संत सर्वज्ञ दासोपंत १५-१६ व्या शतकातले! मध्ययुगातील नाथपंचक म्हणजे संत एकनाथ, जनीजनार्दन, रामा जनार्दन, विठा रेणुकानंदन आणि संत सर्वज्ञ दासोपंत हे होय.
या पंचकातीलच नव्हे तर एकूणच आजवरच्या संत काव्यात सर्वाधिक, प्रचंड काव्यनिर्मिती करणारे संत म्हणजे दासोपंत होत. त्यांनी केवळ अफाट साहित्य निर्माण केले, असे नाही तर त्यातील वैविध्य, वैचित्र्य, विलक्षणता यामुळे त्यांचे साहित्य संत काव्यात आपली विशिष्टता सिद्ध करते. ज्यांनी अंबाजोगाईत मंदिर परंपरेत धर्मसंप्रदायी उपासनेला कलात्मक अधिष्ठान दिले, ते संत सर्वज्ञ दासोपंत गोस्वामी होत.
संत दासोपंतांचे चरित्र :-
बेदर परगण्यातील नारायणपेठी दिगंबरपंत हे बेरिद अलीच्या दरबारात कमाविसदार होते. दिगंबरपंतांकडे पंचमहाली देशमुख-देशपांडेपण होतं. दिगंबरपंत व पार्वतीबाईंच्या पोटी मोठय़ा नवसानं शके १४७३ (सन १५५१) अधिक भाद्रपद वद्य अष्टमीला दासोचा जन्म झाला. बालपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या दासोनं वयाच्या पाचव्या वर्षी, मौंज होताच चारही वेद मुखोद्गत म्हणून दाखविले! पुढे वयाच्या १६ व्या वर्षी गद्वालच्या सावकाराच्या मुलीशी - जानकीशी - त्याचा विवाह झाला.
राज्यात दुष्काळ पडला. लोकांची अन्नान्न दशा झाली आणि दिगंबरपंताच्या ठायी असलेली भूतदया जागी झाली. त्यांनी कोठारातील सर्व धान्य गोरगरीब लोकांना वाटून टाकले. त्या वर्षी दिगंबरपंतांनी साराही जमा करून भरला नाही. बादशहाला ही गोष्ट कळताच दिगंबरपंतांना दरबारात हजर राहण्याचे आदेश दिले. दिगंबरपंत आपल्या लवाजम्यासह दरबारात हजर झाले. सोबत दासो होता. बादशहाने कोठारं खुली करण्याबद्दल जाब विचारला. दिगंबरपंतांचे, मला गरिबांची दया, आली हे उत्तर ऐकून बादशहा आणखीनच संतापला. त्यानं फर्मान सोडलं, एक महिन्याच्या आत दोन लक्ष सुवर्णमुद्रा सरकारी खजिन्यात जमा करा. तोवर दासोला इथं ओलीस म्हणून नरजकैदेत राहावं लागेल. एक महिन्याच्या आत मुद्रा भरल्या नाहीत तर दासोला मुसलमान केलं जाईल. हे निर्वाणीचे शब्द ऐकले आणि दिगंबरपंतांवर आभाळच कोसळलं! त्यांची चूक त्यांना मान्य होती पण त्याची एवढी मोठी शिक्षा भोगावी लागेल अशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती! आपला नुकतंच लग्न झालेला कोवळा पोरगा आपण आपल्या हाताने कसायाच्या ताब्यात दिला असं त्यांना वाटू लागलं. पण आता काहीच इलाज नव्हता. दिगंबरपंत खालमानेनं घरी आले. पार्वतीबाईंना ही गोष्ट कळली आणि त्यांनी धीरच सोडला! नुकतीच लग्न होऊन आलेली जानकी तर अजाणच होती! ती भांबावून गेली. एवढी मोठी रक्कम दिगंबरपंतांना भरणं कदापिही शक्य नव्हत!
दासो बादशहाच्या नजरकैदेत होता. तो रोज झरणीनृसिंहाला जाई, तिथे स्थान-संध्या आदी आन्हिके करी. बादशहाने भोजन खर्चासाठी म्हणून दिलेले पैसे ब्राह्मणांना दान करी आणि परत येई. त्याच्या कोवळ्या वयातील गंभीर मुद्रेकडे पाहून लोक हळहळ करीत. आता हा तेजस्वी ब्राह्मण मुलगा मुसलमान होणार याचे दु:खही त्यांना होत असे. पण बादशहाच्या आज्ञेपुढे काहीच चालत नव्हते!
एक महिना भरत आला आज शेवटचा दिवस! इकडे दासोने आणि तिकडे दिगंबरपंतांनी व पार्वतीबाईंनी तर आशाच सोडून दिली होती!
दासो आपल्या सात पिढय़ांपासून असलेल्या कुलदैवताला, श्रीदत्तात्रेयाला, आर्त टाहो फोडून आळवीत होता आणि दिवसाच्या शेवटच्या प्रहरी सूर्य मावळताना हातात काठी, डोक्यावर मुंडासं, खांद्यावर घोंगडी अशा वेषातील दत्ताजी पाडेवार बादशहापुढं हजर झाला. मी दिगंबरपंतांचा सात पिढय़ांपासून सेवक आहे माझं नाव दत्ताजी पाडेवार. मला दिगंबरपंतांनी या मुद्रा देऊन पाठवलं आहे, असे म्हणून त्यानं हातातली दोन लक्ष मुद्रा असलेली चंची बादशहाच्या पुढय़ात खळखळा ओतली. मुद्रा मिळाल्याची पावती मागितली. आणि पावती घेऊन तो गेलासुद्धा! ही गोष्ट दासोला कळली आणि त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आपण श्रीदत्तात्रेयाच्या दर्शनाला मुकलो हे त्याच्या ध्यानात आलं. बादशहा मात्र भाग्यवान त्याला श्रीदत्ताचं दर्शन झालं! असं त्याला वाटलं.
बादशहाने दासोची पालखीतून पाठवणी केली लोकांत आनंदीआनंद झाला. दिगंबरपंत व पार्वतीबाई आनंदानं हरखून गेले. पण या आनंदोत्सवात वरवर आनंदी दिसणारा दासो मात्र अस्वस्थ होता. हा दत्ताजी पाडेवार म्हणजे प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयच! श्री दत्तात्रेयाच्या दर्शनाचा ध्यास लागला आणि घरी आल्यानंतर काही दिवसांतच घर-संसाराचा त्याग करून दासो घराबाहेर पडला. काही काळ भ्रमणानंतर तो माहुर गडी १२ वर्षे तपश्चर्या करून त्यांनी ज्ञान-योग सिद्ध आणि साध्य केला.
श्रीदत्तात्रेयाच्या आदेशावरून दासोपंत राक्षसभुवनी गेले तिथे गंगातीरी वाळूमध्ये दत्तात्रेयांच्या पादुकांचा प्रसाद प्राप्त झाला. आजही धाकटे देवघरी या पादुका पाहावयास मिळतात. कर्नाटकात डाकुळगी, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर जवळील हिलालपूर येथे दासोपंतांनी शिष्यांस अनुग्रह दिला.
पती घरातून निघून जाऊन १२ वर्षे होऊन गेल्यामुळे दिगंबरपंत - पार्वतीबाई जानकीला वैधव्य पत्करण्यासाठीच्या विधीसाठी वाणीसंगमावर घेऊन आले. तिथेच व्याघ्रेश्वराच्या मंदिरात दासोपंत बसलेले होते. त्यांनी या मंडळींना ओळखले आणि हे कृत्य तूर्तास थांबवावे, असा निरोप दिला. हा निरोप कोणी दिला त्यांची भेट घ्यावी, दर्शन घ्यावे म्हणून ही सर्व मंडळी व्याघ्रेश्वराच्या मंदिरात आली आणि जानकीने तात्काळ आपल्या पतीस ओळखले. सर्वाची पुनश्च भेट झाली. दिगंबरपंतांनी नारायणपेठी असलेली जहागिरी आपल्या कारभाऱ्याच्या नावे करून दिली. पुन्हा नारायणपेठी न जाण्यासाठी! दासोपंत सर्वासह अंबाजोगाईस आले. गावाच्या मध्यवस्तीत असलेल्या (भटगल्ली) गणपती मंदिरात मुक्काम ठोकला. सितोपंत हे गावातलं बडं प्रस्थ! त्यांची स्वारी पालखीतून देवीच्या दर्शनासाठी निघाली. त्यांचा एक पण होता. की, मला नजरेने जो समाधी लावील, त्यालाच मी गुरू करीन दासोपंतांची आणि सितोपंतांची नजरानजर झाली मात्र सितोपंतांची शुद्ध हरपली. सितोपंत शुद्धीवर आले तेव्हा त्यांचे मस्तक दासोपंतांच्या चरणावर होते.
सितोपंतांनी दासोपंतांची राहण्याची सर्व व्यवस्था लावली. आजचे धाकटे देवघर म्हणजे दासोपंतांचे वास्तव्य असलेले घर होय. दासोपंत नित्यकर्मे, आन्हिके आटोपत आणि अव्याहत लेखन करीत. साधारणपणे वयाच्या ३५-४० व्या वर्षी ते अंबाजोगाईस स्थिरावले. या वेळी त्यांनी लेखनास सुरुवात केली असे गृहीत धरल्यास, त्यांनी वयाच्या ६४ व्या वर्षांपर्यंत म्हणजे २० ते २५ वर्षे अखंड लेखन केले. त्यांना दररोज एक ढबुभर पैशाची शाई लागे असे सांगतात.
माघ वद्य षष्ठी शके १५३७ ला ते समाधीस्त होऊन श्री दत्तस्वरूपात विलीन झाले.
दासोपंतांची पासोडी :
दासोपंतांच्या वाङ्मय मंदिराचा कळस म्हणजे त्यांची पंचीकरण ‘पासोडी’ होय. ४० फूट लांब आणि चार फूट रुंद अशा कापडावर पंचीकरण, अध्यात्मज्ञानाचा विषय चित्राकृतींतून मांडलेली ही पासोडी मराठी संतवाङ्मयात अनन्य, अपूर्व व एकमेवाद्वितीय अशीच म्हणावी लागेल.
प्राचीन काळी पांघरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जाडय़ा-भरडय़ा कापडास पासोडी म्हणत असत. या कापडावर खळीचे लेप देऊन सुकविले जाते. ग्रॅफाईटची पावडर, कवडय़ांच्या साहाय्याने घासून हा कपडा गुळगुळीत केला जातो. या प्रक्रियेतून पासोडी टिकाऊ व मजबूत बनवली जाते. अशा पासोडीवर वेदांताचे आकृतीसह स्पष्टीकरण देताना, कपाटाकृती विवरणात्मक मांडणी करताना, कागदाला कागद जोडून लिहिणे गैरसोयीचे व त्याची काळजीपूर्वक हाताळणी करणे व ते दीर्घ काल टिकणे अशक्य व अवघड झाले असते. म्हणूनच पिढय़ान्पिढय़ा हा अमूल्य विषय अमीट राहावा या उद्देशाने दासोपंतांनी ‘कापड’ हे वैशिष्टय़पूर्ण माध्यम वापरून चित्राकृतीतून अध्यात्मासारखा विषय प्रतिपादन करणे ही कल्पनाच मुळात अभिनव आहे. यातूनच दासोपंतांतील कलावंताच्या सर्जन व सृजनशक्तीचे दर्शन घडते व अभिजात शिक्षकही मनात ठसतो. विषयांची मांडणी करताना त्या अनुषंगाने त्यांनी अश्वत्थवृक्ष, सर्प, भावचक्र, पंचकोशचक्र, स्थुलादिदेहचक्र, श्रीदत्तमूर्ती, माला, त्रिशूल, शंख, डमरू, कमंडलू, चक्र व हंस या चित्रांचे रेखाटन केले आहे. दासोपंत एक उत्तम चित्रकार होते याची साक्ष पासोडीतील चित्रांवरून सहजच मिळते.
संपूर्ण पासोडीच्या भोवती सुरेख आणि सुबक अशी वेलबुट्टी काढलेली आहे. चित्रांतील रेषा अत्यंत भावसूचक भासतात. त्यातील वळणे (स्ट्रोक्स) कुशल चित्रकाराचे दर्शन घडवितात. विशेष गोष्ट अशी की, प्रत्येक चित्रात त्यात मावेल असा त्या चित्राचा कार्यकारणभाव व्यक्त करणारा मजकूर योजनाबद्ध रीतीने लिहिलेला दिसतो. कुठेही अक्षरांची दाटी नाही किंवा बळेच मजकूर कोंबून बसवलेला नाही. कुठेही खाडाखोड नाही. नियोजनपूर्वक संतुलित असे हे नेटके चित्रमय वाङ्मय विलक्षण म्हणावे लागते.
शास्त्राच्या अनुषंगाने विचार केल्यास वेदांतशास्त्रातील पंचकोशचक्र दर्शविण्यासाठी त्यांनी ह्रदयाच्या आकाराप्रमाणे चित्राकार घेतला आहे. अश्वत्थवृक्षाची अप्रतिम मांडणी, सर्प व हंसातील सजीवपणा किंवा स्थूलादिदेहचक्रांत तांबडय़ा, निळ्या रंगांचा केलेला वापर, तसेच कपाटाकृतीच्या आधारे केलेली शिक्षकी शैलीतील मांडणी यावरून अत्यंत परिश्रमपूर्वक व अभ्यासपूर्ण केलेली ही वाङ्मयनिर्मिती आहे हे लक्षात येते. प्राचीन काळापासून विश्वाचे मूळ शोधणे, सृष्टीप्रक्रियेला सांख्ययोगाधाराने पंचीकरणाद्वारे मांडू पाहणे हा मानवी-प्रज्ञेचा आविष्कार होय. यात प्राचीन ऋषी-मुनींपासून मुकुंदराज, यंबक, ज्ञानेश्वर, सोपानदेव, जनार्दन स्वामी, मृत्युंजय स्वामी, रंगनाथबुवा निगडीकर, दीन कवी, हरिबुवा, मौनी स्वामी इत्यादींनी पंचीकरणावर स्वतंत्र रचना केल्या. परंतु आजवर निर्माण झालेल्या या पारमाíथक वेदांती वाङ्मयात दासोपंतांची पासोडी ही वेदांतातील पंचीकरण इतक्या सूक्ष्मपणे, विस्ताराने विवरण करणारी एकमेव आकृत्या असलेली व चित्रमय वाङ्मयीन रचना असावी.
दासोपंतांची पंचीकरण कल्पना :
सकळ विश्वाचे कारण
निमित्य आणि उपादान
परब्रह्मनिर्गुण निराभास जे
जेथे कार्य ना कारण माया अविद्य भान
जीऊ ईश्वरू ना आन वस्तुजात
ज्ञाता ज्ञेय ना जेथ
ज्ञान कर्ता कार्य ना कारण
ऐसे सच्चिदानंदमय संपूर्ण परब्रह्म
पंचीकरण विषयाची स्वानुमते चिकित्सात्मक मांडणी दासोपंतांनी केली आहे. शेवटी पंचीकरणातील तत्त्वासंबंधी असलेली मत-मतांतरे देऊन दासोपंतांनी स्वयंप्रज्ञेने आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. पासोडीतील चित्रांचा भाग वगळता एकूण ओव्या १४८७ इतक्या आहेत. पासोडीचे एकूण १३ विभाग करण्यात आलेले असून प्रत्येक भागाच्या समाप्तीनंतर जाड लाल रेषा आखलेली दिसते. अक्षरांसाठी काळी शाई आणि रेषांसाठी लाल शाईचा वापर केलेला दिसतो. बोरूच्या लेखणीने अत्यंत ठसठशीत अर्धा इंच उंचीचे हे अक्षर वळणदार आणि घोटीव आहे. काही ठिकाणी पासोडी जीर्ण झाल्याने फाटून झड झाली आहे. अक्षरे पुसट झाली आहेत. जगातील वाङ्मयाच्या वस्तुसंग्रहात दासोपंतांची पासोडी एकमेवाद्वितीय असावी असे तज्ज्ञांचे मत आहे. म्हणूनच या कलाकृतीचे जतन, संवर्धन व पुनरुज्जीवन होणे ही काळाची गरज आहे.
वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व :
संत सर्वज्ञ दासोपंतांची वाङ्मयनिर्मिती विपुल असून त्यातील वैविध्य लक्षवेधी आहे. ५० ते ५२ लहान-मोठय़ा संस्कृत-प्राकृत ग्रंथांची केवळ सूचीच आज पाहावयास मिळते. सव्वा लक्ष ओव्यांचे प्रदीर्घ गीताभाष्य (दासोपंती केला गीतार्णव मानावा सव्वा लाख -मोरोपंत) म्हणजे दासोपंतांचा ‘गीतार्णव’ होय! ‘दिगंबरानुचर’ ही नाममुद्रा धारण करून दासोपंतांनी आपले ग्रंथ लिहिले. गीतेच्या श्लोकांवर स्वयंप्रज्ञा भाष्य व परमार्थ निरूपण ही मुख्य विषयभूमिका स्वीकारून विवेचनातून चिंतन करणारे निबंध, समाजकथा, बोधकथा सांगत प्रशस्त विवेचनशैलीने, विस्ताराने विषय मांडणी, यांत केलेली दिसते. म्हणूनच गीतेचा अर्णवच निर्माण झाला. गीतार्णवात दासोपंतांतील निबंधकार, प्रबोधनकार, कथाकार अभिव्यक्त होतो. रसाळ निवेदन करीत दासोपंत गीतेच्या श्लोकांच्या निरूपणात रूढार्थाहून निराळे अर्थ देतात. गीतार्णवातील शिवकालखंडपूर्व राजनीती विचार (१५०० ओव्यांतून), कृषिधर्म व वाणिज्य धर्म तसेच धर्मावरील चिंतन व भाष्य दासोपंतांची स्वतंत्र सामाजिक प्रज्ञा प्रदíशत करतात. शिवरायांच्या गनिमी काव्यास पूर्वीचे दासोपंतांचे ‘मायायुद्ध’ मार्गदर्शक ठरले असावे काय? समर्थ रामदासांच्या विचारांची बैठक तयार होण्यास दासोपंतांचे ग्रंथ कारण-प्रेरणा ठरले असावेत काय?
एकाध्यायी गीता असणाऱ्या १८व्या अध्यायात १८,००० ओव्या दासोपंत लिहितात. पण दासोपंत विस्तारशरण नाहीत हे ‘गीतार्थबोधचंद्रिके’वरून स्पष्ट होते. भगवतगीतेवरील त्यांचे ८८८९ ओव्यांचे संक्षिप्त भाष्य होय. ही लघुटीका लिहिण्याचे प्रयोजनही ते सांगतात.
‘मागा गीतार्णव रचिले
ते समुद्रचि होऊनि गेले
न वचेचि कवणा उल्लंघिले
शब्दार्णव
गीतार्थबोधचंद्रिका आरंभिली
हे ‘लघुटीका संतोषी करू लोकां श्रोतयांते’ या त्यांच्या ओवीवरून सामान्य लोकांच्या संतोषाची बूज ठेवूनच त्यांना डोळ्यांसमोर ठेवूनच दासोपंतांनी ग्रंथरचना केली. गीतार्थबोधचंद्रिकेत गीतेच्या श्लोकांवर थोडके संस्कृत भाष्य करून दासोपंतांनी पुढे प्राकृत निरूपण केले आहे.
‘योगसंपत्ती’ हा मुख्य प्रतिपाद्य विषय असलेला गुरूशिष्यसंवाद रूपाने लिहिलेला- तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ म्हणजे ‘ग्रंथराज’ होय. सिद्धराज आगम या ग्रंथात गुरुपरीक्षा, शिष्यपरीक्षा, गुरुदर्शन, यंत्रपूजा, मानसिक पूजा, कालनियम कर्म, श्रीदत्ताच्या १६ अवतारांचे विवेचन इ.विषय येतात. अवधूतराज हा गुरू-शिष्य संवादी तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ, प्रबोधोदय (पूर्वार्ध-उत्तरार्ध) हा मुमुक्षुंसाठी लिहिलेला ग्रंथ वाक्यवृत्ती (गद्यात्मक), वाक्यवृत्ती (पद्यात्मक), सार्थगीता, स्थूल गीता, अवधूत गीता, अनुगीता, पंचीकरणप्रबोध या प्राकृत रचना तसेच प्रणव व्याख्या, पुरुषसूक्तार्थ प्रकाश:, गायत्री मंत्रभाष्य, दत्तात्रेय माहात्म्य, सिद्धराजागम, बोधप्रक्रिया, गुरुप्रसाद, अद्वैतश्रुतिसार, गीतार्थबोध, उपनिषदर्थप्रकाश या संस्कृत ग्रंथकृती सूचित तसेच वाङ्मयेतिहासाच्या ग्रंथात उल्लेखिलेल्या आढळतात. परंतु यातील एकही रचना संशोधकास, अभ्यासकांस आज पाहावयासही मिळत नाही. याशिवाय अनेक स्तोत्रे, पूजाविधी, दत्तात्रेय सहस्रनामावली, दत्तात्रेय द्वादशनाम, दत्तात्रेय शतनाम, गीतार्थ प्रबंधस्तोत्र, शिवस्तोत्र, षोडशस्तोत्र, भक्तराजकवच, मंगलमूíतपूजा, मासिक पूजा, यंत्रपूजा, उपकालस्तोत्र, वेदपादाख्यान, षोडशयंत्र, दत्तात्रेय दशनाम, षोडशनाम, अत्रिपंचक, सिद्धदत्तात्रेय, गुरुस्तोत्र, सीताज्वरनिवारणस्तोत्र, वज्रपंजरस्तोत्र, दत्तात्रेय नामावली, महापूजा, वैदिक पूजा, सिद्धमाला, षोडशावतार प्रादुर्भावस्तोत्र, षड्गुरू यंत्र, इ.स्फुट रचनांची नोंद मिळते यातील काही रचनाच फक्त आज उपलब्ध आहेत.
संत दासोपंतांचे पदार्णव :
संत सर्वज्ञ दासोपंतांनी सव्वालक्ष पदांचा ‘पदार्णव’ रचला. आजमितीस त्यांची ३००० ते ३५०० पदेच उपलब्ध आहेत. मध्ययुगातील ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ या पूर्वसूरींच्या रचनांचा मंद परिमळ, तरीही स्वयंप्रज्ञ भावानुभवांची सुसंघटित आशयघन, भक्तिपर पदरचना संत दासोपंतांनी केली. संत दासोपंतांच्या पदरचनेत विविध आकृतिबंध आढळतात. त्यात ओवी, धवळे, ध्रुवा, चौचरणी, जती, अभंग, पद, प्रबंध, आरती, शेजारती, लळित आरती, भारूड, गवळण, विरहिणी, पाळणा, हिंदूोळा, कूट, स्तोत्र, श्लोक, अष्टक यांचा समावेश होतो. यातील चौचरणी, जती, ध्रुवा हे आकृतिबंध प्राचीन महानुभावी वाङ्मयात आढळतात. त्यानंतर ते दासोपंतांनीच हाताळलेले दिसतात. तसेच दासोपंतांची ‘हिंदूोळा’ आकृतिबंधाची रचना एकूणच संत वाङ्मयात लक्षणीय ठरते. भारूडसदृश ‘लळित पदे’ म्हणजेच विविध ‘रूपके’ दासोपंतांनी रचली. तसेच दासोपंतांची काही नाटय़ात्मक दीर्घ पदेही (पदनाटय़) संत वाङ्मयातील काव्य क्षेत्रात विलक्षण ठरतात.
कवीमनाची भावावस्था, उत्कटता, तिची सूक्ष्मातिसूक्ष्म व तरल स्पंदने, संवेदना यांवरच कलाकृतीचे, रचनेचे बाह्य़स्वरूप निश्चित होते. आशयाच्या दृष्टीने, विचार, कल्पना, तत्त्व, भावविभाव, अर्थ या घटकांचा तर आविष्काराच्या दृष्टीने प्रतिमा संकेत, प्रतीके, अलंकार, शब्दकळा, शैली, वृत्त, लय, रचना यांची मांडणी, योजना या घटकांचा विचार करावा लागतो.
दासोपंतांच्या पदरचनेतील विविध आकृतिबंध आणि आशय-आविष्काराच्या अनुषंगाने येणारे विविध भावविभाव, विषय, संत कवितेच्या क्षेत्रांत अभ्यसनीय ठरतात.
पदरचनेतील भावकल्लोळ :
सर्वच संतांची भावकविता ही सहजोद्गार असते. ती नेणिवेची कविता असते. दासोपंतांची भावकविता नेणिवेची आत्मनिवेदनात्मक तसेच संवादी सहजोद्गार असूनही जाणिवेने लिहिलेली आहे असे वाटते. मनाची विशिष्ट भाववृत्ती, उत्कटता जो उपजत, आंतरिक स्फुरण असलेला प्रातिभ आविष्कार करते, ते म्हणजे ‘भावकाव्य’
आठविता तुझे गुण,
दोन्ही सजळ जाले नयन
दत्ता कई येसील भेटी?
प्राणपंचक धरिले कंठी
दासोपंत नि:सीम दत्तभक्त होते. हा भक्त देवाला अनेक भूमिकांतून पाहतो. विविध नातेसंबंधांनी, विविध भूमिकांतून त्याची कल्पना करतो. त्या-त्या भूमिकेच्या अनुषंगाने भक्तांच्या मनांत अनेकविध भावतरंग निर्माण होतात. या विविध भूमिकांतील भक्ताची अनुभूती, तन्मयता, देवाच्या रूप-गुणांचे वर्णन, त्याच्याविषयी वाटणारी आत्यंतिक ओढ, पराकोटीचे प्रेम, कृतकृत्यता, अनन्यशरणता, आर्तता इ. भाव विविध अनुबंधांतून व्यक्त होत असतात. हा भक्त कधी बालक होतो तर कधी पाडस होतो. चातक, पतंग होऊन श्रीदत्ताचा धावा करतो. पाण्याबाहेर तळमळणारी मासोळी होतो, सासुरवाशीण लेक होतो. श्रीदत्ताची विरही प्रेयसी होतो, कधी श्रीदत्ताची पतिव्रता होतो तर कधी व्यभिचारिणी होतो. श्रीदत्ताविषयीचे प्रेम विविध भावच्छटांतून व्यक्त करणाऱ्या पदरचनांतून भक्तिप्रेमाचा पूर लोटलेला दिसतो.
प्रेम दे मज प्रेम दे सर्व सुख मज प्रेम दे
‘अवधूता रे! जळधरा;
कई वोळसी अमृतधारा
तुझे चातकु मी पाखरू;
कवणाची आशा करू?
‘कवळीन दोही बाही
ऐसी आवडी होतसे देही
दत्ता! नीरास करिसी काह्य?
परमात्मया योगीराया’
या पदरचनांतून शुद्ध भक्तिभाव, वत्सलभाव, प्रीतीभाव, क्षमापराधी भाव आढळतो. दत्तसंप्रदायात दासोपंतांची ‘विरहिणी’ लक्षणीय म्हणावी लागेल. अभिलाषा, चिंता, स्मरण, गुणकथन, उद्वेग, प्रलाप, उन्माद, व्याधी, जडता, मूच्र्छा, मरण अशा दशांगांतून व लास्यांगातून विरहिण्यांची भावस्पंदने अभिव्यक्त होतात.
‘चांदु चंदन न साहे गायन
श्री दत्तेवीण सखीये वेचती प्राण’
‘चांदु चंदने माये चंपक
चेतने मूळी लागती बाण
‘बाइये! चंदन अंगी न साहे
परिमळ तो वाया जाय
चंद्रु चांदिणे करी काये?
प्राणनाथु वो कैसे नि ये?
पाखंड खंडन करणारी, दंभस्फोट करणारी पदे, हरि-हर ऐक्य प्रतिपादन करणारी पदे, गुरूमहिमा व्यक्त करणारी पदे, सगुण-निर्गुण द्वैतभावाचा विलक्षण अद्वैतभाव व्यक्त करणारी पदे, जन नाम-गुणसंकीर्तनाचा पुरस्कार करणारी पदे ही समाज प्रबोधनाच्या कळवळ्यापोटीच निर्माण झालेली पदरचना आहे.
‘बाह्य़ मौनी जडु अंतरी बोले
मन चंचळ लावितो डोळे
वेष देखोनिया वेधले जन
अंतरिचे ज्ञान कवणु जाणे?
‘ह्रदयी कामना, क्रोधु असंवरू
संन्यासु तो वरि काई
वाक्य विचारणा, प्रणवाचा जपु,
निष्ठेसि ठावोचि नाही
दंड कमंडलु पादुका
काशाय वस्त्र पवित्रसे देही
अंतरीची खूण न कळे
प्राणीया न सुधी बोडिकी डोई
दासोपंतांच्या पदांतील नाटय़-नृत्य :
संत दासोपंतांच्या पदार्णवातील काही पदांतून विशिष्ट प्रसंगांचे वर्णन, कथन तसेच वैशिष्टय़पूर्ण नाटय़ात्मक निवेदन असलेली लक्षणीय पदे आहेत. काही पदांवर शीर्षकाची नोंद आढळते तर काही पदांचा समूह (सलग ५, १० इ.) अभ्यासताना त्यातील अनुस्यूत सूत्र, अंतसंबंधावरून, ती पदे म्हणजे ‘पद्यनाटय़’ असावे असे वाटते. यात ‘जन्मकाळची पदे’, ‘हळदुली’, ‘प्रीतीकळहो’, ‘नामनिर्देशु’ आणि ‘गूज’ अशी शीर्षके असलेली नाटय़पदे आहेत तर काही पदसमूह विविध विषयांवर गुंफलेली पदनाटय़े आहेत. यांत श्रीदत्त आणि ऋषीपुत्र यांतील वनक्रीडा, त्यांच्यातील चर्चा, जन्मकाळचे प्रसंगवर्णन, संवाद आढळतात.
लळित :
दासोपंतांचे ‘लळित’ म्हणजे ‘रूपके’, ‘कूट’, ‘खेळिया’, ‘नवल’, ‘कोडे’, सामाजिक, कौटुंबिक अशा अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या विविध सोंगांचे रंगाविष्करणच होय. लोकनाटय़ाचा मंदिर परंपरेतील अवतार म्हणजेच ‘लळित’ असे म्हटल्यास वावगे ठरू नये. संतांनी परमार्थाचे शिक्षण मनोरंजक पद्धतीने देताना, ‘समाजजागर’ही केला. पाखंडी लोकांच्या बाह्य़रूपातील फोलपणा स्पष्ट करून समाजशिक्षकाची भूमिका विविध पात्रांतून वठविण्यासाठी रंगपीठावर केलेली लळिताची योजना म्हणजे लोकसंस्कृतीच्या माध्यमातून लोकविषयाचा, लोकमानसाचा विविध अंगांनी, विविध रंगांनी नटवून मांडलेल्या लोकवाङ्मयाचा लोकरंग, भक्तिरंग, रंजन, प्रबोधनाच्या साहाय्याने घडविलेला रंगपीठीय रंगाविष्कार! दासोपंतांच्या लळितात गोंधळ, जोगवा, भुत्या, दिवटी, डफगाणे, वासुदेव, बाळसंतोष, इ. लोकसंस्कृतीच्या उपासकांवर आधारित लळित पदे आढळतात. पंथोपपंथांच्या उपासना मार्गाच्या साधकांवर आधारित जोगी, जोगन, बैरागी, बैरागन, पीर-फकीर, कानफाटे, संन्यासी, जंगम, नाथ, पांगुळ ही लळित पदे आढळतात तर टिपरी, गोफ, फुगडी, कोंबडा (काठखेळ), िपगा, मुंढे-हिजडे, सोवरी, इ. खेळिया धाटणीची लळित पदे आहेत. कर्मविधीवर आधारित स्नान, संध्या, तर्पण, अग्निहोत्र ही पदे आहेत. विविध व्यावसायिकांवर आधारित सुकाळ शेटी, वाणी, गौळण, शेतकरी, गारुडी, सिपाई, जातक, ज्योतिषी, पारधी, शास्त्री, वैद्य, भाट, जखडी इ. पदे आढळतात. स्त्रियांची कामे व त्या संबंधित वस्तूंवर आढळणारी पदे- जाते, सडा, चाळणी, इ. आहेत. कौटुंबिक नातेसंबंधावर आधारलेली मामी, भाउ, गृहस्थ ही पदे आहेत. देवतांवर आधारित ब्रह्मदेव, विष्णूदेव, महादेव ही पदे असून ही सोंगे मात्र सादर होत नाहीत. एकूण ५० ते ५५ लळित पदे (सोंगे) उपलब्ध हस्तलिखितात असली तरी आजमितीस केवळ १५ ते १६ लळित पदे (सोंगे) देवघरांतील रंगपीठावर सादर होतात.
‘अविद्य सुविद्य दोन्ही हात मिळविती
भक्ति ते सांडूनि बाई, अभक्त फेऱ्या घेती
फू गडी फू गं दत्तु माय तू गं’ (फुगडी)
सर्वज्ञ बाळा आली गोंधळा,
योगीया तारण हेतू गे माये
परिस योगी वाजवी िशगी,
चेवविला अवधूतू गे माये (गोंधळ)
संत दासोपंतांच्या पद्यनाटय़ावरून, लळित पदांवरून सर्वज्ञ दासोपंत उत्तम ‘नाटककार’, ‘रंगकर्मी’, ‘दिग्दर्शक’ होते हे सिद्ध होते. अध्यात्म ज्ञानी तरीही सगुणाचा प्रेमवेडा उपासक असलेला हा श्रीदत्तभक्त मध्ययुगातील अंबाजोगाईच्या देवघराच्या रंगपीठावरचा अधिकारी कलावंत होता हे निश्चित.
पदांतील भाषावैविध्य :
दासोपंतांच्या सव्वालक्ष पदांच्या अर्णवात विविध भाषांची पदे आढळतात. त्यात संस्कृत, प्राकृत, मराठी (नागर, ग्रामीण, वैदर्भीय बोली) हिंदूी (हिंदूुस्थानी विविध छटा), ब्रज, फार्सी-उर्दूमिश्रीत हिंदूी, कन्नड, तेलुगु इ. भाषावैविध्य आहे. तसेच हिंदूी-मराठी या दोन भाषामिश्रित मणिप्रवाळ रचनाही आढळते. दासोपंतांचे तीर्थाटन, विविध प्रांतांतून भ्रमण आणि तेलंगणा व कर्नाटक यांच्या सीमेवर असलेली त्यांची जन्मभूमी, महाराष्ट्रातील दीर्घकालीन वास्तव्य यामुळे त्यांची पदरचना बहुभाषिक बनली.
संत दासोपंतांच्या पदांतील संगीत :
संगीताचा मूळ हेतू मोक्षसाधन आहे. मोक्षप्राप्तीच्या नादब्रह्म उपासनेचे संगीत हे ‘साध्य’ नसून ‘साधन’ आहे. ब्रह्मानंदाच्या स्वरूपाचे दर्शन घडविण्याची नादब्रह्माची शक्ती आहे. नादब्रह्माचे पूर्णार्थाने व पूर्णत्वाने आकलन होण्यासाठी शरीरशास्त्र, मानसशास्त्र, इंद्रिय विज्ञानशास्त्र, योगशास्त्र आणि सर्व शास्त्रांचे प्रधान शास्त्र असे वेदांतशास्त्र इ. अनेक शास्त्रांचा अभ्यास करावा लागतो. दासोपंतांच्या इतर गद्यपद्य ग्रंथांतील मीमांसा, विवेचन, चिकित्सापूर्ण बौद्धिक विषय प्रतिपादन व पदार्णवातील संगीत यावरून दासोपंतांचा वरील सर्व शास्त्रांचा अभ्यास असला पाहिजे. संतांनी सिद्धांच्या असामान्य मोक्षगायन परंपरांचा अवलंब करून यातून सामान्य जनांना भक्तिमार्ग सांगितला व याच प्रेरणेतून पदनिर्मिती झाली.
दासोपंतांची संगीत पद्धती :
१५ व्या शतकानंतर दक्षिण हिंदूुस्थानी संगीत पद्धती उदयास आल्या. दक्षिणेकडील संगीत-मत आजही अधिक ‘सोवळे’ दिसते. संगीताच्या संक्रमण काळात दासोपंतांची पदनिर्मिती झाली. दक्षिण व उत्तर या दोन्ही संगीत पद्धतीचे प्रतििबब त्यांच्या पद गायनपद्धतीत दिसतात. दोन्ही संगीत पद्धतींचा पाया एकच असल्याने फार मोठी तफावत यांत नाही. परंतु उत्तर हिंदूुस्थानी संगीत हे दक्षिणी संगीतापेक्षा अधिक परिवर्तनशील असल्याचे दिसते. याच लवचिकपणाचा प्रयोग दक्षिण संगीत पद्धतीबरोबर दासोपंतांनी केला असावा.
सांगीतिक पाश्र्वभूमीवर दासोपंतांचे पदांचे वर्गीकरण केल्यास ढोबळमानाने ते पुढीलप्रमाणे मांडता येईल.
अभिजात संगीतावर आधारित पदे, उपशास्त्रीय संगीतावर आधारित पदे, सुगम संगीतावर आधारित पदे, लोकसंगीतावर आधारित पदे. पदार्णवांतील पदरचनांवर विविध रागनामांचा, विविध तालांचा उल्लेख असलेल्या विपुल रचना आहेत. सरगम, जति, मेळाप, परण यांचा भरपूर अंतर्भाव असलेली तसेच सांगीतिक परिभाषेतील रागवेळा, मेळरागमाळा, अशा काही रचना आहेत. दासोपंतांच्या अभिजात संगीताची साक्ष देणाऱ्या षटभार्या भैरवं, प्रबंध, खंड प्रबंध, चतुरंग प्रबंध, त्रिवट, स्वरसामगायन, ताल स्वरालंकार, झपतालालंकार, तीवडा वीणालंकार या रचना आढळतात. उपलब्ध पदरचनांमध्ये एकूण ८० ते ८५ रागांचा व १० ते १२ तालांचा उपयोग दासोपंतांनी केलेला आढळतो. विविध पदांच्या बंदिशी या राग-तालात बद्ध केल्या. अनेक भावपूर्ण पदे सुगम संगीतातून आविष्कृत झालेली दिसतात, तर लळित पदांतून लोकसंगीताचे पडसाद उमटताना दिसतात. अभिजात संगीताची साक्ष देणारी कांही पदे-
‘मधुमाधवीच देशाक्षा भुपाळीच भैरवीस्तथा
बिलावलीच मुखारी बंगाली सामगुर्जरी
धनाश्री मालवीस्त्रीश्व मेघ रागस्येपंचमा
देशाकारे भैरवस्य ललितस्य वसंतिका
एते रागा: प्राकांगी उवे प्रारंभ्य नित्यश: ’ (रागवेळा)
‘भैरवी, गुर्जरी चैव रेवा गुणकारी तथा
बंगाली बाहुलीश्वैव भैरवस्थ व रांगणा ’
(षट् भार्या भैरवं)
‘आजि मेरो मन आनंद भयो
कानन कुंडल मुगुट सिरमो
ध्यान मो देखो षडभुज धारी
ताल मृदुंग धिमि धिमि धिमिता,
धिमि धिमि धिमिता
तधिन्न थै, तधिन्न थै कहत पुकारे सुत दिगंबर (गौडीमिश्रित कल्याणमधील पद)
प्राचीन काळी नृत्यकलेस धार्मिक प्रतिष्ठा होती. खास नृत्यानुकुल तालबोलांचा वापर दासोपंतांच्या पदांतून स्पष्ट दिसतो. मंदिरनृत्य परंपरा दर्शविणारी अनेक पदे नृत्याविष्काराचे प्रकटीकरण करणारी दिसतात. दासोपंत पदरचनाकार, मृदुंगवादक व गायक होते. ज्यास ‘वाग्गेयकार’ असे शास्त्राने संबोधले आहे. मध्ययुगातील एक थोर ‘वाग्गेयकार’ म्हणून संगीत इतिहासांत दासोपंतांचा (एकूणच मराठी संत संगीत प्रवाहाचा) उल्लेख दुर्लक्षिला गेला आहे. ४०० वर्षांपासून दासोपंतांच्या मंदिर संगीताचा प्रवाह आजही अखंडपणे वाहतो आहे. याचे संपूर्ण श्रेय दासोपंताच्या दक्ष संप्रदायी संगीत उपासना पद्धतीला द्यावे लागते.
सकलकलागुणनिधी दासोपंत :
भारतीय ६४ ललित कलांमध्ये संगीत, चित्र आणि काव्य यांचे विशेष महत्त्व आहे. त्यातही संगीत कला अधिक प्रभावी म्हणून श्रेष्ठ. गीत-वाद्य-नृत्य ही त्रिपुटी म्हणजे संगीत. या तीनही ललित कला, सौंदर्य, माधुर्य, सहजता, सरलता, प्रसाद, सृजनशीलता, ओज, लय या गुणांनी युक्त असतात. दासोपंतांच्या ठायी या तीनही कलांच्या सृजनशक्ती एकवटल्या होत्या. तीनही कलांत अनुस्यूत असणारे, अंत:सूत्रातील असे एकच लयतत्त्व जाणून आत्माभिव्यक्ती, आनंदानुभूती, लोकरंजन, लोकोपदेश यासाठी या तीनही कलांचा त्यांनी सूज्ञपणे व मनोज्ञ उपयोग केला. नित्यनैमित्तिक उपासनेतील पदगायनातून मार्गशीर्ष उत्सवाच्या सांगतेस देवघराच्या रंगपीठावर सादर होणारे लळित लोकनाटय़ाचे रंगपीठावरील नाटय़च होय.
दासोपंतांचे पदवाङ्मय लोकाभिमुख झाल्यास महाराष्ट्रातील काव्य-संगीताचे हे भव्य दालन लोकांसमोर खुले होईल व त्याचा आनंद रसिक घेतीलच.
पूर्वसुरींचा प्रभाव :
सर्वज्ञ दासोपंतांच्या वाङ्मयीन कर्तृत्वावर एक दृष्टिक्षेप टाकला तर दासोपंतांचे व्यक्तिमत्त्व व्यामिश्र आहे हे सहजच लक्षात येते. व्युत्पन्न पंडित तत्त्वज्ञानी असलेले दासोपंत भावकवी, लोककवी ही आहेत व लोकशिक्षकाची भूमिका करतात, श्री दत्ताची प्रेयसी, बालक, सखा, बंधू होऊन श्रीदत्ताला भावपूर्ण पदांजली वाहतात तर तर्ककठोर, तर्कनिष्ठ, बुद्धिप्रामाण्यवादी प्रकांड पांडित्याने अद्वैत तत्त्वज्ञान अभिव्यक्त करतात. मराठीचा अभिमान बाळगणारा मराठी बाणा त्यांच्यात उफाळून येतो, ते एक उत्तम संगीतकार, वाग्ग्येकार, चित्रकार होते. बहुभाषिक असून अखंड वाङ्मयसेवेचे असिधाराव्रत घेतलेला मराठी साहित्यशारदेचा उपासक होते. त्यांची स्वयंप्रज्ञ वृत्ती हे त्यांच्या ग्रंथकर्तृत्वाचे वैशिष्टय़! लळित पदांतून व्यक्त होणारे दासोपंत नाटककार, दिग्दर्शक कलावंत, रंगकर्मी उत्तम कीर्तनकारही होते. संतप्रवृत्ती आणि कलावंत प्रकृती या द्वयाचे अद्वैत दासोपंतांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसते.
हे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी कोणत्या कारण प्रेरणा कारणीभूत झाल्या असाव्यात?
दासोपंतांच्या जीवनातील धर्मसंकट आणि त्यांनी केलेले तीर्थाटन हे दोन महत्त्वाचे घटक त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पाडतात. भ्रमणातूनच अनेकविध ग्रंथाचे अवलोकन, विविध पंथ-संप्रदायाचे दर्शन त्यांना घडले आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अष्टपैलूत्व प्राप्त झाले. यात १२ व्या शतकातील संत ज्ञानदेव, नामदेव ज्येष्ठ समकालीन संत एकनाथ यांच्या वाङ्मयाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव जाणवतो. तुलसीदास, सुरदासांच्या हिंदूी रचनांचा प्रभावही त्यांच्यावर दिसतो हे स्पष्ट दिसते. दासोपंतांचे विविध प्रांतांतील भ्रमण हा या वैशिष्टय़पूर्ण आकृतिबंधावर, भाषेवर प्रभाव पाडणारा घटक वाटतो. नाथ संप्रदाय (गान योगी, ध्यान योगी), सूफी संप्रदाय, वारकरी संप्रदाय, वल्लभ संप्रदाय, मध्व संप्रदाय, दास संप्रदाय, आनंद संप्रदाय, दक्षिणेतील अळवार संप्रदाय, दासकूट भक्तिपरंपरा, चैतन्य संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, शैव संप्रदाय, महानुभाव संप्रदाय इ. संप्रदायांचे त्यांनी केलेले अवलोकन व त्यातून दासोपंतांची संगीताचे अधिष्ठान असलेली दक्ष संप्रदायी भक्ती परंपरा म्हणजे ललित कलांच्या आधारे ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग या त्रिपुटींसाठी केलेली सर्वसंप्रदायसमन्वयी उपासना पद्धती होय.
‘घालीन गोंधळ होईन वारकरी’ असे म्हणणारे दासोपंत ‘जिकीर कर फिकीर कु मुकर के न कर तू नजर कर नजर फिर न हो दर बदर तू’ असे म्हणत पुढे सूफी संप्रदायाच्या तत्त्वानेही आपला विचार मांडतात. नाथ पंथाचा गान योग, दास संप्रदायाची दास्य भक्ती, वैष्णव व तत्सम पंथाची मधुराभक्ती, शैव पंथाची उपासना, दक्षिणी पंथ परंपरेतील पूजा पद्धती हे सर्वगुणसंग्राहकवृत्तीने दासोपंतांनी आपलेसे केले. त्यांच्या वाङ्मयातील विविध विषय, पैलू अभ्यासणे हे केवळ मराठी साहित्याच्या, संगीताच्या प्रादेशिक क्षेत्रातील काम नव्हे तर यांचा अभ्यास भारतीय परिप्रेक्ष्यातून झाला पाहिजे.
अंबाजोगाईत आलेल्या अनेक सामान्य पर्यटकांना दासोपंतांची पासोडी माहीत नसते. अभ्यासक मात्र ती पाहण्यासाठी शोध घेत येतात. ५० वर्षांपूर्वीच्या बंद कपाटातील एका दृष्टिक्षेपातील पासेडीच्या दर्शनाने त्यांचे समाधान होत नाही. त्यांची निराशा होते. आलेल्या प्रत्येकाला पासेडी पाहता यावी अशी सोय होणे गरजेचे आहे. त्यासाठी ती ज्या ठिकाणी आहे, तिथेच ठेवून तिची सुरक्षितता लक्षात घेऊन ती पूर्ण लांबीरुंदीत पर्यटकांना पाहता यावी, अशी सुविधा करणे गरजेचे आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कापड सुस्थितीत राहण्यासाठी त्यावरील अक्षरे टिकण्यासाठी विशिष्ट रसायने, प्रक्रिया यांचा वापर करून पासोडीचे आयुष्य त्यायोगे वाढवता येईल, अशा प्रकारची उपाययोजना करणे अगत्याचे आहे. जेणेकरून मराठी साहित्य शारदेला संत दासोपंतांनी अर्पण केलेले हे महावस्त्र सर्वाना डोळे भरून पाहता येईल. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा