रविवार, २ नोव्हेंबर, २०२५

अंबाजोगाईचा King ऑफ Fitness ...कृष्णा !!

 अंबाजोगाईचा King ऑफ Fitness ...कृष्णा !!

कृष्णा अरुण पुजारी नाव वाचले तर नावात एक जोर आहे. अरुण पुजारी अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष. त्यांचा हा मुलगा. अरुण पुजारी यांचे नाव काढल्यास या कृष्णात खरंच काही दम आहे का हे समजून घेण्यात मला स्वारस्य होते. तसा तो ज्ञान प्रबोधिनीचा पालक आणि आमच्या गुड मॉर्निंग ग्रुपचा सदस्य. ग्राउंडवर सर्वात शेवटी येणारा सदस्य. सर्वांना हसत गुड मॉर्निंग करत सोबतच्या लोकांशी हसत,गप्पा मारत,किस्से आणि गोष्टी सांगत अगदीच रमतगमत ट्रॅक वर चालणारा हा आमचा छोटा दोस्त. पाहता क्षणी पहिलवान वाटावा अशी त्याची देहयष्टी. हळूहळू आमची दोस्ती होत गेली. त्याच्या गोष्टी सांगण्याचा अंदाज फारच भारी एकदम चांगल्या गुरुजींना लाजवणारा. तो अनेक गोष्टी सांगायचा. एक दिवस मी त्याला त्याचीच गोष्ट विचारली आणि महाराज बोलते झाले.
कृष्णाला लहानपणा पासून व्यायामाची आवड. त्याच्या घरा जवळील बाईच्या वाड्यात तो व्यायाम करायचा. झाडांना दोऱ्या बांधून एक सिंगल बार केला होता. पोत्यात माती भरून त्यावर मुष्टि प्रहार तो करायचा असे नानाविध प्रकार त्याचे चालायचे. सोबत काही मित्र. तो व्यायामाने झपाटून गेला होता.

वाढदिवसाच्या दिवशी अरुणमामांनी त्याला विचारले तुला काय हवे आहे. महाराजांचे उत्तर तयारच होते. दहा हजार रुपये आणि ते कशाला तर जिम सुरू करायला. शेवटी देवीच्या मंदिराच्या जवळील एक हॉल स्वच्छ करून त्यात कृष्णांची पहिली जिम सुरू झाली. तो व्यायाम करतो हे पाहून अनेक जण येऊ लागले. पुढे इतके लोक आले की त्याचे व्यवस्थापन करणे कृष्णाला जमेना. त्यात साहित्य कमी असल्याने पोरांची भांडणे. अवघड होते सारं.

एकीकडे व्यायाम सुरू होता तर दुसरीकडे महाविद्यालयात शिक्षण. फार्मसी मधील पदविका अभ्यासक्रम तो करत होता.याच काळात अरुणमामाचा दुर्दैवी मृत्य झाला. यापुढे काय करायचे हा कृष्णांच्या समोरील मोठा प्रश्न होता. शिक्षण पूर्ण झाले आणि त्याला कोणी कामावरच ठेवेना. आता काय करायचे. कृष्णा जेवढा नटखट तेवढाच धडपड्या. तो स्वस्थ बसणाऱ्यातील नव्हता. त्याने त्याचा पहिला व्यवसाय सुरू केला योगेश्वरी शाळेच्या जवळ चॉकलेट विकायचा. माजी नगराध्यक्षाचा मुलगा चॉकलेट विकतो हे पाहणे आपल्याला अवघड पण कृष्णा स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होता. हैद्राबादहुन चॉकलेट आणायचे आणि ते विकायचे. व्यवसाय नफ्यात होता. मग किचेन विकणे सुरू झाले. हसत प्रेमाने आणि आपुलकीने बोलणाऱ्या कृष्णांचा माल चांगलाच खपू लागला. यातील नफयातून त्याने STD PCO सुरू केले. पुढे जूसबार आणि रसवंती. यासर्वातून तो व्यवसायाचे खाच खळगे शिकत होता. हिशोब करायला शिकला. नफ्या नुकसानीचे गणिते शिकला. सगळ्यात महत्वाचे न लाजता प्रचंड मेहनत करायला शिकला. त्याच्या अंतर्मनातून जिम हा विषय मात्र सुटला नव्हता. आलेल्या पुंजीतून त्याने लातूरची एक जिम विकत घेतली आणि ते साहित्य आणून देवीच्या मंदिराच्या पाठीमागे हिंदकेसरी जिम सुरू केली. पाहता पाहता सभासद वाढत गेले. प्रचंड प्रतिसाद होता. आता तो कृष्णाचा गुरुजी झाला. व्यायाम शाळेतील सर्व जण कृष्णाला भेटल्यावर प्रणाम गुरुजी म्हणायला लागले. आजही ग्राऊंडवर प्रणाम गुरुजी म्हणणारे आम्हाला भेटतात. आवडीचा व्यवसाय सुरू केला पण जे शिकलो त्याचे काय ? कोणी दुकानात नौकरी मात्र हया पहिलवानाला देत नव्हते.

डॉ नयना शिरसट अंबाजोगाईतील प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ. अंबाजोगाईच्या पंचक्रोशीत त्यांची प्रॅक्टिस खूप जोरात चालू होती. त्या एकेदिवशी देवीच्या दर्शनाला आल्या. नवरात्र चालू होते. प्रचंड गर्दी. कृष्णाने त्यांना पाहिले आणि ओळखले. त्यांच्या जवळ जाऊन त्याने विचारले आपल्याला दर्शन करायचे आहे का ? अर्थातच त्यासाठी त्या आल्या होत्या. गुरुजींनी त्यांना व्यवस्थित दर्शन घडवले. मॅडमनी त्याला नाव विचारले. काय शिकला हे विचारले. आमच्याकडचे दुकान चालवतोस का हे पण विचारले. कृष्णा खुश आनंद गगनात मावेना. योगेश्वरी देवीची कृपा झाली होती. दुसऱ्या दिवशी कृष्णाला भेटायला बोलावले आणि कृष्णाचे पाहिले मेडिकलचे दुकान सुरू झाले. सगळं काही जीव ओतून करायचे हे कृष्णाकडून शिकावे. सकाळी आठ ते रात्री कितीही वाजेपर्यंत कृष्णा दुकानातच. त्याने पैशांच्या सोबत नाव पण कमावले. त्याचे जामीनदार होते नंदकिशोर मुंदडा. दहा वर्षाच्या नंतर तो त्यांना भेटला व धन्यवाद म्हणून म्हणाला बघा मी असे एकही कृत्य नाही केले की ज्याने माझी तक्रार तुमच्याकडे येईल. त्यानंतर अजून एक दुकान व ते डॉ. विनोद जोशींच्या बरोबर. खूप विश्वासाने डॉ जोशींनी कृष्णांला दुकान चालवायला दिले. कृष्णांची सचोटी आणि धडपड त्यांना माहित होती. नंतर चक्क होलसेलचे दुकान पण सुरू झाले. कृष्णा चॉकलेटवाला ते गुरुजी ते कृष्णासेठ हा प्रवास तसा अवघडच होता.

कृष्णासेठ झाला तरी त्याने त्याच्यातील गुरुजी मरू दिला नव्हता. हिंद केसरी बंद पडली पण त्याच्या मनात ती अजून जिवंत होती. अंबाजोगाईतील मोहन टॉकीजचे नवीन बांधकाम सुरू झाले होते. तिसरा मजला सुरू झाला. अगदीच नगरपालिकेच्या समोर मध्यवर्ती जागा. कृष्णा दररोज तिथे जायचा. दररोज येणारा कृष्णाला पाहून मालकांनी विचारले तू दररोज इथे का येतोस. मला इथे जिम सुरू करायची आहे. मालक अवाक. अजून बांधकाम बाकी आहे आणि आमच्या मनात आम्हीच जिम सुरू करण्याचे आहे. लगेच कृष्णाने प्रस्ताव दिला तुमच्या सोबत भागीदारीत सुरू करू तुम्ही नफ्यात 50 % हिस्सेदार !! प्रस्ताव भारी होता. हजरजबाबी कृष्णाने पहिली लढाई जिंकली. यासोबतच त्याच्या आयुष्यात सर्वात मोठी साथ मिळाली ते गिरीश हजारीची. दोघे खूप चांगले मित्र बनले. डॉ जोशी आणि गिरीश हजारी सारखे साथीदार कृष्णांला मिळाले ही त्याची खरी कमाई होती. आपली सर्व कमाई त्याने जिमच्या साहित्यासाठी वापरली. देशभर फिरून त्याने एका पेक्षा एक चांगल्या आणि आधुनिक जिम पहिल्या. सर्वांतील चांगल्या गोष्टी घेतल्या आणि मोहन कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर अंबाजोगाईतील पहिली अत्याधुनिक जिम सुरू झाली. Krishna नावाने ती सुरू करावी असा मानस होता पण त्याने स्वतःला आवर घातला. King Fitness नावाने ती सुरू झाली. काही दिवसात मेंबर फुल झाले. वर्षभर सारेच मस्त होते आणि नंतर कोविडची महामारी सुरू झाली. पण पहिल्या वर्षातील कमाईने हिशोब चुकता झाला होता. दररोजचा चॉकलेटचा हिशोब ते King Fitnessचा हिशोब यात मात्र कृष्णा King राहिला. त्याने काही वर्षातच आपली दुसरी शाखा मोरेवाडीत सुरू केली.

त्यांपुढे अमृतुल्यचहा आणि उडपी आणि परळीला kekiz असा व्याप पण कृष्णांचा वाढला. आज सगळे वळून बघताना सहज वाटून गेलं. जिथे कुठे अरुणमामा असतील तेथून अंबाजोगाईच्या या King ऑफ Fitness ची घोडदौड पाहताना त्यांचा उर अभिमानाने भरून आलेला असेल. अजूनही कृष्णाची सकाळ लाल मातीच्या योगेश्वरी मैदानातून होते आणि नंतर तो दीडतास आपली जिम मध्ये घाम गाळतो. कृष्णा आज सुद्धा यारोंका यार है !! जरूर त्याच्याशी बोला !!
कृष्णा पुजारी :- 9405833333

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: