सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

“ दादा .....मला जगायचं आहे र दादा ....मला जगायचं आहे ......”

“ दादा .....मला जगायचं आहे र दादा ....मला जगायचं आहे ......”

विश्वनाथ शंकर सरवदे, मुक्काम पोस्ट आपेगाव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड.
शंकर सरवदे शेळ्या मेंढ्या राखायचे. थोडी जमीन ती पण कोरडवाहू. पांढऱ्या मातीने लिंपलेल्या दोन कुढाच्या खोल्या. विश्वनाथ ऊर्फ तात्या त्यांचा धाकला मुलगा.
ज्योतिबांचा "विद्ये विना मति गेली l मति विना नीती गेली ll नीती विना गति गेलीl गति विना वित्त गेले ll वित्ता विना क्षुद्र खचले l इतके अनर्थ एक अविद्येने केले ll हा विचार गावागावात पोहोंचला. त्यामुळे गावागावात शाळा निघाल्या. गावातील पोर शाळेत जाऊ लागले व शिकू लागले.

आमच्या तालुक्यातून पदमश्री पुरस्काराने सन्मानित शंकरबापू आपेगावकर,याच गावचे. गावात पूर्वापार चालत असलेली वारकरी संप्रदायाची भजन कीर्तनाची परंपरा. गाव तस भक्ती रसात भिजलेल. शंकरबापू मृदंग वाजवायचे. त्यांची ख्याती जगभर.

या सर्व पोषक वातावरणात तात्या शिकत होता. पण त्याच्या नशिबी फक्त शिकणं नव्हत त्या बरोबर त्याला, बा बरोबर शेतात राबाव पण लागायचं. शाळेतले चांगल्या घरचे पोर मित्र झाल्याने आपल्या घरची परिस्थिती सुधारली पाहिजे अस त्याला वाटू लागल. शाळेतील मास्तरांनी सांगितलेलं पाटी आणि पोळीच महत्व व समीकरणं पण त्यांनी चांगल ध्यानात ठेवल होत.कष्ट कितीही केलेतरी तो रात्री अभ्यासाला बसायचाच. एक वेगळ्या प्रकारची रग तात्या मध्ये आली होती. चांगला अभ्यास करून तात्या MA (इंग्रजी ) झाला.

एवढं शिकल तरी नौकरी कुठ मिळणार? एखाद्या सेवकाची नोकरी मिळणं पण फार कठीण त्यासाठी पण लाखांनी मोजावे लागतात . आपल्या घरची परिस्थिती तात्याला पूर्ण माहित होती. सुट्टीतला दिवसभर रानात सर्व कुटुंब राबायचं. सगळ्यांना राबण्या शिवाय पर्याय पण नव्हता, नाही तर रात्री चूल घरात पेटली नसती. सूर्य माथ्यावर येई पर्यंत रानात काळ्या आईची सेवा करायची, मग माईन केलली भाकर आणि कालवण मस्त खायचं. उन्हात राबल्या नंतर पाणी आणि अन्नाची चव पण लैच झ्याक लागते. घरच्या लोकांच्या ह्या जीवन संघर्षात व उत्पनाच्या परतेक गोष्टीत तात्याचा सहभाग लहान पणा पासूनच होता.
आज काल आमच्या शहरात कुटुंबातील हा सहअनुभव फारच दुर्मिळ झाला आहे.हॉटेलमध्ये जेवताना, चित्रपट गृहात चित्रपट पाहताना हा अनुभव विकत घ्यावा लागतो. त्यामुळे कुटुंबांसाठी सगळ्यांनी कष्ट करण्याचा सहअनुभव क्वचित मिळतो. आई व बाबा गरजा पुरवणाऱ्या ATM बनतात. त्यामुळे कुटुंब हे आपल्या आस्थेचा विषय रहात नाही. प्रत्येकाला रूम व space असते पण नात्यानात्यात भिंती तयार होतात.
महाविद्यालयात शिकायला आल्यावरच तात्याला लक्षात आलं आत्ता आपल्या भविष्याचे धनी आपणच. इथ काही माय नाही भाकर द्यायला आणि रान नाही ज्वारी पिकवायला. तात्या अभ्यासात बरा असल्यानी त्याने लहान पोरांची शिकवणी घ्यायला सुरु केली. त्याचा हा अनुभव पुढे त्याला फारच कामी आला. आपल्या मेहनतीने मिळवलेला एक एक पैश्याच मोल तो जाणत होता.

कुठलही कष्ट न करता बाप कमाईवर किवा कुठलाही घाम न गाळता मिळालेल्या पैशानी आपल्या चीभेचे चोचले पुरवत ताटात अन्न टाकणारे माजुरे लोक अवती भवती दिसले की मस्तक भनक्त.नको तिथे वाढलेली चरबी व वजन कमी करण्यासाठी ह्या लोकांना पैसे देऊन डॉक्टरकडे जाताना पाहिलं की तात्या सारखे लोक आपले सोयरे आहेत यात समाधान वाटत.

तात्यांनी अंबाजोगाईत “प्रगती कोचिंग क्लासेस” या नावानी शिकवणी वर्ग सुरु केले. लहान मुलांना शिकवण त्याला नवख नव्हत. गावातील कर्ते लोक व्यावसायिक व सामाजिक कामात व्यस्त असत.आपल्या व्यवसायामुळे व सामाजिक जिम्मेदारी मुळे त्यांना आपल्या निर्मिती साठी फारसा वेळ नसे. बड्या लोकांच्या या मुलानसाठी शाळेतील शिक्षक स्वतःच्या घरातच शिकवणी घेत असत. शिक्षकाला पैसे देऊन विद्या विकत घेता येते हे बाळकडू गावातील कर्त्या लोकांच्या मुलांना एकदा समजल की मग ते गावासाठी काय करणार? त्यातल्या त्यात पैसा न घेता. परीक्षेच्या ऐक दोन दिवस आधी गुरुजींनी दिलेला guess paper परीक्षेत जश्याचा तसा आला की मुलं खुश, शिक्षक popular व पालक मुलांचे मार्क पाहून आपण किती चांगल्या प्रकारे कर्तव्य पारपाडत आहेत हे समजात मिरवायला मोकळे.

अश्या या शैक्षणिक माहोल मध्ये इंग्रजी सारख्या विषयाचे शिकवणी वर्ग, त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील व बहुजन समाजातील एखादा तरुण ज्यावेळी यात उतरतो त्यावेळी त्याला थोडं अवघड जात. निसर्गाच्या सहवासात राबलेल्याना रासायनिक खतानी समृद्ध झालेल्या हायब्रीडच्या दुनियेशी जुळून घेण फारसं अवघड जात नसत. कारण त्याच्या रोमा रोमात लढाऊ पण मुरलेल असत. बाजारू समाजव्यवस्थेची प्रचार व आचार पद्धतीनची आता तात्याला चांगली ओळख झाली होती. थोड्या महिन्यात तात्याच्या क्लासेसला बऱ्या पेकी मुलं यायला लागली.

तो दरवर्षी वेगळ्या वेगळ्या स्पर्धांचे व परीक्षांचे आयोजन आपल्या क्लासेसच्या नावाने करत असे. मग यशस्वी झालेल्या पहिल्या ३ मुलांना रोख बक्षीस व पुढील एक वर्षाचा शिकवणी वर्ग मोफत. एकदा ही मुलं तात्याकडे क्लासला जातात म्हंटल की मग प्रत्येक फुकट मुला बरोबर पैसे देऊन दहा मुल यायची. अश्याच एका बक्षीस समारंभात तात्याची आणि माझी ओळख झाली.

ठेंगणा, आपल्या मातीचा पक्का रंग घेतला होता त्याने. मध्यम शरीरयष्टी, हसरे व बेरकी डोळे. अंगावर पांढरा सदरा व काळी विजार.सदा कुठल्या तरी लगबगीत. त्याच गतीन त्याच बोलणं थोड ग्रामीण ढंगाच. तो बोलयला लागला की वाटे त्याचे पूर्ण शरीरच बोलतंय.
“नमस्कार दादा”, तात्यांनी हसत अभिवादन केले.
तो लगबगीने माझ्या जवळ आला व हात हातात घेतला.
मी मजेत म्हणालो, “ काय तात्या क्लासेस जोरात का ? आता काय चाटे कोचिंग क्लासला मागे टाकणार तू.”
“नाहीर दादा ! आपलं थोडं फार चाललं आहे. मोठ्यांची गोष्टच लई न्यारी.” तात्या तोडा लाजत व मान खाली घालून बोलत होता.

तात्याचे “प्रगती कोचिंग क्लासेस” आमच्याच वसाहतीत पोखारीकरांच्या घरात चालत. तिथे त्यांनी दोन खोल्या भाड्यानी घेतल्या होत्या. दिवसा शिकवण्या व इतर वेळा मग घर म्हणून. हळूहळू खूप कष्टानी “प्रगती कोचिंग क्लासेस” ची चांगलीच प्रगती होत होती. शंभराच्या पुढे संख्या गेली. ज्ञान प्रबोधिनीचा व त्याचे चांगले नाते बनायला लागले. तो MPSC या परीक्षेचची तयारी करणाऱ्या गटाचा सदस्य पण झाला व त्याचे प्रबोधिनीत येण जाण वाढल. ज्ञान प्रबोधिनीची शिशुशाळा अंबाजोगाईत चांगल्या बालशिक्षणासाठी प्रसिद्ध होती. तात्याचा एक भाऊ शेती करायचा. त्याचा मुलगा वैजनाथ ऊर्फ वैजू ४ वर्षाचा व गावाकडे होता. तात्यांनी त्याला अंबाजोगाईत आणायचं ठरवलं.

वैजू.....रोडका पहिलवान, एका जागी बसने अवघड,थोड्या दिवसात त्यांनी केशवनगर मधील अबाल वृद्धांची मैत्री पूर्ण ओळख झाली.शिशुविहार मधील काही संस्कृत श्लोक तर वैजूच्या मागच्या कोणत्याच पिढ्यांनी उच्चारले पण नसतील पण काही दिवसातच वैजूला ते नीट उच्चारसह मुखपाठ पाठ झाले. खरच मला नेहमी प्रश्न पडतो अरुणाचल मधील वनवासी बंधू किवा वैजू सारखे आपल्या भागातील अनेक छोटे मुलं पाहून, का आपण हे मौल्यवान ज्ञान सर्व लोकांपासून दूर ठेवल? केवढा समृद्ध झाला असता आपला समाज व संस्कृत भाषा. स्वामी विवेकानंद म्हणतात,“Let New India arise in your place. Let her arise - out of the peasants' cottage, grasping the plough; out of the huts of the fisherman, the cobbler, and the sweeper. Let her spring from the grocer's shop, from beside the oven of the fritter-seller. Let her emanate from the factory, from marts, and from markets. Let her emerge from groves and forests, from hills and
mountains..” त्याची अनुभूती अशी नेहमी येते.

वैजू बरोबर, त्याची व तात्याच्या भाकरी व कालवणाची सोय करण्यासाठी तात्याची आई पण अंबाजोगाईत आली. अंगावर नऊवार पातळ,डोक्यावरून पदर, मोठ कुंकू, ठेगणी व अतिशय शिडशिडीत देहंयष्टी, पक्का ग्रामीण पण खमका आवाज. बोलण्यात स्पष्टपणा पण मनात खूप आपले पणा. वर्षात फक्त दोनच पातळ मी त्यांच्या अंगावर पहिले. चेहऱ्यावरच्या सुरुकुत्या, हात व पायावरी भेगानी, त्यांनी केलेल्या शरीर श्रमाचा अंदाज यायचा..

“अव परसाद दादा, आमच्या विशवनाथा कड व वैजनाथा कड लक्ष द्या”, आपुलकीने ती माऊली म्हणायची.

वैजू चा खास मित्र म्हणजे ओंकार. ओंकार आणि वैजूची जोडी म्हणजे गोऱ्या कुरुळ्या केसांच्या व बोबड बोलणाऱ्या गोपाल कृष्णाची व आमच्या सावल्या रंगाच्या पांडुरंगाची. दोघं मिळूनच शाळेत यायचे,बसणार जवळच, दिवस भर एकमेकाच्या घरी. संध्याकाळी प्रबोधिनीत उपासना व्हायची. हे दोघे मित्र बरोबर यायचे. त्यांना उपासनेतील मंत्रांचा अर्थ समजणे अशक्य. पण दोघंही ऐटीत असायचे. एक दिवस ओंकार विवेकानंदांचा एक विचार पाठ करून आला.
“दादा, मी एक स्वामीजींचा विचार पाठ कलून आलो आहे सांगू का ?”, ओंकार नेहमीच्या आपल्या बोबड्या स्वरात म्हणाला.
सांग म्हटल्यावर तो उठला व स्वामीजींची पोस घेत तो सर्वांच्या समोर म्हणाला, “उठा ! जागे व्हा ! आणि ध्येय प्राप्ती शिवाय थांबू नका.” व यानंतर तो थोडा वेळ थांबत जोशात म्हणाला, “ स्वामी विवेकानंद.”

सर्वानी त्याच जोशात ते वाक्य मागोमाग म्हंटल. त्या दिवसां पासून असे विवेकानंदांचे विचार उपासनेत म्हणण्याचा नित्यक्रम प्रबोधिनीत सुरु झाला.

कधी ओंकार तर कधी वैजू. स्वामीजींचे अवघड अवघड विचार मुलाना सहज पाठ होऊ लागले. वेगळाच जोश असे ह्या वेळी.

“प्रयत्नशील माणूस म्हणतो मी महासागर पिऊन टाकीन, माझ्या इच्छेने पर्वताचे चूर्ण विचूर्ण होऊन जाईल असेल बल व अदम्य इच्छाशक्ती शक्ती असू द्या कठोर परिश्रम करा म्हणजे ध्येय प्राप्ती निश्चितच !”.....स्वामी विवेकानंद.

ओंकार व वैजूची जोडी जशी जमली होती तशीच जोडी त्यांच्या आज्यांची पण जमली. जोशी आजी, गोऱ्या, चेहेऱ्या वर वार्धक्याच्या सर्व खुणा, थोडा घोगरा आवाज,नऊवारी पातळ, थोड्या स्थूल व ठेंगण्या. वैजूची आजी एकदम विरुद्ध दर्शन.पण दोघींची जोडी चांगलीच जमली. संसार करताना केलेले खूप कष्ट हे त्यांच्यातील साधर्म्य. आयुष्य जगताना, संकटांशी लढताना आलेले अनुभव जर सारखे असतील तर मैत्री होण्यासाठी जात, धर्म, भाषा, वय, पैसा या सारखे वरवरचे भेद शूद्र ठरतात .समान असणाऱ्या अभिनिवेशाच्या धाग्यान पेक्षा समान अनुभवाचे धागे हे मैत्री घट्ट होण्यासाठी अधिक कारणीभूत ठरतात. जीवन संघर्ष हा वेगवेगळया परिस्थितीतील असला तरी, तो करत असताना मनात निर्माण होणाऱ्या सुख दुःखाच्या भावना ह्या एकाच प्रकारचे रंग तरंग निर्माण करतात मनात. असे समान धागे असले की वेगवेगळे विचार, आचार, संस्कृती,वय हे सारे भेद असले तरी “मैत्र जीवांचे” होते आणि ते अधिक बळकट असते.

सर्दीशी तशी माझी चांगलीच मैत्री, इंजिनिअरिंग करत असल्या पासूनच झाली होती. कधी कधी तिच्यासोबत ताप पण असायचा. या दोघांचे सोबत आगमन झाले की मी औषधां पेक्षा आराम करणे पसंत करी. असाच एकदा सक्तीचा आराम व एकांत चालू होता. दुपारची ४ ची वेळ मी पहुडलेला होतो. खोलीच्या दाराबाहेर कुणाच्या तरी कुजबुजण्याचा आवाज आला. मी सुरुवातीस दुर्लक्ष केल पण नंतर उठून दार उघडल तर समोर आमच्या दोन्हीही आजी उभ्या. जोशीआजी आणि सरवदेआजी !
“काय म्हणताय आजी”, मी विचारले.
“बर नव्ह म्हणे तुम्हासली म्हणून भेटाया आलोत ” ,वैजूची आजी म्हणाली.
मी त्यांना आत बोलावले. त्यांनी काळजी घेण्याचे दोन, तीन आर्जवपूर्ण सल्ले दिले. १५/२० मिनिटांनी दोघी निघण्याच्या तयारीत होत्या. पण एकमेकान कडे त्या काही तरी खाणाखुणा करत होत्या. मी बोलणार इतक्यात जोशीआजीनी आपल्या मुठीत लपून ठेवलेली दहा रुपयाची नोट मला देऊ केली. थोडा वेळ मला काहीच समजले नाही.
“कश्यासाठी हे?” , मी विचारले.
“राहू द्या, बिस्कुत आणा खायाला. दुपारची येळ न आम्ही दोन चार दुकानी जाऊन पण आलो पण बंद होते .....बिमार माणसाला भेटायला जायचं तर मोकळ्या हातानी कस जाव ? मग म्याच म्हनले यांली १० रुपये देऊ दादाली ते आणून घेतील बिस्कुत” वैजूची आजी म्हणाली.
मला काय बोलावे हेच कळेना. शेवटी आमचा कार्यालय प्रमुख विजुदादा यांनी दुकानात जाऊन बिस्कीटपुडा आणला व आमच्या सर्वाना त्यांनी मस्त चहा करून दिला. लवकर बरे व्हा ....अस म्हणत आजींनी निरोप घेतला.

तात्यांनी कामाचा विस्तार केला त्याच प्रमाणे त्याचे दोनाचे चार हात पण झाले. तो नवीन जागेत राहायला गेला. वैजू बरोबर. आजी परत आपेगावला गेल्या. नवीन जागा म्हणजे एक प्रशस्त वाडा होता. आता सर्व काही चांगल चालल होत.

ऐके दिवशी संध्याकाळी तात्या भेटायला आला. खूप वेळ गप्पा मारल्या नंतर तो म्हणाला, “ दादा, पंचायत चे इलेक्शन लागलेत, सरपंचपद ओबीसी साठी राखीव आहे. गावातले सगळे जन म्हणतायेत उभ रहा म्हणून. काय कराव !”

“तात्या, आत्ता सर्व बर चालल आहे न कश्याला या भानगडीत पडायचं?” मी थोडं नकार युक्तच बोललो.

बराच वेळ या विषयाचा खल झाला. अनेक तरुण व शिकलेली युवक या वेळी निवडणुकीच्या मैदानात उतरणार होती. तात्याची पण मनातून इच्छा होतीच हे लगेचच माझ्या लक्षात आले.राजकारणाच्या या फडात तात्या सारखे लोक प्यादे म्हणून वापरतात हे जवळून पाहिलं होत. थोडी काळजी वाटत होती. माझ्या प्रत्येक शंकेच उत्तर तात्या कडे होत. शेवटी विचार करून काय करायचं ते ठरव अस म्हणत मी चर्चेचा शेवट केला.

शिकलेला तरुण त्यात सर्वाना मदतीसाठी पुढे असणारा त्यात कोरीपाटी व तालुक्याच्या ठिकाणी राहणारा निवडून येण्यासाठी लागणारे सगळे गुण तात्या जवळ होते नव्हता तो फक्त पैसा. तात्या आपल्या सर्व कष्टानी जमा केलेल्या पुंजीनी निवडणूक लढला व विजयी झाला. तात्या आपेगावचा सरपंच झाला. त्याच्या घरच्या इतिहासात गावाचे प्रमुख पद मिळवणारा तो पहिलाच होता. आम्ही पेढे खाल्ले व शुभेच्छा दिल्या.

तात्या धडाक्यात कामाला लागला. लहान असल्याने गावातील सर्वाना त्याला काम सांगणे, समस्या सांगणे सोयीचे होते. प्रबोधिनीच्या मदतीने त्याने मोठे आरोग्य शिबीर गावात घेतले. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, राष्ट्रीय सणाच्या दिवशी गावातील चांगले काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार असे अनेक उपक्रम त्यांनी विकास कामाबरोबर सुरु केले. आमचा दुसरा मित्र दत्ता खोगरे यांनी स्वामी विवेकानंद बहुदेशिय संस्था काढली होती व त्या माध्यमातून त्यांनी प.पू.पद्मश्री शंकरबापू आपेगावकर वाचनालय गावात सुरु केल. दत्ताचे चहा व फराळाचे छोटे हॉटेल होते. वाचनालयासाठी ग्रामपंचायतीने जागा देण्याचा ठराव पास पण केला. वाचनालयाच्या औपचारिक उदघाटनासाठी अनेक नेते मंडळी बरोबर मला पण दोघांनी बोलावले व सत्कार केला. तात्या, गावाच्या कामात रमत होता.

नातू फौन्डेशन, पुणेचे प्रमुख विश्वस्थ ब्रिगेडीयर प्रताप जोशी, ज्ञान प्रबोधिनी, अंबाजोगाईचे काम पाहण्यासाठी अंबाजोगाईला आले होते ७५ वर्षाच्या या तरुण सैनिकाचा उत्साह आम्हा सर्वाना लाजवणारा होता. रात्र भर प्रवास करून आल्यावर ह्या माणसांनी क्षणाची विश्रांती पण घेतली नाही. आल्या पासून त्यांनी अनेक प्रश्न विचारण्याच्या फैरी सुरु केल्या. ते भारतीय सैन्यात पुरवठा विभागात होते. “Not Check Not Done” हा त्यांचा मुल मंत्र. अगदी शिशुविहारच्या लहान मुलान पासून अनेक लोकांना ते भेटले. काहीतरी वेगळ व बदल दाखवणारे केले पाहिजे यावर त्यांचा भर. विवके गिरीधारी हा आमचा कार्यकर्ता मित्र त्यांचा सदैव साथीदार असे.

प्रबोधिनीतील अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना ते भेटले. तात्या पण त्यांना भेटायला आला होता. तात्याशी झालेल्या चर्चेच्या शेवटी मी त्यांना सरपंच सहलीची कल्पना सांगितली. त्यांना ती फारच आवडली व त्यासाठी नातू फौंडेशन तर्फे एक लक्ष रुपयाची मदत पण करायचे त्यांनी मान्य केले. तात्या आणि मी मग कामाला लागलो. तात्याच्या ओळखीचे आता अनेक तरुण सरपंच झाले होते. खूप उत्साह होता त्यांच्यात. आदर्श गाव हिवरेबाजार, राळेगणसिद्धी, पोपटराव पवार व अण्णासाहेब हजारे यांच्याशी भेट. गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्यात पहिले आलेले गाव, पुण्यातील प्रबोधिनीचे काही ग्रामविकासाचे कार्य हे या सहलीचे आकर्षण असल्यानी अनेकजण तयार झाले. तात्या, वैद्यकाका, राजेसाहेब किर्दंत व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे बलभीम शिंदे व महादेव किरवले हे सर्वजन कामाला लागले. सर्वात पहिल्यांदा सरपंच काय करू शकतो ही पुस्तिका प्रकाशित केली. त्याचा उपयोग तरुण सरपंचाना खूप झाला.

डिसेंबरमध्ये मध्ये अनेक गावांमध्ये जाऊन तरुण सरपंचाना भेटलो. २० गावातील २५ ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व काही धडपडणारे युवक यांची निवड सहलीसाठी करण्यात आली. या सर्वात तात्याचा पुढाकार फार मोठा. शेवटी जानेवारी ७ ते १० दरम्यान सहल ठरली. आमच्या भागातील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे देवळ्याचे लालासाहेब पवार ऊर्फ नाना यांच्या नेतृत्वा खाली प्रबोधिनीच्या उपासनेनी व चाकरवाडीच्या माऊलींच्या समाधीच्या दर्शनानी सहलीची सुरुवात झाली. पहिला मुक्काम सुदाम काका भोंडवे यांच्या सोनदरा गुरुकुलात. दुसऱ्या दिवशी सुदामकाकाशी गप्पा मारून हिवरेबाजार व पोपटराव पवारांशी गप्पा. दुसरा मुक्काम राळेगणसिद्धी पण अण्णासाहेब तिथे नसल्यानी थोडी हुरहूर वाटली. अण्णा पुण्यात होते व आजारी असल्यानी उपचार घेत होते. फिरोदिया वसतिगृहात त्यांचा मुक्काम. खूप प्रयत्न करून त्यांच्याशी संपर्क होत नव्हता.

दुसऱ्यादिवशी राळेगण पाहून व सरपंच आणि प्रशिक्षण केंद्राचे पाटील यांचे मार्गदर्शन घेऊन आम्ही पुण्याकडे निघालो. रांजणगाव गावच्या गणपतीच्या दर्शनाला थांबलो. एकदा परत प्रयत्न करू म्हणून अण्णाना फिरोदिया वसतिगृहात फोन लावला आणि अण्णाशी संपर्क झाला. आळंदीच्या भ्रष्टाचार विरोधी उपोषणाच्या वेळी मी त्यांचा स्वीय सहाय्यक होतो.त्यांनी मला लगेच ओळखले.त्यांना सरपंच सहलीचे प्रयोजन त्यांना सांगितले. त्यांनी तासाभरात यायला सांगितले. आमचा तीन सुमोचा ताफा सुसाट वेगानी पुण्याकडे निघाला. अण्णा आम्हा सर्वाना भेटले. दोन तास ते आमच्याशी बोलत होते. सर्व जण भारावून गेले होते. तात्या तर वेगळ्याच विश्वात होता. तो पूर्णवेळ अण्णाच्या बाजूला आणि त्यांना खेटून बसला होता. त्यांच्या बोलण्यातील भाव आणि शब्द नी शब्द तो टिपत होता. अण्णाचे आशिर्वाद घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरु केला. ९ जानेवारीच्या नातू फौन्डेशन च्या कार्यक्रमात तात्यांनी व मी सहलीसाठीच्या अर्थ सहाय्याचा धनादेश व सत्कार स्वीकारला. सहल सार्थ झाली.

सर्व जण गावाकडे आल्या नंतर कामाला लागली. सहा महिन्यांनी आढावा घेतला तर लक्षात आले की सर्वांनी मिळून ४.५ कोटींची विकासकामे गावात केली होती. गाव सहभागानी गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुक्यात आपेगावला दुसरा क्रमाक मिळाला. तात्या एका वेगळ्याच आनंदात होता.

आढाव घेण्यासाठी सरपंचानी केल्याला विकासकामांचे चित्रीकरणकरण्यात आले. कॅमेऱ्या समोर तात्या खूप आत्मविश्वासाने पण खूप भाऊक होऊन सर्व कामांची माहिती देत होता. चहा पिण्यासाठी आम्ही त्याच्या घरी गेलो. घराबाहेरच दर्शन झाले लाल पातळातील वैजूच्या आजी चे.
“वैजनाथ कसा हाय? त्याच्या कडे लक्ष द्या ....कुठ हायत परसाद दादा .....?”, तात्याच्या आईने अभिजीत जोंधळे ला विचारले.
“तात्या, सरपंच झाला आहे, कसे वाटे तुम्हाला?” , अभिजीत नी विचारले.
“हो झाला हाय म्हने...का केल ते माहित नाय” ,माय थोड्या नाराजीतूनच बोलली.
“चांगले काम करतो आहे न तो! पाणी, रस्ते, नाल्या, लाईट याची सोय केली की त्यांनी गावासाठी” , अभिजीत तात्याच्या कामात बदल कौतुकानी बोलला.
“ हो की करतू हाय पन आपल स्वतःच बी बघाव की”, गावच्या कामामुळे तात्याचे घराकडे व स्वतःच्या प्रकृती कडे दुर्लक्ष होत आहे अशी काळजी त्या माउलीच्या बोलण्यातून व्यक्त होत होती.

तात्या गावात जसा रमत होता तसा तो गावच्या व तालुक्याच्या राजकारणात ही रमू लागला. अश्या धडपडणाऱ्या पोरांना सुंदर व प्रभावी आयुष्याचे दिवास्वप्न राजकारणाच्या माध्यमातून लवकर साधता येते हे लवकर पटत. नेत्यांचा रुबाब, त्याचं समाजजीवनातील महत्वाचे स्थान, त्यांच्या कडे असलेला पैसा, अधिकार व लोकांनी त्यांना देऊ केलेल मोठेपण हे खुपच लोलुप करणारे असते. साहजिकच खेळ सुरु होतो मृगजळा मागे धावण्याचा. मग राजकारणी लोकात वावरता वावरता त्याचं बोलणं, वागणं शिकतो. हळूहळू नदीच्या बोहऱ्यात माणूस जसा अडकतो व बाहेर यायचा प्रयत्न केला तर तो अधिकच बुडत जातो तस या तरुण लोकांच होताना दिसत. हळूहळू ९८% समाजकारण व २ % राजकारण करणारे हे लोक २% समाजकारण व ९८ % राजकारण करायला लागतात. इथून सुरु होतो एक नवीन रस्ता. आपल्या नेत्याच्या नजरेस सतत दिसत राहण्यासाठीचा आटापिटा. त्यातून काही मेह्बानी झाली तर मग हे बरोबर राहणं मग नेत्याच्या हक्काचे बनते. मग तो समाजाचा कार्यकर्ता न राहता नेत्याचा कार्यकर्ता बनतो.

तात्याला एक गोंडसा व गुबगुबीत मुलगा झाला. त्याच नाव मोठया कौतुकाने अमर ठेवले. तात्याचा प्रगती कोचिंग क्लास मात्र बंद होण्याच्या मार्गावर होता. शेवटी तात्यांनी आपले शैक्षणिक कार्यक्षेत्र अंबाजोगाई सोडले व तो जवळच्या चनई गावात राहायला गेला. त्याच्याशी भेट दुर्मिळ होऊन गेली.

शंकर उबाळे असाच एक धडाडी चा सरपंच एक दिवस भेटला व तात्या खुपच आजरी असल्याचे त्यांनी सांगितले. घरी भेटायला गेलो तर सांगितले हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केल आहे. हॉस्पिटल मध्ये गेलो तर कळल मुबईला हलवल. निश्चित काही कळत नव्हत. शेवटी तात्याचे सासरे महाराष्ट्र परिवहन मंडळात चालकाचे काम करायचे. ते अंबाजोगाईला राहायचे त्यांना भेटायला गेलो. त्यांनी सांगितलं तात्याला रक्ताचा कर्करोग झाला आहे. सुन्न झालो .....जवळच अमर बसला होता. केवळ दीड वर्षांचा होता. उसण अवसान जमाकरून मी तात्याचा फोन नंबर मागितला व फोन लावला.

माझा आवाज एकताच तात्यांनी टाहो फोडला, “ दादा .....मला जगायचं आहे र दादा ....मला जगायचं आहे ......”
समजुतीचे दोन शब्द व काही मदतीचे आश्वासन देऊन मी सैरभैर अंतकरणाने मी घरी आलो. तात्याशी फोन वरून संवाद चालू होता तो टाटा कर्करोग रुग्णालयात उपचार घेत होता.

उन्हाळ्याचे दिवस, दुपारचे उन, प्रचंड गरमी, घराच्या बाहेर पडणे अशक्यच. भर दुपारी अचानक दरवाजा वाजला. मी दरवाजा उघडला तर समोर सिल्कचा अर्ध्या बाह्या घातलेला सदऱ्यातला, तात्या समोर उभा.
“तात्या, दादा म्हणत आम्ही एकमेकांना आलिंगन दिले” , तात्या बरोबर वाहिनी व अमर पण होता.
त्याची प्रकृती सुधारली होती. तो चांगला दिसत होता व थोडा जाड पण. खूप आनंद झाला. तात्या, रुग्णालयातील त्याचे एक एक अनुभव सांगत होता. वाहिनीने त्याची सावित्री बनून केलेली सेवा, सगळं सगळ तो भरभरून सांगत होता. तो ९५ % बरा झाला होता.

“दादा आत्ता भ्या नाही राहील बघ ! आता परत पूर्ण बरा होऊन आलो की आपल्या भागातील अश्या आजारी रोगांना मदत करायची. अगदी मानसिक व आर्थिक पण. आता मला या रोगांनी आजारी असणाऱ्याला आर्थिक मदत करणाऱ्या सर्व सामाजिक संस्था माहित पण झाल्यात आणि तिथले समदे लोक ओळखीचे झाले आहेत.” तात्या एका नवीन विश्वासानी बोलत होता.

त्यांनी एक कर्करोगाने आजारी असणाऱ्या रुग्णांना मदत करणाऱ्या धर्मदाय संस्थांची यादी पण दाखवली.एकदीड तास गप्पा मारून तात्या गावा कडे जायला निघाला.

१५ दिवस झाले असतील. रात्री घराच्या दाराची ग्रील जोरजोरात वाजल्याणी जाग आली. “दादा, दादा”, म्हणून कोणीतरी आवाज देत होते. अजून बाहेर अंधार होता. मी दरवाजा उघडण्यासाठी बाहेर पडलो तर समोर तात्याचा मेव्हणा.
“काय रे काय झाले ?” , मी विचारण्याच्या आतच तो रडत म्हणाला, “भाऊजी गेले रात्री”
खर कणी माझी झोप उडाली .....तात्याचे रात्री निधन झाले. काय कसे विचारण्याची भ्रांत पण राहिली नाही.
अंतिम संस्कार आपेगावला होणार होते अजून उजेड नव्हता सकाळ व्हायला बराच वेळ होता. मनात काय चाललं आहे हे पण समजत नव्हत शेवटी मी टेलीव्हिजन सुरु केला व चित्रपटातील गाणे पाहू लागलो सूर्य उगवण्याची वाट पहात.

डोळ्या समोरून तात्या काही हलत नव्हता. आपेगावला निघालो. तात्याचा देह सरणावर ठेवला होता. विषाणू संसर्गामुळे तात्याचा कर्करोग रोग अचानक बळावला व त्यात्तच तात्या नावच एक तारुण्य संपल अमर नावाची आपली खूण व कुंकू पुसलेली त्याची धर्माची पत्नी मागे ठेऊन.

“परसाद दादा, माझा विश्यवनाथ आम्हाली सोडून गेला”, माय धायमोकून रडत होती. मी तिचे हात हातात घेऊन माझ्या डोळ्यातल्या अश्रू ना वाट करून दिली ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: