१८. गावोगावी
भगीरथ उभे करण्याचे पवित्र कार्य
उन्हाचा पारा चांगलाच चढत होता. तापमानाबरोबर दाहकता व तीव्रता चांगलीच दाह देत होती. पळस लालबुंद झाला होता. जुन्याचा शिमगा करून नव्या वसंताची नवती फुटू लागली.पाण्याची गरज चांगलीच वाढायला लागली. त्यासोबतच पाणी मुरवण्याच्या कामाची सुरवात. ओसाड रानात, डोंगराळ भागात व दऱ्याखोऱ्यात जाणवायला लागते एक भयाण भकास पण. विवेकवाडीत दुपारच्या वेळेस राऊतकाका अवाक होऊन मला म्हणत होते, “ बघा की दादा या बायांनी दोन दिवसात पाच एकरावरची ज्वारी काढली. काय म्हणायचं ? आपल्याला नुसतं उभारायला नको वाटायलं आणि दोन दिवसात अर्धा तास जेवायचं सोडलं तर सगळच उरकून टाकलं ह्या बायांनी.” दिवस पण योगायोगाने जागतिक महिला दिन. मला पण सहजच माझ्या आयुष्याला एक छानसे वळण देणाऱ्या कणखर स्त्रियांची आठवण प्रकर्षाने झाली.
“नदी, नारी और नीर इन तिनोकी एक अलगसी गरिमा भारत में है लेकिन दु:ख की बात यह है की इनका पूजन भारत में होता है लेकिन सन्मान तो उतना नहीं होता.” जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंगांचे वाक्य सहजच आठवून गेले.
रात्री हातोला गावात ग्रामसभा होती. गाव ‘सत्यमेव जयते वॉटरकप’ स्पर्धेत सहभागी झाले होते. त्याचा शुभारंभ. पाण्याचे नाते असणारे अनेक जण यात सहभागी होणार होते. माझा मित्र संतोष शिनगारे सोबत गेल्या दोन वर्षांचा पाण्याचा लेखाजोखा घेत आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. तिथे सगळेच पुरुष. संतोषला तर आज महिलांची ग्रामसभा घ्यायची होती. तितक्यात लगबगीने आमचा तरुण मित्र आला. तो म्हणाला, “महिला नक्कीच चांगल्या संख्येने येतील. घरचं सगळं आवरून यायला वेळ लागेल.”
त्याची धावपळ जोरात चालू होती. हळूहळू संख्या वाढू लागली. महिलांची संख्या पण लक्षणीय होती. सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. आत्ता माझी वेळ. काय बोलावे हे समजत नव्हते. मी सहजच प्रश्न केला समोरील ग्रामस्थांना,
“ आपल्यापैकी किती जणांनी हुंडा घेतला नाही ?”
समोरून एकही हात वर आला नाही. माझ्या डाव्याबाजूने मात्र एक आवाज खंबीर पणे म्हणाला,
“ दादा मी नाही घेतला हुंडा.”
माझे लक्ष त्या आवाजाकडे गेले तो होता त्या तरुण मित्राचा आवाज. हसऱ्या चेहऱ्याने तो हात वर करून उभा होता. सहजच तिथे असणाऱ्या महिलांना विचारले, “हुंड्याची जमवा जमव करत असताना तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरील घालमेल आठवते का ?” डोके डोलावली गेली. सर्व पुरुषांना विचारले, “तुमच्या घरातील बहिणीच्या लग्नाच्या वेळचा तणाव आठवतो का ?” सर्वांच्या माना डोलावल्या गेल्या. हे सगळे आपल्याला आठवते,जाणवते तर आजच्या महिला दिनानिमित्त इथे असणाऱ्या सर्व तरुण तरुणींनी संकल्प करायचा का की आम्ही हुंडा घेणार पण नाही आणि देणार पण नाही. किंचितशी शांतता सर्वत्र पसरली. सर्व तरुण तरुणींना समोर बोलावले. योगायोगाने मेडिकल कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर पण त्याच दिवशी सुरु होत होते. त्या सर्व विद्यार्थ्यांना पण सहभागी होण्याची विनंती केली. तरुण तरुणींनी जोरदार आवाजात संकल्प केला,
“आम्ही हुंडा घेणार नाहीत आणि आम्ही हुंडा देणार नाहीत.”
पुढे काय बोलणार हा परत प्रश्न.
“तुम्ही मतदान केले का ?
“हो केले ”
“फुकट की काही घेवून ?”
तरुण मित्र उभा राहिला व मोठया आत्मविश्वासाने म्हणाला,
“ दादा आमच्या गावात एक रुपया पण आम्ही दिला नाही सरपंच निवडणुकीत.”
असा एकही रुपया मतदाराला न देता निवडून येणारा नवीन सरपंच तो तरुण मित्रच होता जयसिंग चव्हाण.
“ निवडणुकीत जसे गाव पेटले होते तसे गाव पेटेल का ? मतदानाला आतुर असणारी लोक पाण्यासाठी श्रमदान करणार का ? जयसिंग तू स्वतः जसा निवडणुकीसाठी रात्रंदिन कष्ट घेतले तसे गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी घेणार का ?”
तेवढ्याच आत्मविश्वासाने जयसिंग म्हणाला, “ हो नक्कीच ! ”गावकऱ्यांनी टाळ्यांची आतषबाजी केली.” आम्ही लोक फुकट काही देत नाहीत. तुम्हा गावातील लोकांना लोकसहभाग द्यावा लागेल. फुकट मिळते ते पचत नाही. बघा विचार करा आणि ठरवा.” असे म्हणून मी बसलो.
जयसिंग हिरीरीने उठला व माईकचा ताबा घेतला.
“ मी गावकऱ्यांच्या साक्षीने तुम्हा सर्वांना आश्वासन देतो की या कामासाठी लोकसहभाग म्हणून माझ्या कुटुंबांकडून एक लक्ष रुपये”
काही काळातच अनेकांनी पण आपला वाटा जाहीर केला. ‘गाव करी ते राव न करी’ या म्हणीप्रमाणे आता गाव तर तयार झाले. आपण पण निवडणुकीत एक पैसा खर्च न करता स्वच्छ मार्गाने निवडून येणाऱ्या जयसिंग चव्हाण व त्याला निवडून देण्याऱ्या गावातील नदी, नारी आणि नीरच्या विकासासाठी काही वाटा उचणार का ? आपल्याला जमेल तसा खारु ताईचा का असेना त्याला मोलच नाही. गावोगावी भगीरथ उभे करण्याच्या पवित्र कार्यात सहभागी होऊ या.
१९. सगळंच
काही अदभूत घडतंय......!!
उन्हाचा पारा ४३ अंशाच्या वर गेला. अंगाची लाही लाही होतेय. मी व इरफान व्हरकटवाडीला गेलो श्रमदान त्यांचे कमी झालंय म्हणून माझ्या चेहऱ्यावर नाराजी होती. तोच प्रकार थोडा फार निमल्याला झाला.
दुसऱ्या दिवशी १७ LBS ( ४८० घनमीटर) करूनच व्हरकटवाडीच्या गावकऱ्यांनी पाणी पिले.
निमल्यातील तरुणवीरांनी तर चंगच बांधला त्यांनी १५ X 20 चे शेततळे चक्क एकाच दिवसात एक मीटर खोंदून गुणांकाच्या दृष्टीने ९०० घनमीटरचे टार्गेट केवळ एका दिवसात पूर्ण केले. हजार लोक एकत्र येवून जेवढे काम होते तेवढे केवळ शंभराच्या जवळपास असणाऱ्या हजारो हत्तीचे बळ असणाऱ्या वीरांनी केले.
पुण्यात १२वीचा अभ्यास करणारा पर्जन्य प्राजक्ता प्रशांत थोडा उदास होता. त्याला मराठवाड्याच्या दुष्काळ हटवण्यासाठी काहीच करता येत नाही. तसेच त्याचे कुटुंब पण. पर्जन्यने “दुष्काळाशी दोन हात” नावाचा फेसबुकवर एक ग्रुप बनवला व आईच्या मदतीने त्याने ८४ हजार रुपये मदत गोळा केली. त्यातून काही कोटी रुपयांचे पाणी साठवले जाईल.
गावातून लोकवाटा जमत नाही म्हणून काही लोक नाराजी व्यक्त करत होते. मी पर्जन्य व आमच्या विवेकवाडी परिवार, डोंबिवलीचे उदाहरण ग्रामसभेत दिल्यावर पठाण मांडाव्याच्या ८० वर्षाच्या जोगदंड आजीने जवळ जपून ठेवलेली शंभराची नोट माझ्या हातात ठेवली. तीन गावात मिळून लाख रुपयांचा लोकवाटा जमा झाला.
सगळंच काही अदभूत घडतंय......!!
२०. वेदने
वर सहवेदनेचा विजय....कधी आसू कधी हासू !!!
१ मे महाश्रमदान. राहुल व्यवहारे थोडा उदास वाटत होता.
“ राहुल बरा आहेस न ?” हो दादा एवढंच उत्तरं. काही वेळानी कळले की राहुलच्या आजोबांचा रात्री मृत्यू झाला. त्याच्या वडिलांनी व त्याने ठरवले आजोबांच्या अंत्यसंस्कारासाठी येण्यापेक्षा “दुष्काळाशी दोन हात” करणाच्या यज्ञाचा स्वतः वर संस्कार करणे जास्त महत्वाचे. राहुल अंबाजोगाईतच थांबला. इथल्याच काम करणाऱ्या आजोबांमध्ये तो आपले आजोबा शोधत होता.
“मागच्या वर्षीच मला श्रमदानासाठी यायचे होते. मनोरुग्ण असणाऱ्या एका महिलेची एक दिवसाची मुलगी मी दत्तक घेतली तिचा बाप तिला सांभाळायला तयार नव्हता म्हणून. ती आजारी होती. नाही जमले.” ३० तारखेला स्वतःच्या अंगावर आठ शस्त्रक्रिया झालेल्या चिपळूणच्या अश्विनीताई लग्नाचा वाढदिवस असताना पण अंबाजोगाईत आल्या. हातोल्यात राहून त्यांनी सलग २ तास श्रमदान केलं.
हातोल्याचा गणेश चव्हाण चक्क गेल्या काही दिवसांपासून फक्त २ तास झोपतो आहे आणि दिवसभर बेफान काम करतो. निमल्याच्या गावकऱ्यांनी दिवसभर रखरखत्या उन्हात काम केलं. दोघांना ऊन लागून उलटया झाल्या पण बहाद्दर मागे फिरले नाहीत.
आनंदगावाची कथाच न्यारी.सगळेच गाव श्रमदानासाठी उपस्थित होत. सकाळी ३ वाजता सगळ्या महिला उठल्या व घरचे सगळे आवरून गावाच्या महाश्रमदाना साठी सज्ज.लोकसहभाग जमत नाही असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.तिथे माझी प्रेरणा माझ्या साथीला होती. केवळ १५ मिनिटात १ लक्ष ३५ हजार रुपये जमा झाले. एका छोटीने सगळे लोक मला पैसे देतात पाहून स्वतः जवळचा एक रुपया मला आणून दिला.
विनायक पटवर्धन, मुंबईचे नौदलाचे माजी सैनिक. माझ्या सोबत चक्क काही ओळखपाळख नसताना काम करण्यासाठी आले. दिवसभर रखरखत्या उन्हात काम करतात. एक तारखेला मला कळले की गावातील इंधनासाठी त्यांच्या कुटुंबातील पाच जणांची ५० हजार रुपये लोकवर्गणी दिली. तन,मन, धनाने काका मराठवाड्याचे झाले आहेत.बावचीचे शिवा व विष्णू तसे अनाथ व वृद्ध पण जोरदार श्रमदान करतात, विष्णूने १० रुपयाच्या तीन नोटा लोकवाटा म्हणून माझ्या हातात आणून दिला.
बावचीच्या ग्रामसभेत लोकवाटा पन्नास हजार रुपये जमा झाला,
स्पर्धा सुरु होण्याच्या एक दिवस आधी गरिबीमुळे व कर्जापोटी निमल्याच्या महादेवच्या बायकोने आत्महत्या केली होती. ग्रामसभेत मी लोकवाट्याचे आवाहन केल्यावर काही वेळानी चक्क महादेव उठला व त्याने शंभराची नोट पुढे केली. तुझ्याकडून नको म्हणालो.
“गावपाणीदार झाले पाहिजे दादा ! लेकरांचे आई बाप मेले नाही पहिजेत !”
काय चाललंय हे ...उर भरून येतो, मन सुन्न होत. वेदने वर सहवेदनेचा विजय होतोय हे मात्र नक्की. कधी आसू कधी हासू.
२१. मास्तर
तुम्ही सुद्धा ... नाही नाही मास्तर तुम्हीच हे करू शकता !!!
रस्ता कटता कटत नव्हता. वातानुकूलित गाडीत पण घाम येत होता. घसा कोरडा. शरीराची क्षमता कमालीची ताणली जात होती. त्यात नेमका रस्ता कळेना. आमचा चालक व मी परेशान. आता येईल मग येईल. चुकलो तर नाही ? असे सर्व करत शेवटी कसे तरी लंगोटवाडी करत सक्करवाडीला पोह्चंलो. रस्ता होताच की नाही अस वाटत होतं. गाडीतून उतरलो तेच तळपत्या उन्हाचा चटका बसला. कसे तरी सावरून समोर पाहिलं तर सगळे ग्रामस्थ सकाळ पासून श्रमदान करत होते. दुपारचे दोन वाजले होते. माझी वाट पाहात रणरणत्या उन्हात त्यांना उभ पाहिल्यावर काळीज हलले व एक नवीनच शक्ती आली.
अमोल आणि सुखदेव हे दोघे या गावातील गुरुजी गेल्या महिन्यापासून गावातच ठाण मांडून बसले आहेत. अवघ्या तिशीतील आहेत. अमोलगुरुजींना छोटस बाळ काही दिवसांपूर्वीच झालं आहे. पण त्याला पाहण्याचा आनंद मात्र त्यांना त्यागावा लागला. धरणी मातेला इतकं सुंदर सजवल आहे सरकटवाडीच्या गावकऱ्यांनी. स्पर्धेतील श्रमदानाचे २० पेकी २० गुण मिळवणारे हे गाव झाले.व्हरकटवाडीचे रामगुरुजीच्या छोटया मुलीला चांगलाच ताप आला होता. रात्रंदिन फक्त दुष्काळाशी लढायचे हे फक्त डोक्यात. ताप वाढतच गेला. गावाने गुरुजींना सक्तीच्या रजेवर पाठवलं. लेकराला दवाखान्यात नेण्यासाठी. स्पर्धेतील श्रमदानाचे २० पेकी २० गुण मिळवणारे हे दुसरे गाव.
सुरेशगुरुजी बावचीचे दिवसरात्र काम करतात. स्वतःचे तीन लाख घालून मशीन चालू राहिली पाहिजे यासाठी त्यांनी चंग बांधला आहे. गावतळे व महाश्रमदान दलितांच्या जमिनीत घेवून त्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला. बाबासाहेब आत्ता नक्कीच खुष झाले असतील.सौदागरगुरुजी आनंदगावचे. विनाअनुदानित संस्थेत काम करतात. गावासाठी इतके झोकून दिलंय की बोलून बोलून घसाच बसला. काही किलोनी वजन कमी झाले. पण वीर फारच जोरात पळतोय हो गाव पाणीदार होण्यासाठी.
बाळूगुरुजी पळसखेडचे मागच्यावर्षी आपल्या गावाला राज्यात तिसरे बक्षीस मिळवण्यात त्यांचा मोठा वाटा. बाळू गुरुजी तिथेच थांबले नाहीत आता इतर गाव पाणीदार करण्यासाठी रात्रंदिवस पळत आहेत.
काही खर नाही या देशाचे म्हणणाऱ्या तथाकथित लोकांच्या तोंडावर आमच्या या मास्तरांनी जोरदार चपराक मारली आहे. लोकशिक्षणातून लोकसंघटन करत परिवर्तनाची उर्जा संक्रमित करणारे हे मास्तर. मास्तर तुम्ही सुद्धा ...हे वाक्य फारच गाजले. मास्तर तुम्हीही काही तरी करू शकता अस वाटतंय नाही नाही मास्तर तुम्हीच हे करू शकता !!!
२२. “सब कुछ झूट”....फिर क्या है असली सच ?
गावात गेलो की ऐकायला मिळायचे,
“माय बाप सरकार जे करल तेच होईल न. आम्ही गरीब बापडे काय करणार ? हालाकीत जगण्याचं नशीब घेवूनच आम्ही जन्माला आलो आणि मरू बी तसंच.”
शहरात गेलो की ऐकायला मिळायचे,
“गावातून पैसा उभारणे अशक्यच. यांना सवय लागलीय फुकटात सगळं करण्याची. स्वतःच्या गावासाठीच काहीच करणार नाहीत. निवडणुकीत हजाराची नोट मिळाली की खूष. गावातील तरुण म्हणजे राजकीय लोकांचे हुजरे.”
सब कुछ झूट. आपला देश बदलणे अशक्यच. गावातून अराजकीय नेतृत्व उभे होणे अशक्यच आणि राजकारणी चांगले काही गावात होऊच देणार नाहीत. यासगळ्या प्रस्थापित विचारधारेला सरळ मोडीत काढत महाराष्ट्रात काही प्रमाणात तरी खरंच “तुफान आलंया”.
निमला या धारूर तालुक्यातील गरीब गावा पासून सुरुवात करून आम्ही घेतलेल्या ७ ग्रामसभेतून २,४९,७०० रुपयांचा लोकवाटा जमा झाला. आ पर्यंत २० लक्ष ४८ हजार रूपयांच मशिनचे काम ज्ञानप्रबोधिनीने १३ गावात केलं. आपल्या सोबतच भारतीय जैन संघटना,मानवलोक व इतर संस्थांनी यापेक्षाही जास्त आणि अनेक गावांसाठी केले. त्यासाठी काही करोड रुपयातील इंधनाचा खर्च गावकऱ्यांनी केला. सरकारच्या जलयुक्त शिवाराची याला मोठी जोड मिळाली.
ज्ञान प्रबोधिनीच्या सर्व मित्रांनी अगदी अमेरिकेतील Save Indian Farmers पासून मुंबई,पुणे सारख्या शहरातून ३५ लक्ष रुपये निधी गोळा झाला.पाणी फौंडेशन च्या आवाहनामुळे भारतीय जैन संघटनेकडे तर यापेक्षाही किती तरी अधिक निधी झाला आहे.
ज्ञान प्रबोधिनी ज्या १३ गावात काम करते तिथे ६७ हजार ८०० घन मीटर श्रमदान झाले तर एकूण महाराष्ट्रात कमीत कमी १० लक्ष घनमीटर तरी श्रमदान झाले असेल. १ घनमीटर खोदण्याची मजुरी निदान सगळी कडे १०० रुपये आहे. आता पाहा किती रुपयांचे श्रमदान गावकऱ्यांनी आपल्या गावात केले. यात शहरी भागातून श्रमदानासाठी आलेल्या मित्रांचा पण मोलाचा वाटा आहे.
प्रत्यके गावातून तरुण अराजकीय नेतृत्व उभे रहात आहे. चवथी पास असणारा आमचा निमाल्याचा वैजनाथ ते अगदी जायभायवाडीतील डॉक्टर सुंदर जायभाय.
सगळ्यात जबरदस्त बदल जो जाणवतो आहे ते घर न सोडणाऱ्या हजारो महिला श्रमदानासाठी घराबाहेर पडत आहेत व त्यांना त्यांच्या घरातल्यांची तेवढीच साथ आहे. हे सर्व पूर्ण नाही हं ! अजून खूप काही करायचे आहे. आपण पण या न आमच्या सोबत. आपला मेंदू आपल्या प्रिय सद्प्रेरणेच्या ताब्यात द्या आणि बघा मग काय होतंय “सब कुछ झूट. आपला देश बदलणे अशक्यच.” हे वाक्य मोडीत काढूया... काही तरी भव्य कृती करू या.
२३. मनुष्याच्या
घामावर जर ही जेसीबी मशीन चालली असती तर..?
बालाघाटच्या डोंगररांगाच्या कुशीत अनेक वाड्या, तांडे आणि वस्त्या वसल्या आहेत. जिंदा दिलाची आणि दणकट शरीराची ही माणसे अनेक आघात सहन करत जगत आहेत. अनेक वर्षांची शेतातील नापिकी आणि त्यामागे असणारे पाण्याचे दुर्भिक्ष व दुष्काळाचा घाला यामुळे नशिबाला आलेले भटकेपण. या साऱ्या भटक्यांच्या वाटयाला वाघिणीचे दूध म्हंटले जाते ते शिक्षण काही आले नाही. “ सिंचनासाठी पाणी नसणे-नापिकी शेती- पिढ्यानपिढ्याचे भटकेपण- शिक्षणापासून दूर” हे दुष्टचक्र त्यांच्या मागे लागले ते सुटलेच नाही. आयुष्य हे असेच खितपत जगायचे असते हेच त्यांच्या सवयीचे झाले.
हे असे किती दिवस चालणार ? काही तरी केलं पाहिजे का नाही ? काय करावे यासाठी मतभेद असू शकतो पण या आपल्या भावंडाचे आयुष्य थोडे तरी सुकर झाले पाहिजे असे तर प्रत्येकालाच वाटत असणार. आम्ही सुरु केलीय “दुष्काळाशी दोन हात” करण्याची मोहीम. रोजचा दिवस कधी प्रचंड आनंदाचा जातो तर कधी प्रचंड खिन्नता दाटून येते.
रात्री १२ वाजेपर्यंत दिपेवडगावच्या बैठकीत महाश्रमदानाचे नियोजन केले आणि सांगून आलो की ५०० घनमीटर काम झाले पाहिजे तरच मी गावात येणार. गावातील लोक चार वाजल्यापासून उठली. कुठल्याही घरात चूल पेटली नाही. सगळे कामाला. सकाळी ७ वाजताच मला फोन, “ दादा या न ५०० घनमीटर झाले.” “हो येतोच,” म्हणून मी थांबलो. त्यानंतर फोन वर फोन. शेवटी मी ज्यावेळी गावात गेलो त्यावेळी १००० घनमीटरचे नियोजीत काम पूर्ण करून. २००च्या वर लोक उत्साहाने काम करत होती. ग्रामसभेत लोकवाट्याचे आवाहन केले तर १५ मिनिटात ५० हजारापर्यंत लोकवाटा जमा. भन्नाट वाटले.
माझी गाडी निघाली परळी तालुक्याकडे. सपाट भाग संपून आम्ही डोंगरात घुसलो. इंदिरानगर तांड्यावर पोहोंचलो. गाडीतून उतरताच फुल फुल कृतींनी आणि वाणीने म्हणत माझे स्वागत झाले. लमाण ( बंजारा ) पारंपारिक वेशातील उपसरपंच आजीबाई जिने पाणी फौंडेशनचे प्रशिक्षण घेतले आहे; ती माझा हात हातात घेवून म्हणाली, “ लई वाट पाहत होतो तुमची सकाळ पासून श्रमदानचालू हाय.बरं झालात आलाव.” काळजात चर्रर्र झाले दुपारचे २.३० वाजले होते. उन्हाचा पारा ४३ अंशाच्या पुढे सरकला होता.
इंदिरानगर तांड्याची लोकसंख्या ५००च्या आसपास. गावातील ७५% लोक ऊसतोड कामगार. गावात पिण्याच्या पाण्याची केवळ एकच विहीर. शासनाने १९० फुट खोल एक बोअरवेल घेतली होती. त्याला काही पाणी लागले नाही. बाकी गावात एकही विहीर किंवा बोअरवेल शेतीच्या सिंचनासाठी नाही. रब्बीचे क्षेत्र शून्य असलेले हे गाव. एक भयानक काळोख माझ्या डोळ्यासमोर. एका एक्कराच्या कॉलनीत घरगुती पाण्यासाठी ४० बोअरवेल घेणारा आमचा शहरी समाज माझ्या डोळ्यासमोर आला.
विस्तीर्ण पसरलेल्या त्याडोंगर रांगातून आम्ही श्रमदानचालू असणाऱ्या शेततळ्याच्या जागी आलो तर एकदम मला हिंदी चित्रपट पाहतोय असे वाटत होते. काही लमाण वेशातील स्त्रिया घेर धरून हलकीच्या तालावर नाचत होत्या. कणखर शरीराचे माणसे बेफामपणे खोद काम करत होते. मुले व स्त्रिया माती व मुरमाचे टोपेले उचलून टाकत होत्या. मी ते अनोखे दृश्य भान हरपून पाहत होतो. पुढच्या अर्ध्या तासात काम न करता मला तीन वेळा पाणी प्यावे लागले. माझ्या तांड्याच्या भावांच्या अंगांअंगातून घामाचे पाझर येत होते पण मला एकही जण पाणी पिताना दिसला नाही. काय ही अलौकिक शक्ती.
२ लक्ष रुपयाचा लोकवाटा करून त्यांनी मशीनच्या मदनीने २० हजार घनमीटर खोद काम पण केले पण आत्ता पैसे संपले. शेतीची मशागत करावी लागणार. खत व बियाणांसाठीच पैशाची मारामार चालू आहे तर मग लोकवाटा कसा जमणार? जेसीबीला डिझेल लागते आणि त्यासाठी पैसा. मनुष्याच्या घामावर जर ही मशीन चालली असती तर तांड्याला पैशाची गरजच पडली नसती. त्यांच्या घामाच्या सोबतीला आपण त्यांना डिझेलसाठी नक्की मदत करू. तुम्ही सर्व जण आमच्या सोबत आहे तर इंदिरानगर तांडा एकटा कसा करणार “दुष्काळाशी दोन हात”. या आपण सारे मिळून आपल्या माणुसकी प्रचीती देवू या !!
२४. अतिमागास
जिल्ह्यात
भलतच काही घडतंय ...!!!
भलतच काही घडतंय ...!!!
भारत सरकारच्या नितीआयोगाचा २३ एप्रिल २०१८ अहवाल पाहून थोडा थक्कच झालो. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा अविकसित जिल्ह्यात भारतात तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा. शिक्षणाच्या बाबतीत तर दुसऱ्या क्रमांकावर व शेतीच्या बाबतीत चवथ्या क्रमांकावर. पाण्याचे काम करण्यासाठी अतिशय आव्हानात्मक जिल्हा. त्यात अजून अवघड म्हणजे परंडा तालुका. नेहमी दुष्काळाच्या गर्तेत असलेला. काही तरी केले पाहिजे हे सारखे वाटत होते. मागच्या वर्षी धारूर तालुक्यातील जायभायवाडी वॉटर कप स्पर्धेत दुसरे आले आणि यावेळी धारूर तालुक्यात जबरदस्त वातावरण खूप जोरात काम सुरु झाले अनेक गावात.
असेच काही करता येईल का परंडा तालुक्यात ? परंडा तालुक्यातील पाणी फौंडेशनचा समन्वयक राहुलशी बोललो. त्याने मला तालुक्यात येण्याचे आमंत्रण दिले. परंडा तालुक्याच्या अगदी सीमेवर व मराठवाड्याच्या पण सीमेवर असलेल एक छोटेस गाव सक्करवाडी चांगले काम करतंय असे सांगितले. मी पण लगबगीने तिकडे निघालो. दोन जबरदस्त मास्तर वीरांशी भेट झाले. अमोल अंधारे व सुखदेव भालेकर याच्याशी फोनवर भेट बोलणे झाले. सक्करवाडीला भेट द्यायचे ठरले.
पहिली भेट लिंबाखालची. दुपारचे ३ वाजलेले. गावकऱ्यांना व गावाला समजून घेण्याचा प्रयत्न. सुखदेव भालेकर तर जवळच्या शिंदेवाडीचे सक्करवाडीत तळ ठोकून आहेत.माझी पाहिली भेट तशी वादळीच होती. मी फारच स्पष्ट शब्दात माझी मते गावकऱ्यांना व दोन्ही शिक्षकांना सांगितली. मनात विचार करून निघालो की आता परत हे लोक काही आपल्याला या गावात बोलावणार नाहीत. कडुलिंबाच्या झाडा खाली झालेली बैठक फारच कडू डोस देणारी होती.
माझ्या डोक्यातील ग्रह मात्र अमोल आणि सुखदेवसरांनी खोटा केला. एवढे कडू बोलून सुद्धा त्यांनी माझ्याशी फारच मधुर नाते निर्माण केले. मी दिलेल्या सूचना तंतोतंत अंमलात आणल्या. गावातील लोकांनी जीवाचे रान केले. त्याला साथ सोबत पाणी फौंडेशनच्या सर्व टीमची होती. काही दिवसातच आमचे नाते कित्येक वर्षाचे दृढ नाते आहे असे वाटायला लागले. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या कुटुंबाची घटक झाली व प्रसाद त्यांचा पण जीवाभावाचा “दादा” झाला.
“दादा एक गोड बातमी सांगायला फोन केला.” अमोल सरांचा फोन.
“काय म्हणताय सर सांगा की.”
“ दादा आपले वॉटर कप स्पर्धेचे टार्गेट पूर्ण झाले.”
“म्हणजे तुम्ही आता राज्याच्या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचे प्रबळ दावेदार”
मला पण खूप आनंद झाला. स्पर्धेतील टार्गेट पूर्ण करणारे मराठवाड्यातील सक्करवाडी पाहिले गाव होते. मी सरांना सांगितले की आता एक दिवसभर मी गावात राहणार.
सकाळीच निघालो. दुपारी १२.३० पर्यंत पोहोंचलो. आत्ता गाव लागले होते कामाची गुणवत्ता सुधारण्याच्या कामाला.
अंगाची लाही लाही करणारे ऊन. गावकरी मात्र खुपच मस्तीत काम करत होते. शेवटी मी विनंती केली. आत्ता काम थांबवा. अमोल सरांनी सहभोजनाची व्यवस्था आता मात्र आंब्याच्या झाडाखाली केली होती. मस्त जेवण झाल्यावर ग्रामसभा चालू झाली.
एवढे कष्ट केल्यावर तुम्हाला बंद डोळ्यासमोर काय दिसतंय ते मी त्यांना पाहायला सांगितले.
“ हिरवंगाव परिसर, चांगली शेती, चांगले गाव.”
मी अनेकांना विचारात होतो. सगळ्यांच्या डोळ्यांसमोर हेच चित्र होते.
एक जण मात्र थोडा वेगळे चित्र पाहात होता.
“गाव वॉटर कप स्पर्धेतील पाहिले बक्षीस घेत आहे.”
त्याच्या डोळ्यांसमोरील चित्र सगळ्यांनाच भावले. ग्रामसभा चक्क तीन तास चालली. नाचत, गात तर कधी प्रचंड हशा व शेवटी जायभायवाडीत जे घडले तेच झाले. आपल्या विवेकवाडी परिवार, डोंबिवलीचा सुहास कुलकर्णी म्हणजे आमचा अण्णा याने परिवारा तर्फ गावाला मदत म्हणून म्हणून एक लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर देवू केले.
भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या अतिमागास जिल्ह्यातील,अतिमागास तालुक्यातील “सक्करवाडी” वॉटर कपसाठी प्रबळ दावेदार आहे.
सक्करवाडीचा दुष्काळाविरुद्ध लढा देण्याची प्रेरणा सर्व महाराष्ट्रात पसरू दे आई भवानी !!!
२५. साप
चावला तरी थांबणार नाही....
भ्याव नसलेला भिवंन्ना काळे जेसीबी चालकाचे रात्रंदिवस काम करत जेसीबी मालक झाला. रात्रीची जेसीबी चालवण्यात त्याचा भारी हातखंडा. सिंगनवाडीच्या डोंगरावर तो काम करत होता. रात्रीची पाळी सुरु करण्याच्याआधी पाणी पिण्यासाठी तो अंधारात चालत असताना त्याचा पाय नेमका सापावर पडला. साप त्याचा पायाला चांगलाच डसला. सोबतच्या चालकांनी व गावकऱ्यांनी भयाण पावसात त्याला अंबाजोगाईच्या मेडिकल कॉलेजमध्ये आणले. सकाळी भिवंन्नाला भेटायला गेलो तर मर्द म्हणतो कसा,
“ साप डसला बघा. तरास लई झाला. सकाळच्याला ऑपरेटरला जा म्हटंल. मशिन बंद राहिली नाही पाहिजे. जेवढी चालवता येईल तेवढी चालव.गावाचं नुस्कान नाही झालं पाहिजे.”
मी त्याचा राकट हात हातात घेवून त्याच्या भावूक डोळ्यात पाहात राहिलो.
लंगोटवाडीच्या रणजितला लग्नाची हळद लागणार होती. पण घात होऊन व्हराडाच्या गाडीला अपघात झाला. रणजितच्या आजीचा त्यात मृत्यू झाला. गावातील श्रमदान बंद झाले. मंदिरा जवळच्या ग्रामसभेला रणजित समोरच बसला होता.
“ गावांनी परत जोरात श्रमदान सुरु करावं. खरी श्रद्धांजली आजीला त्यातूनच मिळेल.”
मी सुन्न होऊन रणजितचे वाक्य ऐकत होतो. गाव परत पेटले.
व्हरकटवाडीचे लिंबाजी वर्षापूर्वीच मरता मरता वाचले. आत्ता सत्तरीच्या वर वय पण गेले. श्रमदान करणाऱ्या लोकांना डोंगरदऱ्यात डोक्यावर पाण्याची घागर घेवून ४३ दिवस पाणी पाजत आहेत.
तर लिंबांबाईनी मागच्या वर्षी सलग ४५ दिवस खाडा न करता सलग श्रमदान केलेला विक्रम यावर्षी पण कायम ठेवला. यावर्षी त्यांचा पाय चांगलाच मुरगाळला होता. सहज पाय दाखवा म्हणालो तर चांगलीच सूज पायावर होती. पण श्रमदानात एक दिवसाचा बी खाडा नाही.
जिजाचा पोरगा नुकताच जन्मला होता. जगतो की मरतो सांगता येत नव्हते. फार जड अंतःकरणाने त्याला दवाखान्यात जावं लागले पण त्याचा दुसरा जीव मात्र गावातच होता. काल लेकराला थोडं बर वाटलं. जिजा पेढे घेवून श्रमदानाला हजर.
आमचे कॅप्टन मुंजाभाऊ भोसले. सत्तरीच्या वर वयं. दुपारी दोन असू की रात्रीचे ८ कधीही मुंजाभाऊ डोंगरावर जाणार व सलग समपातळीतील चर सलग खोदत राहणार.या माणसांनी तर कहरच केला. एक दिवस सलग २५ मीटरचा चर एका पाळीत खोदून काढला.
इतिहासात ऐकले होतं की देव, देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती असे म्हणणारे सरदार होते.वर्तमानात असे प्राण हातात घेवून दुष्काळाशी लढणारी मर्द मराठे गावोगावी दिसत आहेत.
२६.
करोडो मोलाचे सुख....
हार पत्करणार ते गौरसैनिक कसले. मुळातच बंजारा आणि प्रचंड ताकत. त्यांनी शक्कल लढवली शेवटच्या दिवशी सगळ्या गावाने मिळून एक दीड किलोमीटर लांबीची एक मीटर उंचीची व एक मीटर रुंदीची दगडी पोळ रचायचे ठरले. सकाळी सुरु करायचे आणि रात्री बारालाच थांबायचे. दीड किलोमीटर लांबीची दगडी पोळ पूर्ण झाली. मानवी श्रमदान पूर्ण झाल्यावर त्यानंतर होणारे श्रमदान मशीनच्या कामात धरले जाणार होते आणि तेही ३ गुणांका सह म्हणजे ४५०० घनमीटर काम पूर्ण झाले व तांडा स्पर्धेच्या पूर्व परीक्षेत पास झाला. यासर्व कामाचे फलित म्हणजे कुणाला फारसा माहिती नसणारा इंदिरानगर तांडा परळी तालुक्यात दुसऱ्या क्रमांकावर येवून सहा लक्ष रुपयांचे बक्षीस त्यांनी पटकावले.
हे सर्व काम करताना आम्ही स्वतःचे फोटो किंवा सेल्फी घेण्याचे खूप टाळले होते. गावकरी नाराज व्हायचे. काम पूर्ण झाल्यावर व बक्षीस मिळाल्यावर तुमच्यासोबत फोटो काढेल असा माझ्या बोलण्याचा सूर असायचा. आज इंदिरानगर तांड्याला खास कार्यक्रम होता. सगळ्यांच्या बरोबर फोटो काढल्यानंतर एक घोगरा आवाज कानावर आला नव्हे नव्हे सरळ त्यांनी मला खेचून बाजूला घेतले आणि समोरच्या पोराला म्हणाल्या “आमचा बी फुटू काढा की दादा संग” पारंपारिक बंजारा वृद्ध स्त्रियांनी एक सॉलिड फोटो काढायला लावला. “ तांड्यावर येत जा आम्हाला बरं वाटतय ! याद येती न तुझी” असे प्रेमाने बोलत एक आजी म्हणाली “आपल्या दुगाचाच फुटू काढ,” तिची ती प्रेमळ फर्माईश आणि त्यानंतर मिळालेला खास बुंदीचा लाडू.करोडो मोलाचे सुख देवून गेला पाणीदार इंदिरानगर तांड्यावर.