आपण अनेक कल्पनेतील कथा ऐकत असतो. अशाच एका वास्तवातील कल्पनेच्या फिनिक्सला आपल्या समोर परत ती अफाट फिनिक्सभरारी घेताना पाहून त्यांच्या स्वतःची अर्धांगिनी “कल्पना” ज्यावेळी म्हणते,
“मला पाहिजे होता तसाच तो आता झाला आहे.”
हे वाक्य ऐकताना पण मला एक जबरदस्त अनुभूती येते. तिने स्वतः त्याची फिनिक्स भरारी जवळून अनुभवली होती.
तसा तो बेदरकार,बिनधास्त,कलंदर काही जण आवारा पण म्हणत असतील. त्यांच्या नावाचा अर्थ पण स्वतःचे घर नसलेला. मला सापडलेला त्याच्या अस्तित्वाचा अर्थ मात्र स्वतःचे घर फक्त आपले न मानता सर्वांची घरे आपली मानणारा असा तो “अनिकेत” !!!
घरात समाजसेवेचा वारसा असला तरी आपल्या मस्तित जगणारा अनिकेतदादा लोहिया मी पाहतो तसा तो हरहुन्नरी. त्यात माझ्या खूप जवळच्या मित्राच्या बहिणीचा नवरा. म्हणजे आमच्या कल्पनाताईचा तो नवरा. उंचा, पुरा, सगळ्या आधुनिक स्टाईल जोपासणारा. वेगळा वाटायचा.
मानवलोक व मनस्विनी हे अंबाजोगाईत बाबूजी व भाभीनी उभी केलेली परिवर्तनाची चळवळ. बाबूजीनी पसारा खूप वाढवला होता. त्या पसाऱ्याचे कार्यवाहपद अनिकेतदादाकडे आल्यानंतर अनेक कुचकट वाक्य मी स्वतः पण ऐकली होती. अनिकेतदादाला बाबुजींनी निर्माण केलेला वारसा जपावयाचा होता वाढवायचा होता त्या सोबत स्वतःची वेगळी ओळख निर्माण पण करायची होती. अतिशय अवघड जबाबदारी त्याने कशी स्वीकारली हेच मला कळत नव्हते.
खांडसरीचा प्रकल्प अयशस्वी झाल्याने त्याच्या वाट्याला आधीच खूप बदनामी आली होती. “मानवलोकची मसनवाट हा पोरगा करणार” असे अनेकांनी बोलून पण दाखवले. यासर्व परिस्थिती दादाची मात्र एक विलक्षण बदलाची व संघर्षाची यात्रा चालू झाली होती. तो झपाटल्यागत कामाला लागला. प्रचंड प्रवास, अनेक लोकांना भेटणे, अनेक कार्यक्रम या सर्वात स्वतःला अंतरबाह्य बदलणे फार जीव घेणे असते याचा अनुभव मी स्वतः पण घेतलेला आहे. अनिकेतदादाच्या स्वतःच्या शब्दात सांगायचे झाले तर, “ वाल्याचा वाल्मिकी होण्यासारखे ते होते.”
मला हे त्याचे वाक्य काही पटले नाही फार जास्तच स्वतःचे केलेले परखड मूल्यमापन वाटले. ताईला मी त्याचे हे वाक्य सांगितले. त्यावर तिची खुपच बोलकी प्रतिक्रिया होती, “ तो कधीच वाल्या नव्हता. अफाट सामर्थ्य असणाऱ्या शक्तीला नीट दिशा मिळत नव्हती म्हणून त्याच्या कडून काही चुका व्हायच्या पण मुळात त्याची प्रवृत्ती नवनिर्माणाची होती. त्याच्या शक्तीला योग्य ती दिशा मिळाली आणि मग त्याचे कर्तुत्व अधिक देखणे झाले,”
नवीन उपक्रम,नवीन संकल्प,नवीन क्षितिजे दादाला खुणावत होती व तो एका नंतर एक ते पूर्ण करत होता. त्याच्या सोबत अनुभवलेला पाहिला उपक्रम म्हणजे गरीब शेतकऱ्याच्या मुला मुलींचा सामुहिक विवाह सोहळा. कल्पना ताई म्हणते ते पहिल्यांदा मला यात जाणवले. दादा प्रचंड स्पष्ट वक्ता. मनात काही न ठेवता तो जे काही मनात आहे ते मोकळेपणाने बोलणारा.
“तो एकदा का भडकला की आठ दिवस घर तणावात.” कल्पनाताई
पण त्याने स्वतःला पूर्णपणे बदलले परिस्थिती खूप शांतपणे हाताळणे, समजून घेवून वागणे. त्रासदायक गोष्टीना पण शांतपणे सामोरे जाणे हे तो अगदी सहजपणे करत होता. अंबाजोगाईत झालेल्या सक्षम जलनीती परिषदे नंतर मात्र त्याचे काम प्रचंड वाढले. घराची पूर्ण भिस्त कल्पनाताई वर. दादाची दगदग प्रचंड वाढली. त्याने स्वतःच्या प्रकृतीकडे पण लक्ष दिले नाही. असाच एक मोठा प्रवास करून तो औरंगाबाद व तिथून बीडला आला. तिथून त्याचे गुढघे दुखायला लागले. अंबाजोगाई येई पर्यंत त्याचे सगळे सांधे आखडून गेले होते. त्याला कुठलीच हालचाल करता येत नव्हती. त्याला चक्क उचलून घरात न्यावे लागले.
एका भयानक जीवघेण्या संघर्षाची सुरुवात झाली. नेमके काय झाले हे कळत नव्हते. आपले शरीर ज्यावेळी आपल्याला झळते त्यावेळी इतर त्रास फार किरकोळ वाटायला लागतात. एक जीव घेण्या नैराश्याच्या खोल खाईत आपण स्वतःला जळताना स्वतःच पाहात असतो. हे सगळे सहन करणे खूप कठीण होते. दादाला स्वतःला व आमच्या कल्पनाताईला पण.
स्वतःची नौकरी आठ तास, मुलांच्या सगळ्या गोष्टी,घरात येणारे जाणारे खूप , बाबूजींची काळजी आणि त्यात दादाचे हे भयानक आजारपण .....मुळात खूप वेगळ्या धाटणीत तयार झालेल्या ताईला हे सांभाळणे कठीण पण तिला समजले होते आता यावेळी खचून नाही चालणार. तिने,घरातील सर्वांनी,मानवलोकच्या सर्व कार्यकर्त्यांनी व दादाच्या सर्व मित्रांनी दादाला एक जबदस्त प्रेरणा देण्याचे आव्हान स्वीकारले.
राजेंद्रसिंह राणाच्या सोबत स्वीडनला त्यांना मिळालेला पुरस्कार घेण्यासोबत जाणाऱ्यांच्या यादीत अनिकेतदादाचे नाव होते. त्याला पश्चिमीदेशातील सर्व महत्वाच्या लोकांसमोर मानवलोकनी केलेले आपल्या भागातील काम सादर करण्याची संधी मिळणार होती. दादाला मात्र स्वतःला स्वतः उभारता येत नव्हते. त्याचा जीवघेण्या आजारपणा मुळे आयुष्यभर असेच पडून रहावे लागणार का? हा झळनारा विचार त्याच्या मनात घर करू लागला. त्यावेळी मात्र कल्पनाताई व मानवलोकच्या सर्व परिवाराने चंगच बांधला.....अनिकेत दादांनी या विदेश मोहिमेस गेलेच पाहिजे.
यासर्वाचा खूप चांगला परिणाम दिसू लागला. दादाच्या प्रकृतीत चांगले बदल दिसू लागले. तो झपाट्याने बरा होऊ लागला. पूर्ण बरा नसताना त्याने स्वीडन दौरा पूर्ण केला.
“ तो जो बाहेर पडला न तो त्याने परत पहिलेच नाही. झपाटल्यागत त्याने कामात झोकून दिले.” कल्पनाताई
स्वीडन नंतर मग सुरु झाला होळनानदी पुनर्जीवनाचा प्रकल्प. यात प्रचंड भगीरथ प्रयत्न करावे लागणार होते. दादा पूर्ण बरा झाला नव्हता पण नदी मात्र पुनर्जीवित करण्याचे सर्व काम त्याने पूर्ण केले. बीड जिल्यातील भयानक दुष्काळ. एक मोठं आव्हान होते. अनेक गावांना मदत करणे. लोकांना प्रोत्साहन देणे. काम नीट चालले आहे का नाही ते बघणे अगदी काम नाका तोंडाशी आले होते. पण पट्टीच्या पोहणाऱ्याला भोवऱ्याची किंवा तुफानाची काय भीती ....
जब नावं जल मे छोड दी
तुफानोमे ही मोड दी
दे दी चुनोती सिंधूको फिर आर क्या और पार क्या ........
तुफानोमे ही मोड दी
दे दी चुनोती सिंधूको फिर आर क्या और पार क्या ........
एक भन्नाट काम दादाचे चालू होते. त्याची काम करण्याची जिद्द आम्हाला ही प्रेरणा देत होती. त्याला दोन तीन दिवसातून एकदा तरी भेटल्याशिवाय आतून पेटल्यागत वाटायचे नाही. कधी सकाळी तर कधी भर दुपारी तर कधी भर मध्य रात्री आम्ही एकमेकांना भेटत होतो.
एक प्रचंड ऐतिहासिक काम अंबाजोगाईने अनुभवले.....पण मी मात्र पाहत होतो एका फिनिक्सभरारीला....... आणि वास्तवातील “कल्पने”च्या “फिनिक्स”ला