विजय भालेराव |
जगत
म्हणजे सतत बदलणारे व गतिशील. त्यामुळे सतत जे बदलत राहते ते जीवन. समाज दर्शन
करताना अनेक गतिशील व कालानुरूप बदल करणारे अनेक लोक व संघटना दिसतात. गतीचा अनुभव
घेण्यासाठी स्थिरता असणे गरजेचे असते.स्थिर पडदा असल्याशिवाय गतिमान चित्रपटाचा
आनंद घेता येत नाही. स्थिर रस्ता असल्याशिवाय वेगाने बाईक चालवण्याचा जोश अनुभवता
येत नाही. आपले विश्व पण गतिमान आहे व ते सतत वाढत असते. वाढीचा वेग हा जेवढी वाढ
झाली आहे त्याच्या समानुपाती असतो. जर हे विश्व एवढे गतिमान आहे तर त्यामागे स्थिर
असणारे काही तरी असले पाहिजे असे अनेक शोधकांना वाटते. जीवनाची गती कमी होऊ शकते किंवा
वाढू शकते. परिस्थिती नुसार त्याचे नियंत्रण गरजेचे असते. याचा अंदाज येण्यासाठी
स्थिर प्रज्ञेची जोपासना करावी लागते.
“
नित्य, नूतन व तात्कालीन म्हणजे शाश्वत ”, हा प्रबोधिनीचा विचार.
त्यामुळे
चिरंतन कार्य करण्यासाठी काही नित्याचे, काही नवीन व काही तात्कालीन,काळानुरूप
योग्य तो बदल करून उपक्रमांची मांडणी करावी लागते. यासाठी अनेक गतिशील, योजक व
काळाचे भान ठेऊन नव-नवीन काम करणाऱ्या कर्त्यांची आवश्यकता असते. पण त्याच बरोबर
ही गतिमानता सतत ठेवण्यासाठी स्थिर पण अढळ राहून नित्याचे काम आनंदाने व
स्थिरवृतीने करणारे पण अत्यावश्यक असतात. त्यांचे काम हे गतिशील व नित्य नूतन काम
करणाऱ्यांसारखे मोहक व आकर्षक नसते पण
त्यांच्या शिवाय कार्याला स्थिर सातत्य राहत नाही.
आपल्याला
सुंदर अशी इमारत दिसते पण ती ज्याच्यावर उभी आहे, असा जमिनीतील दृश्य नसणारा पाया
नाही दिसत. पण तो पाया जेवढा मजबूत तेवढी ती इमारत दीर्घ काळासाठी उभी. लढणारे
लष्कर जय मिळवते जर स्थिर व सातत्य पूर्ण रसद व मदत त्यांना मिळत राहिली तर मात्र
अनाहूतपणे रसद पुरवणाऱ्याचा आपल्या स्मृती पटलावर काही ठसा उमटत नाही. समाजाचे नीट
अवलोकन केले तर प्रभावशाली राजकारणी, अधिकारी, उद्योजक, प्रसिद्धी माध्यमांचे
प्रतिनिधी, चित्रपट कलावंत, लोकप्रिय खेळांचे खेळाडू हे आपल्याला मोहक व आकर्षक वाटतात. शेतकरी,
कामगार,शिक्षक घरात सर्वांसाठी राबणारी आई, रोग्यांची शुश्रूषा करणाऱ्या परिचारिका
मात्र थोडे उपेक्षित राहतात.
देश
उभारणीचे काम करणाऱ्या सर्व समूहांमध्ये अशा नित्याचे,स्थिर व मदतीचे सेवाकार्य
करणाऱ्यांना अनन्यसाधारण महत्व असते. दहीहंडी फोडणाऱ्या कृष्णाला हे माहित असते की,
आपण नक्की हंडी पर्यंत जाऊन हंडी फोडू शकू कारण स्थिरपणे पाय रोऊन, ज्यांच्या
खांद्यावर आपण निश्चिंतपणे उभे राहू शकतो असे अनेक आपले सवंगडी सोबत आहेत.
रोज
सकाळी साडे दहा वाजता, थोडया जुन्याच सायकलवर थोडे पुढे झुकून सतत पायंडल मारत,
सौम्य रंगाचे कपडे घातलेला व समाजप्रिय गोरा रंग सोडला तर प्रभावी व्यक्तिमत्वाचे
फारसे कुठलेही दर्शक नसणारा विजू प्रबोधिनीत यायचा. सायकल एका बाजूला लाऊन
त्याच्या कुलपाची किल्ली पँटच्या खिशात ठेवत तो गेट ढकलून आत यायचा. तोपर्यंत अनेक
लोक येऊन जायचे पण बहुधा गेट बंद असायचे.
विजू पहिल्यांदा आला की गेटला वीट लाऊन गेट उघडे ठेवायचा. नंतर एक नजर समोरच्या
मोकळ्या जागेवर टाकायचा. आमच्या सारखे कुणी समोर बाकावर बसले असल्यास त्याच्या
वेगळ्या अदाकारीने, डोळे थोडे लहान करून हसून पाही व खालच्या पण शांत व प्रेमळ
आवाजात समोरचा व्यक्ती म्हणण्याच्या आत “नमस्ते” म्हणे. आपली चप्पल स्टँडवर ठेऊन लगबगीने तो
कार्यालयाच्या दर्शनी कक्षेत प्रवेश करी. त्याची ही लगबग म्हणजे त्याचा सर्वात
मोठा अविष्कार.
कार्यालयात एकदा सर्वत्र पाहून प्रबोधिनीतील प्रत्येक खोलीत तो
जाऊन येई. कुणी तिथे असेल तर हसून नमस्ते करी व मग दर्शनी कार्यालयाच्या दारामागे
असणारा झाडू घेऊन पहिल्यांदा प्रबोधिनीसमोरील मोकळी जागा, मग कार्यालय तो स्वतः
झाडून घेई. जमा झालेला केर केरसुणीत घेऊन तो कार्यालयाच्या छोट्या कचरापेटीत टाके.
इमारतीच्या मागच्या बाजूच्या मोकळ्या जागेत जाऊन तो हात पाय स्वच्छ करून
कार्यालयात येई. त्याची बसण्याची खुर्ची व टेबल तो कपड्यांनी स्वच्छ करी मग
टेलीफोन. टेबलावरच्या सर्व गोष्टी व्यवस्थित ठेऊन मग तो उदबत्ती पेटवून
स्वामीजींच्या फोटोला ती ओवाळून टेबलावरच्या उदबत्तीच्या स्टँडला तो लावी.
या
नंतर सर्व फाईल्स तो कपड्याने झटकून व्यवस्थितपणे योग्य ठिकाणी लावे. एकदाचे कार्यालय
टापटीप झाले की, विजूची स्वारी ग्रंथालयाकडे वळे. तिथे जर काही अस्ताव्यस्त पडलेले
असेल तर त्याला योग्य त्या ठिकाणी ठेवे. हे सर्व होते न होते तोच शिशुविहारच्या
चिमण्यांची चिवचिवाट सुरु. विजुदादा सर्वांना अगत्याने हसत नमस्ते करायचा. अनेक
पालकांना, काही सूचना मुलांबद्दल ताईनां द्यावयाच्या असायच्या त्या ते विजुदादाला
सांगायचे. ताई येई पर्यंत तो बाहेरच्या बाकांवर मुलांबरोबर बसून येणाऱ्या मुलांचे
स्वागत करायचा. त्या सर्वांचे स्वागत पण भारी असे. रस्त्यावरून जो आपला मित्र
शाळेकडे चालत येताना दिसेल त्याचे नाव ते सर्व जोरजोरात म्हणायचे. मग मित्राची
स्वारी राजेशाही पद्धतीने प्रवेश करायची. एक झाला की मग दुसऱ्यासाठी ते तयार. त्या
बाकाच्या एका बाजूस विजू बसलेला असे व मुलं मात्र त्यावर उभे राहूनच आपल्या
मित्राचे स्वागत करत. आलेला मित्रही त्यांच्यात सहभागी होत असे. काही वेळातच मग
ताईंचे आगमन होई. ताईंचे स्वागत पण त्याच प्रमाणे. प्रत्येकाच्या नावाचा उच्चार २५
वेळा तरी व्हायचा. शाळा सुरु होताच थोड्या दिवसातच मुलांना सर्वांची नावे पाठ होत.
मी पण कधी कधी या स्वागत समारंभात सहभागी असे.
“चला
मुलांनो” अस ताई म्हणेपर्यंत आमचे सर्व
बालसैनिक व विजूदादा बाहेरच असत. सर्व शिलेदार प्रार्थनेसाठी उपासना कक्षात जात.
बरोबर अकरा वाजता नमस्ते होऊन शाळा सुरु होई. उशिरा येणाऱ्या मुलांच्या पालकांना व
रिक्षावाल्या मामांना योग्य ती तंबी देऊन, विजूदादा मुलांना कार्यालयातील खोलीतून
पाठवायचा, अनेक पालकांनी फारच उशीर केला तर तो कधी कधी त्यांना घरी पण पाठवी. पालक
कधी विनंती करत, कधी चिडून तर कधी आग्रह करून उशिरा येण्याचे कारण सांगायचे. पण
एकदा निर्णय घेतला की विजूदादा आपला निर्णय बदलायचा नाही. अगदी शांतपण दृढपणे तो
पालकांच्या रोषाला सामोरे जायचा. अनेक पालकांना वेळेची शिस्त विजजूदादानी लावली. सगळ्यांना
त्याचा धाक वाटायचा पण भिती कधीच नाही.
एकदा
शाळा व्यवस्थित सुरु झाली की मग तो कार्यालयात येई.आलेल्या पत्रांवर तो नजर टाके.
मग जमाखर्चाच्या वह्या कपाटातून बाहेर काढून त्या व्यवस्थित ठेवी. एक पत्र्याचा
डबा म्हणजे त्याची तिजोरी. ती तो बाहेर काढी व रक्कम एकदा मोजून घेई. इतक्यात
राष्ट्रगीत सुरु होई. विजू तत्परतेनी आपल्या जागी सावधान मध्ये उठून उभा राही.
भारतमाता की जय झाले की मग परत आपल्या कामात मग्न. प्राथमिक काम झाल्यावर आलेल्या
पालकांशी बोलणे, विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील पुस्तके देणे, काही पत्रव्यवहार
असेल तर तो पूर्ण करणे,फोनवर आलेले निरोप घेणे व देणे, पैशांची देवघेव हे सर्व
झाले की, मग बँकेची कामे,विविध प्रकारचे बिल भरणे व काही सामान आणण्यासाठी सायकलवर
तो बाहेर निघे. निघताना परत सर्व गोष्टी पूर्वीच्या जागी असतील तेथेच ठेऊन कपाटाला
कुलूप लाऊन त्याला दोनदा तीनदा दाबून व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यावरच तो
बाहेर पडे.
बाहेर
जाताना वरच्या मजल्यावर माझ्या आईला भेटून तो जाई. मी तसा मोकाटच त्यामुळे आई सतत
त्रस्त असायची. विजू आपलेपणाने आईला काही काम आहे का बाहेरचे विचारायचा. काही वेळ
तिच्याशी गप्पा मारायचा व आपल्या कामासाठी निघायचा. त्याचे हे वागणे काही माझ्या
सांगण्यामुळे नव्हते.
बाहेरून
आला की, मग परत तो कार्यालयीन कामात गर्क. मी त्याला कधीच मोकळे बसलेले पाहिले
नाही. दोन वाजता शिशुशाळा सुटे. त्याआधीच
अनेक पालक येऊन बाकांवर बसलेले असत. काही पुरुष पालक आवर्जून विजूदादाला भेटत. अगदी
कुठलाही अभिनिवेश न ठेवता सहज पणे विजू सर्वांशी संवाद साधायचा. शाळा संपल्यावर
काही मुलांच्या पालकांना किंवा रिक्षांना येण्यासाठी उशीर होई. ताई सव्वादोन
पर्यंत वाट पाहत मग त्यानंतर राहिलेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी विजूदादावर
सोडून त्या घरी जात.
मुलं
व विजूमधला संवाद खुपच मस्त असे. बऱ्याच वेळा फक्त मुलंच बोलत व विजू त्यांच्या
कडे फक्त हसत पाहत असे. खूप वेळ झाला तर मुलांना तो घरी सोडवायला पण जाई. साधारण
पावणेतीन पर्यंत सर्व कामे पूर्ण करून तो सर्व गोष्टी व्यवस्थित ठेऊन व परत गेट
बंद करून आपल्या सायकलवर घरी जाई.
दोन
अडीच तासांचा मध्यंतर घेऊन तो बरोबर साडेपाच वाजता परत येई.परत येताच वर सांगितलेल्या
आपल्या नित्य आचारसंहितेप्रमाणे सर्व करी.पावणे सात होताच परत सायकलवर भटगल्लीतील
राममंदिरात असणऱ्या रामदास उपासना केंद्रात उपासना घेण्यासाठी तो निघे. गल्लीतून
जाताना खेळणाऱ्या मुलांना तो आवाज देऊन बोलावूनही घेई व सोबत उपासनेला जाई. ४५
मिनिटांचे उपासना केंद्राचे सर्व उपक्रम
झाल्यावर तो सर्व मुलांबरोबर गप्पा मारत बाहेर पडे. खुपदा मुलं उपासनेच्या वेळी व
नंतर खूप गोंधळ घालत पण विजूचा आवाज खूप वाढला असे कधी दिसले नाही. मुलांबरोबर
त्यांच्या घरी कधी तर कधी गल्लीतील मित्रांशी काही वेळ बोलून व गरज असल्यास
बाजारातील काही कामे करून आठच्या आसपास विजू प्रबोधिनीत परत येई.
थोडं फार असलेल्या लोकांशी हसून बोलून विजू कामाला
लागे. रात्रीचे दहा, साडे दहा तर कधी कधी अकरा वाजे पर्यंत तो काम करत बसे.
“अरे
विजू,थोडं लवकर जात जा घरी, वाटल्यास लवकर ये सकाळी” , असे अनेक वेळा फक्त मीच
नाही तर अनेकांनी सांगितले पण त्याची जाण्याची वेळ काही बदलली नाही तशी येण्याची
पण.
एप्रिल
ते जून मध्ये तर विजूला खुपच काम असे. शिशुशाळेतील, प्रबोधशाळेतील, स्पर्धापरीक्षा
केंद्रातील व उन्हाळी शिबिरातील मुलांचे प्रवेश या काळात असत. सुरुवातीस ३०-४०
मुलं होती पण पुढे ही संख्या हजारांमध्ये पोहोंचली. त्या बरोबर कार्यकर्त्यांची
संख्या व प्रबोधिनीच्या केंद्रांची संख्या पण एकाहून तीन वर पोहोंचली. काम खूप
वाढले पण विजू मात्र शांतपणे सर्व काही हसत हसत करत होता.
प्रबोधिनीतील
अगदी लहान मुलांपासून ते सहस्त्रचंद्रदर्शन झालेले मामा पारगावकरांपर्यंत कुणीही
सहज पणे कुठलीही मदत विजूला मागत व तो सहजपणे त्यांना ती करत असे. हे फक्त मदतीपुरतेच
नव्हते तर अगदी कुठल्याही कामाबाबतीत पण असे. सुरवातीचा काही काळ सोडला तर
कार्यालयात झाडू मारण्यापासून अगदी पैशांचे व्यवस्थापन करण्यापर्यंत सर्व गोष्टी
विजू करायचा.या सोबत प्रबोधिनीच्या संस्कार विधीच्या पद्धतीने पहिल्या पौरोहित्यापासून,
गणेशोत्सव, विवेकानंद जयंतीचा मोठा कार्यक्रम किंवा विवेकवाडीतील कुठलेली काम यामध्ये
विजूचा सक्रिय सहभाग असायचा.
२०००साली
तो प्रबोधिनीत आल्यापासून त्याचा पुढील ९ वर्षे यात क्वचित खंड पडला असेल.
विनोबांनी
बाळकोबांना लिहिलेल्या एका पत्रात, गीतेतील पहिल्या अध्यायातील श्लोक फारच सुंदरपणे
थोडासा बदल करून वापरला आहे,
“राहुनि
आपुल्या स्थानीं जेथें ज्यास नियोजिलें, चहूंकडूनि ‘ विद्येस’ रक्षाल सगळे जण ”
(गीताई १.११ ) आपल्याला ज्या स्थानावर,ज्यासाठी नियुक्त केले आहे ते अतिशय
प्रामाणिकपणे करत प्रबोधिनीचे संघटनात्मक काम पण विजय करत होता. सदैव गतिशील असणाऱ्या
ज्ञान प्रबोधिनी, अंबाजोगाईसाठी दोन भक्कम असे स्थिर आधार होते एक म्हणजे आमचा
विजय व माझी आई.
विजयचा
जन्म अंबाजोगाईतच झाला. वडील सिद्धराम भालेराव शिक्षक होते. सावळा रंग, स्थूल प्रकृती, पारंपारिक पांढरा सदरा व
धोतर ते घालायचे. दररोज त्यांची व माझी भेट मारुतीच्या मंदिरात व्हायची. ते स्मित
करून माझ्या नमस्काराला प्रतिसाद द्यायचे. आई सुनंदाबाई, खूप गोऱ्या,
ठेंगण्या,कपाळावर मोठं कुंकू, नऊवारीत असत. विजू खुपसा आई वर गेलेला. विजूला एक
भाऊ व बहिण. मोठा भाऊ पुण्यात सिव्हील इंजिनिअर होता तर बहिणीचे लग्न लातूरच्या
मधील औषध कंपनीच्या प्रतिनिधीशी झाले होते. विजूचा बहिणीत खूप जीव.
“अरे
विजू कुठे आहेस? आज आलाच नाहीस?”
“दादा,लातूरला
आलो आहे.” विजू शांतपणे फोनवर सांगायचा.
“मग
आत्ता तू काही पाच दिवस येत नाहीस.” एकदम
हळुवार पणे खुद कणी हसत विजू हो म्हणायचा.
पुढे
त्याच्या बहिणीचे पती दुबईला नौकरीसाठी गेले.
विजूचे
शिक्षण अंबाजोगाईतच झाले. फारसा वर्गात उठून दिसणाऱ्यात तो नव्हता. वडीलांचे पण फार
काही मोठे प्रस्थ नव्हते. त्यामुळे फार कमी शिक्षकांना असे मुलं लक्षात राहतात किंवा
त्यांना त्यांच्या कडे खास लक्ष देता येते. ७० ते ८० मुलं असणाऱ्या वर्गात व एक
एका वर्गाच्या अनेक तुकडया असणाऱ्या शाळेतील शिक्षकांकडून ही थोडी अवास्तवच
अपेक्षा ठरेल ना ?
वडिलांची
नौकरी बाहेर गावची.आईचे शिक्षणही फारसे नाही. त्यामुळे मुलांच्या शिक्षणातील फारसे
त्यांना कळायचे नाही. त्यात विजयराव घरातील शेंडीफळ !!!!
शालेय
जीवनातील त्यांचा प्रवास तसा सो सोच होता. घरातील संस्कारांमुळे शांतपणा,
मितभाषीपणा, प्रामाणिकपणा, सचोटी, पडेल ते काम करण्याची सवय असे अनेक गुण विजूत
होते. एकविसाव्या शतकातील शिक्षणाच्या ससा-कासवाच्या स्पर्धेत कासवाचे टिकणे पण
अशक्यच. कारण आत्ता या स्पर्धेत पालकपण सहभागी असतात जर चुकून मुलगा झोपला तर
त्याला जागे करायला.
काही
दिवसांपूर्वी माझा एक मोठा भाऊ माझ्याकडे पुस्तक वाचण्यासाठी मागावयास आला. माझ्या
आत्ता पर्यंतच्या त्याच्या सहवासात मी त्याला अवांतर पुस्तक वाचताना कधीच पहिले
नव्हते.
मी
उत्सुकते पोटी त्याला विचारले, “अरे दादा ! हे वाचन कधी पासून सुरु केलेस ?”
“अरे
पोरगा, १२ वीला आहे ना. शेवटचा महिना राहिलेला आहे. रात्री जागून अभ्यास करतो.
त्याच्या सोबत बसावे लागते मध्येच त्याला झोप लागली तर उठवण्यासाठी. पण नुसते बसणे
काही होत नाही. सोबत काहीतरी लाईट मूडचं वाचायला असले तर मला ही न झोपता त्याच्या
बरोबर जागता येईल.” खुपच प्रांजळ पणे दादा म्हणाला.
विजूवरील
घरातून झालेल्या संस्कारांना शिक्षण क्षेत्रात फारसे स्थान नाही. बाजारात त्या
values ला काही sale value नाही. दहावीला अगदी काठावरची प्रथम श्रेणी त्याला मिळाली.
साहजिकच शास्त्र शाखेत त्याने प्रवेश घेतला. त्यात त्याचा निभाव लागणे कठीण होते.
दुसऱ्याचे पाहणार नाही,कॉपी करणार नाही, थोरामोठ्यांचा मुलगा नसल्याने
महाविद्यालयातील परीक्षेच्या वेळी Garding करणाऱ्यां प्राध्यापकांचे कृपाछत्र पण नाही, जवळचे मित्र व नातेवाईक इतके
भिडस्त की पोलीस दिसला तरी चार हात दूर राहणारे. त्यांची परीक्षेच्या वेळी रसद
पुरवायला यायची काय बिशाद !!!! अशात व्हायचे ते होणारच की? विजू ४८ % घेऊन पास
झाला.
देणगी
देऊन व्यावसायिक अभ्यास क्रमात प्रवेश घेणे त्याच्या व वडिलांच्या स्वप्नातही येणे
शक्य नव्हते. पाच जणांचे भागवण्या पुरती त्यांची कमाई. विजूने महविद्यालयात रसायन
शास्त्रातील पदवी साठी प्रवेश घेतला. मोठया भावाचे शिक्षण पण सुरु होते. पुढच्या दोन
वर्षांत त्याला लक्षात आले की, आपण ही आत्ता काही कमाई केली पाहिजे. पुढे शिकणे पण
शक्य नव्हते. मंडीबाजारातील मंत्रीच्या औषधाच्या दुकानावर विजू ग्राहकांना औषधे
देण्याचे काम पदवीच्या शेवटच्या वर्षी करू लागला. पदवी पूर्ण झाली. आत्ता कुठेतरी
नौकरी केली पाहिजे असे त्याला वाटत होते. एका पतसंस्थेत त्यांनी लेखनिक म्हणून
नौकरी धरली.
याच
काळात प्रबोधिनीने दुसऱ्या वर्षांत पदार्पण केले होते. विद्यार्थ्यांची व
उपक्रमांची संख्या वाढली. आम्ही त्या मध्ये खुपच गुंतलेलो असत. स्थिरपणे
कार्यालयात आपलेपणानी काम करणारे कुणीत तरी आवश्यक होते. विजूची भेट नेहमी
व्हायचीच. त्याचे कुटुंब काही काळ माझ्या आजोबांच्या घरात भाडेकरू म्हणून राहायचे.
आजोबांनी विजू बद्दल खूप चांगले सांगितले होते. मी विजू समोर अनेक वेळा प्रबोधिनीत
कामासाठी येण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मकरंद पत्की बरोबर अनेक निरोपपण पाठवले.
विजू प्रबोधिनीत यायला मात्र चारपाच महिने लागले.
विजूने
प्रबोधिनीचे कार्यालयीन काम सुरु केले त्यावेळी प्रबोधिनी, संघटना, रूप पालटू
देशाचे असे शब्द कधी ऐकिवात पण नव्हते. सुरवातीचे मानधन चारशे रुपये ठरले व विजू
कार्यालय सांभाळू लागला. बाहेर दिसणाऱ्या कासवाने मात्र प्रबोधिनीच्या वातावरणात
एकदम सस्याचे रूप घेतले. फार लवकर तो अनेक गोष्टी शिकत गेला. थोड्या दिवसात
त्यांनी कार्यालयीन कामातून माझी बरीच सुटका केली. आत्ता फक्त नियोजनाचा व
निर्णयाचा भाग माझ्या कडे होता.
वर्ष
पूर्ण होताच तो अनेक उपक्रमात सहभागी होऊ लागला. प्रबोधिनीतील साहित्य पण या काळात
बरेच वाढले. त्याला अगदी प्रत्येक गोष्टीची खबर बात असे. दुसरे वर्ष पूर्ण होताच
त्याने सर्व कार्यकर्त्यांशी एवढे छान नाते जोडले की, त्याला काम सांगण्यासाठी किंवा
त्याची मदत घेण्यासाठी माझी मध्यस्ती पण संपली. तिसऱ्या वर्षांत सर्व
कार्यकर्त्यांसोबत त्याचे रचनाबद्ध काम सुरु झाले व प्रबोधिनीच्या कार्यालयाची आचारपद्धतीची
घडी खूप व्यवस्थी पणे बसली.
विजूची
आत्ता प्रबोधिनीच्या अनौपचारिक शिक्षण पद्धतीचा एक प्रतिनिधी म्हणून अंबाजोगाईत
ओळख होऊ लागली. स्वामी रामानंदतीर्थ यांच्या जन्मशताब्दी वर्षांत सोनवळकर यांच्या
घरातील स्वामी रामानंदतीर्थ रहात होते त्या खोलीत अभिजीत देशपांडे सोबत वर्षभर
उपासना केंद्र चालवले. अमोल पाटणकरने काम थांबवल्यावर रामदास उपासना केंद्राची
जबाबदारी कोण घेणार हा मोठा प्रश्न माझ्या समोर उभा होता. अमोल खूप मोठया ताकदीचा
कार्यकर्ता आणि खुपच प्रेमळ. विजूदादा शिवाय हे काम खूप आत्मियतेनी करू शकेल असे मला
कुणीही दिसत नव्हते. विजू रामदास उपासना केंद्रावर मार्गदर्शक म्हणून जाऊ लागला व
काही दिवसात त्यांनी त्या भागातील अनेक लोकांना प्रबोधीनिशी जोडले. श्री मुकुंद
कऱ्हाडे यांचे संपूर्ण कुटुंब, परिमल देशपांडेचे कुटुंब असे अनेक जण प्रबोधिनीला
जोडले गेले. श्री मुकुंद कऱ्हाडेशी विजूचे खुपच छान नाते जुळले. त्यांना तो मामा
म्हणायचा. विजू बरोबर ते सर्वांचे मामा झाले. पुढे मामांच्या घरातील सर्व
सदस्यांनी प्रबोधिनीची एकत्र प्रतिज्ञा घेऊन प्रबोध कुटुंबाचा आदर्श निर्माण केला.
विजूचे
वय पण वाढत होते. प्रबोधिनीचे कामातून त्याला फार फार तर त्याचे भागेल ते ही
जेमतेम एवढे मानधन आम्ही त्याला देऊ शकत होतो. त्यात विस्तार केंद्रावर जास्त
अनौपचारिक शिक्षणाचे उपक्रम झाले पाहिजेत असे धोरण होते. त्यातून अर्थाजन होणे
अशक्यच. मारुतीच्या मंदिरात विजूचे वडील भेटले की, ते त्याच्या पगारा बद्दल
बोलायचे,स्थिर नौकरी बद्दल बोलायचे, लग्ना बद्दल बोलयचे. त्यांना विजूच्या
भविष्याची चिंता होती. एक दिवस मी विजूला, वडील जे बोलतात ते सांगितले.
“दादा,
वृद्धापकाळ आहे, फार मनावर घेऊ नका.” अगदी सहज विजू बोलला.
प्रबोधिनीतील
माझ्या कामाच्या बदलाचे वेध पण मला लागले होते. २००५ पासून अंबाजोगाईत मी वाढवलेला
कामाचा काही पसारा आवरायला सुरुवात केली. अनेक उपक्रम प्रबोधिनी नावानी बंद करून
ते जे चालवत होते त्यांनी स्वतः चालवावेत अशा स्थितीत आले होते. त्यामुळे त्यांची
व्यवस्था लावणे अवघड नव्हते. विजूशी निवांत बोलण्यासाठी मी त्याला कन्याकुमारीला
आठ दिवसांसाठी घेऊन गेलो. खूप गप्पा झाल्या. त्याचे भविष्याकडे पाहण्याचा
दृष्टीकोन समजला. त्याला स्थिर व योग्य पगाराची नौकरी मिळाल्यास गृहस्थाश्रमात
प्रवेश करायचा होता. याच काळात भारताचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम
शिलास्मारकावर दर्शनासाठी येणार होते. आम्ही कन्याकुमारीत राहण्याचा बेत
वाढवण्याच्या विचारात होतो. याच काळात विजूला घरून कळाले की, एका शासकीय
नौकारीच्या पूर्व परीक्षेचे पत्र घरी आले आहे व पुढील तीन दिवसांनी ती परीक्षा होणार आहे. विजूला जाने भाग होते मी
थोडं थांबण्याचा आग्रह केला.
“अरे!
नौकरी तर कधी न कधी भेटेल पण डॉक्टर कलामांची भेट व तीही विवेकानंद शिलास्मारकावर
हा खूप दुर्मिळ योग आहे. जाऊ नकोस.” मी दिवसातून अनेक वेळा विजूला सांगत होतो.
डॉक्टर
कलामांच्या भेटी पेक्षा भविष्यातील असुरक्षितता संपणे विजूसाठी महत्वाचे होते.
विजू परीक्षेसाठी तत्काळ तिकीट काढून गेला. मी मात्र विवेकानंद शिलास्मारकावरील
डॉक्टर कलामांच्या भेटीचा अविस्मरणीय अनुभव घेऊन अंबाजोगाईला परतलो.
विजू
काही ती परीक्षा पास झाला नाही पण मला मात्र आता त्याच्या भविष्याची योग्य
व्यवस्था करणे महत्वाचे वाटत होते.
अभिजीत
जोंधळे माझा प्रिय मित्र हर्षवर्धनचा लहान भाऊ. माझे पदव्युत्तर शिक्षण संपल्यावर
अंबाजोगाईत संगणक प्रशिक्षण सुरु करण्याचा माझा विचार होता. काही पायभूत गोष्टी
पूर्ण पण केल्या होत्या. घरातील सर्वांचा याला विरोध होता. अभिजीतशी माझ्या या
संकल्पनेवर खूप बोलणे झाले होते. तो संगणक शास्त्र घेऊन पदवी करत होता. अभिजीतचे
वडील हाडाचे कार्यकर्ते तर त्याचे सर्व मामा व्यापारात निपुण. हर्षवर्धन हा
मामाच्या तालमीत वाढला. त्यामुळे त्याचे व्यापारातील व व्यवहारातील कौशल्य
बेमालूम. हर्षवर्धन त्याची रग आमच्या बरोबर मैदानात जिरवत होता तर अभिजीत
काकांच्या मार्गदर्शनाने वक्तृत्व स्पर्धा गाजवत होता. संगणक प्रशिक्षण व
व्यवसायाची माझी संकल्पना त्याला आवडली व तो सोबत काम करण्यास तयार होता. माझ्या
घरातून अंबाजोगाईला येण्याला टोकाचा विरोध सुरु झाला. आई व माझे रोजच भांडणं होऊ
लागली. प्रबोधिनीचा ध्येयवाद माझ्या नसानसात भिनला होता. आई व माझ्यात खूप मोठी
मानसिक दरी निर्माण होत होती. दोघंही आपल्या जागी आम्ही बरोबर होतो. शेवटी मी
निर्णय बदलून अनुभव घेण्यासाठी कन्याकुमारी व तेथून अरुणाचलला गेलो. आई व
प्रबोधिनीचे संचालक गिरीशराव यांना पाच वर्षांनी परत येण्याचे आश्वासन देऊन.
अभिजीत
मात्र याकाळात पुढे शिकण्यासाठी औरंगाबादला गेला. तिथल्या वातावरणात तो रमला.
बँकेतून कर्ज काढून,दोन मित्रांबरोबर त्याने संगणकाचा व्यवसाय पण सुरु केला. सरावा
नंतर एखाद व्याख्यान देणं, कार्यक्रमाचे संचलन करणे खूप सोप होत.आपल्याच
मित्रांबरोबर व्यवसाय चालवणे व तो ही भागिदारीने हे औरंगाबादसारख्या ठिकाणी खूप
जिकीरीचे काम. त्यात साहेबांना व्यवसायातील छक्के पंजे आजिबात माहीत नाहीत. एखादे
भागीदारीचे दस्तावेज करताना कितीही जवळचा मित्र असला तरी त्यातले बारकावे व योग्य
त्या कायदेशीर बाबींबाबत योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. बऱ्यापेकी भावनिकतेनी
व थोड्या फाजील आत्मविश्वासाने त्यांनी थोडं घाईतच भागीदारीचे दस्तावेज तयार केले.
त्यात बऱ्याच त्रुटी होत्या हे त्याला समजले ज्यावेळी सुरुवातीचे गुलाबी स्वप्न
भंगून वास्तवाचे चटके त्यांना बसायला लागल्यावर फारच कमकुवत असलेले त्यांचे
मैत्रीचे बंध तुटून पडले. संगणक व्यवसायाची पूर्णतः वाताहत झाली. बँकेचा तगादा
वर्षभरातच सुरु झाला. याच काळात त्याचे लग्न पण झाले. औरंगाबादच्या त्याच्या घरी
मी एकदा जाऊन पण आलो होतो. वर वर पाहता अभिजीत खूप खुश दिसत असे. तसा त्याच्या
बोलण्यातून कधीच त्याच्या समस्या आपल्याला कळत नाहीत. तसा बोलण्यातून बिनधास्त
वाटणार भैय्या या सर्वांनी आतून खुपच भेदरला होता.
अभिजीतसाठी
बँकेत जमानतदार म्हणून औरंगाबाद मधील खूप प्रसिद्ध असलेले त्याचे काका होते. बँकेच्या
नोटीसा ज्यावेळी काकांना जाऊ लागल्या त्यावेळी ते अस्वस्थ होऊ लागले. अपस्माराचा
बालवयात त्रास असणऱ्या अभिजीतला साहजिकच याचे चांगलेच धक्के बसत होते. अतिशय
संवेदनशील व भाऊक भैय्याच्या मनावर यासर्वांचा खूप खोल परिणाम झाला होता. मन काही
स्थिर नव्हते. असाच एके दिवशी तो बाहेर काही कामासाठी मोटार सायकलहून निघाला. थोडे
अंतर जाताच त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली व तो गाडीवरून जोरात पडला. मोठा अपघात
झाला पायाच्या हाडांना चांगलीच इजा झाली. पायावर शस्त्रक्रिया करून प्लॉस्टर
करण्यात आले. २ महिने सक्तीच्या विश्रांतीसाठी अभिजीतला हर्षवर्धनने अंबाजोगाईला
आणले.
प्रचंड
क्षमता असणारा अभिजीत वेगळ्याच मानसिकतेत असल्याची पुसटशी जाणीव मला झाली होती.
त्याच्या अंबाजोगाईतील वास्तव्यात तो हळूहळू माझ्या समोर मोकळा झाला. तो मोकळा
झाल्यावर आता त्याला यातून बाहेर काढायचे होते. त्यासाठी त्याला आश्वासक
वातावरणाची खूप गरज होती. प्रबोधिनीत ते खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकते याच्यावर
माझा विश्वास होता. अंबाजोगाईत अभिजीतच्या अनेक गुणांची कदर होणार होती. प्रबोधिनी
व अंबाजोगाईच्या वातावरणात तो भूतकाळाच्या धक्यातून सहज बाहेर येऊ शकत होता. खूप
सावकाश पणे मी त्याच्याशी संवाद वाढवत होतो. मी योग्य वेळेची वाट पाहत होतो. मला
हे माहीत होते, एकदा तो अंबाजोगाईला आला की, त्याच्या आर्थिक, भावनिक व भविष्याचे
सर्व प्रश्न तो स्वतःच संपून टाकेन. त्याच्यात तेवढ्या क्षमता नक्की होत्या.
योग्य
वेळ आली व मी अभिजीत समोर अंबाजोगाईत प्रबोधिनीचे काम करण्याचा प्रस्ताव ठेवला. तो
या काळातच बाबा पण झाला होता. अनुरागच्या
आगमनाने त्यात थोडं चैतन्य पण आले होते. प्रबोधिनी फार आर्थिक दृष्ट्या सक्षम होती
अशातील भाग पण नव्हता. अभिजीतचा चरितार्थ अखंड पणे चालवण्याची प्रबोधिनीची ताकद पण
नव्हती. आमचा ठेवा म्हणजे प्रत्येकाला मुक्त पणे अभिव्यक्त होण्यासाठी जेवणातील मिठा
एवढी मदत करणे. एकंदर अर्थकारण बघता आम्ही फक्त अभिजीत सोबत त्याच्यावर ज्यांची जबाबदारी
आहे त्यांच्या फक्त पोटापाण्याची आर्थिक व्यवस्था आम्ही करू शकत होतो. त्यावेळी
विजूला सर्वात जास्त म्हणजे १८०० रुपये मानधन होते. अभिजीतला त्याच्या पेक्षा थोडे
जास्त लागणार होते. विजूच्या मागे संसार अजून लागला नव्हता व कर्जाचे तुणतुणे पण.
सहजच मी विजू समोर बोलताना त्याला नकळत अभिजीतला ३००० रुपये मानधन दिले तर कसे
राहील? हा विषय ठेवला. त्याची
सहज प्रतिक्रिया होती काही हरकत नाही. अभिजीत निदान एक वर्ष कमीत कमी पूर्ण
क्षमतेने काम करू शकेल असे नाही हे पण आमच्या चर्चेतून त्याला उमजले होते. विजूने
कधी एक क्षण पण त्याच्या वागण्यातून मला हे जानवू दिले नाही की, मी गेले पाच वर्षे
काम करतो आहे व माझ्या पेक्षा जास्त मानधन तुम्ही अभिजीतला का देता? त्याने आधी
पहिले होते की, प्रबोधिनीतील काही प्रवृतिनी त्याच्यासमोर काही पैशांसाठीचा विषय
अस्मितेचा बनवत खूप टोकाला नेला होता. आपण जिथे काम करतो आहे तिथे घडत असणऱ्या
चांगल्या गोष्टी शोधायच्या असे उमदे व्यक्तिमत्व विजयचे होते.
आम्ही अनेक वेळा
त्याच्या भाबडेपणाची टिंगल करायचो तो
मात्र सगळ निर्व्याज भावाने घायचा. शाब्दिक तडक्याचा खमंग मजे पेक्षा निथळ
पाण्याची शीतलता विजूच्या हसण्यात होती.
प्रबोधिनीच्या
दरवर्षीच्या कार्यवृतात्त किंवा विशेष कार्यक्रमात कधीही त्याचे नाव आले नाही.
त्याने कधी कुठला लेख लिहिला नाही. कधी कोणते भाषण केले नाही, कुणाला भारून
सोडणारे कुठले काम पण त्यांनी केले नाही. तरीही प्रत्येक उपक्रम त्याच्या शिवाय
कधीच पूर्ण झाला नाही. विजू आमचा एक मोठा स्थिर आधार होता. संघटनेसाठी व्यक्ती
असतात पण व्यक्ती साठी संघटना नसते हे जरी खरं असलं तरी कार्यकर्ते हीच खरी
संघटनेची संपती असते. विजू पण प्रबोधिनीतील संपत्तीतील हिरा होता. त्याचे ही काही
स्वप्न होते. फार मोठया नाही पण सुखी संसाराच्या त्याच्याही काही आशा होत्या. लग्न
करून घर थाटण्याची त्याची पण इच्छा होती. विजू या हिऱ्याची लग्नाच्या बाजारात व
नौकरीच्या बाजारात फार किंमत नव्हती.
आमच्या
भागात आधीच मुलां पेक्षा मुलींची संख्या कमी. अगदी ग्रामीण भागातील काही मातब्बर
लोकांना आपल्या मुलांचे लग्न शहराच्या अनाथांलयातील मुलींशी लाऊन द्यावे लागते. विवाह
योग्य मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण चांगले. एकदा मुलगी पदवीधर झाली की, तिला
शहरातील सॉफ्टवेअर मधील किंवा चांगल्या पगाराची स्थिर नौकरीचा नवरा हवा. विजू या सर्वांमध्ये
प्रबोधिनीत काम करत राहून बसू शकत नव्हता. आमची त्याला फक्त आत्मसन्मान व
आत्मविश्वास देण्याची कुवत होती. विजू ला व अभिजीतला या शिवाय आम्ही काहीच जास्त
देऊ शकत नव्हतो. अभिजीत मध्ये अनेक क्षमता होत्या तो त्यांच्या जोरावर थोडं सावरलं
की, स्वतःची व कुटुंबाची आरामात व्यवस्था करू शकणार होता पण विजूला स्थिर नौकरी
मिळणे अवघड होते. त्याला ती मिळणे पण गरजेचे होते कारण वयाचे वाढणे त्यासमोर
थांबणार नव्हते. आ. संचालकाशी बोलून यातून काही मार्ग काढण्याचा प्रयत्न पण केला,
यश काही नाही आले. विजू काही काळ पुण्यात राहून परत अंबाजोगाईला आला.
प्रबोधिनीतील
अनेक उपक्रम आम्ही माईर ( MIT) च्या शाळेत घेत असू. तिथे काही जागा रिकाम्या
असल्याच्या आमच्या कार्यकर्त्यांना कळले. विजू तेथील कामावर रुजू झाला. पगार ३०००
रुपये. नौकरी मोठया संस्थेत मिळाली पण आजून लग्नाच्या बाजारात विजूला किंमत आली
नव्हती. त्याच्या कष्टाळू व प्रामाणिकपणा मुळे मात्र तेथील लोक खुश होते.
आम्ही
मात्र विजूला मजेत म्हणायचो, “ विजूदादा कधी बार वाजवायचा ?”
तो
फक्त हसून उत्तर देई, “होईल...होईल.”
गेल्या
तीन वर्षातील त्याचे काम पाहून शाळेनी त्याचे मानधन चांगलेच वाढवले. विजूनी नवीन
स्कुटर घेतली. अभिजीतपण सर्वं अग्नी परीक्षातून सुखरूप पण काही काळासाठी
अपस्माराचा व नेहमी साठी मधुमेहाचा दागिनां घेऊन बाहेर आला. त्याचे प्रबोधिनीतील
मानधन मात्र आजही तेवढेच आहे पण त्याने आपल्या क्षमतांचा योग्य वापर करून स्वतःचा
योग क्षेम केला.
अभिजीत देशपांडे ,अभिजीत जोंधळे ,प्रसाद चिक्षे ,विजय भालेराव |
बैठकीसाठी
माझ्या कडे काही शिशुशाळेच्या ताईंना मी घरी बोलावले होते.
चोथवे
काकू नेहमीच्या उत्साहात व जोरदार आवाजात म्हणाल्या, “ दादा, अहो माहीत झाले का ?
विजू दादाचे लग्न ठरले. मुलगी औश्याची आहे. खूप चांगल झालं बघा.”
४ टिप्पण्या:
wow congratulation dada aplya viju dadache laggn tharlyache wachun khupch anand zala
Viju dada sobat Ramdas Upasana Kendra varil kal avismarniy hota!!!To anubhav kadhihi visarnar nahi.
अरे दादा एक छोटीशी मिस्टेक झाली आहे...मुलगी उस्मानाबाद ची आहे...आणि माझी बहिण आहे...कडक लिहिलं आहे!
टिप्पणी पोस्ट करा