मला भाषा शिक्षणात फारशी आवड नव्हती, त्यामुळे त्यात गतीही नव्हती. इंग्रजीची भयाण भीती वाटायची, तर मराठीत शुद्धलेखन आणि उच्चारांच्या चुका व्हायच्या. संस्कृत शिकताना तर मनात जी भीती बसली होती, ती निघणे अवघडच होते. माझ्या पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मला संस्कृतचा अजिबात गंध नव्हता. एखादे सुभाषित केवळ पाठ होते. रामरक्षा सुद्धा संथा न घेताच शिकलो होतो, त्यामुळे वाणीत शुद्ध उच्चार अजिबात नव्हते.
भगवद्गीतेची ओळख
विवेकानंद केंद्रात गेल्यावरच झाली. माझ्या जिभेला संस्कृत नीट बोलण्याचे वळण
नव्हते, तरीही अथक प्रयत्नाने काही श्लोक पाठ
केले. अंबाजोगाईला परत आल्यावर मात्र गीता शिकण्यासाठी 'गीता प्रबोधिनी' सुरू केली. तेव्हा सर्वांचा असा एक गोड गैरसमज झाला की मला खूप चांगले संस्कृत
येते. खरं तर मी स्वतः शिकण्याचा प्रयत्न करत होतो; उच्चारात तर अजूनही चुका आहेतच.
ऊर्जेचा झरा:
पहिले दर्शन
भाऊंबद्दल मी बरेच
काही ऐकले होते, ते अंबाजोगाईतील मामा क्षीरसागरांकडून.
त्यांची खूप चांगली मैत्री होती. आमची प्रत्यक्ष भेट सिंहगडच्या पायथ्याला
प्रबोधिनीची प्रदीर्घ बैठक होती, त्या वेळी झाली.
सकाळची उपासना झाल्यावर मी चहा पीत गप्पा मारण्यात पुरता रमलो होतो. कोपऱ्यात एका
बाजूला गोरापान, कृश शरीर, पांढरे शुभ्र धोतर घातलेली आणि वयाने ज्येष्ठ अशी एक व्यक्ती प्रचंड ऊर्जेने
सूर्यनमस्कार घालत होती. त्यांच्या हालचालींत कमालीची लवचिकता आणि गती होती.
विचारल्यानंतर कळले की, ते निगडी केंद्राचे प्रमुख वामनराव
अभ्यंकर होते. त्यांच्या विद्वत्तेबद्दल खूप काही ऐकले होते. गणित व संस्कृतमधील
त्यांची महती बरीच ऐकीव होती.
त्यांचा व्यायाम
झाल्यावर मी त्यांना नमस्कार केला व मामांबद्दल सांगितले. "अंबाजोगाईत काय करतोस?" वामनराव म्हणाले. "एकादशीला संपूर्ण सामूहिक गीतापाठ व दर
शनिवारी गीतेचा सामूहिक अभ्यास करतो."
आमची न्याहरी
झाल्यावर भाऊंनी मला बोलावून घेतले. "चल, आपण गीतेचा एक अध्याय म्हणूया. कोणता
अध्याय तुला पाठ आहे?" आता मात्र माझी फजिती झाली! मला तर एकही
अध्याय पूर्ण पाठ नव्हता. शेवटी दुसरा अध्याय म्हणायचे ठरले. मी अगदी चोरून आणि
दबक्या आवाजात म्हणायला सुरुवात केली. त्यांचे उच्चार मात्र खूपच स्पष्ट आणि आवाज
खणखणीत होता. कसा बसा दुसरा अध्याय पूर्ण झाला.
ते म्हणाले, "थोडा सराव करावा लागेल तुम्हाला. काही उच्चारांकडे अधिक
लक्ष द्यावे लागेल. घाबरू नका, पहिल्यांदा चुकेल
पण नंतर जमेल. इंग्रजी इतके शिकल्यावरही आपल्याला बोलताना भीती वाटतेच की! संस्कृत
तर आपण पूर्वी शिकलेलो नाही, पण न घाबरता
प्रयत्न करत राहायचे."
भाऊंचे बोलणे खूपच
आश्वासक होते. सुरुवातीला मला खूपच निराशा वाटत होती, पण त्यांच्या बोलण्याने आता बरेच हलके वाटू लागले. त्या
वेळेपासून मी न भिता, चुका झाल्या तरी गीतेचे श्लोक खणखणीत
आवाजात म्हणायला लागलो. अजूनही सगळे उच्चार बरोबर असतात असे नाही, पण मनातील भीती मात्र गेली.
खरे तर आमचा सहवास
खूप कमी काळाचा होता. आम्ही एकत्र असे काही मोठे काम दीर्घकाळ केले नाही. पण
भाऊंच्या पहिल्याच भेटीत माझी प्रबोधिनीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांबद्दलची भीती
निघून गेली. त्यांच्यासमोर सहज मोकळेपणाने कोणताही प्रश्न किंवा विचार व्यक्त करता
येऊ लागला. भाऊंच्या सोबतच्या छोट्या सहकृतीतून माझी भिड चांगलीच चेपली. 'आपले लोक आहेत, आपली चूक असली तरी आपल्याला सांभाळून घेणारे, समजून सांगणारे आणि उभारी देणारे आहेत,' हे भान मला आले. प्रबोधिनी म्हणजे अशी उभारी देणाऱ्या कार्यकर्त्यांची संघटना
आहे, हे शिक्षण मला नकळत मिळाले.
ऋषी आणि वैज्ञानिक
यांचा संगम: गणितातील 'भाऊ'
भाऊ केवळ
संस्कृततज्ज्ञ नव्हते, तर ते गणिताचे ऋषी होते. गणिताकडे ते
केवळ एक विषय म्हणून नाही, तर जीवनाकडे पाहण्याचे एक 'अचूक साधन' म्हणून पाहायचे.
गणितातील क्लिष्ट प्रमेये सोडवताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असायचा, तोच आनंद एखाद्या कार्यकर्त्याच्या आयुष्यातील गुंता
सोडवताना दिसायचा. "आयुष्यात प्रत्येक समस्येला उत्तर असतेच, फक्त आपण योग्य समीकरणाने तिथे पोहोचायला हवे," ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या बुद्धीची धार जितकी
तीक्ष्ण होती, तितकेच त्यांचे मन कोमल होते.
कन्याकुमारीची चिरस्मरणीय भेट
थोर माणसांचा सहवास आपल्याला निश्चित
ध्येयाकडे जाण्यासाठी खूपच उपयोगी पडतो. साधे आणि सोपे जीवन जगत, विविध प्रयोग करत, स्वतःला समजून घेत आणि आपल्यातील उणिवा
दूर करत आपले देशकार्य अधिक नेमके करण्यासाठी अशा सहवासाचा नक्कीच उपयोग होतो.
ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीशराव
बापट यांच्या सोबतच्या प्रवासात खूप काही शिकायला मिळाले. प्रचंड ताकदीचा माणूस
किती सहजतेने आपल्याला समजून घेऊ शकतो व समजून सांगू शकतो, याचा अनुभव पदोपदी येत असे.
त्याहीपेक्षा आमचे नाते समृद्ध होण्यासाठी या प्रवासाचा मोठा उपयोग झाला.
विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी
येथे शिक्षक प्रशिक्षणासासाठी जायचे ठरले. मी तर प्रचंड उत्साहाने याची वाट पाहत
होतो. मा. गिरीशरावांच्या सोबतच तीर्थरूप वामनराव अभ्यंकर (आमचे सर्वांचे लाडके 'भाऊ') या प्रवासात सोबत होते. ज्ञान
प्रबोधिनीने देशसेवेचे दोन मार्ग सांगितलेले आहेत: एक वैराग्यपूर्ण आणि दुसरा
गृहस्थाश्रम सांभाळत व्यवहारपूर्ण. दोन्ही मार्गांनी तुम्ही निजध्येयाचा ध्यास
धरून देशकार्य नक्कीच करू शकता.
मा. गिरीशराव म्हणजे संघटनेचे व्यवहार
निर्मोही व अलिप्तपणे करणारे साधक, तर
आहार-विहाराचे नियम पाळत, संयम
आणि साधनेने संस्थाकार्य समृद्ध करणारे व अफाट जनसंपर्क असणारे व्यक्तिमत्व म्हणजे
भाऊ. दोघांच्या सहवासात पुढील आठवडाभर राहता येणार होते. त्यांचे जगणे जवळून
अनुभवता येणार होते, तो
एक अनोखा अनुभव होता. थोडक्यात, मी
प्रबोधिनीचे देशसेवेचे दोन प्रकार प्रत्यक्ष अनुभवणार होतो.
रेल्वे प्रवासात गप्पांचा ओघ सतत चालू
होता. मला प्रत्येक स्टेशनवर तेथील काहीतरी खास खाणे फार आवडे; यात मला गिरीशरावांची साथ असे. चटपटीत
आणि जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ खाणे माझ्या आवडीचे होते. मी प्रत्येक वेळी
भाऊंना खाण्याचा आग्रह करी. कधी कधी तर 'खाण्याचे तत्वज्ञान' देश समजून घेण्यासाठी कसे महत्त्वाचे आहे, हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करी.
अर्थात, याचा भाऊंवर अजिबात
परिणाम होत नसे. ते फक्त हसून म्हणत, "तू जरूर खा, मला नको." त्यांच्या चेहऱ्यावर
कोणत्याही प्रकारचा राग किंवा चीड नसे. मी माझे मत दोघांसमोर ठामपणे मांडत असे.
अनेकदा त्यांचे मत नीट न समजून घेता मी टोकाचा वादविवाद करी. हे सर्व कित्येक तास
चाले, पण त्यांनी माझ्यावर
कधीही वैचारिक जबरदस्ती केली नाही. "तुला अजून समजत नाही,"
"अरे, तू लहान आहेस," किंवा "आम्ही तुझ्यासारखे अनेक
युवक पाहिले आहेत," अशा
प्रकारचे टोमणे तर सोडाच, साधी
नाराजीची छटाही त्यांच्या चेहऱ्यावर कधी दिसली नाही. परिणामी, मी त्यांच्याशी अधिकच मोकळा झालो.
सोबतच्या युवा कार्यकर्त्याला कमालीचे स्वातंत्र्य देणे, त्याला बोलते करणे आणि नवनवीन
प्रयोगांसाठी प्रेरणा देणे, हे
त्यांच्यातील 'खऱ्या
गुरुजनांचे' लक्षण होते.
भाऊंचे राहणे आणि दिसणे कमालीचे निरलस
आणि सात्विक होते. त्याचा प्रभाव विवेकानंद केंद्रातील प्रत्येक व्यक्तीवर पडायचा.
साहजिकच अनेक जण त्यांच्यासमोर नतमस्तक होत. ज्ञान, कर्म आणि भक्ती यांमध्ये त्यांची उंची
हिमालयासारखी होती, तरीही
त्यांच्या वागण्यात कोणताही दंभ नव्हता.
शिक्षक प्रशिक्षणात त्या दोघांनी मला
सोबत घेतले. खरं तर मी तिथे प्रशिक्षण देण्यासाठी गेलो नव्हतो, पण त्यांच्या सोबत मीही प्रशिक्षक झालो.
भाऊंच्या तोंडून प्रत्यक्ष 'पंचकोश
विकसन' समजून घेता आले,
तर गिरीशरावांनी 'प्रक्रिया संशोधन' आणि मी 'शैक्षणिक नियोजन' यांवर सत्रे घेतली. संपर्क, सहवास आणि सामूहिक कृतीतून मिळणाऱ्या
शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव मी तिथे घेतला.
आपल्या ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या मनात
आपली प्रतिमा कशी होईल, याचा
विचार आपण अनेकदा करतो; पण
भाऊ आणि गिरीशरावांच्या बाबतीत मी असा विचार कधीच केला नाही. त्यांच्या सहवासात मी
जसा आहे, तसाच वागत होतो. मनात
येणारे विचार मोकळेपणाने बोलत होतो. माझे 'मडकं कच्चं आहे' याची मला कल्पना होती. मी माझ्या भावनांचा आणि वर्तनाचा
खराखुरा आविष्कार त्यांच्यासमोर करत असे. ते योग्य-अयोग्य काय, हे समजून सांगून माझ्यातील अवगुण दूर
करण्यासाठी मला नेहमीच मदत करत असत.
औपचारिक प्रशिक्षणावर माझा फारसा
विश्वास नव्हता, त्यातून
काहीच साध्य होत नाही असे मला वाटे. मी माझे म्हणणे भाऊंना व गिरीशरावांना पटवून
देण्याचा बालिश प्रयत्न करत असे. ते मात्र शांतपणे ऐकून घेत. भाऊंचा तो हसरा चेहरा
मला आजही जसाच्या तसा आठवतो.
कन्याकुमारीत एका संध्याकाळी आम्ही दोघे
समुद्रकिनारी फिरायला गेलो. उसळणारा समुद्र आणि त्यामध्ये प्रकाशाने सजलेले
शिलास्मारक फारच देखणे दिसत होते. मी सहज भाऊंकडे पाहिले, त्यांचा चेहरा अत्यंत शांत होता.
भगवद्गीतेतील हा श्लोक तेव्हा मनात घोळत होता:
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः
प्रविशन्ति यद्वत् ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स
शान्तिमाप्नोति न कामकामी ॥
बराच वेळ शांततेत गेल्यावर भाऊंनी मला
विचारले, "विवेकानंदांचे
जीवित ध्येय काय होते?"
"विखुरलेल्या
आध्यात्मिक शक्तींचे एकीकरण," मला
पाठ असलेले इंग्रजीतील वाक्य मी एका दमात सांगून टाकले.
"ते पूर्ण झाले का?"
भाऊंचा पुढचा प्रश्न.
"नाही वाटत... अजून
खूप काही करावे लागणार आहे," मी
माझे मत मांडले.
"कोण करेल ते पूर्ण?"
त्यांनी विचारले.
"आपल्यालाच करावे
लागेल ना?" मी
प्रतिसाद दिला.
"करायचा का मग असा
काही प्रयत्न?" भाऊंनी
माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला, ज्यात
ते माझ्यासोबत असणार हे निश्चित होते.
"मला लगेच सांगता
येणार नाही, विचार करावा लागेल,"
मी म्हणालो.
"ठीक आहे, तुला हवा तेवढा वेळ घे. तुझा विचार
झाल्यावर आपण बोलू," असे
म्हणून त्यांनी विषय तिथेच थांबवला.
आम्ही विवेकानंदपुरममधील स्वामीजींच्या
मूर्तीजवळ बसलो. समोर श्रद्धेय एकनाथजींची समाधी होती—'एक जीवन, एक ध्येय'. दर्शन घेऊन परतताना अंधार पडला होता.
भाऊंनी गंभीर आवाजात सांगितले, "प्रसाद, तू
अंबाजोगाईत शाळा काढायचा विचार मनातही आणू नको. शाळेशिवाय काम करता आले पाहिजे,
तेच तू कर." संपूर्ण सहा
दिवसांच्या प्रवासात भाऊंनी मला स्पष्टपणे सांगितलेले हे एकमेव वाक्य होते.
भाऊ विमानाने परत गेले आणि मी व
गिरीशराव दोन दिवसांनी रेल्वेने निघालो. "तुझा प्रशिक्षणावरील विश्वास
वाढल्यावर आपण अंबाजोगाईत एक प्रशिक्षण वर्ग घेऊ," असे गिरीशराव म्हणाले. भाऊ आणि गिरीशराव
दोघेही मला किती मोकळीक देत होते, हे
पाहून मी भारावून गेलो. कन्याकुमारीची ती भेट खरोखरच चिरस्मरणीय ठरली.
स्वातंत्र्यातून स्व-विकास
अंबाजोगाईला परतल्यानंतर
महिनाभराभरानंतर भाऊंचा फोन आला, "देशातील विखुरलेल्या आध्यात्मिक संस्था-संघटनांच्या एकीकरणाचे
काम करायला तुला आवडेल का?" खरे
तर मी आमचे कन्याकुमारीतील बोलणे विसरूनही गेलो होतो आणि माझा त्यावर फारसा
विचारही झालेला नव्हता. मी थोडे वेळकाढू उत्तर दिले. 'विचार पूर्ण झाल्यावर बोलू' असे सांगितल्यावर भाऊंनी माझी इतर चौकशी
केली. दोन महिन्यांनंतर मला पुन्हा फोन आला. त्या काळात माझी प्रकृती थोडी
खालावलेली असल्याने दुसरा कोणताही विचार करण्याची माझी क्षमता नव्हती. "मला
जमणार नाही भाऊ," असे
म्हणत मी माझी असमर्थता व्यक्त केली. तरीही, कोणताही नापसंतीचा स्वर न काढता भाऊंनी
माझा निर्णय सहज स्वीकारला. "भविष्यात तुला असे काही करावेसे वाटले तर नक्की
सांग, आपण करू,"
असे म्हणत आमचे संभाषण थांबले.
याच काळात अंबाजोगाईतील काही तरुण
कार्यकर्त्यांना मिशनरी शाळेत होणाऱ्या त्रासामुळे काहीतरी वेगळे करावेसे वाटत
होते. एक प्राथमिक शाळा सुरू करावी, असे त्यांच्या मनात होते. 'ज्ञान प्रबोधिनी'ची शाळा नक्कीच काढायची नाही, हे मनात पक्के होते. कार्यकर्त्यांनी
स्वतंत्र न्यासाची (Trust) नोंदणी
करून शाळेची मान्यता मिळवली. मी त्यांना यात बरीच मदत केली होती. योगायोगाने याच
काळात भाऊंचा अंबाजोगाई प्रवास ठरला होता. मी त्यांना विनंती केली की, या शाळेची सुरुवात तुमच्या उपस्थितीत
व्हावी. मनात एकीकडे शंका होती की—भाऊंनी सांगितलेले आध्यात्मिक एकीकरणाचे काम मी
स्वीकारले नाही आणि त्यांनी ज्याला विरोध केला होता, तेच शाळेचे काम मात्र मी त्यांच्या
उपस्थितीत सुरू करत होतो. पण एक मात्र पक्के होते, आपल्याला कोणताही मुखवटा घालून
त्यांच्यासमोर वागायचे नाही.
भाऊ लगेच तयार झाले. शाळेतील पहिल्या
पालक बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे नाव आम्ही 'स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर'
असे ठेवले होते. त्या दिवशी मी एक मोठी
गोष्ट शिकत होतो—कार्यकर्त्यांना प्रयोग करण्याचे आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य
अजिबात न हिरावता, त्यांना
स्व-विकासाच्या आणि देशविकासाच्या मार्गावर सतत मार्गस्थ करण्यासाठी योग्य ती मदत
करत राहणे. 'चांगल्या संघटकाला हे
नक्कीच जमले पाहिजे,' या
विचारात मी कित्येक दिवस गढून गेलो होतो.
भाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञान,
कर्म आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम
होता. इतक्या उंचीवर असूनही त्यांच्यातील 'दंभहीन' स्वभाव
मला कायम प्रेरणा देत राहील. आपण जसे आहोत, तसे त्यांच्यासमोर वावरता आले, यातच त्यांच्या सहवासाचे खरे यश होते.
'स्व' कडून 'सर्व' कडे: पंचकोश विकसनाचे तत्त्वज्ञान
भाऊंनी 'पंचकोश विकसन' ही संकल्पना केवळ पुस्तकातून शिकवली
नाही, तर ती जगून दाखवली:
·
अन्नमय
कोश: वयाची
सत्तरी ओलांडल्यानंतरही त्यांचे सूर्यनमस्कार आणि योगासने म्हणजे शरीरावर मिळवलेले
प्रभुत्व होते.
·
प्राणमय
कोश: त्यांच्या
आवाजातील तो खणखणीतपणा त्यांच्या प्राणायामाच्या साधनेतून आला होता.
·
विज्ञानमय
कोश: एखादा
विषय मुळापासून समजून घेण्याची त्यांची वृत्ती. भाऊ जेव्हा पंचकोशावर बोलायचे,
तेव्हा ते एखाद्या शिक्षकासारखे नाही,
तर प्रयोगांती सिद्ध झालेल्या
शास्त्रज्ञासारखे वाटायचे.
अहंकाराचा अभाव आणि निरलस सेवा
विवेकानंद केंद्रात किंवा प्रबोधिनीत
भाऊंची उंची हिमालयासारखी होती, पण
त्यांच्या वागण्यात त्याचा लवलेशही नसायचा. अनेकदा बैठकांमध्ये ते साध्या कार्यकर्त्याप्रमाणे
कोपऱ्यात बसून ऐकत असत. कुणी नमस्कार करायला आले, तर ते तितक्याच नम्रतेने प्रतिसादात्मक
कृती करत. त्यांच्या पांढऱ्या शुभ्र धोतरासारखेच त्यांचे चारित्र्य पारदर्शक होते.
"संस्था मोठी आहे, मी
केवळ तिचा खारीचा वाटा उचलणारा एक घटक आहे," हा भाव त्यांच्या प्रत्येक कृतीतून
झळकायचा.
मौनातील संवाद: एक उत्तम श्रोता
भाऊ समोरच्याचे म्हणणे खूप शांतपणे ऐकून
घेत असत. आजच्या काळात 'बोलणारे'
खूप आहेत, पण 'ऐकणारे' दुर्मिळ आहेत. भाऊ समोरच्याचे म्हणणे
केवळ कानाने नाही, तर
मनाने ऐकायचे. म्हणूनच एखादा युवक जेव्हा त्यांच्याशी वाद घालायचा, तेव्हा ते त्याच्याकडे रागाने न पाहता
कौतुकाने पाहायचे. कार्यकर्त्याला आपले मत मांडण्याची मोकळीक देऊन, त्याच्यातील वैचारिक प्रगल्भता वाढवणे
ही भाऊंची जडणघडण करण्याची खास पद्धत होती.
भाऊंचे आयुष्य म्हणजे
'एक जीवन, एक ध्येय' याचे चालते-बोलते उदाहरण होते. वैयक्तिक
आयुष्यातील सुख-दुःखा पलीकडे जाऊन देशकार्य कसे करावे, हे त्यांच्याकडे पाहून शिकता यायचे.
ज्ञान प्रबोधिनीची
प्रार्थना हे केवळ एक गीत नसून ती संघटनेच्या कार्यकर्त्यांची 'जीवनप्रणाली' आहे. स्व. वामनराव अभ्यंकर (भाऊ) यांचे जीवन आहे, ते प्रार्थनेतील प्रत्येक शब्दाचा जणू जिवंत पुरावाच आहे.
प्रार्थनेतील ओळी
आणि भाऊंच्या जीवनातील प्रसंग यांचे विश्लेषण खालीलप्रमाणे करता येईल:
१. ज्ञान-कर्म-युत भक्ती-व्रत
प्रार्थनेचा गाभा
असलेला हा मंत्र (ज्ञान-कर्म-युत भक्ती) भाऊंच्या आयुष्यात कसा विणला गेला होता.
- ज्ञान: ते गणिताचे 'ऋषी' आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक होते.
- कर्म: वयाच्या सत्तरीतही त्यांचे
सूर्यनमस्कार आणि त्यांची प्रचंड कार्यक्षमता ही 'नित करू झिजवोनि काया' या ओळीचे प्रतीक आहे.
- भक्ती: त्यांची भक्ती ही केवळ देवपूजेपुरती
मर्यादित नव्हती, तर ती 'राष्ट्रार्थ भव्य कृती' करण्याची देशधर्माप्रती असलेली
भक्ती होती.
२. विज्ञान-ज्ञान अमुचे परिपूर्ण होवो
प्रार्थनेत 'विज्ञान' (शास्त्र) आणि 'ज्ञान' (आध्यात्मिक/व्यावहारिक
ज्ञान) यांचा समतोल मागितला आहे.
- भाऊ गणिताकडे जीवनाचे 'अचूक साधन' म्हणून पाहायचे. आयुष्यातील समस्या
सोडवण्यासाठी ते 'समीकरणांचा' वापर करायचे. हा त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन होता. तर गीतेचा अभ्यास आणि पंचकोश
विकसनाचे तत्त्वज्ञान हे त्यांचे परिपूर्ण ज्ञान होते.
३. निष्ठा विवेक प्रकटो मन पूर्ण शुद्ध
प्रार्थनेनुसार
कार्यकर्त्याचे मन शुद्ध आणि पारदर्शक असावे लागते ते भाऊंचे होते.
४. संघरचनार्थ सदा जपू या (संघटना आणि एकता)
प्रार्थनेत 'अनेक हृदये एकरूप' होण्याचे आणि 'संघरचने'चे महत्त्व सांगितले आहे.
'विखुरलेल्या आध्यात्मिक शक्तींच्या एकीकरणाचे' काम सुचवले होते. तसेच, 'प्रबोधिनी म्हणजे उभारी देणाऱ्या
कार्यकर्त्यांची संघटना आहे' हा अनुभव भाऊंच्या
सहवासात आला. कार्यकर्त्याला स्वातंत्र्य देऊन त्याला संघटनेशी जोडून ठेवण्याची
कला भाऊंकडे होती.
५. निंदा-प्रहार अथवा नच कोणि लोभो (स्थितप्रज्ञता)
प्रार्थनेनुसार, यश-अपयश किंवा निंदा-स्तुती यात ढळू नये.
समुद्रकिनाऱ्यावर
भाऊंनी विचारलेला प्रश्न आणि त्यांचा अत्यंत शांत चेहरा हे त्यांच्या 'स्थितप्रज्ञ' असण्याचे लक्षण आहे. मी दिलेला नकार त्यांनी तितक्याच
सहजतेने स्वीकारला. ही वृत्ती म्हणजे 'सोडू कधी न पथ हा चिर ठेवु आशा' या ओळींची प्रचिती आहे.
प्रार्थनेच्या तत्त्वांचे 'भाऊंच्या' जीवनातील प्रतिबिंब
|
प्रार्थनेतील ओळ |
भाऊंच्या जीवनातील उदाहरण |
|
'नित करू झिजवोनि काया' |
सत्तरीतील सूर्यनमस्कार आणि निरंतर
प्रवास. |
|
'बुद्ध्याचि वाण धरिले' |
'मडकं कच्चं' असलेल्या कार्यकर्त्याला बुद्धीने आणि प्रेमाने
घडवणे. |
|
'सतीचे वाण' |
'एक जीवन, एक ध्येय' या विचाराने देशकार्यासाठी स्वतःला वाहून घेणे. |
|
'अंधतेने व्रत न घेणे' |
प्रत्येक गोष्ट प्रयोगांती सिद्ध करून
(उदा. पंचकोश विकसन) स्वीकारणे. |



