बुधवार, २८ मार्च, २०१२

पर्वताच्या उंच टोकाहून भारतमातेचे शेवटचे टोक पाहताना गुरुजींच्या चेहऱ्यावर जीवनाच्या गणिताचे अतिशय अवघड प्रमेय सोडवल्याचा आनंद व आत्मविश्वास दिसत होता.


वि.र .जोशी गुरुजी (मरुतमलाई ,कन्याकुमारी)
१९९९ ला मी अंबाजोगाईत राहायचे या उद्देशाने अरुणाचल प्रदेशातून अंबाजोगाईला आलो. अंबाजोगाईत काय कार्य करायचे हे निश्चित नव्हते पण पुढील सहा महिने तरी रामकृष्ण व विवेकानंद यांच्या साहित्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्याच बरोबर भगवद्‌गीतेचा अभ्यास पण एक संघटन व मनुष्य विकसनाचे शास्त्र म्हणून करत होतो. ज्ञान प्रबोधिनीचे संचालक आ. गिरीशरावांशी तसे बोलणे पण झाले होते. मला संस्कृत येत नसल्याने भगवद्‌गीतेचा अभ्यास करणे अवघड होते. मी अश्या लोकांच्या  शोधात होतो ज्यांचा भगवद्‌गीतेचा अभ्यास चांगला आहे. मामा पारगावकर, मालतीताई धारूरकर,  देशमुख काकू अश्या अनेक जणांची भेट घेतली व दर शनिवारी एक तास थोरल्या देवघरात आम्ही संध्याकाळी ६ ते ७ एक तास एका वेळी फक्त एका श्लोकाचा अर्थ आम्ही समजून घेत असूत. अभ्यास करून जाणत्या लोकांनी पहिल्यांदा अर्थ सांगायला सुरुवात केली. त्याला आम्ही नाव दिले गीताप्रबोधिनी.


संध्याकाळी काही कारणास्तव मी सावरकर चौकात गेलो होतो. अगदी चौकातच मला वि.र जोशी गुरुजी दिसले. संदीकर गुरुजींना भेटल्यावर गीतेच्या अभ्यासासाठी वि.र जोशी गुरुजीना नक्की भेट असे सांगितले होते. गुरुजी दिसल्याबरोबर खूप आनंद झाला. त्यांना मी नमस्कार केला व विचारले,
“ओळखलंत का गुरुजी मला ?”
माझ्यात खूप बदल झालेला होता. गुरुजींना मी १६ वर्षांनी भेटत होतो. त्यांनी ओळखणे शक्य नव्हते.
“मी प्रसाद चिक्षे.” मी नाव सांगितले.
गुरुजींनी हातात हात घेतला व विचारले, “अरे वा ! काय करतोस ?”
“गुरुजी इंजिनिअरींगचे पदव्युत्तर शिक्षण झाले. विवेकानंद केंद्राचे अरुणाचलप्रदेश मध्ये काम केले गेले पाच वर्ष. आता अंबाजोगाईत आलो आहे. सध्या गीतेचा अभ्यास चालू आहे. तुम्ही पण या की थोरल्या देव घरात दर शनिवारी संध्याकाळी.” माझे थोडक्यात इतिवृत्त गुरुजींना सांगितले.
“तू पण घरी ये एकदा. माझा मुलगा रवी इंजिनिअरिंगला आहे. त्याला पण तुझे मार्गदर्शन होईल.” गुरुजींनी खूप प्रेमाने आमंत्रण दिले.

काही दिवसांनी मी गुरुजींच्या घरी गेलो. आनंदनगर मध्ये ते रहात होते क.र.जोशी गुरुजींबरोबर. घराचे नाव पण मस्त होत “करविर”. करविर पिठाची महालक्ष्मी हे त्यांचे कुलदैवत व दोन्हीही गुरुजींचे आद्याक्षरे घेतली तर हे नाव बनते. गुरुजी मस्त घोंगडीवर भिंतीला टेकून पांढरे लांब बाह्याचे बनियन व पांढरी लुंगी घालून ते बसले होते. चेहऱ्यावर १६ वर्षांपुर्वीचेच भाव होते. थोडे केस पांढरे झाले होते. तीच सहजता व आपुलकी होती. आवाजात थोडा फरक झाला होता. बोलता बोलता आवाज घोगरा होई.

गुरुजींची पत्नी माझ्या आईची विद्यार्थिनी. रवी व स्नेहल हे त्यांची दोन मुलं.रवी अंबाजोगाईतील अभियांत्रिकी महाविद्यालयात तर स्नेहल केजच्या D.Ed कॉलेज मध्ये शिकत होते. रवीची व माझी ओळख झाली. कधी कधी ७ वीचा अभ्यास करत असताना तहान लागल्यावर आम्ही गुरुजी राहत असलेल्या लादनीत पाणी पिण्यासाठी जात असू त्यावेळी लहाग्या रवी बरोबर खूप खेळत असुत. त्याचे बोबडे बोलणे खूप मजेदार वाटायचे.रवी खूप उंच झाला होता. डोळ्यावर चष्मा, अगदी टापटीप इन शर्ट मध्ये.त्याची आणि माझी लवकरच मैत्री झाली.

गुरुजी अंबाजोगाई जवळील चंदन सावरगावचे. त्यांचे प्राथमिक शिक्षण सावरगावलाच झाले. अठरा खणांचे माळवद व त्यासमोर विस्तीर्ण ओसरी. पहिली ते सातवी पर्यंतचे गुरुजींचे शिक्षण गावातील मठात चालणाऱ्या जिल्हापरिषद शाळेत झाले. आजोबांबरोबर मस्त घोड्यावरून ते शाळेत जायचे. चार भाऊ व एक बहिण असा त्यांचा परिवार. घर मात्र अनेक लोकांनी भरलेलं असे. कमीतकमी २ /३ जण तरी घरी शिकण्यासाठी रहात असत.वडील सुरुवातीला शिक्षक होते नंतर परंपरागत भिक्षुकी करत होते.

७ वीच्या परीक्षेनंतर पुढील शिक्षणाचे काय करायचे हा मोठा प्रश्न होता. वडिलांच्या काकीने आपल्या मुली कडे म्हणजे गुरुजींच्या आत्याकडे ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला. आत्याला दम्याचा त्रास होता. केजला पाणी नदीतून आणावे लागे. ते त्यांना खूप त्रास दायक होते. गुरुजी तिथे राहिले तर या कामात आत्याला खूप मदत होणार होती. गुरुजी सरळ आत्याला बोलायला केजला गेले. आत्याच्या सासूबाई सोवळ्या होत्या पण खूप मायाळू व परिपक्व ! एक विद्यार्थी आपल्या घरी राहून अध्ययन करणार या विचाराने त्या खुपच खुश झाल्या. आत्याला पण मदत होणार होती व गुरुजींना पुढे शिकता येणार होते.

पुढचे शिक्षण केजच्या हायस्कूलमध्ये सुरु झाले. गणितात खुपच रस असल्याने त्यांनी “Higher maths” घेतले. पण मोठा प्रश्न निर्माण झाला. गणित शिकवण्यासाठीचे शिक्षक सातत्याने बदलत होते व काही काळ तर असा गेला की शिक्षकच नाहीत. दहावी पर्यंत गणिताचा अभ्यास गुरुजींनी स्वतःच केला. याचमुळे प्रबोधिनीतील स्वयंअध्ययन पद्धत त्यांना फारच भावली. दहावीला नवीन आलेले मुख्याध्यापक श्री अंबेकर खूपच तत्पर व कल्पक होते. दहावीची परीक्षा दोन महिन्यावर आली आहे व त्यांना गणित शिकवायला शिक्षक नाहीत हे समजल्यावर त्यांनी तत्परतेनी धारूरहून श्रोत्री गुरुजींना खास गणित शिकवायला आणले. मोकळ्या मैदानात ते सकाळी सहा वाजता “Higher maths” असणाऱ्या मुलांना शिकवायचे. दोन महिने त्यांनी खूप चांगली तयारी करून घेतली. दहावीच्या परीक्षेत शाळेतील फक्त चारच मुलं पास झाली तर बाकी सगळे गणितात नापास झाले. गुरुजी ४८ टक्के गुण घेऊन पास झाले.

कद्रे गुरुजी नावाचे गुरुजींच्या आईचे भाऊ शिक्षक होते. गुरुजींचे गुण त्यांनी पाहिले.
“विजूने पुढे अंबाजोगाईला जाऊन शिकले पाहिजे. माझे कुटुंब मुलांच्या शिक्षणासाठी अंबाजोगाईला आहे. तिथे विजू राहील व त्याच्या जेवणाची व्यवस्था होईल. माझ्या जेवणाची व्यवस्था तुम्ही इथे सावरगावात करा.” कद्रे गुरुजींनी आईंना सुचवले.
सूचना स्वीकारली गेली व गुरुजी त्यावेळचे PUC विद्यापीठ पूर्व अभ्यासक्रमा साठी अंबाजोगाईत दाखल झाले. त्यांनी वाणिज्य शाखा घेतली. देवघराच्या पुढे बोळीत असलेल्या कुर्डूकरांच्या वाड्यात कद्रे कुटुंब रहात होते. तिथेच गुरुजींची त्यांच्या बरोबर शिकणाऱ्या दिलीप कुर्डूकरांशी व वकील आर. डी देशपांडे यांचा मुलगा सुधीरशी घट्ट मैत्री झाली. दिलीप व सुधीर बरोबर गुरुजींचा अभ्यास मस्त चालू होता. सुधीर हा  खुपच वेगळा. खूप सारे अवांतर वाचन. अफाट बुद्धिमत्ता व त्यात निर्भयता. एक अवलियाच. सबनीससर, माहुरकरसर, हरीश देशपांडे असे अनेक नामवंत प्राध्यापक त्यांना शिकवायला होते.

PUC च्या परीक्षेचे दोन महिने राहिले तो एक दुःखद घटना घडली. कद्रे गुरुजी अचानक कर्करोगाने निधन पावले. त्यांच्या कुटुंबाला स्वतःचे भागवणे अवघड होऊन बसले. शेवटी दुसऱ्या एका नातेवाइकांकडे व्यवस्था झाली व गुरुजी PUC मध्ये अव्वल दर्जाने पास झाले. माहुरकरसर शिकवत असलेल्या बुककीपिंग या विषयात त्यांना १०० पैकी ९८  गुण मिळाले व ते सर्व प्रथम आले.
निकाल लागायच्या आतच एक नवीन अभ्यासक्रम सुरु झाला होता. दहावी पास मुलांसाठी प्राथमिक शिक्षकांसाठीचा D.Ed अभ्यासक्रम. नेकनूर येथे महाविद्यालय सुरु झाले. प्रवेश ज्या विद्यार्थ्यांना मिळेल त्यांना ४० रुपये प्रति महिना विद्यावेतन होते. गुरुजींना हे कळताच ते व व्ही.टी कुलकर्णी गुरुजी या दोघांनी प्रवेश घेतला. ४० रुपये विद्यावेतन फारच महत्वाचे व गरज भागवणारे होते. इकडे ९८  गुण घेणारा विद्यार्थी कुठे गेला याचा शोध मात्र अंबाजोगाईतील प्राध्यापक करत होते. गुरुजी D.Ed. चा अभ्यासक्रम ७८ % गुण घेऊन पास झाले. त्यात त्यांच्या विद्यावेतनात त्यानी बचत करून १८० रुपये शिल्लक ठेवले.

बडेगावच्या ( बर्दापूर ) रेणूक विद्यालयात मुलाखत व पाठ देऊन गुरुजी सावरगावला निघाले. बस अंबाजोगाईला येऊन बदलावी लागायची. अंबाजोगाईला ते आले व सावरगावच्या बसची वाट पहात होते. बस स्थानकावर त्यांना सुधीर देशपांडे हा त्यांचा PUC मधील मित्र भेटला. शिक्षकाच्या पदासाठी मुलाखत देऊन आल्याचे कळताच तो म्हणाला. “ आपल्या प्राथमिक शाळेत जागा आहेत की तिथे अर्ज दे.”
गुरुजींना त्याबाबत फारशी माहिती नव्हती.
“मी पहातो किती जागा आहेत व तुला तसे कळवतो.” खुपच आश्वासक पणे सुधीर देशपांडे बोलले.
ते आता वाणिज्य तृतीय वर्षाला होते. आपल्या पत्त्याचे पोस्ट कार्ड गुरुजींनी सुधीर देशपांडेना दिले.
सुधीर देशपांडे तसे बिनधास्त व मित्रांसाठी बरच काही करायचे. त्यांचे वडील अंबाजोगाईतील प्रसिद्ध वकील व योगेश्वरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी. त्यामुळे संस्थेतील अनेक लोक त्यांच्या परिचयाचे होते. योगेश्वरी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक त्यावेळी बाजीराव गुरुजी होते.सुधीर भाऊ त्यांच्या कडे गेले व गुरुजींबद्दल सर्व काही सांगितले.

“तुम्ही ठरवलं तर त्याला तुम्ही नक्की घेऊ शकता, तुम्ही त्याला घ्याच आपल्या शाळेत. अहो तो खूप हुशार आहे. ७८% पडेल आहेत त्याला D.Ed मध्ये.” नेहमीच्या बिनधास्तपणे बाजीराव गुरुजींना सुधीरभाऊनी गळ घातली.

“अरे अर्ज तरी दे आधी त्याचा.” बाजीराव गुरुजी म्हणाले.

गुरुजींकडूनच कागद घेऊन सुधीरभाऊनी गुरुजीचा शिक्षक पदासाठीचा अर्ज भरला. येवढ्यावर ते थांबले नाहीत तर संस्थेचे कार्यवाह त्यावेळी बेथुजी गुरुजी होते. त्यांच्याकडे ते गेले व त्यांना गुरुजींबद्दल सांगून. शिक्षक म्हणून घेण्याची विनंती केली.

मुलाखत व पाठ घेण्यासाठी गुरुजी अंबाजोगाईला आले. साहजिकच पहिल्यांदा ते गेले सुधीर भाऊंकडे.
योगेश्वरी प्राथमिक शाळेत पाठ झाला. गुरुजींनी गणिताचा पाठ घेतला व ते परत सावरगावला गेले.
सुधीरभाऊ पिच्छा सोडणारे नव्हते. ते बाजीराव गुरुजींकडे गेले व विचारले,
“गुरुजी काय झालं विजूचं?

“त्याची भाषा थोडी अशुद्ध आहे आणि थोडं उच्चारात स्पष्टता नाही.” नकार कळवण्याच्या भाषेत बाजीराव गुरुजी बोलले.

“हो थोडी ग्रामीण भाषा आहे. ग्रामीण भागातीलच आहे न तो. पण उच्चारातील अस्पष्टता अशक्य, मी त्याच्या बरोबर एक वर्ष राहिलो आहे. खूप स्पष्ट बोलतो तो.” खूप विश्वासाने सुधीरभाऊ बोलले.
तसं हार मानणाऱ्यातील ते नव्हते. असा बिनधास्तपणा अंबाजोगाईकरांच्या नसानसात भिनलेला आहे. म्हणूनच अंबाजोगाई हैदराबाद मुक्ती संग्रामचे केंद्र होते.

सुधीर भाऊ बेथुजी गुरुजींना भेटले त्यांनी पण गुरुजींच्या भाषेबद्दलच सांगितले. सुधीर भाऊ मात्र त्यांच्याशी सहमत नव्हते. ते बेथुजी गुरुजींना आपल्या मित्राची योग्यता पटवून देत होते. शेवटी बेथुजी गुरुजी म्हणाले, “त्याला परत एकदा पाठ घ्यायला सांग. या वेळी मात्र पाठ मराठीचा घ्यावा त्याने.”

“हो घेईल की त्यात काय. मी सांगतो त्याला लगेच.” उत्साहाने सुधीरभाऊ बोलले.

गुरुजी मराठीचा पाठ घेण्यासाठी अंबाजोगाईला आले. त्यांना कुठलाही विषय शिकवण्याबाबत समस्या नव्हती. “छान किती दिसते फुलपाखरू” ही कविता गुरुजींनी रंगून शिकवली. विद्यार्थी दशेत त्यांचे अक्षर थोडे खराब होते. D.Ed ला असताना फळ्यावर ते नीट यायचे नाही. आपले अक्षर सुंदर झाले पाहिजे असे त्यांना आता मनोमन पटले होते. अगदी बाजारातून अक्षर वळणदार होण्यासाठी मिळणारी अक्षर गिरवण्याची बरगे पाटी त्यांनी आणली व दररोज सराव सुरु केला. खूप सराव करून त्यांनी आपले अक्षर खुपच वळणदार केले. त्यांचे फळ्यावरचे लिखाण खुपच नेटके व आकर्षक असायचे. विद्यार्थ्यांनी स्वच्छ, सुंदर, वळणदार व नेटके लिहावे यासाठी ते फार दक्ष असत. अनेक मुलांनी त्यांचा प्रसाद यासाठी बऱ्याच वेळा घेतला होता.

पाठ एकदम मस्त झाला. गुरुजी, विजू गुरुजी म्हणून योगेश्वरी प्राथमिक शाळेत रुजू झाले. सुधीर भाऊ पण खुश झाले. १८० रुपये प्रतिमहा पगार. दहावी पात्रतेच्या पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली. गुरुजींच्या बरोबर काही दिवस आधी तांदळे गुरुजी धारूरची जनता विद्यालयातील नौकरी सोडून योगेश्वरी प्राथमिक शाळेत रुजू झाले होते. थोडया दिवसात दोघांची चांगली मैत्री झाली. तांदळे गुरुजी वयानी खूप वडील होते पण निखळ मैत्रीच्या आड वय कसे येणार? नौकरी लागली, पगार मिळायला लागला म्हणून पुढील शिक्षण थांबवणाऱ्यातील गुरुजी नव्हते. महाविद्यालयात प्रवेश घेऊ दिला जाईल का याची शंका त्यांच्या मनात होती. मोकळे राहणे त्यांच्या स्वभावात नव्हते. त्यांनी मग हिंदीच्या विविध परीक्षा द्यायला सुरुवात केली. अगदी पंडित पर्यंतच्या. याच काळात प्रयोगातून विज्ञान (NCERT) चा अभ्यासक्रम सुरु करण्याचे शासनाने ठरवले व त्यासाठी तालुक्यातील दहा शाळांची निवड करण्यात आली. योगेश्वरी प्राथमिक शाळा त्यामध्ये एक होती. शिक्षकांना प्रशिक्षणासाठी पाठवायचे ठरले. योगेश्वरी प्राथमिक शाळेतून तरुण,कल्पक व उपक्रमशील वि.र. गुरुजींची निवड होणे स्वाभाविक होते. ते त्या प्रयोगात रमले व त्यातच ते जिल्हापातळीवरील शिक्षण प्रशिक्षणाचे प्रमुख बनले.

माध्यमिक शाळेत शिकवावे असे त्यांना वाटत होते. तशी संधी पण योगेश्वरी माध्यमिक शाळेत आली होती. पण मुख्याध्यापक बाजीराव गुरुजी त्यांना सोडायला तयार नव्हते. बेथुजी गुरुजींना इच्छा सांगितली तर ते म्हणाले की तुमचे पदवी पर्यंतचे शिक्षण झाले नाही. लगेच गुरुजींनी विद्यापीठातील पदवी परीक्षेसाठी बहिस्थ विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. त्यांच्याबरोबर ४० वर्षांच्या तांदळे गुरुजींनी पण प्रवेश घेऊन अभ्यास सुरु केला. भालचंद्र मोटेगावकर, कोष्टगावकर हे सारे त्यावेळी नियमित अभ्यासक्रमाला होते. संध्याकाळी सुधीर देशपांडे,तांदळे गुरुजी, भालचंद्र मोटेगावकर व वि.र गुरुजी एकत्र प्राथमिक शाळेत अभ्यास करायचे. कालच्या पेक्षा आज पुढे गेले पाहिजे हे प्रबोधिनीपणाचे वैशिष्ट्य गुरुजींमध्ये खूप आधीच रुजले होते.

पुढच्या वर्गाला शिकवण्याची इच्छा खूप होती पण तशी संधी येत नव्हती. काय करणार? मनात तर चलबिचल होती. शेवटी ५ वी ते ७ वी च्या मुलांसाठी त्यांनी व तांदळे गुरुजींनी मिळून  मार्गदर्शन वर्ग सुरु केले. तांदळे गुरुजी इंग्रजी तर वि.र. गुरुजी गणित शिकवायचे. थोडया दिवसात त्यांच्या शिकवण्याची हातोटी मुलांना भावली व मुलांचे ते आवडते शिक्षक बनले. अनेक मुलं त्यांच्या वर्गाला येऊ लागली. काही संस्थेतील शिक्षकांची व पदाधिकाऱ्यांची पण होती. सहाजिकच त्यांच्या पर्यंत दोन्हीही गुरुजींच्या शिकवण्याच्या पद्धती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पोहोंचली वं ते प्रभावित झाले.


१९७८ ला माध्यमिक शाळेत अनेक जागा निघाल्या. तांदळे गुरुजी व वि.र गुरुजींची निवड झाली. तुकड्या कमी झाल्या तर नौकरी जाण्याचा धोका होता. अनेकांनी सांगितले की आता नियमित झालेली नौकरी सोडून कश्याला या फंद्यात पडता. कालच्या पेक्षा आज आणि आजच्या पेक्षा उद्या ज्यांना पुढे जायचे असते त्यांनी अश्या भीतीने पाऊल मागे घेणे शक्य नव्हते. दोघंही योगेश्वरी मंदिरा जवळील शाळेत रुजू झाले. फडके गुरुजी मुख्याध्यापक होते. दोघांच्या शिकवण्याच्या क्षमतांना ते जाणते होते. तांदळे गुरुजींना एकदम ७ वी चे इंग्रजी शिकवायचे दायित्व त्याच बरोबर ७ वी शिष्यवृत्तीची जवाबदारी वि.र गुरुजींना दिली. आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाचे सार्थक करण्यासाठी दोघंही खूप कष्ट घेत होती. त्याची प्रचीती लवकरच आली अनेक मुलं पहिल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आली. दुसऱ्या वर्षी तर जिल्ह्यातील १६ जणांपैकी ९ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आली. वि.र. गुरुजींच्या प्रयत्नाला यश आले तर फडके गुरुजींनी टाकलेल्या विश्वासाचे त्यांनी चीज केले.    

शिक्षणातील नवनवीन प्रयोग सतत करत राहणे व त्यात यश मिळवणे यासाठी अंबाजोगाईकराना वि.र गुरुजी सर्व परिचित झाले. मध्यंतरीच्या काळात त्यांनी गीतेची संथा कोष्टगावकर गुरुजींकडून घेतली. त्यांचे नित्य गीतापठण व अभ्यास हा त्यांच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग बनला. ७ वीत  ज्यांच्या मुळे गणिताची आवड लागली त्यांच्या बरोबर राहून आता गीता शिकायला मिळणार या कल्पनेंनी मी खूप भारावून गेलो होतो. शनिवारच्या गीताभ्यासाला गुरुजी आले व पुढे त्यात ते रमत गेले.

दर शनिवारचा आमचा गीता अभ्यास मस्त चालू होता. एकावेळी फक्त एका श्लोकाचा अभ्यास करून कुणीही एक जण बोलायचे. माझ्यासाठी हे खुपच उपयोगी होते. विविध पद्धतीने गीता समजून घेता येत होती. मामा पारगावकर वय वर्ष ८१ व मालतीताई धारूरकर वयवर्ष ७१ या दोघांचा उत्साह खुपच दांडगा होता. मामा तर भगवद्‌गीता जगले होते. एक छोटे किराणा सामानाचे दुकान ते चालवायचे. भिक्षुकी करायचे व खूप कष्टानी त्यांनी दिवस काढले. आपण जे भोगतो आहोत ते आपल्या मुलांना भोगावे लागू नये म्हणून त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. दुकानात फावल्या वेळेत ते भगवद्‌गीतेचा अभ्यास करायचे. दोन्ही मुले खूप शिकली एक प्राध्यापक तर दुसरा डॉक्टर झाला. मामांचे आयुष्य आता फक्त भगवद्‌गीतेच्या प्रचारासाठी होते. अनेक महिलांना व पुरुषांना त्यांनी गीता शिकवली.

गीतेच्या अभ्यासा बरोबरच प्रबोधिनी करत असलेल्या अनेक शिक्षणातील प्रयोगांबद्दल मी वि. र. गुरुजींना सांगायचो. प्रबोधिनीचे प्रकाशित साहित्य मी त्यांना वाचायला देत असे. माझा दैंनदिन अभ्यास व्यवस्थित सुरु होता. प्रबोधिनीच्या संदर्भात मी अंबाजोगाईतील अनेक लोकांना बोलत होतो. वेगवेगळी अनुभव येत होती. ज्यांच्या विचारांमुळे मी प्रभावित झालो होतो अश्या अनेक लोकांना प्रबोधिनीचे काम अंबाजोगाईत सुरु करण्यासाठी बोलत होतो.

“समाज हा प्रचंड अश्या आगीच्या वणव्या सारखा असतो. तो जे काही त्यामध्ये उभे राहील त्याला भक्ष्य  करून टाकतो. मग तृप्तीची ढेकर देतो. अश्या सामाजिक कामानी काही होत नाही. या पेक्षा वेगळ काही कर स्वतःच्या हिताचे.” असे समजून सांगणारे स्वर पण ऐकायला मिळाले.

तर विलासराव बेलुर्गीकर गुरुजींची मला शाळेत असताना खूप भीती वाटायची त्यांना भेटायला गेलो.
थोडं भीतभीतच त्यांना प्रबोधिनीच्या कामाबद्दल सांगितले.

“अरे वा ! चांगले काम करतोस की तू. तुझ्या सर्व उपक्रमांना आमच्या सर्वांची सर्व प्रकारची मदत व साहाय्य असेल.” विलासराव गुरुजी खुपच आत्मीयतेने बोलले.


 चैत्र प्रतिपदे नंतर प्रबोधिनीचे काही शैक्षणिक काम अंबाजोगाईत सुरु करावे असे वाटत होते. पण निश्चित असे काहीच होत नव्हते. संघटनशास्त्राचा अभ्यास व अंबाजोगाईचे भावविश्व, विचारविश्व मी मा.मा. क्षीरसागरांकडून समजून घेत होतो. संघटनशास्त्राचा त्यांचा अभ्यास खुपच तगडा होता.दररोज त्यांच्या बरोबर मी किमान एक तास बसायचो. विविध लोकांना भेटायला जायचो. खूप विषयांवर चर्चा व्हायची. मामांची, विषय समजून घेऊन त्यावर कोटी पूर्ण भाष्य करण्याची क्षमता अफलातून होती. माणूस समजून घेऊन त्याच्या क्षमतांना कश्या प्रकारे समाज विकासाचे व्यासपीठ संघटनेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायचे या बद्दलची त्यांची हातोटी विलक्षण होती.

शिक्षण व संघटन क्षेत्राचा योग जोडत चांगले मनुष्य निर्माणाचे कार्य त्यांनी गेले अनेक दशकं केली होती. गम्मत म्हणजे मामांचे संवाद कौशल्य भारीच होते. लहान मुलांपासून ते अगदी आपल्या विरुद्ध विचारांच्या लोकांशी ते सहजपणे बोलत. “मत भेद होने पर भी, मन भेद हो न पाये” हे त्यांची मैत्री असलेल्या अनेक लोकांकडे पाहून लगेच लक्षात येते. अंबाजोगाईत अनेक विचार नांदतात. त्या विचार प्रवाहासाठी उभे आयुष्य देणाऱ्यांची मांदियाळी या गावात आपल्याला दिसते. अनेक मोठे सामाजिक, शैक्षणिक प्रकल्प या लोकांनी उभे केले.  आपल्या विचारांचे समर्थन करताना त्यांच्यात होणारे संभाषण म्हणजे कुणालाही सहज पणे समृद्ध करणारी वैचारिक जुगलबंदीच असायची. सरते शेवटी एकमेकांची मजा घेत व सर्वांचे अंबाजोगाईच्या विकासातील आवश्यक स्थान ते मान्य करत. अंबाजोगाईचे कधी Mono culture होऊ दिले नाही या लोकांनी. मतभेद असणारच पण व्यक्तिगत पातळीवरकिंवा कश्याच्याही बाबतीत एकमेकांवर पातळी सोडून टीका कधी कुणी केली नाही. आधीच्या पिढीने पाडलेले चांगले आदर्श आपण नक्कीच पुढे जपले पाहिजेत हे या सहवासातून समजत होते.

मामांबरोबरच्या संवादातून मी अंबाजोगाईत प्रबोधिनीचेच काम करावे हे निश्चित झाले. प्रबोधिनी म्हणजे अनेक संस्था, संघटना,विचारधारा, माणसे यांच्यामध्ये पूल बांधणारी संघटना. माझा स्वभाव पाहता मला हे करणे जमेल असे मामाना वाटत होते. आपण एखाद्या संघटनेच्या महत्वाच्या स्थानावर काम करत असताना सुद्धा समोरील व्यक्तीस अभिव्यक्त होण्यासाठी कोणती संघटना योग्य आहे हे समजून घेऊन त्याला ते कामच कर म्हणून सांगण्याचा उमदेपणा मामांमध्ये होता.
प्रबोधिनीचे काम अंबाजोगाईत सुरु करायचे या माझ्या विचाराला एक जाणत्या संघटकाचा अनुभवाचा दुजोरा मिळाला व मग मी जोरात कामाला लागलो. माझ्याबरोबर काम करण्याला ज्यांनी अनुकूलता दर्शविली होती अश्या पन्नासेक लोकांची बैठक मी माझ्या घरीच आयोजित केली. बैठकीची वेळ झाल्याबरोबर पहिल्यांदा वि.र .गुरुजी आले. आम्ही इतरांची वाट पहात होतो. एक तास झाला पण कुणी आलेच नाही. विवेक जोशी थोडा वेळ येऊन गेला. बैठकीच्या अंति आम्हा दोघांना हे समजून चुकले हे काम आम्हा फक्त दोघांनाच करायचे आहे. त्यादिवसापासून मी व गुरुजी प्रबोधिनीच्या कामाला लागलो.

गुरुजींच्या मनात पण अनेक नवीन उपक्रम करण्याचे होते. शैलेश कंगळेशी याच काळात माझी मैत्री झाली. त्यांनी एक खूप वेगळे शिबिर आपण मुलांसाठी घेऊत असा प्रस्ताव ठेवला. माझ्या स्वतःच्या अनुभवातुन मला एक पक्के वाटत होते की ७ वी तून आठवीत जाणाऱ्या मुलांसाठी हा उपक्रम असावा. या वयात झालेले संस्कार खूप दीर्घकाळ आयुष्यात टिकतात.संस्कार या शब्दाचा अर्थ वेगवेगळे लोक खूप वेगळा लावतात असे लक्षात आले होते. माझ्या स्वतःच्या लहानपणीच्या आठवणीतून, मामा क्षीरसागर, वि.र गुरुजी, बेळूर्गीकर गुरुजी यांच्याशी होत असलेल्या संवादातून काही गोष्टी  मला प्रकर्षाने जाणवत होत्या. प्रबोधिनीचे शैक्षणिक प्रयोग अभ्यासताना त्यातील मानसशास्त्रीय संकल्पना खुपच स्पष्ट होत होत्या. आज देशाला सायंकाळी शुभंकरोती म्हणण्याच्या पुढे जाऊन भोवतालचा समाज माझा आहे, या समाजातील सर्व लोकांचे माझ्या दैनंदिन आयुष्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पण महत्वाचे योगदान आहे, या समाजात अनेक वाईट प्रथा, रुढी,प्रश्न व समस्या आहेत, त्यांचा योग्य तो अभ्यास करून त्यावर माझ्या परीने प्रयत्न करत राहण्याचा संस्कार पण मुलांवर झाला पाहिजे. याचबरोबर आता त्याला बऱ्याच गोष्टी समजायला लागल्यात. त्याने स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे पैलू समजून घेऊन या पुढे स्वतःच्या विकासाची जबाबदारी त्याची स्वतःची आहे याचे त्याला योग्य पद्धतीने भान आणून देण्याचा संस्कार पण त्याच्यावर झाला पाहिजे.

आपल्या भोवतालच्या परिसरातील लोकांच्या परिणामातून आपले व्यक्तीमत्व बनत असते. आज काल फक्त पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करताना हा महत्वाचा संस्कार दुर्लक्षित राहतो. अंबाजोगाईत आल्यापासून मामा व वि.र गुरुजींबरोबर राहून माझ्या पहिली ते बारावी पर्यंतच्या काळात व पुढे ज्या ज्या वेळी मी अंबाजोगाईत राहिलो त्यावेळी न समजलेली अंबाजोगाई गेल्या चार महिन्यात खुपच समजली. विलक्षण वैभव आहे या अंबाजोगाईत. गाव व्यापारपेठेंनी, उद्योग धंद्यांनी श्रीमंत होते हे असेलही पण अंबाजोगाईची श्रीमंती म्हणजे येथील माणसे. त्यांनी देश विकसनासाठी केलेले अथक प्रयत्न व त्यातून तयार झालेली गावाची एक संस्कृती हे फार थोडया ठिकाणी पहावयास मिळते. अंबाजोगाई या बाबतीत मराठवाड्याची  राजधानी आहे. पण या अश्या अंबाजोगाईची ओळख माझ्या शालेय जीवनात फार कधी झाली नव्हती. देशपातळीवरचे व प्रबोधिनीचे काम करताना याचे महत्व अधिकच पटत होते.

गावाची ओळख मुलांना झाली पाहिजे हे खूप आतून पटले होते. गुरुजी व शैलेश कंगळेशी चर्चा करून गावातील परिसर,शिल्प व ऐतिहासिक स्थळे, इमारती,शैक्षणिक व सामाजिक संस्था,दूरदर्शन केंद्र व गिरवली विद्युत केंद्र,शेती व तेथे काम करणारी माणसे  यांचा प्रत्यक्ष भेटीतून व सहवासातून अनुभव घेत अभ्यास करण्याचे व्यक्तीमत्व संस्कार शिबीराचे आयोजन १४ एप्रिल ते २१ एप्रिल दरम्यान केले. खूप छान अनुभव होते. पुण्याहून माझा मित्र मिलिंद नाईक खास ह्या शिबिरासाठी सात दिवस आला होता.

गुरुजींबरोबर अनेक क्षेत्रात काम करता आले. खूप काही शिकत होतो. रवी व स्नेहल पण खूप मोठी झाली होती. याच काळात एक दुर्घटना घडली रवीचे अपघाती निधन झाले. गुरुजींना भगवद्‌गीतेच्या अभ्यासामुळे ह्या धक्यातून सावरणे थोडं अवघड जरी असले तरी जमले. काकूंना मात्र रवीचे अपघाती निधन हा खुपच मोठा धक्का होता. त्यांचा रवीवर खूप जीव होता. या धक्यातून त्या बाहेर येणे खुपच अवघड होते. गुरुजी शाळेत गेल्यावर तर घर त्यांना खायला उठायचे. काकूंनी घराच्या बाहेर पडणेच बंद केले होते. रवीची आठवण आली की त्यांना दाटून येई. ९ महिने आपल्या अंगाचा एक भाग म्हणून वाढवले, त्याच्या जन्माच्या वेळी वेदना सहन करत मातृत्वाचा सुखद अनुभव त्यांनी घेतला होता. प्रत्येकाला एक दिवस शाश्वत निद्रेत जायचेच असते. पण पोटच्या पोराचा शाश्वत विरह त्या माऊलीला आत्मकैदेच्या एकांतवासात नेत होता. गुरुजींचे पण त्यामुळे शाळेशिवाय बाहेर पडणे थांबले. त्यात मानेच्या मणक्याच्या दुखण्यानी त्यांना अचानक चक्कर येत असे. या सर्वांनी गुरुजींचा आत्मविश्वास पण थोडा कमी होत असल्याची पुसटशी कल्पना त्यांच्या बोलण्यातून लक्षात येत होती.

या सर्वातून बाहेर कसे निघायचे? गुरुजींसमोर व आम्हा सर्वांसमोर मोठा प्रश्न होता. मला पण भावी आयुष्याचे अनेक निर्णय घ्यायचे होते. आई निवृत्त झाल्यावर तिला निवांत विचार करण्यासाठी तपस्व्यांच्या भूमीत मी तिला नेले होते व त्याचा खूप वेगळा परिणाम तिच्यावर झालेला होता. स्वामी विवेकानंदानां आयुष्याचे ध्येय दर्शन झालेले हे ठिकाण आधुनिक युगातील साध्या वेशातील संन्याश्यांनी “कर्मयोगेक निष्ठा” म्हणत तपोभूमी बनवली आहे. माता पार्वतीच्या तपाने पुनीत झालेल्या कन्याकुमारीला सर्व प्रबोधिनीच्या सदस्यांसोबत  अभ्यास सहलीसाठी जाण्याचा प्रस्ताव मी गुरुजींसमोर ठेवला. सोबत काकूंना पण घ्यायचे ठरले. आम्ही सर्व जण १७ दिवसांसाठी कन्याकुमारीला निघालो. गुरुजींचे प्रबोधिनीत येणे नित्याचे होते पण काकू फारच प्रासंगिक यायच्या.सर्वांसोबत काही दिवसातच काकू मिसळून गेल्या. १७ दिवस सहजीवनाचा व अभ्यासाचा अनुभव अनेकांच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण ठरला पण गुरुजी व काकुंसाठी तो उत्तर आयुष्याला ध्येय देणारा ठरला. काकूंचा एकांत पूर्णपणे संपला तर गुरुजी आमच्या सोबत उंच असा मरुतमलाई पर्वत चढले. पर्वताच्या उंच टोकाहून भारतमातेचे शेवटचे टोक पाहताना गुरुजींच्या चेहऱ्यावर जीवनाच्या गणिताचे अतिशय अवघड प्रमेय सोडवल्याचा आनंद व आत्मविश्वास दिसत होता.

त्या उंची वरून ते भारताचे टोक पहात संकल्प करत असावेत, या भूमीच्या विविधतेचा अनुभव घेण्यासाठीच्या भारताच्या परिक्रमेचा! सागरातील भूमीच्या अंतिम शिलेवर स्वामी विवेकानंदानी आपल्या भारत परिक्रमेचा शेवट केला होता. त्याच शिलेपासून उत्तरेल्या पसरलेल्या पुण्यभूमीचे दर्शन आसेतु हिमालय करण्याचा निश्चय गुरुजींनी केला. काकू व गुरुजी भारतभर तर फिरलेच व नेपाळ दर्शन पण करून आले.सामान्य पणे अवघड असणाऱ्या भूप्रदेशांचे दर्शन मोठया मानसिक इच्छाशक्ती ने गुरुजींनी व काकूंनी केले. त्यांचे प्रवास अनुभव आपल्याला स्तिमित करतात.

माझा पण स्वतः स्वीकारलेला स्वान्तआश्रम संपवून गृहस्थाश्रम स्वीकारायचे ठरवले. वडिलांचे निधन मी ३ वर्षांचे असतानाच झाले होते. लग्नात आता माझ्या मागे वरपिता म्हणून प्रबोधिनीच्या अंबाजोगाईतील कामात जे अगदी पहिल्या पासून फक्त माझ्या पाठीशी नाहीतर बरोबरीने काम करणारे वि.र गुरुजी होते व त्यांच्या सोबत काकू.

मातृदेवो भव्, पितृदेवो भव्, आचार्य देवो भव् ................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: