रविवार, २ नोव्हेंबर, २०२५

आकाशाला गवसणी घालण्याची आस असणारे... पाटील !!

 आकाशाला गवसणी घालण्याची आस असणारे... पाटील !!

लोमटे आणि अंबाजोगाईतील नाव ऐकताच लोकांचा काळजीपूर्वक व्यवहार व्हायला सुरुवात होते. माझं लहानपण सगळं लोमटेंच्या सोबतच गेलं त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. अंबाजोगाईत दोन ठिकाणी लोमटे कुटुंब राहतात. एक गौड गल्ली आणि दुसरे खडकपुरा. राजकारण आणि भांडण नसानसात भिनलेलं असे म्हंटल्यास वावगे होणार नाही. आमच्या गुडमॉर्निंग ग्रुपचा कॅप्टन पण महेश लोमटे. तो तसा खूप मितभाषी सकाळी सगळ्यात पहिल्यांदा आम्हा 50 च्या वर लोकांना फोन येणार तो महेशकाकाचा. मैदानावर सर्वांनी यावं यासाठी त्याचे प्रयत्न खूप चालू असतात. तर सगळे मैदान ओस पडायले की एक धूमकेतू प्रगट होतो. त्याच्या आवाजाने मैदान भरून जाते. आले पाटील आले म्हणत सर्वजण एकमेकांना सांगतात. मग व्यायाम करत गप्पांची मैफिल रंगते पाटील शंभर जोर काढतात. सगळा व्यायाम संपला की पाटलांचा आग्रह असतो चहा प्यायला चला. अगदी माझ्या सगट हंसराज देशमुख सारखे शिस्तबद्ध आयुष्य जगणारे लोक पाटलांच्या प्रेमळ आग्रहाला बळी पडतात. असे काही दिवस चालते आणि पाटील अचानक गायब होतात. आम्ही नेहमीसारखे आमचे रस्ते आणि वेळा पाळतो व घरी जातो. परत काही दिवसांनी पाटील हजर परत मैफिल परत चहा परत गप्पा....

मला या पाटलांच्या बाबत भारीच कुतूहल निर्माण झालं. माझी व गणेश लोमटे ( पाटील ) यांची ओळख खूप जुनी. तो MPSC चा अभ्यास करत होता त्यावेळी पासून. प्रबोधिनीशी त्याचे विशेष नाते. मध्यंतरी गणेश सिमेंट चे दुकान चालवत होता आणि प्रबोधिनीच्या विवेकवाडीचे बांधकाम सुरू झालेले. थोडं फार बोलणं व्हायचे. पण अचानक दुकान बंद आणि साहेब गायब ते थेट मला भेटले मैदानावर !! आमची मॉर्निंग गुड करणारे पाटील काय करतात हे समजून घ्यावे म्हणून त्याला मी माझ्यासोबत राऊंड मारायला घेतले आणि त्याने स्वतःच्या भोवती प्रदक्षिणा मारत मारत गेल्या अनेक वर्षांच्या सूर्य प्रदक्षिणेचा प्रवास एकदम खुलेआम सांगितला.

गणेशचे वडील डॉ सुभाष लोमटे रेकॉर्ड टाइम मध्ये विज्ञान विषयात Phd करणारे व माजलगावच्या मोठ्या महाविद्यालयात प्राचार्य तसे ते मराठवाड्याला परिचित व्यक्तिमत्त्व. गणेश लहानपणी म्हणजे तिसरी पर्यँत अंबाजोगाई आपल्या आजी आजोबांच्या सोबतच राहत होता. तिसरीत असताना त्याने एक कांड ( पाटलांच्या भाषेत ) केलं. महाराज व त्यांचे मित्र खेळत खेळत अंबाजोगाईच्या बाहेर असणाऱ्या नागझरीला गेले. इकडे घरी शोधाशोध सुरू. सगळेच परेशान. अनोळखी रस्त्याने बिनधास्त जाणे हे बहुतेक गणेशच्या रक्तातच आहे. पण यामुळे त्यांची रवानगी झाली माजलगावला थेट वडिलांच्या सोबत. शाळा सिद्धेश्वर विद्यालय शिस्त आणि संस्कार याचा चांगलाच ठेवा. चक्क 12 वी पर्यँत गणेश माजलगावला होता. याच काळात त्याचा संपर्क RSS शी आला. लोमटे आणि RSS गणित चुकतंय असे मला वाटले. पण हे साहेब नुसते शाखेवरच गेले नाहीत तर शाखेचे कार्यवाह पण झाले अनेक शिबिरं पण केली. संघ प्रचारक सहस्त्रबुद्धे यांच्या सोबत ते सतत असायचे. बारावी झाली आणि अचानक वेगळीच वाट थेट नाट्यशास्त्र विभागात प्रवेश. बहुदा लोमटेंच्या मध्ये नाट्यशास्त्र शिकणारे ते पहिलेच असावेत. यासोबतच होते राजकारण आता मात्र NSUI एकदम भिन्न मार्ग. महाविद्यालयाचा गणेश विद्यापीठ प्रतिनिधी झाला.राजकारणाचे बाळकडू त्याला होतेच पण नाट्यशास्त्र आणि वक्तृत्व यात त्याची हुकूमत मिळवण्यास सुरुवात झाली. नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख केशवराव देशपांडे यांचा तो पट्ट शिष्य झाला. असा एकही दिवस नसेल की गणेश अंबाजोगाईत आहे आणि तो केशवसरांना भेटला नाही गप्पा गोष्टी झाल्या नाहीत. याच काळात भागवत मसने महाविद्यालयात प्राध्यापक होते. गणेश आणि ते चहा पिण्यासाठी कँटीनला गेले विषय होता राजकारण. पहाडी आवाजात आणि आवेशात गणेश आपली मुद्दे प्रभावीपणे मांडत होता. सरांनी त्यातील स्पार्क ओळखला आणि त्याला अगदीच बळजबरीने वक्तृत्वकला पारंगत करण्यात तयार केले. सहज काही करतील ते लोमटे कसे !! आता सुरू झाला स्पर्धा, युथ फेस्टिवल, नाट्यस्पर्धा,एकांकिका स्पर्धा गाजवण्याची मोहिम. त्याच्या आयुष्याचा हा एक वेगळाच श्रीगणेशा होता.

पाटलांनी कॉलेज खूप गाजवले आता त्यांना अंबाजोगाईचे क्षितिज अपुरे वाटू लागले. ते निघाले पुण्याला. त्यांचे स्वप्न होते प्रशासकीय अधिकारी बनण्याचे. अभ्यासाला सुरुवात झाली. चौफर वाचन सुरू झाले. वैचारिक जडणघडण होऊ लागली. नकळत जीवनभर अविवाहित राहण्याचा विचार मनात घोळू लागला. हे सगळेच अनाकलनीय होते.तगडा अभ्यास झाला. वैचारिक बैठक पक्की झाली. प्रचंड वाचण आणि अभ्यासाचा व्यासंग वाढला. फक्त एकच गोष्ट घडली ती म्हणजे MPSC च्या परीक्षेत यश काही मिळाले नाही. घरून काही तरी पोटापाण्याचे करावे म्हणून सुचवले जाऊ लागले. मुक्त विहार करत क्षितिजे पादाक्रांत करणाऱ्या गणेशला अंबाजोगाईला परतावे लागेल आणि चक्क एक सिमेंटचे दुकान सुरू करावे लागले. पर्याय नव्हता पण मनात प्रचंड अस्वस्थता होती. सतत नाविन्याची आस असणाऱ्या व्यक्तीला पिंजऱ्यात कोंडावे तसेच काही झाले होते. परिणाम व्हायचा तो झाला. दुकानावर दहा लाखांच्या वर कर्ज झाले. मला जे काही करायचे ते हे नाही हे मनातून पक्के होऊ लागले.

आणि एक दिवस आला सर्व काही सोडून गणेश गेला मुंबईच्या काँग्रेस भवनात तिथे काम करायला. त्याचे खरे तर आदर्श होते प्रमोद महाजन पण त्याने काँग्रेसचा मार्ग निवडला. सोबत काहीच नव्हते फक्त जबर इच्छा शक्ती होती. काही तरी करण्याची उर्मी होती. वेळ पडली तर फुटपाथवर झोपण्याची तयारी होती. असा आशावाद फार कमी जणांना असतो त्यातील गणेश एक. 2009च्या काँग्रेसचा प्रचार करण्याचा त्यांचा मानस होता.काँग्रेस भवनात भेट झाली बाळासाहेब विखे पाटील,माणिकराव ठाकरे,मोहन जोशी व सुशील शुक्ल यांची. फार मजेदार प्रसंग घडला ते सगळेच गुरुदास कामतचा प्रचार करण्यासाठी जाणार होते सोबत गणेशला घेऊन गेले. प्रचार सभेच्या मध्यंतरात त्यांनी चक्क गणेशला भाषण करायला सांगितले. हे सगळेच खूप अनपेक्षित घडत होते. संकटाला संधीत रूपांतर करण्याची वेळ होती आणि पाटलांनी ती केली. जोरदार भाषण झाले. पाटलांच्या मधील स्पार्क दिग्गजांनी ओळखला आता सुरू झाली घोडदौड. विलासराव देशमुखांना ते भेटले पूर्ण तयारीनिशी. साहेब एकदम खुश झाले. तसं याच काळात त्यांना दिल्लीला येण्याचे आमंत्रण पण मिळाले होते पण विलासरावांच्या सुचनेनुसार महाराष्ट्रात राहायचे ठरले आणि ते महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कोअर प्रचार यंत्रणेचा ते भाग बनले. पूर्ण महाराष्ट्र पिंजून झाला. जोरदार मुसंडी मारली होती. स्वतःच्या कोअर स्ट्रेंथ पाटलांना कळल्या होत्या. परंतु एक पण होत्या. डोक्यावरची लाखांचे कर्ज. ते घेऊन जगणे त्यांच्या आत्मसन्मानाला पटत नव्हते.

आणि वेगळी वाट निवडण्याचा निर्णय झाला. भाषण कला शिकाव्यण्याच्या पुण्याच्या वर्गात असताना त्यातील स्कोप समजला होता. पहिली 30ची बॅच सुरू करण्याचे ठरले. मज ध्येय गवसले हो असेही काही झाले आणि त्यातून ऑर्किड HRD ट्रेनिंग याचा जन्म झाला. यातून भाषण कला,नेतृत्व कौशल्य आणि राजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांच्यासाठी राजकीय नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. अथक प्रयत्न,जिद्द आणि ध्यास याच्या पुढे यश वाकून उभे असते हे पाटलांनी सिद्ध केले आणि महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली पर्यँत प्रशिक्षण वर्ग झाले. आता लाखाच्या कर्जाची भीती नव्हती आता लक्ष्मी सरस्वतीने प्रसन्न केली होती. कोण बनेगा करोडपती हे स्वप्न प्रत्यक्षात आले. काही हजारांच्या वर प्रशिक्षणे झाली आणि त्यातून अगदी मंत्री पातळीवरचे नेतृत्व उभे राहिले. जे सर्व होत असताना त्यांची लाल मातीशी आणि अंबाजोगाईशी असलेली नाळ मात्र तुटली नव्हती. शनिवार रविवार वर्ग घेण्यासाठी धूमकेतू गायब होतो आणि काही दिवसांनी परत मैदानात प्रगट होतो ह्याचे आकलन मला झाले.

सर्वांनाच घरात बंदी होण्याचे दिवस आले. कोविडचे संकट समोर. आता पाटलांनी यासंकटाला संधीत रूपांतर केले आणि आपल्या सर्व संचिताचा निचोड असणारे पुस्तक त्यांनी लिहून काढले. राजकारणात यशस्वी होण्यासाठी ....राजकीय नेतृत्व कौशल्य !! पुस्तक मराठी व हिंदी भाषेत आले. मराठी पेक्षा हिंदी प्रति जास्त विकल्या गेल्या बाकी लाखाची उलाढाल ही गौण गोष्ट !!
आकाशाला गवसणी घालणाऱ्या व्यक्तीला भौगोलिक सीमा नसतात आणि एकाच क्षेत्रात ते स्वतःला बांधत नाहीत. गणेश लोमटेंच्या अफाट कल्पकतेतून अजून काय धूमकेतूसारखे प्रगटेल याची वाटच पाहावी लागेल !!
गणेश लोमटे पाटील :- 94231 68252

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: