मंगळवार, १० एप्रिल, २०१२

झालिया दर्शन ...."जनी जनार्दन ऐसा भाव"


“दर्शन” हा मूळ संस्कृत भाषेतील शब्द. तो अनेक भारतीय भाषांमध्ये तसेच नेपाळी भाषेमध्ये पण वापरला जातो. मला हा शब्द व त्याचा नाद पण खूप आवडतो. एकाच सत्याचे विविध पद्धतीने, रुपाने अभिव्यक्त होणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ठ्य. दर्शन हा शब्द पण अनेक पद्धतीने समाजात व्यक्त होताना दिसतो. पाहणे, निरीक्षण करणे, दृष्टीस पडणे, या शब्दांशी थोडे साधर्म्य असणारा हा शब्द. जास्त करून अध्यात्मिक जीवनात वापरतात.

देवदर्शन, संतदर्शन, निसर्गदर्शन, मार्गदर्शन, भावदर्शन,विचारदर्शन,समाजदर्शन असा वेगवेगळ्या पद्धतीने हा शब्द वापरला जातो. व्यक्ती, स्थिती,स्थळ,रूप, समूह यांना जोडून पण हा शब्द अनेकदा वापरला जातो. कधी कधी “धन्य झालो, आपले दर्शन झाले !!!” असा उपहासाने किंवा विनोदाने पण वापरला जातो.

वारकरी संप्रदायात एकमेकांचे चरणस्पर्श करून दर्शन घेतले जाते तर नेपाळ व भारतातील काही भागात नमस्कार करणे म्हणजे दर्शन करणे.

दर्शन ह्या शब्दाची व्याख्या करणे खूप कठीण.

संस्कृतात म्हंटले आहे, “दृष्यते ही अनेन इति दर्शनम्”

यातून हे नक्की स्पष्ट होते की  व्यक्ती, स्थिती,स्थळ,रूप, समूह यांना पाहून त्यांचे अनेक आयाम समजून घेणे म्हणजे दर्शन होऊ शकते. म्हणजे दर्शन फक्त कृती पुरते मर्यादित नाही.
मी अनेक वेळा देवदर्शन किवा गुरुंचे दर्शन करताना अनेक लोकांना पाहिले आहे. दर्शन करताना त्यांचे डोळे बंद असतात व चेहऱ्यावर कधी शांत तर कधी खूप आनंदी व कधी कधी तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहताना मी पाहिले आहे. यातून हे नक्की समजते की फक्त डोळ्यांनी पाहण्याची कृती म्हणजे दर्शन नसून ती एक भाव पूर्ण अवस्था आहे.

एखादी घटना,स्थिती,परिस्थिती, व्यक्ती पाहिल्यावर प्रथम पाहणे होते. जर ते हृदयाला भिडले तर मग त्या बद्दलचा भाव मनात निर्माण होऊन ते अभिव्यक्त होतात. त्यानंतर त्या बद्दल बराच काळ आपल्या डोक्यात विचार चालू राहतात, चिंतन सुरु होते. आपण थोडं मुळात जाऊन विचार करतो. त्या चिंतनातून जीवनाचा अर्थ समजून घेत, वास्तवाला समजून घेण्याचा दृष्टीकोन आपण बनवतो त्याला पण दर्शन म्हणतात. असा अर्थ समजून घेऊन अज्ञान, परंपरावादी व रुढीवादी विचारांना नष्ट करून सार्थ ज्ञान प्राप्त करणे म्हणजे दर्शन.

असत्याचे व सत्याचे ज्ञान म्हणजे दर्शन. अविद्या आणि विद्येचे ज्ञान म्हणजे दर्शन. असे दर्शन फक्त बौद्धिक पातळीवर प्रतिसाद देणारे असेल तर आपण बुद्धिजीवी लेखक, कवी, अभ्यासक किवा विचारवंत बनतो. यातून आपल्यामध्ये त्या व्यक्ती, स्थिती,स्थळ,रूप, समूह यांच्याशी आपलेपणा, नाते,परस्परभाव निर्माण झाले तर पवित्र विचारांनी आपण काही प्रतिसादी सेवा करतो व परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करतो.

जाणता व्यक्ती या पुढे जाऊन फक्त प्रतिसाद देत नाही तर स्वतःमध्ये सुद्धा खूप बदल करून घेतो व समग्र दृष्टीने सर्वांकडे पाहू लागतो. त्याचा मोह,भय नष्ट होते.


कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर गलितगात्र झालल्या अर्जूनाचा मोह विश्वरूप दर्शनाने नष्ट होतो.
   

तुकाराम महाराज म्हणतात ....


झालिया दर्शन करीन मी सेवा, आणीकही देवा न लगे दुजें  ....

आसवालें मन जीवनाचे ओढी, नामरुपें गोडी लावियेला      ....

काय लोखंडाचे पाहे गुण दोष, शिवोनि परिस सोनें करी     ....

तुका म्हणे माझें अवघें असों द्यावें, आपुलें करावें ब्रीद साच  ....


एकदा खरे खुरे दर्शन झाले की गुण,दोष निर्मळ होतात.


खूपदा संतसाहित्यातील आपल्याला दर्शन, सेवा, देव ह्या सगळ्या पारमार्थिक व समाजातील वास्तवापासून दूर करणाऱ्या अडगळीतील कल्पना वरकरणी वाटतात कारण आपण त्यांचे खरे खुरे दर्शन घेतलेले नसते.

नामदेव महाराजांनी फार सुंदरपणे दर्शनानंतर निर्माण होणाऱ्या भावाचे विवेचन केले आहे.पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे ........१

हेची घडो मज जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही दुजे ......२

मुखी नाम सदा संतांचे दर्शन, जनी जनार्दन ऐसा भाव .......३

नामा म्हणे तुझ्या नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी सप्रेमाचे.....४
त्यामुळे दर्शनात फक्त मूर्तीशी अडकून बसणे हे अपेक्षित नाही तर त्याची परिणीती जनी जनार्दन अशा  भावात होणे अभिप्रेत आहे. मूर्ती मध्येच ईश्वरत्वाचे दर्शन घेणाऱ्या नामदेवांनाच काय तर रामकृष्ण परमहंसांना पण हेच अभिप्रेत होते. उपनिषद काळातील “ईशा वास्य इदं सर्वं” ही या संकल्पनेच्या चळवळीचा प्रथम तेराव्या शतकात नामदेवांनी जनी जनार्दन ऐसा भाव असे म्हणत पाया रचला.

बारा वर्षांच्या एकनाथाला जनार्दन स्वामींकडून जनी जनार्दन ( जनता हीच जनार्दन ) हे दर्शन झाले.१)जन ते चि जनार्दन, एका जनार्दनी भजती. 

२)जनीं जनार्दन प्रत्येक्ष डोळा कां न दिसे यासी ?

३)साकर दिसे परी गोडी न दिसे, ती काय त्या वेगळी असे, तैसा जनी आहे जनार्दन.

४)अवलोकितां जन, दिसे जनार्दन

आपल्या अशा अनेक अभंगातून एकनाथ महाराजांनी आपल्या सभोवतालच्या लोकांमध्ये व आपल्या मध्येच देव आहे हे ठासून 
सांगितले.
एकोणिसाव्या शतकात मात्र विश्वविजय करणाऱ्या स्वामी विवेकानंदानी तर खुपच ठासून सांगितले.


“आपला समाज हेच एकमेव जागृत दैवत आहे. व्यर्थ अशा देवतांच्या मागे आपण धावत आहोत. पण भोवताली पसरलेल्या विराट अशा साक्षात परमेश्वराला मात्र आपण पूजीत नाही. आवश्यकता कशाची असेल तर ती चित्तशुद्धीची आहे. हृदयाच्या पावित्र्याची आहे. ही चित्तशुद्धी कशी होईल? प्रथम आवश्यक आहे विराटाची पूजा –आपल्या भोवती असणाऱ्या सर्व जीवांची पूजा. माणसे व पशू हे सर्व आपले देव आहेत आणि ज्यांची आपण सर्वप्रथम पूजा करावी असे देव म्हणजे आपले देशबांधव आहेत.”

स्वामीजींचे हे विचार म्हणजेच जनी जनार्दन हे तत्व. विराटाचे असे दर्शन व्हायला लागले की आपण अधिक चांगल्या प्रकारे अभिव्यक्त होतो व आपला व समाजाचा विकास होत राहतो. स्वामीजी म्हणतात त्याप्रमाणे हे होण्यासाठी चित्तशुद्धी होणे गरजेचे.महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, "ज्याचे मन सत्याने पवित्र झाले आहे, तो जगातील सर्वांत पवित्र माणूस.' 

स्वामीजी अनेक वेळा म्हणतात,  “आधी माणूस व्हा !”

हे माणूस होणे म्हणजे नेमके काय? माणूस होणे म्हणजेच माणूसपण वाढवणे. प्रबोधिनीच्या संचालकांनी याचे खूप चांगले विवेचन केले आहे. इतरांचे माणूसपण वाढवण्याच्या प्रयत्नानेच स्वतःचे माणूसपण वाढत असते.

इतरांचे माणूसपण कसे वाढवायचे? तर

१)इतरांच्या सुखदुःखात सहभागी होण्यानी हे माणूसपण वाढत जाते.

२)काम, कलाकुसर, संवाद इत्यादी अभिव्यक्तीच्या नवनवीन पद्धती वापरल्याने माणूसपण वाढत जाते.

३)भावनाकोषाच्या समृद्धीने हे वाढत जाते.

४)कल्पक विचार करायला प्रोत्साहन दिल्याने माणूसपण वाढत जाते.

५)प्रश्न सोडविण्याची शक्ती दिल्याने माणूसपण वाढत जाते.

६)चिकित्सक विचारांचा आदर केल्याने माणूसपण वाढत जाते.

७)प्रत्येकाची आत्मप्रचीती वाढवल्याने हे माणूसपण वाढत जाते.

थोर विभूती,जसे गौतम बुध्द, महावीर वर्धमान. डॉ. आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, बसवेश्वर यांचे माणूस म्हणून जगा आणी दुसर्‍यात माणूस बघा हे साधे तत्वज्ञान आत्मसात केले नाही.

असा स्वतः साठी व दुसऱ्यांसाठी पण प्रयत्न करायला लागलो की आपल्यातील माणूसपणाच वाढत नाही तर आपल्यातील व  इतरांमधील दैवी संपत्तीचे दर्शन पण आपल्याला होते.

हे सतत होण्यासाठीच्या चार पायऱ्या आपल्या संस्कृतीत मांडल्या आहेत.

सलोकता,समीपता,सरूपता व सायुज्यता ह्या चार स्थितीतून ज्यावेळी आपण स्वतःशी व सभोवतालच्या व्यक्तींशी एकरूप होऊ लागलो की जनी जनार्दन भाव निर्माण होऊ लागतो. मला हे आत्मदर्शन वाटते. असे आत्मदर्शन झाले की व्यक्तीचे असणे गीताईतील भगवंताला प्रिय असणऱ्या भक्तांच्या लक्षणांप्रमाणे असते. 

“जो न लोकास कंटाळे ज्यास कंटाळती न ते.”  गीताई १२.१५

एकदा आपल्यातील माणूसपण वाढायला लागले की आपल्याला इतरांमधील जनार्दन दिसायला लागतो. इतरांमधला जनार्दन पाहणे म्हणजे काय? अगदी तुकाराम महाराजांनी पण हा प्रश्न उपस्थित केला आहे. इतरांमधील दैवी गुणांचे दर्शन आपल्याला व्हायला लागले की तो जनी जनार्दन भाव आपल्यातील वाढायला लागतो. गीतेतील सोळाव्या अध्यायात या गुणांचा उल्लेख केला आहे.

१)निर्भयत्व २)मनःशुद्धी ३)यज्ञ ४)निग्रह ५)दातृत्व ६)स्वाध्याय ७)ऋजुता ८)ताप ९) अहिंसा १०)शांती ११)अक्रोध  १२) त्याग १३)सौजन्य १४)सत्यता १५)अ-लुब्धता १६)दया १७)मर्यादा १८) स्थैर्य १९)मार्दव
२०)पवित्रता २१)क्षमा २२)तेज २३)धैर्य २४)अद्रोह २५)नम्रता २६)ज्ञान व कर्म यातील समत्व

या दैवी संपत्तीचे दर्शन जेवढे आपल्याला इतरांमध्ये दिसेल तेवढा आपल्यामध्ये जनी जनार्दन भाव निर्माण होईल.

बऱ्याच वेळा आपल्याला ह्या गुणांच्या अभावामुळे आर्त व विपन्न लोकांचे पण दर्शन होते. त्यांच्यात पण दैवी गुण आले तर त्यांची दुःखातून सुटका होईल हे जेव्हा आपल्या मनाशी पक्के पटते व त्यासाठी आपण धडपड करू लागतो म्हणजे या प्रवासातून आपल्याला होणारे दर्शन असते जनी जनार्दन.

आपला समाज विविध प्रकारच्या लोकांनी बनलेला आहे. आपला समाज व या समाजात पूर्वीपासून चालत असणारी मनुष्य निर्माणाची व समाजसंस्थापनेची प्रक्रिया याचे योग्य दर्शन झाले की त्याच्याशी आपले भावनिक नाते बनते. जर हे पवित्रभाव (भक्ती) जपत समाजाच्या समस्या सोडवण्याचे ज्ञान व कर्मयुक्त काम सर्वांच्या सोबत केले की विराटाचे दर्शन होते.एकदा असे दर्शन झाले की जनी जनार्दन हा भाव अधिक खोलवर रुजतो.

विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांचे एक महिन्याचे अभ्यास शिबीर चांडील (झारखंड) त्यावेळच्या बिहार येथे होते. त्यात मलाही सहभागी होता आले. शिबिराच्या पहिल्या दिवशी आम्हाला आपल्या कार्यक्षेत्राबद्दल व लोकांबद्दल बोलावयाचे होते. त्याचबरोबर आपल्याला जाणवलेल्या संघटनेतील गोष्टी ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सांगायच्या होत्या. सर्वांनी आपला भारतीय समाज किती चांगला आहे याचे खूप चांगले वर्णन केले. पण यासोबत माझ्यासह काही जणांनी आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांचे व काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे मात्र उणेदुणे काढले. 

अंबाजोगाईत काम करताना आईशी माझे बरेच खटके उडायचे. आपल्या जवळच्या नित्य सहवासातील लोकांशी आपले नाते नीट का राहत नाही? याचा विचार मी करू लागलो. माझ्या लक्षात आले की आपण आपल्या सोबतच्या नित्याच्या असणाऱ्या लोकांमधील जनार्दन अजिबात पाहिलेला नाही. आपल्या सोबतच्या लोकांमध्ये जर आपल्याला जनार्दन दिसत नसेल तर नक्कीच इतरांमध्ये जनार्दन पाहतो हे म्हणणे म्हणजे खोटे बोलणे होईल. प्रबोधिनीच्या संचालाकांशी बोलताना याची अनुभूती अनेक वेळा आली. त्यांच्या स्वतःच्या वागण्याचे दर्शन मी गेले १३ वर्षे करत आलो आहे. त्यांच्या वागण्याच्या दर्शनातून हळूहळू मला ही चूक लक्षात आली.

एकदा आपण आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या आयुष्यात विकसित झालेले माणूसपण अभ्यासले तर बऱ्याच प्रकारे आपल्याला सभोवतालच्या समाजाच्या समस्यांचा पण अभ्यास होईल. एकदा चांगल्या गुणांचे दर्शन झाले की त्या आधारे अधिक चांगले अभिव्यक्त होण्याचे माध्यम आपल्याला व त्यांना आपण निर्माण करू शकतो. यातून परस्पर भाव निर्माण होऊन संघटनेचा श्रेयस्कर मार्गावरचा प्रवास गतीने, स्थिरपणे व योग्य दिशेने सतत करता येतो. 


योगिता कापसे,प्रसाद चिक्षे 

माझे आजोबा शिवाजीराव व आजी सौ. कुसुम 


प्रबोधिनीतील अगदी लहान योगिता ते सर्वात ज्येष्ठ माझे ९३ वर्षांचे आजोबा यांच्या जीवन प्रवासाचा अनुभव व त्यातून दर्शन झालेला त्यांच्यातील जनार्दन समजून घेण्याचा हा एक छोटा प्रयत्न आहे............
झालिया दर्शन !!!!!