सुधाकर भाऊ ....मामा अशा अनेक नावाने श्री सुधाकर निकम यांना आमच्या घरात हाक मारले जाते.सकाळी घरातील गजानन महाराजांच्या मंदिराची घंटी वाजली की समजायचे सुधाकर महाराज आले....बहुतेक वेळा मी त्यावेळी व्यायाम करत असतो. दरवाजा उघडून आत आले की आम्ही दोघंही मोठ्यांनी गर्जना करतो “गजानन महाराज की जय ” व त्यानंतर मी म्हणतो “सुधाकर महाराज की जय” एकमेकांना सकाळी अभिवादन करण्याची आमची ही रीत.
लहानपण खडकावर म्हणजे खडकपुऱ्यावर ...सुरुवातीस शेळ्या राखणे हा व्यवसाय ....सोबतच त्या परिसरातील नवीन बांधल्या जाणाऱ्या आमच्या घराची वॉटरिंग तो करायचा...त्याचा आणि आमच्या कुटुंबाचा ऋणानुबंध असा सुरु झाला.दिसताना थोडा भोळा वाटणारा सुधाकर भाऊ वागताना कमालीचा व्यवहारी आहे. सुधाकर भाऊचे एक अनोखे नाते अगदी लहानपणा पासून आमचे होते. त्यावेळी पासून ते आत्ता पर्यंत. मी व माझी बहिण आरतीला रात्री औरंगाबादला जाताना आमचा पेटारा आपल्या खांद्यावर घेवून येणारा व आम्हाला बसून देणारा..व निरोप देताना मान खाली घालून अश्रू लपवत टाटा करणारा आमचा मोठा भाऊ ...
मी अरुणाचल मध्ये असताना आरतीच्या मुलीचे बारसे सुधाकर भाऊच्या मांडीवर काढले....आईच्या तर आयुष्याचा तो एक अविभाग्य घटक आहे. तिला पण आता एकू येत नाही व भाऊला पण... खुपच गमतीदार पद्धतीने त्यांची जुगलबंदी चालू असते. एकमेकावर चिडत, ओरडत व शेवटी हसत. तो तिचा “ सुध्या ” तो “गजानन महाराज” कधी झाला हे कळलेच नाही. आई ने त्याला तिच्या आयुष्यात गजानन महाराजांचे स्थान दिले.
भाऊ तसा खूप भावूक आहे. माझ्या पायाला अपघात झाला. सकाळी त्याने माझा पाय बांधलेला पाहिल्यानंतर तो जवळ आला. माझ्या पाया जवळ बसला. हळूच आपले हात माझ्या उघड्या बोटांवर फिरवले. माझ्याकडे पाहिले व लगेच मान खाली घालून त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा धारा....तसा तो खुपच हळवा आहे आमच्या बाबत. नगरपालिकेतील बऱ्या पगाराची नौकरी असली तरी त्याने आमचे काम करणे सोडले नाही. त्याला तीन मुली व एक मुलगा. भाऊची बायको मात्र खमकी आहे. तिच्या मुळे त्याचा संसार चांगला चालू आहे.
तो कधी कधी खुपच वेगळा वागतो. दर रविवारी तो आपल्या मुलांना बेकरीतून खारी आणतो. घरी जाताना मग आमच्या कडे येतो व त्यातील एक पुढा आम्हाला देतो. नको म्हंटल तर त्याच्या विशिष्ठ आदाकारीत थोडं लाजत म्हणतो .. “ राहू द्या मोप आणलेत..”
दररोज सकाळी अंबाजोगाईतील इत्यभूत वार्ता तो मला सांगतो. त्याला नीट वाचता येत नाही पण वर्तमानपत्र मात्र तो पूर्ण चाळतो. त्यात प्रचंड ताकद आहे. वय पन्नाशीच्या आसपास असले तरी मोठ लोखंडी कपाट एकटा उचलू शकतो. आधी त्याच्या सोबत असायची त्याची सायकल व एक रेडिओ...त्याला गाणे समजते का ते माहित नाही पण त्याला सतत गाणे लागतात काम करताना. आत्ता रेडिओची जागा घेतील मोबाईल ने ...लावणी पासून इंदोरीकर महाराजांचे कीर्तने सगळे काही चालू असते.
सकाळी मामाचा मूड चांगला नव्हता. आज त्याच्या कडे कुठल्या राजकारण्याची खबर नव्हती. तो थोडं रडवेला होता... “ दादा अहो चोरी झाली. देवीचे दागिने चोरले कुणीतरी पाप्याने.” तो फार खिन्न होऊन सांगत होता. अस्वस्थ होत तो उठत म्हणाला, “मानूस लई उतावळा असतो, तस देवाचे नाई...तो पक्की सजा देईल, त्यांची येळ आली की.”
फार मोलाचे तो बोलला होता “ माणूस लई उतावळा आहे.” माझा पूर्ण दिवस त्या शब्दांचा विचार करण्यात गेला.
ज्ञान प्रबोधिनीच्या शिशुविहारची अगदी आरंभापासून त्याचे नाते. स्वच्छता करणे हे त्याचे काम. मुलांशी त्याचे वेगळेच नाते. लहान मुलांना त्याच्या टिपिकल आदाकारीत ती नाचून पण दाखवे. मुलं एकदम खुश. आरतीच्या लहान मुलीने एकदा त्याच्या अंगावर शी केली तर हा माणूस हसत हसत येत आईला म्हणतो, “बघा ,वाहिनी लेकरांनी प्रसाद दिला.”
माणसाचं मन इतक निर्मळ, निर्व्याज होऊ शकते अगदी लेकरांसारखे ?
आठ दिवसांना पूर्वी भाऊची एकच गडबड होती.
“ बाजारात हारं आलेत आता आनावं लागतील लेकरांसाठी.”
नवीन वर्षाचा गुडी पाडवा येणार होता. भाऊ त्याच्या मुलावर खूप प्रेम करतो. त्याला सायकल घेवून फिरायला जातो. शाळेत सोडायला जातो तर कधी शाळेतून आणायला जातो.मला वाटले गुडी पाडाव्यासाठी त्याच्या मुलांसाठी तो गाठी ( हार ) आणायचे म्हणतो आहे. दुसऱ्या दिवशी परत तो मला म्हणाला, “अव, दाद हारं आनावं लागतील न ? बाजार सजला बघा.लई बेस्ट हायत.”
“मग अनुकी त्यात काय.”
गुडी पाडव्याच्या दोन दिवस आधी सकाळी अकराच्या सुमारास भाऊ आपला हातात एक मोठे खोके घेवून आला.
“हे बघा लई झाक हार आणलेत.”
त्याने चक्क शिशुविहार मधील पन्नास मुलांसाठी गाठी आणल्या होत्या. मी ते पाहून तर अवाकच झालो. यार हा माणूस शिकलेला नाही. फार श्रीमंत पण नाही त्यातल्या त्यात त्याचा पोरगा पण शिशुविहार मध्ये नाही तरी याच्या जाणीवा एवढ्या व्यापक कशा ? पै पै साठी भाऊ बंधकी....संपत्तीसाठी व घरासाठी भाऊबंधकी सुधाकरभाऊ नी पण सोसासली होती.स्वतःच्या पैशातून त्यांनी बांधलेल्या राहत्या घरातून त्याच्या भावांनी त्याला बाहेर काढले होते.त्याच्या या विषारी अनुभवातून मात्र त्याच्या जाणीवा काही बोथट झाल्या नाहीत....
त्याची कृती ही त्याच्या नावा प्रमाणेच “सुधाकर” होती.
मी आईला विचारले सुधाकरचा अर्थ काय..... “अमृत”
सुधाकर मामाकडून गळ्यात हार घालून घेताना शिशुविहार मधील आपल्या लेकरांची चेहरे अमृतपान करतो आहेत अशीच खुलली होती. त्यांच्यासाठी साखरेची ती गाठी अमृता सारखीच गोड होती न....
मी मात्र सुधाकर भाऊच्या तृप्त चेहऱ्याकडे पाहून माझी तहान पण भागून घेत होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा