अगदी संताना पण ज्याची ओढ सतत वाटत राहते ते म्हणजे बालपण. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मला या वयोगटाचे खुपच आकर्षण आहे. सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे या वयातील सर्वात मोठी ताकद म्हंजे विस्मरण क्षमता. विनाकारण आपला मेंदू या वयात नको त्या विचारांची कचरा कुंडी बनत नाही. काही झाले तरी लवकर आपण विसरून जातो. दुसरं या वयात असलेला उत्साह व कुतूहल. सतत काही तरी नवं करावे वाटते. काही तरी नवीन समजून घ्यावं वाटत. मला फार कमी क्षण लहानपणीचे आठवतात की मी घरी एकटा आहे आणि खूप कंटाळलो आहे. एका बॉलबरोबर मी व एका बाहुलीबरोबर माझी बहिण कित्येक तास खेळत बसायचो.आपलं मन रमवण्यासाठी आपण खुपच सक्षम असतो या वयात. रात्री झोपवताना आईनी सांगितलेली चिमणा चिमणीची, चतुर कावळ्याची,रामाची, हनुमानाची तर कधी श्रावण बाळाची गोष्ट कधीही old version ची वाटत नाही. भेद, वाद, प्रथा, परंपरा, अभिमान,मान, अपमान, मत्सर,हाव,चिंता यांपासून कोसो दूर असतो आपण. आपल्या शिक्षकांवर खुपच विश्वास असतो व निर्व्याज प्रेम असते. वय वाढत जातं व मग भेद, वाद, प्रथा, परंपरा, अभिमान, मान, अपमान, मत्सर,हाव,चिंता हे सर्व आपल्यावर हावी होतात व आपण मोठे होतो !!!!!स्वामी विवेकानंद म्हणतात ते आता पटते Be like child, not childish. Lead like a child.
अंबाजोगाई हे शिक्षणाचे माहेर घर. मला तर हे माझ्या स्वअनुभवाने पटले आहे. फारच उपद्व्यापी असल्याने आईच्या शाळेच्या वेळेनुसार माझ्या शाळेची वेळ असणे हे तिला, घरातील अनेक वस्तू सुखरूप राहाव्यात म्हणून व माझे हात,पाय व डोकेही दुखापतरहित रहावे म्हणून निकडीचे होते. त्यात आम्ही एका शाळेत टिकलो पण पाहिजेत ना ? अंबाजोगाईतील अनेक शाळांचा व शिक्षकांचा खास अनुभव आहे आमच्या पाठीशी !!
अंबाजोगाईतील बुरुजाजवळची मुशीरमंजीलची जिल्हापरिषद शाळा ही माझी पहिली शाळा. जिरे गल्लीतील मुक्त जीवन सोडून त्या बंदिस्त खोल्यात शिकणे म्हणजे मला माझ्यावर जबरदस्ती वाटे. मग आमचे असहकार आंदोलन सुरु. रडणे, आक्रस्ताळेपणा हे आमचे हत्यार. पहिल्या दिवसाच्या शाळेनंतर आम्ही हे हत्यार शाळेत जाण्याच्या विरुद्ध वापरले आणि विजयी पण झालोत. माझी आई माझ्यापेक्षा साहजिकच हुशार होती. तिने शाळेतील मोठ्या बाई मंकले बाईना सांगितले. मंकले बाईनी वरच्या वर्गातील चार धष्टपुष्ट मुलं घरी पाठवली. त्यांनी माझी चक्क उचलबांगडी केली. दोन मुलांनी पुढून आपल्या खांद्यावर माझे दोन्ही हात घेतले व उरलेल्या दोघांनी दोन्ही पाय त्यांच्या खांद्यावर घेतले. माझे तोंड आकाशाकडे. याला उचलबांगडी म्हणत. अश्या राजेशाही पद्धतीने व आमच्या पद्धतशीरपणे चाललेल्या सुरांच्या भोंग्यात आमची मिरवणूक जिरे गल्ली ते मुशीरमंजील शाळेपर्यंत काढण्यात आली. मंकले बाई व उचलबांगडी या खेरीस त्या शाळेतील फारश्या गोष्टी आठवत नाहीत. तसं फार काळ त्या शाळेत रहावे पण लागले नाही.
मला दुसऱ्या शाळेत घालण्याचे ठरवले. गुरुवार पेठेतील महिला मंडळाच्या बालक मंदिरात. अंबाजोगाईतील माई खेडगीकर, निर्मलाताई कुंबेफळकर, माझी पणजी कमलाबाई देशपांडे अश्या अनेक शिक्षित महिलांनी ते सुरु केले होते. नेण्यासाठी मस्त सायकल रिक्षा होता.खास लहान मुलांना शाळेत नेण्यासाठी.मागच्या दोन चाकांवर निळ्या रंगाचा पत्र्याचा डब्बा असे. त्यात बसण्यासाठी लाकडाचे बाक व बाहेर पाहण्यासाठी जाळीच्या खिडक्या. मला रिक्षा फारच आवडायची पण त्यात बसायचे म्हणजे शाळेत जाणे गरजेचे. रिक्षा, मधल्या सुट्टीतील खाऊ व रडत असताना जवळ घेऊन बसणारी जुबाताई म्हणजे अरुंधती लोहिया पाटील, ह्या स्मरणात राहिलेल्या आठवणी.
अंबाजोगाईत इंग्रजी माध्यमाची बालवाडी पहिल्यांदा सुरु केली ते अनिल होळसमुद्रेकरांच्या पत्नीने. आमची स्वारी मग त्या शाळेत दाखल झाली. आकर्षक नारंगी रंगाचा टायसहित गणवेष मला खुपच आवडला होता.शाळा होळसमुद्रेकरांच्या आदर्श कॉलनीतील त्यांच्या स्वगृहीच चाले. एके दिवशी मी लघुशंकेसाठी त्यांच्या स्नानगृहात केलो. कुणी बघेल म्हणून आतून कडी लाऊन घेतली. मोकळे झाल्यावर कडी काढायचा प्रयत्न करू लागलो. काही केल्या मला ती कडी निघेना. आत मध्ये जोरात भोंगा काढला. बाहेर सगळे आले पण काय करणार? शेवटी जर्मनचा तांब्या होता तो जोर जोरात कडी वर मारून १५ -२० मिनिटांनी मी बाहेर पडण्यात यश मिळवले. भयानक अनुभव होता तो. कधीही विसरता न येणारा.
माझ्या आयुष्यातील पहिली चोरी पण मी ह्या शाळेत केली. शाळेतील एका मुलीकडे एक लाल रंगाची लंबगोलाकार डबी होती. त्यात ती पाटीवर लिहिण्याच्या वेगवेळ्या पेन्सिली ठेवायची. ती डबी फारच मनात बसली होती. वेळ साधून डल्ला मारला. घरी घेऊन गेलो. आईने दप्तरात ती डबी पाहिली. माझा पराक्रम तिच्या लक्षात आला. ती काहीच म्हणाली नाही. पण दुसऱ्या दिवशी ती मुलगी प्रार्थनेच्या वेळी मला खूप चिमटे घेत होती. काहीच कळत नव्हतं. थोडया वेळानी ती डबी मी तिच्या जवळ पाहिली. माझे दप्तर पाहिले, त्यात डबी नव्हती. तिने काय जादू करून आपली डबी परत मिळवली हे बरेच दिवस कळले नव्हते.
अनिल होळसमुद्रेकरांनी अंबाजोगाई सोडले व आमची रवानगी झाली अंबाजोगाईतील सुप्रसिद्ध इंग्रजीचे शिक्षक गोटे गुरुजींच्या लिटील फ्लॉवर स्कूल मध्ये. शाळा बदलली, गणवेश बदलला. जुन्या वाड्यात ही शाळा चाले. वर्गात अनेक ओळखीचे मित्र होते. अजय खुरसाळे हा आधीपासून ओळखीचा होता. एक दिवस मी एका मुलीचे केस ओढले, का? ते आठवत नाही. मुलीने गोटे गुरुजींना सांगितले. पांढरे शुभ्र कपडे घालणारे गोटे गुरुजी खूप शिस्त प्रेमी.आपल्या कपड्याच्या विरुद्ध रंगाचा म्हणजे काळ्या रंगाचा लांब व गोल रूळ ते मारण्यासाठी वापरायचे.त्याची आम्हाला खूप भीती वाटायची. आमचे कर्म मुलीनी गुरुजींना सांगितल्यावर आम्हाला त्या रुळाचा चांगलाच प्रसाद मिळाला. तसे आमचे अनेक पराक्रम घरापर्यंत पोहोंचले होते. तसंते इंग्रजी माध्यम पण जड जातंय हे आईला लक्षात आले असेल.
आमची रवानगी छल्यावरच्या खोलेश्वर शाळेत झाली. घसरगुंडी व कोदरकर सरांनी वर्गात लक्ष नसल्याने पाठीत मारलेला गुद्दा व हृदयात बसलेली धडकी मात्र आठवते. काय माहित नाही पण थोड्याच दिवसात माझी रवानगी योगेश्वरी प्राथमिक विद्यालयात झाली. तिथे मात्र थोडा जास्त काळ काढला. जवळ पास ३ वर्ष. माझी तुकडी होती “ब”. अ तुकडीत हुशार मुलं असायची. मी त्यातला नव्हतो.
मुंडे गुरुजींच्या पिळदार मिशा, कपाळावरील अष्टगंध, त्यांची शिकवातानाची अदाकारी व शिक्षा करताना वापरलेली ठकुबाई मी कधीच विसरू शकणार नाही. खाँसाहेब व त्यांचा मुलगा मुसा हे आमचे रिक्षा वाले मामा. अगदी बाबा होते त्या वेळेपासून खाँसाहेबांच्या रिक्षातच आम्ही फिरायचो. ते निवृत्त सैनिक होते. बाबा आजारी असताना व त्यांचे निधन झाल्यावर त्यांनी आम्हाला खुपच मदत केली. माझ्या दहावीच्या परीक्षेपर्यंत त्यांनी मला घेऊन जाण्याचे व आणण्याचे काम केले. शाळेचे मुख्याध्यापक चौधरी गुरुजी, खूप उंच,पांढरे धोतर, त्यावर पांढरा शुभ्र नेहरू शर्ट व पांढरी गांधी टोपी व टोकदार नाक. गुरुजींचे व्यक्तीमत्व खुपच प्रभावित करणारे होते. मी शाळेत मस्त रमलो होतो. संतोष डागा, किरण अंबेकर,मनिष रुपडा असे अनेक जीवाभावाचे मित्र होते.
आईच्या शाळेची वेळ बदलली व मग माझी शाळा पण. अगदी आमच्या चौधरी गुरुजींच्या सारखेच दिसणाऱ्या संदीकर गुरुजींच्या कार्यालयात मला नेण्यात आले. खोलेश्वर शाळेतील कोदरकर गुरुजींचा गुद्दा चांगलाच लक्षात होता. मनात भीती होती. मी शाळा बदलण्यासाठी तयार नव्हतो. संदीकर गुरुजींनी पहिल्या भेटीतच त्यांच्या प्रेमळ बोलण्याने माझी भीती दूर केली. ४ थीला मी छल्या वरच्या, कवठाच्या झाडाजवळच्या खोलेश्वर शाळेत जाऊ लागलो. सुहास सेलूकर उर्फ उक्या, आनंद कुलकर्णी उर्फ अण्णा, शरद भोसले उर्फ शऱ्या हे सारे माझे जिगरी दोस्त. गणित शिकवणारे क.र.जोशी गुरुजीनी मी पहिल्यांदा गांधीजींवर केलेलं भाषण ऐकून दिलेली शाब्बासकी अजून लक्षात आहे. त्या बरोबर भाषण करताना लटलटणारे पाय पण ! मराठी शिकवणाऱ्या बालासाहेब गुरुजींनी माझे अक्षर मात्र चांगले करून घेतले. ते खूप रागीट होते. माझ्या शुद्धलेखनाच्या वहीतील एका लिखाणावर त्यांनी दिलेले छान हा शेरा माझ्या तोपर्यंतच्या शिक्षण यात्रेतील सर्वात मोठा बहुमान होता.
५ वीला मग घराजवळील खोलेश्वर माध्यामिक शाळेत जाऊ लागलो. जून मध्येच विषाणू संसर्गामुळे एक महिना शाळेत उशिरा गेलो. ५ वी ते ७ वी पर्यंत माझ्या अनेक क्षमता विकसित झाल्या. मुळे गुरुजींमुळे चित्रकला, केशव मुंडे व महामुनी गुरुजींमुळे खेळ, भारतराव धर्मराव गुरुजी व धाटबाईंमुळे निबंध लेखन व वाचन, वि.वा देशपांडे गुरुजी व हेबाळकरबाईंमुळे विज्ञाना बद्दलचे कुतूहल व इतिहासाबद्दलची अभिरुची. पण या सोबत गाण्याच्या एका स्पर्धेत एका गुरुजींनी “गर्दभ गायन” म्हणून मारलेल्या शेऱ्यामुळे मी कधी गायनाकडे वळलो नाही. पुढे देगलुरकर गुरुजी आले. त्यांच्या मुळे थोडं गाणं ऐकायला, आवडायला लागले. “आकाशी झेप घे रे पाखरा” हे त्यांच्या आवाजातील गाणे मी कधी विसरू शकत नाही. पुढे ते माझे जगण्याचे तत्वज्ञान बनले. खूप तयारी करूनही कथाकथन स्पर्धेत बोलण्यासाठी उभे राहिल्या बरोबर भरलेली थरथरी,मेंदूला आलेल्या मुंग्या व सर्वांसमोर पळून जावं लागल्याने अगदी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षापर्यंत स्टेजवर बोलण्याची हिम्मत केली नाही.
हे सर्व असले तरी प्रचलित शिक्षणात जे फारच गौरवाचे असते ते चांगले गुण मिळवण्याची क्षमता काही माझ्यात निर्माण झाली नाही. आमचे लक्ष अभ्यास करताना एका ठिकाणी कधीच नसायचे. आई अभ्यास घेण्यासाठी बसली तर चीडचीड व्हायची तिची. मार पण खूप खाल्ला.अगदी पहिली पासून सर्व प्रकारच्या शिक्षकांच्या शिकवण्या लावल्या. फक्त एकट्याला शिकवण्या पासून ते शाळेतील शिक्षकांच्या घरी जाऊन शिकण्यापर्यंत. काही प्रगती नाही. पालथ्या घडयावर पाणी. मला कधीही फार चांगले गुण मिळाले नाहीत पण प्रथम श्रेणी मात्र कधी चुकली नाही. अभ्यासाच्या नावानी बोम्बच होती आमची.
७ वीला बोर्डाची परीक्षा. आईने तिच्या परीने सर्व गोष्टी केल्या पण मी काही अभ्यास करत नव्हतो. २ किलोमीटर वर असणऱ्या तांदळे गुरुजींकडे पण शिकवणी लावली. परिवहन मंडळाच्या शहर वाहतूक बसनी मी २ रुपयाचे तिकीट काढून जायचो. फार काही बदल घडला नाही. शेवटी सततचे लक्ष राहवे व थोडया धाकानी अभ्यास करावा म्हणून माझी रवानगी लतामावशी कडे करण्यात आली. मावशी माझ्या पणजोबांच्या वाड्यात राहायची. तिथे महेश कानडे नावाचा योगेश्वरी मध्ये शिकणारा खूप हुशार मुलगा राहायचा. खूप चांगला अभ्यास करायचा. आता पर्यंत माझे मित्र माझ्या सारखेच मैदानावर रग जिरवायचे. पुस्तक आणि अभ्यास हे आमचे शत्रू. महेशच्या संगतीत राहून चांगला अभ्यास करेल असे मावशीला वाटले. त्याच्या बरोबर मला तिने जवळच नाना जोशींच्या वाडयात रहाणाऱ्या व योगेश्वरीशाळेत शिकवणाऱ्या जोशी गुरुजींकडे शिकवणीला पाठवले. गुरुजींना सर्व जण वि.र.गुरुजी म्हणायचे. खोलेश्वर मधील क. र. जोशी गुरुजींचे ते लहान भाऊ होते.
अंबाजोगाईतील ७ वी बोर्ड व शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारी करून घेणाऱ्यांत वि.र.गुरुजींचे नाव फार मोठे होते. खूप हुशार व मोठ्या लोकांची मुलं मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे यायची. मी महेश बरोबर त्यांच्या कडे जाऊ लागलो. खोलेश्वरचा मी एकटाच होतो व गुणाच्या टक्केवारीत सर्वात खालून पहिला ! गुरुजी शिकवायचे कमी पण मुलांनी समस्या विचाराव्यात व त्यांचे ते निराकरण करायचे. मुलं पण अभ्यास करणारी होती. त्यामुळे त्यांना अनेक न सुटलेली गणितं असायची. मला मात्र फार समस्या नसायच्या.कधी तरी आपण पण विचारले पाहिजे म्हणून काही गणितं करायचा प्रयत्न केला तर प्रत्येक गणित अडायला लागले. पहिल्यांदा मला काहीच समजत नव्हते. काही गोष्टी हळूहळू लक्षात यायला लागल्या. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र वापरून क्षेत्रफळ काढायला पहिल्यांदा शिकलो.
शिष्यवृत्ती परीक्षा जवळ आल्याने महेश व त्याचे मित्र त्यांचा ते अभ्यास करायचे. गुरुजींच्या घराच्या देवळी मध्ये. २०-२५ शिष्यवृत्ती परीक्षेचे पुस्तके होती. त्यातील पुस्तकातून ते अभ्यास करायचे. गुरुजींचा चुलत भाऊ विठ्ठल, अजय खुरसाळे, महेश सबनीस असे अनेक जण असायची. मी पण ७ वी च्या गणिताच्या शिकवणीला बसण्यापेक्षा महेश व मित्रांबरोबर ७ वी शिष्यवृत्तीचा अभ्यास करायला लागलो. गणितात रस निर्माण होत होता.
७ वी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला. मला सेकंड क्लास मिळाला. परत माझी शाळा बदलली.योगेश्वरी माध्यमिक मध्ये “G” तुकडीत प्रवेश मिळाला. माझ्या आयुष्यात एक मोठ स्थित्यंतर होत ते. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत मात्र मी पास झालो. गुणवत्ता यादीत नाही आलो पण गणितात मला ३५ गुण मिळाले होते. चवथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मी गणितात नापास होतो. ७ वी चा निकाल असो किवा गुरुजींच्या घरी बसून हुशार मित्रांबरोबर केलेला अभ्यास या मुळे मला स्वतः हून अभ्यास करावा वाटायला लागले. मी खूप अभ्यास करायला लागलो व आधी वर्गातून, मग शाळेतून पहिला, दुसरा यायला लागलो. मी खूप हुशार मुलगा झालो. दहावीला गणितात १५० पेकी १४८ तर १२ वीला १०० पेकी ९९ तर इंजिनिअरिंग च्या दुसऱ्या वर्षी Maths-3 मध्ये १०० पेकी ९२ गुण मी घेतले. पुढे आयुष्यात अनेक स्थित्यंतरे होत गेली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा