शुक्रवार, ९ मार्च, २०१२

विशेष विभागीय समाज कल्याण अधिकारी वर्ग १

सकाळची दहाची वेळ होती. प्रबोधशाळा संपली होती. मी व अमोल पाटणकर गप्पा मारत बसलो होतो.शिशुविहार सुरु होण्यासाठी आजून एक तास होता. अचानक लगबगीने एक उंच व्यक्ती व त्यांच्या बरोबर एक बुटकासा तरुण कार्यालयात आला. पादत्राणे बाहेर ठेऊन आत येण्याची पद्धत प्रबोधिनीत होती. तशी सूचनाही बाहेर लिहिली होती. पण येणारे इतक्या लगबगीने आले कि त्यांनी सूचना न वाचताच चपलांसह प्रवेश केला. तसं आता आम्हाला हे सवयीचे झाले होते. मी विनंती पूर्वक त्यांना पादत्राणे बाहेर काढायला सांगितले. कुठल्याही प्रकाचे आढेवेढे न घेता त्यांनी क्षमा मागून पादत्राणे बाहेर सोडली.

“मी जगदीश जाजू ,लोकमतचा अंबाजोगाईतील वितरक आहे.” श्री जाजूनी स्वतःची ओळख करून दिली.
दोघंही माझ्या समोर बसले. जगदीश जाजू म्हणजे अंबाजोगाईतील एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व. त्यांची नीटशी ओळख व्हायला मला बराच काळ लागला. सतत कुठल्याश्या कामाच्या गडबडीत असतात, जाजू साहेब! चाळीसच्या आसपास वय, गव्हाळ रंग, मध्यम बांधा, तेल लाऊन चोपून काढलेला केसांचा भांग,बोलके पण चाणाक्ष डोळे. अंबाजोगाईतील सर्वात जास्त विक्री होणारे वर्तमान पत्र म्हणजे लोकमत.जाजू मुळचे कळंबचे, पदवी पर्यंतचे शिक्षण नांदेडला झाले. पुढे CA ची आर्टिकलशिप करण्यासाठी ते पुण्याला गेले. पण वडिलांना हृदयविकाराचा झटका आला व जगदीशभाऊंना शिक्षण सोडून कळंबला येण क्रमप्राप्त होत. वडिलांकडून सामाजिक कामाचा वारसा त्यांना मिळाला होता. जगदीशभाऊंचे वडील राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत तयार झालेले. कळंब मधील अनेक चळवळींचे नेतृत्व त्यांनी केलेले. आपल्या लेखणीद्वारे लोकमतचा वार्ताहर म्हणून ते काम करायचे. जगदीशभाऊंनी कळंब मध्येच शिकवणी वर्गाला सुरुवात केली व आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वतःवर घेतली. बेरोजगारांची संघटना, माहेश्वरी समाजाचे कार्य अश्या अनेक कामांशी त्यांनी स्वतःला जोडून घेतलं. M.Com करण्यासाठी ते अंबाजोगाईला आले. शेवटच्या वर्षाला असताच त्यांना अंबाजोगाईतील लोकमतच्या वितरणाची जबाबदारी मिळाली.

सोबत आलेला तरुण,वय वीसच्या जवळपास असावे. बुटका पण शरीराने धडधाकट, काळासावळा रंग, केस विस्कटलेले, चेहेऱ्यावर घामाचे ओघळ स्पष्ट दिसत होते, बहुधा आंघोळ पण केलेली नसावी. मी नजर त्याच्याकडे फिरवली तोच त्याने मान खाली घातली. खुपच कावराबावरा वाटत होता. त्याची गोंधळलेली स्थिती सहजच त्याच्या देहबोलीतून व्यक्त होत होती. त्याचे दोन पाय जवळ व हात थोडे थरथरतच एकमेकांशी चाळे करत होते. एखादा अतिशय नवखा व घाबरलेला,गोंधळलेला तरुण कुठल्याही पूर्व तयारी शिवाय पहिल्यांदाच मुलाखतीसाठी बसल्यावर जशी अवस्था होते तश्याच गोंधळलेल्या अवस्थेत तो बसला होता.

“हा बलभीम शिंदे, आवसगाव वाकडीचा. आमच्याकडे पेपर टाकण्याचे काम करतो. सध्या कॉलेजात शिकत आहे. त्याला MPSC करायचं आहे. तुमच्या कडे त्याची तयारी करून घेतली जाते की ? घरची परिस्थिती बेताचीच आहे. पण पोरगा मेहनती आहे. आपल्याकडे चांगले मार्गदर्शन होते हे कळले म्हणून घेऊन आलो.” जगदीशभाऊनी बलभीमची ओळख मला करून दिली.

पेपर टाकण्याचे काम करत शिकतो म्हटल्या बरोबरच बलभीम बद्दल माझ्या मनात आदर निर्माण झाला.त्याच्या सारख्या मुलाचं मला फारच कौतुक वाटे. सकाळी चारच्या आसपास, पांढरपेश्या वर्गातील लोकांची आमच्या सारखी मुले ज्यावेळी गुलाबी थंडीत, पहाटेची गोड स्वप्न पहात आपल्या उबदार पांघरुणात व मऊमऊ गादीवर ज्यावेळी झोपलेली असतात त्यावेळी हि मुल बसस्थानकावर कुडकुडत वर्तमानपत्राच्या गाडीची वाट पहात उभी असतात. गाडी साडेचारच्या सुमारास आली कि आपल्या वाट्याची पेपर घेऊन ती सायकलवर निघतात. प्रत्येक घरात आजची ताजा खबर पोहोचवत. कशी एवढ्या सकाळी हि मुलं उठत असतील? सकाळचा अभ्यास खूप चांगला म्हणून सकाळी उठलं पाहिजे व अभ्यास केला पाहिजे हे लहानपणा पासूनच मी ऐकत आलो. गजराच घड्याळ पण फारच उत्साहानी आईने आणलेलं. गजर वाजून जायचा व मग आईचा गजर सुरु व्हायचा...

“मुन्ना ऊठ.....अरे ऊठ की गजर होऊन किती वेळ झाला.”

“आई अजून फक्त पाचच मिनिट” असे म्हणून आमची स्वारी पुढच्या अर्ध्या तासासाठी परत निद्रा देवीच्या आधीन.

“आता उठतोस की पाणी टाकू?” अशी आईची धमकी दररोज एकदोनदा तरी सवयीची झाली होती. गजराचे घडयाळ

नित्य नेमाने आपले काम करायचे. आई पण बरेच सारे प्रयोग करून थकली पण .....”.मुन्ना नही बदला !”

बलभीम सारखे मुलं पहिले की निद्रादेवते समोरची माझी दुर्बलता मला लाजवते. घरातील परिस्थिती प्रतिकूल असताना शिकण्यासाठी व स्वतःच्या मुलभूत गरजांसाठीचा संघर्ष अश्या प्रकारच्या दुर्बलतेवर सहजच मात करायला शिकवतो. उठण्यासाठी त्यांना गजराचे घडयाळ लागत नाही किंवा आईची धमकी. थंडीत उठल्यावर गरम चहा पण आयता मिळत नाही. सकाळी चार वाजता बसस्थानकावर जायचे म्हटल्यावर साडेतीन वाजताच उठायचे. प्रातर्विधी झाले की सायकलला टांग मारायची व बसस्थानक गाठायचं. बलभीम हे काम गेले तीन वर्ष करत होता. तो आता तिसऱ्यावर्षात शिकत होता. त्याचा मित्र विकास बोराडे यांनी जगदीश जाजू यांची ओळख करून दिली.
बलभीम सारखे पंचेविसेक मुलं त्यांच्या कडे वितरणाचे व मासिक बिल जमा करण्याचे काम करायचे. सकाळी ४ ते ८ येवढा वेळ काम करावे लागे. रविवारी वसुलीचे काम. पाचशे साडेपाचशे रुपये मिळायचे मग आठ नंतर आपापल्या महाविद्यालयात हे मुलं जायचे.

“फीसच कसे?” जगदिशभाऊनी बलभीमसाठीच नव्हे तर त्याच्या सारख्या अनेक परिस्थितीशी लढणाऱ्या मुलां समोर असणाऱ्या यक्ष प्रश्नाची विचारणा केली.

“त्याची काळजी करू नका. आजपासून ती काळजी माझी” मी म्हणालो.

बलभीमला MPSC गटाची माहिती दिली व त्यास त्यामध्ये सहभागी व्हावयास सांगून आम्ही उठलो.

त्याच्या डोळ्यात थोडी अस्वस्थता अजून जाणवत होती.काही दिवसांपूर्वी बलभीमला मी फोन वर याची आठवण करून दिली. त्यावेळी तो मला म्हणाला, “दादा! तो दिवस माझ्या आयुष्यातील turning point होता.”

बलभीमचे वडील अच्युतराव शिंदे व आई सुशीलाबाई. वडिलांना बलभीम, भाऊ म्हणायचा व आईला आबई. भाऊ १० वी पर्यंत शिकलेले. परंतु परिस्थिती मुळे ते पुढे शिक्षण घेऊ शकले नाहीत. भाऊ व आबईला पाच मुलंच. भाऊना वडिलोपार्जित ८ एक्कर जमीन.त्यांच्या कुटुंबाचे व्यवस्थित चालण्यासाठी आठ एक्करची कोरडवाहू जमीन पुरी पडणारी नव्हती. मांजरा कालव्यावर एका कंत्राटदारा कडे ते मुकद्दम म्हणून काम करायचे. त्याचे त्यांना महिन्याला तीन हजार रुपये मिळायचे. शिक्षणाचे महत्व भाऊना उमजले होते. सर्व मुलांनी शिकून चांगल जीवन जगाव हि त्यांची मनोमन इच्छा. बलभीम दुसऱ्या क्रमांकाचा. भाऊ व आबई त्याला बापू म्हणायचे. गावातल्याच जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शाळेत तो जाऊ लागला. अभ्यासात प्रगती दिसल्याने त्याला साळेगावला पुढच्या शिक्षणासाठी आबईच्या आईकडे म्हणजे बलभीमच्या आजीकडे त्याला ठेवण्यात आले.

दहावी पर्यंत तो आजीकडेच राहिला. फार क्वचितच तो वाकाडीला यायचा. तो शाळेत पण चांगलाच रमला होता. दहावीची परीक्षा देऊन तो वाकडीला परत आला.मोठ्या भावाला, भाऊनी होळला आत्याकडे ठेवल होत. दहावी पर्यंत तो कसा बसा शिकला व नंतर नौकरीसाठी मुंबईला गेला. घरच्या परिस्थितीची चांगलीच जाणीव बलभीमला आता होऊ लागली. भाऊंचे व आबईचे राबणे तो जवळून पाहात होता. एव्हाना प्रचलित शिक्षणामुळे अनेक जणान मध्ये निर्माण होणाऱ्या बोथट भावनानी त्याच्या सुशिक्षित मेंदूचा ताबा घेतला नव्हता.आपण पण काही केलं पाहिजे म्हणून आत्तापर्यंत पेन आणि पुस्तक घेतलेले त्याचे हात आता विहिरीचा गाळ उपसण्याच्या कामाला लागले. दिवसभर गाळ उपसल्यानंतर त्याला भाऊंच्या व आबईच्या कष्टांची किमंत कळू लागली व त्याबरोबर कुठलेही कष्ट पडलेतरी शिक्षण घेऊन हि परिस्थिती पालटण्याची उमेद पण वाढू लागली.

शारीरिक श्रमाचा अनुभव, माणसाला अधिक उन्नत व ध्येय प्रवर बनवतो हे मात्र खर. महात्मा गांधीनी म्हणूनच शरीर श्रमाला आपल्या साधनेतील एकादश व्रतात स्थान दिलेलं आहे. शरीरश्रमा मुळे तयार झालले मजबूत मनगट लेखणी जास्त घट्ट हातात धरील, पण आपल्या ग्रामीण भागातील परिस्थिती फारच वेगळी दिसते. शरीर श्रमातून आलेला घामाचा पैसा गुटखा, तंबाकू द्वारे घोडावतांच्या जयसिंगपुरला हवेल्या व मटक्याच्या बुकी चालवणाऱ्यांचे बंगले उभे करतो तर हातभट्टी चालवणाऱ्याच्या मदतीने पोलीस मामांच्या गावाकडच्या केळीच्या बागा फुलवतो. काम करताकरता लेखणी सुटून जाते व बलभीम सारख्या अनेक बापूच्या जीवनाला, जिवंत राहण्याच्या साधनेतच ग्रहण लागते. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा त्यांचा प्रवास हा अंधाराकडून अधिक अंधाराकडे सुरु होतो. स्वातंत्र्या नंतर परदेशी मदतीने सर्वशिक्षा अभियान राबवणारे आमचे बापूंचे अनुयायी हे आमच्या गावागावातील बापूंचा व्रत म्हणून नाही तर परवडत नाही म्हणून आजही चालत असलेला जीवन संघर्षातील उपवास कधी थांबेल यासाठीचा मदतीचा, आधाराचा हात देणार आहेत का? आता ह्या हाताला फक्त घेण्याचीच सवय लागली आहे काय ?
दहावीचा निकाला लागला. बलभीमला चांगले गुण मिळाले व त्याच्या आयुष्यातील एका वेगळ्याच संघर्षाला सुरुवात झाली. ११वीत कोणती शाखा घ्यायची? १० वर्ष शाळेत अनेक विषयांचा अभ्यास केल्यावर,दर दोन महिन्यांनी एखादी परीक्षा देऊनही त्यात परत ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षाना सामोरे जाऊन विद्यार्थ्याला आपण पुढील शिक्षणासाठी आपल्या क्षमतेस पूरक अशी शाखा व विषय शोधता का येत नसतील ? हि समस्या फक्त बलभीम सारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या मुलांची नाही तर शहरी भागात अनेक विषयांचे शाळेतील व शाळाबाहेरील तज्ञ मार्गदर्शन घेऊन चांगले गुण मिळवणाऱ्या भल्याभल्यांच्या मुलांची पण प्रकर्षानी दिसते. आपल्या भावी आयुष्याची दिशा हि आपल्या क्षमतेनुसार निवडता न येता प्रचलित “धोपट मार्गा सोडू नको” या ठोकताळ्या ने ठरवणे हि आपल्या शिक्षण पद्धतीतील मोठी शोकांतिका नाही का ? बलभीम पण याला अपवाद नव्हता व त्याचे नातेवाईकपण. डॉक्टर, इंजिनिअर तयार करणाऱ्या शास्त्र शाखेतच हुशार मुलांनी प्रवेश घेतला पाहिजे हा एक प्रस्थापित नियमच आहे.बलभीमनी पण शास्त्र शाखेतच प्रवेश घेतला पाहिजे असा जाणत्या लोकांचा आग्रह होता. एकंदरीत शाळेतील या विषयांचे शिक्षण व आपल्या विकसित झालेल्या क्षमतांचा अंदाज बऱ्या पेकी बलभीमला होता पण जाणत्या लोकांच्या आग्रहाला विरोध करण्याचे धैर्य मात्र त्याच्या कडे नव्हते. त्यामुळे त्याला स्वतःला इच्छा नसताना शास्त्र शाखेत प्रवेश घ्यावा लागला. फाजील आत्मविश्वासामुळे अनेकाचे आयुष्य अपयशी होताना मी पहिले आहे पण सार्थ आत्मविश्वास विकसित न झाल्या मुळे आयुष्यात जास्त काळ वैशाख वणवा अनुभवणारे संख्येनी जास्त पहावयास मिळतात. खर तर शिक्षणाचा मूळ उद्देशच हा सार्थ आत्मविश्वास निर्माण करणे हा आहे.

बलभीम, तालुक्याच्या सायन्स कॉलेजला जाऊ लागला. महिना झाला, सहामहिने झाले वर्षपण झालं शिकवलेल उद्या समजेल या भावनेनी तो मेहनत करत होता. अकरावीत Home examination. बलभीम आपल्या शिक्षकांच्या कृपेनी पास झाला. दररोज साळेगाव वरून ST बसनी तो जाणयेण करायचा. मासिक पास मुळे ते स्वस्तात व्हायचे. ST चा येण्याचा व जाण्याचा वेळ निश्चित नव्हता. बराच वेळ वाटपहाण्यातच जायचा. इंग्रजी तस त्याच बेताचच. सगळे विषय इंग्रजीतून शिकायचे म्हंजे त्याच्यासाठी हा भगीरथ प्रयत्नच होता.
बारावी सुरू झाली. बलभीमची प्रगती तशी बेताचीच होती. काही लक्षातच येत नव्हत मग लक्षात कस राहणार? घुसमटलेल्या गत त्याची अवस्था होती. नियती पण अश्यावेळी फार जास्तच परीक्षा पहात असते आणि तिचा घाला हा फारच जिव्हारी लागतो. याच काळात आजीच निधन झाले. आजीने त्याला दुधावरच्या साई प्रमाणे जपल होत. गेले ८ वर्ष जेवणा खाण्यापासून कपडे धुण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आजी करायची. तिचे मायेचे व आधाराचे छत्र अस एकेकी हरवाल्यानी बलभीम प्रचंड हादरला होता. या धक्क्यातून त्याला बाहेर यायला खूप वेळ लागला. बाहेर येताच समोर १२ वीची मुख्य परीक्षा फारच जवळ आलेली. सकाळचा स्वयंपाक करून बलभीम कॉलेजला जायचा.

संध्याकाळचा स्वयंपाक आजोबा करायचे.सर्वातून व्हायचे तेच झाले. बलभीम १२ वीला नापास झाला.
पास नापासाचा हा खेळ अनेकांच्या आयुष्यात चालत असतो पण हे ना-पास पण मात्र बापूच्या जिव्हारी लागल. त्याचा स्वतः वरचा विश्वास पार खचला.

“या पुढे शिकायचं नाही, मी शेती करतो.” बापूनी भाऊला सांगून टाकल.

एक नव्या आयुष्याला व एका नव्या शिक्षणाला सुरुवात झाली. भाऊनी लहानपणा पासूनच शेतीकामा पासून बापूला दूर ठेवल होत. शेतीतील फारसे ज्ञान त्याला नव्हत. शाळा आणि अभ्यास एवढंच त्याच आत्ता पर्यंतच विश्व होत. नागरणी,मोगडनी, बियाण्यांच्या जाती,फवारणी,खते या बाबत तो शिकू लागला. फक्त आपल्या शेतात काम करून भागणार नाही हे कळल्यावर त्याने दुसऱ्यांच्या शेतात ७० रुपये हजरीने जायला सुरुवात केली.शाळेत गणित मनापासून शिकल्या मुळे रोजचा रोज जमाखर्च तो मांडत होता. पावसाच्या थेंबावर कोरडवाहू शेती करायची. फारच जिगर लागते. पावसाचा काही भरोसा नाही. उडदाचे पिक आल्यावर उडीत बडवण्याच काम मोठ्या त्रासाच. दिवसभर सोट्याने बडवावे लागे. अंग नी अंग दुखायचं रात्री. मग कन्हतच झोप लागायची.

१० वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात शेतीला फारसे स्थान नाही. मराठवाड्यातील काय देशातील अनेक लोक १० वी नंतर शेती करतात.थोड फार शेतीला ग्रामीण भागातील शाळेत स्थान दिल तर बरच काही होऊ शकेल अस वाटत. वर्षाच्या शेवटी जमा २५,००० रुपये व खर्च १५,००० रुपये म्हणजे दहा हजार रुपये फायदा. अशी शेती करून फायदा थोडा फार वाढेल. चांगल उत्पन्न मिळवायचे असेल तर पाण्याची व्यवस्था करावी लागेल. म्हणजे जवळपास लाख रुपयांची सोय हे शिंदे कुटुंबाना करणे अशक्य कोटीतील होते. बलभीम नव्या मोसमा मध्ये नव्याने विचार करायला लागला.
“भाऊ, अंबाजोगाईला जाऊन टायपिंग शिकाव म्हणतो.....कुठतरी कारकुनाची नौकरी तरी मिळेल.” बलभीम त्याच्या वडिलांना म्हणाला.

भाऊनां बदलते जग माहित होते ते म्हणाले, “बापू, फक्त टायपिंग शिकून नाही चालणार. आता कॉम्पुटर आल्यात .....ते शिकावे लागेल.”

अंबाजोगाईत संगणकाचे धडे बलभीमने सुरु केले. ST चा पास काढला. त्याच अंबाजोगाईत येणजाण सुरु झालं. पण उन्हाळ्यात पास बंद. शेवटी अंबाजोगाईत खोली करणे भाग होते. त्याबरोबरच मग स्वयंपाक करणे कारण खाणावळ परवडत नव्हती. संपत मदने नावाचा रूम पार्टनर त्याला मिळाला. थोड्यादिवासात त्याचं व बलभीमच चांगल जमल.

“शिंदे, तुम्ही खूप मेहनत घेता. मला वाटत तुम्ही १२ Commerce ला परत riadmission घ्या. चांगला अभ्यास करा. तुम्हाला नक्की D.Ed ला प्रवेश मिळेल.” संपत मदने खूप विश्वासानी सांगे.
पण बलभीमच मन काही तयार होत नव्हत. शेवटी एक दिवस तो भाऊनां म्हणाला, “मी परत १२ वी करतो. इथ शिक्षण चांगल आहे. मार्गदर्शन पण भेटेल. फुले वसतिगृहात राहिलो तर खर्च पण कमी लागेल. मेहनत घेतो.”
“आता कश्याला परत १२ वी, फक्त राहिलेला इंग्रजी विषय काढून टाकावा ?” भाऊ थोड नकारात्मकच बोलले.
“या वेळी मी चांगली मेहनत घेतो. मला D.Ed ला नक्की प्रवेश मिळेल. एकदा D.Ed झाल की मग प्राथमिक शिक्षकाची नौकरी नक्की मिळते.” बलभीम भाऊनां विश्वास देत होता.

एक नवी आशा घेऊन तो अभ्यासाला लागला. रोजच कॉलेज व अभ्यास चांगल चालले होते. दिवाळी पर्यंत चांगला अभ्यास पण केला. दिवाळीनंतर मात्र एक वेगळच संकट समोर आल. प्राध्यापकांचा संप सुरु झाला. बराच अभ्यासक्रम राहिला होता. बाहेर शिकवणी वर्ग लावणे काही परवडणारे नव्हते व त्यात त्याचं शिकवण संपून सराव सुरु झाला होता. एव्हाना अश्या संकटांनी भेदरून न जाता निकरानी लढा द्यायची सवय बलभीमला झाली होती.त्याचे कष्ट सुरूच होते. परीक्षा चांगली झाली.निकाल पण चांगला लागला ६९% गुण मिळाले. मागच्या वर्षी या गुणांवर बऱ्याच मुलांना D.Ed ला प्रवेश मिळाला होता. बलभीम खुश होता. अनेक जिल्हातील अगदी, ठाण्यापासून गोंदिया पर्यंतच्या सर्व D.Ed कॉलेजमध्ये प्रवेशअर्ज भरला. प्रवेश प्रक्रिया सुरु झाली. परत नियतीचा खेळ सुरु झाला.प्रवेश यादी बलभीम पर्यंत यायच्या आधीच एकानी बंद व्हायची. यशाचा लपंडावाचा खेळ अजूनही बलभीम सोबत चालू होता. दोन वर्ष त्याने प्रवेश मिळण्यासाठी खटाटोप केला पण यश काही नाही आले. मन सैरभैर होत होत. परत शेती करावी हा विचार मनात येत होता. पण भाऊनां आता काय सांगणार? अनेक प्रश्न घेऊन एक एक दिवस जात होता. अपयश आल्यावर पोटाची भूक थोडीच कमी होणार ? जिवंत राहण्यासाठी काहीतरी करणे भाग होते. शेवटी विकास बोराडे या मित्रांनी पेपर टाकण्याची कल्पना बलभीमला सांगितली. याच काळात त्याची भेट लोकमतचे अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी श्री सुदर्शन रापतवारांशी झाली. बलभीमचा प्रामणिकपणे कष्ट करण्याचा स्वभाव त्यांना भावला. लोकमतच्या कार्यालयात त्यांनी त्याला काम दिले. आता पेपर टाकण्याचे ७०० रुपये व कार्यालयीन कामाचे ५०० असे एकूण १२०० रुपये त्याला मिळत होते. त्यात त्याचे भागत होते. धर्मापुरीच्या महाविद्यालयात त्याने External म्हणून प्रवेश पण घेतला. लोकमत कार्यालयात सर्व वर्तमान पत्र यायचे. नियमित वर्तमान पत्र वाचण्याची सवय बलभीमला लागली. आता त्याच्या बोलण्याचा ग्रामीण ढंग पण शहरी झाला होता. यातूनच त्याच्या मनात MPSC परीक्षा देण्याचा विचार पक्का होऊ लागला. मोकळ्या वेळात तो एका मार्गदर्शन वर्गात पण जाऊ लागला पण फार काळ तिथे तो रमला नाही. श्री रापतवारांचे दोन मुल प्रबोधिनीत अभ्यास वर्गाला यायचे. प्रबोधिनीत चालू असणाऱ्या MPSC अभ्यास गटा बद्दल त्यांना चांगली माहिती होती. बलभीमला त्यांनी प्रबोधिनीत जाण्यासाठी सांगितले. बलभीम चा प्रबोधिनीत प्रवेश झाला.

किरण, मुकुंद, महादेव किरवले, मोरेश्वर, सय्यद रफिक, लता फड,बालाजी, नामदेव, नवनाथ भताने असे एकूण १५ जण नियमित MPSC चा अभ्यास करत होते. बलभीम पण त्यांच्यात सामील झाला. थोडया काळातच तो सगळ्यान मध्ये मिसळून गेला. MPSC च्या अभ्यासा बरोबरच तो प्रबोधिनीच्या इतर उपक्रमातही सहभागी होऊ लागला. रोजची उपासना, चर्चा सत्र या मध्ये सुरुवातीस त्याचा फक्त मूक सहभाग होता. एकंदरीत प्रबोधिनीचे व त्याचे एक नाते बनायला सुरुवात झाली.MPSC ची पूर्व परीक्षा जशी जवळ येऊ लागली तसं त्याचा अभ्यास ही वाढला. वेळ खूप कमी होता. लोकमतचे काम त्याला सोडणे भाग होते.

उपासने नंतर बलभीम बोलायला थांबला. सगळे गेल्यावर त्याने त्याच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना मला दिली. जवळ जमा झालेले पैसे व एकूण खर्च पाहता केवळ दोन ते तीन महिने जातील अशी बेताची स्थिती होती.
“दादा, मला प्रबोधिनीत राहता येईल का ? त्यामुळे माझे खोली भाडे वाचेल.” बलभीम नी मला विचारले.
त्याची एकूण परिस्थती पाहता मी नाही म्हनणे अशक्यच होते. तो आता प्रबोधिनीचा निवासी सदस्य झाला. अमोल बरोबर त्याचे चांगलेच जमले होते. माझ्या आई बरोबर त्याचे विशेष सूर जमले. साध्यासाध्या गोष्टीन मध्ये बलभीमची तिला खूप मदत व्हायची आणि बलभीम अगदी आपुलकीने व तत्परतेनी ती करायचा. तो हळूहळू आमच्या कुटुंबातील पण सदस्य झाला.

पूर्व परीक्षेचा निकाला लागला. प्रबोधिनीतील ६ जण पूर्व परीक्षेला पास झाले. यावेळी पण बलभीमला यशाने हुलकावणी दिली होती. मनातून अस्वस्थ झालेला बलभीम जवळून पाहता आला. प्रबोधिनीत नित्य नवीन नवीन इतके उपक्रम व्हायचे की कुठल्याही अस्वस्थ करणाऱ्या भावना लवकर संपून जायच्या. सोबत असलेली मित्रांची साथ खुपच असायची. त्यांच्या शुद्ध आणि सात्विक प्रेमाने एक नवी प्रेरणा मिळायची व परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रचंड बळ मिळायचे.

२००२-०३ हे वर्ष अंबाजोगाईकरांना व प्रबोधिनीला पण खुपच महत्वाचे वर्ष होते. हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंदतीर्थ यांचे जन्म शताब्दी वर्ष. अनेक उपक्रमांचे व कार्यक्रमांचे नियोजन या निमित्य करण्यात आले होते. स्वामीजींचे चरित्र व संदेश अंबाजोगाई तालुक्यात सर्व दूर पोहचावेत म्हणून अनेक महत्वकांक्षी कार्यक्रम घेण्याचा मानस सर्व कार्यकर्त्यांचा होता. वि.र. जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात छान झाली. या सर्वाचे नेतृत्व साहजिकच अमोल पाटणकरकडे आले आणि त्याला सहाय्य होते बलभीम शिंदेचे. अमोल बरोबर काम करण्याची संधी म्हणजे खरोखर भाग्यच. मूर्तिमंत प्रेरणेचा व प्रेमाचा तो झराच होता. अमोलनी नियतीशी बेदरकारपणे व हसत हसत सामना करून तिच्यावर विजय मिळवला होता. सतत काठीचा आधार घेत लढणारा अमोल अनेकांच्या कोलमडलेल्या मनाला आधार देत होता. परिस्थितीशी संघर्ष करून कोलाहल पचवण्याचे सामर्थ्य बलभीम मध्ये होते शाररिक ताकद पण होती पण कधी कधी कच खाणार मन होत. अमोल बरोबर काम करताना स्वतःतील नैराश्य निर्माण करण्याऱ्या भावनांवर ताबा कसा ठेवायचा तो शिकला.

जन्म शताब्दी वर्षाचा सर्वात मोठा उपक्रम म्हणजे अंबाजोगाई,परळी,केज,धारूर तालुक्यातील ४५ शाळांमधील ५००० मुलांपर्यंत विविध स्पर्धा घेऊन स्वामीजींचा संदेश पोहोचवायचा. हे फार सोपे काम नव्हते. त्यात बलभीमला याचा काहीच पूर्व अनुभव पण नव्हता. प्रत्येक शाळेत ५ ते ६ वेळा जावे लागायचे. मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व कधी कधी पालक या सर्वाना याची माहिती द्यायची व महत्व पटून सांगायाचे.त्यात प्रत्येक स्पर्धेला शुल्क होते. शुल्क म्हटलेकी विद्यार्थी थोडे दूरच राहयचे. मुख्याध्यापक व शिक्षक थोड संशयाने बघायचे. या सर्व प्रक्रियेत त्याला मनुष्य स्वभावाचे व ग्रामीण भागातील शिक्षणाचे चांगलेच दर्शन झाले. काही शाळातून मुलांचा प्रतिसाद कमी असायचा मग त्यांच्याशी बोलून उत्साह निर्माण करावा लागायचा. अनेक मुलांशी यातून जवळीक निर्माण झाली. काही जणाशी मैत्री पण झाली. अमोल आणि बलभीम ने खूप कष्ट घेतले. ५००० विद्यार्थ्यांचे लक्ष ते पार पाडू शकले. या सर्व मुलांमधून ४५० मुलांची निवड करून त्यांच्यासाठी एक दिवसाचे मैत्री शिबीर व ४० शिक्षकांसाठी मार्गदर्शन शिबीर योजण्यात आले. या सर्व प्रक्रियातून बलभीमचा आत्मविश्वास खूप वाढला. आपण काही तरी भव्य मूर्त स्वरुपात आणू शकतो याची त्याला अनुभूती आली. आपल्या सारख्या ग्रामीण भागातील बंधुंसाठी काही करता आले याचे समाधान त्याच्या चहेऱ्यावर दिसू लागले. चार शब्द दहा मित्रांसमोर बोलताना त्याची जी त्रेधातिरपीट व्हायची त्यावर त्यांनी आता पूर्ण विजय मिळवला होता. त्याच्या बोलण्यात, वागण्यात राहण्यात एक प्रकारचा उठावदार पण दिसायला लागला.

विनाश्रमाचे घेणार नाही हे प्रबोधिनीपण आम्ही बाळगत असल्याने कुठल्याही प्रकारचे अनुदान किवा देणगी आम्ही घेत नसुत. पैशाची चणचण नसे पण प्रत्येक गोष्टीत काटकसर व काटेकोर पणा असे. त्यात MSEB मधील अनेक चांगले मित्र यांनी जाणीव नावाने समाजासाठी व वीजबचतीसाठी अनेक उपक्रम सुरु केले. वीज जास्त लागणारे कुठलेही उपकरणांचा वापर त्यामुळे प्रबोधिनीत करत नसुत. पाणी तापवण्याचे हिटर, विद्युत इस्त्री या सारख्या उपकरणावर आम्ही स्वतःहूनच बहिष्कार टाकला होता.

दुपारची वेळ होती. प्रबोधिनीत फक्त अमोल व बलभीम होते. अमोल कार्यालयात होता. मी बाहेरून आलो व काही कामासाठी अमोलशी काही न बोलता सरळ निवासाच्या खोलीत गेलो. तो समोर बलभीम आपल्या कपड्यांना विद्युत इस्त्री द्वारे इस्त्री करत होता. मी खोलीत आलेलं पाहता तो मनातून खूप घाबरला. कुणी नियम तोडला की ताबडतोब शब्दांचा किवा वेळ प्रसंगी हातांनी पण चोप देताना बलभीमनी मला पाहिलं होत. माझ्या चेहेऱ्यावरचे भाव पण त्याने लगेच ओळखले. मी काही न बोलताच खोलीतून बाहेर आलो. बलभीम या घटनेनी प्रचंड अस्वस्थ झाला.
“दादा, माझ चुकल बघा. मी नियम मोडला. कसतरी वाटतंय....प्रसाददादाला सामोरे जायची हिम्मत होत नाही. काय करावे हेच कळत नाही.” अमोल समोर बलभीमनी आपले मन मोकळे केले.

अमोलला हे माहित होते माणसांसाठी नियम आहेत नियमांसाठी माणूस तोडणे हे प्रबोधिनीची रीत नाही. या सर्व परम्परा निर्माण करणाऱ्यातील तो एक महत्वाचा घटक होता. त्याने बलभीमची समजूत काढली. प्रबोधिनीत धाक दाखवण्याचे काम माझे तर प्रेमानी समजून सांगण्याचे काम अमोलचे अश्या एकमेकाला पूरक भूमिका आम्ही नकळत घेतल्या होत्या. बलभीमच्या मनाला बोचलेल्या ह्या सलीने त्याच्या भावी आयुष्यात अन्याया विरुद्ध प्रामाणिकपणे क्वचित प्रसंगी एकाकी लढण्याची वृत्ती निर्माण केली.

बलभीम परत जोमाने MPSC ची तयारीला लागला. आता त्याला विशाल चव्हाण सारखा जीवाभावाचा मित्र पण मिळाला. विशालच्या नेतृत्वाने, प्रबोधिनीच्या गणेश मंडळाने अंबाजोगाईत आदर्श मिरवणुकीचा एक पायंडा घातला. प्रबोधिनीने मिरवणुकीतील मानाचा पहिला पुरस्कार पण यावेळी पटकावला. मिरवणुकीच्या पथकात फारच मस्त ताशा विशाल वाजवायचा. या मिरवणुकीत बलभीम ध्वजधारी होता. अभ्यासाबरोबरच बलभीम, वैद्य काका, चव्हाण बापू व तात्या सरवदे बरोबर प्रबोधिनीच्या ग्रामविकसनाच्या कामात हिरीरीने सहभागी होऊ लागला. सरपंचांसाठी आयोजित सहलीमध्ये तो व महादेव किरवले सहभागी झाले होते. त्यांच्या साठी सहलीचा अनुभव फारच प्रेरणादाई व संपन्न करणारा होता. आ.अण्णासाहेब हजारे, श्री.पोपटराव पवार, श्री.सुभाषराव देशपांडे, श्री.व्यंकटराव भताने या सारख्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या दिग्गजांचा सहवास लाभला. महादेव पुढे जाऊन तहसीलदार झाला. तो परळी तालुक्यातील सिरसाळा गावचा. त्यानी त्याच्या कुटंबात इतिहास घडवला. लाल दिव्याच्या गाडीत साहेब म्हणून बसणारा त्याच्या अख्या बिरादरीत तो पहिलाच. तहसीलदार झाल्यावर सगळ्या बिरादरीने त्याची बेंडबाजा लाऊन मिरवणून काढली होती.

या नंतर त्यांनी प्रबोधिनीच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख श्री विवेक कुलकर्णी सरांन सोबत ऊसतोड कामगारांसाठी चालणाऱ्या साखर शाळांच्या सर्वेक्षणाच्या अभ्यास गटात पण सदस्य म्हणून सहभाग घेतला.
खूप अभ्यास करून सुद्धा बलभीमला पुढच्या दोन प्रयत्नांना पण यश नाही मिळाले. सतत येणार अपयश पचवायला तो समर्थ झाला होता पण त्याच बरोबर वय पण वाढत होत. भाऊ व आबईला पण आता पूर्वी सारखे कष्ट होत नव्हते.त्याच्या मित्रां पैकी महादेव तहसीलदार झाला, सय्यद रफीक पोलीस सब इन्स्पेक्टर झाला. लता फड तर बीड जिल्ह्यातील पहिली महिला Dy.SP झाली. विशाल मुंबईत गेला व त्यास चांगल्या पगाराची नौकरी मिळाली. इतर अनेक जण कुठल्यानी कुठल्या तरी सेवेत रुजू झाले.कुठे तरी स्थिर नौकरी मिळावी म्हणून बलभीमचे प्रयत्न चालू होते. B.Ed ची प्रवेश परीक्षा दिली पण शासकिय महाविद्यालयात काही प्रवेश मिळाला नाही. शेवटी त्याने भारतीय आयुर्विमा मंडळाचे विमा प्रतिनिधी म्हणून काम सुरु केले. प्रबोधिनीच्या अनेक हितचिंतकांनी त्याचाकडे विमा काढला. MPSC चा अभ्यास पण चालू होता. शेवटी मित्राच्या भावानी त्याला MSW करायचा सल्ला दिला. एकूण आता पर्यंत घेतलेल्या अनुभवामुळे MSW करण्याची कल्पना त्याला व मला पण खूप आवडली.नित्य नेमाने तो MPSC च्या अभ्यासा बरोबर MSW चा पण चांगला अभ्यास करू लागला.

पाबळच्या विज्ञान आश्रमाचा संचालक योगेश कुलकर्णी माझा चांगला मित्र. गुबाळ हे किल्लारी भूकंपात उध्वस्त झालेले एक गाव. तिथे त्यांनी ADRA या संस्थेच्या मदतीने भूकंप रोधक डोम उभे केले होते. भूकंपानंतर बदलणाऱ्या लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी ADRA चे अभ्यासक श्री हॉर्ट रॉली हे काही सर्वेक्षणासाठी गुबाळला येणार होते. त्यांना यासाठी काही तरुण मदतीला हवे होते. या कामासाठी योग्य तो मोबदला पण ते देणार होते. अंबाजोगाईचा युवक विभाग हे काम करण्यासाठी पुढे आला. श्री हॉर्ट रॉली जागतिक पातळीवरचे प्रसिद्ध अभ्यासक. गरिबी हा त्यांचा अभ्यासाचा विषय. अनेक देशातील विश्वविद्यालयात ते मानद प्राध्यापक होते. मुळचे जर्मनीचे पण अनेक ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलेल.भारतातील वास्तव्यात ते भारताचे जावई झाले. त्यांची मुलगी करिना व योगेश सोबत ते अंबाजोगाईला आले. प्रबोधिनी तर्फे या कामात मदत करण्याचे दायित्व बलभीम कडे आले. त्यांनी प्रबोधिनीतील सर्व मित्रांच्या मदतीने खूप चांगले नियोजन केले. श्री हॉर्ट रॉली च्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण करण्याची, ते अचूकपणे व वेगाने संकलित करण्याची व त्यातून निष्कर्ष काढण्याची पद्धत सर्व युवकांनी खुपच मार्गदर्शक ठरली. श्री हॉर्ट रॉली यांनी प्रत्येक सदस्यांना मानधन म्हणून प्रत्येकी ५०० रुपये दिले. हा पैसा स्वतःसाठी वापरण्या पेक्षा सुनामी ग्रस्त लोकांना मदत म्हणून देण्याचा विचार पुढे आला. सर्वानी या कल्पनेच स्वागत केले. मानधनाची सर्व रक्कम सुनामी ग्रस्त लोकांना मदत म्हणून पाठवण्यात आली. श्री हॉर्ट रॉली बरोबर बलभीम व इतरांनी खूप गप्पा मारल्या.

MSW चा अभ्यास करताना या सर्व प्रबोधिनीच्या उपक्रमाचा त्याला खूप उपयोग होई. विचार तर्कशुद्ध असावा. त्यासाठी आवश्यक ती तात्विक बैठक असावी. ती भक्कम करण्यासाठी सर्व विषयांचा मुळापासून अभ्यास करावा व शेवटी हरएक बाबतीत स्वतःच निर्णय घेण्याची हुकुमत वाढवावी व घेतलेल्या निर्णयाचे यश किवा अपयशाचे धनी आपणच असतो त्याचे खापर दुसऱ्याच्या माथी कधी मारायचे नाही. हे स्वामी विवेकानंदाचे विचार प्रत्यक्ष आयुष्यात उतरवण्याचे शिक्षण बलभीमचे या सर्व अनुभव शिक्षणानी होत होते. आपणच आपल्या भाग्याचे शिल्पकार हे त्याला आता पटू लागले होते. अपयश येणे स्वाभाविक आहे ते तर जीवांचे सौंदर्य म्हणायचे अपयशा खेरीस जीवन ते काय? संकटांना भिऊन पळू नका त्यांच्याशी निर्भयपणे मुकाबला करा. या उपासनेच्या वेळी म्हणत असलेल्या स्वामीजींच्या विचारांची सत्यता वास्तव जगात तो अनुभवत होता.

महाविद्यालयातील पहिले वर्ष संपले. परीक्षा चालू होती. दुसऱ्या वर्षाच्या मुलांना कळले की पुढील वर्षी महविद्यालय फी वाढ करणार. अनेक जणांना ते परवडणारे नव्हते. त्यांनी गावातील विद्यार्थी संघटनांशी संपर्क साधला. विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते, दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आलेले पहिल्या वर्षाचे विद्यार्थी यांची एक बैठक झाली. सर्वानी मिळून महाविद्यालयाच्या व्यवस्थापनां विरुद्ध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. वाढीव फीस भरणे बलभीमला शक्य नव्हते. आता पर्यंत शांत पणे स्वतःचा व त्याबरोबर इतरांच्या विकासाच्या मनुष्यनिर्माणाच्या चळवळीत बलभीम घडत होता. आता तो वेगळ्याच वातावरणात राहू लागला. संप,उपोषण, धरणे, बंद या मार्गाने ते आपला व्यवस्थापनां विरुद्धचा असंतोष व्यक्त करत होते. व्यवस्थापनातील सन्मान्य लोकांनी हे अस्त्र वेळो वेळी वापरलेल होत. आता त्यांच्याच महाविद्यालयात आंदोलन सुरु झाले. दुसऱ्या वर्षीच्या मुलांच्या परीक्षा झाल्या व त्यांनी आंदोलनातून काढता पाय घेतला. पहिल्या वर्षीच्या मुलांनी आंदोलन सुरूच ठेवल. मान्यवरांची मदत असणाऱ्यांच्या विरुद्ध ही लढाई ते लढत होते. खरा पाहता अश्या प्रकारच्या आंदोलनाच्या मार्गाने जे मोठे झाले त्यांनी ज्यावेळी आपल्या विरुद्ध हे अस्त्र वापरले जाते व ते ही आपलेच मुलं म्हंटल्यावर त्यांना योग्य त्या पद्धतीने हाताळायला पाहिजे होते पण तस घडल नाही. पोलीस तक्रार,धमक्या पर्यंत गोष्टी गेल्या. विद्यार्थ्यांनी शेवटी साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. पण व्यवस्थापन हे चांगलेच अनुभवी होते. त्यांना विद्यार्थ्यांमध्ये दुही पाडण्यात यश मिळाले. शेवटी १८ जण जे साखळी उपोषणाला बसले होते त्यातील फक्त ३ मुलं व १ मुलगी टिकली बाकीच्यांनी काढता पाय घेतला. बलभीम मात्र शेवटच्या चार जणात होता. आंदोलन फसल पण बलभीम यातून खूप काही शिकला. त्याने पुढे त्या महाविद्यालयात न शिकण्याचा निर्णय घेतला. मग लढाई सुरु झाली विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी. शेवटी कुलगुरूंनी चारी जणांनां विद्यापीठात प्रवेश दिला.

बलभीम चांगलाच अभ्यासाला लागला. परीक्षेनंतर त्याने पुण्याच्या प्रबोधिनीतील ग्राम विकसन विभागात अनुभव शिक्षण घेतले व त्याचा MSW चा अभ्यास पूर्ण झाला. वेगवेगळ्या सामाजिक संस्थान मध्ये त्याने वर्षभर काम केलं. समाजकल्याण खात्या मार्फत चालणाऱ्या आदिवासी आश्रम शाळांसाठीच्या वसतीगृह अधिक्षक पदाची परीक्षा पण तो पास झाला व यवतमाळ जवळील हिवरी येथील आदिवासी आश्रम शाळेत तो अधीक्षक म्हणून रुजू झाला.
मोठ्या जबाबदारी चे काम होते. १३ जणांचा तो प्रमुख होता. प्रचंड काम होत. त्यात सरकारी समाजकल्याण खाते व सोबतचे लोक म्हणजे शासकिय कामात पूर्ण मुरलेले.चांगल काम करण्याची खूप इच्छा होती. पण पद्दोपदी अडवणूक होऊ लागली. बलभीम पहिल्या सहा महिन्यातच त्रासून गेला. त्यांनी परिस्थितीशी दोन हात केले होते. संघर्ष पण केला होता खूप कष्ट करण्याची त्याची तयारी होती. पण स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या मनुष्य स्वभावाची त्याला या कामात ओळख व्हायला लागली होती. तो पूर्ण त्रासून गेला होता. या वास्तव जगात आपण राहायला योग्य नाहीत म्हणून स्वतःला संपवण्याचे विचार त्याच्या मनात येत होते. पैसा मिळत होता पण त्याच्या भोवती असणारे आश्वासक वातावरण आता नव्हत. MPSC चा अभ्यास तर जवळपास बंद झाला होता. नोकरी सोडण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला व तो सरळ रजा टाकून अंबाजोगाईला आला. सर्व मित्रांना त्याने आपली समस्या सांगितली.

आपल्या भोवती आपणच चांगले वातावरण तयार करायचे असते. पाणनिथळी जस आपल्या स्वतः भोवती फिरून आपल्या भोवतीचे पाणी स्वच्छ करते तसेच काम आपल्याला करायचे असते. मुलांवर लक्ष केंद्रीत कर.शेवटी बलभीम सर्वांच्या सांगण्या मुळे हिवरीला परतला. प्रबोधिनीत शिबिरात व उपासनेच्या वेळी शिकवले जाणारे खेळ, गाणी, स्वामी विवेकानंदाचे विचार, विज्ञान प्रयोग अश्या अनेक गोष्टी तो मुलांना शिकऊ लागला. थोडया दिवसातच मुलांचा त्याला व त्याला मुलांचा लळा लागला. मुळात आदिवासी मुलं ती, निर्व्याज प्रेम करणारी. शहरी बाजारू संकृती पासून कोसोदूर. फार लवकर शिकत होती सर्व. या सर्वात मुलांच अभ्यास वरच प्रेम वाढल व त्यांच्या बरोबर अभ्यास करत करत बलभीमच्या MPSC च्या अभ्यासाने गती पकडली. आता ती मुल मोठी झाली. अनेकांना चांगली नौकरी पण मिळाली. अधून मधून आज पण बलभीमला फोन करतात. आपल्या चांगल्या आयुष्याच श्रेय देतात. बलभीम या मुलान बाबतीत खूप भरभरून सांगतो.

नियती शेवटी सात्विक संघर्षा समोर नतमस्तक होते.

“दादा ! चांगुलपणाला व संघर्षाला नक्की यश मिळत पण थोडी वाट पहावी लागते. थोड झुंजाव लागत.” बलभीम ताठ मानेंनी आज सांगतो.

बलभीमनी MPSC द्वारे भरल्या जाणाऱ्या “ समाजकल्याण अधिकारी वर्ग १” पदा साठीची परीक्षा दिली. त्याच बरोबर आश्रम शाळा, बार्शी येथील गृहपालपदा साठीची परीक्षा पण दिली. गृहपालपदाच्या परीक्षेचा निकाल आधी लागला व त्यात तो यशस्वी झाला. बार्शी, वाकडी पासून जवळ होत. भाऊ आणि आबईची काळजी होती. बलभीम बार्शीला गृहपाल म्हणून आला व याच काळात त्याच्या घराचा विस्तार पण झाला. त्याचे दोनाचे चार हात झाले. लग्नाला जाता नाही आल पण बलभीम जोडीने भेटायला आला.

“हे आमचे दादा,जे मी आज काही आहे न ते यांच्या मुळे आणि प्रबोधिनी मुळे.” त्यांनी आपल्या पत्नीला माझी ओळख करून दिली. व्यक्ती शेवटी निमित्य असते ज्या विचाराने ती करते तो विचार मोठा. अशा श्रेष्ठ प्रबोधिनीचा विचार असे अनेक बलभीम उभे करू शकतो फक्त तो व्यक्त होण्यासाठी काही माध्यमांची गरज असते.

महिन्याभरात बलभीमचा फोन आला.

“दादा ! MPSC च्या मुलाखतीचा निकाल लागला मी पात्र झालो. वर्ग १ ची जागा आहे. पेढे घेऊन भेटायला येतो.”
बलभीम आता विशेष विभागीय समाज कल्याण अधिकारी वर्ग १, जात पडताळणी कार्यालय, कोकण भवन, मुंबई येथे साहेब आहे.

त्याचा प्रवास म्हणजे “किरण एक घेऊन हाती मी असाच निघालो आणि असाच वणवणताना मी मला मिळालो” असाच होता.

1 टिप्पणी:

SSA म्हणाले...

इंजिनियर असून "लेखक" आणि फ़क्त लेखणीतूनच नव्हे तर "कृती" तून माणूस बनायचं आणि बनवायचं. दुसऱ्यासाठी प्रेरणा बनायचं म्हणजे साधी-सुधी गोष्ट नव्हे. माणसं जोडणे आणि त्याच्या "उभारणीला" वाहून घेणे - ध्येयामाघे "देह" विसरणे. खरच खूपच आपुलकी वाटते. "ईश्वराला" देतानाही अभिमान वाटलं पाहिजे - असं कर्तत्व. शब्द हि फिके पडतात.