रविवार, २२ जानेवारी, २०१७

नोटा बदली बरोबर माणूस म्हणून आपली माणसं पण बदलू की यार आपण !!!

नोटा बदली बरोबर माणूस म्हणून आपली माणसं पण बदलू की यार आपण !!!







ग्रामीण भागातील मुलांची “आरोग्य तपासणी व अभ्यास”  करण्यासाठी केज तालुक्यातील भाटूंबा गावात गेलो होतो. गावातील जिल्हा परिषदेची शाळा खुपच जुनी. मुलांचे व मुलींच्या हिमग्लोबिनची तपासणी आमची टीम करत होती. सहज बोलता बोलता शाळेतील शिक्षकांकडून कळले की शाळेत १८ पारध्यांची मुलं आहेत. त्यापेकी एकही जण आज शाळेत आला नव्हता.जवळच ते राहतात चार किलोमीटर वर.

पारधी म्हटल्या नंतर एकदम माझ्या मनात मी ऐकलेल्या गोष्टी चमकून गेल्या. वस्तीची चौकशी करायला सुरुवात केली. जाता येईल का तिथे विचारले.तिथे जाणे अवघड आहे. रस्ता नीट नाही. तुमची गाडी दिसली की पळून जातील. फारसे लोकात मिसळत नाहीत. शाळेतील शिक्षकांनी मला सांगितले. माझ्या मनात जाण्याची खूप तीव्र इच्छा होती.

“ तुमच्या ओळखीचे कुणी नाही का तिथे. किंवा तुम्हाला कुणी ओळखत नाहीत का ?”

“आज त्यांच्या पेकी कुणाचा एकही मुलगा आलेला नाही.”

शेवटी माझा फारच आग्रह आहे पाहिल्या नंतर मस्के मामा नावाच्या सेवकांना मला घेवून जाण्यास सांगितले. त्यांना पण नीट रस्ता माहित नव्हता. शाळेतील एका मुलाचे शेत पारध्यांच्या पालाजवळ होते. तो रस्ता सांगू लागला. त्याला पण सोबत घेवून आम्ही निघालो. एका वळणावर आल्यावर तो म्हणाला.

“एकून जाता येतंय पण रस्त्यात नाला हाय. गाडी जाईल का माहित नाय ..पण जवळचा रस्ताय ह्यो.”

अशोकनी त्या रस्त्यानेच नेण्याचे ठरवले. अरुंद रस्ता. बाजूनी कोरफडीची झाडे. आजूबाजूची हिरवी गार शेतं संपली व उजाड माळ लागला.

त्यो पहा पारधी....सोबतच्या मुलांनी मला दाखवले. लंगडत आपल्या शेळ्या राखणारा माणूस दिसला. त्याच्या सोबत एक मोठी मुलगी व दोन छोटे लेकर होते. मी गाडी थांबायला सांगितली. मस्केमामांनी त्यामुलीला विचारले शाळेत का नाही आलीस. ती काहीच बोलली नाही उलट दूर निघून गेली. तो लंगडणारा माणूस मात्र जवळ आला व त्या मुलीला त्यांच्या भाषेत बोलवू लागला. पण ती मुलगी काही जवळ येईना.

“लोक आहेत का वस्ती वर ?”

“नाही खूरपायला गेलीत.”

“किती घरं आहेत.”

“आठ”

आम्ही गाडी पुढे वस्तीकडे नेली. एका झोपडीच्या जवळ आलो. तिथे काही महिला व दोन पुरुष होती. त्यांच्यातील तरुण बाहेर आला. मी विचारल्यावर त्याने मला त्याचे नावं सांगितले. आनंदगावच्या गायराना वर ही वस्ती होती. हळूहळू सगळे आम्ही जसे मोकळेपणानी बोलायला लागलो तसे अवती भोवतीचे वातावरण बदलले. प्रचंड थंडीत कसे हे लोक अशा माळावर राहात असतील असा विचार करताच एक चिमुरडी माझ्या समोरून पळून गेली. लालसर मातीच्या रंगाचा चेहरा. नाकावर पांढरट ओघळणारा द्रव व काही ठिकाणी तो वाळल्यामुळे दिसणारे पांढरे पुट. केसावर चांगलाच मातीचा थर..अंगात एकही कपडा नाही अनेक दिवस आंघोळ केलीच नाही हे जाणवत होते. ...मी मात्र स्वेटर व कानटोपी घालून....पाहताच क्षणी लक्षात येत होतं लेकरांनां योग्य तो आहार मिळत नसणार.

तिची आई कोंबड्याच्या पिंजर्या  जवळ लवंडली होती. आई .... १६-१७ वर्षाची पोरगीचती. आम्ही गेल्यावर ती काही उठून बसली नाही. मी त्या लेकराला जवळ ये म्हणालो तो ते जास्त दूर जात होतं . हे पाहून तिची आई हसायला लागली. तुमच्या दोघींचा फोटो काढू म्हटल्या वर ती आई जाम लाजायला लागली. आणि पडल्या पडल्या लाजून तिने जवळची चादर आपल्या तोंडावर घेतली.

“या लेकराचे नावं काय ?”

“आरती ....” हे तर माझ्या बहिणीचे नाव.

मला एकदम लक्षात आले की सध्या मी प्रेमाने जवळ बाळगत असलेल्या पोलो मिंटच्या गोळ्या. मी गोळ्या काढल्या. काय जादू आहे की त्या गोळ्यात...पाहताच सगळी मुलं माझ्या जवळ यायला लागली. आरतीपण जवळ आली. पार वातावरण बदलून गेलं. सगळ्यांचा एक फोटो काढला.

“पोलीस त्रास देतात का रे ?”

“आता नाही देत ...आदी आम्ही लई दारू काढायचो त्यायेळी दयायची.”

“गावातली लोक”

“ते बि नाय..”

“या वस्तीचे नाव धारुका हाय ...इथला देव हाय तो.”
अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत होती व काही प्रश्न मनातल्या मनात तयार होत होती. इतक्या वर्षानंतर पण याचं जीवन असे का ? अनेक सरकारे, राज्यकर्ते, राजकारणी आली पण पारध्यांचे जीवन पार बदलून का नाही गेले? त्यांच्या बद्दलचा समाजाचा दृष्टीकोन का बदलत नाही ? न त्यांचा समाजाबद्दलचा ? मला आफ्रिकेत जायची फार इच्छा होती .....अतिमागास आयुष्य काय असते पाहण्यासाठी. आरतीला पाहताच मला तिच्यात आणि कुपोषित निग्रो मुलात काहीच फरक वाटला नाही.

कसे बदलणार हे सारे ? सरकार बदलू शकेल का ? राजकारणी बदलू शकतील का ? शासन बदलू शकेल का ? शिक्षण बदलू शकेल का ? ...पण हे सगळे पुरेसे नाही असे वाटत होते. माणसा मधील माणूस जागा झाला व माणूस नावाच्या आपल्याच सारख्या लोकांना प्रेमाने विकासाची मनोमन साद देत सगळ्यांच्या विकासासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले तर हे खरच अवघड आहे का ? अजून आपण सगळेच कमी पडतोय ? पारध्यांना आता घर बसल्या डिश मुळे मनोरंजन तर मिळतय. आकडे टाकून का होईना लाईट मिळतिये. पाणी व हाताला काम पण मिळतय. चोऱ्या पण सोडल्यात त्यांनी. पण अजूनही त्यांना जीवन मिळायचे बाकी आहे.

ती छोटी आरती आपली पोर आहे ...तिच्यासाठी आपणही काही केलं पाहिजे ....सहानभूतीने नाही तर कर्तव्य आणि आस्था म्हणून ही भावना आपल्या प्रत्येकात चिरकाल टिकणारी निर्माण कधी होणार ? अशा सगळ्याच आरतींचे भविष्य बदलायला फार वेळ लागणार नाही. नोटा बदली बरोबर माणूस म्हणून आपली माणसं पण बदलू की यार आपण !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: