गेली काही वर्षे महाविद्यालयात जाण्याचा योग फारसा आलेला नाही. त्यामुळे कोविड नंतरची महाविद्यालय आणि त्यांची झालेली वाताहत आपल्याला पाहवणार नाही म्हणून फारसा प्रयत्न पण केला नाही. आमच्या गुड मॉर्निंग ग्रुपचे डॉ कल्याण सावंतसरांनी मला तीन महिने आधी बजावून सांगितले की माझ्या महाविद्यालयात तुम्हाला यावच लागणार आहे. सावंतसर तसा उमदा माणूस. ज्ञान प्रबोधिनीचे पालक त्यामुळे अजून जवळीक. उंचापुरा,तगडा आमच्या ग्राऊंडवर उठून दिसणारा हा तरुण. चुकून सुद्धा कधी ते ग्राऊंडवर यायचे विसरत नाहीत.
दिवस 24 सप्टेंबर सकाळी 9 वाजता मी आढेवेढे घेत सरांच्या बरोबर जायला तयार झालो. प्रवासात माझे पुराण संपले आणि सरांच्या बाबत जाणून घेऊ लागलो. सर धारूरचे. दहावी पर्यँतचे शिक्षण तिथे झाले आणि मग अंबाजोगाई. इथून त्यांची घोडदौड सुरू झाली ती थांबली Phd करूनच. उच्च शिक्षणातील सर्व परीक्षा पहिल्या दमात पास. अभ्यासाच्या शिवाय महाविद्यालयातील सर्वच क्षेत्रात त्यांनी उतुंग भरारी घेतली. NSS आणि NCC तर जीव की प्राण.
महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर प्राध्यापक होणायचे स्वप्न काही दिवसातच पूर्ण आणि तेही देवगिरी महाविद्यालयात. एक जबरदस्त कॉलेज. काही दिवस सरांनी काम केलं आणि त्यांना हाक आली एका अशा महाविद्यालयाची की जिथे वरिष्ठ महाविद्यालयात शिकण्यासाठी बाहेरच्या राज्यातून मुलं येतात. कॉलेज सगळ्यात टॉपचे. अगदी प्राध्यापकांच्या नियुक्तीची कोटी रुपयांची उलाढाल सर्वत्र चालू आहे. या महाविद्यालयात मात्र एक नया पैसा पण नियुक्तीसाठी घेतला जात नाही. सरांची मुलाखत झाली. भरपूर स्पर्धा होती. बाहेर आल्यावर मित्रांनी विचारले कशी झाली मुलाखत ? " जर महाविद्यालयाचे आधीच कुणाला घायचे ठरले नसेल तर माझी निवड पक्की !! " काय जबरदस्त आत्मविश्वास !! आणि आत्मविश्वास निवडला गेला.
मी आणि सर कॉलेजमध्ये पोहनचलो. कॉलेज एकदम मुलांनी गजबजलेलं. जिकडे पाहावे तिकडे विद्यार्थी. सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यँत विद्यार्थी महाविद्यालयात त्यानंतर शेवटी मुलांना हकलावे लागते. प्रत्येक महाविद्यालयाचे चैतन्य म्हणजे विद्यार्थी. आज तेच लोप पावत आहे. मुलांनी बहरलेलं महाविद्यालय मी कित्येक वर्षात पहिल्यांदाच पहात होतो. मला एकदम उभारी आली. सर NSS विभागाचे प्रमुख. त्यांनी खास करून हा विभाग मागून घेतलेला. अतिशय चोख आर्थिक व्यवहार आणि वर्षाच्या शेवटी काही तूट आली तर प्राध्यापक ती भरून काढतात हे एक नवलच. NSS विभाग पण विद्यार्थ्यांनी भरून गेला होता. आम्ही येण्याच्या आधीच विद्यार्थ्यांनी सर्व तयारी करून ठेवली होती. आज NSSचा स्थापना दिवस आणि माझे ग्रामीण भागातील अनुभव कथन असा योग् होता. मी महाविद्यालयात गेल्यावर पहिल्यांदा स्वच्छता गृहात जातो. विशेष करून विद्यार्थी जे वापरात ते !! त्यावरून बरेच काही कळते. मी इथे मात्र अचंबित झालो. अगदी इस्रायल मधील विश्व महाविद्यालयातील स्वच्छता गृह पण या पेक्षा स्वच्छ नव्हती. बदाम,नाव,चित्र आणि शिव्या तर दूरच.
कार्यक्रम सुरू झाला आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती चिक्कार अगदी पाचशेच्या वर. प्राचार्य चक्क आपल्या तासावर होते म्हणून थोडे उशिरा आले. सोबत उपप्राचार्य होते. कार्यक्रम जोरदार झाला. मला तर बोलताना प्रचंड ऊर्जा मिळाली. कार्यक्रम संपेपर्यंत कोणताही विद्यार्थी जागचा उठला नाही. NSS च्या कॅम्प मध्ये पूर्ण 9 दिवस 50च्या वर विद्यार्थिनी निवासी असतात. त्याच सोबत विभाग प्रमुख. सावंतसरांना तर राज्य शासनाचा उत्कृष्ट प्रकल्प अधिकारी म्हणून पुरस्कार मिळलेला आहे. गेले कित्येक वर्षे ते ही आघाडी तर सांभाळत आहेतच पण सकाळी 8 ते रात्री 8 असे महाविद्यालयात ते नियमित असतात. रजा नावाची भानगड नाही. याशिवाय Phd च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. बाकी पडेल ते काम !! कशाला नाहीच नाही. कार्यक्रम संपल्यावर आम्ही प्राचार्यांच्या सोबत गेलो. त्यांनी प्रेमाचा आग्रह केला आपल्या कँटीन मध्ये जेवून जा !! कुठल्या हॉटेल मध्ये नाही ह !! आणि जेवण अल्पोपहार नाही. तसा दिवसभर मी महाविद्यालयातच थांबणार होतो. मग उपप्राचार्यांना भेटायला गेलो. मस्त नितळ माणूस. एका प्रथम वर्षाच्या मुलाला त्यांनी चक्क अर्धातास समुपदेशन केले. प्रचंड काम असताना पण मुलांना इतका वेळ देणारे प्राचार्य आणि उपप्राचार्य मी पहिल्यांदा पहात होतो. कँटीन मधील जेवण अप्रतिम होते. मी तसा भोजन आणि चव बहाद्दर !! कमालीची चव अन्नाला. महाविद्यालयातील प्राध्यापक कँटीनची देखरेख करतात. कंत्राटदार नाही !!
विशेष म्हणजे हे महाविद्यालय कोण्या एका विचाराचे नाही. सगळ्यांना प्रवेश आहे. नाही तर मला अंबाजोगाईत आज काल ही वैचारिक अस्पृश्यता खूप जाणवते. हे सर्व अनुभवताना मला एक मात्र कमालीचे जाणवत होते की डॉ कल्याण सावंतसरांच्या बाबतीत. विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राचार्य यांना कमालीचा आदर आहे. आमच्या अंबाजोगाईच्या बहाद्दराने महाविद्यालय आपल्या कामाने जिंकले !! कमालीची गोष्ट अशी की सरांनी सांगितले तर वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी उठाबशा काढतो हे मला विद्यार्थ्यांनी सांगितले !!
आता या महाविद्यालयाच्या संस्थाचालकांच्या बाबत थोडं समजून घेतले पाहिजे. संस्थेचे सचिव 91 वर्षांचे तरुण. रोज महाविद्यालयात येतात. अगदी आठ तास. रिसर्च कमिटीची बैठक चालू होती. सचिव तिथे आले. त्यांना बैठकीची कल्पना नव्हती. सगळे प्राध्यापक उठून उभारले. सचिवसर एकदम म्हणाले मला माफ करा मी तुमच्या कामात व्यत्यय आणला. अगदी प्रामाणिक माफी मागून ते मागे वळले. आजचे संस्थाचालक हे संस्था मालक आणि राजे. भ्रष्ट्राचारी नसतील तर हुकूनशहा !! इथले सगळेच संस्थेचे पदाधिकारी संस्थेचे सेवक आहेत.मन भरून पावलं. शिक्षणाच्या पंढरीतून आमच्या कल्याण रुपी विठुरायाच्या सोबत परत अंबाजोगाईला निघालो.
महाविद्यालयाचे नाव मुद्दाम लिहिले नाही. आपण मला जरूर सांगा हे महाविद्यालय कोणते ? डॉ कल्याण सावंतसरांचा मोबाईल नंबर 94035 91841 जरूर फोन करा तुम्हाला नक्कीच एक छान मित्र मिळेल !!
डॉ कल्याण सावंत:- 94035 91841

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा