गुरुवार, १९ एप्रिल, २०१२

हृदये जोडणाऱ्या चालत्या बोलत्या विश्वविद्यापीठाची यात्रा..... ‘द वॉकिंग सेंट’


१८ एप्रिल १९५१ या दिवशी विनोबांना पहिले भूदान मिळाले आणि भूदान चळवळीचा जन्म झाला. आधुनिक भारताच्या इतिहासातील ही एक विलक्षण चळवळ. आज या चळवळीला ६ वर्षे पूर्ण होत आहेत.

गीतेवर विनोबांनी केलेल्या भाष्यात तीन योगक्रिया यज्ञ, दान व तप सांगितल्या.

१. यज्ञ सृष्टीकडून आपण जेजे घेतो त्याची भरपाई करणे : उदा. जमिनीतून अन्नधान्य घेतो म्हणून तिची मशागत करणे, खतपाणी देणे. सृष्टीची झीज भरून काढणे हा यज्ञ.
२. दान मनुष्य-समाज, आईबाप, गुरू, आप्तेष्ट इ. आपल्यासाठी मेहनत घेतात, त्यांचे उतराई होण्यासाठीं, झिज भरून काढण्यासाठी दान करणे. हा परोपकार नव्हे.
३. तप आपण शरीर मन, बुद्धि, इंद्रियें वापरतो. त्यांची झीज भरून काढणें, त्याची विकारांपासून शुद्धी करणें. हे झालें तप. समाज व शरीर सष्टीबाहेर नाहीत. तसेच या तीनही क्रिया यज्ञच आहेत. (संदर्भ : विनोबा भावे, गीता-प्रवचनें, अध्याय १७)

भूदान हा काही अकस्मात, एकाएकी सुचलेला विचार नव्हता. त्यामागे विनोबांची प्रतिभा, तपश्चर्या, चिंतन, कृती या सगळ्यांचाच मिलाफ झाल्याचे आपणास दिसून येते. भूदान यज्ञाची प्रेरणा विनोबांना बालपणीच्या एका प्रसंगात दिसते.

विनोबा ऊर्फ विनू बालपणी आईला नेहमी विचारायचा,
आई, देव म्हणजे काय गं?’
आई म्हणाली, ‘योग्य वेळ आली की सांगेन.
भावेंच्या गागोदेगावी अंगणात झाडाला खूप फणस येत असत. एकदा फणस कापला असता आई म्हणाली, ‘विनू, हे गरे अगोदर आजुबाजूच्या घरी देऊन ये’.
विनूने विचारलं, ‘असं का? आपण का नाही अगोदर खायचे?’
आई म्हणाली, ‘अगोदर दुसऱ्यांना देऊन मगच आपण खाल्ले पाहिजे. अरे, देतो तो देव आणि राखतो तो राक्षस.

पुढे कित्येक वर्षांनी विनोबा या प्रसंगाबद्दल लिहितात- आईची ही शिकवण नसती तर मला भूदान यज्ञाची प्रेरणा झालीच नसती. भूदान यज्ञात लाखो एकर जमीन मिळाली आणि ती सहजगत्या वाटली गेली. या भू-क्रांतीचे बीज एका मोहरीएवढय़ा प्रसंगात दडले होते.

भूदान यज्ञामध्ये दान करताना विनोबा पारख न करताच दान करतात, असाही काही लोकांचा आक्षेप होता. या आक्षेपाला उत्तर देताना विनोबा पुन्हा एकदा त्यांच्या बालपणीचाच प्रसंग सांगतात-

एके दिवशी दारावर एक सशक्त इसम भिक्षा मागण्यास आला. भिक्षा मागायला आलेल्या कोणालाही नकार न देणे हा तर विनोबांच्या मातोश्रींचा स्वभाव. त्यामुळे आईने त्याला भिक्षा वाढली. विनोबा म्हणाले की, आई हा तर धडधाकट दिसतो. अशा लोकांना भिक्षा दिल्याने आळस वाढेल. अपात्राला दान केल्यास देणाऱ्याचेच अकल्याण होते.
आई उत्तरली, ‘कोण पात्र आणि कोण अपात्र याची परीक्षा करणारे आपण कोण? दारावर आलेला प्रत्येक माणूस  परमेश्वररुप समजून त्याला शक्तीनुसार देत राहणे एवढे आपले काम आहे. त्याची परीक्षा करणारी मी कोण?’

महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात "गागोदे" नावाच्या गावात ११ सप्टेंबर १८९५ या दिवशी आचार्य विनोबा भावे यांचा जन्म झाला.त्यांचे पाळण्यातील नाव विनायक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव नरहरपंत असे होते. त्यांचे आजोबा शंभूराव हे ईश्वरभक्त होते. त्यामुळे त्यांचा घरातील वातावरण धार्मिक होते. पण घरात जातीभेद, धर्मभेद पाळला जात नसे.सर्व ईश्वराचीच लेकरे आहेत हीच शिकवण लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबविली गेली.भक्ती आणि त्यागाचे धडे शंभूरावांकडूनच विनायकाला मिळाले. विनोबांची आजी कर्तबगार व करारी होती. वयाची पन्नाशी ओलांडल्यावर ती लिहायला, वाचायला शिकली. विनोबांचे वडील गुजरातेत वडोदरा येथे होते. त्यामुळे त्यांचे बालपण आजीआजोबांजवळच गेले. 

इंग्रजी तिसरीपर्यंत विनायक घरातच शिकले. फक्त चित्रकला शिकण्यापुरते ते शाळेत जात. पण त्यांचे मित्रमंडळ मोठे होते. सारेचजण देशप्रेमाने भारलेले, अभ्यासूवृत्तीचे पण मनस्वी होते. लोकमान्य टिळकांचा त्यांच्यावर प्रभाव होता. टिळकांनी "गीतारहस्य" हा ग्रंथ लिहिला हे कळताच सर्व मुलांनी गीतेचा अभ्यास करायला सुरुवात केली. शाळेमध्ये पासापुरता अभ्यास करावयाचा व बाकीचा वेळ इतर वाचनात घालवायचा असा त्यांचा दिनक्रम होता. हळूहळू शालेय शिक्षणावरचा त्यांचा विश्वास उडू लागला.

लहानपणापासून देशप्रेम आणि समाजसेवेने त्यांच्या मनात घर केले होते. हिमालयाची भीषण शांतता व ज्ञान योगाची ओढ त्यांना होती. त्याचबरोबर बंगालमधील वंदेमातरम्‌चे नारेही त्यांना खेचत होते. १९१६ मध्ये त्यांनी घर सोडले. कुठे जावे या दुविधेत होते ते. त्यांना सांसारिक मोहापासून मुक्त होऊन अध्यात्माकडे वळायचे होते व समाजसेवा करायची होती. फक्त मार्ग ठरत नव्हता.
संत विनोबा भावे यांनी आपले सारे जीवन दुस-याची सेवा करण्यात घालवले आणि भारतीय समाजाला सुसंस्कारांचा उपदेश दिला. बालपणात त्यांना त्यांचे माता-पिता विनायक नावाने बोलावत असत. परंतु महात्मा गांधींनी एकदा त्यांच्या वडिलांना पत्र लिहिले. त्यात त्यांच्यासाठी विनोबा शब्दाचा वापर केला. तेव्हापासून सर्व लोक त्यांना विनोबा भावे म्हणू लागले. विनोबाला सेवा, त्याग, सौहार्द हे संस्कार आपल्या आईकडून मिळाले. असाच एक प्रसंग आहे.

एकदा विनोबाच्या शेजारीच राहणारा एक जण आजारी पडला होता. अशा कठीण परिस्थितीमध्ये विनोबाच्या आईने शेजाऱ्यांना सहकार्य केले. ती आपल्या घरी जेवण बनवल्यानंतर शेजा-याच्या घरी जाऊन जेवण करून द्यायची आणि आजारी व्यक्तीची सेवाही करायची.

एकदा विनोबाने आपल्या आईला विचारले, आई, तू किती मतलबी आहेस, स्वत:च्या घरचे जेवण आधी बनवतेस आणि नंतर शेजा-याचे जेवण तयार करतेस.
आईने उत्तर दिले. तुला समजत नाही. विनोबा, शेजाऱ्यांचे जेवण आधी बनवले तर ते थंड होईल. त्यामुळे मी त्यांचे जेवण नंतर बनवते.
दुसऱ्याला संकटाच्या वेळी सहकार्य करण्याचा हा भाव विनोबांनी  नेहमीसाठी सांभाळून ठेवला आणि त्यांचे संपूर्ण जीवन याच भावाचे प्रत्यक्ष उदाहरण बनले.

आईचा आशीर्वाद घेऊन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते बडोद्याहून निघाले. परंतु वाटेत सुरतजवळ त्यांनी एका शाळेत नाममात्र वेतनावर इंग्रजी शिकवायला सुरुवात केली. बनारस हिंदू विद्यापीठात गांधीजींनी केलेले भाषण विनोबांनी पेपरात वाचले. त्या भाषणाचा ठसा विनोबांच्या मनावर उमटला. मनात दरवळणारे प्रश्‍न लिहून त्यांनी गांधींच्या पत्त्यावर पाठवले. उत्तरही आले. विनोबांचा आणि गांधीजींचा पत्रव्यवहार सुरू झाला.

एक दिवस गांधीजींनी लिहिले, ‘आश्रमाच्या नियमाप्रमाणे जे शिकायचे आहे त्यासाठी वेळ द्या तरच शिकाल. पत्र नकोत. आश्रमात या.

हे आमंत्रण विनोबांच्या आयुष्यातील एक फार मोठा सण होते. त्यांचे पाय गांधीजींच्या आश्रमाकडे वळले.
७ जून १९१६ या दिवशी या दोन महात्म्यांची भेट झाली ती गांधीजी स्वयंपाकघरात भाजी चिरत असताना. विनोबांच्या मनावर श्रमसंस्काराचा धडा उमटला. आजवर अफाट बौद्धिक श्रम घेतले होते, आता शारीरिक कष्ट सुरू झाले. पहिले सहा महिने या दोघांमध्ये संवादच नव्हता. या आश्रमीय दिवसांबद्दल विनोबा लिहितात- गांधीजींच्या चरणांजवळ बसून या असभ्य माणसाचा सेवक झाला. मी स्वभावाने  एखाद्या जंगली जनावरासारखा आहे. बापूंनी मला पाळीव जनावर केले.

पुढील काळात अहमदाबादातील आश्रमात एकटे राहून धार्मिक संस्कृत ग्रंथांचा, वैदिक संस्कृतीचा अभ्यास केला. ते नेहमी सांगत, ‘मी बंगालला गेलो नाही किंवा हिमालयातही नाही गेलो. पण गांधीजींच्या सहवासात मला त्या दोनही ठिकाणी पोहोचल्याचे सुख मिळाले. हिमालयाची शांतता आणि अन्यायविरोधाचा पराक्रम दोनही एकाच वेळी कसे घडू शकते ते मला आता कळले.

विनोबांना महान व्हायचे नव्हते. नेता व्हायचे नव्हते. गर्दी जमवायची नव्हती. ते नेहमी सांगत, ‘रोज ज्ञान मिळवत राहिले पाहिजे. नाहीतर जगणे व्यर्थ आहे.

१९२१ साली ते आपल्या काही सहकार्यांसोबत वर्ध्याला पोहोचले. तेथे त्यांना सेठ जमनालाल बजाज भेटले. बजाज यांनी विनोबांना गुरू मानले. पवनार येथे परमधाम आश्रमाची स्थापना केली. येथे शेती, ग्रामोद्योग व ग्रामसफाई याबाबत प्रयोग केले जात. केरळ प्रांतात वाईकोम नावाचे तीर्थस्थान आहे. येथील शंकराच्या मंदिरात जायचा रस्ता ब्राह्मणांनी बंद केला होता. याविरुद्धच्या १९२४ मधील सत्याग्रहाचे नेतृत्व विनोबाजींनी केले. स्वातंत्र्यलढ्यात १९३२  साली त्यांना अटक झाली. धुळे येथील जेलमध्ये त्यांनी गीतेवर प्रवचन सांगितले. हेच गीता प्रवचन गीताईझाले. याच्याशी एक गोड गोष्ट जुडलेली आहे.

विनोबा कॉलेजमध्ये असताना विनोबांची आई गीतेवरील प्रवचन ऐकायला जात असे. एकदा ती विनोबांना म्हणाली, ‘गीता संस्कृत आहे. ती मला समजत नाही. मला मराठी गीता आणून दे.
त्यावेळी उपलब्ध होता तो ग्रंथ विनोबांनी तिला आणून दिला. तो पसंत नव्हता तरी नाइलाजाने तोच द्यावा लागला.

तेव्हा आई विनोबांना म्हणाली, ‘हे पद्य तर संस्कृतइतकेच कठीण आहे. तू स्वत:च का अनुवाद करीत नाहीस?’
आपला मुलगा गीतेचा अनुवाद करू शकेल इतका आत्मविश्‍वास तिला कशामुळे वाटला असेल कोण जाणे! कदाचित तिने विनोबांचे अप्रतिम कविता लिहून अग्नीला समर्पण करणे पाहिले असेल. आईच्या या पूर्ण विश्‍वासामुळे विनोबांना फार मोठे बळ लाभले. विनोबांची आई विद्वान नव्हती की शिकली सवरलेली नव्हती. तिने कधी विनोबांना शिकवलेही नाही. उलट विनोबांनीच तिला वाचायला शिकवले होते. तिचा अत्याधिक विश्‍वास विनोबांच्या जीवनाचा पाया होता. विश्‍वास ही एक जादू आहे. अनेक धर्मग्रंथ सांगतात, ‘तू पापी आहेस, पुण्यवान हो.पण वेद, उपनिषदे विश्‍वासपूर्वक म्हणतात, ‘तू ब्रह्म आहेस.त्या माऊलीने विनोबांवर असाच विश्‍वास ठेवला. तोच विश्‍वास विनोबांनी गांधीजींवर ठेवला. आईच्या निधनानंतर कित्येक वर्षांनी गीतेचा मराठी अनुवाद करून त्या अनुवादाला गीताईम्हणजे गीता-आई असे नाव दिले. ही गीताई आज महाराष्ट्रात घरोघर पोहोचली आहे. विनोबांनी जे काही चिंतन, मनन केले होते आणि लिहिलेले अग्नीला समर्पण केले होते त्याचाच हा प्रसाद आहे असे विनोबांना वाटते. ही साहित्यिक कृती नसून हे धर्म-चिंतन आहे. मध्य प्रदेशातील सिवनी जेलमध्ये विनोबा होते. त्यावेळी फाशीची शिक्षा झालेले कैदी गीताईची मागणी करीत.

फाशीला चढणार्‍या एका कैद्याने डॉक्टरांच्या मार्फत विनोबांना संदेश पाठवला, ‘तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. गीताई वाचली. आता आनंदाने जातो.
गीताई माउली माझी तिचा मी बाळ नेणता।
पडतां रडतां घेई उचलूनि कडेवरी॥
आपल्या आईवरचे निस्सीम प्रेम आणि नितांत श्रद्धा यांचे वारंवार दर्शन 'गीताई'मध्ये दिसत राहते. 'पडतां रडतां घेई उचलुनि कडेवरी' असे म्हणताना विनोबांनी खरेच मुलाला समजेल आणि ज्ञानाच्या कडेवर उचलून घेईल, अशा भाषेत ही पद्यरचना केली. गीता हे काव्य नसून दर्शन आहे. ते सोपे करून सांगणे, ही अवघड बाब. गीतेच्याच श्लोकांबरहुकूम मराठीत रचना करून छंद आणि वृत्तांचेही भान राखायचे आणि अर्थहानी होऊ द्यायची नाही, हे शिवधनुष्य विनोबांनी पेलले. आपल्या पांडित्याचे दर्शन न घडवता सोप्यात सोपे शब्दप्रयोग योजण्यासाठी विनोबांनी अपार श्रम घेतले.
चार महिन्यांत 'गीताई' लिहून झाल्यावरही विनोबांना चैन पडत नव्हती. म्हणून त्यांनी आश्रमातील लहान मुलींना ती शिकवली. जिथे त्यांना अडचण आली, तिथे बदल केले. 'हे देवाचे काम' म्हणून विनोबा 'गीताई'कडे बघत असल्याने त्यासाठी सर्व कष्ट घेण्याची त्यांची तयारी होती.
'गीताई' १९३२ साली प्रकाशित झाली. त्या वेळी गांधीजींच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल ते धुळ्याच्या जेलमध्ये बंदिवान होते. एका बाजूला तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास चालू असताना दुसरीकडे त्यांचे राजकीय कार्यही चालू होतेच. स्वातंत्र्यचळवळ आणि त्यामुळे होणारा बंदिवास यामुळे सामान्यांत मिसळण्याची संधी मिळाल्याबद्दल विनोबा आनंदीच असायचे. १९३२ सालापासून आतापर्यंत 'गीताई'च्या लाखो प्रती घरोघर विकल्या गेल्या. २००३पर्यंत 'गीताई'च्या ३६ लाख २५ हजार प्रती छापल्या गेल्याची नोंद आहे. अर्वाचीन काळात एखाद्या पद्य पुस्तकाचा इतक्या मोठ्या संख्येने खप होण्याची उदाहरणे क्वचितच सापडतील.
महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांमध्ये संस्कृतमधील गीतेचे पठन व अध्ययन ही कठीण बाब होती. 'गीताई'ने ही ज्ञानाची कवाडे सर्वांसाठी उघडली. गीतेच्या पंधराव्या अध्यायात 'पुरुषोत्तमयोग' विशद केलेला आहे. मानवी शरीराचे वर्णन करताना व्यासांनी शरीर उलट्या वृक्षाप्रमाणे असल्याचे म्हटले.
'ऊर्ध्वमूलमधशाखमवत्थं प्राहुरव्ययम्। छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥'
विनोबांनी हे सारे सोप्या मराठीत सांगितले.
 'खाली शाखा वरी मूळ नित्य अवत्थ बोलिला। ज्याच्या पानांमधें वेद जाणे तो वेद जाणतो॥'

'गीताई' मराठी वाङ्मयाचा मैलाचा दगड बनला. आपल्या 'प्रेमपंथ अहिंसेचा'मध्ये विशद केलेली विनोबांची आठवण अधिक मनोवेधक आहे. धुळ्याच्या जेलमध्ये विनोबांचे प्रसिद्ध 'गीता प्रवचन' झाले आणि त्याची भारतातील अनेक भाषांत रूपांतरे झाली. या जेलमधून विनोबांची सुटका झाली, तेव्हा सर्व कैद्यांनी जेलरला विनंती केली की, आमच्या श्रमाने मिळवलेल्या पैशांतून दोन आणे कापा आणि आम्हाला 'गीताई' द्या. या पुस्तकाची किंमत तर एक आणा होती. पण कैदी म्हणाले, 'एक आणा 'गीताई'चा आणि एक आणा विनोबांच्या दक्षिणेचा.'

विनोबा सर्वांचे प्रिय होते. निसर्गाचे व मुक्या प्राण्यांचे कैवारी होते ते. शांतपणे उपोषणे, साधे कपडे, गोरगरीबांची सेवा हेच त्यांचे जगणे विनोबांना अनेक भाषा येत. फ्रेंच व लॅटिनवर तर त्यांचे प्रभुत्व होते. १७ ऑक्टोबर १९४०  पासून गांधीजींनी ब्रिटिश सरकारच्या धोरणाविरुद्ध वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात केली व भावे यांची निवड केली.


स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सर्वोदय समाजाची स्थापना केली. या चळवळीचा आरंभ आंध्र प्रदेशातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातून झाला. भूमिहीन हरिजनांनी विनोबांना आपल्या वेदना सांगितल्या. गर्दीतील विनोबांच्या एका भक्ताने उठून सांगितले, ‘मी शंभर एकर जमीन तुम्हाला अर्पण करतो विनोबा.हे ऐकून ते थक्क झाले. अनेक शेतकर्‍यांनी आपल्या परीने जमिनी दान करणे सुरू केले. विनोबांनी मेलेली मनं जागृत केली. ही होती भूदान चळवळ. हळूहळू त्यांनी चळवळीचा व्याप वाढवत नेला. कर्नाटक, ओरिसा व महाराष्ट्र या सर्व भूदान चळवळींसाठी विनोबा पायी फिरले. या चळवळीतून हजारो एकर जमीन त्यांनी भूमिहीनांना दिली.
आपल्या आध्यात्मिक मानवतावादी विचारांच्या सहाय्याने चंबळच्या खोर्‍यातील दरोडेखोरांनाही बदलले. या सर्वांत आध्यात्मिक साधनेचा हात त्यांनी कधीच सोडला नाही. भूदान चळवळ गाजली. टाइममासिकाने व यॉर्करया अमेरिकेतील वर्तमानपत्राने विनोबांच्या साधेपणाला जगासमोर मांडले. सत्याग्रह, चळवळ, ज्ञानसाधना, शिक्षा वाटप सर्व काही केले. त्यांचे मत होते की, ‘जो देतो तो देव, जो राखतो तो राक्षस.त्यांना परदेशात द वॉल्किंग सेंटअसे म्हणत. त्यांच्या पदयात्रांनी व गांधीभक्तीने त्यांना परदेशात ओळख मिळाली.

त्यांनी भगवा रंग ओढून अध्यात्माची टपरी लावली नाही. कार्य केले, पण पोस्टर लावले नाही. समर्पण एवढेच त्यांनी आयुष्यभर केले. कविता लिखाण अग्नीत टाकले आणि स्वत:च्या जीवाची आहुती समाजसेवेच्या अग्नीकुंडात दिली. हल्लीच्या बाबांनी व संत होण्याची इच्छा बाळगणार्‍यांनी विनोबांचे आयुष्य समजून घ्यावे.
अमेरिकेचा प्रवास करून परतलेल्या एका मद्रासी गृहस्थाने विनोबांना विचारले, ‘विज्ञानात बाह्य कसोटी असते तशी आत्मज्ञानात असते का?’
विनोबा हसत म्हणाले, ‘एक थप्पड मारून पहावे, रागावला तर समजावे की हा आत्मज्ञानी नाही, अजून कच्चा आहे!
विनोबां जीवनातील एक सत्यघटना येथे देत आहोत. दृढ विश्वास आणि संकल्प यांचे महत्त्व या घटनेतून आपल्या ध्यानात येऊ शकेल.

आचार्य विनोबांकडे एकदा एक दारूडा तरुण आला. हात जोडून विनवणी करू लागला
, ‘मी खूप दु:खी आहे. मला दारूने घेरले आहे. दारू सोडायची माझी तीव्र इच्छा आहे, पण दारू सुटत नाहीय. आपण काहीतरी उपाय सांगा.
 विनोबाजींनी थोडा विचार केला आणि दुस-या दिवशी भेटीस बोलावले.

दुस-या दिवशी तो तरुण सकाळी लगबगीने आला. त्याने विनोबाजींना हाक दिली. विनोबा म्हणाले
, अरे आत ये.
 त्याला आश्चर्य वाटले. विनोबा एका खांबाला घट्ट पकडून उभे होते. तरुणाने जिज्ञासेने असे करण्याचे कारण विचारले.
विनोबा म्हणाले, अरे या खांबाने मला पकडून ठेवले आहे. कितीतरी वेळ झाले पण खांब मला सोडत नाहीय.
तरुणाला आश्चर्य वाटले आणि हसूही आले. तरुण म्हणाला, खांबाला तर तुम्ही स्वताच पकडले आहात. तुम्ही खांबाला सोडा म्हणजे आपोआप तुमची सुटका होईल.

विनोबा हसले. तरुणाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले,
बाळ मी हेच तर तुला सांगणार होतो. दारूला तू कवटाळून बसलास. तू ठरवलास तर तुझे व्यसन सुटू शकेल.

तरुणाचे डोळे उघडले. त्याने दृढनिश्चय केला आणि त्याचे व्यसन सुटले. तुम्हालाही कोणत्यातरी व्यसनाने घेरले आहे असे वाटत असेल तर आज आणि आताच दृढ निश्चय करा.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर विनोबांनी समाजकार्याचा जो मार्ग निवडला त्याविषयी सांगताना ते म्हणतात,
‘‘माझे काम आश्रमापुरतेच मर्यादित राहणार नाही. आश्रमामध्ये मी दही बनवितो आहे. पुढे समाजरूपी दुधात त्याचे विरजण घालून त्याचे दही बनवायचे आहे.

विनोबांच्या या विचारातून अनेकांनी प्रेरणा घेतल्याचं दिसतं. आमटे कुटुंबिय, बंग दाम्पत्य आदींच्या समाजकार्याचा हाच आधार आहे. पुढे आणीबाणीच्या काळात स्वातंत्र्यावरती काळे ढग दाटून आले, लोकशाही मूल्यांचा संकोच होऊ लागला. त्याकाळी जेपींच्या आंदोलनाने पुन्हा एकदा सामाजिक संवेदना चाळवल्या. अशाप्रकारे समाजवादी, गांधीवादी विचाराने भारावलेली एक पिढी निर्माण झाली.

चोहोबाजूंनी अंधारून येत असताना तेवत राहिलेल्या ज्योतीइतकंच महत्त्वाचं आहे या पिढीचं काम. नव्या समाजरचनेचं काम अनेक पिढ्यांना मिळून करावं लागेल. ती एक प्रकारची रिले रेसच. जुन्या पिढीने आपला पल्ला संपला की नव्या पिढीच्या हाती बॅटन द्यावी. नव्या पिढीने ती घ्यावी.

रामचंद्र रेड्डी
विनोबा आमच्या पोचमपल्ली गावी आले होते. महात्माजींचे एक थोर अनुयायी व संत म्हणून ते आम्हास पूर्वपरिचित होते. आमच्या गावच्या हरिजनांनी सभेत त्यांच्याकडे जमिनीची मागणी केली. विनोबा त्यांना म्हणाले की, ‘मी कोठून जमीन देऊ?’
मी येथेच होतो. मी एकदम उठून उभा राहिलो. जणू परमेश्वरानेच मला तशी बुद्धी दिली.
आम्हाला जमीन द्या’!
त्या हरिजनांच्या या शब्दांचा माझ्या हृदयात पडसाद उठला आणि मी विनोबांना म्हणालो, ‘मी देतो शंभर एकर जमीन.
विनोबांनी माझ्याकडे पाहिले. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी माझ्या आश्वासनाचा पुनरूच्चार करण्यास सांगितले. मी पुन्हा संथपणे पण निश्चयाने सांगितले, की मी जमीन द्यावयास तयार आहे आणि माझ्यावर लोकांचा विश्वास बसत नसेल तर जमीन दिल्याचे मी लिहून द्यावयास तयार आहे. सभा संपल्यावर विनोबांनी मला एका बाजूस बोलावून पुन्हा विचारले. मी परत त्यांना तेच सांगितले. त्यानंतर रात्री विनोबा आपल्या निवासस्थानी झोपावयास गेले. दुसऱ्या दिवशी ते पुढील गावी गेले आणि तेथे त्यांनी माझ्या दानाविषयी प्रवचनात उल्लेख केला. त्या गावीही त्यांनी जमीन मागितली आणि लोकांनी त्यांना ती दिली आणि अशा रीतीने भूदानाचा जन्म झाला.

मी या घटनेचा जेव्हा विचार करतो तेव्हा मला समजून येते की मी त्या वेळी जे केले त्यापेक्षा दुसरे काही करू शकलो नसतो. दान करण्याची माझ्यावर कोणी सक्ती केली नव्हती किंवा औदार्याच्या झटक्यातही मी ते केले नव्हते. विनोबांची भेट होण्यापूर्वीही मी हरिजनांना जमीन द्यावयाच्या विचारातच होतो. परंतु विनोबांनी समाजाच्या आजच्या परिस्थितीत ज्यांना जमीन नाही त्यांना ती देण्याची आवश्यकता तर्कदृष्टय़ा पटवून दिली आणि माझ्या नैतिक कर्तव्याची मला ओळख झाली. काही लोक म्हणतात, की भावनेच्या आहारी जाऊन लोक दान देतात. पण माझ्या बाबतीत तरी ते खरे नाही. दुसऱ्या काहींचे म्हणणे आहे की, जमीन मालकावर नैतिक दबाव आणला जातो. परंतु त्यात चूक काय आहे? आपले नैतिक कर्तव्य जाणून भूहीनांना जमीन देणे योग्य नाही काय? नैतिक कर्तव्यपूर्तीच्या भावनेतून दान करण्याने मनात मागून कटुता रहात नाही. हृदय निर्मळ होते आणि शतकानुशकतांचे ओझे खाली उतरल्यामुळे मन कसे मोकळे होते.

(सं - भूदान-यज्ञअंक- २३  १९ नोव्हेंबर १९५३  पृ- १)

शोभनाताई रानडे

शांततापूर्णरीत्या हिंदूधर्म आणि सुधारणा घडवून आणणार्‍या आचार्य विनोबा भावे यांनी शंकराचार्यांप्रमाणे हिंदूस्थानांतील चार दिशेला आपले चार आश्रम विकसित केले. हिंदू धर्मातील अनेक परंपरा आणि रूढी त्यांनी त्याज्य ठरविल्या. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे जानवे अग्निला अर्पण केले. महिलांना सर्व स्वावलंबन आणि स्वच्छतेची शिकवण देऊन कार्यप्रेरित केले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शोभनाताई रानडे यांनी आसाम आणि गोव्यात महिलांसाठी आणि बालकल्याणासाठी विविध प्रकल्प राबविले. एकेकाळी आसाम विधानपरिषदेवर शोभनाताई रानडे या बिनविरोध निवडून येणार होत्या. परंतु आचार्य विनोबांच्या सूचनेनुसार सेवाकार्य हेच खरे आपले काम आहे ते सोडून आपण अन्य कोणतेही कार्य पत्करावयाचे नाही, असाच संकल्प त्यांनी केला. सेवाशक्ती म्हणजेच श्रमशक्ती.

महेंद्रसिंह प्रसाद (वय 85, रा. शिंगोडिया, बिहार)

राष्ट्रीय जनता दलाचे नेते, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे मामा राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रसार-प्रचार करण्याचे काम करतात, असे कोणी सांगितले, तर त्यावर कोणीही विश्‍वास ठेवणार नाही. मात्र हे वास्तव आहे. महेंद्रसिंह प्रसाद (वय 85, रा. शिंगोडिया, बिहार) असे या मामांचे नाव आहे. ते बिहारमधील महात्मा गांधी संस्थेचे सदस्य आहेत. महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ते आजही विविध राज्यांत प्रवास करतात. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

कृष्णमल जगन्नाथन आणि संकरलिंगम जगन्नाथन
आताच्या स्पर्धेच्या जगातही तत्त्वांची बांधिलकी मानून जगता येते आणि अर्थपूर्ण सामाजिक कार्य करता येते, हे दाखवून देणाऱ्या कृष्णमल जगन्नाथन आणि संकरलिंगम जगन्नाथन या दाम्पत्याला पर्यायी नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. साऱ्या भारतवासीयांच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. कृष्णमल यांचा जन्म दलित सामाजातील. सगळी परिस्थिती प्रतिकूलच होती. परंतु त्यांनी हातपाय गाळले नाहीत किंवा त्या परिस्थितीला शरणही गेल्या नाहीत. उलट मोठ्या जिद्दीने त्या पदवीधर झाल्या. संकरलिंगम यांचा जन्म धनी कुटुंबातला. पण पैशाची धुंदी त्यांच्या डोळ्यावर कधी आली नाही. त्यांनी महात्मा गांधी यांची हाक ऐकली आणि कॉलजचे शिक्षण सोडून ते गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीत सामील झाले पुढे त्यांनी १९४२च्या चळवळीतही भाग घेतला. परिणामी त्यांना कारावास भोगावा लागला. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि संकरलिंगम यांची सुटका झाली. कृष्णमल यासुद्धा गांधीजींच्याच प्रेरणेने सुरू झालेल्या सवोर्दय चळवळीत होत्या. त्यामुळेच त्यांची आणि संकरलिंगम यांची भेट झाली आणि त्याचेच रूपातंर विवाहात झाले. 

लग्नानंतरही आपण चारचौघांसारखा संसार करायचा नाही; तर ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे उतराई होण्यासाठी ठोस काम हाती घ्यावयाचे असा संकल्पच या तरुण जोडप्याने सोडला. संकरलिंगम विनोबांच्या भूदान चळवळीत दाखल झाले. त्यानिमित्ताने त्यांचे उत्तर भारतात बरेच भ्रमण झाले. पुढे ते मदासाला परतले. त्यांनी आणि कृष्णमल यांनी विनोबांची भूदान चळवळ आणि जमिनीचे फेरवाटप याबाबत काम सुरू केले. भूदानामध्ये मिळालेली बरीचशी जमीन ही नापीक होती. ती लागवडीखाली आणणे हे मोठे आव्हान होते. तेच या दाम्पत्याने स्वीकारले. त्यांनी 'असोसिएशन ऑफ सर्व सेवा फार्मर्स' नावाची संस्था स्थापन केली. या कामाचा पसारा देशाच्या अनेक राज्यांमध्ये पसरला. गांधीविचारांना धरून आवश्यक ती सर्व कामे करावयाची हेच या संस्थेचे सूत्र. ते यशस्वी ठरले. पुढे १९८१ सालामध्ये भूमी कसणाऱ्यांना जमीन मिळावी, यासाठी त्यांनी 'लँड फॉर दी टिलर्स फ्रिडम' ही संस्था स्थापन केली. जमीनदार आणि कष्टकरी यांना एका टेबलावर आणावयाचे, कष्टकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज मिळवून द्यायचे आणि नंतर सर्व कष्टकऱ्यांना सहकाराने काम करायला उद्युक्त करावयाचे असे या संस्थेच्या कामाचे स्वरूप. त्यातूनच तेरा हजार कुटुंबाचे जीवन बदलून गेले. त्यांची आयुष्ये प्रकाशाने उजळून गेली.

रमाकांत आत्माराम पाटील
आचार्य विनोबा भावे यांच्या लाडक्या मानसपुत्रांपैकी एक रमाकांत आत्माराम पाटील
१९५५च्या सुमारास नोकरीला रामराम ठोकून ते थेट आचार्य विनोबा भावे यांच्याकडे गेले. त्या वेळी विनोबा पंजाबमध्ये होते. रमाकांत पाटील तेथे पोहोचले आणि एक व्रतस्थ सर्वोदयी बनले. कोकणापासून ते उत्तर भारतातील विविध ठिकाणांपर्यंत त्यांनी विनोबा भावे यांच्याबरोबर संचार केला. विनोबाजींच्या पदयात्रेचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी रमाकांत पाटीलनिर्मला देशपांडे आदींवर होती. ती त्यांनी लीलया पेलली. भूदान चळवळीमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्याचबरोबर गोहत्या बंदीग्रामदानखादी ग्रामोद्योग आदी चळवळींशी त्यांचा जवळचा संबंध होता.
कालांतराने ते मुंबईत आले. मुंबईत सातरस्ता येथील शांतीनगर येथे ते वास्तव्यास होते. तेथूनच ते सवरेदयाचे काम करू लागले. मुंबई सर्वोदय मंडळाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. मुंबईतून सुरू झालेल्या ‘सर्वोदय साधना’ पत्रिकेचे संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. अविवाहित असलेल्या रमाकांत पाटील यांनी सर्वोदयाप्रमाणेच पत्रकारितेचाही वसा घेतला. ‘लोकसत्ता’, ‘नवशक्ति’, ‘केसरी’, ‘लोकमान्य’, ‘लोकमित्र’, ‘नागपूर पत्रिका’, ‘सागर’ आदी वृत्तपत्रांतून त्यांनी लेखन केले. त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये सुमारे ४० हजार लेख लिहिले. दै. ‘नवशक्तिमध्ये तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ त्यांचे ‘सहज संवाद’ हे सदर गाजत होते.
मधुगंगा’ आणि ‘भैरवी’ हे त्यांचे काव्यसंग्रहतर ‘विनोबा एक युगयात्री’ आणि मामा क्षीरसागर यांच्या जीवनावर ‘जीवन त्यांना कळले’ ही त्यांची पुस्तके. सावंतवाडी येथून काही काळ त्यांनी भूदान चळवळीला वाहिलेले वृत्तपत्रही चालविले.
माजी केंद्रीय मंत्री स. का. पाटील हे त्यांचे काका, पण या राजकीय जवळिकीचा त्यांनी स्वतच्या फायद्यासाठी कधीही उपयोग करून घेतला नाही.

जपानच्या युरिको इकिनोया यांची ही गाथा...
द्वारा :- प्रदीप कुलकर्णी
त्यांची आणि भारताची; विशेषतः महाराष्ट्राची, ओळख होऊन, आता झालीत बरीच वर्षं. जवळपास ३५
तरी. दूर अतिपूर्वेकडील देशात राहणाऱ्या त्यांना पूर्वेकडील या भारतात खेचून आणलं ते दोन शब्दांनी. ज्ञानोबा आणि तुकोबा! हे दोन शब्द त्यांना अगदी पहिल्यांदा भेटले ते त्यांच्याच देशात. जपानमध्ये! गीताप्रवचनाच्या भाषांतरात. हे दोन शब्द म्हणजे नेमकं आहे तरी काय? याचा शोध घेत त्या पोचल्या भारतात. महाराष्ट्रात. महाराष्ट्रातील विदर्भात आणि विदर्भामधील वर्ध्यातील पवनार आश्रमात. आचार्य विनोबा भावे यांच्या या आश्रमात त्यांची "ज्ञानोबा-तुकोबां'शी प्राथमिक ओळख झाली नि पुढं ती घनदाट व्हावी म्हणून त्या पंढरपूरच्या आषाढी वारीत आल्या...ते साल होतं १९८१. आता "त्या वारीच्या आणि वारी त्यांची', असं होऊन गेलंय. त्यांचं नाव आहे युरिको इकिनोया! एरवी मुक्काम पवनार आश्रम, वर्धा. विनोबांच्या समग्र साहित्याच्या अभ्यासात त्या गढून गेल्या आहेत. आदी शंकराचार्यांचं तत्त्वज्ञानही त्यांना खूप आवडतं. महात्मा गांधींच्या विचारांचाही त्यांना अभ्यास करायचा आहे...भारतीय अभिजात संगीतात त्यांचे आवडते राग आहेत मालकंस नि केदार...! आता भारत हाच त्यांचा देश आहे...भारताचं कायमस्वरूपी नागरिकत्व मिळावं, यासाठी अलीकडंच त्यांनी सरकारदरबारी अर्जही करून ठेवलाय...

विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा....या चार भरभक्कम खांबांवरच इकिनोया यांच्या जगण्याची "इमारत फळा आली' आहे!
अगदी परवा, म्हणजे ज्ञानोबांच्या पालखीचं आळंदीहून पुण्याकडं प्रस्थान होण्याच्या दोन दिवस आधी, इकिनोया यांची आळंदीतच भेट घेतली.
"मुलाखत द्याल का?', विचारल्यावर संकोचून त्या म्हणाल्या, "मुलाखत म्हटलं की ती गंभीर वगैरे होणार आणि वारीबद्दल गंभीर होऊन सांगण्यासारखं माझ्याकडं तसं काहीही नाही. वारी हा माझ्या परमानंदाचा, ब्रह्मानंदाचा आणि अखंड समाधानाचा विषय आहे. गेल्या
३१ वर्षांचा हा सारा अनुभव शब्दांच्या पलीकडचा आहे. वाटलंच तर आपण गप्पा मारू या.त्यातून तुम्हाला जे मिळेल, ते मिळेल.'
म्हटलं, "चालेल.'

इकिनोया हिंदी अस्खलित बोलतात. अधूनमधून छोटी छोटी मराठी वाक्‍यंही पेरतात. नामस्मरण, पारायण, स्मरणशक्ती, शिस्त, समाधिस्थ, निष्ठा या शब्दांचं उच्चारण अगदी शुद्ध!

आळंदीतील देवीदास धर्मशाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील रूम नंबर 50 मध्ये दुपारी पोचलो. पांढऱ्याशुभ्र साडीतील लहानखुऱ्या चणीच्या इकिनोयांनी भारतीय पद्धतीनं दोन्ही हात जोडून स्मितहास्यानं स्वागत केलं. गळ्यात तुळशीच्या दोन माळा, कपाळावर कुंकवाचा छोटासा टिळा...

खोलीत उजव्या हाताच्या मांडणीवर ज्ञानेश्‍वरी, तुकारामगाथा, समग्र विनोबा आणि इतरही अनेक धार्मिक ग्रंथ...मांडणीच्या एका कप्प्यात विठ्ठल-रखुमाईच्या पितळी मूर्ती, ज्ञानोबांच्या चित्राचा काळा-पांढरा फोटो, तुकोबांच्या चित्राचा रंगीत फोटो, विनोबांचा छोटेखानी फोटो...आणखीही इतर देव-देवतांचे फोटो, एक ताम्रकलश...समोरच्या टी पॉयवर संत कबीरांच्या दोह्यांचा संग्रह....जवळच एका कागदी खोक्‍यात वेगवेगळ्या प्रकारची बरीच छोटी-मोठी औषधं...कुण्या मराठमोळ्या भागवतभक्ताचीच ही खोली आहे की काय जणू, असा सारा थाट! नाही म्हणायला अत्याधुनिकतेची काही पावलंही त्या खोलीत होती. छोट्याशा दिवाणावर लॅपटॉप होता, मोबाईल होता. शिवाय, विनोबांच्या समग्र साहित्याचा अकरावा खंडही...इकिनोया खोलीत नसताना तिथं कुणी गेलं असतं तर, ही खोली कुण्या विदेशी व्यक्तीची आहे, हे सांगूनही पटलं नसतं. आता इकिनोया स्वतःच तिथं उपस्थित असल्यानं विश्‍वास ठेवावाच लागत होता...! खोलीत प्रवेश केला तेव्हा विनोबांच्याच समग्र साहित्याचा अकरावा खंड त्या वाचत होत्या. तुकोबांचे अभंगांत काहीतरी शोधत होत्या...

मुलाखतीऐवजी गप्पाच मारायच्या असल्यानं थेट गप्पाच सुरू केल्या...पहिला प्रश्‍न अगदी नावालाच विचारला..."महाराष्ट्रात अशी काही वारी असते हे तुम्हाला कळलं तरी कसं...?'

साठीच्या आत-बाहेर असलेल्या इकिनोयांचा चेहरा उजळला नि अस्खलित हिंदीत त्या सांगू लागल्या... ""आचार्य विनोबांच्या गीताप्रवचनांचं जपानी भाषांतर जपानमध्येच माझ्या वाचनात आलं. त्यात ज्ञानेश्‍वर महाराज-तुकाराम महाराज हे दोन शब्द मला वारंवार आढळले आणि त्या शब्दांनीच मला महाराष्ट्रात खेचून आणलं. विनोबांच्या सगळ्याच साहित्याचा, सर्वोदय चळवळीचा, त्या विचारांचा मला अभ्यास करायचा होता. त्यासाठी मी
१९७६ साली केवळ दोनच महिन्यांसाठी पवनार आश्रमात आले होते. मात्र, केवळ दोन महिन्यांत या साहित्याची साधी ओळखही होणार नाही, हे मला लवकरच कळून चुकलं. मी मग महाराष्ट्रात तीन वर्षं राहायचं ठरवलं. विनोबांच्या "गीताई'च्या प्रचारासाठी वारीच्या काळात त्यांचे शिष्यगण आळंदीत जात असत. त्यातीलच काही शिष्यांनी एका वर्षी, म्हणजे १९८१ साली, मला आणि माझ्याबरोबरच्या पाच-सहाजणींनाही प्रचारासाठी वारीत येण्याविषयी सुचवलं आणि मी पंढरीच्या वारीत गेले. तीच माझी पहिली वारी. पुढची सलग ३० वर्षं मग मी वारीला जातच राहिले. ही सगळी वर्षं मी पायी वारी केली. याच वर्षी प्रकृती कुरकुरू लागल्यानं मला मनासारखी वारी करता येणार नाही.
"वारीत चालतानाचा अनुभव शब्दांत वर्णन करण्यासारखा नाही. तो परमानंदाचाच अनुभव आहे. तुकोबांची गाथाही मी २० ते २५ वेळा वाचली. ही पारायणं मी आळंदी, देहू, पवनार इथं केली. अनेकदा तर विनोबांच्या समाधीच्या ठिकाणी जायचं नि तुकोबांची गाथा उघडून त्यात हरवून जायचं, असं मी कितीदा तरी केलं आहे. तो आनंद काही वेगळाच. चालत चालत वारी करून एकदा पंढरपूरला पोचल्यावर विठ्ठलाच्या पायी माथा टेकवला की मला पूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन होतं! दरवेळी असाच अनुभव पंढरपुरात मला येतो,'' इकिनोयांच्या सांगण्यातून "सावळे परब्रह्म'च जणू त्या छोट्याशा खोलीत अवतरलं...

पवनार आश्रमाचे व्यवस्थापक गौतमजी बजाज
आज आश्रमात प्रामुख्याने ब्रह्मविद्या मंदिराचे कार्य चालते. विनोबाजींनी स्थापन केलेल्या ब्रह्मविद्या मंदिराद्वारे महिलान्नोतीचे कार्य चालते. स्त्रियाच आश्रमाचे संचालन करतात. महिलांच्या एका छोटय़ा गटाने सर्व सामाजिक, सांसारिक जबाबदाऱ्यांपासून मुक्त राहून आध्यात्मिक साधनेचा प्रयोग करावा, अशी विनोबाजींची अपेक्षा होती. त्यानुसार आज येथे देशविदेशातील २७ साधिका आहेत. सामूहिक साधना हा आश्रमीय जीवनाचा गाभा आहे. आश्रमातील गोशाळा, शेती, स्वयंपाक, सफोई सर्व कामांवर स्त्रियाच निगराणी ठेवतात. प्रत्येकास सहा तास श्रमदान अनिवार्य आहे. बाहेरून वस्तू आणल्या जात नाही. संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा कायदा होण्यासाठी विनोबाजींच्या विचारानुरूप पाठपुरावा होतो. मैत्रीहे आश्रमाचे मुखपत्र आहे. बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवण्याचे ते एकमेव साधन असून देशभर व विदेशात त्याचे वाचक आहेत. दरवर्षी विनोबाजींच्या स्मृदिदिनी कीर्तन सप्ताह व भारतभरातील स्नेह्य़ांसाठी मित्र मिलनसोहोळा आयोजित केला जातो. दररोज तीन वेळा प्रार्थना व गीताई पठन होते. हे स्थान बघण्यासाठी हजारो पर्यटक येतात. त्यापैकी काही आश्रमात थांबतात. कुठलेही शासकीय अनुदान घेतले जात नाही. पहाटे चारला आश्रमातील दिवस सुरू होतो, रात्री ८.३० ला संपतो! 
गौतमभाई बजाज यांची सतराव्या राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सामाजिक एकता, शांतता व सद्भावना वाढविण्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल गौतमभाई बजाज यांची या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 
प्रत्येक भारतीय हा गीता, गंगा, गायत्री, गोमाता, ग्राम व गुरुजी एका सूत्रात जुळला आहे
.... गौतमजी  बजाज
विजय दिवाण  
१९८२ पर्यंत  मी विनोबांच्या ग्रामदान कार्यक्रमात सहभागी होतो. पेणजवळील त्यांच्या गागोदे या जन्मगावी ग्रामस्थांनी ग्रामदान केले होते. जमिनीवरची व्यक्तिगत मालकी सोडून ती गावाकडे दिलेली आहे. सातबा-याच्या उता-यावर शेतीचे मालक म्हणून गावाचे नाव असते. व्यक्ती वहिवाटधारक असतेमालक नाही. ही ग्रामदानाची मुख्य कल्पना आहे. या गावात आणि विनोबाजींच्या जन्मघरात राहून मी त्यांच्या विचारांचे काम करतो. दलितांचे काम सवर्णानी केले तर त्यांचे प्रश्न कळतील आणि ते सोडण्यासाठी मदत मिळेल ही त्यांची धारणा होती.  मुंबई सर्वोदय मंडळाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली असून बरेच काही करण्याची इच्छाआहे. सर्वोदय मंडळाला संघटनेचं नवं रूप द्यायचं आहे. गांधीविनोबा,फुले,आंबेडकर यांच्या विचारांची परस्परपूरकता आणि समन्वय साधायचा आहे. सर्व विचारधारेंचे कार्यकर्ते मिळून इतर प्रश्नांवर एकत्र काम करण्यासाठी एकत्र येऊ.

 डॉ. आशिष सातव आणि डॉ. कविता सातव


वाघांसाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले विदर्भातील मेळघाट हे कुपोषण आणि मोठ्या प्रमाणातील बालमृत्यूदरासाठी कुप्रसिद्ध आहे. इथल्या दाट जंगलात जसा सूर्यप्रकाश पोचत नाही, तशीच इथल्या गावांमध्ये विकासाची किरणेही पोचत नाहीत; पण अशाच अंधारलेल्या परिस्थितीत काही लोक स्थानिक आदिवासींचे जीवन सक्षम करण्याचे काम करत आहेत. स्वेच्छेने घेतलेला हा अवघड वसा ते कोणत्याही संकटाला न जुमानता पुढे चालवत आहेत. डॉ. आशिष सातव आणि डॉ. कविता सातव हे दांपत्य अशा लोकांपैकीच एक आहेत. 

"माझे आजोबा वसंतराव बोंबटकर यांचा माझ्यावर लहानपणापासून प्रभाव होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी गांधीजी व विनोबा भावे यांचे साहित्य वाचू लागलो. विनोबाजींच्या सर्वोदयी विचारांचा जसा माझ्यावर प्रभाव पडला तसाच गांधीजींच्या, "तरुणांनी खेड्यांकडे जायला हवे, कारण खरा भारत तिथे आहे,' या वचनाचाही प्रभाव होता.''

आदिवासी भागात जायचे ठरल्यावर तिथल्या वातावरणाची, तिथल्या जगण्याची सवय व्हावी म्हणून डॉक्‍टरांनी कॉलेजला असतानाच तयारी सुरू केली.

"गावातील जगण्याची मला फारशी ओळख नव्हतीच. त्यामुळे जास्तीत जास्त साधेपणाचे जीवन जगण्याचे प्रयोग माझे मीच सुरू केले. उन्हाळ्यात विदर्भ खूप तापतो. ४०-४५  अंशांपर्यंत तापमान जाते. अशा उन्हातही कूलरशिवाय राहायचे. कडाक्‍याच्या थंडीतही थंड पाण्यानेच अंघोळ करायची. उपवास करून भूकेवर नियंत्रण मिळवायचे. अशा प्रयोगांतून मी माझी सहनशक्ती वाढवत होतो,'' डॉ. सातव सांगतात. एकीकडे शारीरिक साधना करत असतानाच योग व ध्यान यांचाही अभ्यास ते करत होते. मन मजबूत बनवण्यासाठी त्याचा उपयोग होत होता. या काळात गांधीजींच्या "माझे सत्याचे प्रयोग', स्टीफन कोव्हेचे "सेव्हन हॅबिट्‌स ऑफ हायली इफेक्‍टिव्ह पीपल', स्वामी विवेकानंद यांची पुस्तके वाचून त्यांचे विचार अधिक तयार होत होते.

त्यांनी काम सुरू केल्यानंतर दोन वर्षांनी त्यांच्या पत्नी डॉ. कविता सातव याही त्यांच्याबरोबर काम करू लागल्या. डॉक्‍टरांच्या लग्नाचा किस्साही ऐकण्यासारखा आहे. लग्न करताना त्यांच्या दोन अटी होत्या. पहिली म्हणजे, मुलीची मेळघाटात राहण्याची, तिथे काम करण्याची तयारी असावी. ती जर सरकारी डॉक्‍टर असेल तर उत्तमच आणि दुसरी म्हणजे ती दुसऱ्या जातीची असावी. डॉ. कविता यांनी त्यांच्या या दोन्ही अटी पूर्ण केल्या. नेत्रशल्यविशारद असलेल्या डॉ. कविता यांनी धारणी येथे नेत्र रुग्णालय सुरू केले. पहिल्या वर्षी त्याला कोणतेच आर्थिक पाठबळ नव्हते. त्यामुळे साधनांची उणीव जाणवायची. शिवाय रुग्णही फारसे मिळत नव्हते.

"एकतर इथले आदिवासी अतिशय गरीब. त्यांच्याकडे ऑपरेशनसाठी पैसेच नसायचे. शिवाय त्यांच्यातील अंधश्रद्धांमुळेही ते डॉक्‍टरकडे फिरकायचे नाहीत. आजूबाजूला प्रश्‍न दिसायचे, रुग्ण दिसायचे; पण त्यांच्यावर उपचार करता येत नव्हते. त्यामुळे सुरवातीला कविता फार वैतागायची. अशाने मला एखाद्या वाघावरच ऑपरेशन करायची वेळ येईल, असे कधी कधी चिडून बोलायची,'' डॉक्‍टर हसत सांगतात. 

नंतर पैशांची कशीतरी जुळवाजुळव करून त्यांनी आधी गरजेची उपकरणे विकत घेतली. त्यामुळे कमी पैशात किंवा मोफत शस्त्रक्रिया करणे शक्‍य झाले, तसे लोकही येऊ लागले. देणग्या देऊन मदत करणारे हातही वाढू लागले आणि अशा रीतीने नेत्र शस्त्रक्रियांचे कामही वाढू लागले. सुरवातीला वर्षभर डॉ. कवितांनी मेळघाटातल्या पन्नासहून जास्त गावांत जाऊन घरोघरी फिरून डोळे तपासणीचे काम केले. त्यावेळी त्यांचा मुलगा अथांग फक्त चार महिन्यांचा होता. त्याला एखाद्या झाडावर झोळीत ठेवून त्या लोकांना तपासण्याचे काम करायच्या. अत्यवस्थ पेशंट असेल तर स्वतः गाडीने त्याला धारणीला घेऊन यायच्या. कितीतरी पेशंट जेव्हा रात्रीच्या वेळी यायचे तेव्हा त्यांच्यासाठी त्याच स्वयंपाक करायच्या. 

डॉ. अविनाश सावजी यानी मला विनोबांचे एक वचन सांगितले होते, "तलवारीशी तलवारीने नाही, तर ढालीने लढायचे असते'; तेव्हापासून त्रास देणाऱ्या लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा मी ज्यांच्यासाठी आलो होतो, त्या लोकांकडे जास्त लक्ष द्यायला मी सुरवात केली,'' डॉक्‍टर सांगतात. नंतर हीच माणसे त्यांच्याबरोबर उभी राहिली. लोक त्यांच्याबरोबर आहेत हे पाहिल्यानंतर विरोध बराच कमी झाला.

"आयुष्य हे नदीसारखे असते. नदी जेव्हा डोंगरातून, दऱ्या-खोऱ्यांतून वाहते, तेव्हा ती अधिकच सुंदर दिसते. त्यामुळे माझ्या कामात मला आलेल्या अडथळ्यांमुळे मी कधीच निराश झालो नाही की मागे फिरलो नाही. आयुष्याचा प्रवास जेवढा खडतर वाटेने होईल, तेवढा तो जास्त सुंदर असेल यावर माझी श्रद्धा आहे,'' डॉ. सातव सांगतात. याच श्रद्धेवर त्यांची वाटचाल सुरू आहे. 

गीताई अध्याय दहावा

सर्वांचे मूळ माझ्यात प्रेरणा मजपासुनी । हे ओळखूनि भक्तीने जाणते भजती मज ॥ ८ ॥
चित्ते प्राणे जसे मी चि एकमेकांस बोधिती । भरूनि कीर्तने माझ्या ते आनंदात खेळती ॥ ९ ॥
असे जे रंगले नित्य भजती प्रीती-पूर्वक । त्यांस मी भेटवी माते देउनी बुद्धि-योग तो ॥ १० ॥
करूनि करुणा त्यांची हृदयी राहुनी स्वये। तेजस्वी ज्ञान-दीपाने अज्ञान-तम घालवी ॥ ११ ॥









1 टिप्पणी:

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

लेख पूर्ण वाचायचाय पण मधून मधून काही परीच्छेद वाचले. धन्यवाद प्रसाद सर, या सगळ्याचे दर्शन आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून करून देण्याबद्धल. सध्या आपल्यादेशात राजकिय आणि सामाजिक क्षेत्रात इतका भ्र्ष्टाचार बोकाळला आहे की चांगलं काही होत असेल, चालू असेल याची आशाच वाटत नाही. इतके छॊटे छोटे यज्ञ चालू आहेत आणि या यज्ञांची माहीती देत असल्याबद्धल आपलं मन:पूर्वक अभिनंदन.