रविवार, २२ जानेवारी, २०१७

नोटा बदली बरोबर माणूस म्हणून आपली माणसं पण बदलू की यार आपण !!!

नोटा बदली बरोबर माणूस म्हणून आपली माणसं पण बदलू की यार आपण !!!ग्रामीण भागातील मुलांची “आरोग्य तपासणी व अभ्यास”  करण्यासाठी केज तालुक्यातील भाटूंबा गावात गेलो होतो. गावातील जिल्हा परिषदेची शाळा खुपच जुनी. मुलांचे व मुलींच्या हिमग्लोबिनची तपासणी आमची टीम करत होती. सहज बोलता बोलता शाळेतील शिक्षकांकडून कळले की शाळेत १८ पारध्यांची मुलं आहेत. त्यापेकी एकही जण आज शाळेत आला नव्हता.जवळच ते राहतात चार किलोमीटर वर.

पारधी म्हटल्या नंतर एकदम माझ्या मनात मी ऐकलेल्या गोष्टी चमकून गेल्या. वस्तीची चौकशी करायला सुरुवात केली. जाता येईल का तिथे विचारले.तिथे जाणे अवघड आहे. रस्ता नीट नाही. तुमची गाडी दिसली की पळून जातील. फारसे लोकात मिसळत नाहीत. शाळेतील शिक्षकांनी मला सांगितले. माझ्या मनात जाण्याची खूप तीव्र इच्छा होती.

“ तुमच्या ओळखीचे कुणी नाही का तिथे. किंवा तुम्हाला कुणी ओळखत नाहीत का ?”

“आज त्यांच्या पेकी कुणाचा एकही मुलगा आलेला नाही.”

शेवटी माझा फारच आग्रह आहे पाहिल्या नंतर मस्के मामा नावाच्या सेवकांना मला घेवून जाण्यास सांगितले. त्यांना पण नीट रस्ता माहित नव्हता. शाळेतील एका मुलाचे शेत पारध्यांच्या पालाजवळ होते. तो रस्ता सांगू लागला. त्याला पण सोबत घेवून आम्ही निघालो. एका वळणावर आल्यावर तो म्हणाला.

“एकून जाता येतंय पण रस्त्यात नाला हाय. गाडी जाईल का माहित नाय ..पण जवळचा रस्ताय ह्यो.”

अशोकनी त्या रस्त्यानेच नेण्याचे ठरवले. अरुंद रस्ता. बाजूनी कोरफडीची झाडे. आजूबाजूची हिरवी गार शेतं संपली व उजाड माळ लागला.

त्यो पहा पारधी....सोबतच्या मुलांनी मला दाखवले. लंगडत आपल्या शेळ्या राखणारा माणूस दिसला. त्याच्या सोबत एक मोठी मुलगी व दोन छोटे लेकर होते. मी गाडी थांबायला सांगितली. मस्केमामांनी त्यामुलीला विचारले शाळेत का नाही आलीस. ती काहीच बोलली नाही उलट दूर निघून गेली. तो लंगडणारा माणूस मात्र जवळ आला व त्या मुलीला त्यांच्या भाषेत बोलवू लागला. पण ती मुलगी काही जवळ येईना.

“लोक आहेत का वस्ती वर ?”

“नाही खूरपायला गेलीत.”

“किती घरं आहेत.”

“आठ”

आम्ही गाडी पुढे वस्तीकडे नेली. एका झोपडीच्या जवळ आलो. तिथे काही महिला व दोन पुरुष होती. त्यांच्यातील तरुण बाहेर आला. मी विचारल्यावर त्याने मला त्याचे नावं सांगितले. आनंदगावच्या गायराना वर ही वस्ती होती. हळूहळू सगळे आम्ही जसे मोकळेपणानी बोलायला लागलो तसे अवती भोवतीचे वातावरण बदलले. प्रचंड थंडीत कसे हे लोक अशा माळावर राहात असतील असा विचार करताच एक चिमुरडी माझ्या समोरून पळून गेली. लालसर मातीच्या रंगाचा चेहरा. नाकावर पांढरट ओघळणारा द्रव व काही ठिकाणी तो वाळल्यामुळे दिसणारे पांढरे पुट. केसावर चांगलाच मातीचा थर..अंगात एकही कपडा नाही अनेक दिवस आंघोळ केलीच नाही हे जाणवत होते. ...मी मात्र स्वेटर व कानटोपी घालून....पाहताच क्षणी लक्षात येत होतं लेकरांनां योग्य तो आहार मिळत नसणार.

तिची आई कोंबड्याच्या पिंजर्या  जवळ लवंडली होती. आई .... १६-१७ वर्षाची पोरगीचती. आम्ही गेल्यावर ती काही उठून बसली नाही. मी त्या लेकराला जवळ ये म्हणालो तो ते जास्त दूर जात होतं . हे पाहून तिची आई हसायला लागली. तुमच्या दोघींचा फोटो काढू म्हटल्या वर ती आई जाम लाजायला लागली. आणि पडल्या पडल्या लाजून तिने जवळची चादर आपल्या तोंडावर घेतली.

“या लेकराचे नावं काय ?”

“आरती ....” हे तर माझ्या बहिणीचे नाव.

मला एकदम लक्षात आले की सध्या मी प्रेमाने जवळ बाळगत असलेल्या पोलो मिंटच्या गोळ्या. मी गोळ्या काढल्या. काय जादू आहे की त्या गोळ्यात...पाहताच सगळी मुलं माझ्या जवळ यायला लागली. आरतीपण जवळ आली. पार वातावरण बदलून गेलं. सगळ्यांचा एक फोटो काढला.

“पोलीस त्रास देतात का रे ?”

“आता नाही देत ...आदी आम्ही लई दारू काढायचो त्यायेळी दयायची.”

“गावातली लोक”

“ते बि नाय..”

“या वस्तीचे नाव धारुका हाय ...इथला देव हाय तो.”
अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत होती व काही प्रश्न मनातल्या मनात तयार होत होती. इतक्या वर्षानंतर पण याचं जीवन असे का ? अनेक सरकारे, राज्यकर्ते, राजकारणी आली पण पारध्यांचे जीवन पार बदलून का नाही गेले? त्यांच्या बद्दलचा समाजाचा दृष्टीकोन का बदलत नाही ? न त्यांचा समाजाबद्दलचा ? मला आफ्रिकेत जायची फार इच्छा होती .....अतिमागास आयुष्य काय असते पाहण्यासाठी. आरतीला पाहताच मला तिच्यात आणि कुपोषित निग्रो मुलात काहीच फरक वाटला नाही.

कसे बदलणार हे सारे ? सरकार बदलू शकेल का ? राजकारणी बदलू शकतील का ? शासन बदलू शकेल का ? शिक्षण बदलू शकेल का ? ...पण हे सगळे पुरेसे नाही असे वाटत होते. माणसा मधील माणूस जागा झाला व माणूस नावाच्या आपल्याच सारख्या लोकांना प्रेमाने विकासाची मनोमन साद देत सगळ्यांच्या विकासासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले तर हे खरच अवघड आहे का ? अजून आपण सगळेच कमी पडतोय ? पारध्यांना आता घर बसल्या डिश मुळे मनोरंजन तर मिळतय. आकडे टाकून का होईना लाईट मिळतिये. पाणी व हाताला काम पण मिळतय. चोऱ्या पण सोडल्यात त्यांनी. पण अजूनही त्यांना जीवन मिळायचे बाकी आहे.

ती छोटी आरती आपली पोर आहे ...तिच्यासाठी आपणही काही केलं पाहिजे ....सहानभूतीने नाही तर कर्तव्य आणि आस्था म्हणून ही भावना आपल्या प्रत्येकात चिरकाल टिकणारी निर्माण कधी होणार ? अशा सगळ्याच आरतींचे भविष्य बदलायला फार वेळ लागणार नाही. नोटा बदली बरोबर माणूस म्हणून आपली माणसं पण बदलू की यार आपण !!!

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

ती तर आदितीचे प्रत्यक्ष रूप.

ती तर आदितीचे प्रत्यक्ष रूप.
ती तर आदितीचे प्रत्यक्ष रूप. अनेक आदित्यांची जननी होण्याची आदी शक्ती तिच्याठाई. तसेच ते मोहक व निरागर स्मित म्हणून ती स्मिता पण. लहानपणी तिच्या चेहऱ्यावरील हे स्मित हरवत गेले नात्यातील राहू केतूं मुळे. नियती नसतेच मुळी. लोकांची नियत बदलली की अनेकांचे भाग्य खोल अंधाऱ्या गर्तेत जाते. भय नावाचा आक्राळ विक्राळ दैत्याचे राज्य त्या कोवळ्या जीवाच्या मनोराज्यावर आरूढ होते व त्याच्या आजन्म कैद्येत ती हतबल होऊन कैद होते. तिच्या कधी कधी पडणाऱ्या काळ्यासावळ्या चेहऱ्या मागे अनेक आक्राळ विक्राळ आकारांच्या दैत्यरूपी मेघांचे भय दडलेले असते म्हणून काय तिचे नाव मेघा ठेवले होते की काय कोण जाणे. त्या अस्वस्थ करणाऱ्या भूतकाळा मुळे तिला मेघांनी आच्छादित आदित्य आवडत नसेल का ? तिला असणार आस मोकळ्या निळाशार आकाशाची. तिला नक्कीच भावणार न तो उषेच्या कुशीतून अंशा अंशाने अवतीर्ण होणारा हिरण्यगर्भ. तो तेजो निधी लोह तीव्र दाहक उष्णतेचा अधिकारी. प्रातकाळी क्षितिजावरून विस्तीर्ण निळाशार आकाशात सौम्य रुपाने हळूहळू प्रकाशमय वसुंधरा करण्यासाठी अवतरीत होत असेल त्यावेळी त्याच्या त्या सौम्य प्रकाशमयी रुपाने तिलाही नक्कीच माझ्या मनाच्या अंधारात पण असा सुर्यादय नक्कीच होईल ही आस असणार न? म्हणून तिला आवडतो स्वच्छ, सौम्य व निरभ्र सूर्य व आकाश.

नेत्रचक्षु बंद करून ती तो उगवता आदित्य पाहाण्याचा प्रत्यत्न करते त्यावेळी अनेक रंगाचे, रूपाचे, आकाराचे मेघरूपी भूतकाळातील विचार तिच्या नित्तळ, निर्मळ मनाच्या विस्तीर्ण आकशात अवतरीत होत असतील न ? ती खूप प्रयत्न करते त्या मेघांना दूर करण्याचा व उगवता आदित्य पाहण्याचा पण ते इतक्या लवकर शक्य आहे का ? वयाच्या चार वर्षापासून मनाला तीव्र वेदना देणाऱ्या शब्दांच्या व अनुभवांच्या वातावरणात ती जगायला शिकली.

प्रेमाच्या चंद्राचे स्वप्न पाहण्याचे पण तिचे वय नव्हते तो त्या अवनी एका चंद्राशीबद्ध केली गेली. ती पण नियतीने नाही तर नियत नसलेल्या अनेक राहू केतुनी....तिच्या निरभ्र, निर्मळ जगण्यास नित्याने भावबदलाचे मनोविश्व असणाऱ्या चंद्राचे तिचे नाते जोडले गेले. तो कधी तिच्या आयुष्यात सौम्य प्रकाशित पौर्णिमा घेवून येई तर कधी काळी कुट्ट अमावस्या. भास्कर व अवनी मध्ये चंद्र आल्याने तिच्या भावविश्वाला एक वेगळेच ग्रहण लागले. तिच्या आयुष्यातील उगवत्या सूर्याची सौम्यता व शीतलता तिला कधी नीट अनुभवताच नाही आली.

ती हे विसरून गेली ती स्वतः आदिती आदिती आहे. आदित्याची जननी आहे. तिच्या स्वतः एक तेजोनिधी आहे. पण आयुष्यात तिच्या अनेक मेघ आले काही काळे कुट्ट आक्रळ विक्राळ, तरी कधी गुलाबी, मायावी पण काही क्षणांसाठीचे रोमांचित अनुभव देवून परत तप्त ग्रीष्मात मृगजळा मागे धावण्यास प्रवृत्त करणारे तर कधी पांढरे शुभ्र पण कुठे तरी आधीच आपल्यातील ओलावा संपून आलेल. तिला आता नको आहेत असे भासमान आभासी मेघ ....मेघाला आता आस आहे निरभ्र सूर्योदयाची ....हे अदिती तो उगवता नारायण तुझ्यातच आहे....स्वतःच्या आत खोल जाऊन ....अपानाच्या संपूर्ण प्राणशक्तीने आवाज दे स्वतःतील त्या आदित्याला ....तो नक्कीच आहे तुझ्यात आणि घेवून येईल तुला पाहिजे ती शांत सुंदर पहाट...निरभ्र

सोमवार, १३ जून, २०१६

वास्तवातील “कल्पनेचा फिनिक्स”

वास्तवातील “कल्पनेचा फिनिक्स”....

आपण अनेक कल्पनेतील कथा ऐकत असतो. अशाच एका वास्तवातील कल्पनेच्या फिनिक्सला आपल्या समोर परत ती अफाट फिनिक्सभरारी घेताना पाहून त्यांच्या स्वतःची अर्धांगिनी “कल्पना” ज्यावेळी म्हणते,
“मला पाहिजे होता तसाच तो आता झाला आहे.”

हे वाक्य ऐकताना पण मला एक जबरदस्त अनुभूती येते. तिने स्वतः त्याची फिनिक्स भरारी जवळून अनुभवली होती.
तसा तो बेदरकार,बिनधास्त,कलंदर काही जण आवारा पण म्हणत असतील. त्यांच्या नावाचा अर्थ पण स्वतःचे घर नसलेला. मला सापडलेला त्याच्या अस्तित्वाचा अर्थ मात्र स्वतःचे घर फक्त आपले न मानता सर्वांची घरे आपली मानणारा असा तो “अनिकेत” !!!

घरात समाजसेवेचा वारसा असला तरी आपल्या मस्तित जगणारा अनिकेतदादा लोहिया मी पाहतो तसा तो हरहुन्नरी. त्यात माझ्या खूप जवळच्या मित्राच्या बहिणीचा नवरा. म्हणजे आमच्या कल्पनाताईचा तो नवरा. उंचा, पुरा, सगळ्या आधुनिक स्टाईल जोपासणारा. वेगळा वाटायचा.

मानवलोक व मनस्विनी हे अंबाजोगाईत बाबूजी व भाभीनी उभी केलेली परिवर्तनाची चळवळ. बाबूजीनी पसारा खूप वाढवला होता. त्या पसाऱ्याचे कार्यवाहपद अनिकेतदादाकडे आल्यानंतर अनेक कुचकट वाक्य मी स्वतः पण ऐकली होती. अनिकेतदादाला बाबुजींनी निर्माण केलेला वारसा जपावयाचा होता वाढवायचा होता त्या सोबत स्वतःची वेगळी ओळख निर्माण पण करायची होती. अतिशय अवघड जबाबदारी त्याने कशी स्वीकारली हेच मला कळत नव्हते.

खांडसरीचा प्रकल्प अयशस्वी झाल्याने त्याच्या वाट्याला आधीच खूप बदनामी आली होती. “मानवलोकची मसनवाट हा पोरगा करणार” असे अनेकांनी बोलून पण दाखवले. यासर्व परिस्थिती दादाची मात्र एक विलक्षण बदलाची व संघर्षाची यात्रा चालू झाली होती. तो झपाटल्यागत कामाला लागला. प्रचंड प्रवास, अनेक लोकांना भेटणे, अनेक कार्यक्रम या सर्वात स्वतःला अंतरबाह्य बदलणे फार जीव घेणे असते याचा अनुभव मी स्वतः पण घेतलेला आहे. अनिकेतदादाच्या स्वतःच्या शब्दात सांगायचे झाले तर, “ वाल्याचा वाल्मिकी होण्यासारखे ते होते.”

मला हे त्याचे वाक्य काही पटले नाही फार जास्तच स्वतःचे केलेले परखड मूल्यमापन वाटले. ताईला मी त्याचे हे वाक्य सांगितले. त्यावर तिची खुपच बोलकी प्रतिक्रिया होती, “ तो कधीच वाल्या नव्हता. अफाट सामर्थ्य असणाऱ्या शक्तीला नीट दिशा मिळत नव्हती म्हणून त्याच्या कडून काही चुका व्हायच्या पण मुळात त्याची प्रवृत्ती नवनिर्माणाची होती. त्याच्या शक्तीला योग्य ती दिशा मिळाली आणि मग त्याचे कर्तुत्व अधिक देखणे झाले,”

नवीन उपक्रम,नवीन संकल्प,नवीन क्षितिजे दादाला खुणावत होती व तो एका नंतर एक ते पूर्ण करत होता. त्याच्या सोबत अनुभवलेला पाहिला उपक्रम म्हणजे गरीब शेतकऱ्याच्या मुला मुलींचा सामुहिक विवाह सोहळा. कल्पना ताई म्हणते ते पहिल्यांदा मला यात जाणवले. दादा प्रचंड स्पष्ट वक्ता. मनात काही न ठेवता तो जे काही मनात आहे ते मोकळेपणाने बोलणारा.

“तो एकदा का भडकला की आठ दिवस घर तणावात.” कल्पनाताई

पण त्याने स्वतःला पूर्णपणे बदलले परिस्थिती खूप शांतपणे हाताळणे, समजून घेवून वागणे. त्रासदायक गोष्टीना पण शांतपणे सामोरे जाणे हे तो अगदी सहजपणे करत होता. अंबाजोगाईत झालेल्या सक्षम जलनीती परिषदे नंतर मात्र त्याचे काम प्रचंड वाढले. घराची पूर्ण भिस्त कल्पनाताई वर. दादाची दगदग प्रचंड वाढली. त्याने स्वतःच्या प्रकृतीकडे पण लक्ष दिले नाही. असाच एक मोठा प्रवास करून तो औरंगाबाद व तिथून बीडला आला. तिथून त्याचे गुढघे दुखायला लागले. अंबाजोगाई येई पर्यंत त्याचे सगळे सांधे आखडून गेले होते. त्याला कुठलीच हालचाल करता येत नव्हती. त्याला चक्क उचलून घरात न्यावे लागले.

एका भयानक जीवघेण्या संघर्षाची सुरुवात झाली. नेमके काय झाले हे कळत नव्हते. आपले शरीर ज्यावेळी आपल्याला झळते त्यावेळी इतर त्रास फार किरकोळ वाटायला लागतात. एक जीव घेण्या नैराश्याच्या खोल खाईत आपण स्वतःला जळताना स्वतःच पाहात असतो. हे सगळे सहन करणे खूप कठीण होते. दादाला स्वतःला व आमच्या कल्पनाताईला पण.

स्वतःची नौकरी आठ तास, मुलांच्या सगळ्या गोष्टी,घरात येणारे जाणारे खूप , बाबूजींची काळजी आणि त्यात दादाचे हे भयानक आजारपण .....मुळात खूप वेगळ्या धाटणीत तयार झालेल्या ताईला हे सांभाळणे कठीण पण तिला समजले होते आता यावेळी खचून नाही चालणार. तिने,घरातील सर्वांनी,मानवलोकच्या सर्व कार्यकर्त्यांनी व दादाच्या सर्व मित्रांनी दादाला एक जबदस्त प्रेरणा देण्याचे आव्हान स्वीकारले.

राजेंद्रसिंह राणाच्या सोबत स्वीडनला त्यांना मिळालेला पुरस्कार घेण्यासोबत जाणाऱ्यांच्या यादीत अनिकेतदादाचे नाव होते. त्याला पश्चिमीदेशातील सर्व महत्वाच्या लोकांसमोर मानवलोकनी केलेले आपल्या भागातील काम सादर करण्याची संधी मिळणार होती. दादाला मात्र स्वतःला स्वतः उभारता येत नव्हते. त्याचा जीवघेण्या आजारपणा मुळे आयुष्यभर असेच पडून रहावे लागणार का? हा झळनारा विचार त्याच्या मनात घर करू लागला. त्यावेळी मात्र कल्पनाताई व मानवलोकच्या सर्व परिवाराने चंगच बांधला.....अनिकेत दादांनी या विदेश मोहिमेस गेलेच पाहिजे.

यासर्वाचा खूप चांगला परिणाम दिसू लागला. दादाच्या प्रकृतीत चांगले बदल दिसू लागले. तो झपाट्याने बरा होऊ लागला. पूर्ण बरा नसताना त्याने स्वीडन दौरा पूर्ण केला.

“ तो जो बाहेर पडला न तो त्याने परत पहिलेच नाही. झपाटल्यागत त्याने कामात झोकून दिले.” कल्पनाताई

स्वीडन नंतर मग सुरु झाला होळनानदी पुनर्जीवनाचा प्रकल्प. यात प्रचंड भगीरथ प्रयत्न करावे लागणार होते. दादा पूर्ण बरा झाला नव्हता पण नदी मात्र पुनर्जीवित करण्याचे सर्व काम त्याने पूर्ण केले. बीड जिल्यातील भयानक दुष्काळ. एक मोठं आव्हान होते. अनेक गावांना मदत करणे. लोकांना प्रोत्साहन देणे. काम नीट चालले आहे का नाही ते बघणे अगदी काम नाका तोंडाशी आले होते. पण पट्टीच्या पोहणाऱ्याला भोवऱ्याची किंवा तुफानाची काय भीती ....

जब नावं जल मे छोड दी
तुफानोमे ही मोड दी
दे दी चुनोती सिंधूको फिर आर क्या और पार क्या ........

एक भन्नाट काम दादाचे चालू होते. त्याची काम करण्याची जिद्द आम्हाला ही प्रेरणा देत होती. त्याला दोन तीन दिवसातून एकदा तरी भेटल्याशिवाय आतून पेटल्यागत वाटायचे नाही. कधी सकाळी तर कधी भर दुपारी तर कधी भर मध्य रात्री आम्ही एकमेकांना भेटत होतो.

एक प्रचंड ऐतिहासिक काम अंबाजोगाईने अनुभवले.....पण मी मात्र पाहत होतो एका फिनिक्सभरारीला....... आणि वास्तवातील “कल्पने”च्या “फिनिक्स”ला

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५

विचारप्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते ?

“ Whatever you think that you will be.” Swami Vivekananda
“As you think, so shall you become.” Bruce Lee.

गेल्या काही दिवसांपासून आपल्या विचारप्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते याचा विचार करत होतो. आपल्या विचारांचा आपल्या जगण्यावर परिणाम होत असतो. आपण जसा विचार करत जातो तसे बनत जातो. स्वामी विवेकानंद हे विचारवंत व बुस ली एक ताकदवान खेळाडू. दोघांचीही जी प्रसिद्ध वाक्य आहेत त्यातून हाच बोध होतो की विचारांचा खूप मोठा परिणाम आपल्यावर व अर्थात आपल्या जगण्यावर होत असतो.

आता प्रश्न हा येतो की आपल्या विचारांवर कशाचा परिणाम होतो. नीट समजून घेतले असता असे लक्षात येते की आपले मन, आपले बोलणे, आपले शरीर व आपण करत असलेलो काम या चार गोष्टींचा आपल्या विचारांवर परिणाम होत असतो.
मन :- आपल्या मनाची स्थिती अर्थात आपली भावनिक स्थिती कशी आहे ? आपली मनाची स्थिती किंवा आपली भावनिक स्थिती ही अवलंबून असते ती आपण आपल्या पंचेद्रियांच्या द्वारे ग्रहण करत असलेल्या ज्ञानावर. हे ज्ञान जेवढे अचूक तेवढे चांगले. ज्ञानाची अचूकता आपल्याला आलेल्या आधिच्या अनुभवांच्या संचीतावर अवलंबून असते. पूर्वीच्या अनुभवातून आपण समृद्ध व्हावयास हवे पण बऱ्याच वेळी आपण घाबरट,संशयी बनतो किंवा आपल्या विचारात एक साचेबंद पणा येतो.त्यामुळे पंचेद्रियांच्या द्वारे ग्रहण केलेले ज्ञान अचूक असण्यासाठी ते पूर्वग्रहदूषित दुषित तर नाही न याची काळजी नक्की घ्यावयाची असते. मनाचे अवधान, एकाग्रता, संकल्प व कल्पकता याचा आपल्या ज्ञान ग्रहण करण्याच्या प्रकियेवर खूप परिणाम होतो आणि यावरून आपल्या मनाची स्थितीचे आकलन आपल्याला होते. मन जेवढे आपण शांत करत जाऊ तसे मनाचा आपल्या विचारांवरील परिणाम चांगला व्हायला लागतो.

बोलणे :- आपल्या बोलण्याचा आपल्या विचारांवर खूपच परिणाम होत असतो. बोलणे कसे आहे ? खरे की खोटे, बोचरे,खिजवणारे किंवा त्रास दायक की समजून घेणारे, समजून सांगणारे की दोष दाखवणारे, चिडके की प्रसन्न,चहाडी-कुचेष्टा-निंदा करणारे की चांगल्या गोष्टी सांगणारे. आपण सर्वांशी कसे बोलतो याचा परिणाम आपल्या विचारांवर नक्कीच होत असतो. आपली बोलणे दोन प्रकारेचे असते एक प्रगट मोठ्या आवाजात तर दुसरे मनातील मनात. आपण प्रगट बोलण्याच्या आधी आपल्या मनातल्या मनात आपण काही प्रतिक्रिया दिलेल्या असतात. त्या मनातील प्रतिक्रियांचा पण खूप मोठा परिणाम आपल्यावर होत असतो. याच बरोबर आपण जेवढे लोकांशी बोलत असतो त्याही पेक्षा जास्त आपण आपल्याशीच बोलत असतो. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांना आपण आपल्यालाच दिलेली प्रतिक्रिया म्हणजे हा आपल्याशीच असलेला हा मौन संवाद. हे बोलणे नेमके कसे असते हे समजून घेतले की आपल्याला लगेच लक्षात येईल की आपल्या स्वतःची बोलण्याचा परिणाम आपल्या विचारांवर किती मोठा होतो. तटस्थपणे आपण आपल्या बोलणे साधक बाधक रित्या समजून घेवू लागलो की त्याचा चांगला परिणाम आपल्या विचारांवर होत असतो.

शरीर :- आपल्या शरीराची अवस्था कशी आहे याचा खूप मोठा परिणाम आपल्या विचारांवर होत असतो. वेगवेगळ्या वयात आपल्या शरीराची स्थितीव वेगळी असते. त्यामुळे वयानुसार आपले विचार बदलत जातात याचा अनुभव पण आपण घेतो. शरीर रोगांनी ग्रासलेले आहे की निरोगी. खूप थकलेले आहे की मस्त तजेलदार,भुकेले-तहानेले की तृप्त यासर्वाचा परिणाम आपल्या विचारांवर होत असतो. आपले शरीर निरोगी, सतेज आणि शक्तिशाली असलेकी त्याचा चांगला परिणाम आपल्या विचारांवर होतो.

काम ( कार्य ):- आपण जे काही काम करत असतो त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या विचारांवर होत असतो. ज्या कामातून काही चांगले निष्पन्न होणार आहे. आपल्या भोवतीच्या लोकांचे चांगले होणार आहे.अनेकांच्या उपयोगाचे ते काम असणार आहे. काम चुकारी, आपले काम दुसऱ्यावर, आजचे काम उद्यावर याचा खूप वाईट परिणाम आपल्या विचारांवर होतो. आपण ज्या परिक्षेत्रात काम करतो किंवा कुणासोबत काम करतो याचा परिणाम पण आपल्या विचारांवर होत असतो. स्वतःचा उदरभरण होण्यासोबत व्यापक मानवाच्या हितासाठी, नवनिर्मिती करणारे काम आपल्या विचारांवर खूप चांगला परिणाम करते.

आत्ता पर्यंत तरी मला या चार गोष्टी समजल्या यापेक्षा अजून काही आपल्याला समजल्या असतील तर नक्कीच सांगा मला त्याचा खूप उपयोग होईल.

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०१५

सर्वांच्या प्रेरणेने मनातील सुप्तइच्छेचे मुर्त रूप उद्या साकार होणार.....

सर्वांच्या प्रेरणेने मनातील सुप्तइच्छेचे मुर्त रूप उद्या साकार होणार.....

गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातील पाच शाळांमध्ये बऱ्याच भेटी होत आहेत. विद्यार्थ्यांना शिकवणे व शिक्षकांशी गप्पा मारणे त्यांना समजून घेणे खूपच वेगळी अनुभूती देते. प्रत्येक शाळेत काहीतरी खास आहे. शिक्षकांशी बोलताना मुख्यतः ग्रामीण भागातील शिक्षण कसे बदलले पाहिजे यावर चर्चा होते. शिक्षकांचे अनुभव खूप बोलके असतात. खूप मेहनत घेणारी ही शिक्षक व कुठलीही अनुकूल परिस्थिती नसताना शाळेत प्रचंड उत्साहाने येणारी मुलं पाहिल्यावर असे नक्कीच वाटते प्रयत्न नक्कीच चालू आहेत.
या सर्वातून मी काही गोष्टी समजून घेतल्या. शिक्षण कसे किंवा कोठे दिले जाते या बरोबर विद्यार्थी,शिक्षक व समाज यांच्या प्रेरणे वर बरच काही अवलंबून आहे. प्रेरित शिक्षक जर विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याच्या प्रेरणेचे संक्रमण करू शकले तर विद्यार्थी नक्कीच चांगले शिकतात व प्रेरक समाज व साथीदार सोबत असतील तर शाळेचे रूप पालटायला फारसा वेळ लागत नाही. याची प्रत्यक्ष अनुभूती मला येत गेली.
“नमस्कार राजेसाहेब, आज येवू का शाळेत ?”
“या की दादा काहीच प्रॉब्लेम नाही ....या या या.” राजेसाहेब किर्दंत,कोद्रीच्या जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नेहमीच्याच उत्साही व आश्वासक आवाजात प्रतिसाद दिला.
श्री गजानन महाराजाची पालखीतील वारकरी बंधूना केळी देण्याची आमची सेवा विवेकवाडी परिसरात चालू होती. तोच घाई गर्दीतून रवी, अमर, शरद हे माझे मित्र व प्रबोधिनीचे पालक तर पांडुरंग सोळुंके हा संगणक व्यापारी व तज्ञ मला गाडीतून उतरताना दिसले.
“ दर्शनासाठी इतक्या लांब का ?” मी शरद लोमटेला विचारले.
“ नाही कोद्रीला निघालो आहे.”
“मी पण कोद्रीलाच निघालो आहे. इथला कार्यक्रम संपला की येणार आहे.”
तो पर्यंत रवी, अमर व पाडुरंग पण जवळ आले.
“कोद्रीला काय विशेष”
“ ई लर्निग सुरु करायचे आहे म्हणून ती शाळा पाहायला जातो आहोत.”
“ मस्त...चांगलंय.”
“या मग... आम्ही जातो पुढे.” असं म्हणत रवी देशमुख व त्याचे सर्व मित्र कोद्रीकडे रवाना झाले.
गेल्या काही वर्षात मी कोद्रीची शाळा बदलताना पाहतो आहे. शाळेतील आठ शिक्षक एक मस्त टीम उभी राहिली आहे. राजेसाहेब व त्यांचे सहकारी शाळेसाठी खूप कल्पक. प्रेरणात्मक प्रयत्न करत आहेत. एकदम शाळेचे रूपच पालटून गेले. स्वच्छ, सुंदर, हिरवीगार शाळा सर्व शिक्षकांनी उभी केली आहे. उन्हाळ्यात व सध्याच्या दुष्काळी वातावरणात पुनर्भरणाचे अनेक प्रयत्न केल्या मुळे शाळेतील कुपनलिकेला अजूनही पाणी आहे. त्यामुळे गावाची फारमोठी पाण्याची व्यवस्था शाळेनी केली आहे. याचसोबत परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे लावून परिसर हिरवागार केला आहे. पक्षांच्या व मुलांच्या चिवचिवटात शाळा भरते. शाळेची प्रत्येक भिंत बोलकी व प्रत्येक कोपरा काही तरी वेगळा.
आपल्या शाळेत आधुनिकातील आधुनिक सोयी असाव्यात हा मानस राजेसाहेबांनी आमच्या नगरच्या स्नेहालय भेटीत व्यक्त केला होता. त्यांना समाजाचे पण योगदान हवे होते. सहकारी शिक्षकांनी तर प्रति शिक्षक दोन हजार रुपये जमा पण केले होते. त्या वेळच्या मुख्याध्यापकांनी सहा हजार तर राजेसाहेबांनी पाच हजार असे शिक्षकांचे तेवीस हजार रुपये जमा झाले. त्याना सर्वांना आपल्या शाळेत ई लर्निगची आधुनिक शिक्षण पद्धती सुरु करायची होती.
हेमंत राजमाने एक खूप वेगळे व्यक्तीमत्व अंबाजोगाईत होऊन गेले. फार काळ त्याला आयुष्य नाही लाभले पण तो जे काही जगाला त्याने त्याच्या सभोवतालच्या व्यक्तींवर व परिसरावर एक वेगळीच छाप टाकली. मुन्ना राजमाने हे नाव आजही अंबाजोगाईतील त्याच्या मित्रांना खूप प्रेरक आहे. मदतीसाठी अर्ध्या रात्री धावून जाणे, दिलदार वृत्ती, निर्मळ प्रेम यामुळे मुन्ना किती जगला या पेक्षा तो कसा जगला यामुळे त्याची प्रेरणा घेवून त्याच्या मित्रांनी २०१३ साली कै, हेमंत राजमाने बहुदेशीय सेवाभावी संस्था सुरु केली. हेमंतने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते पण त्याचे अन्य मित्र पण बरेच होते. त्या सर्व मित्रांनी हेमंतच्या स्मृती मृत्यू नंतर ही जपून ठेवल्या. आजही हेमंत त्यांच्यासाठी एक प्रेरणेचा स्त्रोत आहे हे रवी देशमुख ज्यावेळी किती आत्मियतेने त्याबद्दल बोलतो यातून समजते. यासर्व मित्रांनी अनेक समाजासाठीचे कार्यक्रम अंबाजोगाईत स्वतःच्या खर्चाने संस्थेच्या नावाने घेतले.

सुवर्णकारसर हे शिक्षण विभागातील एक चांगले व्यक्तिमत्व त्यांच्या सुचणेवरून रवी व त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी ई लर्निग प्रणाली एकाद्या जिल्हा परिषद शाळेत सुरु करण्याचे ठरवले व त्यानुसार त्यांनी पाच सहा शाळांना पण भेटी दिल्या. सर्वांच्या एक मताने शेवटी जिल्हा परिषद,कोद्री या शाळेची निवड झाली.
सगळेच जण कामाला लागले. अनेकांचे मदतीचे हात पुढे येवू लागले. जवळगावच्या चित्रकला शिक्षक श्री. हारे यांनी वर्ग खोली सुंदर करून दिली. शिक्षकांनी जमा केलेल्या रकमेतून प्रत्येक वर्गाचे सॉफ्टवेअर विकत घेतले. कै.हेमंत राजमाने स्मृती बहुदेशीय सेवा संस्थेनी बाकी सगळी पन्नासहजार रुपयांची साधने विकत घेवून दिली. महिन्याभरात तर सर्व रचना सज्ज झाली. आता गावकरी कसे मागे राहतील त्यांनी पण दुष्काळ असताना यासाठी मदत गोळा करायला सुरुवात केली.
राजेसाहेबांचा काल फोन आला,
“ नमस्कार दादा, इकडे तुमच्या या मित्राला बोला.”
“नमस्कार कोण बोलतंय ?” मी थोड्या कुतूहलाने विचारले.
“मी रवी देशमुख...परवा ई क्लास रूमचे उदघाटन आहे तुम्ही नक्की या.”
“हो नक्की येतो.” कुठलाही विचार न करता मी हो म्हणालो.
सर्वांच्या प्रेरणेने मनातील सुप्तइच्छेचे मुर्त रूप उद्या साकार होणार आहे. शिक्षक, समाज व चांगले कार्य करणारी सेवा संस्था यांच्या सर्वांच्या प्रेरणेने एक आधुनिक विद्या मंदिराची सुरुवात होणार आहे.

रविवार, २३ नोव्हेंबर, २०१४

“Hari u r really very ambitious person. आणि तु यशस्वी होशील कारण तुझ्यात हरी आहे “


“Hari u r really very ambitious person. आणि तु यशस्वी होशील कारण तुझ्यात हरी आहे “


उभट चेहरा, थोडा नाकाच्या शेंड्याच्या जवळ सरकत येणारा चेष्मा सावरत आपल्या दाक्षिणात्य पद्धतीचा हेल काढत मराठी बोलणारा हरी एक प्रांजळ व्यक्तिमत्व. “I am a very ambitious person.” आपल्या स्वतःचे वर्णन आपल्या ब्लॉग वर लिहिणाऱ्या हरिहरन अय्यरची ओळख माझी गेल्या पाच सहा वर्षातील. प्रबोधिनीच्या कामानिमित्य ज्यावेळी मुंबईत जाऊ लागलो त्यावेळी मी खरोखर मुंबईकरांच्या प्रेमात पडलो. वर वर पाहता खूप एकांडी वाटणारी माणसे खूप मस्त सहजीवन जगायला शिकली. व्यस्त दिनक्रम,प्रवासाची दगदग हे सर्व असले तरी आपल्या या बिझी आयुष्यात पण माणुसकीचा ओलावा जपणारी अनेक माणसे मला भेटली त्यातील एक हरी.


दहावी पर्यंत हरी अभ्यासात फार विशेष मुलगा नव्हता. आपल्या सोसायटीचा गणेशोत्सव,मुबईकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे क्रिकेट व वेळ मिळाला की बुद्धिबळ हे हरीचे आनंद सोबती. पंचाचे निर्णय येण्याच्या आधीच आपला निर्णय सांगणारा हरी क्रिकेटचा जबरदस्त फ्यान आहे. क्रिकेटशी आयुष्यभराशी नाते रहावे म्हणून त्याने अठरावे वर्ष पूर्ण होताच पंच प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. या सर्वात व्हायचे हे होऊनच गेले. दहावीच्या शालान्त परीक्षेत त्याला हवे तसे गुण नाही पडले. याची परिणीती म्हणजे त्याला विज्ञान शाखेला प्रवेश मिळाला नाही.

गणित हा विषय त्याला खूप आवडायचा. वाणिज्य शाखा त्याला घ्यावी लागणार होती. त्याचा मोठा भाऊ वाणिज्य शाखेत शिकत होता. सकाळी महाविद्यालयात जाऊन दुपारी परत आला की त्याला फारसे काही काम नसायचे. हरीला असे मोकळे, निवांत आयुष्य नको होते. वाणिज्य शाखा घेण्याशिवाय दुसरा मार्ग पण नव्हता.सगळ्यात महत्वाचे त्याला आवडणाऱ्या गणिताला फार काही या शिक्षणात स्थान नव्हते.त्याने वास्तव स्वीकारले. महाविद्यालयात जाऊ लागला. सोबतची मित्र पण छान होती. खूप काही करायचे होते पण कुणासोबत करू हा मोठा प्रश्न होता.

प्रथम वर्षाला असतानाच त्याला एक लक्षात आले की जे आपल्याला येते ते दुसऱ्याला शिकवले पाहिजे. जे आपल्याला समजले ते दुसऱ्यांना समजून सांगितले पाहिजे. या प्रक्रियेत घेणारा व देणारा या दोघांचा पण चांगला विकास होतो हे त्याला आता पक्के होत जात होते. त्याला शिक्षकीपेशा बद्दल अतीव कुतूहल निर्माण होऊ लागले. यातूनच तो माध्यमिक शाळेतील मुलांना शिकवू लागला व त्यात मस्त रमू पण लागला.शिकवण्याचा विषय म्हणजे त्याला आवडणारे गणित.

अनेकांना सोबत घेवून काम करायचे तो आधीच शिकला होता.आता इतरांना गणितात रुची व गती निर्माण होण्यासाठी तो शिकवू लागला तसा तो वैदिक गणिता पासून आधुनिक गणिता पर्यंतचे सर्व क्षितिजे तो पादाक्रांत करत होता. कुठला अभ्यासक्रम नाही कुठली परीक्षा नाही कुठला निकाल पण नाही. आपनच ठरवायचे काय शिकायचे, कसे शिकायचे, किती शिकायचे आणि कुठपर्यंत आलो ते आपणच समजून घ्यायचे. हा गणिताचा प्रवास त्याचे आयुष्य अधिक समृद्ध करत होता आणि त्यासोबतच इतरांचे पण.

लोकांना वाटणाऱ्या या नसत्या गोष्टी करत असताना तो व्यावहारिक जगातील यशातही माग नाही पडला. तो याकाळातच Chartered Accountant पण झाला.एक मोठया पगाराची नौकरी मस्त बँकेत पण त्याला मिळाली. नौकरी सांभाळत शनिवार-रविवार मात्र तो आपण जे शिकलो ते शिकवायचा त्याच बरोबर गणित पण. फार काळ मात्र या कॉर्पोरेट जगात हरी रमला नाही. सहा महिन्यातच त्याला लक्षात आले की आपल्याला एका चक्रात अडकून ठेवणाऱ्या या चक्रव्युहातून लवकर बाहेर पडायचे. त्याने नौकरी सोडली व पूर्णवेळ शिक्षक होण्याचे ठरवले.

हरी नुसता हाडाचा शिक्षक नाही तर तो एक सामाजिक भान असणारा एक आत्मप्रेरीत कार्यकर्ता पण आहे. तो आता मुलांना नुसता Account शिकवत नव्हता तर आपल्या आयुष्याचे self audit, social audit करायला पण शिकवत होता. समाजाला भेडसावनाऱ्या अनेक प्रश्नांवर तो आपल्या विद्यार्थ्याशी चर्चा करायचा, अनेक विद्यार्थ्यांना असं काही करायला नक्कीच आवडायचे. मुलांचा एक चांगला घोळका हरी सरांच्या भोवती जमत होता. आता काही करायचे झाले तर माणसांची कमी नव्हती. शिक्षकाने ठरवले तर तो समाजातील अनेक प्रश्नाना आपल्या विद्यार्थ्यांसह कसे सोडवायचे हे गणित अगदी सोप्या पद्धतीने समाजाला समजून सांगू शकतो हे हरीला नेमके कळले होते.

याच पद्धतीने शिक्षक व त्यांचे विद्यार्थी यांच्यातील औपचारिक व अनौपचारिकरित्या शिक्षण घेत
देशप्रश्न सोडवण्याची संघटीत चळवळ म्हणजे ज्ञान प्रबोधिनीच्या संपर्कात हरी आला. गणपती विसर्जनात निर्माल्य जमा करण्याच्या मोहिमेत तो सहभागी झाला. पर्यावरणाला हानीकारक अशा पदार्थांना वेगळे करण्याचे व त्याची योग्य ते विल्हेवाट लावण्याचे काम हरी व हरीच्या मित्रांनी गणेशविसर्जनाच्या वेळी केले आणि कित्येक टन निर्माल्य त्यांनी योग्य पद्धतीने मार्गी लावले.

आपल्या विद्यार्थ्यांना मिळणारे विद्यावेतन अंशतः सामाजिक कामासाठी वापरायचे का ? असा प्रस्ताव त्याने मुलांसमोर ठेवला. बऱ्याच जणांनी यात सहभागी होऊन अनाथालयातील मुलांना काही गरजेच्या वस्तू घेवून देण्याचे काम हरी सह त्याच्या सवंगड्यानी सुरु केले. मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळाची माहिती माझ्या कडून समजताच हरी परत धावून आला व त्याने मोलाची मदत जलसंधारणाच्या कामासाठी केली. हे सगळ करत असताना हरी मात्र नेहमी सारखाच प्रांजळ,निगर्वी राहतो हे मात्र विशेष. यात कुठलाच बडेजाव पणा नाही न खूप काही केले अशी मर्दुमकीची भाषा पण नाही.

त्याचे गणित शिकवणे व शिकणे याकाळात काही थांबले नव्हते. एक चांगला गणित शिक्षक मित्र विनय नायरशी त्याची भेट झाली आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिता बद्दल रुची व गती वाढावी म्हणून काय करता येयील याबाबत त्यांनी चर्चा पण सुरु केले.मंदार भानुशे या गणित प्रेमी प्राध्यापकाशी त्यांनी भेट घेतली. एक फौंडेशन तयार करून त्यांनी चक्क भारतातील शंभर मुलांसाठी कुठलीही फीस न घेता निवासी अभ्यास वर्ग घेण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी पैसा जमा करणे, व्यवस्था लावणे फार सोपे काम नव्हते. म्हणतात न हरी जिथे आहे तिथे नक्कीच सगळी कोडे सुटतात. प्रयत्नांती परमेश्वर. अभ्यासवर्ग तर मस्त झाला पण यातून मुलांना मिळालेल्या ज्ञानामुळे पालक एवढे खुष झाले की त्यांनी स्वतःहूनच या कार्यासाठी देणगी दिली आणि पाच हजाराने तोट्यातील अर्थवृत्त एकदम ऐंशीहजारांनी फायद्यात आले. नेकीने आणि कष्टाने तोड्याचे रूपांतर फायद्यात होते हे गणित त्या सर्वांना शिकायला मिळाले.

देशपातळीवरील गणित परिषदेत हरी वं त्याचा नववीत शिकणाऱ्या मित्रांनी आपले मूळ संख्यांवरील संशोधन तर मांडलेच पण याच्या बरोबरीने हरीला जुनियर रिसर्च फेलोशिप पण मिळाली. हे सर्व करताना गणितात व सांखिकी शास्त्रात फार कमी संशोधन भारतात होत आहे हे त्याला लक्षात आले. यापुढे हरीला आता Phd करायची आहे. जगातील मान्यवर विद्यापीठातून. त्यासाठी त्याचे प्रयत्न पण सुरु आहेत.

“अरे दादा, आपल्या भारतातील मुलांना अगदी १३ व्या वर्षापासून वाटले पाहिजे की आपण कुठल्यातरी विषयात Phd केली पाहिजे आणि खरा खुरा अभ्यास करून ह् ..पण त्यांना माहीत नाही न याबद्दल.आता मी ते शिकेन आणि मग परत मुलांना सांगू शकेल.” हरीच्या Phd मागील गणित पण मला सहजच कळले.

“तुला काय सांगू दादा, एक जबदस्त अनुभव आला मला. काल पेपर मध्ये मी वाचले की एका रिक्षावाल्याने त्याच्या रिक्षेत विसरून राहिलेली दीड लाखाची रक्कम त्याने पोलिसांना दिली. चांगुलपणा हा सगळ्यातच असतो. मी माझ्या students ना घेवून त्या रिक्षेवाल्याला भेटणार आहे. त्यांना पण कळू देत न जगात अनेक चांगली माणसे आहेत.”

“फार सही अनुभव होता तो दादा, तो रिक्षावाला म्हणाला, मैने कोई बडा काम नही किया. जो हमारे
पवित्र कुराण मे लिखा है वो ही किया. काय सही न एक साधा माणूस पण किती सहज आणि सच्चा असतो न !”

हरीला डॉक्टर अब्दुल कलामांना भेटायची फार इच्छा आहे.

“काही तरी कर न दादा, आपण एकदा तरी त्यांना भेटू.”

मी त्याला विचारले, “कशा साठी रे.”

“काही नाही रे दादा फक्त त्यांच्या पायाला हात लावून त्यांचे दर्शन घ्यायचे आहे”

शांतपणे डोंबिवलीच्या रस्तावर चालुन दमल्या वर आम्ही दोघ कोपऱ्यावरील एका बाका वर बसलो.

“ एक सांगू का दादा, मला न नोबेल प्राईज मिळावयाचे आहे.खूप अभ्यास, संशोधन करायचे आहे खूप जणांना शिकावयाचे आहे” हरी आपल्या मनातील “GREAT AMBITION” सांगून गेला.

“Hari u r really very ambitious person. आणि तु यशस्वी होशील कारण तुझ्यात हरी आहे “

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०१४

“आपल्यासारखी काही वेडी माणसे आहेत न अजून, मग काय करू की काही तरी चांगलं.”सकाळीच डॉ.महेंद्रचा फोन आला.
“दादा, माझ्या भावाशी थोडं बोलाल का ? त्याला त्याच्या परीक्षेत अपयश आले आहे”
“हो नक्की बोलेल. कधी भेटेल तो ? ”
त्या दिवशी त्याची न माझी पहिली भेट. उंच, गोरा, अगदी सात्विक चेहरा, वागण्यात एक वेगळीच अदब. तो खूप शांतपणे माझ्याशी बोलत होता. पहिल्याच भेटीत हा माणूस काही तरी हटके आहे याची जाणीव झाली. “बंदे मे दम है.”  त्याची प्रांजळता मला खूप भावली. तो अस्वस्थ नक्कीच होता पण पराभूत मानसिकतेचा नाही हे पण त्याच वेळी समजले. काहीतरी नक्की वेगळं करणार हा पोरगा कारण त्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता.

अमित तसा फार कमी भेटतो पण भेटल्यानंतर मला त्याच्या बद्दल व त्याला माझ्याबद्दल असणारी आपुलकी सहजच जाणवून जाते फक्त आम्हाला नाही तर सोबतच्या लोकांना पण. दोन आठवड्यापूर्वी अंबाजोगाईतील वैद्यकीय महाविद्यालयात ज्ञानसेतू हा उपक्रम घ्यायचा होता त्यासाठी अमितशी बोलावे वाटले. विचित्र म्हंजे माझ्याकडे त्याचा फोन नंबर पण नव्हता. मनाला इतकासा आपला वाटणाऱ्या माणसाचा फोननंबर आपल्याकडे नाही हे म्हणजे अतीच झाले. डॉक्टर महेंद्रकडून त्याचा फोननंबर घेतला. मी फोन करण्यापूर्वीच अमितचा फोन आला. त्याचे बोलणे कानावर पडताच लक्षात आले की अनेक महिने जरी आपण बोललो नाही या व्यक्तीशी तरी तिच आत्मीयता त्याच्यात आहे व माझ्यात आहे. नित्य संपर्क असून सुद्धा अनेक लोकांशी असे नाते होत नाही.
डॉक्टर अमित लोमटे .....आम्ही अमितला भेटायला वैद्यकीय महाविद्यालयात गेलो. प्रभारी अधिष्ठाता काही कामात असल्याने चहा घेण्यासाठी उपहार गृहात गेलो. अमित आता महाराष्ट्रातील मार्डचा प्रमुख आहे हे कळले. गेल्या अनेक दिवसात त्याने केलेला वेडेपणा मी समजून घेवू लागलो.

उपहारगृह चालवणाऱ्या स्वामी पासून ते सोलापूरच्या आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरसाठी काही क्षणात लाखाची मदत करण्याची करामत या वेड्या डॉक्टर मध्ये आहे. पोस्टमार्टम सारखे नको वाटणारा विभाग मुद्दाम अमितने स्वतः कडे घेतला व त्याला एक वेगळीच शिस्त लावली. आपले शेखी मिरवू पाहणाऱ्या एका राजकारण्याला फार मस्तपणे अमित ने वठणीवर आणले.

 “आपण चांगल करतोत न दादा मग घाबरायचे कशाला ?”

 त्याचे हे वाक्य एक वेगळी अनुभूती देत होते. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वस्तीगृह असो की परिसरातील उपहारगृह यांचा कायापालट करताना अतिशय धैर्याने अमितने केलेल काम खुपच कौतुकास्पद आहे.

महाविद्यालयाची व एकूणच दवाखान्याची स्थिती सध्या फार काही चांगली नाही.  

“मी त्याला म्हंटले की मग हे कसं रे नीट चालणार ?” त्यावर त्याचे उत्तर फारच मस्त होते.

“आपल्यासारखी काही वेडी माणसे आहेत न अजून, मग काय करू की काही तरी चांगलं.”

माझ्या मनातल अमितबाबतील कौतुकयुक्त अभिमान वाढतच होता. अमित खूप सर्वस्पर्शी आहे, अनेकांचे त्याचे स्नेहाचे नाते आहे. आपल्या सोबत अनेक महिने जेवण करणाऱ्या मित्राला अचानक छातीत दुखायला लागते व त्याचा फोन अमितला येतो. अमित लगेच त्याच्या मदतीला निघतो. मित्राला तो सांगतो काहीही शरीराला त्रास होईल अशा हालचाली करू नको. पण तो लिफ्टने जाण्याच्या एवजी जिन्याचा वापर करतो. जीना तो चढून जातो व सरळ समोरील मोकळ्या जागेवरच त्याचा तोल जातो. जागेवरच त्याचा मृत्य होतो.

अमित तिथे पोहोंचतो. आकस्मित मृत्यू मुळे पोस्टमार्टम करणे क्रमप्राप्त. नातेवाईक तयार नाहीत, अशी अवघड स्थिती अमितने खूप शांतपणे हाताळली. स्वतःच्या मित्राचे पोस्टमार्टम करतांच्या त्याच्या व्यथेची अनुभूती शब्दात नाही मांडता येणार.

अंबाजोगाई व आपल्या पेशाबद्दल अतिव आदर व श्रद्धा असणाऱ्या अमितने हौसेने जिथे तो काम करतो तिथे पण खूप रचनात्मक बदल करून रुग्णांचा होणारा अवाजवी खर्चपण खूप कमी केला व रुग्णालयाची पत पण वाढवली.

“यार इस बंदेमे साहिमे दम है”

अमित तु म्हणतोस ते खरच खूप खरं आहे      

“आपल्यासारखी काही वेडी माणसे आहेत न अजून, मग काय करू की काही तरी चांगलं.”