अंबाजोगाईच्या संगणक विश्वातील एक विश्वास ...मयूर
आपल्या कर्तृत्वाने प्रचंड कष्टाने बनवलेलं आपलं व्यक्तिमत्त्व आणि त्याच्या जोरावर आपली स्वतःची समाज मनावर छाप पाडणाऱ्या व्यक्ती मला खूप आवडतात. वडिलोपार्जित वारसा असणाऱ्या लोकांच्या मध्ये असणारा दर्प या पेक्षा शून्यातून विश्व निर्माण करणारे हे लोक एका ध्यासाने झपाटलेले असतात. वस्तीवरील मुलांना अशा व्यक्तींना भेटवायला मला खूप आवडते. दिवाळीत आपण सगळेच त्यांच्यासाठी खूप काही करतो पण या 67 मुलांनी भेटायला आलेल्या अशा खास व्यक्तींचा ध्यास आत्मसाथ केला तर सर्वात मोठे यश असेल. बाकी शिकणे,मजा करणे आणि बालपण जोपासणे हे तर चालूच असते.
या दिवाळीत कुणाला घेऊन जायचे मुलांना भेटायला हे खूप दिवसांच्या पासून ठरवत होतो. पण काही केल्या मी यशस्वी होत नव्हतो. याच काळात मी एक अत्याधुनिक संगणक घेण्याच्या विचारात होतो. तो माझ्या 48 अभियांत्रिकी महाविद्यालयातील मित्रांची मला भेट होता. त्यामुळे तो खासचं होता माझ्यासाठी. मला संगणक अंबाजोगाईतील व्यक्तीकडून हवा होता. हे माझे पक्के होते. माझा अभ्यास बऱ्यापैकी झाला होता. मी सर्व दुकाने पालथी घातली खूप वेळ दिला. पण मला नीट समजून सांगणारे आणि योग्य त्याही पेक्षा तातडीने प्रतिसाद देणारे कुणीच भेटत नव्हते. शेवटचा प्रयत्न म्हणून मी मयूर कर्वाला फोन लावला. त्यानंतर पुढील 10 दिवस आम्ही मला पाहिजे तसा संगणक मिळवण्याच्या मागे लागलो. मी दररोज नवीन काही समजून घेत होतो आणि त्यातून माझ्या अपेक्षा अजून वाढत होत्या. पहिल्यांदा प्रत्यक्ष नंतर फोनवर आणि त्यानंतर whatsapp वर माझं आणि मयूरचे संवाद सुरू झाले. यासर्व प्रक्रियेत मयूर न थकला न त्याने टोलवा टोलव केली आणि शेवटी त्याच्या आणि माझ्या मंथनातून एक संगणक आम्ही निश्चित केला. एकूण सर्व प्रक्रियेत मजा आली.
मयूर ज्ञान प्रबोधिनीचा विद्यार्थी. घरची परिस्थिती फारच बेताची अगदीच अवघड. वडिलांचा छोटा व्यवसाय होता आणि खर्च कमाई पेक्षा जास्त. छोट्या मयूर मध्ये लहानपणा पासून व्यवसाय करण्याचा ध्यास होता. वेळप्रसंगी तो शाळा बुडवायचा आणि वडिलांच्या दुकानावर बसायचा. शालेय शिक्षण पूर्ण झालं बारावीला बरे मार्क्स पडले आणि मयूरचा नंबर अभियांत्रिकी महाविद्यालयात लागला. परिस्थिती खूप बेताचीच होती. मयूर संभाजीनगरला गेला व शिकणे सुरू झाले. पण महाविद्यालयाची फिस काही भरता आली नाही आणि मयूरला परत यावे लागले. कठीण प्रसंग होता. पण तो तसा खटपट्या होत्या तसा चिकित्सक पण. कोणतेही यंत्र उघणे आणि ते समजून घेऊन परत बसवणे हा त्याचा छंद. यातून तो मोलाची गोष्ट शिकला ती म्हणजे ज्याला यंत्र आत्मविश्वासाने उघडता येते व परत जोडता येते त्याला ते यंत्र दुरुस्त करता येते. यातून तो यंत्र दुरुस्तीत पारंगत झाला. काही गोष्टी त्याला जमू लागल्या पण संगणकासारखे आधुनिक यंत्र समजून घेणे अवघड आणि हे कळल्यावर त्याने स्वतःच संगणक दुरुस्ती सुरू केली. सुरुवातीला तो संगणक लातूरला घेऊन जायचा. तिथे दुरुस्त करायचा आणि अंबाजोगाई येऊन तो परत करायचा. यात तो कमालीचे शिकला. महाविद्यालयात तो वाणिज्य शाखेत होता मात्र स्वतःच्या जगण्यात तो संगणक तज्ञ बनत होता.
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तींचे त्यांच्या अनुभवातून एक व्यवसायाचे एक तत्वज्ञान बनते. तसेच मयूरचे तीन तत्व पक्की झाली. १) खोटे कधी बोलायचे नाही.२) संगणकातील जे खराब झाले आहे त्याचीच फक्त दुरुस्ती करायची बनवाबनवी करायची नाही. ३) ग्राहकांशी प्रामाणिक राहायचं. खराब झालेला पार्ट परत द्यायचा.आपल्या तत्वांशी मयूर खूप प्रामाणिक आहे कारण ती तत्वे त्यांनी स्वतः स्वतःच्यासाठी ठरवली आहेत.नकळत ती त्याची जीवन मूल्येच झाली आहे.
कुठलेही फॉर्मल शिक्षण संगणकाचे नसताना अंबाजोगाई तच नव्हे तर अगदीच महानगरात पण त्याने आपली ओळख निर्माण केली आहे. तत्पर सेवा, चोख व्यवहार आणि संगणक क्षेत्राचा अगदीच परीपूर्ण अभ्यास याच्या जोरावर मयूर आज अंबाजोगाईच्या संगणक विश्वातील एक विश्वास झाला आहे. आज ही सर्व रोजची कामे झाल्यावर आपले ज्ञान ताजे ठेवण्यासाठी तो काही तास अभ्यास करतो. अंबाजोगाईतील सर्व शैक्षणिक संस्था,सरकारी, इतर कार्यालयं,व्यापारी आणि डॉक्टर यांच्यासाठी कृष्णा कॉम्पुटर अँड सर्व्हिसेस हे खात्रीचे ठिकाण आहे. मध्यंतरी मयूरच्या वडिलांचा मृत्य झाला. मोठा आधार गेला. पण आता लाला शर्मा त्याच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करतोय. असा ध्यासाने व्यवसाय करणाऱ्या मयूर वस्तीवरील मुलांशी बोलताना मात्र खूप भावून झाला. त्याचा आदर्श फक्त मुलांच्यासाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठी पण आहे. मयूरशी जरूर बोला. त्याला फोन करा. त्याला नक्कीच प्रेरणा मिळेल.
मयूर कर्वा :- 758 805 7085

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा