परिणामी बरची नृत्याच्या वेळी कुणी चुकला
किंवा ढोल वाजवताना कुणी चुकला तो बेदम मार खाणार...आम्ही गणेशोत्सवाचा मिरवणुकीत
पहिला क्रमांक मिळवला खरा पण त्याच्या मागे नकळत असलेली माझी वाढती दहशत हे पण
कारण होते. यातून बाह्य यश चांगलेच मिळत
होते. यश,प्रसिद्धी,मान-सन्मान, पुरस्कार यांचा वर्षाव होता. कार्यक्रम
घेतला तर तो देखणा होणार यात वादच नाही.यासर्वातून प्रसाददादा नावाचा एक बागुलबुवा
मात्र तयार होत होता. माझे आचरण मग प्रबोधिनीतील इतर कार्यकर्त्यांसाठी प्रमाण बनत
चालले होते. त्यातच माझ्या बोलण्यातून पण चांगलीच आक्रमकता दिसू लागली. काही खूप
चांगले आणि शांत प्रेमळ कार्यकर्ते माझ्या बोलण्याने दुखावले जाऊ लागले. प्रसाद
चिक्षे नावाला एक वलय प्राप्त झाले होते.
शिशुशाळेतील एक इवलासा जीव. मी
वर्गात पाऊल टाकले की घाबरून जाऊन प्रचंड रडायची. सुरुवातील मी ते हसण्यावर नेले.
काही दिवसांच्या नंतर ते ठीक होईल असे वाटत होते. नंतर तर तिचे रडणे वाढले. मी
तिला समजून सांगण्यासाठी जवळ गेलो तो ती म्हणाली,
“ तुम्ही बाहेर जा आधी. माझ्याजवळ नका
येवू. मला तुमची भीती वाटते. तुम्ही बाहेर जा !!”
मी एकदम सुन्न झालो. माझ्या
असण्याची पण भीती त्या लहान लेकराला वाटत होती. मी चुपचाप बाहेर कार्यलयात येवून
बसलो. डोक चांगलच गरगरायला लागलं. तिचे रडणे काळजाला चांगलेच चटका देवून गेले. मी
सरळ माझ्या खोलीत आलो व आरशात स्वतःला पाहिले.....
मी खराच असा आहे का ? की खूप बदललो आहे ? वाहवत गेलो का यासर्व गोष्टींच्या बरोबर ? माझं वागणे इतकं विचित्र का झालंय ? मला गलबलून आलं. कित्येक वर्षात डोळ्यातून अश्रू बाहेरच नव्हते
पडले. यशस्वी दादा उभा राहिला होता पण प्रेमळ आणि हक्काचा आपला दादा मात्र संपून
गेला होता.मला रात्रभर झोप लागली नाही. मी ठरवून टाकले की सगळा वाढवलेला व्याप बंद
करायचा. माझी अस्वस्थता मी ज्ञान प्रबोधिनीच्या संचालकांशी बोलून दाखवली. त्यांनी
मला विनोबा भावे यांच्या भूदानयात्रेतील भाषणाचे दहा खंड वाचण्यासाठी दिले.
महात्मा गांधींचे शिष्य पुंडलिक कातगडे यांचे पुस्तक वाचण्यास दिले. विनोबांचे
चरित्र पण पूर्ण वाचून झाले. सर्वत्र भय मुक्तीचे विनोबांचे विचार वाचताना माझे
डोळे चांगलेच उघडले. विवेकानंदांच्या विचारांना गांधीजी आणि विनोबांच्या विचारांची
जोड मिळाली. माझ्यातील बागुलबुवा मारून टाकून नितळ प्रसादला शोधण्याचा प्रवास खूपच
अवघड होता. अर्थातच तो यश,प्रतिष्ठा,पैसा,वलयांकितता आणि पुरस्कार हे साध्य
करण्याच्या प्रवासा पेक्षाही अवघड होता.
निर्भय आनंदाचे दर्शन ...
(भाग १७)
अंबाजोगाईत काम करण्यास सुरुवात
केल्यावर पहिल्यांदा संघर्ष होऊ लागला तो आपल्या सारख्याच काम करणाऱ्या बांधवांशी.
व्यापक ध्येयापर्यंत पोहोंचण्यासाठी एकच मार्ग नसतो हे त्यांना पटलेले नव्हते.
आपलाच मार्ग राजमार्ग आहे हे मानणारे असे अनेक जण होते. त्यातून मग वेगेवगळ्या
वावड्या उठवल्या जाऊ लागल्या. मला अभियांत्रिकीचे शिक्षण न झेपल्यामुळे मी पळवाट
शोधून ज्ञान प्रबोधिनीचे काम करतोय. माझ्यासाठी असे आरोप देशप्रेमाचा वसा घेतलेले
लोक करत असल्याने फारच जिव्हारी लागत होते. त्यातून नकळत निर्माण होत होती स्वतःला
सिद्ध करण्याची प्रचंड इर्षा. मी माझा ध्येयाचा मार्ग सोडून प्रतिक्रियेच्या
मार्गावर चाललो होतो.
निस्वार्थ आणि त्याग भावनेने केलेलं
काम नेहमीच योग्य दिशेने असते असे पण नाही. माझ्या मनात नकळत सात्विक अहंकार तर
निर्माण होत नव्हता न ? त्या अहंकारातून माझ्यातील हिंसंक
प्रसाद तयार होत होता. हिंसेची पार्श्वभूमी ही नक्कीच भयाची असते. हिंसा,क्रोध,प्रतिक्रिया, आरोप,स्वार्थ हे नक्कीच भयातून निर्माण
होतात. स्वतःला समजून उमजून बदलण्याचा मार्ग सिद्ध करण्याचा,यशस्वी करण्याच्या मार्गापेक्षा खूपच अवघड असतो. खरं तर माझा मार्ग
स्वतःला सापडण्याचा,समजून घेण्याचा आणि स्वतःत
बदलण्याचा होता. एकदा रस्ता चुकल्यावर परत आपल्या योग्य मार्गावर येण्यासाठी खूप
प्रयत्न करावे लागतात. देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धिकडे नेणारा. नीज रूप दाखवणारा, देशकार्य हेच ईश्वरी कार्य आहे हे समजून आपल्या मार्गावर समविचारी
अनेक प्रबोधक जोडणारा मी निवडलेला मार्ग होता.
सर्वात पहिल्यांदा ठरवले की आपण
काही दिवस सगळ्यांपासून दूर राहून स्वाध्याय व आत्मगत चिंतनात वेळ घालावा. पुढील
पाच दिवस मी स्वतःला कोंडून घेतले. आई घरी नसल्याने अगदीच सगळ्या गोष्टी स्वतः
करायच्या ठरवल्या. श्री.रामकृष्ण परमहंसांचे वचनामृत संपूर्ण समजून घ्यायचे ठरवले.
यासर्वांचा खूपच उपयोग झाला. स्वतःची स्वतः सर्व्हिसिंग करून घेतली. सगळेच काही
संपलेले नव्हते. एकदम सगळेच काम बंद केल्याने गावात चांगल्याच चर्चा घडत होत्या.
निर्माण होणाऱ्या वावड्यांची आता भीती वाटत नव्हती. सर्वात महत्वाचे मी माझ्या
निर्णयाचा प्रतिवाद करणे बंद करून टाकले. यासाठीचा विश्वास मला श्री.रामकृष्ण
परमहंसांचे वचनामृताच्या अभ्यासातून मिळाला. कित्येक वर्षांनी मी स्वतःच्यासाठी,स्वतःच्या शुद्धीसाठी,आत्मगत चिंतनासाठी वेळ काढलेला होता. आता माझ्या मनाच्या आरशावर
निर्माण झालेली धूळ साफ करता आली. परत मी मस्त कामाला लागलो.
आधी काम करत असताना होणारा खळखळाट
बराच कमी झाला होता. स्वामी विवेकानंदांची पत्रे परत एकदा वाचून काढली.प्रबोधिनीच्या
कामांची सूज कमी झाल्याने मला आता सहकारी बांधवाना भरपूर वेळ देता येत होता.
मुलांच्यासाठी व मुलींच्यासाठी विद्याव्रत संस्काराची सुरुवात झाली. मुलांना
व्रतांची दीक्षा देत असताना माझा नकळतच अधिक अभ्यास होत होता. ज्ञान प्रबोधिनीच्या
संचालकांनी मला लिहिलेलं पत्र मी वेळ काढू परत वाचून,समजून घेतली.
फक्त निस्वार्थी कामातून निर्भयता
येत नाही. त्यासाठी अभ्यासाची जोड लागते.अंबाजोगाई प्रत्यक्ष काम सुरु केल्यावर
माझा अभ्यास जवळपास बंदच झाला होता. गंमत म्हणजे मी घरात राहात होतो पण आईसाठी
कधीच वेळ काढला नव्हता. कामाची नशाच इतकी जबरदस्त होती की आईसाठी वेळ काढणे दुय्यम
होत असे. नात्यामध्ये भावनेचा ओलावा नसला की मग वादविवाद होतात. आरोप प्रत्यारोप
होतात. आपल्या अगदीच जवळील आत्मजांशी होणाऱ्या ह्या तणावातून नकळत भय निर्माण
होते. उलट भावनिक ओलावा,आपुलकी, एकेमेकांच्यासाठी काही तरी करण्याची इच्छा मनाला उभारी देते.
त्यातून नकळत आधार तर मिळतोच पण सर्वात महत्वाचे म्हणजे निर्भयतेच्या सोपानाला
चांगला टेकू किंवा आधार मिळतो. मी कामातून वेळ काढून आईला कन्याकुमारीला घेवून
जायचे ठरवले. चक्क दहा दिवस मस्त आईच्या सोबत कन्याकुमारीत परत स्वतःचे
सर्व्हिसिंग करून घेतले. आईला माझ्यातील बदल फारच सुखद वाटत होता. आपल्या
भोवतालच्या लोकांच्या सुखदुःखात सहभागी झाले की एक घट्ट नाते निर्माण होते. ते
नाते आपल्या निर्भयतेच्या प्रवासात फार मोठे आधार असते.
अभ्यासा सोबतच आत्मीयतेने निर्भयता
वाढीस लागते. त्यातून नवीन आव्हाने घेण्याची ताकत वाढते.
शिशुशाळा भरली होती. मी कार्यलयात
बसलेलो. एक महिला भेटायला आली आणि तिने चक्क टाहो फोडला.
“माझ्या मुलीला शाळेतून काढू नका
हो.मी नाही सांगितलं तुम्हाला पण माझ्या मुलीला शाळेतून काढू नक्का”
मी स्वतःला सावरत त्यांना म्हणालो
तुम्ही आधी बसा व मला नीट सांगा काय झालं.थोडस सावरत आई म्हणाली,
“ही माझी मुलगी.”
गोरा व उभटसा चेहरा....बोलके व
पाणीदार डोळे, थोडीशी अकल्पित भीती. ४ वर्षाचे ते
लेकरू थोडं भेदरून गेलं होत. मी तिच्याकडे पाहिलं व विचारले,
“आजी बाई नाव काय हो आपलं?"
ती काहीच बोलली नाही मी परत विचारलं
पण ती ....फक्त आपल्या आईकडे पाहत होती....आईच हुंदके देण चालूच होत. त्यातच ती
म्हणाली,
“नाही बोलता येत तिला पण तिला
शाळेतून काढू नका. जन्मल्यापासून नाही बोलता येत, योगिता आहे तीच नाव”
एक अबोल शांतता सर्वत्र पसरली.मला
काय बोलावं हेच समजत नव्हत.
योगिताच्या आई हुंदके देतच बोलत
होती,
“ दादा, हिला लहान पणापासून खूप कमी ऐकू येत ....जवळ पास नाहीच आणि त्यातून
मग हिला बोलता पण येईना....सगळ हातवारे करूनच बोलणं चालत. एक दोन शाळेत घातलं पण
त्यांनी ठेवायला नाही म्हटलं......आता काय करू सांगा ? खरं सांगून शाळेत घालायचं म्हणल तर कुणी शाळेतच घेत नाहीत
....त्यामुळे या वेळी न सांगताच प्रवेश घेतला. चूक झाली माझी ...पण करू तरी काय मी
? मुंबई पुण्याच्या डॉक्टरला दाखवलं ते म्हंत्यात लहान मुलात खेळू
द्या ...पण आमच्या घरात ही एकटी लहान बाकी मोठी माणस.”
मला काय बोलावं हेच समजेना. मी
आमच्या शिशूविहारच्या ताईंना बोलून विचारलं काय कराव. त्या म्हणाल्या खुपच अवघड
आहे. अस म्हणताच योगिताची आई परत रडायला लागली. मी त्यांना म्हणालो,
“ताई, योगिताला विशेष शाळेत पाठवावे लागेल तिला वेगळ्या पद्धतीने शिकवावे
लागेल.”
“आहो दादा, कुठ आहे अशी बालवाडी अंबाजोगाईत .......नाही म्हणून लेकरांनी घरीच
राहायचं का ?”
त्याचं ही खरं होत. योगिता मात्र
अनिमिष नेत्रांनी सर्व कावरंबावरं होऊन पाहत होती. तिचे डोळे मधून मधून हसणाऱ्या
आमच्या चिमण्यांकडे जायचे. मी ताईंच्याकडे पहिले त्यांच्या डोळ्यात ही
अनिश्चितता.एक अनाहूत पोकळी माझ्या छातीत व पोटात ...जर कुणी मुलांबद्दल काही
माहिती लपवली की पालकांना अद्वातद्वा बोलणारा मी मात्र .......काय निर्णय घ्यावा
यातच अडकलो. मनात भीती होती.
“चला पुढचे १५ दिवस आपण पाहू जर
योगिता शिशूविहारच्या वातावरणात जुळून घेते का ? पण तिला जमले नाही तर मात्र मला माफ करा ताई”
थोड्याफार अविश्वासानेच मी
योगिताच्या आईला माझा निर्णय सांगितला. थोडया केविलवाण्या आवाजात योगिताच्या आई हो
म्हणाली.
योगिता वर्गात गेली .......पुढचे १५
दिवस ...तिला व आम्हालाही माहित नव्हते काय होईल.
दोन दिवसात योगिता हसायला
लागली.....ताई तिला त्यांच्या समोर बसवायच्या. चार पाच दिवसात ती नबोलता सामान्य
कृती इतर मुलांसारख्या करू लागली आणि आठवडा भरातच योगिता आम्हा सर्वांची लाडकी
झाली. फक्त लाडकी नाही तर आमची झाली.तिच्या शब्दात नव्हत तेवढे सामर्थ्य तिच्या डोळ्यात
आणि धावूनी येत मिठी मारण्याच्या कृतीत होते. आम्हा सर्वांना तिने कामाला लावलं
ताई ओठांची व बोटांच्या हालचालीची भाषा शिकत होत्या. माझा तिच्यासाठीच्या खास
शिक्षणाचा अभ्यास सुरु झाला.१५ दिवसच काय, अनेक महिने निघून गेले.
तिच्या घरी एकदा भेटायला गेलो.तिच्या
बाहुली पासून ते घरातील प्रत्येक व्यक्तींना ती माझी हसून ओळख करून देत होती. आपला
उजवा हात डाव्या छातीला लाऊन .....आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी व “दा ..दा” शब्दांनी ती सर्वाना सांगत होती
माझे दादा. दोन तासानी जायला निघालो आणि योगिता एकदम अस्वस्थ झाली व रडू लागली ती
खूप प्रयत्न करून सांगत होती ...आणि मला ही ते आता समजत होतं. मी समजून सांगत होतो
पण तिच्या डोळ्यातील हट्ट मला जाऊ देण्यास तयार नव्हता. मला आत्ता तिच्या हृदयाची
भाषा शब्दांन शिवाय समजत होती.
योगिता मोठी झाली. ती चवथीत असताना
आम्ही तिला स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले. तिला बोलता येत नसल्याने
तिच्या भाषणाचे नियोजन आम्ही काही केले नव्हते. काही दिवसांनी तिला बोलू नाही दिले
म्हणून ती थोडी नाराज झाल्याचे कळले. तिला भाषण करायचे होते. आपण चूक केली हे
लक्षात आले.
ज्ञान प्रबोधिनी,अंबाजोगाईला १२ वर्षे पूर्ण झाल्यावर अनेकांचे मनोगत आम्ही
भल्यामोठ्या सभागृहात आयोजित केले होते. यावेळी पहिल्यांदा बोलणार होती ती योगिता.
योगिता मोठ्या आत्मविश्वासाने व्यासपीठावर गेली. आपल्या भाषणाचा कागद हातात घेत ती
बोलू लागली. पुढील तीन मिनिटे खचाखच भरलेले ते सभागृह एकदम शांत होते. ती काय
बोलते हे कुणालाच कळत नव्हते. भाषण संपले तेवढ्याच निर्भयतेने योगिता परत निघाली.
पूर्ण सभागृह टाळ्यांनी निनादत होते.
मी शांतपणे तिच्या जवळ गेलो. प्रचंड
उत्साहाने तिने मला दादा ! म्हणत टाळी दिली. तिच्या चेहऱ्यावरील अनिर्भय आनंद
जबरदस्त होता. असाच काहीसा आनंद मला हवा होता. त्याचे दर्शन मी आज घेतले होते.
योगिता पुढे योगेश्वरी शाळेत शिकली. दोन वर्षांन पूर्वी ती दहावीत 80 % गुण घेऊन पास झाली. मला पेढे देण्यासाठी आली तेव्हा तिला विज्ञान
शाखा घेऊन पुढील शिक्षण घ्यायचे म्हणाली. मी पण तिच्या इच्छेला दुजोरा
दिला.बाईसाहेब एकदम खुश !!
राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलामांच्या
सोबत ....
(भाग १८)
आईला कन्याकुमारी दाखवल्या नंतर मी
परत एकदा माझा सहकारी विजय बरोबर कन्याकुमारीला गेलो. आमचा परत निघण्याचा दिवस जवळ
आला. केंद्राचे कार्यवाह भानुदाजी त्यांच्या अनोख्या शैलीत म्हणाले,
“ प्रसादे सर्व दुखा: नाम, तुला परत जाता येणार नाही इतक्यात. आरक्षण रद्द कर.”
भानुजी हसत म्हणाले.
“भारताचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम
आपल्याला भेटायला येणार आहेत.”
मी एकदम खुश. भारताला निर्भयतेचा
आणि स्वाभिमानाचा मंत्र देणारे ते आधुनिक ऋषीच होते. विवेकानंद शिलास्मारकावर
डॉक्टर कलामांची भेट म्हणजे खूप दुर्मिळ योग होता. माझ्यावर भानुजींनी खास
जबाबदारी टाकली. रात्री लवकर झोप काही लागत नव्हती. माझ्या डोळ्यासमोर जुन्या
आठवणी उभ्या राहिल्या.
अरुणाचल प्रदेशात जाताना पाहिल्यादा
उतरलो ते कामरूप म्हणजेच आसामात. उषा-अनिरुद्ध चे मिलन जिथे झाले त्या शोणितपुर (
तेजपूर ) मध्ये माझा पहिला पडाव. एक जेष्ठ साधक बंधू बरोबर मी राहात होते. पहाडी
पण हृदयाला भिडणाऱ्या आवाजाचे ते साधक होते नागेशजी. राष्ट्राच्या आराधनेचे गीत
त्याच्या आवाजातून एकताना सारा इतिहास डोळयासमोरून जात अंगावर शहारे यायचे व
राष्ट्र-आराधनेचे व्रत अधिकच पक्के झाले असे वाटायचे.गीत संगीतातील ताकद
पहिल्यांदा अनुभवली. त्याच सोबत जगजीत सिंगांच्या आवाजाचे व माझे एक अंतस्थ नातेच
जुळले. पुत्र वियोगाच्या विदारक काळातून बाहेर पडल्यावर त्यांचा आवाज आता आर्तआत्मिक
झाला होता. सहजच तो हृदया पर्यंत पोहोनचून एकाकी पणात एक निर्भय साथ देणारा होता.
करुणा, माधुर्य व लय या त्रिवेणी संगमात
मस्त न्हावून निघायचो. करुणेनी ग्रेसफुल झालेल्या गुढतेच्या गाण्यात मी स्वतःला
शोधू लागलो.
जगजित,ग्रेस,निदा फाजली,हृदयनाथ व लताताई याच्या काही कलाकृतींबाबत मात्र चांगलेच मैत्र
जुळले. शेवटी मैत्र हे काही शरीराशी नसते तर अभिव्यक्तीशी असले की ते भोग प्रधान न
राहता आत्मिक होते हे माझ्या युवा मनावर पक्के कोरले गेले.
पुढे विवेकानंद केंद्र विद्यालयाचे
काम करत असताना तेजपूरला यावे लागायचे. तरुण मुलांवर शौर्याचा आणि देशप्रेमाचा
संस्कार व्हावा म्हणून भारतीय वायू दलाच्या इथल्या मुख्यालयात युवकांना नित्य
नेमाने घेवून यायचो. १९९८ मध्ये भारताने पोखरण मध्ये दुसऱ्यांदा अणुचाचण्या
घेतल्या. फारच जबदस्त वाटले होते !! देश आणि समाज म्हणून निर्भयता अनुभवता आली होती.
त्याच वेळी परिचय झाला डॉ. अब्दुल कलाम
या नावाशी. त्यांचे अग्निपंख वाचताना भान हरपून गेलो होतो. एक वेगळाच विश्वास मनात
निर्माण झाला होता. आता मुलांना तेजपूरच्या संरक्षण संशोधन प्रयोग शाळेत घेवून जाऊ
लागलो. प्रवेश करताच दिसणारा डॉ. अब्दुल कलामचा फोटो मनाला उभारी द्यायचा. त्या
फोटोच्या खाली एक वाक्य लिहिलेलं होतं.
“It is the time of fearless experimentation and dreaming of
making impossibilities possible!”
मला ते प्रचंड आवडले होते. कधी तरी
डॉ.कलामांना प्रत्यक्ष भेटावे असे वाटायला लागले. अशाच एका भेटीच्या वेळी
प्रयोगशाळेच्या संचालकांनी विद्यार्थ्यांना विचारले.
“तुमचे शिक्षक कोण ?”
मुलांनी माझ्याकडे बोट दाखवले.
“तुम्ही तर एकदम या मुलांच्या वयाचे
दिसतात. काय नाव तुमचे ? शिक्षण काय झाले ?”
त्यांनी प्रश्नाचा भडीमार सुरु
केला. मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे म्हंटल्यावर ते मला
त्यांच्या कक्षात घेवून गेले. परत
प्रश्नांचा भडीमार.
“ अरुणाचलची शक्ती कशात आहे ? भारताची शक्ती कशात आहे ? पुर्वांचालाच्या क्षमता कोणत्या ? या भागाचा चांगला विकास करायचा असेल तर काय केले पाहिजे ?”
ते प्रश्न विचारत होते आणि मी उत्तर देत होतो.
नौकरीच्या मुलाखतीला गेल्यावर एकदम
घाबरून स्मृती शून्य होणारा मी आज मात्र बिनधास्त उत्तर देत होतो. आपण जे काही
करतोय ते प्रामाणिक तळमळीतून करतोय हे पक्के असले की भीती पळून जाते. संचालक मला
अजूनच खोचक प्रश्न विचारत होते. मी पण न भिता मला वाटते ते प्रामाणिक उत्तर देत
होतो. तसा अगदीच जमिनीवरील चार वर्षांचा अनुभव गाठीशी असल्याने माझ्या बोलण्यात
मला चांगलाच आत्मविश्वास जाणवत होता. मला त्यांच्यावर काही माझी छाप टाकायची
नव्हती. मी किती ग्रेट आहे हे दाखून दयायचे नव्हते. माझे म्हणणे अगदीच बरोबर आहे
हे सिद्ध पण करायचे नव्हते. त्याही पेक्षा मला त्यांच्याकडे कशाचीच अपेक्षा
नव्हती. त्यांनी मला चहा पिण्यासाठी दिला व बसण्यास सांगून ते बाहेर कुठे तरी
गेले. मी मात्र आज चहाचा घोट घेत असताना एक वेगळ्याच निर्भयतेचा आनंद अनुभवत होतो.
संचालक परत आले आणि त्यांनी माझ्या
पाठीवर थाप मारून हसत म्हणाले.
“हे पत्र वाच !! आमचा प्रस्ताव तू
मान्य करावास अशी माझी इच्छा आहे.”
मी पत्र वाचले.
“भारत २०२०साठी गठीत ईशान्य
भारताच्या टास्क फोर्स मध्ये तुला आम्ही आमंत्रित करत आहोत.”
मी क्षणभर खूपच सुखावलो. दुसऱ्या
क्षणी मला लक्षात आले की मी केंद्राचा जीवनव्रती कार्यकर्ता आहे. केंद्राच्या
परवानगी शिवाय मी असे कोणतेच काम करू शकणार नव्हतो. संचालकांचे आभार मानले व मला
जरी हे काम आवडले असले तरी केंद्राच्या अनुमतीने मी यात सहभागी होईल. ते हसले व
मान डोलावली.
केंद्राच्या प्रमुखांनी मला टास्क
फोर्सच्या बैठकीत सहभागी होण्यास अनुमती दिली. पुढील काही काळ भरपूर अभ्यास आणि गट
चर्चा. मनात मात्र एक इच्छा होती की डॉ.कलामांना भेटण्याची. मी खरंतर फार काळ आता
अरुणाचल मध्ये राहणार नव्हतो. अंबाजोगाईला परतण्याचे वेध लागले होते. आईला मी
प्रॉमिस केलं होतं परत येण्याचे. ती वेळ आलेली होती. शेवटी महाराष्ट्रात परतलो.
डॉ. अब्दुल कलाम त्यानंतर भारताचे राष्ट्रपती झाले. आता तर भेट अशक्यच होती.
गेले दोन वर्षे मात्र मी महाराष्ट्र,आंध्रप्रदेश आणि गुजराथ मधील विविध ठिकाणी भारत २०२० या विषयाची
मांडणी करत होतो.
हे सगळे आठवतच झोप लागली. सकाळी
उठलो आणि मग नियोजनाला सुरवात झाली. डॉ. अब्दुल कलामांचे विवेकानंद शिलास्मारकावर
आले. त्यांच्यासोबत आम्ही १५ जण ४० मिनिटे होतोत. आज प्रत्यक्ष सहवास आणि गप्पा
होत होत्या.
“ स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना
निर्भयतेचा संदेश दिला. आता आपल्याला परत त्याच निर्भयतेची गरज आहे. जगातील सर्वात
जास्त तरुण असणारा आपला देश.आज परत आपला देश स्वामीजींचे आदर्श घेवून निर्भयतेने
प्रयत्न करायला लागला तर विकास नक्कीच होईल.”
आम्हाला त्यांची स्वाक्षरी हवी
होती. सुरक्षा सैनिक जवळ काही जाऊ देत नव्हते. माझी कार्यकर्ता बहिण वैशाली मात्र चांगलीच धडाडीची. ती मात्र धैर्याने पुढे गेली. आपल्या मनात
प्रामणिक तळमळ असेल तर नक्कीच निर्भयता येते व आपण यशस्वी होतो. आम्हा दोघांना
हसतच डॉ.कलामांनी स्वाक्षरी दिली.
भारताच्या मिसाईल मॅनचा कमालीचा
साधेपणा,आपुलकीचा अनुभव घेवून मी अंबाजोगाईत
निघालो. परतत असताना एक गोष्ट नक्की केली. अंबाजोगाईतील सर्व कार्यकर्त्यांना
घेवून डॉ. अब्दुल कलामांच्या रामेश्वरच्या घरी नक्कीच जायचे. त्याच घरात त्यांच्या
वडिलांनी त्यांना कुराणातील निर्भयतेचे दाखले देत जगाला भयमुक्तपणे पाहायला शिकवले
होते.
स्मशानातील निर्भयता ...
(भाग १९)
प्रचंड वाढलेली कामांची सूज कमी
केल्याने माझ्याकडे भरपूर वेळ होता. अभ्यासाबरोबरच आता सोबतच्या युवक युवतींशी
मोकळा संवाद होण्यास सुरुवात झाली. दहावी बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळवणारी.
अगदीच काही कारणाने नापास झालेली. सातत्याने प्रयत्न करून स्पर्धा परीक्षांच्या
मध्ये अपयश आलेली. काही पर्याय नाही म्हणून महाविद्यालयात कला व वाणिज्य शाखा
घेवून शिकणारी. मोठ्या संख्येने तरुण प्रबोधिनीच्या संपर्कात येत होती. करिअरची
भीती काय त्रास देते हे फार जवळून पाहत होतो. अपयश मिळाल्यावर आयुष्यात आलेली
निराशा अनेकांना त्रासून सोडत होती. अशा वेळी एक हक्काचा माणूस लागतो.
ज्याच्यासमोर आपण आपले मन मोकळे करू शकू. तो आपल्यावर कुठलाही शिक्का न मारता फक्त
शांतपणे मनातील खदखद ऐकून घेईल. माझं काम फक्त होतं त्यांच्या चांगला मित्र होऊन
शांतपणे त्यांच्या मनातील भीती,अस्वस्थता,निराशा ऐकून घेणे. त्यांना आश्रय अजिबात नको होता. फक्त आधार हवा
होता. असा खात्रीचा आधार असला की भीतीवर,अपयशावर,अस्वस्थतेवर हमखास मात करता येते.
महाविद्यालयातील दादागिरी करणाऱ्या
युवकांच्या विरुद्ध निवडणूक लढवावी वाटत होती पण हिंमत होत नव्हती. मनात इच्छा तर
भरपूर होती पण भीतीने काहीच करता येत नव्हते. त्यातून निर्माण होणारी चिडचिड आणि
अस्वस्थता पराकोटीची होती. खरं तर बऱ्याच वेळा परिणामांचे भय इतके जास्त असते की
माणूस संघर्ष करणेचे सोडून देतो.
"अरे ! निवडणूक हराल फार तर. थोडी
दमदाटी होईल किंवा प्रसंगी थोडा मार पण खावा लागेल. आता जी काही अस्वस्थता आहे
त्यापेक्षा भिडा की सरळ."
त्यानंतर त्यांना कुठलीच मदत लागली
नाही. तरुणांचा तो गट चक्क निवडणूक जिंकला.
महाविद्यालयातील दंडेल प्रशासनाच्या
विरुद्ध आवाज उठवायची कुणाचीच तयारी नव्हती. परीक्षेत नापास करतील.
महाविद्यालयातून काढून टाकतील असे एक न अनेक प्रश्न. मुकाटपणे अन्यास सहन करत
होती. त्यात हे सगळे ग्रामीण भागातील आणि गरीब घरातील.अशाच एका गटचर्चेत विषय
निघाला.
"जा भिडा काही होणार नाही. मी आहे
सोबत."
एवढंच काय ते म्हणालो. त्यांनी
चांगलाच संघर्ष उभा केला. व्यक्ती असो की गट असो आपला भोवताल नेहमीच भीतीने
लढण्याआधीच माघार घेण्यास शिकवतो. असा भयाचा संस्कार काय कामाचा.
आमच्या विवेकवाडीच्या जागेला भुताचे
माळ म्हंटले जायचे. दिवसा ढवळ्या लोक तिथे जायला घाबरायची. भुताच्या बरोबरच,विंचू सापांची भीती. दिवसा भीती म्हंटल्यास रात्रीची काय अस्वस्था
असेल ? आम्ही चक्क ठरवेल की भुताच्या
माळाला विवेकवाडी करायची. मुख्य रस्त्यापासून बरेच दूर. वीज नाही. रहदारीचे साधन
नाहीत. फारसा पक्का निवारा नाही आणि आम्ही तिथे अभ्यास शिबीर घेण्याचे ठरवले.
युवकांच्या सोबत चर्चा करताना सत्तरी पार केलेले मामा क्षीरसागर होते. चर्चा रंगात
आल्यावर मामांनी आपला निश्चय सांगितला.
"मी तुमच्याबरोबर तिथे एक रात्र
थांबणार."
मामांच्या बोलण्याचा परिणाम इतका
जबरदस्त झाला की तेव्हापासून भुताचे माळ अभ्यासाचे,श्रमदानाचे,साधनेचे केंद्र झाले. मामांचा
दराराच एवढा जबरदस्त होता की माळावरची भुते कुठे पळून गेली हे अजूनपण आम्हाला कळले
नाही. पुढे तर दहा दिवसांची राहुट्या टाकून शंभरावर मुलांचे श्रमशिबीर तेथे झाली.
भुताचे माळ आत्मविश्वासाचे, निखळ प्रेमाचे, स्फूर्तीचे नाही तर निर्भयाचे केंद्र बनले.
तरुणांच्या बरोबरच कुमारांच्या
बरोबर पण ज्ञान प्रबोधिनी अंबाजोगाई काम करते. ग्रामीण भागातील मुलांच्या बरोबरच
शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील कुमार व तरुण मुलांच्यासाठी पण विविध उपक्रम
असतात. भर एप्रिल मे मधील रणरणत्या उन्हात मुलांना घेवून आम्ही अंबाजोगाई
परिसरातील डोंगरदऱ्या फिरायचो.जवळचे पाणी संपले की पाण्याच्या शोधासाठी मग
फिरायचे.उन्हाची आणि डोंगरदऱ्यांची भीती जाऊन कुठल्याही परिस्थितीत मुकाबला कसा
करायचा हे मुलं चांगलीच शिकत होती. ग्रहण काळात घराच्या बाहेर न पडणारी मुलं चक्क
उघड्या माळरानात ग्रहणाचा अभ्यास दुर्बिणी,सूक्ष्मदर्शक यंत्र घेवून करायला लागली. प्रेताची आणि स्मशानाची तर
प्रचंड भीती यासर्व मुलांच्या मध्ये होती. निर्भयाच्या संस्कार पेक्षा भयाचा
संस्कारच आपल्याकडे नकळत होतो.
सुभाष तळेकर असेच एक अफलातून
स्वावलंबी व्यक्तीमत्व. बाजारू विश्वात विकण्यासाठी असणाऱ्या बाह्य व्यक्तीमत्वाचा
कुठलाही लवलेशही नाही. बुटकी व रोडकी ही आमची विठ्ठलाची मूर्ती. सकाळी ब्रेड, फुलांचे हार, वर्तमानपत्र
विकण्यापासून दिवस सुरुवात होई त्याचा. आपल्या हाताची भाजी भाकर स्वतःच्या कमाईची
असली की एक आपलंसं करणार स्मित नित्याच चेहेऱ्यावर येत, असा आमचा प्रबोधिनीचा तो कार्व्हर होता. सुभाष बरोबर विवेकवाडीत
गेलो होतो. संध्याकाळची वेळ, सूर्यास्त झाला
की आम्ही परत अंबाजोगाईला निघालो. चुकून मोबाईल आज घरीच विसरला होता.
अंबाजोगाईच्या जवळ २ किमी आलो नसेल तोच जोरदार पावसाला सुरुवात झाली. थोड्यावेळात
त्याने आपले रौद्र रूप दाखवायला सुरुवात केली. आम्हाला समोरचे काहीच दिसत नव्हते.
शेवटी त्याला शरण जाऊन एका ढाब्याचा निवारा आम्ही पकडला. पुढील पाच मिनिटात तो
ढाबाच कोसळला. भिजलेल्या कपड्यां पेक्षा किंचितशी भयभीत मनाची अनुभूती जास्त होत
होती. एक उंच वाढलेलं अशोकाच झाड करकर आवाज करत जमिनीवर पडलं. का थैमान घालतोय हा
आज एवढा? मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते.
घरी येऊन पहिल्यांदा चिंब भिजलेले
कपडे काढले व गरम पाण्यानी स्नान केले. आई म्हणाली,
“अरे, फोन कितीदा वाजला. घरीच विसरून गेलास.”
लगेच मोबाईल पहिला तर ३० मिस कॉल!
बऱ्याच जणांचे होते पण वैद्य काकांचे जास्त होते. काकांना फोन लावला.
“काका, का हो इतके फोन केले?”, मी विचारले.
“अरे ! राहुलचे वडील गेले”
“मी, किरण आणि राधेश इकडे लाकडे आणण्यासाठी आलोत तू लवकर तयार होऊन
राहुलच्या घरी ये.”
विवेकवाडी हिरवीगार करणाऱ्यातील
छोट्या राहुलची खूप मोठी भूमिका होती. अनेक प्रश्न मनात घेऊन राहुलच्या घरी
निघालो.
किरण, राधेश सारखीच अनेक इतर युवा मित्र त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच
रात्री स्मशानभूमीत जात होते. अमित, मंगेश, मुंजा व इतर सगळेच अंत्यसंस्काराची
तयारी करत होते. आम्ही एक दोन जणच थोडे अनुभवी बाकी सगळीच नवखे होती. सर्वजण
धीरांनी सगळ्या गोष्टी करत होती. रात्री ११.३० ची वेळ प्रचंड पाऊस पडत होता. आमची
जीप स्मशानभूमीकडे निघाली. आम्ही स्मशानभूमीत पोहोंचलो. बाहेर किट्ट अंधार, जीप मध्ये आम्ही चार जण. अजून मागचा टेम्पो यायचा होता. कुठे दहन
करायचे याची कल्पना मला नव्हती. टेम्पो येण्याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हत.
भर मध्यरात्री स्मशान शांततेत राहुलच्या चेहऱ्यावरची शांतता जास्त अस्वस्थ करणारी
होती. लहान वयातच आलेल मोठेपण जाणवत होत. धाकटा योगेश रडत म्हणाला होता,
“दादा, आता आपले कसे होणार?”
राहुलनी धीरानी उत्तर दिलं, “मी आहे न ?”
मारवाडी स्मशानभूमीत त्या
परिस्थितीचा काहीच अनुभव नसलेले सगळेच छोटी मित्र एकदम सराईत अंत्यसंस्कार
करणाऱ्यांच्या सारखे वागत होते. सरण रचणे, मृतदेह नीट त्यावर ठेवणे. शेवटचे विधी सर्व जण शांतपणे करत होते.
भरपावसात भिजलेली लाकडे कशी पेटणार? मग त्यासाठी मीठ आणि करडीचा भुसा कसा वापरतात हे सर्व ते अनुभवत
होती आणि पाहिजे ती मदत ती आम्हा सर्व जाणत्या लोकांना करत होती. धगधगनाऱ्या
चितेचा लाल भडक प्रकाश सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. रात्रीचे दोन वाजले होते.
मातीचे छोटे मडके खांद्यावर घेवून राहुलनी चिते भोवती तीन फेऱ्या मारल्या व
शेवटच्या फेरीनंतर त्याला मडके पाटीमागे सोडून द्यायला सांगितले. मडके फुटले
अंत्यविधी पूर्ण झाला. सर्व जण परत निघाले.
शांतपणे उपासना करणारी,दलावर मनसोक्त खेळणारी, भर उन्हात डोंगरदऱ्यां फिरणारी, गणेशोत्सवात भान हरपून प्रचंड ताकदीने बरची नृत्य करणारी, पूर्ण मिरवणुकीत
बांधलेला ढोल न सोडता अफाट ताकदीने वाजवणारी ही आमची तरुण प्रबोधक आता मध्यरात्री
स्मशानात निडरपणे अंत्यसंस्कार सहजपणे करू लागली.....
शेवटी संघटीतपणे काम करण्याचा
संस्कार निर्भयता पण सहज शिकवून जातो.
लग्न करण्याची भीती ....
(भाग २०)
महाविद्यालयात असताना व.पु.काळे
यांचे पार्टनर हे पुस्तक वाचण्यात आले. सुट्टी असल्याने एका बैठकीत ते संपवले
होते. वाचून झाल्यावर मात्र मनात लग्न,सहजीवन,संसार याबद्दल चांगलीच भीती मनात
बसली. नवरा-बायको,सासू-सून,मुलगा-आई ह्या नात्यात लग्नाच्या नंतर निर्माण होणारी प्रचंड वादळे
व.पु.काळे फारच ठळकपणे माडलेली आहेत.नवरा-बायको मधील अबोला हा प्रकार तर भयानक
वाटला. मी लग्न ह्या प्रकियेचा याआधी फारसा विचार केलेलाच नव्हता. मनात भीती आणि
प्रचंड वादळ होती. खरं तर तशी वादळे किंवा भीती मनात असली की आपल्याला खात्रीचा
आधार देणारी व्यक्ती लागते. मला माझ्या मनातील भाव दुसऱ्या कुणाला बोलायचे असते हे
ज्ञान नव्हते. आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भीती,अस्वस्थता योग्य आणि परिपक्व माणसाला सांगणे पहिली पायरी. त्याच्याशी याबद्दल व्यवस्थित चर्चा करणे दुसरी
पायरी. चर्चेतून निर्माण होणाऱ्या निष्कर्षाना नीट समजून उमजून स्वीकारणे तिसरी पायरी. अशा तीन पायऱ्याच्या माध्यमातून भीतीचे खूप चांगले
व्यवस्थापण होते. मला ह्या प्रक्रियाच माहित नव्हत्या. अनेकांच्या बाबतीत असेच
असते हे मला नंतर कळाले. मी माझ्या मनाशी ठरवून टाकले लग्नच करायचे नको. उगीच आपली
विषाची परीक्षा कशाला घ्यायची ?
मला लग्न न करता काम करायचे आहे असे
मी सुबोध कुलकर्णीला सांगून टाकले. असे लग्न न करता काम करणाऱ्या प्रबोधिनीतील
ज्येष्ठांशी संवाद करायचे ठरले. प्रत्यक्षात मात्र तसे काही घडले नाही. हळूहळू
लग्न न करताच काम करणाऱ्या दिग्गज लोकांच्या सहवासात येत गेलो त्यामुळे लग्न नको
ही भावना जास्त घट्ट होत गेली. भीती मुळे लग्न नको की काही तरी चांगले काम करताना
लग्न हा अडथळा आहे की मला साधना मार्गावर जायचे आहे व पुढे जाऊन संन्यास घ्यावयाचा
आहे. असा खरंच फारसा विचार मी केलेला नव्हता. पार्टनर मध्ये काय लिहिलेलं होतं ते
मी काळाच्या ओघात विसरून पण गेलो होतो. लग्न न करता माझं काहीच अडत नव्हते. उलट
मस्त मोकळे,उनाड आयुष्य आनंदाने जगत होतो. ' कशाला लग्न ?' असे विचार आता
जास्त येत होते. अर्थात लग्न न करण्या मागील विवेकनिष्ठ आणि शास्त्रशुद्ध विचार मी
कधी केलाच नव्हता. तसेच लग्न केल्याने नेमके काय होते ? याचा विचार पण मी फारसा केलेला नव्हता. लग्न न करता काम करायचे अशा
पार्श्वभूमीवर सगळे चालू होते. पुढे नकळत लग्न न करता समाजकार्य करतोय हे कौतुक
ऐकायला मिळायला लागले.
विवेकानंद केंद्रात होतो तो पर्यंत
मी माझ्या अगदीच जवळच्या लोकांच्या पासून बराच दूर होतो. त्यामुळे लग्न का करावे
लागते याबद्दल फारसे मला कुणी बोलणारे नव्हते. अंबाजोगाईत आलो आणि काही दिवसात
माझ्यामागे लग्न कर म्हणणाऱ्यांचा ससेमिरा लागला. आईला तर मनातून मी लग्न करावे
वाटतच होते. तिला साहजिकच माझ्या वृद्धापकाळाची काळजी होती. त्यावेळी माझी काळजी
कोण घेईल ? असेच बरेच काही. विवेकानंद केंद्रात
मी अगदीच वार्धक्यातील अविवाहित कार्यकर्ते पाहिले होते. त्यांची खूप चांगली काळजी
घेतली जाते हे पाहिलेले होते. अंबाजोगाईत मात्र मित्र,नातेवाईक,आप्त खूप ताकदीने माझा विचार
बदलण्याचा प्रयत्न करत असतं. त्याला प्रतिक्रिया म्हणून मी अधिक ताकदीने लग्न न
करण्याचे कारणे त्यांना समजून सांगत असे. खरे पाहता तो माझा रुक्ष बौद्धिकवाद
असायचा. लग्न न करण्याचे किंवा करण्याचे मी फारसे सखोल चिंतन अजिबात केलेलं
नव्हते.
यापुढे जाऊन माझ्या घरी मुलीचे वडील, नातवाईक लग्नाचा प्रस्ताव घेवून येत होती. काही तर माझे शिक्षक
होते. मी कधीच वैतागून नाही गेलो. काही वेळा तर असे प्रस्ताव घेवून येणाऱ्या
मुलीच्या वडिलांना मी मुलाचा मोठा भाऊ आहे असे भासवून बोलत असे. माझ्याशी लग्न न
करणे किती हिताचे आहे हे मीच त्यांना समजून सांगत असे. ते हताश होऊन आईला न भेटताच
परत गेले की मी निवांत. असे अनेकदा घडलेले होते.
मी माझ्या मित्रांच्या लग्नात भरपूर
एन्जॉय केला. प्रत्यक्ष नवरदेव होऊन तसे नटून थटून मिरवावे असे अजिबात वाटले नाही.
एकुणात लग्नाबद्दल मला आधी प्रचंड भीती वाटत होती. त्याच बरोबर लग्न झाल्यावर
निर्माण होणाऱ्या नात्यातील तणावांची तर फारच जास्त.पुढे लग्न न करताच काम करावे
असे मनातून वाटायला लागले. असेच एकदा मामा क्षीरसागरांनी मला विचारले,
“ काय रे, प्रबोधिनीचे काम आता आयुष्यभर करायचे ठरले का ?”
मी काहीच उत्तर दिले नाही. मात्र
मामांनी विचारलेल्या प्रश्नांनी माझे भरपूर वैचारिक मंथन झाले. प्रबोधिनीचेच काम
आयुष्यभर करावे हे मात्र आता पक्के होत होते. त्यासाठी नेमकं काय करावे यासाठीचा
माझा संचालकांशी संवाद पण सुरु झाला. लग्न न करता करायचे आहे हे मात्र मी फक्त
माझ्या मनात ठेवले.मोकळेपणाने मी त्यांना माझा संकल्प सांगितला असता तर खूप चांगले
झाले असते. असा मोकळा संवाद अभयाच्या प्रवासात उपयोगी असतो.
पुण्यातील प्रबोधिनीच्या बैठकीला
नित्यनेमाने जात होतो. तिथे माझे समवयस्क प्रबोधक मित्रांशी भरपूर चर्चा होत असतं.
अशाच एका बैठकीत त्यातील बरेच जण फारच पक्केपणाने म्हणाले,
“ ज्ञान प्रबोधिनीचे काम स्थिरपणे आणि
आयुष्यभर करायचे असेल तर लग्न करावेचे लागते.”
ते सर्व पुण्यात ज्येष्ठ लोकांच्या
सहवासात राहात होते. मी तर खूप दूर अंबाजोगाईत. व्हायचे ते झाले. माझ्या मनात
प्रचंड अस्वस्थता. मला जर प्रबोधिनीचे काम करायचे असेल तर लग्न करावे लागेल. मला
तर लग्न न करता करायचे होते. ती अस्वस्थता कुणाशी व्यक्त न करताच मी अंबाजोगाईत
आलो. मनात प्रचंड अस्वस्थता आणि भीती. त्याचा चांगलाच वाईट परिणाम माझ्या मनावर
व्हायला लागला.
अशी अस्वस्थता असली की मी प्रचंड
वाचन करत असे. यावेळी मी महर्षी अरविंदांचे वाचन सुरु केले. खाण्यापिण्याचे आणि
झोपण्याचे सगळेच नियम धाब्यावर बसवले होते. रात्री उशिरापर्यंत वाचन. ते समजायला
थोडं अवघड त्यातून निर्माण होणार वैचारिक ताण. भावनिक ताण तर आधीच बराच होता. तीन
दिवस झोपलोच नाही.
संध्याकाळची उपासना संपवून मी
जेवण्यासाठी घरी आलो. जेवण झाले व अचानक चक्कर आल्यासारखे वाटायला लागले. सगळा
भोवताल फिरतोय अशी जाणीव. प्रचंड अस्वस्थता होती. मी चेहऱ्यावर पाणी मारले. काही
केल्या ते थांबत नव्हते. विचित्र अनुभव होता तो. आपले स्वतःवरील सगळेच नियंत्रण
गेल्याची असाह्य जाणीव. स्वतः स्थिर करण्याचे प्रयत्न मी करत होतो पण सगळेच
अयशस्वी.शेवटी डॉक्टर अतुलकडे जावे म्हणून विजयला सोबत घेवून गेलो. अतुलचे घर
माझ्या घरापासून फक्त पन्नास मीटरवर. एकटा जाण्याचे धारिष्टय माझ्यातील संपले
होते.
भीती,घबराट,तीव्र घबराट.....
Panic Attack
(भाग २१)
पार्टनरच्या वाचनापासून लग्नाचे
मनात बसलेलं भय मला नकळतच एका चांगल्या मार्गाला घेवून गेले. लग्ना शिवाय
प्रबोधिनीचे काम आयुष्यभर करता येणार नाही यातून निर्माण झालेला मनकल्लोळ फारच
त्रास दायक होता. स्वतःला स्थिर स्थितीत न ठेवता येणारी ती चक्कर भयानक होती. मी
मला सुचतात ते सगळे उपाय करून पाहिले पण सगळेच व्यर्थ होते. शेवटी डॉ. अतुलकडे
निघालो. आधारा विना चालता येत नव्हते.
अतुल मार्गशीर्ष दत्त महोत्सव
असल्याने देवघरात गेलेला. शेवटी डॉ.नितीन धर्मरावकडे गेलो. त्याने माझी नाडी
परीक्षा केली व काही औषध दिले. घरी परतत असताना अतुल भेटला. त्याला मी सविस्तर
वृतांत सांगितला. आपण आधी तुझा रक्तदाब तपासू असे त्यांनी सांगितले व मला घेवूनच
तो दवाखान्यात आला. त्याला तसे माझे सगळेच परिचयाचे. रक्तदाब चांगलाच वाढलेला
होता. अतुलच्या चेहऱ्यारील भाव गंभीर होते. त्यात मला त्याच दिवशी रात्रीचा प्रवास
करून पुण्याला एका महत्वाच्या बैठकीला जायचे होते.
एकूणच निदान अचूक करण्यात अतुल फारच
तरबेज.मला मात्र बैठकीला जाणे महत्वाचे वाटत होते. अतुलने जाण्यासाठी परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी रक्तदाब तपासण्याचे
सांगितले. रात्रभर जागाच होतो. प्रवासात काही त्रास झाला नाही. मनामध्ये परत आधी
घडले तसे होईल का ? ही मात्र धास्ती होती. त्याच बरोबर
एक विचित्र मानसिकता होती की आपल्याला रक्तदाब असणे शक्यच नाही. अतुलने कधी नव्हे
ते आरतीला( माझी बहिण ) माझा रक्तदाब तपासून घेण्यास सांगितले. दोन दिवस पुण्यात
राहिलो मात्र रक्तदाब काही तपासला नाही. मी स्वतःचा रक्तदाब वाढतो हे स्वीकारायलाच
तयार नव्हतो. पुढील पंधरा दिवसात परत तसाच त्रास झाला. रक्तदाब अतुलने परत तपासला
तो वाढलेला होता. खरं तर मी सगळे आता त्याच्यावर सोडायला पाहिजे होते. माझा विश्वास
त्याच्यावर होता पण माझ्या काही धारणा फारच विचित्र होत्या. माझ्यासारख्या सामाजिक
काम करणाऱ्या माणसाला रक्तदाब असणे म्हणजे कलंक अशी काही माझी मानसिकता होती.
त्यात रक्तदाबावरील डॉक्टर जे औषध देईल ते मुकाट्याने घेण्यास तयार व्हायला
पाहिजे. माझ्या अडेलतट्टूपणा इथे आड येत होता. शेवटी मी आयुर्वेदिक औषध व एकूण
सगळ्या चाचण्या करून घेण्यास तयार झालो. चाचण्यात माझ्या रक्तातील चरबीचे प्रमाण
थोडे वाढलेले होते.
माझा या काळात प्रवास चांगलाच वाढला
होता. त्याच सोबत अनेक लोकांचे घरगुती उपायांचे सल्ले मी प्रामाणिकपणे ऐकत होतो.
प्रमाणबाहेर लसणाचे सेवन करण्यात आले. पित्तप्रकोपाचा काळ त्यात पित्तवर्धक अधिक
खाद्य पदार्थांचे सेवन व बदलता रक्तदाब यातून मला रात्री शांत झोप लागणे बंद झाले.
रात्रीचे जागरण त्यातून अधिक पित्त वाढायला लागले व परत रक्तदाब वाढणे. अशा
दुष्टचक्रात मी अडकलो होतो. मनात आपल्याला रक्तदाब असल्याची प्रचंड सल. जगात
सगळ्यात मोठा आजार आपल्यालाच कसा झाला ? या विचित्र विचारांनी स्वतःलाच ग्रहण लावून घेतलेले होते. रक्तदाब,पित्त व निद्रानाश यातून चिंतारोग सुरु झाला. अतुल सारखा अगदीच
जवळचा आणि जिवाभावाचा मित्र डॉक्टर माझी ही सगळी आंदोलने खूप शांतपणे समजून घेत
मला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. तो तसा डॉक्टर म्हणून खूप मृदू स्वभावाचा
आणि मी पेशंट म्हणून मात्र अगदीच त्याच्या विरुद्ध. डॉ.भाऊसाहेब देशपांडे म्हणजे
अतुलचे वडील म्हणजे अगदीच निष्णात वैद्य. त्यांनी माझ्या आहाराचे नियोजन करून
दिले. सगळेजण मला समजून घेवून मदत करत होती. तात्काळ सगळे माझे विकार थांबले
पाहिजेत आणि माझ्या सगळ्या गोळ्या बंद होऊन मी अगदी पूर्वी सारखा मस्तकलंदर, मला पाहिजे तसे स्वतःच्या शरीरावर व मनावर अत्याचार करणारा
सुपरहिरो झालो पाहिजे याच अभिनिवेशात वावरत होतो.
माझ्या इच्छेनुसार सगळे
ताबडतोब-लगेच होणारे नव्हते. माझ्या अपेक्षा माझ्या शरीराने पूर्ण करण्यासाठी व
त्याला सुस्थितीत आणण्यासाठी थोडा वेळ देणे गरजेचे होते. डॉक्टरांच्यावर सर्व काही
सोडून मी योग्य विश्रांती घेणे गरजेचे होते. माझ्यातील अट्टाहास टोकाचा होता. खरं
तर तो एक आजारच होता. माझ्या मनासारखे सगळे काही होत नाही यातून वैफल्य व निराशा
मात्र जास्त वाढत होती.छोट्याछोट्या गोष्टींनी डोळ्यातून पाणी येण्यास सुरुवात
झाली.
शिशुविहार सहल होती. रात्रभर मी
मात्र जागा होतो. अगदी मिनिटभर पण झोप लागली नाही. स्वतः अतुल माझ्या सोबत सहलीला
आला. परतल्यावर मात्र अतुलेने कडक शब्दात सांगून मला रक्तदाबाची गोळी दिली. रात्री
शांत झोपी गेलो. सकाळी रक्तदाब तपासाला बराच नियंत्रणात होता. काही दिवस गोळी
घेण्याचे ठरले. मी मात्र मनातून हा निर्णय स्वीकारायला तयार नव्हतो.
अस्वस्थता पराकोटीची झाल्यावर मात्र
मी ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीशराव बापटांना फोन केला व माझी व्यथा
सांगितली. ते सोलापुरात असल्याने मी लगेच त्यांना भेटण्यासाठी निघालो. आमचे
सविस्तर बोलणे झाले. माझ्या वैचारिक अस्वस्थतेला त्यांनी नीट समजून घेतले. माझ्या काही
गोष्टी नक्की नव्हत्या. प्रबोधिनीची प्रतिज्ञा घेवून काम करण्याचे मी बरेचदा
खिल्ली उडवून टाळले होते. आयुष्यभर ज्ञान प्रबोधिनीचे काम करायचे आणि ते ही कुठला
आचारधर्म न पाळता ही चूक पद्धती होती. मी ज्ञान प्रबोधिनीचा प्रतिज्ञीत कार्यकर्ता
म्हणून काम करायचे आता निश्चित झाले. सोलापूर मधून परतत असताना बस मध्येच अंगाला
कंप फुटला. परत भेदरल्या सारखे होत होते. पराकोटीची भीती आणि अस्वस्थता. जवळील
लसून मी कचाकचा खाल्ला. पोटात वेगळीच पोकळी निर्माण व्हायची. अंबाजोगाईत सुखरूप
पोहोंचलो. भय आणि त्यातून निर्माण झालेला चिंता रोग लागलेला होता. रेस्टील नावाची
मेंदूला शांत करणारी गोळी घेणे क्रमप्राप्त होते.
प्रशिक्षण वर्गासाठी पुण्याला गेलो.
सर्वांच्या सोबत खूप चांगले वाटत होते. आजीचा अपघात झाल्याने ती हॉस्पिटलमध्ये
होती. त्यामुळे काही काळ पुण्यात राहायचे ठरवले. मी खरं तर चांगली विश्रांती
घेण्याची गरज होती. मनात प्रचंड विषाद होता व तो घालवण्यासाठी शरीरासोबतचे मनावर
प्रचंड अत्याचार चालू होते. त्यात आहाराचे पथ्य पाळणे झाले नाही. याच काळात माझ्या
एका मामा मला म्हणाला,
“हे सगळे लग्न न केल्यामुळेच तर होत
नाही न ?”
आता तर विचित्र परिस्थिती. मी तकड
ज्ञान प्रबोधिनीचे संचालक कार्यालय गाठले. मनातील सर्व काही गिरीशरावांना
सांगितेल. ते सांगत असतानाच अंगात प्रचंड कंप आणि तीव्र स्वरूपातील घबराट ( Panic Attack )
सुरवात झाली. मला काहीच समजत
नव्हते. खूप रडावे वाटत होते पण रडता पण येत नव्हते. मी जवळील खडीसाखर कचाकचा
खाण्यास सुरवात केली. गिरीशरावांनी मला टेबलावर झोपण्यास सांगितले पण मला ते शक्य
होत नव्हते. शेवटी त्यांनी मला सोबत घेवून स्वयंपाक घर गाठले. गरम चहा पिला.
“ मला ईश्वर आहे यावर विश्वास नाही.तो
कसा येईल ? मला वाटते की हे सर्व काही माझ्या
नास्तिकते मुळे निर्माण झालेलं आहे. मी काय करू त्यामुळे हे सगळे थांबेल ? मला नाही सहन होत आता हे ? माझा मामा म्हणत आहे ही मानसिक व्याधी आहे. त्याला सुद्धा असा
त्रास होता. लग्न न करणाऱ्या लोकांच्यात हे जास्त असते.”
मी माझ्या मनात जे काही आहे ते
त्यांना बोलत होतो. गिरीशरावांना एका व्याख्यानाला जायचे होते.माझ्यामुळे त्यांना
बराच वेळ झालेला होता. मी थोडा स्थिर झाल्यावर मला सोबत घेवूनच ते निघाले. माझे
त्यांना सारखे प्रश्न.
“ तुम्हाला नाही का झाला असा त्रास ? असे न होण्यासाठी तुम्ही काय केले होते ? तुमचा आहे का नाही देवावर विश्वास ? काय नेमके असे आहे की तुम्ही इतके शांत आणि खंबीर आहात ? ज्ञान प्रबोधिनीचे काम हे तुमचा स्वधर्म आहे हे तुम्हाला कसे कळले ? मला ते कसे कळेल ?”
डॉ.गिरीशराव ज्ञान प्रबोधिनीचे
चतुर्थ प्रतिज्ञीत म्हणजेच आजन्म अविवाहित राहून वैराग्यपूर्ण काम करणारे प्रबोधक.
माझ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर ते शांतपणे देत होते. मला मात्र काही तरी जादूची
कांडी हवी होती की ती मला माझ्या मनातील सर्व प्रश्न क्षणात संपवेल.
तिसरी रात्र पूर्णपणे जागा होतो.
रेस्टील घेवून पण झोप लागत नव्हती. आता आईचा जीव फारच अस्वस्थ होत होता. तिची तगमग
मला पाहवेना. शेवटी मी मानसोपचार तज्ञ डॉक्टरांच्याकडे जायचे निश्चित केले.
संध्याकाळी अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांच्याकडे जाण्यास निघालो ....
झाले मोकळे आकाश...
(भाग २२)
काही कारणाने निर्माण होणाऱ्या
प्रश्नांचा मनकल्लोळ होतोय हे समजून घेवून योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन न घेणे.
शारीरिक व्याधींच्या बाबतीत हटवादीपणा करणे व अडेलतट्टूपणाने वागणे. आपल्या चूक
विचार करण्याच्या पद्धतीने निर्माण झालेली परिस्थिती स्थिरस्थावर होण्यास थोडा वेळ
लागणार हे न स्वीकारता ती क्षणात पूर्व पदावर यावी ही अवास्तव अपेक्षा. हे सगळेच
भीती मुळे निर्माण होणारे किंवा अशा हेकेखोर स्वभावामुळे भीतीचे रुपांतर भयगंडात (Phobia) होणे हे साहजिकच असते. मला आता रक्तदाब वाढण्याच्या भीती सोबतच झोप
न लागण्याचा Phobia निर्माण झाला होता. त्यातून निर्माण
झाला होता चिंता रोग. सर्वांचे एकत्रित निदान म्हणजे Phobic
anxiety. रक्तदाब नियंत्रणात न येण्याचे कारण
म्हणजे Phobic anxiety आहे हे निदान
डॉक्टरांचे.
डॉ. अंजली पाटील माझ्या फारच मस्त
डॉक्टर. माझ्या पूर्ण स्वभावाचा आणि विचार करण्याच्या पद्धतीची त्यांनी चांगलीच
पोलखोल केली. पहिल्या भेटीत अतिशय कठोर वाटणाऱ्या डॉक्टर काही दिवसातच माझ्या
चांगला आजी come दोस्त झाल्या. त्यांच्या थोड्या
नेमक्या आणि तीक्ष्ण प्रश्नांनी मी बऱ्याच गोष्टींवर बोलता झालो.
“तू न खरोखर अतिरेकी आहेस !!
चांगल्या लोकांच्या सोबत होतास म्हणून भल्या मार्गाला लागलास नाही तर विध्वंस केला
असतास. धन्य आहे तुझी ती प्रबोधिनी आणि तुझे कुटुंब !!.तुला कसे सांभाळून घेते
असेल ते त्यांनाच माहित !!”
त्या मला आरसा दाखवत होत्या.
त्यातून मला दिसलेला मी समजून घेत गिरीशरावांच्या बरोबर चर्चा करून योग्य मार्ग
काढत होतो. आपण कामाच्या नशेत इतके बेभान असतो की काम करण्यामागील आपली मनोभूमिका
आणि विचार पक्का होत नाही. त्यातून पुढे कधी तरी नक्कीच भावनिक आणि वैचारिक गोंधळ
निर्माण होतो.
चित्त थाऱ्यावर राहात नाही. निर्माण
होणारी चित्तातील अशुद्धी दूर करणे गरजेचे असते. मेंदूत निर्माण होणारा केमिकल
लोच्या औषधाच्या आणि डॉक्टरांच्या मदतीने वाढायचा थाबतो व ठराविक काळापुरते बरे
वाटते. मला तर डॉक्टरने दिलेले औषध पाहिले आणि Panic Attack आला होता.
चित्तशुद्धी करण्यासाठी मला ज्ञान
प्रबोधिनीच्या उपासनेचा आणि प्रार्थनेचा खूप उपयोग झाला. अभयाच्या साधनेत
चित्तशुद्धी खूपच गरजेची असते. माझा गिरीशरावांशी संवाद खूप जास्त वाढला. नकळत मला
आता अंबाजोगाईत न राहता पुण्यात त्यांच्यासोबतच राहावे वाटायला लागले. मी त्यांना
माझी इच्छा सांगितली. त्याच्यावर मात्र ते ठाम होते.
" तू स्वतः प्रयत्न करून यातून बाहेर
पडू शकतो. तुला आधाराची गरज आहे आणि तू आश्रय मागतोस."
मी थोडा नाराज होतो पण काही इलाज
नव्हता.ज्ञान प्रबोधिनीचे द्वितीय संचालक अण्णासाहेब ताम्हनकर यांचे पण मार्गदर्शन
घेण्यास मला गिरीशरावांनी सांगितले. चांगले सविस्तर बोलणे झाल्यावर अण्णांनी मला
हराळीत येवून राहण्यास सांगितले. याबाबत पण गिरीशरावनी फार पक्की भूमिका घेतली. मी
स्वतः या परिस्थितीतून नक्कीच बाहेर येवू शकतो असा त्यांचा विश्वास होता आणि तेही
अंबाजोगाईत राहून.
सततची डोक्यात असणारी चिंता आणि भय
कमी करण्यासाठी नामस्मरणाचा उपयोग होतो. त्यासाठी गुरुंकडून मंत्र दीक्षा घ्यावी
लागते. अशी दीक्षा घ्यावी असे पण काही ज्येष्ठ लोकांनी सांगितले. गिरीशराव मात्र
म्हणाले,
“ज्ञान प्रबोधिनीचे काम आयुष्यभराचे
करायचे असेल तर प्रबोधिनीची उपासना हाच आपला मंत्र आणि प्रबोधिनीची प्रतिज्ञा हीच
आपली दीक्षा.”
मला सुरवातीला ते सगळे पचणे खूप
अवघड होते. मला लगेच पाहिल्यासारखे बिनधास्त व्हायचे होते. गिरीशराव मात्र मला काम
करतच निर्धास्त होण्याचा मार्ग सांगत होते.
मी मग अनेक दिग्गज लोकांना भेटण्यास
सुरुवात केली. गिरीशरावांना जे प्रश्न मी विचारत होतो ते त्यासर्वांना विचारत
होतो. रामकृष्ण मठाचे स्वामी भौमांनंद, अभय बंग, बाबा आमटे, गौतमजी बजाज ( पवनार आश्रम ). प्रत्येकाच्या भेटीतून नक्कीच काही न
काही मिळत होते.
अभय बंग व स्वामी स्वामी
भौमानंदांनी मला भक्तीचे महत्व सांगितले. मी जरी सगळ्या मंदिरात जात असलो तरी
विचारांना ईश्वराचे अस्तित्व मान्य होत नव्हते. काही लोकांचे फारच चांगले असते ते
अनन्य भावाने ईश्वराची आराधना करतात. मला तर ते शक्य नव्हते.बाबांच्या भेटीने
मात्र निराशा चांगलीच गेली. पवनार आश्रमात गेलो असता आश्रम बंद झाला होता. मी व
सुबोध प्रबोधिनीतून आलो म्हंटल्यावर आम्हाला आत येण्याची परवानगी मिळाली. त्या
परिसरात गेल्यावर मात्र एक वेगळीच उर्जा मिळाली. गौतमजींना मी भरपूर प्रश्न विचारत
होतो. “ स्वधर्म कसा शोधायचा ?” माझे घोंगडे इथेच भिजत पडले होते.
“ विनोबा म्हणतात त्या प्रमाणे
स्वधर्म आपल्या आईसारखाच आपल्या आधी जन्माला आलेला असतो. आपल्याला शोधण्याची गरज
नाही. निरपेक्षपणे काम करत राहायचे.”
या उत्तराने माझा वैचारिक गोंधळ
भरपूर कमी झाला. आता मी अधिक तटस्थपणे माझ्या स्वतःचा अभ्यास करायला लागलो.
शारीरिक गोंधळ म्हणजे केमिकल लोच्या औषधाच्या आणि डॉक्टरांच्या मदतीने कमी करण्यास
सुरवात केली. भावनिक गोंधळ व वैचारिक गोंधळ थांबवण्यासाठी गिरीशरावांची मदत. यातून
काही गोष्टी पक्क्या झाल्या. आपला देश म्हणजेचे आपला देव. देशासाठी मनोभावे काम
करणे म्हणजे भक्ती. मनात हा भाव अधिक पक्का व्हावा म्हणून संतांची अभंग व
देशभक्तीपर गीते समजून उमजून म्हणणे. ज्ञान प्रबोधिनीची उपासना व प्रार्थना व ती
नीट समजावी म्हणून वाचन म्हणजे माझी अध्यात्मिक साधना. देव हा देश म्हणून
विचारांना पटणे थोडं अवघड होते. मला स्वतःच्या असण्याचे महत्व पटले होते. माझे
असणे म्हणजेचे ईश्वराचे अस्तित्व हे जास्त पटले. माझ्या भोवती असणाऱ्या
माझ्यासाख्या लोकांमध्ये पण तो आहे. त्यांच्यासाठी शुद्ध मनाने काम करणे म्हणजे
ईश्वर भक्ती. आपले स्वतःचे खरे स्वरूप ओळखणे, समजून घेणे म्हणजेच साधना व ध्येय. आता हे सगळे विचारांना, भावनेला पटले होते.
प्रबोधिनीच्या मार्गावर व डॉ. पाटील
यांच्या वैज्ञानिक औषधोपचारावर माझी श्रद्धा अधिक वाढली. माझी प्रकृती झपाट्याने
सुधारत गेली. औषधे फार लवकर कमी व्हायला लागली. इस्रायलच्या अभ्यास दौरा इतका
सॉलिड झाला की मला रक्तदाबाच्या गोळी शिवाय कुठलीच गोळी लागली नाही.
डॉ. अंजली पाटील थोड्या अचंबित
झाल्या. आमची भेट आता तीन महिन्याने होत होती. आता जास्त गप्पाच व्हायच्या. बोलता
बोलता त्या म्हणाल्या,
“ तुला खरंच लग्नाची गरज नाही. असेच
मस्त काम करत राहा. तुला आता अगदीच क्षुल्लक औषध आहेत. तुझा रक्तदाब कमी
ठेवण्यासाठी कवच म्हणून ते चालू ठेवू !!”
त्या आज कमालीच्या खुश होत्या. मी
मात्र एकदम हवेत होतो. फिटे अंधाराचे जाळे...झाले मोकळे आकाश........असेच काही
वाटत होते. मोकळ्या आकाशा खालीपण आता झोप मस्त लागत होती. पुढे प्रेमाचा आणि
करुणेचा मार्ग समजून घ्यायचा होता. त्याला सुरुवात झाली.
राजकारण गेलं चुलीत...
(भाग २३)
शरीराची काळजी घेतली नाही तर शरीर
त्रास द्यायला सुरवात करते. त्याला मी शरीराचा गोंधळ असे म्हणतो. ज्यावेळी तो
पराकोटीचा होतो मग त्यातून वर डोके काढतात भावनिक आणि वैचारिक गोंधळ. यातून मागे
लागतात शारीरिक व मानसिक व्याधी. नकळतच मग त्या व्याधी आपल्याला सतत भयाच्या छायेत
ठेवतात. यश भरपूर मिळते. नाव होते. लोक आपले कौतुक करायला लागतात. मनातील सुप्त भय
आपल्याला सतत बोचत राहते. आपल्या पूर्ण क्षमतेने आपण काम करू शकत नाहीत. भरपूर
बंधन येतात. अशा बंधनाच्या पेक्षा स्वतःहून स्वीकारलेले बंधने ( व्रत )
निर्भयाच्या प्रवासात मोलाचे आधार ठरतात. ज्ञान प्रबोधिनीत मनोगत लेखन ही एक अतिशय
शास्त्र शुद्ध प्रक्रिया आहे. त्याच्या आधारे संचालक आपल्याला मार्गदर्शन करत
असतात. निवेदन लेखन ही पण अशीच पद्धती त्यातून आपल्या कामाच्याबद्दल संचालक
मार्गदर्शन करतात. मी मात्र ह्या दोन्ही पद्धतीचा उपयोग केला नाही. त्याच परिणाम
मला चांगलाच भोगावा लागला होता.
शारीरिक,भावनिक आणि वैचारिक गोंधळ आता माझा बराच नियंत्रणात आलेला होता.
लग्न न करता आयुष्यभर काम करावे अशी मनाची आस होती. महाराष्ट्रभर फिरून आता
अनेकांच्या ओळखीचा झालो होतो. प्रसाददादाचा नकळत प्रसादजी होत होतो. सावधपणे काम
चालू होते. अशातच अंबाजोगाईतील नगरपालिकेच्या निवडणुका आल्या. प्रक्रिया म्हणून ती
समजून घेण्याची इच्छा होती.त्याचा काही तरी नक्कीच सुप्त मनावर परिणाम झाला.
मे महिन्याची सुरुवात होती. उन्ह
चांगलेच वाढले होते. दिवसा घरा बाहेर पडणे अशक्य होते. अतिशय दुर्दैवी घटना घडली.
४ मे रोजी श्री प्रमोद महाजन यांच्या मृत्यू झाला. त्याकाळात मी सतत दूरदर्शनच्या
समोर होतो. वाईट नक्कीच वाटत होते. त्यांच्या कर्तुत्वाचे विवेंचन दिवसभर ऐकत असे.
अंबाजोगाई सारख्या छोट्या गावातील एक तरुण आपल्या अफाट प्रयत्नाच्या जोरावर
देशपातळीवरील अफाट ताकदीचा नेता बनू शकतो. जर प्रमोद महाजन असे करू शकतात तर आपण
का नाही ? आपण तर आता अविवाहित राहून काम
करणार. मग असे अफाट मोठे काम का नाही करायचे ? काय भारी आहे ते सारे !! आपण पण असे भारी झाले पाहिजे. माझ्या मनात
आता इच्छांचा गोंधळ सुरु झाला. मला राजकारणाचे वेध लागायला लागले.
याच काळात माझा चांगला मित्र प्रवीण
घुगे भारतीय जनता पार्टीचा संघटन मंत्री झाला होता. प्रवीण दादांची भेट पण झाली.
मी माझ्या मनातील इच्छा त्यांना सांगितली. चांगल्या माणसांनी राजकारणात आले पाहिजे
असे त्यांचे मात होते. माझ्या डोक्यात आता राजकारणाचे खूळ चांगलेच बसले होते. पैशांच्यासाठी
काम करायचे नाही आणि तेही अविवाहित राहून तर मग मस्त लोकांनी आपल्याला ग्रेट
म्हणावे असे नक्कीच जबरदस्त काही तरी केले पाहिजे. त्यातून मिळणारा अधिकार आणि
प्रसिद्धी काय जबरदस्त असते. एकदम फार भारी वाटत होते. आपल्याला नक्कीच असे काही
करता येईल असे मनातून वाटत होते. अनेकांशी चर्चा केल्या. सर्वांनीच अनुकूलता
दर्शवली.
बरोबर एक वर्षांनी मी भारतीय जनता
पार्टीचे उपाध्यक्ष बाळासाहेब आपटे यांना ई मेल केला. मला भारतीय जनता पार्टीचे
पूर्णवेळ काम करायचे आहे. बाळासाहेबांची माझी बरी ओळख होती त्यांनी माझा बायोडेटा
राष्ट्रीय सचिव प्रभात झा यांच्याकडे पाठवला व मला त्यांच्याशी बोलण्यास सांगितले.
याच काळात प्रवीणदादांचे आणि माझे बोलणे महाराष्ट्रात कसे काम करता येईल ? याबाबत झाले. त्यांनी माझ्याबद्दल सर्वकाही माहिती भाजपचा प्रदेश
संघटन मंत्र्यांना दिली. त्याच बरोबर प्रांत अध्यक्ष नितीन गडकरी यांची आणि माझी
भेट घडवण्याचे त्यांनी नियोजन केले.
इकडे प्रबोधिनीत मी माझ्या मनातील
इच्छा गिरीशरावांना सांगितली. कुठलीही वाईट प्रतिक्रिया न देता ते ठीक आहे
म्हणाले. मला तर आयुष्यभरासाठी प्रबोधिनीचे काम करायचे होते आणि आता तर मी वेगळाच
सूर निनादत होतो. त्यांच्या चेहऱ्यावर अगदीच पुसटशी सुद्धा नाराजी नव्हती.
“तुला वाटतंय न मग कर.”
प्रबोधिनीतील इतर ज्येष्ठ
प्रबोधाकांनी पण कुणी रोखले नाही. मला मनातून नवल वाटले होते. मला माझे स्वतःचे पण
नवल वाटत होते. माणसाला अधिकार आणि प्रसिद्धी याचे किती मोठे आकर्षण असते. आपल्यात
प्रत्यक्ष काम करण्याच्या क्षमता आहे का ? आपण अधिकाराच्या पदाला योग्य न्याय देतो का ? त्यासाठीचा वेळ देण्याची आणि कामातून निर्माण होणारा मानसिक त्रास
सहन करण्याची आपली तयारी आहे का ? आपल्या भोवती असे
नागोबा बरेच दिसतात. मी पण असेच काही करत होतो. मला फक्त काही तरी ग्रेट व्हायचे
होते. जबरदस्त मोठे अधिकार मला हवे होते. माझ्यात निर्माण झाला होता इच्छेचा
गोंधळ. प्रचंड इच्छा आणि लालसा मनात भरलेली होती.
मी आज पर्यंत जे काही विचार करत होतो अगदीच तो विचार सोडून दुसऱ्या मार्गावर
जाण्याच्या तयारीत होतो. अरुणाचल मधून अंबाजोगाईत आईसाठी परत आलो होतो. आता मात्र
माझ्या लालसे पोटी मी तिला एकटे सोडून मुंबई किंवा दिल्लीला जाणार होतो. जबरदस्त
नेता बनण्यासाठी.
शेवटी मुंबईत श्री.नितीन गडकरी
यांना भेटण्यासाठी गेलो. त्या आधी बाळासाहेब आपटेशी पण सविस्तर चर्चा झाली.
दिल्लीतील अभ्यास गटाचा सदस्य म्हणून काम करावे का ? अशा विचारांच्या पर्यँत आम्ही पोहोंचलो. पुढे नितीनजींची त्यांच्या
घरी भेट झाली. थोडक्यात बोलणे झाले. नंतर त्यांच्यासोबत कार मध्ये बसून मुंबईतील
पतंगराव कदमच्या घरी भेटण्यासाठी गेलो. शेवटी भाजपा कार्यलयात. श्री.गोपीनाथराव
मुंडे पण आता कार्यलयात आलेले होते. त्यांची माझी थोडीशी ओळख. शेवटी आमच्या
तिघांची बैठक झाली. मी नितीनजींच्या बरोबर भाजपच्या ई विंगचे काम पाहावे असे ठरले.
राहण्यासाठी चंचल निवास मध्ये माझी व्यवस्था करण्यात आली. सर्व काही होत होते.
माझ्या भोवतालची सगळी माणसं प्रचंड लगबगीत होती. मी मात्र थोडा गोंधळलेला
होतो.पुसटशी भीती मनात होती. शेवटची बैठक झाली पण मला फार आनंद झाला नाही. खरं तर
माझ्या मनासारखे झाले होते. मी निवडलेल्या अधिकार आणि प्रसिद्धीच्या मार्गावर माझी
सुरवात झाली होती. ती अस्वस्थता आणि भीती घेवूनच मी परळीची ट्रेन पकडली.
ट्रेन ने वेग पकडला की मला झोप
लागायची आज मात्र टक्क जागा होतो. अण्णा हजारेंच्या भेटी पासून आज पर्यंतचा प्रवास
डोळ्यासमोरून जात होता. असंख्य अनुभव आणि खूप सारे लोक. अनेकांनी माझ्यामुळे
प्रबोधिनीचे काम सुरु केले होते. त्यांच्या आधारावर मी आता एक कर्ता कार्यकर्ता
झालो होतो. माझे प्रबोधिनीतील सगळे ज्येष्ठ लोक ज्यांच्या आधाराने मी मोठ्या
व्याधीतून बाहेर पडलो होतो. ते सगळे माझ्याकडे पाहून हसत आहेत असे वाटत होते. मनात
चित्र विचित्र भास होत होते. झोपण्याच्या प्रयत्न करत होतो पण झोप काही नाही.
डॉ.अंजली पाटीलनी हक्काची झोप येणारी गोळी दिली होती. ती घेतली पण उपाय शून्य !!
प्रचंड अस्वस्थता.परत Panic attack येतो का ही भीती.
माझ्यासाठी खूप काही करणारी आई तिचा पण मी फारसा विचार केला नव्हता. पूर्ण प्रवास
जागून काढला.
आपल्यात कर्तुत्व नक्कीच आहे पण
समर्पण नक्कीच नाही असे फार मनातून जाणवले. मी आज जो मार्ग निवडत होतो तो नक्कीच
समर्पणाचा नव्हता. इच्छेच्या गोंधळातून निर्माण झालेले भय मी आता माझ्या सोबत
वागवत होतो. समर्पणाची भावना मनात खोल रुजल्या शिवाय निर्भयता येणे थोडे अवघड !!
मला काही तरी सापडले होते. मी त्यासरशी निर्णय घेतला राजकारण गेलं चुलीत
......परळीहून अंबाजोगाईच्या बस मध्ये बसलो आणि गाढ झोप लागली.
लालसा जर श्रेयस नसेल तर ती भय आणि
क्रोध निर्माण करते. श्रेयस मार्गावरील माणूस निर्भयाच्या मार्गावर पुढे पुढे जात
राहतो.
लग्न करण्याचे ठरवले .....
(भाग २४)
‘तिकडे जाऊ नकोस बोकाडी असते !
गच्चीवर जाऊ नकोस खाली पडशील ! अभ्यास नाही केलास तर तुला गुराखी व्हावे लागेल !!’
अशी व्याक्य अगदीच लहानपणापासून
ऐकायला मिळतात.नकळतच भीती दाखवून काही कृती करायला भाग पाडले जाते किंवा काही न
करण्यास भाग पाडले जाते. मला तर याचा चांगलाच अनुभव आहे.
प्रबोधिनीचे काम करायचे म्हंटल्यावर,
“ ते आपल्या सारख्या घरातील लोकांचे
काम नाही. तुला नाही जमायचे ते.”
पैसे न घेता काम करायचे म्हंटल्यास,
“सगळ्याचे सोंग घेता येतं बाबा.
पैशाचं सोंग अजिबात घेता येत नाही. आता आपले आर्थिक बस्तान नीट बसवायचे. समाजसेवा
ते आपलं सगळं झाल्यावर चाळीशी नंतरचे उपद्व्याप आहेत. पैसा असेल तर जग राम राम
करते नाही तर साधं कुत्र पण विचारत नाही.”
लग्न नाही करणार म्हंटल्यावर तर
अनेक जण अनेक पद्धतीने समजून सांगतात.
“ आपलं हक्काचे माणूस लागतं रे. आपली
पोरबाळच आपल्या म्हातारपणाचे आधार असतात. ते श्रीरामजी माहित आहेत न ? कसे अगदीच वाताहत झाली बघ त्यांची म्हातारपणी. शेवट दोन घास
आपल्याला तयार करून खाऊ घालणारी आपली हक्काची बायको नक्कीच असावी.”
हे सर्व पटवून देताना खूप सुंदर
दाखले दिले जातात. तयासर्वांच्या अफलातून वर्णनाने तर माणूस अगदीच अंतर्मुख होतो.
मी अशा भययुक्त समजून सांगण्याला
चांगलेच हसण्यावर नेत असे. काही जण अगदीच टोकाचे बोलायचे त्यावेळी मी थोडं
त्यांच्यापासून दूर राहायचो.अंबाजोगाईत तर माझ्यासोबत काम करणाऱ्यांचे तर फार अफलातून समुपदेशन केले जायचे.
“ते प्रसाददादाचे ठीक आहे रे. तुझं
आपलं तू बघ. फारसे नादी लागू नकोस. तो जो शिकवतोय अभ्यासाचे ते ठीक पण ती समाजसेवा
व बाकीची भानगड अजिबात नको. आपल्या फायद्याचे असेल तेवढे घ्यायचे.”
अंबाजोगाईत येवून आता आता चांगलीच
दहा वर्षे झाली होती. त्यामुळे आता फारसे अशा बोलण्याचे वाटत नव्हते.
आईची एकसष्टीसाठी ज्ञान प्रबोधिनीचे
वामनराव अभ्यंकर आलेले. त्या विधीमध्ये आईचा गृहस्थाश्रम संपून त्याचा उतराधिकारी
म्हणून मी तिच्या मग जाऊन म्हणायचे असते,
“मी आता यापुढे तुझा गृहस्थाश्रम
व्यवस्थित चालवेल.”
वामनरावांनी मला तसे करण्यास सांगितले.
मला तर गृहस्थाश्रम स्वीकारायचा नव्हता. आता प्रबोधिनीचे ज्येष्ठ सदस्यच मला म्हणत
होते तुला तसे आईला वचन द्यावे लागेल. माझी चांगलीच अवघड परिस्थिती. उपस्थित
असणारे सर्व नातेवाईक आणि आप्त माझ्याकडे पाहात होते. मी आपली मान खाली घालून
बसलेलो. वामनराव परत म्हणाले,
“ प्रसाद ये आता इकडे. आईच्या
पाठीमागे उभार आणि मी काही मंत्र म्हंटल्यावर म्हण ‘मम’.”
मी आपले नाखुशीनेच जाऊन मम म्हणून
आलो. त्यानंतर मात्र मी लवकरच ते सगळे विसरून गेलो आणि माझ्या कामाला लागलो.
शारीरिक,मानसिक, वैचारिक आणि इच्छेचा गोंधळ आता बराच
कमी झाला होता. घरातील आईने आता जवळपास स्वीकारले होते की मी लग्न करणार नाही.माझे
वय पण आता चाळीसच्या घरात गेले होते. माझ्या सहकारी कार्यकर्त्यांना बराच वेळ देत
होतो. अशातच सगळ्यांची सहल चांगलीच दहा दिवस कन्याकुमारीला काढली होती. फारच मस्त
दिवस गेले. याच काळात मी लॅपटॉप विकत घेतलेला.इस्रायलला जायचे असण्याने खूप
लोकांशी संपर्क वाढला. इंटरनेटचे ब्रॉडब्यांडचे कनेक्शन मिळाल्याने तर अगदीच चुटकी
सरशी संपर्क होत होते. सोशल नेट्वर्किंग मुळे संपर्काचे अफाट विश्व आता आवाक्यात
होते. भीती,Anxiety कमी करण्यासाठी
म्हणून भरपूर माहिती मिळवत होतो.
मोकळा संवाद केल्याने भीती,Anxiety कमी होते असे खूप वाचनात येत होते. मी पण अनेकांशी मोकळे बोलत
होतो. याच काळात ईशान्य भारत २०३५ हा अभ्यास करून ती मांडणी कन्याकुमारीत
करण्यासाठी गेलो होतो. १ ऑगस्टला कन्याकुमारी संध्याकाळी ५ वाजता मी गिरीशरावांना
तिसरी प्रतिज्ञा घेण्याचे पत्र लिहिले. तिसरी प्रतिज्ञा दोन पद्धतीने घेता येते.
एक वैराग्यपूर्ण ( लग्न न करता ) आणि दुसरी व्यवहारपूर्ण. मी अजून त्याबद्दल
सविस्तर गिरीशरावांशी बोललेलो नव्हतो.
रक्षाबंधनासाठी पुण्यात बहिणीकडे
जाणे झाले. आईची जबाबदारी मी आरतीची असाच विचार करत आलेलो होतो.ती पण अगदीच
व्यवस्थित ती पूर्ण करते आणि करत आलेली. लहानपणापासून आरतीने ओवाळणी म्हणून मला
काहीच मागितले नाही. त्यामुळे अगदीच मोकळ्या हाताने मी तिच्याकडे गेलेलो.अशी बहीण
मिळायला खरंच भाग्य लागते. माझे आजारपण तिने व मुकुंदने अगदीच जवळून पाहिलेले
होते.आईच्या आजारपणाच्या तक्रारी वाढत होत्या. आरतीच्या सासू सासऱ्यांचे आरोग्याचे
प्रश्न पण वाढलेले. अशी सगळीच परिस्थिती.
राखी बांधली व मला तिने विचारले,
“ मला ओवाळणी देशील का ?”
“तू माग तर. नक्की देईल.”
“बघ हं ! विचार कर !!”
“अगदीच बिनधास्त. माग तुला काय हवे
ते.”
“ तू लग्न कर.”
आरती मला पहिल्यांदा काही मागत
होती. मी क्षणाचा विचार न करता तिला म्हणालो.
“ तू मुलगी पाहा. मी करेल तिच्याशी
लग्न.”
मी लग्नाचा इतका सहजपणे निर्णय घेईल
असे वाटले पण नव्हते. पुढे अंबाजोगाईत आलो नीट विचार केला. आपल्याला लग्न करायचे
आहे मग आपण स्वतः मुलगी पाहू.आपल्या भविष्याचे आरती किंवा आईवर कशाला खापर
फोडायचे. आपण स्वतः ते नक्की करू. आपण स्वतः आपल्या कृतीला,निर्णयाला,वर्तनाला जबाबदार राहिलो तर
निर्भयता येते असा माझा अनुभव. लग्न करण्याचा निर्णय मी घेतला.
१२ सप्टेंबर २००८ मी व खंडू अण्णा (
डोंगरे ) त्याचे शेत पाहण्यासाठी बाहेर पडलो. प्रचंड पाऊस सुरु होता. नदी नाले
दुथडी भरून वाहत होते. आम्ही मस्त भिजलो. भरलेल्या वांग्याच्या भाजीचा मस्त स्वाद
घेतला. जोरदार भ्रमंती करून आल्यावर मी माझा लॅपटॉप उघडला व लग्न जुळवण्याच्या
सगळ्याच साईटवर माझी नोंदणी केली.
Emotional dependency
(भाग २५)
आयुष्याच्या अवघड काळातून जात
असताना काही माणसांचे मुखवटे अधिक पक्के होतात तर काही लोकांचे मुखवटे गळून पडतात.
मुखवटे गळून पडले तर मोकळेपणा येतो. असा मुखवटा नसलेला माणूस हळूहळू निर्भयतेच्या
प्रवासाला लागतो. मुखवटे जेवढे पक्के होतील तसा तो इतर अनुचित मार्गांचा उपयोग
करतो. त्या चक्रव्यूहात तो अडकत जातो. स्वतःची आभासी प्रतिमा निर्माण करण्याचा
प्रयत्न होतो. आत एक आणि बाहेर एक असे वागणे होते.आचार भ्रष्ट होतो. त्यातून
प्रचंड भीतीची टांगती तलवार आपल्या डोक्यावर असते.
मी लग्न करण्याचा निर्णय घेल्यावर
माझ्या मनात कुठेलेच भय नव्हते. काही दिवसातच डॉ. सुलभाशी माझा विवाह झाला. घरातील
सगळेच लोक खुश होते. लग्न चांगले करावे अशी आईची इच्छा. मला मात्र एकदम साधे अगदीच
दहा माणसांच्या उपस्थितीत व्हावे असे वाटत होते. लग्नाचे पौरोहित्य प्रबोधिनीच्या
महिला प्रबोधीकेने करावे असे निश्चित केले. प्रबोधिनीच्या लग्न संस्काराच्या पोथीत
मी मला हवे तसे खूपच बदल केले. संस्कृत मात्र गाळून सगळा विधी मराठीतून केला.
लग्नाला फारसे कुणाला बोलावले नसल्याने अनेक लोक माझ्यावर नाराज झाले. ती नाराजी
माझ्यावरील प्रेमाच्या मुळे असल्याने त्याची भीती कधी वाटलीच नाही.
माझे लग्न मात्र काही जणांसाठी
चर्चेचा विषय होता तर काही लोकांच्यासाठी आनंदाचा. माझासोबत काम करणाऱ्या
कार्यकर्त्यांना नक्कीच त्याचा त्रास झाला असणार. मला काही बोलण्याचे धाडस फार
लोकात नव्हते. काही मात्र दिव्य लोक होते.
“दादा ! तुझा फोटो आम्ही आता घरातच
लावणार होतो आणि तू तर लग्न केलंस.”
मी आपले हसून त्यांना म्हंटले,
“बरे झाले फोटोचे पैसे वाचले तुमचे.”
त्यात माझे लग्न आंतरजातीय.
“लग्न करायचे आहे हे आम्हाला
सांगितले असते तर आपल्यातील चांगली मुलगी नसती का पाहिली.”
खरे तर यासर्वांचा त्रास
माझ्यापेक्षा आईला जास्त झाला. माझ्याशी बोलणे महागात पडेल अशी भीती असल्याने
साहजिकच आईशी बोलणे अनेकांचे व्हायचे.
अंबाजोगाईत मधील माझी प्रतिमा फारशी
सुलभाला माहित नव्हती. तिच्यासाठी मी तिचा नवरा होतो. त्यामुळे समाजात वागताना
माझे वर्तन फारसे तिच्या अपेक्षेच्या नुसार नसायचे. आईला मात्र गप्पा मारण्यासाठी
हक्काचे माणूस मिळाले होते. यासर्वातून नकळत सुलभाला त्रास होणार नाही याची
जास्तीत जास्त काळजी घेण्याचा माझा प्रयत्न व्हायचा. तिचा चेहरा थोडा जरी उतरलेला
असला की मी अस्वस्थ व्हायचो. मग माझ्या प्रश्नांचा ससेमिरा सुरु व्हायचा. अर्थात
तिला कुणी काही बोलू नये, त्रास होऊ नये,तिला वाईट वाटू नये याची भीती मनात सारखी असायची.
मी माझ्या आयुष्यात गिरीशराव सोडून
फार कमी लोकांना मोकळे बोललेलो. त्यांच्याशी मात्र एकदम दिलखुलास बोलायचो. त्यात
खरे तर त्यांचे मोठेपण. माझे सगळेच बोलणे,वागणे ते प्रेमाने सहन करायचे.
सुलभाशी अगदीच पहिल्या भेटीपासून मी
खूपच मोकळे बोलत असते. माझ्या मनातील सगळ्याचा गोष्टी तिला सांगत असे. काहीही साधी
गोष्ट झाली तरी मी तिला सांगायचो. ती तशी माझ्याच वयाची. आमच्या दोघांच्या अनुभव
विश्वात मात्र प्रचंड अंतर. माझी तिच्यातील भावनिक गुंतवणूक प्रचंड वाढत गेली.
परिणामी मी अगदीच तिच्यावर भावनिकदृष्ट्या अवलंबून राहू लागलो. ती फार जास्त काळ
नजरेआड नसावी वाटायची. ती मात्र खूपच स्वावलंबी आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व होती.
माझी Emotional dependency तिला त्रासदायक
व्हायला लागली.पुढे जाऊन तर तिचे अवतीभवती नसल्याने माझ्या मनात भीती निर्माण होत
असे. ती सोबत असण्याने आधार वाटायचा. मला माझेच नवल वाटत होते. तिला अगदीच माहेरी
जाणे,तिच्या मैत्रिणीला भेटणे अवघड जात
होते. त्यातच तिच्या मनात आर्थिक सुरक्षिततेची भीती मोठ्या प्रमाणावर होती. लग्न
ठरवता तिने मला विचारले तुझा पगार किती.
“दोन हजार मानधन घेतो मी.”
“निदान २५ ते ३० हजार तरी असावा न ?”
“ हो असावा न !! पण मी फार फार तर पाच
हजार मानधन मागू शकतो. मला जास्त मानधन मागणे योग्य नाही वाटत.”
“मग मला काम करावे लागेल.”
“काहीच हरकत नाही.”
प्रत्यक्षात मात्र तिचा बराच वेळ
घरीच जात होता. तिच्या स्वतःच्या अशा काही जबाबदाऱ्या होत्या त्या पण तिला पूर्ण
करता येत नव्हत्या. त्यातून आमचे भांडण होण्यास सुरवात झाली. मला मग अजून
असुरक्षित वाटायला लागायचे.
मला आमचे घर म्हणजे एकदम आदर्श
कुटुंब असावे वाटायचे.प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचे घर न ते !! घरात असल्यावर भांड्याला भांडे लागणारच ! मला मात्र असे काही झाले
की पराकोटीची भीती वाटायची. त्यातून निर्माण व्हायचा आई, मी आणि सुलभा मधील विसंवाद. परिस्थिती जास्तच खराब झाल्यावर मात्र
मी थोडा अधिक शांतपणे विचार करण्यास सुरुवात केली.
सुलभाला त्रास होईल, तिला वाईट वाटेल, ती थकून जाईल अशी
भीती मनात ठेवल्याने उलट माझ्या वागण्याचा तिला त्रास होतोय. प्रचंड Emotional
dependency आणि त्यातून निर्माण झालेली भीती न
कळत मला पूर्णतः परावलंबी बनवते. ठीक आहे नवरा बायकोचे काही प्रमाणात भावनिक नाते
असते माझे मात्र थोडे टोकाचे होते. घरातील वातावरण एकदम आदर्श असावे हे ठीक आहे पण
त्याच्या भीतीतून मी अधिकच अस्वस्थता घरात निर्माण करतोय हे पक्के होत होते.
सुलभाची आर्थिक सुरक्षिततेची भीती मी कमी करूच शकणार नव्हतो. त्यामुळे तिला योग्य
ती नौकरी करणे क्रमप्राप्त होते. ते स्वीकारायला मला बराच वेळ लागला. अशा भावनिक
गुंतागुंती मुळे मोठा घोळ मात्र झाला. मी खरंच लग्न करण्यास लायक माणूस नव्हतो असे
मनाशी पक्के होत चालले होते.
सुलभाचे आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन
आणि माझा यात मोठा फरक होता. त्यातून बराच संघर्ष झाला. आम्ही दोघेही वयाच्या अशा
टप्प्यावर होतो की स्वतःच्या स्वभावात फार मोठा बदल करणे अवघड होते. भयातून माणूस
आक्रमक पण बनतो. तशी परिस्थिती फारशी चांगली नसते. त्यात मी प्रबोधिनीचा काम
करणारा. त्याने तर असे वागणे अयोग्य. मी स्वतःत बदल करून घेण्याचा प्रयत्न सुरु
केला. कामात मी स्वतःला झोकून दिले.
विवेकवाडी, दुष्काळ मदत कार्य, प्रदेश विकसनाचे काम जोरात सुरु केले. ज्ञान प्रबोधिनीच्या
उपासनेच्या सोबतच मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरु केला.अनासक्त योग नीट समजून घ्यायला
लागलो. प्रेम आणि मालकी हक्क याच्यातील सूक्ष्म फरक समजून घ्यायला लागलो.मनाला
प्रचोदना ( चांगला ड्राइव्ह) देणारे विचार सतत मनात राहिले तर भय कमी होते.
सेवाभाव मनात जास्तीत जास्त वाढवला तर मनशुद्ध होते व त्यातून भय कमी होते. एका
व्यक्तीच्या बद्दलची भावनिक ओढ ह्याची व्याप्ती वाढवत नेवून समाजरूपी ईश्वराच्या
पर्यंत तिचा परीघ वाढवला तर मन विशाल बनते. अशा विशाल मनात निर्भयता वाढीला लागते.
आसक्ती व्यक्तीच्या प्रति कमी करत कार्य शरण झाल्यास भय खूपच कमी होते. अनासक्ती
वाढल्यास नक्कीच भय कमी होते. तिचे स्वरूप समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वरीचा खूपच
उपयोग झाला. ती नीट समजून घेण्यासाठी खास वेळ काढावा लागतो. स्वतःची आर्थिक प्रगती
हा विचार विस्तारत नेवून समाजाची संपन्नता वाढण्याचा प्रयत्न केला तर निर्भयता आणि
शुद्धता अधिक वाढायला लागते. अधिकाराची वासना, पराकोटीची व्यक्तिगत लाभहानी, दांभिकता माणसाला भित्रा बनवते.
व्यक्तिगत गोष्टी इतक्या मोकळ्या
लिहाव्यात का ?
(भाग २६ )
चांगल्या कामात सतत व्यस्त राहणे.
अधिक व्यापक विचार करत राहणे. अति व्यावहारिक व फायद्या तोट्याचा विचार फार न करता
निरपेक्षपणे काम करत राहणे. कमीत कमी अपेक्षा ठेवून निर्मळ मनाने काम करत राहणे.
होऊन गेलेल्या घटनांचे चर्वण न करता आपल्याला जे जमते व रुचते असे काम करत राहणे.
सतत पुढे जात राहणे. अशा सर्व गोष्टींचा उपयोग निर्भयतेच्या प्रवासात नक्कीच होतो.
विवेकवाडीची जागा घेत असतानाचा मला
गिरीशरावांनी धोक्याची घंटा दिली होती. खास पत्र पाठवून भानगडीत न पडण्याचा सल्ला
पण दिलेला होता. मला मात्र त्यावेळी जास्तच फाजील विश्वास होता. सोबतची माणसे फार
चांगल्या काळजाची आहेत असा भ्रम होता. खरं तर जमीन,जुमला,पैसा आणि व्यवहारात कोण कधी बदलेले
हे सांगणे खूपच अवघड. आपण विश्वासाने एखादी गोष्ट करावी आणि नेमकी काही तरी गडबड
होणार.
लग्न झाल्यावर काही दिवसातच मला एक
गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की मला लोकांमधील स्वतःच्या प्रतिमेची फारच जास्त
काळजी आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर मला ‘इमेज’ खराब होण्याची प्रचंड भीती होती.
कुणीच आपल्याला वाईट म्हंटले नाही पाहिजे असा अट्टाहास होता. त्यातून मी प्रचंड
दडपणात असे. रक्तदाबाचा त्रास झाल्यावर पण डोक्यात विचार होता की आपल्याला रक्तदाब
कसा काय ? अर्थात इमेजची चिंता. संसारात
पडल्यावर माझं थोडं विवेकवाडीकडे दुर्लक्ष होत होते. माझ्या सोबत ज्यांनी जमीन
घेतलेली होती त्यातील एकाची मती बदलली. त्यामुळे काही तरी निश्चित भूमिका घेणे
गरजेचे होते. त्यातून बराच काळ तिथे जाणे राहून जायचे. जागा जरी प्रबोधिनीच्या
नावावर नसली तरी सर्वांना ती प्रबोधिनीची जागा अशीच माहित होती. अनेकांनी निरपेक्ष
श्रमदान तिथे केलेलं होतं. भुताच्या माळावर हिरवाई उभी राहिलेली होती. छोटेसे
बांधकाम पण झालेले.
माझ्या तिथे जाण्यात चांगलाच खंड
पडत गेला. कुणी फारसे येत नाही म्हंटल्यावर ती जागा अनेकांना सुरक्षित मद्यपान
करण्यासाठी,पत्ते खेळण्यासाठी, चोरून आणलेल्या विजेच्या तारा जाळून तांबे बाजूंला करण्यासाठीचे
मोक्याचे ठिकाण झाले. असाच सहज तिथे एकदा गेलो तर आम्ही बांधलेल्या खोलीच्या
दाराचे कुलूप तोडलेले. दरवाजा सताड उघडा. मध्ये जातात सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा
खच. जाळलेल्या तारेची राख. भरपूर अशा गोष्टी की ज्या तिथे असणे म्हणजे वास्तूच्या
पावित्र्याची विटंबना. ते पाहताना अंगात प्रचंड कापरे भरले. जे स्वप्नात पण पहिले
नव्हते ते मी प्रत्यक्ष पाहत होतो. प्रबोधिनीसाठी घेतलेल्या जागेत असे काही होणे
माझ्या फारच जिव्हारी लागले. त्यातून मनात प्रचंड अस्वस्था आणि भीती बसली. मला
स्वप्न पण विचित्र पडायली. दचकून जागा व्हायचो. छातीत प्रचंड धडधड. प्रत्यक्ष
विवेकवाडीत जाऊन पाहवे तर आईचे आणि सुलभाचे प्रश्न.
“काय काम आहे तिथे ? कशाला जायचे ? काय करणार आहेस
जाऊन ?”
प्रबोधिनी म्हणजे माझे दुसरे घर.
मनात खूपच चांगला भाव ठेवून ती जागा काही तरी चांगले काम करण्यासाठी घेतलेली. तिथे
असे काही होईल ही कल्पनाच करवत नव्हती. प्रबोधिनीच्या सर्व प्रबोधकांच्या प्रचंड
श्रमातून उभी राहिलेल्या विवेकवाडीत असे काही होणे म्हणजेच प्रबोधिनीचे नाव खराब
होणे. आपण दुर्लक्ष केल्याचा प्रचंड पश्च्याताप. गिरीशराव म्हणाले होते जागेच्या
फंदात नको पडू. त्यांचे न ऐकता घेतलेली जागा. यासर्वाने मनात चांगलाच काळोख
साठलेला होता. माझ्या मनातील भीतीची आईला कल्पना येणे अशक्य आणि तिला ते समजून सांगणे पण कठीण.
प्रबोधिनीला वाटले म्हणून काही अंबाजोगाईत प्रबोधिनीचे काम सुरु झालेले नव्हते. मी
स्वतः प्रबोधिनीचे काम करणार हे ठरवून सुरु झालेले होते. त्यामुळे संघटनेच्या
प्रतिमेची काळजी मी घेतली पाहिजे. मनात विचारांचे थैमान चालू होते. त्याच बरोबर
घरातील भांडणे पण वाढत होती. असाच पुण्याहून रात्री प्रवास करून आलो. रात्रीचे
जागरण असल्याने दिवसभर झोपीतच गेला. उठलो व उपासनेसाठी खाली जात होतो.शेवटच्या
पायरीचा अंदाज चुकला व माझा तोल गेला. समोरील लोखंडी गेटला डोके आदळू नये म्हणून
प्रयत्न करत असताना तळपाय एकदम वाकडा झाला व मी कोसळलो. तळपायातून कट असा आवाज
आला. पाय मोडला. आता पुढील काही महिने घराच्या बाहेर पडता येणार नव्हते. मला तर सारखी
कामाची सवय. घरी बसून डोक्यात विचारांचे थैमान वाढवणे मला परवडणारे नव्हते.
आता खरं तर माझा कस लागणार होता.
माझ्या सुदैवाने याच काळात युनिकोड सुरु झाला होता. मी भरपूर लिहिण्याचे ठरवले.
लहानपणा पासून भाषा विषयांची प्रचंड भीती मनात होती. शुद्धलेखनाच्या प्रचंड चुका
व्हायच्या. वाक्य रचना नीट नसायची. मी फारसा विचार करणे सोडून दिले. लिहायला
सुरवात झाली. भयाच्या व्यवस्थापनात लिहिण्याचा प्रचंड उपयोग होतो हे लक्षात आले.
माझ्या वेगाने विचार करणाऱ्या मेंदूला नियंत्रणात ठेवण्याचे साधन मिळाले. सगळ्यात
महत्वाचे म्हणजे माझ्या मनाची आणि विचारांची खदखद आता साठून न राहता मोकळी होत
होती. जे काही लिहील ते सर्वांसाठी खुले असे. त्यामुळे स्व प्रतिमेची भीती कमी
होण्यास माझ्या मन मोकळ्या लिहिण्याचा खूप उपयोग झाला. ही लेखमाला लिहिताना
अनेकांना आश्चर्य वाटले की फारच मोकळं लिहितोय मी. अनेकांनी बोलून पण दाखवले,
“ हे थोडं जास्तच व्यक्तिगत गोष्टी
जाहीर करणे चालले आहे.”
मी त्यांना फक्त एकच विचारले, “ मग काय? काय फरक पडणार आहे ?”
खोटी स्व प्रतिमा जपण्याने मनावर
प्रचंड ओझे निर्माण होते. त्यातून आपण बनचुके होतो किंवा कधी तरी कोसळून पडतो.
प्रबोधिनीचे नाव खराब होईल ही भीती
काढण्यासाठी मी अगदीच सोपा मार्ग निवडला. विवेकवाडीत दररोज भरपूर चांगल्या गोष्टी
घडून आणायच्या. एखाद्या घटनेचे महत्व कमी करायचे असेल तर अधिक मोठी चांगली घटना
घडवून आणायची. पाय बरा झाला आणि विवेकवाडीत उपक्रमांचा मी सपाटाच सुरु केला.
विवेकवाडी आमची प्रयोगभूमी झाली. आता अनेकांना विवेकवाडीत येण्याची ओढ निर्माण होत
गेली.परिणामी वर्दळ वाढली. चांगल्या गोष्टींची प्रचंड रेलचेल सुरु झाली की वाईट
गोष्टींना सहजच आळा बसतो आणि अर्थात भीतीला पण !!
भयमुक्तीच्या सामूहिक प्रयत्नांची
सुरुवात !!
(भाग २७)
मानवी आयुष्यात समस्या,संकटे, अस्वस्थता व त्यातून निर्माण होणारी
भीती नसणे हे जवळपास अशक्यच असते. आपल्या जवळ एकच पर्याय त्या भीतींनी लिप्त होऊन
त्यात गुरफटून जाऊन आपण स्वतःच एक समस्या बनायचे किंवा त्या भीतीशी मुकाबला करायचा ? एकट्या माणसाला जशा समस्या असतात त्याप्रमाणे मनुष्यजाती समोर काही
समस्या असतातच. काही निसर्ग निर्मित तर काही आपण स्वतःच निर्माण केलेल्या. माझ्या
पण आयुष्यात अनेक समस्या आहेत,प्रश्न आहेत.
त्यांची तीव्रता कमी करण्याचा एक उपाय मला सापडला तो म्हणजे संपूर्ण समाजाच्या
समोर असणाऱ्या समस्यांना समजून घेवून त्याचा अभ्यास करून सामूहिकरीत्या
समस्यांशी मुकाबला करणे. दाहक
समस्यांशी, प्रश्नाशी मुकाबला करताना माझ्या
स्वतःच्या समस्यांचा, भीतीचा दाह कमी होतो. हा
प्रबोधिनीचा मार्ग !!
२०१३ पासून दुष्काळाचे संकट बीड
जिल्ह्यावर अधिकच गडद होत चालले होते. अंबाजोगाईत १५ दिवसांनी पाणी येत होतं पुढील
तीन वर्षे भयाण गेली. मला तर बीड जिल्ह्याचे वाळवंट होतंय का अशी भीती मनात वाढू
लागली. पडणाऱ्या पावसाचा अभ्यास करताना संकट अजून अवघड वाटायचे. माणसांच्या
पिण्याच्या संकटाच्या सोबतच वन्य जीवनाच्या पाण्याचा प्रश्न फारच बिकट झाला होता.
लोखंडी सावरगाव मधील आपले मित्र
मनोज जोशींचा फोन आला,
“दादा एक हरणाचे पाडस सापडले आहे.
कळापा पासून वेगळे झाले होते बहुतेक मागे कुत्रे
लागले असणार. तुम्ही येता का ?”
मी लगेच एक गुरांसाठीच्या
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून लोखंडीत पोहोंचलो मनोज सर माझी वाट पाहत
होते.आम्ही शिवारातील बेले यांच्या शेतात गेलो. तिथे कोपऱ्यात तो
घाबरलेला जीव बसलेला. दोन
दिवसांपूर्वी त्यांना ते सापडले. बाटलीने दुध पाजून त्यांनी
त्याला वाचवले पण कुत्र्यांचा त्रास
म्हणून पुढे त्याला ठेवणे अवघड होते .....
”मग मी करू का व्यवस्था.” मी विचारले.
“त्यासाठी तर आम्ही तुम्हाला
बोलावले.”
मी सरळ पाडसाला घेतले व आम्ही
विवेकवाडीकडे निघालो. विवेकवाडीत त्याचे सर्वांनी स्वागत केले.नाव ठेवले ‘सुंदरी’. मग तिची.राजेशाही व्यवस्था करण्यात आली. वनरक्षक व उपजिल्हाधिकारी यांना
पाडसा बद्दलmमाहिती सांगितली .....
नरसिंग बाप्पा आपला गुरांना व
वन्यजीवांना पाणी पुरवण्यासाठीचा प्रमुख मात्र बोलून गेला.
“दादा आता तुम्हालाच याचे आई बाप
व्हावे लागणार ! नाही सोडून जात आता हे तुम्हाला.”
बाप्पाला जरी हे वाटत असले तरी
पाडसाच्या आई जवळ पोहांचवणे हे आमचे नक्की कर्तव्य होते.
नकळत सुंदरीचे मातृत्व आणि पितृत्व
माझ्याकडे आले होते. दोन दिवसात माझा जीव तिच्यात चांगलाच गुंतला. तिला दुध पाजणे.
तिच्यासोबत खेळणे. तिच्या गोजिऱ्या उड्या आणि आपुलकीच्या डोळ्यांना पाहताना एक
वेगळाच आनंद मला मिळत असे. असाच आनंद मला माझी छोटी भाच्ची मुग्धा इवलीशी असताना
तिच्या बरोबर खेळताना यायचा. सुंदरीला खास डॉक्टरांच्याकडे घेवून गेलोत. तिची
प्रकृती आला चांगली झाली होती. पायाची दुखापत बरी झाली होती. तिला आता कळपात
सोडण्याची वेळ आलेली होती. तिचा विरह खूप जीवघेणा असणार हे लक्षात आले. त्यामुळे
थोडं अलिप्त होण्यासाठी म्हणून आज तिला विवेकवाडीला अभिषेक सोबत सोडून मी दिवसभर
कामात गुंतलो होतो.
संध्याकाळी परतलो. सुंदरी म्हणून
आवाज दिला. मला कोपऱ्यातून धडपडण्याचा आवाज आला. सुंदरीला नीट उभारता येत नव्हते.
ती आपल्या पूर्ण ताकदीने उठण्याचा प्रयत्न करत होती. मी तिच्या जवळ जाताच तिने
माझ्या हातांना चाटत माझ्या मांडीवर आपले डोके ठेवले.
“दादा आज दुपार पासून सुंदरी शांत
शांतच आहे. दुध नाही की पाणी नाही.”
अभिषेकचा रडवेला आवाज ऐकायला
मिळाला.आम्ही लगेच अंबाजोगाईतील वनखात्यातील
डॉक्टरांना दाखवण्यासाठी तडक निघालो.
सोबत आनंद व अभिषेक सुंदरीला पकडून बसली होती. तिची तडफड जास्तच वाढली. मी तिला
माझ्या कुशीत घेतलं. थोडी शांत झाली पण काही काळात परत प्रचंड तडफड. डॉक्टरांना
फोन करत होतो पण ते काही फोन उचलत नव्हते. वनखात्याच्या ऑफिस आले. डॉक्टर काही
नव्हते. रविवार असल्याने ते फोन उचलणार नाहीत असे तेथील रक्षकांनी सांगितले.
सुंदरीची तडफड अजूनच वाढली. दुसऱ्या खासगी डॉक्टरांना फोन करून औषध विचारले. औषध
येईपर्यंत सुंदरी नेहमी करताची शांत झाली.
घरी आलो आणि हंबरडा फोडून रडायला
सुरवात केली. तान्हं लेकरू गेल्यावर आईचे काळीज कसे दुखावत असेल याची जाणीव मी घेत
होतो. माझ्या कुशीत झालेला तो पहिलाच दुष्काळी मृत्यू होता.
दुष्काळचे अक्राळविक्राळ रूप
अनुभवने चालूच होते. आनंद कुलकर्णी माझा छोटा मित्र अचानक फोन न करता आला. खुपच
अस्वस्थ वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावरून व सप्टेंबरच्या थंडीत देखील त्याला
दरदरून घाम सुटला होता. तो स्वतः आल्यावर मला पाणी
मागतो पण आज मी उठलो व त्याला पाणी दिले. थोडया इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या; पण आनंदचा मूड काही वेगळाच होता.
शेवटी त्याच्या मनातील विचारांना
त्यांनी वाट करून दिली. कापऱ्या आवाजात तो म्हणाला,
“दादा, आमच्या गावातील शेतकरी बाळूने आत्महत्या केली. त्याचा पोरगा
डिप्लोमा करत
होता. फिस भरण्यासाठी पैसे नव्हते.
माझ्या बाबांनी त्याला मदत करायची ठरवली होती.
पण त्यांनी मदत देण्याच्या आधीच
स्वतःला संपवले.”
बीड जिल्ह्यातील हे आत्महत्त्येचे
सत्र काही थांबत नव्हते. मनात आता दुष्काळाची प्रचंड भीती वाटत होती.पाण्याचा
प्रश्न आता धसास लावला नाही तर मोठ्या पश्चातापाशिवाय आपल्या हातात
काही राहणार नाही. त्यावेळी तहान
लागल्यावर विहीर काढण्यासाठी सुद्धा संधी मिळणार
नाही. माती आणि पाणी न जपणारा देश
भविष्यात पृथ्वीच्या पटलावर अस्तित्वात
राहणार नाही. त्यामुळे आता
दुष्काळाशी दोन हात करण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
“जिवंत राहण्यासाठी काही ही करण्याची
नुसती ताकद आमच्या मनगटात आहे. नुसती
ताकदच नाही तर बिनधास्त पणे आम्ही
ते करतो जीवाची पर्वा न करता. मंग ऊस तोडी
असो की दारू गाळण्याचे काम
असो.कुणाच भ्याव नाही आपल्याला.”
अवघ्या १५० उंबऱ्यांचे व ८५०
लोकसंख्येचे एक छोटे गाव म्हणजे राडीतांडा- राडी लमाण
तांडा. अगदी लहानपणापासून दारू
गाळायची चूल कोवळ्या हातांनी पेटवायला
लेकरं शिकतात.हातात कोयते घेवून ऊस
तोडीसाठी शाळा सोडून गावोगाव फिरस्ते
होण्याची सवय सहज अंगवळणी त्यांना
पडली.
दुष्काळ इतका भयाण..जमीन,झाडं, प्राणी, पक्षी, नाही तर मानसं पण करपू लागली.
“आम्हाला बी जगायला पाणी लागते
हो.....काम नाही हाताला.”
पाण्याची समस्या भयाण होती. याच
काळात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा अंबाजोगाई
तालुक्यात सुरु झाली. राडी
तांड्यानी भाग घेतला. खास त्याच्यासाठी घेतलेल्या ग्रामसभेत
माझा मित्र रवी देशमुखने मला राडी
तांड्याला नेले. विनोद व सरपंच श्री राठोड यांनी
चांगलीच तयारी केली होती. अख्खे गाव ग्रामसभेला होते. मला सभेचे अध्यक्ष करण्यात
आले.
“ दुष्काळ मदत कार्याला ज्ञान
प्रबोधिनी नक्की मदत करेल पण तुम्ही दारू पिणे कोण कोण
सोडणार ?”
असे म्हंटल्यावर कुणीच पुढे यायला
तयार नाही. एकाने दारू सोडली तर १०,००० रुपये
पाण्याच्या कामासाठी. असा प्रस्ताव
मी ठेवला. सर्वत्र शांतता होती....शेवटी गणेश
उठला....
“सेवालाल महाराजांची शपथ घेवून मी
सांगतो की यापुढे मी दारू पिणार नाही.”
त्यानंतर एक एक करत १० जणांनी दारू
सोडण्याची जाहीर शपथ घेतली व ज्ञान प्रबोधिनीकडून १ लक्ष रुपयाचे जेसीबी मशीनचे
ठरले. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजताच सर्व तरुण लोक तयार होती. १३७ तरुण आपल्या
हातात आज कोयत्याच्या जागी कुदळ,टिकाव व फावडे
घेवून आपल्या विस्तीर्ण गायराना वर पाणलोटाचे काम करण्यासाठी तयार होती. जोरात काम
सुरु झाले. मजबूत हाताला साथ देण्यासाठी जेसीबीचा एक मजबूत हात प्रबोधिनीने उपलब्ध
करून दिला.
एक नवी निर्माण कार्याची चळवळ सुरु
झाली......मृत्यूपासून नवनिर्माणाची चळवळ. भयमुक्तीच्या सामूहिक प्रयत्नांची
सुरुवात !!
अभयाचा संस्कार आणि निर्भयतेचा choice...
(भाग २८ )
दहावीत चांगलेच ८४ % गुण घेवून मी
उतीर्ण झालेलो होतो. इंग्रजी विषयाची मनात खूपच भीती होती. त्यातून मी तंत्रनिकेतन
मध्ये प्रवेश घेण्याचा हट्ट करत होतो. मला नेमक्या माझ्या क्षमता काय आहेत हे
माहितच नव्हते. भीती पोटी मात्र ११ विज्ञान नको हा माझा सूर होता. माझी व्यवस्थित
समजूत काढल्यावर मात्र भीती निघून गेली. अशीच काहीशी भीती मला
अभियांत्रिकीला प्रवेश घेतल्यावर
रॅगिंगची होती. मित्रांच्या बोलण्यातून तिचे भयाण वर्णन केले जायचे. हॉस्टेलमध्ये
जास्त रॅगिंग होते हे कळल्यावर मात्र मी हॉस्टेल घ्यायचे नाही असेच ठरवले.
प्रत्यक्ष खाजगी वसतिगृहातील एकांत भयानक त्रासदायक होता हे अनुभवले. शेवटी
वसतिगृहात जायचे निश्चित केले. असे किती तरी अनुभव माझ्या गाठीशी आहेत. भीती असणे natural आहे पण निर्भयता मात्र choice आहे. भिणे शिकावे लागत नाही. निर्भयता मात्र शिकावी लागते. भीती
आपल्या अबोध मनाचा ( नेणीव) भाग आहे. ती समजून उमजून घेवून विवेकाच्या सहाय्याने
त्यावर उपाय शोधत ती कमी करता येते. अभय मात्र दैवी गुण आहे. अभयाचा संस्कार आपल्यावर
सतत करत राहिल्यावर अभयाच्या अभ्यासाची सवय होते.
दुष्काळी परिस्थितीत अंबाजोगाई
पासून पाच किलोमीटर असलेल्या लमाण तांड्यावर पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या
होती. तातडीने पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे होते. माझे वडील बंधू
नंदकिशोर मुंदडांनी मला निर्माण होणाऱ्या वाईट परिणामाची जाणीव करून देत पाण्याचे
टँकर उपलब्ध करून दिले. टँकर तर होते पाणी ३ किलोमीटर वरून आणावे लागायचे. अशातच
प्रचंड वादळ झाले व वीज प्रवाह खंडित झाला. आता पाणी कुठून आणायचे ? शेवटी अंबाजोगाईतून पाणी घेवून जायचे ठरले. १२ हजार लिटर क्षमतेचे
ते मोठे टँकर होते. अंबाजोगाईतून तांड्यावर जाताना मुकुंदराजचा अवघड घाट लागतो.
त्या घाटातून टँकर नेणे अतिशय धोक्याचे होते. चालक ते काही नेण्यास तयार नव्हता.
घाटातून जाताना टँकर मधील पाणी ढवळायला लागायचे तशा अवस्थेत टँकर नियंत्रणात ठेवणे
अतिशय अवघड काम. अभिषेक बाबुळगावकर ( वय १५ वर्षे),अर्णव लिमये ( वय २० वर्षे ), अद्वैत शेंडे ( वय २० ) या प्रबोधिनीच्या युवक विभागातील सदस्यांवर
पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी होती. त्यांनी सर्वांनी मिळून चालकाला समजून
सांगितले आम्ही तुझ्या बरोबर येतोत टँकर मध्ये. तू घाबरू नको. खरं तर चालक त्यांच्या पेक्षा वयाने आणि अनुभवांनी मोठा. प्रबोधिनीची
अनुभव शिक्षणाच्या पद्धतीतून सतत स्वतःवर अभयाचा संस्कार करत राहण्याची सवय
त्यांना झालेली. भीती तर त्यांना वाटतच होती. मोठ्या धीराने ते टँकर मध्ये बसले
खरे पण घाट सुरु होताच पोटात चांगलाच गोळा आला होता.आपल्या विवेकाने त्यांनी भीती
नियंत्रणात ठेवली. मी माझी गाडी टँकरच्या समोर सावकाश चालवत होतो. त्यामुळे पुढून
येणाऱ्या वाहनाला थांबून ठेवता येत होते. एकमेकांना आधार देत शेवटी टँकर तांड्यावर
पोहोंचले. पाच दिवस पाणी नसल्याने अवघड परिस्थिती होती. पाणी भरतानाचा आनंद
सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. खास करून आपल्या प्रबोधकांच्या चेहऱ्यावरील
अनुभव तर कमालीचा होता.
काही दिवसांनी पुणे युवक विभागातील
युवक परत गेले. आता अंबाजोगाईचा अभिषेक बाबुळगावकर एकटाच चालकाच्या बरोबर असायचा.
समोर येणाऱ्या वाहनाला थांबण्यासाठी आता माझी गाडी पण नसायची. आता अभिषेक व
चालकाच्यासाठी ते सवयीचे झाले होते. ज्ञान प्रबोधिनीच्या शिक्षण प्रक्रियेतील
अनुभव शिक्षणातून अबोध मनातील ( नेणीव) भीतीचे विवेकाने नियंत्रण व अभयाचा संस्कार स्वतःवर सतत
करून तो सवयीचा करणे हे शिकणे खूपच उपयोगी ठरत होते. नकळतच पुढे natural असणारी भीती सोडून निर्भयता choice हे प्राधान्याने व्हायला लागले.
वातवरण जर चांगल्या विचाराने
भारलेले आणि भरलेले असेल तर अभयाचा संस्कार नकळतच होतो. दुष्काळाच्या विरुद्धच्या
लढ्यात हे पदोपदी जाणवत असे.
जायभायवाडीतील धर्मराज श्रमदानाचा
प्रमुख. बैलाची झुंज लागली. ती सोडवण्यासाठी धर्मराजला जाणे गरजेचे होते. झुंज
सुटली एका बैलाला त्याने वाचवले पण दोन्ही बैल त्याच्या अंगावर. तो जवळच्या खड्यात
कोसळला. डोक्याला सहा टाके पडली. पाठीला जबर मार बसला.त्याला पूर्ण विश्रांती सांगितली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच धर्मराज श्रमदानाला हजर.
‘‘गाव लढतंय सारं, मी कसा पडून राहू.’’
त्याला समजून सांगणे कठीण. तो
कामाला लागला.
भ्याव नसलेला भिवंन्ना काळे. जेसीबी
चालकाचे रात्रंदिवस काम करत जेसीबी मालक झाला. रात्रीची जेसीबी चालवण्यात त्याचा
भारी हातखंडा. सिंगनवाडीच्या डोंगरावर तो काम करत होता. रात्रीची पाळी सुरु
करण्याआधी पाणी पिण्यासाठी तो अंधारात चालत असताना त्याचा पाय नेमका सापावर पडला.
साप त्याचा पायाला चांगलाच डसला.
सोबतच्या चालकांनी व गावकऱ्यांनी
भयाण पावसात त्याला अंबाजोगाईच्या मेडिकल कॉलेजमध्ये आणले. सकाळी भिवंन्नाला
भेटायला गेलो तर मर्द म्हणतो कसा,
‘‘ साप डसला बघा. तरास लई झाला.
सकाळच्याला ऑपरेटरला जा म्हटंल. मशिन बंद राहिली नाही पाहिजे. जेवढी चालवता येईल
तेवढी चालव.गावाचं नुस्कान नाही झालं पाहिजे.’’
मी मात्र असे अनुभव समजून घेत
असताना सुन्न व्हायचो. वातवरण जर चांगल्या विचाराने भारलेले आणि भरलेले असेल तर
अभयाचा संस्कार नकळतच होतो. दुष्काळाच्या विरुद्धच्या लढ्यात हे पदोपदी जाणवत असे.
दुष्काळा विरुद्धची लढाई सुरुच होती
व अचानक कोविड महामारीच्या उद्रेक झाला. आता निवांत बसणे हाच उपाय होता. लॉकडाऊन
सुरु झाले. अचानक एके दिवशी ज्ञान प्रबोधिनीच्या माहुरकर ताईंचा फोन आला,
“दादा आपण वस्त्यांवरील गरीब लोकांना
जेवण पुरवायचे का ?”
आजूबाजूला कुणी शिंकले तरी धातीस
भीतीची धडकी बसायची. इथे तर माहुरकरताई मदत करण्यासाठी कुठलीच आरोग्याची काळजी न
बाळगणाऱ्या वस्त्यांवर जाऊन मदत करायची म्हणत होत्या. त्या स्वतःवर अभयाचा संस्कार
करून घेवू इच्छित होत्या. कोविड मदत कार्य जोरात सुरु झाले. महाविद्यालयात असणारे
शौनक,वेदान्त,अभिषेक,रेणुका ही तरुण प्रबोधक प्रचंड
निर्भयतेने बाहेर पडली व प्रबोधिनीच्या मदत कार्याला गती मिळाली.
अंबाजोगाईत प्रबोधिनीच्या अगदीच
निकटचे एक कुटुंब संक्रमित झाले. त्यांच्या घरातील ताईनां व त्यांच्या छोट्या
मुलीला संसर्ग झाला होता. कोविड केअर केंद्राच्या परिसरात जायला लोक घाबरत होते.
तेथील जेवण मसालेदार असल्याने दोघींना त्रास होत होता. आमचे फोन वरून बोलणे झाले.
भरपूर फळ आणि फळांचा जूस घेवून मी व सदानंद वालेकर निघालो. कोविड केअर केंद्रातून
ताईंनां बाहेर येता येत नव्हते आणि आम्हाला मध्ये जाता येत नव्हते. आमच्या जवळील
साहित्य त्यांना पोहोंचवण्यासाठी कुणी माणूस पण तिथे नाही. सदानंद वालेकर सरळ
मध्ये घुसले.
“चला दादा काही होत नाही.”
आम्ही चक्क त्यांच्या खोलीच्या जवळ
पोहोंचलो. चांगले बोलणे झाले. डॉक्टर सुद्धा अगदीच दुरून बोलत होती त्यावेळी आम्ही
दोघे अगदीच त्यांच्या जवळ जाऊन विचारपूस करत होतो.
मदत कार्यात प्रचंड व्यस्त असताना
सदानंद वालेकरांना कुठलाच त्रास झाला नाही. मदत कार्य बंद झाले व मालक चांगलेचे १५ दिवस ऑक्सिजनवर. भेटायला गेलो तर म्हणाले,
“आपण मदत कार्य बंद केले म्हणूनच मला
त्रास सुरु झाला.”
चांगल्या कामावर प्रचंड श्रद्धा
असणारा हा प्रबोधक मरणाच्या दारातून परत येतो. आजाराचे भयानक अनुभव घेतल्यावर पण
त्यांच्यावरील अभयाचा संस्कार त्यांना चूप बसू देत नाही. आजच्या घडीला त्यांची
पत्नी कोविड वार्डची प्रमुख नर्स. स्वतः वालेकरांना उच्च रक्तदाब व मधुमेह.
मागच्या वर्षीच्या आजारपणाचा अनुभव पण घरी शांत राहणारा हा प्रबोधक थोडाच !! ते
दररोज कोविड स्मशानभूमीतील बांधवाना औषध आणि जेवण घेवून जातात.
स्वतःच्या भीतीचे व्यवस्थापन करता
येणारे. निर्भयता हा choice म्हणून स्वीकारणारे. उच्चतम
ध्येयाने भारून आणि भरून जाऊन काम करणारे व अभयाचा संस्कार जाणूनबुजून आणि
समजून-उमजून करणारे प्रबोधिनीचे प्रबोधक मला निर्भयतेच्या प्रवासातील चिरंतन
प्रेरणा देणारे आहेत. स्वामी विवेकानंदांच्या विचारांच्या प्रकाशात आणि
प्रबोधिनीच्या आधाराने माझा निर्भयतेचा प्रवास चालूच आहे. तो सतत चालू राहावा अशी
नक्कीच आपली शुभेच्छा माझ्या बरोबर आहे. भरपूर काही लिहिण्यासारखे आहे. चालू
असणाऱ्या शब्द प्रपंचाला मात्र आता पूर्णविराम देतो. आपण सर्वांनी ह्या लेखमालेला
दिलेल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा