सोमवार, ७ एप्रिल, २०१४

“वो सानिया मिर्झा है ये हमारी सानिया पठाण है ”


दुपारची चांगलीच गर्मी जाणवत होती. गोविंद अकुस्कर या तरुण मित्राशी नेट वर बोलत होतो. त्याच काळात माझा मोबाईल वाजला. “नमस्कार दादा, मी रमा बोलतेय.” “रमा ? कोण रमा ?” माझ्या बोलण्यातून सहज विचारण्यात आले. “दादा,मी रमा हजारी, लहान असताना प्रबोधिनीत यायचे. सध्या ME करते आहे.” “ओह रमा तू का ? काय म्हणतेस ?” दादा, आमच्या घरी लहानपणी मला सांभाळणारी आजी होती. तिची नात चार वर्षाची आहे. तिला जन्मा पासूनच दोन्ही हात नाहीत आणि एक पाय नाही. तिला शाळेत घालायचे आहे. कोणत्या शाळेत घालावे हे विचारण्यासाठी फोन केला.” “अशी मुलगी अंबाजोगाईत आहे ?” मी प्रश्न केला. “हो दादा” रमा खूप शांतपणे म्हणाली. मी तिला अनेक प्रश्न विचारले शेवटी आम्ही मुलीला भेटायचे ठरवले. रमा भर दुपारी १ वाजता पण यायला तयार होती. मग मीच म्हंटले आता नको आपण थोड उन उतरल्यावर जाऊ. साडेचार वाजता त्या मुलीला भेटायला जायचे ठरले. तो पर्यंत मनात खूप प्रश्न निर्माण झाले. दुपारची वाम कुशी घेण्यासाठी पडलो पण डोळा काही लागला नाही. बरोबर सव्वाचार वाजता रमाचा फोन आला की ती घरातून निघतेय. मी पण तयार होतो. आम्ही दोघ प्रबोधिनीच्या कार्यालयात भेटलो. रमाला मी अनेक प्रश्न विचारले. ती खूप शांतपणे सगळी उत्तरं देत होती. तिच्या त्या शांत स्थिर स्वभावाचे मला कौतुक वाटले. “ते मुस्लिम आहेत दादा.” “अग मग त्यांना चालेले का प्रबोधिनी.” “काहीच प्रश्न नाही. त्यांना शाळेत प्रवेश मिळणार हे ऐकूनच ख़ुशी होईल.” आम्ही दोघंही मग सानियाला भेटण्यासाठी तिच्या घरी म्हणजे सदरबाजारातील पेन्शनपुरा या भागात गेलो. घर सापडणे थोडे अवघड होते, रमा ने फोन करून सानियाच्या आजीला बोलावून घेतले. आम्ही सानियाच्या घरी पोहोंचलो. गल्लीच्या टोकाला अगदी आत मध्ये दोन पत्र्याच्या खोल्या. आम्हाला घरात नेण्यात आले. उंचीला खूप खुजे असलेल्या घरात आम्ही चटईवर बसलो. आजी, आई,काकू व आजोबा खेरीस बरेच अनेक छोटे मुलं पण होती. त्या छोटीला आईने आमच्या समोर आणले. तिला दोन अगदी खांद्या पासून नव्हते. एक पाय नव्हता. ती अभावित पण आमच्याकडे पाहात होती. “आदाब कर सानिया सर को आदाब कर” तिची आजी सानियाला सांगत होती. सानियाचे डोळे खूप बोलके होते पण तिला आम्ही अपरिचित होतो. “अरे सानिया बेटा तू कितनी प्यारी है ..अरे हम तो एक चीज भूल ही गये, आपको हमने कुच्छ भी नही लाया...क्या खायेगी आप ...चॉकलेट बडा वाला चॉकलेट..” तीने लाजत मान डोलावली व तिच्या बहिणी करवी चॉकलेट आणून घेतले. त्याच दरम्यान तिच्या आजीने आमच्यासाठी शीतपेय मागवली. “वो सानिया मिर्झा है ये हमारी सानिया पठाण है ” गमतीने तिची आई म्हणाली. सानिया खूप गुणी लेकरू. ९० % अपंग पण तिला शाळेत काही कुणी प्रवेश देत नव्हते. घरातील सर्व मुले शाळेत जाताना पाहून तिला पण शाळेत जावे वाटते. पण तिची जबाबदारी घायला कोणतीच शाळा तयार नाही. तिची आजी एक चांगल्या शाळेत सेविकेचे काम करते. मी तिला म्हंटले की त्या शाळेत प्रवेश द्यायला मी सांगतो. पण ती सरळ नको म्हणाली. प्रबोधिनीचे शिशुविहार थोडे दूर आहे. तिला कसे घेवून येणार. “ उसका गाडा है न उसगाडे पे लेके आयेंगे ” उत्साहात तिच्या सगळे घरचे लोक म्हणाले. “दादा ते करतील सगळे.” रमा, जिचे लग्न केवल अजून काहीच दिवसांनी आहे ती भर उन्हात माझ्या सोबत येते व उत्साहाने मला हे सांगते. “बहोत प्यारी लडकी है ये ...मां को कहती है तुम काम पे जाओ मै नही रोयेगी.” सानियाचे वडील दिवस भर फक्त टीवी पहात झोपलेले असतात. काही काम नाही करत. थोड्या वेळातच सानिया एकदम खुलली. तिने तिच्या पायांनी स्वतः चॉकलेट खाले. ती खुदुखुदू हसू लागली. मी तिचा फोटो काढला तर एकदम खुश होऊन स्वारी ती पहात होती. घरातील वातावरण एकदम खुश होते. आजोबा गफार सायकल रिक्षा चालवायचे. मला त्यांना पाहिले की मला लहानपणी शाळेत सायकल रिक्शेत नेणाऱ्या खांसाहेबांची आठवण झाली. मन एकदम तरल अवस्थेत होत. आम्ही जायला निघालो. घरातील सर्व महिला, बच्चे कंपनी व आमची सानिया सोडायला आम्हाला बाहेर पर्यंत आली. “आदाब कर सानिया सर को.” तिने आपला छोटा पाय उचलला व डोक्यापर्यंत नेत आदाब केला. मी टाटा म्हंटल्यावर तिने आपल्या त्या छोट्या पायांनी मला टाटा केला. ती तिच्या एकमेव पायाचा चांगला वापर करायला शिकली होती. रमाशी काही गोष्टींबाबत चर्चा करून आम्ही एकमेकाचा निरोप घेतला. काही दिवसात मी तुला प्रवेशा बद्दल सांगतो असे तिला म्हणालो. काल मी प्रबोधिनीतील शिशुशाळा ताईंच्या प्रशिक्षण वर्गात ओळख करून घेण्यासाठी गेलो होतो. काही चर्चा पण केली व त्यांना विचारले सानियाला शाळेत प्रवेश दिला पाहिजे की नाही. सगळ्यांनी एक मुखांनी सांगितले दिला पाहिजे. अभिजितला विचारले .... “नक्कीच दिला पाहिजे..आपण देणार नाहीत तर कोण देईल मग कोण ?.....आपल्या मुलांवर याचा खूप चांगला परिणाम होईल...” आम्ही सर्वांनी सानियाला आपल्या शिशुविहार मध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. “सानिया” आम्हाला खूप काही शिकवेल यात आम्हा सर्वांचे आजीबात दुमत नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: