शनिवार, १४ एप्रिल, २०१२

राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर


राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आज १४ एप्रिल आज सकाळ पासून विविध वर्तमानपत्रातील लेख वाचताना अनुभवलेले राष्ट्रपुरुष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
वर्तमानपत्रातील लेख डॉ.यशवंत मनोहर,नागेश गजभिये, रमाकांत जाधव , बी. व्ही. जोंधळे, प्रा. राजेंद्र गोणारकर, जयदेव गायकवाड , श्रीनिवास हेमाडे यांचे आहेत. मी फक्त समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन संकलित केले आहे, कुठलाही बदल न करता.
जीवन

 बाबासाहेबांचे वडील रामजीबाबा धार्मिक, कबीरपंथीय. लष्करात असूनही मद्याच्या थेंबालासुद्धा शिवत नव्हते. हाच वैचारिक वारसा बाबासाहेबांना मिळाला. म्हणूनच बाबासाहेब निरीश्वरवादी बनले. त्याची कारणे त्यांच्या बालपणीच्या संस्कारांत दडलेली आहेत.

कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर
ऑफ  लॉया महान पदवीसाठी जगातील पाच पंडितांची निवड केली. त्यात प्रमुख नाव होते डॉ. आंबेडकर - एकमेव भारतीय. भारतीय घटनेचे शिल्पकार, एक महान सुधारक, मानवी हक्काचे आधारस्तंभ असणारे महापराक्रमी पुरुष डॉ. बी. आर. आंबेडकरअशा शब्दांत सन्मानाने नाव पुकारले गेले तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात अंगावरील गाऊन सांभाळत डॉक्टर ऑफ  लॉपदवीचा स्वीकार त्यांनी केला. संपूर्ण भारतातून विद्येचे महान यश एकाच व्यक्तीला का मिळाले, असा प्रश्न सहज पडतो. हे मानवी रसायन समजून घेताना बाबासाहेब विद्याव्यासंगी कसे झाले, त्यांच्या पूर्वजांची पार्श्वभूमी समजून घेणे (त्यांच्या जन्मदिनी) मला महत्त्वाचे वाटते.

कुटुंब  

बाबासाहेबांचे आजोबा मालोजीराव ईस्ट इंडिया कंपनीच्या मुंबई आर्मीमध्ये नोकरीला होते. बाबासाहेबांचे वडील (रामजी व त्यांचे दोन भाऊ) लष्करात भरती झाले. तिसरे भाऊ जातीयतेच्या मानहानीमुळे साधूंच्या झुंडीत सामील झाले. ती त्या काळातली बंडखोरी होती. थोडक्यात जातीची ओळख कायमची बुजवली जायची.

बाबासाहेब पोरके झाल्यावर त्यांची आत्या मीराबाई त्यांचे लाड पुरवायची, नव्हे शिस्तसुद्धा लावायची.

आईचे वडील

बाबासाहेबांचे आजोबा (आईचे वडील) सुभेदार धर्मा मुरबाडकर हे मराठा पलटणीतून रामजी (बाबासाहेबांचे वडील) यांच्या पलटणीत बदलून आले होते. सुभेदार मुरबाडकर घरचे सधन होते. त्यांना दोन मुली व एक मुलगा अशी तीन मुले होती. तेरा वर्षांची मुलगी भीमाबाई हिचे लग्न रामजींशी 1865 च्या सुमारास झाले. 1865 च्या दरम्यान भीमाबाईच्या वडिलांना दोनशे पंचवीस रुपये पगार होता. महाराष्ट्रात अस्पृश्यांच्या घरात त्या वेळी चांदीच्या ताटात जेवणारा मुरबाडकर परिवार होता. मुरबाडकर परिवारात (ठाणे जिल्ह्यात) सहा जण सुभेदार-मेजर पदावर काम करत होते.

आई

थोडक्यात, बाबासाहेबांची आई मोठ्या सुखात वाढली होती. पण रामजींचे घर सधन नव्हते. त्यामुळे या लग्नाला विरोध होता. रामजींचे वागणे-बोलणे-राहणे मात्र सुसंस्कृत होते. त्यामुळेच भीमाबार्इंचे लग्न रामजींशी झाले. भीमाबाई स्वाभिमानी होत्या. त्या आर्थिक मदतीसाठी कधीही माहेरी यायच्या नाहीत.

त्या काळात लष्करी कँपात राहणाºया मुला-मुलींना शिक्षण घेणे सक्तीचे होते. जी मुले-मुली शिक्षण घेणार नाहीत, त्यांना मोठ्या रकमेचा दंड भरावा लागे. ज्या काळात ब्राह्मण मुलींना शिक्षण घेणे अवघड होते, त्या काळात महार समाजातील मुली पांडवप्रताप, रामविजय, शिवलीलामृत आदी पौराणिक व धार्मिक ग्रंथ वाचत, त्याची पारायणे व श्रोतृवंदास निरूपणही करत.

वडील

रामजींनी लष्करातील नॉर्मल परीक्षा दिली होती. ती परीक्षा मॅट्रिकच्या बरोबरीची गणली जायची. इतिहास-गणित-इंग्रजी या विषयांवर रामजींनी प्रभुत्व मिळवलेले होते. शिक्षकी शास्त्राचा डिप्लोमा मिळवला होता. सैनिकी शाळेवर ते मुख्याध्यापक होते. रामजींनी तर्खडकर भाषांतर मालेचे तीन भाग बाबासाहेबांकडून पाठ करून घेतले होतेच. इंग्रजी भाषा अवगत करण्यासाठी तू हार्वर्डची पुस्तके तोंडपाठ करही सक्ती ते आपल्या मुलावर करत. एवढेच नव्हे, तर अभ्यासाला छोट्या भीमाला पहाटे उठवण्यासाठी ते रात्रभर जागे राहत. मराठी भाषेतील शब्दांना योग्य इंग्रजी प्रतिशब्द हुडकून काढण्यास व योग्य उपयोग करण्यास त्यांनी छोट्या भीमाला सांगितले आणि मुलगा हा अभ्यास नीटपणे करतो की नाही याचे सूक्ष्म निरीक्षण रामजी करत. रामजीबाबा तसे धार्मिक आणि कबीर पंथीय होते. लष्करात असूनही मद्याच्या थेंबालासुद्धा शिवत नव्हते. हाच वैचारिक वारसा, शैक्षणिक वारसा बाबासाहेबांना मिळाला.

शाळा व समाजजीवन

1896 मध्ये बाबासाहेब शाळेत दाखल झाले. तेव्हा त्यांचे वडील पहाटे भूपाळ्या-स्तोत्रे म्हणत. पुन्हा सायंकाळी दोन तास मुलांबरोबर पूजाअर्चा होई. प्रार्थनेनंतर कबीराचे दोहे, तुकाराम, चोखोबाचे अभंग, दत्ताची स्तोत्रे, गीतेतील श्लोकांची पारायणे (म्हणजे त्या काळात ब्राह्मणांपेक्षा काकणभर सरस) व्हायची. आणि हे झाल्यावर रामजींच्या घरात मुलांची खºया अर्थाने स्पर्धा असायची, अर्थात पाठांतराची. अशा संस्कारांत बाबासाहेब वाढले. पण असे सगळे सोज्वळ संस्कार होत असताना बाबासाहेब शाळेत गेल्यावर त्यांना मात्र शाळेच्या बाहेर बसवले जायचे. शाळेची हजेरी सक्तीची होती. अशा त्या अवस्थेत बाबासाहेबांच्या मनात बालपणीच भारतीय संस्कृतीविषयी चीड निर्माण झाली होती. ती मानसिकता त्यांना आयुष्यभर सतावत होती. अगदी त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत. असे असले तरी वर्गाबाहेर काढणाºया शिक्षकांविषयी आदर होता.

गुरुजी

चुणचुणीत भीमराव हुशार असूनही जातीच्या चौकटीमुळे त्यांचे प्रचंड शालेय नुकसान होत होते. त्यातच त्यांच्या स्पृश्य आंबेडकर   गुरुजींनी मात्र एक निर्मळ प्रेमाचा धागा विणून ठेवला. तो धागा बाबासाहेब विसरू शकले नाहीत. बाबासाहेबांच्या शालेय-कॉलेज-शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी परदेशात गेल्यावर त्यांच्या आंबेडकर गुरुजींना बाबासाहेबांची आठवण व्हायची. आपल्या शिष्याला आपण कधी भेटू, असे त्यांना सारखे वाटे.

ज्या आंबेडकर गुरुजींनी बाबासाहेबांच्या शालेय पटावर आंबेडकर आडनाव नोंदवले, ते गुरुजी आणि बाबासाहेबांची प्रत्यक्ष भेट झाल्यावर गुरुजी म्हणाले, ‘भीमराव, तू तुझ्या कुळाचेच नव्हे तर माझ्या कुळाचेसुद्धा नाव अजरामर केलेस. नकळत मला तू बहुमानित केले आहेस.त्यावर बाबासाहेब म्हणाले, ‘गुरुजी, मी अजून कमाईला सुरुवात केली नाही. फूल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला गुरुदक्षिणा द्यावी अशी माझी इच्छा आहे.त्यावर गुरुजी म्हणाले, ‘भीमराव, अरे तू एवढी विद्या संपादन केलीस, तीच मला खºया अर्थाने गुरुदक्षिणा. जगात तुझा नावलौकिक व्हावा एवढीच माझी इच्छा.त्यानंतर राउंड टेबल कॉन्फरन्सला बाबासाहेब जाताना त्यांना गुरुजींनी हृदयस्पर्शी पत्र लिहिले. ते बाबासाहेबांनी जपून ठेवले.

विद्यार्थी जीवन

1920 मध्ये ग्रेजइनमध्ये बॅरिस्टर परीक्षेसाठी प्रवेश घेतला तेव्हा बाबासाहेब रात्रभर जागून अभ्यास करत. त्या काळात त्यांच्या खोलीतील भारतीय विद्यार्थी बाबासाहेबांना सांगत, ‘अहो आंबेडकर, रात्र फार झाली हो. आता विश्रांती घ्या.तेव्हा बाबासाहेब म्हणत, ‘मित्रांनो, अन्नाला पैसा आणि झोपायला मला वेळ नाही. मला माझा अभ्यासक्रम लवकर पुरा करायचा आहे.त्याच काळात अस्नोडकर, मुखर्जी, नायडू, माथूर, देसाई, हाजी, कुडाळकर असे अनेक विद्यार्थी तिथल्या (लंडनच्या) वसतिगृहात राहत. खºया अर्थाने अभ्यासात दंग असणारे (अठरा-अठरा तास) बाबासाहेब हे एकमेव भारतीय विद्यार्थी होते.

चित्रकार  

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चित्रकलेची विशेष रुची होती. चित्रे पाहायला त्यांना आवडत आणि आपल्यालाही सुंदर सुंदर चित्रे निर्माण करता यावीत, असे त्यांना मनापासून वाटे. बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. चित्रकलेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके विकत घेतली होती. चित्रे काढण्यात आणि रंगविण्यात ते तल्लीन होऊन जात असत. "पेंटिंग ऍज अ पास्ट टाइम' या चर्चिलच्या पुस्तकाने त्यांना हा जबरदस्त नाद लावला होता. 


लढाऊ पत्रकार 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्षमय जीवनातूनच त्यांची जीवननिष्ठा आकार घेत गेली आणि त्यातूनच त्यांची अन्यायाशी झुंज देण्याची वृत्ती वाढत गेली. अशा परिस्थितीत त्यांच्यात एका लढाऊ वृत्तीचा पत्रकार निर्माण झाला. बाबासाहेबांना अस्पृश्य वृत्तपत्रांची आवश्यकता का भासली याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. 1947 मध्ये ब्रिटिश सरकारने साउदबरो कमिशन भारतात पाठवले. या कमिशनने हिंदी लोकांच्या मताधिकारांसंबंधी प्रतिक्रिया जाणून घेण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे त्यांनी अनेक हिंदी मान्यवरांना चर्चेसाठी निमंत्रित केले होते; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सिडनेहॅम, मुंबई या सरकारी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करीत असल्यामुळे त्यांना निमंत्रण पाठवले नव्हते. या कमिशनपुढे आपले विचार मांडावेत आणि अस्पृश्यांना राजकीय हक्क, मतदानाचा अधिकार, निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहण्याचा अधिकार मिळावा म्हणून ते आग्रह धरणार होते. कारण त्या वेळी लोकांची स्वराज्याची मागणी अतिशय तीव्र झाली होती; परंतु त्या मागणीत अस्पृश्यांच्या अस्तित्वाला आणि स्वतंत्र प्रतिनिधित्वाचा विचार नव्हता. म्हणून त्यांनी या संदर्भात त्या वेळच्या गव्हर्नरशी पत्रव्यवहार करून कमिशनपुढे आपले विचार मांडण्याची परवानगी मिळवली. त्या वेळी त्यांच्या मनाला एक कल्पना शिवून गेली की, दलितांची बाजू मांडण्याकरिता, त्यांना त्यांच्या राजकीय हक्काची जाणीव करून देण्याकरिता एखादे पत्र त्यांच्याच मालकीचे असावे, जेणेकरून ते त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून स्वत:च स्वत:चे प्रतिनिधित्व उत्तम प्रकारे करू शकतील. याच त्यांच्या कल्पनेतून आणि भूमिकेतून मूकनायक या पत्राचा जन्म झाला. मूकनायक हे त्यांचे पहिले वर्तमानपत्र होय.

तत्पूर्वी मुंबईला कोल्हापूरचे राजे शाहू महाराज यांचे आगमन झाले असताना डॉ. आंबेडकरांनी आपली योजना त्यांच्यासमोर मांडली. शाहू महाराजांनी त्वरित 2500 रुपये मदत म्हणून त्यांना दिले आणि मूकनायक हे पाक्षिक 30 जानेवारी 1920 रोजी सुरू झाले. 'मूकनायक'चे डॉ. आंबेडकर स्वत: संपादक नव्हते. या पत्राच्या संपादकपदी विदर्भातील तरुण पांडुरंग नंदराम भटकर यांची नियुक्ती त्यांनी केली होती. मूकनायकात बाबासाहेबांनी अनेक अग्रलेख आणि स्फुटके लिहिली. पहिल्या अंकात आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी आपले मनोगत असे व्यक्त केले होते की, 'आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या आणि पुढे होणार्‍या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती आणि तिचे मार्ग यांच्या खर्‍या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी भूमी नाही आणि अनेक पत्रे विशिष्ट जातीचेच हितसंबंध पाहणारी आहेत. इतर अन्य जातींच्या हिताची त्यांना पर्वा नसते.' मूकनायकाच्या निर्मितीमुळे अवघ्या काही काळातच अस्पृश्य समाजात जनजागृतीचे अंकुर फुटायला सुरुवात झाली, असे बाबासाहेबांनी एका लेखात म्हटले आहे. दुसरे पत्र 'बहिष्कृत भारत' हे 3 एप्रिल 1927 रोजी सुरू झाले. याचे संपादक स्वत: बाबासाहेब होते. त्यांनी बहिष्कृत भारतमधून प्रखर विचार मांडले. त्यानंतर 'जनता' हे साप्ताहिक 1930 मध्ये उदयास आले. हे पत्र 25 वर्षे म्हणजे 1930 पासून 1955 पर्यंत चालू होते. या पत्राचा उपयोग मुख्यत: बाबासाहेबांना त्यांची चळवळ व आंदोलन चालवण्याकरिता झाला. पुढे 4 फेब्रुवारी 1954 रोजी जनताचे नामकरण 'प्रबुद्ध भारत' असे करण्यात आले. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि त्यानंतर 'प्रबुद्ध भारत'चे एक संपादक मंडळ निर्माण करण्यात आले. 3 ऑक्टोबर 1957 रोजी भारतीय रिपब्लिकन पार्टी कार्यान्वित झाली आणि प्रबुद्ध भारत या पक्षाचे मुखपत्र बनले. हे पत्रसुद्धा 1961 मध्ये बंद पडले.

योजक संघटक

बाबासाहेबांनी सांगितलेला संदेश ''एकीत जय आणि बेकीत क्षय'' हा आमचा मूलमंत्र ठरला पाहिजे. तसेच संघर्ष, स्वावलंबन आणि स्वातंत्र्य ही बाबासाहेबांनी दिलेली त्रिसूत्री आपल्या सामाजिक दिशा असावी.

बाबासाहेबांनी शेतकºयांच्या प्रश्नावर आंदोलने करताना कमी उत्पन्न असणाºया शेतकºयांना कर आकारणीतून सूट मिळावी, खोती पद्धती व सावकारशाही नष्ट व्हावी अशी भूमिका घेतली. स्वातंत्र्यपूर्व काळात केंद्रीय मजूरमंत्रिपदाबरोबर बांधकाम व पाटबंधारे खात्याचा कार्यभार सांभाळताना त्यांनी पाणी प्रश्नाचाही विचार केला.

कामगार चळवळीचे नेतृत्व करताना कामगारांच्या हक्काचे कायदे संमत करून घतेले. स्त्री-पुरुषाला समान वेतन, महागाई निर्देशांकानुसार महागाई भत्ता, गरोदर स्त्रियांना पगारी रजा, कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय असे या कायद्यांचे स्वरूप होते.

बाबासाहेबांनी निवडणुकीच्या राजकारणाची सुरुवात 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून केली. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करताना जनता या आपल्या मुखपत्रातून जी भूमिका मांडली ती अत्यंत महत्त्वाची आहे. बाबासाहेब म्हणतात की, अस्पृश्यांनी स्पृश्य हिंदूंबरोबर चालवलेला समतेचा लढा बाह्यत: जरी जातीय स्वरूपाचा असला तरी त्याचे मूळ अस्पृश्यांच्या आर्थिक गुलामगिरीत आहे. अस्पृश्यतेचे उच्चाटन होणे हे भांडवलशाहीच्या हिताचे जसे आहे तसे ते हिंदी र्शमजीविकांच्या लढय़ाची पहिली पायरी आहे. स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यामध्ये राजकीय बाबतीत सहकार्य घडून येण्यास हा पक्ष उपकारक होईल. हा पक्ष बहुसामान्यांचा व्हावा यासाठी सर्व जाती-धर्मांतील उमेदवारांना उमेदवारी देण्याचे बाबासाहेबांनी जाहीर केले होते


इतिहास अभ्यासक  :- माणूसच इतिहास घडवतो.

न्यायमूर्ती रानडेंच्या १०१ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुण्यात एक  व्याख्यान झाले होते. रानडे यांच्या जीवनावर भाष्य करताना त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना त्यांनी जगातल्या थोर विचारवंतांचे संदर्भ घेतले. समकालीन इतिहासातील थोर नेते, समाजसुधारक, वॉर हिरोज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करताना मोठा माणूस कोण असतो, याबाबत अतिशय सखोल विश्लेषण केले आहे. त्यांचे ते भाषण गांधी, जिना, रानडेग्रंथरूपाने प्रसिद्ध आहे.

या भाषणातील त्यांचे मूलभूत विचार सर्वकाल आपल्याला विचार करायला लावतात. आजच्या देशपातळीवरच्या सामाजिक, राजकीय नेत्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण करण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या निकषांचा खूप उपयोग होतो.

रानडेच्या विचारांचा परामर्श घेताना प्रथम ते इतिहास कोण घडवतो असा प्रश्न उपस्थित करून इतिहासनिर्मितीचे जनक कोण, याबाबत असलेले अनेक वाद-प्रवादांचा ऊहापोह करतात. त्या वेळी ऑगस्टीन या विचारवंताचे म्हणणे होते की, ‘इतिहास विधिलिखित असतो.जसजशा घटना घडत जातात, तसतसा पूर्व विधिलिखित इतिहास उलगडत जातो. तर बॅकल या विचारवंताचे म्हणणे होते, की विज्ञान व भौगोलिक क्षेत्रात होणारे बदल म्हणजेच इतिहास असतो.याच दरम्यान कार्ल मार्क्‍सने इतिहासाची व्याख्या सांगितली होती. इतिहास हा आर्थिक शक्तीच्या पोटी जन्म घेतो. हे तीनही विचारवंत इतिहासाचे श्रेय माणसाला द्यायला तयार नव्हते. याकडे लक्ष वेधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचारांशी मतभेद व्यक्त करतात व माणूसच इतिहास घडवतो, असे आग्रही प्रतिपादन करतात.

माणूसच इतिहास घडवतो यांचे प्रतिपादन करताना ते अमेरिकन प्रेसिडेंट थिओडर रुजवेल्ट यांच्या भाषणाचा संदर्भ देतात. रुझवेल्ट म्हणतात, ‘मानवी जीवनात (किंवा राजकीय पक्ष, सामाजिक, आर्थिक संस्था असेल) कधी असा कालखंड येतो की तेव्हा त्या समाजाचा विकास थांबतो. त्यांची गतीच नष्ट होते. एखाद्या डबक्यासारखा तो समाज प्रवाहपतित होतो. त्या समाजाचा जिवंतपणाच नष्ट होतो. तेव्हा अशा समाजातील तरुणांना ना नवीन कल्पना सुचतात, ना नवीन दृष्टी (Vision) असते आणि समाजातील जुन्या जाणत्या ज्येष्ठानांही पूर्ण निराशा आलेली असते किंवा त्यांना नवीन स्वप्ने पडत नाहीत. समाजाबद्दलच्या आशाआकांक्षाच मरून गेलेल्या असतात.. मग ते भूतकाळात आठवणीवर जगू लागतात. इतिहासातील जुन्या कालखंडात रमू लागतात किंवा त्याच त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहतात.

नव्या मार्गाचा शोध
जेव्हा जेव्हा अशा प्रकारे समाजजीवनाला साचलेपण किंवा प्रवाहपतितपणा येतो, किंवा अपयशातून खचल्यासारखा समाज संकटग्रस्त होतो, तेव्हा अशा परिस्थितीतून अशा समाजाला बाहेर काढण्याचे जुने परंपरागत मार्ग निरुपयोगी ठरतात. अशा वेळी नवीन मार्ग शोधावे लागतात. कोणत्याही समाजाच्या जीवनात किंवा वाटचालीत असे प्रवाहपतित झाल्यासारखे कालखंड येत असतात. तेव्हा अशा समाजाने त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग शोधले पाहिजेत आणि अशा समाजाला काळच नवीन मार्ग दाखवतो. मात्र नवीन मार्ग शोधण्याचे काम समाजातील जबाबदार लोकांनी केले पाहिजे. समाजातील जबाबदार लोक नवीन मार्ग शोधू शकतात. त्यातून इतिहास घडत जातो. माणूसच नवीन इतिहास घडवतो. अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब इतिहास घडविण्याचे श्रेय माणसाला देतात.
पुढे चर्चा करताना समाजातील मोठा माणूस कोण, असा महत्त्वपूर्ण प्रश्न बाबासाहेब उपस्थित करतात.अलेक्झांडर, सीझर, टॉमरलेन हे वॉर हीरो मोठे होते काय..? युद्ध जिंकणाऱ्या शूर सेनानींचा तत्कालीन युद्ध काळावर परिणाम असतो, परंतु समाजाच्या जडणघडणीवर विशेष परिणाम होत नसतो असे सांगतात.

मोठा माणूस कोण?

 मोठा माणूस कोण या प्रश्नाचा पाठलाग थोर विचारवंत कार्लाइल करतो, तो म्हणतो की,

  1. १)     मोठय़ा माणसाचा लक्षवेधक गुण म्हणजे, तो खूप प्रामाणिक असतो किंवा तो प्रामाणिक असलाच पाहिजे. समाजातील नेतृत्वगुण संपन्न व्यक्तीकडे अस्सल प्रामाणिकपणा असलाच पाहिजे. तरच त्याने केलेले कार्य लक्षवेधक असेल. त्याचा प्रामाणिकपणा त्यांच्या कृतीतून दिसला पाहिजे. पारदर्शी असला पाहिजे मोठय़ा माणसाबद्दल कार्लाइलचे विश्लेषण मान्य करताना डॉ. आंबेडकर पुढे म्हणतात.

  2. २)     मोठा माणूस ठरविण्यासाठी प्रामाणिकपणा हा निकष असलाच पाहिजे. परंतु पुढे जाऊन ते प्रतिपादन करतात की केवळ प्रामाणिकपणा असून चालत नाही कारण एखादा माणूस प्रामाणिक असूनही मूर्ख असू शकतो. म्हणून प्रामाणिकपणाशिवाय मोठय़ा माणसांकडे बुद्धिमत्ता असली पाहिजे. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावरच तो संकटात सापडलेल्या समाजाला वाचविण्याचे मार्ग शोधू लागतो.

  3. ३)     बुद्धिमत्ता व प्रामाणिकपणाच्या बळावर समाजात अनेक व्यक्ती विख्यात असतात. परंतु खरा मोठा माणूस त्यापेक्षा वेगळाच असतो. डॉ. आंबेडकर म्हणतात, समाजातील इमिनंट तथा विख्यात व्यक्तीपेक्षा मोठा माणूस हा सामाजिक ध्येयाने प्रेरित झालेला असला पाहिजे. जो समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा वा अंधश्रद्धांविरुद्ध बंड करतो. प्रसंगी हातात चाबूक घेऊन समाजावर फटकारे ओढतो किंवा प्रसंगी झाडू घेऊन समाजातील घाण स्वत: उपसतो. समाजपरिवर्तन हे त्याचे ध्येय असले पाहिजे.
  4. ४)     सामाजिक सुधारणा करण्यासाठी व्यक्तीकडे दृष्टी व धाडस असावे लागते. प्रचंड इच्छाशक्ती असावी लागते अशा व्यक्तींना त्या त्या वेळी खूप विरोध होतो. त्यांचा द्वेषही होतो. परंतु अशा परिस्थितीत प्रवाहाच्या विरोधी लढण्यासाठी त्यांच्याकडे धाडस असावे लागते. काही काळानंतर समाजामध्ये परिवर्तन होते. तेव्हा मात्र अशा समाजसुधारकांना चिरकालीन आदर व प्रेम मिळते.


जात


जातीसंकल्पनेचे एक मूळ असलेल्या मनुस्मृतीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यासपूर्ण घाव घातला. आता अन्य मुळे तपासून पाहिली पाहिजेत..
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची भारतीय प्रबोधनातील भूमिका अत्यंत मूलगामी आहे. हजारो वर्षांच्या अनेक प्रकारच्या अंधश्रध्दांमधून हिंदू समाजाला मुक्त करणारे लोकशाहीप्रधान भान देणारे बाबासाहेब हेच पहिले समाजधुरीण होते.
जात म्हणजे काय?’ हा मूलभूत तत्त्वज्ञानात्मक प्रश्न विचारणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले आधुनिक विचारवंत आहेत. जातीव्यवस्थेची तात्त्विक मुळेही शोधताना त्यांना धर्मरचनेतून त्याची उत्तरे मिळाली. ज्या मुळापर्यंत ते जाऊन पोहोचले, ते मूळ भारतीय हिंदू तत्त्वज्ञानात आहे
.

हिंदू तत्त्वज्ञानातील न्यायदर्शनाने ही जातीची संकल्पना मांडली. ती त्यांनी प्रत्यक्षातील जातीसाठी मांडली, असे नव्हे तर ज्ञानशास्त्रीय वस्तू म्हणून चच्रेसाठी मांडली. तथापि ही संकल्पना आजच्या विद्यमान जातिव्यवस्थेला लागू केली तर कोणते चित्र दिसू शकते, ते कळू शकते. ही संकल्पना जणू काही जातिसंस्था आणि जातिव्यवस्था यांचा आराखडाच तयार करते, असे म्हणता येते.

आज जाता जात नाही, ती जात’  अशी व्याख्या केली जाते, पण ती योग्य नाही. जात जाऊ शकते, जाती व जातिसदस्य यांचे नाते तोडता येते, हे डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले आहे. आज जातीची बंधने नाहीशी झाली असून समता व बंधुता या दिशेने भारताची प्रगती चालू आहे, असे म्हटले जाते. समृध्दी हा प्रश्नही बऱ्याच अंशी सोडविला गेला आहे. या पाश्र्वभूमीवर, शुध्द तात्त्विक चिंतन अथवा तर्कशास्त्रीय चिंतनाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे आव्हान व आवाहन नव्या आंबेडकर अभ्यासकांपुढे आणि विशेषत: दलित नेतृत्वापुढे आहे. 


उघड्या डोळ्यांचा बुद्ध आणि डॉ. आंबेडकर

"मला चालणारा बुद्ध हवा,' असे म्हणणारे बाबासाहेब बुद्धाला बुद्धाच्याच सब्बं अनिच्चच्या, चरथ भिक्‍ख्वेच्या संकल्पनेशी जोडून घेतात. उघड्या डोळ्यांचा बुद्ध चितारून बाबासाहेब बुद्धालाच सम्यक दृष्टीच्या आणि सम्यक ज्ञानाच्या मर्माशी जोडतात. उघड्या डोळ्यांचा बुद्ध हे त्यांचे चित्र बावीस प्रतिज्ञांएवढेच विद्रोही आहे. "ऍनिहिलेशन ऑफ कास्ट' इतकेच बंडखोर आहे. "रिडल्स इन हिंदूइझम' इतकेच स्फोटक आहे

चित्रकाराचे वर्गचारित्र्य, त्याचे भूमिकाचारित्र्य चित्राच्या संहितेतून प्रकटते. वर्गचारित्र्यही नाना स्तरांचे असते. त्यानुसार कलावंतांच्या भूमिका संभवतात. त्यांच्यानुसार कलावंतांच्या चित्राचा Significant content and Form ठरतो. या भूमिकांच्या अनुषंगाने जागतिक चित्रक्षेत्रात अभिजाततावाद, वास्तववाद, अतिवास्तववाद, स्वच्छंदतावाद, दृकप्रत्ययवाद, घनवाद, अभिव्यक्तिवाद, दृक्‌भ्रमकला, जनकला असे अनेक संप्रदाय जन्माला आले आहेत. यातील काही संप्रदाय स्थितीवादी आहेत, तर काही परंपरांच्या चौकटी तोडणारे आहेत. द. ग. गोडसे यांनी या सर्व थांबलेल्या आणि प्रगमनशील संप्रदायांचे शास्त्रधाटी आणि लोकधाटी, गणितमानी आणि गतिमानी असे दोन वर्ग कल्पिले आहेत. भारतातील ऐहिक जीवनाची जडवादी कल्पना संपन्न, समृद्ध आणि विशाल होती, हेही त्यांनी "पोत' या त्यांच्या प्रबंधात (पृ. 15) सांगितले आहे. अशी इहवादी चित्रनिर्मिती जीवनाच्या संघर्षात सैनिक म्हणून लढते. अशा चित्रांतील रेषा पोलादी, आक्रमक आणि ओजस्वी असतात. अशी चित्रे चांदण्याचे आणि आगीचे दुधारी व्यक्तिमत्त्व धारण करतात. 


काही प्रज्ञावंतांनी आता आंबेडकरवादाची मांडणी केलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातले एक महान systems builder आहेत. आंबेडकर हा समग्रलक्ष्यी जीवनविचार आहे. संपूर्ण मानवी जीवनाच्याच कल्याणाचे ते गतिशील, परिवर्तनशील संविधान आहे. या तत्त्वज्ञानाला जन्मप्रेरणा मानणारी चित्रचळवळ प्रतिक्रिया देण्यात गुंतून राहण्याऐवजी विश्‍वसमाजाच्या नव्या नमुन्याचे संकेत चितारण्याला आंबेडकरवादी चित्रचळवळ अधिक महत्त्व देते, म्हणून या चित्रकलेचे सौंदर्यशास्त्र आता प्रतिकाराच्या सौंदर्यशास्त्राच्या (Aesthetic of Resistance) सीमा ओलांडून Aesthetic of Reconstruction चे जीवनाच्या पूर्ण नवनिर्मिती सौंदर्यशास्त्र उभारीत आहे.

आज जागतिकीकरणाच्या अमानुषतेवर या चित्रचळवळीने जिहाद पुकारला आहे. आंबेडकरी चित्रचळवळीतील रंगरेषा पुन्हा नव्या सैन्यात भरती होत आहेत. प्रस्थापितांच्या फसव्या नियमांची मोडतोड त्या करीत आहेत. आणि प्रतिगाम्यांचे चित्राशय धगधगत्या रंगरेषांच्या सुरुंगानी उडवून देत आहेत. आंबेडकरी चित्रचळवळीला आपल्या श्‍वासाचे माहेर चांगले माहीत आहे. आपल्या पुढल्या आव्हानांचेही तिला भान आहे. अशावेळी रंगरेषांना आवश्‍यक त्या रणनीतीचा नकाशाही या चळवळीच्या हातात आहे. 

राष्ट्रपुरुष

बाबासाहेबांनी प्रत्येक शोषित माणसाला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला, म्हणून बाबासाहेब केवळ दलितांचेच नव्हे, तर राष्ट्रीय नेते ठरतात; पण आपल्या व्यवस्थेने त्यांना जातीच्या चौकटीत बसवून केवळ दलितांचेच नेते ठरवले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी हजारो वर्षे जो अस्पृश्य समाज हिंदू धर्म-संस्कृतीने बहिष्कृत केला होता त्या दीन समाजास माणुसकीचे हक्क मिळवून देण्यासाठी जो समतासंगर उभारला तो समतेच्या इतिहासात अद्वितीय असाच आहे. बाबासाहेबांनी दलितांबरोबरच या देशातील प्रत्येक शोषित माणसाला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला, म्हणून बाबासाहेब केवळ दलितांचेच नव्हे, तर राष्ट्रीय नेते ठरतात; पण आपल्या समाज व्यवस्थेने बाबासाहेबांना जातीच्या चौकटीत बसवून त्यांना केवळ दलितांचेच नेते ठरवलेयासारखे दुसरे करंटेपण ते   कोणते?

बाबासाहेबांनी सातत्याने एकात्म भारताचा पुरस्कार केला. वर्णवादी समाज व्यवस्थेने बाबासाहेबांचा आणि त्यांच्या समाजाचा अमानुष छळ केला. पण म्हणून त्यांनी देशावर सूड उगवण्याचा विध्वंसक विचार कधीही आपल्या मनाला शिवू दिला नाही. बाबासाहेब राष्ट्रभक्त होते. भारतीय संघराज्यात विलीन न होता स्वतंत्र राहू पाहणाºया हैदराबादच्या निझामाविरुद्ध भूमिका घेताना निझाम हा भारताचाच नव्हे, तर अस्पृश्यांचाही शत्रू असल्यामुळे दलित समाजाने त्याला साथ देऊ नये, असे म्हटले होते. हैदराबाद संस्थान मुक्त करणाºया पोलिस कारवाईतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती आणि धर्मांतर करतानाही या देशाच्या संस्कृती व राष्ट्रीय एकात्मतेस धक्का पोहोचवणार नाही असा बुद्ध धम्म घेतला. 

दारिद्र्य निर्मूलनासाठी कुटुंब नियोजनाचा पुरस्कार केला. एक अर्थशास्त्रज्ञ, घटनातज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, राजनीतिज्ञ, एक धर्मवेत्ते, प्रकांड पंडित, जातीच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांचा विचार करणारा एक क्रांतिकारी नेता म्हणून बाबासाहेबांचे फार मोठे योगदान आहे; पण तरीही त्यांना राष्ट्रपुरुष- राष्ट्रीय नेता मानण्यात खळखळ करण्यात येते, यास काय म्हणावे? कृतज्ञता की कृतघ्नता? प्रगल्भता की जातीय मानसिकता? एकीकडे गांधीवादी, समाजवादी, फुले-आंबेडकरवादी आदी सामाजिक प्रवाहांच्या सामाजिक पातळीवरील प्रबोधनाच्या चळवळी थंडावलेल्या असतानाच दुसरीकडे जातीपलीकडे न जाता जाती-धर्माचा आधार घेऊन राजकारण करण्याची रोगट स्पर्धा सर्वच पातळ्यांवर आता तीव्र झाली आहे. जातीच्या आधारावर मतांचे राजकारण करताना कोणत्याही राजकीय पक्षनेत्याला आपण जाती-धर्मनिरपेक्ष समाज निर्मितीच्या संकल्पनेला तडा देऊन जाती व्यवस्था घट्ट करीत आहोत याची खंत वाटली नाही
.या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी तमाम मानव जातीच्या कल्याणासाठी जे क्रांतिकारी विचार वेळोवेळी व्यक्त केले त्याचे परिशीलन होणे देश नि समाजहितासाठी आवश्यक आहे.

जग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आंबेडकरांचे विचार केवळ भारतीय दलितांपुरतेच नाहीत, तर जगातील सर्व समाजातील सर्व दलितांना लागू पडतील इतके व्यापक आहेत. त्यांचे आवाहन केवळ कर्मठ हिंदू धर्मपंडितांनाच नसून सर्वधमीर्य पंडितांना आहे. जगात सर्व धर्म आहेत, सर्व धर्मांत दलित असतात. त्यामुळे आंबेडकरांचे विचार वेगळ्या अर्थाने जागतिक दर्जाचे आहेत. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर साऱ्या भारतीयांचे म्हणायचे, तर आंबेडकरवादाच्या जागतिकी-करणाची जबाबदारीही साऱ्या भारतीयांची आहे. आजपर्यंत त्यांनी केलेले प्रयत्न विद्यापीठीय चर्चाविश्वातून मुक्त करून सामान्य जनतेपर्यंत नेले पहिजेत. आंबेडकरांना जातीयवादातून मुक्त करून प्रथम त्यांचे भारतीयीकरण आणि अखेरीस जागतिकीकरण करणे असे आंबेडकरी तत्त्वज्ञानाचे उद्दिष्ट असले पाहिजे. पण त्यातील प्रमुख अडथळा आंबेडकरांच्या केलेल्या जातीयीकरणाचाच आहे. 

५ टिप्पण्या:

aapan sare.... म्हणाले...

khoop chan........... changla manus kon vishes bhavle !

sachin4567 म्हणाले...

या लेखात बाबासाहेबांच्या जीवनाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा समतोलपणे विचार केला गेला आहे...साउथबरो कमिशनचे वर्ष १९१८ आहे,१९४७ नव्हे ,ही एक छोटीशी दुरुस्ती केली जावी....
बाबासाहेब प्रखर राष्ट्रवादी होते हे त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेतून स्पष्ट होते....जसे की,त्यांनी त्यांच्या पी.एचडी. च्या प्रबंधात 'इंग्रजांनी भारताचे आर्थिक शोषण कसे केले' हे अर्थशास्त्रीय सिद्धान्तानाद्वारे मांडले होते....रुपयाचे पौंडमध्ये ठरणारे मूल्य हे तेव्हा प्रचलित असलेल्या आकड्यापेक्षा कसे जास्त ठरते हे गणिताने सिद्ध करणारे बाबासाहेबच होते...त्यांच्या पूर्वी होऊन गेलेले अनेक सुधारक 'इंग्रजांचे राज्य बहुजनांसाठी उपकारक आहे म्हणून ते टिकणे आवश्यक आहे' अशा मान्यतेचे होते....याउलट बाबासाहेबांनी 'परकीय गुलामगिरी जाणार नाही तोपर्यंत अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन करणे अशक्य आहे ' अशी भूमिका घेतली होती...परंतु अशा राष्ट्रीय नेत्याला त्याचा मरणोत्तर जातीयतेच्या चौकटीत बंदिस्त करण्याचे पुण्यकर्म हे त्यांचाच अनुयायांनी केले आहे,अजूनही केले जात आहे,असे मला वाटते....तसेच कुरुंदकर म्हणतात त्याप्रमाणे,आपल्या अनुयायांना बौद्ध धर्माच्या प्रवाहात आणण्यामागे बाबासाहेबांचा प्रमुख उद्देश,त्यांची सामाजिक गुलामगिरी संपावी हा होता,तसेच त्यांच्या सांस्कृतिक जीवनाचा नवप्रारंभ व्हावा,हा सुप्त उद्देश होता....परंतु दलितांनी बौद्ध धर्माचा उपयोग कागदावर ओळख सांगण्यापलीकडे केलेला फारसा दिसत नाही....त्यांची बरीचशी बौद्धिक उर्जा ही बौद्ध धर्म इतर धर्मांपेक्षा(विशेषत: हिंदू धर्मापेक्षा)श्रेष्ठ कसा ठरतो,' संत तुकारामावर बौद्ध धर्माचा प्रभाव' वगैरे पुस्तके लिहिणे,अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या गोष्टींत खर्ची होते...हे चित्र बदलायला हवे...

शांतीसुधा म्हणाले...

छान लेख. आता ब्लॉग सुटसुटीत झाला आहे. :-)
सगळ्या महापुरूषांची एक शोकांतीका असते असे म्हणतात. त्यांचे अनुयायीच त्यांच्या शिकवणुकीचं मातेरं करतात. डॉ आंबेडकरही त्याला अपवाद नाहीत. सध्याचं आंबेडकर जयंती साजरी करण्याचं सार्वजनीक स्वरूप पाहीलं की हे सतत जाणवत रहातं. छत्रपतींच्या बाबतीतही काहीप्रमाणात तेच झालंय.

kunal bansode म्हणाले...

khup chan sir.......atleast now we need to understand ambedkar is not limited for one community....he is a symbo of knowledge

DyDEO Chandrapur म्हणाले...

असा लेख वाचल्यावर कळते साहेब एकच बाबासाहेब...

अप्रतिम लेख आणि अशा लेखांची आताच गरज आहे अख्ख्या भारताला..................