“ Whatever you think that you will be.” Swami Vivekananda
“As you think, so shall you become.” Bruce Lee.
“As you think, so shall you become.” Bruce Lee.
गेल्या काही दिवसांपासून आपल्या विचारप्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते याचा विचार करत होतो. आपल्या विचारांचा आपल्या जगण्यावर परिणाम होत असतो. आपण जसा विचार करत जातो तसे बनत जातो. स्वामी विवेकानंद हे विचारवंत व बुस ली एक ताकदवान खेळाडू. दोघांचीही जी प्रसिद्ध वाक्य आहेत त्यातून हाच बोध होतो की विचारांचा खूप मोठा परिणाम आपल्यावर व अर्थात आपल्या जगण्यावर होत असतो.
आता प्रश्न हा येतो की आपल्या विचारांवर कशाचा परिणाम होतो. नीट समजून घेतले असता असे लक्षात येते की आपले मन, आपले बोलणे, आपले शरीर व आपण करत असलेलो काम या चार गोष्टींचा आपल्या विचारांवर परिणाम होत असतो.
मन :- आपल्या मनाची स्थिती अर्थात आपली भावनिक स्थिती कशी आहे ? आपली मनाची स्थिती किंवा आपली भावनिक स्थिती ही अवलंबून असते ती आपण आपल्या पंचेद्रियांच्या द्वारे ग्रहण करत असलेल्या ज्ञानावर. हे ज्ञान जेवढे अचूक तेवढे चांगले. ज्ञानाची अचूकता आपल्याला आलेल्या आधिच्या अनुभवांच्या संचीतावर अवलंबून असते. पूर्वीच्या अनुभवातून आपण समृद्ध व्हावयास हवे पण बऱ्याच वेळी आपण घाबरट,संशयी बनतो किंवा आपल्या विचारात एक साचेबंद पणा येतो.त्यामुळे पंचेद्रियांच्या द्वारे ग्रहण केलेले ज्ञान अचूक असण्यासाठी ते पूर्वग्रहदूषित दुषित तर नाही न याची काळजी नक्की घ्यावयाची असते. मनाचे अवधान, एकाग्रता, संकल्प व कल्पकता याचा आपल्या ज्ञान ग्रहण करण्याच्या प्रकियेवर खूप परिणाम होतो आणि यावरून आपल्या मनाची स्थितीचे आकलन आपल्याला होते. मन जेवढे आपण शांत करत जाऊ तसे मनाचा आपल्या विचारांवरील परिणाम चांगला व्हायला लागतो.
बोलणे :- आपल्या बोलण्याचा आपल्या विचारांवर खूपच परिणाम होत असतो. बोलणे कसे आहे ? खरे की खोटे, बोचरे,खिजवणारे किंवा त्रास दायक की समजून घेणारे, समजून सांगणारे की दोष दाखवणारे, चिडके की प्रसन्न,चहाडी-कुचेष्टा-निंदा करणारे की चांगल्या गोष्टी सांगणारे. आपण सर्वांशी कसे बोलतो याचा परिणाम आपल्या विचारांवर नक्कीच होत असतो. आपली बोलणे दोन प्रकारेचे असते एक प्रगट मोठ्या आवाजात तर दुसरे मनातील मनात. आपण प्रगट बोलण्याच्या आधी आपल्या मनातल्या मनात आपण काही प्रतिक्रिया दिलेल्या असतात. त्या मनातील प्रतिक्रियांचा पण खूप मोठा परिणाम आपल्यावर होत असतो. याच बरोबर आपण जेवढे लोकांशी बोलत असतो त्याही पेक्षा जास्त आपण आपल्याशीच बोलत असतो. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांना आपण आपल्यालाच दिलेली प्रतिक्रिया म्हणजे हा आपल्याशीच असलेला हा मौन संवाद. हे बोलणे नेमके कसे असते हे समजून घेतले की आपल्याला लगेच लक्षात येईल की आपल्या स्वतःची बोलण्याचा परिणाम आपल्या विचारांवर किती मोठा होतो. तटस्थपणे आपण आपल्या बोलणे साधक बाधक रित्या समजून घेवू लागलो की त्याचा चांगला परिणाम आपल्या विचारांवर होत असतो.
शरीर :- आपल्या शरीराची अवस्था कशी आहे याचा खूप मोठा परिणाम आपल्या विचारांवर होत असतो. वेगवेगळ्या वयात आपल्या शरीराची स्थितीव वेगळी असते. त्यामुळे वयानुसार आपले विचार बदलत जातात याचा अनुभव पण आपण घेतो. शरीर रोगांनी ग्रासलेले आहे की निरोगी. खूप थकलेले आहे की मस्त तजेलदार,भुकेले-तहानेले की तृप्त यासर्वाचा परिणाम आपल्या विचारांवर होत असतो. आपले शरीर निरोगी, सतेज आणि शक्तिशाली असलेकी त्याचा चांगला परिणाम आपल्या विचारांवर होतो.
काम ( कार्य ):- आपण जे काही काम करत असतो त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या विचारांवर होत असतो. ज्या कामातून काही चांगले निष्पन्न होणार आहे. आपल्या भोवतीच्या लोकांचे चांगले होणार आहे.अनेकांच्या उपयोगाचे ते काम असणार आहे. काम चुकारी, आपले काम दुसऱ्यावर, आजचे काम उद्यावर याचा खूप वाईट परिणाम आपल्या विचारांवर होतो. आपण ज्या परिक्षेत्रात काम करतो किंवा कुणासोबत काम करतो याचा परिणाम पण आपल्या विचारांवर होत असतो. स्वतःचा उदरभरण होण्यासोबत व्यापक मानवाच्या हितासाठी, नवनिर्मिती करणारे काम आपल्या विचारांवर खूप चांगला परिणाम करते.
आत्ता पर्यंत तरी मला या चार गोष्टी समजल्या यापेक्षा अजून काही आपल्याला समजल्या असतील तर नक्कीच सांगा मला त्याचा खूप उपयोग होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा