भाग १६: अर्जुन विषाद योग - एक मानसशास्त्रीय विश्लेषण (८ जुलै २०२६)
शंख फुंकल्यापासून अर्जुनाची एन्ट्री होते. अर्जुन आपला 'देवदत्त' नावाचा शंख फुंकतो. त्यानंतर तो श्रीकृष्णाला सांगतो, "या युद्धात मी कुणाबरोबर युद्ध करणार आहे, हे मला पाहायचे आहे. त्यासाठी रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करा." गीतेत सांगितल्याप्रमाणे, श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह यांच्या समोर आणून उभा केला. त्यांना पाहिल्यापासून अर्जुनामध्ये (धनंजयामध्ये) अचानक परिवर्तन व्हायला लागले, बदल व्हायला लागले.
भारतीय मानसशास्त्राचा आधार
आता आपण भारतीय मानसशास्त्राच्या आधारे ही सगळी प्रक्रिया समजून घेऊया. भारतीय मानसशास्त्रामध्ये फक्त 'मन' ही संकल्पना मानली गेलेली नाही, तर त्याला 'अंतःकरण' असे म्हटले जाते. वेदान्तामध्ये या अंतःकरणाचे अधिक सविस्तर विश्लेषण केलेले आहे. याला 'अंतःकरण चतुष्टय' असे म्हटले जाते, कारण हे चार घटकांचे मिळून बनलेले असते:
1. मन (संकल्प-विकल्प करणे): अर्जुनाच्या मनामध्ये आता 'युद्ध करू की नको करू?' असा संकल्प-विकल्प (द्वंद्व) निर्माण झाला आहे.
2. बुद्धी (निर्णय घेणे): अर्जुन इथे निर्णय घेतो की, "मला युद्ध नाही करायचं, युद्ध करणं पाप आहे." आणि असे म्हणून तो रथात खाली बसतो.
3. अहंकार (मी पणाचा भाव): हा अहंकारच पहिल्यांदा स्टिम्युलंट (उत्तेजक) ठरला. "मी युद्ध करतोय, माझे स्वजन, माझे गुरु, माझे पितामह..." हा 'मी' आणि 'माझे' पणाचा भाव अहंकार निर्माण करतो.
4. चित्त (स्मृती आणि वासनांचे भांडार): या सगळ्यात अत्यंत महत्त्वाची आणि गुंतागुंतीची गोष्ट म्हणजे 'चित्त'. चित्त हे स्मृती, वासना आणि पूर्वानुभवांचे भांडार आहे. ते अंतःकरणाच्या उर्वरित तिन्ही घटकांचे मूळ अधिष्ठान आहे. चित्ताशिवाय बुद्धी निर्णय घेऊ शकत नाही आणि मन विचार करू शकत नाही.
एक उदाहरण: आपल्या आधुनिक परिभाषेत सांगायचे तर, चित्त म्हणजे 'Hard Drive' (Hard Disk) आहे. पण ही नुसती हार्ड डिस्क नाही, तर ती 'Self-Driven' (स्वयंचलित) हार्ड ड्राईव्ह आहे. म्हणजेच चित्ताला कोणतेही प्रॉम्प्ट किंवा इन्स्ट्रक्शन द्यावे लागत नाही, ते आपोआप जुने अनुभव शोधून काढते.
चित्तवृत्ती आणि त्याचे प्रकार
जेव्हा एखादी घटना घडते, तेव्हा ती चित्तावर येऊन आदळते. त्यामुळे चित्त रुपी सरोवरामध्ये तरंग निर्माण होतात, त्याला 'चित्तवृत्ती' म्हणतात. महर्षी पतंजलींनी या वृत्तींचे पाच प्रकार सांगितले आहेत:
• प्रमाण (Valid Knowledge): प्रत्यक्ष पाहणे, तर्क करणे किंवा विश्वासू व्यक्तीकडून मिळालेले ज्ञान.
• विपर्यय (Misconception/Error): चुकीचे किंवा भ्रमाचे ज्ञान. अर्जुनाच्या चित्तात नेमका हाच 'विपर्यय' झाला आहे, ज्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला.
• विकल्प (Imagination): जे प्रत्यक्षात नाही, पण कल्पनेने निर्माण केलेले भय किंवा विचार.
• निद्रा (Sleep): सुषुप्त अवस्था, जिथे काहीही नसण्याचा अनुभव साठवला जातो.
• स्मृती (Memory): जुन्या आठवणी आणि पूर्वानुभव सक्रिय होणे. अर्जुनाचा रथ जेव्हा द्रोणाचार्य आणि भीष्मांच्या समोर गेला, तेव्हा त्याची 'स्मृती' सक्रिय झाली. त्या स्मृतीतून 'विकल्प' (कल्पनेचे घोडे) धावू लागले—"वर्णसंकर होईल, कुलधर्म नष्ट होईल." हा विचारांचा संघर्ष म्हणजेच 'विपर्यय' होता, ज्याने अर्जुनाच्या अंतःकरणात सुनामी आणली.
वृत्तींचे वर्गीकरण: क्लिष्ट विरुद्ध अक्लिष्ट
वृत्ती प्रामुख्याने दोन प्रकारच्या असतात:
• क्लिष्ट वृत्ती (Painful): ज्या वृत्ती आपल्याला दुःखी करतात, मोहात पाडतात किंवा रागाकडे नेतात.
• अक्लिष्ट वृत्ती (Non-painful): ज्या वृत्ती आपल्याला सत्याकडे नेतात आणि मन शांत करतात.
अर्जुनाच्या मनात सध्या 'क्लिष्ट वृत्ती' निर्माण झाली आहे. आपल्या गुरूंना आणि पितामहांना पाहून त्याच्या स्मृती जागृत झाल्या, कल्पनेतून भीती, गोंधळ आणि अस्वस्थता निर्माण झाली.
योगाची सुरुवात आणि 'विषाद योग'
या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जुनाची 'साक्षी भावना'. अर्जुनाने आपल्या मनात चाललेला हा सगळा गोंधळ, भीती आणि अस्वस्थता लपवून ठेवली नाही. त्याने ती अगदी स्पष्टपणे, शब्दबद्ध करून श्रीकृष्णासमोर मांडली. तो पळून गेला नाही, तर तो परिस्थितीला सामोरे गेला (Confront केले) आणि स्वतःचा Acceptance (स्वीकार) दाखवला की, "हो, मला सध्या असे वाटते आहे."
आपल्यातील चुकीच्या किंवा क्लिष्ट गोष्टीही तटस्थपणे समजून घेता आल्या पाहिजेत. अर्जुनाच्या चित्तात या वृत्तींचे केवळ तरंग नव्हते, तर तिथे 'सुनामी' आली होती. ही अवस्था एखाद्या स्त्रीला मूल जन्माला घालताना होणाऱ्या 'प्रसव वेदनेसारखी' (लेबर पेन) होती. या तीव्र वेदनेतूनच अर्जुनाला जाणीव असावी की, चित्तशुद्धी झाल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. जेव्हा आपण आपल्यातील विषाद किंवा दुःख साक्षी भावाने स्वीकारतो आणि योग्य ठिकाणी व्यक्त करतो, तेव्हाच 'योगाची' खऱ्या अर्थाने सुरुवात होते. म्हणूनच, अर्जुन केवळ 'विषाद' ग्रस्त राहिला नाही, तर त्याच्या या वेदनेचे रूपांतर 'अर्जुन विषाद योगात' झाले.
________________________________________
भाग १७: सांख्य योग - महर्षी कपील आणि गीता (९ जुलै २०२६)
श्रीमद्भगवद्गीतेचा दुसरा अध्याय म्हणजे 'सांख्य योग'. हा अध्याय गीतेचा आत्मा आणि संपूर्ण तत्त्वज्ञानाचा पाया मानला जातो. पहिल्या अध्यायातील अर्जुनाचा विषाद दूर करून त्याला कर्तव्याची जाणीव करून देण्याचे काम या अध्यायातून सुरू होते.
दर्शन ही संकल्पना
भारतीय अध्यात्मिक आणि तत्त्वज्ञानाच्या परंपरेत 'दर्शन' या शब्दाचा अर्थ पाश्चिमात्य 'फिलॉसॉफी' (Philosophy) पेक्षा अधिक व्यापक आणि सखोल आहे. 'दर्शन' या शब्दाची व्युत्पत्ती 'दृश्यते अनेन इति दर्शनम्' अशी केली जाते, म्हणजेच "ज्याच्याद्वारे सत्य पाहिले जाते किंवा ज्याच्याद्वारे सत्याचे साक्षात् दर्शन घडते, ते दर्शन." भारतीय परंपरेत दर्शनाचे स्वरूप केवळ बौद्धिक चर्चा नसून ते 'अनुभवावर' आधारित आहे.
सांख्य दर्शन: भारतीय परंपरेतील सर्वात जुने तत्त्वज्ञान
'सांख्य' हे भारतीय संस्कृतीतील षड्दर्शनांपैकी (सहा तत्त्वज्ञान) पहिले आणि सर्वात जुने दर्शन मानले जाते. एका अशा काळात जेव्हा समाजात कर्मकांड, यज्ञ-यागांचे अवडंबर प्रचंड माजले होते आणि खऱ्या धर्माला ग्लानी आली होती, तेव्हा महर्षी कपील यांनी या बुद्धिप्रामाण्यवादी सांख्य दर्शनाची मांडणी केली.
महर्षी कपील आणि 'कपिल गीता'
श्रीमद्भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्णाने महर्षी कपील यांचे महत्त्व सांगताना म्हटले आहे: "सिद्धानां कपिलो मुनिः" (अर्थात सिद्धांमध्ये मी कपील मुनी आहे). कपील मुनींना भगवान विष्णूंच्या २४ अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांच्या जन्माची एक कौटुंबिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. कपील मुनींचे वडील कर्दमा ऋषी यांनी जेव्हा वानप्रस्थाश्रम स्वीकारला, तेव्हा त्यांच्या मातोश्री देवहुती यांच्या मनात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली. आईची ही व्याकुळता दूर करण्यासाठी कपील मुनींनी त्यांना जो सर्वोच्च आध्यात्मिक उपदेश केला, त्याला 'कपिल गीता' असे म्हटले जाते.
सगर पुत्रांची कथा आणि गंगेचे अवतरण
महर्षी कपील यांच्याशी जोडलेली 'सगर पुत्रांची कथा' आपण सर्वजण जाणतोच. राजा सगराच्या अश्वमेध यज्ञाचा घोडा इंद्राने चोरून पाताळात कपील मुनींच्या आश्रमात लपवून ठेवला होता. घोड्याचा शोध घेत तिथे पोहोचलेल्या ६० हजार सगर पुत्रांनी तपश्चर्येत लीन असलेल्या कपील मुनींवर चोरीचा खोटा आळ आणला आणि त्यांचा अपमान केला. महर्षी कपील यांनी जेव्हा क्रोधाने आपले डोळे उघडले, तेव्हा त्यांच्या तेजाने सर्व सगर पुत्र तिथेच भस्म झाले. पुढे त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी राजा भगीरथाने आपल्या 'भगीरथ प्रयत्नांनी' गंगेला पृथ्वीवर अवतरित केले.
'सांख्य' म्हणजे काय? (प्रकृती आणि पुरुष)
हे मूलतः एक 'द्वैतवादी' (Dualistic) दर्शन आहे, ज्याचे जनक महर्षी कपिल मानले जातात. यामध्ये प्रामुख्याने २५ तत्त्वांचा अंतर्भाव होतो:
• पुरुष (चेतना/आत्मा): हा आत्मा शुद्ध, निष्क्रिय आणि निर्गुण असतो. हा सृष्टीचा निर्माता नाही, तर केवळ साक्षी आहे.
• प्रकृती (जड/पदार्थ): ही मूळ जड शक्ती आहे, जिच्यापासून संपूर्ण जगत निर्माण झाले आहे. प्रकृती ही त्रिगुणात्मक असते (सत्व, रज, तम).
• इतर २३ तत्त्वे: प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगातून महत्तत्व (बुद्धी), अहंकार, मन, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच तन्मात्रे (सूक्ष्म गुण) आणि पाच महाभूते (पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश) निर्माण होतात.
• सांख्य दर्शनाचा मुख्य उद्देश 'पुरुष' आणि 'प्रकृती' यांच्यातील भेद (विवेक) स्पष्ट करून मुक्ती प्राप्त करणे हा आहे.
सांख्य 'दर्शन' ते सांख्य 'योग'
गीतेमध्ये श्रीकृष्णाने या सांख्याला 'कर्मयोगा'ची जोड दिली आहे. जेव्हा ज्ञानाला कर्माची आणि कर्तव्याची जोड मिळते, तेव्हा ते केवळ 'सांख्य' न राहता 'सांख्य योग' बनते. फरक काय?
• सांख्य दर्शन (कपिल मुनींचे): हे एक प्रकारचे शास्त्र आहे जे सृष्टीच्या उत्पत्तीचे विश्लेषण करते. यात सृष्टी ही प्रकृती आणि पुरुषाच्या संयोगाचे फळ आहे हे सांगितले आहे.
• गीतेतील सांख्ययोग: श्रीकृष्ण अर्जुनाला 'युद्ध नको' या मोहातून बाहेर काढण्यासाठी 'ज्ञानाचा आधार' (सांख्य) देतात. ते अर्जुनाला हे पटवून देतात की, "हे शरीर मरू शकते, पण आत्मा नाही. त्यामुळे तुझ्या अज्ञानावर आधारित जो मोह (कश्मल) आहे, तो सोडून देऊन कर्तव्याच्या मार्गावर चाल." सांख्य दर्शन हे 'सत्य काय आहे' (ज्ञान) हे सांगते, तर भगवद्गीतेतील सांख्ययोग हे 'त्या सत्याचा जीवनात वापर करून कर्तव्य कसे पार पाडावे' (कर्म + ज्ञान) हे शिकवते.
________________________________________
भाग १८: अर्जुनाचा विषाद आणि श्रीकृष्णाचे 'निदान' (१० जुलै २०२६)
श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील पहिले दोन श्लोक खालीलप्रमाणे आहेत:
> संजय उवाच तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् । विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ १ ॥ (अर्थ: संजय म्हणाला - अशा प्रकारे करुणेने भरलेल्या, अश्रूंनी व्याकुळ झालेल्या आणि दुःखी असलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदनाने (श्रीकृष्णाने) हे वचन म्हटले.)
> श्रीभगवानुवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् । अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥ २ ॥ (अर्थ: भगवान श्रीकृष्ण म्हणाले - हे अर्जुना, तुला या संकटसमयी हा मोह (अज्ञान) कसा काय प्राप्त झाला? कारण हा मोह श्रेष्ठ पुरुषांना शोभणारा नाही, स्वर्गाचा नाश करणारा आहे आणि अपकीर्ती मिळवून देणारा आहे.)
अर्जुनाचा विषाद आणि कृष्णाचे 'निदान': एक विवेकपूर्ण चिंतन
संजयाने म्हटल्याप्रमाणे, 'अशा प्रकारे करुणेने भरलेल्या, अश्रूंनी व्याकूळ झालेल्या आणि दुःखी असलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदनाने हे वचन म्हटले.' येथे कवीने अर्जुनाच्या स्थितीचे आणि श्रीकृष्णाच्या 'मधुसूदन' (मधु नावाच्या दैत्याचा वध करणारा) या नावाचे जे वर्णन केले आहे, ते अतिशय प्रासंगिक आणि सुंदर आहे. प्रत्येक प्रसंगाला साजेशी अशीच नामे येथे वापरली आहेत.
अज्ञान, मोह आणि 'कृपयाविष्ट' अर्जुनाची अवस्था
पहिल्या श्लोकाचा विचार करताना, तिथे अज्ञानाचा आणि मोहाचा उगम दिसून येतो. सत्य जे आहे ते असत्य समजून वागणे किंवा असत्य ते सत्य मानणे, म्हणजेच 'अज्ञान'. जसे आहे तसे पाहण्याऐवजी जेव्हा आपण आपल्या दृष्टिकोनातून पाहतो, तेव्हा ते अज्ञान असते. अर्जुनाबद्दल येथे 'कृपयाविष्ट' हा शब्द वापरला आहे. याचा ढोबळ अर्थ 'करुणेने भरलेला' असा होतो. अर्जुनाचे हे दुःख भौतिक नाही, तर ते मोहाचे लक्षण आहे.
ही करुणा जरी 'सत्त्वगुणी' वाटत असली, तरी ती प्रत्यक्षात अज्ञानावर आधारित आहे. जेव्हा आपण स्वतःचे आत्मतत्त्व आणि कर्तव्य विसरून केवळ देहाच्या व नातेवाईकांच्या पातळीवर विचार करतो, तेव्हा आपण मोहात अडकलेले असतो. अर्जुनाचे अश्रूपूर्ण डोळे हेच दर्शवतात की, जेव्हा जीव अहंकार आणि ममत्वात (माझे आणि परके) अडकतो, तेव्हा त्याला वास्तवाचे दर्शन होत नाही. गीता आपल्याला ईश्वराच्या नावाखाली काल्पनिक जगात न जगता, वास्तवात जगायला शिकवते.
'कश्मल' – चित्ताचे मळभ
गीतेतील ४६ श्लोकांनंतर श्रीकृष्ण बोलायला सुरुवात करतात. हा श्रीकृष्णाचा अर्जुनाच्या 'विषादयोगावर' केलेले पहिले 'निदान' (Diagnosis) आहे. श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनस्थितीचे वर्णन करण्यासाठी 'कश्मल' हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण शब्द वापरला आहे. हा शब्द संपूर्ण ७०० श्लोकांमध्ये, उपनिषदांमध्ये किंवा पुराणांमध्ये क्वचितच आढळतो. 'कश्मल' म्हणजे मळ किंवा घाण. भारतीय मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचे तर, हे चित्तावर साचलेले 'मळभ' किंवा 'गढूळपणा' आहे. ज्याप्रमाणे स्वच्छ पाण्यात माती मिसळल्यास तळाचे दिसत नाही, त्याचप्रमाणे चित्तावर जेव्हा मोह, भीती आणि अज्ञानाचा मळ साचतो, तेव्हा त्याला 'कश्मल' अवस्था म्हणतात.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ही अवस्था येते. स्वतःची ही 'कश्मल' अवस्था ओळखणे, हीच प्रगतीची पहिली पायरी आहे. अर्जुन भाग्यवान होता की त्याला मार्गदर्शनासाठी साक्षात श्रीकृष्ण लाभले, पण आपल्यासाठी आपला 'विवेक' हाच श्रीकृष्ण आहे. अर्जुन ज्याला दया किंवा धर्म समजत होता, ते प्रत्यक्षात 'कश्मल' होते. हे मळभ कायमस्वरूपी नसते, ते वादळासारखे येते आणि आपल्याला अस्वस्थ करते. हे 'तात्पुरते' मळभ अर्जुनसारख्या ज्ञानी आणि पराक्रमी व्यक्तीलाही ग्रासू शकते.
मानसिक विश्लेषण आणि जीवनमूल्ये
आजच्या पाश्चात्य मानसशास्त्राच्या भाषेत 'कश्मल' म्हणजे मानसिक नैराश्य, भ्रम (Delusion) किंवा 'एस्केपिझम' (पळपुटेपणा). जब माणूस स्वतःच्या जबाबदारीला पाहून घाबरतो, तेव्हा त्याचे मन पळ काढण्याचे कारण शोधते. आपण आपल्या भीतीला 'शांतताप्रिय' असण्याचे गोंडस मुलामे लावतो, ज्याला मानसशास्त्र 'रॅशनलायझेशन' (Rationalization) म्हणते. ज्ञानेश्वर माऊलींनी याचे वर्णन 'अमृताच्या ताटात विषाचा थेंब' असे केले आहे.
जेव्हा आपण आळसामुळे किंवा भीतीमुळे कर्तव्याच्या मार्गावरून मागे हटतो, तेव्हा समजून घ्यावे की आपल्या चित्तावर 'कल्मष' साचले आहे. हे मळभ झटकून आत्मिक बळावर उभे राहणे, हाच गीतेचा संदेश आहे.
कीर्ती आणि स्वर्ग
या श्लोकात 'स्वर्ग' आणि 'अपकीर्ती' हे शब्दही महत्त्वाचे आहेत. 'आर्य' म्हणजे आपल्या कर्तव्यानुसार चालणारा, समाजाचा विचार करणारा आणि भावपूर्ण बुद्धीने कार्य करणारा माणूस. स्वर्ग म्हणजे मनाची अशी शांत अवस्था, जिथे चित्तवृत्ती अस्वस्थ होत नाहीत. तसेच 'कीर्ती' म्हणजे स्वतःचे अस्तित्व अनुकरणीय किंवा दिशादर्शक बनवणे.
________________________________________
भाग १९: 'वयम्' कडून 'अहम्' कडे - भावविश्वाचा संकोच (११ जुलै २०२६)
> क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते । क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥ २.३ ॥
चक्क शिवी !!! श्रीकृष्ण अर्जुनाला शिवीच देतात .....का ?
अर्जुनाच्या मानसिक स्थित्यंतराचा उलगडा: 'वयम्' कडून 'अहम्' कडे
अर्जुनाच्या विषादाचे सर्वात सुंदर आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय विश्लेषण त्याच्या बदललेल्या भूमिकेतून स्पष्ट होते. रथ मध्यभागी येण्यापूर्वी अर्जुन एका मोठ्या 'पूर्णाचा' (Universal Whole) भाग होता. तो स्वतःला 'धर्माचा रक्षक', 'पांडवांचा प्रतिनिधी' आणि 'सत्याचा सैनिक' समजत होता. त्याचे भावविश्व विस्तृत होते—तिथे वैयक्तिक राग-लोभापेक्षा 'कर्तव्य' आणि 'न्याय' या समष्टीच्या (Collective) संकल्पना मोठ्या होत्या. हा 'वयम्' (आम्ही/समष्टी) चा भाव होता.
परंतु, रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा राहिला आणि श्रीकृष्णाने "पश्यैतान् समवेतान् कुरूनिति" (या गोळा झालेल्या कौरवांना बघ) असे म्हटले, तशी अर्जुनाची दृष्टी बदलली. समष्टीचे ते विशाल रूप एकाएकी वैयक्तिक नात्यांच्या चौकटीत बंदिस्त झाले. त्याचे विस्तृत विचारविश्व संकुचित होऊन 'मी आणि माझे' या परिघात अडकले:
• "हे माझे आजोबा..."
• "हे माझे गुरु..."
• "यांना मारून मला काय मिळणार?"
• "माझे गांडीव हातातून गळत आहे..."
सहसा आध्यात्मिक प्रवास हा 'अहम्' (मी) कडून 'वयम्' (आम्ही/ब्रह्म) कडे असा होतो. माणसाने स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन समष्टीचा विचार करावा, हा सृष्टीचा नियम आहे. परंतु, कुरुक्षेत्रावर अर्जुनाचा प्रवास नेमका उलट झाला. तो 'वयम्' च्या विशाल भूमिकेतून घसरून 'अहम्' च्या संकुचित मानसिकतेत आला.
त्याच्यातील 'योद्धा' गळून पडला आणि केवळ एक 'नतद्रष्ट नातेवाईक' जागा झाला. हाच अर्जुनाचा विषाद आहे. जो अर्जुन संपूर्ण समाजाच्या आणि धर्माच्या कल्याणासाठी लढायला निघाला होता, तो आता "माझ्या हाताने यांचा वध कसा करू?" या वैयक्तिक मोहात अडकला. त्याची वैश्विक दृष्टी धुळीस मिळाली आणि वैयक्तिक अहंता जागी झाली.
जेव्हा माणसाचा 'चित्त विस्तार' संकुचित होतो, तेव्हा त्याचे चित्त मलीन होते. या मलीनतेतूनच सात्त्विक अहंकार जन्माला येतो. मी खूप दयाळू आहे, मी किती पापभीरू आहे, मी कसा युद्ध टाळू पाहतोय—हा अर्जुनाचा स्वतःबद्दलचा भाव म्हणजेच सात्त्विक अहंकार होता. तो स्वतःला या संपूर्ण सृष्टीच्या नियतीपेक्षा मोठा समजू लागला होता.
श्रीकृष्णाच्या प्रहाराचे मानसशास्त्र
जो पूर्ण पुरुष आहे, बुद्धीचा सागर आहे, तो श्रीकृष्ण अर्जुनाला समजवून सांगण्याऐवजी इतका आक्रमक का होतो? दुसऱ्याच अध्यायात थेट 'क्लैब्यं' (नपुंसक/भेकड) सारखी जळजळीत शिवी हसडत त्याच्या हृदयदुर्बळतेवर प्रहार का करतो?
'संकुचितते'तून सात्त्विक अहंकाराचे दर्शन घडते, त्यातून 'तमोगुण' प्राधान्याने निर्माण होतो. जेव्हा कल्मष (मळ) अधिक प्रमाणात वाढतो, तेव्हा अर्जुनाच्या चित्तात एक प्रकारचा 'चिखल' निर्माण झाला आहे, जो अतिशय तमोगुणी आहे.
1. सांख्य दर्शनाच्या (द्वैतवादी) माध्यमातून: सांख्य फिलॉसॉफीच्या माध्यमातून पाहिले तर, अर्जुन पूर्णपणे 'तमोगुणामध्ये' (जडत्व, मोह, अज्ञान) गुरफटलेला दिसतो. त्याचे हे वागणे त्याच्या प्रकृतीला साजेसे नाही.
2. अद्वैत वेदांत (अद्वैतवादी) माध्यमातून: अद्वैत तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर, अर्जुनाची 'देहबुद्धी' (Body consciousness) मोठ्या प्रमाणावर जागृत झाली आहे. तो त्याच्या मूळ 'आत्मस्वरूपाला' पूर्णपणे विसरून गेला आहे. अशा परिस्थितीत, जो तमोगुणाला छेद देऊ शकेल आणि देहबुद्धीला पुन्हा जागृत करू शकेल, अशाच कठोर संवादाची गरज आहे.
श्रीकृष्णाची भूमिका: श्रीकृष्णाने अर्जुनाच्या या कल्मषमय अवस्थेचे (चित्तातील अशुद्धतेचे) संपूर्ण आकलन केले आहे. अर्जुनाचे हे बोलणे केवळ अज्ञान दर्शवणारे आहे, हे कृष्णाने त्याला स्पष्टपणे सांगितले. त्याने या परिस्थितीची भीषणता अर्जुनासमोर मांडली आणि त्याला अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी कठोर शब्दांचा 'शॉक' दिला.
आधुनिक मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस यांच्या सिद्धांतानुसार, जेव्हा एखादा माणूस आपल्या चुकीच्या विचारांनाच 'परफेक्ट' किंवा योग्य समजू लागतो आणि त्याला तत्त्वज्ञानाचा मुलामा देतो, तेव्हा त्या विचारांवर अत्यंत आक्रमक आणि थेट प्रहार (Confrontation) करावा लागतो. सायकियाट्रिस्ट देखील अशा रुग्णांना बरे करण्यासाठी 'कन्फ्रंटेशन'चा वापर करतात.
श्रीकृष्ण नेमके हेच करतो. अर्जुनाचा स्मृतिलोप झाला आहे. जोपर्यंत त्याला तीक्ष्ण शब्दांचा धक्का दिला जात नाही, तोपर्यंत तो भानावर येणार नाही. म्हणून श्रीकृष्ण त्याच्या हृदयदुर्बळतेवर थेट प्रहार करत म्हणतो:
> क्लैब्यं मा स्म ( न ) गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते । क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥ (अर्थ: "हे पार्था, या नपुंसकतेला बळी पडू नकोस, हे तुला शोभत नाही. तुझ्या मनाचा हा क्षुद्र भित्रेपणा, ही दुर्बळता झटकून टाक आणि युद्धासाठी उभा राहा!")
येथे श्रीकृष्ण अर्जुनाला 'पार्थ' हे संबोधन देतात, याचे मुख्य कारण म्हणजे 'पार्थ' म्हणजे 'पृथेचा पुत्र'. 'पृथा' हे कुंतीचे मूळनाव आहे. कुंती ही कृष्णाची आत्या होती. या नात्याने श्रीकृष्ण आणि अर्जुन हे आतेभाऊ आणि सखे मित्र आहेत. एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी आपण उपदेश करतो, त्यावेळी आपला काय अधिकार आहे हे देखील सांगावे लागते. असा अधिकार स्पष्ट करण्यासाठी श्रीकृष्ण अर्जुनाला 'पार्थ' म्हणून संबोधून, त्याच्या पाठीशी असलेल्या कौटुंबिक आणि भावनिक नातेसंबंधांचा दाखला देतात.
________________________________________
भाग २०: गोंधळलेल्या अवस्थेतील निर्णय - एक आत्मपरीक्षण (१२ जुलै २०२६)
ज्यावेळी चित्तावर मळभ येते आणि 'काय करावं' अन् 'काय करू नये' असा प्रश्न पडतो, तेव्हा काय केले पाहिजे? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला भगवद्गीतेतील तिसऱ्या श्लोकातून स्पष्ट होते:
> क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते । क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥
जब आपण गोंधळून जातो, तेव्हा त्याचे परिणाम आपल्या शरीरावर, प्राणांवर, मनावर, बुद्धीवर आणि विशेषतः आपल्या आनंदात दिसून येतात. अशा वेळी, गोंधळातून आपण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करायला लागतो, इतकेच नव्हे तर चुकीची कृतीही करायला प्रवृत्त होतो.
गोंधळातून निर्माण होणारे व्यावहारिक प्रश्न
• गरज आणि नीतिमत्ता: कधीकधी पैशाची तीव्र गरज असते. अशा वेळी एखादा माणूस आपल्याला लाच किंवा चुकीचा मार्ग देतो. पण आपण आयुष्यभर प्रामाणिक राहिलो असतो, तर आता लाच घ्यायची का नाही, हा नैतिक प्रश्न उभा राहतो.
• दुहेरी विचार: एक मन म्हणते, "प्रचंड घे, काय होतंय, सगळेच घेतात." तर दुसरे मन म्हणते, "नाही, हे चुकीचे आहे, असे नको करायला."
• चांगले की वाईट: आपण फक्त वाईटच नाही, तर एखादी चांगली गोष्ट करतानाही कधीकधी गोंधळलेली अवस्था अनुभवतो.
चित्तावर मळभ येणे, गोंधळलेली अवस्था ही अटळ (inevitable) आहे. ती पूर्णतः थांबवणे, आपल्यासारख्या सामान्य माणसाला सहज शक्य नाही. पण अशा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आपण नेमके काय करायला पाहिजे, हे या श्लोकातून स्पष्ट होते. आपण आपले 'हृदयदौर्बल्य' सोडून, स्वतःच्या कर्तव्यासाठी उठले पाहिजे, म्हणजेच धैर्याने निर्णय घेऊन कृती केली पाहिजे.
संकटाच्या वेळी स्वतःला सावरण्याचे तीन मंत्र
जेव्हा बुद्धी गोंधळून जाते आणि निर्णयक्षमता थंडावते, तेव्हा परिस्थितीवर मात करण्यासाठी विशिष्ट गोष्टींचे स्मरण आणि आचरण करणे गरजेचे असते. श्रीकृष्णाने अर्जुनाला नेमके हेच तीन डोस देण्यासाठी 'पार्थ' आणि 'परन्तप' या शब्दांची योजना केली आहे.
‘पार्थ’: हक्काच्या नात्याची वत्सल हाक
या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला ‘पार्थ’ म्हणून हाक मारतात. या संबोधनामागे एक फार मोठा कौटुंबिक इतिहास आणि भावनिक जिव्हाळा दडला आहे. श्रीकृष्णाचे वडील वसुदेव आणि अर्जुनाची आई कुंती हे सख्खे बहीण-भाऊ होते. कुंतीचे मूळ नाव ‘पृथा’ होते, जी राजा शूरसेन यांच्या पोटी जन्माला आली होती. पुढे शूरसेनांचे मित्र राजा कुंतीभोज यांना अपत्य नसल्यामुळे त्यांनी पृथाला दत्तक घेतले, आणि म्हणूनच तिचे नाव ‘कुंती’ झाले.
या पृथेचा (कुंतीचा) पुत्र म्हणजेच ‘पार्थ’. तसे तर युधिष्ठिर आणि भीम हेही कुंतीचेच पुत्र होते, पण ‘पार्थ’ हे नाव फक्त आणि फक्त अर्जुनासाठीच रूढ झाले.
जेव्हा अर्जुन रणांगणावर हताश होऊन बसतो, तेव्हा श्रीकृष्ण त्याला ‘पार्थ’ म्हणून आळवतात. त्यामागे भगवंताचा हेतू हाच आहे की, "अर्जुना, तू माझ्या सख्ख्या आत्याचा मुलगा आहेस. आपण केवळ रणांगणावरील सेनापती आणि योद्धा नाही आहोत, तर तू माझा भाऊ आहेस, माझा सखा आहेस!" हा जो नात्याचा हक्क आहे, तोच श्रीकृष्णाला ती अधिकारवाणी देतो. हा आपला हक्काचा भाऊ, आपला मित्र आहे म्हणूनच श्रीकृष्ण त्याला एवढ्या अधिकारानं आणि प्रेमानं "क्लैब्यं मा स्म गमः" (या नपुंसकतेला प्राप्त होऊ नकोस) अशी वत्सलतेची ‘शिवी’ देऊ शकतो. जिथे अत्यंत जवळीक असते, तिथेच असा अधिकार चालतो!
शिवाय, कुंतीचे जीवन हे कर्तव्याने रसरसलेले होते. तिने कधीही कर्तव्यापासून पाठ फिरवली नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या आईच्या संघर्षाची आठवण करून देतात, "तू त्या कर्तव्यनिष्ठ मातेचा पुत्र आहेस, जिने कधी संकटांसमोर गुडघे टेकले नाहीत. मग तू असा पदच्युत कसा होऊ शकतोस?"
‘परन्तप’: अथांग पराक्रमाची जाणीव
याच श्लोकाच्या उत्तरार्धात श्रीकृष्ण त्याला दुसरे संबोधन वापरतात— ‘परन्तप’! व्याकरणानुसार ‘परन्तप’ या शब्दाची फोड ‘परम् + तप’ अशी होते. ‘पर’ म्हणजे शत्रू आणि ‘तप’ म्हणजे ताप देणारा, जाळून भस्म करणारा. म्हणजेच— "ज्याच्या तेजाने शत्रूचा थरकाप उडतो, जो शत्रूला घाम फोडतो, तो ‘परन्तप’!"
अर्जुनाने आजवर अनेक युद्धे गाजवली होती. त्याचा गांडीव धनुष्याचा केवळ टणत्कार ऐकला तरी शत्रूची हृदये धडधडू लागायची. श्रीकृष्ण इथे एका सुंदर विरोधाभासाचा वापर करतात. ते म्हणतात, "अर्जुना, तू ‘परन्तप’ आहेस! तुझ्या नावाने शत्रू थरथर कापतात; आणि आज तू स्वतःच रडत बसला आहेस? तुझे हात-पाय गळले आहेत, गांडीव हातातून सुटत आहे आणि तू मूळमुळू रडत आहेस? हे तुला शोभते का?"
जसा एखादा सिंह स्वतःचे अस्तित्व विसरून शेळीसारखा वागू लागतो, तेव्हा त्याला त्याच्या डरकाळीची आणि जंगलाच्या राजेपणाची म्हणजेच त्याच्या भूतकाळातील जबरदस्त पराक्रमाची आठवण करून द्यावी लागते; तसेच श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या इतिहासाशी, त्याच्या पूर्वजांच्या शौर्याशी आणि त्याच्या स्वतःच्या अफाट अस्तित्वाशी जोडतात.
नात्याचा आणि कर्तव्याचा सुवर्णसंगम
हा श्लोक आपल्याला शिकवतो की, जेव्हा माणूस स्वतःचे मूळ अस्तित्व विसरून गोंधळलेल्या अवस्थेत जातो, तेव्हा त्याला जागृत करण्यासाठी दोन गोष्टींची गरज असते: एक म्हणजे ‘हक्काचे प्रेम’ आणि दुसरी ‘कर्तव्याची जाणीव’.
श्रीकृष्णाने ‘पार्थ’ म्हणून प्रेमाचा आणि नात्याचा हात देऊन आई-वडिलांच्या संस्कारांची आठवण करून दिली, तर ‘परन्तप’ म्हणून भूतकाळातील जबरदस्त कामांची जाणीव करून देत अर्जुनाला स्वतःलाच एक वैचारिक 'शॉक' दिला. व्यासांच्या लेखणीतून उतरलेला हा संवाद म्हणूनच केवळ ऐतिहासिक राहत नाही, तर तो प्रत्येक माणसाच्या मनातील संभ्रमावर फुंकर घालणारा एक नितांत सुंदर आध्यात्मिक ठेवा बनतो.
भाग २१: सूडबुद्धीकडून कर्तव्यबुद्धीकडे - भगवद्गीतेचा परिवर्तनाचा मार्ग (१३ जुलै २०२६)
लहानपणी खोलेश्वर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मी तीन-चार दिवस एक भाषण ऐकत होतो. ते भाषण दाजी पणशीकर यांचे होते. पुढे त्यांचे एक पुस्तक फार प्रसिद्ध झाले – 'महाभारत: एक सुडाचा प्रवास'.
ते भाषण ऐकताना खूप छान वाटले होते. असेच काहीसे वर्णन भैरप्पानीही त्यांच्या कादंबऱ्यांमधून केले आहे. इरावती बाईंच्या 'युगांत'मध्येही अशाच पद्धतीचे वर्णन येते. पण 'भगवद्गीता' आणि 'सूड' हे मला काही जुळताना (कोरिलेट होताना) दिसत नव्हते. माझ्या मनामध्ये नेहमी असा प्रश्न असायचा की, महाभारतामध्ये भगवद्गीता आहे आणि मग भगवद्गीतेचे अस्तित्व असताना 'सूडाचा प्रवास' कसा काय?
'सूड' ही भावना जी आहे ना, ती तमोगुणी-रजोगुणी भावना आहे. प्रतिशोध घेणे ही रजोगुणी भावना आहे. अनेकांनी प्रतिशोध घ्यायचे ठरवलेले असते, सूड घ्यायचा ठरवलेला असतो. पण खरोखरच, हा सूडाच्या प्रवासाचे समर्थन करण्यासाठी भगवद्गीता आहे का? म्हणजे कृष्ण अर्जुनाला यासाठी असे सांगतोय की युद्ध कर? की या सगळ्यांचे सूड सार्थकी लागतील किंवा सिद्धीस जातील? मला हे काहीतरी चुकीचे वाटते. काहीतरी गडबड होती, असे नेहमी मला वाटत होते.
आणि यावर मी विचार करायला लागलो. पहिला विचार असा केला की, 'धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे' – हा दोन सूडांनी पेटलेली लोकं एकमेकांच्या विरुद्ध धर्मयुद्ध करतायेत, हे कसं काय होऊ शकतं? हे धर्माचे युद्ध आहे, तर मग तिथे 'धर्मयुद्धा'च्या ऐवजी 'सूडयुद्ध' का नाही म्हटले? असे प्रश्न मला फार पडतात. ज्यावेळी युद्धाची सुरुवात होते, शंख-भैरवी हे सगळे वाजतात, युद्ध-वाद्ये वाजतात, त्यावेळी प्रतिध्वनीत होत असेल की हा सूडाचा प्रवास आहे. हा आता मात्र मी इथे तुम्हाला फार पक्केपणाने सांगतो की, हे प्रतिशोधाचं किंवा सूडाचं युद्ध न राहता, ते कर्तव्याचं किंवा धर्माचं युद्ध होणं, याला कारणीभूत भगवद्गीता आहे.
भगवद्गीतेच्या अस्तित्वामुळे हे युद्ध 'धर्मयुद्ध' होत आहे. अन्यथा, हे अस्तित्व नसतं (या पूर्ण महाभारतामध्ये), तर नक्कीच हे 'सूडयुद्ध' झालं असतं.
आणि आता मला पक्केपणाने पटतं की 'अर्जुन-विषादयोग' म्हणजे काय नेमका? अर्जुन लढायला उभा राहिला आहे, तो कौरवांच्या वर सूड घेण्यासाठी, प्रतिशोध घेण्यासाठी, कारण आमचं राज्य त्यांनी हिरावून घेतलंय. आम्हाला त्रास दिलेला आहे, आम्हाला लाक्षागृहात मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, माझी सतत असूया केलेली आहे त्यांनी. द्रौपदीचं वस्त्रहरण केलंय, माझ्या बायकोचं वस्त्रहरण केलेलं आहे, तिचा अपमान केलेला आहे, या सगळ्याचा प्रतिशोध घेण्यासाठी आम्ही लढतोय, आम्हाला पाच गावं पाहिजेत.
असा प्रतिशोध घेणारा व्यक्ती 'धर्माचा' असतो, असं म्हणणं थोडसं विचित्र होईल. अर्जुन-विषादयोग हा अध्याय नसता आणि अर्जुनाला जर विषाद झाला नसता आणि तो लढायला लागला असता, तर हे नक्कीच 'सूडाचं युद्ध' झालं असतं. महाभारत ही 'सूडाची कथा' झाली असती. अर्जुन सूडाने पेटलेला आहे, लढायला उभा राहिलाय आणि त्याला विषाद होतोय आणि तो 'मोहाने' ग्रस्त होतोय. परंतु, मला असं वाटतं की अर्जुनाची सूडबुद्धी सुटते तिथे आणि 'मम-बुद्धी' किंवा 'आपल्या' नातीगोत्यांच्या बाबतीमध्ये असणाऱ्या नात्यांच्या बाबतीत असणारी ममत्व, मोहयुक्त बुद्धी निर्माण होते.
सूडबुद्धी संपलेली आहे आणि तिथे ममत्व निर्माण झालेलं आहे. 'माझे' असं म्हणतोय तो. आता सूड घ्यायचा नाही, प्रतिशोध घ्यायचा नाही, 'माझे' – याच्यामध्ये रूपांतर झालंय, मोहामध्ये रूपांतर झालंय त्याचं. त्यामुळे हे युद्ध सूडाने लढलं पाहिजे असं नाहीये आणि हे युद्ध मोहाने त्यागलं पाहिजे असं पण नाहीये.
उलट, हे युद्ध कर्तव्य बुद्धीने लढलं पाहिजे, धर्माने लढलं पाहिजे. मोह त्यागून नवीन युगाची सुरुवात करण्यासाठी म्हणून लढलं पाहिजे. सत्याचा विजय करायचा आहे, म्हणून हे लढलं पाहिजे. अर्थातच, सूड बुद्धीने मिळवलेला विजय नवीन युगाची स्थापना करू शकत नाही.
सूडबुद्धीने जे युद्ध होतात, त्यातून नवीन 'व्हॅल्यू सिस्टिम' तयार नाही होत. कर्तव्य बुद्धीने जे युद्ध होतात, अशी धर्मयुद्ध नवीन व्हॅल्यू सिस्टिम तयार करतात.
म्हणून 'अर्जुन-विषादयोग' हा सूडबुद्धीचा नाश करणारा आहे आणि १००% मोह बुद्धी निर्माण झालेली आहे त्याच्या मनामध्ये. म्हणजे आपण सांख्ययोगाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर, सूड हा रजोगुणाचा भाग आहे आणि मोह हा तमोगुणाचा भाग आहे. त्यामुळे रजोगुणातून निर्माण झालेला अर्जुनाचा तमोगुण आहे, हे मान्य आहे. रजोगुण आणि तमोगुण हे माणसाला देहबुद्धीकडे नेतात. सत्व आणि निस्त्रैगुण्य होणं माणसाला आत्मबुद्धीकडे नेतं.
सूड बुद्धी हा देहबुद्धीचा भाग आहे, कर्तव्य बुद्धी हा आत्मबुद्धीचा भाग आहे. त्यामुळे अर्जुन-विषादयोगाच्या माध्यमातून सूडबुद्धीचं परिमार्जन झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे आणि त्याचे मोह बुद्धीमध्ये रुपांतर झाले आहे. त्यामुळे निस्त्रैगुण्य होण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात शेवटी जातो तो 'तमोगुण'. पहिल्यांदा रजोगुण जातो, मग सत्वगुण येतो आणि जातो आणि शेवटी 'डॉरमेंट' राहतो तो तमोगुण आणि तमोगुण गेल्यानंतर माणूस निस्त्रैगुण्याकडे जाण्याची शक्यता असते. मोह रुपी तमोगुणामध्ये अर्जुन आहे, तो निस्त्रैगुण्य होण्यासाठी गीतेच्या इतर अध्यायांची गरज आहे.
परिवर्तनाचा आलेख:
सूडबुद्धीतून मोहबुद्धी (From Vengeance to Delusion) -> मोहबुद्धीतून कर्तव्य बुद्धी -> कर्तव्य बुद्धीतून ध्येय (From Duty to Goal/Purpose) -> आत्मबुद्धी (Self-Realization)
________________________________________
भाग २२: मोह आणि नात्यांचे गढूळ धागे - अर्जुनाची नैतिक कोंडी (१४ जुलै २०२६)
"मोह! म्हणजे काय ?"
मोह म्हणजे अडकून जाणे. मोह म्हणजे स्वतःला विसरणे. मोह म्हणजे दुसऱ्याचं अस्तित्व आपल्या आयुष्यात इनव्हिटेबल (अनिवार्य) करणे. त्या अस्तित्वाशिवाय आपल्या आयुष्याला अर्थ नाही, असं म्हणणे. असं मोहाच्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येईल. आपल्या हिंदी चित्रपटांमध्ये हा मोह खूप छान-छान पद्धतीने अभिव्यक्त केलेला आहे. हा मोह खूप असा मुलायम, रेशमी, मस्त असतो. तो माणसाला असा हुरळून टाकतो. मोह... प्रेम आणि मोह यांच्यामध्ये फारच गफलत केली जाते.
आपल्या आयुष्यात अनेक भावभावना येतात, पण अवास्तव मोह नावाची भावना येते ना, तेव्हा माणूस सर्वात जास्त अस्वस्थ असतो. पण काही मोह प्रचंड गोड पण असतात. मोह म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या अस्तित्वात स्वतःच्या अस्तित्वात हरवून जाणे. मोह म्हणजे आपल्याला वास्तवाच्या जमिनीवरून उचलून कल्पनेच्या आभाळात घेऊन जाणे.
अशाच अर्जुनाला आपल्या स्वजनांचा मोह झालेला आहे आणि मोह झाल्यानंतर ती व्यक्ती ज्या पद्धतीने बोलते ना, त्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की, अरे, रास्त आहे त्याचं म्हणणं! बरोबर आहे त्याचं म्हणणं! काय चुकीचं आहे? आणि नेमकं या पुढच्या श्लोकांमध्ये अर्जुन अगदी तसंच बोलतोय.
दुसऱ्या अध्यायाच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या श्लोकांमध्ये अर्जुन आपल्या मानसिक अवस्थेबाबतीमध्ये अजून स्पेसिफिक होतोय. तो थोडा आता तटस्थ झालाय. मोह झाल्यानंतर माणसाने थोडं तटस्थ होता आलं पाहिजे. गुरफटून जाणं म्हणजे मोह. हा आपण लेकरामध्ये गुरफटून जातो, आईमध्ये गुरफटून जातो, बायकोमध्ये गुरफटून जातो, पैशामध्ये गुरफटून जातो, सत्तेमध्ये गुरफटून जातो. आपल्या स्वतःच्या देहामध्ये, आपल्या विचारांमध्ये पण गुरफटून जातो. मला कधी कधी भीती वाटते, मी हे भगवद्गीतेच्या विचारांमध्ये गुरफटून तर जाणार नाही ना? हा माझा विचारांचा मोह तर नाही ना?
त्यामुळे थोडं तटस्थ होता आलं पाहिजे. अर्जुन आता थोडा तटस्थ झालाय. आता तो नैतिकतेबद्दल बोलतोय, मोरालिटीबद्दल बोलतोय. त्याच्यावर असणाऱ्या अनेक वर्षांचे संस्कार, अनेक पिढ्यांनी निर्माण केलेली जी नैतिकता आहे, त्याच्यावर तो बोलतोय. काय आहे ही नैतिकता? अगदी उपनिषदांपासून म्हणजे तैत्तिरीय उपनिषदाच्या शिक्षावल्लीपासून आपण ऐकत आलोय— 'मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव'. हा संस्कार आपल्यावर फार मोठ्या प्रमाणावर झालाय.
श्रीकृष्ण अतिशय तीव्र शब्दामध्ये, अगदी शिवी देऊन अर्जुनाची निंदा करतो, तेव्हा अर्जुन आपल्या मनाला नीट थांग घेऊन सांगतो. थोडा थांग घेतो स्वतःचा आणि म्हणतो, 'बा कृष्णा, अरे माझे वडील तर खूप आधी गेले. मग आपल्या सर्वांचा सांभाळ तर भीष्मानीच केला. भीष्माच्या या सर्व आवडत्या नातूंतून, अथवा नातवांपैकी मी एक. माझ्यासाठी भीष्म हे पितासमान आहेत, पितामह आहेत. वडिलांचं आणि आजोबांचं प्रेम त्यांनी मला दिलेलं आहे आणि मी त्यांना त्यांच्या त्या दोन्ही रूपांमध्ये पाहतो. ते माझ्यासाठी पितृदेव आहेत.
अनेक पिढ्यांनी सांगत आलेले आहेत, हे नैतिक अधिष्ठान मी कसं तोडू? मी माझ्या पितृतुल्य पितामहांच्या विरुद्ध, भीष्मांच्या विरुद्ध लढू कसं? आणि लढलो तरी त्यांना मारू कसं? हा, इच्छा मरण आहे , पण कारण मी होतोय ना ? मी बाणांचा वर्षाव त्यांच्यावर करणार आहे. त्यांना शिरपंजरी पाडणार आहे.
अरे कृष्णा, आज मला सगळे धनुर्धर अर्जुन म्हणतात, पण माझ्या मते हे कौशल्य ही क्षमता, ही ताकद निर्माण करणारे माझे गुरु द्रोणाचार्य आहेत रे! आचार्य आहेत माझे ते. अरे कितीतरी उपनिषद् काळापासून मी ऐकत आलोय 'आचार्यदेवो भव' आणि हा संस्कार माझ्यावर झालाय. कित्येक पिढ्यांपासून सांगत आलेत की आचार्य हे देव आहेत. माझ्या देवाच्या विरुद्ध मी का लढायचं? त्यांच्यावर बाणाचा वर्षाव का करायचा? त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन आशीर्वाद घ्यायचे आणि ते सांगतील ते प्रमाण म्हणायला करायचे. इथे तर मी त्यांच्यावर बाणाचा वर्षाव करतोय.
अरे माझे त्यांच्याशी भावनिक बंध आहेत. द्रोणाचार्यांचा मी सर्वोत्तम, सर्वात लाडका शिष्य आहे, भीष्माचा मी सगळ्यात लाडका नातू आहे. या दोघांनी माझ्यावर अतिशय प्रेम केलेलं आहे, त्यांच्यावर बाणाचा वर्षाव कसा करायचा? एक तर माझे व्यक्तिगत भावभावना तू समजून घे. अरे माझं त्यांच्याशी घट्ट नातं आहे रे! एक वेगळाच ऋणानुबंध आहे माझा. मी जे काही आहे ना आता, या असण्यामध्ये त्या दोघांचं प्रचंड मोठं योगदान आहे आणि आपला सगळा समाज, आपल्या सगळ्या परंपरा, रुढी.
मी कसा त्यांच्याशी युद्ध करू? एक तर माझे व्यक्तिगत भाव आणि नातं, याचा प्रश्न आहे. दुसरा, पिढ्यानपिढ्यांचा संस्कार माझ्यावर जो झाला आहे त्याचा प्रश्न आहे. असे, असे प्रश्न अतिशय सुंदरपणे अर्जुन विचारतो. भगवद्गीतेतल्या संस्कृतचं ज्याला नीट आकलन आहे, त्यावेळी त्या संस्कृत भाषेतल्या त्या श्लोकांचा भाव आपल्याला लक्षात येतो. आपण पण गुरफटून जातो हे सगळं करताना. या श्लोकाचा नीट भावार्थ समजून घेत असताना आणि महाभारताची पार्श्वभूमी समजून घेताना, आपल्याला असं वाटायला लागतं की, अर्जुन म्हणतोय ते बरोबर आहे.
मोहामध्ये अडकलेली व्यक्ती इतकी सुंदर तत्त्वज्ञान सांगून, सगळ्या गोष्टींचे दाखले देते की, आपण कसे बरोबर आहोत, हे पटवून देते. हो, व्यक्तिगत पातळीवर अर्जुन बरोबर आहे. पण आपलं अस्तित्व व्यक्तिगत पातळीवरच फक्त असतं का हो? ओके! इव्हन कौटुंबिक पातळीवरदेखील अर्जुन बरोबर आहे. मी म्हणेल, सामाजिक किंवा नैतिक पातळीवर सुद्धा अर्जुन बरोबर आहे. मग अर्जुन चुकतोय कुठं? आपल्यासारखे सामान्य माणूस असाच अनेक वेळा संभ्रमीत होतो. अरे माझं आर्थिक नुकसान होणार आहे, माझ्या मुलांच्या प्रती, माझ्या बायकोच्या प्रती, माझ्या आई वडिलांच्या प्रती माझे कर्तव्य पूर्ण करायचे आहे, माझ्या समाजाच्या समाजाने दिलेली चौकटीमध्ये, नियमांमध्ये मला वागावं लागणार आहे. ते तोडून मी जाऊ शकत नाही. मी या समाजाचा घटक आहे, मी समाजासारखं वागलं पाहिजे. नियमित कमाई आणि टेबलावर टेबलाखालची कमाई किंवा वरची कमाई, असं म्हणता येईल त्याला? मी का नाही पैसे घेतले पाहिजेत? मला लोकं आणून देतायत रे पैसे.
आणि अर्जुना, अरे कृष्णा! अरे तू तर मला इथे नपुंसक म्हणतोयस. तू तर मला इथे शुद्र म्हणतोयस, हृदय दुर्बल असणारी अवस्था आहे अशी म्हणतोयस, त्याचं हृदय दुर्बल झालेला आहे. अरे सांग बाबा, आता मी कुठे चुकतोय? कृष्णाला अर्जुनाने सबशेल आता प्रश्न विचारला, 'बाबा, मी कुठे चुकतोय सांग आता!' आतापर्यंत तो म्हणत होता, हे नको, ते नको, मला पळून गेलेलं चालेल, मी भिक्षा मागितलेली चालेल. मला कीर्ती नको, मला स्वर्ग नको, मला काहीच नको. श्रीकृष्णानी शिवी हासडली आणि जे दणका दिला, त्यामुळे अर्जुन थोडा वास्तवात आला. त्या मोह-मोह के धागेतून तो थोडा बाहेर आला आणि थोडा तटस्थ होऊन विचार करायला लागला, सांगायला लागला, जस्टिफिकेशन द्यायला लागला. पण या जस्टिफिकेशनमध्ये एक बदल आहे, तिथे तो कृष्णाला विचारतोय, बाबा रे! सांग आता मी कुठे चुकतोय? मला कळत नाहीye, तुलाच मला सांगावं लागेल.
पण अजूनही अपूर्ण अवस्था आहे. भगवंताने गीता सांगण्याची तयारी अजून झालेली नाही अर्जुनाची. अति मोह होता सुरुवातीला, त्या मोहातून त्या मोहाला नैतिक दाखले देणं अर्जुनाचं झालं. आणि मग ते नैतिक धागे देऊन झाल्यानंतर अर्जुन शेवटी म्हणतो... प्रश्न विचारतो अर्जुन कृष्णाला, आता मी कुठे चुकतोय ते तरी सांग मला! ज्ञानाच्या बाबतीमध्ये अर्जुनाच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. तो थोडासा मोहातून बाहेर येतोय, वास्तवात येतोय, स्वतःबाबतीमध्ये तटस्थ होतोय. अतिशय सुंदर पद्धतीने अर्जुनाची ही अवस्था या श्लोकांमध्ये वर्णन केलेली आहे.
> श्लोक ४: अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन । इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥ २-४ ॥ (अर्थ: अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना! मी युद्धात भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यावर बाण कसे सोडू? कारण हे दोघेही पूजनीय आहेत. हे अरिसूदना! त्यांचे पूजन करणेच योग्य आहे, मग मी त्यांच्यावर बाण कसे सोडू?)
> श्लोक ५: गुरूनहत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके । हत्वार्थकामांस्तु गुरून्निहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥ २-५ ॥ (अर्थ: या जगात गुरुजनांची हत्या करण्यापेक्षा भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे हेच श्रेयस्कर आहे. कारण जरी ते धन आणि कामनेमुळे युद्ध करत असले, तरी ते माझे गुरु आहेत. त्यांना मारून जे सुख मला मिळेल, ते रक्ताने माखलेले असेल.)
> श्लोक ६: न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः । यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥ २-६ ॥ (अर्थ: आम्हाला हेच समजत नाही की आमच्यासाठी कोणते अधिक श्रेयस्कर आहे – आम्ही त्यांना जिंकू की त्यांनी आम्हाला जिंकावे. ज्या धार्तराष्ट्रांना मारून आम्हाला जगायचीही इच्छा नाही, तेच आमच्या समोर युद्धासाठी उभे आहेत.)
> श्लोक ७: कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः । यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥ २-७ ॥
________________________________________
भाग २३: कार्पण्य-दोष-उपहत-स्वभावः - अज्ञानी शरणागतीकडून शिष्यभावाकडे (१५ जुलै २०२६)
> कार्पण्य-दोष-उपहत-स्वभावः पृच्छामि त्वाम् धर्म-संमूढ-चेताः । यत् श्रेयः स्यात् निश्चितम् ब्रूहि तत् मे शिष्यः ते अहम् शाधि माम् त्वाम् प्रपन्नम् ॥ २.७ ॥
शब्दांचा अर्थ (सोप्या भाषेत):
1. कार्पण्य-दोष-उपहत-स्वभावः:
• कार्पण्य: कृपणता, दीनता किंवा अज्ञानजन्य मोह आणि भीती.
• दोष: वैगुण्य किंवा कमतरता.
• उपहत: मारलेला, दबलेला किंवा भ्रष्ट झालेला.
• स्वभावः: आपला मूळ स्वभाव (क्षत्रियाचा पराक्रम).
• अर्थ: माझ्यातील क्षत्रियत्वाचा स्वभाव 'दीनतेच्या' किंवा 'मोहाच्या' दोषामुळे दबून गेला आहे.
2. पृच्छामि त्वाम् धर्म-संमूढ-चेताः:
• पृच्छामि: मी विचारतो आहे.
• त्वाम्: तुम्हाला (श्रीकृष्णाला).
• धर्म-संमूढ-चेताः: ज्याचे चित्त 'धर्माच्या' (कर्तव्य काय हे ठरवण्याच्या) बाबतीत गोंधळलेले आहे असा मी.
3. यत् श्रेयः स्यात् निश्चितम् ब्रूहि तत् मे:
• यत्: जे.
• श्रेयः: कल्याणकारी (सर्वात चांगले/हितकारक).
• स्यात्: असेल.
• निश्चितम्: नक्की (ठामपणे).
• ब्रूहि: सांगा (उपदेश करा).
• तत् मे: ते मला.
4. शिष्यः ते अहम् शाधि माम् त्वाम् प्रपन्नम्:
• शिष्यः ते अहम्: मी तुमचा शिष्य आहे.
• शाधि: शासन करा किंवा उपदेश करा.
• माम्: मला.
• त्वाम्: तुमच्या.
• प्रपन्नम्: शरणागतीला आलेला.
श्लोकाचा अर्थ सोप्या शब्दांत
अर्जुन म्हणतो: "माझा मूळ स्वभाव (कर्तव्य) या मोह आणि दीनतेमुळे झाकोळला गेला आहे. धर्माच्या संदर्भात (काय करावे आणि काय नको) माझी बुद्धी पूर्णपणे गोंधळली आहे. म्हणून, जे माझ्यासाठी निश्चितपणे कल्याणकारी असेल, ते मला सांगा. मी आता तुमचा शिष्य झालो आहे. मी तुम्हाला शरण आलो आहे, त्यामुळे मला योग्य तो उपदेश करा."
लक्षात ठेवण्यासारख्या काही खास गोष्टी:
• 'श्रेय' (Shreyas): अर्जुन विचारतो की, माझ्यासाठी 'प्रेय' (तात्पुरते प्रिय/आवडते) नको, तर 'श्रेय' (कायमस्वरूपी कल्याणकारक) काय आहे ते सांगा. हेच एका खऱ्या जिज्ञासू विद्यार्थ्याचे लक्षण आहे.
• 'शाधि माम्' (Shadhi Mam): येथे अर्जुन श्रीकृष्णाला केवळ मित्र मानत नाही, तर 'गुरू' मानून, "मला शिस्त लावा किंवा आज्ञा द्या" असे म्हणतोय. यात अर्जुनाचा संपूर्ण अहंकार गळून पडलेला दिसतो.
• 'धर्मसंमूढ': हे आपल्या सगळ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचे सत्य आहे. आयुष्यात जेव्हा आपण अशा परिस्थितीत येतो की जिथे दोन चांगले मार्ग (उदा. कर्तव्य विरुद्ध प्रेम) एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात, तेव्हा आपणही अर्जुनासारखेच 'धर्मसंमूढ' होतो.
________________________________________
भाग २४: अर्जुनाचा षड-स्तरीय प्रवास - अहंकाराकडून संपूर्ण शरणागतीकडे (१६ जुलै २०२६)
महाभारताच्या युद्धभूमीवर अर्जुनाच्या मनाचा जो प्रवास आहे, बुद्धीचा जो प्रवास आहे, चित्ताचा जो प्रवास आहे आणि अंतःकरणाचा जो प्रवास आहे, तो केवळ एका योद्ध्याचा व्यक्तिगत संघर्ष नसून, मानवी मनाच्या अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याच्या उत्क्रांतीचे एक शास्त्रशुद्ध रूप आहे. या प्रवासात अर्जुन सहा टप्प्यांतून जातो.
योगदर्शन (पातंजल योगदर्शन), सांख्य दर्शन आणि वेदान्त दर्शन यांच्या आधारे आपण त्याचे विवेचन करूया.
आत्तापर्यंत आपण सहाव्या टप्प्यावर आलो आहोत. तिथे तो 'शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्' असे म्हणतो. अगदी सुरुवातीला काय होतं? युद्ध सुरू होण्याआधी तो आपला देवदत्त नावाचा शंख वाजवतो आणि श्रीकृष्णाला म्हणतो, "मी कोणाबरोबर युद्ध करणार आहे, सांग. मला त्यांना पाहायचं आहे. कोण माझ्याबरोबर युद्ध करायला सज्ज आहे?" आणि तो श्रीकृष्णाला आदेश देतो, "मला मध्यभागी घेऊन जा, युद्धभूमीच्या." अशी ती स्थिती आहे.
टप्पा १: 'अहंकारी योद्धा' (युद्धारंभापूर्वीची स्थिती)
मनामध्ये सूडबुद्धी आहे. तो स्वतःच्या परिस्थितीचा नियंता समजतो. नायक आहे तो कुरुक्षेत्रावरचा. अधिकारवाणी आहे त्याच्या शब्दांमध्ये. चांगलाच रजोगुण आहे तो आता. आणि चित्ताची स्थिती चंचल आहे, क्षिप्त आहे. त्यामुळे साहजिकच चित्तदोष जो आहे तो 'प्रमाद'—स्वतःच्या वास्तवाचे विस्मरण होणे. आपण कशासाठी युद्ध करतो आहोत, हे अर्जुनाला फार सविस्तर कळलेलं नाही. तो समजतो, 'Personal Will' (वैयक्तिक इच्छा) आहे, माझी इच्छा आहे युद्ध करण्याची; ही 'Divine Will' (ईश्वरी इच्छा) अजिबात नाहीये. नवीन व्हॅल्यू सिस्टिम करायची अजिबात त्याच्या मनामध्ये नाहीये. अशा या स्थितीमध्ये आग्रही बुद्धी आहे त्याची, स्वतःच्या इच्छेला तो सत्य मानणार आहे. श्रीकृष्ण इथे मौन पाळून आहेत, कारण अहंकार जोपर्यंत स्वतःहून थकत नाही, तोपर्यंत ज्ञानाचा प्रवेश शक्य नसतो.
टप्पा २: 'विषाद-ग्रस्त स्थिती' (मोहाचा महापूर)
युद्धभूमीमध्ये मध्यभागी श्रीकृष्ण अर्जुनाला घेऊन जातात, पितामह भीष्म आणि द्रोणाचार्यांच्या समोर ते जातात आणि विषादाचा महापूर येतो. सुनामी, चित्तवृत्तीची सुनामी येते. समोर आपल्या प्रियजनांना पाहून अर्जुनाचे मन कोसळतं. त्याच्यामध्ये तमोगुण प्रबळ (Dominant) तयार होतो, चित्त तमोगुणी बनतं. चित्ताची स्थिती त्याची 'मूढ' म्हणजे थोडीशी जड आहे आणि इथे त्याला चित्तदोष जो निर्माण झालेला आहे, तो 'व्याधी' आणि 'दौर्मनस्य' (नैराश्य) आणि शरीराचा थरथराट अशा प्रकारचा आहे.
अंतःकरणाची स्थिती काय आहे? स्मृतीमधील नातेसंबंधामध्ये चित्त दुःखात बुडलेले आहे आणि बुद्धी भ्रमित आहे—भ्रमित बुद्धी आहे, जो अधर्माला धर्म म्हणू लागलाय. या स्थितीमध्ये श्रीकृष्ण एकदम निरीक्षक आहेत. अर्जुनाच्या स्वतःच्या भावनेचा तो 'निचरा' करू देत आहेत. 'They are good listeners', not a single word from Krishna.
टप्पा ३: 'गोंधळलेली आणि साशंक स्थिती' (The Stage of Confusion)
त्यानंतर दुसरा अध्याय सुरू होतो आणि दुसऱ्या अध्यायात संजयाच्या श्लोकाच्या आधी, अर्जुनाच्या या सूडबुद्धीचे, त्याच्यानंतर झालेल्या भ्रमित बुद्धीचे रूपांतर साशंक बुद्धीमध्ये होतं. अर्जुन स्वतःच्या तर्कामध्ये अडकून पडतोय. त्याची ही जी स्थिती आहे, ती बऱ्यापैकी रज आणि तम गुणांनी युक्त आहे. चित्ताची स्थिती 'विक्षिप्त' आहे, हेलकावे खाणारी चित्त आहे त्याची आणि चित्तदोष त्याचे झालेले आहेत—तो 'संशय', युद्ध करावे की नको? अनवस्थितत्व हे त्याला जास्त दिसतं.
मन संकल्प-विकल्पांच्या द्वंद्वात अडकलेलं आहे. अशी त्याची अंतःकरणाची स्थिती आहे. 'किं कर्तव्यमूढ' बुद्धी म्हणतात ना, तशी बुद्धी त्याची आहे.
टप्पा ४: 'आघात आणि धक्का' (The Stage of Impact & Ego-Dismantling)
या तिन्ही टप्प्यांमध्ये काय काय बदल होतोय, काहीही इंटरव्हेंशन न करता श्रीकृष्ण समजून घेत आहेत. आता वेळ आली आहे इंटरव्हेंशन करायची. पहिल्यांदा अचूक निदान करतायत अर्जुनाच्या स्थितीचं, त्याला 'कल्मष' असे म्हणतायत आणि मग आघात करतायत. 'क्लैब्यं' म्हणून शिवी देतायत, हृदय दौर्बल्य म्हणतायत, 'अकीर्ति' करतो अर्जुन असं म्हणतायत आणि 'उत्तिष्ठ' म्हणतायत.
चित्ताची स्थिती कशी आहे अर्जुनाची? स्तब्ध. शुद्धीसाठी तयार झालाय तो. चित्तदोष कोणता आहे त्याच्यामध्ये? 'भ्रान्तिदर्शन'. मिथ्या ज्ञानाचा नाश होतोय त्याचा आता. अहंकाराच्या पडद्याला मोठी भेग पडतेय. जागृत बुद्धी निर्माण झाली आहे त्याच्यात. श्रीकृष्ण मात्र कठोर गुरु आहेत इथे, कठोर मित्र आहेत. 'उठ' म्हणतायत ते, 'युद्धाय कृतनिश्चय' असे म्हणतायत. या आघातानंतर अर्जुन थोडा सावध होतो आणि तो 'तटस्थ निरीक्षण' करायला लागतो स्वतःचं. तटस्थता त्याच्यामध्ये येते.
टप्पा ५: तटस्थ स्व निरीक्षण (तटस्थता) - Neutral Self-Observation
अब अर्जुन स्वतःच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक स्थितीच्या पलीकडे जाऊन स्वतःचं 'ॲनालिसिस' करायला लागतो. चित्ताच्या या स्थिर होण्याची प्रक्रिया असं पण म्हणतात. चित्तदोष त्याच्यातून दोषमुक्त होण्याची परिस्थिती आहे. मनातील गोंधळ थांबून तटस्थता निर्माण होते. विवेकशीलतेकडे जाणारी बुद्धी आहे. इथे श्रीकृष्ण अर्जुनाला तटस्थ आकलन (Judgment), परिस्थितीचं तटस्थ आकलन करायला मदत करतात.
टप्पा ६: पूर्ण शरणागती (Total Surrender / Complete Surrender)
पुढे येतो सातवा श्लोक. त्या सातव्या श्लोकामध्ये अर्जुन 'मी' पण सोडून शिष्याचा भाव स्वीकारतो. चित्ताची स्थिती त्याची 'एकाग्र' होते, पूर्ण समर्पित होतो. चित्त दोषमुक्त निवृत्तीच्या मार्गाकडे जातं. अहंकार पूर्णपणे गळून पडल्यामुळे अंतःकरण अशा आरशासारखं निर्माण व्हायला लागतं. शुद्ध बुद्धी निर्माण व्हायला लागते. जिज्ञासा निर्माण व्हायला लागते आणि आता जगद्गुरु म्हणून सांख्य योगाचं ज्ञान श्रीकृष्ण द्यायला तयार होतात. अंतःकरण शुद्धीचा मार्ग हा अर्जुनाचा प्रवास, जोपर्यंत आपण अहंकारी टप्प्यात असतो, तोपर्यंत आपण दुःखात असतो. पण जेव्हा आपण 'तटस्थ निरीक्षण' करतो आणि शेवटी शरणागती घेतो, तेव्हा चित्ताची खरी एकाग्रता साधली जाते. एक आध्यात्मिक संधी आपल्याला उपलब्ध होते.
________________________________________
भाग २५: कार्पण्य दोष - चित्ताचे संकुचितपण आणि आत्मनिरीक्षण (१९ जुलै २०२६)
कार्पण्य दोष: चित्ताचे संकुचितपण आणि आत्मनिरीक्षण
मानवी जीवन हे सतत चालणाऱ्या विचारांच्या प्रवासाचे नाव आहे. या प्रवासात अनेकदा आपण अशा वळणावर येतो, जिथे आपल्याला स्वतःच्याच मानसिक स्थितीचे आकलन करणे कठीण जाते. 'भगवद्गीते'तील अर्जुनाची अवस्था ही केवळ एका योद्धाची युद्धभूमीवरील संभ्रमावस्था नव्हती, तर ती प्रत्येक मानवी मनाची एक वैश्विक अवस्था आहे. जेव्हा आपण स्वतःच्या स्थितीचे तटस्थपणे निरीक्षण करतो, तेव्हा आपल्याला स्वतःमधील दोषांचे भान येते.
चित्त, कलमष आणि गढूळता
श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनातील संभ्रमाची ओळख पटवताना त्याला 'कलमष' असे संबोधले आहे. जेव्हा आपण म्हणतो की, "चित्त कलुषित झाले आहे," तेव्हा त्याचा अर्थ चित्तामध्ये एक प्रकारची 'गढूळता' आली आहे, असा होतो. ही चित्ताची गढूळता म्हणजे केवळ मनाची अस्वस्थता नसून, ती चित्ताच्या संकुचितपणाचाच एक भाग आहे. जेव्हा चित्तामध्ये स्वार्थ, मोह आणि संशय हे तीन विकार शिरतात, तेव्हा ते चित्त गढूळ होते.
कार्पण्य दोष म्हणजे काय?
अर्जुन जेव्हा आपल्या परिस्थितीचे आकलन करतो, तेव्हा तो स्पष्टपणे म्हणतो: "कार्पण्यदोषोपहतस्वभाव:" म्हणजेच, माझ्या स्वभावाला 'कार्पण्य दोष' लागला आहे. 'दोष' म्हणजे काहीतरी गडबड किंवा चुकीचे घडणे. 'कार्पण्य' या शब्दाचा व्यावहारिक अर्थ 'कृपणता' किंवा 'कंजूसपणा' असा घेतला जातो. मात्र, आध्यात्मिक दृष्टीने याचा अधिक संयुक्तिक अर्थ 'संकुचित होणे' असा आहे. जेव्हा आपली बुद्धी, मन आणि विचार संकुचित होतात, तेव्हा तो 'कार्पण्य दोष' निर्माण होतो. चित्त संकुचित होणे आणि कार्पण्य दोष हे हातात हात घालून चालणारे आहेत; चित्त संकुचित झाले की कार्पण्य दोष निर्माण व्हायला सुरुवात होते.
चित्ताच्या संकुचितपणाची लक्षणे
चित्त संकुचित झाले की ते केवळ विचारांपुरते मर्यादित राहत नाही, तर त्याचे परिणाम शारीरिक आणि मानसिक स्तरावर जाणवतात. महर्षी पतंजलींच्या योगसूत्रांनुसार, जेव्हा चित्त स्वार्थ, मोह आणि संशयात अडकते, तेव्हा ते व्यापक विचार करू शकत नाही. अशा वेळी मनात 'दुःख आणि दौर्मनस्य' निर्माण होते. परिस्थिती मनासारखी न घडल्यास तीव्र 'दौर्मनस्य' (मेंटल डिप्रेशन) किंवा 'विकनेस' निर्माण होतो आणि माणूस स्वतःला अगतिक (Helpless) समजायला लागतो.
युद्धाच्या वेळी अर्जुनाचे मन संकुचित मोहाने ग्रस्त झालेले होते. याचा परिणाम त्याच्या शरीरावरही झाला—त्याचे गांडीव धनुष्य हातातून गळून पडले आणि त्वचा जळू लागली. यालाच 'अगम्य जेयत्व' अशी संज्ञा दिली जाते.
प्राण आणि श्वासावर होणारा परिणाम
जब मन शांत आणि विशाल असते, तेव्हा श्वासोच्छवास शांत आणि लयबद्ध असतो. मात्र, जेव्हा चित्त दोषाने भरले जाते, तेव्हा श्वासाची गती बदलते. महर्षी पतंजलींनी या सूत्रांमध्ये एक प्रकारे 'अलार्म' किंवा 'चेतावणी' दिली आहे. जर तुमच्या आयुष्यात नैराश्य, शरीराची अस्वस्थता किंवा श्वासाची गती बिघडणे असे काही घडत असेल, तर त्याचा अर्थ असा आहे की, तुमचे चित्त कुठेतरी संकुचित झालेले आहे आणि ते कोणत्यातरी मानसिक विक्षेपाने ग्रासले आहे.
थोडक्यात सांगायचे तर, 'कार्पण्य दोष' हे केवळ एक मानसिक दुबळेपण नसून ती आपली आध्यात्मिक संकुचितता आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी चित्ताला व्यापक करणे, म्हणजेच 'चित्तप्रसादम'ची अवस्था गाठणे, हेच जीवनविस्ताराचे खरे सूत्र आहे.
भाग २६: श्रेयस् आणि प्रेयस् - कल्याणाचा आणि तात्पुरत्या सुखाचा मार्ग (२० जुलै २०२६)
भगवद्गीतेच्या सातव्या श्लोकात, दुसऱ्या अध्यायामधील 'कार्पण्यदोषोपहतस्वभावः' ही स्थिती आपण पाहिली. त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा शब्द येतो, तो म्हणजे 'श्रेयस्'. अर्जुन कृष्णाला शरण जात म्हणतो, "निश्चित श्रेयस् असा मला मार्ग सांग."
यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होती की, यापूर्वी अर्जुन 'श्रेयस्' मार्गावरून जात नव्हता, कारण तो त्याच्यासाठी अयोग्य मार्ग होता. आता हा 'श्रेयस्' मार्ग नेमका काय आहे? हे आपल्याला सखोलपणे समजून घ्यावे लागेल.
श्रेयस् आणि प्रेयस्: जीवनाचे दोन मार्ग
आयुष्य जगण्यासाठी 'श्रेयस्' आणि 'प्रेयस्' या दोन महत्त्वाच्या संकल्पना व दोन मार्ग आहेत. या दोन्ही मार्गांची अतिशय सुंदर व स्पष्ट मांडणी कठोपनिषदामध्ये केलेली आढळते. कठोपनिषादाच्या दुसऱ्या वल्लीतील पहिल्या श्लोकात 'प्रेयस्' मार्गाबद्दल सविस्तर वर्णन केले आहे.
नचिकेता आणि यमराज यांची कथा
या संदर्भातील एक प्रसिद्ध कथा म्हणजे नचिकेताची कथा. नचिकेता हा एका ऋषींचा मुलगा असतो. ते ऋषी आपले सगळे सर्वस्व—संपूर्ण संपत्ती—दुसऱ्या समाजासाठी आणि लोकांसाठी अर्पण करत असतात. हे पाहून लहान नचिकेता आपल्या वडिलांना विचारतो, "मला तुम्ही अर्पण कुणाला करणार?"
पहिल्यांदा वडील या प्रश्नाचे उत्तर देत नाहीत. परंतु नचिकेता वारंवार तोच प्रश्न विचारत राहतो. शेवटी वैतागून वडील चिडून म्हणतात, "तुला मी यमाला, म्हणजेच मृत्यूला दान केलं आहे."
वडीलांचे शब्द खरे करण्यासाठी नचिकेता थेट यमलोकात पोहोचतो. मात्र, तिथे यमराज बाहेर गेलेले असतात. नचिकेतेला सलग तीन दिवस त्यांची प्रतीक्षा करावी लागते. यमराज परत आल्यानंतर त्याला म्हणतात, "तू माझी वाट पाहिलीस, तुला यासाठी कष्ट घ्यावे लागले, त्यामुळे मी तुला तीन वर देतो."
नचिकेता पहिले दोन वर मागितल्यानंतर तिसरा वर मांगताना म्हणतो, "मला असा वर दे, ज्यामुळे मृत्यूनंतर काय होते याचे सत्य मला कळेल." थोडक्यात त्याला मृत्यूचे व परलोकाचे अगाध ज्ञान हवे असते.
यमाची प्रलोभने आणि प्रेयस् मार्ग
पहिल्यांदा यमराज नचिकेतेला हे ज्ञान देण्यास तयार होत नाहीत. उलट, ते त्याला अनेक प्रकारच्या प्रलोभनांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतात.
• ही प्रलोभने प्रामुख्याने इंद्रियसुख देणारी असतात.
• माणसाला सभोवतालचा अधिकार, सत्ता व वैभव मिळवून देणारी असतात.
• मनाला लुभावणारी आणि व्यक्तीला ऐहिक मोहात गुंतवून ठेवणारी असतात.
• आयुष्यात फक्त वरवरचे छान छान वाटावे, अशा प्रकारची ती सुख असतात.
परंतु ही सर्व सुख भोगप्रधान असतात. ती भोगल्यानंतर काही काळाने संपुष्टात येतात; म्हणजेच ती नश्वर व संपणारी असतात. ही सर्व प्रलोभने मिळाल्यानंतरही, अत्यंत विवेकवादी असलेला नचिकेता यमाला स्पष्टपणे सांगतो, "नको मला या भोगप्रधान गोष्टी. मला असे ज्ञान हवे आहे, ज्यामुळे माझे दीर्घकालीन कल्याण साधले जाईल."
यावर यमराज म्हणतात की, जे मार्ग तात्कालिक सुख देतात, माणसाला इंद्रियसुखात गुरफटून टाकतात आणि तीच ती गोष्ट वारंवार करायला भाग पाडतात, त्याला 'प्रेयस् मार्ग' असे म्हणतात.
श्रेयस् मार्ग: दीर्घकालीन व व्यापक कल्याणाचा मार्ग
दूसरीकडे, नचिकेता ज्या मार्गाची मागणी करतो, तो 'श्रेयस् मार्ग' आहे.
• हा आत्मज्ञानाचा, मुक्तीचा आणि दीर्घकालीन आनंद मिळवण्याचा मार्ग आहे.
• यामध्ये केवळ स्वतःचेच नव्हे, तर अनेकांचे व्यापक हित साधलेले असते.
कठोपनिषदामध्ये या दोन्ही मार्गांचे सुंदर वर्णन आढळते. आणि अर्जुन कृष्णाला नेमका हाच 'निश्चित श्रेयस् मार्ग' दाखवण्याची विनंती करतो.
श्रेयस् आणि प्रेयस् मार्गांमधील मूलभूत फरक
जर आपण या दोन्ही मार्गांचा सूक्ष्म अभ्यास केला, तर आपल्याला यांच्यातील फरक स्पष्टपणे समजेल:
प्रेयस् मार्ग (सुखलोलुप व तात्कालिक):
• हा मार्ग माणसाला प्रिय असणाऱ्या आणि इंद्रियांना तात्पुरते सुख देणाऱ्या गोष्टींकडे नेतो.
• हा तात्पुरत्या आनंदात लीन करणारा आणि माणसाला मोहात गुरफटवून ठेवणारा मार्ग आहे.
• या मार्गावर चालण्यासाठी माणसाला आनंद मिळवण्यासाठी बाहेरच्या कुठल्यातरी गोष्टीची सतत गरज असते (उदा. पैसा, सत्ता, सुख, प्रसिद्धी इ.). यासाठी माणसाची कठीण आयुष्याची धावपळ चाललेली असते.
• हा तात्कालीन परिणाम घडवणारा आणि व्यक्तीपुरता व त्याच्या इमिजिएट अवतीभवतीच्या जगापुरता मर्यादित असतो.
श्रेयस् मार्ग (शाश्वत व कल्याणकारी):
• हा दीर्घकालीन हिताचा, मुक्तीचा आणि आत्मसमाधानाचा मार्ग आहे. हा माणसाला जगात अडकवून ठेवत नाही.
• या मार्गावर चालण्यासाठी बाहेरच्या कोणत्याही बाह्य गोष्टीची गरज पडत नाही. माणसाचे स्वतःचे मूळ अस्तित्व आणि आत्मिक सामर्थ्य हेच त्याच्यासाठी आनंदोत्सव बनून जाते.
• माणसाला काही न करताही आनंदी, शांत आणि मस्त राहता येते.
• अशा स्थितीत माणसाकडून जे कर्म घडते, त्याचा प्रभाव फार खोलवर आणि दीर्घकाळ टिकणारा असतो.
• हा मार्ग केवळ स्वतःच्या नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या व व्यापक लोकांच्या हिताचा असतो.
प्रेयस् मार्ग हा क्षणिक, तात्पुरता आणि फार मोठी ताकद किंवा शांती देऊ शकणारा नसतो; कारण तो बाह्य जगावर अवलंबून असतो. याउलट, श्रेयस् मार्ग हा मनाच्या व बुद्धीच्या पातळीवर सर्वाधिक परिणाम घडवणारा, दीर्घकालीन आनंदाची प्रचिती देणारा आणि कायमस्वरूपी शांती देणारा असतो.
याच कारणामुळे अर्जुनाला केवळ स्वतःचे हित किंवा तात्पुरती सुखाची अनुभूती नको होती; तर त्याला आनंद, शांतता, समाधान, तृप्ती आणि त्यासोबतच संपूर्ण समाजाचे व अनेकांचे कल्याण साधणारा असावा, असा 'श्रेयस्कर मार्ग' हवा होता. म्हणूनच, तो श्रीकृष्णाला अत्यंत आर्ततेने विनंती करतो की, "मला तो निश्चित असा श्रेयस्कर मार्ग दाखव!"
भाग २७: टर्निंग पॉईंट - अहंकार विसर्जन आणि आत्म-रूपांतरण (२१ जुलै २०२६)
टर्निंग पॉईंट (Turning point)
भगवद्गीतेमध्ये एक महत्त्वाचा श्लोक अर्जुनाच्या तोंडून येतो; त्यामध्ये जो वापरलेला शब्द आहे, तो आहे "धर्मसम्मूढचेताः".
सम्मूढ या शब्दाचा अर्थ येतो, पूर्णपणे गोंधळलेला, संभ्रमात पडलेला, ज्याची दिशा सुचत नाही असा मूढ, अज्ञानी. चेताः म्हणजे चित्त किंवा अंतःकरणाचा भाग. अशा अर्थाने 'धर्मसम्मूढचेताः' अशी परिस्थिती अर्जुनाची झालेली आहे.
माझ्या भल्यासाठी, माझ्यामधल्या दिव्यत्वाच्या प्रकटीकरणासाठी (Establishment / Manifestation of Divinity and Perfection) मला नेमकं काय करायचं आहे, हे मला कळत नाही. हे करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यामधला अहंकार गळून पडायला लागतो.
अर्जुन आतापर्यंत कृष्णाला जे सांगतोय, त्यामध्ये तो स्वतःचं लॉजिक (Logic) वापरतोय, विवेक, बुद्धी आणि भावना सांगतोय; आणि त्या भावनांमध्ये संभ्रमित होऊन, सम्मूढ होऊन तो गलितागात्र झालाय. त्याला काय करावं आणि काय करू नये, हेच समजत नाही. अशा वेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते — "भाड मे गया! छोड़ दिया! खतम कर दिया!" — असं स्वतःला म्हणावं लागतं.
मी स्वतःला सोडून दिलंय, माझे डोक्यामधले सगळे गुंते, गाठोडं, गडबडी आणि घोटाळे मी काढून टाकतो आणि कोरा कागद होऊन पूर्णपणे स्वच्छ होतो. स्वतःला पूर्णतः स्वीकारून (Accept करून), हे चुकीचं आहे हे समजून मी आता प्रपन्नम्, पूर्णपणे शरणागत होऊन शरण येतो तुला.
असं ज्यावेळी होतं, त्यावेळी अर्जुन म्हणतो — 'शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्'.
• शिष्य म्हणजे मी तुझा शिष्य आहे, ज्याला अनुशासन शिकवलं जातं. विद्यार्थी आणि शिष्यामध्ये फरक आहे. शिष्याला अनुशासन शिकवलं जातं आणि गरज पडली तर शासनही केलं जातं.
• शाधि (शासन करा, योग्य दिशा दाखवा, मार्गदर्शन करा, शिक्षण द्या), माम् (मला), त्वाम् (आपल्या), प्रपन्नम् (पूर्णपणे शरण आलो आहे). I'm totally surrendering to you.
मी आता पूर्णपणे कोरा कागद झालो आहे, आणि माझं आयुष्य यापुढे मला नव्याने लिहायचं आहे. माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट (Turning point) आहे. टर्निंग पॉईंट म्हणजे माझ्यामधल्या दुबळेपणाला, अयोग्यतेला, अहंकाराला आणि दांभिकतेला संपवून, माझ्यामध्ये डिव्हाइन ईश्वरी अंशाचं व गुणाचं प्रगटीकरण करण्याची माझी इच्छा आहे.
आणि त्यासाठी मला तुमचं पूर्ण मार्गदर्शन हवं आहे; तुम्ही सांगाल, ते अनुशासन मी पाळायला तयार आहे आणि मी सुप्सेलपणे (पूर्णपणे) तुम्हाला शरण आलेलो आहे. धर्मसम्मूढचेताः या स्थितीटून मार्ग काढायचा असेल, तर 'शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्' याशिवाय दुसरा पर्याय नसतो. हा गीतेचा टर्निंग पॉईंट आहे. विषाद झाला नसता, तर अर्जुनाला आपला कार्पण्यदोष कळला नसता आणि ही धर्मसम्मूढचेताः अवस्था समजली नसती, तर त्याला हे म्हणता आलं नसतं.
आपल्या अवगुणांना, चुकीच्या विचार पद्धतींना आणि कृतींना स्वीकारणं, त्या चुकीच्या आहेत हे स्वीकारणं (Accept करणं) आणि त्या बरोबर आहेत असं प्लीड (Plead) करणं थांबवणं हे गरजेचं असतं. आपण स्वतः ग्रेट आहोत या फिलिंगमध्ये सतत असताना 'taking second thought from other' (दुसऱ्याचा सल्ला घेणे) हा विचारच निघून जातो. पण सामान्य निर्णय घेत असताना ही वरवरची स्टेज असू शकते, मात्र इथे अनेकांना मारण्याचा आणि मूल्यव्यवस्था रीइस्टॅब्लिश (Re-establish) करण्याचा निर्णय आहे, जो काळाला वेगळी दिशा देणारा आहे. यामध्ये तुम्ही ईश्वराच्या डिव्हाइन व्हीलचा (Divine wheel) एक घटक म्हणून काम करणार आहात, त्यामुळे तुमच्यामध्ये प्रपन्नता असलीच पाहिजे.
कुठल्याही अभ्यासाच्या सुरुवातीला त्याचे अनुशासन पाळावेच लागते; योगदर्शनामधील सुरुवातीचा श्लोकसुद्धा 'अथ योग अनुशासनम्' हाच आहे. इथे अर्जुन टोटल निर्मळ, स्वच्छ आणि कोरा कागद होऊन एखादी गोष्ट जशीच्या तशी रिसीव्ह (Receive) करायला तयार होतो. हा आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट असतो. अशी प्रपन्न मनाची स्थिती आल्यानंतर चहूबाजूने ईश्वरी संकेत मिळायला लागतात.
आपलं नवीन व्हर्जन (Version) तयार करण्यासाठी आपल्याला आपलं पूर्वीचं व्हर्जन माहीत असलं पाहिजे. त्यामधले 'धर्मसम्मूढचेताः' म्हणजे काय आणि काय चुकीचं घडतंय, ते आपल्याला माहीत पाहिजे. आणि नवीन व्हर्जन तयार करण्यासाठी, ज्याच्याकडे अधिक सुपीरियर व्हर्जन (Superior version) आहे, त्याच्या अनुशासनाखाली आणि मार्गदर्शनाखाली योग्य देशाने जाऊन स्वतःला रूपांतरित करण्यासाठी त्याचं शिष्य होणं आणि टोटल सरेंडर (Total surrender) असणं, पूर्णपणे शरणागत असणं, हाच या गीतेतला टर्निंग पॉईंट आहे.
________________________________________
भाग २८: इंद्रियजन्य भोगांचा दाह आणि आत्मशोधाची गोळी (२२ जुलै २०२६)
> न हि प्रपश्यामि ममापपन्याद्- यच्छोकमुच्छोषयम् इन्द्रियाणाम् । अवाप्य भूमाव्-असपत्नम् ऋद्धम्- राज्यं सुराणाम् अपि चाधिपत्यम् ॥ २.८ ॥ (अर्थ: "पृथ्वीवर शत्रूविना समृद्ध आणि वैभवशाली राज्य मिळवले किंवा स्वर्गातील देवांचे स्वामित्व (अधिपत्य) जरी मला मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना आतून शोषून टाकणाऱ्या (सुकवणाऱ्या) या शोकाला दूर करणारा असा कोणताही उपाय मला दिसत नाही.")
भोगातून नव्हे, त्यागातून शांतता
भारतीय अध्यात्मशास्त्र हे सर्वस्पर्शी आहे. भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये इटरनल पीस किंवा शाश्वत शांती किंवा शाश्वत आनंद मिळवायचा असेल, तर एक ठोस मार्ग सांगितलेला आहे. तो ठोस मार्ग म्हणजे, भोगातून तो मिळणार नाही, तो त्यागातूनच मिळेल. पण त्याग सर्वांना जमतच नसतो आणि सर्वस्वाचा त्याग करणं अशक्य असतं. त्यावरचा पुढचा टप्पा येतो—तेन त्यक्तेन भुञ्जीथाः। सर्वत्र ईश्वराचा निवास आहे, वास आहे, मग असं समजून घेऊन, उमजून घेऊन, जो आपण भोग घेतो, तो त्यागाने भोगा. असं उपनिषद सांगतात.
नचिकेता आणि भृगूचे दाखले
उपनिषद सत्य ठासून सांगतात, स्पष्टपणे सांगतात. उपनिषदांचा प्रतिनिधी नचिकेता आहे, भृगू आहे. भृगू आपलं आयुष्य म्हणजे ६० वर्ष तपश्चर्यामध्ये घालवतो आणि या निर्णयापर्यंत येतो किंवा या अनुभवापर्यंत येतो की, मानवी अस्तित्व म्हणजे आनंद आहे, माणसाचं खरं स्वस्वरूप आनंद आहे, आनंदाचा अभ्यास करणं म्हणजे ब्रह्मतत्वाचा अभ्यास करणं. याची अनुभूती आल्यानंतर तो म्हणतो—अहमन्नम् अहमन्नम् अहमन्नम्।
भृगूनं ६० वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर या मनस्थितीमध्ये येतो. तर दुसरीकडे नचिकेता आहे. तो भृगूच्या या अनुभवावर ठांब आहे आणि तो म्हणतो यमाला की, "तू जे मला सगळे सुख देणार आहेस, ते इंद्रियजन्य सुख आहेत, ते भोगून संपतात. मला असं ज्ञान हवं आहे, जे कधीही संपणार नाही, असा आनंद हवा आहे, जो कधीही संपणार नाही. माझं अस्तित्व हे आनंद महोत्सव व्हावं."
अर्जुनाची पार्श्वभूमी आणि गौतम बुद्धाचा मार्ग
आता अर्जुनाचा विचार करू. अर्जुनाकडे इंद्रप्रस्थासारखं राज्य होतं. तो धनुर्धारी फार ग्रेट माणूस होता. त्याचबरोबर त्याला अनेक गोष्टी सोसाव्या लागल्या. तो बृहन्नला पण झाला, म्हणजे त्याला स्त्रीवेषात राहावं पण लागलं. क्षत्रियाला स्त्रीवेषात राहणं ही अतिशय अवघड गोष्ट. त्याच्या स्वतःच्या पत्नीचे वस्त्रहरण त्याला प्रत्यक्ष अनुभवावे लागले.
म्हणजे एकीकडे त्यांनी श्रीमंतीचा अनुभव घेतला होता, दुसरीकडे प्रचंड दुःखाचा अनुभव घेतला होता, हतबलतेचा अनुभव घेतलेला होता आणि युद्धाच्या वेळी मात्र तो मोहामध्ये अडकतो आणि तो म्हणतो की, निष्कंटक, कुणीही विरोधक नाही असं, कुठलाही अडथळा नाही असं सार्वभौम, सगळ्यांनी मान्य केलेलं, असं जगाचं नेतृत्व जरी मिळालं आणि स्वर्गामधली सर्व सुख अगदी स्वर्गाचा तो स्वामी झाला, इंद्र झाला, तरी ते सगळं सुख मिळालं तरीही माझ्यामध्ये निर्माण झालेला ह्या इंद्रियांचा दाह जो आहे, तो काही शमत नाही.
असंच काहीसं गौतम बुद्धा बाबतीत झालेलं दिसतं. अतिशय सुंदर, मस्त जीवन जगणारा गौतम बुद्ध, जीवनाचं सत्य पाहतो आणि त्याला ते सगळं सुख सोडावसं वाटतं आणि आत्मज्ञानाच्या पाठीमागे तो लागतो. आणि त्या आत्मज्ञानाचा शोधासाठी तो जंगल-जंगल भटकतो.
कलिंगाचा युद्ध झालेला नंतरचा अशोका, याची अवस्था काय, तसेच होते ना? अगदी सहजच म्हणायचं झालं तर लिओ टॉलस्टॉय आपण घेऊ, प्रचंड ताकदवान असणारा हा माणूस सुखामध्ये आणि श्रीमंतीमध्ये आणि ऐश्वर्यामध्ये जगलेला या माणसाला अशा इटरनल नॉलेजची का गरज पडावी? त्याच्यामध्ये ही जिज्ञासा का निर्माण व्हावी, की मला अजून काहीतरी शाश्वत सुख हव आहे. आणि तो बायबलमधल्या सरमन ऑन द मॉन्क्सचा सहारा घेतो.
• भृगु सारखा — सतत प्रयत्न करत राहा, साठ वर्षाचा आयुष्य घाला आणि सत्य काय आहे ते समजून घेऊन काम करा.
• दुसरा मार्ग आहे नचिकेताचा — उपनिषद, भूतकाळातले अनुभव, ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींचे अनुभव हे समजून घेऊन आता सावध व्हा आणि इटरनल आनंदाचा शाश्वत आनंदाच्या शोधासाठी निघा.
• तीसरा मार्ग आहे अर्जुनाचा — सगळी अनुभूती घ्या आणि एका क्षणाला तुम्ही ज्यावेळी खोल गर्तेत जाल, त्यावेळी तुम्हाला भोगप्रदान व्यवस्थेपेक्षा त्यागप्रदान व्यवस्था ही जास्त शाश्वत आनंदाकडे घेऊन जाते, हा एक मार्ग मिळतो.
• गौतमासारखं डोळे उघडून बघा, की मानवी मन मानवाचं अस्तित्वाचं चिरंतन सत्य समजून घ्या आणि पुढे जा.
आपण सामान्य माणूस आहोत. आपल्याला धड भृगू होता येत नाही, नचिकेता होता येत नाही, अर्जुन होता येत नाही, गौतम होता येत नाही, टॉलस्टॉय होता येत नाही किंवा आपल्या आयुष्यात आपण कधी अशोक पण होणार नाहीत. आपल्या आयुष्यामध्ये लिमिटेशन्सच असे आहेत की, आपण फारसं इंद्रियप्रदान सुखाच्या, सुखाकडे धावू शकणार नाही. मग अशा व्यक्तीला या अध्यात्माचा नेमका उपयोग काय? "नहीं प्रपश्यामि ममापनुद्यात्" अशी भावना सामान्य माणसाच्या मनामध्ये कधी येऊ शकते?
मला गीतेची ओढ लागली आणि गीतेचा अभ्यास मी करायला लागल्यानंतर माझ्यामध्ये जो बदल झाला, तो या दृष्टीकडे झाला की, इंद्रियगोचर अशी जी सुख आहेत, ती पहिल्यांदा सुख वाटायला लागतात, पण नंतर ते त्रासदायक होतात.
लेखकाचा स्व-अनुभव आणि अस्वस्थता
असंच काहीसं अजून एक गोष्ट घडली, ती म्हणजे बाह्य जगताच्या पाठीमागे सैरावैरा धावत असताना असा काहीतरी एक क्षण येतो, (म्हणजे बाह्य जगता म्हणजे भोगप्रदान व्यवस्थेकडे नाही, कर्तृत्व काहीतरी गाजवायचंय, भव्य-दिव्य असं काहीतरी करायचंय) हे करत असताना असा एक क्षण येतो, की तुम्ही कोलमडून पडता. मी ही असा सुसाट धावत असताना एकदा कोलमडून पडलो आणि त्यातून बाहेर येणं अवघड व्हायला लागलं. दिवसभर पूर्ण थकलेल्या असताना सुद्धा गादीवर पडल्यानंतर कित्येक तास झोप यायची नाही. एवढंच काय तर कधीकधी दोन-दोन, तीन-three दिवस सलग झोप यायची नाही.
सुरुवातीला काहीतरी मिळवण्यासाठी मी अस्वस्थ होतो. आता मला माझं मन नावाचं जे इंद्रिय आहे, ते इतकं छळत होतं, की मला प्रचंड थकल्यानंतरची साधी झोप पण मिळत नव्हती, मला विश्रांती पण मिळत नव्हती. त्यामुळे माझ्या शरीराचा, मनाचा दाह इतका प्रचंड वाढलेला होता, की त्या क्षणी मला असं वाटत होतं, की माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी गेल्या तरी चालतील, पण मला छान झोप लागली पाहिजे. झोपेची नितांत गरज मी त्यावेळी अनुभवली.
नहीं प्रपश्यामि ममापनुद्यात्
असंच काहीतरी अर्जुनाचं झालंय. त्याला लक्षात आलंय की, हे इंद्रियजन्य जे त्रास आहेत, हे जे सगळे प्रकृतीचे त्रास आहेत, ते त्याच्या या मोहातून उत्पन्न झालेले आहेत, कार्पण्य दोषातून उत्पन्न झालेले आहेत. आता या कार्पण्य दोषातून, मोहातून, चित्तसंकुचिततेतून, चित्तभ्रांतीतून, धर्मसंमूढचेतातून बाहेर यायचं असेल, तर मला ते आत्मज्ञान झालंच पाहिजे. तर आणि तरच केवळ मी बाहेर येईल.
तुम्ही ज्यावेळी अस्वस्थ असता, त्यावेळी बाह्य जगताकडे तुम्ही भोगप्रधान गोष्टीकडे गेलात, तर ती अस्वस्थता मुळातून संपत नाही. ती तात्पुरती संपते, पण मुळातून संपत नाही. पण अर्जुनाला इथे मुळावरच घाला घालायचा आहे. मला झोप येत नाही, म्हणून मी वीस वर्ष गोळीचा सहारा घेतला. पण मला गोळी जेवढी पहिल्यांदा लागत होती, त्याच्या पुढचा डोस वाढला, त्याच्या पुढचा डोस वाढला, त्याचा पुढचा डोस वाढला, अनेक रोग लागले. मला लक्षात आलं, बाह्य गोळीतून मला ती शांतता नाही लाभणार, माझी ती इंद्रियांची अस्वस्थता नाही संपणार.
माझाही अर्जुन झाला होता—नहीं प्रपश्यामि ममापनुद्याद्यच्छोकमुच्छोषयंद्रियाणाम्। आणि मग मी आत्मशोधाचा मार्ग निवडला, गीता समजून घ्यायला लागलो. गोळ्या तर संपल्या संपल्या, आता पडल्यापडल्या झोप लागते. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ असल्यावर बाह्य जगतामध्ये जर तुम्ही घुसलात, बाह्य गोष्टींचा तुम्ही सहारा घेतला, तर तुमची अस्वस्थता मुळातून नष्ट होऊ शकतच नाही. हे शाश्वत तत्त्व या श्लोकातून व्यक्त होतं.
________________________________________
भाग २९: मन आणि बुद्धीचा संघर्ष - 'न योत्स्ये' आणि तुष्णीभाव (२३ जुलै २०२६)
कार्पण्यदोषोपहतस्वभाव, मला कार्पण्यदोष झाला आहे. हे आता अर्जुनाच्या बुद्धीला पटले आहे.
धर्मसंमूढचेताः, हे पण कळले आहे. म्हणजे माझ्या 'धर्मसंमूढ' असा जो दोष आहे, तो चित्तामध्ये निर्माण झाला आहे, हे पण कळले आहे. श्रेयस् मार्गावर जायचे आहे, हे पण कळले आहे. स्वर्गाचे सुख असो की भूतलावरची अनर्बंध सत्ता असो, ह्याने जो निर्माण झालेला आत्ताचा दोष आहे माझ्या मनामधला, तो दोन्हीने जाणार नाही. हे पण अर्जुनाच्या मनामध्ये पक्के झाले आहे. आणि तो 'शिष्योऽहम् शाधि मां त्वां प्रपन्नम्' म्हणजे तो सरेंडर, ॲब्सोल्युट सरेंडर आहे.
संजयचा श्लोक - नववा श्लोक
दोन श्लोकांचा कालचा अभ्यास झाल्यानंतर सबकॉन्शियस माइंडमध्ये असं होतं की, आता कृष्णाचा श्लोक सुरू होणार. पण सकाळी भगवद्गीता उघडली आणि समोर आला संजयचा श्लोक.
कोणता श्लोक आहे हा?
> संजय उवाच - एवमुक्त्वार्जुनं हृषीकेशं गुडाकेशः परंतपः । न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ २-९ ॥ (अर्थ आहे - हे राजा, निद्रेवर ताबा असलेल्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णाला एवढं बोलून, 'मी युद्ध करणार नाही' असं स्पष्ट सांगितलं आणि तो गप्प झाला.)
या गीता श्लोकाचा आचार्य विनोबा भावे यांनी केलेला अनुवाद असा आहे - असे अर्जुन तो वीर ऋषिकेशास बोलुनी शेवटी मीन झुंजेची या शब्दे स्तब्ध राहिला.
गुडाकेश आणि ऋषिकेश - पात्रांचे मर्म
अर्जुनाच्या या मनस्थितीचं वर्णन झाल्यानंतर संजय आता धृतराष्ट्राला सांगतोय की, अर्जुनाने मी युद्ध करणार नाही असा निर्णय घेतलाय आणि तो स्तब्ध उभा आहे.
इथे अर्जुनाचा उल्लेख संजय 'गुडाकेश' असा करतो. गुडाकेश म्हणजे निद्रेवर ज्यांचं नियंत्रण आहे असा. अर्जुनाने निद्रेप्रमाणेच स्तुती आणि आळस यावर विजय मिळवलेला आहे. कार्य करण्याच्या वेळी ज्याला निद्रा किंवा स्तुती घेरट नाही, त्याला पाहिजे तेव्हा तो विश्रांती घेऊ शकतो. निद्रा ही त्याच्या अधीन आहे, ही सिद्धी अर्जुनाकडे होती, म्हणून निद्रेचा स्वामी असं त्याला म्हटलं जात असे.
अर्जुन हा श्रेष्ठ योद्धा आहे, ज्याच्या कौशल्याबरोबरच त्याचं या इंद्रियांशी निगडित गोष्टींवर नियंत्रण आहे. झोपेवर नियंत्रण मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी इंद्रियांचा संयम राखला जातो आणि अर्जुनाने हे प्रयत्नपूर्वक साध्य केलेलं आहे.
संजय सांगतो, असं गुडाकेशानी ऋषिकेश्याला सांगितलं. भगवान श्रीकृष्णांचं उल्लेख त्यांनी 'ऋषिकेश' असा केला आहे. ऋषिकेश म्हणजे ज्याच्या अधीन इंद्रिय आहेत, जो इंद्रियांना स्वाधीन ठेवून सत्कर्मी करायला लावतो किंवा ज्यांची इंद्रिय स्वभावतः वाईट कर्माकडे प्रवृत्त होत नाहीत तो. ऋषिकेश म्हणजे वृत्ती सुख किंवा इंद्रिय यांच्या स्वामी.
तुष्णीभाव - सुन्न अवस्था
आजूबाजूच्या परिस्थितीचं भान विसरलेला, त्याच्यावरचा ताबा सुटलेला माणूस जसा स्तब्ध होतो, सुन्न होतो, तशी अर्जुनाची अवस्था झाली. या भावनेला 'तुष्णीभाव' असं म्हणतात.
एकीकडे अर्जुनाचा उल्लेख 'गुडाकेश' केलेला आहे, तर दुसरीकडे श्रीकृष्णाचा उल्लेख 'ऋषिकेश' असा केलेला आहे. झोपेवर नियंत्रण मिळवणं म्हणजे बऱ्यापैकी इंद्रियांवर नियंत्रण मिळवावं लागतं. म्हणजे पंचेंद्रियांवर तर नियंत्रण मिळवावंच लागतं, पण षडेंद्रिय ज्याला म्हटलं जातं, त्या मनावर पण नियंत्रण मिळवावं लागतं. या आधीच्याच श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो की, सर्व इंद्रियांना शोषून टाकणारा हा शोक मला दूर करायचा आहे. म्हणजे इंद्रियांवर विजय मिळवणं ही गोष्ट आहेच आहे, पण जर इंद्रियांना शोषून टाकणारा जो शोक आहे, तो मात्र दूर जात नाही. अशा वेळी ऋषिकेशाला अर्जुन शरण जातो.
असं का होतं नेमकं? म्हणजे अर्जुनाला सगळं कळायला लागलंय आता, तरीपण तो युद्धाला तयार होत नाही, तो असा पडून उभा राहतो, शांत उभा राहतो. हाँ, पहिल्यांदा बुद्धीला एखादी गोष्ट पटते.
अर्जुनाच्या बुद्धीला सगळ्या गोष्टी पटलेल्या आहेत, वर मी ज्या सांगितलेल्या आहेत. पण मनाला अजून पटलेल्या नाहीत. मन आणि बुद्धी मध्ये संघर्ष चालू आहे. अजूनही त्याचं हृदय, मन मोहाने युक्त आहे. त्यामुळे मोहयुक्त मनाने तो असल्यामुळे त्याची ही अवस्था आहे. म्हणजे माणूस पूर्ण चित्तशुद्धीकडे जात असताना किंवा पूर्ण आत्मस्वरूपाचा अभ्यास करत असताना, त्याच्या मनाला पण कन्विन्स झालं पाहिजे आणि त्याच्या बुद्धीला पण कन्विन्स झालं पाहिजे. असं दोन्ही कन्विन्स झालं, तर तो पुढे जाऊ शकतो.
त्या प्रसंगी त्याला पाहून श्रीकृष्णांना विस्मय वाटला. अर्जुनाच्या मनात द्वंद्व होतं, पण इथे मात्र त्याच्याविषयी प्रेम, भीष्म द्रोणांविषयी आदर, त्यांना ठार मारावं लागेल याची कल्पना आणि यामुळे केवळ पापाचे धनी होणार नाही, या विचारांच्या कल्लोळामुळे अर्जुन आता युद्ध करणारच नाही, या निर्णयापर्यंत आला आणि तसं भगवान श्रीकृष्णांना सांगून तो स्तब्ध झाला.
आजच्या संदर्भात हा श्लोक समजून घेतला, तर पूर्ण शरणागतीचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. एका विशेष वळणावर आपण येऊन पोहोचतो, तो हा क्षण. खूप प्रयत्न करतो, तर्क लढवतो आणि शेवटी थकून म्हणतो, "माझ्याचानी आता काही होणार नाही, मती गुंग झालीये." इथे महत्त्वाची बाब म्हणजे आपण गप्प झालो, की कदाचित दुसऱ्याचं ऐकू शकतो. विचार, तर्कवितर्क सगळं थांबलंय, मन सुन्न झालंय. इथून पुढे आपल्याला गुरु किंवा हितचिंतकांनी काही सांगितलं, तर कदाचित ऐकलं जाऊ शकतं. अशी परिस्थिती तयार झालेली आहे. जी अनेक चांगल्या आणि योग्य मार्गाने आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे.
________________________________________
भाग ३०: कुरुक्षेत्रावरील दोन युद्धे - लोकसंग्रह आणि धर्मसंस्थापना (२४ जुलै २०२६)
कुरुक्षेत्रावर लढत लढली जात असलेली दोन युद्ध
लोकसंग्रह आणि धर्मसंस्थापना: भगवद्गीतेचे तात्विक व सामाजिक मर्म
भगवद्गीतेची सुरुवात 'धर्मक्षेत्रे' या शब्दाने होते. कुरुक्षेत्राच्या भूमीवर सुरू झालेले हे युद्ध केवळ दोन कुळांमधील किंवा आप्तान्स्वकीयांमधील आपापसातील भांडण नव्हते; तर ते मानवी संस्कृतीच्या दोन वेगवेगळ्या दिशांमधील, दोन मूल्यांमधील आणि दोन जीवनपद्धतीमधील एक निर्णायक महायुद्ध होते.
या संघर्षाचे दोन सर्वात महत्त्वाचे आणि कणा असणारे मूळ विषय म्हणजे 'लोकसंग्रह' आणि 'धर्मसंस्थापना'. या दोन प्रमुख संकल्पनांच्या आधारे या युद्धाचे तात्विक आणि सामाजिक स्वरूप कसे स्पष्ट होते, याचा सखोल मागोवा खालीलप्रमाणे घेता येईल:
१. दोन प्रवृत्ती आणि दोन मूल्यव्यवस्थांचा संघर्ष
या युद्धात एका बाजूला कौरवांचा पक्ष होता, जो मूलतः असुरी प्रवृत्तीचा, लोकविघातक आणि अधर्माचा पायीक होता. तर दुसऱ्या बाजूला पांडवांचा पक्ष होता, जो धर्म, दैवी प्रवृत्ती आणि लोकसंग्रहाचा पुरस्कर्ता होता.
• अधर्म, असुरी प्रवृत्ती आणि शोषण व्यवस्था: ज्या व्यवस्थेत सत्तेचा अहंकार, अनीती, असत्य, अन्याय आणि स्वार्थी लालसा शिगेला पोहोचलेली असते, ती अधार्मिक व्यवस्था होय. समाजाची घडी विस्कटवणारी, दुर्बलांचे शोषण करणारी आणि संपूर्ण समाजात भीती व अराजकता निर्माण करणारी प्रवृत्ती ही लोकसंग्रहाच्या विरुद्ध जाणारी असुरी प्रवृत्ती असते. 'जिसकी लाठी उसकी भैंस' या न्यायानुसार चालणारी प्रस्थापित शोषण व्यवस्था हे कौरवांचे प्रतीक होते.
• धर्म, दैवी प्रवृत्ती आणि कल्याणकारी व्यवस्था: याउलट, सत्य, न्याय, उच्च मूल्ये आणि समष्टी समाजाच्या कल्याणावर आधारित विचारसरणी म्हणजे धर्मव्यवस्था होय. हा लोकसंग्रहाचे मूर्तिमंत रूप, समाजाला जोडणारा, सुसंवाद टिकवणारा आणि जगण्याचा योग्य मार्ग दाखवणारा पक्ष होता. हा वैयक्तिक विकासाचा, उत्क्रांतीचा आणि आरोहणाचा मार्ग होता.
२. जुनाट व्यवस्था विरुद्ध कालसंयोजित नवीन व्यवस्था
कौरवांची बाजू ही मानवी हक्कांचे दमन करणारी, जुनाट व कुजलेली मूल्ये घट्ट धरून ठेवणारी आणि कालबाह्य कल्पनांना कवटाळून बसलेली व्यवस्था होती. या विपरीत, पांडवांची रचना ही काळाची गरज ओळखणारी, नवीन मूल्यांना सामावून घेणारी आणि मानवी कल्याणाची नवी रचना प्रस्थापित करणारी होती. अन्यायाचा बिमोड करून तिथे शांतता, समता आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे हे पांडवांच्या विचारसरणीचे उद्दिष्ट होते.
३. आचरणातील तफावत: अन्यायाचा मार्ग विरुद्ध सहिष्णुतेचा मार्ग
दोन्ही पक्षांच्या आचरणात आणि जीवनमूल्यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक होता:
• कौरवांचा अनीतीमार्ग: लाक्षागृहाचा कट, द्यूतात झालेली फसवणूक, भर सभेत द्रौपदीचे झालेले वस्त्रहरण आणि राज्यसत्ता बळकवण्यासाठी कोणतेही अनैतिक मार्ग वापरणे, हे कौरवांच्या अधार्मिक आचरणाचे ज्वलंत उदाहरण होते. केवळ हस्तिनापूरची सत्ता स्वतःच्या ताब्यात ठेवून इतरांवर अधिकार गाजवणे हा त्यांच्या राजकारणाचा मुख्य हेतू होता.
• पांडवांचा सहिष्णुता मार्ग: पांडवांनी अतोनात अन्याय सहन केला. बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास भोगल्यानंतरही, शक्य तिथे शांतता आणि न्यायाचा मार्ग स्वीकारला. युद्धाचा भीषण प्रसंग टाळण्यासाठी त्यांनी अगदी "पाच गावांवर" समाधानी होण्याचा नम्र व शांततावादी मार्ग स्वीकारला होता.
४. स्वार्थ आणि विवेकशून्यता विरुद्ध त्याग आणि धर्माची प्रत्यक्ष साथ
या युद्धातील प्रत्येक बाजूचे प्रेरणास्थान आणि स्वरूप पूर्णपणे भिन्न होते:
• एका बाजूला स्वार्थ, सत्याची हाव आणि विवेकशून्यता होती. श्रीकृष्णाच्या शांततेच्या प्रस्तावाला आणि स्वर्णमध्य साधण्याच्या सुवर्णसंधीला स्पष्ट नकार देऊन युद्धाची जिद्द धरणारे कौरव होते.
• दुसऱ्या बाजूला त्याग, विवेक आणि प्रत्यक्ष धर्माची साथ होती. स्वतः श्रीकृष्ण जे विवेक, चेतना आणि धर्माचे मूर्तिमंत प्रतीक आहेत, त्यांचे थेट सारथ्य आणि मार्गदर्शन लाभलेला पक्ष म्हणजेच पांडवांचा पक्ष होय.
५. लोकसंग्रह आणि धर्मसंस्थापनेची महती (मुख्य गाभा)
या संपूर्ण युद्धाचा अन्वयार्थ लावताना लोकसंग्रह आणि धर्मसंस्थापना हे दोन मुख्य स्तंभ समोर येतात:
• लोकसंग्रह (समाजाची निर्मिती व जोपासना): समाजाला एकत्र बांधून ठेवणे, लोकांमध्ये सुसंवाद टिकवणे, दुर्बलांचे रक्षण करणे आणि सर्वांच्या कल्याणासाठी पोषक वातावरण निर्माण करणे म्हणजे लोकसंग्रह होय. पांडवांचे आचरण हे याच लोकसंग्रहाच्या पायावर उभे होते.
• धर्मसंस्थापना (अधर्माचा अंत व मूल्यांची स्थापना): जगात जेव्हा अन्यायाची आणि असुरी प्रवृत्तीची अतिरेकी वाढ होते, तेव्हा त्या भ्रष्ट व शोषण करणाऱ्या व्यवस्थेचा बिमोड करून उच्च नैतिक मूल्यांची पुनर्स्थापना करणे अत्यंत आवश्यक असते. श्रीकृष्ण आणि पांडवांनी नेमके हेच कार्य युद्धाच्या माध्यमातून पार पाडले.
अशा प्रकारे, हे युद्ध केवळ नातेसंबंधांमधले किंवा सत्तेसाठीचे भांडण नसून, स्वार्थाचा अंत करून लोकसंग्रह साधणे आणि जगात धर्मसंस्थापना करणे या सर्वोच्च उद्देशासाठी झालेला एक ऐतिहासिक संघर्ष होता.
अर्जुनाचे अंतःयुद्ध आणि आंतरिक धर्मसंस्थापना: विषादापासून कर्मयोगापर्यंतचा प्रवास
कुरुक्षेत्रावर युद्धाचे शंख वाजले असताना, प्रत्यक्ष रणभूमीवर उभा असलेला अर्जुन बाह्य शत्रूंशी लढण्यापूर्वी स्वतःच्याच अंतःकरणातल्या युद्धाशी म्हणजेच विचारांच्या आणि मोहाच्या प्रचंड संघर्षाशी लढत होता. हा बाह्य युद्धाचा आरंभ नसून, अर्जुनाच्या मनात चाललेला मोह, संभ्रम आणि आत्मकेंद्रित भावना विरुद्ध आंतरिक धर्मसंस्थापना (चित्तशुद्धी व कर्तव्यबुद्धी) यांच्यातील एक सखोल तात्विक संघर्ष होता.
या संपूर्ण प्रवासाचे आणि अर्जुनाचे झालेले वैचारिक व मानसिक परिवर्तन दर्शवणारे विविध पैलू खालीलप्रमाणे आहेत:
१. युद्धाच्या प्रारंभीची मनःस्थिती: मोह, संभ्रम आणि पलायनवाद
युद्धभूमीवर रथावर बसूनही जीवनाच्या खऱ्या अर्थापासून दूर गेलेला आणि दुःखात बुडलेला संभ्रान्त मानव म्हणजेच अर्जुन होय. युद्धाच्या ऐन वेळी शस्त्र खाली ठेवणे आणि संघर्षाचा सामना न करता माघार घेण्याची इच्छा व्यक्त करणे, हे त्याच्या कूपमंडूक, अशक्त आणि पळकुट्या मनाचे प्रतीक होते.
• नातेसंबंधांच्या अति-आसक्तीमुळे तो आपले मूळ कर्तव्य विसरला होता आणि त्याच्यामध्ये पलायनवादाची भावना निर्माण झाली होती.
• "माझे नातेवाईक मारले जातील, मला राज्याशी काय करायचं आहे?" असा संकुचित, वैयक्तिक स्वार्थाचा विचार करून तो समाजाच्या भविष्याकडे व समष्टीच्या हिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होता.
• केवळ रक्तपात होईल, पाप लागेल आणि हिंसा होईल, या नकारात्मक व भीतीदायक दृष्टिकोनातून तो बघत असल्यामुळे उसकी बुद्धी मार्गापासून पूर्णपणे विचलित झाली होती.
२. धर्माचे विविध स्तर आणि अर्जुनाची 'धर्मसंमूढ' अवस्था
या संपूर्ण संघर्षाचा अभ्यास करताना आपल्याला धर्माचे ग्रेडेशन (स्तरीय स्वरूप) समजून घेणे आवश्यक ठरते. उपनिषदांमध्ये सांगितल्याप्रमाणे 'सत्यं वद धर्मं चर' म्हणजे धर्म हे आचरणाचे उच्च स्वरूप आहे. परंतु, अर्जुन ज्या मानसिकतेत अडकला होता, तो अतिशय संकुचित असा कनिष्ठ दर्जाचा धर्म होता:
• कुलधर्म व आचारधर्म: अर्जुनाचे मन एवढे संकुचित विचारांमध्ये लिप्त झाले होते की, तो गुरु, पितामहासोबतच्या नात्यांच्या चौकटीत अडकला होता. हा त्याचा कुलधर्म किंवा आचारधर्म होता.
• धर्मसंमूढ चेता (मानसिक गोंधळ): अर्जुन ज्या संभ्रमात अडकला होता, त्याला 'धर्मसंमूढ चेता' असे म्हटले जाऊ शकते. कोणता धर्म श्रेष्ठ?- नातेसंबंधांचा संकुचित कुलधर्म, की विश्वहिताचा आणि सर्वांच्या कल्याणाचा 'स्वधर्म' व 'सत्यधर्म' (क्षात्रधर्म)? हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर होता. (विशेष म्हणजे, कौरव त्यांच्या संकुचित स्वार्थी भूमिकेत ठाम होते, मात्र अर्जुन आपल्या उच्च क्षात्रधर्मापासून पूर्णपणे विचलित झाला होता.)
३. आंतरिक धर्मसंस्थापना आणि चेतना जागृतीची प्रक्रिया
या अज्ञानातून, दुर्बलतेतून आणि संभ्रमातून बाहेर काढण्यासाठी अर्जुनाला त्याच्या आत्मस्वरूपाची आणि खऱ्या कर्तव्याची ओळख करून देणे गरजेचे होते:
• ज्ञानाची जोड: त्याच्या मनातील मोह, अहंकार आणि नकारात्मक प्रवृत्तींचे रूपांतर विवेक, चेतना आणि आंतरिक धर्मसंस्थापनेमध्ये करण्याची प्रक्रिया श्रीकृष्णाने सुरू केली.
• कर्मयोगाची प्रतिष्ठापना: मनातील सर्व भीती, द्वंद्व आणि मानसिक अराजकता नष्ट करून तिथे निःस्पृह कर्तव्यभावना म्हणजेच 'कर्मयोग' प्रस्थापित करायचा होता.
• श्रेष्ठ मूल्यांची स्थापना: जुनाट, चुकीच्या मार्गाने चालणारी आणि स्वार्थी मूल्यांवर आधारित व्यवस्था उखडून टाकून; सर्वसमावेशक, कालोचित आणि प्रत्येकाच्या अभिव्यक्तीला फुलवणारी लोकसंग्रहाची व्यवस्था निर्माण करणे हाच खरा सत्यधर्म आहे, हे त्याला पटवून देण्याची आवश्यकता होती.
४. श्रीकृष्ण आणि अर्जुन: गुरु-शिष्याचे सुंदर नाते
संत कबीरांनी गुरू आणि शिष्याच्या नात्याचे अत्यंत मार्मिक वर्णन केले आहे:
> गुरु कुंभार शिष्य कुंभ है, घडी-घडी काढे खोट । अंतर हाथ सहार है, बाहर मारे चोट ॥
अगदी याचप्रमाणे, स्वतः श्रीकृष्ण जे विवेक, चेतना आणि धर्माचे मूर्तिमंत प्रतीक आहेत, त्यांनी अर्जुनाचे थेट सारथ्य स्वीकारले. अर्जुन आता श्रीकृष्णाचा शिष्य बनला होता. श्रीकृष्णाने त्याला त्याच्या स्वधर्माची आणि क्षात्रधर्माची ओळख करून देण्यासाठी कठोरपणे (दणका देऊन) जागे केले. सत्याचे सरंक्षण करण्यासाठी आणि अधर्माचा अंत करण्यासाठी स्वतःच्या कर्तव्याचे पालन करणे हेच सर्वोच्च कर्म आहे, हा संदेश श्रीकृष्णाने दिला.
अशा प्रकारे, अर्जुनाच्या अंतःकरणात चाललेले हे युद्ध केवळ दोन सैन्यांमधील नसून, संकुचित आचारधर्माकडून विश्वहितकारी सत्यधर्माकडे जाणारा प्रवास होता. मनातील सर्व संभ्रम दूर करून, समाजाच्या कल्याणासाठी आणि लोकसंग्रहाची नवी व्यवस्था उभी करण्यासाठी स्वतः श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनाचे झालेले हे आंतरिक परिवर्तन म्हणजेच गीताधर्माचा मूळ गाभा आहे.
धर्माची वैशेषिक व्याख्या
महर्षी कणाद यांनी आपल्या 'वैशेषिक दर्शन' (किंवा वैशेषिक सूत्र) मध्ये धर्माची खूप सुरेख व्याख्या केली आहे:
> "यतोऽभ्युदयनिःश्रेयससिद्धिः स धर्मः॥"
अर्थ:
• यतः = ज्यापासून,
• अभ्युदय = भौतिक प्रगती व ऐहिक सुख,
• निःश्रेयस = आत्मिक सुख व मोक्ष,
• सिद्धिः = प्राप्ती होते,
• सः = तो,
• धर्मः = धर्म होय.
🔹 वैयक्तिक धर्म आणि समष्टी धर्म
• अभ्युदय म्हणजे प्रगती करणे, विकास करणे, भौतिक जगात विचार करणे. सांख्ययोगाच्या भाषेत सांगायचे तर प्रकृतीचा विचार करणे.
• निःश्रेयस म्हणजे चित्तशुद्धी, आत्मबुद्धी, आत्मसाक्षात्कार, पुरुषाचा विचार आणि सनातन संकल्पनांचा विचार.
असा जो व्यक्तिगत धर्म असतो, तो स्वतःच्या ऐहिक सुखासाठी प्रयत्न करतो. त्याचबरोबर तो व्यक्तिगत निःश्रेयसाचा (आनंद, शांती, समाधान, चित्तशुद्धी आणि मोक्ष) विचार करतो. याला आपण 'व्यक्तिधर्म' असे म्हणू शकतो.
व्यक्तिगत उपासना, प्रार्थना आणि कर्तव्ये तर झालीच पाहिजेत; पण त्यासोबतच सामूहिक उपासना आणि सामूहिक कर्तव्ये देखील पार पाडली पाहिजेत.
व्यक्तिधर्माकडून समष्टी धर्माकडे या राष्ट्रधर्माकडे जाण्याचा हा मार्ग आहे. अर्जुन नेमका व्यक्तिगत अभ्युदय आणि निःश्रेयसामध्ये अडकला होता. त्याला नवीन युगानुकूल समाजरचना, लोकसंग्रह आणि धर्मसंस्थापना करण्यासाठी सामूहिक समाजधर्माकडे (राष्ट्रधर्माकडे) नेणारी ही भगवद्गीता आहे.
श्रीमद्भगवद्गीता: दुसरा अध्याय – 'सांख्य योग'
भाग ३१
२५ जुलै २०२६
श्रीकृष्ण म्हणतात ...
"अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे। गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः॥" (ज्यांचा शोक करणे योग्य नाही, अशांच्याबद्दल तू शोक करत आहेस आणि पंडितांसारख्या ज्ञानाच्या गोष्टी, प्रज्ञावान लोकांसारखे वाद घालत आहेस. मरण पावलेल्यांचा आणि मरण न पावलेल्यांचा ज्ञानी पुरुष कधीही शोक करत नाहीत.)
गेली कित्येक वर्षे मानवी स्वभावाचा जवळून अभ्यास करतोय. अगदी तीन-साडेतीन वर्षांच्या निरागस मुलापासून ते आयुष्यभर विचार करून निरपेक्ष झालेली संन्यस्त मने आणि कर्मयोगी लोकांपर्यंत; सीमापार पसरलेल्या प्रचंड संपत्तीच्या शिखरावर बसलेल्या श्रीमंतांपासून ते अत्यंत गरिबीत दिवस काढणाऱ्या सर्वसामान्य माणसांपर्यंत; आपल्या देशातील असो वा परदेशातील—मी माणसांना आणि त्यांच्या विचारांना समजून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय.
या अथक प्रवासात एक गोष्ट माझ्या मनावर अतिशय प्रकर्षाने आणि ठसठशीतपणे बिंबवली गेली आहे. ती म्हणजे, आपण करत असलेल्या गोष्टी असोत, आपल्या स्वार्थाच्या किंवा सोयीच्या गोष्टी असोत, किंवा मग कोणत्याही पूर्वग्रहापोटी आभासी रीत्या, पूर्ण सत्य न समजून घेता एखाद्या मताला किंवा आडमुठ्या भूमिकेला घट्ट चिटकून बसलेले असणे असो—या अशा प्रत्येक गोष्टीच्या समर्थनासाठी मानवी बुद्धी अत्यंत सुंदर आणि चपखल दाखले शोधून आणते.
माणसाची बुद्धी इतकी प्रगल्भ आणि चलाख आहे की, ती कुठल्याही चुकीच्या किंवा हट्टाच्या गोष्टीला न्यायाचे स्वरूप देऊ शकते. त्यांचे बोलणे इतके जबरदस्त, इतके परफेक्ट आणि अभ्यासपूर्ण असते की, समोरच्या ऐकणाऱ्याला क्षणभर असे वाटावे—की हा माणूस जे काही सांगतोय, ते अक्षरशः शंभर टक्के बरोबर आहे! प्रचंड हुशारी, तार्किकता आणि ज्ञानाचा सुवास या साऱ्यांच्या बोलण्यातून ओसंडून वाहत असतो.
याचे एक अगदी साधे आणि ज्वलंत उदाहरण घेऊया—मद्यप्राशन (दारू पिणे).
सध्याच्या काळात दारू पिण्यासारख्या वाईट व्यसनाचे कोणी समर्थन करेल का? असा प्रश्न साहजिकच आपल्या मनात येतो. पण प्रत्यक्षात काय घडते? उच्चशिक्षित, अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले, अत्यंत कर्तृत्ववान आणि समाजात मान असणारे लोक जेव्हा दारू पिण्याचे समर्थन करतात, तेव्हा त्यांची बाजू ऐकून थक्क व्हायला होते.
ते दारूचे महत्त्व इतक्या प्रभावीपणे पटवून देतात की, जशी ती एखादी अमृततुल्य औषधीच असावी!
• दारू पिण्याने आपले कसे भले होते, आपले मानसिक ताण कसे कमी होतात, आणि त्यामुळे आपण कसे अधिक कार्यक्षम बनतो, याचे ते असे काही पाढे वाचतात...
• आणि मग समोरच्याला उद्देशून अत्यंत आक्रमकपणे विचारतात—"आम्ही दारू पितो म्हणून आमचे काय नुकसान झाले? आणि तुम्ही दारू पीत नाही, मग तुमचे नेमके असे कोणते मोठे भले झाले आहे?"
ते मांडत असलेले हे विचार इतके लॉजिकल, इतके विवेकपूर्ण, इतके रॅशनल आणि शास्त्रीय गुंफण केलेले असतात की, विचारूच नका! ते स्वतःच्या भूमिकेची इतकी सुंदर वकिली (Plead) करतात, इतक्या चोखपणे त्याचे जस्टिफिकेशन देतात की, ऐकणाऱ्याला काही वेळासाठी खरोखरच असे वाटू लागते की, अरेरे... कदाचित याच माणसाचे म्हणणे खरे असेल!
माणूस आपल्या सोयीसाठी आणि पुराव्यांसाठी असे काही चोख दाखले देतो आणि गोष्टी सादर करतो, की मानवी बुद्धीच्या या अफाट कौशल्यावर आश्चर्यच वाटावे.
मानवी स्वभावाचे हे विविध रंग, बुद्धीचे हे कुतूहल आणि तर्काचा हा अद्भूत खेळ पाहताना एक सत्य वारंवार अधोरेखित होते—माणूस हुशार आहे, पण तो बऱ्याचदा आपल्याच सत्याचा कैवारी असतो. तो जी भूमिका घेतो, तिच्या समर्थनार्थ जगातील कोणतीही बाजू फिरवण्याचे कसब त्याच्याकडे असते. हेच माणसाचे खरेखुरे रूप आहे, जे आपल्याला अंतर्मुख करायला लावते.
मानवी स्वभावाचा हा प्रवास केवळ व्यसनापुरता मर्यादित नाही, तर तो याहूनही अधिक खोलवर जातो. मानवी मनाचा अभ्यास करताना मला दुसरी एक गोष्ट तितक्याच प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे भ्रष्टाचार.
ज्या कामासाठी आपल्याला आधीच ठरलेला पगार किंवा मोबदला मिळतो, त्याव्यतिरिक्त त्याच कामासाठी अधिकचा मोबदला (लाच) मिळणे कसे योग्य आहे, याचे काय जबरदस्त जस्टिफायनेशन लोक देतात! कधी ते अत्यंत किळसवाण्या सुरात सांगतात, कधी अतिशय तार्किक रीतीने मांडणी करतात, कधी भावनिक होऊन पाझर फुटल्यासारखे बोलतात, तर कधी अध्यात्माचे दाखले किंवा आनंदाचे सिद्धांत जोडून सांगतात की, या भ्रष्टाचारात गैर काय आहे?
यातूनही ते अत्यंत सोयीस्कर मार्ग शोधून काढतात:
• काही जण म्हणतात, "आम्ही मागितले नाही; समोरच्याने स्वतःहून दिले, तर मग आम्ही का नाही घेणार?" हे सगळे जण जणू हॉटेलमधील वेटर झालेले असतात आणि त्यांना 'टीप' मिळणे जसे गरजेचे असते, तसेच हे 'टीप कल्चर' ते येथेही सर्रास राबवतात.
• काही जण अतिशय नैतिकतेचा आव आणून म्हणतात, "आम्ही गरिबांकडून आणि गरजू लोकांकडून पैसे घेणार नाही." (याचा अर्थ, ते इतरांकडून नक्कीच घेतात!)
• काही जण अजून एक पाऊल पुढे जाऊन म्हणतात, "आम्ही हे आमच्यासाठी नाही घेत, आमच्या वरच्या साहेबांसाठी (बॉससाठी) गोळा करतो."
मी अनेक शिक्षण संस्थांशी जवळून संबंधित आहे. यातील बहुतांश शिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रविचारांचे मोठे धडे दिले जातात, संस्कृतीच्या गोष्टी केल्या जातात. परंतु, प्रत्यक्षात काय चालले असते? अनअकाउंटेबल (ज्याचा हिशोब नाही) आणि लीगली नॉट प्रूव्हड (कायदेशीररित्या सिद्ध करता येणार नाही) अशा मार्गांचा वापर करून शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेशांसाठी बिनदिक्कत पैसे घेतले जातात. आणि सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे, या सगळ्याचा अतिशय योग्य शब्दांत आणि अत्यंत सिस्टीमॅटिक पद्धतीने बचाव केला जातो, त्याचे समर्थन केले जाते.
अर्जुनाची दुविधा आणि आजचा माणूस
आजच्या माणसाची गत महाभारतातील अर्जुनासारखी झाली आहे. माणसाचे जे मूळ कर्तव्य आहे, ते त्याने केलेच पाहिजे. पण प्रश्न असा निर्माण होतो की, धर्म आणि अधर्माचा संकल्प काय आहे, हे त्याला शंभर टक्के माहीत असते. धर्म हा नेहमी देशकाळसापेक्ष आणि सिच्युएशनल (परिस्थितिसापेक्ष) असतो, हेही त्याला चांगले ठाऊक असते. पण तो काय करतो? तो पूर्णपणे आपल्या सोयीने आपला धर्म निवडतो.
तो पूर्णपणे 'व्यक्तिधर्मामध्ये' अडकून पडला आहे. आणि अशाच व्यक्तिधर्माचे प्रतीक असणाऱ्या, म्हणजेच सरळसरळ असत्याच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांमध्ये तो आपलेपणा (ममत्व) शोधू लागतो. जेव्हा माणसाने अत्यंत गंभीर चुका केल्या असतात, आणि त्याबद्दल त्याला नियमानुसार किंवा कर्माच्या सिद्धान्तानुसार शिक्षा मिळणे अगदी क्रमप्राप्त असते, अशा वेळीही त्याच्याबद्दल मनात अफाट ममत्व निर्माण करायचे आणि मग मोठमोठ्या फिलॉसॉफी छाटायच्या, हा तर रोजचाच खेळ झाला आहे.
याचा व्यावहारिक अर्थ आठवतो—"अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे।"
हा श्लोक मला पदोपदी अनुभवायला मिळतो. प्रज्ञावादांश्च भाषसे! प्रज्ञेने वाद घालणे! म्हणजे काय तर, बिंबीच्या डेटापासून आणि मेंदूच्या पेशी अन् पेशीपासून हे लोक आपल्या प्रत्येक चुकीच्या वागण्याचे आणि बोलण्याचे असे काही भारी जस्टिफायकेशन देतात, की जणू 'क्रिटिक्स इज द मॅन हू नोज हाऊ टू ड्राईव्ह द कार' (समीक्षक तो आहे जो गाडी कशी चालवायची हे उत्तम जाणवतो) त्याप्रमाणे ते आपल्या युक्तिवादाची गाडी अत्यंत चलाखीने पळवतात.
आजचा अर्जुन खरोखरच धृतराष्ट्र झालाय आणि तो दुर्योधनही झालाय! तो पूर्णपणे अंध झाला आहे; त्याला आज सत्य दिसतच नाहीये.
श्रीकृष्णांनी अर्जुनाला सुनावले आहे :
"अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे। गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः॥" (ज्यांचा शोक करणे योग्य नाही, अशांच्याबद्दल तू शोक करत आहेस आणि पंडितांसारख्या ज्ञानाच्या गोष्टी, प्रज्ञावान लोकांसारखे वाद घालत आहेस. मरण पावलेल्यांचा आणि मरण न पावलेल्यांचा ज्ञानी पुरुष कधीही शोक करत नाहीत.)
अर्जुन ज्ञानाच्या गोष्टी करतोय, पण श्रीकृष्ण त्याला समजवतात की, अरे बाबा, तू जे सांगतोयस ते खरे ज्ञान नाहीये, तर ते सुईएवढे क्षुल्क ज्ञान आहे.
सत्याची आस आणि परिवर्तन
श्रीकृष्ण किती परफेक्ट आहेत! मनोमन एखादी गोष्ट आपल्याला व्यावहारिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या किंवा अगदी शास्त्रीयदृष्ट्या पटलेली असते, की ही गोष्ट चुकीची आहे; ती आपण करत नसलो तरी ती चुकीची आहे हे आपल्याला ठाऊक असते, तरीही आपण ती करतच राहतो—आणि तेही चुकीच्या लोकांसाठी!
अशा वेळी गीतेचा हा श्लोक आणि हा विचार आपल्याला नक्की आठवला पाहिजे. आपल्यातला हा दृष्टिकोन बदलणे, आपल्यामध्ये परिवर्तन घडणे ही काळाची गरज आहे.
• असत्याला सत्य मानणे,
• अधर्मामधला सोयीचा धर्म शोधणे,
• स्वतःच्या चुकीच्या धारणांना घट्ट मिठी मारून बसणे,
• आणि सत्याची अजिबात आस नसलेल्यांना आपले 'ममत्व' मानून त्यांच्यासाठी कुलधर्म आणि व्यक्तिधर्माचे दाखले देणे,
—हे सगळे थांबवायला हवे.
पण गंमत अशी होते की, जेव्हा या सर्वांच्या विरोधात प्रत्यक्ष कृती करण्याचा विचार येतो, तेव्हा त्या कृतीमुळे आपल्यावर किती निगेटिव्ह शेरा मारला जाईल, आपल्याला साऱ्या जगाचा रोष पत्करावा लागेल, या भीतीने आपण स्वतःला 'जागतिक शांततेचे आणि कल्याणाचे प्रतीक' म्हणून जगासमोर भासवू लागतो.
अरे बाबा, ज्याच्यासाठी शोक करायची गरज नाही, अशा अनित्य गोष्टींवर तू का शोक करतोयस? जे अनित्य आहे आणि जे नित्य आहे, हे वरकरणी सत्य आहे. Time doesn't come and go, we come and go. काळ कधीही येत आणि जात नसतो; आपण येतो आणि आपणच निघून जातो. सत्य कधी येत आणि जात नाही, सत्य शाश्वत असते ते कायम असते.
फक्त त्या सत्याची आणि त्या वेळेची योग्य गरज ओळखून स्वतःचे कल्याण साधणे आणि समाजाचे कल्याण करणे, हेच खऱ्या प्रज्ञेचे लक्षण असते.
अध्यात्म, खरे ज्ञान किंवा खरा प्रज्ञावान माणूस कधीही अध्यात्माचा उपयोग स्वतःच्या चुकांचे समर्थन (Justification) करण्यासाठी करत नाही; ना तो त्याचा वापर स्वतःच्या सोयीसाठी किंवा तात्पुरत्या विरंगुळ्यासाठी (Relaxation) करतो. आपले चुकीचे बोलणे, चुकीची वर्तणूक आणि भ्रामक धारणा किती योग्य आहेत हे जगाला पटवून देण्यासाठी खरा ज्ञानी अध्यात्माचा आडोसा कधीच घेत नाही.
उलट, त्याच्यासाठी अध्यात्म हे:
• स्वतःमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचे साधन असते.
• स्वतःचे नवनिर्माण करण्याचे माध्यम असते.
• स्वतःची एक नवी आणि श्रेष्ठ आवृत्ती (New Version) घडवण्यासाठी असते.
• आपल्या खऱ्या 'स्वस्वरूपाचे' ज्ञान करून घेण्यासाठी असते.
• आपले खरे भले आणि कल्याण कशात आहे, हे आत्मपरीक्षणाने समजून घेण्यासाठी असते.
महाभारताच्या रणभूमीवर अर्जुन जेव्हा मोठे युक्तिवाद करत होता, तेव्हा तो खऱ्या अध्यात्माची भाषा बोलत नव्हता; तर तो आपल्या भित्रेपणाचे आणि मोहाचे समर्थन करत होता. म्हणूनच श्रीकृष्णाला त्याला स्पष्ट शब्दांत सुनावणे भाग पडले:
"अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः॥"
श्रीकृष्णाच्या या विधानाचा मर्म अत्यंत रोकडा आणि जळजळीत होता:
अरे अर्जुना! तू पंडित नाहीस; तू फक्त ज्ञानी आणि पंडित असल्याचा आभास निर्माण करतो आहेस.
अध्यात्म ही स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्याची कला नसून, स्वतःच्या अहंकाराचा आणि अज्ञानाचा नाश करून 'स्व'ची पुनर्रचना करण्याचे शास्त्र आहे.
श्रीमद्भगवद्गीता: दुसरा अध्याय – 'सांख्य योग'
भाग ३२
२६ जुलै २०२६
श्रीकृष्ण म्हणतात
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः । न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ २-१२ ॥
"असे कधीही नव्हते की, मी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते; आणि असेही कधीच होणार नाही की, आपण सगळे यानंतर (भविष्यात किंवा देहान्तरा नंतर) कधीच असणार नाही."
खरंच आहे! ही सुरुवातच इतकी आश्वासक आणि चैतन्यदायी आहे की ती माणसाच्या मनातील सर्व भीती, नैराश्य आणि संभ्रम झटकून टाकते.
जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे असणाऱ्या शाश्वत आत्म्याचा संदेश देऊन श्रीकृष्ण माणसाला जगण्याचा एक नवा आत्मविश्वास देतात. जेव्हा आपण हा मूळ गाभा समजून घेतो, तेव्हा गीता केवळ एक धार्मिक ग्रंथात मर्यादित न राहता आयुष्याला जगण्याची एक सुंदर कला आणि तत्त्वज्ञान बनून जाते.
या प्रवासात गीतेचे सौंदर्य आणि तिचे 'मस्तपण' अनुभवताना जीवनातील प्रत्येक टप्पा अधिक अर्थपूर्ण आणि आनंदी बनतो.
जन्म, जीवन आणि मृत्यू: मानवी अस्तित्वाची एक सुंदर आणि तात्विक काव्यात्म यात्रा
जन्म, जगणे आणि मृत्यू या मानवी जीवनाच्या अशा तीन अत्यंत महत्त्वपूर्ण अवस्था आहेत, ज्यांच्याकडे पाहण्याचे मानवी मनाचे आणि विचारांचे मार्ग अनेकविध असू शकतात.
१. दृष्टिकोन आणि अध्यात्मशास्त्र: जीवनाची मूळ पायाभरणी
आपण जगातल्या कोणत्याही घटनेकडे, व्यक्तीकडे किंवा प्रक्रियेकडे ज्या नजरेने पाहतो, तो आपला दृष्टिकोन असतो. हा दृष्टिकोन आपल्याला कुठून मिळतो? तर तो आपल्या संस्कारांतून, मूल्यांतून आणि संस्कृतीतून आकार घेत असतो. जेव्हा माणसाचा दृष्टिकोन संकुचित किंवा केवळ भौतिकवादी असतो, तेव्हा तो त्याला नैराश्य किंवा संकुचित स्वार्थाकडे घेऊन जातो. याउलट, भारतीय अध्यात्मशास्त्र माणसाची दृष्टी अधिक समृद्ध करून त्याला जीवनाचे उदात्त आणि सर्वसमावेशक सत्य दाखवते.
२. जन्माकडे पाहण्याचे दोन भिन्न मार्ग: यांत्रिक संयोग ते दिव्य महोत्सव
जन्माकडे पाहताना मानवाचे विचार प्रामुख्याने दोन वेगवेगळ्या दिशांना जाताना दिसतात:
• केवळ जैविक आणि भौतिकवादी दृष्टी (यांत्रिक दृष्टिकोन): या विचारसरणीनुसार जन्म हा केवळ दोन जीवांच्या शारीरिक संयोगाची (स्त्रीबीज आणि पुरुषबीज) परिणती किंवा एक निव्वळ योगायोग (ॲक्सिडेंट) असतो. यात जीवनाला एका भौतिक प्रक्रियेच्या पलीकडे कोणतेही उच्च किंवा पारमार्थिक मूल्य नसते.
• भारतीय अध्यात्मशास्त्राची दृष्टी (जन्म एक महोत्सव): याच्या पूर्ण विपरीत, भारतीय संस्कृती जन्माला केवळ एक जैविक घटना न मानता एका मोठ्या 'उत्सव' किंवा 'महोत्सव' मानते.
o हा जन्म म्हणजेच एका सुंदर, उदात्त आणि सर्वसमावेशक ईश्वरी इच्छेचे (Divine Will) प्रकटीकरण आहे.
o आपण केवळ मातीतून बनलेले शरीर नसून "अमृताचे पुत्र" आहोत. एका थोर विचारधारेचे आणि दिव्य चेतनेचे आपण प्रतिनिधी आहोत, याची जाणीव म्हणजेच खरा जन्म होय.
२. मृत्यू, नैराश्य आणि स्वार्थ: मानवी अस्तित्वाची द्वंद्वे
मृत्यू हे मानवी जीवनातील एकमेव अकाट्य आणि सार्वत्रिक सत्य आहे. जन्मलेल्या प्रत्येक जीवाला एका ना एका दिवशी हा देह सोडावाच लागतो, हे विज्ञानाने आणि निसर्गाच्या नियमाने सिद्ध केले आहे. परंतु, या भौतिक सत्याचा स्वीकार करताना मानवी मन दोन टोकाच्या मानसिक भूमिकांमध्ये अडकताना दिसते.
अ. मृत्यूच्या सत्यापोटी निर्माण होणारी नैराश्याची भावना
जेव्हा एखादी व्यक्ती अतिशय खोलवर विचार करते की, "शेवटी सर्वकाही नश्वर आहे, एक दिवस मरायचेच आहे, मग या सगळ्या खटाटोपाचा आणि कष्टांचा काय फायदा?" तेव्हा नैराशाचा जन्म होतो:
• संघर्षाबद्दल प्रश्नचिन्ह: वृद्धापकाळात येणारा शारीरिक त्रास, तरुण वयात करावी लागणारी धडपड आणि प्रगतीसाठी करावा लागणारा अहोरात्र संघर्ष यामागे मानवी मन विचारू लागते की, "मी हे का करू?"
• अस्तित्वाची निरर्थकता: "जेव्हा मृत्यू अटळ आहे, तर चांगल्या गोष्टींमध्ये किंवा कर्मामध्ये स्वतःला गुंतवून घेण्याचा ताण का घ्यायचा?" ही विचारसरणी माणसाला निरुत्साही बनवते.
• अतिटोकाची भावना: जेव्हा नैराश्य पराकोटीला जाते, तेव्हा माणूस जीवनाला पूर्णपणे अर्थहीन मानू लागतो. "मृत्यू अटळ असेल तर तो लवकर आला तर काय बिघडले?" असा टोकाचा नकारात्मक विचार किंवा पलायनवादी वृत्ती या नैराशाच्या पोटी जन्म घेऊ शकते.
ब. मृत्यूच्या सत्यापोटी निर्माण होणारी स्वार्थाची आणि अहंकाराची भावना
याच मृत्यूच्या सत्याकडे पाहण्याचा दुसरा दृष्टिकोन पूर्णपणे उलट आहे. यामध्ये मनुष्य नैराशात जाण्याऐवजी सर्वकाही स्वतःच्या आनंदासाठी आणि उपभोगासाठी वापरून घेण्याच्या जिद्दीला पेटतो:
• केवळ स्वतःचा विचार: "माझे शरीर आज आहे, उद्या नष्ट होणार आहे, मग मी कशाला दुसऱ्याचा विचार करू?" हा विचार माणसाला अति-स्वार्थी बनवतो.
• अमर्याद भोगवाद: "मला माझ्या आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे, माझी कोणतीही इच्छा अपूर्ण राहिली नाही पाहिजे," या भावनेतून तो हव्या त्या मार्गाने आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
• हिंसेचा मार्ग: या स्वार्थी प्रवासात जर कोणाकडून बाधा आली किंवा आपल्या मनासारखे झाले नाही, तर तो इतरांना विरोध करतो किंवा आपल्या आनंदाच्या मार्गात येणाऱ्यांना नष्ट करण्याची हिंसक प्रवृत्ती सुद्धा धारण करू शकतो. "मी माझ्या पद्धतीने जगेल आणि माझा आनंद मिळवीन," हा अतिरेकी अहंकार यातूनच तयार होतो.
•
४. नैराश्य आणि स्वार्थ: विकासाच्या मार्गातील प्रमुख बाधक
मानसशास्त्र आणि समाजशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास, नैराश्य आणि स्वार्थ या दोन्ही मानवाच्या प्रगतीला आणि समष्टीच्या चांगुलपणाला मारक ठरणाऱ्या भावना आहेत:
• नैराश्य माणसाची ऊर्जा गोठवून टाकते आणि त्याला निष्क्रिय बनवते.
• स्वार्थ माणसाला आंधळा करून समाजात संघर्ष, द्वेष आणि हिंसा निर्माण करतो.
या दोन्ही भावना माणसाला क्षुद्रतेकडे नेतात. जिथे सहकार्य, प्रेम आणि सर्जनशीलता असायला हवी, तिथे भीती, नैराश्य किंवा हिंसेचे सावट दाट होते.
५. भारतीय अध्यात्मशास्त्राचा दृष्टिकोन: मृत्यूकडे कसे पाहावे?
भारतीय अध्यात्मशास्त्र (विशेषतः भगवद्गीता आणि उपनिषदे) या दोन्ही टोकाच्या भावनांवर अत्यंत प्रगल्भ आणि वैज्ञानिक उत्तर देते. अध्यात्म आपल्याला सांगते की मृत्यू हा शरीराचा अंत आहे, अस्तित्वाचा नाही.
• देहाची नश्वरता आणि आत्म्याचे नित्यत्व: जसे जुने कपडे बदलून आपण नवीन कपडे घालतो, तसेच शरीर जुने झाल्यावर आत्मा नवीन देह धारण करतो, हे गीतेचे मर्म आहे. शरीराचा मृत्यू अटळ आहे हे सत्य स्वीकारूनही अध्यात्म माणसाला नैराश्यात ढकलू देत नाही.
• कर्तव्याची प्रेरणा (कर्मयोग): "मरायचेच आहे ना, मग कशाला कर्म करायचे?" या नैराशाच्या उत्तरादाखल अध्यात्म सांगते की, जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत तुझे कर्म करणे हेच तुझे मूळ कर्तव्य (धर्म) आहे. फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म माणसाला आनंदी आणि निरोगी ठेवते.
• स्वार्थाच्या पलीकडील विस्तार: स्वार्थ माणसाला संकुचित करतो, तर अध्यात्म माणसाला हे शिकवते की, आपण सगळे एकाच विशाल वैश्विक चेतनेचा भाग आहोत. त्यामुळे दुसऱ्याचे हित पाहणे म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या स्वतःचा आत्मा उन्नत करणे होय.
६. चांगुलपणा आणि वाईटपणाची अंतर्गत गती आणि दुष्टचक्र
समाजाच्या आणि समष्टीच्या अस्तित्वाचा पाया हा केवळ भौतिक समृद्धीवर नव्हे, तर माणसातील चांगुलपणावर आधारित आहे.
• चांगुलपणाची वाढ (Expansion): एखादी चांगली कृती माणसाला केवळ बाह्य लाभ मिळवून देते असे नाही, तर ती व्यक्तीच्या आंतरिक चेतनेला समृद्ध करते. चांगुलपणा माणसाला अधिक प्रसन्न, शांत, सर्जनशील आणि सर्वसमावेशक बनवतो. ही शक्ती स्वतःसोबतच संपूर्ण समाजाच्या चांगुलपणाच्या शक्तीमध्ये भर घालते.
• वाईटपणाची अधोगती (Degeneration): याच्या विपरीत, वाईट प्रवृत्ती ही त्या व्यक्तीला हळूहळू अधिक खोलवर विनाशाकडे किंवा मानसिक अस्वास्थ्याकडे नेते. वाईट कर्म किंवा स्वार्थ माणसाच्या मनात सतत अस्वस्थता आणि अशांतता निर्माण करतो.
• नैराश्य आणि हिंसेचे दुष्टचक्र: “मनासारखं नाही झालं तर नैराश्य वाढतं, आणि नैराश्य स्वीकारता नाही आलं तर हिंसा वाढते.” आजच्या समाजात अनेकदा नैराश्य आणि हिंसेचे प्रमाण वाढताना दिसते, ज्याचे मूळ माणसाच्या अपेक्षा आणि अपयशाशी जुळवून न घेण्याच्या अक्षमतेत असते. जेव्हा माणसाला परिस्थिती स्वीकारता येत नाही, तेव्हा तो नैरास्याच्या गर्तेत जातो आणि तिथूनच संताप किंवा हिंसेचा जन्म येतो. या दुष्टचक्राला तोडण्यासाठी मनाचा समतोल आणि चांगुलपणाची शक्ती आवश्यक ठरते.
७. जीवन, संगीत आणि मृत्यूचा समतोल
जीवन आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी मानवी अस्तित्वाचा आणि निसर्गाच्या प्रवाहाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. या प्रवासाची तुलना अतिशय सुंदर अशा संगीताच्या सुरावटीशी करता येते:
• आरोही आणि जीवन: संगीतात जशी 'आरोही' ही चढत्या क्रमाने जाणारी, नवीन नोट्स निर्माण करणारी आणि उत्साहाची प्रगती दर्शवणारी असते, तसाच माणसाचा जन्म आणि त्याचे आयुष्य हे सर्जनशीलता, संघर्ष आणि नवनिर्मितीचा प्रवास घडवणारे असते.
• भैरवी आणि मृत्यू: संगीताच्या मैफिलीची सांगता ज्याप्रमाणे 'भैरवीने' (एका शांत, गंभीर आणि गोड सुरावटीने) होते, त्याचप्रमाणे मृत्यू हा या जीवनरूपी मैफिलीचा एक अटळ, शांत आणि परिपूर्ण शेवट आहे.
•
ज्याप्रमाणे जीवनाला अर्थ आहे, त्याचप्रमाणे मृत्यूलाही जीवनात एक अपरिहार्य आणि आवश्यक स्थान आहे. मृत्यूमुळे जीवनाला एक मर्यादा आणि गांभीर्य प्राप्त होते, ज्यामुळे प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजते. हा समतोलच मानवी जीवन आणि समष्टीचा गाभा टिकवून ठेवतो.
भगवद्गीता आणि जन्माचे उदात्त सत्य: एक दिव्य महोत्सव
जन्मा आणि मृत्यूच्या या अनंत प्रवासात मध्यभागी असणारे 'जगणे' म्हणजेच ही जीवनरूपी मैफिल! या मैफिलीत आपण संगीताचा कोणता सूर छेडतो आणि तिला कसा आकार देतो, यावरच आपले संपूर्ण अस्तित्व अवलंबून असते. या मैफिलीकडे पाहण्याचे मार्ग अनेक असू शकतात—काही लोक त्याकडे भोगवादी किंवा नैराश्यात्मक दृष्टिकोनातून पाहतात, तर काही लोक तिला एक क्रिएटिव्ह, सृजनात्मक, नवनिर्मिती करणारी आणि समृद्ध करणारी कला मानतात.
भारतीय अध्यात्मशास्त्र आपल्याला या मैफिलीकडे पाहण्याची एक अत्यंत उदात्त दृष्टी देते. आहे त्या वारशाला पुढे नेणे, नवीन येणाऱ्या पिढीला एक समृद्ध आणि सुसह्य वारसा देणे, आपला भोवताल अधिक सुंदर करणे आणि हा चैतन्याचा वारसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करणे, हीच खऱ्या अर्थाने जगण्याची सृजनात्मक दिशा आहे.
जेव्हा आपण या जीवनप्रवासाकडे पाहतो, तेव्हा भगवद्गीता आणि भारतीय तत्त्वज्ञान आपल्याला आत्म्याचे अमरत्व आणि कर्मसिद्धांताचे महत्त्व अत्यंत स्पष्टपणे शिकवते:
• आत्म्याचे अमरत्व (जन्मा आणि मृत्यूकडे पाहण्याची दृष्टी): आत्म्याच्या अमरत्वामुळे जन्म आणि मृत्यू हे अंतिमतः संपुष्टात येणारे सत्य नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात किंवा विराम आहेत, हे समजते. शरीराचा अंत होतो पण आत्म्याचा नव्हे, त्यामुळे जन्माकडे एक 'दिव्य महोत्सव' म्हणून आणि मृत्यूकडे एका 'शांत व अटळ सत्याच्या' रूपात पाहण्याचे सामर्थ्य आपल्याला मिळते.
• कर्मसिद्धांताचे महत्त्व (कर्मयोगातून आनंद आणि शांती): कर्मसिद्धांताचा मार्ग आपल्याला निष्काम कर्म करण्याची प्रेरणा देतो. "मरायचेच आहे ना, मग कशाला कर्म करायचे?" या नैराश्याच्या विचाराला छेद देत, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आपले कर्तव्य (कर्म) करत राहणे म्हणजेच खरा कर्मयोग आहे, हे भगवद्गीता आपल्याला शिकवते. फळाची आस न ठेवता केलेले कर्म माणसाला आंधळ्या स्वार्थापासून दूर नेऊन आंतरिक शांती आणि आनंद प्रदान करते.
भारतीय अध्यात्मशास्त्र हे केवळ मुक्तीचे शास्त्र नसून ते आपल्याला भरभरून आणि आनंदाने जगण्याचे, समाजाला समृद्ध करण्याचे कलाशास्त्र शिकवते. भगवद्गीता आपल्याला आपल्या जन्माकडे एका उदात्त ईश्वरी इच्छेचे प्रकटीकरण आणि एका दिव्य महोत्सवाच्या रूपाने पाहायला शिकवते, ज्यामुळे आपले आयुष्य भयमुक्त, नैराश्यमुक्त आणि परमार्थिक आनंदाने भरून जाते.
प्रसाद चिक्षे
ज्ञान प्रबोधिनी
8208438600
श्रीमद्भगवद्गीता: दुसरा अध्याय – 'सांख्य योग'
भाग ३३
२७ जुलै २०२६
श्रीकृष्ण म्हणतात
"देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा। तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥ १३ ॥"
ज्याप्रमाणे (यथा) या (अस्मिन्) शरीरात (देहे) राहणाऱ्या आत्म्याला (देहिनः) बालपण (कौमारम्), तारुण्य (यौवनम्) आणि म्हातारपण (जरा) या अवस्था प्राप्त होतात, त्याचप्रमाणे (तथा) त्याला दुसरे शरीर प्राप्त होते (देहान्तरप्राप्तिः); त्याविषयी (तत्र) धीर पुरुष (धीरः) मोहित होत नाही (न मुह्यति).
हा अत्यंत सुंदर आणि अर्थगर्भित श्लोक आहे.
मुळात ना भारतीय मानसशास्त्राकडे किंवा अध्यात्मशास्त्रंकडे पाहत असताना आपल्याला ह्याच वेगळेपण वैशिष्ट्य समजून घ्यावं लागतं. एखादी घटना घडते, म्हणजे आता उदाहरणार्थ, अर्जुनाने कौरवांच्या सैन्यातील द्रोणाचार्यांना आणि पितामहांना पाहिलं आणि त्यांच्यामध्ये ममत्व निर्माण झालं, मोह निर्माण झाला. घटनेला प्रतिसाद म्हणून, प्रतिक्रिया म्हणून, त्याच्या तीन प्रकारच्या असू शकतात.
एक तर पहिली प्रतिक्रिया आहे की, म्हणजे अहाहा! एवढे मोठे सैनिक! इतके मोठे ताकतवान लोक! यांच्याशी कसं युद्ध करू मी? किती ताकतवान आहे माझा पराभव नक्की आहे. असं म्हणून फ्रीझ होणं, म्हणजे थिजून जाणं, भयभीत होणं.
दुसरा मार्ग असा आहे की, ए बाबा! एवढे मोठे सैनिक! किती ताकतवान लोक आहेत! यांच्याशी मी लढू शकत नाही. मी पळून जातो किंवा माझा जिवाला कशाला त्रास करून घेऊ?
तिसरा मार्ग आहे, चला भिडतोच मी ह्याला! स्वतःच्या मनाची, भौतिक क्षमतांची कशाची जाणीव न करता सरळ लढा. माणूस फ्रीझ होतानादेखील प्रश्न विचारत नाही. पळून गेल्यावरही प्रश्न विचारत नाही. किंवा लढायला लागल्यानंतरही प्रश्न विचारत नाही.
भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये अर्जुन हे जे पात्र आहे, हे तिन्ही गोष्टी करत ते उलट प्रश्न विचारतं. ते 'शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्' असं म्हणतं. धर्मसंमूढ चेतना म्हणतं. म्हणून विषाद होतो.
फ्रीझ, फाईट अँड क्विट या त्रिस्तुत्रीमधून अर्जुनाला पाहणं फार अवघड जातं. आपल्याला भारतीय पद्धतीतून, भारतीय मानसशास्त्राच्या पद्धतीतून, भारतीय अध्यात्माच्या पद्धतीतूनच अर्जुनाला पाहावं लागतं. त्यामुळे आपली भारतीय अध्यात्मशास्त्राची पद्धती अशी आहे की, जो विचलित झाला आहे, त्याला सर्वांगाने पाहा, समजून घ्या.
अर्जुनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, भारतीय दृष्टिकोन श्रीकृष्णाचा वेगळा आहे. तो या तीन पद्धतीने तो पाहतोच पाहतो; परंतु तो प्रश्न पडणारा, प्रश्न करणारा जो अर्जुन आहे ना, त्याचा हा मानसिक रोग नाहीये. तो बौद्धिक रोग पण आहे. कॉग्गनेटिव्ह डिसोन्सन्स (Cognitive Dissonance) आहे तो, रेझोनन्स नाही. त्याला उत्तर देताना एखाद्या समस्येला 'क्विट, फाईट अँड फ्रीझ' पद्धतीने फक्त रिएक्शन दिली जात नाही, तर भारतीय पद्धत ती टॅकल करण्याची ट्रान्सफॉर्म (परिवर्तन) आणि ट्रान्सेंड (उत्क्रमण) (Transform or Transcend) आहे.
ट्रान्सफॉर्मेशन आणि ट्रान्सेंड होणं, ही जी पद्धत आहे.
त्यामुळे गीतेचं तत्त्वज्ञान हे ट्रान्सफॉर्मेशन आणि ट्रान्सेंड आहे. माणसाचं पुनरस्र्थापन, देशाचं पुनरस्र्थापन. देशाचं आराधन करायचंय आपल्याला, असं आपण म्हणतो. ज्ञान प्रबोधिनीचा विचार = मानवी जिद्द, सातत्य आणि प्रगतीचा अत्यंत सुंदर संदेश देतो.
"आव्हानांना उल्लंघून नव आव्हाना घेतो..."
त्यासाठी श्रीकृष्णाने हा श्लोक खूप सुंदर मांडलेला आहे.
अरे अर्जुना, आपण आपल्या स्वतःच्या शरीराकडे किती सुंदर आणि अथांग दृष्टीने पाहतो!
दोन Chromosomes आधाराने आपला जन्म त्या लिंबा एवढ्या गर्भामध्ये होतो. तिथे नऊ महिने हळूहळू वाढ होत होत आपण एक सुंदर देहरूपात येतो. एका लहानशा पेशीपासून सुरू झालेला हा प्रवास गर्भाच्या बाहेर येतो आणि आपल्या स्वतःच्या बलबुतेवर, पंचमहाभूतांच्या साहाय्याने आणि आईच्या वात्सल्याच्या ओलाव्याने आपण मोठे होत जातो.
ते कोमल शरीर, ती हळूहळू फुलणारी बालवस्था... आपण खेळू लागतो, तेव्हा आपल्या प्रत्येक नवीन गोष्टीचे, आपल्या बोलण्याचे, चालण्याचे विलक्षण कौतुक वाटू लागते. पुढे थोडे मोठे झाल्यावर प्रसंगी ओरडा खात, खेळकरपणे व्यक्त होत आपण मोठे होतो. "मोठे होऊन तू काय होणार?" या प्रश्नांची उत्तरं देताना आपल्या मनात एक अनामिक ओढ असते. त्या लहान, कोमल तनूकडे परत जाण्याची इच्छा आपल्याला कधीच नसते; उलट आपल्याला पुढे जायचं असतं, स्वतःला रूपांतरित करायचं असतं!
मी एका पेशीपासून देहरूपात आलो, तिथून कोमल देहात आणि मग अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होणाऱ्या तरुण देहामध्ये रूपांतरित झालो. बुद्धीचा वापर करणारा तो बलवान तरुण देह मला मिळाला, ज्याच्या माध्यमातून मी या संसारातील भोगांच्या परिसीमा अनुभवल्या. तरीही माझी पावले थांबली नाहीत; मी पुढेच जात राहिलो. कष्ट करत मी प्रौढ झालो, संसार थाटला आणि वृद्धापकाळ आल्यावर तोही तितक्याच सहजतेने स्वीकारला.
आपल्या भारतीय संस्कृतीत वयाची साठ वर्षे किंवा सहस्रचंद्रदर्शनाचे संस्कार करून वृद्धापकाळातही आपल्याला उन्नत केले जाते. विशेष म्हणजे, भारतीय अध्यात्मशास्त्रात मृत्यू हा अंत नसून एक संस्कार मानला जातो. मृत्यू म्हणजे एक महोत्सव, एका रूपांतराचा (Transformation) आणि उत्क्रांतीचा अत्यंत पवित्र क्षण!
कालचा मी कितीही सुंदर, आनंदी किंवा शांत असलो, तरी मला नेहमी आजचाच मी हवा असतो. कालच्या मी पेक्षा आजचा मी सदैव वेगळा असतो. मी अधिक चांगला होण्याचा प्रयत्न करतो, अधिक आनंदी होण्याचा प्रयत्न करतो आणि अधिक शांत होण्याचा प्रयत्न जगत राहतो.
एक अत्यंत सुंदर मराठी गाणं आहे— "आधीचा प्रसाद घेतो, पुढची ऐकीत साथ. नादात शीळ असा वाजवीत चाललो." काय मस्त जीवनाचं तत्त्वज्ञान आहे हे! मृत्यूसारख्या अटळ सत्यालाही आम्ही असंच हसतमुखानं, संगीताच्या सुरावटीसारखं सामोरं जाणार आहोत.
त्या मातेच्या गर्भातील पेशीत मीच होतो, जन्मलेल्या त्या इवल्याशा बाळामागे मीच होतो, बाल्यात, तारुण्यात, प्रौढपणात आणि वृद्धापकाळातही मीच होतो. एवढेच नव्हे तर मृत्यूनंतर लोकांच्या स्मृतीत, आठवणीत आणि विचारांतही मीच असतो. माझ्या विचारांमुळे, माझ्या कृतीमुळे आणि माझ्या अस्तित्वामुळे माझे असणे अनेक रूपांतून व्यक्त होते. माझा वंश आणि माझे गणगोत वाढते; मी प्रत्यक्ष शरीराने नसलो तरी त्या सर्वांमध्ये मीच सामावलेला असतो.
असा हा 'मी' अतिशय स्थायी आहे!
"ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्" (हे संपूर्ण जग सतत बदलणारे आणि गतिशील आहे.)
जगात म्हणजे सतत बदलणे (Continuously changing, ever changing). जसे भौतिकशास्त्र सांगते की हे विश्व सतत विस्तारत आहे, तसेच माणसाचे आयुष्यही सूक्ष्मतेकडून विस्ताराकडे जाणारा एक प्रवास आहे. मृत्यू म्हणजे आपल्या वैयक्तिक अहंकाराचे त्या अफाट ब्रह्मतत्त्वात होणारे विसर्जन आणि ब्रह्मस्वरूप होऊन जाणेच होय. या मृत्यूलाही आपण किती सुंदरतेने स्वीकारतो!
जसे एखादे चित्र पाहण्यासाठी एक स्थिर पडदा लागतो, किंवा रस्त्यावरून धावणारी वाहने पाहण्यासाठी एक स्थिर रस्ता लागतो, तसेच या प्रत्येक बदलत्या गोष्टीमागे एक स्थिर आधार असावा लागतो. हे सतत बदलणारे शरीर आणि हा बदल अनुभवणारा 'मी' यांच्या पलीकडे जो स्थिर आहे, तोच आपला आत्मा आहे! आणि ते आपल्या ब्रह्मचैतन्याचेच रूप आहे.
किती सुंदर आणि अफाट तत्त्वज्ञान श्रीकृष्णाने गीताईच्या माध्यमातून आपल्याला शिकवले आहे:
"देहिनोऽस्मिन यथा देहे कौमारं यौवनं जरा..." (ज्याप्रमाणे देहधाऱ्या जीवाला या देहात कुमारवय, तरुणपण आणि वृद्धपण प्राप्त होते, त्याचप्रमाणे त्याला दुसरा देहही प्राप्त होतो.)
हा विचार आपल्या मनाला एक वेगळीच उंची देतो. आपल्याला गीतेची एक चळवळ उभी करायची आहे—चांगुलपणाची चळवळ! आपल्या-आपल्या परीने गीतेचा, भारतीय मानसशास्त्राचा, भारतीयतेचा आणि आपल्या आत्म्याचा प्रचार करायचा आहे.
देह फारसा वाढू शकत नाही, पण विचार अफाट वाढू शकतो! देहाच्या पलीकडचा हा विचार समजून घेऊन पुढे जायला शिका. सतत विस्तारत राहा, लोकांना भरभरून द्या आणि स्वतःचे एक उच्च, दिव्य जीवनदर्शन निर्माण करा!
"आदर्शाने आकर्षित व्हा. प्रलोभनांना बळी पडू नका. देह कधी ना कधी जाणारच आहे. मग तो उदात्त कार्यात खर्ची का नाही पाडायचा? उपयोगात का नाही आणायचा?"
श्रीमद्भगवद्गीता: दुसरा अध्याय – 'सांख्य योग'
भाग ३४
२८ जुलै २०२६
श्रीकृष्णा, बोलायला सुरुवात करतात अकराव्या श्लोकापासून दुसऱ्या अध्यायाच्या, पहिल्यांदा अशोच्यानन्वाशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे असं सांगतात, आणि गतासूनगतासूंच नानुशोचन्ति पण्डिताः या बाबतीत सांगतात. पण त्याच्यानंतर ते काय जाणारा आहे, काय temporary आहे, तात्कालिक आहे आणि काही नित्याच आहे, ते सांगायला लागतात.
सुरुवातीला, अगदी जे बारावा श्लोक आहे ना, "न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः" यामध्ये ते आपलं अस्तित्व या बाबतीमध्ये बोलतात. आपलं अस्तित्व आता आहे, ते आधी नव्हतं. परंतु पुढे नसेल, असं पण नाही. त्यानंतर ते देहाच्या बाबतीत पण असंच बोलतात. ते म्हणतात, हा देह अस्तित्वाचा व्यक्त होणे म्हणजे देह, अस्तित्व मनामध्ये पण असतं. एखादा व्यक्ती आपल्या समोर असला, म्हणजे तो आहे असं आपण मानत नाही. बस ती व्यक्ती आपल्या समोर नसताना ती आपल्या आठवणीत आहे, असं ज्यावेळी आपण म्हणतो, त्यावेळी तिचे आपण अस्तित्व कबूल करतो.
पण आपल्याला स्थूल स्वरूपामध्ये, कॉंक्रीट स्वरूपामध्ये देह लागतो. आणि देहाच्या नश्वरतेबद्दल, देहाच्या विविध अवस्थांच्याबद्दल आणि त्या बदलत्या असल्या तरी आपण त्याच्याशी चिटकून राहत नाही, त्याबद्दल
"देहिनोऽस्मिन्यथा देहे" मध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने श्रीकृष्णाने सांगितलेले आहे.
मृत्यूला पण खूप छान घ्या, असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. पण हे म्हणत असताना शाश्वत काहीतरी आहे, हा विश्वास, हा आधार, हे मोठं आश्वासन श्रीकृष्णा सतत देत आहेत. काहीतरी बदलणारं आहे आणि काहीतरी शाश्वत आहे, ह्या दोन्हीचा आधार कृष्ण देत आहेत. वास्तव कितीही भीषण असलं, तर ते नेहमीच भीषण असतं, असं नाही. =कितीही चांगलं असलं, तर ते नेहमी चांगलं असतं, असं नाही. वास्तव चांगलं आणि वाईट असणारच आणि आपल्या ते जो मी आहे, त्याला ते समजून घ्यावं लागतं.
म्हणजे शरीराच्या मूर्त, म्हणजे स्थूल शरीराच्या बाबतीमध्ये स्थूल शरीराच्या अवस्था 'देहिनोऽस्मिन्यथा देहे' मध्ये व्यक्त केल्या. हा पुढचा श्लोक मात्र खूपच सुरेख आहे आणि तो नीट समजून घ्यावा लागतो आणि तो जर नीट समजला, तर अध्यात्म शास्त्रावर आपल्याला अधिक पुढे जाता येतं.
"मात्रास्पर्शास्तु कौतेय शीतोष्णसुखदुःखदाः | आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ||"
अप्रतिमच, फार सुंदर श्लोक आहे हा. काय सांगतो हा श्लोक नेमका आपल्याला?
श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, "बा अर्जुना, शरीराला आणि मनाला होणारे सुख-दुःखाचे किंवा थंड उष्णतेचे अनुभव हे बाह्य जगाशी इंद्रियांच्या संयोगामुळे निर्माण होतात. हे अनुभव टिकणारे नसून सतत येणारे आणि जाणारे, म्हणजे येणारे आणि अनित्य आहेत. त्यामुळे माणसाने या सुख-दुःखाच्या चक्रात विचलित हो, विचलित न होता त्याला धीराने सहन करण्याची तितिक्षा बाळगण्याची ताकद ठेवली पाहिजे."
श्रीकृष्ण = बोलायला सुरुवात केल्यानंतर ते पहिल्यांदा स्पष्ट सांगतात की, अरे, तुझा हा शोक व्यर्थ आहे. दुसऱ्यांदा सांगतात की, बाबा हे अनित्याच्या बाबतीमध्ये तू बोलतोयस. नंतर सांगतात की, आपला देह पण बदलत राहतो, त्याला आपण कुठे पकडून ठेवतो. 'त्याच तसंच व्हायचं' म्हणून आपण देहाला देखील स्वीकारतो बदलताना आणि ते बदल देखील आपण आनंदाने स्वीकारतो, तसा मृत्यू पण आपण आनंदाने स्वीकारला पाहिजे.
पण ते सांगताना, श्रीकृष्ण म्हणतात, या सगळ्या प्रक्रियेमध्ये मोहात मात्र अडकलं नाही पाहिजे.
श्रीकृष्णाने आपल्याला एक साधना सांगितली आहे. मोहात न अडकण्याची साधना.
आता हा श्लोक आपण नीट समजून घेऊ.
'मात्रास्पर्शा' - इंद्रिय आणि विषयांचे संयोग.
कोणकोणती इंद्रिय आहेत? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, ही पाच इंद्रिय आहेत. आणि पाच विषय आहेत, त्या इंद्रियांच्या बाबतीत असणारे पाच विषय.
शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे पाच विषय.
ह्या विषयाचा आणि इंद्रियांचा ज्यावेळी संयोग होतो, त्यांचा परस्पर संबंध निर्माण होतो, त्यातून एक अनुभव तयार होतो. म्हणजे आपण एखादं पाहतो, जे पाहिल्यानंतर, काय पाहतो आपण? रूप पाहतो. त्या विषयाचं ध्यान करायला लागतात. त्यातून भावना-विचार निर्माण होतो.
निसर्ग आहे, सुंदर निसर्ग आहे, पाहिल्यानंतर. तो निसर्ग दिसला, डोळ्यांनी पाहिला, तर त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये भाव निर्माण होतो. तो भाव निर्माण होण्याचा घटक म्हणजे विषय.
विठ्ठलाचे रूप पाहिल्यानंतर मनामध्ये काय भावना निर्माण होते?
ही व्यक्तीपरत्वे बदलणारी असते. विठ्ठलाचं रूप तेच असतं, पाहणाऱ्यांचे डोळे तेच असतात, पण रूप पाहिल्यानंतर जे मनामध्ये भाव निर्माण होतात, ते मात्र सब्जेक्टिव्ह असतात.
त्याचबरोबर, आपल्या शरीराला ज्या गोष्टी जाणवतात, म्हणजे दोन एक्स्रिमिटीज (extremities), थंड गोष्टी जाणवतात, गरम गोष्टी जाणवतात. पावसाळा छान वाटायला लागतो, उन्हाळा त्रासदायक वाटायला लागतो. आपण इक्विलिब्रियम (equilibrium) मध्ये किंवा मजेत राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून उन्हाळ्यात आपण एसी लावतो. खूप कोरडी हवा असेल तर आपण फॅन लावतो.
ज्यावेळी एखादा स्पर्श किंवा एखादं वातावरण आपल्याला सुखी करतं किंवा दुःखी करतं, ह्यावरून त्या वातावरणामध्ये आपण जास्त काळ राहायचं की नाही हे आपण ठरवतो.
पंचज्ञानेंद्रिय अॅक्टिव्ह नसतील, तर विषयाचा आणि वातावरणाचाचा अनुभव आपल्याला घेताच येत नाही. पंचविषय समोर नसेल, तरी आपल्याला अनुभव घेता येत नाही. विषय पण पाहिजे आणि ज्ञानेंद्रिय पाहिजे आणि त्यांचा संयोग झाला पाहिजे. त्यामधून अनुभव निर्माण होतो, मग तो चांगला पण होतो आणि वाईट पण होतो.
तसंच शरीराला, पंचमहाभूतं जी आहेत, त्या पंचमहाभूताच्या शरीरावर होणारा परिणाम
हे देखील काही अनुभव निर्माण करतात. तसंच काही घटना घडल्या, काही गोष्ट घडली,म्हणजे इंद्रियाचा विषयाचा संयोग झाला तर त्यातून सुख आणि दुःख निर्माण होतात. सुख आणि दुःख निर्माण करण्यासाठी, होण्यासाठी, इंद्रिय आणि विषय यांचा संयोग होणं गरजेचं असतं.
आता मन पण महत्वाचे. उदाहरणार्थ, इंद्रियांचा आणि विषयाचा संयोग झाला आणि त्याच्यामध्ये मन आलं, आणि ते आपल्या मनाला अनुकूल असलं, तर ते सुख देणारं असतं, आनंद देणारा प्रसंग असतो, ती अनुभूती म्हणजेच सुखाची अनुभूती.
दुःख म्हणजे काय ज्यावेळी इंद्रिय आणि विषयांच्या संयोगामध्ये मन येतं, आणि काहीतरी आपल्याला नकोसं वाटायला लागतं, प्रतिकूल वाटायला लागतं, त्याला आपण त्रास म्हणतो, वेदना अनुभवतो. त्यालाच आपण म्हणतो दुःख. हे जे सुख-दुःखाचे अनुभव असतात,शीत-उष्णतेचे अनुभव असतात, ते क्षणीक असतात.
मनाच्या पातळीवर घेतलेला अनुभव देखील तो क्षणीक असतो. इंद्रियांच्या आणि विषयांच्या सेवनातून निर्माण होणारा आनंद देखील क्षणीक असतो.
ते जास्त काळ टिकत नाहीत. काही वेळाने नाहीसे होतात. सतत येणारे आणि जाणारे असतात.
त्या अनित्य असतात. त्यांचा अस्तित्व तात्कालिक असतं,जे कधीही कायमस्वरूपी टिकत नाहीत.
या भौतिक अनुभवांना कसं समजून घ्यायचं?
इथे श्रीकृष्ण म्हणतात, 'तितिक्षस्व', धीराने सहन कर.
मनाचा समतोल न ढळू देता, कोणत्याही तक्रारीशिवाय त्या परिस्थितीला धैर्याने तोंड दे किंवा सहन कर, त्याला तितिक्षा म्हणतात.
भारत राजाच्या कुळात जन्मलेल्या अर्जुना, तुला मी तुझ्या कुलधर्माची आणि पराक्रमाची जाणीव करून देतो,हे तू शिकलं पाहिजेस. आता ह्याच्यामध्ये गंमत आहे.
ज्ञान-प्रबोधिनीच्या उपासने मध्ये, पहिल्यांदा
पंचमहाभूताची शुद्धि सांगितलेली आहे. आणि त्यानंतर पंच विषयांची शुद्धि सांगितलेली आहे.
मुळे आपल्याला पंचमहाभूतांची शुद्धी, आपल्यामधील आपण सेवन करत असलेल्या आणि पंच वासनांची शुद्धी, जे आपण सेवन करतो, त्या पंच विषयांची शुद्धी असं करायला श्रीकृष्णाने हे करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे.
बंधूंनो, भगिनींनो, भगवद्गीता हा प्रवचनाचा विषय नाही. तो समजून घेण्याचा विषय आहे आणि आचरणाचा विषय आहे. भगवद्गीता हा श्रवणाचा विषय नाही, तो ऐकण्याचा आणि आत्मसात करण्याचा विषय आहे. वाचलं, ऐकलं, त्यानंतर ते प्रत्यक्षात आचरणात यायला लागलं, की भगवद्गीता समजायला लागते.
हे एकट्या-दुकट्याचं काम नाही. आपल्याला यासाठी एक व्यापक चांगुलपणाचं जनआंदोलन उभं करावं लागणार आहे. सध्या खूप मोठी आंदोलनं होत आहेत. बघू आपण किती वेगाने (फास्ट) हे आंदोलन उभं करू शकतो. अवघड आहे, कारण चांगल्या गोष्टी करायला वेळ लागतो. आपल्याला जर अशा या आंदोलनात भाग घ्यायची इच्छा असेल, तर मला जरूर संपर्क करा. माझा फोन नंबर मी खाली दिलेला आहे.
धन्यवाद.
प्रसाद चिक्षे
ज्ञान प्रबोधिनी
८२०८४३८६००
श्रीमद्भगवद्गीता: दुसरा अध्याय – 'सांख्य योग'
भाग ३५
२९ जुलै २०२६
शोक करणे, अस्वस्थ होणे, त्रासून जाणे, भयभीत होणे, चिडचिड करणे, चुकीचे समर्थन करणे, क्रोधित होणे, अहंग्रस्त होणे, हा माणसाचा मूळ स्वभाव नाहीये. माणसाचा मूळ स्वभाव खूप छान आहे; स्वच्छ आणि निरागस आहे. स्वतःमध्ये मस्त राहून आनंदी राहण्याचा आणि मस्त जगण्याचा आहे. दुसऱ्याला त्रास देण्याचा नाही, तर दुसऱ्याला समजून घेऊन त्याला मदत करण्याचा आहे.
पण हा स्वभाव बदलतो; ईश्वराने आणि निसर्गाने दिलेला हा आपला पवित्र स्वभाव आपण स्वतःच बदलतो. खरंच, आपण स्वतःला कधी विचारले आहे का, की आपल्याला दुःखी राहायला आवडतं का? आपल्याला नेहमी चिडचिड करत राहायला आवडतं का? 'पाहिजे, पाहिजे, पाहिजे' म्हणत सारखे आसुसलेले राहायला आवडतं का? आपल्याला सतत हिंसक राहायला आवडतं का?
नाही, मुळीच नाही आवडत. आपल्याला शांत राहायला आवडतं. आपल्याला आनंदी राहायला आवडतं. आपल्याला दुसऱ्यांचा विचार करायला आवडतं. मला कधीकधी असं वाटतं, की केवळ आपला आणि आपलाच विचार करणारी या भूततालावर एकही व्यक्ती नसेल; प्रत्येकाने कुणाचा ना कुणाचा तरी विचार नक्कीच केलेला असतो. एखादा जबरदस्त खूनी जरी असला, तरी तो आपल्या लेकराचा शांतपणे विचार करतो आणि त्याच्यावर प्रेम करतो. आपण आपल्या दिवसाचा विचार केला, तर दिवसभर आपण आपल्या प्रकृतीच्या नियमानुसार वागत असतो. आणि रात्री मात्र, थकून आपल्याला त्या सर्वापासून विमुक्त होण्यासाठी झोपेची नितांत गरज असते. जर आपण सतत त्या तीव्र चुकीच्या भावनांमध्ये अडकून राहिलो आणि झोप न घेता त्यांच्याशी डिटॅच झालो नाही, तर आपली अवस्था काय होईल?
त्यामुळे आपल्याला त्या भावनांपासून डिस्कंटिन्यू व्हावंच लागतं, अलिप्त व्हावंच लागतं. आपल्याला सुखापासून आणि दुःखापासूनही अलिप्त व्हावं लागतं. तुम्हाला कंटीन्यूअसली सुख मिळतंय, तर तुम्ही न झोपता सुख अनुभवू शकता का?
आपल्याला थांबावं लागतं. आपल्याला डिटॅच करावं लागतं. आपल्याला डिस्कंटिन्यू करावं लागतं. आपल्याला एक पॉझ द्यावा लागतो. विषयांचा आणि इंद्रियांचा संयोग होऊन, त्यामध्ये मन आल्यानंतर हे सुख-दुःख तयार होतात. आणि जरी विषयाचा संयोग झाला नाही आणि इंद्रिये शांत व संयमित असली, तरीही चित्तामध्ये असणाऱ्या पूर्वानुभवाच्या आधारावर आपण हे सुख-दुःख अनुभवतो.
त्यामुळे आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे, या सुख-दुःखातून निर्माण होणारी जी अस्वस्थता आहे, त्याचे रिपरक्युलेशन्स (दुष्परिणाम) किंवा त्याची वृत्ती आपल्या चित्तामध्ये उमटू नये, यासाठी प्रयत्न करावा लागेल. या सगळ्या भावनांना आपल्याला धीराने आणि तितिक्षेने (सहजपणे सहन करण्याची शक्ती) घ्यावं लागेल. आपल्या निगेटिव्ह इमोशन्सच्या (नकारात्मक भावनांच्या) मोहामध्ये आपल्याला अडकून पडून चालणार नाही.
निगेटिव्ह इमोशन्सचा तात्पुरता फायदा होईलही. समजा, तुम्ही एखाद्या व्यक्तीवर चिडला, क्रोधित झालात, तर ती व्यक्ती भयभीत होईल आणि तुमच्या मनासारखं करेल. पण हे नेहमी होत नसतं; हे तात्पुरतं असतं. तुम्ही लबाडी केली, दुसऱ्या माणसाला फसवलं आणि त्यातून तुम्हाला काहीतरी मिळालं, तरी ते नेहमीच टिकेल असं नाही. हे बदलतं आणि कधी ना कधी तुम्हाला त्याचा मोठा सेटबॅक (धक्का) सुद्धा बसतो. त्यामुळे निगेटिव्ह गोष्टी सतत फायदे देणाऱ्या असतातच असं अजिबात नाही. त्याचा शंभर टक्के सेटबॅक तुम्हाला बसणारच आहे.
त्यामुळे तुम्हाला त्या भावना डिस्कंटिन्यू कराव्याच लागणार आहेत आणि तुमच्यामध्ये चांगल्या वृत्ती, चांगले स्वभाव, चांगले भाव आणि चांगले विचार आणावेच लागणार आहेत. हे आज नाही तर उद्या करावेच लागणार आहे, कारण हे इनविटेबल (अपरिहार्य) आहे. आनंदी असणे अपरिहार्य आहे, शांत असणे अपरिहार्य आहे. हे आपल्याला करावच लागणार आहे. प्रश्न हा आहे की, हे कधी करायचं? त्याकरिता फार वेळ वाया घालवता कामा नये; आपण आत्तापासूनच करायला सुरुवात केली पाहिजे.
भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्णाने यावर फार सुंदर उपाय सांगितला आहे:
यं हि न व्यथयत्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ (२-१५)
अर्थ: हे पुरुषांमध्ये श्रेष्ठ अर्जुना! ज्या धीर (संयमी) पुरुषाला हे सुख आणि दुःख दोन्ही विकार अस्वस्थ करत नाहीत किंवा ज्याच्या मनात सुख आणि दुःखात समभाव असतो, तोच मनुष्य मोक्षाचा (अमृतत्वाचा) अधिकारी ठरतो.
डिस्कंटिन्यू करणं हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार असा आहे की, सुख आणि दुःखाच्या ज्या लाटा येतात, त्यांच्यामुळे विचलितच व्हायचं नाही, व्यथितच व्हायचं नाही. त्यांना समान पाहायचं. हे जरी अवघड असलं, तरी पहिल्यांदा आपल्याला त्याचं शास्त्र कळलं पाहिजे, की आपण या सुख-दुःखांना समान का पाहायचं?
कारण या दीर्घकाळ टिकणाऱ्या गोष्टी नाहीत.
आपल्याला दीर्घकाळ टिकणाऱ्या, जास्त लाभ देणाऱ्या आणि अधिक चांगल्या गोष्टींकडे जायचं आहे. या तात्पुरत्या गोष्टी आहेत, प्रेयस गोष्टी आहेत, श्रेयस्कर गोष्टी नाहीत. श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रेयस्कर मार्ग सांगितला आहे, म्हणूनच तो सांगतो की सुख-दुःखाच्या गर्तेमध्ये कधीच अडकायचं नाही. एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला जर आज सुख मिळत असेल, तर तीच गोष्ट परत परत केल्यावर तेच सुख मिळेलच, याची कोणतीही खात्री नसते. दुःखाचंही तसंच असतं. म्हणूनच, एक तर तुम्हाला त्यापासून डिस्कंटिन्यू व्हावं लागतं, किंवा त्यांच्यापासून थोडं अलिप्त होऊन, साक्षीभावाने, प्रखर इच्छाशक्तीच्या आधारे आणि तितिक्षेने त्याकडे समानतेने पाहावं लागतं.
सुख किंवा दुःख येतेय ना? येऊ दे. जातंय ना? जाऊ दे. ध्यानाचा एक साक्षीभावाचा प्रकार खूप सुंदर आहे. आपल्या विचारांचा अभ्यास करा. येणारा कुठलाही विचार येऊ द्या, त्याचे प्रेमाने स्वागत करा. 'अरे बाबा, ये!' असं म्हणून त्याच्यामध्ये गुंतू नका, फक्त त्याला स्वीकारा. हळूहळू तो विचार निघून जातो आणि दुसरा विचार येतो. दुसऱ्या विचाराला स्वीकारा, पण त्यात गुंतू नका. असे विचार येत राहतात आणि जात राहतात. आपण तटस्थपणे त्यांच्याकडे पाहत राहिलो आणि गुंतलो नाही, तर त्यातून सुख-दुःख निर्माणच होणार नाही.
तसंच, विषयांचा संग झाला, विषय आणि इंद्रिय यांचा संयोग झाला आणि त्यामुळे मनामध्ये लाटा निर्माण व्हायला लागल्या, तरी त्या मनामधल्या विचारांकडे व भावनांकडे व्यथित न होता, विचलित न होता, न गुरफटता आपण शांतपणे तटस्थपणे साक्षीभावाने पाहत राहिलं, तर त्या भावना, ते सुख-दुःख आणि त्या लाटा आपल्याला कधीही त्रास देत नाहीत.
म्हणजेच आपण मुळातच याच्या मुळावर घाव घाालत असतो. पहिली गोष्ट म्हणजे त्या भावनांना डिस्कंटिन्यू करणं, त्यांच्यापासून तात्पुरतं डिटॅच होणं. आणि सतत जर असाच आपला भाव राहिला, तर ती हळूहळू आपली नैसर्गिक वृत्ती बनते. आपण प्रत्येक गोष्टीकडे असं पाहू शकतो—'आओ! आओ! आपका स्वागत है, आप जाने वाले हैं, मालूम है, रहो थोड़ी देर, कुछ बात नहीं है, और जाते समय बाय-बाय करके जाने का! जा जा!'
एखादा दुःखद प्रसंग किंवा चांगला प्रसंग आपल्या आयुष्यात घडतो आणि त्यातून आपण शिकतो. कधीकधी ही शिकवण तात्पुरती असते, ती एक तात्पुरती प्रतिक्रिया असते. उदाहरणार्थ, आपण रक्ताची चाचणी केली आणि त्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे किंवा साखरेचे प्रमाण खूप वाढलेले आढळले. आपण विचलित होतो, अस्वस्थ होतो. मग आपण नियम पाळायला लागतो, आपली काळजी घ्यायला लागतो. काही दिवसांनी साखरेचे प्रमाण कमी होते, रिपोर्ट नॉर्मल येतो आणि आपली एक-दोन औषधांची गोळी कमी होते. आपण खूश होतो! पहिल्यांदा आपण दुःखी झालेलो असतो, पण प्रयत्नांनंतर आता आपल्याला आपले 'इम्प्रूव्हड व्हर्जन' मिळाले म्हणून आपण आनंदी होतो. ते आपणच केले असते, आपल्याच प्रयत्नांमुळे ते झाले असते.
मग काही दिवस ते छान चालतं. पण हळूहळू त्या इम्प्रूव्हड व्हर्जनचा विसर पडायला लागतो. आपण सगळे पथ्य विसरून पुन्हा मस्त जगायला लागतो, व्यायाम बंद करतो आणि आपल्या जीवनशैलीतील जुन्या दोषांकडे दुर्लक्ष करून पुन्हा 'पहिले पाढे पंचावन्न' अशी स्थिती करतो. आणि मग अचानक पुन्हा कोलेस्ट्रॉल किंवा साखर वाढते! पुन्हा तेच सुख आणि दुःख!
अरे, यापेक्षा आपण असा विचार का नाही करत? आपण नेहमीच असं नियमित जगूया, जेणेकरून आपली साखर, आपला त्रास किंवा कोलेस्ट्रॉल कधी वाढणारच नाही. ते नेहमीच नॉर्मल पातळीवर किंवा त्यापेक्षा कमी राहतील. अशी नियमितता आणि आपल्या सवयींमध्ये असा बदल घडवून आणणे म्हणजेच 'ट्रान्सफॉर्मेशन' (रूपांतरण). असं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला वाईट अवस्थेतून अधिक चांगल्या अवस्थेत नेतो. त्यामुळे आपण जास्त आनंदी राहतो, जास्त समाधानी राहतो, जास्त शांत राहतो, इतरांचा विचार करायला लागतो आणि सर्वांना सोबत घेऊन एकत्र काम करायला लागतो.
आपण म्हणतोच ना—
शांतीमंत्र (तैत्तिरीयोपनिषद / कठोपनिषद):
ॐ सह नाववतु ।
सह नौ भुनक्तु ।
सह वीर्यं करवावहै ।
तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
आणि,
"सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्।"
असा विचार जेव्हा आपण करतो, तेव्हा आपले खऱ्या अर्थाने ट्रान्सफॉर्मेशन होते.
भगवद्गीतेतला हा श्लोक आपल्याला हेच सांगतो, की आपल्याला जर हे ट्रान्सफॉर्मेशन करायचे असेल, तर पहिल्यांदा आपल्या मनातून तीव्रतेने वाटले पाहिजे की आपल्याला हे रूपांतरण घडवून आणायचे आहे. असा तीव्र ध्यास निर्माण झाल्यानंतर, आपण योग्य पद्धतीने स्वतःला त्या मार्गावर समर्पित केले पाहिजे, आपल्यातल्या काही चुकीच्या गोष्टी हळूहळू सोडून दिल्या पाहिजेत आणि अधिक परिपक्व बनले पाहिजे.
हे मानसिक आणि शारीरिक ट्रान्सफॉर्मेशन हळूहळू आपल्यातील एका साध्या सुरवंटाचे सुंदर फुलपाखरामध्ये रूपांतर करते. याने नेमके काय होते? तर मुळापासून बदल होतो, सखोल बदल होतो, आपला गाभाच बदलतो. आपल्या स्वभावामध्ये प्रचंड पालट होतो, अस्तित्वात ट्रिमंडस (मोठा) बदल होतो. परंतु, ही दीर्घकाळ चालणारी आणि अनेक टप्प्यांतून जाणारी प्रक्रिया आहे. आपले आयुष्य एक सुंदर फुलपाखरू करण्याची ही प्रक्रिया आहे, ज्यातून समाधान, शांती, आनंद, समत्व आणि सहकार्य या सगळ्यांचा खरा आनंद घेता येतो.
म्हणूनच—
"यं हि न व्यथयत्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥"
हे पुरुषश्रेष्ठा अर्जुना! ज्या धीर पुरुषाला हे सुख-दुःख व्यथित करत नाही, म्हणजे जो यांच्यामध्ये गुरफटत नाही, त्यांच्यामुळे विचलित होत नाही आणि जो सुख-दुःखात समान राहतो, तोच अमृतत्वास किंवा मोक्षास पात्र ठरतो.
'याची देही, याची डोळा' मुक्तीचा हा सोहळा खऱ्या अर्थाने पाहता येतो. मस्त, नियमित, आनंदात आणि एका छान लईत जगता येते—गीता अभ्यासताना आपल्याला असाच अनुभव येतो.
माझी सगळ्यांना विनंती आहे की, असा छान, मस्त चांगुलपणा पसरवणारे, सुंदर जगण्यासाठी प्रवृत्त करणारे आणि स्वतःचे फुलपाखरामध्ये रूपांतरित करण्याची इच्छा असणारे जे जे लोक आहेत, त्यांना आपण जोडूया. त्यांच्यासोबत सातत्याने आपण गीतेचा अभ्यास करूया. तुम्हालाही जर या सगळ्या प्रक्रियेमध्ये रस असेल, तर नक्की सहभागी व्हा.
धन्यवाद!
आपला
प्रसाद चिक्षे
ज्ञान प्रबोधिनी
अंबाजोगाई
श्रीमद्भगवद्गीता: दुसरा अध्याय – 'सांख्य योग'
भाग ३६
३० जुलै २०२६
आपण सगळे या जगामध्ये सतत बदलणाऱ्या जगामध्ये जगत असतो. आपला स्वतःचा देह पण सारखा बदलत असतो. म्हणजे जग पण सारखं बदलतंय, देह पण सारखा बदलतोय.ह्या आपल्या भाव-भावना आहेत, त्या पण सारख्या बदलताहेत. आपल्या विचार करण्याच्या पद्धती पण सारख्या बदलताहेत. ह्या बदलणाऱ्या जगामध्ये काहीतरी स्थिर असतं. जे स्थिर आहे, त्याला आपण शाश्वत म्हणतो. सत् म्हणतो. आणि जे स्थिर नाही, बदलणार आहे, त्याला अशाश्वत म्हणतो. त्याला असत् असं पण म्हणतो. आपलं अध्यात्मशास्त्र म्हणतं, हारमोनी ठेवा, सलोखा ठेवा, समत्व ठेवा. हे जर तुमच्या जगण्या-वागण्यात जर समत्व नसेल, तर अनइक्विलिब्रियम तयार होईल, असमतोल तयार होईल. आणि तो असमतोल तयार झाला की गडबड होते.
अर्जुनामध्ये देखील हा समत्व ढासळलेला आहे. तो टोकाचा अशाश्वताचा विचार करतोय. जे शाश्वत नाही, याचा विचार जास्त करतोय. एकदम टोकाचे आहे त्याची भावना आणि शाश्वताचा अजिबातच विचार करत नाही. त्यामुळे त्याचा पूर्ण बॅलन्स पूर्ण बिघडलाय. त्याला नॉर्मल आणायचं असेल, नॉर्मल करायचं असेल, तर श्रीकृष्णांनी पहिली टॅक्टिक वापरली ती थेट फक्त शाश्वताचा विचार करायचा. शाश्वताबद्दल सांगायचं.
अशाश्वतामध्ये गुंतूच नको, शाश्वतामध्येच गुंतु असं म्हणायचं. ही स्ट्रॅटेजी पण असू शकते. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींकडे पाहत असताना, ह्या श्लोकांकडे पाहत असताना, हे भगवद्गीता ही निवृत्तीप्रधान नाहीये. आणि प्रवृत्तीप्रधान पण नाहीये.
फक्त शाश्वताचा विचार करणारी पण नाहीये आणि अशाश्वताला एकदम संपूर्ण संपून टाका, असं पण म्हणणार नाही. शेवटी जे घडतंय, ते अशाश्वत आपल्या बाबतीतच घडतंय ना? आणि जे शाश्वत आहे, ते आपल्या बाबतीतच आहे. आपण असू तर अध्यात्म आहे ना? आपण असू तर हे सगळं आहे. त्यामुळे आपण आहे असणं, हे देखील खूप महत्त्वाचं आहे.
त्यामुळे भगवद्गीता अजिबात निवृत्तीप्रधान नाहीये आणि एकदम प्रवृत्तीप्रधान नाही. भगवद्गीता हे दोन्हीचा समतोल राखण्यासाठीच शास्त्र आहे.हा सुरुवातीला तुम्ही प्रवृत्तीप्रधान जास्त असू शकता, मग हळूहळू कमी होतात, मग हळूहळू निवृत्तीप्रधान पण होता. पण पूर्ण निवृत्तीप्रधान होणे चालत नाही. आपल्या उपनिषदामध्ये संभूती आणि असंभूती, अविद्या आणि विद्या असे दोन शब्द वापरलेले आहेत.म्हणजे संसार, स्वार्थ आणि परमार्थ, संसार आणि पारलौकिक गोष्टी, ह्याचा आपल्याला इक्विलिब्रियम साधायचा आहे. ह्याची हारमोनी साधायची आहे. समत्व साधायचं आहे.
त्यामुळे हे सगळे श्लोक त्या अंगाने आपल्याला पाहावे लागतील. नाहीतर आपल्याला सुरुवातीलाच असं वाटायला लागेल की, भगवद्गीता ही पूर्णतः निवृत्तीप्रधान आहे, ती फक्त आत्म्याचा विचार करणारी आहे, आत्मतत्त्वाला समजून घ्या, म्हणजे बाकीचे सगळे प्रश्न संपतील. असं नाहीये. आत्मतत्त्वाला समजून घेऊन त्यानुसार आपल्याला प्रवृत्तीमार्गामध्ये शरीराला पण समजायचं आहे. म्हणजे फक्त आत्म्याचा विचार करेल, मी शरीराचा अजिबात विचार करणार नाही. असं करून नाही चालणार. आपल्याला शरीराचा विचार करावा लागेल, कारण शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्. त्याचा त्याचा पण विचार करावा लागेल. आपल्याला स्थुलाचा पण विचार करावा लागेल, आपल्याला सूूक्ष्माचा पण विचार करावा लागेल. असा जो विचार करायला लागतो, त्यावेळी आपल्याला भगवद्गीता अधिक नेमकी समजायला लागते.
हा श्लोक सांगतो:
• नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः। उभयोरपि दृष्टोन्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः॥
जी गोष्ट असत् आहे, जी बदलणारी आणि नश्वर आहे, तिची कधीही स्थायीसत्ता टिकत नाही आणि जे सत् आहे, जे शाश्वत आणि अमर आहे, त्याचा कधीही नाश होत नाही. या दोन्हीच्या शरीर आणि आत्मा खऱ्या स्वरूपाचा हा अंतिम सिद्धांत तत्वज्ञानी महात्म्यांनी अनुभवला आहे.
मग एक चिरंतर बदलणारा आहे, एक चिरंतन शाश्वत आहे. ह्या दोन्ही गोष्टींचा अनुभव तत्वज्ञानी महात्म्यांनी अनुभवलेला आहे, असं इथे सांगितलंय. आता आपण थोडंसं समजून घेऊ, की आपल्या मनामध्ये दोन प्रकारच्या भावना आहेत. एक आहे असत् विचार करून निर्माण होणाऱ्या भावना आणि एक आहे सत् विचार करून निर्माण होणाऱ्या भावना. एक आहे श्रेयस्कर मार्गाचा विचार करून निर्माण होणाऱ्या भावना, एक आहे प्रेयसमार्गावरून निर्माण होणाऱ्या भावना.
एक आहे स्वार्थ आणि संसार, याचा विचार करून निर्माण होणाऱ्या भावना, एक आहे परमार्थ आणि पारमार्थिक गोष्टींचा विचार करून निर्माण होणारी भावना. असा एक संच आहे, ज्याला आपण थोडंसं असत् चा विचार करून करणाऱ्या भावना पण कोणत्या?
जे बदलतं आहे त्याच्या विचार करून करणाऱ्या भावना आहेत: राग (Anger), भीती (Fear), दुःख (Sadness), अपराधीभाव (Guilt), चिंताकाळजी (Anxiety and Worry), मत्सर, ईर्ष्या, जेलस आणि अन्वी, लच्छा, लांछन, शेलम, हताशपणा, नैराश्य (Frustration) आणि एकटेपणा (Loneliness).
ह्या असत् विचार करून निर्माण होणाऱ्या भावना आहेत. आता सत् विचार करून, श्रेयस्कर श्रेयासाचा विचार करून निर्माण होणाऱ्या भावना कोणत्या? तर शांती आणि संयम, निर्भयता आणि सुरक्षिता, आनंद आणि उल्हास, आत्मसन्मान, क्षमाशीलता, विश्वास आणि आशा, समाधान आणि कौतुक, आत्मविश्वास आणि स्वीकार, उत्साह आणि प्रेरणा, आपुलकी आणि जिव्हाळा.
इंग्रजीमध्ये Peace and Calmness, Courage and Safety, Joy and Happiness, Self-forgiveness and Pride, Trust and Hope, Contentment and Appreciation, Confidence and Acceptance, Enthusiasm and Inspiration, Belonging and Connection.
अशा या दोन प्रकारच्या भावना आहेत.
एक सत् विचार करून, एक प्रेयसाचा विचार करून आणि एक श्रेयसाचा विचार करून निर्माण होणाऱ्या भावना आहेत.
आता ह्याच्यामधल्या एकाच भावनाशी, म्हणजे ज्या बदलणाऱ्या गोष्टींशी रिलेटेड भावना आहेत, त्याच्याशीच जर आपण चिटकून बसलो आणि त्याच सत्य आहेत, असं समजून बसलो, तर ह्या ज्या इमोशन्स आहेतत्या डॉमिनेटेड होतात आपल्या मनामध्ये.
त्या सारख्या-सारख्या भावना आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागल्यानंतर त्याचा अतिरिक्त त्रास होतो आपल्याला.
ह्या ज्या भावना आहेत सारख्या-सारख्या आपण अनुभवायला लागलो की आपले ते सेन्टिमेंट बनतं, वृत्ती बनते आणि हळूहळू जर त्या निगेटिव्ह गोष्टी सारख्या-सारख्या आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागल्या, तर त्या आपल्या रिपू बनतात.
काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, मदमोह, मत्सर, अशा सगळ्या रिपू बनतात. आणि जर आपण ते आपल्याला त्रासदायक बनतात. तेच जर आपण सत्प्रवृत्तीच्या सद्गुणांचा विचार केला, संयम, पवित्रता, शांती, क्षमा, संतोेष, उदारता, विवेक, अनासक्ती, नम्रता, प्रेम, मुदिता, या भावना जर वाढवल्या, तर आपल्या त्या शत्रू नाही, त्या आपल्या मित्र बनतात.
त्यामुळे काही शत्रू भावना आहेत, त्याला आपण षड्रिपू म्हणतो, काही मित्र भावना आहेत, त्याला आपण हे म्हणतो. म्हणजे त्या आपल्या वृत्ती बनतात.
अशा वृत्ती डॉमिनंट होत चालल्या, सारख्या-सारख्या होत राहिल्या, तर त्याच्यातून दुर्गुण आणि विघातक प्रवृत्ती तयार होतात. त्याला आपण असुरी संपदा म्हणतो. आणि श्रेयस्कर मार्ग आपण जास्त वापरायला लागलो, तर दैवी गुण संपत्ती, सद्गुण संपत्ती आपल्या वाढायला लागतात.
खरं जर तौलनीक दृष्ट्या पाहिलं, तर आपल्या समाजामधल्या दैवी संपत्ती ह्या वाढल्या पाहिजेत. आपल्या समाजामधल्या सद्गुण वाढले पाहिजेत. आपल्या समाजामधल्या पॉझिटिव्ह इमोशन्स किंवा श्रेयस्कर इमोशन्स ह्या जास्त वाढल्या पाहिजेत. परंतु एकदमच अशी एक्स्ट्रिमिटी गाठता येत नाही, म्हणून दोन्हीचा इक्विलिब्रियम ठेवणं, दोन्हीचं समत्व ठेवणं हे खूप गरजेचं असतं. असं समत्व ठेवणं, जो कोणी अनुभवतो, या दोन्ही गोष्टींचा ज्यांनी तौलनीक अभ्यास केलेला असतो, ज्यांनी ते प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो आणि त्यातून काय होतं, याचा दीर्घकाळ प्रयोग केला असतो. म्हणजे तात्कालीन प्रयोग नाही, तो दीर्घकाळाचा प्रयोग केला असतो, आपल्या आयुष्यासाठीचा ह्याचा प्रयोग केला असतो आणि त्यांचा आयुष्य इतरांसाठी मार्गदर्शक बनतं, त्यांचा आयुष्य इतरांसाठी गाईडलाईन बनतं. अशा लोकांना तत्वज्ञानी म्हणलेलं आहे भगवद्गीतेमध्ये.
अशा तत्वज्ञानी माणसांनी, महात्म्यांनी ते अनुभवलेलं असतं, तो अंतिम सिद्धांत असतो त्यांचा. असं या श्लोकावरून कळतं.
जी गोष्ट असत् आहे, जी बदलणारी आहे आणि नश्वर आहे, तिची कधीही स्थायीसत्ता टिकत नाही आणि जे सत् आहे, जे शाश्वत आणि अमर आहे, त्याचा कधीही नाश होत नाही. या दोन्हीच्या शरीर आणि आत्मा खऱ्या स्वरूपाचा हाच अंतिम सिद्धांत तत्वज्ञानी महात्म्यांनी अनुभवला आहे.
म्हणून अर्जुना, समजून घे.
• नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः। उभयोरपि दृष्टोन्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः॥
थोडक्यात सांगायचे तर, प्रेयस्कर मार्गावर चालणे जरी सोपे आणि पटकन साध्य होणारे वाटत असले, तरी त्यापासून मिळणारे यश किंवा सुख हे फार काळ टिकणारे नसते; ते एका ठराविक वेळेनंतर संपुष्टात जाणारे असते. याच्या विपरीत, श्रेयस्कर मार्गाचा प्रवास हा किंचित अवघड आणि कठीण असला, तरी तो अधिक काळ टिकणारा आणि आयुष्याला वृद्धिंगत करणारा, म्हणजेच नेहमी 'इन्क्रिझिंग रिटर्न' देणारा ठरतो; तर प्रेयस्कर मार्ग हा हळूहळू क्षीण होणारा, म्हणजेच 'डिक्रीझिंग रिटर्न' देणारा ठरतो. जीवनाचा गाडा हाकताना या दोन्हीच्या ताळेबंदाचा विचार अत्यंत सूक्ष्मपणे करावा लागतो.
आपल्याला खरं चांगुलपणाचं, सद्गुणाचं संघटन करायचं आहे. दैवीगुणी संपत्तीचं संघटन करायचं आहे. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला समत्व ठेवायचं आहे, हारमोनी ठेवायची आहे. पण काही प्रयेस्कर गुण पण लागणार आहेत, आणि श्रेयस्कर गुण पण लागणार आहेत. श्रेयस्कर गुण म्हणजे काय की, आपण स्वतः बदलू, दुसऱ्याला कशाला बदलायचं? आपण आधी बदलू स्वतःला आणि दुसऱ्याला पण बदलू.
प्रेयस्कर गुण असा आहे की, आपण दुसऱ्याचा कशाला विचार करायचा, आपला फायदा आहे तेच करू आपण.पण आपल्याला इक्विलिब्रियम ठेवायचंय. आपल्याला स्वतःला बदलता-बदलता दुसऱ्यांना पण बदलायचंय. स्वामी विवेकानंद जे म्हटले, की बी अँड मेक, बना आणि बनवा.
भगवद्गीता हा तसाच मार्ग आहे.कृष्ण हे बनण्याचं प्रतीक आहे. आणि अर्जुन हे बनवण्याचं प्रतीक आहे. बी चं प्रतीक हे कृष्ण आहेत, मेकचं प्रतीक हे अर्जुन आहेत.
आपण पण थोडंसं बनतोय हे सगळं ऐकताना. आपल्याला थोडंसं इतरांना पण बनवावं लागेल. फक्त अभ्यास करणं हे अभिप्रेत नाही, थोडी कृती करणं अभिप्रेत आहे. अभ्यास हा खरंच श्रेयस्कर असतो, कृती थोडीशी प्रयेसाकडे जाणारी असते.
त्यामुळे थोडा प्रयेस् मार्गाचा आपण उपयोग करू, हा जो सगळं आतापर्यंतचं जे मी विश्लेषण केलं आहे, ते तुम्हाला जर आवडलं असेल, तर ते अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. लोकांना कळू द्या, नेमकं काय आहे, सत्य काय आहे, असत्य काय आहे, स्थायी काय आहे, चिरंतन काय आहे. हे कळल्यानंतर लोकं चांगला विचार करतील. आपण त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलं नाही, तर ते राहील आणि आपला मोठा समाज अनफॉर्च्युनेटली ह्या सगळ्या ज्ञानापासून दूर राहिलेला आहे.
त्यांना थोडं-थोडं तरी ज्ञान देऊ.
धन्यवाद. इतरांना नक्की शेअर करा.
प्रसाद चिक्षे
८२०८४३८६००
श्रीमद्भगवद्गीता: दुसरा अध्याय – 'सांख्य योग'
भाग ३७
३१ जुलै २०२६
श्रीकृष्णाचे श्लोक सुरू झाल्यानंतर, मला एक सतत प्रश्न असा मनामध्ये पडतो की हा शाश्वताचा, अशाश्वताचा, सत्याचा-असत्याचा, आत्म्याचा सगळा विचार, नश्वरतेचा विचार, शाश्वताचा विचार हा सगळा विचार अर्जुनाला आधी माहीतच नव्हता का?
अर्जुन राजकुमार आहे. त्याने वेगवेगळ्या तपश्चर्या केलेल्या आहेत. राजकुमाराला अशा सगळ्या प्रकारचं ज्ञान दिलं जातं. मग अर्जुनाला दिलं गेलेलं नव्हतं का? रणांगणावर ते परत श्रीकृष्णाला सांगायची काय गरज पडते? असा प्रश्न मला राहून राहून आणि नेहमीच पडतो. त्याचं उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करतो. अनेकांना विचारतो. आता मी विचारांती एका उत्तरापर्यंत पोहोचलोय.
हेच उत्तर शाश्वत असेल, नित्याचाच असेल, असं नाहीये. यामध्ये पुढचा अभ्यास ज्यावेळी सुरू करेल, त्यावेळी बदल पण होऊ शकतो. कारण सत्याचं ज्ञान अधिक नेमकं होत होत, नेमकं होत जातं; जोपर्यंत त्याची अनुभूती होत नाही, तोपर्यंत. मला वाटतं की थेरॅटिकली (सैद्धांतिकदृष्ट्या) अर्जुनाला हे सगळं माहीत असेल. प्रॅक्टिकली (प्रत्यक्ष अनुभव) त्यांनी कधी हे अनुभवलं नसेल. म्हणजे इतका सखोल अभ्यास अर्जुनाचा झाला असेल का, जो आपला आता गीतेच्या मुळे होतोय?
एक वाटते की थेरॅटिकली झाला असेल, प्रॅक्टिकली अजिबात नसेल झाला. आणि अध्यात्मशास्त्र हे अकॅडमिकली (अभ्यासकीय पातळीवर) जसं शिकावं लागतं, तसंच प्रॅक्टिकली पण शिकावं लागतं. दोन्हीचा संगम लागतो. त्यामुळे अर्जुनाने जरूर तपश्चर्या केलेली आहे; परंतु ती आपलं क्षात्रतेज आणि शास्त्रधर्म वाढवण्यासाठी केलेली आहे. त्याने स्वतःचा अभ्यास, आत्मतत्त्वाचा अभ्यास आणि त्यातून आत्मतत्त्वाच्या बाबतीतल्या काही सिद्धी मिळवणं, याच्यासाठी फारसा अभ्यास केलेला कुठेच दिसत नाही, तशी साधना केल्यासारखीही दिसत नाही. शास्त्रतेजाच्या बाबतीमध्ये त्याला अनेक अस्त्रे, शिवासमवेत अनेक लोकांकडून मिळालेली दिसतात.
ह्यावरून एक गोष्ट नक्की आहे, की अर्जुनाचा अशाश्वतेचा किंवा जगताचा, त्याच्या शास्त्रधर्मासाठी अनुकूल असणाऱ्या अविद्येचा आणि विज्ञानाचा अभ्यास खूप चांगला झालेला होता. परंतु, त्याचा आत्मविद्येचा किंवा विद्येचा किंवा ज्ञानाचा अभ्यास फारसा झालेला दिसत नाही, किंवा त्यांनी त्याची साधना केलेली फारशी दिसत नाही.
त्यामुळे विज्ञानाचा अभ्यास त्याचा खूप चांगला झालाय, पण ज्ञानाचा झाला नाही. अविद्येचा अभ्यास खूप चांगला झालाय, पण विद्येचा कमी झालाय. अशाश्वताचा खूप चांगला अभ्यास झालाय, शाश्वताचा खूप कमी झालाय. शरीराचा खूप अभ्यास झालाय, प्रकृतीचा कमी झालाय. असा आत्मतत्त्वाचा व शाश्वताचा अभ्यास अर्जुनाचा किंवा तशी साधना अर्जुनाची झालेली नसल्यामुळे तो मोहामध्ये पडतो, अज्ञानात अडकतो, अहंकारामध्ये जातो आणि त्याला विषाद होतो.
सामान्य माणसाचं आणि अर्जुनाचं साधर्म्य एकच आहे. आपण खूप प्रमाणामध्ये आपल्या संसारासाठी, आपल्या उपजीविकेसाठी, आपल्या प्रगतीसाठी आणि गरजेसाठी अशाश्वताचा किंवा विज्ञानाचा किंवा व्यवहाराचा खूप चांगला अभ्यास करतो, त्याची खूप चांगली साधनाही करतो. पण या सगळ्या रहाटगाडग्यात आत्मतत्त्वाची व शाश्वताची साधना थोडी करणं राहूनच जातं. त्यामुळे एका विशिष्ट स्थितीमध्ये, विशिष्ट क्षणी ही एकांगी साधना कोलमडून पडते. आपण काही क्षणी मोहामध्ये अडकू शकतो, त्याच्यामुळे अहंकारामध्ये जाऊ शकतो.
आपण अभ्युदयाचाच फार विचार केलेला असतो. आपण निःश्रेयसाचा फार विचार करत नाही. अभ्युदय आणि निःश्रेयस हातात हात घालून चाललं पाहिजे. आपण प्रेयसाचा खूप विचार करतो, श्रेयसाचा कमी करतो. प्रेयसाची साधना खूप जास्त होते, श्रेयसाची साधना होत नाही. त्यामुळे प्रेयसाची साधना आणि श्रेयसाची साधना या दोन्ही गोष्टी सायमलटेन्युअसली चालू असल्या पाहिजेत. विद्येचा व अविद्येचा विचार, तसंच ज्ञानाचा व विज्ञानाचा विचार समवेत चालला पाहिजे.
असा प्रेयसाचा जास्त विचार केल्यामुळे अर्जुन विषादात अडकला आणि आता त्याला श्रेयाच्या मार्गावर जावं लागतंय. त्यामुळे श्रीकृष्ण त्याला शाश्वताचं ज्ञान देतोय. ते सांगताहेत की काही गोष्टी नक्कीच बदलणाऱ्या आहेत, त्या प्रेयस आहेत, त्या विज्ञानाच्या आहेत, त्या अविद्येच्या आहेत. आणि काही गोष्टी, म्हणजेच काहीतरी या सगळ्या जगामध्ये स्थिर आहे. ते समजून घ्यायला श्रेयस्कर मार्ग लागणार आहे. ते समजून घेण्यासाठी आपल्याला विद्येचा, आत्मस्वरूपाचा, चित्तशुद्धीचा आणि स्थितप्रज्ञतेचा विचार केला पाहिजे. असं हातामध्ये हात घालून (समन्वयाने) जावं लागतं, हा मूळ भगवद्गीतेचा संदेश आहे.
कर्म तर करावंच लागतं, कर्मामध्ये कौशल्यही करावं लागतं, कर्म अधिक उत्तम आणि खूप चांगलं करावं लागतं. पण त्याच्या पाठीमागची भावना ही देखील जास्तीत जास्त शुद्ध करावी लागते. ते करताना आपलं चित्त अधिक शुद्ध व्हावं लागतं आणि आपल्याला शाश्वताचं भान असलं पाहिजे. अशी जी साधना असते, त्याला आपण कर्मयोग म्हणू शकतो. सांख्ययोगाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं, तर प्रकृती आणि पुरुषाचा साकल्याने अभ्यास करणं, सोबत अभ्यास करणं, तुलनात्मक अभ्यास करणं, याला सांख्ययोग पण म्हणू शकतो.
अशाश्वताच्या प्रवासात शाश्वताचा अभ्यास करायला शिकणे म्हणजेच भगवद्गीता समजून घेणे होय. आपल्या प्रेयस्कर सांसारिक व व्यवहारजगतात आपण जे कर्म करतो, ते ज्या भावनेने, वृत्तीने आणि विवेकाने करतो, तो विवेक, ती भावना आणि ते चित्त अधिक शुद्ध व्हावे, यासाठी शाश्वताची साधना करणे आणि शाश्वत विचार समजून घेणे अत्यंत गरजेचे ठरते.
असा शाश्वत विचार आत्मसात करताना आपले व्यक्तित्व परिपूर्ण बनू लागते. आपले रूपांतर छोट्या पूर्णत्वातून मोठ्या पूर्णत्वामध्ये होते. आपल्या मनातील नकारात्मक भावना हळूहळू लोप पावू लागतात आणि सकारात्मक भावनांचा उदय होतो. आपल्यामधील षड्रिपू कमी होत जाऊन सद्गुण वाढीस लागतात, तसेच आसुरी संपत्ती कमी होऊन दैवी संपत्ती वृद्धिंगत होते.
या प्रक्रियेमुळे आपल्याला आपल्यामधील ईश्वराचा साक्षात्कार आणि अनुभूती येते. ईश्वराची अनुभूती आणि ईश्वराची सोबत हे दोन भिन्न मार्ग आहेत. सांसारिक व व्यावहारिक कर्म करत असताना अनेकदा अस्वस्थता आणि नकारात्मक भावना निर्माण होतात. त्या कमी करण्यासाठी आपण मंदिरात जातो, सत्कर्म करतो आणि चांगल्या संतांचे प्रवचन ऐकतो. देवळा जाऊन देवाच्या पाया पडतो, कारण आपल्याला एका बाह्य आधाराची (External Support) गरज असते. आपले व्यावहारिक रूप वेगळे आणि शाश्वताचे रूप कुठेबाहेर मंदिरात आहे, ही भावना म्हणजेच द्वैतवादाची भावना होय. सांख्ययोगात याच द्वैत विचाराचे दर्शन घडते.
याच्या विपरीत, अद्वैताची भावना अशी सांगते की, आपणच व्यवहार करतो आणि आपल्यामध्येच ते परमतत्त्व व आत्मतत्त्व सामावलेले आहे. त्यामुळे आपल्याच आत्मतत्त्वाला शरण जाणे, त्यालाच आपले गुरु मानणे, त्याचीच साधना करणे, त्याच्याशी सतत संवाद साधणे, त्यालाच प्रश्न विचारणे आणि समजून घेणे हे अद्वैताचे स्वरूप आहे. ते ईश्वरत्व, ते दिव्यत्वाचा अंश आपल्याच अंतकरणात आहे. याच दिव्यत्वाची अनुभूती घेत घेत व्यावहारिक कर्म करणे म्हणजेच अद्वैत सिद्धांतानुसार किंवा अद्वैत पद्धतीने जीवन जगणे होय.
सांख्ययोगात अर्जुनाने श्रीकृष्णाला गुरु मानले आहे. "शिष्यस्तेहम् शाधि मां त्वां प्रपन्नम्" असे म्हणून त्याने आपले शिष्यत्व पत्करले आहे. जीवनाच्या व्यावहारिक गुंतागुंतीमध्ये त्याला श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाची आणि मदतीची गरज भासते. सुरुवातीला तो द्वैत पद्धतीने विचार करतो, म्हणूनच श्रीकृष्णाला त्याला समजावून सांगावे लागते की, तू शाश्वताचा आणि आत्मतत्त्वाचा विचार कर. जे तुझ्यामध्ये अविनाशी आहे, सातत्यपूर्ण आहे, नित्यनूतन आणि सनातन आहे, जे कधीही बदलत नाही, अशा शाश्वत सत्याचा अभ्यास कर. गौतम बुद्धाने आपल्या आनंद शिष्याला जे 'आत्मदीपो भव' (प्रकाशात राहा, स्वतःचा दीप व्हा) हे वचन दिले होते, त्याच मार्गावर श्रीकृष्ण या ज्ञानाला आणखी पुढे घेऊन जाताना दिसतात.
सहप्रवासाचे निमंत्रण
ही मांडणी समजून घेताना यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल, अधिक नेमकेपणा आणायचा असेल किंवा काही आक्षेप असतील, तर आपले विचार मोकळेपणाने मांडू शकता. आध्यात्मिक अभ्यास हा एकट्याचा नसून तो सहप्रवास आहे; आपले इनपुट्स या विचारांना अधिक समृद्ध करतील यात शंका नाही.
अशा प्रकारे एकमेकांना समृद्ध करत गीताज्ञान, शाश्वताचे व अशाश्वताचे, विद्येचे व अविद्येचे, तसेच विज्ञानाचे व ज्ञानाचे मर्म आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचवत राहूया.
प्रसाद चिक्षे
संपर्क: 8208438600
श्रीमद्भगवद्गीता: दुसरा अध्याय – 'सांख्य योग'
भाग ३८
१ ऑगस्ट २०२६
मानवी जीवन आणि त्याचे अस्तित्व समजून घेताना भगवद्गीतेमध्ये एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना मांडली गेली आहे. ही संकल्पना समजली की जीवनातील बऱ्याचशा गोष्टी सहज स्पष्ट होतात. मानवाचे स्थूल शरीर अत्यंत स्पष्ट आणि प्रत्यक्ष गोचर आहे. त्याचा अभ्यास आपण सहज करू शकतो, त्याविषयी मोकळेपणाने बोलू शकतो—उदा. हे हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, कान आहेत. परंतु, जेव्हा आपण 'आत्मा' या विषयावर बोलतो, तेव्हा स्थिती पूर्णपणे बदलते. आत्म्याच्या बाबतीत असणाऱ्या विविध तात्विक उपपत्तींवर सार्वमत होणे अत्यंत अवघड आहे. याचे मुख्य कारण म्हणजे विज्ञान अद्याप त्यापर्यंत पूर्णपणे पोहोचलेले नाही आणि मानवी बुद्धीला ते समजून घेणे तसे अवघड आहे.
शरीर आपल्याला सहज समजते. समजा, एक व्यक्ती आहे जी अतिशय आनंदाने आणि छान जगत आहे. अचानक त्याला कॅन्सरसारखा गंभीर आजार होतो आणि १० वाजून २० मिनिटांनी त्याचे निधन होते. १० वाजून २० मिनिटांच्या अगदी आधी त्या शरीरामध्ये जे काही सक्रिय होते, आणि मृत्यूनंतर शरीर तिथेच असते पण जे निघून जाते—त्याला आपण स्थूलमानाने 'चेतना' म्हणू शकतो. दुसरा समर्पक शब्द म्हणजे 'जाणीव'. काही लोक याला 'प्राण गेला' असेही म्हणतात.
परंतु 'चेतना' (Consciousness) हा विषय अधिक खोलात जाऊन समजून घेण्यासारखा आहे. आता प्रश्न पडतो—त्या मृतशरीरामध्ये कॉन्शिअसनेस आहे का? तर तो अत्यंत किंचित प्रमाणात असतो. याच कारणामुळे मृत्यूनंतरही कधीकधी शरीरात मलोत्सर्जन किंवा लघवी होणे यांसारख्या अतिशय सूक्ष्म जैविक क्रिया घडतात (निर्जीवाच्या प्रमाणात). आता प्रश्न उरतो की, ती चेतना जी आधी होती आणि आता नाही, ती नक्की कुठे गेली?
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अनेक विचारवंतांनी चिंतन केले आहे. जरी आपण याला सरळ सरळ 'लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी' (Law of Conservation of Energy) ठामपणे म्हणू शकत नसलो, तरी ती जाणीव किंवा चेतना म्हणजे नक्की काय होते? एक प्रमुख थेरी असे सांगते की, ती जाणीव किंवा चेतना म्हणजेच 'आत्मा' होता. ती एका परमदिव्य ऊर्जेचा (Divine Energy) आपल्या शरीरातील एक स्पार्क (Spark) होती. जेव्हा ती दिव्य ऊर्जा त्या शरीरातून निघून जाते, तेव्हा ती इतर जिवंत शरीरांमध्ये कार्यरत असते.
या थेरीच्या आधारे अनेक गोष्टी स्पष्ट होतात. भगवद्गीतेमध्ये अतिशय पक्क्यापणाने आणि स्पष्टपणे म्हटले आहे की, आत्मा हा नाशवंत नाही. आत्मा पूर्णपणे निर्विकार आहे, त्याच्यावर कसलाही परिणाम होत नाही. तो नाश पावत नाही, तर तो परिवर्तित होतो किंवा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात बदलतो. आत्म्याचे अंतिम सत्य हेच आहे की, 'चेतना' हे आत्म्याचाच आविष्कार किंवा त्याचे व्यक्त रूप आहे. हे थोडंसं समजून घेतलं की जीवन-मृत्यूचे कोडे सोडवणे सोपे जाते.
भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला नेमके हेच सत्य अत्यंत अधिकारवाणीने (Authoritatively) समजावून सांगतात:
अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हती॥
अर्थ: "ज्या आत्म्याद्वारे हे संपूर्ण जग व्यापले आहे, त्या आत्म्याला तू अविनाशी जाणून घे. हा अव्ययी आणि नाश न पावणारा आत्मा आहे; याचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही."
या श्लोकाच्या माध्यमातून श्रीकृष्णाने अर्जुनाला हे पक्के कन्फर्मेशन दिले आहे की, तू युद्धाच्या प्रसंगात शरीराला मारू शकतोस, परंतु आत्मतत्वाला तू कधीही मारू शकत नाहीस. आत्म्याचा नाश करणे कुणाच्याही सामर्थ्यात नाही.
भगवद्गीता ही केवळ काही विखुरलेल्या श्लोकांचा संग्रह नसून, मानवी मनाच्या विकासाचा एक अत्यंत सुसंवादी (Integrated) आणि एकात्मिक प्रवास आहे. गीतेमधील प्रत्येक श्लोक हा एका विशिष्ट क्रमाने (Sequence) येतो, ज्याचे स्वतःचे एक गांभीर्य आणि प्रयोजन असते. दैनंदिन जीवनातील ताणतणाव, नैराश्य, नोकरी जाणे, कौटुंबिक दुःख किंवा अचानक ओढवणारे मोठे संकट यांमुळे जेव्हा माणसाचे मन अर्जुनाप्रमाणे गोंधळून जाते, तेव्हा भगवद्गीता ही एक अचूक मार्गदर्शक (Guide) ठरते.
श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक ११ ते १७ मधील हा प्रवास म्हणजे मानवी मनाच्या सर्वात मोठ्या अज्ञानाकडून परम सत्याच्या प्रकाशाकडे जाणारा एक अत्यंत प्रभावी मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक मार्ग आहे. हा प्रवास टप्प्याटप्प्याने कसा उलगडतो, याचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे आहे:
१. श्लोक ११: अज्ञानाचा टप्पा — 'अज्ञानामुळे झालेला खोटा मोह आणि गोंधळ'
• अर्जुनाची स्थिती (अज्ञान): युद्धभूमीवर उभा असलेला अर्जुन नातेसंबंधांच्या भावनिक मोहात आणि स्वतःच्या नैतिक संकटात पूर्णपणे अडकला आहे. "आपले आप्त मारले जातील" या विचाराने तो हतबल झाला आहे. तो वरवर विद्वानांसारखे बोलतोय, पण त्याची कृती एका शोकग्रस्त माणसासारखी आहे.
• प्रयोजन: श्रीकृष्णांनी येथे अर्जुनाच्या या 'भावनिक अंधकाराला' आरसा दाखवला. जोपर्यंत मनुष्य आपल्या अज्ञानाला आणि मोहाला स्पष्टपणे ओळखत नाही, तोपर्यंत खऱ्या ज्ञानाची सुरुवात होत नाही. येथे कृष्णाने त्याच्या तात्कालिक विलापाला सुरुंग लावला आणि त्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडले.
२. श्लोक १२: विलगतेचा टप्पा — 'वैयक्तिक अस्तित्वाचे त्रिकालाबाधित सत्य'
• संक्रमण (अज्ञानाकडून ज्ञानाकडे पहिली पायरी): अर्जुन वैयक्तिक मृत्यूला अंतिमतः सर्वस्व मानत होता. यावर श्रीकृष्ण त्याला अत्यंत अचूक जाणीव करून देतात की, "मी, तू आणि हे सर्व राजे भूतकाळातही होतो, वर्तमानात आहोत आणि भविष्यातही अस्तित्वात राहू."
• प्रयोजन: येथे अज्ञान असे होते की, "मृत्यू म्हणजे सर्वनाश आणि अस्तित्वाचा अंत." याउलट, ज्ञान अशी पायरी ठरते जिथे हे समजते की मूलभूत अस्तित्व (Existence) कधीही नष्ट होत नाही. कृष्णाने अर्जुनाला त्याच्या तात्कालिक भीतीपासून बाहेर काढून एका सार्वकालिक आणि शाश्वत सत्याशी जोडून दिले.
३. श्लोक १३: समजुतीचा टप्पा — 'मृत्यू म्हणजे केवळ शरीराचा बदल (देहांतर)'
• संक्रमण: जर सर्वजण अमर आहेत, तर मग मरतात कोण? अर्जुन देहाच्या नाशालाच आत्म्याचा नाश समजत होता. यावर कृष्णाने बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या मानवी जीवनातील नैसर्गिक बदलांचे उदाहरण देऊन हे स्पष्ट केले की देहांतर ही एक अत्यंत सुलभ आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे.
• प्रयोजन: अज्ञान असे होते की, "शरीर संपले म्हणजे सर्व काही संपले." ज्ञान असे उलगडते की, मृत्यू ही भीतीची गोष्ट नसून जुनी वस्त्रे फेकून नवीन वस्त्रे धारण करण्यासारखी एक प्रक्रिया आहे. यामुळे अर्जुनाच्या मनातील हत्येचे पाप लागल्याची भीती कमी करण्याचे महत्त्वाचे प्रयोजन इथे साध्य होते.
४. श्लोक १४ आणि १५: व्यावहारिक टप्पा — 'सुख-दुःखाच्या पलीकडे जाण्याची सहनशीलता (तितिक्षा)'
• संक्रमण: तात्विक सिद्धांत समजल्यानंतर, आता तो दैनंदिन जगण्यात कसा आणायचा? शरीराचे नाते तुटताना मानसिक दुःख होणारच, यावर श्रीकृष्ण मार्गदर्शन करतात की सुख आणि दुःख हे ऋतूंसारखे येतात आणि जातात; त्यांना सहन करण्याची ताकद निर्माण करावी लागते.
• प्रयोजन: अज्ञान असे होते की, "बाहेरील परिस्थितीमुळे मी दुःखी झालोय." ज्ञान मात्र हे सांगते की, सुख-दुःखाचे अनुभव बाह्य वातावरणात (शीतोष्ण) आहेत, पण त्यावर विचलित न होणे ही मनाची खरी ताकद आहे. जो या परिस्थितीशी समरस होऊन डगमगत नाही, तोच खरा धीर पुरुष आहे. येथे संवेदनांचे संयमात रूपांतर होते.
५. श्लोक १६: तात्विक टप्पा — 'सत् आणि असत् चा विवेक (विवेक बुद्धी)'
• संक्रमण: आता श्रीकृष्ण ही चर्चा वैयक्तिक पातळीवरून थेट ब्रह्मांडीय (Cosmic) सत्यावर नेतात. ते डोळ्यांना दिसणाऱ्या नश्वर शरीरामध्ये ('असत्') आणि त्यामागे लपलेल्या शाश्वत चेतनेमध्ये ('सत्') असलेला मूलभूत भेद स्पष्ट करतात.
• प्रयोजन: अज्ञान असे होते की, "जी शरीरे डोळ्यांनी दिसतात, तीच एकमेव खरी आहेत." ज्ञान असा प्रकाश टाकतो की, ज्याला रूप आणि आकार आहे ते सर्व विनाशी (असत्) आहे आणि जे अदृश्य पण शाश्वत आहे, तेच एकमेव सत्य ('सत्') आहे. येथे अर्जुनाची सुप्त विवेक बुद्धी जागृत करण्याचे मोठे प्रयोजन साधले जाते.
६. श्लोक १७: अंतिम सत्याचा टप्पा — 'अविनाशी आत्म्याची प्रचिती (परम ज्ञान)'
• संक्रमण: हा संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाचा कळस (Climax) आहे, जिथे अज्ञानाचा अंधार पूर्णपणे नाहीسا होतो.
• प्रयोजन: श्रीकृष्ण अत्यंत ठामपणे आणि अधिकारवाणीने प्रतिपादन करतात की, "ज्याने हे संपूर्ण जग व्यापले आहे, त्या आत्म्याला तू अविनाशी जाणून घे." अज्ञान हे होते की अर्जुन स्वतःला आणि इतरांना 'मारणारा' किंवा 'मरणारा' समजत होता. ज्ञान असे प्रस्थापित होते की, आत्मा पूर्णपणे अजेय, अमर आणि विकारांच्या पलीकडील आहे.
श्रीमद्भगवद्गीतेचा हा टप्प्याटप्पयाने चालणारा प्रवास आपल्याला हेच शिकवतो की जीवनातील कोणतेही मोठे संकट किंवा मानसिक गोंधळ हा केवळ अज्ञानाचे एक रूप असतो. जेव्हा माणूस शोकातून विलगतेकडे, विलगतेतून समजुतीकडे, समजुतीतून संयमाकडे आणि संयमातून अंतिम विवेक बुद्धीकडे वाटचाल करतो, तेव्हा त्याचे जीवन संकटांच्या प्रभावातून मुक्त होते. भगवद्गीता ही मानवी मनाला नैराश्यातून बाहेर काढून आत्मज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारी एक शाश्वत संजीवनी आहे.
श्रीमद्भगवद्गीता: दुसरा अध्याय – 'सांख्य योग'
भाग ३९
४ ऑगस्ट २०२६
श्रीकृष्ण ज्या वेळी बोलायला लागतात, त्यावेळीपासून त्यांचे बोलणे इतके नेमकं आणि अचूक असतं की त्याचा परिणाम नक्कीच दिसून येतो. आधी पहिला श्लोक 'कुतस्त्वा कश्मलमइदम्'. हे श्रीकृष्णाने अर्जुनाचे केलेले निदान आहे; मोह तुझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, तुझी मोहग्रस्त अवस्था आहे. आणि त्यानंतर 'क्लैब्यं मा स्म गमः पार्थ'. शेवटी 'उत्तिष्ठ' म्हणतात. बसू नको, आता उठ.
त्यानंतर अर्जुन आपल्या कार्पण्यदोषाचा स्वीकार करतो, आपल्या धर्मसंमूढ चेता या अवस्थेचा स्वीकार करतो, आणि सरळसरळ 'शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नं' म्हणून श्रीकृष्णाचा शिष्य होतो. आणि मग श्रीकृष्ण अर्जुनाला पहिल्या भूमिकेवर काम करायला लागतात. अर्जुनाला अज्ञान झालेले आहे, किंवा अर्जुन जो विचार करत आहे, ती कृती अज्ञानाची आहे. यावर श्रीकृष्णाने फार सविस्तरपणे ११ ते १७ श्लोकांमध्ये अर्जुनाच्या मनामध्ये असणारे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला.
अर्जुनाचे अज्ञान आणि विषादाचे मूळ
आता पहिले अज्ञान काय होते अर्जुनाचे? अर्जुनाला विषादाचे कारण काय? तर अर्जुन लढायला घाबरत नाही. अर्जुन आत्ता मारायला तयार नाही. आणि तेही कुणालाच. दुसरं तो मरणाचे कारण व्हायला पण तयार नाहीये. नुसतं मारायला तयार नाही, तर मरणाचे कारण व्हायला पण तयार नाही. कारण ह्या दोन्हीही गोष्टींमध्ये अर्जुन स्वतःला कर्ता समजतो, मी करणारा आहे, असे समजतो.
आता ह्याच्या मुळातला भाग जर आपण असा पाहिला, आपण मारतो कुणाला? आपण कुणाच्या मरणाचे कारण बनतो? याचा विचार केला, तर मरण कुणाला आहे? तर मरण देहाला आहे. देहाला मारणारा किंवा देहाच्या मरणाला कारणभूत होणारे आपण आहोत. त्यामुळे अर्जुन हा युद्ध करत असताना समोरच्या व्यक्तींना फक्त देह म्हणून पाहतोय, असे श्रीकृष्ण प्रथम स्पष्ट करतात. आणि ते अनेक उदाहरणांसह सांगतात की देह, देहामधल्या भावभावना, देहामधल्या गतिविधी , देहाच्या माध्यमातून होणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या शाश्वत नाहीत, त्याला अंतच आहे. त्यामुळे तू मारलस काय आणि न मारलस काय, ते मरणारच आहेत. मरण हे अपरिहार्य (इन्व्हिटेबल) आहे.
आत्मतत्त्वाचे शाश्वत स्वरूप
पण यामधले अविनाशी काय आहे? तर ते आहे आत्मतत्त्व. आत्मा समजून घेणे तर खूप अवघड आहे, पण अगदी साध्या सोप्या पद्धतीत आत्मा जर समजून घ्यायचा असेल तर आपण मागच्या भागामध्ये पाहिले, की मृत्यूपूर्वाच्या काही काळापूर्वी जे शरीर असतं, जो मनुष्य असतो, तो मृत्यूनंतर प्रेत बनतो. म्हणजेच मृत्यूपूर्वी आपण त्या माणसाला त्या व्यक्तीचे शरीर म्हणतो किंवा त्या व्यक्तीच्या नावाने हाक मारतो. मृत्यूनंतर तेच शरीर, त्याचे, त्याला प्रेत आपण म्हणतो.
मग असे काय होते, जे मृत्यूपूर्वी होते आणि मृत्यूनंतर नाही? तर त्याला आपण चेतना म्हणू शकतो, प्राण म्हणू शकतो. पण चेतना, प्राण हे कशाचेतरी बाह्य गुणधर्म आहेत. त्यांचे काहीतरी स्वस्वरूप असू शकतं, ते स्वस्वरूप म्हणजे आत्मतत्त्व. तो म्हणजे डिव्हाइन स्पार्क, जो चराचरामध्ये भरलेले जे तत्त्व आहे, त्या तत्त्वाचा एक अंश माझ्यामध्ये भरला आहे, माझ्यामध्ये आहे, आणि मृत्यूनंतर तो भाग निघून जातो. त्याला आपण आत्मतत्त्व म्हणतो.
अज्ञानाचे निवारण आणि गीतेचा संदेश
आता हे पूर्ण ज्ञान अर्जुनाला श्रीकृष्णाने दिले, म्हणजेच मृत्यूबद्दलची भ्रांती त्याच्या मनामधली काढून टाकली. शरीराला तू मारतो आहेस, आत्म्याला तू मारूच शकत नाहीस, हे अतिशय ठांबपणे सांगितले. अर्जुन त्या अज्ञानाने ग्रस्त आहे, की मी त्या व्यक्तीला मारतो आहे. शरीर मरते, आत्मा नाही. हा शाश्वत संदेश अर्जुनाला दिला.
हा पूर्ण संवाद झाल्यानंतर, शेवटी श्रीकृष्ण म्हणतात—
अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः। अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद् युध्यस्व भारत॥ गीता अध्याय २, श्लोक १८:
अर्थ: या शरीराचा नाश करणारा (किंवा अंत होणारा) हा देह नाशवंत आहे; परंतु या देहामध्ये राहणारा हा आत्मा अनाशित (अविनाशी) आणि अप्रमेय (ज्याला पूर्णपणे जाणता येत नाही असा) आहे. म्हणून हे भारता (अर्जुना), तू युद्ध कर.
गीताईमध्ये खूप छान पद्धतीने, सोप्या पद्धतीने समजून सांगितलेले आहे:
"विनाशी देह हे सारे, तू बोलिले त्यात शाश्वत, नित्य सीमित तो आत्मा, अर्जुना झुंझ यास्तव."
श्रीकृष्णाच्या भूमिकेचा (स्टँडचा) प्रवास
मी भगवद्गीतेतल्या तत्त्वज्ञानाबरोबरच पदोपदी श्रीकृष्ण कोणकोणता दृष्टिकोन (स्टँड) घेतात, हे पण मी फार काळजीपूर्वक समजून घेतोय.
पहिला अध्याय: श्रीकृष्णाचा दृष्टिकोन आहे 'चांगला श्रोता असणे' (बिइन्ग गुड लिसनर).
दुसरा अध्याय: दुसऱ्या अध्यायाची सुरुवात होताना पहिल्या दोन श्लोकांमध्ये श्रीकृष्णाचा दृष्टिकोन आहे 'प्रहार करणारा, डायग्नोस करणारा, निदान करणारा'.
त्यानंतरचा त्याचा दृष्टिकोन आहे तो अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचे स्वस्वरूप सांगणारा. ज्ञानाचे स्वस्वरूप सांगितल्यानंतर श्रीकृष्ण आता मात्र म्हणतात 'तस्माद् युद्धस्व भारत'.
आत्तापर्यंत श्रीकृष्ण म्हणाले नाहीत, 'युद्ध कर'. आत्ता पहिल्यांदा म्हणताहेत. 'क्लैब्यं मा स्म गमः पार्थ' मध्ये देखील ते म्हणताहेत की 'उत्तिष्ठ कौन्तेय', 'तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय'. आता मात्र ते सरळसरळ म्हणताहेत की बाबा, अर्जुना आता तू युद्ध करायला सुरू कर. तू युद्ध कर बाबा! ' आता तू डायरेक्ट लढायला सुरुवात कर.
खरं तर श्रीकृष्णाने आता इथे थांबायला पाहिजे. त्याला आज्ञा दिली आणि तो शिष्य म्हणून ती आज्ञा स्वीकारेल, या अपेक्षा धरली पाहिजे. पण श्रीकृष्ण इथे थांबत नाही. पुढे १९ व्या श्लोकापासून श्रीकृष्ण सांगताहेत, पुढेच बोलतात, ते थांबत नाहीत. आणि त्यांची ती सातत्यप्रक्रिया (कंटिन्यूटी) कुठपर्यंत चालते, हे आपण पाहणारच आहोत. कारण कृष्णाची वाणी आपल्यासाठी आपल्यामधल्या अर्जुनाला अज्ञानातून ज्ञानाकडे, जडत्वाकडून गतिमानतेकडे नेणारी असणार आहे.
परिवर्तनाचे आंदोलन
आपल्याला हे जे विश्लेषण, भाष्य उपयोगी वाटले, तर ते अनेकांपर्यंत पोहोचवा. आजकाल आंदोलनाचे जग आहे, आणि सगळी आंदोलनं आता सोशल मीडियावर होतात. चला, मग होऊ देत एक चांगले आंदोलन, गीतेचे आंदोलन, चांगुलपणाचे आंदोलन. पण वाईट गोष्टीसाठी लोक जे एकत्र येतात ना, किंवा वाईट पद्धतीने लोक जे एकत्र येतात ना, चांगल्या पद्धतीने चांगले लोक का एकत्र येत नसतील?
श्रीमद्भगवद्गीता: दुसरा अध्याय – 'सांख्य योग'
भाग ४०
५ ऑगस्ट २०२६
"यातून मला काय मिळणार?"
एखादी गोष्ट करताना, एखादे नाते जोडताना, एखादे पुस्तक वाचताना, एखादा निर्णय घेताना किंवा एखाद्या व्यक्तीशी संबंध ठेवताना आपल्या मनात नकळत हा प्रश्न उभा राहतो. याचा माझ्यासाठी उपयोग काय? यामुळे माझे काय भले होणार? माझ्या सुखात, माझ्या सुरक्षिततेत, माझ्या यशात याचा किती वाटा आहे?
हा विचार चुकीचा नाही. कारण माणूस जगतोच सुखासाठी. त्याला दुःखापासून दूर जायचे असते. त्याला आपल्या भोवतालचे जग सुरक्षित, स्थिर आणि आनंदी हवे असते. आपली माणसे सुखात असावीत, आपली आर्थिक परिस्थिती चांगली असावी, अस्वस्थता कमी व्हावी, भीती कमी व्हावी आणि जीवन अधिकाधिक आरामदायी व्हावे, ही प्रत्येकाची स्वाभाविक इच्छा असते.
त्याला समजायला लागते की केवळ पैसा किंवा साधने पुरेशी नाहीत. आपले शरीर अधिक सक्षम असले पाहिजे. मन अधिक स्थिर आणि खंबीर असले पाहिजे. बुद्धी अधिक स्पष्ट, विवेकी आणि व्यापक झाली पाहिजे. ज्ञान वाढले पाहिजे. कौशल्ये विकसित झाली पाहिजेत. अनुभव समृद्ध झाला पाहिजे.
कारण जितकी क्षमता वाढते, तितक्या शक्यता विस्तारतात.
काही जण स्वतःची क्षमता वाढवतात आणि जिथे कमी पडतात, तिथे इतरांच्या क्षमतांना जोडतात. त्यांना समजते की काही गोष्टी एकट्याने शक्य नसतात. एकत्र आल्यावरच मोठी स्वप्ने साकार होतात.
अशा वेळी वैयक्तिक प्रयत्न सामूहिक प्रयत्नांत रूपांतरित होतात.
माणसाला निसर्गाने केवळ बुद्धी दिलेली नाही; त्याला सविवेक बुद्धी दिलेली आहे. म्हणूनच तो फक्त स्वतःचाच विचार करत नाही. तो इतरांचाही विचार करू शकतो. दुसऱ्याच्या वेदना समजू शकतो. दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी होऊ शकतो.
तरीही वास्तव हेच आहे की स्वतःचा विचार अधिक प्रभावी असतो. तो स्वाभाविकही आहे. पण जर तोच विचार इतका प्रबळ झाला की इतरांचे अस्तित्वच दिसेनासे झाले, तर सामूहिक शक्तीचे रूपांतर सामूहिक स्वार्थात व्हायला वेळ लागत नाही.
याउलट काही व्यक्ती स्वतःचा आणि इतरांचा विचार यांमध्ये विलक्षण समतोल साधतात. तर काही जण स्वतःच्या सुखापलीकडे जाऊन संपूर्ण आयुष्य इतरांच्या कल्याणासाठी अर्पण करतात.
अशाच व्यक्तींमुळे आणि अशाच विचारांमुळे समाजात विविध स्तरांवर सामूहिक शक्ती निर्माण होत जाते.
अशा प्रकारे माणसाचा प्रवास 'माझ्या फायद्यापासून' सुरू होतो, आणि 'आपल्या सामूहिक क्षमतेच्या वर्धनापर्यंत' पोहोचतो. या प्रवासातील बहुतांश टप्प्यांवर माणूस मानवी अस्तित्वाचा विचार करतो; पण त्याचे लक्ष मुख्यतः दृश्य अस्तित्वावरच केंद्रित असते—शरीर, मन आणि बुद्धी. याच त्रिसूत्रीला अधिक निरोगी, अधिक सक्षम आणि अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी तो आयुष्यभर धडपडत राहतो. हा प्रवास महत्त्वाचा आहे. आवश्यकही आहे.
पण यानंतरही एक प्रश्न उरतो...
दृश्याच्या पलीकडचा प्रवास : आत्मतत्त्वाचा शोध
आतापर्यंतचा माणसाचा प्रवास आपण पाहिला.
सुरुवातीला तो स्वतःच्या सुखाचा विचार करतो. नंतर स्वतःच्या क्षमतांचा विकास करतो. पुढे सामूहिक शक्ती उभी करतो. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजव्यवस्था, आरोग्य, शिक्षण अशा असंख्य क्षेत्रांत तो अद्भुत प्रगती साधतो. शरीर अधिक सक्षम होते, मन अधिक प्रशिक्षित होते आणि बुद्धी अधिक प्रगल्भ होत जाते.
पण या सगळ्या प्रवासात एक मूलभूत प्रश्न अजूनही उभाच असतो.
हे शरीर चालते कशामुळे?
हात काम करतात, पाय चालतात, मेंदू विचार करतो, हृदय धडधडते, भावना उमलतात, निर्णय घेतले जातात... पण या सर्व क्रियांना गतिमान ठेवणारी ती अदृश्य शक्ती कोणती?
आपण तिला प्राण म्हणू, चेतना म्हणू, चैतन्य म्हणू किंवा आत्मतत्त्व म्हणू; नाव काहीही असो, तिच्या अस्तित्वाशिवाय शरीराचे स्वतःचे कोणतेही मूल्य उरत नाही.
ज्या शरीरावर आपण जीवापाड प्रेम करतो, ज्याला सजवतो, सांभाळतो, जपत राहतो, त्याच शरीरातून जर चैतन्य निघून गेले, तर काही दिवसांत तेच शरीर आपल्याला नकोसे वाटू लागते. इतकेच नव्हे, ज्या व्यक्तीने आयुष्यभर आपल्यावर सर्वाधिक प्रेम केले, तिलाही त्या निर्जीव शरीराला निरोप द्यावाच लागतो.
याचा अर्थ इतकाच—
शरीराचे सौंदर्य, सामर्थ्य आणि उपयोगिता ही शरीरात नसून, त्या शरीरात स्पंदन निर्माण करणाऱ्या चैतन्यात आहे.
मग प्रश्न असा उभा राहतो की, जर शरीराच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुभवांमुळे आपल्याला इतका आनंद मिळतो, तर त्या शरीरालाच जिवंत ठेवणाऱ्या आत्मतत्त्वाची अनुभूती किती विलक्षण असेल?
आपण एखादा रुचकर पदार्थ खातो आणि त्याची चव अनुभवतो, तेव्हा आनंद होतो.
अनुभवाशिवाय आनंद नसतो.
आणि म्हणूनच आत्मतत्त्व हे केवळ समजून घेण्याचा विषय नाही; ते अनुभूतीचा विषय आहे.
जेव्हा त्या चैतन्याचा स्पर्श मनाला होतो, तेव्हा सुख केवळ परिस्थितीवर अवलंबून राहत नाही. शांतता बाहेर शोधावी लागत नाही. आनंद एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा कैदी राहत नाही. जीवनात एक वेगळीच परिपूर्णता उतरू लागते.
दुर्दैव इतकेच की, या दिशेने प्रयोग करण्याची सवय आपण फारशी लावून घेतलेली नाही.
परंतु स्वतःच्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू असलेल्या आत्मतत्त्वाचा शोध घेण्यासाठी किती वेळ देतो?
भारतीय अध्यात्माची खरी वैशिष्ट्यपूर्ण देणगी याच ठिकाणी आहे.
हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषींनी हा प्रश्न केवळ विचारला नाही; तर त्याचे उत्तर शोधण्यासाठी स्वतःचे संपूर्ण जीवन वाहून घेतले.
वेदकालीन ऋषी, उपनिषदांतील याज्ञवल्क्य, मैत्रेयी, उद्दालक, श्वेतकेतू, नचिकेता—या सर्वांनी आत्मस्वरूपाचा शोध हीच जीवनाची सर्वोच्च साधना मानली.
पुढे आदि शंकराचार्यांनी अद्वैताच्या रूपाने त्या अनुभूतीला तात्त्विक अधिष्ठान दिले.
संत ज्ञानेश्वरांनी त्या अनुभूतीला मराठी भाषेची माधुरी दिली.
कबीरांनी तिला निर्भीड शब्द दिले.
संत तुकारामांनी अभंगांतून ती लोकांपर्यंत पोहोचवली.
समर्थ रामदासांनी तिला सामर्थ्याची दिशा दिली.
रामकृष्ण परमहंसांनी ती प्रत्यक्ष जगली.
स्वामी विवेकानंदांनी तिचा जागतिक संदेश दिला.
रमण महर्षींनी "मी कोण?" या एका प्रश्नातून तिचे दार उघडले.
महर्षी अरविंदांनी मानवी उत्क्रांतीचे पुढचे पाऊल म्हणून तिचे दर्शन घडवले.
ही केवळ काही महान व्यक्तींची यादी नाही; हा हजारो वर्षे अखंड वाहणाऱ्या एका शोधाचा इतिहास आहे.
हा शोध शरीराचा नव्हता.
हा शोध मनाचाही नव्हता.
हा शोध त्या चैतन्याचा होता, ज्यामुळे शरीर जिवंत आहे, मन विचार करते आणि बुद्धी निर्णय घेते.
कल्पना करा...
जशी विज्ञानासाठी संशोधन संस्था उभ्या राहिल्या, तशी आत्मअनुभूतीसाठीही शास्त्रशुद्ध साधना, प्रयोग आणि सामूहिक प्रयत्न अधिक व्यापक प्रमाणावर घडले, तर?
जर माणूस शरीर, मन आणि बुद्धी विकसित करण्याइतक्याच प्रामाणिकपणे आत्मस्वरूपाचा शोध घेऊ लागला, तर?
जग अधिक सुखी होणार नाही का?
संघर्ष कमी होणार नाहीत का?
भीतीचे रूपांतर विश्वासात होणार नाही का?
अस्वस्थतेचे रूपांतर शांततेत होणार नाही का?
कदाचित याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाला आत्मतत्त्वाचे रहस्य सांगितले.
भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील १९ वा, २० वा आणि २१ वा श्लोक हे आत्मस्वरूप समजून घेण्याचे मूलाधार आहेत.
या श्लोकांमध्ये श्रीकृष्ण आत्मा काय आहे, तो कसा आहे, त्याचे स्वरूप काय आहे आणि तो शरीरापेक्षा कसा भिन्न आहे, याचे अत्यंत नेमके, तर्कशुद्ध आणि अनुभवाधिष्ठित विवेचन करतात.
यापुढील आपल्या प्रवासात आपण याच आत्मतत्त्वाचा शोध घेणार आहोत.
कारण मानवी जीवनाची खरी उंची शरीराच्या सामर्थ्यात नाही, बुद्धीच्या तेजात नाही, तर त्या सर्वांना प्रकाशित करणाऱ्या आत्मस्वरूपाच्या अनुभूतीत आहे.
श्रीमद्भगवद्गीता: दुसरा अध्याय – 'सांख्य योग'
भाग ४१
६ ऑगस्ट २०२६
आजचा अभ्यास आपण एका कृतियुक्त आणि अंतर्मुख करणाऱ्या विचाराने सुरू करूया.
काही क्षण शांत बसा. मनामध्ये अशी एखादी आठवण आणा, जिथे आपण कोणावरतरी कमालीचा रागवून त्याला गालावर एक जोराची थापड मारली होती. ती थापड देण्याच्या अगदी आधी नेमके काय काय घडले होते? त्या परिस्थितीची पार्श्वभूमी काय होती? आणि त्या क्षणी आपल्या मनाची मानसिक स्थिती, संताप किंवा भावना नेमकी कशी होती? याचा थोडा खोलवर विचार करून ती अनुभूती समजून घेण्याचा प्रयत्न करा.
आता आपण आणखी एक दुसरी कृती आपल्या मनातल्या मनात करणार आहोत. आपल्याला अतिशय प्रिय असलेल्या अशा व्यक्तीची आठवण करा, जिने आपल्या आयुष्याला कलाटणी दिली आहे, आपल्या आयुष्याला मोठा आधार दिला आहे, जी व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने मोठी आहे आणि जी आपल्यासाठी अत्यंत आदरणीय आहे. शिवाय, ती व्यक्ती आपल्या रक्ताच्या नात्यातील आहे — जसे की आपले आजोबा किंवा आजी, ज्यांनी आपल्यावर नितांत प्रेम केले आहे.
आणि अशा त्या आपल्या प्रिय आणि आदरणीय व्यक्तीच्या गालावर आपल्याला एक चापट द्यायची आहे. आपण ती देऊ का?
थोडा विचार करा — कोणत्या परिस्थितीमध्ये असे घडू शकते? किंवा घडले पाहिजे? याचा विचार करा.
मला खात्री आहे की तुम्ही परिस्थिती आणि मनाची स्थिती अगदी चांगल्या प्रकारे अनुभवली असेल.
आता आपण या मानवी भावनांच्या आणि रागाच्या भावनेतून बाहेर पडून पुन्हा एकदा शांत चित्ताने भगवद्गीतेच्या अभ्यासाकडे वळूया.
श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील श्रीकृष्णाच्या मुखातील १९, २० आणि २१ वे श्लोक समजून घेत असताना मनामध्ये एका नव्या आणि उच्चतर जाणिवेचा उदय होतो. ही जाणीव केवळ तात्त्विक वा बौद्धिक पातळीवरची नसून ती मानवी जीवनाला आणि अस्तित्वाला पूर्णपणे बदलून टाकणारी एक आंतरिक प्रचिती आहे.
य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम्। उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते।। (१९)
न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः। अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे।। (२०)
वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम्। कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम्।। (२१)
जो मनुष्य या आत्म्याला मारणारा समजतो आणि जो मनुष्य या आत्म्याला मारला गेला (मेलेला) मानतो, ते दोघेही आत्म्याचे मूळ स्वरूप जाणत नाहीत; कारण हा आत्मा कोणालाही मारत नाही आणि कोणाकडूनही मारला जात नाही.
हा आत्मा कधीही जन्म घेत नाही आणि मरतसही नाही. तो जन्मलेला असून पुन्हा कधी होणार आहे असेही नाही. कारण हा आत्मा अजन्म, नित्य (ध्रुव), सनातन आणि अनादि (पुराण) आहे. शरीर मारले गेले तरी हा आत्मा मारला जात नाही.
हे पार्था! जो मनुष्य या आत्म्याला अविनाशी, नित्य, अजन्म आणि अव्यय (ज्याचा कधीही क्षय होत नाही असा) जाणतो, तो पुरुष कोणाला मारतो आणि कोणाला मारण्यास प्रवृत्त करतो? (अर्थात, आत्म्याचे सत्य जाणणारा मनुष्य कोणाचाही वध करत नाही.)
एखादा माणूस दुसऱ्यावर हात कधी उगारतो?
चिमटा काढणे, थप्पड मारणे, अपमानास्पद शब्द बोलणे किंवा शारीरिक हिंसा करणे—या कृती सहज घडत नाहीत. त्यांच्या मागे मनाची एक विशिष्ट अवस्था असते.
सामान्य माणूस अनेकदा भीतीमुळे हिंसक होतो. कधी असहाय्यतेमुळे, कधी दीर्घकाळ सहन केलेल्या अन्यायाचा उद्रेक म्हणून, तर कधी समोरच्याच्या वागण्याचा अतिरेक असह्य झाल्यावर.
परंतु काही जण हिंसा वेगळ्याच कारणांसाठी करतात. स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी, सत्ता टिकवण्यासाठी, इतरांना भयभीत करण्यासाठी, स्वार्थ साधण्यासाठी किंवा अहंकाराचे समाधान करण्यासाठी. अशा हिंसेच्या मुळाशी करुणा नसते; तिथे केवळ अहंकार आणि स्वार्थ असतो.
हौस म्हणून कोणाला त्रास देणारा माणूस हा सामान्य मनुष्य राहत नाही. त्याच्या मनातील संवेदनशीलता क्षीण झालेली असते. दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव हरवलेली असते. अशा कृतीमागे विकृत मनोवृत्ती, सत्तेची लालसा किंवा विवेकशून्यता कार्यरत असते.
एखाद्याच्या गालावर चापट मारण्यासाठी आधी मनात किती राग, किती द्वेष, किती नकारात्मकता साठलेली असावी लागते, याचा विचार केला पाहिजे.
याउलट प्रेमाने दिलेली थाप, शाबासकीची टाळी किंवा आपुलकीचा स्पर्श कधीही हिंसा ठरत नाही. कारण कृतीपेक्षा तिच्यामागचा भाव महत्त्वाचा असतो. जिथे क्रूर भावना आणि क्रूर कृती यांचा संगम होतो, तिथे हिंसा जन्म घेते. आणि अशा हिंसेतून स्वार्थी, आत्मकेंद्री, अहंकारी आणि मतलबी व्यवस्थांना बळ मिळते.
महाभारताचे युद्ध अशा सात्त्विक लोकांविरुद्ध नव्हते. ते उभे राहिले होते त्या आसुरी प्रवृत्तीविरुद्ध, ज्या समाजातील मूल्यव्यवस्थेलाच भ्रष्ट करत होत्या. चुकीचे आदर्श निर्माण करत होत्या. अन्यायाला प्रतिष्ठा देत होत्या. धर्माच्या नावाखाली अधर्माला संरक्षण मिळत होते.
इतिहासात अनेकदा असे घडते की, दुष्ट प्रवृत्तीचे लोक सत्तेवर आरूढ होतात आणि सज्जन लोक त्यांच्या मोहात, नात्यांत किंवा चुकीच्या दयाभावात अडकून त्यांना प्रत्यक्ष पाठबळ देतात. तेव्हाच समाजाची मूल्यव्यवस्था ढासळू लागते.
अशा वेळी केवळ एखाद्या व्यक्तीचा नाही, तर एका विकृत मानसिकतेचा अंत आवश्यक ठरतो. जुन्या, अन्याय्य आणि मूल्यहीन व्यवस्थेऐवजी सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारी नवी मूल्याधिष्ठित व्यवस्था उभी करावी लागते.
व्यवस्थेचे असे परिवर्तन इतिहासात कधीच सहज घडलेले नाही. जुन्या व्यवस्थेचा अंत आणि नव्या व्यवस्थेचा उदय यामध्ये संघर्ष अटळ असतो. प्रश्न इतकाच असतो—तो संघर्ष कोणाच्या हातून आणि कोणत्या भावनेतून घडतो?
याच ठिकाणी भगवद्गीता अत्यंत विलक्षण तत्त्वज्ञान मांडते.
ती सांगते की, ज्याच्या मनात द्वेष नाही, सूड नाही, स्वार्थ नाही, अहंकार नाही; ज्याने आत्मस्वरूपाचा साक्षात्कार केला आहे; ज्याच्या क्षुद्र भावना पूर्णपणे गळून पडल्या आहेत—अशाच व्यक्तीच्या हातून आवश्यक हिंसा धर्मरूप ठरू शकते.
म्हणूनच अर्जुन युद्धासाठी तत्क्षणी तयार नव्हता. त्याच्या मनात अजून मोह होता, आप्तभाव होता, दुःख होते, गोंधळ होता. तो अजून परमेश्वराच्या व्यापक योजनेचे केवळ एक साधन होण्याइतका निर्मळ झाला नव्हता.
श्रीकृष्ण प्रथम त्याला युद्ध शिकवत नाहीत; ते त्याला आत्म्याचे स्वरूप शिकवतात.
कारण आत्मज्ञानाशिवाय केलेली हिंसा ही सूड ठरते; पण आत्मसाक्षात्कारानंतर कर्तव्य म्हणून केलेले कर्म हे धर्म ठरते.
आत्मानुभूती प्राप्त झालेला मनुष्य क्षुल्लक कारणांसाठी कोणालाही इजा करत नाही. कारण त्याच्यातील अहंकार विरघळलेला असतो. तो स्वतःला या विश्वाचा स्वामी मानत नाही; तो स्वतःला या विराट व्यवस्थेचा एक छोटासा घटक मानतो.
त्याला कळते—
"मी येथे स्वतःसाठी नाही. या विश्वव्यवस्थेच्या संतुलनासाठी माझे अस्तित्व आहे. माझ्या क्षमतेनुसार, माझ्या धर्मानुसार आणि माझ्या कर्तव्याप्रमाणे मला कर्म करायचे आहे."
अशी आत्मानुभूतीच मनुष्याला निष्काम कर्माची पात्रता देते.
म्हणूनच भगवद्गीतेच्या दृष्टीने केवळ बलवान असणे पुरेसे नाही. बलाला विवेकाची जोड हवी, विवेकाला आत्मज्ञानाची आणि आत्मज्ञानाला लोककल्याणाची दिशा.
तेव्हाच आवश्यक हिंसा ही वैयक्तिक सूड न राहता धर्मसंस्थापनेचे साधन बनते.
याच कारणामुळे श्रीकृष्ण प्रथम अर्जुनाला आत्म्याचे अमरत्व समजावून सांगतात आणि त्यानंतरच त्याला युद्धासाठी उभे करतात.
कारण धर्मसंस्थापनेसाठी हातात शस्त्र असण्यापेक्षा मनात आत्मज्ञान असणे अधिक आवश्यक आहे.
श्रीमद्भगवद्गीता: दुसरा अध्याय – 'सांख्य योग'
भाग ४२
७ ऑगस्ट २०२६
क्षणभर आपण एक छोटासा प्रयोग करून पाहूया.
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत, किंवा अगदी आपल्या बालपणापासून आजच्या या क्षणापर्यंतच्या आयुष्याचा पट डोळ्यांसमोर उभा करा. आपल्या आयुष्यात असंख्य लोक आले—विविध जाती, पंथ, भाषा आणि समाजघटकांतील. अर्थात, आपल्या देशात बहुसंख्य असल्यामुळे हिंदू समाजातील लोकच अधिक प्रमाणात आपल्या सहवासात आले.
आता स्वतःलाच एक प्रश्न विचारूया.
यांपैकी किती जणांना आपण "मृत्यू आहे, आणि मृत्यू हेच अंतिम सत्य आहे" या विचाराने कायमचे खचलेले पाहिले आहे? किती जण या सत्यामुळे आयुष्यभर अस्वस्थ राहिले? किती जणांचे जीवनच थांबून गेले?
थोडा शांतपणे विचार केला, तर उत्तर आश्चर्यकारकरित्या वेगळं दिसेल. अशी माणसं फारच क्वचित आढळतात.
हो, आपल्या माणसांना प्रिय व्यक्तीच्या निधनाने दुःख होतं, डोळ्यांत अश्रू येतात, विरहाची वेदना होते; पण मृत्यू हे जीवनाचं अपरिहार्य सत्य आहे, ही जाणीव भारतीय मनाने इतकी खोलवर स्वीकारलेली आहे की, त्या सत्यामुळे जीवनाविषयीचा विश्वास कधीच संपत नाही. दुःख असतं, पण निराशा नसते; विरह असतो, पण जीवनाचा त्याग नसतो. अश्रू असतात, पण आशाही असते.
हीच भारतीय मानसाची विलक्षण ताकद आहे.
भय माणसाला लहान करतं. भय त्याच्या निर्णयक्षमतेवर आघात करतं. भय त्याला स्वतःच्या क्षमतेवर संशय घ्यायला शिकवतं. म्हणून भारतीय तत्त्वज्ञानाने निर्भयतेला केवळ मानसिक अवस्था मानलं नाही; ती एक साधना मानली.
भारतीय विचार शरीराला नाकारत नाही. उलट तो सांगतो—
"शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्."
हे शरीरच आपल्या सर्व साधनेचं माध्यम आहे. त्याची काळजी घ्यायची, त्याचं संवर्धन करायचं, कारण त्याच्या माध्यमातूनच आपल्याला जीवनाचं उद्दिष्ट साध्य करायचं आहे.
पण शरीर हे अंतिम सत्य नाही. भारतीय जीवनदृष्टी सांगते की, आपण केवळ जगण्यासाठी जन्माला आलेलो नाही. प्रत्येकाच्या अस्तित्वामागे एक उद्देश आहे. प्रत्येकाच्या जीवनाला एक अर्थ आहे. प्रत्येक व्यक्ती काहीतरी उदात्त, काहीतरी श्रेष्ठ, काहीतरी कल्याणकारी घडवण्यासाठी जन्माला आली आहे. जेव्हा ही भूमिका मनामध्ये दृढ होते, तेव्हा जीवन बदलायला लागतं. तेव्हा "आजचा दिवस कसा जाईल?" हा प्रश्न राहत नाही; त्याऐवजी "आज माझ्या जीवनाच्या ध्येयासाठी मी काय करणार?" हा प्रश्न उभा राहतो.
कर्तव्य, धर्म, जबाबदारी, सेवा, त्याग, मूल्यांची स्थापना—हीच जीवनाची दिशा बनते.
या प्रवासात एक प्रश्न मात्र प्रत्येकाच्या मनात उभा राहतो—मृत्यू.
मृत्यू अटळ आहे. हे प्रत्येकाला माहीत आहे. पण त्याच क्षणी मनात दोन भावना जन्म घेतात.
पहिली—या शरीराशी, या जगाशी, या नात्यांशी निर्माण होणारी आसक्ती.
आणि दुसरी—मृत्यूची भीती.
भारतीय तत्त्वज्ञान या दोन्ही भावनांवर विलक्षण उपाय सुचवतं.
ते म्हणतं—जगा. आनंदाने जगा. कर्तव्य करत जगा. प्रेमाने जगा. पण आसक्त होऊन जगू नका.
कारण जीवनात सुख-दुःख येणारच. लाभ-हानी होणारच. यश-अपयश येणारच. हे सारे प्रवासाचे टप्पे आहेत. त्यांच्याकडे समत्वाने पाहायला शिकणं हीच खरी साधना आहे.
भारतीय तत्त्वज्ञानातील सर्वांत मोठा धीर देणारा विचार म्हणजे—
मृत्यू हे सत्य आहे; पण ते अंतिम सत्य नाही.
अंतिम सत्य आहे आत्मा.
जो जन्मत नाही, मरत नाही, नष्ट होत नाही.
जो शाश्वत आहे.
जो केवळ एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवास करतो.
भगवद्गीतेतील तो अमर श्लोक म्हणतो—
वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोऽपराणि।
तथा शरीराणि विहाय जीर्णा-
न्यन्यानि संयाति नवानि देही॥
जसा मनुष्य जुनी, जीर्ण झालेली वस्त्रे सोडून नवीन वस्त्रे धारण करतो, तसाच आत्मा जीर्ण झालेलं शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो.
किती सहज, किती सुंदर आणि किती जीवनस्पर्शी उदाहरण!
मृत्यू म्हणजे शेवट नाही.
तो केवळ वस्त्रपरिवर्तन आहे.
तो स्थलांतर आहे.
तो पुढच्या प्रवासाची तयारी आहे.
मी भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संकटकाळी आम्ही ईश्वराच्या खांद्यावर असतो. जिथे जातो तिथे तू माझा सांगाती. कितीतरी असे संदर्भ आहेत, जिथे निर्भयाचा बोध आपल्याला आपल्या आयुष्यात मिळतो आणि निर्भय ही साधना बनते. निर्भय ही साधना बनण्यासाठीचा एक मोठा आधार हा पुनर्जन्माचा संकल्पना आहे. आत्म्याच्या शाश्वततेचा संदेश आहे.
आत्मा अमर आहे.
याच विश्वासातून निर्भयता जन्म घेते.
याच निर्भयतेतून कर्तव्य जन्म घेतं.
आणि कर्तव्याच्या या अखंड प्रवाहातूनच राष्ट्राचं सामूहिक भावविश्व घडतं.
अंतिम चिंतन
भगवद्गीतेतील "वासांसि जीर्णानि..." हा श्लोक केवळ पुनर्जन्माची संकल्पना सांगत नाही; तो माणसाला भयातून मुक्त करतो. तो मृत्यूकडे पाहण्याची दृष्टी बदलतो. तो शरीराचं महत्त्व मान्य करतो, पण शरीरालाच अंतिम सत्य मानत नाही.
तो सांगतो—हे जीवन अमूल्य आहे. कारण या शरीराच्या माध्यमातूनच आपल्याला धर्म, कर्तव्य, सेवा, प्रेम आणि आत्मसाक्षात्काराचा प्रवास करायचा आहे.
आणि जेव्हा हा प्रवास पूर्ण होईल, तेव्हा जीर्ण वस्त्राप्रमाणे हे शरीर मागे राहील; पण प्रवासी पुढे निघालेला असेल.
कदाचित म्हणूनच भारतीय मानस आजही शांतपणे म्हणू शकतं—
"मृत्यू मला घाबरवत नाही; कारण मी नश्वर शरीर नाही, तर शाश्वत आत्मा आहे. मृत्य नंतर तर मला नवीन ताजे ताकदीचे शरीर मिळणार आहे."एखाद्या व्यक्तीचं जसं स्वतःचं एक भावविश्व असतं, तसंच समाजाचंही असतं. हजारो, लाखो व्यक्तींच्या विचारांचा, अनुभवांचा, श्रद्धांचा आणि संस्कारांचा संगम झाला की एका राष्ट्राचं सामूहिक भावविश्व घडतं. प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली वेगळी असते, प्रत्येकाची धाटणी वेगळी असते; पण त्या सर्वांना जोडणारं एक अदृश्य सूत्र असतं. भारताच्या बाबतीत हे सूत्र म्हणजे त्याची अध्यात्मप्रधान जीवनदृष्टी.
भारतीय समाजाला हजारो वर्षे प्रेरणा देणारे काही विचार असे आहेत की, ते केवळ ग्रंथात राहिले नाहीत; ते लोकांच्या मनात उतरले. भगवद्गीतेतील काही श्लोक तर भारतीयांच्या सामूहिक चेतनेचाच भाग झाले आहेत.
"परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्..." हा श्लोक ईश्वरावरचा विश्वास दृढ करतो.
"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन..." हा कर्मयोग शिकवतो.
आणि "वासांसि जीर्णानि यथा विहाय..." हा श्लोक मृत्यूकडे पाहण्याची भारतीयांची दृष्टीच बदलून टाकतो.
श्रीमद्भगवद्गीता: दुसरा अध्याय – 'सांख्य योग'
भाग ४३
८ ऑगस्ट २०२६
ख्रिस्तपूर्व ३२६.
आजपासून जवळजवळ तेवीसशे वर्षांपूर्वीचा काळ.
मॅसिडोनियाचा राजा अलेक्झांडर—सिकंदर—जग जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेने भारताच्या उत्तर-पश्चिम सीमेवर, तक्षशिलेजवळ येऊन पोहोचला होता.
जगज्जेता म्हणून ज्याची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली होती, तो सिकंदर ग्रीक तत्त्ववेत्ता अॅरिस्टॉटलचा शिष्य होता. अॅरिस्टॉटलने त्याला भारताबद्दल सांगितले होते—या भूमीत असे योगी आहेत, असे संन्यासी आहेत, जे शरीराच्या पलीकडे जीवनाचा विचार करतात; ज्यांच्यासाठी संपत्ती, सत्ता, विजय यांच्यापेक्षा आत्मज्ञान अधिक मोठे आहे.
सिकंदरला अशा एखाद्या ज्ञानी पुरुषाला भेटायचे होते.
त्याच्या सैनिकांनी, सेनापतींनी अशा योग्याचा शोध सुरू केला.
आणि त्यांना एक संन्यासी सापडला—दांडामिस.
सिकंदरच्या प्रतिनिधींनी त्याच्यासमोर राजाज्ञा ठेवली.
“जगज्जेता अलेक्झांडर तुला बोलावतो आहे. तू त्याच्याबरोबर चल. तो तुला अपार संपत्ती देईल, मान देईल, सन्मान देईल.”
दांडामिस शांत होता.
मग त्यांनी धमकी दिली—
“आणि जर तू त्याच्या आज्ञेचे पालन केले नाहीस, तर तुझे मस्तक धडापासून वेगळे केले जाईल.”
दांडामिस हसला.
त्याचे उत्तर इतिहासात अमर झाले.
“तू माझे मस्तक वेगळे करू शकतोस. माझे शरीर नष्ट करू शकतोस. पण माझ्या आत्म्याला मारू शकत नाहीस.”
कारण त्याच्या मनात भगवद्गीतेचा विचार जिवंत होता—
“वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोऽपराणि।”
माणूस जुने, जीर्ण वस्त्र टाकून नवे वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्मा जुने शरीर सोडून दुसरे शरीर धारण करतो.
आणि पुढचा श्लोक तर जणू भारतीय मानसाच्या अंतरंगातच कोरला गेला—
“नैनं छिन्दन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो
न शोषयति मारुतः॥”
शस्त्र आत्म्याला छेदू शकत नाही.
अग्नी त्याला जाळू शकत नाही.
पाणी त्याला भिजवू शकत नाही.
वारा त्याला सुकवू शकत नाही.
हा केवळ एक तात्त्विक सिद्धांत नाही.
हा भारतीय माणसाच्या मनाची भीतीशी लढण्याची शक्ती बनला.
________________________________________
शरीर नश्वर आहे; पण मी केवळ शरीर नाही!
भारतीय संस्कृतीने माणसाला एक विलक्षण प्रश्न विचारला—
“तू नेमका कोण आहेस?”
तुझे शरीर?
की शरीराच्या पलीकडे असलेले तुझे अस्तित्व?
शरीराला जन्म आहे.
शरीराला वृद्धत्व आहे.
शरीराला रोग आहे.
शरीराला मृत्यू आहे.
पण या सगळ्याच्या पलीकडे जे काही आहे, त्याला आपण आत्मा म्हटले.
म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञानाने मृत्यूला जीवनाचा अंत मानले नाही.
मृत्यू म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेकडे जाणे.
जुने वस्त्र उतरवणे.
प्रवास संपणे नव्हे—प्रवासाचे रूप बदलणे.
आणि म्हणूनच भारतीय मानसाला एक विलक्षण अभय मिळाले.
“मी शरीर नाही; मी आत्मा आहे.”
या एका जाणिवेने माणसाच्या भीतीचे स्वरूपच बदलून गेले.
पण मग आपण हरलो कसे?
हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.
भारतावर शतकानुशतके आक्रमणे झाली.
ग्रीक आले.
शक आले.
यवन आले.
हूण आले.
नंतर मंगोल, तैमूर, विविध मध्य आशियाई आक्रमक आले.
मंदिरे उद्ध्वस्त झाली.
शहरे जाळली गेली.
कत्तली झाल्या.
असंख्य लोकांवर अत्याचार झाले.
शरीराला वेदना देऊन माणसाचे मन मोडण्याचा प्रयत्न झाला.
मग प्रश्न असा पडतो—
ज्या भूमीने आत्मा अमर आहे असे सांगितले, ती भूमी परकीयांच्या ताब्यात गेलीच कशी?
कारण एका टप्प्यावर आपण आपल्या तत्त्वज्ञानाचा जिवंत अर्थ विसरलो.
गीतेचा आत्मा विसरून आपण केवळ कर्मकांडात अडकलो.
तत्त्वज्ञान जगण्याऐवजी ते पाठ करण्यापुरते उरले.
शरीर, सुख, सत्ता, संपत्ती, जात-पात, परंपरा यांच्या बाह्य चौकटींमध्ये आपण इतके अडकलो की आपल्या अंतरंगातील निर्भयता कुठेतरी हरवली.
स्वत्व जिवंत होते; पण त्याची जाणीव क्षीण झाली होती.
________________________________________
पंचनदीच्या तीरावर आलेले ग्रीक…
कवितेतून त्या काळाचे एक विलक्षण चित्र उभे राहते—
ग्रीक, हूण, शक, यवन, टूटते थे भूमि पर
हारते थे हौसले, पंचनदी के तीर पर
पता नहीं कहाँ हैं वे, अतीत में समा गए
काल के प्रवाह में, निज को वो मिटा गए
आक्रमक आले.
त्यांनी तलवारी आणल्या.
घोडदळ आणले.
शस्त्रे आणली.
भीती आणली.
पण भारताने त्यांना केवळ तलवारीने उत्तर दिले नाही.
भारताने त्यांना एक वेगळी जीवनदृष्टी दिली.
युद्ध झाले.
रक्त सांडले.
साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली.
पण या भूमीच्या चिंतनाची परंपरा टिकून राहिली.
अगदी ग्रीक राजा मेनांडर—भारतीय परंपरेत ज्याला मिलिंद म्हणून ओळखले जाते—याच्याही आयुष्यात असा टप्पा आला की तो भारतीय तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली आला. नागसेन भिक्षूशी झालेल्या संवादातून त्याने जीवन, आत्मा आणि सत्य यांचा शोध घेतला.
जग जिंकण्यासाठी आलेल्या माणसाला अखेरीस प्रश्न पडला—
“मी कोण आहे?”
हेच भारताचे वैशिष्ट्य होते.
________________________________________
शरीराला हरवता येते; आत्म्याला नाही
शकांच्या आक्रमणांपासून पुढे अनेक परकीय शक्तींनी भारतावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला.
पण भारताच्या इतिहासात पुन्हा पुन्हा अशी माणसे उभी राहिली, ज्यांनी शरीराच्या नश्वरतेच्या पलीकडे राष्ट्राचे स्वत्व पाहिले.
युद्धभूमीवर उभा असलेला सैनिक जर स्वतःच्या मृत्यूला घाबरत नसेल, तर त्याला पराभूत करणे किती कठीण आहे!
कारण शत्रू त्याच्या शरीराला मारू शकतो.
पण त्याच्या विचाराला?
त्याच्या श्रद्धेला?
त्याच्या स्वत्वाला?
ते कसे मारणार?
“नैनं छिन्दन्ति शस्त्राणि…”
ही केवळ उपासनेची ओळ राहिली नाही.
ती रणांगणातील मानसिक शक्ती बनली.
________________________________________
छत्रपती संभाजी महाराजांच्या वेदनेतही हेच अभय
आपल्या इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांना अमानुष छळ सहन करावा लागला.
शरीरावर असह्य अत्याचार झाले.
पण शरीराला छळता येते म्हणून आत्मसमर्पण करावेच लागते असे नाही.
शरीर जखमी होऊ शकते.
शरीर रक्तबंबाळ होऊ शकते.
शरीर नष्ट होऊ शकते.
पण ध्येयाशी असलेली निष्ठा शरीराच्या वेदनेपेक्षा मोठी असते.
हीच गीतेची शिकवण भारतीय इतिहासातील अनेक वीरांनी जगून दाखवली.
शरीराच्या वेदनेपुढे मन झुकले नाही.
मृत्यूच्या सावलीतही स्वत्व टिकून राहिले.
________________________________________
शिखांच्या बलिदानातही तोच आत्मा
गुरु परंपरेतील बलिदान असो, साहिबजाद्यांचे बलिदान असो, किंवा असंख्य शीख बांधवांनी धर्म आणि स्वाभिमानासाठी दिलेली आहुती असो—
शरीरावर अत्याचार झाले.
पण आत्मसमर्पण झाले नाही.
भिंतीत जिवंतपणी चिणून टाकण्याचा प्रयत्न झाला.
मृत्यू समोर उभा होता.
पण मन म्हणत होते—
“शरीर जाईल; विचार जाणार नाही.”
याच मानसिकतेतून भारतीय इतिहासातील बलिदानांची परंपरा निर्माण झाली.
________________________________________
आणि मग इंग्रज आले…
परकीय सत्ता बदलली.
शस्त्रे बदलली.
राज्यकर्ते बदलले.
पण भारतीय माणसाच्या मनातील तीच ज्योत पुन्हा पुन्हा प्रज्वलित झाली.
इंग्रजांची सत्ता अफाट होती.
त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे होती.
प्रचंड सैन्य होते.
कारागृहे होती.
फाशीची शिक्षा होती.
छळ होता.
पण स्वातंत्र्यसैनिकांच्या मनात एक वेगळेच बळ होते.
त्या बळाला शब्द मिळाले—
“अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला;
मरी रिपू असा जगती कवन जन्मला?”
ही केवळ कविता नाही.
ही गीतेच्या आत्मतत्त्वाची आधुनिक प्रतिध्वनी आहे.
________________________________________
“आई, मरणाला भ्यालो नाही…”
एका क्रांतिकारकाच्या मनात मृत्यू म्हणजे शेवट नव्हता.
तो मातृभूमीपासून कायमचा दूर जाणे नव्हते.
तो फक्त काही काळासाठी शरीर सोडणे होते.
म्हणूनच त्या भावनेतून शब्द उमटतात—
“सांगतो तुला शपथ घेऊनी आई,
मरणाला भ्यालो नाही…”
मृत्यू समोर उभा आहे.
हृदयाचे ठोके मोजले जात आहेत.
शरीराला कदाचित आता काहीच क्षण उरले आहेत.
पण मन शांत आहे.
कारण मनाला गीतेचे सार आठवते—
“नश्वर तनु जाणार…”
हे शरीर जाणारच.
मग त्यासाठी भीती कशाची?
जर माझे जीवन मातृभूमीच्या चरणी अर्पण झाले, तर त्यापेक्षा मोठे भाग्य कोणते?
आणि म्हणूनच त्या भावनेतून एक विलक्षण ओळ जन्म घेते—
“वाईट वाटते तुके, तव सेवेला अंतरलो मी जननी…
भेटेन नऊ महिन्यांनी!”
किती अद्भुत आहे हा विचार!
मृत्यूला सामोरे जाणारा मनुष्य आपल्या आईला सांगतो—
“आई, मी तुला सोडून जात नाही.
मी पुन्हा येईन.
फक्त नऊ महिन्यांनी.”
हा मृत्यूवरचा विश्वास नाही.
हा जीवनाच्या अखंड प्रवाहावरचा विश्वास आहे.
हा आत्म्याच्या अमरत्वावरचा विश्वास आहे.
________________________________________
“पुनःपुन्हा मरण्यासाठी…”
मातृभूमीच्या सेवेसाठी एक जन्म पुरेसा नाही, असे वाटणारी ही भावना किती विलक्षण आहे!
तो म्हणतो—
लाभते जया वीरमरण भाग्याचे,
वैकुंठपदी तो नाचे.
आणि पुढची प्रार्थना तर आणखी मोठी—
दे जन्म मला मातृभूमीचे पोटी,
पुनःपुन्हा मरण्यासाठी.
कशासाठी?
संपत्तीसाठी नाही.
सत्तेसाठी नाही.
स्वतःच्या सुखासाठी नाही.
तर—
मागेन हेच श्रीहरिला,
मातृभूमी उद्धरण्याला,
स्वातंत्र्यरणी लढण्याला,
तव शुभउदरी जन्म पुन्हा घेऊनी…
“भेटेन नऊ महिन्यांनी.”
________________________________________
ज्ञानेश्वरीने हा विचार घराघरात नेला
गीतेतील हा अत्यंत गहन अद्वैत विचार केवळ संस्कृत जाणणाऱ्या विद्वानांच्या वर्तुळात राहिला नाही.
ज्ञानदेवांनी तो लोकभाषेत आणला.
भावार्थदीपिका—ज्ञानेश्वरी जन्माला आली.
संस्कृतमधील तत्त्वज्ञान मराठी माणसाच्या घरात आले.
शेतकऱ्याच्या कानावर आले.
सामान्य माणसाच्या मनात उतरले.
आत्मा, शरीर, कर्म, मृत्यू, जीवन यांच्याबद्दलचे चिंतन लोकमानसाचा भाग बनले.
हीच भारतीय संस्कृतीची ताकद आहे.
ती केवळ ग्रंथ लिहीत नाही.
ती मानस घडवते.
________________________________________
भारताचा आत्मा नेमका काय आहे?
भारताचा आत्मा म्हणजे केवळ एखादी राजसत्ता नाही.
एखादे साम्राज्य नाही.
एखादा राजा नाही.
एखादे मंदिर नाही.
भारताचा आत्मा म्हणजे—
“मी शरीरापेक्षा मोठा आहे.”
“सत्य शरीराच्या नाशाने नष्ट होत नाही.”
“धर्मासाठी उभे राहणे मृत्यूपेक्षा मोठे आहे.”
“मृत्यू हा अंत नाही.”
आणि म्हणूनच या भूमीवर हजारो वर्षे आक्रमणे झाली, राज्यकर्ते बदलले, सत्ता बदलल्या, भाषा बदलल्या, राजकीय नकाशे बदलले—
पण काहीतरी मूलभूत टिकून राहिले.
भारताचे स्वत्व.
________________________________________
आज आपण पुन्हा त्या दोन श्लोकांकडे पाहिले पाहिजे—
“वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोऽपराणि…”
आणि—
“नैनं छिन्दन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो
न शोषयति मारुतः॥”
हे श्लोक केवळ मृत्यूच्या वेळी आठवायचे मंत्र नाहीत.
हे जगण्याचे मंत्र आहेत.
अपयश आले तर—
मी शरीर नाही. मी यापेक्षा मोठा आहे.
अडचण आली तर—
ही परिस्थिती मला तोडू शकत नाही.
भीती वाटली तर—
माझ्यातील आत्मशक्ती नश्वर नाही.
आणि जेव्हा जीवन एखाद्या मोठ्या ध्येयासाठी स्वतःला अर्पण करण्याची वेळ आणते, तेव्हा—
शरीराची चिंता मागे पडते आणि ध्येय पुढे उभे राहते.
म्हणूनच दांडामिस सिकंदरसमोर निर्भय उभा राहू शकला.
म्हणूनच हजारो बलिदानांनी भारतीय इतिहासाची पाने लाल झाली, पण भारतीय स्वत्वाची ज्योत विझली नाही.
म्हणूनच ज्ञानेश्वरांनी गीता लोकांच्या ओठांवर आणली.
म्हणूनच क्रांतिकारक फाशीच्या दोरीकडे हसत पाहू शकले.
आणि म्हणूनच एखादा वीर आपल्या आईला शेवटच्या क्षणी सांगू शकला—
“मरणाला भ्यालो नाही…”
कारण त्याच्या मनात श्रीकृष्णाचा आवाज घुमत होता—
“नैनं छिन्दन्ति शस्त्राणि…”
शस्त्र मला छेदू शकत नाही.
अग्नी मला जाळू शकत नाही.
पाणी मला भिजवू शकत नाही.
वारा मला सुकवू शकत नाही.
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ४४
९ ऑगस्ट २०२६
शाश्वत अशा आत्म्याचा आणि अशाश्वत अशा शरीराचा संयोग झाला की जीवन निर्माण होतं. त्यामुळे जीवन समजून घ्यायचं असेल, तर या दोन्हींचा विचार करावा लागतो—शाश्वताचाही आणि अशाश्वताचाही.
फक्त शरीराचा विचार केला, तर तो अपुरा ठरतो. आणि शरीर सोडून केवळ आत्म्याचा विचार केला, तरी तोही अपुरा ठरतो. कारण आपलं प्रत्यक्ष जीवन या दोघांच्या संयोगातून आकाराला आलेलं आहे.
अर्जुनाच्या विषादामागे नेमकं हेच एक महत्त्वाचं कारण आहे.
अर्जुन सध्या फक्त अशाश्वताचा—म्हणजे शरीराचा—विचार करतो आहे. स्वतःच्या शरीराचा आणि समोर उभ्या असलेल्या आप्तस्वकीयांच्या शरीराचाही. “मी यांना मारणार”, “माझ्यामुळे यांचा नाश होणार”, “यांच्या मृत्यूमुळे मला काय भोगावं लागेल?” या सगळ्या विचारांच्या केंद्रस्थानी शरीर आहे.
त्यामुळे त्याच्या मनात विषाद दाटून येतो.
आपणही जब जीवनाकडे केवळ शरीर, परिस्थिती, नाती, संपत्ती, यश-अपयश, मिळणं-गमावणं या अशाश्वत गोष्टींच्या चौकटीतून पाहतो, तेव्हा विषाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. कारण अशाश्वत गोष्टी बदलणारच असतात. शरीर बदलणार, नाती बदलणार, परिस्थिती बदलणार, यश-अपयश बदलणार.
मग या बदलत्या जगाला आपण अंतिम सत्य मानलं, तर मन अस्थिर होणारच.
म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला शरीराच्या अशाश्वततेबरोबर आत्म्याच्या शाश्वततेची जाणीव करून देतात.
जीवन अधिक आनंदी, सक्षम आणि शांत करायचं असेल, तर अशाश्वताचा स्वीकार करताना शाश्वताचा आधार समजून घ्यावा लागतो. अशाश्वत बदलतं—हे मान्य करून पुढे जाणं, आणि त्या बदलांच्या पलीकडे असणाऱ्या शाश्वत तत्त्वाची जाणीव ठेवणं, हेच कदाचित जीवनाकडे साकल्याने पाहणं आहे.
पूर्ण शरीर आणि पूर्ण आत्मा यांच्या संयोगातून पूर्ण जीवन निर्माण होतं.
म्हणून जीवनाला तुकड्यांत समजून घेता येत नाही. ते केवळ शरीर नाही आणि ते केवळ आत्माही नाही. या दोघामधील परस्परसंबंध, त्यांच्यातून निर्माण होणाऱ्या प्रक्रिया आणि त्या प्रक्रियांमधून घडणारं आपलं अस्तित्व—हे सगळं एकत्र समजून घ्यावं लागतं.
अशाश्वत समजून घेण्याचा प्रयत्न
भारतीय अध्यात्मपरंपरेमध्ये अशाश्वत विश्व समजून घेण्यासाठी दोन महत्त्वाच्या तत्त्वदृष्टी आपल्याला दिसतात—सांख्य दर्शन आणि वेदांत दर्शन.
सांख्य दर्शनामध्ये पुरुष आणि प्रकृती या दोन मूलभूत तत्त्वांची मांडणी आहे.
• पुरुष म्हणजे चेतना, आत्मा, दृष्टा.
• प्रकृती म्हणजे जड निसर्ग—संपूर्ण व्यक्त विश्वाचं मूळ कारण. प्रकृती त्रिगुणात्मक आहे—सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी युक्त.
वेदांताच्या भाषेत याच विश्वाकडे पाहताना ब्रह्म आणि माया या संकल्पना येतात. ब्रह्म हे अंतिम सत्य; आणि जे काही या ब्रह्माचं प्रकट रूप म्हणून आपल्याला अनुभवाला येतं, ते मायेच्या माध्यमातून प्रकट झालेलं विश्व.
ही तत्त्वज्ञानं केवळ पुस्तकात ठेवण्यासाठी नाहीत. आपल्या अस्तित्वाकडे, शरीराकडे आणि विश्वाकडे पाहण्याची ती वेगवेगळी साधनं आहेत.
याच संदर्भात अंबाजोगाईचे संत दासोपंत यांचा अभ्यास विशेष महत्त्वाचा वाटतो. त्यांनी या सूक्ष्म तत्त्वज्ञानाचा विचार केवळ शब्दांत मांडला नाही, तर चित्रांच्या माध्यमातूनही व्यक्त केला. त्यामुळे तत्त्वज्ञान आणि कलात्मक अभिव्यक्ती यांचा एक विलक्षण संगम त्यांच्या कार्यामध्ये दिसतो.
अशा प्रकारे सूक्ष्म तत्त्वज्ञान शब्दातून आणि चित्रातून समजून घेण्याची परंपरा आपल्या परिसरात निर्माण झाली, ही मोठी गोष्ट आहे.
सांख्य दर्शनातील पंचवीस तत्त्वे
सांख्य दर्शनानुसार सृष्टीची रचना पंचवीस तत्त्वांच्या माध्यमातून समजावून सांगितली जाते.
यामध्ये सर्वप्रथम दोन स्वतंत्र मूलतत्त्वांचा विचार केला जातो—पुरुष आणि प्रकृती.
• पुरुष म्हणजे चैतन्य. तो स्वतः काही निर्माण करत नाही; पण त्याच्या उपस्थितीमुळे प्रकृतीला चैतन्य प्राप्त होतं.
• प्रकृती ही सृष्टीच्या निर्मितीचं मूळ कारण आहे. तिच्यामध्ये सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण आहेत. या त्रिगुणांच्या संतुलनात परिवर्तन झालं की सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होते.
प्रकृतीपासून प्रथम महत किंवा बुद्धी प्रकट होते.
बुद्धी म्हणजे जाणण्याची, समजण्याची, निर्णय घेण्याची क्षमता.
बुद्धीतून अहंकार प्रकट होतो—“मी” असल्याची जाणीव. “मी करतो”, “माझं”, “मला” अशा भावनांचा केंद्रबिंदू म्हणजे अहंकार.
या अहंकारातून पुढे इंद्रियं, मन, तन्मात्रा आणि महाभूतांची निर्मिती समजावून सांगितली जाते.
पाच ज्ञानेंद्रिये
• श्रोत्र — ऐकण्यासाठी कान
• त्वचा — स्पर्श जाणण्यासाठी
• चक्षु — पाहण्यासाठी डोळे
• रसना — चव घेण्यासाठी जीभ
• घ्राण — गंध जाणण्यासाठी नाक
पाच कर्मेंद्रिये
• वाणी — बोलण्यासाठी
• हात — ग्रहण करण्यासाठी
• पाय — चालण्यासाठी
• उत्सर्जनेंद्रिय — उत्सर्जनासाठी
• जननेंद्रिय — प्रजननासाठी
आणि या दोन्हींच्या कार्याला समन्वय देणारं मन.
मन हे संकल्प-विकल्पांचं केंद्र आहे. इंद्रियांना विषयांकडे नेणं आणि त्यांच्याकडून आलेल्या अनुभवांचा समन्वय करणं, हे मनाचं महत्त्वाचं कार्य.
यानंतर येतात पाच तन्मात्रा—
शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध.आणि त्यातून पुढे स्थूल स्वरूपात प्रकट होतात पाच महाभूतं—
आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी.अशा प्रकारे सांख्य दर्शन सृष्टीच्या सूक्ष्मापासून स्थूलाकडे होणाऱ्या प्रवासाचं एक तात्त्विक चित्र आपल्यासमोर ठेवतं.
पंचीकरण : सूक्ष्मातून स्थूलाकडे
वेदांतामध्ये स्थूल विश्वाची निर्मिती समजावून सांगताना पंचीकरण ही एक सुंदर संकल्पना येते.
पाच सूक्ष्म महाभूतं—आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी—स्वतंत्र स्वरूपात असताना अत्यंत सूक्ष्म असतात. स्थूल जगाची निर्मिती होण्यासाठी त्यांचं परस्पर मिश्रण होतं.
या प्रक्रियेचा विचार गणिताच्या माध्यमातूनही करता येतो.
प्रत्येक सूक्ष्म महाभूताचे दोन समान भाग केले जातात. त्यातील एक अर्धा भाग तसाच ठेवला जातो. उरलेल्या अर्ध्या भागाचे पुन्हा चार समान भाग केले जातात. म्हणजे प्रत्येकाचा $1/8$ भाग.
नंतर एखाद्या महाभूताच्या मूळ ५० टक्के भागामध्ये इतर चार महाभूतांचे प्रत्येकी १२.५ टक्के भाग मिसळले जातात.
उदाहरणार्थ, पंचीकृत आकाशामध्ये—
$50\%$ आकाश + $12.5\%$ वायू + $12.5\%$ तेज + $12.5\%$ जल + $12.5\%$ पृथ्वी
अशा प्रकारे पंचीकृत वायू, पंचीकृत तेज, पंचीकृत जल आणि पंचीकृत पृथ्वी तयार होतात.
या प्रक्रियेचा तात्त्विक अर्थ अत्यंत सुंदर आहे.
स्थूल जगात कोणतीही गोष्ट पूर्णपणे स्वतंत्र नसते.
एकाच घटकातून स्थूल वस्तू निर्माण होत नाही. प्रत्येक स्थूल वस्तूमध्ये इतर घटकांचाही सहभाग असतो.
मातीचा गोळा असला, तरी त्याला आकार देण्यासाठी पाणी लागतं. उष्णता लागते. त्यामध्ये वायू आणि अवकाशाचाही सहभाग असतो.
म्हणूनच जग हे परस्परावलंबी आहे.
आपलं शरीर म्हणजे पंचमहाभूतांचा संगम
आपलं शरीरही याच पंचीकृत महाभूतांनी बनलेलं आहे, अशी भारतीय तत्त्वज्ञानाची मांडणी आहे.
• पृथ्वी तत्त्व स्थैर्य आणि घनता देतं—हाडं, मांस, त्वचा, नखे, दात, केस यांसारख्या स्थूल रचनांमध्ये त्याचा विचार केला जातो.
• जल तत्त्व शरीरातील द्रवरूप प्रक्रियांशी जोडलेलं आहे—रक्त, रस, घाम, मूत्र इत्यादी.
• तेज तत्त्व उष्णता, तापमान, पचन आणि शरीरातील रूपांतरणाच्या प्रक्रियांशी संबंधित मानलं जातं.
• वायू तत्त्व हालचाल, श्वासोच्छ्वास, आकुंचन-प्रसरण यांसारख्या प्रक्रियांशी संबंधित आहे.
• आकाश तत्त्व शरीरातील सर्व पोकळ्या आणि अवकाशाशी संबंधित आहे.
म्हणजे शरीराकडे पाहिलं, तरी आपल्याला एक विलक्षण परस्परसंबंध दिसतो.
आपण स्वतंत्र नाही.आपल्या शरीरामध्ये पृथ्वी आहे, जल आहे, अग्नी आहे, वायू आहे आणि आकाश आहे.आणि हेच घटक आपल्या भोवतालच्या विश्वातही आहेत.व्यष्टी आणि समष्टी यांच्यातील नातं इथे स्पष्ट होतं.जे विश्वाबाहेर आहे, त्याचं प्रतिबिंब आपल्या शरीरात आहे.
पंचमहाभूतांपासून अनुभवविश्व
आपण जे जग अनुभवतो, तेही याच स्थूल घटकांच्या माध्यमातून.
• डोळ्यांना रूप दिसतं.
• कानांना शब्द ऐकू येतो.
• त्वचेला स्पर्श जाणवतो.
• जिभेला रस कळतो.
• नाकाला गंध जाणवतो.
म्हणजे पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या स्थूल विश्वाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला ज्ञानेंद्रियांची आवश्यकता आहे.एकीकडे विश्व आहे आणि दुसरीकडे ते अनुभवणारं शरीर आहे.
पण प्रश्न असा उरतो—हे शरीर अनुभव घेतं कसं?डोळे आहेत, पण त्यांना दिसतंच कसं? कान आहेत, पण ऐकण्याची जाणीव कुठून येते? मेंदू आहे, मज्जासंस्था आहे, शरीरातील असंख्य प्रक्रिया आहेत; पण या सगळ्यांना “मी अनुभवतो आहे” अशी जाणीव कुठून येते?
इथे येतो आत्म्याचा विचार.
आत्मा : शरीराला चैतन्य देणारा
स्थूल शरीर कितीही परिपूर्ण असलं, तरी त्यामध्ये चैतन्य नसेल तर ते जीवन राहत नाही.
शरीर आहे, पण जीवन नाही—अशी अवस्था आपण मृत शरीरामध्ये पाहतो.
म्हणून भारतीय तत्त्वज्ञान म्हणतं—
शरीराला चैतन्य देणारं तत्त्व म्हणजे आत्मा.
भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण आत्म्याचं स्वरूप अत्यंत प्रभावीपणे स्पष्ट करतात.
ते म्हणतात—
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥
आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही. अग्नी जाळू शकत नाही. पाणी भिजवू शकत नाही. वारा सुकवू शकत नाही. म्हणजे आत्मा हा भौतिक जगाच्या नियमांनी नष्ट होणारा घटक नाही. पुढे श्रीकृष्ण म्हणतात—
अच्छेद्योऽयमदाह्योऽयम अक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्यः सर्वगतः स्थाणुर् अचलोऽयं सनातनः ॥
तो अच्छेद्य आहे.अदाह्य आहे. अक्लेद्य आहे. अशोष्य आहे. तो नित्य आहे. सर्वव्यापी आहे. स्थिर आहे. अचल आहे. सनातन आहे.आणि पुढे—
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम अविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥
आत्मा अव्यक्त आहे. तो इंद्रियांना दिसत नाही. तो अचिंत्य आहे—सामान्य तर्कबुद्धीच्या मर्यादेपलीकडचा. तो अविकारी आहे—त्याच्यामध्ये बदल होत नाही.
म्हणून आत्म्याचं हे स्वरूप जाणून घेतल्यानंतर शोक करण्याचं कारण नाही, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात.
शरीर बदलतं; आत्मा बदलत नाही
आपल्या बालपणापासून आजपर्यंत स्वतःच्या शरीरात किती बदल पाहिले आहेत! बालपणीचं शरीर आज नाही. किशोरावस्थेचं शरीर आज नाही. तरुणपणाचं शरीरही कायम राहणार नाही. शरीर बदलतं. पण या सगळ्या बदलांमध्ये “मी” असल्याची जी जाणीव आहे, ती मात्र अखंड राहते.शरीराच्या अवस्थांमध्ये बदल होतात; पण त्या बदलांचा दृष्टा कोण? भारतीय तत्त्वज्ञान त्याला आत्मा म्हणतं.
म्हणूनच आत्म्याच्या वर्णनासाठी अनेक शब्द वापरले गेले आहेत—
• अज — ज्याला जन्म नाही.
• नित्य — जो सदैव आहे.
• शाश्वत — जो कायमस्वरूपी आहे.
• सनातन — ज्याला आरंभ-अंताच्या मर्यादा नाहीत.
• अच्छेद्य — ज्याला कापता येत नाही.
• अदाह्य — ज्याला जाळता येत नाही.
• अक्लेद्य — ज्याला भिजवता येत नाही.
• अशोष्य — ज्याला सुकवता येत नाही.
• सर्वगत — जो सर्वत्र व्यापून आहे.
• अचल — ज्यामध्ये चंचलता नाही.
• अव्यक्त — जो इंद्रियांना दिसत नाही.
• अचिंत्य — जो सामान्य विचारांच्या पलीकडे आहे.
• अविकारी — ज्यामध्ये परिवर्तन होत नाही.
हे आत्म्याचं स्वरूप समजून घेण्याचे वेगवेगळे प्रयत्न आहेत.
मग जीवन म्हणजे नेमकं काय?
इथे पुन्हा आपण सुरुवातीच्या प्रश्नाकडे येतो. शाश्वत आत्मा आणि अशाश्वत शरीर यांच्या संयोगातून जीवन प्रकट होतं.शरीराशिवाय आपल्याला जगात कृती करता येत नाही. आत्मतत्त्वाची जाणीव नसताना त्या कृतींना अंतिम अर्थ प्राप्त होत नाही. शरीर आपल्याला जगण्याची साधनं देतं. आत्म्याची जाणीव जगण्याला दिशा देते. शरीर आपल्याला अनुभव देतं. आत्मा त्या अनुभवांचा साक्षी होण्याची क्षमता देतो.शरीर बदलतं.आत्मा शाश्वत आहे, अशी गीतेची भूमिका आहे. म्हणूनच शरीराला नाकारणं चुकीचं आणि शरीरालाच अंतिम सत्य मानणंही चुकीचं. अशाश्वताला समजून घ्यायचं आहे; पण त्यात अडकायचं नाही.शाश्वताला जाणून घ्यायचं आहे; पण अशाश्वत जीवनापासून पळून जायचं नाही.यांचा समतोल साधणं म्हणजेच कदाचित योग.
अर्जुनाचा प्रश्न आणि आपला प्रश्न
अर्जुन युद्धभूमीवर उभा आहे. त्याला मृत्यू दिसतो आहे.त्याला नाती दिसत आहेत.त्याला शरीरं दिसत आहेत.त्याला परिणाम दिसत आहेत.पण त्याला त्या सगळ्याच्या पलीकडचं शाश्वत तत्त्व दिसत नाही.म्हणून त्याचा विषाद वाढतो.कृष्ण त्याला लगेच युद्धाची रणनीती शिकवत नाहीत.
ते आधी त्याची दृष्टी बदलतात.“तू ज्याला संपूर्ण सत्य मानतो आहेस, ते संपूर्ण सत्य नाही,” असं जणू ते सांगतात.शरीर आहे—पण शरीरापलीकडेही काही आहे.मृत्यू आहे—पण मृत्यू अंतिम सत्य नाही.बदल आहे—पण बदलाच्या पलीकडेही एक स्थैर्य आहे.अशाश्वत आहे—पण त्याला आधार देणारं शाश्वतही आहे.आणि ही दृष्टी अर्जुनासाठी जशी आवश्यक होती, तशीच ती आपल्यासाठीही आहे.
जीवनाकडे साकल्याने पाहण्याची दृष्टी
आपल्या आयुष्यातही कित्येक वेळा आपण अर्जुनासारखेच होतो. कधी शरीराच्या प्रश्नाने अस्वस्थ होतो. कधी नातं तुटल्यामुळे. कधी संपत्ती गेल्यामुळे. कधी यश मिळालं नाही म्हणून.कधी आपल्या जवळची व्यक्ती बदलली म्हणून. कधी काळ बदलला म्हणून. या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. त्यांना नाकारणं योग्य नाही. पण त्या अशाश्वत आहेत, हे विसरलं की त्यांचं दुःख आपल्या अस्तित्वाचं अंतिम सत्य बनतं. गीता आपल्याला दुःख नाकारायला सांगत नाही. ती आपली दृष्टी अधिक व्यापक करायला सांगते.अशाश्वताला अशाश्वत म्हणून स्वीकारा.बदलाला बदल म्हणून स्वीकारा.शरीराची काळजी घ्या.नात्यांची जपणूक करा.कर्तव्य करा.यश मिळालं तर स्वीकारा.अपयश आलं तर त्यातून शिका.वियोग झाला तर दुःख अनुभवा.पण या सगळ्यांच्या पलीकडे आपल्या अस्तित्वामध्ये एक शाश्वत आयाम आहे, याची जाणीव ठेवा.
कारण मग जीवन तुकड्यांत राहत नाही.ते साकल्याने समोर येतं.
मी कोण आहे?
हीच जीवनाकडे साकल्याने पाहण्याची दृष्टी.
हीच अर्जुनाला श्रीकृष्णांनी दिलेली दृष्टी.
आणि हीच दृष्टी आजच्या माणसालाही तितकीच आवश्यक आहे.
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – ‘सांख्य योग’
भाग ४५
१० ऑगस्ट २०२६
आपली इकोसिस्टम आपल्याला घडवत असते...
क्षणभर स्वतःच्या आयुष्याकडे थोडं मागे वळून पाहूया.
आपण ज्या गोष्टी योग्य मानतो, ज्या गोष्टी चुकीच्या मानतो, संकटाच्या वेळी ज्या विचारांचा आधार घेतो, आनंदाच्या वेळी ज्या पद्धतीने आनंद व्यक्त करतो, माणसांकडे ज्या नजरेने पाहतो, मृत्यूकडे ज्या दृष्टीने पाहतो—हे सगळं अचानक तयार झालेलं असतं का?
नाही.
आपल्या मनाची एक मनोवृत्ती बनत असते. तसेच समाजाचीही एक मनोवृत्ती बनत असते. समाजाच्या काही धारणा तयार होत असतात. आणि त्या धारणा तयार होण्यासाठी अनेक वर्षे लागतात.
आधुनिक भाषेत याला ‘इकोसिस्टम’ असं म्हणतात. व्यक्तीच्या संदर्भात ‘बिलीफ सिस्टीम’ हा शब्दही आज खूप प्रचलित आहे.
पण ही इकोसिस्टम किंवा बिलीफ सिस्टीम एका दिवसात तयार होत नाही.
ती अनेक अनुभवांचं, विचारांचं, सुख-दुःखांचं, यश-अपयशांचं आणि चिंतनाचं संचित असतं.
आपल्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतात. एखाद्या संकटातून बाहेर पडताना आपण एखाद्या विचाराचा आधार घेतो, एखाद्या व्यक्तीचा आधार घेतो, एखाद्या मूल्याचा आधार घेतो किंवा एखाद्या तत्त्वज्ञानाचा आधार घेतो.
तो आधार हळूहळू आपल्या मनाचा भाग बनतो.
तसंच आनंदाच्या क्षणांतही काही विचार आपल्या मनात रुजतात. एखादं सुंदर नातं, एखादी प्रेरणादायी व्यक्ती, एखादं यश, एखादा अविस्मरणीय अनुभव—हे सगळं आपल्या विचारविश्वावर काही ना काही परिणाम करत असतं.
दुःख आणि सुख, संकट आणि आनंद, अनुभव आणि चिंतन—या सगळ्यांतून आपली बिलीफ सिस्टीम तयार होत जाते.
नवीन प्रसंग येतात.
नवीन दाखले समोर येतात.
नवीन विचार जन्म घेतात.
आणि हे सगळं आपल्या मनात साठत राहतं.
अशी ही इकोसिस्टम—
हळूहळू, हळूहळू आणि पुन्हा हळूहळू—घडत जाते.
नंतर ती केवळ आपल्या मनापुरती राहत नाही.
ती साहित्यात येते.
वाङ्मयात येते.
कवितांमध्ये येते.
कादंबऱ्यांमध्ये येते.
कथांमध्ये येते.
चित्रपटांमध्ये येते.
आणि अगदी चित्रपटांच्या गाण्यांमधूनही व्यक्त होते.
एका समाजाची विचारसरणी अशा प्रकारे अनेक पिढ्यांच्या अनुभवातून आणि चिंतनातून घडत जाते.
________________________________________
आपल्याला कोणता समाज घडवायचा आहे?
आपल्या अवतीभवतीचा निसर्ग कसा असावा, हे आपण ठरवू शकत नाही.
डोंगर असावेत की समुद्रकिनारा?
हिरवळ असावी की वाळवंट?
हिमाच्छादित प्रदेश असावा की उष्ण प्रदेश?
हे निसर्ग ठरवतो.
पण आपल्या अवतीभवतीची माणसं कशी असावीत, याचा विचार आपण नक्की करू शकतो.
ती कशी विचार करणारी असावीत?
संकट आलं तर त्यांनी कसा विचार करावा?
आनंद मिळाला तर तो कसा जगावा?
अवघड प्रसंगी त्यांनी एकमेकांना कशी मदत करावी?
एकमेकांसोबत जगताना कुठल्या गोष्टींमध्ये तडजोड करावी आणि कुठल्या गोष्टींबाबत ठाम राहावं?
जीवनाकडे पाहण्याचं त्यांचं शाश्वत तत्त्वज्ञान काय असावं?
हे प्रश्न केवळ व्यक्तीचे नाहीत.
हे एका समाजाच्या भवितव्याचे प्रश्न आहेत.
आणि म्हणूनच एखादा समाज समृद्ध व्हायचा असेल, तर त्याची इकोसिस्टम आणि बिलीफ सिस्टीम समृद्ध असणं आवश्यक आहे.
________________________________________
अनुभवाबरोबर अभ्यासही हवा
ही समृद्धी केवळ अनुभवातून येत नाही.
अनुभव महत्त्वाचा आहेच; पण अनुभवाला अर्थ देण्यासाठी अभ्यास आवश्यक आहे.
एखादा प्रसंग आपल्या आयुष्यात घडला म्हणून त्यातून आपोआप शहाणपण निर्माण होत नाही.
त्या अनुभवाकडे पुन्हा पाहावं लागतं.
त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो.
त्यातून काय शिकता येईल, याचा विचार करावा लागतो.
म्हणूनच चिंतनाची आणि अभ्यासाची अखंड परंपरा जिवंत ठेवणं आवश्यक आहे.
अनुभवातून ज्ञान मिळतं.
अभ्यासातून त्या ज्ञानाला दिशा मिळते.
आणि चिंतनातून त्या ज्ञानाचं जीवनमूल्य तयार होतं.
अशा प्रक्रियेतून एक समृद्ध समाज निर्माण होतो—ज्याला केवळ इतिहास नसतो, तर समृद्ध वैचारिक वारसाही असतो.
________________________________________
भगवद्गीता : एका शाश्वत विचाराची इकोसिस्टम
भगवद्गीतेतील शरीराची नश्वरता आणि आत्म्याची शाश्वतता हा आपल्या भारतीय विचारविश्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
अर्जुनाला श्रीकृष्ण हा विचार सांगत आहेत.
पण हा विचार त्या क्षणी निर्माण झालेला नाही.
त्याच्या मागे कितीतरी वर्षांची ज्ञानपरंपरा आहे.
पिढ्यान्पिढ्या चालत आलेलं चिंतन आहे.
अनुभव आहे.
अभ्यास आहे.
तत्त्वज्ञान आहे.
आणि पुढेही हे ज्ञान अनेक पिढ्यांपर्यंत प्रवास करत राहणार आहे.
मूळ ज्ञानामध्ये फारसा फरक पडणार नाही; पण ते समजून सांगण्याची भाषा आणि पद्धत मात्र काळानुसार बदलत जाईल.
कारण—
सत्य शाश्वत असतं; पण माणसाची समज बदलत असते.
म्हणूनच चिरंतन सत्य आपल्या काळाच्या भाषेत समजून घेणं आणि ते आपल्या विचारविश्वाचा भाग बनवणं आवश्यक आहे.
________________________________________
अर्जुनाच्या मनातला प्रश्न
श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याच्या शाश्वत स्वरूपाचं तत्त्वज्ञान सांगतात.
शरीर नश्वर आहे.
शरीराचा जन्म होतो आणि शरीराचा मृत्यू होतो.
पण आत्मा नष्ट होत नाही.
शरीराला मारता येतं; आत्म्याला मारता येत नाही.
हा विचार श्रीकृष्ण स्पष्टपणे अर्जुनासमोर ठेवतात.
पण अर्जुनाच्या मनातला विषाद एका क्षणात नाहीसा होत नाही.
कारण एखादं तत्त्वज्ञान ऐकणं आणि ते अंतःकरणाने स्वीकारणं यात फरक असतो.
अर्जुन प्रश्न करतो.
प्रतिवाद करतो.
स्वतःच्या भूमिकेचा विचार करतो.
आणि इथे श्रीकृष्णांची संवादपद्धती आपल्याला विशेष महत्त्वाची वाटते.
ते केवळ एक महान तत्त्वज्ञान सांगून थांबत नाहीत.
ते अर्जुनाच्या मनाच्या पातळीवर उतरतात.
अर्जुन काय विचार करतो आहे, त्याची अडचण कुठे आहे, त्याचा प्रश्न नेमका काय आहे—हे समजून घेऊन ते त्याला उत्तर देतात.
आणि म्हणूनच पुढचा श्लोक येतो—
“अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम्।
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि॥”
श्रीकृष्ण म्हणतात—
“हे महाबाहो अर्जुना, जर तू या आत्म्याला नेहमी जन्म घेणारा आणि नेहमी मरणारा असे मानत असशील, तरीदेखील तू अशा प्रकारे शोक करणे योग्य नाही.”
________________________________________
“महाबाहो” — केवळ संबोधन नाही
इथे श्रीकृष्ण अर्जुनाला ‘महाबाहो’ असं संबोधतात.
‘बाहू’ हे आपल्या शौर्याचं, सामर्थ्याचं आणि कर्तृत्वाचं प्रतीक मानलं जातं.
‘महाबाहो’ म्हणजे प्रचंड सामर्थ्यवान बाहू असलेला.
पण कृष्ण केवळ अर्जुनाच्या शारीरिक सामर्थ्याची आठवण करून देत आहेत का?
कदाचित त्यापेक्षा अधिक काहीतरी सांगत आहेत.
जणू ते म्हणत आहेत—
“अर्जुना, तू इतका सामर्थ्यवान आहेस. मग या परिस्थितीसमोर इतका खचून का जात आहेस?”
________________________________________
कृष्ण अर्जुनाच्या गृहीतकापासूनच विचार सुरू करतात
आता कृष्ण आणखी एक वेगळी भूमिका घेतात.
ते म्हणतात—
समजा, अर्जुना, तुला माझं आत्म्याच्या अमरत्वाचं तत्त्वज्ञान मान्य नाही.
समजा तू आत्म्याला जन्म घेणारा आणि मरणारा मानतोस.
तर जन्माला आलेल्या प्रत्येक गोष्टीचा मृत्यू निश्चित आहे, हेही तुला मान्य करावंच लागेल.
मग जी गोष्ट जन्मते आणि मरते, ती नश्वर आहे.
क्षणभंगुर आहे.
मग अशा नश्वर गोष्टीसाठी इतका शोक करण्यात काय अर्थ आहे?
हा युक्तिवाद अत्यंत महत्त्वाचा आहे.
कारण कृष्ण अर्जुनावर आपलं तत्त्वज्ञान लादत नाहीत.
ते असं म्हणत नाहीत—
“मी सांगतो ते मान्य कर.”
ते म्हणतात—
“तू जे मानतोस, त्याच्यापासूनच आपण पुढचा विचार करूया.”
हीच कृष्णाच्या संवादकौशल्याची विलक्षण ताकद आहे.
________________________________________
तत्त्वज्ञान सांगण्यापेक्षा माणूस समजून घेणं महत्त्वाचं
श्रीकृष्ण एकाच वेळी दोन भूमिका निभावत आहेत.
एकीकडे ते शाश्वत तत्त्वज्ञान सांगत आहेत.
आणि दुसरीकडे ते समोरच्या माणसाची मानसिक अवस्था समजून घेत आहेत.
अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला विषाद केवळ एका वाक्याने दूर होणार नाही, हे कृष्णांना माहीत आहे.
म्हणून ते वेगवेगळ्या वैचारिक प्रक्रिया वापरतात.
कधी तत्त्वज्ञान सांगतात.
कधी तर्क करतात.
कधी अर्जुनाला त्याच्या कर्तृत्वाची जाणीव करून देतात.
कधी त्याच्याच गृहीतकांमधून पुढचा निष्कर्ष काढतात.
कारण अंतिम उद्देश एकच आहे—
अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला विषाद मुळापासून दूर करणे.
आणि म्हणूनच हा श्लोक आपल्याला केवळ आत्म्याच्या स्वरूपाबद्दल सांगत नाही.
तो आपल्याला माणसाशी संवाद कसा साधावा, हेही शिकवतो.
समोरच्याला सत्य सांगणं महत्त्वाचं आहेच.
पण त्याहून महत्त्वाचं आहे—
समोरचा माणूस त्या सत्यापर्यंत पोहोचू शकेल अशा पद्धतीने त्याच्याशी संवाद साधणं.
________________________________________
आपली बिलीफ सिस्टीम आणि भगवद्गीता
आज आपण इकोसिस्टम, बिलीफ सिस्टीम, माइंडसेट, काउन्सिलिंग अशा आधुनिक संज्ञा वापरतो.
पण माणसाचे मूलभूत प्रश्न हजारो वर्षांपूर्वीही तेच होते.
मी कोण आहे?
माझं शरीर आणि माझं अस्तित्व यांचं नातं काय?
संकट आलं तर मी कसा उभा राहू?
दुःखाला कसं सामोरं जाऊ?
मृत्यूकडे कसं पाहू?
आणि जीवनाचा अर्थ काय?
कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या मनात हेच प्रश्न उभे राहिले होते.
आणि म्हणूनच हजारो वर्षांनंतरही श्रीकृष्णाचा संवाद आपल्याशी जोडला जातो.
कारण काळ बदलतो.
भाषा बदलते.
परिस्थिती बदलते.
पण माणसाच्या अंतर्मनातील काही प्रश्न शाश्वत असतात.
आणि त्या शाश्वत प्रश्नांना उत्तर देणाऱ्या विचारांची परंपरा हीच आपल्या समाजाची खरी वैचारिक इकोसिस्टम असते.
________________________________________
आजचा विचार...
आपली बिलीफ सिस्टीम कुठून आली आहे?
आपण ज्या गोष्टी आज अगदी ठामपणे मानतो, त्या आपण स्वतः विचार करून स्वीकारल्या आहेत का?
की त्या आपल्या कुटुंबाकडून, समाजाकडून, संस्कृतीकडून, अनुभवातून किंवा परिस्थितीतून आपल्यात आल्या आहेत?
हा प्रश्न स्वतःला एकदा विचारून पाहूया.
कारण आपल्या मनात काय आहे, हे समजून घेणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते तिथे आलं कुठून, हे समजून घेणंही महत्त्वाचं आहे.
आपल्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव आपल्याला घडवत असतो.
पण त्या अनुभवाचा अर्थ आपण कसा लावतो, यावर आपलं पुढचं आयुष्य घडत असतं.
म्हणून अनुभव घ्या.
अभ्यास करा.
चिंतन करा.
आणि आपल्या मनात तयार होणाऱ्या इकोसिस्टमकडे जाणीवपूर्वक पाहा.
कारण शेवटी—
आपण ज्या विचारविश्वात जगतो, तेच विचारविश्व आपल्याला घडवत असतं.
आणि जेव्हा भगवद्गीतेसारखं शाश्वत तत्त्वज्ञान आपल्या या विचारविश्वाचा भाग बनतं, तेव्हा संकटं कदाचित नाहीशी होत नाहीत...
पण संकटांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
दुःख संपत नाही...
पण दुःखाचा अर्थ बदलतो.
मृत्यू टळत नाही...
पण मृत्यूकडे पाहण्याची भीती बदलते.
आणि जीवन बदलत नाही...
पण—
जीवन जगणारा माणूस मात्र बदलतो.
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – ‘सांख्य योग’
भाग ४६
११ ऑगस्ट २०२६
जे अटळ आहे, त्याच्याशी युद्ध का करायचं?
कुरुक्षेत्रावर अर्जुन उभा आहे.
समोर आपलीच माणसं आहेत.
गुरु आहेत. बंधू आहेत. आप्त आहेत.
ज्यांच्यासोबत आयुष्याचा एक मोठा भाग जोडलेला आहे, त्यांच्याविरुद्ध शस्त्र उचलायचं आहे.
अर्जुनाच्या हातातून गांडीव गळून पडलं आहे.
तो लढण्यास नकार देतो आहे.
पण एक गोष्ट इथे अतिशय बारकाईने समजून घ्यायला हवी.
अर्जुनाला लढण्याची भीती नाही.
अर्जुनाला मारण्याची भीती आहे.
आणि त्याहूनही अधिक—‘मी मारणारा आहे’ या भावनेची भीती आहे.
‘माझ्या हातून माझीच माणसं मरतील.’
‘त्यांच्या मृत्यूला मी कारणीभूत ठरेन.’
‘मी हे पाप कसं करू?’
या विचारांनी अर्जुनाच्या मनाचा ताबा घेतला आहे.
आणि म्हणून तो गोठतो.
पळून जाण्याचा विचार करतो.
संन्यास घ्यावा असं म्हणतो.
म्हणजेच वर्तमानातील आपलं कर्तव्य करण्याऐवजी मन त्याला Flight Mode मध्ये घेऊन जातं.
कधी प्रश्न विचारतो.
कधी कृष्णाशी वाद घालतो.
कधी स्वतःच्या भावनांमध्ये हरवतो.
आणि अशा वेळी श्रीकृष्ण काय करतात?
सुरुवातीला ते त्याला अत्यंत थेटपणे Confront करतात.
कुठलीही गोड भाषा नाही.
कुठलाही भावनिक लाड नाही.
“क्लैब्यं मा स्म गमः पार्थ…”
अरे पार्थ, ही नपुंसकता कुठून आली?
ज्याच्या हातात गांडीव आहे, जो योद्धा आहे, ज्याने आयुष्यभर धर्मासाठी संघर्ष केला आहे, तो आज असा खचून का गेला?
आणि त्यानंतर श्रीकृष्ण थेट मृत्यूच्या प्रश्नाला हात घालतात.
“अशोच्यानन्वशोचस्त्वं…”
ज्यांच्यासाठी शोक करण्याची गरज नाही, त्यांच्यासाठी तू शोक करतो आहेस.
आणि मग आत्म्याचं तत्त्वज्ञान समोर ठेवतात.
शरीर नश्वर आहे.
आत्मा नित्य आहे.
शरीराचा मृत्यू होतो.
आत्म्याचा होत नाही.
“नैनं छिन्दन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावकः…”
शस्त्र आत्म्याला छेदू शकत नाही.
अग्नी त्याला जाळू शकत नाही.
पाणी त्याला भिजवू शकत नाही.
वारा त्याला वाळवू शकत नाही.
श्रीकृष्ण अर्जुनाला मृत्यूच्या पलीकडचं सत्य समजावून सांगतात.
आणि हे सगळं सांगून झाल्यावर आता ते एका वेगळ्या पातळीवर येतात.
कारण अर्जुनाच्या मनातला प्रश्न फक्त ‘मृत्यू म्हणजे काय?’ हा नाही.
त्याच्या मनात दुसरा प्रश्न आहे—
‘माझ्या हातून मृत्यू झाला तर?’
इथे अर्जुनाच्या अज्ञानाबरोबरच त्याच्या अहंकारावरही काम सुरू होतं.
‘मी मरणारा आहे.’
‘मी मारणारा आहे.’
‘मी मृत्यूला कारणीभूत होणार आहे.’
या ‘मी’च्या भोवती अर्जुनाचा सगळा संघर्ष उभा आहे.
आणि म्हणून श्रीकृष्ण म्हणतात—
**जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि।।**
जन्मलेल्या प्रत्येकाचा मृत्यू निश्चित आहे आणि मृत्यूनंतर जन्मही निश्चित आहे. म्हणून जे अपरिहार्य आहे, अटळ आहे, त्याचा तू शोक करू नकोस.
हा श्लोक ऐकायला अतिशय साधा आहे.
आपल्याला ही गोष्ट माहीत आहे.
लहान मुलालाही माहीत आहे—
जो जन्माला आला आहे तो एक दिवस जाणार.
मग श्रीकृष्णांना अर्जुनाला हीच गोष्ट पुन्हा सांगण्याची गरज काय?
आणि तीही अर्जुनासारख्या महान योद्ध्याला?
अर्जुनाला हे माहीतच नसेल का?
नक्कीच माहीत असेल.
पण इथेच भगवद्गीतेचा एक अत्यंत सूक्ष्म आणि जीवन बदलून टाकणारा मुद्दा समोर येतो—
माहित असणं आणि स्वीकारलेलं असणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.
आपल्याला मृत्यू माहीत आहे.
पण मृत्यू स्वीकारलेला आहे का?
आपल्याला बदल माहीत आहे.
पण बदल स्वीकारलेला आहे का?
आपल्याला माहीत आहे की भूतकाळ बदलता येत नाही.
पण आपण किती वेळा भूतकाळात परत परत जातो?
एखादी गोष्ट घडून गेली आहे.
तरी मन म्हणत राहतं—
‘असं झालं नसतं तर…’
‘मी तेव्हा तसं केलं असतं तर…’
‘त्याने असं केलं नसतं तर…’
वास्तव बदललेलं नसतं.
पण त्या वास्तवाशी असलेला आपला संघर्ष मात्र वाढत जातो.
आणि त्या संघर्षातून दुःख निर्माण होतं.
________________________________________
मृत्यू एकच असतो; पण शोक वेगळा असतो
दररोज जगात हजारो, लाखो लोक मृत्यू पावतात.
त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून आपल्याला वाईट वाटतं.
पण आपण कोसळून जात नाही.
मग आपल्या आईचा मृत्यू झाला तर?
वडील गेले तर?
भाऊ किंवा बहीण गेली तर?
जिवलग मित्र गेला तर?
तेव्हा आपण आतून हादरतो.
मृत्यू तर तोच आहे.
मग फरक कुठे आहे?
फरक आहे नात्यात.
आपली आई गेली म्हणजे फक्त तिचं शरीर गेलं असं नसतं.
तिच्यासोबतच्या असंख्य आठवणींचा एक जिवंत आधार तुटतो.
तिचा आवाज ऐकू येणार नाही.
तिचा हात डोक्यावर जाणवणार नाही.
आपण घरी गेल्यावर ‘आलास का?’ असं विचारणारं कुणीतरी नसेल.
आपल्या आयुष्यातील एका नात्याचा आधार नाहीसा होतो.
एक सवय संपते.
एक भावविश्व तुटतं.
आणि म्हणून शोक होतो.
गीता हा शोक नाकारत नाही.
गीता माणसाच्या भावनांची खिल्ली उडवत नाही.
ती असं म्हणत नाही—
‘रडू नकोस.’
‘दुःखी होऊ नकोस.’
‘तुला वाईट वाटता कामा नये.’
नाही.
दुःख येणारच.
प्रिय व्यक्ती गेल्यावर डोळ्यांत पाणी येणारच.
आठवणी येणारच.
मन भरून येणारच.
हे मानवी आहे.
पण प्रश्न हा आहे—
त्या दुःखाने आपल्याला वाहून न्यायचं का?
अर्जुनाच्या बाबतीत हेच घडतंय.
तो फक्त दुःख अनुभवत नाही.
तो दुःखाच्या प्रवाहात वाहून चालला आहे.
त्याची बुद्धी गोठली आहे.
कर्तव्याची जाणीव धूसर झाली आहे.
पळून जाण्याची इच्छा निर्माण झाली आहे.
म्हणून कृष्णाचा प्रश्न भावनांविरुद्ध नाही.
तो भावनांच्या गुलामगिरीविरुद्ध आहे.
________________________________________
स्वीकार म्हणजे पराभव नाही
‘Acceptance’ हा शब्द अध्यात्माच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे.
स्वीकार म्हणजे—
‘आता काहीच करायचं नाही.’
असं नाही.
स्वीकार म्हणजे—
‘जे बदलता येत नाही, त्याच्याशी माझं युद्ध आता थांबवतो.’
मृत्यू झाल्यावर मृत्यू उलटवता येत नाही.
गेलेला काळ परत आणता येत नाही.
घडलेली घटना पुसता येत नाही.
दुसऱ्याच्या मनावर पूर्ण नियंत्रण ठेवता येत नाही.
निसर्गाचे नियम आपल्या इच्छेनुसार बदलता येत नाहीत.
मग त्या अशक्य गोष्टींशी सतत संघर्ष करून आपली ऊर्जा का जाळायची?
स्वीकार म्हणजे हात टेकणे नाही.
स्वीकार म्हणजे वास्तवाशी युद्ध थांबवणे.
आणि त्यानंतरच खरी कृती सुरू होते.
________________________________________
स्वीकार ही पुढच्या कर्माची सुरुवात आहे
मृत्यू निश्चित आहे—म्हणून जीवन व्यर्थ होत नाही.
उलट जीवन अधिक मौल्यवान होतं.
कारण आपल्याकडे अमर्याद वेळ नाही.
म्हणून ज्यांच्यावर प्रेम आहे, त्यांना आजच सांगावं—
‘माझं तुझ्यावर प्रेम आहे.’
ज्यांच्याशी गैरसमज आहे, तिथे संवाद आजच साधावा.
कुणाचे आभार मानायचे आहेत तर उद्यावर ढकलू नयेत.
कुणासाठी काही चांगलं करायचं आहे तर ‘योग्य वेळ येऊ दे’ म्हणत बसू नये.
कारण—
उद्याची खात्री कोण देणार?
मृत्यू निश्चित आहे.
पण मृत्यूपर्यंत आपण कसं जगणार आहोत, हे काही अंशी आपल्या हातात आहे.
________________________________________
गीता आपल्याला भावनाशून्य करत नाही
कधी कधी ‘न त्वं शोचितुमर्हसि’ ऐकल्यावर प्रश्न पडतो—
गीता आपल्याला दुःख करू नकोस, रडू नकोस, भावना ठेवू नकोस असं सांगते का?
अजिबात नाही.
गीता आपल्याला भावनाशून्य बनवत नाही.
ती आपल्याला भावनांचे स्वामी बनवते.
भावना अनुभवायची.
पण भावनेने आपल्याला चालवायचं नाही.
दुःख अनुभवायचं.
पण दुःखाच्या नावाखाली कर्तव्यापासून पळायचं नाही.
डोळ्यात पाणी येऊ द्यायचं.
पण त्या पाण्यामुळे आपल्या विवेकाची दृष्टी धूसर होऊ द्यायची नाही.
ही अतिशय सूक्ष्म गोष्ट आहे.
भावना असणं ही कमजोरी नाही.
भावनेच्या ताब्यात जाणं ही कमजोरी आहे.
________________________________________
भगवद्गीतेची शिकवण्याची पद्धतही विलक्षण आहे
इथे आणखी एक प्रश्न पडतो.
आपण नेहमी शिकतो—
सोप्याकडून अवघडाकडे जा.
मूर्ताकडून अमूर्ताकडे जा.
परिचिताकडून अपरिचिताकडे जा.
मग श्रीकृष्णांनी अर्जुनाला सुरुवातीलाच आत्म्याचं एवढं अवघड तत्त्वज्ञान का सांगितलं?
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि…’
‘न जायते म्रियते वा कदाचित्…’
हे तर अत्यंत सूक्ष्म तत्त्वज्ञान!
मग सोप्या उदाहरणापासून सुरुवात का नाही केली?
कारण भगवद्गीता ही केवळ शिक्षणशास्त्र नाही; ती अध्यात्मशास्त्र आहे.
अध्यात्माचा प्रश्न मुळाशी जातो.
तो विचारतो—
‘तू नेमका कोण आहेस?’
‘मी’ची व्याख्या चुकीची असेल तर संपूर्ण जीवनाचं गणित चुकीचं होऊ शकतं.
गणितात आधी बेरीज-वजाबाकी, मग गुणाकार-भागाकार आणि नंतर अवघड समीकरणं येतात.
पण जीवनाचं गणित वेगळं आहे.
इथे आधी मूळ समजून घ्यायचं.
मुळं समजली की फांद्या समजायला सोप्या जातात.
आपण कोण आहोत, शरीर म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, नश्वर काय आणि शाश्वत काय—हे समजलं की मग कर्म, कर्तव्य, यश, अपयश, नाती, सुख-दुःख या सगळ्यांकडे पाहण्याची दृष्टी बदलते.
म्हणून गीतेत एक अर्थाने अमूर्ताकडून मूर्ताकडे प्रवास आहे.
आधी शाश्वत सत्य.
नंतर त्या सत्याच्या प्रकाशात दैनंदिन जीवन.
________________________________________
कृष्णाचा उद्देश काय आहे?
श्रीकृष्णाला अर्जुनाला कर्मशून्य करायचं नाही.
उलट—
कर्मशून्य झालेल्या अर्जुनाला पुन्हा कर्मशील करायचं आहे.
कर्तव्यापासून पळणाऱ्या अर्जुनाला पुन्हा उभं करायचं आहे.
आणि केवळ कर्म करायला सांगायचं नाही—
उदात्त कार्यासाठी आपला देह, बुद्धी, शक्ती आणि जीवन खर्च करायला शिकवायचं आहे.
अर्जुनाचा प्रश्न ‘मी काय मिळवणार?’ हा नाही.
त्याचा प्रश्न आहे—
‘मी जे करणार आहे, त्याची किंमत काय आहे?’
आणि कृष्ण त्याला सांगतात—
जीवनात काही गोष्टी आपल्या हातात नसतात.
पण त्यांना प्रतिसाद कसा द्यायचा, हे आपल्या हातात असतं.
________________________________________
मग आपल्या हातात काय आहे?
खूप काही.
मृत्यू आपल्या हातात नाही.
पण मृत्यूपर्यंत कसं जगायचं, हे आपल्या हातात आहे.
भूतकाळ आपल्या हातात नाही.
पण त्यातून काय शिकायचं, हे आपल्या हातात आहे.
दुसरी माणसं आपल्या इच्छेनुसार वागतीलच असं नाही.
पण त्यांच्याशी आपण कसं वागायचं, हे आपल्या हातात आहे.
परिस्थिती आपल्या मनासारखी असेलच असं नाही.
पण त्या परिस्थितीत आपली वृत्ती कशी ठेवायची, हे आपल्या हातात आहे.
चूक झाली असेल तर ती सुधारण्याचा प्रयत्न आपल्या हातात आहे.
नातं तुटलं असेल तर संवाद साधण्याचा प्रयत्न आपल्या हातात आहे.
काम बिघडलं असेल तर पुन्हा प्रयत्न करणं आपल्या हातात आहे.
पण जे घडून गेलं आहे, त्याला सतत मनात बदलण्याचा प्रयत्न करणं आपल्या हातात नाही.
________________________________________
अटळ गोष्टींशी संघर्ष करू नका; शक्य गोष्टींसाठी पूर्ण ताकदीने उभे रहा
हा श्लोक आपल्याला निष्क्रिय करत नाही.
उलट तो आपल्याला ऊर्जा वाचवायला शिकवतो.
जिथे काहीच बदलता येणार नाही, तिथे संघर्ष थांबवा.
आणि—
जिथे तुमच्या हातात काहीतरी आहे, तिथे पूर्ण सामर्थ्याने उभे राहा.
हीच कदाचित या श्लोकाची आधुनिक भाषेतील सर्वात सुंदर मांडणी आहे—
जे आपल्या हातात नाही, ते स्वीकारा.
जे आपल्या हातात आहे, ते पूर्ण ताकदीने करा.
मृत्यू थांबवता येत नाही.
पण मृत्यूच्या आधीचं जीवन अर्थपूर्ण करता येतं.
भूतकाळ बदलता येत नाही.
पण वर्तमान बदलता येतं.
गेलेली व्यक्ती परत आणता येत नाही.
पण तिच्या स्मृतीतून प्रेम शिकता येतं.
झालेली चूक पुसता येत नाही.
पण त्यातून शहाणपण जन्माला घालता येतं.
आणि म्हणून—
**स्वीकार हा शेवट नाही.
स्वीकार ही पुढच्या कर्माची सुरुवात आहे.**
________________________________________
कुरुक्षेत्रावर श्रीकृष्ण अर्जुनाला मृत्यूची आठवण करून देत आहेत.
पण खरं तर ते अर्जुनाला जीवनाची आठवण करून देत आहेत.
‘मृत्यू अटळ आहे’ हे सांगून ते त्याला मृत्यूकडे नेत नाहीत.
ते त्याला पुन्हा जीवनाकडे,
कर्तव्याकडे,
कर्माकडे,
जबाबदारीकडे नेत आहेत.
कारण मृत्यू निश्चित असल्यामुळेच प्रत्येक क्षण मौल्यवान आहे.
वेळ मर्यादित असल्यामुळेच प्रत्येक क्षणाला अर्थ आहे.
उद्या मिळेलच याची खात्री नसल्यामुळेच आजचं प्रेम महत्त्वाचं आहे.
आजचं कर्तव्य महत्त्वाचं आहे.
आजचा निर्णय महत्त्वाचा आहे.
आजची कृती महत्त्वाची आहे.
म्हणून ‘जातस्य हि ध्रुवो मृत्युः…’ हा श्लोक केवळ मृत्यूचं तत्त्वज्ञान नाही.
तो स्वीकाराचं तत्त्वज्ञान आहे.
तो आपल्याला सांगतो—
जे अटळ आहे, त्याच्याशी युद्ध करू नका.
जे बदलता येत नाही, त्यात स्वतःला जाळू नका.
आणि जे आपल्या हातात आहे, त्यापासून पळू नका.
कारण—
**मृत्यू आपल्या हातात नाही;
पण मृत्यूपर्यंत आपण कसं जगायचं, हे आपल्या हातात आहे.**
आणि कदाचित म्हणूनच श्रीकृष्णाचा हा श्लोक आजही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला थेट भिडतो—
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि।।
जे अटळ आहे ते स्वीकारा.
मन स्थिर करा.
वास्तवाशी युद्ध थांबवा.
आणि मग—
पूर्ण सामर्थ्याने आपल्या कर्माच्या दिशेने पुढे चला.
कारण स्वीकारानंतरच खरी कृती सुरू होते.
अव्यक्तातून व्यक्त... आणि पुन्हा अव्यक्ताकडे!
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ४७
१२ ऑगस्ट २०२६
कुरुक्षेत्रावर अर्जुन उभा आहे. समोर त्याची माणसं आहेत. ज्यांच्याबरोबर तो वाढला, ज्यांच्याकडून शिकला, ज्यांच्यावर प्रेम केलं, ज्यांच्यासोबत आयुष्याचे कितीतरी क्षण जगला—तीच माणसं आज युद्धभूमीवर उभी आहेत. अर्जुनाला त्यांचा मृत्यू दिसतोय. आणि त्या मृत्यूच्या कल्पनेने त्याचं हृदय विदीर्ण झालंय. श्रीकृष्ण मात्र त्याला हळूहळू एका अशा सत्याकडे घेऊन चालले आहेत, जे केवळ मृत्यू समजून घेण्यासाठी नाही... तर संपूर्ण जीवन समजून घेण्यासाठी आहे.
आधी श्रीकृष्ण म्हणाले—“जातस्य हि ध्रुवो मृत्युः...” ज्याचा जन्म झाला आहे, त्याचा मृत्यू निश्चित आहे. पण आता ते आणखी एक पाऊल पुढे जातात. ते अर्जुनाला सांगतात— तू केवळ मृत्यूकडे पाहू नकोस. जीवनाच्या संपूर्ण प्रक्रियेकडे पाह.
आणि मग एक अद्भुत श्लोक समोर येतो—
“अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत। अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना॥”
अर्थात—
सर्व प्राणी सुरुवातीला अव्यक्त असतात. मधल्या अवस्थेत व्यक्त होतात आणि शेवटी पुन्हा अव्यक्त होतात. मग त्यासाठी शोक का करायचा?
हा श्लोक ऐकताना पहिल्यांदा आपल्याला वाटतं—हा जन्म आणि मृत्यूचा श्लोक आहे. पण थोडं खोलात गेलं की लक्षात येतं— हा तर आपल्या प्रत्येक दिवसाचा श्लोक आहे!
आपल्या आयुष्यात दररोज कितीतरी गोष्टी जन्म घेत असतात. काही विचार. काही स्वप्नं. काही नाती. काही कल्पना. काही योजना. काही संकल्प. काही भावना. काही इच्छा. सुरुवातीला यापैकी काहीच दिसत नाही. सगळं काही आपल्या आत चाललेलं असतं. मनात. बुद्धीत. कल्पनेत. चिंतनात.
हेच तर अव्यक्त!
आणि मग एक दिवस त्या अव्यक्ताला आकार येतो. विचार कृतीत उतरतो. स्वप्न प्रत्यक्षात येतं. नातं निर्माण होतं. एखादा कार्यक्रम उभा राहतो. एखादी संस्था जन्माला येते. एखादं घर बांधलं जातं. एखादं मूल जन्माला येतं. एखादं पुस्तक लिहिलं जातं. एखादी चळवळ सुरू होते. जे आतापर्यंत कुणालाच दिसत नव्हतं— ते अचानक सगळ्यांच्या डोळ्यांसमोर उभं राहतं.
हा असतो—व्यक्त! पण...
कहाणी इथे संपत नाही.
कारण जे व्यक्त झालं आहे, ते कायम व्यक्त राहणार नाही. हळूहळू त्याचा काळ संपतो. कार्यक्रम संपतो. उपक्रम संपतो. नात्याचं स्वरूप बदलतं. माणसं दूर जातात. शरीर वृद्ध होतं. मुलं मोठी होतात. घर रिकामं होतं. आठवणी धूसर होतात. आणि एक दिवस— जे कालपर्यंत आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतं, ते स्मृती बनतं.
पुन्हा...
अव्यक्त!
जन्म... विकास... अनुभव... विराम... आणि विलय. पुन्हा जन्म. पुन्हा विकास. पुन्हा अनुभव. पुन्हा विलय. ही केवळ माणसांची गोष्ट नाही. ही सृष्टीची लय आहे. बीज अव्यक्त असतं. त्यातून अंकुर व्यक्त होतो. अंकुर वृक्ष होतो. वृक्ष फुलतो. फळ देतो. आणि एक दिवस तो वृक्षही नष्ट होतो. पण त्याच्या फळातून पुन्हा बीज जन्माला येतं.
म्हणजे—
अव्यक्तातून व्यक्त... आणि व्यक्तातून पुन्हा अव्यक्त!
सृष्टीचा हा खेळ अनादिकाळापासून सुरू आहे.
लहानपणी आपल्या मनात एखादं स्वप्न जन्म घेतं. कदाचित कुणीतरी आपल्याला प्रेरणा दिलेली असते. कुणीतरी एखादी गोष्ट सांगितलेली असते. कुणाचं तरी जीवन आपल्याला भावलेलं असतं. परिस्थितीने आपल्या मनात एखादं बीज पेरलेलं असतं. आणि मग आपण मनात म्हणतो— “मला हे करायचं आहे.”
अजून काहीच झालेलं नसतं. पण मनात एक जग उभं राहतं. आपण त्याचा विचार करतो. चिंतन करतो. कल्पना करतो. भविष्यातील चित्र रंगवतो. हळूहळू त्या स्वप्नाला आकार येतो. एक दिवस त्याचा रोडमॅप तयार होतो. ब्लूप्रिंट तयार होते. आणि मग आपण प्रत्यक्ष कामाला लागतो.
माणसं भेटतात. संबंध तयार होतात. प्रयत्न सुरू होतात. अडचणी येतात. अपयश येतं. पुन्हा प्रयत्न होतात. आणि मग एक दिवस—आपण आपल्या डोळ्यांसमोर आपलं स्वप्न उभं राहिलेलं पाहतो!
तो क्षण किती विलक्षण असतो! ज्या गोष्टीचं अस्तित्व कालपर्यंत फक्त आपल्या मनात होतं...
आज त्याला स्पर्श करता येतो. त्याला पाहता येतं. इतरांनाही ते अनुभवता येतं. आणि आपण म्हणतो— “हे खरंच घडलं!”
हा व्यक्त अवस्थेचा परमोच्च क्षण असतो.
कारण आपली खरी अडचण इथेच सुरू होते. आपल्याला व्यक्त अवस्था इतकी सुंदर वाटते की आपण तिला कायमची बनवू पाहतो. मुलं मोठी होऊ नयेत असं वाटतं. आई-वडील कधीही जाऊ नयेत असं वाटतं. जिवलग मित्र कधीही दूर जाऊ नये असं वाटतं. सुंदर नातं कधीही बदलू नये असं वाटतं. एखादा सुवर्णकाळ कधीही संपू नये असं वाटतं. एखादा सुंदर कार्यक्रम संपला की मन म्हणतं— “हे पुन्हा पुन्हा असंच घडत राहावं...”
पण जीवन म्हणतं—“नाही!”
कारण जीवन स्थिर नाही. जीवन प्रवाह आहे. आणि प्रवाहाचा धर्मच आहे— वाहत राहणं!
काल आपण एखाद्या कार्यक्रमात होतो. लोक होते. गोंधळ होता. हशा होता. आनंद होता. टाळ्या होत्या. आपण सगळ्यांसोबत होतो. आज? कार्यक्रम संपला. मंडप उतरला. लोक आपापल्या घरी गेले. काही फोटो उरले. काही व्हिडिओ उरले. काही आठवणी उरल्या. आणि आपण म्हणतो— “काय सुंदर दिवस होता!”
लक्षात आलं? काल अनुभव होता. आज स्मृती आहे. काल व्यक्त होतं. आज पुन्हा अव्यक्ताच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे.
ही गोष्ट खूप खोलवर समजून घ्यायला हवी. आपण भूतकाळ बदलू शकत नाही. भविष्य आपल्या पूर्ण नियंत्रणात नाही. आपल्या हातात काय आहे?
हा क्षण. हा व्यक्त क्षण. म्हणून जो क्षण आपल्यासमोर आहे— तो पूर्णपणे जगा!
माणूस समोर आहे? त्याच्याशी प्रेमाने बोला. मुलं जवळ आहेत? त्यांच्यासोबत खेळा. मित्र भेटला आहे? भरभरून गप्पा मारा. काम समोर आहे? पूर्ण मनाने करा. स्वप्न साकार होत आहे? त्याचा आनंद घ्या.
कारण हा क्षण पुन्हा याच रूपात येणार नाही. पण त्याच वेळी— हा क्षण कायम राहणार नाही, हेही विसरू नका.
ही दोन्ही सत्यं एकाच वेळी स्वीकारणं म्हणजे गीता समजणं.
अर्जुनाला समोरचा व्यक्त क्षण दिसत होता. भीष्म दिसत होते. द्रोण दिसत होते. कौरव दिसत होते. आप्त दिसत होते. त्याला त्यांचा मृत्यू दिसत होता. पण श्रीकृष्ण त्याला सांगत आहेत—“अर्जुना, तू फक्त या एका क्षणाला अंतिम सत्य समजतो आहेस.”
ज्यांना तू आज पाहतो आहेस—ते याआधी कुठे होते? अव्यक्त. आणि पुढे कुठे जाणार? अव्यक्त. मग तू या मधल्या एका टप्प्यालाच पूर्ण सत्य का मानतोस? तू व्यक्त अवस्थेला धरून बसला आहेस. आणि म्हणून शोक करतो आहेस.
एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर जाते. आपण म्हणतो— “हे माझ्यासोबतच का झालं?” पण ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येण्यापूर्वी काय होती? अव्यक्त. आपल्या आयुष्यात आली—व्यक्त. काही काळ आपल्याबरोबर राहिली. अनुभव दिला. आठवणी दिल्या. आणि निघून गेली. पुन्हा—अव्यक्त. मग त्या व्यक्तीच्या येण्याबद्दल आपण आनंद मानतो आणि जाण्याबद्दल शोक करतो—पण श्रीकृष्ण म्हणतात— दोन्ही एकाच प्रक्रियेचे भाग आहेत!
हा फरक अत्यंत महत्त्वाचा आहे. गीता म्हणत नाही—प्रेम करू नका. गीता म्हणत नाही—नाती तोडा. गीता म्हणत नाही—आनंद घेऊ नका. गीता म्हणते— आनंद घ्या, पण मालकी गाजवू नका.
प्रेम करा, पण व्यक्तीला पकडून ठेवू नका. निर्माण करा, पण निर्मितीला स्वतःचं अंतिम अस्तित्व समजू नका. यश मिळवा, पण यशाशी स्वतःची ओळख बांधून ठेवू नका. कारण— जे व्यक्त झालं आहे, ते एक दिवस अव्यक्त होणारच.
________________________________________
चिंतन → अनुभव → समर्पण
म्हणून प्रत्येक गोष्टीची एक सुंदर त्रयी आहे.
चिंतन
काहीतरी मनात जन्म घेतं. आपण विचार करतो. अभ्यास करतो. नियोजन करतो. स्वप्न पाहतो.
अनुभव
ते प्रत्यक्षात आणतो. कष्ट करतो. अपयश स्वीकारतो. यश अनुभवतो. आनंद घेतो. रसास्वाद घेतो.
समर्पण
आणि शेवटी...सोडून देतो.
कृतज्ञतेने. शांतपणे. हसत. कारण आपल्याला माहीत असतं— हेही जाणार आहे.
एखादी गोष्ट संपली म्हणून दुःखी न होणं म्हणजे समर्पण नाही. तर— ती आपल्या आयुष्यात आली याबद्दल कृतज्ञ असणं आणि ती निघून गेली तरी तिच्यावर मालकीचा दावा न करणं म्हणजे समर्पण.
________________________________________
श्रीकृष्ण अर्जुनाला केवळ युद्ध शिकवत नाहीत...
ते त्याला जीवनाची दृष्टी देत आहेत. कारण पुढे अर्जुनाला केवळ युद्ध करायचं नाही. त्याला एका जुन्या व्यवस्थेच्या समाप्तीनंतर नवी व्यवस्था उभी करायची आहे. आणि नवीन व्यवस्था केवळ भावनेच्या भरात उभी राहत नाही. त्यासाठी विचार हवा. चिंतन हवं. अभ्यास हवा. मनन हवं. निदिध्यास हवा. ज्ञान हवं. ज्ञानाधिष्ठित कर्म हवं. उगाच एखादी कल्पना आली...मनात स्फूर्ती झाली...आणि आपण कामाला लागलो...अशा रचना फार काळ टिकत नाहीत. पण ज्या रचनेच्या मुळाशी खोल चिंतन आहे, जिच्यामागे अभ्यास आहे, जिच्यामागे मूल्यांची स्पष्टता आहे, जी अनुभवातून परिपक्व झाली आहे—ती अधिक भक्कम असते. आणि गंमत म्हणजे अशी रचना उभी करणारा मनुष्य तिचं समर्पणही अधिक सहज करू शकतो.
कारण त्याला माहीत असतं— रचना माझी नाही; मी तिच्या प्रक्रियेचा एक निमित्तमात्र भाग आहे.
________________________________________
आता स्वतःच्या आयुष्याकडे पाहूया...
आपल्या आयुष्यात कितीतरी गोष्टी आल्या. काही आपण मागवल्या. काही अचानक आल्या. काहींसाठी वर्षानुवर्षे वाट पाहिली. काही क्षणभरासाठी आल्या. काहींनी आपल्याला आनंद दिला. काहींनी वेदना दिल्या. काहींनी आपल्याला बदलून टाकलं. आणि मग त्या निघून गेल्या. पण त्या निघून गेल्या म्हणून त्या व्यर्थ झाल्या का?
नाही!
त्यांनी आपल्याला काहीतरी दिलं. एक अनुभव. एक शिकवण. एक स्मृती. एक जखम. एक जाणिव. एक दिशा. आणि मग त्या आपल्या आयुष्याच्या पुढच्या अध्यायासाठी आपल्याला तयार करून गेल्या.
म्हणूनच कधी कधी जे संपतं—ते हरवत नाही. ते आपल्यात रूपांतरित होतं.
काहीतरी संपतं. पण त्यातून काहीतरी नवीन जन्म घेतं. एक शिक्षक जातो. त्याचं ज्ञान विद्यार्थ्यांत जगत राहतं. एक आई जाते. तिची माया मुलांच्या संस्कारांत जगत राहते. एक मित्र दूर जातो. त्याची मैत्री आपल्या आठवणीत जगत राहते. एक कार्यकर्ता निघून जातो. त्याचं कार्य दुसऱ्या हातात पुढे जातं. एक विचार व्यक्त होतो. मग तो हजारो मनांत रुजतो.
म्हणून— व्यक्ताचं अव्यक्त होणं म्हणजे नेहमी नाश नाही. कधी कधी ते रूपांतर असतं.
राम आले. कृष्ण आले. भीष्म आले. अर्जुन आला. असंख्य संत आले. असंख्य महात्मे आले. असंख्य सामान्य माणसं आली. त्यांनी आपापल्या काळात आपापली भूमिका जगली. आणि निघून गेले. पण सृष्टी थांबली नाही. जीवन थांबलं नाही. नदी वाहत राहिली. सूर्य उगवत राहिला. पुढची पिढी जन्माला येत राहिली. नवीन स्वप्नं जन्माला येत राहिली. नवीन माणसं येत राहिली. नवीन व्यवस्था उभ्या राहत राहिल्या.
म्हणून कवी विचारतो— “रामकृष्णही आले गेले, त्याविना जग का ओस पडले?”
आणि हा प्रश्न केवळ कवितेचा नाही.
हा प्रश्न आपल्या आसक्तीला हादरा देणारा आहे.
________________________________________
आज श्रीकृष्ण आपल्याला विचारत आहेत...
तुला जे मिळालं आहे— तू ते पूर्ण जगतोयस का?
तुझ्या आयुष्यात जे लोक आहेत— तू त्यांच्यावर भरभरून प्रेम करतोयस का?
तुला जे काम मिळालं आहे— तू ते पूर्ण मनाने करतोयस का?
तुझी स्वप्नं— तू त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोयस का?
आणि जेव्हा वेळ येईल— ते सोडून देण्याची तयारी आहे का?
कारण जीवनाचा नियम आहे— अव्यक्तातून व्यक्त. व्यक्तातून अव्यक्त.
याला कुणी थांबवू शकत नाही.
________________________________________
मग शोक कशाचा?
शोक होणार नाही असं नाही. मनुष्य आहोत. मन हेलावणार. डोळे पाणावणार. आठवणी येणार. कधी हृदय तुटणारही. पण त्या वेदनेच्या मध्यभागीही एक दिवा तेवत ठेवायचा— सत्याचा.
हे जे होत आहे—ते केवळ माझ्याबरोबर होत नाही. ही सृष्टीची प्रक्रिया आहे. मी त्याला थांबवू शकत नाही. पण मी त्याच्याकडे पाहण्याची माझी दृष्टी बदलू शकतो.
आणि ही दृष्टी बदलली की—दुःखाचं रूप बदलतं. आसक्तीचं रूप बदलतं. कर्माचं रूप बदलतं. आणि हळूहळू... जीवनाचंही रूप बदलतं.
________________________________________
गीता म्हणजे हाच जागरणाचा क्षण आहे!
आपण जे पाहतो तेच संपूर्ण सत्य नाही.
आज जो व्यक्त क्षण आपल्या डोळ्यांसमोर आहे—तो एका मोठ्या प्रक्रियेचा केवळ मधला टप्पा आहे.
त्याआधी अव्यक्त होतं.
त्यानंतर पुन्हा अव्यक्त होणार आहे.
म्हणून व्यक्त अवस्थेला कमी लेखायचं नाही.
उलट ती पूर्णपणे जगायची!
पण तिच्यावर मालकी गाजवायची नाही.
तिला पकडून बसायचं नाही.
तिच्या निघून जाण्याला जीवनाचा अंत समजायचा नाही.
कारण— जे संपतं, त्याच्या राखेतूनच अनेकदा नवीन काहीतरी जन्म घेत असतं.
________________________________________
आजचा विचार...
आपल्या आयुष्यात जे काही सुंदर आहे— त्याचा आज पूर्ण रसास्वाद घ्या.
ज्यांच्यावर प्रेम आहे— त्यांना आजच ते प्रेम सांगा.
जे स्वप्न मनात आहे— त्यावर आजच काम सुरू करा.
जे कार्य करायचं आहे— ते आजच पूर्ण मनाने करा.
आणि जे काल संपून गेलं— त्याला आज कृतज्ञतेने नमस्कार करा.
कारण तेही तुमच्या जीवनप्रवासाचा एक आवश्यक टप्पा होतं.
उद्या काय व्यक्त होईल, कोण जाणे?
पण आज जे व्यक्त आहे— ते पूर्ण जगा!
आणि उद्या ते अव्यक्त झालं तर— त्याला रडत धरून ठेवू नका.
हात जोडून म्हणा—
“तू आलास... तू मला जगवलंस... तू मला शिकवलंस... तू मला समृद्ध केलंस... आता जा... तुझ्या पुढच्या प्रवासाला.”
कारण—
अव्यक्तातून व्यक्त होणं हा सृष्टीचा चमत्कार आहे. व्यक्त अवस्थेत पूर्णत्वाने जगणं ही साधना आहे. आणि व्यक्तातून पुन्हा अव्यक्तात विलीन होणं हे समर्पण आहे.
आणि या तिन्हींचं भान आलं की...
मृत्यूची भीती कमी होते. वियोगाचा शोक कमी होतो. आसक्ती सैल होते. अनुभव अधिक सुंदर होतो. आणि कर्म अधिक निर्मळ होतं.
श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी उभं करत नाहीत...
ते त्याला जीवनाच्या या अखंड प्रवाहासाठी जागं करत आहेत.
आणि म्हणूनच पुन्हा एकदा तो प्रश्न आपल्या अंतःकरणात घुमतो—
“अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत। अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना॥”
अव्यक्तातून आलो... व्यक्त झालो... पूर्णत्वाने जगलो... आणि पुन्हा अव्यक्तात विलीन झालो...
मग या शाश्वत प्रवाहात— शोक कशाचा?
आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम्… — आपण दिवसभर नेमकं कशाचा विचार करतो?
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ४८
१३ ऑगस्ट २०२६
आपण ज्यावेळी वास्तवात असतो, जागे असतो, त्यावेळी आपण कशाचा जास्त विचार करतो? कधी असा आढावा घेतलाय का? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण दिवसभरामध्ये कशाचं चिंतन करतो? काय समजून घेण्याचा प्रयत्न करतो? आपल्या बुद्धीचा कस आपण कशासाठी लावतो? आपला निजध्यास, आपला अभ्यास, आपली धडपड नेमकी कशासाठी असते? आपण करत असलेल्या विचारांचा साक्षीभावाने कधी अभ्यास केला आहे का? आपल्या कृतींकडे तटस्थपणे पाहण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? आपण सतत काही ना काही करत असतो, धावत असतो, मिळवत असतो, गमावत असतो; पण या सगळ्याच्या पाठीमागे नेमकं काय चाललं आहे, याचा आपण कधी शांतपणे विचार करतो का?
आपल्या मनात निर्माण होणारा राग, लोभ, मद, मोह, मत्सर यांच्याकडे आपण कधी दुसरी व्यक्ती असल्यासारखं पाहिलं आहे का? “माझ्यामध्ये राग निर्माण झाला आहे” आणि “मीच राग आहे” यामध्ये काही फरक आहे का? हा फरक जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतो का? खरंच, आपण दिवसभर काय करत असतो, याचा जर तटस्थपणे आढावा घेतला, तर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते.
आपल्या अस्तित्वाचा विचार केला तर…
आपल्या अस्तित्वाचे दोन घटक आपण समोर ठेवू शकतो. एक म्हणजे हे मूर्त शरीर आणि दुसरा म्हणजे या मूर्त शरीराला चैतन्यस्वरूप देणारं आत्मतत्त्व किंवा चैतन्य. दिवसभर या शरीराच्या माध्यमातून असंख्य प्रक्रिया घडत असतात. शरीराची काळजी, आरोग्य, अन्न, विश्रांती, पैसा, कुटुंब, व्यवसाय, नोकरी, प्रतिष्ठा, सुखसोयी आणि शरीराभोवतीचं संपूर्ण जग—या सगळ्याचा आपण सतत विचार करत असतो. पण ज्या चैतन्यामुळे या शरीराला जिवंतपणा प्राप्त झाला आहे, ज्या चैतन्यामुळे या सर्व प्रक्रिया घडत आहेत, त्या चैतन्याचा विचार आपण किती करतो?
मी स्वतः भगवद्गीतेचा अभ्यास आता बऱ्यापैकी दररोज करतो. त्या अभ्यासाच्या वेळी सकाळचे एक-दोन तास कधी कधी या विषयाचा विचार होतो. आजकाल अनेक प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करता येतो. ज्ञानग्रहणाची साधनं पूर्वीपेक्षा कितीतरी वाढली आहेत. त्यामुळे मनामधल्या कुतूहलाला दिशा देणंही शक्य झालं आहे. पण दिवसाचा पूर्ण वेळ पाहिला, तर जाणवतं की शरीर, शरीराच्या माध्यमातून घडणाऱ्या प्रक्रिया, पंचकोशात्मक अस्तित्व, आपल्या सभोवतालचं जग आणि त्यातली माणसं—यांचाच विचार आपल्या मनात मोठ्या प्रमाणावर चाललेला असतो.
आणि माझ्या चैतन्याचा? या शरीराला जिवंत स्वरूप देणाऱ्या आत्मतत्त्वाचा? त्याचा विचार मात्र फारसा होत नाही.
हे फक्त माझं सत्य नाही. आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे स्वतःच्या दिवसाचा आढावा घेतला, तर कदाचित हेच सत्य आपल्या लक्षात येईल.
आत्मतत्त्वाकडे पाहणारा किती जण?
श्रीमद्भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात—
“आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनम् ।
आश्चर्यवद्वदति तथैव चान्यः ।
आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति ।
श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ॥”
या आत्मतत्त्वाकडे कोणीतरी एखाद्या महान आश्चर्याप्रमाणे पाहतो. दुसरा कोणीतरी त्याचं आश्चर्याने वर्णन करतो. आणखी कोणीतरी त्याच्याविषयी आश्चर्याने ऐकतो. परंतु ऐकूनही त्याला खऱ्या अर्थाने जाणणारा अत्यंत विरळ असतो. आत्मतत्त्व हे इतकं सूक्ष्म, इतकं अगाध आणि इतकं विलक्षण आहे की केवळ ऐकणं आणि बोलणं पुरेसं ठरत नाही; त्यासाठी अंतर्मुख होण्याची गरज आहे.
खरंच, हा श्लोक डोळ्यात अंजन घालणारा आहे. कारण आपण संतांच्या कथा ऐकतो, त्यांच्या अनुभूतींबद्दल बोलतो, त्यांच्या जीवनातील विलक्षण प्रसंग ऐकतो, त्यांच्या लीलांबद्दल चर्चा करतो. ज्यांनी चैतन्यस्वरूपाचा अनुभव घेतला आणि ज्यांचं संपूर्ण जीवन त्या अनुभवामुळे जमिनी-आस्मानाइतकं बदललं, अशा व्यक्तींच्या कहाण्या ऐकण्यात आपला बराच वेळ जातो. आपण त्यांची भक्ती करतो, पूजा करतो, त्यांना शरण जातो. शरणागती ही निश्चितच महत्त्वाची गोष्ट आहे; पण त्यांनी जे अनुभवलं, ते त्यांनी कसं अनुभवलं, त्या अनुभवामागची साधना काय होती, त्या परिवर्तनाची प्रक्रिया काय होती—याचा आपण किती अभ्यास करतो?
कथा ऐकतो; पण प्रक्रिया समजून घेतो का?
हा खरा प्रश्न आहे. एखाद्या संताच्या जीवनातील चमत्कार ऐकणं सोपं आहे; पण त्या संताने स्वतःच्या मनावर कसं काम केलं, चित्तशुद्धी कशी साधली, तितिक्षा कशी निर्माण केली, साक्षीभाव कसा विकसित केला, समत्व कसं प्राप्त केलं आणि स्वतःच्या अंतर्मनाचा शोध कसा घेतला—या प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी आपण किती वेळ देतो?
आपल्याला अनेकदा वाटतं की एखाद्या महान व्यक्तीच्या कृपेने आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल. किंवा निदान जगण्यातलं समाधान, सुख, शांतता आणि स्थैर्य मिळेल. या भावनेमध्येही एक सुंदर श्रद्धा आहे. पण त्याही पलीकडे एक प्रश्न विचारायला हवा—“मला खरंच माझं चैतन्यस्वरूप जाणून घ्यायचं आहे का?”
हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे.
कारण जर खरंच जाणून घ्यायचं असेल, तर त्यासाठी काही वेळ द्यावा लागेल. काही विचार करावे लागतील. स्वतःच्या मनाकडे पाहावं लागेल. स्वतःच्या प्रतिक्रियांचा अभ्यास करावा लागेल. आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टींच्या मुळाशी जावं लागेल. आणि हळूहळू शरीर, मन, बुद्धी, भावना यांच्यापलीकडे “मी कोण?” या प्रश्नाकडे वळावं लागेल.
काय अडवतंय आपल्याला?
मग प्रश्न पडतो—काय अडवत असेल आपल्याला रमण महर्षी होण्यापासून? काय अडचण असेल आपल्याला रामकृष्ण परमहंसांसारख्या अंतर्मुख प्रवासापासून? काय अडवत असेल आपल्याला संतांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन स्वतःच्या जीवनात साधनेचा प्रयोग करण्यापासून? ही अडचण समाजाची आहे का? परिस्थितीची आहे का? उपलब्ध साधनसामग्रीची आहे का? की आपल्या प्राधान्यक्रमाचीच आहे?
कदाचित आपण मनाशीच ठरवलं असेल की या जन्मात आपल्याला या सगळ्या गोष्टींचा फार खोलवर विचार करायचा नाही. आपल्याला जगायचं आहे, काम करायचं आहे, मिळवायचं आहे, सुखी व्हायचं आहे आणि पुढे जायचं आहे. आत्मतत्त्व, चैतन्य, साक्षीभाव, स्थितप्रज्ञता, चित्तशुद्धी या गोष्टी नंतर पाहू. पण हे “नंतर” कधी येणार?
चोवीस तासांपैकी एक तास तरी…
दिवसाचे चोवीस तास आपण शरीर आणि शरीराच्या पंचभौतिक, पंचकोशात्मक अस्तित्वासाठी वापरतो. शरीरासाठी आपण किती काळजी घेतो! शरीराला अन्न देतो, विश्रांती देतो, व्यायाम करतो, औषधं घेतो, त्याला सुखसोयी देतो. शरीराच्या भविष्याची काळजी घेतो आणि शरीराभोवतीचं संपूर्ण जग उभं करतो.
मग या चोवीस तासांमधला एखादा तास आपण आपल्या आतल्या चैतन्याचा विचार करण्यासाठी देऊ शकतो का? आत्मतत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो का? आपल्या मनाचा साक्षी होण्यासाठी थोडा वेळ बसू शकतो का? आपल्या रागाकडे, लोभाकडे, अहंकाराकडे आणि अपेक्षांकडे थोडं तटस्थपणे पाहू शकतो का?
यासाठी देवदेव करण्याची गरज नाही. मोठमोठे विधी करण्याची गरज नाही. जग सोडून कुठेतरी जाण्याचीही गरज नाही. फक्त विचार करण्याची गरज आहे. सातत्याने विचार करण्याची गरज आहे. आणि त्या विचाराला आपल्या जगण्यात उतरवण्याची गरज आहे.
आपल्या चर्चांचे विषयही बदलायला हवेत
आपण आपल्या अवतीभवती पाहिलं, तर लोक कशावर चर्चा करतात हे सहज लक्षात येतं. शरीर, पैसा, व्यवसाय, राजकारण, नाती, प्रतिष्ठा, सुखसोयी, लोक काय म्हणाले, कोण पुढे गेलं, कोण मागे राहिलं—या सगळ्यांवर आपण तासन्तास बोलू शकतो. पण किती वेळा अशी चर्चा होते की, “आज माझ्या मनात नेमकं काय चाललं होतं?”
किती वेळा आपण विचारतो—“आज मला एवढा राग का आला?”, “माझ्या अहंकाराला नेमकं काय दुखलं?”, “मी कोणत्या गोष्टीला अनावश्यक महत्त्व देतो?”, “माझ्या विचारांचा मी साक्षी होऊ शकतो का?”, “माझ्यातलं चैतन्य नेमकं काय आहे?” अशा प्रश्नांवर चर्चा सुरू झाली, तर कदाचित आपल्या जीवनाची दिशाच बदलू शकेल.
आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम्…
म्हणूनच श्रीकृष्णांचा हा श्लोक केवळ आत्म्याचं वर्णन करणारा श्लोक नाही. तो आपल्याला एक आरसा दाखवतो. आपण कुठे उभे आहोत, हे दाखवतो. आपण आत्मतत्त्वाविषयी फक्त ऐकतोय का? त्याचं वर्णन करतोय का? त्याची भक्ती करतोय का? की खरंच त्याचा शोध घेण्यासाठी आपल्या जीवनात काही वेळ, काही ऊर्जा आणि काही प्रामाणिक प्रयत्न देतोय?
आपण विश्वाचा शोध घेण्यासाठी आयुष्य खर्च करतो; पण स्वतःचा शोध घेण्यासाठी किती वेळ देतो? आपण बाहेरच्या जगातील अंतरं मोजतो; पण स्वतःच्या अंतर्मनाची खोली मोजण्याचा प्रयत्न किती करतो? आपण शरीर किती वर्षं जगेल याची काळजी घेतो; पण ज्यामुळे या शरीराला “जीवन” मिळालं, त्या चैतन्याचं रहस्य जाणून घेण्याची उत्कंठा किती जणांच्या मनात आहे?
म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात—“आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनम्…” कोणीतरी या आत्मतत्त्वाकडे आश्चर्याने पाहतो. दुसरा त्याचं आश्चर्याने वर्णन करतो. तिसरा त्याच्याविषयी आश्चर्याने ऐकतो. पण ऐकूनही त्याला खऱ्या अर्थाने जाणणारा विरळ!
खरा प्रश्न आत्म्याचा नाही; आपल्या तळमळीचा आहे!
कदाचित या श्लोकाचा सर्वात मोठा प्रश्न हा नाही की “आत्मा काय आहे?” त्याआधीचा प्रश्न आहे—“मला आत्मा जाणून घ्यायची खरंच इच्छा आहे का?”
जर या प्रश्नाचं उत्तर मनापासून “हो” असं आलं, तर कदाचित आत्मज्ञानाचा प्रवास सुरू झालाच आहे. कारण आत्म्याचा शोध बाहेर कुठेतरी सुरू होत नाही. तो सुरू होतो स्वतःच्या विचारांकडे पाहण्यापासून, स्वतःच्या मनाला समजून घेण्यापासून आणि “मी नेमका कोण?” या प्रश्नाला प्रामाणिकपणे सामोरं जाण्यापासून.
आणि जर या प्रश्नाचं उत्तर अजून “नाही” असं असेल, तरी काही हरकत नाही. निदान आज आपण स्वतःला प्रामाणिकपणे ओळखलं आहे.
कारण आत्म्याचा शोध सुरू होण्यापूर्वी ‘मला स्वतःला जाणून घ्यायचं आहे’ ही तळमळ जन्माला यावी लागते.
आणि कदाचित…
हीच तळमळ म्हणजे अध्यात्माची पहिली पहाट!
मन बदललं की जगण्याची दिशा बदलते!
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ४९
१४ ऑगस्ट २०२६
गीतेचा अभ्यास करत असताना काही श्लोक असे येतात, की ते केवळ वाचून पुढे जाता येत नाही. ते आपल्या आयुष्यातील एखाद्या खोल अनुभवाला स्पर्श करतात आणि अचानक जाणवतं—अरे, कृष्ण जे अर्जुनाला सांगत आहेत, ते तर माझ्या आयुष्यातही घडलं आहे! माझ्या आयुष्यातला असाच एक प्रसंग मला सध्या सतत आठवतो आहे.
एकदा माझी आई डोक्यावर पडली आणि तिच्या मेंदूत रक्तस्राव झाला. ती पूर्णपणे डिसओरिएंटेड झाली होती. तिला आजूबाजूचं काहीच नीट समजत नव्हतं. त्या अवस्थेतून ती हळूहळू सावरली. आम्हाला वाटलं, आता संकट टळलं. पण ज्या दिवशी तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला, त्याच दिवशी तिच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या. तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. तिच्या आतड्याला पीळ पडला होता. परिस्थिती इतकी गंभीर झाली की ती सेप्टिक शॉकमध्ये गेली. तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. पुन्हा एकदा मृत्यूच्या दारातून तिला परत आणण्याचा संघर्ष सुरू झाला. ती त्यातूनही सावरू लागली.
पण या सगळ्या आघातांचा तिच्या शरीरावर जितका परिणाम झाला, त्यापेक्षा कदाचित तिच्या मनावर अधिक परिणाम झाला होता. तिची मानसिकता बदलली. ती पूर्वी जशी होती, तशी राहिली नव्हती. तिचं बोलणं कमी झालं. चेहऱ्यावरच्या भावना दिसेनाशा झाल्या. कुठल्याही गोष्टीला फारसा प्रतिसाद देत नव्हती. आम्ही तिला आनंदी करण्यासाठी अनेक प्रयत्न करत होतो; पण तिच्याकडून प्रतिक्रिया मिळत नव्हती. ICU मधून बाहेर आणल्यानंतर एक-दोन दिवस परिस्थिती चांगली वाटली. पुन्हा रक्तातील साखर प्रचंड वाढली आणि ती शॉकमध्ये गेली. एकामागून एक आघात, एकामागून एक संकटं—शरीरावर, मनावर, भावनांवर सतत होणारे प्रहार!
शेवटी एक दिवस तिला डिस्चार्ज मिळाला आणि आम्ही तिला घरी आणलं. घरी आल्यानंतर फिजिओथेरपी सुरू झाली. आम्ही तिला मदत करण्यासाठी तयार होतो. पण ती सहकार्य करत नव्हती. ती प्रतिकार करत होती. आम्ही पुढे जायचा प्रयत्न करायचो आणि ती मागे हटायची. आणि हे सगळं पाहताना मला सर्वांत जास्त आश्चर्य वाटत होतं ते एका गोष्टीचं—ही तीच माझी आई होती का? कारण मी ज्या आईला पाहिलं होतं, ती आयुष्यभर संघर्ष करणारी स्त्री होती. ती फायटर होती. संकट आलं की त्याच्याशी दोन हात करणारी होती. स्वतःच्या अडचणींवर मात करून इतरांना उभं करणारी होती. आणि आता? ती जणू पूर्णपणे अवसान गाळून बसली होती. शरीर थकलं होतं; पण त्याहून अधिक तिचं मन थकलं होतं.
आम्हाला प्रश्न पडला—आता करायचं काय? आम्ही तिच्यासाठी सगळं करायला तयार होतो; पण तिच्या मनानेच जणू सगळ्या प्रयत्नांना नकार दिला होता. याच काळात माझ्या आईच्या धाकट्या बहिणीला—लतामावशीला—कॅन्सर झाला. तिची शस्त्रक्रिया झाली. मी आणि माझी बहीण आरती यांनी एक धाडसी प्रयोग करायचं ठरवलं. आम्ही आईला सांगितलं—“आई, तुझ्या लहान बहिणीला कॅन्सर झाला आहे. तिचं ऑपरेशन झालं आहे. या वेळी तिला तुझी गरज आहे. तूच जर असं अवसान गाळून बसलीस, सहकार्य केलं नाहीस, तर कसं चालेल? तू घरातली सगळ्यात मोठी आहेस. आयुष्यभर लोकांनी तुझ्याकडे प्रेरणा म्हणून पाहिलं आहे.”
आम्ही तिला परिस्थिती बदलून सांगत नव्हतो. आम्ही तिच्या परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याचा प्रयत्न करत होतो. तो क्षण माझ्यासाठी आजही अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आम्ही तिच्या मनाला एका वेगळ्या केंद्राकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होतो—“मी आणि माझं दुःख” यापासून “मी आणि माझं कर्तव्य” याकडे; “मला काय होतंय?” यापासून “माझ्यामुळे कोण उभं राहू शकतं?” याकडे; “माझ्या भावना” यापासून “माझी जबाबदारी” याकडे. आणि कदाचित हाच मानवी मानसिकतेतील सर्वांत मोठा बदल असतो. ह्युमन माइंडसेटमधून ड्युटी-ड्रिव्हन माइंडसेटकडे… आणि ड्युटी-ड्रिव्हन माइंडसेटमधून दैवी मानसिकतेकडे जाणारा प्रवास!
आम्हाला त्या वेळी हे यशस्वी होईल की नाही, याची काहीच खात्री नव्हती. पण आश्चर्य घडलं. आईमध्ये प्रचंड बदल झाला. तिचं प्रतिसाद देणं बदललं. सहकार्य करणं बदललं. तिची हालचाल बदलली. तिच्या मनात पुन्हा जणू जगण्याची काहीतरी कारणं जागी झाली. आठ-दहा दिवसांत तिच्यात इतका बदल झाला, की आम्हाला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता. परिस्थिती तीच होती; पण परिस्थितीला प्रतिसाद देणारं मन बदललं होतं! आणि तेव्हाच मला जाणवलं—माणसाची मानसिकता बदलू शकते. आपण एखाद्या व्यक्तीला परिस्थितीपासून वाचवू शकत नाही; पण कधी कधी त्या परिस्थितीकडे पाहण्याची तिची दृष्टी बदलू शकतो. आणि दृष्टी बदलली की जगण्याची दिशा बदलते.
माझ्या स्वतःच्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग आहेत. एकेकाळी मी अभ्यास करणारा मुलगा नव्हतो. खेळणं, मारामाऱ्या करणं, गुंडगिरी करणं—यातच अधिक रस होता. सातवीत मला ५८ टक्के गुण मिळाले. मी घरी आलो आणि आईला खोटं सांगितलं—“मी पहिला आलो.” योगायोगाने माझी बहीण त्याच शाळेत होती. ती घरी आली आणि तिने आईला सांगितलं—“मैया सेकंड क्लास आला.” मला वाटलं, आता आई मारेल. रागावेल. ओरडेल. पण आईने मला मारलं नाही. ती रडायला लागली. आणि त्या अश्रूंनी माझ्या आयुष्याचा माइंडसेट बदलला.
त्या दिवशी माझ्या मनात एक विचार रुजला—“माझ्या कमी गुणांमुळे माझ्या आईच्या डोळ्यात पुन्हा अश्रू येता कामा नयेत.” पुढच्या वर्षी मी प्रयत्न केला आणि ५८ टक्क्यांवरून थेट ८५ टक्क्यांवर गेलो. त्यानंतर मी मागे वळून पाहिलंच नाही. आज मागे वळून पाहताना लक्षात येतं—गुणांनी माझं आयुष्य बदललं नाही; माझ्या मानसिकतेत झालेल्या बदलाने माझे गुण बदलले. म्हणूनच प्रश्न अनेकदा परिस्थितीचा नसतो. प्रश्न असतो—त्या परिस्थितीकडे पाहणाऱ्या आपल्या मनाचा!
आणि म्हणूनच आज जेव्हा भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील हे श्लोक वाचतो, तेव्हा मला श्रीकृष्णाचा अर्जुनाशी चाललेला संवाद केवळ युद्धभूमीवरचा संवाद वाटत नाही. तो मानवी मानसिकतेला बदलण्याचा संवाद वाटतो. अर्जुनाच्या मनावर ‘मी’, ‘माझे’, ‘माझी माणसं’, ‘माझं दुःख’, ‘माझी भीती’, ‘माझा मोह’ यांचं प्रचंड ओझं आहे. त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर झाला आहे, मनावर झाला आहे, बुद्धीवर झाला आहे आणि शेवटी त्याच्या अस्तित्वावरच झाला आहे. तो म्हणतो—“मी हे युद्ध करणार नाही.” पण श्रीकृष्ण परिस्थिती बदलत नाहीत. ते अर्जुनाला युद्धभूमीतून घेऊन जात नाहीत. ते त्याला शस्त्र खाली ठेवून घरी जाण्याचा मार्ग दाखवत नाहीत. ते एक वेगळंच काम करतात—ते अर्जुनाची मानसिकता बदलतात.
दुसऱ्या अध्यायातील तीसाव्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात—
देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥ २.३० ॥
अर्थ—“हे भारत, सर्वांच्या शरीरात वास करणारा देही नित्य अवध्य आहे. त्याचा कधीही वध होऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही प्राण्याबद्दल तू शोक करण्यास योग्य नाहीस.”
इथे एक विलक्षण गोष्ट घडते. कृष्ण अर्जुनाची परिस्थिती बदलत नाहीत; ते परिस्थितीकडे पाहण्याची त्याची दृष्टी बदलतात. अर्जुनाला दिसतं—शरीर. कृष्ण त्याला दाखवतात—देहाच्या पलीकडचं सत्य. अर्जुनाला दिसतं—मृत्यू. कृष्ण त्याला दाखवतात—अविनाशी आत्मा. अर्जुनाला दिसतं—“माझी माणसं मरतील.” कृष्ण त्याला विचारायला लावतात—“खरंच नष्ट होणार काय?” ही केवळ तत्त्वज्ञानाची चर्चा नाही. ही माइंडसेटची पुनर्रचना आहे.
मानवी मन बहुतेक वेळा दृश्यावर आधारलेलं असतं. शरीर, नाती, संपत्ती, मान, प्रतिष्ठा, सुख, दुःख, यश, अपयश—आणि या सगळ्यांशी आपण आपली ओळख जोडून घेतो. “हा माझा”, “हे माझं”, “माझं नुकसान”, “माझं दुःख”, “माझं भविष्य”, “माझं अपयश”, “माझी भीती”—या चौकटीत आपलं जग आकाराला येतं. आणि मग एखादी गोष्ट आपल्या अपेक्षेप्रमाणे घडली नाही की मन हादरतं. एखादी व्यक्ती दूर गेली की आपण तुटतो. अपयश आलं की आपण स्वतःलाच अपयशी समजू लागतो. संकट आलं की भविष्याची भीती आपल्याला ग्रासते.
गीता या भावनांना नाकारत नाही; पण ती त्यांच्या मर्यादा दाखवते. “तू केवळ हे शरीर नाहीस. तुझ्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू यापेक्षा अधिक खोल आहे.” ही जाणीव झाली की परिस्थिती बदलत नाही; पण परिस्थितीला सामोरं जाणारं मन बदलतं.
आणि मग पुढच्या श्लोकात श्रीकृष्ण आणखी एक पाऊल पुढे जातात—
स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ २.३१ ॥
“स्वधर्माचा विचार केला तरी तुला विचलित होण्याचं कारण नाही. क्षत्रियासाठी धर्मयुक्त युद्धापेक्षा श्रेष्ठ कर्तव्य दुसरं नाही.”
इथे कृष्ण अर्जुनाला एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे नेतात. आधी प्रश्न होता—“तू कोण आहेस?” आता प्रश्न आहे—“तुला काय करायचं आहे?” आत्मज्ञान आणि कर्तव्यज्ञान यांची ही सांगड अत्यंत महत्त्वाची आहे. केवळ “मी आत्मा आहे” एवढं समजून जीवन पूर्ण होत नाही. त्या सत्याची जाणीव घेऊन आपलं कर्तव्य काय आहे, हेही समजलं पाहिजे.
मानवी मन विचारतं—“मला काय आवडतं?”, “मला काय नकोसं वाटतं?”, “मला यात सुख मिळेल का?”, “मला त्रास होईल का?” पण कर्तव्यनिष्ठ मन एक वेगळा प्रश्न विचारतं—“या क्षणी योग्य काय आहे?” हीच मानसिकतेतील क्रांती आहे. अर्जुनाला युद्ध नको आहे, कारण त्याला युद्ध दुःखद वाटतं, भयंकर वाटतं, आप्तांचा वियोग सहन होत नाही. पण कृष्ण त्याला सांगतात—तुझ्या वैयक्तिक भावनेपेक्षा तुझं कर्तव्य मोठं आहे. भावना चुकीच्या नाहीत; पण भावनेच्या अधीन होऊन कर्तव्य सोडणं चुकीचं आहे.
माझ्या आईच्या प्रसंगाकडे आज मी पुन्हा पाहतो, तेव्हा मला या दोन श्लोकांचा एक वेगळाच अर्थ जाणवतो. आम्ही आईला तिचं दुःख नाकारायला सांगितलं नव्हतं. आम्ही तिला “तुला काही झालेलंच नाही” असं सांगितलं नव्हतं. तिचं शरीर थकलं होतं. तिच्यावर अनेक आघात झाले होते. तिचं मनही त्या आघातांनी विदीर्ण झालं होतं. पण आम्ही तिच्या मनाला एक प्रश्न विचारला—“आता तुझ्यापलीकडे कोणीतरी तुझी वाट पाहत आहे. तुझं कर्तव्य काय आहे?” आणि कदाचित त्या प्रश्नाने तिच्या मनातली दिशा बदलली.
“मी” पासून “माझ्यामुळे” पर्यंत, “माझं दुःख” पासून “माझी जबाबदारी” पर्यंत, “मला काय होतंय?” पासून “माझ्यामुळे कोण उभं राहू शकतं?” पर्यंत—यालाच कदाचित आपण मानवी मानसिकतेतून कर्तव्यप्रेरित मानसिकतेकडे जाणं म्हणू शकतो. आणि जेव्हा हे कर्तव्य केवळ अहंकारातून नव्हे, तर व्यापक कल्याणाच्या भावनेतून केलं जातं, तेव्हा ती मानसिकता आणखी उंचावते. ती दैवी मानसिकतेकडे प्रवास करू लागते.
कदाचित म्हणूनच भगवद्गीता आपल्याला केवळ संकटातून बाहेर पडण्याचं तंत्र शिकवत नाही. ती आपल्याला संकटात असताना आपण कोण व्हायचं, हे शिकवते. परिस्थिती नेहमी आपल्या हातात नसते; पण परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी आपण बदलू शकतो. दुःख थांबवणं नेहमी आपल्या हातात नसतं; पण दुःखातून आपण काय घडवणार, हे काही अंशी आपल्या हातात असतं. संकट टाळता येत नाही; पण संकटात आपली मानसिकता कोणती असावी, हे शिकता येतं.
आणि म्हणूनच गीता म्हणजे केवळ युद्धभूमीवरील उपदेश नाही. गीता म्हणजे मनाच्या युद्धभूमीवर कृष्णाने दिलेला प्रकाश आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक अर्जुन आहे. कधी तो घाबरतो, कधी तो तुटतो, कधी तो मोहात पडतो, कधी तो स्वतःच्या दुःखात इतका अडकतो, की स्वतःची व्यापक ओळख विसरतो. आणि त्या वेळी आपल्या आतला कृष्ण आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देतो—तू केवळ तुझ्या परिस्थितीइतका नाहीस. तू केवळ तुझ्या दुःखाइतका नाहीस. तू केवळ तुझ्या शरीराइतका नाहीस.
आणि म्हणूनच दृष्टी बदल, मानसिकता बदल, स्वतःच्या पलीकडे पाहा, कर्तव्य ओळखा आणि त्या कर्तव्याला व्यापक कल्याणाशी जोडा. कारण अनेकदा आयुष्य बदलण्यासाठी परिस्थिती बदलण्याची गरज नसते. फक्त मनाची दिशा बदलावी लागते. आणि मनाची दिशा बदलली की तेच जीवन नव्याने दिसू लागतं.
कदाचित श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध जिंकायला शिकवत नव्हते. ते आधी त्याला स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिकवत होते. आणि मनावर विजय मिळाला, की बाहेरची कोणतीही युद्धभूमी तितकी भयानक राहत नाही.
कारण खरी गीता तेव्हा सुरू होते, जेव्हा कृष्णाचा आवाज आपल्या कानात नव्हे—आपल्या मनात ऐकू येऊ लागतो.
भगवद्गीता आणि स्वातंत्र्य : आत्मजागृतीपासून विकसित भारतापर्यंत
भारताची भूमी ही हजारो वर्षांच्या संस्कृतीची, चिंतनाची, अध्यात्माची आणि ज्ञानपरंपरेची भूमी आहे. या भूमीवर अनेक आक्रमणं झाली. अलेक्झांडरपासून ग्रीक, हूण, शक, यवन अशा अनेक परकीय शक्तींनी भारतात प्रवेश केला. या आक्रमणांमागे प्रामुख्याने व्यापार, संपत्ती, सत्ता आणि भूभाग यांची लालसा होती. परंतु या आक्रमणांची एक विलक्षण बाजू अशीही होती की, या भूमीवर आलेल्या अनेक आक्रमकांवर भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांचा इतका जबरदस्त परिणाम झाला की, त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन झालं. त्यांनी इथला विचार स्वीकारला, इथला आचार स्वीकारला आणि कालांतराने या भूमीच्या सामाजिक-सांस्कृतिक रचनेचाच एक भाग बनले.
परंतु इसवी सन ७१२ मध्ये सिंधवर महंमद बिन कासिमने राजा दाहिरच्या विरुद्ध केलेल्या आक्रमणापासून परिस्थितीला एक वेगळं वळण मिळालं. त्यानंतरची अनेक आक्रमणं केवळ राजकीय किंवा आर्थिक स्वरूपाची राहिली नाहीत. त्यांच्यासोबत एका वेगळ्या विचारविश्वाचंही आगमन झालं. राजकीय सत्तेबरोबर धार्मिक आणि वैचारिक विस्ताराची प्रक्रियाही सुरू झाली. सिंधमध्ये जिझिया कराची व्यवस्था लागू झाली. युद्धकैदी, बंदिवान आणि लोकांचं स्थलांतर यांसारख्या प्रक्रियांनाही या काळात वेग आला. मंदिरांवर आक्रमणं झाली आणि काही मंदिरांचं मशिदींमध्ये रूपांतर करण्यात आलं.
यानंतर महंमद गझनीसारख्या आक्रमकांच्या मोहिमा झाल्या. सोमनाथ मंदिरावरील त्याचा हल्ला भारतीय जनमानसावर खोल परिणाम करून गेला. पुढे दिल्ली सल्तनतीच्या काळातही अनेक संघर्ष, आक्रमणं आणि सत्तांतरं घडत गेली. तेराव्या शतकापर्यंत ही राजकीय अस्थिरता आणि संघर्षाची परिस्थिती अधिक स्थिरावली. एकीकडे राजसत्ता उलथून पाडण्यासाठीच्या लढाया सुरू होत्या, तर दुसरीकडे सामान्य माणसाच्या मनावर आणि विचारांवर परिणाम करणाऱ्या विविध प्रक्रिया घडत होत्या.
अशा परिस्थितीत समाजाचं स्वत्व टिकवून ठेवणं अत्यंत अवघड झालं होतं. महाराष्ट्रातही या सगळ्या घडामोडींचे पडसाद उमटत होते. ज्ञानाची केंद्रं उद्ध्वस्त झाली, मंदिरांवर आक्रमणं झाली आणि सामाजिक जीवन अस्थिर झालं. नालंदा विद्यापीठाच्या विध्वंसाने तर भारतीय ज्ञानपरंपरेवर झालेल्या आघाताचं एक मोठं प्रतीक निर्माण केलं. या सगळ्याचा सर्वाधिक परिणाम सामान्य माणसाच्या मनावर होत होता.
अशा आणीबाणीच्या परिस्थितीत भारताला केवळ शस्त्रांची ताकद नव्हती, तर एका विचाराची गरज होती. एका आचाराची गरज होती. एका चळवळीची गरज होती. समाजाला आतून उभं करणाऱ्या एका शक्तीची गरज होती. आणि ही शक्ती भागवत धर्माच्या माध्यमातून समाजाला मिळू लागली.
याच काळात ज्ञानेश्वरांनी आणि त्यांच्या नाथ संप्रदायाच्या परंपरेने एक अभूतपूर्व काम केलं. श्रीमद्भगवद्गीतेतील गहन तत्त्वज्ञान संस्कृतच्या मर्यादित वर्तुळातून बाहेर काढून लोकभाषेत मांडण्यात आलं. मराठी भाषेत गीतेचं विवेचन झालं आणि ‘ज्ञानेश्वरी’चा जन्म झाला.
ज्ञानेश्वरीची निर्मिती ही केवळ एका ग्रंथाची निर्मिती नव्हती. ती भारतीय जनमानसाच्या इतिहासातील एक मोठी घटना होती. ती एक वैचारिक क्रांती होती. गीतेतील तत्त्वज्ञान सामान्य माणसाच्या भाषेत आलं आणि अध्यात्म हा केवळ काही मोजक्या लोकांचा विषय न राहता तो जनसामान्यांच्या जीवनाचा भाग बनू लागला.
ज्ञानेश्वरीने भारतीय संस्कृती, भारतीय विचार आणि भारतीयत्व यांचा आविष्कार केवळ वैचारिक पातळीवर केला नाही; तर त्याला प्रत्यक्ष सामाजिक जीवनाची दिशा दिली.
एका बाजूला राजे लढत होते. क्षत्रिय लढत होते. युद्धसरदार आणि सैनिक रणांगणात संघर्ष करत होते. दुसऱ्या बाजूला समाजाच्या मनावर परिणाम करणाऱ्या विविध वैचारिक आणि धार्मिक प्रक्रिया सुरू होत्या. अशा वेळी समाजातील अंतर्गत दुर्बलता, भेदभाव, कर्मकांड आणि सामाजिक विसंगती यांमुळे अनेक लोक बाह्य प्रभावांना बळी पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. म्हणूनच सर्वप्रथम हे ओळखणं आवश्यक होतं की आपला समाज आतून दुर्बल झाला आहे. आणि हे लक्षात आल्यानंतर समाजामध्ये पुन्हा चैतन्य निर्माण करणं गरजेचं होतं.
हा समाज भेदमुक्त करावा लागणार होता. समतेचं आणि ममतेचं तत्त्व समाजाला द्यावं लागणार होतं. त्याचबरोबर शौर्य आणि निर्भयतेचा विचारही समाजाच्या मनामध्ये रुजवावा लागणार होता.
शक्तीच्या जोपासनेसाठी भक्तीची गरज होती.
ही गोष्ट जेव्हा लक्षात आली, तेव्हा ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीने समाजामध्ये मोठं स्थित्यंतर घडवून आणलं. एक नवी मूल्यव्यवस्था आकाराला आली. अध्यात्म सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडला गेला. भक्ती ही केवळ व्यक्तिगत साधना न राहता समाजाला जोडणारी शक्ती बनली. या प्रक्रियेतून वारकरी संप्रदायाची उभारणी झाली. वैष्णव आणि भागवत धर्माचा प्रसार झाला. आचार-विचारांमध्ये परिवर्तन घडू लागलं. कर्मकांडाच्या अतिरेकाला आणि सामाजिक भेदभावाला आव्हान मिळालं. अध्यात्मावर एका विशिष्ट समूहाची मक्तेदारी राहू नये, अशी एक व्यापक लोकाभिमुख दिशा निर्माण झाली. आणि या प्रक्रियेतून जनमानसाला एका वेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं—विचार करण्याचं स्वातंत्र्य, अध्यात्म अनुभवण्याचं स्वातंत्र्य आणि स्वतःच्या सांस्कृतिक अस्मितेसह उभं राहण्याचं स्वातंत्र्य.
याच वैचारिक आणि सामाजिक पायाभरणीच्या पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला. त्याच व्यापक कालखंडात समर्थ रामदास, संत तुकाराम, संत एकनाथ यांसारख्या संतांनी भावविश्व, विचारविश्व आणि आचारविश्व समृद्ध केलं. एका बाजूला संतांची वैचारिक आणि आध्यात्मिक चळवळ होती, तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची प्रत्यक्ष उभारणी होत होती.
म्हणूनच या संपूर्ण प्रक्रियेकडे केवळ धार्मिक चळवळ म्हणून पाहता येत नाही. ही समाजाच्या अंतःकरणाची घडण होती. ही माणसाला आतून उभं करण्याची प्रक्रिया होती. भक्तीच्या माध्यमातून शक्ती जागवण्याची आणि अध्यात्माच्या माध्यमातून समाजाला निर्भय करण्याची प्रक्रिया होती.
आणि या प्रक्रियेचा प्रभाव महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही.
गुजरातमध्ये नरसी मेहता उभे राहिले. आसाममध्ये शंकरदेवांनी व्यापक भक्तीपरंपरेला दिशा दिली. मीराबाई आणि कबीर यांनी आपल्या स्वतंत्र आध्यात्मिक विचारांनी जनमानसाला स्पर्श केला. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभूंच्या माध्यमातून भक्तीची एक प्रभावी चळवळ उभी राहिली. पुढे गुरु नानकांच्या रूपाने पंजाबच्या भूमीत शीख परंपरेचा स्वतंत्र आणि शक्तिशाली प्रवाह आकाराला आला.
भारताच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या रूपांनी हा भारतीय विचार अधिक प्रबळ करण्याचा प्रयत्न सुरू होता.
या संपूर्ण प्रक्रियेचा एक महत्त्वाचा वैचारिक टर्निंग पॉईंट म्हणजे श्रीमद्भगवद्गीतेचं ज्ञानेश्वरीच्या रूपाने लोकभाषेत अवतरणं. गीतेतील विचार जनमानसापर्यंत पोहोचला आणि त्यातून भक्ती, समता, ममता, स्वाभिमान, शौर्य आणि निर्भयता यांचा एक नवा संगम तयार झाला.
ही केवळ धार्मिक जागृती नव्हती.
ही आत्मजागृती होती.
ही वैचारिक स्वातंत्र्याची चळवळ होती.
ही आचारस्वातंत्र्याची चळवळ होती.
आणि अन्याय, परकीय आक्रमण किंवा कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीसमोर निर्भयपणे उभं राहण्याची मानसिकता निर्माण करणारी ही एक मोठी सामाजिक-आध्यात्मिक प्रक्रिया होती.
म्हणूनच भगवद्गीतेकडे केवळ एक धार्मिक ग्रंथ म्हणून पाहणं तिच्या प्रभावाची व्याप्ती कमी करून पाहणं ठरेल. गीतेने भारतीय समाजाला केवळ अध्यात्म दिलं नाही; तिने कर्तव्याची जाणीव दिली, आत्मस्वरूपाची जाणीव दिली, संघर्षाची दिशा दिली आणि संकटाच्या काळात मनुष्याला आतून उभं राहण्याची शक्ती दिली.
ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून हा विचार लोकभाषेत उतरला आणि जनमानसाच्या जीवनाचा भाग बनला.
आक्रमणांच्या काळात बाहेरची सत्ता बदलत होती; पण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आतली सत्ता जागी होत होती.
आणि म्हणूनच—
आक्रमण ते आत्मजागृती,
पराभवाच्या भीतीपासून निर्भयतेकडे,
भेदभावापासून समतेकडे,
कर्मकांडापासून अनुभूतीकडे,
आणि वैचारिक गुलामगिरीपासून आत्मस्वातंत्र्याकडे—
या प्रदीर्घ प्रवासात श्रीमद्भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
कारण शेवटी समाजाला बाहेरून वाचवण्यापूर्वी त्याला आतून जागं करावं लागतं.
आणि भारतीय समाजाला ही आत्मजागृती देणाऱ्या महान परंपरेच्या केंद्रस्थानी—भगवद्गीतेचा विचार उभा होता.
इंग्रजी सत्तेविरुद्ध भारतीय आत्मजागृतीचा नवा अध्याय
पुढे मात्र ज्यावेळी इंग्रजांचं आक्रमण सुरू झालं, त्यावेळी परिस्थिती पुन्हा एकदा बदलली. इंग्रजांचं धोरण मुस्लिम आक्रमकांच्या धोरणापेक्षा फार वेगळ्या पद्धतीचं होतं. त्यांनी पहिल्यांदा इथल्या सगळ्या धर्मग्रंथांचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायला सुरुवात केली. नुसतं ट्रान्सलेशन केलं नाही, तर त्यामधले मूळ अर्थ बदलून त्यामध्ये भ्रष्टता आणली गेली. त्याचबरोबर शिक्षणाची संपूर्ण व्यवस्था पाश्चात्य पद्धतीची, इंग्रजांची किंवा युरोपियन पद्धतीची करण्यास सुरुवात झाली.
त्यामुळे समाजामध्ये एक नवा विचार रुजू लागला—भारतीयत्व म्हणजे काही श्रेष्ठत्व नाही; भारतीय संस्कृतीमध्ये काही मोठेपणा नाही; उलट ही हीन, जंगली, रांटी संस्कृती आहे. अशा प्रकारचा विचार मांडला जाऊ लागला. आणि दुर्दैवाने, या विचाराला आधार देण्यासाठी आपल्या धर्मग्रंथांमधील दाखलेही दिले जाऊ लागले. अशा काळामध्ये भारतीय समाजाला पुन्हा आपल्या स्वतःच्या विचारविश्वाकडे पाहण्याची गरज निर्माण झाली. याच काळात एक मोठा विचार समोर आला. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आणि सुब्रह्मण्यम भारती यांनी गीतेचा एक वेगळा आस्पेक्ट समजून घ्यायला सुरुवात केली. त्यांनी गीतेचा विचार केवळ अध्यात्माच्या चौकटीत न पाहता त्यातून आचार, शक्ती आणि राष्ट्रजागृतीचा अर्थ शोधायला सुरुवात केली.
पुढे स्वामी विवेकानंदांनी गीतेचा विचार अत्यंत जबरदस्त पद्धतीने मांडला.
त्यांच्या विचारामध्ये शक्तीची उपासना होती.
“Strength is Life, Weakness is Death.”
“Expansion is Life, Contraction is Death.”
विस्तारित व्हा. ताकदवान व्हा. आत्मनिर्भर व्हा. स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून घ्या.
“उत्तिष्ठत! जाग्रत! प्राप्य वरान्निबोधत!”
उठा! जागे व्हा! आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका!
तमसामध्ये असलेल्या समाजाला जागं करण्याचं काम विवेकानंदांनी सुरू केलं. पाश्चात्य श्रेष्ठत्वाच्या न्यूनगंडाने ग्रासलेल्या समाजाच्या मनावर त्यांनी प्रहार केला. भारतीय विचार हा हीन नाही, भारतीय अध्यात्म हे मागासलेपणाचं प्रतीक नाही, उलट भारताकडे जगाला देण्यासारखं महान तत्त्वज्ञान आहे—हा आत्मविश्वास त्यांनी भारतीय समाजामध्ये निर्माण केला. याच काळात पाश्चात्य जगासमोर भारतीय विचारांचं सामर्थ्यही प्रकर्षाने दिसून आलं. शिकागोमधील धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंदांच्या प्रभावी भाषणातून भारतीय अध्यात्माचा आवाज जगभर पोहोचला.
भगवद्गीता नव्याने समजली जाऊ लागली. गीता म्हणजे केवळ संन्यासाचा किंवा निवृत्तीचा ग्रंथ नाही, तर जीवनाच्या संघर्षात उभं राहण्याची प्रेरणा देणारा ग्रंथ आहे, हा विचार अधिक स्पष्ट होऊ लागला. याच काळात श्री अरविंदांच्या विचारांनीही भारतीय राष्ट्रवादाला एक वेगळी दिशा दिली. उत्तरपारा भाषणामध्ये त्यांनी सनातन धर्म आणि राष्ट्राच्या पुनरुत्थानाचा संबंध अत्यंत प्रभावीपणे मांडला. त्यांच्या दृष्टीने भारताचं राष्ट्रीय जीवन आणि सनातन धर्म यांचा संबंध हा केवळ धार्मिक नव्हता; तो भारताच्या आत्म्याशी जोडलेला होता.
दुसऱ्या बाजूला मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ची निर्मिती केली. ही घटना अत्यंत महत्त्वाची होती. एकीकडे विवेकानंदांचा शक्तीचा विचार, दुसरीकडे श्री अरविंदांचा राष्ट्रजागृतीचा विचार आणि तिसरीकडे लोकमान्य टिळकांचा कर्मयोगाचा विचार—या तिन्ही प्रवाहांनी भारतीय स्वातंत्र्यचळवळीला एक नवी वैचारिक ताकद दिली.
गीतेचा अर्थ नव्याने उलगडला.
कर्म करा. कर्तव्यापासून पळू नका. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्या कर्तव्यापासून विचलित होऊ नका. या विचारातून अनेक क्रांतिकारक उभे राहिले. परंतु गीतेचा प्रभाव स्वातंत्र्यचळवळीमध्ये केवळ क्रांतिकारकांच्या मार्गानेच पुढे गेला नाही. त्याचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रवाह महात्मा गांधींच्या माध्यमातून समोर आला. महात्मा गांधी असोत किंवा विनोबा भावे—दोघांनीही गीतेचा आधार घेत भारतीय स्वातंत्र्याला एक नवा आयाम दिला. परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष करताना भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय विचार आणि भारतीय जीवनपद्धती यांना ताकद देण्याचं काम भगवद्गीतेच्या माध्यमातून केलं गेलं.
गांधीजींनी गीतेमधून अनासक्तीयोग समजून घेतला. स्थितप्रज्ञतेचा विचार आत्मसात केला. त्यातून निर्भयता आली आणि त्या निर्भयतेतून अहिंसेची शक्ती निर्माण झाली. गीतेचा आधार घेत गांधीजींनी केवळ स्वतःच्या जीवनामध्ये स्थित्यंतर घडवलं नाही, तर संपूर्ण समाजामध्ये स्थित्यंतर घडवण्याची एक पद्धती विकसित केली.
इंग्रजांच्या विरुद्ध एक असा संघर्ष उभा राहिला, ज्यामध्ये सामान्य माणूसही सहभागी होऊ शकला.
इतिहासात आतापर्यंतची युद्धं प्रामुख्याने एका राजसत्तेची दुसऱ्या राजसत्तेविरुद्ध, एका क्षत्रियाची दुसऱ्या क्षत्रियाविरुद्ध, एका सरदाराची दुसऱ्या सरदाराविरुद्ध किंवा एका सैनिकाची दुसऱ्या सैनिकाविरुद्ध असायची.
पण गांधीजींनी एक वेगळाच मार्ग दाखवला.
राजसत्तेविरुद्ध सामान्य माणूसही उभा राहू शकतो.
टिळकांनी हा आत्मविश्वास जागवला.
लाला लजपतरायांनी तो अधिक प्रखर केला.
गांधीजींनी त्याला अखिल भारतीय जनचळवळीचं स्वरूप दिलं.
आणि मग स्वातंत्र्याची लढाई ही केवळ काही राजे, सरदार, सैनिक किंवा क्रांतिकारकांची लढाई राहिली नाही. ती सामान्य भारतीय माणसाची लढाई बनली.
शेतकरी सहभागी झाला.
कामगार सहभागी झाला.
विद्यार्थी सहभागी झाला.
स्त्रिया सहभागी झाल्या.
सामान्य नागरिक सहभागी झाला.
भारतीय समाजाच्या प्रत्येक स्तरातून स्वातंत्र्याची आकांक्षा व्यक्त होऊ लागली.
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भगवद्गीतेने दिलेला विचार पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रूपांत समोर येत राहिला—कर्तव्य, कर्म, अनासक्ती, स्थितप्रज्ञता, निर्भयता, आत्मविश्वास आणि सत्यासाठी उभं राहण्याची शक्ती.
म्हणूनच भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पाहताना भगवद्गीतेच्या प्रभावाकडे दुर्लक्ष करता येत नाही.
ज्ञानेश्वरांच्या काळात गीतेने भारतीय समाजाला आत्मजागृतीची दिशा दिली.
शिवाजी महाराजांच्या काळात त्या विचारांच्या व्यापक सामाजिक परिणामातून स्वराज्याची मानसिकता बळकट झाली. आधुनिक भारतात विवेकानंद, टिळक, अरविंद, गांधी, विनोबा आणि असंख्य राष्ट्रभक्तांच्या विचारांमधून गीतेने पुन्हा एकदा भारतीय समाजाला उभं केलं.
म्हणजेच गीता एका काळापुरती मर्यादित राहिली नाही.
प्रत्येक संकटाच्या काळात तिने स्वतःचा नवा अर्थ भारतीय समाजासमोर उलगडला.
आणि अखेर स्वातंत्र्य मिळालं.
पण इथे या प्रवासाचा शेवट होत नाही.
कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला पुन्हा एका वेगळ्या विचारासह जगावं लागणार आहे.
परकीय सत्तेविरुद्ध लढणं एक गोष्ट होती.
पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतःच्या स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेणं, स्वतःचा समाज घडवणं, स्वतःची मूल्यव्यवस्था जपणं आणि नव्या भारताची निर्मिती करणं—ही त्याहून मोठी जबाबदारी आहे.
कारण स्वातंत्र्य मिळवणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच स्वातंत्र्य टिकवणं आणि त्याला योग्य दिशा देणं महत्त्वाचं आहे.
आणि कदाचित म्हणूनच आजही भगवद्गीता आपल्याला पुन्हा पुन्हा एकच प्रश्न विचारते—
“तुझं कर्तव्य काय आहे?”
कारण युद्धभूमी बदलते.
आक्रमक बदलतात.
परिस्थिती बदलते.
पण माणसासमोरचा मूलभूत प्रश्न तोच राहतो—
भीतीसमोर तू झुकणार की आपल्या कर्तव्याच्या मार्गावर निर्भयपणे उभा राहणार?
याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याची प्रेरणा भारतीय समाजाला शतकानुशतकं भगवद्गीतेकडून मिळत आली आहे.
आणि म्हणूनच—
गीता ही केवळ ग्रंथ नाही.
ती आत्मजागृतीची शक्ती आहे.
ती कर्तव्याची जाणीव आहे.
ती निर्भयतेची प्रेरणा आहे.
आणि संकटाच्या काळात समाजाला पुन्हा उभं करणारी भारतीय चेतनेची एक अखंड ज्योत आहे.
ज्ञानेश्वरांच्या काळात गीता सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम झालं. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात गीता भारतीय आत्मविश्वास जागवण्याचं साधन बनली. टिळकांसाठी ती कर्मयोगाची प्रेरणा होती; गांधींसाठी अनासक्तीची; अरविंदांसाठी आध्यात्मिक राष्ट्रनिर्मितीची; विवेकानंदांसाठी शक्ती, समत्व आणि मनुष्यनिर्मितीची.
म्हणजेच गीता बदलली नाही; काळ बदलला आणि गीतेशी संवाद साधण्याची आपली पद्धत बदलली.
आज भारत स्वतंत्र आहे.
आज आपल्यासमोर परकीय राज्यसत्तेविरुद्ध लढण्याचा प्रश्न नाही. पण त्यामुळे संघर्ष संपलेला नाही. त्याचं स्वरूप बदललं आहे.
आज आपल्यासमोर गरिबी, विषमता, सामाजिक तणाव, पर्यावरणीय संकट, मानसिक अस्थिरता, तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी आव्हानं, रोजगाराचा बदलता चेहरा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे—मानव आणि यंत्र यांच्यातील बदलतं नातं—हे प्रश्न आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञान ही मानवाच्या बुद्धीची निर्मिती आहेत. यंत्र अधिक बुद्धिमान होत असताना मानवाने स्वतःच्या बुद्धीचा आणि विवेकाचा उपयोग कसा करायचा?
हा आजचा प्रश्न आहे.
म्हणून आज गीतेकडे केवळ वैयक्तिक तणाव कमी करण्यासाठी पाहणं पुरेसं नाही. गीता केवळ “मन शांत ठेवण्याचं पुस्तक” नाही. ती केवळ वैयक्तिक यशासाठीची प्रेरणाग्रंथिका नाही.
गीता आपल्याला अधिक मोठा प्रश्न विचारते—
मी कोण आहे?
माझं कर्तव्य काय आहे?
माझ्या कृतीचा समाजावर काय परिणाम होतो?
माझ्या ज्ञानाचा उपयोग कशासाठी होतो?
माझ्या शक्तीचा उपयोग कोणासाठी होतो?
आणि माझ्या वैयक्तिक प्रगतीचा समाजाच्या प्रगतीशी संबंध काय आहे?
आज भारत विकसित राष्ट्र होण्याचं स्वप्न पाहतो आहे. या विकासाला केवळ आर्थिक शक्ती पुरणार नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान आवश्यक आहे; पण त्याबरोबर विवेक, मूल्यदृष्टी, सामाजिक जबाबदारी आणि मानवी संवेदना आवश्यक आहेत.
म्हणूनच आज आपल्याला गीतेचा नवा अर्थ शोधण्याची गरज नाही; तर गीतेतील शाश्वत विचारांचा नव्या काळाशी संवाद घडवण्याची गरज आहे.
ज्ञानेश्वरांनी आपल्या काळात गीतेला लोकभाषा दिली.
टिळकांनी तिला कर्मयोगाचा आधुनिक अर्थ दिला.
गांधींनी तिला अनासक्तीच्या आचरणाशी जोडलं.
विनोबांनी तिला जीवनशिक्षण बनवलं.
आता आपल्या पिढीसमोर नवं काम आहे—
गीतेला आधुनिक भारताच्या विकासाच्या भाषेत आणणं.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात गीता काय सांगते?
यंत्रमानवाच्या युगात मानवीपणाचं महत्त्व काय?
स्पर्धेच्या युगात समत्व कसं जगायचं?
अमर्याद माहितीच्या युगात विवेक कसा विकसित करायचा?
वैयक्तिक यशाच्या धावपळीत सामाजिक कर्तव्य कसं जपायचं?
आणि विकसित भारत घडवताना विकासाचा केंद्रबिंदू केवळ अर्थव्यवस्था न राहता मनुष्यनिर्मिती कशी बनेल?
हे प्रश्न आजच्या तरुणाईसमोर ठेवण्याची वेळ आली आहे.
गीता भूतकाळाची आठवण म्हणून जपायची नाही. ती वर्तमानाला दिशा देण्यासाठी आणि भविष्य घडवण्यासाठी समजून घ्यायची आहे.
गीता ही केवळ व्यक्तिगत मुक्तीचा मार्ग नाही; ती व्यक्तीपासून समाजाकडे, समाजापासून राष्ट्राकडे आणि राष्ट्रापासून संपूर्ण मानवतेकडे जाणाऱ्या कर्तव्याची जाणीव करून देणारी दृष्टी आहे.
म्हणून आजची गरज आहे—गीतेला नव्या पिढीच्या भाषेत समजून घेण्याची, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगाशी तिचा संवाद घडवण्याची आणि तिच्या विचारांना सामाजिक परिवर्तनाच्या शक्तीत रूपांतरित करण्याची.
ज्ञानेश्वरांनी गीता लोकांपर्यंत आणली.
आता आपली जबाबदारी आहे—गीतेतील विचार लोकांच्या जीवनात आणण्याची.
कारण भारताचा पुढचा प्रवास केवळ आर्थिक महासत्ता होण्याचा नसावा.
तो विचारसमृद्ध, मूल्यसमृद्ध, विज्ञाननिष्ठ, कर्तव्यनिष्ठ आणि माणुसकीने समृद्ध भारत घडवण्याचा असावा.
आणि या प्रवासात भगवद्गीता पुन्हा एकदा आपल्याशी बोलू शकते.
फक्त यावेळी रणांगण कुरुक्षेत्राचं नसेल.
रणांगण असेल—आपलं आजचं जीवन.
आणि प्रश्न पुन्हा तोच असेल—
“मी काय करू?”
याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज गीतेकडे नव्या नजरेने पाहण्याची वेळ आली आहे.
प्रसाद चिक्षे
ज्ञान प्रबोधिनी
8208438600
स्वधर्मापासून पळायचं नाही! — संघर्षातून स्वतःच्या पूर्णत्वाकडे
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ५०
१६ ऑगस्ट २०२६
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्ययोग
गीतेचा अभ्यास करताना काही श्लोक असे येतात, की ते केवळ अर्जुनासाठी आहेत असे वाटत नाही; उलट ते आपल्यालाच आरसा दाखवतात. दुसऱ्या अध्यायातील ३१ ते ३७ या श्लोकांकडे पाहताना मला असाच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जाणवतो—आपण इतरांना जे सत्य सांगतो, तेच सत्य आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष उभे ठाकले, तर आपण त्याला स्वीकारतो का?
महाभारतातील विराटपर्वात अर्जुनाने विराटपुत्र उत्तराला दिलेला एक संदेश या संदर्भात फार बोलका आहे—
न एष पूर्वैः स्मृतो धर्मः क्षत्रियस्य पलायनम् ।
श्रेयस्ते मरणं युद्धे न भीतस्य पलायनम् ॥
रणांगणातून पळून जाणे हा क्षत्रियाचा धर्म पूर्वजांनी कधीही सांगितलेला नाही. भीतीपोटी युद्धातून पळून जाणे हा क्षत्रियाचा धर्म नव्हे. त्यापेक्षा युद्धभूमीवर लढताना मरण येणे हे अधिक श्रेयस्कर आहे; परंतु भीतीपोटी पळून जाऊन जिवंत राहणे हे भूषणावह नाही.
हा संदेश अर्जुनाने विराटाच्या पुत्राला—उत्तराला—दिला होता. युद्धभूमी पाहून उत्तर घाबरला होता. त्याला रणांगणातून पळून जायचे होते. त्यावेळी अर्जुनाने त्याला कर्तव्याची आठवण करून दिली.
पण गंमत अशी आहे की, तोच अर्जुन आता कुरुक्षेत्राच्या रणांगणावर उभा राहून आपल्या धर्मकर्तव्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो आहे!
ज्याने उत्तराला सांगितले होते, “भीतीपोटी पळून जाऊ नकोस,” तोच अर्जुन आता स्वतःच्या मनातील मोह, ममता, विषाद आणि संभ्रमामुळे युद्धातून दूर जाण्याची भाषा करतो आहे.
इथेच गीतेचा एक अत्यंत मूलभूत धडा आपल्यासमोर उभा राहतो—
आपण इतरांना जे सत्य सहजपणे सांगतो, तेच सत्य आपल्या आयुष्यात आले की आपण ते स्वीकारू शकतो का?
आपण इतरांना कर्तव्याची शिकवण देतो; पण जेव्हा स्वतःच्या कर्तव्याची वेळ येते, तेव्हा आपण कारणे शोधतो. आपण इतरांना धैर्य सांगतो; पण स्वतःच्या मनातील भीतीसमोर उभे राहण्याची वेळ आली की मागे हटतो.
म्हणून अर्जुनाची अवस्था ही केवळ अर्जुनाची अवस्था नाही. अर्जुन म्हणजे आपणच.
स्वधर्म म्हणजे नेमकं काय?
गीतेतील ३१वा श्लोक वाचताना “स्वधर्म” हा शब्द माझ्यासाठी खूप काळ एक मोठा प्रश्न राहिला.
स्वधर्म म्हणजे काय? तो कसा शोधायचा? आपला स्वधर्म कोणता, हे कसं ठरवायचं?
हा प्रश्न मी अनेकांना विचारला. अनेक संत, संन्यासी आणि विचारवंत यांच्याशी बोललो. पण मला अपेक्षित असलेले उत्तर मिळत नव्हते. उत्तरं मिळत होती; पण माझे समाधान होत नव्हते.
या प्रश्नाची अस्वस्थता इतकी वाढली की त्याचा परिणाम माझ्या मनावर आणि शरीरावरही झाला. अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या. त्या काळात मी अनेक लोकांना भेटत होतो, उत्तर शोधत होतो.
अशाच एका शोधात माझा मित्र सुबोध याच्यासोबत मी पवनारला, विनोबा भावे यांच्या आश्रमात गेलो. आम्हाला गौतमजी बजाज यांना भेटायचे होते. आम्ही गेलो तेव्हा दुपारची विश्रांतीची वेळ असल्याने आश्रम बंद होता. आम्ही द्वारपालाला सांगितले की, आम्ही ज्ञान प्रबोधिनीतून आलो आहोत आणि गौतमजींना भेटायचे आहे. सुबोधला गौतमजी चांगले ओळखत असल्यामुळे आम्हाला आत जाण्याची परवानगी मिळाली.
गौतमजींबरोबर गप्पा सुरू झाल्या आणि नेहमीप्रमाणे मी माझा प्रश्न त्यांच्यासमोर ठेवला—
“स्वधर्म म्हणजे काय? तो कसा शोधायचा?”
गौतमजींनी अगदी सहजपणे उत्तर दिले—
“विनोबा म्हणतात, स्वधर्म आपल्या आईसारखा असतो. तो शोधावा लागत नाही. तो आपल्या जन्माच्या आधीच जन्मलेला असतो.”
हे वाक्य माझ्या मनाला भिडले.
आपलं कर्तव्य आपल्यापेक्षा आधी जन्माला आलेलं असतं.
आपण या जगात येतो तेव्हा काही नाती, काही जबाबदाऱ्या, काही क्षमता, काही परिस्थिती आणि काही व्यापक संदर्भ आपल्याभोवती आधीच निर्माण झालेले असतात. त्यातून आपल्यासमोर आपलं कर्तव्य उभं राहतं.
स्वधर्म म्हणजे केवळ व्यवसाय किंवा भूमिका नाही
स्वधर्म म्हणजे केवळ “माझं काम काय?” एवढाच त्याचा अर्थ नाही.
स्वधर्म म्हणजे कर्तव्य, जबाबदारी आणि दायित्व.
माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्या आत दडलेल्या दिव्यत्वाचे, सामर्थ्याचे आणि पूर्णत्वाचे प्रगटीकरण करण्याची प्रक्रिया सुरू होते. माणूस हा सतत विकसित होणारा प्राणी आहे. म्हणूनच माणसाच्या जीवनात संघर्ष आहे. तपस्या आहे. स्वतःशी लढणं आहे. परिस्थितीशी लढणं आहे. स्वतःच्या मर्यादांशी लढणं आहे. आपल्या विकासाच्या मार्गात काही अडथळे आले, तर त्यांना दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्वतःचे नवे, अधिक उन्नत रूप शोधण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. लढणे म्हणजे स्वतःच्या विकासाला अडथळा ठरणाऱ्या गोष्टींविरुद्ध उभं राहणं.
आपण एकटे नाही. आपण एका समाजाचे, एका समूहाचे घटक आहोत.म्हणूनच आपलं कर्तव्य केवळ स्वतःपुरतं मर्यादित राहू शकत नाही. समाजामध्ये काही प्रश्न निर्माण झाले—ते सामाजिक असोत, राष्ट्रीय असोत किंवा व्यापक मानवी जीवनाशी संबंधित असोत—तर त्या प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रयत्न करणे हेही आपलं कर्तव्य आहे. म्हणजे स्वधर्माची एक दिशा आहे—
स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे.
दुसरी दिशा आहे—
समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे.
आणि तिसरी दिशा आहे—
समष्टीच्या संतुलनासाठी आणि विकासासाठी प्रयत्न करणे.
आपल्या आतल्या पूर्णत्वाचा विकास, समाजव्यवस्थेचा विकास आणि व्यापक सृष्टीव्यवस्थेचा समतोल—या तिन्ही पातळ्यांवर आपली भूमिका आहे. म्हणून स्वधर्म म्हणजे केवळ काही कर्मकांड नव्हे. स्वधर्म म्हणजे स्वतःच्या पूर्णत्वाच्या दिशेने सतत प्रयत्न करणे, गरज पडली तर संघर्ष करणे, तपस्या करणे; समाजातील दुष्प्रवृत्तींविरुद्ध उभे राहणे; समाजाच्या विकासासाठी योगदान देणे आणि समष्टीचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करणे.
अर्जुनाचा स्वधर्म काय आहे?
आता हे अर्जुनाच्या संदर्भात पाहू. अर्जुनाचा क्षत्रिय म्हणून स्वधर्म म्हणजे समाजाचे संरक्षण करणे, दुष्प्रवृत्तींपासून समाजाचे रक्षण करणे, अन्यायाचा प्रतिकार करणे आणि समाजव्यवस्था सुरक्षित ठेवणे. हे त्याच्यासाठी नवीन नव्हते. तो अनेक वर्षांपासून हेच करत आला होता.
पण कुरुक्षेत्रावर त्याच्यासमोर दुसरा संघर्ष उभा राहिला होता—स्वतःच्या मनाशी संघर्ष.
त्याच्या मनात मोह निर्माण झाला होता. ममता निर्माण झाली होती. अज्ञानाने त्याला वेढले होते. कार्पण्यदोष, विषाद, संभ्रम—या सगळ्या गोष्टी त्याच्या अंतर्मनात निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे अर्जुनाला बाहेरच्या शत्रूविरुद्ध तर लढायचेच होते; पण त्याच वेळी स्वतःच्या आत निर्माण झालेल्या दुर्बलतेविरुद्धही लढायचे होते. म्हणूनच त्याने पळून जाणे हा पर्याय स्वीकारणे म्हणजे केवळ रणांगणातून पळणे नव्हते. ते स्वतःच्या स्वधर्मापासून पळणे होते.
स्वधर्मापासून पळालो तर काय होतं?
श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकांमध्ये एकेक परिणाम समजावून सांगतात.समाजाची मूल्यव्यवस्था चुकीच्या दिशेने जाऊ लागली, तर योग्य मूल्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी कुणीतरी उभं राहावं लागतं.ज्यावेळी न्यायाचे सर्व मार्ग बंद होतात, त्यावेळी संघर्ष अपरिहार्य होतो. क्षत्रियासाठी अशा वेळी युद्ध करणे हे केवळ कर्तव्य नसून सौभाग्याची संधी आहे, असे कृष्ण अर्जुनाला सांगतात. पण अर्जुन जर या कर्तव्यापासून पळून गेला, तर तो स्वतःचा स्वधर्म आणि कीर्ती गमावेल. त्याची अपकीर्ती होईल. एखाद्या सामान्य माणसाची अपकीर्ती जितकी वाईट, त्यापेक्षा एका श्रेष्ठ व्यक्तीची अपकीर्ती अधिक घातक असते. कारण श्रेष्ठ व्यक्तीचे आचरण समाजासाठी आदर्श ठरते. अर्जुनासारखा महारथी रणांगणातून पळून गेला, तर समाजासमोर कोणता संदेश जाईल?
आपल्या कमकुवतपणामुळे, भीतीमुळे किंवा मोहामुळे समाजाच्या चांगुलपणासाठी असलेल्या संघर्षातून पळून जाणे योग्य आहे, असा चुकीचा आदर्श निर्माण होईल.
म्हणून अर्जुनाने केवळ स्वतःसाठी लढायचे नाही; त्याच्या कृतीचा परिणाम संपूर्ण समाजावर होणार आहे.
मरण आणि विजय—दोन्हीमध्ये अर्थ आहे
कृष्ण अर्जुनाला सांगतात—तू युद्धात मरण पावलास, तरी तुझ्या कर्तव्याच्या पालनातून तुला श्रेय मिळेल; आणि जिंकलास, तर पृथ्वीवर राज्य करण्याची संधी मिळेल. म्हणजे परिणाम काहीही असो, कर्तव्यापासून पळणे हा पर्याय नाही. समाजासाठी स्वतःचं बलिदान देणं म्हणजे स्वतःचा संकोच संपवून व्यापक जीवनाशी जोडले जाणं. “मी”पासून “आपण”पर्यंतचा हा प्रवास आहे. माझं, माझ्यासाठी, माझ्यापुरतं—इथून बाहेर पडून “आपण” आणि “आपल्यासाठी” या व्यापक भावनेपर्यंत जाणं म्हणजेच व्यक्तीच्या विस्ताराची प्रक्रिया.जिंकलो तर यश आहेच. पण कर्तव्याच्या मार्गावर चालताना संघर्षात स्वतःला अर्पण केलं, तरी त्याला अर्थ आहे.
आता प्रश्न अर्जुनाचा नाही—आपला आहे!
आता या सगळ्या विचारांकडे स्वतःच्या आयुष्याच्या संदर्भात पाहूया. आपण आपल्या दिवसातील किती वेळ स्वतःच्या विकासासाठी वापरतो? आपल्या विकासामध्ये आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी आपण किती संघर्ष करतो? आपल्या स्वतःच्या कमतरता, सवयी, भीती, आळस, मोह, अहंकार आणि अस्वस्थता यांच्याविरुद्ध आपण किती लढतो? समाजामध्ये असणाऱ्या दुष्प्रवृत्तींच्या विरोधात आपण किती उभे राहतो? आपल्या स्वतःच्या दुष्प्रवृत्ती कमी करण्यासाठी आपण विधायक मार्ग किती वापरतो? आपल्याला अनेक गोष्टी कळतात.
पण कळतं आणि वळतं यात अंतर असतं.
हे अंतर का निर्माण होतं? आपल्याला निसर्गाचं संवर्धन करायचं आहे हे कळतं; पण प्रत्यक्षात आपण निसर्गाचं शोषण करणाऱ्या व्यवस्थेचा भाग बनतो. आपल्याला स्वतःवर नियंत्रण ठेवायचं आहे हे कळतं; पण आपल्या इच्छा, सवयी आणि मोह यांच्यासमोर आपण पुन्हा पुन्हा हरतो. आपल्याला समाज चांगला हवा आहे हे कळतं; पण समाजामध्ये बदल घडवण्यासाठी आवश्यक असलेला संघर्ष आपण टाळतो.
आणि मग प्रश्न उभा राहतो—
आपल्याला सत्य कळत असूनही आपण त्याप्रमाणे जगत का नाही?
याच ठिकाणी गीता आपल्याला जागं करते.
स्वतःचं रूप बदलणं हीसुद्धा एक लढाई आहे
आपलं स्वतःचं चांगलं रूप निर्माण करणं ही एक प्रक्रिया आहे. समाजाचं चांगलं रूप निर्माण करणं हीदेखील एक प्रक्रिया आहे. आणि या दोन्ही प्रक्रियांमध्ये जे काही अडथळे निर्माण होतील, त्यांच्याशी संघर्ष करावा लागणार आहे. पळून जाता येणार नाही. स्वतःच्या कमतरतांपासून पळून जाता येणार नाही. कर्तव्यापासून पळून जाता येणार नाही.समाजाच्या प्रश्नांपासून पळून जाता येणार नाही. आपल्या काळाच्या आव्हानांपासून पळून जाता येणार नाही. कारण पळणं म्हणजे समस्या संपवणं नव्हे; पळणं म्हणजे समस्या आपल्यामागे घेऊन जाणं.
एक गीत या विचाराला फार सुंदरपणे व्यक्त करतं—
संग्राम जिन्दगी है, लड़ना उसे पड़ेगा।
जो लड़ नहीं सकेगा, आगे नहीं बढ़ेगा॥
इतिहास कुछ नहीं है- संघर्ष की कहानी। राणा, शिवा, भगतसिंह- झाँसी की वीर रानी॥
कोई भी कायरों का, इतिहास क्यों पढ़ेगा?
आओ! लड़ें स्वयं से, कलुषों से कल्मषों से। भोगों से वासना से, रोगों के राक्षसों से॥
कुन्दन वही बनेगा, जो आग पर चढ़ेगा॥
घेरा समाज को है, कुण्ठा कुरीतियों ने। व्यसनों ने रूढ़ियों ने, निर्मम अनीतियों ने॥
इनकी चुनौतियों से, है कौन जो भिड़ेगा॥
चिन्तन, चरित्र में अब, विकृति बढ़ी हुई है। चहुँ ओर कौरवों की, सेना, खड़ी हुई है॥
क्या पार्थ इन क्षणों भी, व्यामोह में पड़ेगा॥
या गीताचा गाभा हाच आहे—
जीवन म्हणजे संघर्ष.
जीवन म्हणजे लढणं.
जीवन म्हणजे प्रगती.
जीवन म्हणजे आरोहण.
जीवन म्हणजे उत्क्रांती.
जीवन म्हणजे स्वतःच्या अधिक उन्नत रूपाकडे जाणं.
जीवन म्हणजे केवळ सुख शोधणं नाही. जीवन म्हणजे अडचणी टाळणं नाही.जीवन म्हणजे संघर्षापासून पळणं नाही.जीवन म्हणजे संघर्षातून स्वतःला घडवणं.
कृष्णाचा संदेश अर्जुनाला… आणि आपल्यालाही!
कुरुक्षेत्रावर कृष्ण अर्जुनाला केवळ युद्ध करण्यास सांगत नाहीत. ते त्याला सांगत आहेत—
तुझ्या जीवनात जे कर्तव्य आले आहे, त्यापासून पळू नकोस.
तुझ्या आत निर्माण झालेल्या दुर्बलतेपासूनही पळू नकोस.तुझ्या मोहाला सामोरं जा.तुझ्या भीतीला सामोरं जा.तुझ्या अज्ञानाला सामोरं जा.तुझ्या विषादाला सामोरं जा.आणि स्वतःच्या अधिक उन्नत रूपाच्या दिशेने वाटचाल कर.कारण स्वधर्म म्हणजे केवळ बाहेरच्या रणांगणात लढणं नाही; स्वधर्म म्हणजे आतल्या रणांगणातही लढणं.
आपल्याला स्वतःचं पूर्णत्व प्रकट करायचं आहे.इतरांच्या प्रगतीला हातभार लावायचा आहे. समाजाला अधिक चांगलं, अधिक न्याय्य आणि अधिक विकसित बनवायचं आहे.आणि या प्रक्रियेत जो अडथळा येईल, त्याच्याशी संघर्ष करायचा आहे. पळून जायचं नाही.
कारण विराटाच्या रणांगणावर उत्तराला सांगणारा अर्जुन आज कुरुक्षेत्रावर स्वतःलाच तोच प्रश्न विचारतो आहे—
“मी इतरांना सांगितलेला धर्म स्वतः जगणार आहे का?”
आणि कदाचित हाच प्रश्न आज कृष्ण आपल्यालाही विचारत आहेत—
“तुला जे सत्य कळलं आहे, ते तू जगणार आहेस का?”
कारण शेवटी,
स्वधर्मापासून पळणं म्हणजे स्वतःच्या विकासापासून पळणं.
आणि संघर्षाला सामोरं जाणं म्हणजे स्वतःच्या पूर्णत्वाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणं.
भीतीपेक्षाही मोह अधिक ताकदवान असतो!
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ५१
१७ ऑगस्ट २०२६
नमस्कार.
तुम्ही कधी शांतपणे बसून स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का—आपल्याला नेमकी कशाची भीती वाटते? मी स्वतः अनेकदा या प्रश्नाचा विचार केला आणि त्यातून भीतीची एक यादी तयार केली. तुम्हीही हा लेख वाचण्यापूर्वी, शक्य असेल तर तुमची स्वतःची यादी तयार करून पाहा. कारण आपल्याला नेमकी कशाची भीती वाटते, हे समजलं की त्यावर काम करणं सोपं होतं.
माझ्या मते, या यादीत सर्वात पहिल्या क्रमांकावर येतात दोन गोष्टी—मृत्यू आणि वेदना. मृत्यूची भीती आणि त्याच्याशी जोडलेली शारीरिक किंवा मानसिक वेदनेची भीती ही माणसाच्या मनात अतिशय खोलवर रुजलेली आहे. त्यानंतर येते भविष्यातील अनिश्चिततेची—Uncertainty—भीती. काय होईल? कसं होईल? पुढे काय घडणार आहे? या प्रश्नांनी माणूस अनेकदा अस्वस्थ होतो. त्यानंतर येते असुरक्षिततेची—Insecurity—आणि नियंत्रण गमावण्याची—Lack of Control—भीती. आपण स्वतःचं संरक्षण करू शकू का? संकट आलं तर त्याचा सामना करता येईल का? परिस्थिती हाताबाहेर गेली तर काय होईल? ही भावना माणसाला आतून खचवून टाकू शकते. त्यानंतरची मोठी भीती म्हणजे अपयशाची—Failure. आपली क्षमता आपण सिद्ध करू शकलो नाही, आपलं ध्येय साध्य झालं नाही, आपण कुठेतरी कमी पडलो—तर आपल्या स्वतःच्या नजरेतच आपली किंमत कमी झाल्यासारखी वाटते. अपयशाचा संबंध माणसाच्या अहंकाराशी, आत्मसन्मानाशी आणि स्वतःच्या प्रतिमेशी जोडलेला असतो.
यानंतर येते अस्वीकाराची—Rejection—भीती. आपल्याला नाकारलं जाईल, समूहातून दूर केलं जाईल, आपल्यावर बहिष्कार टाकला जाईल, आपल्याला एकटं पाडलं जाईल—ही भीती माणसाला खूप त्रास देते.आणि मग येते एक अतिशय मोठी भीती—निंदा, टीका, बदनामी आणि “लोक काय म्हणतील?” आपली प्रतिमा खराब झाली तर? लोक आपल्याबद्दल वाईट बोलले तर? आपली अब्रू गेली तर? आपल्यावर टीका झाली तर? ही भीती आजच्या सोशल मीडियाच्या काळात आणखी तीव्र झालेली दिसते. शेवटी—एकटेपणाची—Loneliness—भीती. कोणीतरी सतत आपल्या सोबत असावं, आपल्याला समजून घ्यावं, आपल्याला स्वीकारावं, आपली काळजी घ्यावी, अशी माणसाची नैसर्गिक इच्छा असते. हे नातं किंवा सोबत नसेल तर माणसाला आतून एक प्रकारचा धोका जाणवू लागतो.
अशा या भीतींची माझ्या मनात एक यादी तयार झाली. पण त्यानंतर मी स्वतःला आणखी एक प्रश्न विचारला—आजच्या काळात माणसाला या सगळ्या भीतींपैकी सर्वाधिक त्रास नेमका कशाचा होतो? आणि इथे एक विलक्षण गोष्ट जाणवते. आज अनेकांच्या मनावर सर्वात मोठं ओझं आहे—“लोक काय म्हणतील?” कपडे कसे घालायचे? करिअर कोणतं निवडायचं? काय बोलायचं? काय लिहायचं? कुठे जायचं? कसं वागायचं? अनेक वेळा प्रश्न असा नसतो की “मला काय आवडतं?” प्रश्न असा असतो—“लोकांना काय आवडेल?”
आज सोशल मीडिया, ट्रोलिंग, सार्वजनिक प्रतिमा आणि सततची तुलना यामुळे नकार, टीका आणि सामाजिक स्वीकाराची भीती अधिक तीव्र झालेली दिसते. म्हणजेच, माणसाला शरीराने किंवा मनाने होणाऱ्या वेदनेपेक्षा अनेकदा शब्दांची वेदना जास्त असह्य होते. आपण हे स्वतःच्या आयुष्यात तपासून पाहू शकतो. आपल्याला आयुष्यात सर्वाधिक त्रास कधी झाला? एक कारण असू शकतं—आपल्या शरीराने किंवा मनाने आपल्याला दिलेला त्रास. पण दुसरं कारण असतं—आपल्या आजूबाजूच्या माणसांनी आपल्याशी केलेलं वर्तन.
एखाद्याने आपला अपमान केला, विचित्र बोललं, कमी लेखलं, आपल्याबद्दल चुकीचं काहीतरी पसरवलं किंवा सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकल्यानंतर त्यावर खोटा किंवा अपमानास्पद प्रतिसाद आला, तरी मन किती अस्वस्थ होतं, हे आपण अनुभवतो. मी स्वतः हे अनेकदा अनुभवलं आहे. पाण्याच्या कामात मी चांगलं काम करत होतो. लोकांचं प्रेम मिळत होतं. कामाची दखल घेतली जात होती. बंधाऱ्यांवर माझं नाव लिहिलं गेलं. ज्ञान प्रबोधिनीच्या कामातून समाधान मिळत होतं. मराठवाड्यातील जलकार्यामुळे एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. पुरस्कार मिळाले, अनेक लोकांची मदत मिळाली, मोठ्या व्यक्तींशी काम करण्याची संधी मिळाली आणि केलेल्या कामाचं समाधानही होतं.
एकूणच सगळं सकारात्मक होतं. पण अचानक एका पत्रकाराने माझ्यावर टीका केली. आणि गंमत अशी की—हे सगळं चांगलं माझ्या आयुष्यात असतानाही त्या एका टीकेची तीव्रता इतकी मोठी होती, की काही दिवस मी बाकी सगळं विसरून गेलो. चार-पाच दिवस माझ्या डोक्यात तोच विचार फिरत राहिला. मग प्रश्न पडतो—इतकी शक्ती या “लोक काय म्हणतील?” या भावनेत कुठून येते?
इथेच मला भगवद्गीतेकडे पुन्हा पाहावंसं वाटतं.
आपण गीतेचा अभ्यास करतो आहोत. मग या सगळ्या भीतींचा गीतेशी संबंध काय? तर खूप खोल संबंध आहे. अर्जुनाच्या मनात युद्धाच्या प्रसंगी अनेक प्रकारच्या भीती, शंका आणि भावनिक संघर्ष निर्माण झालेले आहेत. मृत्यूच्या भीतीचं निराकरण करण्यासाठी श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याच्या अमरत्वाची जाणीव करून देतात. शरीर नश्वर आहे, जगात सतत परिवर्तन होत आहे, जन्म-मृत्यूच्या पलीकडे असलेलं आत्मतत्त्व वेगळं आहे—हे श्रीकृष्ण स्पष्ट करतात.
पण त्यानंतर श्रीकृष्ण फक्त अध्यात्म सांगून थांबत नाहीत. ते अर्जुनाच्या मनाशी अत्यंत वास्तववादी पद्धतीने संवाद साधतात. दुसऱ्या अध्यायातील ३१व्या श्लोकापासून पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देतात. ते अगदी स्पष्टपणे सांगतात—“तू युद्ध केलं नाहीस तर काय होईल, याचा विचार कर.”
युद्ध न केल्यास अर्जुनाचं काय नुकसान होईल?
१. स्वतःचा क्षत्रियधर्म सोडल्यामुळे तुला पापाचा भागीदार व्हावं लागेल.
२. जगात तुझी कीर्ती नष्ट होईल आणि अपकीर्ती कायम राहील.
३. लोक तुझ्या पराक्रमाची थट्टा करतील आणि तुला आयुष्यभर वाईट बोलतील.
४. महारथी योद्धे तुला भीतीपोटी युद्धातून पळून गेलेला समजतील.
५. ज्यांच्या नजरेत तू आदरणीय होतास, त्यांच्या नजरेत तू तुच्छ होशील.
६. तुझे शत्रू तुझ्या पराक्रमाला कमी लेखतील आणि तुझ्याबद्दल अपमानास्पद शब्द बोलतील.
७. हे दुःख मरणापेक्षाही अधिक त्रासदायक ठरेल.
म्हणजेच, श्रीकृष्ण अर्जुनाला एका प्रकारचं “जिवंत मरण” समजावून सांगत आहेत.
पण त्याचबरोबर ते दुसरी बाजूही दाखवतात.
युद्ध केल्यास अर्जुनाला काय मिळेल?
१. युद्धात मारला गेलास तर स्वर्गप्राप्ती होईल.
२. युद्ध जिंकलास तर पृथ्वीचं राज्य भोगशील.
३. तुझी कीर्ती आणि यश सर्वत्र पसरतील.
४. आपल्या क्षत्रियधर्माचं पालन केल्याचं समाधान तुला मिळेल.
५. कर्तव्यापासून पळाल्यामुळे निर्माण होणाऱ्या पापापासून तू मुक्त राहशील.
म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनासमोर अक्षरशः लेखाजोखा मांडतात—युद्ध केल्याने काय होईल आणि युद्ध न केल्याने काय होईल!
अतिशय व्यावहारिक, वास्तववादी आणि मनोवैज्ञानिक पद्धतीने श्रीकृष्ण अर्जुनाच्या मानसिकतेवर काम करत आहेत.
आता आपल्या सुरुवातीच्या भीतींची यादी या ठिकाणी पुन्हा आठवा—मृत्यू, वेदना, अनिश्चितता, असुरक्षितता, अपयश, अस्वीकार, निंदा-बदनामी आणि एकटेपणा. यापैकी कितीतरी भीतींचा थेट किंवा अप्रत्यक्ष संदर्भ श्रीकृष्ण अर्जुनाशी करत आहेत.
पण इथे मला एक फार महत्त्वाचा प्रश्न पडतो—मग अर्जुनाला हे सगळं माहीत असूनही तो मोहातून बाहेर का येत नाही? आत्म्याचं अमरत्व त्याला सांगितलं गेलं. जगाचं नश्वर स्वरूप सांगितलं गेलं. कर्तव्य सांगितलं गेलं. युद्ध न केल्याचे परिणाम सांगितले गेले. युद्ध केल्याचे फायदे सांगितले गेले. कीर्ती-अपकीर्ती समजावून सांगितली. यश-अपयश समजावून सांगितलं. तरीही अर्जुनाच्या मनावरचा मोह इतका प्रभावी आहे की हे सगळं त्याला पुरेसं वाटत नाही.
इथेच आजच्या आपल्या आयुष्याचा एक अत्यंत महत्त्वाचा धडा दडलेला आहे. माणसाला अनेकदा काय योग्य आहे हे माहीत असतं. त्याला परिणाम माहीत असतात. फायदे-तोटे माहीत असतात. धोके माहीत असतात. आपण कुठे चुकतोय, हेही माहीत असतं. तरीही तो चुकीचा निर्णय घेतो.
का?
कारण त्या क्षणी मोहाची ताकद विवेकापेक्षा मोठी झालेली असते.
मोह माणसाच्या भीतीला झाकतो. मोह माणसाच्या विवेकाला झाकतो. मोह माणसाला होणारे नुकसान दिसू देत नाही. आणि कधी कधी तर माणसाला मिळणारे फायदेही दिसू देत नाही.
आपण स्वतःच्या आयुष्यात हे किती वेळा अनुभवतो! आपल्याला माहिती असतं—हे नातं आपल्यासाठी चांगलं नाही. माहिती असतं—हा निर्णय चुकीचा आहे. माहिती असतं—याचे परिणाम वाईट होणार आहेत. माहिती असतं—आपण स्वतःलाच नुकसान करून घेत आहोत. तरीही आपण म्हणतो—“नाही. मला हेच करायचं आहे.”
हा क्षण म्हणजे मोहाचा क्षण.
आणि म्हणूनच मोह हा केवळ भावनिक शब्द नाही. मोह ही माणसाच्या निर्णयक्षमतेवर परिणाम करणारी एक अत्यंत शक्तिशाली मानसिक अवस्था आहे. भीती आपल्याला थांबवते. पण मोह? मोह आपल्याला सत्य माहीत असूनही पुढे ढकलतो. भीती म्हणते—“हे करू नकोस.” विवेक म्हणतो—“हे योग्य नाही.” अनुभव म्हणतो—“याचे परिणाम वाईट आहेत.” पण मोह म्हणतो—“तरीही कर!” आणि म्हणूनच आयुष्यातील मोहाचे क्षण आपल्याला फार ताकदीने ओळखावे लागतात. कारण मोहाच्या क्षणी आपल्याला सत्य दिसत नसतं असं नाही. सत्य दिसत असतं; पण ते स्वीकारण्याची आपली तयारी संपलेली असते.
अर्जुनाच्या मनातली ही अवस्था आपल्याला म्हणूनच महत्त्वाची आहे. गीता केवळ रणांगणावर उभ्या असलेल्या अर्जुनाची कथा नाही. गीता आपल्या मनात रोज उभ्या राहणाऱ्या त्या रणांगणाची कथा आहे. एका बाजूला भीती, दुसऱ्या बाजूला मोह. एका बाजूला विवेक, दुसऱ्या बाजूला भावनिक ओढ. एका बाजूला काय योग्य आहे याची जाणीव आणि दुसऱ्या बाजूला—“मला हे सोडवत नाही.” यातून बाहेर पडण्यासाठी केवळ माहिती पुरेशी नसते. केवळ परिणाम माहीत असणं पुरेसं नसतं. केवळ भीती ओळखणं पुरेसं नसतं.
मोह ओळखावा लागतो.
मोहाच्या क्षणी स्वतःला थांबवावं लागतं. स्वतःला विचारावं लागतं—“मी हा निर्णय विवेकाने घेतो आहे की मोहाने?” हा एक प्रश्न अनेक चुकीच्या निर्णयांपासून आपल्याला वाचवू शकतो. म्हणून आपल्या आयुष्यात भीती समजून घेणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच—किंबहुना त्याहून अधिक—मोह समजून घेणं महत्त्वाचं आहे.
कारण भीती कधी कधी आपल्याला संकटापासून वाचवते. पण मोह अनेकदा संकट माहीत असूनही त्याच दिशेने घेऊन जातो.
म्हणूनच—
भीतीला सामोरं जायचं असेल तर धैर्य लागतं.
पण मोहाला सामोरं जायचं असेल तर विवेक लागतो.
आणि कदाचित भगवद्गीतेचा हा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे—
आपल्या आयुष्यात बाहेरची युद्धं जिंकण्यापूर्वी, मनातल्या मोहावर विजय मिळवावा लागतो.
कारण मोह जिंकला की विवेक जागा होतो. आणि विवेक जागा झाला की आपल्याला काय करायचं आहे, याचं उत्तर बाहेर शोधावं लागत नाही—ते आपल्या आतूनच स्पष्ट ऐकू येऊ लागतं.
“उठ! आता युद्ध कर!”
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ५२
१८ ऑगस्ट २०२६
नमस्कार.
अर्जुनाचा विषाद झाला. रणांगणाच्या मध्यभागी उभा राहिल्यानंतर त्याच्या मनात निर्माण झालेला संघर्ष त्याने श्रीकृष्णांसमोर मोकळेपणाने व्यक्त केला. आपल्या मनाची अवस्था काय आहे, आपल्याला नेमकं काय वाटतंय, आपण का गोंधळलो आहोत, युद्ध का करावंसं वाटत नाही—हे सगळं अर्जुनाने श्रीकृष्णांना सांगितलं. आणि या सगळ्या विचारांच्या, प्रश्नांच्या आणि संभ्रमाच्या शेवटी अर्जुन एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचतो. तो म्हणतो—“शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्।” म्हणजे, “मी तुमचा शिष्य आहे; मला शिष्य म्हणून स्वीकारा आणि मला मार्गदर्शन करा.” अर्जुनाने स्वतःला श्रीकृष्णांच्या स्वाधीन केलं. इथे अर्जुनाचं शिष्यत्व स्पष्टपणे व्यक्त होतं.
पण श्रीकृष्णांनी कुठेही असं म्हटलेलं नाही की, “आता मी तुझा गुरू आहे.” तरीही त्यानंतर जे घडतं, त्यातून एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते—श्रीकृष्णांनी अर्जुनाचं शिष्यत्व स्वीकारलं आणि गुरुत्वाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर सुरू होते ती ज्ञानाची गंगा, तत्त्वज्ञानाची गंगा आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारी एक अद्भुत प्रक्रिया. श्रीकृष्ण अर्जुनाला एका प्रश्नाचं उत्तर देऊन थांबत नाहीत. ते त्याच्या मनातल्या प्रत्येक स्तराला स्पर्श करतात. त्याच्या भावनांना समजून घेतात, त्याच्या प्रश्नांचा विचार करतात आणि हळूहळू त्याला स्वतःच्या मनाच्या पलीकडे घेऊन जातात.
या संपूर्ण प्रक्रियेत एक गोष्ट मात्र विशेष लक्षात येते. दुसऱ्या अध्यायात अशा पाच जागा आहेत, जिथे श्रीकृष्ण थेट अर्जुनाला उठण्याचं किंवा युद्ध करण्याचं आवाहन करतात. पहिल्या ठिकाणी ते फक्त “उठ” असं म्हणतात; त्यानंतर चार ठिकाणी ते थेट “युद्ध कर” असं सांगतात. आणि या पाचही ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला वेगवेगळ्या कारणांनी कर्मासाठी उभं करत आहेत. या पाच टप्प्यांकडे पाहिलं, तर श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनाला कसं तयार करत आहेत, याची एक सुंदर प्रक्रिया आपल्या लक्षात येते.
सगळ्यात पहिलं आवाहन दुसऱ्या अध्यायाच्या तिसऱ्या श्लोकात येतं. अर्जुनाची मानसिक अवस्था पाहून श्रीकृष्ण त्याला म्हणतात—
“क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप॥ २.३॥”
म्हणजे, “हे पार्था, या दुर्बलतेला शरण जाऊ नकोस. ही तुझ्यासारख्याला शोभणारी नाही. हृदयातील ही क्षुद्र दुर्बलता सोडून उठ!” इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. श्रीकृष्ण अजून “युद्ध कर” असं म्हणत नाहीत. अर्जुन बसलेला आहे, त्याचं मन खचलेलं आहे, विचारांच्या आणि भावनांच्या संघर्षात तो अडकलेला आहे. त्यामुळे श्रीकृष्ण सर्वप्रथम म्हणतात—“उठ!” युद्ध नंतर येईल; आधी मानसिक दुर्बलता झटकून उभं राहणं आवश्यक आहे. जणू श्रीकृष्ण म्हणत आहेत—तू आधी स्वतःला सावर, आपल्या मनाला उभं कर आणि मग पुढचं ऐक.
यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याचं स्वरूप समजावून सांगायला सुरुवात करतात. देह नाशवान आहे, पण आत्मा नित्य आहे; शरीराचा अंत होतो, पण आत्म्याचा नाश होत नाही—हे ते विविध श्लोकांमधून समजावतात. आणि त्यानंतर अठराव्या श्लोकात ते पुन्हा थेट कर्माकडे वळतात—
“अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद् युध्यस्व भारत॥ २.१८॥”
श्रीकृष्ण म्हणतात—हे शरीर नाशवान आहे; परंतु शरीरात असलेला आत्मा नित्य आणि अविनाशी आहे. म्हणून युद्ध कर. म्हणजे आत्म्याच्या अमरत्वाचं ज्ञान झालं, म्हणून आता कर्तव्यापासून मागे हटू नकोस. केवळ शरीराच्या नाशाचा विचार करून कर्तव्य टाळणं योग्य नाही. इथे पहिल्यांदा स्पष्टपणे “युध्यस्व” — युद्ध कर हा शब्द येतो.
यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या स्वधर्माची जाणीव करून देतात. ते म्हणतात—
“स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि।
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते॥ २.३१॥”
“स्वधर्माचा विचार केला तरी तुला विचलित होता कामा नये. क्षत्रियासाठी धर्मयुक्त युद्धापेक्षा अधिक श्रेयस्कर दुसरं कर्तव्य नाही.” इथे आत्म्याच्या ज्ञानानंतर आता स्वधर्माचं ज्ञान समोर येतं. तू कोण आहेस, तुझ्या वाट्याला आलेलं कर्तव्य काय आहे, तुझी जबाबदारी काय आहे—हे समजून घे आणि त्यापासून विचलित होऊ नकोस. म्हणून इथेही संदेश स्पष्ट आहे—स्वधर्म समजला आहे, म्हणून युद्ध कर. हा फक्त युद्धाचा आग्रह नाही; आपल्या वाट्याला आलेल्या कर्तव्यापासून पळू नये, हा त्यामागचा व्यापक विचार आहे.
त्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धाच्या परिणामांची बाजू समजावून सांगतात. ते म्हणतात—
“हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः॥ २.३७॥”
“युद्धात मृत्यू आला तर स्वर्ग प्राप्त होईल आणि जिंकलास तर पृथ्वीचा उपभोग घेशील. म्हणून हे कौन्तेय, युद्धाचा निश्चय करून उठ.” इथे पुन्हा “उत्तिष्ठ” — उठ हा शब्द येतो आणि त्यासोबत येतो “कृतनिश्चयः” — निश्चय केलेला असावा. म्हणजे परिस्थितीचा विचार कर, परिणाम समजून घे, पण परिणामाच्या भीतीने कर्तव्य सोडू नकोस. जिंकलास तर एक परिणाम, मृत्यू आला तर दुसरा परिणाम; पण या दोन्ही शक्यतांच्या पलीकडे जाऊन निश्चयपूर्वक आपल्या कर्तव्यासाठी उभं राहा. युद्धाचा निश्चय करून उठ!
आणि त्यानंतर येतो या मालिकेतील अत्यंत सुंदर आणि पुढच्या संपूर्ण कर्मयोगाची दिशा दाखवणारा श्लोक—
“सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि॥ २.३८॥”
“सुख-दुःख, लाभ-हानी आणि जय-पराजय यांना समान मानून मग युद्धासाठी सज्ज हो. अशा प्रकारे कर्म केल्यास तुला पाप लागणार नाही.” हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. कारण इथपर्यंत श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याचं ज्ञान सांगतात, स्वधर्म समजावतात, परिणामांची बाजू सांगतात आणि निश्चयपूर्वक उभं राहायला सांगतात. पण आता ते एका वेगळ्याच पातळीवर जातात. युद्ध करायचं आहे, पण कोणत्या मानसिकतेने करायचं? सुख-दुःख येईल, लाभ-हानी होईल, जय-पराजय येईल; पण या सगळ्यांमध्ये मनाचं संतुलन ढळता कामा नये. कर्म करायचं, पण मनाला परिणामांच्या दोरीने बांधून घ्यायचं नाही. हीच तर पुढे कर्मयोगाची दिशा आहे.
म्हणजे दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनाला पाच ठिकाणी उठण्याचं किंवा युद्ध करण्याचं आवाहन केलं आहे. पहिल्या ठिकाणी—“दुर्बलता सोडून उठ.” दुसऱ्या ठिकाणी—“आत्मा अमर आहे, म्हणून युद्ध कर.” तिसऱ्या ठिकाणी—“स्वधर्माचा विचार करून युद्ध कर.” चौथ्या ठिकाणी—“परिणामांचा विचार करून निश्चयपूर्वक युद्धासाठी उठ.” आणि पाचव्या ठिकाणी—“सुख-दुःख, लाभ-हानी, जय-पराजय समान मानून युद्ध कर.” म्हणजे श्रीकृष्ण एकदम आदेश देऊन थांबत नाहीत; ते अर्जुनाला त्या आदेशापर्यंत पोहोचवतात.
आणि इथेच मला भगवद्गीतेचा एक अत्यंत सुंदर पैलू जाणवतो. अर्जुन लगेच उठून युद्धाला जात नाही. आत्म्याचं अमरत्व सांगितलं, तरी तो लगेच उठत नाही. स्वधर्म सांगितला, तरी तो लगेच उठत नाही. युद्धाचे परिणाम समजावले, तरी त्याच्या मनातील प्रश्न संपत नाहीत. कारण अर्जुनाचा प्रश्न केवळ “युद्ध करावं की करू नये?” एवढाच नाही. त्याच्या मनातला खरा प्रश्न आहे—“मी कर्म करताना स्वतःला कसं सांभाळू?”
म्हणूनच यानंतरची प्रक्रिया अधिक महत्त्वाची आहे. “युद्ध कर” हे सांगणं सोपं आहे; पण युद्ध करताना मनाची अवस्था कशी असावी, हे समजावणं ही खरी गुरुत्वाची परीक्षा आहे. युद्धाकडे पाहताना आपली मानसिकता कशी असली पाहिजे? कर्म करताना आपल्या मनाचा भाव कसा असला पाहिजे? आपल्या दृष्टिकोनात काय असलं पाहिजे? यश मिळालं तर आपण वाहवत जाऊ नये आणि अपयश आलं तर कोसळू नये, यासाठी अंतर्मन कसं तयार करायचं? या सगळ्याची प्रक्रिया आता श्रीकृष्ण हळूहळू उलगडत जाणार आहेत.
कारण युद्ध हे इथे केवळ युद्ध नाही; युद्ध म्हणजे कर्म. अर्जुनाच्या जीवनात कुरुक्षेत्रावरचं युद्ध आहे, पण आपल्या जीवनातही प्रत्येकाच्या वाट्याला आपापली कुरुक्षेत्रं आहेत. आपण रोज वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरं जात असतो. कधी अशी कर्मं करावी लागतात जी आपल्याला कराविशी वाटत नाहीत; कधी काही कर्मं आपल्याला कराविशी वाटतात, पण ती करणं योग्य असेलच असं नाही. काही कर्मं अपरिहार्य असतात. काही श्रेयस्कर असतात, काही प्रेयस्कर असतात. कर्माची तीव्रता वेगवेगळी असते, परिस्थिती वेगवेगळी असते, उद्देश वेगळे असतात आणि त्या कर्मामागचा आपला भावही वेगळा असतो.
मग प्रश्न उभा राहतो—कर्म टाळायचं का? आणि जर कर्म करायचं असेल, तर ते कसं करायचं? कर्म करत असताना आपलं मन कसं असावं? आपल्या अपेक्षा काय असाव्यात? परिणामाकडे आपण कसं पाहावं? आपल्या भावनांनी आपल्या निर्णयांवर राज्य करू द्यावं का? की आपल्या बुद्धीने त्या भावनांना दिशा द्यावी? हे प्रश्न केवळ अर्जुनाचे नाहीत. हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातले प्रश्न आहेत.
म्हणूनच अर्जुनाचा प्रश्न युद्धाचा असला, तरी श्रीकृष्णांचं उत्तर जीवनाचं आहे. अर्जुन कुरुक्षेत्रावर उभा आहे; पण श्रीकृष्ण त्याला माणसाच्या संपूर्ण जीवनाचा मार्ग समजावून सांगत आहेत. आपल्याला जे कर्म करायचं आहे, ते का करायचं? कर्मापासून पळणं योग्य आहे का? कर्म करताना आसक्ती कशी निर्माण होते? कर्माचा परिणाम आपल्यावर इतका प्रभाव का टाकतो? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे—कर्म करत असतानाही मनुष्य अंतर्बाह्य स्वतंत्र कसा राहू शकतो?
या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं भगवद्गीता पुढे एकेक करून उलगडत जाते.
आणि म्हणून दुसरा अध्याय हा केवळ अर्जुनाला युद्धासाठी तयार करणारा अध्याय नाही. तो मनुष्याला जीवनासाठी तयार करणारा अध्याय आहे. सुरुवात होते ती एका खचलेल्या अर्जुनापासून. त्याला आधी दुर्बलतेतून बाहेर काढलं जातं—“उत्तिष्ठ!” मग आत्म्याचं ज्ञान दिलं जातं. स्वधर्माची जाणीव करून दिली जाते. परिणामांची भीती कमी केली जाते. निश्चयपूर्वक उभं राहायला सांगितलं जातं. आणि शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते—सुख-दुःख, लाभ-हानी, जय-पराजय यांच्यात समत्व राखून कर्म कर.
म्हणजे श्रीकृष्णांचा पहिला संदेश आहे—उठ!
पण पुढचा प्रवास सांगतो—
फक्त उठायचं नाही; समजून उठायचं.
फक्त युद्ध करायचं नाही; समत्वाने युद्ध करायचं.
फक्त कर्म करायचं नाही; कर्मयोग जगायचा.
आणि खरं तर, इथूनच भगवद्गीतेच्या कर्मयोगाची खरी सुरुवात होते.
सुख-दुःखाच्या पलीकडे
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ५३
१९ ऑगस्ट २०२६
नमस्कार.
“सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ। ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि॥”
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात—सुख-दुःख, लाभ-हानी आणि जय-पराजय यांना समान मानून युद्धासाठी उभा राहा. या श्लोकाचा विचार करताना मला नेहमी एक साधी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट जाणवते. या सहा शब्दांकडे आपण थोडं शांतपणे पाहिलं, तर त्यातील तीन शब्द आपल्याला आवडणारे आहेत—सुख, लाभ आणि जय; तर तीन शब्द आपल्याला नकोसे वाटणारे आहेत—दुःख, हानी आणि पराजय. आपल्या आयुष्यात पहिल्या तीन गोष्टी सतत घडाव्यात, असं आपल्याला मनापासून वाटतं. पण दुसऱ्या तीन गोष्टी आपल्या आयुष्यात कधीच घडू नयेत, अशी इच्छा ठेवली तर ती वास्तवाला धरून आहे का?
आपण समाजात राहतो, जगात राहतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत, तशाच काही वाईट गोष्टीही घडणार आहेत. ही गोष्ट सर्वप्रथम स्वीकारावी लागेल. आयुष्य हे केवळ सकारात्मक घटनांचं नाव नाही; आयुष्य हे सकारात्मक आणि नकारात्मक अनुभवांचं एकत्रित रूप आहे. सुख आहे म्हणून दुःख येणार नाही, लाभ झाला म्हणून हानी होणार नाही किंवा एखाद्या वेळी जय मिळाला म्हणून पराजय कधीच येणार नाही, असं जीवनाचं गणित नाही. उलट, या दोन्ही टोकांमधूनच जीवनाची खरी समृद्धी घडत असते.
प्रामाणिकपणे सांगायचं तर आपल्याला सुख हवं असतं. चांगल्या गोष्टी हव्या असतात. यश मिळावं, लाभ मिळावा, आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्ती आपल्या जवळ राहाव्यात, आपण जे ठरवू ते साध्य व्हावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण या सकारात्मक गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत असतानाच, त्याच वेळी काही नकारात्मक अनुभव आपल्या वाट्याला येणार आहेत, याची मानसिक तयारीही असली पाहिजे. स्वीकार म्हणजे नकारात्मक गोष्टींचं स्वागत नव्हे; तर त्या जीवनाचा भाग आहेत, हे वास्तव मान्य करणं.
एकदा शांतपणे आपल्या आयुष्याकडे वळून पाहूया. आपल्या आयुष्यातला एखादा अतिशय सुखद क्षण आठवूया. असा एखादा क्षण, ज्यावेळी आपल्याला प्रचंड आनंद झाला होता; एखादा मोठा लाभ मिळाला होता; आपण काहीतरी विलक्षण साध्य केलं होतं; आपल्या प्रयत्नांना जय मिळाला होता. त्याचबरोबर असा एखादा क्षणही आठवूया, ज्यावेळी आपण प्रचंड दुःखी झालो होतो; एखादी अत्यंत जवळची व्यक्ती आपल्यापासून दूर गेली होती; एखादी अतिशय आवडती वस्तू गमावली होती; मोठी हानी झाली होती; किंवा आपण एखाद्या प्रसंगी पराजित झालो होतो, नामुष्की आली होती. शक्यतो आयुष्यातले दोन टोकाचे क्षण आठवूया—एक अत्यंत सकारात्मक आणि एक अत्यंत नकारात्मक.
आता त्या दोन्ही घटनांकडे थोड्या अंतरावरून पाहूया. त्या घटना घडल्यानंतरचा तीव्र परिणाम किती काळ टिकला? त्या क्षणी जेवढा आनंद झाला होता, तेवढाच आनंद आजही आहे का? त्या वेळी झालेलं दुःख आजही तितकंच तीव्र आहे का? अनुभव सांगतो की काळाचा प्रवाह दोन्ही टोकांच्या अनुभवांना हळूहळू विरळ करत जातो. सुखाची तीव्रता कमी होते, दुःखाची दाहकता कमी होते. घटना आपल्या आयुष्यात घडून जाते; तिचा तत्कालीन परिणाम कमी होत जातो. आपण हळूहळू त्या घटनेपासून पुढे जातो. कधी कधी तर आपण ती घटनाही विसरतो. मात्र, त्या घटनेचे काही ठसे—काही इम्प्रेशन्स—आपल्या मनात किंवा चित्तात राहतात.
यातून एक महत्त्वाची संकल्पना समोर येते. कुठलीही सुखाची गोष्ट असो किंवा दुःखाची, सकारात्मक असो किंवा नकारात्मक—तिचा अंत निश्चित असतो. ती किती काळ टिकणार, तिचा तात्कालिक परिणाम किती तीव्र असणार आणि तिचे ठसे आपल्या मनावर किती काळ राहणार, हे वेगवेगळं असू शकतं; पण कोणतीही अवस्था कायमची नसते. सुख येतं आणि जातं. दुःख येतं आणि जातं. लाभ मिळतो आणि बदलतो. हानी होते आणि तिची तीव्रताही काळाबरोबर कमी होते. जय मिळतो आणि पुढचा संघर्ष उभा राहतो. पराजय होतो आणि त्यानंतर पुन्हा उभं राहण्याची संधी मिळते.
म्हणूनच जीवन आपल्याला एक मोठा धडा शिकवत असतं—काळ आपल्याला विसरायला शिकवतो. आपण विशेष काही प्रयत्न केले नाहीत, तरीही संसाराची गती, आजूबाजूच्या घटना आणि काळाचा प्रवाह आपल्याला अनेक सुख-दुःखांपासून हळूहळू दूर घेऊन जातो. पण प्रश्न असा आहे की, त्या अनुभवांचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर आपण काय परिणाम होऊ देतो? कारण घटना संपते; पण तिच्याबद्दलची आपली भूमिका अनेकदा टिकून राहते.
उदाहरणार्थ, आपली खूप आवडती वस्तू हरवली. ती वस्तू मिळवण्यासाठी आपण खूप कष्ट घेतले होते. किंवा एखादी अत्यंत प्रिय व्यक्ती अचानक एखाद्या दुर्घटनेतून आपल्यापासून दूर गेली. त्या क्षणी होणारा धक्का प्रचंड असतो. मन, शरीर आणि बुद्धी—सगळ्यावर त्याचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे आपण अनेक वर्षे कष्ट केले आणि एखादं मोठं यश मिळवलं, तर त्याचा आनंदही तीव्र असतो. सकारात्मक अनुभव आपल्याला ऊर्जा देतात, प्रेरणा देतात, आनंद देतात. पण इथेही एक धोका आहे.
तो धोका म्हणजे—“असंच माझ्या आयुष्यात सतत घडत राहिलं पाहिजे!” हा अट्टाहास. सुखाचा अनुभव स्वतःमध्ये चुकीचा नाही; पण त्या सुखाची पुनरावृत्ती करण्याचा अट्टाहास निर्माण झाला, तर आपल्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारची कमकुवतता निर्माण होऊ शकते. “माझ्या आयुष्यात असंच घडलं पाहिजे”, “मला हेच मिळालं पाहिजे”, “मला पराजय कधीच स्वीकारायचा नाही”, “माझ्या आयुष्यात हानी कधीच होऊ नये”—अशा अपेक्षा चित्तावर खोलवर उमटल्या, की आपण वास्तवाशी संघर्ष करू लागतो.
शरीर, मन आणि बुद्धीवर झालेला परिणाम काळाबरोबर धुऊन निघू शकतो; पण चित्तावर उमटलेला अट्टाहासाचा ठसा अधिक धोकादायक असतो. “असंच घडलं पाहिजे” या आग्रहासाठी माणूस चांगले-वाईट कोणतेही मार्ग स्वीकारण्याची मानसिकता निर्माण करू शकतो. आणि मग एक सकारात्मक अनुभवसुद्धा भविष्यातील नकारात्मक अनुभवाचं कारण बनू शकतो. कारण सुख आपल्याला सुखी करत नाही; सुखाबद्दलची आपली आसक्ती आपल्याला अस्वस्थ करू शकते.
दुःखाच्या बाबतीतही हेच आहे. नकारात्मक घटना घडली की त्याचा परिणाम होणारच. शरीरावर, मनावर, बुद्धीवर त्याचा आघात होतो. एखादी तीव्र घटना काही काळ आपल्याला हादरवून सोडते. पण माणसामध्ये त्या अनुभवाला सहन करण्याची आणि त्यातून बाहेर पडण्याची ताकदही असते. मात्र, जेव्हा नकारात्मक अनुभवांची पुनरावृत्ती होते, किंवा एखाद्या दुःखद घटनेचं सतत अनुधावन आपण करत राहतो, तेव्हा त्रास वाढतो. घटना एकदाच घडलेली असते; पण आपण ती मनात शंभर वेळा पुन्हा घडवत असतो.
म्हणूनच एखादी नकारात्मक घटना घडल्यानंतर तिची सतत आठवण काढत राहणं, तिच्याभोवतीच आपलं आयुष्य फिरवत राहणं, किंवा “हे माझ्याबरोबरच का घडलं?” या प्रश्नात अडकून राहणं आपल्यासाठी अधिक त्रासदायक ठरतं. दुःख विसरणं म्हणजे त्या घटनेचा अपमान करणं नाही; तर त्या घटनेला आपल्या संपूर्ण आयुष्यावर राज्य करू न देणं. त्याचा परिणाम हळूहळू निष्प्रभ करण्यासाठी आपल्या स्वतःच्या पद्धती आपण शोधल्या पाहिजेत.
हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण दुःखाशी सामना करण्याच्या आपल्या पद्धती विकसित करत नाही. आपण दुःखाला गोंजारण्यात वेळ घालवतो. त्याचप्रमाणे सुख मिळालं की त्यातच मश्गूल होतो. पण या दोन्ही अवस्थांना कसं सामोरं जायचं, त्यांना कसं स्वीकारायचं आणि त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम कसा संतुलित ठेवायचा, यासाठी आपण स्वतःच्या पद्धती विकसित केल्या पाहिजेत.
खरं तर हे प्रत्येक माणसाला जमू शकतं. आपल्याला आपल्या मनाची साधनं विकसित करता येतात; पण आपण त्यासाठी वेळ देत नाही. दुःख आलं की आपण दुःखातच राहतो आणि सुख आलं की सुखाला घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो. दोन्ही अवस्थांपासून थोडं अंतर ठेवून त्यांच्याकडे पाहण्याची सवय मात्र आपण लावत नाही. आणि समत्वाची साधना म्हणजे नेमकं हेच अंतर निर्माण करणं.
नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यात घडूच नयेत, असा अट्टाहास चुकीचा आहे. त्याचप्रमाणे नकारात्मक घटना घडल्यानंतर “आता माझं काही खरं नाही”, “माझ्याच बाबतीत असं का होतं?”, “मी हे सहन करू शकत नाही” अशा विचारांतून स्वतःबद्दल संशय आणि मानसिक दुर्बलता निर्माण करणंही तितकंच चुकीचं आहे. म्हणून पहिली गोष्ट स्वीकारायची—सुख-दुःख, लाभ-हानी आणि जय-पराजय हे आयुष्यात अपरिहार्य आहेत.
त्यांचे तात्कालिक परिणाम आपल्यावर होणारच. पण काळाच्या प्रवाहात त्यांची तीव्रता कमी होत जाणार आहे. म्हणूनच त्या क्षणी आपण कसे वागतो, कसे बोलतो, कसे विचार करतो आणि त्या अनुभवाला कसं सामोरं जातो, हे अधिक महत्त्वाचं आहे. घटना आपल्या हातात नसते; पण घटनेनंतरची आपली प्रतिक्रिया आपल्या साधनेचा भाग असते.
इथे भगवद्गीतेतील आणखी एक विचार आठवतो—“अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत। अव्यक्तनिधनान्येव…” जीवनातील अनेक गोष्टी अव्यक्त अवस्थेतून व्यक्त होतात आणि पुन्हा अव्यक्त होतात. सुख-दुःखही त्याच प्रवाहाचा भाग आहेत. ते कधी येतील, किती काळ राहतील आणि कधी निघून जातील, हे पूर्णपणे आपल्या हातात नसतं. पण त्या व्यक्त अवस्थेत आपण कसे जगतो, यावर आपल्या जीवनाची गुणवत्ता निश्चित होते.
आता या सुख-दुःखाकडे आणखी एका वेगळ्या दृष्टीने पाहता येईल. आपण प्रचंड काम केलं आणि प्रचंड थकलो. शरीराला आपण आव्हान दिलं. आपण खूप मेहनत केली आणि शरीरात वेदना निर्माण झाल्या. आपण आपल्याकडे असलेली एखादी मौल्यवान गोष्ट जाणीवपूर्वक दुसऱ्याला दिली—दान केलं. बाहेरून पाहिलं तर यात काही प्रमाणात त्याग, कष्ट किंवा अस्वस्थता आहे. पण आपण ते ठरवून स्वीकारलं आहे. हाच फरक महत्त्वाचा आहे.
शरीराला आव्हान देणं, मनाला आव्हान देणं आणि बुद्धीला आव्हान देणं—हीदेखील समत्वाची तयारी आहे. आपण जाणीवपूर्वक स्वतःला काही आव्हानं दिली, स्वतःला आपल्या आरामाच्या मर्यादेपलीकडे नेलं, कष्ट सहन केले आणि त्या अनुभवातून परत उभं राहायला शिकलो, तर जीवनातील अनपेक्षित सुख-दुःखांना सामोरं जाण्याची आपली क्षमता वाढते.
म्हणूनच समत्व ही केवळ तात्त्विक कल्पना नाही; ती एक प्रशिक्षणप्रक्रिया आहे. शरीराची व्यायामाने तयारी करतो, मनाचीही व्यायामाने तयारी करता येते आणि बुद्धीचीही आव्हानांनी तयारी करता येते. स्वतःला जाणीवपूर्वक काही आव्हानं देणं, अस्वस्थतेला थोडं सहन करणं, काही गोष्टींचा त्याग करणं, एखादं कठीण काम पूर्ण करणं, मनाला न आवडणाऱ्या परिस्थितीतही शांत राहण्याचा प्रयत्न करणं—या सगळ्या समत्वाच्या छोट्या-छोट्या सरावाच्या पद्धती आहेत.
यासाठी ज्ञानही आवश्यक आहे. वास्तवाचं ज्ञान आपला दृष्टिकोन बदलतं. हे येणार आहे आणि जाणार आहे; हे नश्वर आहे; कोणतीही अवस्था कायमची नाही, हे कळलं की आपण अनुभवांना वेगळ्या नजरेने पाहू लागतो. पण केवळ ज्ञान पुरेसं नाही. ज्ञानासोबत अनुभव आणि सरावही हवा. स्वतःला दिलेली आव्हानं, त्यातून मिळालेला अनुभव आणि त्यावर केलेलं चिंतन—या सगळ्यांतून समत्वाची क्षमता हळूहळू विकसित होते.
आणि मग एक विलक्षण गोष्ट घडते. आपण सुखाच्या मागे धावणं आणि दुःखापासून पळणं थोडं कमी करतो. आपल्या आयुष्यात फार सुख यावं किंवा फार दुःख येऊ नये, यासाठीच सगळे प्रयत्न करण्याऐवजी आपल्या नॉर्मल आयुष्याची उंची वाढवण्याचा प्रयत्न सुरू होतो. सुख-दुःखाच्या टोकांपेक्षा त्यांच्यामधला जो मोठा जीवनप्रवाह आहे, तो अधिक समृद्ध, अधिक सजग, अधिक संपन्न आणि अधिक आनंदी करण्याकडे आपलं लक्ष जातं.
कारण आपल्या आयुष्याचा फार मोठा भाग हा सुखाच्या किंवा दुःखाच्या एक्स्ट्रीममध्ये जात नाही. आपल्या आयुष्यातला बहुतांश काळ हा त्या दोन टोकांच्या मधला असतो. कधी छान वाटतं, कधी वाईट वाटतं; कधी यश मिळतं, कधी अडचण येते; कधी लाभ होतो, कधी थोडी हानी होते. पण या सगळ्यांच्या मधला जो साधा, सामान्य जीवनप्रवाह आहे, तोच आपल्या आयुष्याचा खरा मोठा भाग आहे. तो समृद्ध करणं हीच खरी साधना आहे.
म्हणून युद्ध म्हणजे केवळ रणांगणावरची लढाई नाही. इथे युद्ध म्हणजे कर्म आहे. कर्म सोडून पळायचं नाही. सुख मिळालं म्हणून त्याला चिकटून बसायचं नाही आणि दुःख आलं म्हणून कर्म सोडायचं नाही. लाभ झाला म्हणून अहंकार वाढवायचा नाही आणि हानी झाली म्हणून स्वतःवरचा विश्वास गमवायचा नाही. जय मिळाला म्हणून उन्मत्त व्हायचं नाही आणि पराजय झाला म्हणून खचायचं नाही. कर्म करत राहायचं—समत्वाने, सजगतेने आणि पूर्ण क्षमतेने.
यालाच कदाचित समत्वाचं प्रशिक्षण म्हणता येईल. हे प्रशिक्षण जितक्या लहान वयापासून सुरू होईल, तितकं चांगलं. मुलांना प्रत्येक वेळी त्यांच्या मनासारखं देणं नव्हे, तर कधी मिळणं आणि कधी न मिळणं, कधी जिंकणं आणि कधी हरणं, कधी कौतुक मिळणं आणि कधी टीका होणं—या सगळ्यांचा अनुभव देणं आवश्यक आहे. कारण जीवनात येणाऱ्या प्रत्येक सुख-दुःखापासून मुलांना वाचवणं शक्य नाही; पण त्या सुख-दुःखांना सामोरं जाण्याची क्षमता देणं नक्की शक्य आहे.
शेवटी पुन्हा त्या श्लोकाकडे वळूया—“सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ…” श्रीकृष्ण आपल्याला सुख नाकारायला सांगत नाहीत. दुःखाची इच्छा करायला सांगत नाहीत. लाभ नको म्हणत नाहीत. जय नको म्हणत नाहीत. ते फक्त एवढंच सांगतात की या सगळ्यांनी तुमच्या मनाचा ताबा घेऊ देऊ नका. कारण सुख आणि दुःख येणारच आहेत; लाभ आणि हानी येणारच आहेत; जय आणि पराजयही येणारच आहेत. प्रश्न एवढाच आहे—या सगळ्यांच्या येण्या-जाण्यामध्ये तुम्ही स्वतःला किती स्थिर ठेवू शकता?
आपल्याला फार सुख मिळावं किंवा फार दुःख टळावं, एवढंच आपल्या साधनेचं ध्येय नसावं. त्यापेक्षा आपल्या सामान्य आयुष्याची गुणवत्ता वाढवणं, मन अधिक सजग करणं, शरीर अधिक सक्षम करणं, बुद्धी अधिक व्यापक करणं आणि चित्त अधिक स्थिर करणं—हे आपलं ध्येय असावं.
कारण शेवटी समत्व म्हणजे सुख-दुःख नाहीसं होणं नव्हे. समत्व म्हणजे सुख-दुःख येत असतानाही आपण स्वतःला हरवू न देणं.
आणि कदाचित आपल्या जीवनाच्या साधनेचा सर्वोच्च टप्पा हाच असेल—आपलं अस्तित्वच हळूहळू आनंदाचं कारण बनणं.
Your existence itself should become happiness.
या विचारयात्रेत आपण सगळेजण सहभागी होत आहात, याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. हा विचार थोडा-थोडा अधिक लोकांपर्यंत पोहोचू देऊया. कारण आपल्याला लोकांच्या आयुष्यात केवळ अधिक सुख आणायचं नाही आणि दुःख पूर्णपणे दूरही करायचं नाही. आपल्याला त्यांच्या नॉर्मल आयुष्याची उंची वाढवायची आहे—ते अधिक समृद्ध, अधिक सजग, अधिक समर्थ आणि अधिक आनंदी करायचं आहे.
हीच कदाचित समत्वाची खरी साधना.
धर्मयुद्ध, मार्गाची शुचिता आणि कर्मयोगाची दिशा
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ५४
२० ऑगस्ट २०२६
नमस्कार.
महाभारताचं युद्ध केवळ कौरव आणि पांडव यांच्यातलं युद्ध नव्हतं. ते दोन राजघराण्यांमधील सत्तासंघर्षाचं युद्ध नव्हतं. त्या युद्धाच्या मुळाशी एक फार मोठा प्रश्न होता—अधर्माच्या आधारावर उभी राहिलेली व्यवस्था स्वीकारायची की धर्माच्या आधारावर उभी राहणारी नवी व्यवस्था निर्माण करायची? म्हणूनच हे युद्ध धर्मयुद्ध होतं. ते सत्यासाठीचं युद्ध होतं. सत्याच्या आग्रहासाठीचं युद्ध होतं. न्यायासाठीचं युद्ध होतं. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे—चांगल्या मूल्यव्यवस्थेच्या प्रस्थापनेसाठीचा तो शेवटचा संघर्ष होता.
पांडवांनी युद्ध हा पहिला पर्याय निवडलेला नव्हता. उलट, युद्ध टाळण्यासाठी त्यांनी अनेक मार्ग स्वीकारले होते. बारा वर्षांचा वनवास त्यांनी पूर्ण केला. एक वर्षाचा अज्ञातवासही पूर्ण केला. आपल्यावर आलेल्या अटी त्यांनी मान्य केल्या. त्यानंतरही त्यांनी न्याय्य वाटा मागितला. मागणी मोठी नव्हती; उलट, ती अत्यंत मर्यादित होती. पाच गावं द्या, एवढीही मागणी मान्य करण्याची दुर्योधनाची तयारी नव्हती.
म्हणजेच प्रश्न फक्त पाच गावांचा नव्हता. प्रश्न होता—अन्यायाला मर्यादा असणार की नाही? सत्यासाठी उभं राहणाऱ्या माणसाला जगण्याइतकी जागा तरी मिळणार की नाही? दुर्योधनाने ती किमान मागणीही नाकारली. धृतराष्ट्रानेही अन्यायाला थांबवण्याची निर्णायक भूमिका घेतली नाही. जे जे मार्ग उपलब्ध होते, ते वापरून झाले होते. समेटाचे प्रयत्न झाले होते. संवाद झाला होता. मध्यस्थी झाली होती. पण अधर्म आपल्या स्वार्थापुढे कोणताही न्याय मान्य करायला तयार नव्हता. म्हणून युद्ध आलं.
युद्ध हा पहिला मार्ग नव्हता; तो शेवटचा मार्ग होता.
It was not the first way. It was the last way.
हा मुद्दा आपण अगदी स्पष्टपणे समजून घेतला पाहिजे.
अधर्म म्हणजे केवळ एखादी चुकीची कृती नव्हे. अधर्म म्हणजे असत्याचा आग्रह, चुकीच्या विचारांचा आग्रह, चुकीच्या भावनांचा आग्रह, चुकीच्या आचारांचा आग्रह आणि त्या सगळ्यांच्या आधारावर उभी राहिलेली चुकीची व्यवस्था. समाज केवळ ताकदीवर चालत नाही. समाज दीर्घकाळ टिकतो तो मूल्यांवर, विश्वासावर, सत्यावर, न्यायावर आणि चांगुलपणावर. वाईटपणाची ताकद काही काळ मोठी वाटू शकते; पण ती समाजाला दीर्घकाळ टिकवून ठेवू शकत नाही. कारण समाजाची खरी ऊर्जा चांगुलपणात असते.
पण जेव्हा समाजातील सत्ताकेंद्रेच चुकीच्या विचारांच्या आणि स्वार्थाच्या ताब्यात जातात, तेव्हा प्रश्न केवळ व्यक्तिगत राहत नाही. तो समष्टीचा प्रश्न बनतो. ज्यावेळी चांगल्या विचारांच्या, सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने उभ्या असलेल्या लोकांवर अन्याय होतो आणि त्यांच्या किमान न्याय्य मागण्यादेखील नाकारल्या जातात, त्यावेळी संघर्ष अपरिहार्य होऊ शकतो.
पण इथेच भगवद्गीतेचा खरा प्रश्न सुरू होतो. अधर्माविरुद्ध संघर्ष करायचा आहे, हे मान्य. पण तो संघर्ष कोणत्या भावनेने करायचा? कोणत्या विचाराने करायचा? कोणत्या मार्गाने करायचा? कोणत्या पद्धतीने करायचा? कारण चांगलं साध्य मिळवण्यासाठी आपण जो मार्ग स्वीकारतो, ज्या पद्धतीने पुढे जातो, त्या मार्गामागची भावना आणि त्या पद्धतीमागची वृत्तीही तितकीच महत्त्वाची असते.
महाभारताच्या रणांगणावर अर्जुनासमोर हाच पेच उभा राहिला. अर्जुन हा काही सामान्य योद्धा नव्हता. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने त्याला अनेक विशेषणांनी संबोधलं आहे. तो पराक्रमी आहे, विवेकी आहे, संवेदनशील आहे, शूर आहे. त्याच्यासमोर साक्षात श्रीकृष्ण उभे आहेत. तरीही युद्ध सुरू होण्याच्या क्षणी त्याच्या मनात एक मोठा मानसिक संघर्ष निर्माण होतो. त्याला युद्ध चुकीचं वाटू लागतं.
“मी माझ्याच माणसांविरुद्ध कसं लढू?”
आणि इथे एक अतिशय सूक्ष्म गोष्ट घडते. अर्जुनाचा प्रश्न केवळ करुणेचा नाही. त्याच्या करुणेमध्ये त्याची व्यक्तिगत आसक्ती मिसळलेली आहे. त्याला संपूर्ण समाजव्यवस्थेचा प्रश्न दिसत नाही; त्या क्षणी त्याला मुख्यतः आपल्या समोर उभे असलेले आप्तस्वकीय दिसतात.
म्हणूनच श्रीकृष्णाला त्याला केवळ “लढ” एवढंच सांगून चालणार नव्हतं. त्याला आधी दृष्टी बदलावी लागणार होती.
“मी” पासून “समष्टी”कडे जावं लागणार होतं.
कारण ज्यावेळी आपण समष्टीचा विचार करतो, त्यावेळी केवळ “मला काय वाटतं?” हा प्रश्न पुरेसा राहत नाही. त्यासोबत “यामुळे सर्वांचं काय होईल?” हा प्रश्नही विचारावा लागतो.
आपण एखाद्या समूहाचा भाग असतो. समूहाने एखादं योग्य काम करण्याचा निर्णय घेतलेला असतो. आपणही त्याला संमती दिलेली असते. पण प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की, “आता मला हे करावंसं वाटत नाही,” असं म्हणून आपण मागे हटलो, तर तो केवळ व्यक्तिगत निर्णय राहत नाही. त्याचा परिणाम संपूर्ण समूहावर होतो.
समष्टीच्या हितासाठी स्वीकारलेली जबाबदारी केवळ व्यक्तिगत भावनेमुळे टाळता येत नाही. अर्जुनाच्या बाबतीतही हेच घडत होतं. त्याच्या व्यक्तिगत भावनांनी त्याच्या कर्तव्यावर मात केली होती. आणि म्हणूनच श्रीकृष्णाने त्याच्या मनातील या गोंधळावर प्रहार केला.
मग प्रश्न पडतो—गीता का सांगावी लागली?
कारण एखादा माणूस चांगल्या हेतूसाठी करावयाच्या अपरिहार्य कर्मापासून व्यक्तिगत मोहामुळे दूर जाऊ लागतो, तेव्हा त्याला केवळ आदेश देऊन चालत नाही. त्याला तत्त्वज्ञानाची दृष्टी द्यावी लागते. म्हणून श्रीकृष्ण प्रथम त्याला सांख्ययोग सांगतात. शरीर आणि आत्मा, नाशवान आणि शाश्वत, कर्तव्य आणि आसक्ती यांचं स्वरूप समजावून सांगतात. ज्ञानाची दृष्टी निर्माण करतात. पण केवळ ज्ञान पुरेसं नाही. जीवनात प्रश्न फक्त “मला सत्य काय आहे हे माहीत आहे का?” एवढाच नसतो. पुढचा प्रश्न असतो—“मला जे सत्य समजलं आहे, त्याप्रमाणे मी कर्म करणार आहे का?”
आणि म्हणूनच दुसऱ्या अध्यायाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात—
एषा तेऽभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥ २.३९ ॥
अर्थ :
हे पार्था! आतापर्यंत तुला सांख्याच्या दृष्टीने आत्मज्ञानाची बुद्धी सांगितली. आता कर्मयोगाच्या दृष्टीने ही बुद्धी ऐक. या बुद्धीने युक्त झाल्यावर तू कर्माच्या बंधनातून मुक्त होशील.
हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण इथपर्यंत श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानाची दृष्टी देत होते. आता ते त्याला कर्माची दिशा देणार आहेत.
म्हणजेच हा श्लोक सांख्ययोग आणि कर्मयोग यांच्यामधला एक महत्त्वाचा दुवा आहे.
ज्ञान समजलं. आता ते जगायचं कसं?
सत्य कळलं. आता त्या सत्यानुसार कृती कशी करायची?
कर्तव्य समजलं. आता ते आसक्तीशिवाय कसं पार पाडायचं?
इथून पुढे गीतेचा विचार एका नव्या दिशेने पुढे जातो.
ज्ञानाधिष्ठित कर्म—हा कर्मयोगाचा मार्ग आहे.
कर्म सोडून पळायचं नाही. कर्म तर करावंच लागणार. पण कर्म करताना मनाची भूमिका बदलायची. कर्माचा केंद्रबिंदू “मला काय मिळणार?” हा न ठेवता “हे योग्य आहे का?” हा ठेवायचा.
युद्ध करायचं असेल, तर ते अहंकारासाठी नाही. “मला विजय मिळवायचा आहे”, “माझं सामर्थ्य सिद्ध करायचं आहे”, “मला यश मिळवायचं आहे”, “मला काहीतरी मिळवायचं आहे”—या भावनेने नाही. तर धर्माची प्रस्थापना करण्यासाठी, योग्य मूल्यव्यवस्था उभी करण्यासाठी, कर्तव्य म्हणून आणि साधना म्हणून कर्म करायचं.
हीच योगबुद्धी.
भारतीय विचारपरंपरेची ही एक फार महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. “युद्धात काहीही चालतं” अशी भूमिका भारतीय चिंतनाची नाही. चांगलं साध्य साध्य करायचं असेल, तर त्यासाठी आपण कोणता मार्ग स्वीकारतो, कोणती पद्धत वापरतो आणि त्या मार्गक्रमणामागची आपली भावना काय आहे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
म्हणूनच केवळ आपण काय साध्य करतो, एवढाच प्रश्न महत्त्वाचा नाही; ते साध्य करताना आपण कोणता मार्ग निवडतो आणि त्या मार्गाने जाताना आपल्या मनात कोणती भावना असते, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.
आपले विचार कसे आहेत? आपल्या भावना कशा आहेत? आपले आचार कसे आहेत? आपण स्वीकारलेला मार्ग कसा आहे? त्या मार्गाने पुढे जाताना आपल्या मनात स्वार्थ आहे की समष्टीच्या कल्याणाची भावना आहे? अहंकार आहे की कर्तव्याची जाणीव आहे? सूड आहे की न्यायाची भूमिका आहे? स्वतःला सिद्ध करण्याची धडपड आहे की योग्य गोष्ट करण्याची प्रामाणिक तळमळ आहे?
कारण एखादी गोष्ट योग्य असली, तरी ती साध्य करण्यासाठी वापरलेल्या मार्गामागची भावना चुकीची असेल, तर त्या संपूर्ण कृतीचं स्वरूप बदलू शकतं. म्हणून मार्गाची शुद्धता ही केवळ बाह्य पद्धतीची गोष्ट नाही; आपण ज्या मार्गाने पुढे जात आहोत, त्या मार्गामागची भावना, विचार आणि वृत्ती शुद्ध ठेवणं ही त्याची खरी कसोटी आहे.
कर्मयोग म्हणजे केवळ कर्म करण्याची पद्धत नाही. तो कर्माच्या मागची मानसिकता शुद्ध करण्याचा मार्ग आहे. कर्म करताना फळाची आसक्ती सोडायची. अहंकार सोडायचा. व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवायचा. आपण कोणत्या मार्गाने काम करतोय, त्या मार्गामागची भावना सतत तपासत राहायची. कर्माला पूजेची भावना द्यायची. साधनेची भावना द्यायची. मग साधं कामसुद्धा साधना बनतं.
आपल्या आयुष्यात महाभारतासारखं युद्ध कदाचित येणार नाही. पण रोजच्या जीवनात संघर्ष येतात. निर्णय घ्यावे लागतात. जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. कधी समूहासाठी व्यक्तिगत इच्छा बाजूला ठेवावी लागते. कधी योग्य गोष्टीसाठी कठीण निर्णय घ्यावा लागतो.
त्या प्रत्येक वेळी आपण स्वतःला एक प्रश्न विचारू शकतो—
“मी हे काम केवळ परिणामासाठी करतोय की ते कोणत्या भावनेने आणि कोणत्या पद्धतीने करतोय, याबद्दलही सजग आहे?”
आपण कर्माकडे साधना म्हणून पाहायला लागलो, की जीवनाची गुणवत्ता बदलते. काम तेच असतं; पण मन बदलतं. जबाबदारी तीच असते; पण तिच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. प्रयत्न तेच असतात; पण त्यामध्ये ताण कमी होतो आणि आनंद वाढतो.
कारण मग प्रत्येक कर्माच्या शेवटी फक्त फल मिळत नाही; कर्म करतानाच एक अंतःसमृद्धी मिळू लागते. आपण काम करतो, फल मिळतं. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडते—काम करताना आपण स्वतः घडत जातो. आपली वृत्ती उंचावते. आपली मानसिकता शुद्ध होते. आपला आनंदाचा स्तर वाढतो. आपल्यामधील स्वार्थ कमी होतो आणि समष्टीशी असलेलं आपलं नातं अधिक घट्ट होतं. म्हणूनच कर्मयोग हा केवळ युद्धभूमीवरचा विचार नाही. तो जीवन जगण्याची पद्धत आहे.
आपल्या प्रत्येक कृतीमध्ये ज्ञानाची दृष्टी, कर्माची निष्ठा आणि आपण निवडलेल्या मार्गामागची शुद्ध भावना आली, तर आपलं सामान्य जीवनही साधनेत रूपांतरित होतं. दुसऱ्या अध्यायाच्या या टप्प्यावर श्रीकृष्ण आपल्याला एका अत्यंत सुंदर प्रवासाकडे घेऊन जातात—सांख्याने सत्य समजून घ्या. योगाने त्या सत्याला कर्मात उतरवा.
ज्ञान आणि कर्म हे एकमेकांचे विरोधक नाहीत. उलट, ज्ञान कर्माला दिशा देतं आणि कर्म ज्ञानाला जीवनात उतरवतं. ज्ञान नसलेलं कर्म अंध होऊ शकतं. आणि कर्मात उतरलेलं नाही असं ज्ञान केवळ बौद्धिक माहिती बनून राहू शकतं. म्हणून गीता आपल्याला केवळ विचार करायला शिकवत नाही; विचारांप्रमाणे जगायला शिकवते.
महाभारताच्या रणांगणावर बाहेरचं युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुनाच्या आत एक युद्ध सुरू झालं होतं. त्याच्या मनात मोह आणि कर्तव्य यांचा संघर्ष होता. व्यक्तिगत भावना आणि समष्टीचं हित यांच्यात संघर्ष होता. श्रीकृष्णाने त्याला त्या संघर्षातून बाहेर काढण्यासाठी प्रथम ज्ञान दिलं. आता ते त्याला सांगत आहेत—“हे ज्ञान घे आणि कर्माच्या मार्गावर चल.”
म्हणूनच आज आपल्यासाठी गीतेचा संदेश फक्त “युद्ध कर” एवढाच नाही.
तो आहे—योग्य गोष्टीसाठी उभे राहा. अपरिहार्य कर्तव्यापासून पळू नका. समष्टीचा विचार करा. ज्ञानाच्या आधाराने कर्म करा. आणि योग्य गोष्ट साध्य करण्यासाठी योग्य मार्ग आणि योग्य पद्धत निवडा; त्या मार्गाने जाताना आपल्या मनामागची भावना शुद्ध ठेवा.
कारण जीवनात केवळ “आपण काय मिळवलं?” हा प्रश्न महत्त्वाचा नाही. त्याहून मोठा प्रश्न आहे—“ते मिळवताना आपण काय झालो?” आपल्या कर्मामुळे केवळ आपलं भलं झालं की इतरांचंही कल्याण झालं? आपण यश मिळवलं की आपल्या यशाची पद्धतही सुंदर होती? आपण एखादी गोष्ट साध्य केली की त्या प्रक्रियेत आपलं मनही अधिक निर्मळ झालं?
ज्यावेळी साध्य शुद्ध असतं, मार्ग योग्य असतो, त्या मार्गामागची भावना निर्मळ असते आणि कर्माला योगाची जोड मिळते, तेव्हा व्यक्तिगत स्वार्थापलीकडे समष्टीच्या कल्याणाची भावना जागी होते. त्यावेळी जीवन केवळ जगणं राहत नाही—ते साधना बनतं.
आणि म्हणूनच आजचा हा श्लोक आपल्याला एका निर्णायक वळणावर आणून उभा करतो—
“एषा तेऽभिहिता सांख्ये, बुद्धिर्योगे त्विमां शृणु…”
आतापर्यंत ज्ञानाची दृष्टी मिळाली. आता कर्माची दिशा मिळणार आहे. आतापर्यंत “सत्य काय आहे?” याचा शोध घेतला. आता “त्या सत्याप्रमाणे जगायचं कसं?” हा प्रश्न समोर येणार आहे. आतापर्यंत अर्जुनाला आत्म्याचं शाश्वत स्वरूप समजावलं. आता त्याला कर्माच्या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला जाणार आहे.
म्हणजेच गीतेचा पुढचा प्रवास ज्ञानापासून कर्माकडे, कर्मापासून योगाकडे आणि योगातून अंतःशुद्धीकडे जाणारा आहे.
धर्मयुद्ध बाहेर चाललेलं असलं, तरी खरी लढाई अर्जुनाच्या आत चाललेली आहे. अधर्माविरुद्धचं युद्ध बाहेरच्या रणांगणावर आहे; पण मोह, अहंकार, स्वार्थ, आसक्ती आणि चुकीच्या विचारांविरुद्धचं युद्ध प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. म्हणून आजचा प्रश्न आपल्या प्रत्येकासाठी आहे—आपल्याला काय योग्य आहे हे कळतंय का? आणि त्याहून महत्त्वाचं—जे योग्य कळलं आहे, ते करण्याची बुद्धी आणि धैर्य आपल्यामध्ये आहे का?
कारण गीता केवळ ज्ञान देऊन थांबत नाही. ती आपल्याला ज्ञानातून कर्माकडे घेऊन जाते आणि कर्माला योगाची दिशा देते.
सत्य समजणं ही पहिली पायरी आहे. सत्याप्रमाणे जगणं ही खरी साधना आहे.
हीच कर्मयोगाची सुरुवात. हीच आपल्या मार्गाची जाणीव. आणि याच मार्गावरून पुढे जाताना—अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर हळूहळू त्याच्या कृतीतून प्रकट होणार आहे.
ज्ञानाची दृष्टी घेऊन कर्म करा. कर्तव्याची निष्ठा घेऊन कर्म करा. समष्टीच्या कल्याणाची भावना घेऊन कर्म करा. आणि ज्या मार्गाने कर्म करणार आहोत, त्या मार्गामागची भावना शुद्ध ठेवून कर्म करा.
कारण शेवटी प्रश्न फक्त एवढाच नाही की—“आपण काय केलं?”
खरा प्रश्न आहे—
“आपण ते कोणत्या बुद्धीने केलं?”
आणि त्यासोबतच—
“ते करताना आपल्या मनात कोणती भावना होती?”
आणि म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात—
एषा तेऽभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥
ज्ञानातून कर्माकडे जाण्याचा हा क्षण आहे.
आणि इथूनच सुरू होतो—कर्मयोगाचा प्रवास.
कर्माचे ऑडिट : आपल्या दिवसातला प्रत्येक क्षण आपण कुठे खर्च करतो?
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ५५
२१ ऑगस्ट २०२६
नमस्कार.
गेल्या चार-पाच दिवसांपासून मी माझ्या आयुष्यात एक अतिशय वेगळा प्रयोग करतो आहे. खरं सांगायचं तर माझ्या आयुष्याच्या ५६व्या वर्षापर्यंत मी असं काही केलं नव्हतं. मी सकाळी साधारण चार, सव्वाचार किंवा साडेचारला उठतो आणि पुढच्या दिवशी पुन्हा त्याच वेळेला उठेपर्यंतच्या काळात मी नेमकं काय काय करतो, याची यादी तयार करतो आहे. सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंतची प्रत्येक छोटी-मोठी कृती मी नोंदवतो आहे.
फक्त एवढंच नाही. दिवसभराच्या कामांबरोबर आठवड्यातून एकदा करावी लागणारी कामं कोणती, महिन्यातून एकदा करावी लागणारी कामं कोणती आणि वर्षातून एकदा किंवा अधूनमधून करावी लागणारी कामं कोणती, याचीही यादी तयार करतो आहे. अशा पद्धतीने माझ्या कामांचं एक वेगळंच ऑडिट सुरू झालं आहे.
आणि त्यातून एक विलक्षण गोष्ट लक्षात आली—आपण दिवसभरात किती प्रचंड प्रमाणात कर्म करत असतो, याची आपल्यालाच कल्पना नसते! अगदी अंथरुणातून उठण्यापासून सुरुवात होते. डोळे उघडणे, उठणे, दात घासणे, अंघोळ करणे, कपडे घालणे, चालणे, खाणे, पाणी पिणे, श्वास घेणे, बोलणे, ऐकणे, पाहणे, मोबाईल तपासणे, संदेश वाचणे, उत्तर देणे, विचार करणे, निर्णय घेणे, वर्तमानपत्र वाचणे, बातम्या ऐकणे, गाणी ऐकणे, कोणाला फोन करणे, कोणाला नमस्कार करणे, बाजारात जाणे, घर साफ करणे, कामावर जाणे, कार्यालयीन काम करणे, सामाजिक काम करणे, कुणाला मदत करणे—कृतींची ही मालिका अखंड सुरू असते.
म्हणजे आपण दिवसभर जगत नसतोच फक्त; आपण सतत काही ना काही करत असतो. आणि या सगळ्या कृतींचं बारकाईने वर्गीकरण केलं, तर त्या अनेक स्तरांवर दिसतात.
एक वर्गीकरण : आपण काय काय करतो?
जैविक आणि रुटीन ॲक्शन. श्वास घेणे, खाणे, झोपणे, उठणे, दात घासणे, कपडे घालणे, शरीराची स्वच्छता राखणे—जगण्यासाठी आणि शरीर चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या कृती.
दुसरा प्रकार आहे कॉग्निटिव्ह आणि इमोशनल ॲक्शन. विचार करणे, नियोजन करणे, स्वतःशी बोलणे, हसणे, रागावणे, आनंदी होणे, संभ्रमात पडणे, एखाद्या गोष्टीची चिंता करणे, मोबाईलवरील नोटिफिकेशन पाहणे, संदेशांना उत्तर देणे, वर्तमानपत्र वाचणे, बातम्या ऐकणे, गाणी ऐकणे—म्हणजे आपल्या मनात आणि बुद्धीत सतत घडणाऱ्या कृती.
तिसरा प्रकार आहे फॅमिली किंवा डोमेस्टिक ॲक्शन. घरातील स्वच्छता, किराणा आणणे, भाजी आणणे, बाजारात जाणे, घरातील व्यक्तींची काळजी घेणे, वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे, नातेवाईकांना फोन करणे—ही आपली कौटुंबिक आणि गृहकर्माची क्षेत्रं.
चौथा प्रकार आहे प्रोफेशनल आणि इकॉनॉमिक ॲक्शन. आपल्या उपजीविकेसाठी केलेली कामं, कार्यालयीन कामं, व्यवसाय, प्रकल्प, आर्थिक व्यवहार, प्रवास, बैठका, नियोजन—म्हणजे जीवनाचा आर्थिक आणि व्यावसायिक भाग.
आणि पाचवा प्रकार आहे सोशल आणि पब्लिक ॲक्शन. सिग्नल पाळणे, सार्वजनिक ठिकाणी शिस्त पाळणे, ओळखीच्या व्यक्तीला नमस्कार करणे, सामाजिक संस्थेच्या कामात मदत करणे, समाजाशी संवाद साधणे, सार्वजनिक जबाबदाऱ्या पार पाडणे.
असं पाहिलं तर आपला एक दिवस म्हणजे कर्मांची एक प्रचंड मोठी मालिका आहे. आपण साधारणपणे एखाद्या मोठ्या कामाचीच नोंद ठेवतो. पण आयुष्य घडवत असतात ती केवळ मोठी कामं नसतात. असंख्य छोट्या-छोट्या कृती मिळून आपलं आयुष्य तयार होत असतं.
दिवसाला शेकडो सूक्ष्म कृती होत असतील, तर महिन्याला त्यांची संख्या हजारोंमध्ये आणि वर्षाला ती लाखोंमध्ये जाते. आणि आयुष्यभराचा विचार केला तर? कर्मांची संख्या अक्षरशः कोटींच्या घरात जाते. काय विलक्षण गोष्ट आहे! आपण किती जगतो, यापेक्षा आपण त्या काळात काय काय करतो, हा प्रश्न कदाचित अधिक महत्त्वाचा आहे.
पण प्रश्न फक्त ‘किती कर्मं?’ हा नाही. प्रश्न आहे—‘कशासाठी?’
इथे माझं दुसरं ऑडिट सुरू झालं. आपण केलेल्या कर्मांचं त्यांच्या हेतूनुसार वर्गीकरण केलं तर एक मोठा फरक दिसतो. एक प्रकारची कर्मं आहेत—सकाम कर्म किंवा फलप्रधान कर्म. म्हणजे ज्या कर्मांच्या मागे बाह्य परिणाम, लाभ, यश, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, सत्ता, पद, मान-सन्मान किंवा भीती यांचा प्रभाव असतो.
उदाहरणार्थ, फक्त किती पैसा मिळेल याचा विचार करून व्यवसाय करणे; समाजात आपलं नाव व्हावं म्हणून एखादा दिखाऊ उपक्रम करणे; स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी स्पर्धा करणे; दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करून त्याला मागे टाकण्याचा प्रयत्न करणे; पदोन्नती मिळावी म्हणून अतिरिक्त काम करणे; सत्तेचा किंवा अधिकाराचा वापर स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठी करणे; उद्याची भीती वाटते म्हणून गरजेपेक्षा कितीतरी अधिक संपत्ती आणि सुखसोयी जमा करणे—ही कर्मं चुकीचीच आहेत, असं नाही. पण त्यामागचा हेतू काय आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
कर्मापेक्षा कर्मामागची वृत्ती महत्त्वाची ठरते.
काही कामं आपण केवळ कर्तव्य म्हणून करतो. प्रामाणिकपणे, हलगर्जी न करता, कोणी पाहत आहे की नाही, याची चिंता न करता. काही कामं आपण निस्वार्थ वृत्तीने करतो. पुरस्कार नको, स्तुती नको, मोबदला नको, लाईक नको, कमेंट नको—फक्त एखाद्याच्या उपयोगी पडावं म्हणून.
आपल्याला जे ज्ञान मिळालं आहे, ते पुढे देणं—हेही एक कर्म आहे. आपण जे शिकलो, जे अनुभवलं, जे समजलो, ते इतरांच्या उपयोगी पडावं म्हणून सांगणं. संकटात सापडलेल्या व्यक्तीला कोणताही स्वार्थ न ठेवता मदत करणं. आई-वडील, कुटुंब, समाज यांच्याप्रती असलेल्या जबाबदाऱ्या प्रेमाने आणि आनंदाने पार पाडणं.
स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्यासाठी केलेले प्रयत्न—अहंकार कमी करणे, सवयी सुधारणे, मनावर संयम आणणे, स्वतःच्या चुका स्वीकारणे, स्वतःच्या क्षमतेचा विकास करणे—हीदेखील कर्मंच आहेत. पण त्यांचा केंद्रबिंदू वेगळा आहे.
‘मला काय मिळेल?’ यापेक्षा ‘माझ्यामुळे काय घडेल?’ हा प्रश्न इथे महत्त्वाचा होतो.
आपल्या कर्मांचं प्रमाण काय आहे?
हा प्रश्न आपण स्वतःला कधी विचारतो का? दिवसभरातली किती कर्मं केवळ जगण्यासाठी आवश्यक आहेत? किती कर्मं संसार चालवण्यासाठी आहेत? किती कर्मं माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी आहेत? किती कर्मं माझ्या असुरक्षिततेतून जन्माला येतात? किती कर्मं अहंकारातून येतात? किती कर्मं भविष्यातील भीतीतून येतात?
आणि... किती कर्मं अशी आहेत, ज्यात माझ्यापेक्षा मोठं काहीतरी आहे? कुटुंबापेक्षा मोठं. स्वतःच्या समूहापेक्षा मोठं. स्वतःच्या फायद्यापेक्षा मोठं. समाजाच्या कल्याणासाठी. मानवाच्या कल्याणासाठी. आणि शेवटी—स्वतःच्या अंतर्मनाच्या उन्नतीसाठी.
हा प्रश्न विचारला की आपल्या कर्मांचं खरं चित्र समोर येऊ लागतं. आणि कदाचित आपल्याला जाणवतं—निष्काम कर्मांचं प्रमाण आपण समजतो त्यापेक्षा खूपच कमी असू शकतं.
मग करायचं काय?
माझ्या मते, इथेच ‘कर्माचं ऑडिट’ ही एक अत्यंत उपयुक्त प्रक्रिया ठरू शकते.
आपण पैशांचं ऑडिट करतो. व्यवसायाचं ऑडिट करतो. उत्पन्न-खर्चाचा हिशेब ठेवतो. आरोग्याचा रिपोर्ट पाहतो. बँक खात्यात किती पैसे आहेत, हे पाहतो. पण एक प्रश्न—आपण आपल्या कर्मांचं ऑडिट करतो का?
फक्त कर्मांचंच नाही—विचारांचंही ऑडिट हवं!’
कारण कर्माच्या आधी विचार येतो. आज दिवसभरात माझ्या मनात कोणते विचार आले? किती सकारात्मक होते? किती नकारात्मक? किती विचार भीतीतून आले? किती विचार अहंकारातून आले? किती विचार मत्सरातून आले? किती विचार प्रेमातून आले? किती विचार व्यापक हिताचा विचार करणारे होते? आणि किती वेळ मी स्वतःशीच संघर्ष करत होतो?
आपल्या मनात दिवसभरात किती विचारांची ये-जा होते, याचा आपण कधी हिशेब ठेवतो का?
भावनांचंही ऑडिट हवं!
आज मला किती वेळ आनंद वाटला? किती वेळ चिडचिड झाली? कधी राग आला? कधी भीती वाटली? कधी मत्सर वाटला? कधी प्रेम वाटलं? कधी कृतज्ञता वाटली? कधी कुणासाठी मनापासून काहीतरी करावंसं वाटलं? कधी स्वतःबद्दल अभिमान वाटला? आणि कधी स्वतःचीच लाज वाटली?
या भावना केवळ येऊन जात नाहीत. त्या आपल्या चित्तावर काहीतरी उमटवून जातात.
बुद्धीचं ऑडिट?
हा तर आणखी खोल प्रश्न आहे. दिवसभरात मी किती निर्णय घेतले? त्या निर्णयांमध्ये माझा स्वार्थ किती होता? माझ्या कुटुंबाचा विचार किती होता? समाजाचा विचार किती होता? आणि सर्वांच्या हिताचा विचार किती होता?
मी माझी बुद्धी केवळ स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी वापरली? की एखाद्या व्यापक हितासाठी? कारण बुद्धी ही केवळ निर्णय घेण्याचं साधन नाही; ती आपल्या कर्माला दिशा देणारी शक्ती आहे.
चित्ताचं ऑडिट!
‘
हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. दिवसभरात आपण अनेक गोष्टी करतो. काही गोष्टी संध्याकाळी विसरून जातो. पण काही गोष्टी मनात खोलवर बसतात.
एखादं वाक्य, एखादी भेट, एखाद्याला केलेली मदत, एखाद्याला दिलेला त्रास, एखादं यश, एखादं अपयश, एखादा अपमान, एखादं प्रेम, एखादा निर्णय, एखादं कर्म—काही गोष्टी चित्तामध्ये घर करून राहतात.
त्या पुन्हा पुन्हा आठवतात. कधी प्रेरणा देतात, कधी अपराधी बनवतात, कधी आनंद देतात, कधी मन अस्वस्थ करतात. म्हणूनच प्रश्न असा—आज मी अशी कोणती कर्मं केली, ज्यांची छाप माझ्या चित्तावर पडली? आणि ती छाप कशी आहे—सकारात्मक की नकारात्मक?
कर्मांची गुणवत्ता चित्ताची गुणवत्ता ठरवते
इथे मला एक फार महत्त्वाची गोष्ट जाणवली. जेव्हा एखादं कर्म आपण शुद्ध हेतूने, शुद्ध भावनेने आणि शुद्ध बुद्धीने करतो, तेव्हा त्या कर्माचा परिणाम बाहेरच्या जगापुरता मर्यादित राहत नाही. त्याची एक सुंदर छाप आपल्या स्वतःच्या चित्तावरही पडते.
एखाद्याला निस्वार्थपणे मदत केली. एखाद्याला काही न मागता ज्ञान दिलं. एखाद्या संकटात सापडलेल्या माणसासाठी उभे राहिलो. आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. स्वतःच्या अहंकारावर मात केली. एखाद्या मोहावर विजय मिळवला. अशा प्रत्येक कर्मानंतर आतमध्ये एक वेगळाच अनुभव निर्माण होतो.
मनाला आनंद मिळतो. जगण्याचं बळ मिळतं. स्वतःबद्दलचा आदर वाढतो. प्रेरणा निर्माण होते. ताण कमी होतो. आणि पुन्हा चांगलं काम करण्याची शक्ती मिळते.
याउलट, जेव्हा कर्म संकुचित स्वार्थातून, भीतीतून, मत्सरातून किंवा अहंकारातून होतं, तेव्हा त्याची छापही तशीच पडते. मन अस्वस्थ होतं. प्रेरणा कमी-जास्त होत राहते. आतून एक अस्थिरता निर्माण होते. कधी खूप आनंद, कधी खूप दुःख. कधी समाधान, कधी असमाधान. कधी आत्मविश्वास, कधी भीती.
जणू मन सुख-दुःखाच्या हेलकाव्यात सतत झुलत राहतं.
म्हणून कर्म महत्त्वाचं; पण कर्मामागचा ‘अॅटिट्यूड’ त्याहून महत्त्वाचा!
आपण काय करतो, हे महत्त्वाचं आहेच. पण आपण ते कशा वृत्तीने करतो, हे अधिक महत्त्वाचं आहे. एकच काम दोन माणसं करू शकतात. दोघांचं बाह्य कर्म सारखं असू शकतं. पण एका व्यक्तीच्या मनात स्वार्थ, भीती आणि अहंकार असू शकतो; दुसऱ्याच्या मनात कर्तव्य, प्रेम आणि व्यापक हिताची भावना असू शकते.
बाहेरचं कर्म एकच. पण आतली दिशा वेगळी. आणि म्हणूनच परिणामही वेगळा. याच ठिकाणी कर्म आणि कर्मयोग यांच्यामध्ये फरक निर्माण होतो.
श्रीकृष्णाचा अद्भुत आश्वासक संदेश
भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात—
नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्॥
अर्थात—या कर्मयोगामध्ये केलेल्या प्रयत्नाचा कधीही नाश होत नाही. त्याचा विपरीत परिणाम होत नाही. आणि या धर्माचे थोडेसे आचरणदेखील मनुष्याला मोठ्या भयापासून वाचवते.
हा श्लोक मला कर्माच्या ऑडिटशी जोडलेला दिसतो. कारण श्रीकृष्ण आपल्याला असं सांगत नाहीत की, ‘तुम्ही उद्यापासून तुमची सगळी कर्मं बदलून टाका.’ ते सांगतात—‘स्वल्पमपि’—थोडंसं जरी!
थोडंसं चांगलं कर्म. थोडी अधिक शुद्ध भावना. थोडा कमी स्वार्थ. थोडा कमी अहंकार. थोडी अधिक कर्तव्यबुद्धी. थोडी अधिक व्यापकता. थोडी अधिक निस्वार्थ वृत्ती. आणि ही छोटी सुरुवातदेखील व्यर्थ जात नाही.
एक छोटासा प्रयोग करूया!
आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त दहा मिनिटं स्वतःसाठी काढूया आणि स्वतःला पाच प्रश्न विचारूया—
१. आज मी कोणकोणती महत्त्वाची कर्मं केली?
२. त्यापैकी किती कर्मं केवळ गरज, उपजीविका किंवा संसारासाठी होती?
३. किती कर्मं स्वार्थ, भीती, अहंकार किंवा प्रतिष्ठेच्या इच्छेतून झाली?
४. किती कर्मं कर्तव्य, प्रेम, निस्वार्थता किंवा व्यापक हिताच्या भावनेतून झाली?
५. आजच्या कोणत्या कर्मांनी माझ्या चित्तावर चांगली छाप सोडली आणि कोणत्या कर्मांनी अस्वस्थता निर्माण केली?
बस. एवढंच. दिवसभराच्या कर्मांचा संपूर्ण हिशेब नको. फक्त निरीक्षण. न्याय नको. दोषारोप नको. फक्त स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहायचं.
काही दिवस हा प्रयोग केला, तर कदाचित आपल्याला आपल्या आयुष्याचा एक असा आरसा दिसेल, जो यापूर्वी कधीच दिसला नव्हता.
मग हळूहळू एक सुंदर गोष्ट घडू शकते. आपण कर्मांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करणार नाही. आपण कर्मांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करू.
कर्म बदलतं तेव्हा जीवन बदलतं. पण त्याहून मोठी गोष्ट अशी—कर्मामागची भावना बदलते, तेव्हा कर्मयोग सुरू होतो.
म्हणूनच कदाचित भगवद्गीतेचा हा संदेश केवळ रणांगणासाठी नाही. तो आपल्या प्रत्येक दिवसासाठी आहे. आपल्या प्रत्येक कृतीसाठी आहे. आपल्या प्रत्येक विचारासाठी आहे. आपल्या प्रत्येक निर्णयासाठी आहे. आणि आपल्या चित्तावर उमटणाऱ्या प्रत्येक संस्कारासाठी आहे.म्हणूनच श्रीकृष्णाचं हे आश्वासन पुन्हा एकदा मनात खोलवर उतरवूया—
नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्॥
• प्रयत्नांचा अपव्यय नाही (अव्ययता): भौतिक जगतात आपण केलेले अनेक प्रयत्न अपयशी ठरू शकतात किंवा त्यांची मेहनत वाया जाऊ शकते. मात्र, कर्मयोगात टाकलेले प्रत्येक सत्पात्री पाऊल आणि घेतलेली मेहनत कधीच नष्ट होत नाही. केलेली प्रगती कायमची जमा होते.
• विपरीत परिणामांचा अभाव: इतर मार्गांमध्ये थोडी जरी चूक झाली, तर त्याचे दुष्परिणाम किंवा हानी होण्याची शक्यता असते. परंतु कर्मयोगात जर श्रद्धा व शुद्ध हेतू (ॲटिट्यूड) असेल, तर त्याचे कधीही वाईट किंवा विपरीत परिणाम होत नाहीत; उलट थोडे जरी आचरण केले तरी ते प्रगतीच साधून देते.
• भयातून मुक्तता: जीवनातील सर्वात मोठी भीती म्हणजे संसाराची किंवा अज्ञानाची भीती. या धर्मानुसार (कर्तव्यानुसार) चालल्यास माणसाला जीवनातील मोठ्या संकटांतून आणि मानसिक अस्वस्थतेतून तारण मिळते.
निर्णयाची शक्ती : विचारांपासून कृतीपर्यंतचा प्रवास
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ५६
२५ ऑगस्ट २०२६
कालच मुंबईहून आलो. बराच प्रवास झालेला होता. रेल्वेमधला प्रवास म्हणजे झोप तशी होत नाहीच. मात्र काल रात्री गाढ झोप लागली. सकाळी उठल्यानंतर मात्र एक वेगळाच प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला—उठावं का नाही?जाग आली होती; पण उठावं की आणखी थोडा वेळ झोपावं, याबाबतीत प्रचंड संभ्रम निर्माण झाला.
एक मन म्हणत होतं, उठलं पाहिजे. गीतेचा अभ्यास केला पाहिजे, उपासना केली पाहिजे, व्यायामाला गेलं पाहिजे आणि आपल्या दैनंदिन दिनक्रमाची सुरुवात केली पाहिजे.
दुसरं मन मात्र म्हणत होतं, एका दिवसाने काय फरक पडतोय? थोडा वेळ जास्त झोप ना!
न जाण्याची आणि जाण्याची अनेक कारणं माझ्यासमोर येत होती. जणू माझ्यासमोर दोन पट मांडले गेले होते—एक पट होता ‘उठावं’ म्हणून आणि दुसरा होता ‘झोपावं’ म्हणून.
मग प्रश्न होता—नेमकं काय करायचं? उठायचं की झोपायचं?
हीच होती निर्णयाची वेळ.
पण निर्णय घ्यायचा कशाच्या आधारावर? मला व्यायामाचं महत्त्व माहिती आहे. मला व्यायामाची आवडही आहे. तरीही निर्णय घेतल्याशिवाय पुढची कृती शक्य नव्हती. निर्णय झाला नाही, तर ना मला उठता येणार होतं, ना नीट झोपता येणार होती!
यातूनच लक्षात येतं की निर्णय घेण्याला आपल्या आयुष्यात किती मोठं महत्त्व आहे.
मानसशास्त्रीय अभ्यासकांच्या मते, सामान्य माणूस दिवसभरात जवळपास ३५,००० छोटे-मोठे निर्णय घेत असतो. यातील काही निर्णय अत्यंत साधे असतात, तर काही निर्णय आपल्या आयुष्याची दिशा बदलणारे असतात.
भारतीय माणूस स्वतःकडे एका तटस्थ भूमिकेतून खूप पूर्वीपासून पाहत आला आहे. जवळपास चार-साडेचार हजार वर्षांपूर्वी स्वतःच्या अंतर्मनाचं असं तटस्थ निरीक्षण सुरू झालं, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की मनामध्ये असंख्य विचार येत असतात.
पण प्रत्येक विचारानुसार कृती करता येत नाही. एखादी कृती करायची असेल, तर आपल्या विचारांचा, अनुभवांचा आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो. आणि हा निर्णय योग्य पद्धतीने घेणं अत्यंत महत्त्वाचं—crucial—आहे.
ही निर्णय घेण्याची प्रक्रिया ऋग्वेदामध्ये ‘धी’ या संकल्पनेतून व्यक्त झाली आहे.
पुढे गायत्री मंत्रातही हीच प्रार्थना अत्यंत सुंदरपणे व्यक्त होते—
“ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात्॥”
आपल्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला अधिक उन्नतता मिळो. ज्या निर्णयामुळे आपण क्रियाशील, कर्मशील होतो, त्या निर्णयप्रक्रियेला योग्य दिशेने जाण्याची प्रेरणा मिळो—हीच या प्रार्थनेची एक सुंदर बाजू आहे.
गायत्री मंत्रातील ही ‘धी’ पुढे उपनिषदांमध्ये ‘बुद्धी’ या स्वरूपात अधिक स्पष्ट होते—
“आत्मानं रथिनं विद्धि
शरीरं रथमेव तु।
बुद्धिं तु सारथिं विद्धि
मनः प्रग्रहमेव च॥”
इथे बुद्धीची तुलना सारथीशी केली आहे.
सारथीचं काम काय असतं? रथाला योग्य दिशा देणं. घोड्यांना नियंत्रित करणं. कुठे जायचं, कुठे थांबायचं, कोणत्या दिशेने जायचं—याचा निर्णय घेणं.
म्हणजेच, बुद्धी ही आपल्या जीवनाची सारथी आहे.
माणूस निर्णय कसा घेतो, यावरून त्याच्या आयुष्याकडे बऱ्याच अंशी पाहता येतं.
माणसाच्या मनात चांगले विचारही येतात आणि वाईट विचारही येतात. सकारात्मक विचार येतात, तसे नकारात्मक विचारही येतात. म्हणून एखाद्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार येतच नाहीत, असं म्हणणं अवघड आहे.
मुद्दा विचार येण्याचा नाही; त्या विचारांपैकी कोणता विचार स्वीकारायचा आणि त्यानुसार कोणती कृती करायची, हा आहे.
विचारांचं सारासार परीक्षण करून योग्य विचार स्वीकारणं आणि त्यानुसार कृती करणं—ही प्रक्रिया बुद्धीच्या माध्यमातून घडते.
म्हणून दोन व्यक्तींची तुलना करताना त्यांच्या मनात कोणते विचार येतात, यापेक्षा त्या विचारांमधून त्या कोणता निर्णय घेतात आणि त्या निर्णयानुसार काय कृती करतात, हे अधिक महत्त्वाचं ठरतं.
एखाद्या व्यक्तीला नकारात्मक विचार कमी येऊ शकतात आणि सकारात्मक विचार अधिक येऊ शकतात. पण नकारात्मक विचार येतच नाहीत, असं क्वचितच घडतं. योग्य विचार आणि अयोग्य विचार, असंही आपण म्हणू शकतो. मात्र योग्य विचार ओळखून त्यानुसार निर्णय घेणं आणि त्या निर्णयाची कृतीत रूपांतर करणं—हे जमलं पाहिजे.
गायत्री मंत्रातील “धियो यो नः प्रचोदयात्” ही प्रार्थना म्हणजे आपल्या बुद्धीला, आपल्या निर्णयक्षमतेला योग्य दिशेची प्रेरणा मिळावी, अशीच एक सुंदर आकांक्षा आहे.
भगवद्गीतेमध्येही श्रीकृष्ण अर्जुनाला याच निर्णयक्षमतेच्या संदर्भात एका महत्त्वाच्या टप्प्यावर घेऊन जातात.
आत्म्याचं ज्ञान सांगितलं. जगाच्या क्षणभंगुरतेचं ज्ञान दिलं. सुरुवातीला अर्जुनाला फटकारलं. युद्ध केल्यामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा कर्तव्यापासून पळ काढल्यामुळे होणारा त्रास अधिक मोठा आहे, याची जाणीव करून दिली. कर्म कोणत्या भावनेने केल्यास त्याचं पाप-पुण्य आपल्याला बांधून ठेवत नाही, हेही समजावून सांगितलं.
आणि मग श्रीकृष्ण एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन म्हणतात—
“व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम्॥”
अर्थात, हे कुरुनंदना! या मार्गात निश्चयात्मक बुद्धी एकच असते; परंतु ज्यांची बुद्धी निश्चयशून्य आहे, त्यांच्या विचारांना असंख्य शाखा फुटतात.
सकाळी माझ्यासमोर उभा राहिलेला प्रश्नही शेवटी हाच होता—उठायचं की झोपायचं?
विचार दोन्ही बाजूंनी होते. कारणं दोन्ही बाजूंनी होती. मन दोन्हीकडे खेचत होतं. पण त्या क्षणी गरज होती ती एका गोष्टीची—निश्चयात्मक बुद्धीची.
निर्णय झाला आणि मग कृती सहज झाली.
म्हणूनच आयुष्यात विचारांची संख्या किती आहे, यापेक्षा आपण त्या विचारांमधून कोणता विचार स्वीकारतो, त्यावर कोणता निर्णय घेतो आणि त्या निर्णयाचं कृतीत रूपांतर करतो का, हे अधिक महत्त्वाचं आहे.
कारण शेवटी विचार आपलं मन घडवतात; पण निर्णय आणि कृती आपलं आयुष्य घडवतात.
निश्चयाची बुद्धी : अर्जुनातून कृष्णाकडे
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ५७
२६ ऑगस्ट २०२६
नमस्कार.
आज आपण भगवद्गीतेतील एका अत्यंत महत्त्वाच्या श्लोकाकडे पाहणार आहोत—
“व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम्॥”
हा श्लोक वाचताना पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात येते—‘व्यवसायात्मिका बुद्धी’. ‘व्यवसाय’ हा शब्द ऐकला की आपल्या आधुनिक मराठीत आपल्याला नोकरी, धंदा किंवा व्यापार आठवतो. पण इथे ‘व्यवसाय’ या शब्दाचा अर्थ तो नाही. इथे व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे निश्चयात्मक बुद्धी.
ज्या बुद्धीमध्ये एक स्पष्ट दिशा आहे, एक ध्येय आहे, एक ठाम निश्चय आहे आणि त्या निश्चयापासून वारंवार धरसोड होत नाही—ती व्यवसायात्मिका बुद्धी. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात—“हे कुरुनंदना! या मार्गावर निश्चयात्मक बुद्धी एकच असते; परंतु ज्यांची बुद्धी निश्चयी नाही, त्यांच्या बुद्धीला असंख्य शाखा फुटतात.”
थोडक्यात सांगायचं तर—निश्चय असेल तर दिशा एक; निश्चय नसेल तर दिशांची संख्या अनंत.
व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे नेमकं काय?
निश्चयात्मक बुद्धी म्हणजे हट्टी बुद्धी नव्हे. हट्टीपणा म्हणजे विचार न करता एका गोष्टीला चिकटून राहणं. पण निश्चयात्मक बुद्धी म्हणजे विचार, अनुभव, परिस्थिती आणि विवेक यांच्या आधारे योग्य दिशा निश्चित करणं आणि मग त्या दिशेने ठामपणे पुढे जाणं.
अशी बुद्धी Focused असते, Goal-oriented असते, Target-oriented असते. तिच्यासमोर काय करायचं आहे, हे स्पष्ट असतं. “हे करू की ते करू?”, “इकडे जाऊ की तिकडे?”, “हे योग्य आहे की ते?” अशा सततच्या संभ्रमात ती अडकून राहत नाही.
याचा अर्थ असा नाही की अशा व्यक्तीला कधीच प्रश्न पडत नाहीत, शंका येत नाहीत किंवा अडचणी निर्माण होत नाहीत. प्रश्न पडतात, शंका येतात, परिस्थिती बदलते; पण त्या सगळ्यांमधून मार्ग काढत एक दिशा पकडण्याची ताकद तिच्यात असते. आणि एकदा दिशा निश्चित झाली की तिची मानसिक ऊर्जा सतत दिशा बदलण्यात खर्च होत नाही. तीच ऊर्जा मग कृतीमध्ये वापरली जाते.
आणि अव्यवसायात्मिका बुद्धी?
याच्या अगदी उलट आहे—अव्यवसायात्मिका बुद्धी. जिथे निश्चयाचा अभाव आहे, ध्येयाची स्पष्टता नाही, निर्णय घेतला जातो; पण लगेच त्याबद्दल शंका निर्माण होते. एक पाऊल पुढे टाकलं जातं आणि दुसऱ्या क्षणी दोन पावलं मागे घेतली जातात.
“हे करू की ते करू?”, “याचा फायदा होईल की त्याचा?”, “यश मिळालं नाही तर?”, “अपयश आलं तर?”, “लोक काय म्हणतील?”, “यापेक्षा दुसरा मार्ग चांगला असेल का?” अशा विचारांची मालिका सुरू झाली की मनाची ऊर्जा कृतीमध्ये खर्च होत नाही; ती संभ्रमामध्ये खर्च होते.
म्हणून श्रीकृष्ण म्हणतात—“बहुशाखा ह्यनन्ताश्च...” बुद्धीला अनेक शाखा फुटतात. एका झाडाला जशा अनेक फांद्या फुटतात, तसं मन एका विचारातून दुसऱ्या विचाराकडे आणि दुसऱ्या विचारातून तिसऱ्याकडे धावत राहतं. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी, दुसरी पूर्ण झाली की तिसरी. आणि त्या सगळ्यामध्ये मनाची दिशा पुन्हा पुन्हा बदलत राहते.
अर्जुनाच्या मनाला फुटलेल्या असंख्य शाखा
आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे—श्रीकृष्णांनी हा श्लोक अर्जुनाला याच क्षणी का सांगितला?
गीतेचा प्रवास आपण थोडा मागे पाहिला, तर हे अधिक स्पष्ट होतं. युद्ध अचानक निर्माण झालेलं नाही. युद्ध टाळण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. पांडवांनी अनेक प्रकारे तडजोडीचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला. शांततेचे प्रयत्न झाले. अगदी पाच गावांची मागणी करण्यापर्यंत गोष्ट आली. पण शेवटी युद्ध अटळ झालं.
अर्जुनाला हे सगळं माहिती होतं. तो या संपूर्ण प्रक्रियेचा भाग होता. आणि तरीही कुरुक्षेत्रावर रथ उभा राहतो. समोर भीष्म दिसतात, द्रोण दिसतात, आप्तस्वकीय दिसतात आणि अचानक अर्जुनाची बुद्धी ज्या दिशेने चालली होती, ती अनेक दिशांनी धावू लागते.
“युद्ध केलं तर कुलक्षय होईल. कुलधर्म नष्ट होईल. स्त्रिया दूषित होतील. वर्णसंकर निर्माण होईल. पितरांचा नाश होईल. आपल्याला पाप लागेल. नरकात जावं लागेल.” आणि शेवटी तो अगदी म्हणतो—“यापेक्षा मी भिक्षा मागून जगलेलं बरं!”
एकेकाळी ज्याने युद्धाचा निर्णय घेतला होता, ज्याला क्षात्रधर्म माहिती होता, जो या संपूर्ण संघर्षाचा भाग होता, त्याची बुद्धी आता परिणामांच्या कल्पनांनी व्यापून जाते.
मूळ प्रश्न होता—“आता माझं कर्तव्य काय?” पण अर्जुनाच्या बुद्धीने प्रश्न बदलला—“याचा परिणाम काय होईल?” आणि इथूनच त्याचा संभ्रम वाढत गेला.
वर्तमानातील कर्म विरुद्ध भविष्याची कल्पना
अर्जुनाच्या मनाची ही अवस्था अत्यंत सूक्ष्म आहे. तो वर्तमानातील कर्मापेक्षा भविष्याच्या कल्पित परिणामांमध्ये अडकला आहे.
युद्ध कसं लढायचं? रणनिती काय असावी? आपलं कर्तव्य काय? या प्रश्नांऐवजी त्याच्या मनात प्रश्नांची गर्दी आहे—“पाप लागेल का?”, “नरकात जावं लागेल का?”, “कुलक्षय झाला तर?”, “आपण जिंकलो तर?”, “ते जिंकले तर?”, “आपण मारावं की मरावं?”
अर्थात, त्याच्या मनात करुणा आहे; पण त्या करुणेबरोबर मोह, भीती आणि परिणामांची चिंता मिसळली आहे. आणि जेव्हा बुद्धीचा निश्चय सुटतो, तेव्हा मन या सगळ्यांच्या आहारी जाऊ लागतं. म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला पुन्हा निश्चयाच्या केंद्रावर आणण्याचा प्रयत्न करतात—व्यवसायात्मिका बुद्धी.
प्रक्रियेवर लक्ष की परिणामावर?
इथे मला गीतेचा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिसतो. आपल्या आयुष्यात आपण एखादं काम सुरू करतो; पण काम करताना आपलं लक्ष कुठे असतं—प्रक्रियेवर की परिणामावर?
विद्यार्थी अभ्यास करतो. त्याचं लक्ष अभ्यास करण्याच्या प्रक्रियेवर आहे का, की “किती मार्क मिळतील?” यावर? व्यावसायिक एखादं काम करतो. त्याचं लक्ष काम उत्तम करण्यावर आहे का, की “यातून मला किती फायदा होईल?” यावर? एखादा माणूस समाजासाठी काम करतो. त्याचं लक्ष कामावर आहे का, की “लोक माझं किती कौतुक करतील?” यावर?
परिणाम महत्त्वाचा नाही, असं नाही. पण परिणामावरचं अतिरेकी लक्ष वर्तमानातील कर्माची गुणवत्ता कमी करू शकतं.
व्यवसायात्मिका बुद्धी आपल्याला सांगते—तुला जे करायचं आहे, ते स्पष्टपणे ओळख. त्या कामावर लक्ष केंद्रित कर. प्रक्रिया प्रामाणिकपणे पार पाड आणि परिणामाच्या अतिरेकी चिंतेत स्वतःची ऊर्जा वाया घालवू नकोस.
हीच पुढे गीतेच्या कर्मयोगाची दिशा बनते.
आपल्या आयुष्यात अर्जुन कुठे आहे?
आता अर्जुनाला थोडं बाजूला ठेवूया. कारण गीता केवळ अर्जुनासाठी नाही. अर्जुनाच्या जागी आपण स्वतःला ठेवायचं आहे.
आपल्या आयुष्यात अशी धरसोड किती वेळा होते? एखादा निर्णय घ्यायचा असतो. आपण निर्णय घेतो. दोन दिवसांनी शंका येते. पुन्हा विचार बदलतो. पुन्हा निर्णय बदलतो. पुन्हा नवीन योजना, पुन्हा नवीन लक्ष्य, पुन्हा नवा उत्साह आणि काही दिवसांनी पुन्हा सगळं थांबतं.
कधी कधी आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्याला माहीत असतं; पण आपण ते करायचं ठरवू शकत नाही. हीच अव्यवसायात्मिका बुद्धी.
आणि एखाद्या क्षणी आपण मात्र स्वतःशी ठामपणे म्हणतो—“हे करायचंच आहे.” मग कितीही अडचणी आल्या, आपण मार्ग शोधत राहतो. तेव्हा आपली बुद्धी व्यवसायात्मिका होते.
Focus असला की ऊर्जा वाचते
याचा आपल्या कार्यक्षमतेशी खूप जवळचा संबंध आहे. आपण एखादं काम Focused पद्धतीने करतो, तेव्हा आपली मानसिक ऊर्जा एका दिशेने वाहते. पण एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करत राहिलो, तर ऊर्जा सतत एका दिशेने दुसऱ्या दिशेने वळत राहते.
त्यामुळे थकवा वाढतो, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, कामाचा आनंद कमी होतो आणि कामातून शिकण्याची वृत्तीही कमी होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे—आपल्याकडे वेळ असूनही आपल्याला वेळ कमी पडतो.
म्हणून प्रश्न असा आहे—व्यवसायात्मिका बुद्धीने काम केल्यावर आपली परिणामकारकता वाढते की अव्यवसायात्मिका बुद्धीने? निश्चयात्मक बुद्धीने ऊर्जा अधिक फलदायी होते की अनिश्चित बुद्धीने? एक स्पष्ट ध्येय असताना आपण अधिक आनंदाने काम करतो की अनेक दिशांनी विखुरलेले असताना?
प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यात हा प्रयोग करून पाहावा.
स्वामी विवेकानंद आणि ‘One Idea’
इथे स्वामी विवेकानंदांचं एक प्रसिद्ध वाक्य मला वारंवार आठवतं—
“Take up one idea. Make that one idea your life—think of it, dream of it, live on that idea.”
एका विचाराला पकडा. त्या विचाराला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवा. त्याचा विचार करा, त्याचं स्वप्न पाहा आणि त्या विचारानुसार जगा.
हा संदेश आणि “व्यवसायात्मिका बुद्धी” यांच्यात किती विलक्षण साम्य आहे! अनेक दिशांनी धावणाऱ्या मनाला एक दिशा देणं, ऊर्जा विखुरू न देता एका ध्येयाकडे केंद्रित करणं.
याचा अर्थ बाकीचं जग विसरणं नाही; तर आपल्या प्राधान्यक्रमाची स्पष्टता निर्माण करणं.
अव्यवसायात्मिका बुद्धी निर्माण कशामुळे होते?
हा प्रश्न आता आपल्याला स्वतःला विचारायला हवा. आपण निश्चय का गमावतो? आपली बुद्धी अनेक शाखांमध्ये का फुटते?
कधी भीतीमुळे, कधी मोहामुळे, कधी अतिरेकी अपेक्षांमुळे, कधी इतर लोकांच्या मतांमुळे, कधी अपयशाच्या भीतीमुळे, कधी यशाच्या हव्यासामुळे, कधी आपल्याला नेमकं काय हवं आहे याचीच स्पष्टता नसल्यामुळे आणि कधी आपण एकाच वेळी खूप काही मिळवण्याचा प्रयत्न करतो म्हणून.
म्हणून गीतेचा अभ्यास करताना केवळ श्लोकाचा अर्थ समजून घेणं पुरेसं नाही. “हा श्लोक माझ्या आयुष्यात कुठे लागू होतो?” हा प्रश्न विचारावा लागेल.
मी कुठे बहुशाखा झालो आहे? माझ्या आयुष्यात कोणत्या गोष्टींबद्दल मी सतत धरसोड करतो? माझ्या कोणत्या निर्णयामध्ये भीती माझ्या बुद्धीवर राज्य करते? माझं कोणतं ध्येय खरंच माझं आहे? आणि एकदा ते समजलं की—मी माझी बुद्धी पुन्हा एका दिशेने कशी केंद्रित करू शकतो?
हा अभ्यास महत्त्वाचा आहे.
गीता शिकताना कधी अर्जुन व्हायचं आणि कधी कृष्ण?
मला वाटतं, भगवद्गीतेच्या अभ्यासातील हा एक अतिशय सुंदर पैलू आहे. आपण नेहमी अर्जुनच व्हायचं असं नाही.
हो—अनेक वेळा आपण अर्जुन असतो. आपण संभ्रमात असतो. आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते. आपली बुद्धी बहुशाखा झालेली असते. आपण भीती, मोह आणि अपेक्षांमध्ये अडकलेले असतो. त्या वेळी आपल्याला कृष्णाची गरज असते.
पण आपल्या आयुष्यात अशीही अनेक माणसं असतात, जी अर्जुनाच्या अवस्थेतून जात असतात. आपली मुलं, आपली भावंडं, आपले मित्र, आपले सहकारी, आपले कार्यकर्ते—आपल्या आसपासची अनेक माणसं.
त्यावेळी प्रश्न बदलतो—“मी त्यांच्यासाठी कृष्णाची भूमिका कशी निभावू?”
त्यांना आदेश देऊन नव्हे, त्यांच्यावर आपले निर्णय लादून नव्हे; तर त्यांच्या बुद्धीला स्पष्टता मिळेल, त्यांना स्वतःचा मार्ग दिसेल आणि ते स्वतः निश्चय करू शकतील, अशा प्रकारे त्यांच्याशी संवाद साधून.
म्हणून मला वाटतं—गीता आपल्याला केवळ अर्जुन व्हायला शिकवत नाही; ती आपल्याला हळूहळू कृष्ण व्हायलाही शिकवते.
आपणच अर्जुन आणि आपणच कृष्ण
खरं तर हा विचार आणखी पुढे नेला पाहिजे.
आपल्यासाठी आपण अर्जुन असतो आणि आपल्यासाठी आपणच कृष्णही व्हायला हवं.
आपल्या मनात संभ्रम निर्माण झाला की स्वतःला प्रश्न विचारणारा कोण? आपल्या भीतीला थांबवणारा कोण? आपल्या मोहापासून आपल्याला दूर करणारा कोण? आपल्या कर्तव्याची आठवण करून देणारा कोण?
आपलीच विवेकी बुद्धी.
म्हणजे आपल्या अंतर्मनात एक अर्जुन आहे आणि एक कृष्णही आहे. अर्जुन प्रश्न विचारतो. कृष्ण उत्तर शोधायला दिशा देतो. अर्जुन संभ्रमित होतो. कृष्ण बुद्धीला स्थैर्य देतो. अर्जुन म्हणतो—“मला कळत नाही.” कृष्ण म्हणतो—“थांब. पुन्हा विचार कर. तुझं कर्तव्य काय आहे ते पाह.”
आणि म्हणूनच भगवद्गीता वाचताना आपल्याला दोन भूमिका सतत तपासाव्या लागतील—“मी आत्ता अर्जुनाच्या भूमिकेत आहे का?” की “माझ्या आसपासच्या एखाद्या अर्जुनासाठी मला कृष्ण व्हायचं आहे?”
निश्चयात्मक बुद्धीने गीतेकडे पाहूया
गीतेचा अभ्यास करताना आपण एक निश्चय करूया. केवळ श्लोक पाठ करायचे नाहीत. केवळ अर्थ समजून घ्यायचा नाही. केवळ चर्चा करायची नाही. तर स्वतःला प्रश्न विचारायचा—
“गीता वाचल्यानंतर माझ्यात काय बदलतो आहे?”
माझे निर्णय बदलत आहेत का? माझी प्रतिक्रिया बदलते आहे का? माझ्या मनाचा गोंधळ कमी होतो आहे का? माझ्या कर्तव्याची स्पष्टता वाढते आहे का? माझी बुद्धी अधिक स्थिर होते आहे का? आणि सर्वांत महत्त्वाचं—माझ्या कृतीत गीता उतरते आहे का?
हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे.
गीतेचा प्रसारही व्यवसायात्मिका बुद्धीने
आजच्या काळात चांगल्या विचारांचा प्रसार करणे हीदेखील एक जबाबदारी आहे. वाईट गोष्टी फार वेगाने पसरतात. चांगल्या गोष्टींना मात्र वेळ लागतो.
म्हणूनच भगवद्गीतेचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीही निश्चयात्मक बुद्धी आवश्यक आहे.
स्वतः गीता वाचूया, समजून घेऊया, अभ्यास करूया, आपल्या जीवनात तिचा प्रयोग करूया आणि मग आपल्या अनुभवातून इतरांशी ती जोडूया.
एखाद्या व्यक्तीला गीतेशी जोडणं म्हणजे त्याला केवळ एक पुस्तक देणं नाही. कदाचित आपण त्याला स्वतःकडे पाहण्याचा एक आरसा देत असतो. कदाचित त्याला संभ्रमातून निश्चयाकडे जाण्याचा मार्ग देत असतो. कदाचित त्याच्या जीवनातील एखाद्या कुरुक्षेत्रावर त्याला उभं राहण्याची शक्ती देत असतो.
म्हणून हा केवळ पुस्तकाचा प्रचार नाही. हा विचारांचा प्रसार आहे. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे—निश्चय, विवेक आणि कर्मयोगाचा प्रसार आहे.
धर्मसंस्थापना, लोकसंग्रह आणि निश्चयात्मक बुद्धी
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ५९ | २७ ऑगस्ट २०२६
नमस्कार.
भगवद्गीतेचा विचार आपण समजून घेत असताना एक गोष्ट वारंवार जाणवते—हा उपदेश युद्ध सुरू होण्याच्या क्षणी अर्जुनाला केला जातोय, हीच एक अलौकिक गोष्ट आहे. पण त्याहीपेक्षा अलौकिक गोष्ट अशी आहे की, भगवद्गीतेमध्ये जे ज्ञान सांगितले आहे, जी मूल्यव्यवस्था सांगितली आहे, त्या मूल्यव्यवस्थेवर आधारित एक नवी सामाजिक आणि राजकीय रचना उभी करण्यासाठीच हे युद्ध लढले जात आहे.
पांडवांचा उद्देश केवळ कौरवांचा पराभव करणे किंवा त्यांचा नाश करणे हा नाही. त्यामागे एक व्यापक उद्देश आहे—धर्मावर आधारित राजसत्ता आणि समाजव्यवस्था उभी करणे. यालाच आपण ‘धर्मसंस्थापना’ म्हणतो. त्याचबरोबर समाजातील माणसामाणसांमध्ये परस्पर सहकार्य, परस्परपूरकता आणि एकमेकांच्या विकासाला हातभार लावण्याची वृत्ती निर्माण करून एक सुदृढ लोकव्यवस्था उभी करणे—याला भगवद्गीतेच्या भाषेत ‘लोकसंग्रह’ म्हणतात.
म्हणून भगवद्गीतेचे प्रयोजन केवळ अर्जुनाचा मोह दूर करणे एवढेच नाही. अर्जुनाचा मोह दूर करणे हे तात्कालिक कारण आहे; पण धर्मसंस्थापना आणि लोकसंग्रह हे त्यामागचे व्यापक साध्य आहे. यामुळेच भगवद्गीता हा केवळ अध्यात्माचा ग्रंथ नाही; तो एक क्रांतिकारक जीवनदृष्टी देणारा ग्रंथ आहे.
त्या काळातील सामाजिक रचना आणि राजसत्ता मोठ्या प्रमाणात भ्रष्ट झालेली होती. अशा परिस्थितीत जुन्या, कुजलेल्या व्यवस्थेचे रूपांतर करून नवीन मूल्यव्यवस्थेवर आधारित व्यवस्था उभी करायची असेल, तर केवळ बाह्य सत्ता बदलून उपयोग होत नाही. माणसाच्या विचारांची, बुद्धीची आणि जीवनदृष्टीची पुनर्रचना करावी लागते. आणि याच ठिकाणी भगवद्गीतेचा क्रांतिकारीपणा जाणवतो.
धर्म आणि अध्यात्म म्हणजे नेमकं काय?
आपल्यापैकी अनेकांच्या मनात ‘धर्म’ आणि ‘अध्यात्म’ म्हटलं की काही विशिष्ट कल्पना उभ्या राहतात. काहीतरी मिळवण्यासाठी देवाकडे नवस करणे, आपले दुःख कमी व्हावे म्हणून प्रार्थना करणे, आपल्या मनासारख्या गोष्टी घडाव्यात म्हणून देवाचे साहाय्य मागणे, देवाला आहुती देऊन इच्छित फळ मिळवण्याचा प्रयत्न करणे, मृत्यूनंतर स्वर्गातील सुख मिळावे अशी अपेक्षा करणे किंवा आपल्या संकुचित स्वार्थाला बळ देण्यासाठी ईश्वराचा आधार घेणे—आणि कधी कधी या सगळ्याला गोड, आकर्षक भाषेची जोड देऊन त्यातून स्वतःची प्रसिद्धी, प्रतिष्ठा किंवा प्रभुत्व जपणे—हेच धर्म आणि अध्यात्म आहे, अशी एक समजूत समाजात निर्माण झालेली दिसते.
पण भगवद्गीता या सगळ्या कल्पनांना मुळापासून आव्हान देते. ती बाह्य अवडंबरावर प्रहार करते. ती केवळ कर्मकांडामध्ये अडकलेल्या अध्यात्मावर प्रश्न उपस्थित करते. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ती आपल्याला आतून बदलण्याची दिशा देते. कारण बाहेरच्या गोष्टी बदलल्या आणि आतला माणूस बदलला नाही, तर अध्यात्म कुठे घडले?
आपण कितीही पूजा केली, कितीही विधी केले, कितीही ग्रंथ वाचले, कितीही प्रवचनं ऐकली; पण आपली बुद्धी निश्चयात्मक झाली नाही, आपल्या जीवनात परिवर्तन झाले नाही, आपल्या वृत्ती बदलल्या नाहीत—तर आपण अध्यात्माच्या मुळाशी पोहोचलो आहोत का? भगवद्गीतेचा प्रश्न हाच आहे.
व्यवसायात्मिका बुद्धी निर्माण का होत नाही?
गेल्या काही भागांमध्ये आपण ‘व्यवसायात्मिका बुद्धी’, म्हणजेच निश्चयात्मक बुद्धी, याचा विचार केला. निश्चयात्मक बुद्धी म्हणजे काय, तिचे महत्त्व काय आणि ती माणसाला जीवनात एकाग्र, स्थिर आणि ध्येयवादी कशी बनवते, हे आपण पाहिले. पण आता पुढचा प्रश्न निर्माण होतो—ही निश्चयात्मक बुद्धी आपल्या जीवनात निर्माण का होत नाही? अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या बुद्धीला सतत अस्थिर करते?
श्रीकृष्ण अर्जुनाला याचे अत्यंत स्पष्ट उत्तर देतात. ते म्हणतात—
“यामिमां पुष्पितां वाचं
प्रवदन्त्यविपश्चितः ।
वेदवादरताः पार्थ
नान्यदस्तीति वादिनः ॥”
अर्थात, हे पार्थ! ज्यांची विवेकबुद्धी विकसित झालेली नाही, असे लोक आकर्षक, पुष्पित शब्दांनी भरलेल्या वाणीने बोलतात. वेदांतील कर्मकांडाच्या वर्णनातच रमणारे हे लोक त्यापलीकडे काहीही श्रेष्ठ नाही, असे मानतात.
त्यानंतर श्रीकृष्ण पुढे म्हणतात—
“कामात्मानः स्वर्गपरा
जन्मकर्मफलप्रदाम् ।
क्रियाविशेषबहुलां
भोगैश्वर्यगतिं प्रति ॥”
अर्थात, ज्यांचे मन कामना आणि वासनांनी व्यापलेले आहे, जे स्वर्गसुखालाच सर्वोच्च मानतात, जे कर्माच्या फळांमध्ये आणि विविध प्रकारच्या कर्मकांडांमध्ये गुंतलेले आहेत आणि ज्यांचे अंतिम ध्येय भोग व ऐश्वर्य आहे—
आणि मग श्रीकृष्ण त्याचा परिणाम अगदी स्पष्ट शब्दांत सांगतात—
“भोगैश्वर्यप्रसक्तानां
तयापहृतचेतसाम् ।
व्यवसायात्मिका बुद्धिः
समाधौ न विधीयते ॥”
भोग आणि ऐश्वर्यामध्ये अत्यंत आसक्त झालेल्या आणि त्या आकर्षक वाणीमुळे ज्यांचे चित्त हरपून गेले आहे, अशा लोकांची निश्चयात्मक बुद्धी स्थिर होत नाही.
किती दणकट भाषेत श्रीकृष्ण सांगतात!
आपली बुद्धी अस्थिर करणाऱ्या गोष्टी
या तीन श्लोकांचा आपण आपल्या जीवनाच्या संदर्भात विचार केला, तर काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. वरवर सुंदर, ऐकायला गोड आणि आकर्षक वाटणाऱ्या आश्वासनांना सत्य मानणे; पण त्यामागे विवेक, तर्क आणि आत्मपरिवर्तन आहे का, याचा विचार न करणे—ही पहिली अडचण आहे. दुसरी म्हणजे धर्माचा केवळ कर्मकांडापुरता अर्थ घेणे. वेदांचा आणि धर्माचा व्यापक अर्थ न समजून घेता केवळ यज्ञ, विधी, पूजा आणि त्यातून मिळणाऱ्या भौतिक लाभांमध्ये अडकून राहणे.
तिसरी अडचण म्हणजे भौतिक किंवा स्वर्गीय सुखापलीकडे काही श्रेष्ठ असू शकते हे नाकारणे. ‘मला सुख हवे, मला संपत्ती हवी, मला प्रतिष्ठा हवी, मला स्वर्ग हवा’—या पलीकडे आत्मज्ञान, ईश्वरप्राप्ती किंवा स्वतःच्या स्वरूपाचा अनुभव यांसारखे काही श्रेष्ठ ध्येय असू शकते, हेच न मानणे. चौथी अडचण म्हणजे वासना आणि इच्छांच्या जाळ्यात अडकणे. मनामध्ये सतत नवीन सुखांच्या, नवीन वस्तूंच्या, नवीन अनुभवांच्या आणि नवीन अपेक्षांच्या जळमटांची भर पडत राहणे. आणि पाचवी म्हणजे भोग आणि ऐश्वर्य हेच जीवनाचे अंतिम ध्येय मानणे. संपत्ती, सत्ता, प्रतिष्ठा, प्रसिद्धी आणि विलासी जीवन मिळवणे—यालाच जीवनाचे यश समजणे.
या सगळ्याचा एकच परिणाम होतो—बुद्धीची स्थिरता नष्ट होते. मन एका इच्छेकडून दुसऱ्या इच्छेकडे धावत राहते. एका सुखानंतर दुसऱ्या सुखाचा शोध सुरू होतो. मिळालेलं पुरेसं वाटत नाही आणि न मिळालेलं सतत आकर्षित करत राहतं. मग निश्चयात्मक बुद्धी कुठून निर्माण होणार?
मृगजळामागे धावणारे जीवन
असं जीवन म्हणजे मृगजळामागे धावणाऱ्या माणसासारखं आहे. दूरवर पाणी दिसतं. आपण धावत जातो. जवळ गेल्यावर लक्षात येतं—ते पाणी नाही. मग पुन्हा पुढे पाणी दिसतं. पुन्हा धावतो. पुन्हा निराशा.
अशाच प्रकारे इच्छा, सुख, संपत्ती, प्रतिष्ठा, सत्ता आणि प्रसिद्धी यांच्या मागे आपण आयुष्यभर धावत राहतो. धावतो खूप; पण पोहोचतो कुठे? आपल्याला स्वतःचं स्वरूप सापडत नाही. आपल्यामध्ये असलेली शांतता अनुभवता येत नाही. आपल्या अंतःकरणातील स्थिर आनंदाचा स्पर्श होत नाही.
म्हणूनच भगवद्गीतेचा आग्रह आहे—बाहेरच्या जगाला जिंकण्यापेक्षा आधी स्वतःला समजून घ्या.
स्वामी विवेकानंदांचा अग्निमंत्र
याच विचाराची अत्यंत ताकदवान अभिव्यक्ती स्वामी विवेकानंदांच्या विचारांमध्ये दिसते. ते म्हणतात—
“Spirituality has nothing to do with miracles.”
अध्यात्माचा चमत्कारांशी संबंध नाही. अध्यात्म म्हणजे काही अद्भुत शक्ती मिळवणे नव्हे. अध्यात्म म्हणजे माणसाचे अंतर्बाह्य परिवर्तन.
स्वामीजींच्या शब्दांत—
“Each soul is potentially divine. The goal is to manifest this divinity. Do this either by work, worship, psychic control or philosophy—by one, or more, or all of these—and be free! This is the whole of religion. Doctrines, dogmas, rituals, books, forms, and temples are but secondary details.”
प्रत्येक जीवामध्ये दैवी शक्यता आहे. त्या दैवीत्वाचे प्रकटीकरण करणे हे जीवनाचे ध्येय आहे. कर्मातून करा, उपासनेतून करा, मनाच्या नियंत्रणातून करा किंवा तत्त्वज्ञानाच्या मार्गाने करा—एका मार्गाने करा, अनेक मार्गांनी करा; पण स्वतःला मुक्त करा.
स्वामीजींच्या मते धर्माचा हा गाभा आहे. बाकी सिद्धांत, मतप्रणाली, कर्मकांड, ग्रंथ, बाह्यरूपं आणि मंदिरं—ही दुय्यम साधनं आहेत. आणि म्हणूनच काया, वाचा, मनसा एकवाक्यता हा अध्यात्माचा कस आहे. फक्त बोलण्यात अध्यात्म आणि प्रत्यक्ष जीवनात त्याच्या विरुद्ध आचरण—हे चालणार नाही.
गीता आपल्या जीवनात आणणे म्हणजे काय?
भारतीय तत्त्वज्ञानाचे वैशिष्ट्य हेच आहे की ते केवळ मानण्याची गोष्ट सांगत नाही; ते जगण्याची दिशा देते. भगवद्गीता वाचणे म्हणजे काही श्लोक पाठ करणे नव्हे. गीता आपल्या आयुष्यात आणणे म्हणजे आपली बुद्धी निश्चयात्मक बनवणे, आपल्या इच्छांकडे सजगपणे पाहणे, भोग आणि ऐश्वर्य यांच्या मोहापलीकडे जाणे, स्वतःमध्ये परिवर्तन घडवणे आणि त्या परिवर्तनातून समाजाच्या परिवर्तनासाठी उभे राहणे.
कारण गीतेचा प्रवास ‘मी’पासून ‘आपण’कडे आहे. स्वतःचे आत्मपरिवर्तन आणि समाजाचे कल्याण—या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या नाहीत. म्हणूनच धर्मसंस्थापना आणि लोकसंग्रह हे भगवद्गीतेच्या व्यापक प्रयोजनाचे दोन अत्यंत महत्त्वाचे आयाम आहेत.
आजच्या काळात आपल्याला याच विचाराची अधिक गरज आहे. गीता केवळ मंदिरात राहू नये. ती केवळ ग्रंथालयात राहू नये. ती केवळ प्रवचनांमध्ये राहू नये. ती आपल्या निर्णयांमध्ये उतरली पाहिजे, आपल्या वर्तनात उतरली पाहिजे, आपल्या कुटुंबात उतरली पाहिजे, आपल्या कार्यात उतरली पाहिजे आणि शेवटी आपल्या समाजजीवनात उतरली पाहिजे.
आपण स्वतः बदललो, आपल्यासारखी विचार करणारी आणि जगणारी माणसं आपल्या आसपास निर्माण झाली आणि अशा माणसांच्या माध्यमातून समाज अधिक परस्परपूरक, सहकार्यशील आणि विकासाभिमुख झाला—तरच गीतेचा विचार खऱ्या अर्थाने जगला जाईल.
म्हणून पुन्हा एकदा माझी आपल्याला विनंती आहे—भगवद्गीतेचा हा अभ्यास केवळ आपल्यापुरता ठेवू नका. तो इतरांपर्यंत पोहोचवा. एखाद्या व्यक्तीने जरी गीतेचा एक विचार मनापासून समजून घेतला आणि तो आपल्या जीवनात उतरवला, तरी त्या एका परिवर्तनातून अनेक परिवर्तनांची सुरुवात होऊ शकते.
स्वतः बदलूया, इतरांना जोडूया आणि गीतेचा विचार जगण्याची चळवळ उभी करूया.
कारण भगवद्गीता आपल्याला केवळ शांत बसायला शिकवत नाही—ती आपल्याला जागं करते, उभं करते आणि परिवर्तनासाठी प्रवृत्त करते.
अध्यात्माचे दुकान की आत्मपरिवर्तनाचा मार्ग?
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ६० | २९ ऑगस्ट २०२६
नमस्कार.
अध्यात्म आणि धर्माच्या नावाने आज अनेक दुकाने उघडलेली दिसतात. ही दुकाने आजच उघडली गेली आहेत असे मात्र म्हणता येणार नाही. हजारो वर्षांपूर्वी भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अशा प्रवृत्तीपासून सावध केले आहे. दुसऱ्या अध्यायातील ४२, ४३ आणि ४४ हे तीन श्लोक या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात— “यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः। वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः॥” म्हणजे, हे पार्थ, ज्यांची बुद्धी स्थिर नाही, जे केवळ शब्दांच्या आणि कर्मकांडांच्या बाह्य आकर्षणात रमलेले आहेत, ते अशी फुलांसारखी आकर्षक वाणी बोलतात, जिच्यामध्ये ऐकायला गोडवा असतो, आश्वासन असते; पण जीवनाच्या अंतिम सत्याकडे नेणारी दिशा नसते. हीच “पुष्पित वाणी” आहे. गोड बोलणारी, आकर्षक बोलणारी, मोठमोठी आश्वासने देणारी, भीती दाखवणारी, काहीतरी मिळवून देण्याचे सांगणारी आणि त्या सगळ्याच्या बदल्यात आपल्याकडून काहीतरी मागणारी. आज अशा दुकानांची कमतरता नाही. कोणी दुःख दूर करण्याचे दुकान मांडले आहे, कोणी पैसा मिळवून देण्याचे, कोणी यश, सत्ता आणि ऐश्वर्य मिळवून देण्याचे, कोणी ग्रहदोष दूर करण्याचे, कोणी कर्मकांडांचे, कोणी स्वर्गाचे, तर कोणी जन्नतीचे. प्रश्न एवढाच आहे— हे खरे अध्यात्म आहे का?
माझ्या आयुष्यातला एक अनुभव मला आजही आठवतो. महाविद्यालयीन काळात मी एका गारुड्याचा खेळ पाहत होतो. तो सापाचा खेळ दाखवत होता; पण त्याचबरोबर तो माणसांच्या आयुष्यातील दुःख, प्रश्न, अडचणी आणि अस्वस्थता यांच्याबद्दलही बोलत होता. तो अतिशय ठामपणे सांगत होता की, तुमचे आयुष्य बदलू शकते, तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो, तुम्ही यशस्वी होऊ शकता, तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात; आणि त्यासाठी काय करायचे? त्याच्याकडचा ताईत घ्यायचा! किंमत होती शंभर रुपये. तो इतक्या सुंदरपणे, आर्जवाने, प्रेमाने आणि गोडगोड बोलत होता की अनेक लोक त्याच्या बोलण्याला भुलले. माझ्याही हातामध्ये त्याने एक ताईत ठेवला. मी तो घ्यायला तयार नव्हतो. पण तो म्हणाला, “तुम्ही ठेवा हो, तुम्हाला लगेच परिणाम दिसेल.” त्याने माझ्याकडून शंभर रुपये घेतले. मी तो ताईत हातात ठेवला आणि खरंच काही परिणाम होतो का, हे पाहू लागलो. काहीच झाले नाही! मी त्याच्याकडे पैसे परत मागू लागलो; पण तो पैसे देईना. मी चिडलो, आरडाओरडा करू लागलो. पण माझ्यासारखेच अनेक लोक तिथे होते. त्यांच्या हातामध्येही त्याने ताईत ठेवले होते आणि त्यांच्याकडूनही पैसे घेतले होते. आज मागे वळून पाहताना मला जाणवते की तो गारुडी ताईत विकत नव्हता; तो माणसाच्या अस्वस्थतेवर आश्वासन विकत होता. त्याला लोकांचे दुःख माहिती होते, लोकांना कोणत्या गोष्टींची भीती वाटते हे माहिती होते आणि लोकांना काय हवे आहे हेही माहिती होते. पण त्या माहितीचा उपयोग लोकांच्या परिवर्तनासाठी नव्हे, तर स्वतःच्या कमाईसाठी होत होता. हीच तर “यामिमां पुष्पितां वाचम्” आहे.
पुढे माझ्या आयुष्यात आणखी एक अनुभव आला आणि तो यापेक्षा अधिक गंभीर होता. माझे लग्न झाले होते. मी, माझी आई आणि माझी पत्नी असे आम्ही तिघे एकत्र राहत होतो. त्या काळात माझा भगवद्गीतेचा अभ्यास सुरू झाला होता; पण तो आजच्या इतका खोलवर झालेला नव्हता. गीता वाचणे एक गोष्ट आहे, ती पटणे ही दुसरी गोष्ट आहे आणि मोहाच्या क्षणी गीतेचा विचार जागा राहणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. आपण अनेकदा शास्त्र वाचतो; पण जीवनात एखादी परिस्थिती आली की पुन्हा जुन्याच भीती, जुन्याच श्रद्धा आणि जुन्याच मोहाच्या आधारावर निर्णय घेतो. आमच्या परिचयाचे गणिताचे एक चांगले प्राध्यापक होते. ते जन्मवेळेनुसार कुंडली तयार करून देत. एकदा ते नाशिकहून आलेल्या एका व्यक्तीला घेऊन आमच्या घरी आले. त्या व्यक्तीने आमच्याशी बोलायला सुरुवात केली. त्याने आमचे प्रश्न ओळखले, आमच्या अस्वस्थतेबद्दल सांगितले, आमच्या अडचणींना काही कारणे जोडली आणि मग उपाय सांगायला सुरुवात केली. “शनिवारी काळे कपडे घालू नका,” असे त्याने सांगितले. मला तर शक्यतो काळे कपडे घालूच नका, असे सांगितले. तो ज्या अधिकाराने बोलत होता, ज्या आत्मविश्वासाने बोलत होता आणि ज्या गोड पद्धतीने बोलत होता, त्याचा प्रभाव इतका जबरदस्त होता की आम्ही एका वेगळ्याच मानसिक वातावरणात गेलो. जणू काही आम्ही संमोहित झालो होतो.
मग हळूहळू त्याने सांगितले— “यासाठी तुम्हाला नारायण नागबली करावा लागेल. तो नाशिकला करावा लागेल.” माझी फारशी मानसिकता होत नव्हती; पण माझ्या आईची झाली. दुःखात असलेल्या माणसाला एखादे कारण मिळाले आणि त्यावर एखादा उपाय मिळाला, की मनाला आधार वाटतो. हेच त्या व्यक्तीने पकडले होते. त्याने सांगितले, “मी नारायण नागबली करून देतो, शांती करून देतो.” त्याने लाल कपडा आणायला सांगितला. त्यामध्ये काही वस्तू ठेवल्या आणि त्या आमच्या गजानन महाराजांच्या मंदिराजवळ नेऊन ठेवायला सांगितल्या. आणि मग आणखी एक आश्वासन दिले— “अर्ध्या तासामध्ये तुम्हाला एक दृष्टांत होईल. तो अलौकिक असेल.” नारायण नागबलीसाठी खर्च किती, असे विचारले असता तो म्हणाला, “मी तोंडाने पैशांचा विषय बोलत नाही. मी कागदावर लिहून देतो.” त्याने रक्कम कागदावर लिहून दिली. माझ्या आईने ती रक्कम आणून दिली. तो पैसे घेऊन निघून गेला.
आता आमची उत्सुकता होती—दृष्टांत कधी होतो ते पाहायचे! अर्धा तास झाला. काहीच झाले नाही. मी त्याला फोन केला. त्याने फोन उचलला आणि “वाट पाहा,” एवढेच म्हणाला. त्यानंतर त्याने फोन बंद केला. त्या क्षणी मला एक गोष्ट स्पष्ट दिसली— दुकान मांडले होते! दुःख संपवण्याचे दुकान, शांती देण्याचे दुकान, भविष्य बदलण्याचे दुकान, कर्मकांडाचे दुकान आणि सुख-ऐश्वर्य मिळवून देण्याचे दुकान. आणि या दुकानाचा सर्वात मोठा ग्राहक कोण? माणसाची भीती आणि त्याची अस्वस्थता.
माणूस अज्ञानी असतो म्हणूनच तो भुलतो असे नाही. तो अस्वस्थ असतो म्हणूनही भुलतो. त्याला भविष्याची भीती असते, दुःखाची भीती असते, अपयशाची भीती असते, पैसा गमावण्याची भीती असते, प्रिय व्यक्ती गमावण्याची भीती असते आणि मृत्यूचीही भीती असते. या भीतीवर कोणी गोड शब्दांचे आवरण चढवले आणि त्यावर एखादा चमत्कारिक उपाय दिला, की माणसाला तो खरा वाटू लागतो. म्हणूनच श्रीकृष्ण “यामिमां पुष्पितां वाचम्” म्हणतात. फुलांसारखी सुंदर वाणी असणे आणि त्या वाणीला फल असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. फुल सुंदर असते; पण प्रत्येक फुलाला फल लागतेच असे नाही. म्हणून प्रश्न हा नाही की समोरचा माणूस किती सुंदर बोलतो. प्रश्न हा आहे की तो जे बोलतो आहे, ते मला सत्याकडे घेऊन जाते आहे का?
ही गोष्ट केवळ एखाद्या व्यक्तीपुरती किंवा एखाद्या एका परंपरेपुरती मर्यादित नाही. जगभरात धर्माच्या नावाने माणसाच्या दोन मूलभूत भावनांचा व्यापार केला गेला आहे— भीती आणि लोभ. “हे केले नाही तर शिक्षा होईल”, “हे केले तर स्वर्ग मिळेल”, “हे केले तर जन्नत मिळेल”, “या धर्मासाठी लढा”, “दुसऱ्याला संपवा”, “तुमच्यापेक्षा वेगळा असणारा चुकीचा आहे”—अशा प्रकारच्या विचारांनी माणसाला माणसाविरुद्ध उभे केले जाते. ईश्वराने निर्माण केलेल्या विविधतेऐवजी माणूस एकसारखेपणा लादण्याचा प्रयत्न करतो. एक ईश्वर, एक पुस्तक, एक पद्धत आणि बाकी सगळे चुकीचे! पण हा विचार ईश्वराच्या विशालतेला शोभतो का? “सर्वे भवन्तु सुखिनः” म्हणणारी भारतीय प्रार्थना आपल्याला सर्वांच्या सुखाचा विचार करायला शिकवते. “संगच्छध्वं संवदध्वं” म्हणणारी वैदिक दृष्टी आपल्याला एकत्र चालायला आणि संवाद साधायला शिकवते. मग दुसऱ्याचा नाश करून स्वतःचे आध्यात्मिक कल्याण कसे साधणार?
गळ्यामध्ये रुद्राक्ष असणे चुकीचे नाही. भगवे वस्त्र धारण करणे चुकीचे नाही. जटा असणे चुकीचे नाही. अंगाला भस्म लावणे चुकीचे नाही. कर्मकांड करणेही प्रत्येक वेळी चुकीचे असेलच असे नाही. पण एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे— या सगळ्यामुळे माझ्यामध्ये काय बदलले? माझा लोभ कमी झाला का? माझा क्रोध कमी झाला का? माझी भीती कमी झाली का? माझा अहंकार कमी झाला का? माझी आसक्ती कमी झाली का? माझ्यामध्ये दुसऱ्याच्या सुखाचा विचार निर्माण झाला का? माझी बुद्धी अधिक स्थिर झाली का? जर यापैकी काहीच घडत नसेल, तर बाह्य रूप कितीही आकर्षक असले तरी आत्मपरिवर्तन कुठे आहे? आणि ज्याच्यामध्ये स्वतःचे परिवर्तन झालेले नाही, तो दुसऱ्याचे परिवर्तन कसे करणार?
मला वाटते, इथे आपण स्वतःला एक अगदी साधा प्रश्न विचारायला हवा— आपण देवाशी नाते जोडतो आहोत की देवाशी व्यवहार करतो आहोत? “देवा, माझे हे काम झाले तर मी तुला एवढे देईन”, “माझा व्यवसाय वाढला तर मी एवढा नवस करीन”, “मला पैसा मिळाला तर एवढा अभिषेक करीन”—हा देवाशी संवाद आहे की व्यवहार? दुःखात असताना आधार हवा असेल तर देवाकडे जा. प्रार्थना करा. मन मोकळे करा. “मला हे दुःख सहन करण्याची शक्ती दे. मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे. माझे मन स्थिर ठेव. माझ्यामध्ये विवेक जागृत ठेव,” अशी प्रार्थना किती वेगळी आहे! पण “मी तुला एवढे देतो, तू मला एवढे दे,” हा व्यवहार झाला.
शंभर रुपये एखाद्या चांगल्या कामासाठी देणे उत्तमच. एखाद्या मंदिरात चांगले काम होत असेल तर मदत करा. एखाद्या तीर्थक्षेत्री शिक्षण, आरोग्य, अन्नदान, सेवा अशी चांगली कामे होत असतील तर मदत करा. तिरुपतीला चांगले काम होत असेल तर तिथे मदत करा, शिर्डीला चांगले काम होत असेल तर तिथे मदत करा, शेगावला गजानन महाराजांच्या संस्थेत चांगले काम होत असेल तर तिथे मदत करा. अनेक ठिकाणी मदत करा. पण “मी हे पैसे देतो म्हणून माझे दुःख कमी झाले पाहिजे, मला भरपूर पैसा मिळाला पाहिजे, माझी संपत्ती वाढली पाहिजे,” ही अपेक्षा कशासाठी? देवाला आपण लाच देतो आहोत का? भक्ती आणि व्यवहार यांच्यामध्ये फरक आहे.
याहून विचित्र गोष्ट म्हणजे काही जण आपल्या चुकीच्या कमाईतही ईश्वराला वाटेकरी करतात. “मला इतकी वरकमाई झाली, त्यातील पंचवीस टक्के देवाला देतो.” वा! पंचाहत्तर टक्के स्वतःसाठी आणि पंचवीस टक्के देवासाठी! जणू काही देवही या व्यवहाराचा भागीदार आहे! पण धर्माचा उपयोग आपल्या चुकीच्या कृत्यांना पवित्र करण्यासाठी करता येतो का? उलट धर्माचा खरा अर्थच असा आहे की आपल्या व्यवहाराला, आपल्या कमाईला, आपल्या विचारांना आणि आपल्या आचरणाला शुद्ध करण्याची प्रक्रिया सुरू व्हावी. व्यवहारातील अपवित्रता देवाच्या नावाने झाकणे हा धर्म नव्हे.
या सगळ्याचा विचार केला, तर भगवद्गीतेचा विचार आपल्याला एक अतिशय स्पष्ट क्रम दाखवतो. अज्ञान आणि अविचार असतील, तर मनामध्ये वासना, हव्यास आणि भीती निर्माण होतात. वासना, हव्यास आणि भीती निर्माण झाली की आपण गोड, आकर्षक आणि भुलवणाऱ्या बोलण्याकडे सहज आकर्षित होतो. त्या गोड बोलण्यावर विश्वास बसला की आपण कर्मकांड आणि उपायांच्या जंजाळामध्ये अडकतो. त्या जंजाळातून आपल्याला काहीतरी मिळवायचे असते, म्हणून आपण सुख-भोगांच्या मागे धावत राहतो. सतत सुख-भोग, अपेक्षा, भीती, आश्वासने, तुलना आणि हव्यास यांच्या भोवऱ्यात राहिल्यावर चित्त विचलित होते, मन भरकटते आणि बुद्धी स्थिर राहत नाही.
नेमकी इथेच भगवद्गीतेची दिशा वेगळी आहे. गीता आपल्याला कर्मकांडांच्या जंजाळात अधिकाधिक अडकवत नाही; ती आपल्याला निश्चयात्मक बुद्धीकडे घेऊन जाते. ती आपल्याला बाह्य आश्वासनांवर अवलंबून राहायला शिकवत नाही; उलट स्वतःच्या बुद्धीचा, विवेकाचा आणि आत्मशक्तीचा विकास करायला शिकवते. गीता म्हणते की सुख-दुःख, लाभ-हानी, जय-पराजय यांच्यामध्ये समत्व ठेवून आपले कर्तव्य कर. म्हणजेच जीवनातील परिस्थिती बदलण्यापेक्षा परिस्थितीकडे पाहणारी आपली बुद्धी बदलणे, हा गीतेचा मार्ग आहे.
म्हणून या तीन श्लोकांकडे पाहताना मला वाटते की भगवान श्रीकृष्ण आपल्याला केवळ एखाद्या विशिष्ट कर्मकांडापासून सावध करत नाहीत; ते आपल्याला मनाच्या एका अत्यंत सूक्ष्म प्रवृत्तीपासून सावध करतात. जिथे भीती आहे, तिथे कोणीतरी आश्वासन विकायला उभा राहील. जिथे हव्यास आहे, तिथे कोणीतरी सुखाचे स्वप्न विकायला उभा राहील. जिथे अज्ञान आहे, तिथे कोणीतरी गोड शब्दांनी आपल्याला भुलवेल. आणि जिथे विवेक नाही, तिथे कोणीतरी आपल्यासाठी निर्णय घेईल. म्हणूनच सावध राहा. अध्यात्माच्या नावाने कोणी काय सांगते आहे, यापेक्षा ते आपल्याला कुठे घेऊन जाते आहे, हे पाहा. भीतीकडे की निर्भयतेकडे? हव्यासाकडे की समाधानाकडे? कर्मकांडाच्या जंजाळाकडे की आत्मपरिवर्तनाकडे? भोगाकडे की त्यागपूर्वक भोगण्याकडे? अहंकाराकडे की नम्रतेकडे? विभाजनाकडे की “सर्वे भवन्तु सुखिनः” या भावनेकडे?
माझ्या मते, खरे अध्यात्म म्हणजे दुःख नाहीसे करून देण्याचे आश्वासन नव्हे; दुःखाकडे पाहण्याची दृष्टी बदलणे होय. भविष्य सांगणे नव्हे; भविष्याच्या भीतीतून मुक्त करणे होय. सुख मिळवून देण्याचे आश्वासन नव्हे; सुख-दुःखाच्या पलीकडे उभे राहण्याची बुद्धी देणे होय. देवाशी व्यवहार करणे नव्हे; देवाशी नाते जोडणे होय. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे—स्वतःमध्ये परिवर्तन घडवणे होय.
जर अध्यात्मामुळे माणूस अधिक शांत, अधिक विवेकी, अधिक निःस्वार्थ, अधिक निर्भय आणि अधिक करुणामय होत नसेल, तर आपण स्वतःला विचारले पाहिजे— आपण अध्यात्माच्या मार्गावर आहोत की अध्यात्माच्या नावाने मांडलेल्या दुकानात? हा प्रश्न दुसऱ्याला विचारण्यापूर्वी स्वतःला विचारण्याचा आहे. कारण अध्यात्माच्या नावाने दुकान मांडणारे लोक बाहेर असतीलच; पण त्या दुकानाचे ग्राहक होण्याची तयारी आपल्या मनात आहे का, हा खरा प्रश्न आहे.
भगवद्गीता आपल्याला दुकानाकडे पाहायला सांगत नाही. ती आपल्याला दुकानाच्या पलीकडे पाहायला शिकवते. ती गोड शब्दांच्या मोहातून बाहेर काढते, कर्मकांडांच्या जंजाळातून बाहेर काढते, भीती आणि हव्यासाच्या पकडीतून बाहेर काढते आणि शेवटी निश्चयात्मक बुद्धीच्या दिशेने घेऊन जाते.
म्हणूनच या तीन श्लोकांचा संदेश आजच्या काळातही तितकाच जिवंत आहे—गोड बोलणाऱ्याला भुलू नका. चमत्काराचे आश्वासन देणाऱ्याला शरण जाऊ नका. भीती दाखवून धर्म विकणाऱ्यापासून सावध राहा. आणि देवाशी व्यवहार करू नका. देवाकडे जा. प्रार्थना करा. विवेक मागा. बुद्धी स्थिर करा. आणि सर्वांत महत्त्वाचे— स्वतःला बदला.
कारण खरा धर्म दुसऱ्याला बदलण्यापासून सुरू होत नाही; तो स्वतःला बदलण्यापासून सुरू होतो.
आणि म्हणूनच, धर्माच्या नावाने उभ्या केलेल्या या सगळ्या दुकानांकडे पाहताना शेवटी आपण स्वतःला एकच प्रश्न विचारूया—
“माझ्या धर्मामुळे, माझ्या अध्यात्मामुळे, माझ्या साधनेमुळे माझ्यामध्ये किती परिवर्तन झाले?”
याचे प्रामाणिक उत्तरच आपल्या अध्यात्माची खरी परीक्षा आहे.
मानवी जीवनाची खरी शोकांतिका ?
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ६१ | ३० ऑगस्ट २०२६
नमस्कार.
माणसात शांतता, आनंद, संपन्नता, समृद्धता, धैर्य आणि शौर्य यांचं सुंदर एकत्रीकरण असेल तर किती छान!
एखादी व्यक्ती प्रचंड बलवान आहे, ताकदवान आहे. तिच्याकडे अफाट संपत्ती आहे. तिच्यामध्ये दूरदृष्टी आहे, आशा आहे, भरपूर काही करण्याची वृत्ती आहे. तिच्यामध्ये संयम आहे, धैर्य आहे आणि नवीन-नवीन गोष्टी करण्याची इच्छा आहे. म्हणजेच तो आशिष्ठ, दृढिष्ठ, बलिष्ठ आहे.
तैत्तिरीयोपनिषदाच्या आनंदवल्लीमध्ये हे किती जबरदस्तपणे सांगितलं आहे—
“आशिष्ठो द्रढिष्ठो बलिष्ठः।
तस्येयं पृथिवी सर्वा वित्तस्य पूर्णा स्यात्।
स एको मानुष्य आनन्दः॥”
अशा माणसाचा आनंद आपण एक धरला, तर आनंदाच्या पुढच्या पायऱ्या शतपट-शतपट वाढत जातात आणि ब्रह्माचा आनंद १०²⁰ पट सांगितला आहे. हा केवळ आकड्यांचा विषय नाही. हा आनंदाच्या गुणवत्तेच्या विस्ताराचा विषय आहे. आनंदाची गुणवत्ता वाढते. आनंदाचा कालावधी वाढतो. आनंद दुसऱ्याला देण्याची वृत्ती वाढते. आणि हळूहळू आपल्या सभोवती आनंदमय वातावरण निर्माण करण्याची क्षमता विकसित होते.
मग प्रश्न असा आहे—
एवढी मोठी आनंदाची क्षमता माणसामध्ये असताना हे आपल्या आयुष्यात का घडत नाही?
माणसाचं जीवन म्हणजे अथांग अशा गंगा नदीसारखं पात्र आहे. पण आपण त्याचं एका छोट्याशा डबक्यात रूपांतर करून घेतो. त्या डबक्यात स्वच्छता नाही, निर्मळता नाही; गढूळपणा आहे. आणि दुर्दैव असं की, आपण त्या गढूळपणालाच आयुष्य समजून बसतो. एखाद्या चिल्लर गोष्टीसाठी माणूस आयुष्यातील खूप मोठ्या गोष्टींना मुकतो.
1. त्याच्या चित्तात कमालीची अस्थिरता असते. तो प्रत्येक गोष्ट केवळ संकुचित नफा-तोट्याच्या हिशोबाने करू लागतो.
2. जगणं आनंदी करण्याऐवजी तो क्षणिक आणि बाह्य सुखांवर अवलंबून राहतो—काहीतरी मिळालं की आनंदी व्हायचं, काहीतरी गमावलं की दुःखी व्हायचं.
3. स्वतःच्या ताकदीने, कष्टाने आणि जिद्दीने मिळवण्याऐवजी त्याला शॉर्टकट, फुकट किंवा सहजासहजी सर्व काही मिळावं अशी हाव असते.
4. ऐश्वर्य आणि समृद्धीसाठी अथक परिश्रम करण्याचा मार्ग सोडून तो नवस, याचना, कर्मकांड आणि आमिषं यांसारख्या सकाम मार्गांचा आधार घेतो.
5. त्याला केवळ इहलोकातील सुखांचीच नव्हे, तर मृत्यूनंतरही ‘स्वर्गातील ऐश्वर्य’ मिळवण्याच्या मृगजळाची आसक्ती असते.
6. आणि या चिल्लर गोष्टींचा उदोउदो करणारेही समाजात खूप आहेत.
7. ‘पुष्पित वाणी’ने—गोड, आकर्षक, दिखाऊ आणि फसव्या मार्केटिंगने—शॉर्टकट आणि कर्मकांडांचा आक्रमक प्रचार करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
8.
सामान्य माणूस या आकर्षक जाळ्यात सहज अडकतो. मग त्याच्याकडे स्थिर ध्येय राहत नाही. त्याची बुद्धी एका दिशेने न जाता बहुशाखीय, विखुरलेली होते.
ह्या सगळ्यांच्या मुळाशी काय आहे?
अज्ञान.
स्वतःच्या अनंत अंतर्गत क्षमतेचं अज्ञान.
आणि खऱ्या आनंदाचं अज्ञान.
भगवद्गीता केवळ या अज्ञानाचं निदान करून थांबत नाही. ती केवळ समस्या ओळखून देत नाही; त्या समस्येवरचा मार्गही दाखवते. गीता आपल्याला सांगते की आपली बुद्धी व्यवसायात्मिका—निश्चयात्मक असली पाहिजे; बहुशाखीय आणि विखुरलेली नसली पाहिजे. निश्चयात्मक बुद्धीने काम केलं, तर माणूस अधिक समृद्ध होऊ शकतो, अधिक संपन्न होऊ शकतो, अधिक आनंदी होऊ शकतो आणि अधिक शांत होऊ शकतो.
मग पुन्हा एक प्रश्न उभा राहतो—
ही निश्चयात्मक बुद्धी का नसते?
माणूस स्वतःच्या आयुष्यातील मोठ्या ध्येयाकडे न पाहता वरवरच्या आणि तात्पुरत्या फायद्यांमध्ये स्वतःचं आयुष्य का घालवतो? याचं कारण भगवद्गीता अगदी मुळापर्यंत जाऊन सांगते.
श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात—
“त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन।
निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्॥”
माणसाचं जीवन सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या प्रभावाखाली चालत असतं. या तीन गुणांमुळे त्याच्या इच्छा, विचार, निर्णय आणि कृती यांच्यावर परिणाम होत असतो.
म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात—
“निस्त्रैगुण्यो भव, अर्जुना!”
या तीन गुणांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कर.
निर्द्वंद्व हो—सुख-दुःख, लाभ-हानी, मान-अपमान अशा द्वंद्वांमध्ये अडकून राहू नकोस.
नित्यसत्त्वस्थ राहा—मनाला स्थैर्य आणि निर्मळता दे.
निर्योगक्षेम हो—जे मिळालेलं नाही ते मिळवण्याची आणि जे मिळालं आहे ते टिकवून ठेवण्याची सततची चिंता सोड.
आणि शेवटी—
“आत्मवान्” हो.
स्वतःच्या ठिकाणी स्थिर हो. स्वतःवर ताबा ठेव.
कारण जोपर्यंत माणूस तात्पुरत्या आकर्षणांमध्ये, इच्छा-आकांक्षांमध्ये आणि मिळालेलं टिकवून ठेवण्याच्या चिंतेमध्ये अडकलेला आहे, तोपर्यंत त्याची बुद्धी अनेक दिशांना धावत राहते.
म्हणूनच निश्चयात्मक बुद्धी निर्माण होण्यासाठी क्षणिक फायद्यांच्या पलीकडे पाहायला शिकणं आवश्यक आहे.
आणि गंमत म्हणजे—
निस्त्रैगुण्य होणं, निर्द्वंद्व होणं, नित्यसत्त्वस्थ होणं, निर्योगक्षेम होणं हे फार अवघड नाही.
अगदी मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो—हे अतिशय अवघड नाही. खूप सोपं आहे.
पण आपल्या अवतीभवती या फालतू गोष्टींची इतकी जाहिरात झाली आहे की आपण त्यांच्यामागे धावत राहतो. गंमत अशी आहे की, या फालतू गोष्टी मिळवण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, त्या उलट जास्त त्रासदायक असतात.
फक्त एकच गोष्ट आवश्यक आहे—
थोडंसं सातत्य.
थोडा संयम.
थोडा प्रयत्न.
थोडी तितिक्षा.
फार नाही—थोडीशीच.
आणि हे थोडंसं जरी केलं, तरी त्यातून तुम्हाला खूप काही मिळतं.
पण हे थोडंसंही माणूस करत नाही.
ही खरी शोकांतिका आहे.
अशा डबक्यात अडकलेल्या माणसांना आपल्याला बाहेर काढायचं आहे. त्यांना या संकुचित, गढूळ जीवनातून बाहेर काढून गीतेच्या विशाल आणि निर्मळ प्रवाहाशी जोडायचं आहे. माणसं अनेक प्रकारची सेवा करतात. अनेक चांगली कामं करतात. समाजसेवा करतात, गरजूंची मदत करतात, अनेक उपक्रम राबवतात. ही सगळी सेवा महत्त्वाची आहे. पण माणसाला केवळ बाहेरून मदत करणं हीच सेवा नाही.
माणसाला हे चिरंतन ज्ञान देणं, त्याला स्वतःची अंतर्गत शक्ती ओळखायला मदत करणं आणि त्याचं आयुष्य अधिक आनंदी, शांततामय, समृद्ध आणि अर्थपूर्ण करणं—ही कदाचित सगळ्यात मोठी सेवा आहे.
कारण एखाद्याला आपण काही काळासाठी मदत करू शकतो; पण जर त्याला जीवनाकडे पाहण्याची योग्य दृष्टी मिळाली, तर तो स्वतःचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो.गीता माणसाला केवळ दुःखातून बाहेर काढत नाही; ती त्याला निश्चयात्मक बुद्धी, समत्व, आत्मविश्वास, धैर्य आणि अंतःशांतीचा मार्ग दाखवते.
मग प्रश्न असा आहे—
हा मार्ग आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत का पोहोचवत नाही?
लोकांना या मार्गाची ओळख करून देणं, त्यांना या ज्ञानाच्या प्रवाहाशी जोडणं आणि त्यांच्या जीवनात आनंद, शांतता आणि समृद्धी निर्माण करण्यासाठी त्यांना सक्षम करणं—हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे.
म्हणून चला, आपण प्रयत्न करूया.
कदाचित आपण प्रत्येकाच्या आयुष्यात बदल घडवू शकणार नाही. पण जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल, तितक्या लोकांपर्यंत भगवद्गीतेचं हे चिरंतन ज्ञान पोहोचवूया.
एखादं डबकं गढूळ राहण्यापेक्षा ते गीतेच्या विशाल प्रवाहाशी जोडणं अधिक महत्त्वाचं आहे.
चला, हा प्रवाह पुढे नेऊया.
त्रिगुणांच्या पलीकडे : निश्चयात्मक बुद्धीची वाटचाल
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ६२ | ३१ ऑगस्ट २०२६
नमस्कार.
भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक सांगतात—
“त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥”
हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या एका श्लोकामध्ये अशा काही मूलभूत संकल्पना सांगितल्या आहेत, की ज्यांचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर, विचारांवर, आचरणावर आणि निर्णयक्षमतेवर खोल परिणाम होतो. किंबहुना, व्यवसायात्मिका बुद्धी किंवा निश्चयात्मक बुद्धी आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी आणि ती स्थिर होण्यासाठी आवश्यक असलेल्या जीवनदृष्टीचा संपूर्ण आराखडाच या एका श्लोकामध्ये आपल्याला दिसतो.
मागील काही दिवस आपण “व्यवसायात्मिका बुद्धी” म्हणजे काय, याचा विचार करत आहोत. निश्चयात्मक बुद्धी म्हणजे अनेक दिशांना फुटणारी, मनात सतत संभ्रम निर्माण करणारी बुद्धी नव्हे; तर सत्य काय आहे, आपले कर्तव्य काय आहे आणि जीवनाची दिशा काय आहे याविषयी स्पष्टता असलेली बुद्धी. पण अशी बुद्धी निर्माण कशी होणार? याचं उत्तर या श्लोकामध्ये आहे.
या श्लोकाकडे नीट पाहिलं, तर त्यामध्ये पाच अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना दिसतात— निस्त्रैगुण्य, निर्द्वन्द्व, नित्यसत्त्वस्थ, निर्योगक्षेम आणि आत्मवान्. या पाच संकल्पना म्हणजे जणू निश्चयात्मक बुद्धीपर्यंत पोहोचण्याच्या पाच पायऱ्या आहेत.
निस्त्रैगुण्य — त्रिगुणांच्या बंधनातून मुक्त होणे
श्रीकृष्ण सुरुवातीलाच म्हणतात— “त्रैगुण्यविषया वेदा…” वेदांमध्ये त्रिगुणांच्या क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकारची कर्मे आणि त्यांच्या फलांची चर्चा आहे. माणसाच्या इच्छा, कर्मे आणि त्यांच्या परिणामांमध्ये सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांचा मोठा सहभाग असतो. म्हणून पुढच्याच चरणामध्ये श्रीकृष्ण सांगतात— “निस्त्रैगुण्यो भवार्जुन” — हे अर्जुना, त्रिगुणांच्या बंधनातून वर उठ.
याचा अर्थ असा नाही की सत्त्व, रज आणि तम हे गुण पूर्णपणे नष्ट करून टाकायचे आहेत. कारण हे तीनही गुण प्रकृतीचा भाग आहेत. शरीर, मन, व्यवहार आणि संपूर्ण सृष्टी या सर्व स्तरांवर त्यांचा परिणाम असतो. मात्र या गुणांच्या विकृतींनी आपल्याला चालवू नये, ही खरी गोष्ट आहे. सत्त्वगुणाचा प्रकाश, रजोगुणाची ऊर्जा आणि तमोगुणाची विश्रांती—या तिन्हींचा योग्य उपयोग करायचा; पण त्यांच्या बंधनात अडकायचे नाही.
निर्द्वन्द्व — द्वंद्वांच्या पलीकडे जाणे
यानंतर श्रीकृष्ण सांगतात— “निर्द्वन्द्वो…” म्हणजेच द्वंद्वांच्या पलीकडे जा. जीवनामध्ये सतत दोन टोकं आपल्या समोर उभी असतात— सुख-दुःख, लाभ-हानी, जय-पराजय, मान-अपमान, शीत-उष्ण… आपल्याला सुख हवं असतं; दुःख नको असतं. लाभ हवा असतो; हानी नको असते. जय हवा असतो; पराजय नको असतो. आणि आपल्या मनाची अवस्था या दोन टोकांमध्ये सतत हेलकावत राहते.
जोपर्यंत बाहेरच्या परिस्थितीवर आपल्या मनाची शांतता अवलंबून आहे, तोपर्यंत निश्चयात्मक बुद्धी स्थिर होऊ शकत नाही. म्हणूनच निर्द्वन्द्व होणं म्हणजे परिस्थिती बदलण्यापेक्षा परिस्थितीकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलणं.
नित्यसत्त्वस्थ — सत्त्वामध्ये स्थिर राहणे
तिसरी संकल्पना आहे— “नित्यसत्त्वस्थो…” म्हणजे सदैव सत्त्वामध्ये स्थिर राहा. सत्त्व म्हणजे प्रकाश, ज्ञान, विवेक, प्रसन्नता, समतोल आणि स्पष्टता. सत्त्वप्रधान मनामध्ये विचार अधिक स्वच्छ असतात. पूर्वग्रह कमी होतात. निर्णय अधिक विवेकपूर्ण होतात. मनामध्ये करुणा, सहकार्य, निःस्वार्थ सेवा, प्रेम आणि आत्मिक समाधान वाढतं.
पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे. सत्त्वगुणसुद्धा अंतिम अवस्था नाही. सत्त्वामध्येही ज्ञानाची आणि सुखाची सूक्ष्म आसक्ती निर्माण होऊ शकते. अतिआदर्शवादामुळे व्यवहारापासून दूर जाण्याची शक्यता असते. म्हणून श्रीकृष्ण आधी सांगतात— “नित्यसत्त्वस्थ”, म्हणजे सत्त्वामध्ये स्थिर राहा; आणि पुढे गीतेमध्ये ते आपल्याला गुणातीत होण्याचा मार्गही दाखवतात. म्हणजेच सत्त्व हा शेवट नसून पुढे जाण्यासाठीचा शुद्ध आणि आवश्यक टप्पा आहे.
निर्योगक्षेम — मिळवण्याच्या आणि जपण्याच्या चिंतेतून मुक्त होणे
चौथी संकल्पना आहे— “निर्योगक्षेम…” हा शब्द अतिशय सुंदर आहे. जे आपल्याकडे नाही ते मिळवण्याची धडपड— योग. जे आपल्याकडे आहे ते टिकवून ठेवण्याची चिंता— क्षेम.
आपलं संपूर्ण आयुष्य अनेकदा या दोन गोष्टींमध्येच अडकलेलं असतं— “मला अजून काय मिळवायचं आहे?” आणि “माझ्याकडे जे आहे ते माझ्याकडून निघून जाऊ नये.” मिळवण्याची चिंता आणि गमावण्याची भीती—या दोन्ही मनाला अस्थिर करतात.
म्हणून निर्योगक्षेम म्हणजे निष्क्रिय होणे नव्हे. उलट, आपले कर्तव्य पूर्ण सामर्थ्याने करताना प्रत्येक गोष्ट स्वतःच्या नियंत्रणात ठेवण्याच्या अतिरेकातून मुक्त होणे. याच ठिकाणी पुढे गीतेतील “योगक्षेमं वहाम्यहम्” या आश्वासक विचाराची अनुभूती येते.
आत्मवान् — स्वतःमध्ये स्थिर होणे
आणि या सर्वांचा अंतिम परिणाम आहे— “आत्मवान्.” म्हणजे स्वतःमध्ये स्थिर असलेला. मनाच्या चंचलतेमध्ये वाहून न जाणारा, परिस्थितीच्या दबावाखाली निर्णय न घेणारा, इंद्रियांच्या आकर्षणाने खेचला न जाणारा आणि सुख-दुःख, लाभ-हानी, जय-पराजय यांच्यामध्ये स्वतःची दिशा न हरवणारा मनुष्य आत्मवान् होतो.
आत्मवान् होण्यासाठी निस्त्रैगुण्य, निर्द्वन्द्व, नित्यसत्त्वस्थ आणि निर्योगक्षेम या अवस्थांमधून जाणं आवश्यक आहे. इथेच व्यवसायात्मिका बुद्धीची पायाभरणी होते.
या एका श्लोकात आलेल्या संकल्पना पुढे भगवद्गीतेच्या अनेक अध्यायांमध्ये विस्ताराने समोर येतात. १४ वा, १७ वा आणि १८ वा अध्याय त्रिगुणांचा सखोल विचार करतात. ३ रा आणि ५ वा अध्याय कर्माच्या माध्यमातून द्वंद्वमुक्ततेचा मार्ग दाखवतात. १२ वा अध्याय भक्ताच्या समत्वपूर्ण मनाची ओळख करून देतो, तर ९ वा अध्याय योगक्षेमाच्या चिंतेतून परमविश्वासाकडे नेतो. म्हणून एका अर्थाने हा श्लोक पुढील गीतेची अनेक दारं उघडतो.
त्रिगुण : भारतीय चिंतनाची अद्भुत देणगी
आता या श्लोकामधील पहिल्या संकल्पनेकडे— त्रिगुणांकडे—थोडं खोलात जाऊया.
सत्त्व, रज आणि तम ही संकल्पना भारतीय तत्त्वज्ञानाची अत्यंत महत्त्वाची देणगी आहे. मानवी मन, व्यक्तिमत्त्व, वर्तन, सृष्टी आणि अध्यात्मिक विकास या सर्वांचा विचार करण्यासाठी भारतीय ज्ञानपरंपरेने दिलेली ही एक विलक्षण चौकट आहे.
भारतीय ज्ञानपरंपरा एकाएकी निर्माण झालेली नाही. ती अनेक शतकांच्या चिंतनातून, निरीक्षणातून आणि अनुभवातून हळूहळू विकसित झालेली आहे. अगदी प्राचीन वैदिक चिंतनामध्ये त्याची बीजरूपं दिसतात. ऋग्वेदातील नासदीय सूक्तामध्ये सृष्टीच्या मूलस्वरूपाविषयी जे चिंतन आहे, त्यामध्ये पुढे विकसित झालेल्या अनेक तात्त्विक विचारांची बीजं दिसतात.
अथर्ववेदामध्ये मानवी देह आणि प्रकृतीच्या संदर्भात तीन गुणांचा उल्लेख आढळतो— “पुण्डरीकं नवद्वारं त्रिभिर्गुणेभिरावृतम्।” मानवी शरीर नऊ द्वारांचे असून तीन गुणांनी वेढलेले आहे, असा सुंदर संदर्भ येथे येतो.
पुढे छांदोग्य उपनिषदामध्ये सृष्टीच्या मूलस्वरूपाचे वर्णन तीन रंगांच्या प्रतीकांमधून केलेले आढळते— लोहित, शुक्ल आणि कृष्ण. पुढील परंपरेत लोहिताचा संबंध रजाशी, शुक्लाचा सत्त्वाशी आणि कृष्णाचा तमाशी जोडला गेला. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये त्रिगुणात्मक प्रकृतीचा विचार अधिक स्पष्टपणे पुढे येतो. मैत्रायणी उपनिषदामध्ये सत्त्व, रज आणि तम या संकल्पना अधिक विकसित तात्त्विक स्वरूपात दिसतात.
म्हणजेच ही संकल्पना भारतीय चिंतनामध्ये हळूहळू उत्क्रांत होत गेली.
सांख्यापासून गीतेपर्यंतचा प्रवास
त्रिगुणांच्या संकल्पनेचा विकास काही प्रमुख टप्प्यांत समजून घेता येतो.
सांख्य दर्शनामध्ये प्रकृतीच्या मूलस्वरूपात सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण मानले जातात. सांख्य तत्त्वज्ञानात हे तीनही गुण प्रकृतीच्या अभिव्यक्तीचे मूलभूत घटक बनतात. सृष्टीतील परिवर्तन, विविधता आणि क्रियाशीलता समजावून घेण्यासाठी त्रिगुणांची ही रचना अत्यंत महत्त्वाची ठरते.
भगवद्गीतेने याच तात्त्विक संकल्पनेला मानवी जीवनाशी जोडले. माणूस कसा विचार करतो? त्याची श्रद्धा कशी असते? तो कोणतं कर्म करतो? त्याचं ज्ञान कसं असतं? त्याची बुद्धी आणि धृती कशी असते? तो कोणतं अन्न पसंत करतो? त्याचं सुख कशात असतं? गीतेने या सर्वांचा त्रिगुणांच्या आधारे अत्यंत सूक्ष्म विचार केला आहे. विशेषतः १४ वा, १७ वा आणि १८ वा अध्याय याचे विस्तृत विश्लेषण करतात.
इथे त्रिगुण हे केवळ सृष्टीच्या रचनेचे तत्त्व राहत नाहीत; ते मानवी मानसशास्त्र समजून घेण्याचे प्रभावी साधन बनतात.
पुढे पुराणे आणि भक्तीपरंपरेमध्ये सृष्टीच्या तीन प्रमुख कार्यांना— निर्मिती, पालन आणि लय—त्रिगुणांशी प्रतीकात्मकरीत्या जोडण्यात आलं आणि ब्रह्मा, विष्णू व महेश यांच्या रूपातून हे चिंतन लोकमानसात अधिक सुलभपणे उतरलं.
अशा प्रकारे प्राचीन वैदिक चिंतनातील बीजापासून सुरू झालेली त्रिगुणांची संकल्पना सांख्य दर्शनामध्ये सृष्टिरचनाशास्त्र, आणि भगवद्गीतेमध्ये मानवी मानसशास्त्र व जीवनमूल्यांचा पाया बनते.
आपल्यामध्ये कोणता गुण प्रभावी आहे?
आता हा सगळा विचार केवळ तत्त्वज्ञान म्हणून समजून घेण्यात काय अर्थ आहे? खरा प्रश्न आहे— “या क्षणी माझ्यामध्ये कोणता गुण प्रभावी आहे?”
गुणांचा उपयोग करणारा माणूस व्हायचं; गुणांनी वापरला जाणारा माणूस व्हायचं नाही.
हीच निस्त्रैगुण्याकडे जाणारी वाट आहे.
अर्जुनासाठी हा श्लोक इतका महत्त्वाचा का?
आता पुन्हा अर्जुनाकडे वळूया.
अर्जुनाची समस्या केवळ बाहेरच्या युद्धाची नव्हती. त्याच्या मनामध्ये नैराश्य, संभ्रम, आसक्ती, भीती आणि कर्तव्यत्यागाची भावना निर्माण झाली होती. त्याला काय करायचं हे समजत नव्हतं.
पण श्रीकृष्ण त्याच्या बाह्य परिस्थितीवर उपचार करत नाहीत; ते त्याच्या मनाच्या मुळाशी जातात. कारण समस्या बाहेरच्या परिस्थितीत जितकी होती, त्यापेक्षा अधिक ती त्या परिस्थितीकडे पाहणाऱ्या अर्जुनाच्या मनाच्या अवस्थेत होती.
म्हणून हा श्लोक म्हणजे अर्जुनाच्या विषादावरचा एक अत्यंत प्रभावी तात्त्विक उपचार आहे.
त्रिगुणांच्या बंधनातून वर ये. द्वंद्वांच्या पलीकडे जा. सत्त्वामध्ये स्थिर हो. मिळवण्याच्या आणि जपण्याच्या चिंतेतून मुक्त हो. आणि स्वतःमध्ये स्थिर हो.
त्रिगुणांचा अभ्यास — पुस्तकात नाही, स्वतःमध्ये
ही संकल्पना केवळ वाचून समजून घेण्याची नाही. तिचा खरा उपयोग आपल्या स्वतःच्या जीवनात सुरू होतो.
आपण रोज स्वतःला एक साधा प्रश्न विचारू शकतो— “आज माझ्यामध्ये कोणता गुण प्रभावी होता?” आज मी सत्त्वप्रधान होतो का? आज माझ्यामध्ये रजोगुण अधिक होता का? की आज तमोगुणाने माझ्यावर अधिक प्रभाव टाकला?
आणखी पुढे जाऊन आपण विचारू शकतो— सत्त्वाचा सकारात्मक भाग माझ्यामध्ये किती व्यक्त झाला आणि त्याची आसक्ती कुठे दिसली? रजाची ऊर्जा कुठे उपयोगी पडली आणि तिचं अस्वस्थतेत रूपांतर कुठे झालं? तमाची विश्रांती कुठे आवश्यक होती आणि ती आळसात कुठे बदलली?
हा स्व-अभ्यास साधा वाटतो; पण तो माणसाला स्वतःबद्दल फार मोठी अंतर्दृष्टी देऊ शकतो. मला स्वतःला या अभ्यासाचा प्रत्यक्ष अनुभव विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी आणि पुढे प्रशांती कुटीरम, बंगळुरू — आजच्या S-VYASA, स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान येथे आला.
विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी येथे जीवनव्रती प्रशिक्षणाच्या प्रक्रियेत व्यक्तिमत्त्वघडण हा अत्यंत महत्त्वाचा भाग होता. जीवनव्रती म्हणजे केवळ एखाद्या संस्थेचा कार्यकर्ता तयार करणे नव्हे; तर स्वतःकडे पाहणारा, स्वतःच्या गुण-दोषांचं प्रामाणिक निरीक्षण करणारा, शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर स्वतःला घडवणारा आणि त्यातून समाजकार्यासाठी सिद्ध होणारा कार्यकर्ता घडवणे, हा त्या प्रशिक्षणामागचा व्यापक दृष्टिकोन होता.
या प्रशिक्षणात दिनचर्या, योग, प्रार्थना, अध्ययन, श्रम, सेवा, समूहजीवन, आत्मपरीक्षण आणि स्वभावनिरीक्षण यांना महत्त्व होतं. सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या आधारे स्वतःच्या मनाची आणि वर्तनाची चिकित्सा करणं हाही त्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वघडणीच्या प्रक्रियेचा एक भाग होता.
पुढे प्रशांती कुटीरम येथे डॉ. एच. आर. नागेंद्रजींनी या त्रिगुणांच्या अभ्यासाचं अधिक पद्धतशीर आणि विश्लेषणात्मक स्वरूप आम्हाला समजावून सांगितलं. सत्त्व, रज आणि तम यांच्याशी संबंधित विविध सकारात्मक आणि नकारात्मक पैलू ओळखून दररोज स्वतःचं मूल्यमापन करण्याचा सराव आम्हाला करायला सांगितला जात असे.
कन्याकुमारी आणि बंगळुरू या दोन्ही ठिकाणी अशा प्रकारचं आत्मनिरीक्षण व्यक्तिमत्त्वघडणीशी जोडलेलं होतं. दररोजच्या वर्तनात आपल्यामध्ये कोणते गुण अधिक व्यक्त होत आहेत, त्यांचे कोणते सकारात्मक पैलू वाढत आहेत आणि कोणत्या विकृती आपल्याला मागे खेचत आहेत, याची नोंद ठेवली जायची.
सलग तीन-चार महिने आम्ही या गुणांच्या सकारात्मक आणि नकारात्मक पैलूंच्या नोंदी वहीत ठेवत होतो. महिन्याच्या शेवटी त्या नोंदी पुन्हा पाहिल्या, की स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातील काही विशिष्ट पॅटर्न स्पष्ट दिसायला लागायचे. डॉ. नागेंद्रजी आमच्यासोबत बसून या नोंदींचं विश्लेषण करायचे. कुठे रज आवश्यक आहे, कुठे रजाचा अतिरेक होतो आहे, कुठे तम विश्रांती देतं आहे, कुठे त्याचं आळसात रूपांतर होतं आहे आणि कुठे सत्त्वाची वाढ आवश्यक आहे, याचा विचार केला जायचा.
हा अनुभव माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. कारण तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली—
त्रिगुणांचा अभ्यास हा एखाद्या तत्त्वज्ञानाच्या पुस्तकात तीन गुणांची व्याख्या पाठ करण्यासाठी नाही; तर स्वतःच्या मनाचं निरीक्षण करण्यासाठी आहे.
हेच भारतीय मानसशास्त्राचं वैशिष्ट्य आहे. ते आपल्याला केवळ “माणूस असा असतो” असं सांगत नाही. ते विचारतं— “तू स्वतः सध्या कसा आहेस?” आणि त्याही पुढे— “तुला स्वतःमध्ये काय बदल घडवायचा आहे?”
इथे तत्त्वज्ञान साधना बनतं. ज्ञान आत्मपरीक्षण बनतं. आणि आत्मपरीक्षण हळूहळू आत्मपरिवर्तनाकडे घेऊन जातं.
दररोजचा एक छोटा प्रयोग
आपणसुद्धा हा प्रयोग करून पाहू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटं स्वतःसाठी ठेवावीत. दिवसभरातल्या आपल्या वर्तनाकडे पाहावं आणि तीन प्रश्न विचारावेत— आज माझ्यामध्ये सत्त्व कुठे व्यक्त झालं? आज माझ्यामध्ये रज कुठे व्यक्त झालं? आज माझ्यामध्ये तम कुठे व्यक्त झालं?
आणि त्याबरोबर आणखी एक प्रश्न— “या तिन्ही गुणांपैकी मी कोणत्या गुणाच्या ताब्यात होतो आणि कुठे मी त्या गुणाचा जाणीवपूर्वक उपयोग केला?”
काही दिवसांनी आपल्याला स्वतःबद्दल एक वेगळंच चित्र दिसायला लागेल. कारण स्वतःला जाणून घेण्याची सुरुवात स्वतःच्या मनाचं प्रामाणिक निरीक्षण करण्यापासून होते.
आपली सगळी धडपड नेमकी कशासाठी?
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ६३ | १ सप्टेंबर २०२६
आपण थोडंसं शांतपणे स्वतःला विचारून पाहूया—आपली सगळी धडपड, आपले सगळे प्रयत्न, आपले कष्ट, आपली धावपळ… हे सगळं नेमकं कशासाठी असतं?
आपण इतके कष्ट करतो, प्रचंड प्रयत्न करतो, दिवस-रात्र धावतो… पण या सगळ्याचा अंतिम हेतू काय असतो?
काही दिवसांपूर्वी मी मुंबईला गेलो होतो. संध्याकाळच्या वेळी ठाण्याहून डोंबिवलीला जायचं होतं. ठाणे स्टेशनवरची प्रचंड गर्दी, लोकलमध्ये जाण्यासाठी सुरू असलेली धावपळ, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची लगबग… हे सगळं पाहताना मनात एक प्रश्न निर्माण झाला—नेमकी ही माणसं इतकी धावपळ का करतायत?
कुठे जायचंय? कशासाठी जायचंय? आणि या सगळ्या धावपळीचा शेवट कुठे आहे?
काल ज्ञान प्रबोधिनीच्या हराळी केंद्रावर आलो. जवळपास तीन आठवडे पाऊस नाही. त्यामुळे परिसरात एक प्रकारची मानसिक अस्वस्थता जाणवत होती. शेतीशी आणि निसर्गाशी जोडलेल्या जीवनाची गतीच जणू मंदावली होती.
याच परिसरात माझ्या खापरपणजोबांनी राष्ट्रीय शाळा सुरू केली होती. त्या राष्ट्रीय शाळेची भूमी पाहण्यासाठी मी मुद्दाम तिथे गेलो. स्वामी रामानंद तीर्थ तिथे मुख्याध्यापक म्हणून काम करायचे. बाबासाहेब परांजपे यांच्यासारखी मंडळी तिथे होती. हैदराबाद मुक्तिसंग्रामाची स्वप्नं, आकांक्षा आणि त्यासाठीची ऊर्मी याच भूमीत रुजली होती.
ज्या ठिकाणी स्वामीजी राहायचे, तिथे एक वडाचं झाड आहे. त्या काळातील प्रचंड ऊर्जेचं, विचारांचं आणि परिवर्तनाचं ते जणू साक्षीदार आहे.
मी त्या वडाखाली जाऊन उभारलो.
समोर गावातली काही मंडळी पत्ते खेळत बसलेली दिसली.
एक क्षण मनात विचार आला—एकेकाळी ज्या भूमीत शिक्षणाची, परिवर्तनाची आणि स्वातंत्र्याची प्रचंड ऊर्जा निर्माण झाली, त्याच भूमीत आज ही माणसं पत्ते खेळत का बसली आहेत?
काय मिळतं त्यांना यातून?
कदाचित निसर्गाने पाऊस न पाडल्यामुळे त्यांच्या जीवनाची गती मंदावली असेल. पण केवळ गती मंदावली नाही; ती कुठेतरी चुकीच्या दिशेनेही जाताना दिसत होती.
आणि पुन्हा तोच प्रश्न मनात आला—
माणूस हे सगळं का करतो?
माणसाला नेमकं काय हवं असतं?
माणसाच्या अस्तित्वासाठी काही मूलभूत गरजा आहेत—अन्न, पाणी आणि निवारा.
पण या गरजा पूर्ण झाल्यानंतरही माणूस थांबत नाही.
मग त्याला आणखी काय हवं असतं?
मला वाटतं, माणसाला तीन गोष्टींची गरज असते—आनंद, शांतता आणि समृद्धी.
जसं अन्न, पाणी आणि निवारा आवश्यक आहेत, तसंच आनंद, शांतता आणि समृद्धीही मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
माणूस अन्न, पाणी आणि निवारा मिळवण्यासाठी धडपडतो; पण त्याचबरोबर आनंदी होण्यासाठी, शांत राहण्यासाठी आणि समृद्ध होण्यासाठीही सतत प्रयत्न करत असतो.
आणि गंमत अशी की, बऱ्याच वेळा मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतरही ही धडपड थांबत नाही.
उलट ती वाढत जाते.
अधिक आनंद हवा.
अधिक शांतता हवी.
अधिक पैसा हवा.
अधिक सुविधा हव्यात.
अधिक अधिकार हवा.
अधिक प्रभाव हवा.
अधिक ताकद हवी.
म्हणजे मूलभूत गरजांपासून सुरू झालेला प्रवास हळूहळू शक्ती, संपत्ती, अधिकार आणि प्रभाव यांच्यापर्यंत पोहोचतो.
पण या सगळ्याच्या मुळाशी एकच इच्छा असते—मला आनंदी, शांत आणि समृद्ध व्हायचं आहे.
आनंद बाहेर आहे की आत?
आनंद मिळवण्याचे दोन मार्ग दिसतात.
पहिला मार्ग सांगतो—आनंद मिळवावा लागतो.
एखादी आवडती वस्तू मिळाली की आनंद होतो.
यश मिळालं की आनंद होतो.
आवडते लोक भेटले की आनंद होतो.
आपल्याला हवं ते मिळालं की आनंद होतो.
काहीतरी पराक्रम केला की आनंद होतो.
चांगले गुण मिळाले की आनंद होतो.
चांगली नोकरी मिळाली की आनंद होतो.
चांगला जीवनसाथी मिळाला की आनंद होतो.
चांगली मुलं झाली की आनंद होतो.
मुलांना यश मिळालं की आनंद होतो.
म्हणजे आनंदासाठी बाहेर काहीतरी मिळवावं लागतं, अशी आपली समजूत असते.
शांततेचंही तसंच.
दररोजच्या कोलाहलापासून दूर एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेलो की शांतता मिळते. मंदिरात गेलो की शांतता मिळते. एखादी आध्यात्मिक साधना केली की मन शांत होतं. समुद्रकिनारी बसलो की शांत वाटतं.
समृद्धीबाबतही तसंच.
आपल्याकडे पैसा आला, आपल्या गरजा पूर्ण करता येऊ लागल्या, कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक पैसा, ज्ञान, सुविधा उपलब्ध झाल्या की आपण स्वतःला समृद्ध समजू लागतो.
पण ही समृद्धीही एका टप्प्यावर थांबत नाही.
मग आपले अधिकार वाढावेत, आपला प्रभाव वाढावा, आपली ताकद वाढावी, आपला परिणाम अधिक मोठा व्हावा यासाठी आपण पुन्हा धावू लागतो.
ही धावपळ अखंड सुरू राहते.
वेदांनी दाखवलेले दोन मार्ग
आपल्या प्राचीन परंपरेत आनंद, शांतता आणि समृद्धी मिळवण्यासाठी एक मार्ग सांगितला गेला—कर्मकांडाचा मार्ग.
काहीतरी प्राप्त करण्यासाठी काही कर्म करायची. पूजा, यज्ञ, अनुष्ठान, पुनश्चरण, तपाचरण यांसारख्या साधनांतून इच्छित फल प्राप्त करून घ्यायचं.
पण याच वेदपरंपरेत दुसरा मार्गही सांगितला आहे—ज्ञानाचा मार्ग.
हा मार्ग एक वेगळंच सत्य सांगतो.
तो म्हणतो—
तुम्ही आनंद शोधणारे नाही; तुम्ही स्वतःच आनंदस्वरूप आहात.
शांतता कुठेतरी बाहेर नाही.
शांतता तुमच्यामध्येच आहे.
समृद्धी कुठेतरी बाहेर नाही.
तुमच्यामध्येच एक वेगळ्या अर्थाने समृद्धी भरलेली आहे.
ही जाणीव झाली की बाहेरच्या गोष्टी मिळवण्यासाठीची धावपळ हळूहळू बदलू लागते.
काट्याने काटा काढल्यानंतर…
काट्याने काटा काढताना पहिला काटा बाहेर काढण्यासाठी दुसऱ्या काट्याची मदत घेतो.
पण काटा निघाल्यानंतर दुसरा काटाही हातात ठेवून फिरायचं नसतं.
तोही टाकून द्यावा लागतो.
तसंच आहे.
बाहेरच्या गोष्टी मिळवण्याची इच्छा कदाचित आपल्याला काही टप्प्यांपर्यंत पुढे घेऊन जाईल. संघर्ष करायला शिकवेल. प्रयत्न करायला शिकवेल. यशाची चव देईल.
पण एकदा आपल्याला हे जाणवायला लागलं की आनंद माझ्यामध्येच आहे, शांतता माझ्यामध्येच आहे, तेव्हा बाहेरच्या गोष्टी मिळवण्याच्या मागे धावण्याची गरज कमी होऊ लागते.
मग जीवनाचा दृष्टिकोनच बदलतो.
गोल-ओरिएंटेड जीवनापासून प्रोसेस-ओरिएंटेड जीवनाकडे
आपण सामान्यतः goal-oriented असतो.
काहीतरी मिळवायचं आहे.
काहीतरी साध्य करायचं आहे.
कुठेतरी पोहोचायचं आहे.
म्हणून आपला आनंद भविष्यात ढकलला जातो.
“हे मिळालं की मी आनंदी होईन.”
“हे काम पूर्ण झालं की मला शांत वाटेल.”
पण आत्मज्ञानाचा मार्ग याच्या अगदी उलट आहे.
तो सांगतो—
काम करतानाच आनंदी व्हा.
काहीतरी मिळाल्यानंतर शांत होण्याऐवजी, मिळवण्याच्या प्रक्रियेतच शांतता अनुभवायला शिका.
यातून goal-oriented जीवन हळूहळू process-oriented होतं.
बाह्य प्रेरणेऐवजी intrinsic motivation निर्माण होते.
मग काम केवळ काहीतरी मिळवण्यासाठी केले जात नाही.
काम करणं हाच आनंदाचा अनुभव बनतो.
प्रक्रियेतच शांतता सापडते.
आणि जेव्हा माणूस प्रत्येक प्रक्रियेतला आनंद आणि प्रत्येक प्रक्रियेतली शांतता अनुभवायला लागतो, तेव्हा त्याचं अस्तित्वच बदलतं.
तो निष्क्रिय होत नाही.
उलट त्याची गती वाढते.
पण ही गती धावपळीची नसते.
ती आतल्या शांततेतून निर्माण झालेली गती असते.
मग कर्म थांबत नाही; कर्म अधिक सुंदर होतं
आपल्याला वाटू शकतं की, “जर आनंद आणि शांतता माझ्यामध्येच आहे, तर मग काही करायचंच कशाला?”
पण आत्मज्ञानाचा अनुभव माणसाला निष्क्रिय करत नाही.
उलट तो अधिक गतिमान करतो.
कारण स्वतःमध्ये आनंद अनुभवलेल्या माणसाला तो आनंद स्वतःपुरता ठेवावासा वाटत नाही.
त्याच्या मनात सहज इच्छा निर्माण होते—
“मलाही हे कळलं; इतरांनाही हे कळावं.”
मग तो इतरांना संघर्ष करायला शिकवतो.
काहीतरी मिळवण्याचा आनंद अनुभवायला देतो.
संघर्षामध्ये थांबायला, मन स्थिर करायला शिकवतो.
भौतिक सुख-सुविधा आणि समृद्धी मिळवण्याचं महत्त्व समजावतो.
आणि हळूहळू त्याला एका वेगळ्या सत्याकडे घेऊन जातो—
“बाहेर जे शोधतोयस, त्याचा स्रोत तुझ्यामध्येच आहे.”
‘यावानर्थ उदपाने…’
भगवद्गीतेतील एक अत्यंत सुंदर श्लोक या विचाराला विलक्षण नेमकेपणाने स्पर्श करतो—
“यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः॥”
ज्या व्यक्तीला सर्व बाजूंनी भरलेल्या विशाल जलाशयाची प्राप्ती झाली आहे, त्याच्यासाठी छोट्या विहिरीचे प्रयोजन उरत नाही.
तसंच, ज्याला सत्याची अनुभूती झाली आहे, त्याच्यासाठी केवळ बाह्य साधनांच्या मागे धावण्याची गरज उरत नाही.
कर्मकांड, प्राप्ती, इच्छा, बाह्य प्रेरणा—या सगळ्यांचा एक टप्पा असतो.
पण त्यापलीकडे एक अशी अवस्था आहे, जिथे माणूस स्वतःच्या अस्तित्वातच आनंद, शांतता आणि पूर्णत्व अनुभवायला लागतो.
हराळीच्या भूमीतून मिळालेला अनुभव
या विचारांचा अनुभव घेत असतानाच मी आज ज्ञान प्रबोधिनीच्या हरळी केंद्राच्या भूमीत आहे.
ज्या क्षेत्रात अण्णासाहेब ताम्हणकर आणि लताताई भिशीकर यांसारख्या व्यक्तींनी कार्यातून विचार जगला, त्या कार्यक्षेत्रात आज उभा आहे.
काही पिढ्या मागे जाऊन पाहिलं, तर याच परिसरात माझे खापरपणजोबा व्यंकटराव देशमुख, अनंतराव कुलकर्णी आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे अनेक प्रणेते यांनी एक ऊर्जावान जीवन जगलं.
जिथे राष्ट्रीय शाळा उभी राहिली.
जिथे स्वामी रामानंद तीर्थांसारखे व्यक्तिमत्त्व घडले.
जिथे स्वातंत्र्याची स्वप्नं आकाराला आली.
जिथे आत्मज्ञानाची ओढ निर्माण झाली.
त्या भूमीत काल गेलो.
त्या वडाच्या झाडाखाली बसलो.
आणि त्या वडाच्या पारंब्यांची काही मुळं घेऊन आलो.
ही केवळ मुळं नाहीत.
ही एका ऊर्जेची, एका परंपरेची, एका विचारप्रवाहाची प्रतीकं आहेत.
भूमी बदलली की माणसं बदलतात; माणसं बदलली की भूमीचं सामर्थ्य बदलतं
या संपूर्ण प्रकल्पाच्या पहिल्या खड्ड्याच्या वेळी मी इथे आलो होतो.
आज त्याच भूमीचं झालेलं परिवर्तन माझ्या डोळ्यांसमोर आहे.
एकेकाळी ज्याठिकाणी परिवर्तनाची बीजं पेरली गेली, त्या भूमीत आज पुन्हा परिवर्तन घडवण्याची क्षमता निर्माण झाली आहे.
ही भूमी केवळ स्वतः बदललेली नाही.
इतरांना बदलण्याची तिची उत्सुकता आणि कार्यक्षमताही वाढली आहे.
आणि कदाचित म्हणूनच त्या वडाच्या पारंब्यांची मुळं हातात घेताना एक वेगळीच अनुभूती आली.
आपण ज्या आनंदाचा शोध घेतोय, ज्या शांततेसाठी धडपडतोय, ज्या समृद्धीसाठी आयुष्य खर्च करतोय—त्याचा स्रोत कदाचित बाहेर नसून आपल्यामध्येच आहे, ही जाणीव अधिक गहिरी झाली.
मग आपली धडपड कशासाठी?
मुंबईच्या लोकलमधली धावपळ आठवते.
हरळीच्या भूमीत पत्ते खेळत बसलेली माणसं आठवतात.
स्वामीजींच्या वडाखाली बसलेला मी आठवतो.
आणि पुन्हा तोच प्रश्न उभा राहतो—
आपण सगळे इतके धावत का आहोत?
कदाचित आपल्याला आनंद हवा आहे.
कदाचित शांतता हवी आहे.
कदाचित समृद्धी हवी आहे.
पण जर आनंद मिळवण्यासाठी आपण सतत बाहेर धावत राहिलो, तर धावपळ कधीच संपणार नाही.
कधीतरी थांबून स्वतःकडे पाहावं लागेल.
ज्याचा शोध घेण्यासाठी आपण आयुष्यभर धावत आहोत, ते आपल्या आतच आहे का?
हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल.
आणि जर कधीतरी त्याचं उत्तर आतून मिळालं, तर कदाचित आपली धावपळ थांबणार नाही—
पण तिचा अर्थ बदलेल.
मग आपण काहीतरी मिळवण्यासाठी काम करणार नाही.
काम करतानाच जगण्याचा आनंद अनुभवू.
शांतता मिळाल्यानंतर काम करणार नाही.
शांततेतून काम करू.
समृद्ध झाल्यावर इतरांसाठी काही करू असं न म्हणता—
स्वतःमध्ये जाणवलेल्या समृद्धीतून इतरांना समृद्ध करू.
आणि कदाचित हाच खरा कर्मयोग.
कदाचित हाच खरा आत्म-आविष्कार.
आणि कदाचित हाच त्या प्राचीन वडाच्या पारंब्यांनी आपल्याला दिलेला संदेश—
धावपळ बाहेर कितीही असली, तरी खरा प्रवास आतलाच आहे.
‘यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके…’
बाहेर शोधत राहण्यापेक्षा एकदा स्वतःच्या आत डोकावून पाहूया.
कदाचित तिथेच आनंद आहे.
कदाचित तिथेच शांतता आहे.
आणि कदाचित तिथेच आपल्या खऱ्या समृद्धीचा उगम आहे.
खंडित आनंद की आनंदमय अस्तित्व?
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ६४ | २ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
काल आपण आनंद, शांतता आणि समृद्धी या तीन शब्दांवर विचार केला. या तीन गोष्टींकडे पाहण्याच्या आपल्या जीवनात दोन पद्धती असू शकतात. एक म्हणजे खंडित आनंद, खंडित शांतता आणि खंडित समृद्धी. म्हणजे दिवसभर संघर्ष करायचा, धावपळ करायची, ताण घ्यायचा आणि त्यामध्ये एखादा आनंदाचा क्षण मिळवायचा. एखादा शांततेचा क्षण मिळाला की समाधान मानायचं. काही पैसे मिळाले, एखादी भौतिक गोष्ट मिळाली की आपण समृद्ध झालो असं समजायचं. म्हणजे आनंद काही क्षणांचा, शांतता काही क्षणांची आणि समृद्धीची अनुभूतीही काही विशिष्ट प्रसंगांपुरती मर्यादित राहते.
यामुळे नेमकं काय होतं? आपण तात्पुरत्या गोष्टींच्या मागे अधिकाधिक धावू लागतो. कष्ट होतात, संघर्ष होतो, उपलब्धी मिळतात, पैसा मिळतो, मनोरंजन मिळतं आणि काही क्षण आनंदही मिळतो; पण माणसामध्ये अपेक्षित तेवढं अंतर्गत परिवर्तन घडत नाही. त्यामुळे आपलं बरंचसं आयुष्य आनंद मिळवण्यासाठी संघर्ष करण्यात जातं आणि आनंद हा त्या संघर्षातून मिळणारा एखादा छोटासा अपवाद बनतो.
म्हणून मला दुसरी पद्धत अधिक महत्त्वाची वाटते. सुरुवातीपासूनच आपण स्वतःला विचारायला हवं—मला आनंदासाठी काय करायचं आहे? मला शांततेसाठी काय करायचं आहे? मला समृद्ध जीवन जगण्यासाठी काय करायचं आहे? हा विचार आपण सुरुवातीलाच केला, तर सर्वांत पहिला फायदा होतो तो म्हणजे स्वतःची समज वाढते. मला आनंद नेमका कशातून मिळतो, हे समजू लागतं. मला शांतता कशामुळे मिळते, हे समजू लागतं. आणि मी खऱ्या अर्थाने समृद्ध कसा होतो, हेही समजू लागतं.
कारण समृद्धी म्हणजे केवळ पैसा किंवा भौतिक साधनसंपत्ती नव्हे. समृद्धीमध्ये भौतिक गोष्टी आहेतच; पण त्याबरोबरच आपली विचार करण्याची पद्धत, आपली शारीरिक क्षमता, आपलं मानसिक स्वास्थ्य, आपलं सामाजिक वातावरण, आपली नाती आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी यांचाही समावेश होतो. म्हणून समृद्धी ही केवळ बँकेच्या खात्यात किती आहे यावर ठरत नाही; ती आपल्या संपूर्ण अस्तित्वाची गुणवत्ता आहे.
म्हणून प्रश्न असा आहे—आपल्याला आनंदाचे काही क्षण मिळवायचे आहेत की आपलं अस्तित्वच आनंदमय करता येईल? आपल्याला शांततेचे काही क्षण मिळवायचे आहेत की आपल्या अस्तित्वामध्येच शांतता निर्माण करता येईल? आपल्याला अधूनमधून समृद्ध वाटायचं आहे की समृद्ध जीवन जगता येईल?
सुरुवातीला हा विचार खूप अवघड वाटतो. पण गेल्या दीड वर्षाच्या माझ्या अनुभवावरून मी आज इतकं नक्की सांगू शकतो—हे शक्य आहे. एक-दीड वर्षापूर्वी कोणी मला विचारलं असतं, “दिवसभर आनंदी, शांत आणि समृद्ध अवस्थेत राहणं शक्य आहे का?” तर कदाचित मी म्हणालो असतो, “असं शक्य नाही.” पण आजचा माझा अनुभव मला वेगळं सांगतो. अर्थात हे एका दिवसात घडत नाही. त्यासाठी समजून-उमजून काम करावं लागतं, ठरवून काम करावं लागतं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सातत्याने काम करावं लागतं.
या प्रवासात मला पहिली गोष्ट अत्यंत स्पष्टपणे जाणवली ती म्हणजे शरीराला आव्हान द्यावं लागतं. आनंद, शांतता आणि समृद्धी यांचा विचार करताना मी समृद्धी हा शब्द शेवटी ठेवतो. कारण सुरुवात शरीरापासून करावी लागते. बलोपासना आवश्यक आहे. व्यायाम आवश्यक आहे. शरीराला आव्हान देणं आवश्यक आहे.
आपण आपल्या शरीराला किती वापरतो, किती आव्हान देतो आणि किती सक्षम बनवतो, याचा विचार केला पाहिजे. मला स्वतःचा अनुभव आहे—मी पूर्वी पुरेसा तंदुरुस्त नव्हतो आणि त्या काळात मी खऱ्या अर्थाने आनंदीही नव्हतो. शरीर आणि मन यांचं नातं अतिशय जवळचं आहे. शरीर अस्वस्थ असेल, अशक्त असेल, आळशी असेल तर मनावरही त्याचा परिणाम होतो. शरीरामध्ये उत्साह नसेल तर मनामध्ये स्थैर्य आणि प्रसन्नता निर्माण करणं अधिक कठीण होतं. म्हणून फिटनेस हा केवळ शरीराचा विषय नाही; तो जीवनाच्या गुणवत्तेचा विषय आहे.
दररोज किमान दीड तास तरी शरीरासाठी द्यायला हवा. चालणं, धावणं, व्यायाम, योग, खेळ—काहीही चालेल; पण ते सातत्याने झालं पाहिजे. आणि शक्य असेल तर एकट्यानेच नव्हे, तर समूहाने. ऋग्वेदातील सुंदर आवाहन आहे—“संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम्।” एकत्र चला, एकत्र विचार करा, तुमची मनं एकत्र येऊ द्या. व्यायामही या भावनेने केला तर त्याला वेगळंच सौंदर्य प्राप्त होतं.
उपनिषदातील प्रार्थना आहे—“सह नाववतु। सह नौ भुनक्तु। सह वीर्यं करवावहै।” आपण एकत्र संरक्षित होऊया, एकत्र पोषित होऊया आणि एकत्रितपणे सामर्थ्य निर्माण करूया. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे—“Strength is life, weakness is death.” सामर्थ्य म्हणजे जीवन; दुर्बलता म्हणजे मृत्यू. म्हणून शरीराला आव्हान द्या; पण केवळ शरीराला त्रास देण्यासाठी नव्हे, तर शरीराला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी. शरीराला शिस्त लावा, शरीराला सक्षम करा आणि शरीराचा उपयोग जीवन अधिक चांगलं जगण्यासाठी करा.
पण केवळ शरीर सक्षम करून चालणार नाही. मनालाही आव्हान द्यावं लागतं. कारण शरीर सक्षम असून मन दुर्बल असेल तर प्रवास पूर्ण होत नाही. आपल्या मनाला नेहमी सोपं काय वाटतं? झोपणं, टाळणं, “उद्या करू” म्हणणं, सवयीच्या चौकटीत राहणं, ज्या गोष्टी आवडतात त्याच करत राहणं. पण परिवर्तन तिथे होत नाही. परिवर्तन तेव्हा सुरू होतं, जेव्हा आपण स्वतःच्या मनाला विचारतो—“मला खरंच हेच करायचं आहे का?” आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे—“माझं मन मला चालवतंय की मी माझ्या मनाला चालवतोय?”
मैदानावर चालताना माझे वीस फेरे पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. पण एक क्षण असा येतो की मन म्हणतं, “आता पुरे. आता नको.” हा क्षण माझ्यासाठी फार महत्त्वाचा असतो. कारण त्या क्षणी प्रश्न शरीराचा नसतो; प्रश्न असतो—मी माझ्या मनाला कोणत्या दिशेने नेणार? मी थांबणार की अजून थोडं पुढे जाणार? तिथेच इच्छाशक्तीची परीक्षा होते. म्हणून मनाला आव्हान द्या; पण मनाशी युद्ध करण्यासाठी नव्हे, तर मनाला योग्य दिशेने नेण्यासाठी. मनाला गुलाम बनवायचं नाही आणि मनाला स्वैरही सोडायचं नाही. मनाला प्रशिक्षित करायचं.
मनामध्ये प्रसन्नता, स्थैर्य, धैर्य आणि निश्चय निर्माण करायचा. कारण मनाला योग्य दिशा मिळाली की त्याच मनामध्ये आपल्याला अडवणारी शक्तीच आपल्याला पुढे नेणारी शक्ती बनू शकते.
यानंतरचा टप्पा आहे बुद्धीला आव्हान देणं. दररोज किमान एक तास असा विषय अभ्यासासाठी द्यायला हवा, ज्याचा अभ्यास आयुष्यभर करता येईल. मी स्वतःसाठी भगवद्गीता हा विषय निवडला आहे. त्याच्याबरोबर पुढे प्रस्थानत्रयीचाही अभ्यास करायचा आहे. भगवद्गीता निवडण्याचं एक कारण म्हणजे एका ग्रंथामध्ये किती विलक्षण विषय एकत्र येतात! मानसशास्त्र आहे, तत्त्वज्ञान आहे, अध्यात्मशास्त्र आहे, भाषेचं सौंदर्य आहे, मानवी स्वभावाचं विश्लेषण आहे, कर्तव्याचा विचार आहे आणि अगदी युद्धनीतीचाही विचार आहे.
पण केवळ श्लोक वाचून पुढे जायचं नाही. ज्या श्लोकाचा अर्थ आपल्या मनाला पूर्णपणे समजलेला नाही, त्याचा शोध घेत राहायचा. प्रश्न विचारायचे, चिंतन करायचं, वाचन करायचं, पुन्हा विचार करायचा. म्हणजे बुद्धीला आव्हान द्यायचं. पण बुद्धीला केवळ माहितीने भरून काढण्यासाठी नव्हे; बुद्धीला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी.
कारण माहिती वाढणं आणि समज वाढणं यात फरक आहे. माहिती आपल्याकडे खूप असू शकते; पण ती माहिती आपल्यामध्ये परिवर्तन घडवत नसेल तर तिचा उपयोग किती? म्हणून अभ्यासाचा खरा फायदा परीक्षेत किती गुण मिळाले यात नाही; आपण किती बदललो यात आहे.
बाह्य जगामधील उपलब्धी आपल्याला काही क्षण आनंद देतात. एखादी वस्तू मिळाली, एखादं पद मिळालं, एखादं कौतुक झालं, एखादी आर्थिक उपलब्धी झाली किंवा एखादं यश मिळालं की आपल्याला आनंद होतो. पण हा आनंद अनेकदा परिस्थितीवर अवलंबून असतो. जेव्हा आपली अंतर्यात्रा सुरू होते, तेव्हा मिळणारा आनंद वेगळा असतो.
तुम्ही स्वतःला कालपेक्षा आज अधिक समजून घेतलं—आनंद. काल जिथे दुर्बल होता तिथे आज स्वतःला सावरलं—आनंद. काल जे समजत नव्हतं ते आज समजलं—आनंद. काल शरीराने जेवढं केलं त्यापेक्षा आज थोडं अधिक केलं—आनंद. काल मनाने जिथे हार मानली असती, तिथे आज मनाला पुढे नेलं—आनंद. हा आनंद बाहेरून मिळत नाही; तो आतून निर्माण होतो. आणि म्हणूनच तो अधिक काळ टिकतो.
हा आनंद उथळ नसतो. भोगातून मिळणारा आनंद अनेकदा माणसाला अधिक उत्तेजित करतो. पण स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी मिळणारा आनंद माणसाला अधिक स्थिर करतो. तो माणसाला बदलतो. आणि जेव्हा आनंद अधिक स्थिर होतो, तेव्हा त्यातून शांतताही निर्माण होऊ लागते. शांत मन अधिक स्पष्टपणे विचार करू लागतं. स्पष्ट विचारातून योग्य कृती निर्माण होते. योग्य कृतीतून जीवन अधिक सुसंगत होतं आणि तिथून खरी समृद्धी सुरू होते.
म्हणून आनंद, शांतता आणि समृद्धी या तीन वेगळ्या गोष्टी नाहीत. त्या एका प्रवासाच्या तीन पायऱ्या असू शकतात. शरीराला सामर्थ्य मिळालं, मनाला स्थैर्य मिळालं आणि बुद्धीला विवेकाची दिशा मिळाली, तर माणसाच्या जीवनामध्ये एक विलक्षण समन्वय निर्माण होतो.
मला वाटतं, या संपूर्ण विचाराचा गाभा हाच आहे—शरीराला आव्हान द्या, मनाला आव्हान द्या, बुद्धीला आव्हान द्या आणि या तिन्हींना योग्य दिशेने घेऊन जा. शरीराला सामर्थ्याची दिशा द्या, मनाला स्थैर्याची दिशा द्या आणि बुद्धीला विवेकाची दिशा द्या. शरीर सक्षम झालं, मन स्थिर झालं आणि बुद्धी विवेकी झाली तर शरीर, मन आणि बुद्धी एकमेकांशी संघर्ष करत नाहीत; उलट ती तिन्ही एकाच दिशेने चालू लागतात. यालाच एका अर्थाने स्वतःवर काम करणं म्हणता येईल.
यासाठी निश्चय आणि इच्छाशक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. एखादी गोष्ट योग्य आहे हे समजणं आणि ती सातत्याने करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला काय करायचं हे माहीत असतं; पण ते करावंसं वाटत नाही. अशा वेळीच निश्चयाची खरी परीक्षा होते. म्हणून परिवर्तनासाठी केवळ ज्ञान पुरेसं नाही आणि केवळ इच्छा पुरेशी नाही. ज्ञानाला निश्चयाची आणि निश्चयाला सातत्याची जोड द्यावी लागते.
आपल्या जीवनातील सर्वांत मोठ्या त्यागांपैकी एक कदाचित सकाळच्या गाढ झोपेचा त्याग असू शकतो. पण माझा अनुभव आता उलट आहे. शरीराला योग्य श्रम दिल्यानंतर रात्री झोपताना इतकी गाढ झोप लागते की अनेकदा स्वप्नही आठवत नाही आणि चार-साडेचार किंवा पाच तासांनंतर जाग येते. आणि पुन्हा झोपण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे एक गोष्ट मला स्पष्टपणे जाणवली—व्यायामामुळे माणूस थकत नाही; अतिरेक आणि चुकीच्या जीवनपद्धतीमुळे माणूस थकतो.
आपण झोपेसाठी किती वेळ देतो, शरीरासाठी किती वेळ देतो आणि उरलेला वेळ कशासाठी वापरतो, याचं गणित जुळवलं पाहिजे. कारण वेळ हीसुद्धा जीवनातील संपत्तीच आहे. दिवसातील प्रत्येक तास आपण कुठे खर्च करतो, यावर आपल्या जीवनाची गुणवत्ता ठरते.
म्हणून मला सध्या जीवनासाठी एक साधं सूत्र दिसतं—शरीराला आव्हान द्या, मनाला आव्हान द्या, बुद्धीला आव्हान द्या आणि या तिन्हींना योग्य दिशेने घेऊन जा. दररोज शरीरासाठी वेळ द्या. दररोज मनावर काम करा. दररोज बुद्धीला काहीतरी नवीन, अर्थपूर्ण आणि परिवर्तनकारी द्या. आणि हे सगळं सातत्याने करा.
एक दिवस करून उपयोग नाही. एक आठवडा करून उपयोग नाही. काही दिवस उत्साहाने करून नंतर सोडून दिलं तर परिवर्तन होत नाही. सातत्य हाच खरा तप आहे.
आणि मग भगवद्गीतेतील अत्यंत प्रसिद्ध श्लोकाचा अर्थ हळूहळू जगण्यात अनुभवायला येतो—
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥”
कर्म करण्याचा अधिकार आहे; फळावर नाही. हे वाक्य केवळ तत्त्वज्ञान म्हणून वाचायचं नाही. जेव्हा शरीराला आव्हान देताना शरीर सक्षम करण्यातच आनंद मिळतो, जेव्हा मनाला आव्हान देताना स्वतःवर विजय मिळवण्यातच आनंद मिळतो आणि जेव्हा बुद्धीला आव्हान देताना समज वाढण्यातच आनंद मिळतो, तेव्हा कर्म आणि फळ यांच्यामधील अंतर कमी होऊ लागतं.
कर्मामध्येच आनंद मिळू लागतो. मग बाहेरून काहीतरी मिळालं तर आनंद होतोच; पण ते मिळालंच पाहिजे म्हणून कर्म करण्याची गरज राहत नाही. कर्म हीच साधना बनते. कर्म हाच आनंद बनतो. कर्म हाच परिवर्तनाचा मार्ग बनतो.
आता पुन्हा मूळ प्रश्नाकडे येऊया. दिवसभर संघर्ष करायचा आणि त्यामध्ये बोटावर मोजण्याइतके आनंदाचे क्षण मिळवायचे? की दोन-तीन तास निश्चयपूर्वक, सातत्याने आणि योग्य दिशेने प्रयत्न करून उरलेले वीस-एकवीस तास अधिक आनंदी, अधिक शांत आणि अधिक समृद्ध अवस्थेत जगायचे?
व्यवहाराच्या भाषेत पाहिलं तर दुसरा मार्ग अधिक कार्यक्षम वाटतो. कारण पहिल्या मार्गात आपण आनंद मिळवण्यासाठी जगतो. दुसऱ्या मार्गात आपण आनंदाने जगतो. पहिल्या मार्गात शांतता ही एखाद्या विश्रांतीच्या क्षणात मिळते; दुसऱ्या मार्गात शांतता ही आपल्या अस्तित्वाचा भाग बनते. पहिल्या मार्गात समृद्धी ही बाहेरून मिळालेल्या वस्तूंमध्ये शोधावी लागते; दुसऱ्या मार्गात समृद्धी ही आपल्या जगण्याच्या गुणवत्तेत अनुभवायला येते.
जीवन अधिक कार्यक्षम होतं. जीवन अधिक सुंदर होतं. जीवन अधिक अर्थपूर्ण होतं.
म्हणून स्वतःला आज एक प्रश्न नक्की विचारा—मला आयुष्यात आनंदाचे काही क्षण हवे आहेत की माझं संपूर्ण अस्तित्वच आनंदमय व्हावं असं मला वाटतं? मला शांततेचे काही क्षण हवे आहेत की शांतता माझ्या स्वभावाचा भाग व्हावी? मला अधूनमधून समृद्ध वाटावं असं वाटतं की माझं जगणंच समृद्ध व्हावं?
या प्रश्नांबरोबर आणखी एक प्रश्न—
मी माझ्या शरीराला, माझ्या मनाला आणि माझ्या बुद्धीला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी आज काय करणार आहे?
कदाचित या एका प्रश्नापासून आपल्या जीवनाच्या परिवर्तनाची सुरुवात होऊ शकते.
शरीराला आव्हान द्या. मनाला आव्हान द्या. बुद्धीला आव्हान द्या. आणि या तिन्हींना योग्य दिशेने घेऊन जा.
कदाचित खंडित आनंदापासून आनंदमय अस्तित्वाकडे जाण्याचा हा एक साधा, पण अत्यंत प्रभावी मार्ग आहे.
विचार करा. निश्चय करा. सुरुवात करा. आणि सातत्याने पुढे चला.
कर्मण्येवाधिकारस्ते : एका श्लोकाने बदललेलं आयुष्य
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ६५ | ३ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥
कर्मणि एव अधिकारः — तुझा अधिकार केवळ कर्म करण्यावर आहे.
मा फलेषु कदाचन — कर्माच्या फळावर कधीही तुझा अधिकार नाही.
मा कर्मफलहेतुर्भूः — कर्माच्या फळाचा हेतू तू होऊ नकोस (फळाच्या आशेने कर्म करणारा).
मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि — तसेच अकर्म किंवा निष्क्रियतेमध्ये तुझी आसक्ती नको.
अतिशय लोकप्रिय श्लोक आहे हा. भगवद्गीता म्हटलं की हा श्लोक पहिल्यांदा आठवतो.
या श्लोकात असं काय आहे, की ज्यामुळे हा श्लोक इतका लोकप्रिय झाला? एक तर याच्यात प्रचंड मोठा संदेश असेल, किंवा हा श्लोक अनेकांचं आयुष्य बदलू शकत असेल. मुळातच भगवद्गीता म्हटल्यानंतर हा श्लोक आपल्या चित्तामध्ये ठसवला जातो, असंही म्हटलं जाईल; किंवा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा श्लोक वापरला जातो. पहिल्यांदा हाच विचार येतो, की हा श्लोकच एवढा का वापरला जातो?
२५ एप्रिल २०२५ ला माझी आई सोडून गेली आणि मी आंबेजोगाईला आलो. माझ्यासमोर प्रश्न होता, आता जगायचं कोणासाठी? कामाची मस्ती, आनंद मी भरपूर घेतलेला होता. सेवाही भरपूर केलेली होती. आता जगायचं कशासाठी? आणि कोणासाठी जगायचं? काय मिळवण्यासाठी जगायचं?
मी बराच अस्वस्थ होतो. दुसरं, माझं शरीर आणि मन पुरतं बिघडून गेलेलं होतं. माझं वजन जवळपास ९५ किलोवर गेलेलं होतं. पोट सुटलेलं होतं, चेहरा असा सुजलेला दिसायचा. चालताना देखील मला नीट चालता यायचं नाही. प्राणमय कोश ज्याला म्हणतो आपण, त्याबाबतीत चयापचयाची प्रक्रिया पूर्ण बिघडलेली होती. थरथर कापायचं, अस्वस्थ वाटायचं. अचानकच अंगाला थरथरी सुटायची. अर्थात त्यामुळे रक्ताभिसरणाचा वेग वाढायचा, रक्तदाब वाढायचा. साखरेचं प्रमाणही वाढायला सुरुवात झाली होती. रक्तातली चरबी म्हणजे कोलेस्ट्रॉल चांगल्याच प्रमाणात वाढत होतं.
एकूण परिस्थिती फारच विपरीत होती. पचनाच्या तक्रारी तर अशा होत्या की, गेल्या १३ वर्षांत मी केवळ एक आणि एकच भाजी खाल्लेली होती; ती म्हणजे तांदुळजा. ती भाजी नसेल तर जेवण्याची शक्यताच नव्हती. कितीतरी रात्री मी जागून काढल्या; पोट बिघडल्यामुळे मला झोपच लागायची नाही. मानसिक समस्या तर इतक्या वाढत गेल्या होत्या की इन्सोम्निया, म्हणजे निद्रानाश हा आजार मला जवळपास २० वर्षांपासून होता. गोळी घेतल्याशिवाय झोप येत नव्हती. २००६ पासून बोटावर मोजण्याइतके तीन-चार दिवस असतील, ज्या दिवशी मी गोळी न घेता झोपलो असेन.
इतर व्याधी म्हणाल तर चिंता (Anxiety), नैराश्य (Depression)... मी म्हणेन की स्किझोफ्रेनिया सोडला, तर मानसशास्त्रातील बहुतेक सर्व आजार मला जडले होते. आत्मविश्वास पूर्णपणे ढासळलेला होता. दुचाकी चालवणं अवघड झालं होतं. २० च्या वर वेग नेणं कठीण जायचं, चालवताना भीती वाटायची, धडकी भरायची. पत्नी आली किंवा मी सोलापूरला गेलो, तर मी पत्नीला म्हणायचो, "मला गाडी चालवता येणार नाही, तू चालव."
पाय प्रचंड सुजायचे. त्याहूनही भयानक बाब म्हणजे मल आणि मूत्रावरचं माझं नियंत्रण पूर्णपणे सुटलं होतं. सार्वजनिक ठिकाणी अशा किमान ५० वेळा तरी कपड्यांतच शौचास झाली. लघवीचा तर विचारूच नका, त्याला गणतीच नव्हती. मैदानावर फिरायला गेलो आणि पोट साफ झालेलं नसलं, तर तिथेच विधी उरकला जायचा.
मला एकूण १३ ॲलोपॅथीच्या गोळ्या सुरू होत्या. आयुर्वेदाच्या वेगळ्या, माझ्या मनाने मी घेत असलेल्या वेगळ्या आणि होमिओपॅथी डॉक्टरांच्या गोळ्या वेगळ्या. मनात सतत भीती, अस्वस्थता आणि निराशा असायची. असं जगण्यात काय अर्थ आहे, हा प्रश्न छळायचा. "हे जगणं मरणापेक्षा वाईट," अशी मनःस्थिती झाली होती; मग वाटायचं, यापेक्षा मरण बरं नाही का?
मला कोणाशी फारसं बोलावंसं वाटायचं नाही. खळखळून हसणं जवळपास विसरलोच होतो. यातून कधी बरा होईन, अशी अजिबात आशा उरली नव्हती. आत्महत्या करण्याचे विचार मनात वारंवार यायचे; परंतु महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक कामात असल्यामुळे "आत्महत्या हे पाप आहे" हे मनात पक्कं ठसलं होतं. त्यामुळे विचार येऊनही मी स्वतःला रोखत होतो. हे सगळं बदलणं अशक्य वाटत होतं. पुन्हा डॉक्टरांकडे जाऊन आणखी गोळ्या वाढवून घेण्याची इच्छा नव्हती; जसं चाललंय तसं चालू द्यावं, अशी वृत्ती झाली होती. माझ्या हातात नेमकं काय आहे, याचा विचार मी करत होतो. दिवस कसा काढायचा? प्रचंड एकटेपणा वाटायचा. दिवस कसा जाईल याविषयी तीव्र अस्वस्थता असायची.
डोळ्यांसमोर केवळ अंधारच दिसत होता. याच काळात माझी मावशी, तेजस्विनी देशपांडे हिने माझ्याकडे प्रेमळ हट्ट धरला, "मला भगवद्गीता समजावून सांग." आणि केवळ तिच्या हट्टापोटी, उपचार म्हणून मी बावकरांच्या पुस्तकाच्या आधारे तिला भगवद्गीता समजावून सांगू लागलो. सुरुवातीला मी खूप खोलात जाऊन तिला शिकवू लागलो. हे करताना मी स्वतःही शिकत होतो. तिची अभ्यासाची प्राथमिक अवस्था होती, तर मी बऱ्याच काळापासून अभ्यास करत होतो; पण मधल्या काळात खंड पडला होता.
त्यामुळे पुस्तकात लिहिलेलं वाचणं आणि त्यावरून मला जे वाटतं ते तिला सांगणं, एवढंच मी करत होतो. सुमारे ३०-३५ दिवसांत आम्ही या श्लोकापर्यंत आलो:
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥
या श्लोकाचा अर्थ सांगितला आणि तिथून घरी आलो. घरी आल्यावर विचार करू लागलो, "आपलं आयुष्य आधीच इतकं निरुपयोगी झालं आहे, मग एक प्रयोग म्हणून हा श्लोक प्रत्यक्ष जगून का पाहू नये?" ज्ञानेश्वरांबद्दल म्हणतातच— "एक तरी ओवी अनुभवावी ज्ञानेशाची."
आपण हा श्लोक प्रत्यक्ष जगू. नाहीतरी आयुष्य बिघडलेलंच आहे, मग या श्लोकावरच प्रयोग करू. आतापर्यंत मी असे श्लोक प्रत्यक्ष जगलो नव्हतो. त्यांचं रसग्रहण करणं, बौद्धिक अर्थ काढणं, भावनिक अर्थ शोधणं, वाच्यार्थ तपासणं आणि थोर व्यक्तींचे विचार समजून घेणं एवढंच मी करत होतो. पण असा एखादा श्लोक प्रत्यक्ष जगण्याचा अनुभव मी घेतला नव्हता.
प्रवचन करणं किंवा लिहिणं वेगळं; प्रत्यक्ष जगणं वेगळं. हा श्लोक खूप लोकप्रिय आणि अवघड आहे. लोक हा श्लोक वारंवार उद्धृत करतात. गीता म्हणजे हा श्लोक, असंच अनेकांचं मत असतं. सामान्य माणसाला गीतेने दिलेला हा सर्वात मोठा संदेश मानला जातो; मग हा श्लोक प्रत्यक्ष जगूनच पाहू या.
पहिल्यांदा काय करायचं आणि काय टाळायचं, हे स्पष्ट समजून घेतलं. एक गोष्ट पक्की ठरवली—कर्म करायचं. कोणत्याही परिस्थितीत कर्म करायचं, सतत क्रियाशील राहायचं, काही ना काही करत राहायचं. यातून काय होईल? यापेक्षा वाईट परिस्थिती तर होणार नाही; फार तर फार मरण येईल, या मानसिकतेपर्यंत मी पोहोचलो होतो. त्यामुळे परिणामांची चिंता न करता दिवसभर कामात गुंतून राहायचं ठरवलं, जेणेकरून मनात इतर विचार येणारच नाहीत.
चित्रपट पाहायचे, बालवाडीत मुलांमध्ये जाऊन बसायचं, सकाळी मैदानावर निवांत फिरायचं, लोकांशी मनमोकळ्या गप्पा मारायच्या, वेळ सत्कारणी लावायचा. फळाचा विचार अजिबात करायचा नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट—निष्क्रिय मुळीच राहायचं नाही. फक्त झोपतानाच निष्क्रियता स्वीकारायची. झोप हीच एकमेव निष्क्रिय अवस्था, कर्म न करण्याची वेळ. मी त्याला 'कर्मसंन्यास' किंवा खरा संन्यास मानतो, जिथे आपण थेट ईश्वराशी जोडले जातो.
झोप किती महत्त्वाची असते आणि ज्याला झोप येत नाही त्याला तिच्यासाठी किती तडफडावं लागतं, हे मी २० वर्षे अनुभवलं आहे. त्यामुळे झोपेचं महत्त्व मला चांगलंच ठाऊक आहे. औषध घेऊन लागलेली झोप आणि नैसर्गिक झोप यात खूप मोठा फरक असतो.
मी कामाला सुरुवात केली. सलग सहा महिने हा दिनक्रम चालू राहिला. याच काळात आमच्या 'प्रबोधक' परिवाराच्या सदस्या दिपालीताई केळेकर मला सहज म्हणाल्या, "दादा, मला भगवद्गीतेचा अभ्यास करायचा आहे." मी त्यांना सांगितलं, "अभ्यास करू; पण तुम्ही त्यावर थोडं लिहिलं पाहिजे. मीही लिहीन. तुम्ही लिहिलं नाही, तर मी पुढच्या श्लोकावर लिहिणार नाही."
आता फक्त पुस्तक वाचण्यापुरता अभ्यास राहिला नव्हता; मला गीतेविषयी काय वाटतं ते सांगणं आणि ताईंचं मत समजून घेणं असा हा संवाद सुरू झाला. यात खरा आनंद मिळू लागला. आता गीतेच्या अभ्यासात गोडी वाटू लागली. सकाळी व्यायाम करताना उत्साह वाटू लागला. मुलांसोबत खेळण्यात आनंद मिळू लागला. हळूहळू वजन घटू लागलं आणि मनाला उभारी मिळाली. बऱ्याच दिवसांनी वजन मोजलं.
सुरुवातीला कोलेस्ट्रॉलची गोळी बंद झाली. त्यानंतर बायपोलर डिसऑर्डरची गोळी कमी होत अखेर पूर्ण थांबली. रक्तदाबाची औषधं कमी झाली. पोटाच्या तक्रारींची औषधं बंद झाली; आता सर्व काही खाता येऊ लागलं. नैराश्याची गोळी बंद झाली. चिंतेवरील गोळीचा डोस १.५ वरून ०.२५ वर आला आणि नंतर तीही थांबली. गेल्या ३० वर्षांपासून उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने, सध्या केवळ २५ mg ची एक छोटी 'मेटोप्रोलॉल' गोळी मी घेतो; बाकी सर्व गोळ्या पूर्णपणे बंद झाल्या आहेत.
९५ किलो असलेले वजन आता ७५ किलोवर आले आहे. पोटाचा घेर कमी झाला असून शरीर पुन्हा सुदृढ बनत आहे. पूर्वी विचित्र अवस्थेत ९ तास झोपायचो; आता चार ते पाच तासांची झोपही पुरेशी होते. गाढ झोप लागते, डोळे मिटताच शांत झोप येते.आता मी आयुष्याचा मनमुराद आनंद घेत आहे. नवीन कपडे परिधान करावेसे वाटतात, उत्तम सुगंधी द्रव्ये वापरावीशी वाटतात, वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते आणि मी ते खातो.
गाणी ऐकतो, चित्रपट पाहतो, वाचन-अभ्यास करतो, मुलांशी खेळतो, लोकांशी संवाद साधतो, चर्चा करतो आणि विविध विषयांवर बोलतो. मला जे वाटतं ते निर्भयपणे व्यक्त करतो; परिणामांची चिंता करत नाही. केवळ या एका श्लोकाच्या अनुभूतीने माझ्यात हे आमूलाग्र बदल घडवून आणले.
Now I can challenge body, I can challenge mind, I can challenge intellect.
मी शरीराला, मनाला आणि बुद्धीला आव्हान देऊ शकतो.
माझ्या मनात आनंद आहे; नव्हे, मी दिवसभर आनंदी असतो. माझ्यात शांतता आहे, मी दिवसभर शांत असतो. माझ्याजवळ समृद्धी आहे, मुबलक काम आहे आणि त्यासाठी मोबदला मिळतो यावर माझा विश्वास आहे. मला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी आज माझ्याकडे आहेत.याचे कारण आहे गीता आणि हा श्लोक ...
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
माकर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥
कर्मफळाची आसक्ती की कर्मातील आनंद?
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ६६ | ४ सप्टेंबर २०२६
नमस्कार
आपण यापूर्वी कर्माचं ऑडिट केलं होतं. आठवतंय? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण दिवसभरात नेमकं काय काय करतो, कोणत्या गोष्टींसाठी आपला वेळ आणि ऊर्जा खर्च होते, कोणती कामं आपण ठरवून करतो आणि कोणती सहज घडतात, याची आपण नोंद ठेवली होती. आज त्या कर्माच्या ऑडिटकडे पुन्हा एकदा वेगळ्या नजरेने पाहूया.
दिवसभरातील आपल्या कृतींचं सहज वर्गीकरण करायला गेलो, तर एक प्रश्न समोर येतो—आपण किती कर्मं काहीतरी मिळावं, फायदा व्हावा, तोटा टाळता यावा किंवा एखादा ठरावीक परिणाम मिळावा या अपेक्षेने करतो? आणि किती कर्मं अशी असतात, जी आपण कोणत्याही फलाकांक्षेशिवाय, अगदी सहजपणे करतो? तहान लागली की आपण पाणी पितो, भूक लागली की जेवतो, मित्र भेटला की गप्पा मारतो, एखादं लहान मूल दिसलं की सहज हसतो, सुंदर गाणं ऐकलं की गुणगुणतो, बागेत गेलो की झाडांना पाणी घालतो, कुणी पत्ता विचारला तर सहज सांगतो आणि तुडुंब भरलेल्या बसमध्ये एखादी वृद्ध व्यक्ती उभी असेल तर आपण आपली जागा तिला देतो. या कृतींमागे आपण नेहमी काही फायदा-तोट्याचं गणित केलेलं असतं का? बहुतेक वेळा नाही. त्या कृती सहज असतात, निर्हेतुक असतात; शरीराची गरज, मनाचा सहज प्रतिसाद किंवा अंतःकरणातून उमटलेली भावना यामुळे त्या घडत असतात.
म्हणजेच, आपल्या आयुष्यातील बहुतेक कृती फलाकांक्षेने प्रेरित नसतात. पण काही कृती मात्र आपण परिणाम डोळ्यासमोर ठेवून करतो. मला सन्मान मिळाला पाहिजे, लोकांनी मला ‘ग्रेट’ म्हटलं पाहिजे, माझ्या मनासारखंच झालं पाहिजे, मला पैसा मिळाला पाहिजे, माझं यश झालंच पाहिजे, माझ्या प्रयत्नाचं अपेक्षित फळ मिळालंच पाहिजे—अशा अपेक्षा मनामध्ये निर्माण होतात. या कृती कदाचित संख्येने कमी असतात; पण त्यांचा प्रभाव मात्र आपल्या संपूर्ण जीवनावर पडू शकतो. कारण फलाकांक्षा केवळ त्या एका कृतीपुरती मर्यादित राहत नाही; ती आपल्या सहज जगण्यामध्येही शिरते.
एखाद्या गोष्टीचा फायदा मिळवण्याची किंवा एखादा परिणाम साधण्याची तीव्र इच्छा मनात आली की आपला श्वास बदलतो, सहज हसणं बदलतं, सहज बोलणं बदलतं. झोपेवर परिणाम होतो, जेवणावर परिणाम होतो, आजूबाजूच्या छोट्या-छोट्या सुंदर गोष्टी अनुभवण्याची क्षमता कमी होते. एखाद्या मुलाबरोबर खेळत असतानाही मन दुसरीकडे असतं. मित्रांशी बोलताना शरीर तिथे असतं; पण मन एखाद्या अपेक्षित परिणामाच्या गणितामध्ये अडकलेलं असतं. म्हणजे ज्या काही कृती आपण परिणामासाठी करतो, त्या कृतींची चिंता आपल्या त्या कृतींपेक्षा कितीतरी मोठ्या क्षेत्रावर पसरते.
याचा मला स्वतःला एक अनुभव आला. काही काळ मी शेअर मार्केटचा अभ्यास करत होतो. माझ्या एका मित्राने मला त्याचा अभ्यास शिकवला. मी त्यात खूप रस घेऊ लागलो. सकाळी मार्केट उघडल्यापासून ते बंद होईपर्यंत शेअर्सचे फंडामेंटल्स, ग्राफ्स, पॅटर्न्स, बाजारावर परिणाम करणारे घटक—सगळ्याचा अभ्यास करत होतो. सुरुवातीला तो अभ्यास होता; पण काही दिवसांनी माझ्या लक्षात आलं की, मी अभ्यासापेक्षा फायदा-तोट्याच्या गणितात अधिक अडकत चाललो आहे. हा शेअर किती वाढेल? किती पडेल? माझा अंदाज बरोबर ठरेल का? फायदा होईल का? तोटा होईल का? मार्केट बंद झाल्यानंतरही ही गणितं डोक्यात सुरूच राहायची.
त्याचा परिणाम माझ्या श्वासावर झाला, झोपेवर झाला, जेवणावर झाला, इतर गोष्टींच्या अभ्यासावर झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे—माझ्या सहज जगण्यावर झाला. शाळेत गेल्यावर एखादं छोटं मूल खूप सुंदर सजून आलेलं असायचं. त्या मुलाकडे पाहून आनंद घ्यायला हवा; पण मनात मात्र शेअर मार्केटमधला एखादा शेअर किती वाढला किंवा किती पडला, हाच विचार सुरू असायचा. तेव्हा मला जाणवलं—एका गोष्टीच्या फळाची चिंता माझ्या आयुष्यातील कितीतरी निर्हेतुक आनंदाच्या गोष्टी खाऊन टाकत आहे. आणि मी तो उपक्रम तात्काळ बंद केला.
याच अनुभवातून मला ‘कर्मण्येवाधिकारस्ते’चा अर्थ आणखी एका वेगळ्या पातळीवर समजला.
कर्मण्येवाधिकारस्ते
मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥
तुझा अधिकार कर्मावर आहे; कर्माच्या फळावर नाही.
याचा अर्थ कर्माच्या परिणामाची अजिबात काळजी करू नये, असा नाही. कारण कोणत्याही कर्माचं फळ केवळ आपल्या एका प्रयत्नावर अवलंबून नसतं. आपला प्रयत्न आपल्या हातात असतो; पण त्याचा परिणाम काळ, परिस्थिती, इतरांचं सहकार्य, निसर्ग, इतरांचे निर्णय, अनपेक्षित घटना आणि असंख्य अदृश्य घटक यांच्यावरही अवलंबून असतो.
आपल्या हातात काय आहे? आपली तयारी, आपला प्रयत्न, आपली वृत्ती, आपल्या कर्माची गुणवत्ता आणि त्या क्षणी आपण करत असलेलं कर्म. आणि आपल्या हातात काय नाही? इतर लोक काय विचार करतील, काय बोलतील किंवा कशी प्रतिक्रिया देतील, हे आपल्या हातात नाही. निसर्ग आपल्या हातात नाही. अपघात आपल्या हातात नाहीत. बाजारपेठ आपल्या हातात नाही. सरकारी धोरणं आपल्या हातात नाहीत. भूतकाळ आपल्या हातात नाही. नशीब आपल्या हातात नाही. जन्म-मृत्यू आपल्या हातात नाही.
मग जे आपल्या हातात नाही, त्याचं सतत गणित करत बसण्यापेक्षा जे आपल्या हातात आहे ते अधिक सुंदर, अधिक अचूक आणि अधिक कार्यक्षम करण्यावर लक्ष का देऊ नये?
पण इथे एक अत्यंत महत्त्वाचा फरक समजून घ्यायला हवा.
फळाकडे पाहायचंच नाही, असं गीता सांगत नाही; फळाशी आसक्त व्हायचं नाही, असं ती सांगते.
माझ्या वस्तीवरच्या कामात, लहान मुलांमध्ये काम करताना किंवा ‘गुड मॉर्निंग’ ग्रुपमधून प्रबोधनाचं काम करताना मला याचा वारंवार अनुभव येतो. एखादी गोष्ट करायची ठरवतो. आधी तिचं नियोजन करतो. तिचा प्लॅन तयार करतो. ती गोष्ट अधिक चांगली कशी करता येईल, याचा विचार करतो आणि मग पूर्ण समर्पणाने ती करून पाहतो. त्यानंतर मात्र एक प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचा असतो—याचा परिणाम काय झाला?
मुलांवर त्याचा काय परिणाम झाला? त्यांना काय समजलं? त्यांना काय आवडलं? कुठे ते जोडले गेले? कुठे त्यांचा प्रतिसाद कमी झाला? काय बदलायला हवं? पुढच्या वेळी हीच गोष्ट आणखी चांगली कशी करता येईल?
इथे परिणाम माझ्यासाठी फळाची अपेक्षा नसतो; तो feedback असतो.
ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.
आपण परिणामाकडे दोन पद्धतींनी पाहू शकतो. पहिली पद्धत—मी इतकं केलं, आता मला काय मिळालं? माझ्या अपेक्षेप्रमाणे परिणाम झाला का? लोकांनी माझं कौतुक केलं का? मला यश मिळालं का? आणि दुसरी पद्धत—मी जे केलं त्यातून काय घडलं, हे समजून घेऊया आणि त्या अनुभवाचा उपयोग पुढचं कर्म अधिक चांगलं करण्यासाठी करूया.
पहिली पद्धत आपल्याला फळाशी बांधते; दुसरी पद्धत आपल्याला कर्म अधिक सुंदर करण्यास शिकवते.
म्हणूनच कर्मयोग म्हणजे परिणामाकडे डोळे बंद करणं नव्हे. उलट परिणामाकडून शिकणं; पण परिणामाशी स्वतःची किंमत, अहंकार किंवा आनंद जोडून न घेणं—ही कर्मयोगाची सूक्ष्म दिशा आहे.
एखाद्या मुलांसाठी केलेल्या उपक्रमाचा अपेक्षित परिणाम झाला नाही, तर ‘मी अपयशी झालो’ असं न म्हणता ‘पुढच्या वेळी माझ्या कृतीमध्ये काय सुधारणा करायला हवी?’ असा प्रश्न विचारायचा. एखादा उपक्रम अपेक्षेपेक्षा अधिक परिणामकारक झाला, तर ‘मी किती मोठं काम केलं!’ असा अहंकार न करता ‘यात नेमकं काय चांगलं झालं आणि ते पुढच्या कामात कसं वापरता येईल?’ हे पाहायचं.
मग परिणाम आपल्याला बांधून ठेवत नाही; परिणाम आपल्याला घडवत राहतो.
आणि म्हणूनच आपल्या कामाचा एक सुंदर चक्र तयार होतं—नियोजन, पूर्ण समर्पणाने कर्म, परिणामाचं निरीक्षण, त्यातून feedback घेणं आणि पुढच्या कर्मामध्ये सुधारणा करणं.
हे कर्मयोगाशी अगदी सुसंगत आहे.
कारण आपलं लक्ष परिणामाच्या मालकीवर नसतं; कर्माच्या गुणवत्तेवर असतं.
आणि म्हणूनच श्रीकृष्ण पुढचा टप्पा सांगतात—
योगस्थः कुरु कर्माणि
सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय।
सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा
समत्वं योग उच्यते॥
हे धनंजया, आसक्ती सोडून योगस्थ होऊन कर्म कर. सिद्धी आणि असिद्धी, यश आणि अपयश या दोन्हींमध्ये समान राहा. या समत्वभावालाच योग म्हटलं आहे.
इथे ‘योगस्थः कुरु कर्माणि’ हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे.
योग म्हणजे केवळ योगासनं नव्हेत. आपण सूर्यनमस्कार करतो, योगासनं करतो, प्राणायाम करतो, ध्यान करतो; पण उरलेल्या दिवसभरात जर आपण यश-अपयशाच्या चिंतेत, मान-सन्मानाच्या अपेक्षेत, फायदा-तोट्याच्या गणितात आणि आसक्तीत जगत असू, तर योग अजून आपल्या जगण्यात उतरलेला नाही.
कर्मामध्ये पूर्णपणे उपस्थित राहणं, कर्माला कर्तव्य मानणं आणि त्या कर्मामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देणं—ही योगाची दिशा आहे.
काम हीच पूजा. काम हीच अर्चना. काम हेच प्रेम.
काम करताना ‘यातून मला काय मिळणार?’ या प्रश्नापेक्षा ‘हे मी किती सुंदरपणे करू शकतो?’ हा प्रश्न महत्त्वाचा होतो. यश मिळालं तर अहंकार वाढत नाही. अपयश आलं तर मन खचत नाही. कारण आपली ओळख फळाशी जोडलेली नसते; ती कर्माशी जोडलेली असते.
यालाच गीता समत्वयोग म्हणते.
आपल्या मनातील ताण, भीती आणि चिंता यापैकी कितीतरी गोष्टी परिणामाच्या आग्रहातून निर्माण होतात. ‘हे झालंच पाहिजे’, ‘माझ्या मनासारखंच झालं पाहिजे’, ‘मला यश मिळालंच पाहिजे’, ‘लोकांनी माझा सन्मान केलाच पाहिजे’—या ‘पाहिजे’च्या ओझ्याखाली चित्त अस्वस्थ होतं.
पतंजली म्हणतात—
‘योगश्चित्तवृत्तिनिरोधः।’
चित्तातील वृत्तींचा निरोध म्हणजे योग.
मग चित्तामध्ये अनावश्यक वृत्ती कमी कशा होतील? कर्मावर लक्ष केंद्रित केल्याने. जे आपल्या हातात आहे ते पूर्ण क्षमतेने करायचं. जे आपल्या हातात नाही त्याची अनावश्यक चिंता करायची नाही. आणि आपल्या कर्मामध्ये प्रामाणिकपणा, प्रेम, आनंद आणि समर्पण आणायचं.
असं केलं की एक विलक्षण गोष्ट घडते—फलाकांक्षा कमी झाली की सहजता परत येते.
सहजता परत आली की आपली अभिव्यक्ती खुलते. मग एखादं गाणं पुन्हा सहज गुणगुणावंसं वाटतं. एखाद्या मुलाचं हसू पुन्हा मनापासून आनंद देतं. मित्राशी बोलताना मन पूर्णपणे त्या संवादात राहतं. झाडाला पाणी घालताना त्या कृतीचा आनंद मिळतो. आणि मग लक्षात येतं—आपण ज्या फळासाठी धावत होतो, त्यापेक्षा कर्मामध्येच कितीतरी मोठं फळ दडलं होतं.
म्हणूनच फलाकांक्षा सोडणं म्हणजे निष्क्रिय होणं नाही. उलट, फलाकांक्षा कमी झाली की कर्म अधिक सजग, अधिक कार्यक्षम आणि अधिक आनंददायी होऊ शकतं. परिणामाकडे पाहायचं, पण त्याच्याशी चिकटून बसायचं नाही. परिणामातून शिकायचं, पण परिणामाने आपली शांतता हिरावून घेऊ द्यायची नाही.
आपल्या दिवसातील बहुतेक कृती अशाच निर्हेतुक असतात. पण एखाद्या एका फलाकांक्षेची चिंता त्या संपूर्ण दिवसावर हावी होऊ शकते. म्हणून ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ हा केवळ काम करण्याचा मंत्र नाही.
तो जगण्याला पुन्हा सहज बनवण्याचा मंत्र आहे.
आणि ‘योगस्थः कुरु कर्माणि’ हा त्या सहजतेला समत्वाची दिशा देणारा मंत्र आहे.
कर्म करायचं—पूर्ण मनाने. कर्म करायचं—पूर्ण क्षमतेने. कर्म करायचं—प्रेमाने. कर्म करायचं—पूजा म्हणून. परिणामाकडून शिकायचं; पण परिणामाच्या गुलामगिरीत जायचं नाही.
मग कर्म ओझं राहत नाही.
कर्म जगण्याचा आनंद बनतं.
आणि म्हणूनच भगवद्गीतेचा हा संदेश केवळ वाचायचा नाही; तो दिवसाच्या सुरुवातीलाच आठवायला हवा.\
आपण रोज एकमेकांना ‘गुड मॉर्निंग’चे संदेश पाठवतो. त्या ‘गुड मॉर्निंग’सोबत एखादा गीतेचा श्लोक पाठवला तर? दिवसाची सुरुवात केवळ शुभेच्छेने नव्हे, तर एका सुंदर विचाराने झाली तर?
उद्या सकाळी ‘गुड मॉर्निंग’सोबत एवढंच पाठवून पाहूया—
कर्मण्येवाधिकारस्ते
मा फलेषु कदाचन ।
आज आपल्या हातात असलेलं कर्म आपण पूर्ण मनाने करूया; परिणामाकडून शिकूया; पण परिणामाची अनावश्यक चिंता करू नका.
कदाचित एका श्लोकाने कुणाचा तरी दिवस बदलेल.
आणि कदाचित हळूहळू—
आपलं जगणंच बदलेल.
योगस्थः कुरु कर्माणि : समत्वातून कर्मयोगाकडे
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ६७ | ५ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक आज आपण समजून घेऊया—
योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय।
सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते॥
हे धनंजया, फळाची आसक्ती आणि ‘मी कर्ता आहे’ हा अहंपणा सोडून देऊन, कर्तव्यकर्म पार पाडताना मनाचा तोल सांभाळ. योगस्थ हो. कार्यात यश मिळो अथवा अपयश, दोन्ही परिस्थितींमध्ये शांत आणि समान राहा. कारण अशा प्रकारच्या मानसिक समतोलालाच, समभावालाच योग असे म्हटले जाते.
या श्लोकामध्ये अनेक महत्त्वाच्या तार्किक आणि व्यावहारिक संकल्पना येतात. त्यातील पहिली संकल्पना आहे ‘योगस्थता’—म्हणजेच ‘योगस्थ’ होऊन कर्म करणे.
बहुतेक वेळा माणूस बाह्य परिस्थितीनुसार कृती करतो. आपण कुठलीही कृती करत असताना action and reaction अशी प्रक्रिया चालू असते. काही कृती आपण स्वतःहून करतो; तर काही कृती आपल्यासमोर आलेल्या परिस्थितीला प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद म्हणून करतो.
आपण आपल्या दिवसभरातील कृतींचं थोडं वर्गीकरण केलं, तर एक प्रश्न स्वतःला विचारता येईल—दिवसभरात आपण किती कृती स्वतःच्या इच्छेने करतो आणि किती कृती परिस्थितीला प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद म्हणून करतो? त्याचप्रमाणे आणखी एक वर्गीकरण करता येईल—किती कृती आपल्या सहज घडतात आणि किती कृती आपण ठरवून करतो?
म्हणजे आपल्या कृतींकडे पाहण्याचे किमान चार प्रकार दिसतात—सहज घडणाऱ्या कृती, ठरवून केलेल्या कृती, स्वतःच्या इच्छेने केलेल्या कृती आणि परिस्थितीला प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद म्हणून केलेल्या कृती.
मग इथे प्रश्न असा आहे की, या सगळ्या कृती करताना योगस्थता म्हणजे नेमकी काय?
श्रीकृष्ण सांगतात—आधी स्वतःच्या अंतःकरणाला स्थिर करा. स्वतः स्थिर व्हा. आपल्या आतल्या आत्मतत्त्वाशी, बुद्धीशी, मनाशी आणि शरीराशी एक प्रकारचं स्थैर्य निर्माण करा. आपलं कर्तव्य काय आहे हे समजून घ्या आणि मग कृतीला सुरुवात करा.
म्हणजे उगाच झटकन कृती करण्याऐवजी थोडासा विचार घ्या, थोडासा pause घ्या. आपण म्हणतो ना—Think twice. एखादी कृती करण्यापूर्वी थोडं थांबा, स्वतःकडे पाहा आणि मग कृती करा.
अर्जुनाच्या बाबतीतही हेच घडतं. युद्धाच्या प्रसंगी त्याच्या मनामध्ये अनेक भावना एकदम उफाळून येतात. त्या भावनेच्या भरात तो युद्ध न करण्याचा निर्णय घेतो. श्रीकृष्ण त्याला जणू सांगतात—थोडं थांब, विचार कर. आणि हा दुसरा विचार तुझ्या शुद्ध बुद्धीचा असू दे. तुझ्यातल्या कृष्णासारख्या विवेकबुद्धीचा असू दे. एकाचा असू दे, दुसऱ्याचा असू दे किंवा अनेकांचा असू दे; पण समजून-उमजून, शांतपणे आणि स्वतःला स्थिर करून कृती कर.
आपल्या बाबतीत हे किती होतं, याचा आपण विचार केला पाहिजे. आपण extempore, impulsive, reactive अशा किती कृती करतो? आणि स्वतःला स्थिर करून, समजून-उमजून, प्रतिक्रिया न देता प्रतिसाद म्हणून किती कृती करतो?
मला वाटतं, आपल्या जीवनातील अनेक संघर्ष आणि त्रास हे अशाच कृतींमधून निर्माण होतात, जिथे आपण फारसा विचार न करता प्रतिक्रिया देतो.
पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्ट करण्यापूर्वी विचारच करत बसायचा. काही कृती तत्काळ आणि सहज करायलाच हव्यात. कोणाचं तरी भलं करावंसं वाटलं, कोणाला मदत करावीशी वाटली, तर जरूर करावी. कोणाचं पाकीट खाली पडलं असेल तर ते पटकन उचलून त्या व्यक्तीला द्यावं. कोणीतरी गाडीवरून पडला असेल, तर तो wrong side ला होता की right side ला, तो वेगाने चालवत होता की हळू, त्याच्याकडे लायसन्स आहे की नाही—या गोष्टींचा विचार करण्यापूर्वी त्याला मदत करणं महत्त्वाचं आहे.
अशा काही कृती आहेत, जिथे extempore मदत करणं हीच योग्य कृती आहे. त्या नक्की केल्या पाहिजेत.
पण कोणीतरी आपल्याला वेडंवाकडं बोललं, म्हणून त्याला झटकन उत्तर देण्याची काय गरज आहे? थोडं थांबूया. स्वतःला स्थिर करूया. हा माणूस असं का बोलतोय? त्यामागे काय कारण असेल? हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. घरात, बैठकीत किंवा एखादा विचार समजून घेत असताना लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी Think twice करणं अधिक योग्य ठरतं.
म्हणून दिवसभरातील कृतींकडे पाहताना एक साधं demarcation करता येईल—कोणत्या गोष्टी सहज आणि तत्काळ करायच्या आणि कोणत्या गोष्टी स्वतःला स्थिर करून, विचारपूर्वक करायच्या.
मजेशीर गोष्ट अशी आहे की, अनेकदा आपण ज्या गोष्टी सहज करायला हव्यात तिथे फार विचार करतो; आणि जिथे विचारपूर्वक कृती करायला हवी, तिथे मात्र extempore प्रतिक्रिया देतो. इथेच गडबड होते आणि त्यातून संघर्ष निर्माण होतो.
आता या श्लोकामध्ये स्वतःला स्थिर करून काम करण्याचं सांगितलं आहे. त्याचं एक साधं उदाहरण घेऊया. रस्त्यावरून गाडी जात असताना एखाद्या व्यक्तीचा गाडीवरील ताबा सुटतो आणि तो खाली पडतो. त्या व्यक्तीला मदत करणं, त्याला उठवणं हे आपलं पहिलं काम असलं पाहिजे. पण अनेकदा लोक फक्त बघ्याची भूमिका घेतात.
समाजातही असंच होतं. आपल्या संस्थेत एखादं चांगलं काम करायचं असेल किंवा समाजासाठी काही करायचं असेल, तर पुढाकार घेणारे, पहल करणारे लोक तुलनेने कमी असतात. स्थिर विचार करून काम करणं म्हणजे कामच न करणं नाही. नुसती बघ्याची भूमिका घेणं हे भगवद्गीतेला अपेक्षित नाही.
म्हणून पुढचा शब्द महत्त्वाचा आहे—‘कुरु कर्माणि’. जे करायला पाहिजे ते केलं पाहिजे. भगवद्गीता कर्माचा त्याग करायला शिकवत नाही; ती कर्माचं आचरण करायला आणि proactive राहायला शिकवते.
म्हणूनच अर्जुनाला युद्धासारख्या कठीण प्रसंगी पळून जाण्याऐवजी कर्म करण्यास सांगितलं आहे. ‘कुरु कर्माणि’—कर्म कर. पळून जाऊ नकोस. Freeze होऊ नकोस. फक्त समजून-उमजून, स्वतःला स्थिर करून कर्म कर.
पण कर्म करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे—‘सङ्गं त्यक्त्वा’.
आपण एखादी कृती करतो, मग लगेच तिचा फायदा काय होईल, तोटा काय होईल, मला काय मिळेल, किती लवकर परिणाम मिळेल, याचा विचार सुरू होतो. शरीर अस्थिर आहे आणि आपल्याला व्यायाम करायचा आहे, तर आपण लगेच विचार करतो—याचा फायदा मला किती दिवसांत दिसेल?
पण शरीर, मन, बुद्धी आणि चित्त या सगळ्या गोष्टी organic आहेत. त्या असमतोलातून समत्वाकडे येत असतील, तर त्यासाठी योग्य वेळ द्यावा लागतो. सातत्याने एखादी गोष्ट केली तर बदल नक्की होतो; पण घाई करून त्याचा उपयोग नाही.
‘सङ्गं त्यक्त्वा’ म्हणजेच घाईगडबडीने, तात्काळ फायदा मिळावा या अपेक्षेने कर्म करू नये. लगेच फायदा झाला नाही म्हणून धरसोड करू नये—‘मला लगेच मिळत नाही ना, मग मी सोडतो आणि दुसरं काहीतरी करतो’, अशी वृत्ती ठेवू नये.
पहिल्यांदा मनाची आणि चित्ताची स्थिरता ठेवून कर्माला सुरुवात करायची आणि कर्म करत असतानाही ती स्थिरता टिकवायची. फारसा स्वार्थी किंवा संकुचित विचार न करता, धरसोड न करता पुढे जायचं. यालाच संगाचा त्याग, अनासक्ती किंवा अलिप्तता म्हटलं आहे.
याचा अर्थ निष्क्रिय होणं नाही; उलट सावधपणे आणि सातत्याने कर्म करणं आहे. सावधपणे म्हणजे भीतीने नव्हे. सावधपणे म्हणजे प्रत्येक गोष्टीला योग्य तो वेळ देऊन. प्रत्येक कृतीला तिची स्वतःची एक प्रक्रिया असते, एक विशिष्ट रचना असते, एक पद्धत असते आणि त्यासाठी विशिष्ट कौशल्याची गरज असते.
घाईगडबडीने, फायद्या-तोट्याचा सतत विचार करत एखादी गोष्ट पटकन केली, तर तिचं अपेक्षित स्वरूप येत नाही. काही गोष्टींना क्षणोक्षणी घडण्याचा, रुजण्याचा आणि विकसित होण्याचा वेळ द्यावा लागतो.
आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे—कृती झाल्यानंतर तिचा परिणाम काय झाला?
आपण कृती करताना जी भूमिका किंवा उद्देश ठेवला होता, त्या उद्देशाने ती कृती झाली का? उदाहरणार्थ, रस्त्यावर गाडीवरून पडलेल्या माणसाला आपण मदत केली. त्याने आपल्याला Thank you म्हटलं पाहिजे, अशी अपेक्षा आपण ठेवायची का?
जर ‘त्याने Thank you म्हटलं तरच मी मदत करणार’ असा विचार असेल, तर ती कृती निःस्वार्थ राहिली नाही. आणि मदत केल्यानंतर त्याने Thank you म्हटलं नाही म्हणून स्वतःला त्रास करून घेणंही योग्य नाही.
ती सहज केलेली कृती होती. आपलं कर्तव्य म्हणून केलेली कृती होती. परिस्थितीला दिलेला योग्य प्रतिसाद म्हणून केलेली कृती होती.
एखाद्याचं पाकीट आपल्याला सापडलं, एखाद्याची अतिशय मौल्यवान वस्तू आपल्याला सापडली आणि आपण ती त्या व्यक्तीला परत केली, तर त्याबदल्यात त्या व्यक्तीने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे, असा भाव ठेवायचा नाही.
म्हणूनच कृती करताना आणि कृती केल्यानंतरही परिणामाशी आपली मानसिक अवस्था बांधून ठेवायची नाही.
कृती सिद्ध झाली किंवा सिद्ध झाली नाही, यश आलं किंवा अपयश आलं—दोन्ही परिस्थितींमध्ये मनाचा तोल सांभाळायचा. यश आलं म्हणून गर्वाने उधाणून जायचं नाही आणि अपयश आलं म्हणून निराशेच्या गर्तेतही जायचं नाही.
परिस्थिती कोणतीही असो, मनाची आणि चित्ताची स्थिरता अभेद्य राखणं ही परिपक्वतेची अवस्था आहे.
आणि अशी परिपक्वता, अशी चित्ताची समतोलता किंवा मानसिक समतोलता दैनंदिन जीवनात काम करताना यायला लागली, की हळूहळू आपल्या आत एक वेगळं समत्व निर्माण होतं.
त्यालाच योग म्हणतात.
म्हणजे जीवनच योगमय होतं. माणसाचं जगणंच योगाचं जगणं होतं. सर्व परिस्थितींमध्ये मनाचा किंवा चित्ताचा तोल सांभाळणं हा कर्मयोगाचा सर्वोच्च आदर्श आहे, असं या श्लोकातून आपल्याला समजतं.
या श्लोकातील संकल्पना आपण व्यावहारिक जीवनात समजून घेतल्या, त्यांचं वर्गीकरण केलं आणि त्यानुसार आपल्या कृतींकडे पाहायला सुरुवात केली, तर त्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो. कोणती कृती सहज करायची, कोणती ठरवून करायची, कुठे त्वरित प्रतिसाद द्यायचा आणि कुठे थांबून विचार करायचा—हे समजून घेणं आवश्यक आहे.
आणि या सगळ्या कृती करताना मनाची आणि चित्ताची स्थिरता जपायची, कर्म करताना आनंदी आणि तन्मय राहायचं आणि परिणामाशी स्वतःला बांधून घ्यायचं नाही—ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे, तिलाच आपण यौगिक प्रक्रिया म्हणू शकतो.
अशी प्रक्रिया आपल्या सर्वांच्या आयुष्यात यावी. प्रत्येक गोष्ट अधिक सजगपणे, अधिक समजून-उमजून आणि अधिक सहजतेने करता यावी. आणि या प्रक्रियेमध्ये आपण अनेक लोकांना सहभागी करून घ्यावं.
‘सङ्गच्छध्वं संवदध्वम्’—एकत्र चालत, एकत्र संवाद साधत आपण पुढे जाऊया.
म्हणूनच माझी पुन्हा पुन्हा तुम्हाला एक विनंती आहे—हा अभ्यास केवळ तुमच्यापुरता ठेवू नका.
आपल्या चॅनलवर आता साडेपाचशेहून अधिक लोक आहेत; पण या लेखांचं sharing तुलनेने कमी होत आहे. हे थोडं वाढलं तर मला नक्कीच आनंद होईल. मात्र मी लिहितोय किंवा अभ्यास करतोय तो केवळ sharing वाढावा म्हणून नाही. हा अभ्यास मी माझ्यासाठीही करतोय.
पण माझा भाव असा आहे की हा अभ्यास अनेकांच्या हिताचा ठरू शकतो. म्हणूनच तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, ही इच्छा आहे.
धन्यवाद.
नोकराची वृत्ती की मालकीची? कर्मामागचा भाव कोणता?
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ६८ | ६ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
आपण सर्वांनी एकदा शांतपणे असा विचार करून पाहावा—आपल्या आयुष्यातला असा कोण माणूस आहे, जो आपण कधीही विसरू शकणार नाही? ज्याने आपल्या आयुष्यात फार मोठं योगदान दिलं, आपल्या आयुष्याला दिशा दिली, आपल्यासाठी काहीतरी अतिशय महत्त्वाचं केलं? थोडं आठवा. तो माणूस आपल्याशी कसा वागला? कसा बोलला? त्याने आपल्यासाठी काय केलं? कोणत्या भावनेने केलं? कोणत्या पद्धतीने केलं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे—तो माणूस आपल्यासाठी इतका खास का झाला?
आपण थोडा विचार केला, तर लक्षात येईल की अशा माणसांनी आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं केलं असतं. त्यांनी केवळ एखादं काम पूर्ण केलेलं नसतं; ते काम खास पद्धतीने केलेलं असतं आणि त्यामागे एक खास भावना असते. म्हणूनच त्या व्यक्तीचं योगदान आपल्या मनावर कायमचं कोरलं जातं. काम तेच असतं, परिस्थिती तीच असते; पण कामामागची वृत्ती आणि भावना बदलली, की त्या कामाची गुणवत्ता आणि त्याचा परिणाम पूर्णपणे बदलून जातो.
आपल्या घरात एखादी व्यक्ती काम करण्यासाठी येते. ती व्यक्ती मनात केवळ एवढाच विचार ठेवत असेल की, काम आटपायचं, पैसे घ्यायचे आणि निघून जायचं, तर आपल्याला ते कितपत आवडेल? काम झालं आहे की नाही, ते नीट झालं आहे की नाही, त्यात काही उणीव राहिली आहे की नाही—याच्याशी काही देणंघेणं नाही; फक्त आपलं काम झालं आणि आपल्याला मोबदला मिळाला, एवढाच जर दृष्टिकोन असेल, तर अशा कामामध्ये आणि उत्कृष्ट कामामध्ये फार मोठा फरक पडतो.
माझी आई आमच्या घरात काम करणाऱ्या ताई, मावशी यांचं काम झाल्यानंतर ते काम कसं झालं आहे, हे पाहायची. तिला काही अयोग्य वाटलं, तर ती ते सांगून पुन्हा करून घ्यायची. काही जण पटापट काम उरकायच्या आणि निघून जायच्या तयारीत असायच्या. पण आईला ते मान्य नसायचं. तिला काम व्यवस्थित, नीट आणि मनासारखं झालेलं हवं असायचं. एकदा मी सहज आईला विचारलं, “आई, समजा हेच काम तू करायला लागलीस, तर तूही असंच व्यवस्थित काम करशील का?” माझ्या प्रश्नाचं तिने दिलेलं साधंसुधं उत्तर माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात राहण्यासारखं ठरलं.
आई म्हणाली, “जे माणसं केवळ पैशासाठी काम करतात ना मुन्ना, त्यांचा विकास फारसा होत नाही. ते तिथेच राहतात. त्यांच्या आयुष्यात फारसा बदल होत नाही. पण जे लोक काम करत असतानाच त्या कामामध्ये कौशल्य टाकतात, उत्तमता टाकतात आणि त्या कामामध्ये चांगला भाव टाकतात, अशी माणसं एक तर सुखी असतात आणि त्यांची प्रगतीही होते.” आईचं हे साधं वाक्य मला नंतर भगवद्गीतेतील कर्मयोग समजून घेताना किती खोल आहे, हे जाणवलं.
आईच्या उदाहरणातून मला एक गोष्ट स्पष्ट झाली—नोकराच्या मानसिकतेतून काम करणं म्हणजे केवळ मोबदल्यासाठी काम करणं. काहीतरी मिळणार आहे, पैसे मिळणार आहेत, परिणाम मिळणार आहे म्हणून काम करणं. अशा वेळी काम करण्याची अंतःप्रेरणा फारशी नसते. काम हे आनंदाचं साधन राहत नाही; ते केवळ मोबदला मिळवण्याचं साधन बनतं. पण “हे काम माझं आहे आणि ते उत्कृष्ट झालंच पाहिजे,” या मानसिकतेतून केलेलं कर्म म्हणजे कर्माची मालकी स्वीकारणं. हीच नोकराच्या वृत्तीपासून मालकीच्या वृत्तीपर्यंतची वाटचाल आहे.
स्वामी विवेकानंदांनी कर्मयोगाच्या संदर्भात हाच विचार अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. मनुष्य केवळ फळाची किंवा परिणामाची आशा ठेवून काम करतो, तेव्हा तो एका मजुरासारखा जगतो. मजूर सतत घड्याळाकडे पाहतो किंवा दिवसाच्या शेवटी किती पैसे मिळणार याचा विचार करतो. त्याचं लक्ष कामाच्या आनंदावर नसतं; त्याचं लक्ष मोबदल्यावर असतं. काम हे त्याच्यासाठी साधन असतं आणि मिळणारा पैसा हे अंतिम ध्येय असतं. सकाम कर्माची मानसिकता याच प्रकारची आहे.
स्वामीजींचा एक सुंदर संदेश आहे—“Don’t be a beggar, be a master.” भिकारी किंवा याचक बनू नका; मालक बना. सतत “मला काय मिळणार?” या प्रश्नाभोवती फिरणं म्हणजे स्वतःला फळाच्या दयेवर ठेवणं. फळाची याचना करत राहणं ही शक्तीची नव्हे, तर दुर्बलतेची मानसिकता आहे. म्हणूनच फळाच्या अपेक्षेने केलेलं कर्म तुलनेने कनिष्ठ ठरतं. आपण कर्माचे मालक झालो, की आपली ऊर्जा फळ मागण्यात खर्च होत नाही; ती कर्माला अधिक चांगलं करण्यामध्ये खर्च होते.
स्वामीजींचा आणखी एक अत्यंत सुंदर विचार आहे—“Every act of selfishness, every desire for fruit, binds us.” प्रत्येक स्वार्थी विचार आणि प्रत्येक फळाची अपेक्षा आपल्याला बांधून ठेवते. आपण फळाची अपेक्षा ठेवली, काय मिळणार याचा हिशोब सुरू केला, की त्याच क्षणी अपयशाची भीती निर्माण होते. “मला हे मिळालंच पाहिजे”, “माझं काम यशस्वी झालंच पाहिजे”, “मला याचा मोबदला मिळालाच पाहिजे”—या अपेक्षांमधून मनावर दबाव वाढत जातो. हीच भीती माणसाची ऊर्जा आणि एकाग्रता हिरावून घेते. परिणामी माणूस काम करत असतो, पण मन मात्र परिणामाच्या चिंतेत अडकलेलं असतं. बाहेरून तो काम करत असतो; आतून तो फळाचा याचक झालेला असतो.
याउलट एखादी काम करणारी मावशी असो, आपला सहकारी असो किंवा आपल्या हाताखाली काम करणारी व्यक्ती असो—ती जर काम व्यवस्थित करण्याबरोबरच ते प्रेमाने करत असेल, त्यात कौशल्य असेल, शंभर टक्के एकाग्रता असेल, उत्तमता साधण्याची इच्छा असेल आणि “हे आणखी चांगलं कसं करता येईल?” असा विचार असेल, तर त्या व्यक्तीचा परिणाम आपल्या आयुष्यावर कितीतरी मोठा होतो. कारण तिथे केवळ काम झालेलं नसतं; त्या कामामध्ये माणूस स्वतःला ओतलेला असतो.
स्वामी विवेकानंद म्हणतात—“Work for work’s sake, love for love’s sake.” कर्मासाठी कर्म करा आणि प्रेमासाठी प्रेम करा. कामाच्या बदल्यात काहीतरी मिळावं म्हणूनच काम करू नका. कामामध्येच आनंद शोधा. आपल्या आईचं उदाहरण पाहा. आई आपल्या मुलावर प्रेम करते तेव्हा ती त्याच्याकडून काही मोबदला मागते का? मुलासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवते का? “मी तुझ्यासाठी एवढं केलं, आता तू मला काय देणार?” असा व्यवहार ती करत नाही. तिच्या कर्मामागे प्रेम असतं. म्हणूनच त्या कर्माला एक वेगळी उंची प्राप्त होते.
इथेच आपण स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला हवा. आपण इतरांच्या बाबतीत लगेच तुलना करतो—हा माणूस किती चांगलं काम करतो, तो किती मनापासून काम करतो, हा किती कौशल्याने काम करतो. पण प्रश्न दुसऱ्याचा नाही; प्रश्न आपला आहे. आपण स्वतः जेव्हा काम करतो, तेव्हा आपण नोकरासारखं काम करतो की मालकासारखं? नोकराच्या वृत्तीने काम करतो की मालकीच्या वृत्तीने? “मला काय मिळणार?” या प्रश्नाने काम सुरू करतो की “हे काम माझ्याकडून सर्वोत्तम कसं होईल?” या प्रश्नाने?
भगवद्गीतेतील आजचा श्लोक नेमका याच प्रश्नाचं उत्तर देतो—
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय ।
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥
श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात—“हे धनंजया, बुद्धियोगाच्या तुलनेत फळाच्या अपेक्षेने केलेले कर्म अत्यंत कनिष्ठ आहे. म्हणून तू बुद्धीचा, समत्वबुद्धीचा आश्रय घे. कारण जे लोक कर्माच्या फळालाच आपल्या कर्माचं कारण बनवतात, ते कृपण आहेत.”
“दूरेण ह्यवरं कर्म” म्हणजे बुद्धियोगाच्या तुलनेत फळाच्या अपेक्षेने केलेलं कर्म अत्यंत कनिष्ठ आहे. इथे कर्म नाकारलेलं नाही; उलट कर्म कसं करावं, हे सांगितलं आहे. कर्म करायचं आहे, पण कर्मामागची वृत्ती बदलायची आहे. “बुद्धियोगाद्” म्हणजे समत्वबुद्धीने, स्थिर आणि संतुलित बुद्धीने कर्म करणं. आपण यापूर्वी पाहिलं—“समत्वं योग उच्यते”—सुख-दुःख, लाभ-हानी, जय-पराजय यांच्या पलीकडे जाऊन समत्वबुद्धीने कर्म करणं हाच योग आहे.
म्हणून श्रीकृष्ण सांगतात—“बुद्धौ शरणमन्विच्छ”—तू या समत्वबुद्धीचाच आश्रय घे. तुझं मन फळाच्या हिशोबात अडकवू नकोस. “मला काय मिळणार?” या प्रश्नापेक्षा “माझ्याकडून काय उत्तम होऊ शकतं?” हा प्रश्न महत्त्वाचा आहे. परिणामाची चिंता करण्यापेक्षा कर्माची गुणवत्ता वाढव. फळावर अधिकार नसला, तरी कर्माच्या गुणवत्तेवर आपला अधिकार आहे.
आणि म्हणूनच पुढचा शब्द फार महत्त्वाचा आहे—“कृपणाः फलहेतवः।” फळाची इच्छा ठेवून कर्म करणारे कृपण आहेत. कृपण म्हणजे केवळ पैशाच्या बाबतीत कंजूष नव्हे. ज्याच्याकडे अफाट अंतःशक्ती आहे, पण तो स्वतःला केवळ फळाच्या अपेक्षेपुरतं मर्यादित करून घेतो, तो खरा कृपण. माणसामध्ये किती मोठी शक्ती आहे! पण “मला काय मिळेल?” या छोट्याशा हिशोबात जर ती शक्ती अडकली, तर माणूस स्वतःच्या सामर्थ्यालाच कमी करून घेतो.
भारतीय तत्त्वज्ञान माणसाकडे अत्यंत मोठ्या दृष्टीने पाहतं. “शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्राः”—हे अमृताच्या पुत्रांनो, असा उपनिषदांचा उदात्त पुकार आहे. आपण केवळ दुर्बल, असहाय्य, परिस्थितीचे बळी नाही. आपल्या आत अफाट सामर्थ्य आहे. मग जर आपण स्वतःला अमृताचे पुत्र मानत असू, ईश्वराशी आपलं नातं मानत असू, तर आपल्या कर्मामध्येही त्या भावनेचं प्रतिबिंब दिसायला नको का? आपलं कामही त्या भावनेने झालं पाहिजे—हे माझं काम आहे, हे ईश्वराला अर्पण केलेलं काम आहे आणि ते माझ्याकडून सर्वोत्तम झालंच पाहिजे.
म्हणून भारतीय संस्कृतीने केवळ माणसाच्या माणूसपणाचा गौरव केलेला नाही; तर माणसाने काम कसं करावं, याचाही गौरव केला आहे. काम कोणतंही असो—मोठं किंवा छोटं, प्रसिद्ध किंवा अप्रसिद्ध, प्रतिष्ठेचं किंवा साधं—ते जर कौशल्याने, उत्तमतेने, एकाग्रतेने आणि प्रेमाने केलं, तर ते कर्म माणसाला मोठं करतं. काम उत्तम होऊ लागलं, की माणसातही उत्तमता निर्माण होते. कामात कौशल्य आलं, की माणूस कुशल होतो. कामात प्रेम आलं, की माणूस विस्तारित मनाचा होतो. आणि कामात मालकीची वृत्ती आली, की माणूस आपल्या जीवनाचा निर्माता बनतो.
याच्या उलट जो सतत फळाचा हिशोब ठेवतो, प्रत्येक कृतीमागे “मला काय मिळणार?” हा प्रश्न ठेवतो, तो हळूहळू आपल्या स्वतःच्या शक्तीचा गुलाम बनतो. त्याचं कर्म त्याला मुक्त करत नाही; उलट बांधून ठेवतं. म्हणूनच गीता आपल्याला कर्म सोडायला सांगत नाही. ती सांगते—कर्म करण्याची वृत्ती बदला. नोकराच्या मानसिकतेतून कर्म करू नका; मालकीच्या वृत्तीने कर्म करा.
कारण शेवटी प्रश्न हा नाही की आपण किती काम केलं. प्रश्न हा आहे की आपण ते काम कोणत्या भावनेने केलं? केवळ मोबदल्यासाठी, की उत्तमतेसाठी? केवळ परिणामासाठी, की कर्माच्या आनंदासाठी? केवळ जगण्यासाठी, की स्वतःला घडवण्यासाठी?
आपल्या सर्वांचा प्रयत्न हा असायला हवा—आपण आपल्या कर्माचे मालक व्हावं. “मला काय मिळणार?” या प्रश्नातून बाहेर पडून “मी काय उत्तम देऊ शकतो?” या प्रश्नाकडे वळावं. कारण फळाच्या मागे धावणारा माणूस फळाचा याचक होतो; पण कर्मामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देणारा माणूस कर्माचा मालक होतो.
आणि म्हणूनच श्रीकृष्णांचा आजचा संदेश पुन्हा एकदा आपल्या मनात खोलवर रुजवूया—
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय ।
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥
फळाचा याचक होऊ नका; आपल्या कर्माचे मालक व्हा.
विवेकापासून समत्वापर्यंत : योगः कर्मसु कौशलम्
श्रीमद् भगवद्गीता अध्याय दुसरा सांख्य योग
भाग ६९
नमस्कार
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते । तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥
अर्थ : समत्वबुद्धीने युक्त झालेला मनुष्य या जीवनातच पुण्य आणि पाप—दोन्हींचा त्याग करतो. म्हणून तू योगासाठी स्वतःला जोडून घे. कारण कर्मामध्ये कौशल्य असणे, म्हणजेच योग होय.
अप्रतिम असा हा श्लोक आहे. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या श्लोकाचा—म्हणजे कर्म कसे करायचे, हा श्लोक कसा जगायचा, याचा मार्ग या श्लोकातून सांगितलेला आहे. भगवद्गीता फार सुंदर पद्धतीने याचे विवेचन करते. या श्लोकामध्ये जी ‘बुद्धी’ आलेली आहे, ती केवळ हुशारी किंवा बुद्धिमत्ता या अर्थाने आलेली नाही, तर एका वेगळ्या आणि अधिक व्यापक अर्थाने आलेली आहे.
याच्या आधी आपण जरासे पाहिले, तर मनाला नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वप्रथम विवेकाची गरज असते. मन हे आपल्या उन्नतीचे साधन आहे. ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ असे आपण म्हणतो. पण त्या मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी आणि योग्य दिशेने नेण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते. मनाला नियंत्रित ठेवण्यासाठी पहिल्यांदा लागतो तो विवेक. हा विवेक अनुभवातून येतो, ज्ञानातून येतो, ज्येष्ठांच्या सांगण्यातून येतो, समजून घेण्यातून येतो. योग्य काय आणि अयोग्य काय, हिताचे काय आणि अहिताचे काय, फायद्याचे काय आणि तोट्याचे काय, सुखाचे काय आणि दुःखाचे काय, याचा विचार करण्याची क्षमता म्हणजे विवेक.
विवेक जागा झाल्यानंतर येते ती निश्चयात्मक बुद्धी. भगवद्गीतेमध्ये तिला ‘व्यवसायात्मिका बुद्धी’ असे म्हटले आहे. म्हणजे निश्चय करणे. ‘मला पाप-पुण्य, सुख-दुःख यांच्यामधले चांगलेच घ्यायचे आहे,’ असा निश्चय करणे आणि मग नीतीने, इथिक्सने वागायला लागणे. व्यवसायात्मिका बुद्धी आपल्याला त्या मार्गावर स्थिर करते. मात्र तरीही मनामध्ये एक द्वैत निर्माण होत राहते. मनासारखे घडले तर आनंद आणि मनासारखे घडले नाही तर दुःख; फायदा झाला तर आनंद आणि तोटा झाला तर दुःख. आपण जे ठरवले ते झाले नाही, जो संकल्प केला तो पूर्ण झाला नाही, तरी मन अस्वस्थ होते.
म्हणून आता या सुख-दुःखाच्या, पाप-पुण्याच्या पलीकडे जायचे आहे आणि समत्व ठेवायचे आहे. काहीही झाले—मनासारखे झाले किंवा मनासारखे झाले नाही, जे ठरवले ते ठरले नाही, जो संकल्प केला तो झाला नाही—तरीही करत राहायचे. ही निश्चयात्मक बुद्धीची थोडी वरची पायरी आहे. पुढे पुढे तर फायदा-तोट्याचा विचार न करता मस्त करत राहणे आणि ते करणेच एन्जॉय करायचे. त्याला म्हणायची ही समत्व बुद्धी. फायदा-तोट्याचा, फळाचा, आउटकमचा विचार न करता प्रोसेस एन्जॉय करणे, त्याला म्हणतात समत्व बुद्धी.
अशा समत्व बुद्धीने ज्यावेळी आपण काम करायला लागतो, तेव्हा त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आपण जो योग वापरतो, म्हणजे आपल्या सैरभैर मनाला समत्वाच्या स्थितीत नेण्यासाठी जो मार्ग स्वीकारतो, त्या कौशल्यपूर्वक जोडण्याच्या प्रक्रियेला योग म्हणतात. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात—‘योगः कर्मसु कौशलम्।’ सैरभैर मनाने केलेले काम आणि समत्व बुद्धीने केलेले काम यांच्यामध्ये मोठा फरक आहे. सैरभैर मनाने काम करणाऱ्या माणसाला समत्व बुद्धीने काम करणाऱ्या अवस्थेशी जोडणे, ही जोडण्याची प्रक्रिया म्हणजे योग आणि ते कौशल्य आपल्यामध्ये विकसित करणे म्हणजेच ‘योगः कर्मसु कौशलम्’.
हा विचार माझ्या आयुष्यात कसा आला, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षी असताना मी ‘अग्निपथ’ हा चित्रपट पाहिला. अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती आणि त्यात मिथुन चक्रवर्तीने केलेली ‘नारियल पाणीवाला’ची भूमिका मला फार आवडली होती. त्याचे रूप, दिसणे आणि भांग पाडण्याची पद्धत मला खूपच आवडली. मग तसे दिसण्यासाठी काय करायचे, तर सकाळी उठल्यावर इंजिनिअरिंगच्या हॉस्टेलच्या बाथरूममधल्या शॉवरखाली जायचे, डोक्यावरून थंड पाणी घ्यायचे आणि तसेच चिप्प डोके घेऊन कॉलेजला जायचे, कारण केस तसे दाबून बसायचे.
हॉस्टेलमध्ये सिमेंटच्या टाक्या होत्या आणि त्यात थंड पाणी असायचे. त्याने व्हायचा तो परिणाम झाला. मला पहिल्यांदा सायनसचा त्रास सुरू झाला. दीडशे-दोनशे शिंका यायच्या आणि रात्र-रात्र जागावे लागायचे. पुढे इंजिनिअरिंगचा अभ्यासही मी रात्रीच करायचो. त्यामुळे निशाचरच झालो होतो. रात्री जागणे, दिवसा झोपणे आणि अशी अनियमित जीवनशैली सुरू झाली. विवेकानंद केंद्रात गेल्यानंतर काही काळ हे थोडेफार सुधारले; पण ज्यावेळी इंटरनेट आले, त्यावेळी स्वस्त इंटरनेट रात्री दहानंतर मिळायचे. माझे बरेचसे मित्र अमेरिकेत होते. त्यामुळे त्यांच्यासाठी तो दिवस असायचा आणि मग त्यांच्याशी गप्पा मारणे, चॅटिंग करणे सुरू झाले. पुन्हा रात्री जागणे आणि सकाळी उशिरापर्यंत उठणे सुरू झाले. त्यातून पित्त वाढायला लागले, पोटामध्ये त्रास निर्माण झाला. सर्दी तर होतीच, त्यात पित्ताचा त्रास आणि रात्रीचे जागरण असे सगळे सुरू झाले.
यातून प्रयत्नपूर्वक बाहेर पडायचे होते. हे सगळे सुरू असतानाच मनामध्ये एक द्वैत निर्माण झाले होते—ज्ञानप्रबोधिनीचे काम आपल्याला करायचे आहे, ते लग्न करून करायचे की लग्न न करता करायचे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अरविंदांचा अभ्यास सुरू केला. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. आधीच शिंका, त्यात ॲसिडिटी, त्यात पुन्हा रात्री जागणे आणि त्यावर अरविंदांचा अवघड अभ्यास. त्याचा दणका बसला आणि एका संध्याकाळी सगळेच फिरल्यासारखे वाटायला लागले. प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यात ब्लड प्रेशर असल्याचे लक्षात आले.
ब्लड प्रेशर असल्याचे कळल्यानंतर ‘आपल्यालाच का ब्लड प्रेशर झाले आहे? आपण एवढे सामाजिक काम करतो, मस्त काम करतो, मग आपल्याला ब्लड प्रेशर कशामुळे झाले? असे ब्लड प्रेशर होणे शक्यच नाही,’ हे स्वीकारायलाच मी तयार नव्हतो. ॲक्सेप्टन्सच नव्हते. मग ब्लड प्रेशरच्या गोळ्या घ्यायच्या नाहीत, असंच जगायचं, असा हट्ट सुरू झाला. त्यातून ब्लड प्रेशर सारखे कमी-जास्त होऊ लागले आणि त्यातून अँक्झायटी निर्माण झाली. डॉक्टरांनी ब्लड प्रेशर कमी-जास्त होण्याचे कारण सांगताना स्पष्ट केले की माझी लाइफस्टाइल इर्रेग्युलर आहे. डॉक्टर सगळे सांगत होते की दिनचर्या नीट कर; पण आम्हाला झोपच लागेना. रात्री दहा वाजता झोपायला जायचो, तळमळत पडून राहायचो आणि कधीतरी रात्री बारा, एक, दोन, तीन वाजता झोप लागायची. सकाळी उठणे अवघड व्हायचे; उठावेसेच वाटायचे नाही.
आज मागे वळून पाहताना लक्षात येते की आपण आपल्या मनाचे चोचले पुरवत होतो आणि मनाला चुकीच्या दिशेने नेऊ देत होतो. हे मन आपल्या शरीरालाही खेचते. ‘नारियल पाणीवाला’सारखे दिसायचे म्हणून शरीराला थंड पाण्याखाली उभे करणे असो, इंटरनेट स्वस्त मिळते म्हणून रात्री जागणे असो किंवा मित्रांशी बोलण्याची इच्छा म्हणून झोपेचा त्याग करणे असो—हे सगळे करताना माझे मन माझ्या शरीराला खेचत होते. मन असेच असते. ते तुम्हाला खेचते, तुमच्या शरीराला खेचते.
झोप लागत नाही म्हटल्यावर मन पुन्हा अस्वस्थ व्हायला लागले, अँक्शस व्हायला लागले. ती अँक्शस अवस्था इतकी टोकाला गेली की झोप लागेनाशी झाली. असे करत करत जवळपास तीन दिवस सलग झोप आली नाही. परिणाम काय झाला? पॅनिक अटॅक आला. त्या वेळी गीतेमध्ये अर्जुनाने सांगितलेली अवस्था आठवते—‘सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति। वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते॥’ विषादामध्ये अर्जुनाने वर्णन केलेल्या ज्या शारीरिक आणि मानसिक अवस्था आहेत, त्यातील अनेक अवस्था त्या पॅनिक अटॅकच्या आणि त्यानंतरच्या काळात मी प्रत्यक्ष अनुभवल्या.
आता यातून बाहेर पडायचे होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती—दिनचर्या नियमित करायची आणि सकाळी उठायचे.
सकाळी उठून चालणे ही शरीर आणि मनासाठी अत्यंत उपयुक्त कृती आहे. पण सकाळी चालण्याची इच्छाच होत नव्हती. एक तर शरीराची अस्वस्थता, मनाची अस्वस्थता, त्यात औषधे आणि जवळपास ९५ किलोचा देह. त्या देहामध्ये भरलेला प्रचंड तमोगुण आणि आतापर्यंत मनासारखे जगण्याची सवय. मनासारखे जगणे म्हणजे अनेकदा मन चुकीच्या गोष्टींमधून आपल्याला जगवत असते. आपल्यासाठी चांगले काय आणि वाईट काय, याचा विचार न करता मनासारखे जगत राहिलो, तर त्यातून शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. मनाला आवडणाऱ्या गोष्टींसाठी शरीराला सतत खेचले, तर शरीरावर त्याचा परिणाम होतो. मन अस्वस्थ झाले की त्या अस्वस्थतेमुळे मन आणखी अस्वस्थ होत राहते. हे एक vicious cycle बनते.
मला याच्यातून बाहेर यायचे होते. इतक्या गोळ्या आणि त्या सगळ्या अनुभवांचा वाईट परिणाम मला झालेला होता की आता सकाळी उठणे क्रमप्राप्त झाले होते. त्याचबरोबर माझे मनही अनुभवातून शिकले होते. माझ्या बुद्धीने सगळ्याचे विश्लेषण केले आणि ‘हेच तुझे कारण आहे’ हे डोक्यात पक्के झाले. माझ्यामधला विवेक जागा झाला. मी विचार करायला लागलो—माझ्यासाठी चांगले काय आणि वाईट काय? माझ्यासाठी हिताचे काय आणि अहिताचे काय? ही विवेकाची अवस्था होती.
त्यानंतर त्याच्यापुढे जाऊन मी निश्चय केला—काहीही झाले तरी सकाळी उठायचे. किती वाजता झोपलो तरी सकाळी पाच-सहा वाजता उठायचे आणि उठायचेच. त्यानंतर मैदानावर जायचे म्हणजे जायचेच. हा निश्चय मी पाळायला लागलो. ही होती निश्चयात्मक बुद्धी. विवेकानंतर आली व्यवसायात्मिका बुद्धी किंवा निश्चयात्मक बुद्धी. सलग हे करायला लागलो आणि हळूहळू दहा हजार पावले चालणे कंपल्सरी केले. सुरुवातीला खूप अवघड जायचे. पहिला राउंड मारतानाच अवघड जायचे. पण हळूहळू माझी निश्चयात्मक बुद्धी, व्यवसायात्मिका बुद्धी स्थिर होऊ लागली.
सकाळी उठण्याची इच्छा नसतानाही मी उठायला लागलो, कारण माझ्यासाठी ते हिताचे होते, श्रेयस्कर होते. झोप येणे माझ्यासाठी प्रेयस्कर होते. आपल्या मनाचे ऐकणे म्हणजे प्रेयस आणि आपल्या बुद्धीचे ऐकणे म्हणजे श्रेयस. अर्थात बुद्धीही शुद्ध बुद्धी असली पाहिजे. कधी कधी माझी बुद्धीही मनाचा कौल घ्यायची आणि मग ती निश्चयात्मक बुद्धी थांबायची. परंतु हळूहळू माझी निश्चयात्मक बुद्धी स्थिर झाली. गुलाबी झोपेचा त्याग करून निवांत झोपण्यापेक्षा मैदानावर जाऊन शरीराला ताण देणे ही खरोखरच अवघड गोष्ट आहे. गुलाबी झोपेचा त्याग हा सर्वात मोठा त्याग आहे, असे मला कधी कधी वाटते.
पण त्या व्यवसायात्मिका, निश्चयात्मक बुद्धीच्या आधारे मी मनाला नियंत्रणात आणायला लागलो. उठायला लागलो, दहा हजार पावले चालायला लागलो. त्या निश्चयात्मक बुद्धीच्या माध्यमातून हळूहळू मैदानावर स्थिर व्हायला लागलो, फिरायला लागलो. सकाळी उठण्याची सवय लागल्यानंतर जवळपास एक महिन्याने मला जाणवायला लागले की माझ्यामध्ये स्थिरता येत आहे. माझ्या जगण्याला एक रिदम येत आहे. चालतानाही सुरुवातीला अवघड जायचे; पण हळूहळू हळूहळू मला चालणे आवडायला लागले.
या चालण्याबरोबरच माझ्या सगळ्या मित्रांची मला खूप साथ होती. त्यांच्याबरोबर मजा करत, मस्तीत आणि छान छान गोष्टी ऐकत चालत राहिलो. सुरुवातीला मी नुसते ऐकायचो. लोकांच्या आयुष्यातले प्रश्न ऐकायचो, त्यांचे दुःख ऐकायचो आणि मग माझी त्यांच्याशी तुलना करायचो. मला जाणवायचे—‘अरे, यांचे दुःख तर आणखी अवघड आहे. आपले दुःख त्यांच्यापेक्षा कमी आहे. आपण यावर मात करू शकतो.’
सहा-सात महिन्यांनंतर मला पहिल्यांदा लक्षात आले की माझे वजन कमी होत आहे, माझी दिनचर्या नीट होत आहे आणि हळूहळू माझे ब्लड प्रेशर सामान्य होत आहे. ब्लड प्रेशरची एक गोळी बंद झाली. कोलेस्ट्रॉल कमी व्हायला लागले आणि कोलेस्ट्रॉलची एक गोळी कमी झाली. माझे वजनही कमी झाले. मला छान वाटायला लागले. काहीतरी मिळाल्यासारखे वाटायला लागले.
मला सकाळी उठता येते आहे, हेच लक्षात येणे माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. औषधांमुळे शांत झोप लागायला लागली, पण झोपेची गुणवत्ता बदलत गेली. मला अधिक श्रेयस्कर गोष्टी कळायला लागल्या आणि मी अधिक चांगल्या गोष्टी करायला लागलो. गुलाबी झोपेबद्दल मनाची जी ओढ होती, ती हळूहळू तुटायला लागली.
परिणाम व्हायचा तोच झाला. वर्षभरामध्ये मला माझ्यामध्ये प्रचंड परिवर्तन दिसायला लागले. मनाचा अट्टाहास हळूहळू गळून पडायला लागला आणि शरीर पूर्ववत होऊ लागले. आपल्या शरीरामध्ये अशी एक जबरदस्त ताकद आहे की ती शरीराला पुन्हा उभे करण्याचे काम करते, याचा अनुभव मला आला. आता माझ्या बाबतीत बरोबर घड्याळात वेळ झाल्यावर, साधारण चार-पाच तासांच्या गाढ झोपेनंतर सहज जाग येते.
गीतेचा अभ्यास पूर्ण झाला की मनाची एक विशिष्ट अवस्था निर्माण होते. त्यानंतर ज्ञानप्रबोधिनीची उपासना होते आणि त्याने मनाची आणखी प्रसन्न अवस्था निर्माण होते. मग मैदानावर गेल्यानंतर शरीराला ताण देत, चालत, स्वतःमधील ऊर्जा वाढवत आणि मित्रांच्या सहवासात राहिल्यानंतर एकदम मस्त बहार अवस्था निर्माण होते. ती बहार अवस्था दिवसभर टिकते.
आता इतके सहज झाले आहे की दिवसभरात काही चांगले व्हावे, वाईट व्हावे, असे व्हावे किंवा तसे व्हावे, याचा फारसा विचार मनात येत नाही. जे होईल ते होईल. मस्त जगायचे, मस्त करायचे आणि जे काम करू ते मस्त करायचे. त्याचा फायदा-तोटा काय होईल, हा विचार हळूहळू समूळ गळून गेला. त्यातून लाभ-हानी काय होईल, हे सोडून दिले. त्यातून पाप-पुण्य काय होईल, हेही सोडून दिले. कारण त्या सगळ्या आउटकमपेक्षा ही प्रोसेस किती सुंदर आहे, हे जाणवायला लागले. हे जगणे किती सुंदर आहे, असे वाटायला लागले. काहीतरी मिळवण्यासाठी जगण्यापेक्षा सुंदर जगणे हीच मोठी गिफ्ट आहे, असे वाटायला लागले आणि ते सुंदर जगणे अधिक मस्तीत करायचे, हा विचार मनात रुजला.
म्हणूनच पुन्हा एकदा हा श्लोक समोर उभा राहतो—
‘बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते। तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्॥’
कृष्णाने सरळ आदेश दिलेला आहे—‘तस्माद्योगाय युज्यस्व।’ म्हणून योगासाठी स्वतःला जोडून घे. आणि तो कृष्णाचा आदेश मी माझ्या आयुष्यात पाळला. आता खूप काही छान जमत आहे. हा श्लोक माझ्या आयुष्यातला अतिशय मार्गदर्शक श्लोक राहिला आहे. कर्मयोग समजून घेण्यासाठीच नव्हे, तर कर्मयोग जगण्यासाठी या श्लोकाचा मला उपयोग झाला.
विवेकाने मला योग्य काय ते दाखवले. निश्चयात्मक बुद्धीने योग्य ते करण्यासाठी मला उभे केले. आणि हळूहळू समत्व बुद्धीने त्या कर्मामध्येच आनंद शोधायला शिकवले. फळ काय मिळेल, लाभ किती होईल, तोटा किती होईल, यश मिळेल की अपयश येईल, याचा विचार न करता आपण जे करतो ते कौशल्यपूर्वक, आनंदाने आणि समत्वाने करत राहणे—यालाच श्रीकृष्ण ‘योगः कर्मसु कौशलम्’ म्हणतात.
आणि म्हणूनच हा श्लोक माझ्यासाठी केवळ गीतेतील एक श्लोक राहिलेला नाही; तो जगण्याची एक पद्धत बनला आहे.
गीता सर्वदूर नेऊ 🙏😄
प्रसाद चिक्षे
8208438600
विवेकबुद्धीपासून अनामय अवस्थेपर्यंत : काय मागायचं आणि काय करायचं?
श्रीमद् भगवद्गीता — अध्याय दुसरा : सांख्ययोग
भाग ७०
दिनांक : ८ सप्टेंबर २०२६
नमस्कार!
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥
अर्थ : समत्वबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी पुरुष कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाची आसक्ती सोडून देतात. त्यामुळे ते जन्मबंधनातून सर्व बाजूंनी मुक्त होऊन, सर्व विकार आणि दुःखांपासून विरहित अशा परम पदाला प्राप्त होतात—अनामयम्.
बऱ्याच वेळा मी शांत बसलेलो असताना स्वतःला एक प्रश्न विचारतो—समजा, ईश्वर आत्ता माझ्यासमोर आला आणि त्याने विचारलं, “तुला काय हवं आहे?” तर मी त्याच्याकडे काय मागेन? कधी कधी मी स्वतःशीच एक प्रयोग करतो. समजा, ईश्वराचा निरोप आला की, “तुला माझ्याकडून जे काही हवं आहे ते लिहून दे,” तर मी त्या यादीमध्ये नेमकं काय लिहीन? आपण प्रत्येकाने हा प्रयोग कधीतरी करून पाहायला हवा.
मी अनेक लोकांना हा प्रश्न विचारला. प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी होती. आणि मग मला माझ्या स्वतःच्या आयुष्याकडे मागे वळून पाहावंसं वाटलं—मी आजपर्यंत देवाकडे काय काय मागत आलो आहे?
दररोज घरातल्या देवाच्या पाया पडतो. लहानपणापासून घराजवळच्या मंदिरात जात आलो आहे. आता वयाची छप्पन्न वर्षं झाली. या प्रदीर्घ काळात देवाकडे केलेल्या माझ्या मागण्यांचा विचार केला, तर त्या मागण्यांमध्ये माझ्या बुद्धीचा, वयाचा आणि जीवनानुभवाचा प्रवास स्पष्ट दिसतो.
लहानपणीच्या माझ्या मागण्या अगदी निरागस होत्या. देवाला मी विटीदांडू खेळण्यासाठी विटीदांडू मिळू दे, असं मागितलं आहे. गोट्यांच्या खेळात मी जिंकू दे, अशी प्रार्थना केली आहे. होमवर्क करून झाल्यावर दुसऱ्या दिवशी सरांनी शाळेत येऊ नये किंवा ते आजारी पडावेत, अशीही बालिश मागणी कधीतरी केली आहे! सातवीत असताना ब्रूस लीचं कराटेचं पुस्तक परभणीच्या बुकस्टॉलवर पाहिलं होतं. आम्ही शेगावला चाललो होतो आणि ते पुस्तक मला मिळावं, अशी मागणीही महाराजांकडे केली होती. पेपर सोपा जाऊ दे, परीक्षेत चांगले मार्क मिळू देत, अशा मागण्याही होत्याच.
ही होती बालबुद्धीची मागणी—मला जे हवं आहे ते मिळावं आणि तेही शक्यतो विनासायास मिळावं.
थोडं मोठं झालो, तारुण्यात आलो आणि मागण्यांचं स्वरूप बदललं. त्या जुन्या मागण्या संपल्या नाहीत; पण त्यामध्ये आणखी काही गोष्टींची भर पडली. एखादी मुलगी आवडायला लागली, की ती मला भेटावी, तिने माझ्याशी बोलावं, माझ्याशी गप्पा माराव्यात आणि तिला मी आवडावं, अशाही मागण्या देवाकडे केल्या.
म्हणजेच वय वाढत गेलं, तशा इच्छा बदलत गेल्या; पण देवाकडे मागण्याची वृत्ती तशीच राहिली.
पुढे सामाजिक कामात आलो. अण्णांबरोबर आळंदीला जाणं झालं. तिथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा परिचय झाला. आणि हळूहळू जाणवायला लागलं की ईश्वराकडे मागायचं म्हणजे केवळ आपल्या छोट्या-छोट्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी मागायचं नसतं.
लहानपणी आरत्या, स्तोत्रं म्हणताना आपण काय मागतो, याचा विचारही केलेला नसायचा. हनुमान स्तोत्रामध्ये रोग, व्याधी, विकार, वासना आणि भय यांपासून मुक्ती मागितलेली आहे. पण आपण ते म्हणत असतो आणि त्याचा अर्थ मात्र फारसा समजलेला नसतो.
पुढे पसायदान समजायला लागलं आणि जाणवलं—अरे, ईश्वराकडे काहीतरी वेगळंही मागता येतं! फक्त माझ्यासाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी मागता येतं. पुढे विवेकानंद केंद्रात गेल्यावर तिथली प्रार्थना समजून घेतली. ज्ञानप्रबोधिनीच्या प्रार्थनेतील मागण्या समजून घेऊ लागलो. संतांचे विचार, विवेकानंदांचे विचार, गांधीजींचे विचार यांचा अभ्यास करत गेलो आणि मग एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—आपण ईश्वराकडे काय मागतो, यातच आपल्या बुद्धीची उंची दिसते.
बालबुद्धी, तारुण्यबुद्धी, प्रौढबुद्धी आणि त्यापुढे प्रगल्भ बुद्धी—जसा बुद्धीचा स्तर वाढत जातो, तसा आपल्या मागण्यांचाही स्तर बदलत जातो.
म्हणूनच पुढे प्रश्न उभा राहतो—काय मागायचं आणि काय मागायचं नाही, हे कळणं म्हणजे विवेकबुद्धी.
स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील एक प्रसंग याचं सुंदर उदाहरण आहे. रामकृष्ण परमहंसांनी त्यांना सांगितलं की, “देवीकडे जा आणि तुला जे हवं आहे ते माग.” विवेकानंद देवीसमोर गेले; पण त्यांनी धन, संपत्ती, सुखसोयी किंवा लौकिक यश मागितलं नाही. त्यांनी ज्ञान, वैराग्य आणि भक्ती मागितली.
इथेच आपल्या मागण्यांच्या प्रवासाची दिशा बदलते.
मला काय मिळेल, यापेक्षा माझ्यामध्ये काय निर्माण होईल? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. आणि त्याच्याही पुढे—माझं भलं होत असताना इतरांचंही भलं होईल का? हा प्रश्न निर्माण होतो.
कारण माझं एकट्याचं भलं झालं आणि त्यातून दुसऱ्याचं नुकसान झालं, तर ते खरं भलं कसं म्हणायचं?
भगवद्गीतेतील या श्लोकामध्ये अशा अंतिम कल्याणासाठी एक सुंदर शब्द वापरला आहे—‘अनामयम्’.
अनामयम् म्हणजे रोगरहित, विकाररहित, दुःखरहित अशी अवस्था. केवळ शरीराचे रोग नाही, तर मनातील वासना, विकार, दुर्गुण, अस्वस्थता आणि नकारात्मकता यांपासूनही मुक्त झालेली अवस्था. ज्या वेळी चुकीच्या, अयोग्य आणि नकारात्मक गोष्टी हळूहळू दूर होतात आणि आतमध्ये सकारात्मक, शुद्ध आणि निर्मळ गोष्टी उरतात, त्या अवस्थेकडे जाणं म्हणजे अनामयम्.
पण मग प्रश्न असा उभा राहतो की, ही अवस्था प्राप्त करण्यासाठी ईश्वराकडे काय मागायचं?
भगवंत जणू आपल्याला सांगतात—“मी तुला दोन हात दिले, दोन पाय दिले, बुद्धी दिली, मन दिलं, विचार करण्याची शक्ती दिली. तुला माझी परिपूर्ण निर्मिती म्हणून हे जीवन दिलं. आता तू तुझ्या कर्माच्या आधारावर पुढे जा.”
कर्म करण्यासाठी आपल्याला सतत एखादं फळ डोळ्यासमोर ठेवण्याची गरज नाही. कारण कर्म आणि त्याचं फळ यांचा कार्यकारणभाव आहे. आपण जे करतो त्याचा परिणाम होणारच आहे. चांगल्या पद्धतीने, शुद्ध भावनेने, कौशल्याने आणि प्रामाणिकपणे केलेल्या कर्मातून चांगलं फळ निर्माण होण्याची शक्यता अधिक असते.
पण आपली अडचण इथेच सुरू होते. आपण कर्म करण्यापेक्षा कर्माच्या फळाचा विचार जास्त करतो. “हे केलं तर मला काय मिळेल?”, “यातून मला किती फायदा होईल?”, “मला याचा मोबदला काय मिळणार?” हा विचार सतत डोक्यात ठेवून काम केलं, तर कामाच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो. कारण लक्ष कर्मावर राहत नाही; ते फळावर अडकून राहतं.
गीता म्हणूनच सांगते—फळ सोडून दे; कर्म सोडू नकोस.
कर्म न करता काहीतरी मिळवायचं असेल, तर ती वृत्ती भिकाऱ्याची आहे. काहीतरी मिळवण्यासाठी काम करायचं, तर ती नोकराची वृत्ती आहे. आपल्याला हवं तसं काम इतरांकडून करून घ्यायचं, तर ती मालकाची वृत्ती आहे. पण कर्म करताना त्याच्या पलीकडे जाणं, कर्माला केवळ व्यवहार न मानता ते एका मोठ्या उद्देशासाठी करणं—ही वेगळीच अवस्था आहे.
आणि म्हणूनच श्लोकामध्ये पुढचा शब्द येतो—‘मनीषिणः’.
मनीषी म्हणजे केवळ हुशार माणूस नव्हे. ज्याचा स्वतःच्या मनावर ताबा आहे, ज्याच्यामध्ये संयम आहे, ज्याच्यामध्ये विवेक आहे आणि ज्याला आपल्या विचारांची दिशा कळते, तो मनीषी.
असा माणूस फळाचा विचार करत नाही असं नाही; पण फळाच्या विचाराने त्याचं कर्म विचलित होत नाही.
त्याला माहीत असतं की, काम जर कोत्या भावनेने केलं तर कोतं फळ मिळेल. काम जर अहंकाराने केलं, आसक्तीने केलं, तर त्यातून निर्माण होणारं फळही त्याच मर्यादांनी बांधलेलं असेल. पण काम जर भगवंताची पूजा म्हणून केलं, अनासक्त भावाने केलं, अहंकार बाजूला ठेवून केलं, उत्तम कौशल्याने आणि शुद्ध भावनेने केलं, तर त्या कर्माची गुणवत्ता वेगळीच असेल.
म्हणूनच उत्तम फळ मिळवायचं असेल, तर फळाकडे पाहत बसण्यापेक्षा कर्माकडे पूर्ण लक्ष द्यावं लागतं.
यालाच भगवंत ‘बुद्धियुक्त’ म्हणतात—समत्वबुद्धीने युक्त असलेला माणूस.
अशा समत्वबुद्धीच्या माणसाने कर्मफळाची आसक्ती सोडली, की पुढे काय होतं?
“जन्मबन्धविनिर्मुक्ताः”—तो जन्मबंधनातून मुक्त होतो.
जन्म आणि मृत्यू यांचा अर्थ केवळ शरीराचा जन्म आणि शरीराचा मृत्यू एवढाच मर्यादित नाही. आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी आपण उन्नत होत असतो किंवा अधोगतीकडे जात असतो. आपलं अधिक चांगलं, अधिक निर्मळ, अधिक दिव्य रूप जन्माला येणं म्हणजे एक प्रकारचा जन्म; आणि स्वतःला खाईत लोटणं, स्वतःची अधोगती करून घेणं म्हणजे एक प्रकारचा मृत्यू.
हा प्रवास अगदी सापशिडीच्या खेळासारखा आहे—पुढे जातो, मागे येतो; पुन्हा पुढे जातो, पुन्हा मागे येतो. आपल्या इच्छा, आसक्ती, विकार आणि कर्म यांच्या माध्यमातून बंधनं निर्माण होत राहतात.
पण एक वेळ अशी येते की माणूस या चक्रातून वर उठू लागतो. त्याच्यामध्ये एक नवी, अधिक उत्क्रांत अवस्था निर्माण होते. स्वतःचं अस्तित्वच त्याला आनंद देऊ लागतं. “मी काहीतरी मोठ्या दिव्य शक्तीच्या प्रेरणेने काम करतो आहे,” अशी अनुभूती त्याला येते.
ज्यावेळी आपण चांगलं करतो, चांगल्यासाठी करतो आणि चांगल्या उद्देशाने करतो, त्यावेळी आपण त्या ‘पदाला’ पोहोचू लागतो.
“पदं गच्छन्त्यनामयम्”—अशा पदाला तो पोहोचतो, जिथे अनामय अवस्था आहे.
वासना, रोग, व्याधी, विकार, दुर्गुण, अस्वस्थता आणि नकारात्मकता हळूहळू दूर होत जाते. आतमध्ये निर्मळता, समत्व, विवेक, आनंद आणि कर्तृत्वाची अनुभूती उरते.
म्हणून या श्लोकाचा एक अतिशय साधा, पण खोल अर्थ मला असा वाटतो—
ईश्वराकडे भिकाऱ्यासारखं मागत बसू नका; कर्त्यासारखं कर्म करा.
ईश्वराने आपल्याला जे काही दिलं आहे, त्याचा योग्य उपयोग करा. काय मिळणार याचा विचार करत कर्म करू नका; कसं उत्तम कर्म करता येईल, याचा विचार करा. कारण फळ आपल्या हातात नसले, तरी कर्माची गुणवत्ता आपल्या हातात आहे.
आणि कदाचित ईश्वरासमोर उभं राहिल्यावर आपली मागणीही मग बदलते.
“देवा, मला हे दे, ते दे,” याऐवजी—
“देवा, मला अशी बुद्धी दे की काय मागायचं आणि काय मागायचं नाही, हे मला कळेल. मला अशी समत्वबुद्धी दे की फळाच्या आसक्तीशिवाय मी उत्तम कर्म करू शकेन. माझ्या कर्मातून माझंही आणि इतरांचंही कल्याण होईल, अशी शक्ती दे.”
कदाचित हीच प्रगल्भ मागणी.
आणि कदाचित हीच ‘अनामयम्’कडे जाण्याची सुरुवात.
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥
दलदलीतून समृद्धीकडे ...
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ७१ | ९ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
‘गीता कृष्ण सांगतो आहे’ याचा अर्थ केवळ एका ऐतिहासिक व्यक्तीचे बोलणे ऐकणे असा नसून, प्रत्यक्ष 'कृष्ण' या तत्त्वाच्या माध्यमातून मानवी चेतनेला मिळालेले ते सर्वोच्च, वैश्विक ज्ञान आहे.
हे केवळ पुस्तकी शब्द नाहीत; तर हजारो वर्षांच्या प्रदीर्घ भारतीय चिंतनाने आणि संस्कृतीने मानवी क्षमतेचा, अंतर्मनाचा आणि त्याच्या घडणीचा केलेला अत्यंत सखोल, शास्त्रशुद्ध अभ्यास आहे. अनेक ऋषी-मुनींनी, तत्त्वचिंतकांनी कठोर तपस्या, साधना आणि आत्मचिंतन करून माणसाच्या आतील सुप्त शक्तीला जागृत करणारी ही जीवनवाट शोधून काढली आहे. त्याच सनातन सत्याला गीतेमध्ये श्रीकृष्णाची वाणी प्राप्त झाली आहे.
जेव्हा एखादा व्यक्ती या वाटेवर निष्ठापूर्वक चालू लागतो, तेव्हा जीवनातील चिंता, अस्वस्थता, विकार, व्यसने आणि ‘मी-माझे’ या संकुचित देहभावाची जळमटे आपोआप गळून पडतात. या प्रवासात बाह्य प्रलोभने फिकी वाटू लागतात आणि स्वतःच्या आत दडलेल्या अथांग आत्मिक बळाची, एका अढळ आंतरिक सामर्थ्याची खरी प्रचीती येऊ लागते.
कधी आपल्याला एखाद्या गोष्टीतून बाहेरच पडता येत नाही, असं झालंय का? कधी आपण एखाद्या परिस्थितीत इतके अडकल्यासारखे झालो आहोत का, की त्यातून मोकळं व्हायचं असूनही मोकळं होता येत नाही? उलट, जितका बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, तितकेच आणखी आत रुतत जातोय, असं कधी जाणवलंय का?
असं अडकणं दोन प्रकारे होतं—एक परिस्थितीमुळे आणि दुसरं स्वतःमुळे. परिस्थितीमुळे आपण अडकलो, तर परिस्थिती बदलली की त्यातून बाहेर पडण्याची शक्यता असते. पण जेव्हा आपण स्वतःमुळेच अडकतो, तेव्हा मात्र बाहेर पडणं फार कठीण होतं. कधीतरी शांतपणे स्वतःला विचारून पाहूया—आपण स्वतःच एखाद्या दलदलीत अडकलो आहोत का? अशी कोणती गोष्ट आहे, जिच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे; पण आपण पडतोय, रुततोय आणि तरीही बाहेर पडता येत नाहीये? माझ्या आयुष्यात असे दोन प्रसंग आलेले आहेत.
पण या दलदलीचा अर्थ नेहमी भौतिक नसतो. माणसाचं शरीर प्रत्यक्ष दलदलीत अडकणं क्वचित घडतं; पण मन आणि बुद्धी मात्र रोजच्या जीवनात अनेकदा दलदलीत अडकतात. मन अडलं असेल, तर बुद्धी त्याला बाहेर काढू शकते. पण प्रश्न असा आहे—खुद्द बुद्धीच जर दलदलीत अडकली तर? मग तिला बाहेर कोण काढणार?
भगवद्गीता याच अवस्थेकडे अतिशय सूक्ष्मपणे पाहते. ही दलदल निर्माण होते ती मोहामुळे. मोहातून आसक्ती निर्माण होते. आसक्तीतून वासना निर्माण होतात. वासनांमधून विकार निर्माण होतात आणि त्यातून जन्माला येते ती अत्यंत धोकादायक भावना—‘मी’ आणि ‘माझे’.
यापेक्षाही पुढची अवस्था अधिक धोकादायक असते. आपण चुकीचे आहोत हे कुठेतरी आतून माहीत असूनही, आपली बुद्धी त्या चुकीचं समर्थन करू लागते. “मी चुकीचा नाही”, “माझी परिस्थितीच अशी होती”, “माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता”, “मी जे केलं ते योग्यच होतं”—अशा प्रकारे बुद्धी सत्य शोधण्याऐवजी आपल्या मोहाचं समर्थन शोधू लागते. हीच मोहाची दलदल!
म्हणूनच माणसाचा सर्वांत मोठा शत्रू बाहेर नसतो. अनेकदा तो त्याच्या स्वतःच्या विचारांमध्ये, स्वतःच्या समजुतींमध्ये आणि स्वतःच्या चुकीचं समर्थन करणाऱ्या बुद्धीमध्ये दडलेला असतो. अशा अवस्थेत माणसाचं नैतिक स्खलन सुरू होतं. अहंकार वाढतो, मद चढतो, विकार बळावतात आणि माणूस नकळत स्वतःच्याच दुःखाचं कारण बनतो.
अर्जुनाची अवस्थाही काहीशी अशीच झाली होती. युद्धभूमीवर उभा राहिलेला अर्जुन बाहेरून सामर्थ्यवान होता; पण त्याची बुद्धी मोहाच्या दलदलीत अडकली होती. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात—
यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति ।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥
या श्लोकातील ‘मोहकलिलम्’ हा शब्द अत्यंत सुंदर आहे. ‘कलिल’ म्हणजे दलदल, गोंधळलेली अवस्था, ज्यात माणूस अडकतो. म्हणजे—मोहाच्या दलदलीत अडकलेली बुद्धी. आणि श्रीकृष्ण म्हणतात, “यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति…”—जेव्हा तुझी बुद्धी या मोहाच्या दलदलीतून पार होईल, जेव्हा ती या मोहाच्या पलीकडे जाईल, तेव्हा “तदा गन्तासि निर्वेदम्…”—तू ‘निर्वेद’ अवस्थेला प्राप्त होशील.
इथे ‘निर्वेद’ म्हणजे निराशा नव्हे. उलट, हा एक अत्यंत उन्नत अवस्थेचा शब्द आहे. माणसाला जेव्हा नश्वर, क्षुल्लक आणि बाह्य गोष्टींचं आकर्षण उरत नाही; जेव्हा सतत काहीतरी मिळवण्याची, सिद्ध करण्याची किंवा स्वतःचं समर्थन करण्याची धडपड थांबते; जेव्हा अंतःकरणाला एका प्रकारची तृप्ती प्राप्त होते—तेव्हा तो निर्वेदाकडे जातो. मग त्याला प्रत्येक क्षणी बाहेरून सुख शोधण्याची गरज उरत नाही.
मोहाच्या दलदलीतून बाहेर पडण्याचा हा मार्ग नेमका कोणता? त्याची सुरुवात होते विवेकापासून. विवेक म्हणजे काय शाश्वत आणि काय नश्वर, काय योग्य आणि काय अयोग्य, काय आवश्यक आणि काय अनावश्यक, याचा शांतपणे विचार करण्याची क्षमता. विवेक जागृत झाला की पुढे तयार होते व्यवसायात्मिका बुद्धी—निश्चयात्मक बुद्धी. म्हणजे योग्य काय आहे हे समजल्यावर त्यावर ठामपणे चालण्याची शक्ती. आणि त्यानंतर विकसित होते समत्व बुद्धी. सुख-दुःख, लाभ-हानी, जय-पराजय, मान-अपमान या द्वंद्वांमध्ये मनाचा तोल न ढळू देण्याची क्षमता.
विवेक, निश्चयात्मक बुद्धी आणि समत्व बुद्धी—हीच मोहाच्या दलदलीतून बाहेर पडण्याची वाट आहे. आणि म्हणूनच गीतेचा कर्मयोग केवळ कर्म करण्याची पद्धत नाही; तो बुद्धीच्या शुद्धीकरणाची आणि अंतःकरणाच्या परिवर्तनाची प्रक्रिया आहे. आसक्ती सोडून प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणं, आपल्या कर्तव्यावर प्रामाणिकपणे काम करणं, परिणामांबद्दलची अतिरेकी चिंता सोडणं आणि सुख-दुःखात समत्व राखणं—या सगळ्यांतून माणसाची बुद्धी हळूहळू मोहाच्या दलदलीतून बाहेर येते.
मग श्रीकृष्ण पुढे म्हणतात—“श्रोतव्यस्य श्रुतस्य च.” म्हणजे जे ऐकून झालं आहे आणि जे अजून ऐकायचं आहे, त्या सगळ्या बाह्य आकर्षणांपासूनही एक प्रकारची अलिप्तता निर्माण होते. आपल्या परंपरेमध्ये अनेक कर्मकांडे, पूजाविधी, व्रत-वैकल्यं आणि धार्मिक आचरण यांच्याशी भविष्यातील सुखांची अनेक आमिषं जोडली गेली आहेत. “हे केलंस तर हे मिळेल”, “ही पूजा केलीस तर हे सुख मिळेल”, “हे साध्य केलंस तर भविष्यात तुझं जीवन अधिक चांगलं होईल”—अशा अपेक्षांमध्ये माणूस सतत काहीतरी मिळवण्याच्या प्रयत्नात जगत राहतो.
पण गीता आपल्याला यापेक्षा उंच अवस्थेकडे घेऊन जाते. बाहेरचं मिळवण्यापेक्षा आतलं घडवणं महत्त्वाचं आहे. विकाररहित मन, मोहरहित बुद्धी, स्थिर चित्त, संयमित जीवन आणि समत्वाची अवस्था—ही खरी संपन्नता आहे. आणि या अवस्थेचा अनुभव केवळ ग्रंथ वाचून येत नाही; तो जगावा लागतो.
गीतेचा सखोल अभ्यास करताना मला स्वतःला याचा अनुभव अलीकडे प्रकर्षाने आला. पूर्वी ५०० मीटर चालणंसुद्धा कठीण वाटायचं. पाय दुखायचे, सूज यायची, घशाला कोरड पडायची. रांगेत उभं राहून देवाचं दर्शन घेणंसुद्धा अशक्य वाटायचं. पण अलीकडे लातूरला जाऊन पहाटे चार वाजता उठून गीतेचा अभ्यास केला. शिक्षकांशी आणि विविध घटकांशी संवाद साधला. आजारी स्नेहीजनांची भेट घेतली. त्यानंतर थेट सोलापूरचा प्रवास उभ्याने पूर्ण केला. मित्रांशी प्रदीर्घ चर्चा केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे चार वाजता उठून अभ्यास केला. तुळजापूरला जाऊन दीड तास रांगेत उभं राहून तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर अंबाजोगाईला परतीचा प्रवास केला.
पाठीवर २० किलोची बॅग असूनही आणि सकाळी एकदाच जेवण करूनही ही ऊर्जा टिकून राहिली. माझ्यासाठी हा अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे. पाचशे किलोमीटरचा प्रवास, त्यातील एकशे पंचवीस किलोमीटरचा प्रवास उभ्याने (Standing), पूर्ण दोन दिवसांमध्ये चाळीस किलोमीटर चालणं, सकाळचा थोडा नाश्ता करून फक्त एक वेळेस जेवण करणं, दोन सकाळी पहाटे चार वाजता उठून अभ्यास करणं आणि अनेक लोकांना भेटणं—हे सगळं या प्रवासात झालं.
कारण गीतेचा अभ्यास म्हणजे केवळ श्लोक पाठ करणं नाही. गीतेचा अभ्यास म्हणजे स्वतःच्या शरीराचा,मनाचा आणि बुद्धीचा अभ्यास.
विवेक जागृत झाला की आपण स्वतःकडे पाहू लागतो. निश्चयात्मक बुद्धी विकसित झाली की आपण योग्य गोष्टीवर ठाम राहू लागतो. आणि समत्व बुद्धी विकसित झाली की परिस्थिती आपल्याला हलवण्याची ताकद गमावते. मग हळूहळू आपल्या आतली ऊर्जा मुक्त होऊ लागते. मोह, अस्वस्थता, विकार, व्यसनं, अहंकार, ‘मी-माझं’ या क्षुल्लक गोष्टींची पकड सैल होऊ लागते आणि मग जाणवतं—आपल्यामध्ये आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी अफाट शक्ती दडलेली आहे.
हजारो वर्षांच्या भारतीय चिंतनपरंपरेने माणसाच्या मनाचा, बुद्धीचा आणि अंतःशक्तीचा जो सखोल अभ्यास केला, त्याचं अत्यंत सुंदर आणि शास्त्रशुद्ध रूप भगवद्गीतेमध्ये आपल्याला दिसतं. श्रीकृष्ण अर्जुनाला केवळ युद्ध करण्याची प्रेरणा देत नाहीत; ते त्याला स्वतःच्या मोहावर विजय मिळवण्याची कला शिकवत आहेत. बाहेरच्या शत्रूवर विजय मिळवण्यापूर्वी आतल्या मोहावर विजय मिळवावा लागतो.
म्हणून आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया—मी सध्या कोणत्या दलदलीत अडकलो आहे? कोणती आसक्ती मला सोडवत नाही? कोणता मोह मला योग्य-अयोग्य स्पष्टपणे पाहू देत नाही? कोणत्या चुकीचं समर्थन माझीच बुद्धी माझ्यासाठी करत आहे? आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मी विवेकाने कोणतं पहिलं पाऊल उचलणार आहे?
कारण दलदल कितीही खोल असली, तरी त्यातून बाहेर पडण्याची सुरुवात एका छोट्याशा जागृतीपासून होते. विवेक जागृत करा, निश्चयात्मक बुद्धी घडवा आणि समत्व बुद्धी विकसित करा. मग मोहाची दलदल आपल्याला कायमची गिळून टाकू शकत नाही.
श्रीकृष्णाचं वचन आहे—“यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति…” एक दिवस आपली बुद्धी या मोहाच्या दलदलीच्या पलीकडे जाईल. आणि मग—“तदा गन्तासि निर्वेदं…” आपण एका स्वच्छ, सुंदर, तृप्त आणि उन्नत अवस्थेकडे वाटचाल करू.
हीच गीतेची दिशा आहे. हीच अंतःपरिवर्तनाची वाट आहे. आणि ही वाट प्रत्येक माणसासाठी खुली आहे. आपण फक्त एक पाऊल टाकायचं आहे.
या विचारांचा अभ्यास करा, स्वतःच्या जीवनात प्रयोग करा आणि आपल्या अनुभवांमधून हा संवाद अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. गीता वाचा, गीता समजा आणि गीता जगा.
धन्यवाद.
निश्चला बुद्धी ते योग : गोंधळातून स्पष्टतेकडे
गीता दर्शन : श्रीमद्भगवद्गीता – दुसरा अध्याय, सांख्य योग
भाग ७२ | १० सप्टेंबर २०२६
नमस्कार.
भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक आज आपण समजून घेऊया—
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥
या श्लोकाचा ढोबळ अर्थ घेतला, तर ऐकलेल्या अनेक मतमतांतरांमुळे गोंधळलेली बुद्धी जेव्हा संशयरहित होईल आणि परमात्म्याच्या ठिकाणी अचल व स्थिर होईल, तेव्हा तुला खऱ्या योगाची प्राप्ती होईल. आपण एखादी गोष्ट करायची ठरवतो, तेव्हा त्या विषयाबद्दल ऐकीव अशा अनेक गोष्टी आपल्या कानावर येत असतात. अनेक लोक अनेक मार्ग सांगत असतात. प्रत्येक मार्गामागे काहीतरी विचार, अनुभव किंवा आकर्षण असते. मग प्रश्न पडतो—नेमके कुठल्या मार्गाने जायचे? अशा अनेक मतमतांतरांमुळे गोंधळलेली आणि विचलित झालेली बुद्धी जेव्हा ठाम उभी राहते, स्थिर होते आणि सर्व प्रकारच्या संशयांपासून मुक्त होऊन निश्चल होते, तेव्हा पुढचा प्रवास सुरू होतो.
पहिल्या चरणात श्रीकृष्ण म्हणतात—“श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला।” अनेक शास्त्रवचने, सकाम कर्मकांडे, प्रलोभने, ऐकलेली अनेक परस्परविरोधी मते यांमुळे विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा स्थिर होईल, तेव्हा ती निश्चला होईल. म्हणजेच बाहेरून येणाऱ्या प्रत्येक विचाराबरोबर आपली दिशा बदलणार नाही. प्रत्येक नवीन आकर्षणामुळे आपला मार्ग बदलणार नाही. मनात निर्माण होणाऱ्या प्रत्येक संशयामुळे आपण पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी जाणार नाही. बुद्धी एका योग्य दिशेवर ठामपणे उभी राहील.
दुसरा चरण आहे—“समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि।” ही संशयरहित आणि निश्चल झालेली बुद्धी जेव्हा अंतर्मुख होते आणि एका ठिकाणी अचलपणे स्थिर होते, तेव्हा साधकाला योगाची प्राप्ती होते. केवळ बाह्य गोष्टी टाळून शांत बसणे म्हणजे योग नव्हे; तर अंतर्मन एका योग्य ध्येयाच्या ठिकाणी स्थिर होणे, त्या साधनेशी एकरूप होणे आणि त्यामध्ये अखंड लीन होणे ही योगाकडे जाणारी अवस्था आहे. बुद्धी जेव्हा किंचितही विचलित न होता एका ठिकाणी अचल होते, तेव्हा खऱ्या अर्थाने योगाचा अनुभव सुरू होतो.
जसजसे आपण गीतेच्या अभ्यासात पुढे जातो आहोत, तसतशा तिच्यातील वेगवेगळ्या संकल्पना हळूहळू आपल्यासमोर उलगडत जाताना दिसतात. गीता केवळ ज्ञान सांगत नाही; ती ज्ञान टप्प्याटप्प्याने उलगडत नेते. उपनिषदांमध्ये एखादी संकल्पना एका मंत्रात, एका वाक्यात अत्यंत सूक्ष्मपणे मांडलेली दिसते; परंतु गीतेची पद्धत वेगळी आहे. गीतेमध्ये प्रत्येक गोष्ट अशी हळूहळू अनफोल्ड होत जाते, तिची एकेक बाजू उलगडत जाते आणि शेवटी ती आपल्या जगण्याशी जोडली जाते. त्यामुळे गीतेचा अभ्यास करताना आपल्याला केवळ गीता समजत नाही, तर त्याचबरोबर हळूहळू आपले स्वतःचे स्वरूपही कळत जाते.
गेल्या काही काळापासून आपल्या स्वरूपामधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे बुद्धी, याचे हे अनफोल्डमेंट आपण पाहत आहोत. व्यवसायात्मिका बुद्धी, निश्चयात्मक बुद्धी, समत्वबुद्धी आणि आता निश्चला बुद्धी—या सगळ्या संकल्पना एकमेकांशी जोडलेल्या आहेत. या प्रवासातील हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या टप्प्यापर्यंत पोहोचल्यानंतर आणि हा टप्पा साधता आल्यानंतर माणूस एका विशिष्ट अवस्थेत जातो. त्याला आपली दिशा स्पष्ट होऊ लागते, निर्णयक्षमता वाढते आणि तो आपल्या निवडलेल्या मार्गावर यशस्वीपणे पुढे जाऊ लागतो.
माझ्या स्वतःच्या आयुष्यातील उदाहरण घेतले, तर भगवद्गीतेचा अभ्यास करायचा आहे, असे मला वाटत होते; पण अभ्यास कशाचा करायचा, काय करायचे, कुठून सुरुवात करायची, हा प्रश्न होता. गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यास करण्याची इच्छा होती. सुरुवातीला मनामध्ये आले की आपण स्वामी विवेकानंदांचा आणि श्रीरामकृष्णांचा अभ्यास करू. पुन्हा विचार आला की नाही, आपण उपनिषदांचा अभ्यास करू. त्यानंतर वाटले की उपनिषदांचा अभ्यास करायचा तर ईशावास्योपनिषदाचा अभ्यास करू. मग पुन्हा विचार आला की उपनिषद नको, आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करू. त्यानंतर श्रीअरविंदांचा अभ्यास करण्याचा विचार आला. म्हणजे अभ्यास करायचा होता, ही गोष्ट चांगली आणि निश्चित होती; परंतु कोणता अभ्यास करायचा, हे निश्चित नव्हते. आणि या सगळ्यांमध्ये एक चांगली गोष्ट होती—हे सगळे भारतीय विचारांचेच वेगवेगळे प्रवाह होते.
त्यातच काही मित्र म्हणायचे, “गायत्री पुरश्चरण कर.” काही मित्र म्हणायचे, “ध्यानावर लक्ष केंद्रित कर.” काही जणांनी तर विचारले, “तुला नेमके काय पाहिजे या अभ्यासातून?” काहींनी सांगितले की सिद्धी मिळवायची असेल तर काही पुरश्चरणे केली, महामृत्युंजयाचा जप केला, तर खूप काही होऊ शकते. अशा वेगवेगळ्या प्रकारचे विचार माझ्यासमोर येत होते. एवढी मतमतांतरे, एवढे वेगवेगळे आयाम आणि एवढे पर्याय असताना मी नेमके काय करावे, हा प्रश्न होता. मला सकाळी उठल्यानंतर काहीतरी अभ्यास करायचा होता; पण नेमका कोणता अभ्यास, हे मात्र निश्चित होत नव्हते.
एक दिवस माझे जवळचे स्नेही चारधाम यात्रा करून आले होते. तेव्हा मनात विचार आला—आपल्याला चारधाम करता येतील का? करायचे आहेत का? का करायचे आहेत? असे अनेक प्रश्न आले. विचार करता करता उत्तरही आले—चारधाम केले नाही तरी चालेल. त्यानंतर सोळा संस्कारांचा विचार मनात आला. बहुतांश संस्कार झालेले आहेत; शेवटचा संस्कार जो आहे, तोही एक दिवस होणारच आहे. पण त्या अवस्थेकडे जायचे असेल, तर काय करावे लागेल? तिथून विचार चित्तशुद्धीकडे वळला. हळूहळू असा विचार झाला की वेगवेगळ्या गोष्टी थोड्या थोड्या करण्यापेक्षा आपण प्रस्थानत्रयीचा अभ्यास करूया—उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे.
मग त्यामध्येही विचार केला की सुरुवात कुठून करायची? आणि शेवटी एक गोष्ट पक्की झाली—फक्त भगवद्गीतेचा अभ्यास करूया. भगवद्गीता खूप जवळची होती. ती मला बऱ्यापैकी वाचता येत होती आणि तिचा अभ्यास कसा करायचा, हे समजून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. मागे वळून पाहताना जाणवते की जवळपास एक-दीड वर्ष मी “अभ्यास कोणता करायचा?” या प्रश्नामुळे बऱ्यापैकी गोंधळलेलो होतो. सगळे मार्ग चांगले होते; परंतु कोणता मार्ग निवडायचा हे निश्चित नव्हते. मला मात्र असा अभ्यास हवा होता जो आयुष्यभर माझ्यासोबत राहील. “हे केले, संपले; ते केले, संपले,” असा टप्प्याटप्प्याचा अभ्यास नको होता. आयुष्य भरेल, पुरून उरेल आणि दररोज करता येईल असा अभ्यास हवा होता. आणि मग प्रस्थानत्रयीचा अभ्यास करायचा आणि सुरुवात भगवद्गीतेपासून करायची, हे पक्के झाले.
हे निश्चित झाल्यानंतर एक महत्त्वाचा बदल झाला—संशय मिटला. आता “आपण काय करायचे?” हा प्रश्न राहिला नाही. “आपल्याला हेच करायचे आहे,” हे पक्के झाले. चित्तशुद्धी झाली की नाही, तिचे मापक काय आहेत, याचा त्या वेळी मी फारसा विचार करत नव्हतो. एकच गोष्ट निश्चित झाली होती—अभ्यास करायचा आहे. माझ्या स्वतःच्या बुद्धीची ही स्थिती आज मला या श्लोकातील “निश्चला” या शब्दाशी जोडता येते. अभ्यासाच्या बाबतीत मी निश्चल झालो.
आपण कोणतीही गोष्ट करायला गेलो की इतके विचार, इतके सल्ले आणि इतके लोक आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात. त्या सगळ्या आवाजांमधून योग्य मार्ग शोधण्यासाठी निश्चला बुद्धी फार महत्त्वाची असते. परंतु निश्चल बुद्धी आली म्हणजे प्रवास संपत नाही. त्या अभ्यासाशी, त्या साधनेशी आणि त्या ध्येयाशी एकरूप व्हावे लागते. थोडे अंतर्मुख व्हावे लागते. त्या गोष्टीमध्ये लीन व्हावे लागते. अखंड लीन व्हावे लागते. थोडक्यात सांगायचे झाले, तर अचल व्हावे लागते. विचलित न होता पूर्णपणे अचल व्हावे लागते. अशी अचल स्थिती म्हणजे योग.
अभ्यासाच्या ठिकाणी अशी निश्चल आणि अचल बुद्धी म्हणजे योग. आणि अभ्यास म्हणजे केवळ पुस्तक वाचणे नव्हे. तन-मनाच्या, म्हणजे पूर्ण शक्तीनिशी एखादा विषय समजून घेत असतानाची जी आत्मिक स्थिती असते, ती अभ्यासाची खरी अवस्था आहे. शरीर, मन, बुद्धी, अहंकार—म्हणजे आपल्या संपूर्ण अंतःकरणाची अवस्था त्यामध्ये सहभागी होते. मन एका ठिकाणी स्थिर होते, बुद्धी त्या विषयामध्ये पूर्णपणे गुंतते आणि आपण काही काळ तरी अंतर्मुख होतो. गीतेमध्ये यासाठी “समाधौ” हा शब्द वापरला आहे. आपण त्याला समाधीची पूर्ण अवस्था न म्हणता, त्या दिशेने जाणारी एक अंतर्मुख आणि स्थिर अवस्था असे म्हणू शकतो.
माझ्या स्वतःच्या जीवनाकडे पाहिले, तर मला स्वतःमध्ये बदल घडवायचा होता. मला अधिक चांगले आयुष्य जगायचे होते, अधिक सार्थकी आयुष्य जगायचे होते, मला फिट आयुष्य जगायचे होते, मस्त आयुष्य जगायचे होते. मला अभ्युदय साधायचा होता आणि निःश्रेयस साधायचे होते; या दोन्हींचा सुंदर समतोल साधायचा होता. हे मनामध्ये पक्के होत चालले होते. हे केल्याशिवाय आपण खऱ्या अर्थाने सुंदर आयुष्य जगू शकत नाही आणि त्यासाठी अभ्यास केला पाहिजे, हा विवेक हळूहळू जागा झाला. मग प्रश्न आला—हे करायचे आहे, तर काय करू? कसे करू? आणि तिथून अभ्यास सुरू झाला.
मग निश्चय केला—भगवद्गीतेचा अभ्यास करायचा आहे, दररोज अभ्यास करायचा आहे आणि आयुष्यभर अभ्यास करायचा आहे. एखाद्या दिवशी काही कारण आले तरी शक्यतो सबब काढायची नाही. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला “Work for work’s sake” हा विचार मला इथेही महत्त्वाचा वाटतो—अभ्यासासाठी अभ्यास. त्यातून लगेच काय साध्य होईल, काय परिणाम मिळेल, याचा व्यवहार करायचा नाही. आपल्या भारतीय परंपरेमध्ये प्रस्थानत्रयीच्या अभ्यासाला महत्त्व दिले आहे. त्यातून आपल्याला नेमके काय मिळेल, याची अपेक्षा न ठेवता अभ्यास करणे हीसुद्धा एक साधना आहे.
पण हा अभ्यास कसा करायचा, याची पद्धतही महत्त्वाची आहे. “सह नाववतु, सह नौ भुनक्तु” किंवा “सङ्गच्छध्वं संवदध्वम्”—एकत्र शिकणे, संवादातून समजून घेणे, विचारांची देवाणघेवाण करणे, हीसुद्धा अभ्यासाची पद्धत आहे. म्हणजेच आता विषय निश्चित झाला, अभ्यासाची दिशा निश्चित झाली आणि अभ्यास करण्याची पद्धतही निश्चित झाली.
आज भगवद्गीतेच्या अभ्यासामध्ये अशी स्थिती आली आहे की मी निश्चल आहे. मला कशाबद्दल संशय नाही, मी प्रत्येक नव्या विचारामुळे विचलित होत नाही आणि मी अचल राहण्याचा प्रयत्न करतो. या अभ्यासाचा, म्हणजे भगवद्गीता समजून घेत असतानाचा अनुभव अपार आहे. दररोज काहीतरी नवीन शिकल्याचा अनुभव येतो. त्याचबरोबर काहीतरी नवीन घडल्याचा, काहीतरी आपल्यामध्ये अनफोल्ड झाल्याचा भाव निर्माण होतो. कालपर्यंत जे स्वतःमध्ये दिसत नव्हते, ते आज दिसू लागते. एखाद्या विचाराचा अर्थ अधिक खोलवर समजू लागतो आणि त्याचबरोबर स्वतःमध्येही काहीतरी बदलत असल्याचा अनुभव येतो.
त्यामुळे अधिक निश्चयी मी बनतो, अधिक अविचल मी बनतो. माझ्या शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये आणि एकूण माझ्या अस्तित्वामध्ये अपार परिवर्तन होताना दिसते. आणि हेच अपार परिवर्तन माझ्या प्रेरणेचा मूळ स्रोत आहे. गीतेचा अभ्यास निश्चयात्मक पद्धतीने करताना मला एक क्रम दिसतो—विवेकाने दिशा ठरली, निश्चयात्मक बुद्धीने त्या दिशेवर स्थिर राहिलो, समत्वबुद्धीने या प्रवासाकडे पाहिले, निश्चल बुद्धीने हे करत राहिलो आणि अविचल बुद्धीने हेच करायचे आहे, हे निश्चित झाले.
हळूहळू आता लक्षात येते की काही काळासाठी तरी मी एका शांत अवस्थेमध्ये जातो. ज्या वेळी मनामध्ये कुठलेही संभ्रम नसतात, चित्तामध्ये कुठल्याही वृत्तींची गर्दी नसते आणि अभ्यासाच्या काळात मन स्थिर झालेले असते, त्या वेळी कृष्णाचे शब्द अधिक जवळून अनुभवता येतात. श्रीकृष्णाने जे सांगितले आहे, त्यावर विश्वास ठेवून त्या मार्गाने चालत राहिलो, तर या श्लोकाचा अर्थ केवळ शब्दांमध्ये राहत नाही; तो अनुभवामध्ये उतरू लागतो—
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥
अशा पद्धतीने ही उत्क्रांत अवस्था मी स्वतः अनुभवत आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांनीही ती अनुभवू शकता, हे मी अगदी ठामपणे सांगतो. मात्र त्यासाठी या प्रक्रियेतून जावे लागेल. गोंधळातून स्पष्टतेकडे, स्पष्टतेतून निश्चयाकडे, निश्चयातून निश्चलतेकडे आणि निश्चलतेतून अचलतेकडे जाणारा हा प्रवास स्वतःला करावा लागेल.
आणि खरंच सांगतो—मजा येते! ही मजा केवळ आपल्यापुरती मर्यादित ठेवू नका. हा अनुभव अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. माझी ही तळमळीची इच्छा आहे. खरं तर आपल्याला दुसऱ्या माणसाला बाहेरून काहीतरी द्यायचे नाही; त्याला त्याची स्वतःचीच शक्ती, त्याचे स्वतःचे सुंदर जीवन आणि त्याच्यामध्ये दडलेले आनंदमय अस्तित्व शोधून द्यायचे आहे. त्याला सुंदर आयुष्याची दिशा द्यायची आहे. आणि असे सुंदर गिफ्ट आपण जगात दुसऱ्याला देऊ शकतो, त्यापेक्षा मोठी भेट कोणती?
म्हणूनच हा प्रवास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. भगवद्गीता ही केवळ वाचण्याची गोष्ट नाही; ती जगण्याची दिशा आहे. गीता समजून घेणे म्हणजे केवळ श्रीकृष्णाला समजून घेणे नाही, तर हळूहळू स्वतःलाच उलगडत जाणे आहे. या प्रवासात आपणही निश्चल होऊया, अचल होऊया आणि आपल्या अंतर्मनातील योगाचा अनुभव घेऊया.
धन्यवाद!
बुद्धीच्या मोहातून स्थितप्रज्ञतेकडे
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ७३ | ११ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
अर्जुनाची विषादाची अवस्था आपण पाहिली. पहिल्या अध्यायात अर्जुन म्हणतो—
सीदन्ति मम गात्राणि
वेपथुश्च शरीरे मे
रोमहर्षश्च जायते
मुखं च परिशुष्यति
भ्रमतीव च मे मनः
यानंतर तो वर्णसंकरापासून कुलधर्माच्या नाशापर्यंत अनेक तर्क मांडतो. तो अनेक गोष्टी सांगतो, अनेक कारणे देतो आणि आपल्या निर्णयाचे समर्थन करण्याचा प्रयत्न करतो.
आपल्या आयुष्यात पहिल्या अध्यायात वर्णन केलेली अर्जुनाची पूर्ण विषादावस्था कदाचित फारशी दिसणार नाही. कुरुक्षेत्राचे युद्ध, त्यातील अर्जुनाचे स्थान आणि त्याच्यावर असलेली जबाबदारी यांचा आयाम पाहिला, तर आपल्या दैनंदिन जीवनाची आणि आपल्या जबाबदाऱ्यांची त्याच्याशी तुलना होऊच शकत नाही. त्यामुळे अर्जुनाच्या विषादाची तीव्रता अत्युच्च पातळीवरची आहे.
पण त्या विषादामधली अनेक लक्षणे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात अनुभवत असतो. शरीर थरथरणे, मन अस्थिर होणे, घाबरणे, अस्वस्थ होणे, निर्णय घेता न येणे, तोंड कोरडे पडणे, विचारांचा गोंधळ होणे—यापैकी बरीच लक्षणे पॅनिक अटॅक किंवा ॲंग्झायटीमध्येही दिसू शकतात.
मात्र अर्जुनाचा विषाद केवळ पॅनिक अटॅक नाही. हा फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पॅनिक अटॅकमध्ये माणूस अनेकदा इतका गोंधळून जातो की त्याच्याकडे आपल्या अवस्थेचे तर्कशुद्ध समर्थन करण्याचीही क्षमता उरत नाही. तो त्या क्षणाच्या भीतीमध्ये आणि अस्वस्थतेमध्ये अडकून पडतो. परंतु अर्जुनाच्या बाबतीत एक वेगळी गोष्ट घडते. त्याच्याकडे ज्ञान आहे, क्षमता आहे, सामर्थ्य आहे, अनुभव आहे; पण मोहामुळे आणि अहंकारामुळे त्याची बुद्धी मोहित होते.
‘हे माझ्यामुळे होणार आहे’, ‘याचा परिणाम माझ्यावर होणार आहे’, ‘ही माझी माणसं आहेत’, ‘हे माझे आजोबा आहेत’, ‘हे माझे गुरु आहेत’—या भावनेतून तो विचार करू लागतो. आणि त्याच्या मनात परिणामांचा अतिविचार सुरू होतो.
इथे एक प्रश्न मला नेहमी पडतो. द्रौपदीचे वस्त्रहरण झाले, तेव्हा अर्जुनाने भीष्माचार्यांना कधी जाब विचारला का—‘तुम्ही हे का रोखले नाही?’ द्रोणाचार्यांना कधी विचारले का—‘गुरुवर्य, तुम्ही हे का थांबवले नाही?’ त्या वेळी त्यांना जाब विचारायचा नाही; पण युद्धाच्या वेळी मात्र ‘ही माझी माणसं आहेत, हे माझे आजोबा आहेत, हे माझे गुरु आहेत’ असे म्हणायचे! म्हणजेच मोह आपल्याला निवडक पद्धतीने विचार करायला लावतो.
अर्जुनाच्या अवस्थेत शरीरावर परिणाम झाला, मनावर परिणाम झाला आणि बुद्धीवरही परिणाम झाला.
‘सीदन्ति मम गात्राणि’ — शरीराची अवस्था ढासळते.
भ्रमतीव च मे मनः’ — मन अस्थिर होते.
आणि बुद्धीवर परिणाम झाल्यावर तो वर्णसंकर, कुलधर्म, पाप, संन्यास अशा अनेक कल्पना मांडू लागतो. म्हणजेच बुद्धीने मोहाला तर्काचे रूप दिले जाते.
हीच गोष्ट आपल्या जीवनातही मोठ्या प्रमाणावर दिसते.
आपल्याला बोलता येते, वादविवाद करता येतो, समोरच्याला पटवून देता येते, आपल्या कृतीचे समर्थन करता येते, कारणे देता येतात आणि कधी कधी समोरच्याच्या बुद्धीचा भेदही करता येतो. पण प्रश्न हा आहे की आपली बुद्धी सत्याच्या बाजूने वापरली जाते आहे की आपल्या मोहाचे समर्थन करण्यासाठी?
रोग,वासना,कामचुकार पणा,चीडखोरपणा,पैसा, सत्ता, प्रसिद्धी, अधिकार, वाममार्ग, चुकीची व्यसने, भ्रष्टाचार किंवा आळशीपणा—या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत माणूस आपल्या कृतीचे किती सुंदर समर्थन करू शकतो, हे आपण समाजात पदोपदी पाहतो. आणि गंमत अशी की अशा लोकांची संख्या जास्त दिसू लागली की आपल्यालाही वाटू लागते की, ‘बहुतेक हेच बरोबर असावे.’
आपल्या मनात कौरव आणि पांडव दोन्ही असतात. आपल्या मनात अर्जुन असतो आणि श्रीकृष्णही असतो. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूलाही बुद्धीने मोहित झालेले अनेक लोक दिसतात. आपण स्वतःही कधी ना कधी त्या अवस्थेत असतो.
यात आणखी एक मोठा प्रश्न आहे—आनंदाचा.
बाहेरच्या सुखसोयी, पैसा, प्रसिद्धी, सत्ता किंवा अधिकार यांच्या आधारे मिळणारा आनंद हा अनेकदा क्षणिक असतो. तो बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली, तर आनंद; मनासारखी घडली नाही, तर अस्वस्थता.
अशा अनेक लोकांच्या जवळ राहून, त्यांच्याशी संवाद साधून एक गोष्ट जाणवते—त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काही मिळाले नाही, किंवा त्यांच्या मनासारखे काही घडले नाही, तर त्यांचे आयुष्य अचानक भकास झाल्यासारखे होते. जणू पाण्याबाहेर पडलेल्या माशासारखी त्यांची तडफड सुरू होते.
मग प्रश्न पडतो—आनंद असेलही; पण शांतता आहे का?
बहुधा नाही.
कारण ज्याचा आनंद बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून आहे, त्याच्या मनात कुठेतरी खंत, भीती किंवा असुरक्षितता कायम राहते. म्हणूनच भगवद्गीतेचा संदेश केवळ अज्ञानी किंवा अशिक्षित माणसासाठी नाही. उलट, आपल्या बुद्धीचा उपयोग चुकीच्या गोष्टींचे समर्थन करण्यासाठी करणाऱ्या माणसासाठी गीतेचा संदेश अधिक आवश्यक आहे.
अर्जुनाला केवळ पॅनिक अटॅक आला असता, तर श्रीकृष्णाने त्याला ‘क्लैब्यं मा स्म गमः पार्थ’ असे सांगितले नसते. त्यांनी त्याला ‘अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे’ असेही सांगितले नसते.
कारण अर्जुनाची समस्या केवळ भीती नव्हती. त्याची बुद्धी मोहाने झाकली गेली होती. त्याच्या चुकीच्या धारणांना तो तर्काचा आधार देत होता.
म्हणूनच श्रीकृष्ण सर्वप्रथम त्याचा हा बौद्धिक मोह मोडून काढतात आणि त्यानंतर त्याला ज्ञान देतात.
आपल्या जीवनातही हेच लागू होते.
समजा आपल्याला व्यायाम करणे गरजेचे आहे, हे आपल्याला माहीत आहे; पण आपण व्यायाम करत नाही. मग आपण त्याचे समर्थन करतो—‘आज वेळ नाही’, ‘उद्यापासून सुरू करेन’, ‘काम खूप आहे’, ‘थकवा आला आहे.’ ही कारणे देत राहिलो, तर आपण आपल्या बुद्धीचा उपयोग सत्य शोधण्यासाठी करत नाही; आपण स्वतःच्या चुकीचे समर्थन करण्यासाठी बुद्धीचा वापर करत असतो.
अशा वेळी आपणच आपले कृष्ण व्हायला हवे.
पहिल्यांदा स्वतःला स्पष्टपणे सांगायला हवे—‘हे चुकीचे आहे. मी स्वतःची फसवणूक करतो आहे.’
पण केवळ स्वतःला शिव्या देऊन उपयोग नाही. त्यानंतर सत्याचे ज्ञान आवश्यक आहे.
जीवन नश्वर आहे. शरीर नश्वर आहे. भोग नश्वर आहेत. भोगांमधून मिळणारा आनंद सीमित आहे. बाह्य परिस्थितीवर अवलंबून असलेला आनंद कायमस्वरूपी शांतता देऊ शकत नाही. या सत्याची जाणीव आपल्या जीवनात सतत जागी राहिली पाहिजे.
मग आपण स्वतःला प्रश्न विचारू शकतो—
हे मला खरोखर गरजेचे आहे का?
यातून मला काय साध्य होणार आहे?
माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत?
यामुळे मला खरोखर किती आनंद मिळतो?
याचे परिणाम काय आहेत?
एखादी चुकीची गोष्ट करण्यापूर्वी आणि केल्यानंतरचे परिणाम आपण प्रामाणिकपणे पाहिले, तर हळूहळू विवेक जागा होतो.
कारण चुकीच्या मार्गाचे समर्थन करणारे लोक नेहमीच भरपूर असतात. पण त्यांची संख्या हा सत्याचा पुरावा नसतो.
सारासार विवेकाच्या आधारे योग्य काय, हे निश्चित करणे आवश्यक आहे.
तिथून पुढे निश्चयात्मक बुद्धीचा प्रवास सुरू होतो.
योग्य मार्ग निवडताना ‘काय सोपे आहे?’ एवढेच पाहायचे नाही. ‘काय माझ्यासाठी अधिक योग्य आणि उपयोगी आहे?’ हे पाहायचे. कधी कधी योग्य मार्ग कठीण असतो; पण तोच आपल्याला घडवणारा असतो. एकदा योग्य मार्ग निश्चित झाला की त्यावर अढळ राहायचे. परिस्थिती बदलली म्हणून निर्णय बदलायचा नाही. मोह आला म्हणून मागे फिरायचे नाही. सोयीचा मार्ग दिसला म्हणून चुकीच्या दिशेने वळायचे नाही.
हीच निश्चयात्मक बुद्धीची वाटचाल आहे.
ही वाटचाल निश्चल आणि अचलपणे सुरू राहिली, तर आपल्या जीवनात खरा बदल घडू लागतो.
हा प्रवास केवळ एका निर्णयाचा नाही. हा मोहातून विवेकाकडे, विवेकातून निश्चयाकडे आणि निश्चयातून स्थिर बुद्धीकडे जाणारा प्रवास आहे.
अर्जुनही याच प्रवासातून पुढे जातो. श्रीकृष्ण त्याच्या सोबत आहेत. प्रश्न आहेत, संभ्रम आहेत, मोह आहे; पण कृष्णाच्या सहवासातून आणि ज्ञानातून त्याच्या मनात परिवर्तन घडत जाते.
पुढे या संपूर्ण प्रक्रियेतून जाणारा मनुष्य एका विशिष्ट अवस्थेपर्यंत पोहोचतो.
ती अवस्था म्हणजे—
स्थितप्रज्ञता.
‘प्रतिष्ठित प्रज्ञा’—ज्याची प्रज्ञा सत्यामध्ये स्थिर झाली आहे, ज्याची बुद्धी मोहाने हलत नाही, जो बाह्य परिस्थितीच्या चढ-उतारांमध्ये स्वतःला हरवून बसत नाही, अशी अवस्था.
आणि इथेच एक विलक्षण गोष्ट घडते.
श्रीकृष्ण इतका सुंदर ज्ञानप्रवाह सुरू ठेवतात; पण अर्जुन त्यांना मध्येच थांबवतो आणि एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारतो—
‘स्थितप्रज्ञस्य का भाषा? समाधिस्थस्य केशव?
स्थितधीः किं प्रभाषेत? किमासीत? व्रजेत किम्?’
स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणे काय? त्याची भाषा कशी असते? तो कसा बसतो? कसा चालतो? तो जगतो कसा?
अर्जुनाचा हा प्रश्न म्हणजे आपल्या सर्वांचाच प्रश्न आहे.
गीता ऐकल्यानंतर मी कसा बदलणार?
माझी बुद्धी स्थिर झाली आहे, हे मला कसे कळणार?
माझ्या जीवनात स्थितप्रज्ञतेची सुरुवात झाली आहे, हे कशावरून ओळखायचे?
आता पुढचा प्रवास याच प्रश्नाचा आहे—स्थितप्रज्ञ कोण? आणि स्थितप्रज्ञतेची खरी लक्षणे कोणती?
माणूस एकदम स्थितप्रज्ञावस्थेमध्ये जाणं अशक्य आहे. आपल्याला हळूहळू त्याची सवय करावी लागेल. आपल्या आयुष्यातला एखादा प्रश्न, एखादी समस्या, एखादा त्रास, एखादा रोग आपण घेऊ. किंवा त्याहीपेक्षा, आपल्याला एखादी गोष्ट चांगली करायची आहे. आपल्याला एखादा काम चांगल करायचाय. आपल्याला एखादा उपक्रम चांगला करायचाय. आपल्याला एखादा चांगला लेख लिहायचाय. आपण ती गोष्ट घेऊ.
त्या गोष्टीकडे साधक-बाधक नजरेने पाहू. त्याचं पूर्ण ज्ञान करून घेऊ. समजून घेऊ, सगळी ओळखून घेऊ. जिकडून जिकडून आपल्याला त्याबद्दल माहिती मिळते, ती माहिती घेऊ. त्या माहितीच्या आधारे योग्य आणि अयोग्य असं थोडंसं वर्गीकरण करू आणि मग योग्य मार्ग कोणता आहे, तो निश्चित करू.
त्या मार्गावर निश्चयाने पुढे जाऊ. निश्चयाने पुढे जायल्यानंतर कारणं सांगायची नाहीत, एक्सक्युजेस नाहीत. निश्चयाने पुढे जात असताना मला काय फायदा-तोटा होईल, याचा विचार नाही करायचा. ‘हेच मिळायला पाहिजे, तेच मिळायला पाहिजे’, असा विचार नाही करायचा.
आपण ज्या मार्गावर चाललोय, त्या मार्गावर लक्ष केंद्रित करायचं. त्याचा काय आउटकम असेल, याचा फारसा विचार नाही करायचा. प्रक्रियेतून शिकत जायचं, फीडबॅक घ्यायचा, शोधबोध घ्यायचा आणि पुढे जायचं.
या मार्गावरून चालत असताना अनेक इतर चांगले मार्ग असू शकतात, असं आपल्या अवतीभवतीचे चांगले लोक सांगतील. त्यामुळे भटकायचं नाही. निश्चल राहायचं आणि पुढे जात राहायचं. अचलपणे चालत राहायचं. परिणाम तर हंड्रेड परसेंट पॉझिटिव्ह होतो. पण त्याहीपेक्षा पूर्ण प्रक्रियेमध्ये आपण तावून-सुलाखून निघतो आणि मस्त आनंद वाटायला लागतो.
अशी ही एक प्रक्रिया अनुभवल्यानंतर आपल्या जीवनातल्या सगळ्या प्रक्रियांची संख्या हळूहळू वाढवत न्यायची, वाढवत न्यायची. आणि हळूहळू आपण त्या स्थितप्रज्ञावस्थे जवळ जातो.
चुका होतात, गडबडी होतात; परत त्याच्यातून शिकायचं आणि पुढे जायचं.
बोलण्यातून, बसण्यातून आणि चालण्यातून दिसणारे अध्यात्म
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय – सांख्य योग
भाग ७४ | १२ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
तीन गोष्टी जर आपण नीट समजून घेतल्या, तर माणसाच्या अंतःकरणाविषयी बरंच काही समजून घेता येतं. या तीन गोष्टी म्हणजे—बोलणं, बसणं आणि चालणं. वरकरणी पाहिलं तर या अगदी साध्या, रोजच्या जीवनातील कृती आहेत. प्रत्येक माणूस बोलतो, बसतो आणि चालतो. मग गीतेचा अभ्यास करताना या तीन गोष्टींचं काय महत्त्व? इथे तर आत्मज्ञान, कर्मयोग, समत्वबुद्धी, निश्चल बुद्धी अशा मोठ्या संकल्पनांचा विचार चालू आहे. मग बोलणं, बसणं आणि चालणं यांचा संबंध कुठे येतो?
खरं तर या तीनही कृतींमधून आपल्या अंतःकरणाची अभिव्यक्ती होत असते.
आपण बोलतो ते केवळ शब्द नसतात. बोलणं ही आपल्या विचारांची आणि अंतःकरणाची अभिव्यक्ती असते. एखादा माणूस आनंदी असताना कसा बोलतो, अस्वस्थ असताना कसा बोलतो, रागावलेला असताना कसा बोलतो, एखादी गोष्ट अत्यंत गरजेची असताना कसा बोलतो किंवा अपमान झाल्यावर कसा बोलतो—हे आपण सहज पाहू शकतो. परिस्थिती बदलली की बोलण्याची पद्धतही बदलते. स्थळ, काळ, परिस्थिती, प्रसंग आणि पूर्वानुभव यांचा आपल्या बोलण्यावर परिणाम होत असतो. म्हणूनच आपल्या अंतःकरणाचं बाह्य रूप अनेकदा आपल्या बोलण्यातून दिसतं.
हेच बसण्याच्या आणि चालण्याच्या बाबतीतही आहे. बसणं ही केवळ शरीराची स्थिती नाही आणि चालणं ही केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची क्रिया नाही. आपण कशासाठी बसतो, कसे बसतो, कशा मनःस्थितीत बसतो, यालाही अर्थ असतो. एखादा माणूस सतत धावपळीत असेल, तर त्याला आपण म्हणतो, “आता थोडं शांत बस.” म्हणजेच बाह्य कृती आणि अंतर्गत अवस्था यांचा एक संबंध आहे.
‘उपनिषद’ या शब्दाचाही एक सुंदर अर्थ सांगितला जातो—सत्याच्या जवळ जाऊन बसणे. म्हणजे बसण्यालाही केवळ शारीरिक कृतीच्या पलीकडे एक अंतर्गत अर्थ आहे.
चालण्याचंही तसंच आहे. आपण प्रत्यक्ष कसे चालतो, याला एक अर्थ आहेच; पण आपल्या आयुष्याचं ‘कसं चाललंय?’ यालाही दुसरा अर्थ आहे. आपण जीवनात कोणत्या दिशेने चाललो आहोत, आपलं काम कसं चाललं आहे, आपले संबंध कसे चालले आहेत, आपला विकास कसा चालला आहे—या सगळ्यांत ‘चालणं’ ही एक व्यापक संकल्पना बनते.
म्हणूनच एखादा माणूस निरोगी आणि प्रसन्न असेल, तर त्याच्या बोलण्यात, बसण्यात आणि चालण्यात एक वेगळेपणा जाणवतो. एखादा माणूस राग, लोभ, भीती, अस्वस्थता किंवा मानसिक संघर्षाने व्यापलेला असेल, तर त्याच्या देहबोलीतही त्याचा परिणाम दिसतो. बोलणं ही प्रत्यक्ष बोली आणि बसणं-चालणं ही देहबोली—या दोन्हींतून अंतःकरण बाहेर व्यक्त होत असतं.
समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लिहिताना याच गोष्टीकडे किती सुंदरपणे लक्ष वेधलं आहे—
शिवरायांचे आठवावे रूप।
शिवरायांचा आठवावा प्रताप।
शिवरायांचा आठवावा साक्षेप। भूमंडळी॥
शिवरायांचे कैसे चालणे।
शिवरायांचे कैसे बोलणे।
शिवरायांचे सलगी देणे। कैसे असे॥
फक्त एखाद्या व्यक्तीने काय विचार केले हे महत्त्वाचं नसतं; तो प्रत्यक्ष जगताना कसा वावरतो, हेही तितकंच महत्त्वाचं असतं.
आज आपण एखाद्या व्यक्तीचं भाषण ऐकताना त्याचे शब्द तर ऐकतोच; पण त्याची देहबोलीही पाहतो. तो कसा बसला आहे, कसा उभा आहे, कसा चालतो आहे, बोलताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कसे आहेत—या सगळ्यांतून त्याची अंतर्गत अवस्था समजण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणजेच आपल्या अंतःकरणाचा परिणाम आपल्या कृतींवर होत असतो आणि त्या कृती पुन्हा समाजाला दिसत असतात.
म्हणून आपण स्वतःचंही निरीक्षण केलं पाहिजे. मी कसा बोलतो? मी कसा बसतो? मी कसा चालतो? बोलण्याचा उपयोग मी कशासाठी करतो? माझं बोलणं इतरांना जोडतं की तोडतं? बसताना माझी मनःस्थिती कशी असते? चालताना माझी दिशा कोणती असते? आणि व्यापक अर्थाने—माझं आयुष्य कसं चाललं आहे?
याच ठिकाणी भगवद्गीतेतील अर्जुनाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्म्याचं ज्ञान सांगितलं, नश्वरतेचं ज्ञान सांगितलं, श्रेयस-प्रेयसाचा विचार सांगितला, विवेक सांगितला, व्यवसायात्मिका बुद्धी सांगितली, समत्वबुद्धी सांगितली आणि स्थिर बुद्धीकडे जाण्याचा मार्ग दाखवला. एवढं सगळं ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनात एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो—हे सगळं आत्मसात केलेला माणूस प्रत्यक्ष जीवनात कसा दिसतो? तो समाजात कसा वावरतो?
कारण विचारांची खरी कसोटी व्यवहारातच लागते.
आणि म्हणून अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो—
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव।
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्॥
अर्थात—हे केशवा, समाधीमध्ये स्थित असलेल्या, स्थिर बुद्धीच्या मनुष्याची लक्षणं काय? तो कसा बोलतो? तो कसा बसतो? तो कसा चालतो?
अर्जुनाचा हा प्रश्न विलक्षण आहे. त्याला केवळ “स्थितप्रज्ञ म्हणजे कोण?” हे जाणून घ्यायचं नाही; तर “स्थितप्रज्ञ माणूस प्रत्यक्ष जगतो कसा?” हे जाणून घ्यायचं आहे. हीच गीतेची वैशिष्ट्यपूर्ण दृष्टी आहे.
स्थितप्रज्ञता ही केवळ मनातली कल्पना नाही. ती केवळ एखादी आध्यात्मिक पदवी नाही. ती जीवनात उतरलेली अवस्था आहे. विवेक, निश्चयात्मक बुद्धी, समत्व आणि स्थिरता यांचा परिणाम आपल्या प्रत्यक्ष वर्तनात दिसायला लागतो. त्यामुळे अर्जुनाचा प्रश्न हा केवळ अध्यात्मिक कुतूहलाचा प्रश्न नाही; तो अत्यंत व्यावहारिक प्रश्न आहे.
माझ्या विचारांचा परिणाम माझ्या कृतींमध्ये दिसतो आहे का?
हा प्रश्न आपण स्वतःलाही विचारायला हवा. ‘Actions speak louder than words’ असं आपण नेहमी म्हणतो. पण त्यापुढे जाऊन असंही म्हणता येईल—आपल्या कृती आपल्या मनातील आणि बुद्धीतील अवस्थेची साक्ष देतात. आपल्या मनात कितीही सुंदर विचार असले, तरी ते आपल्या वागण्यात उतरले नाहीत, तर त्या विचारांचं जीवनाशी नातं अजून पूर्ण झालेलं नाही.
याच अर्थाने अर्जुनाच्या तोंडून आलेला ‘स्थितप्रज्ञ’ हा शब्द अत्यंत क्रांतिकारी आहे. स्थितप्रज्ञता म्हणजे आधी सांगितलेल्या ज्ञानाचं एकत्रित, जगण्यात उतरलेलं रूप. स्थिर बुद्धी, समत्व आणि अंतःकरणाची परिपक्वता यांचा परिणाम माणसाच्या व्यवहारात दिसायला लागतो.
याच श्लोकात आणखी एक महत्त्वाचा शब्द येतो—‘समाधी’. समाधी म्हटलं की आपल्या मनात अनेकदा मृत्यूनंतरची समाधी, एखाद्या संतांची समाधी किंवा ध्यानामध्ये प्राप्त होणारी एखादी गूढ अवस्था अशी प्रतिमा उभी राहते. परंतु गीतेत ‘समाधी’चा संदर्भ अत्यंत जिवंत आणि व्यावहारिक आहे. अर्जुन युद्धभूमीवर उभा आहे. जीवनाच्या संघर्षाच्या मध्यभागी उभा आहे. आणि तिथे श्रीकृष्ण त्याला समाधीची भाषा सांगत आहेत.
यातून गीतेची एक अत्यंत महत्त्वाची दृष्टी समोर येते—अध्यात्म म्हणजे जीवनापासून पळून जाणं नाही. अंतःकरणाची स्थिरता केवळ एका ठिकाणी बसूनच अनुभवायची असते असं नाही. प्रत्यक्ष जीवनात, प्रत्यक्ष कर्म करताना, जबाबदाऱ्या पार पाडताना, संघर्षाचा सामना करताना देखील अंतःकरण स्थिर राहू शकतं. म्हणून गीतेतील समाधी ही जीवनापासून दूर जाणारी अवस्था नसून जीवनाच्या मध्यभागी स्थिर होण्याची अवस्था म्हणून समजून घेता येते.
इथून पुढे एक अत्यंत सुंदर संकल्पना आपल्यासमोर येते—कृतिशील समाधी. म्हणजे अंतःकरण स्थिर आहे, बुद्धी स्थिर आहे; पण शरीर आणि कर्म थांबलेले नाहीत. उलट, ती स्थिरता कृतीला अधिक स्पष्ट दिशा देते. अशा स्थितीत अध्यात्म हे निष्क्रिय राहत नाही; ते जीवनाला अधिक जागृत, अधिक सजग आणि अधिक परिणामकारक बनवतं.
यालाच आपण ‘डायनामिक स्पिरिच्युअलिटी’—गतिशील अध्यात्म असं म्हणू शकतो. अध्यात्म म्हणजे केवळ कर्मकांड नाही. अध्यात्म म्हणजे केवळ विधी, मंत्र, पारायण किंवा पुस्तकवाचनही नाही. या गोष्टींचं स्वतःचं स्थान असू शकतं; पण अध्यात्माची खरी कसोटी ही माणसाच्या जीवनात होणाऱ्या परिवर्तनात आहे.
माझं बोलणं बदलतंय का?
माझं वागणं बदलतंय का?
माझी प्रतिक्रिया बदलतेय का?
माझी निर्णयक्षमता बदलतेय का?
माझ्या सभोवतालच्या माणसांवर माझ्या अस्तित्वाचा परिणाम अधिक चांगला होत आहे का?
हा अध्यात्माचा व्यवहारातील आरसा आहे.
आपण विषादामध्ये अडकू शकतो, चिंता आणि अस्वस्थतेमध्ये अडकू शकतो, चुकीच्या सवयींमध्ये अडकू शकतो, व्यसनांमध्ये अडकू शकतो, नकारात्मक विचारांच्या चक्रात अडकू शकतो. कधी कधी परिस्थिती आपल्याला जणू गोठवून टाकते. आपण पुढे सरकू शकत नाही. अशा वेळी गीता आपल्याला केवळ सांत्वन देत नाही; ती आपली बुद्धी जागी करते आणि कृतीकडे नेते.
म्हणूनच स्थितप्रज्ञता म्हणजे गोठून जाणं नाही. उलट, स्थिर बुद्धी आणि गतिशील कर्म यांचा सुंदर मिलाफ म्हणजे गीतेचा जीवनदृष्टिकोन.
आजपासून आपण स्वतःकडे एका वेगळ्या नजरेने पाहूया.
मी कसा बोलतो?
मी कसा बसतो?
मी कसा चालतो?
आणि सर्वांत महत्त्वाचं—माझं जीवन कसं चाललं आहे?
कदाचित या तीन साध्या कृती आपल्या अंतःकरणाचा सर्वांत प्रामाणिक आरसा ठरतील.
आणि इथूनच आपण गीतेच्या पुढच्या प्रवासात स्थितप्रज्ञतेची लक्षणं आणि गतिशील अध्यात्म अधिक खोलवर समजून घेऊया.
एका अफाट माणसाचं तुफान आयुष्य!
गीता दर्शन : श्रीमद्भगवद्गीता – दुसरा अध्याय, सांख्य योग
भाग ७५ | १३ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्णांनी स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली आहेत. दुसऱ्या अध्यायातील शेवटचे १९ श्लोक म्हणजे गीतेच्या संदेशाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या श्लोकांमध्ये समचित्तता, इंद्रियनिग्रह, आसक्तीचा त्याग, क्रोधावर विजय, मानसिक स्थैर्य आणि बुद्धीची स्थिर अवस्था यांविषयी मार्गदर्शन केले आहे.
एकदा एका अफाट ताकदीच्या माणसाने असे म्हटले होते की, गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी असलेल्या या १९ श्लोकांमध्ये गीतेचा खरा संदेश सामावलेला आहे. हिंदू धर्माचे बाकीचे सर्व ग्रंथ नष्ट झाले आणि केवळ हे १९ श्लोक शिल्लक राहिले, तरी हिंदू धर्म परिपूर्ण राहील, असे त्याला वाटत होते. त्याने असेही म्हटले होते की, “हे श्लोक माझ्या हृदयाच्या पाटीवर कायमचे कोरले गेले आहेत. स्थितप्रज्ञाची ही लक्षणे म्हणजे खऱ्या अर्थाने हिंदू असण्याचे आणि धार्मिक असण्याचे सार आहे.”
२९ एप्रिल १९३३ रोजी एका परदेशी पत्रकाराने त्याला प्रश्न विचारला, “हिंदू असणे म्हणजे काय?” त्यावर त्या माणसाने उत्तर दिले, “गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी असलेल्या या श्लोकांप्रमाणे जगणारा म्हणजे हिंदू.”
हा किती अफाट ताकदीचा माणूस होता! पण ही ताकद त्याच्यामध्ये जन्मतःच होती का? तो सुरुवातीपासूनच निर्भय, संयमी, निश्चयी आणि स्थितप्रज्ञ होता का? की त्याच्या आयुष्यातही भीती, दुर्बलता, चुका, वासना, पश्चात्ताप आणि अंतर्गत संघर्ष होते?
हे समजून घेणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
या माणसाच्या बालपणाकडे पाहिले, तर आपल्याला एक अतिशय भित्रे, लाजाळू आणि संकोची व्यक्तिमत्त्व दिसते. लहानपणी त्याला अंधाराची भीती वाटायची. दिवा लावल्याशिवाय झोप येत नसे. भुताखेतांची भीती होती. चोरांची भीती होती. एकटेपणाची भीती होती. पुढे वयात येताना तो सिगारेट ओढू लागला. काही चुकीच्या सवयींच्या आहारी गेला. चोरी केली. वासनेच्या प्रभावाखालीही तो गेला. घरात धार्मिक वातावरण होते; परंतु धार्मिक ग्रंथांविषयी सुरुवातीला त्याला विशेष आस्था नव्हती.
या सगळ्या अनुभवांमुळे त्याच्या मनात पश्चात्ताप निर्माण होऊ लागला. स्वतःच्या चुका, मनातील संघर्ष आणि अस्वस्थता यांमुळे कधीतरी आत्महत्येचे विचारही त्याच्या मनाला स्पर्श करून गेले. म्हणजेच, पुढे जगाला निर्भयतेचा आणि सत्याग्रहाचा मार्ग दाखवणारा हा माणूस सुरुवातीला सामान्य मानवी भीती, दुर्बलता आणि अंतर्गत संघर्षांतूनच जात होता.
तरुणपणी तो परदेशात शिकायला गेला. तेथे काही परदेशी मित्रांच्या आग्रहामुळे त्याने एडविन अर्नॉल्ड यांनी भाषांतरित केलेले The Song Celestial हे भगवद्गीतेचे इंग्रजी भाषांतर वाचले. वयाच्या विसाव्या वर्षी त्याला गीतेचा परिचय झाला. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी असलेले स्थितप्रज्ञाचे श्लोक त्याला विशेष आवडले. मूळ संस्कृत वाचता येत नाही, याची त्याला खंत वाटू लागली.
परंतु त्या काळातील गीतेचे आकर्षण मुख्यतः बौद्धिक होते. गीतेचा अभ्यास करणे, त्यातील विचार समजून घेणे, तर्काने त्याचे विश्लेषण करणे आणि बुद्धीच्या पातळीवर त्याचा अर्थ लावणे—हे त्याला आवडत होते. पण गीता अद्याप त्याच्या आचरणात उतरलेली नव्हती. गीता त्याला लॉजिकल, इंटेलेक्च्युअल आणि व्यावसायिक पातळीवर समजत होती; मात्र जीवनातील प्रत्येक प्रसंगात तिचा उपयोग कसा करायचा, हे अद्याप प्रत्यक्ष अनुभवातून आलेले नव्हते.
ही गोष्ट आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गीतेचा अभ्यास करणे आणि गीता जगणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण अनेक श्लोक पाठ करू शकतो. त्यांचे अर्थ समजून घेऊ शकतो. त्यावर चर्चा करू शकतो. पण एखाद्या कठीण प्रसंगी आपली बुद्धी स्थिर राहते का? क्रोधाच्या वेळी आपण स्वतःवर नियंत्रण ठेवतो का? भीतीच्या प्रसंगी आपण योग्य निर्णय घेऊ शकतो का? मोहाच्या वेळी विवेक जागा राहतो का? हा खरा प्रश्न आहे.
१९०३ मध्ये, वयाच्या सुमारे ३४ व्या वर्षी, त्याने गीतेचा अभ्यास अधिक गांभीर्याने करण्याचे ठरवले. दररोज दात घासताना दोन श्लोक पाठ करायचे आणि दिवसभर त्या श्लोकांचे मनन-चिंतन करायचे, असा त्याने निश्चय केला. ही साधना केवळ श्लोक पाठ करण्यापुरती मर्यादित नव्हती. दिवसभरातील प्रत्येक कृतीमध्ये त्या श्लोकांचा अर्थ उतरवण्याचा तो प्रयत्न होता.
तीन वर्षांनंतर, म्हणजे १९०६ च्या सुमारास, त्याला जाणवू लागले की हे श्लोक म्हणजे जीवनाची खरी कसोटी आहेत. केवळ शारीरिक शक्ती पुरेशी नाही. मानसिक पातळीवर वासनेवर विजय मिळवणे, क्रोधावर नियंत्रण ठेवणे, भीतीवर मात करणे आणि मनाला शिस्त लावणे आवश्यक आहे. समाजसेवा किंवा मोठे कार्य करायचे असेल, तर आधी स्वतःच्या अंतःकरणावर काम करावे लागेल. या जाणिवेतून त्याने कठोर व्रतपालनाला सुरुवात केली.
भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात—
वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः ।
आसक्ती, भय आणि क्रोध यांपासून मुक्त होणे, हा स्थितप्रज्ञतेच्या दिशेने जाणारा मार्ग आहे. त्या माणसाला या विचाराचे महत्त्व हळूहळू जाणवू लागले. बाहेरच्या जगावर विजय मिळवण्याआधी आपल्या मनावर विजय मिळवावा लागतो, हे त्याला उमगले.
बाह्य स्वातंत्र्याच्या आधी आंतरिक स्वातंत्र्य आवश्यक आहे. मनुष्य स्वतःच्या भीतीचा, वासनांचा, क्रोधाचा आणि दुर्बलतेचा गुलाम असेल, तर बाहेरची गुलामगिरी नष्ट झाली तरी तो खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाही. बाह्य गुलामगिरीचे मूळ अनेकदा आपल्या आंतरिक गुलामगिरीमध्ये असते.
जर समाजातील प्रत्येक व्यक्ती आंतरिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करू लागली, तर बाह्य स्वातंत्र्य मिळवण्याची शक्ती समाजामध्ये निर्माण होते. त्या माणसाच्या जीवनात ही जाणीव केवळ विचार म्हणून राहिली नाही; ती त्याच्या व्यक्तिगत साधनेचा आणि पुढील सार्वजनिक कार्याचा आधार बनली.
ही व्यक्तिगत साधना १९१५ मध्ये, वयाच्या सुमारे ४६ व्या वर्षी, सामूहिक रूप धारण करू लागली. त्याने आपल्या सामूहिक प्रार्थनेमध्ये स्थितप्रज्ञाची ही लक्षणे असलेले श्लोक कायमचे जोडले. व्यक्तिगत अभ्यास आणि व्यक्तिगत अनुभूती यांना सामूहिक साधनेशी जोडण्याचे महत्त्व त्याच्या जीवनातून दिसून येते.
एकेकाळी अंधाराला घाबरणारा, भुताखेतांना भिणारा, चुकीच्या सवयींमध्ये अडकलेला आणि अंतर्गत संघर्षांतून जाणारा हा माणूस पुढे जगावर सत्ता असलेल्या साम्राज्याला निर्भयपणे आव्हान देण्यासाठी उभा राहिला. ज्याच्या मनात कधीकाळी भीती होती, त्याच मनात पुढे सत्यासाठी उभे राहण्याचे अद्भुत सामर्थ्य निर्माण झाले. ज्याला स्वतःच्या दुर्बलतांशी संघर्ष करावा लागत होता, तोच पुढे लाखो लोकांना धैर्य देऊ लागला.
एवढे बळ या श्लोकांमध्ये आहे.
स्वातंत्र्याचा खरा अर्थ, खरा आनंद आणि जीवनातील खरी मस्ती या श्लोकांमधून अनुभवता येते. बाह्य जग जिंकण्याची ताकद आतल्या जगावर विजय मिळवल्याशिवाय निर्माण होत नाही.
आपण आपल्या आयुष्यातील कुठलीही वाईट गोष्ट घ्या—वाईट विचार, वाईट संगत, चुकीचे आचार, रोग, वासना, व्याधी, भ्रष्टता, गुलामगिरी किंवा अत्याचार. या सगळ्यांचे मूळ जर नष्ट करायचे असेल, तर आंतरिक स्वातंत्र्य आवश्यक आहे. आणि हे आंतरिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल, तर स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगणाऱ्या या श्लोकांचा अभ्यास आणि आचरण केले पाहिजे.
आता या विचारांशी माझ्या आयुष्याचा संबंध सांगतो.
मी भगवद्गीतेचे अनेक श्लोकसंग्रह वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलेले आहेत. वयाच्या २३ व्या वर्षी विवेकानंद केंद्रामध्ये कर्मयोग श्लोकसंग्रह यातील काही निवडक श्लोकांचे दररोज पठण आम्ही करायचो. त्या माध्यमातून गीता शिकण्याची आणि कर्मयोगाचे आचरण समजून घेण्याची संधी मिळाली.
परंतु पुढे वयाच्या ३६ व्या वर्षी माझ्या आयुष्यात एक भयानक अंधकारमय काळ आला. मानसिक आणि शारीरिक व्याधींनी मला ग्रासले. माझा सगळा प्रवास बाह्य जगामध्ये भव्यदिव्य गोष्टी निर्माण करण्याने झपाटलेला होता. बाहेरच्या जगात काम करण्याची उत्स्फूर्तता होती, पॅशन होती, ताकद होती; पण त्या तुलनेत आंतरिक ताकद वाढवलेली नव्हती.
बाहेरच्या जगात आनंद अनुभवताना शरीर, मन आणि बुद्धी यांना त्या अनुभवांचे ओझे पेलण्याची क्षमता विकसित केलेली नव्हती. स्वतःच्या सहवासात आनंदी राहण्याची सवय नव्हती. आतल्या आत मस्त राहण्याची वृत्ती आणि मनाची स्थिरता निर्माण झालेली नव्हती. त्यामुळे बाहेरच्या जगातून मिळणारा आनंद, उत्साह आणि धुंदी यांवरच माझा भर राहिला. पण शरीर, मन आणि बुद्धी त्या सगळ्याला पेलू शकत नव्हते.
परिणाम व्हायचा तो झाला. दवाखाने लागले. रोग आले. व्याधी आल्या. अशा अवस्थेमध्ये मी अस्वस्थपणे फिरत होतो. आणि एक दिवस वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमामध्ये गेलो.
संध्याकाळची वेळ होती. काही साधक एकत्र बसले होते. प्रार्थनेला सुरुवात झाली—
प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् ।
आणि त्यानंतर स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगणारे पुढचे श्लोक सुरू झाले.
त्या क्षणी माझ्या मनामध्ये एक वेगळीच अनुभूती निर्माण झाली. ज्या माणसाच्या जीवनाचा आपण विचार करीत होतो, त्याला या श्लोकांच्या साधनेतून स्वतःची एक उन्नत अवस्था प्राप्त झाली होती. त्याच्या जीवनातील परिवर्तनामध्ये या श्लोकांचे महत्त्व किती मोठे आहे, हे मला जाणवू लागले.
मला त्या माणसाएवढे मोठे होण्याची इच्छा नाही. पण मस्तीत, आनंदात आणि उत्साहाने काम करण्याची इच्छा आहे. सतत आनंदी, शांत आणि झपाटल्यागत काम करण्याची इच्छा आहे. शरीर, मन आणि बुद्धी यांना समर्थ बनवून जीवन जगण्याची इच्छा आहे.
हे श्लोक मला मानसिक स्थैर्य देतील, अफाट ताकद देतील आणि बुद्धीची अशी अवस्था निर्माण करतील की, ज्यातून मला माझ्या स्वतःच्या हिताचा आणि माझ्या भोवतीच्या अनेक लोकांच्या हिताचा विचार करता येईल, अशी अनुभूती मला त्या काळात आली.
सेवाग्राममधला तो क्षण माझ्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. कारण त्या दिवशी मला जाणवले की, गीता ही केवळ वाचण्याची किंवा पाठ करण्याची गोष्ट नाही. ती मनाला घडवण्याची, दुर्बलतेवर विजय मिळवण्याची आणि जीवनाला व्यापक ध्येयाशी जोडण्याची साधना आहे.
आता या अफाट माणसाचे नाव सांगण्याची वेळ आली आहे.
तो माणूस म्हणजे—महात्मा गांधी.
एकेकाळी अंधाराला घाबरणारा, भुताखेतांना भिणारा, चुकीच्या सवयींमध्ये अडकलेला आणि स्वतःच्या दुर्बलतांशी झगडणारा मोहनदास पुढे महात्मा गांधी झाला. त्याने बाह्य साम्राज्याला आव्हान देण्यापूर्वी आपल्या अंतःकरणातील भीती, वासना, क्रोध आणि आसक्ती यांच्याशी संघर्ष केला. त्याच्या जीवनातील हा परिवर्तनाचा प्रवास स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगणाऱ्या श्लोकांशी खोलवर जोडलेला होता.
माझ्या अनुभवातून गीतेचे महत्त्व मी तुम्हाला सांगितले आहे. महात्मा गांधींच्या जीवनातूनही हेच दिसते की, गीतेचा अभ्यास केवळ बौद्धिक पातळीवर न राहता तो व्यक्तिगत आचरणात उतरला, तर जीवनात परिवर्तन घडवण्याची ताकद निर्माण होते.
म्हणूनच दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी असलेले हे १९ श्लोक आपल्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण ते नीट समजून घेतले पाहिजेत. केवळ अर्थ समजून घेण्यासाठी नव्हे, तर आपल्या जीवनातील प्रत्येक प्रसंगामध्ये त्यांचा उपयोग करण्यासाठी.
महात्मा गांधींनी या श्लोकांना केवळ व्यक्तिगत अभ्यासापुरते किंवा व्यक्तिगत आचरणापुरते मर्यादित ठेवले नाही. त्यांनी त्यांना सामूहिक प्रार्थनेचा आणि सामूहिक साधनेचा भाग बनवले. यामधून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो—अध्यात्म म्हणजे केवळ व्यक्तिगत उन्नती नव्हे; तर त्या उन्नतीचा समाजाच्या जीवनाशी संबंध जोडणे होय.
जे लोक भगवद्गीतेला केवळ व्यक्तिगत अभ्यासापुरते, व्यक्तिगत आचरणापुरते किंवा व्यक्तिगत हितापुरते मर्यादित ठेवतात, त्यांचा गीतेचा अभ्यास परिपूर्ण होत नाही, असे मला वाटते. कारण गीता आपल्याला केवळ स्वतःसाठी जगायला शिकवत नाही; ती आपल्याला समाजाशी जोडते, कर्तव्याची जाणीव देते आणि व्यापक हिताचा विचार करायला शिकवते.
म्हणून मी तुम्हाला विनंती करतो—एकटेपणाने काही करू नका. व्यायाम एकटा करू नका, अभ्यास एकटा करू नका, आनंद एकटा घेऊ नका. समूहामध्ये राहायला शिका. सामूहिकतेची, गटाची भावना माणसाला उन्नत बनवते आणि अनेक गोष्टींपासून मुक्त करते.
‘अहं’चा त्याग करायचा असेल, तर ‘वयम्’चा विचार करायला हवा. ‘मी-माझे’चा त्याग करायचा असेल, तर थोडे पुढे जाऊन ‘आपले, आमचे, सर्वांचे’ असा विचार करायला हवा. हळूहळू ‘मी’ आणि ‘माझे’ यांची पकड सैल होऊ लागते.
महात्मा गांधींच्या आयुष्यातून आपल्याला हेच शिकायला मिळते—व्यक्तिगत साधनेतून आंतरिक स्वातंत्र्य मिळवायचे आणि त्या स्वातंत्र्याचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करायचा.
भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी असलेले हे १९ श्लोक आपल्या जीवनातील अंधार दूर करण्याची, मनाला स्थिर करण्याची आणि बुद्धीला योग्य दिशा देण्याची शक्ती बाळगतात. आपण त्यांचा अभ्यास करूया, मनन करूया आणि आपल्या आचरणात उतरवूया.
गीता केवळ स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. भगवद्गीतेचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. कारण एका व्यक्तीच्या आंतरिक परिवर्तनातून निर्माण झालेली शक्ती जेव्हा समाजाशी जोडली जाते, तेव्हा ती समाजपरिवर्तनाची ताकद बनते.
भगवद्गीता अधिक लोकांपर्यंत पोहोचवा.
कामना विरून गेल्या आणि उरली फक्त तृप्ती
श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय — सांख्ययोग
भाग ७६ | १४ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
“प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् ।
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥”
प्रत्येक चरणाचा अर्थ
‘प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान्’ — हे अर्जुना, मनामध्ये निर्माण झालेल्या सर्व कामना जेव्हा मनुष्य पूर्णपणे सोडून देतो, ‘आत्मन्येवात्मना तुष्टः’ — आणि स्वतःमध्येच, आपल्या आत्मस्वरूपामध्येच स्वतःच्या अंतःकरणाने तृप्त राहतो, ‘स्थितप्रज्ञस्तदोच्यते’ — तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ असे म्हटले जाते.
पण हा श्लोक वाचताना माझ्या मनात एक प्रश्न नेहमी उभा राहतो. खरंच अशी अवस्था येऊ शकते का? श्रीकृष्ण जरा अवास्तवच बोलतोय का?
अर्जुनाला युद्ध करायला शिकवताना श्रीकृष्ण त्याला कामनारहित होण्यास सांगतो. पण युद्ध म्हणजे नेमकं काय? समोरचा माणूस मारायचा आहे. त्याच्यावर अस्त्र चालवायचं आहे. समोरून एखादं अस्त्र आलं तर त्याला प्रत्युत्तर म्हणून योग्य अस्त्र वापरायचं आहे. शत्रू कुठे आहे, त्याचा नेम काय आहे, त्याच्यावर कोणता बाण सोडायचा, कधी सोडायचा—याचा विचार बुद्धीने करायचा आहे. शेवटी लक्ष्य साधून त्याला मारायचं आहे.
मग अशा परिस्थितीत ‘प्रजहाति यदा कामान्’ ही कामनारहित अवस्था कशी काय शक्य आहे?
आणि आपण युद्ध तर सोडाच; साध्या-साध्या दैनंदिन गोष्टी करत असतानासुद्धा आपल्याला मनातल्या इच्छा, अपेक्षा, अस्वस्थता, आतुरता यांच्यापासून मुक्त होता येत नाही. मग अशी स्थिती कशी येणार?
हा प्रश्न माझ्या मनात होताच.
तुळजापूरच्या एका प्रवासाने या प्रश्नाचं उत्तर मला माझ्या अनुभवातून मिळालं.
ज्ञान प्रबोधिनीच्या विस्तारकार्याच्या निमित्ताने माझा संपर्क दौरा होता—लातूर, सोलापूर आणि तुळजापूर. तुळजापूरला एका मित्राला भेटायचं ठरलं होतं. पण अचानक त्याला काही काम निघालं आणि आमची भेट होणं शक्यच राहिलं नाही.
पण तोपर्यंत मी तुळजापूरच्या बसमध्ये बसलेलो होतो.
तुळजापूरला उतरल्यावर मनात विचार आला, ‘आता काय करायचं? कोणाला तरी भेटलं पाहिजे.’
आणि मग एक वेगळाच विचार मनात आला—
‘या तुळजापूरच्या सगळ्यात ग्रेट पर्सनॅलिटीला भेटायला काय हरकत आहे?’
आणि मी ठरवलं—
भवानी मायेलाच भेटायचं!
मला वाटलं, चला, पटकन दर्शन होईल.
पण मंदिरात गेल्यावर लक्षात आलं की ही काही पटकन होणारी गोष्ट नाही!
श्रावण महिना. मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी. लांबच्या लांब रांगा. त्या रांगेत वेगवेगळ्या प्रकारची माणसं. दिवसभर अनेक मंदिरांमध्ये फिरून आलेली घामाघूम झालेली माणसं आणि त्या घामाचा वास. दोन-तीन तास काहीही न करता एका जागी उभं राहायचं. मोबाईल नाही. सोबत मित्र नाही. कोणी ओळखीचं नाही. आणखी एक मोठी भीती मनात—कधी बाथरूमला जावं लागेल, कधी टॉयलेटला जावं लागेल, याची काही शाश्वती नाही! अशा परिस्थितीत दोन-तीन तास शांतपणे रांगेत उभं राहणं, तेही एकट्याने, हे माझ्यासाठी जवळजवळ अशक्यप्रायच होतं.
सुरुवातीला धर्मदर्शनाच्या रांगेत उभा राहिलो. रांग चौथ्या मजल्यावर होती. रांग हलता हलत नव्हती. तिथून पुढे आलो. मग मुखदर्शनाची रांग. दरम्यानचे विधी पूर्ण करून रांगेत उभं राहिल्यानंतर मी मनाशी एक निर्णय घेतला—
‘आता फक्त देवीचं दर्शन घ्यायचं. दर्शन होईपर्यंत जे काही होईल ते अनुभवायचं. मनामध्ये ज्या निगेटिव्ह भावना येतील, त्या फेस करायच्या.’
दीड-दोन तासांनंतर मी मुखदर्शनाच्या अगदी जवळ आलो. आता एक विचार मनात सुरू झाला—
‘देवीच्या समोर आपण काय मागावं?’ काय मागणं इष्ट आहे?
मनात अनेक विचार येत होते. प्रबोधिनीचं काम अधिक वाढावं. भगवद्गीतेचं ज्ञान अधिक मिळावं. माझ्याकडून अधिकाधिक चांगलं काम घडावं. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता यावं. प्रकृती चांगली राहावी आणि अधिकाधिक कार्यक्षम होता यावं. अशा अनेक कामना मनात उमटत होत्या. आणि शेवटी देवीसमोर उभा राहिलो.
देवी दिसली.
त्या क्षणी मात्र काही मागावंसंच वाटलं नाही. कसलाही भाव व्यक्त करावा असं वाटलं नाही. काही सांगावंसं वाटलं नाही. फक्त देवीला पाहावंसं वाटलं. मी फक्त देवीला पाहिलं. फक्त देवीला भेटलो. एक प्रदक्षिणा घातली आणि बाहेर आलो.
बाहेर आल्यानंतर मात्र माझ्या मनात काहीतरी विलक्षण घडलं होतं. मला कुठल्याही गावात गेल्यावर तिथली दुकानं पाहायला फार आवडतात. नवीन वस्तू दिसल्या की घ्याव्याशा वाटतात. खाण्याचे पदार्थ दिसले की खावेसे वाटतात. कपडे, वस्तू, सजावटीच्या वस्तू—काही ना काही घ्यावंसं वाटतंच. तुळजापूरला बसस्थानकातून बाहेर पडतानाही मी सुरुवातीला हल्दीरामच्या भुजियाची दोन पाकिटं आणि पाण्याची बाटली घेतली होती. पण बाहेर पडताना एक विचार केला होता—‘दर्शन झाल्यावर परत घेऊ. काय घ्यायचं ते मग पाहू.’
आता दर्शन झालं होतं. मी शांतपणे चालत होतो. मनामध्ये एक विलक्षण तृप्तता होती. मस्त फीलिंग होती. कुठलीही अधीरता नव्हती. अस्वस्थता नव्हती. असुरक्षितता तर अजिबात नव्हती. मी आजूबाजूला पाहत होतो. सुंदर सुंदर वस्तू होत्या. अनेक गोष्टी माझ्याकडे नव्हत्या. नेहमी असतो तसा माझ्यातला नवीन वस्तू घेण्यासाठी धडपडणारा ‘लहान मुलगा’ही कुठेतरी असतोच. पण त्या दिवशी तो शांत होता. मला काहीही घ्यावंसं वाटत नव्हतं. कुठलाही पदार्थ खावासा वाटत नव्हता. कोणाशी गप्पा माराव्याशा वाटत नव्हत्या. लवकर कुठे पोहोचावं असं वाटत नव्हतं. माझा मूलतः स्वभाव एकटं राहण्याचा नाही. पण त्या दिवशी मी एकटेपणाचा त्रासही अनुभवत नव्हतो. मी फक्त स्वतःमध्ये होतो आणि मला त्या शांततेचा आनंद मिळत होता.
तेव्हा मला जाणवलं—
‘घ्यावंसं वाटणं हीसुद्धा एक मनाची अवस्था आहे. पण काहीच घ्यावंसं न वाटणं हीसुद्धा एक अवस्था असू शकते!’
वस्तू सुंदर होत्या. पदार्थ आकर्षक होते. पण त्यांच्याकडे पाहून मन म्हणत होतं—
‘छान आहे. पाहू या. एन्जॉय करू या. पण घ्यायची गरज नाही.’
मी माझ्यात मस्त होतो. बस मध्ये बसल्यानंतर मला स्वतःचंच नवल वाटायला लागलं.
मग मी स्वतःलाच चार प्रश्न विचारले.
1. अशी स्थिती मला याआधी कधी आली आहे?
2. अशी स्थिती माझ्यात का आली?
3. अशी स्थिती पुन्हा यावी यासाठी मी काय प्रयत्न करू शकतो?
4. अशा स्थितीचे फायदे काय?
उत्तर अफाट होतं.
मला जाणवलं, अशा अवस्था मला याआधीही अनेकदा आल्या आहेत—विशेषतः भगवद्गीतेचा अभ्यास सुरू केल्यापासून. अशा अवस्थेत पैसा अनावश्यकपणे खर्च होत नाही. अस्वस्थता, असुरक्षितता, आतुरता यांसारख्या नकारात्मक भावना मनात निर्माण होत नाहीत. मनाची स्थिरता टिकते. घरामध्ये अवास्तव वस्तूंची भर पडत नाही. मनावर अनावश्यक ओझं राहत नाही. आणि सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे—आपल्याला आनंद मिळण्यासाठी सतत काहीतरी बाहेरून मिळवण्याची गरज भासत नाही.
मग विचार आला—हे देवीच्या दर्शनामुळे झालं का?
हळूहळू मला जाणवलं—केवळ देवीच्या मूर्तीसमोर उभं राहिल्यामुळे हे घडलं नाही. देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने मी स्वतःला अनेक पद्धतींनी ट्रेन केलं होतं. सुरुवातीला माझी कामना होती—मला कोणाला तरी भेटायचं आहे. ती व्यक्ती भेटणार नाही, हे कळलं. मग मी दुसरी दिशा निवडली—‘ठीक आहे. आता तुळजाभवानीला भेटायचं.’ माझ्या मनातल्या अनेक नकारात्मक भावना आणि कामना मी बाजूला सारल्या आणि देवीला भेटणं ही एकच गोष्ट प्राधान्याची केली.
एकटेपणाची भावना बाजूला सारली. रांगेत शांतपणे उभा राहिलो. घाईगडबड केली नाही. हळूहळू पुढे जात राहिलो. आणि गंमत अशी की, जसजसा वेळ पुढे जात होता, तसतशा माझ्या नकारात्मक भावना कमी होत होत्या आणि चांगले विचार वाढत होते. माझ्या मनात अनेक सकारात्मक विचार येत होते. पण मी त्या वेळी दर्शनाच्या रांगेत होतो. त्यामुळे त्या विचारांवर तातडीने कृती करण्याची शक्यता नव्हती. इच्छा निर्माण झाली, पण लगेच कृती झाली नाही. आणि तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली—
एखादी इच्छा निर्माण झाली आणि तिच्यावर तातडीने कृती केली नाही, तर ती इच्छा हळूहळू विरून जाऊ शकते.
‘लवकर दर्शन व्हावं’, ‘लवकर पुढे जावं’, ‘ही रांग कधी संपणार?’—ही भावना सुरुवातीला होती. पण हळूहळू तीही विरून गेली.
रांगेच्या मध्यावर आल्यानंतर परत जाणं अवघड होतं आणि पुढे जाणं आपल्या हातात नव्हतं. मग मी मनाशी म्हटलं—
‘सोडून दे.’
कधी ना कधी मृत्यू येणारच आहे. म्हणून आपण सतत ‘मृत्यू कधी येईल?’ अशी आतुरता बाळगतो का? मृत्यूला भेटण्याची घाई करतो का? नाही. मग देवीचं दर्शन तर आपल्याला शक्ती देणार आहे, आशीर्वाद देणार आहे. मग त्या दर्शनासाठी एवढी आतुरता, एवढी धडपड कशाला? भेटायचं आहे. एवढंच.
या भावनेतून मी रांगेत उभा राहिलो.
आणि शेवटी देवीसमोर पोहोचलो.
ज्या कामना घेऊन मी देवीसमोर उभा राहणार होतो, त्या सगळ्या तिथे विरून गेल्या.
प्रबोधिनीचं काम वाढावं. गीतेचं ज्ञान वाढावं. माझ्याकडून अधिक चांगलं काम घडावं. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता यावं. प्रकृती चांगली राहावी. अधिक कार्यक्षम व्हावं. सगळे विचार होते.
पण देवीसमोर गेल्यावर—काहीच मागावंसं वाटलं नाही. फक्त पाहिलं. फक्त भेटलो. आणि बाहेर आलो.
त्या क्षणापुरतंच नव्हे, तर त्यानंतर बसमध्ये बसेपर्यंत आणि थेट आंबेजोगाईला पोहोचेपर्यंत माझ्या मनात कुठलीही अनावश्यक कामना निर्माण झाली नाही.
जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भावना होत्याच—पाणी प्यावंसं वाटणं, एवढं. बाकी काही नाही.
पूर्ण प्रवासात मी मोबाईल उघडला नाही. फेसबुक उघडलं नाही. व्हॉट्सॲप उघडलं नाही. मी फक्त स्वतःचं अस्तित्व अनुभवत होतो. आजूबाजूचं अस्तित्व अनुभवत होतो. भोवताल सतत बदलत होता. दृश्यं बदलत होती. वातावरण बदलत होतं. माझ्या मनातले विचार बदलत होते. आणि त्या बदलालाच मी एन्जॉय करत होतो. माझ्यात एक विशिष्ट लय निर्माण झाली होती. त्या लयीमध्ये मी होतो. त्या लयीचा आनंद घेत होतो.
सकाळी जेवण झालेलं होतं. त्या दोन भुजियाच्या पाकिटांव्यतिरिक्त आंबेजोगाईला पोहोचेपर्यंत फारसं काही खावंसंही वाटलं नाही. फक्त पाणी पीत राहिलो.
आणखी एक प्रसंग या अवस्थेची जाणीव करून देणारा होता.
लातूरहून आंबेजोगाईला येताना प्रायव्हेट बसमध्ये काही मद्यपी चढले. ते मोठमोठ्याने शिव्या देत होते. अशा वेळी मला नेहमी खूप चीड येते. विशेषतः आई-माईवरून शिव्या दिल्या की मी प्रचंड चिडतो. ड्रायव्हरला सांगावंसं वाटतं—‘या प्रवाशांना खाली उतरवा; नाहीतर मीच उतरतो.’
पण त्या दिवशी?
काहीच परिणाम झाला नाही. शिव्या कानावर पडत होत्या, पण मनावर पडत नव्हत्या. जणू मी त्या ऐकतच नव्हतो.
तेव्हा मला पुन्हा जाणवलं—
मन शांत असणं म्हणजे बाहेर काही घडत नाही असं नाही. बाहेर सगळं घडत असतं; पण त्याचा आपल्या आत किती प्रवेश होतो, हे बदलतं.
घरी आल्यानंतर मी या सगळ्या अनुभवाचा विचार करू लागलो.
तुळजाभवानीचं मंदिर बाहेर होतं. देवीची मूर्ती बाहेर होती. तिच्यामध्ये मला ईश्वरत्व जाणवत होतं.
पण मग एक प्रश्न उभा राहिला—
तेच ईश्वरत्व माझ्यात नाही का?
माझ्यातही तोच सच्चिदानंदस्वरूप परमात्मा आहे. तो फक्त देवीच्या मूर्तीमध्ये नाही. माझं शरीरसुद्धा एक मंदिर आहे.
जर तो परमात्मा सतत माझ्याजवळच आहे, तर मग प्रत्येक वेळी बाहेरच्या मंदिरात जाऊनच अशी अवस्था निर्माण करण्याची गरज का पडावी?
मी माझ्या आतल्या त्या सच्चिदानंदाशी तेवढ्याच तन्मयतेने जोडला गेलो, त्याच्यापुढे तेवढ्याच शरणतेने उभा राहिलो, तर अशीच एक लयबद्ध, शांत, पूर्ण, तृप्त अवस्था माझ्यात निर्माण होऊ शकत नाही का?
‘आत्मन्येवात्मना तुष्टः’ ही अवस्था बाहेरच्या दर्शनानंतरच का यावी?
ती आतून का येऊ नये?
तुळजापूरच्या त्या एका दर्शनाने मला गीतेतील या श्लोकाचा अर्थ पुस्तकाच्या पानावरून उठून माझ्या अनुभवात आणून दिला.
मला जाणवलं—कामना नसणं म्हणजे माणूस निष्क्रिय होणं नव्हे.
अर्जुनाला युद्ध करायचंच आहे. त्याला बाण सोडायचाच आहे. त्याला निर्णय घ्यायचेच आहेत. त्याला बुद्धी वापरायचीच आहे. कृती थांबवायची नाही.
मग कामनारहितपणा म्हणजे काय?
कृतीच्या आधी मनाची जी आतुर धडपड असते, ती नाहीशी होणं.
काहीतरी मिळाल्याशिवाय मी पूर्ण नाही, ही भावना नाहीशी होणं.
बाहेरच्या वस्तूंनी, लोकांनी, परिस्थितींनी, कौतुकाने, यशानेच मला तृप्त करावं, ही अपेक्षा कमी होणं.
आणि त्याऐवजी—
‘मी माझ्यात पूर्ण आहे’ अशी एक आतली जाणीव निर्माण होणं.
म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध सोडायला सांगत नाही.
तो त्याला युद्ध करतानाही मनाची अशी अवस्था साधण्याचं शास्त्र सांगतो.
अर्जुनाच्या हातात गांडीव आहे. समोर युद्ध आहे. कृती अपरिहार्य आहे. पण मनामध्ये असलेली आसक्ती, भय, मोह, अस्वस्थता, अहंकार आणि फलाची आतुरता यांच्यावर विजय मिळवता येतो.
कर्म थांबत नाही; कामना शुद्ध होते.
कृती थांबत नाही; अंतर्मनाची धडपड थांबते.
जगणं थांबत नाही; पण जगण्यासाठी सतत बाहेरून काहीतरी मिळवण्याची गरज कमी होते.
तुळजापूरच्या त्या दिवशी मला याची एक छोटीशी झलक मिळाली.
देवीसमोर उभा असताना मी काही मागितलं नाही. दर्शनानंतर काही घ्यावंसं वाटलं नाही. प्रवासात मोबाईल उघडावासा वाटला नाही. कोणाशी वाद घालावासा वाटला नाही. शिव्या ऐकून चिडावंसं वाटलं नाही. भोवताल बदलत होता, मन बदलत होतं, विचार बदलत होते—पण त्या सगळ्याच्या पलीकडे एक शांत लय होती.
आणि त्या लयीमध्ये एक विलक्षण तृप्ती होती.
कदाचित स्थितप्रज्ञ होणं म्हणजे एखाद्या दिवशी अचानक सर्व इच्छा कायमच्या संपून जाणं नव्हे.
कदाचित ती एक साधना आहे. इच्छा निर्माण होते. आपण तिला लगेच कृतीत आणत नाही. ती थोडी विरते. पुन्हा दुसरी इच्छा येते. आपण तिच्याकडे पाहतो. तिच्याबरोबर वाहून जात नाही.
हळूहळू मनाला कळू लागतं—
‘प्रत्येक इच्छा पूर्ण केलीच पाहिजे असं नाही.’
आणि त्याही पुढे—
‘प्रत्येक गोष्ट मिळाली तरच मी तृप्त होईन असंही नाही.’
याच टप्प्यावर ‘आत्मन्येवात्मना तुष्टः’ या वाक्याचा अर्थ उलगडायला लागतो.
तुळजाभवानीला भेटायला मी गेलो होतो.
पण परतताना मला जाणवलं—देवीला भेटणं म्हणजे कदाचित बाहेरच्या मंदिरात जाऊन मूर्ती पाहणं एवढंच नाही.
त्या दर्शनाच्या निमित्ताने आपल्या आत असलेल्या परमात्म्याची, आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची, आपल्या मनाच्या सामर्थ्याची आणि आपल्या तृप्तीची ओळख होणं—हेही दर्शनच आहे.
आणि त्या दिवशी तुळजापूरहून आंबेजोगाईकडे परतताना माझ्या मनात एकच वाक्य पुन्हा पुन्हा उमटत होतं—
‘काय घ्यायचं?’
आणि आतून उत्तर येत होतं—
‘काहीच नाही. जे आहे, ते पुरेसं आहे.’
त्या क्षणी मला केवळ ‘आत्मन्येवात्मना तुष्टः’ या एका चरणाचा अनुभव आला असं नाही, तर ‘प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान्’ हा श्रीकृष्ण सांगत असलेला अनुभव प्रत्यक्ष जगता येऊ शकतो, याची माझ्या मनात पक्की खात्री निर्माण झाली. कामना निर्माण होणं हा मनाचा स्वाभाविक भाग आहे; पण प्रत्येक कामनेच्या मागे धावत जाणं अपरिहार्य नाही. तिला पाहता येतं, तिच्याबरोबर वाहून न जाता तिला विरू देता येतं. आणि कामना विरून गेल्यानंतर बाहेरून काही मिळवण्याची धडपड उरत नाही; उरते ती एक विलक्षण, शांत आणि आतून आलेली तृप्ती.
कदाचित स्थितप्रज्ञतेचा हा प्रवास असाच असावा—कामना विरून जाण्यापासून सुरू होणारा आणि शेवटी ‘जे आहे, ते पुरेसं आहे’ या अंतर्मनातील तृप्तीपर्यंत पोहोचणारा.
‘आत्मन्येवात्मना तुष्टः’—ही केवळ वाचायची ओळ नाही; तिचा अनुभव घेता येतो.
आणि तुळजापूरच्या त्या एका दिवसाने मला हे पक्केपणाने जाणवून दिलं—‘प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान्’ हा श्रीकृष्णाने सांगितलेला पूर्ण अनुभव केवळ कल्पना नाही. तो माणसाला प्रत्यक्ष अनुभवता येतो. कामना विरून जाऊ शकतात आणि त्यांच्या जागी काहीतरी मागण्याची, मिळवण्याची धडपड न राहता आतून आलेली तृप्ती उरू शकते. त्या दिवशी तुळजापूरच्या दर्शनातून मला या श्लोकाचा अर्थ समजला नाही; तो मला अनुभवायला आला. आणि म्हणूनच या अवस्थेबाबत आता माझ्या मनात केवळ प्रश्न नाही—एक पक्का अनुभव आणि विश्वास आहे.’
दुःखातून उद्वेगरहित मनाकडे : स्थितप्रज्ञतेची वाट
गीता दर्शन : श्रीमद् भगवद्गीता — अध्याय दुसरा : सांख्ययोग
भाग ७७ | १५ सप्टेंबर २०२६
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥
दुःख आलं की आपल्याला दुःख होतं. हे अगदी स्वाभाविक आहे. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो—आपल्याला दुःख नेमकं कधी होतं?
आपल्या आयुष्यातल्या अतिशय अवघड दुःखांकडे थोडं मागे वळून पाहिलं, तर एक गोष्ट जाणवते. माझ्या अस्तित्वामध्ये जेव्हा विसंवाद निर्माण होतो, तेव्हा मला दुःख होतं.
माझं शरीर एका विशिष्ट लयीत, सुसंवादात असतं. शरीरातील वेगवेगळ्या संस्था आणि प्रक्रिया—चयापचय, रक्ताभिसरण, श्वसन अशा अनेक जैविक प्रक्रिया—आपापल्या लयीत चालू असतात. या लयीमध्ये बिघाड झाला, तर शरीर अस्वस्थ होतं.
तसंच मनाचंही आहे. मनात शांतता आणि सुसंवाद असेल, तर आपण स्थिर असतो. पण मनाची लय ढळली, विचारांचा गोंधळ वाढला, भावनांमध्ये संघर्ष निर्माण झाला, तर आपल्याला दुःख जाणवतं. बुद्धीचा तोल गेला, सारासार विचार करण्याची क्षमता कमी झाली, तरी अस्वस्थता निर्माण होते. म्हणजेच आपल्या शरीरात, प्राणिक प्रक्रियांमध्ये, मनात आणि बुद्धीत असलेला सुसंवाद जेव्हा बिघडतो, तेव्हा निर्माण होणाऱ्या अवस्थेला आपण ‘प्रतिकूल अवस्था’ म्हणू शकतो.
मग ही प्रतिकूल अवस्था निर्माण कशामुळे होते?
मुख्यतः दोन कारणं असतात.
एक म्हणजे आपण स्वतः तिचं कारण असतो. आणि दुसरं म्हणजे आपल्या नियंत्रणाबाहेरचे बाह्य घटक तिचं कारण असतात. कधी आपल्या चुकीच्या निर्णयांमुळे, चुकीच्या सवयींमुळे किंवा चुकीच्या कृतींमुळे आपण दुःखी होतो. तर कधी एखादी व्यक्ती, एखादी परिस्थिती किंवा सृष्टीतील एखादी अनपेक्षित घटना आपल्या हातात काहीही नसताना आपल्यावर दुःख आणते. म्हणजे दुःख कधी आपल्या हातून निर्माण होतं, तर कधी ते बाहेरून आपल्यावर येतं. आणि खरं पाहिलं तर जन्माला आलेल्या कोणत्याही माणसाचं आयुष्य दुःखापासून मुक्त नसतं. मग काही माणसं दुःखाने खचून का जातात आणि काही माणसं त्याच दुःखातून शिकून अधिक समर्थ का होतात? याचं उत्तर कदाचित दुःखात नसून दुःखाला सामोरं जाणाऱ्या आपल्या अंतर्गत ताकदीमध्ये आहे.
प्रतिकूल अवस्था थोड्या वेळासाठी आली आणि निघून गेली, तर फारसा प्रश्न निर्माण होत नाही. पण ती अवस्था दीर्घकाळ टिकली, शरीरामध्ये अस्वस्थता निर्माण करत राहिली, मनावर ताण वाढवत राहिला आणि बुद्धीला सतत संघर्ष करावा लागला, तर दुःखाची तीव्रता वाढत जाते. माणूस अधिकाधिक विचलित होऊ लागतो.
दुःख आलं की माणूस सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो.
‘थोड्या वेळाने बरं वाटेल.’ ‘उद्या सगळं ठीक होईल.’
पण दुःख कमी झालं नाही, तर तो त्याचा विचार करू लागतो. त्यावर उपाय शोधतो. उपायांनीही प्रश्न सुटला नाही, तर इतरांची मदत घेतो. आणि हे सगळं करूनही दुःख कमी होत नसेल, तर अस्वस्थता वाढते. माणसाला आपलं दुःख लवकरात लवकर संपावं, असंच वाटतं.
पण इथे एक सूक्ष्म गोष्ट लक्षात येते.
दुःखाचं कारण माहीत असेल, तर त्याची तीव्रता काही प्रमाणात कमी भासते. पण कारणच कळत नसेल, तर माणूस अधिक अस्वस्थ होतो. दुःख किती काळ टिकणार आहे, याचा काही अंदाज असेल, तरी माणूस त्याला सामोरं जाण्याची मानसिक तयारी करू शकतो. पण ते किती काळ टिकेल, किती वाढेल, त्याची परिणती काय होईल—याचीच कल्पना नसेल, तर मन अधिक अस्वस्थ होतं. जर त्या दुःखाची परिणती सर्वस्व गमावण्यात होणार आहे, असं वाटलं, तर माणूस पूर्णपणे हताश होऊ शकतो. म्हणूनच दुःख आल्यानंतर माणूस कसा वागतो, यावरून त्याची खरी ताकद लक्षात येते.
इथेच भगवद्गीता आपल्याला एक विलक्षण दिशा दाखवते.
श्रीकृष्ण स्थितप्रज्ञाचं वर्णन करताना म्हणतात—
‘दुःखेष्वनुद्विग्नमनाः’
म्हणजे दुःखाच्या प्रसंगी ज्याचं मन उद्विग्न होत नाही. इथे ‘दुःख होत नाही’ असं श्रीकृष्ण म्हणत नाहीत. हे फार महत्त्वाचं आहे.
स्थितप्रज्ञ माणसाला दुःख जाणवतच नाही, असं नाही. शरीराला वेदना होतील, मनाला आघात होतील, परिस्थिती प्रतिकूल होईल. दुःख येणारच. पण दुःख आल्यानंतर मनाचा उद्वेग वाढू न देणं, हे स्थितप्रज्ञतेचं लक्षण आहे.
मग उद्वेग म्हणजे काय?
हतबल होणं. चिडचिड होणं. अस्वस्थ होणं. तेच विचार पुन्हा पुन्हा मनात घोळवत राहणं. ‘माझ्याच वाट्याला हे का आलं?’ असा प्रश्न सतत विचारत राहणं. परिस्थितीचा सारासार विचार न करता ‘हे दुःख आत्ताच संपलंच पाहिजे’ असा हट्ट धरणं.
दुःखातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणं चुकीचं नाही. उलट प्रयत्न करणं आवश्यकच आहे. पण प्रयत्न आणि उद्वेग यांच्यात फरक आहे. प्रयत्न म्हणजे परिस्थिती समजून घेऊन कृती करणं. उद्वेग म्हणजे परिस्थितीचा स्वीकार न करता मनाने तिच्याशी सतत संघर्ष करत राहणं.
म्हणून ‘दुःखेष्वनुद्विग्नमनाः’ याचा अर्थ दुःखापासून पळून जाणं नाही; दुःखात बुडून जाणंही नाही. तर दुःखाच्या मध्यभागी राहूनही मनाचा तोल जाऊ न देणं.
पण ही ताकद येते कुठून?
यासाठी शरीर, मन आणि बुद्धी यांना सक्षम करावं लागतं. आपल्याला सुसंवादी आयुष्य हवं असतं. शरीर निरोगी असावं, मन शांत असावं, बुद्धी स्थिर आणि सारासार विचार करणारी असावी, असंच आपल्याला वाटतं. पण जीवनात कायम अनुकूल परिस्थिती मिळणार नाही.
दुःख अपरिहार्य आहे. मग दुःख टाळण्यापेक्षा दुःखाला सामोरं जाण्याची आपली क्षमता वाढवणं अधिक महत्त्वाचं ठरतं. यासाठी व्यायाम हा एक सुंदर मार्ग आहे. व्यायाम म्हणजे शरीराला दिलेलं एक छोटंसं आव्हान.
आपण नेहमी आरामात राहिलो, तर शरीराची क्षमता वाढणार नाही. शरीराला थोडं आव्हान दिलं, थोडी मेहनत घेतली, थोडा थकवा स्वीकारला, तर शरीर अधिक सक्षम होतं.
हेच मनाचं. मनालाही आव्हानं हवीत. हेच बुद्धीचं. बुद्धीलाही विचार करायला, प्रश्न विचारायला, मतभेद सहन करायला आणि कठीण निर्णय घ्यायला शिकवलं पाहिजे.
म्हणजेच आपण स्वतःहून शरीर, मन आणि बुद्धीला छोटी-छोटी आव्हानं दिली, तर भविष्यात आयुष्याने दिलेल्या मोठ्या आव्हानांना सामोरं जाण्याची ताकद निर्माण होते.
शरीर सुदृढ असेल तर मनावर त्याचा परिणाम होतो. मन खंबीर असेल तर बुद्धी अधिक समर्थपणे काम करते. आणि बुद्धी स्थिर असेल, तर शरीर-मनाच्या प्रतिकूल अवस्थांकडेही आपण अधिक समतोलपणे पाहू शकतो. या तिन्हींचा परस्परांशी घनिष्ठ संबंध आहे. यासाठी एक साधं उदाहरण पुरेसं आहे. आपल्याकडे दहा लाख रुपये असतील आणि त्यातून दहा रुपये हरवले, तर आपल्याला फारसं दुःख होणार नाही. कारण आपली आर्थिक ताकद त्या दहा रुपयांच्या नुकसानीपेक्षा कितीतरी मोठी आहे.
त्याचप्रमाणे आपल्या मनाची ताकद दुःखापेक्षा मोठी झाली, तर दुःख आपल्याला मोडून काढू शकत नाही. दुःख येईल, पण आपण त्याला पचवू शकतो. ते येईल, पण त्याचा कालावधी कमी करू शकतो. ते पुन्हा पुन्हा येईल, तरी त्याच्या प्रत्येक लाटेबरोबर आपण वाहून जाण्याची गरज नाही. म्हणून दुःखमुक्तीचा अर्थ आयुष्यात दुःखच नसणं असा नाही.
दुःखमुक्तीचा अधिक खोल अर्थ असा असू शकतो—दुःख आलं तरी त्याने आपल्या अंतःकरणाचा सुसंवाद भंगू न देणं. दुःख आलं तरी बुद्धीचा तोल न जाऊ देणं.प्रतिकूलता आली तरी मनाचा उद्वेग वाढू न देणं.परिस्थिती बदलण्याची गरज असेल, तर शांत मनाने आवश्यक ते प्रयत्न करणं.
म्हणूनच गीतेतील ‘दुःखेष्वनुद्विग्नमनाः’ हे केवळ दुःख सहन करण्याचं सूत्र नाही; ते आंतरिक सामर्थ्य निर्माण करण्याचं सूत्र आहे.
दुःख येणारच.
प्रश्न एवढाच आहे—
दुःख मोठं आहे की माझी अंतर्गत ताकद मोठी आहे? शरीराला रोज थोडं आव्हान देऊया. मनाला रोज थोडं आव्हान देऊया. बुद्धीलाही रोज थोडं आव्हान देऊया. कारण आयुष्य आपल्याला कधी ना कधी मोठी आव्हानं देणारच आहे. त्या वेळी दुःख नष्ट होईलच असं नाही; पण दुःखाच्या मध्यभागीही मन स्थिर ठेवण्याची ताकद आपल्यात निर्माण झालेली असेल.
कदाचित स्थितप्रज्ञतेची सुरुवात तिथूनच होते—
‘दुःखेष्वनुद्विग्नमनाः’—
दुःख आहे, पण मन उद्विग्न नाही.
दुःखात उद्वेग नाही, सुखात स्पृहा नाही : स्थितप्रज्ञतेकडे जाणारा मार्ग
गीता दर्शन : श्रीमद्भगवद्गीता – दुसरा अध्याय, सांख्य योग
भाग ७८ | १६ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥
काल आपण दुःखाचा विचार केला, दुःखाची मीमांसा केली. आज थोडा विचार करूया—सुखाचा. सुख म्हणजे नेमकं काय असतं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, आपल्याला पाहिजे तसं काही घडणं म्हणजे सुख. आपल्या मनामध्ये सुसंवाद निर्माण होणं, मन स्थिर होणं, एखाद्या गोष्टीमुळे आनंद मिळणं, समाधान मिळणं—ही सुखाची वेगवेगळी रूपं आहेत. सुख मिळालं की छान वाटतं, मस्त वाटतं, आपण काहीतरी साध्य केलं, काहीतरी मिळवलं, आपली प्रगती होते आहे, असं वाटतं. दुःख जसं आपल्याला नकोसं वाटतं, तसंच सुख आपल्याला हवंहवंसं वाटतं. आपल्या मनामध्ये जसे चांगले आणि वाईट विचार येत असतात, तसेच आपल्या आयुष्यात सुख आणि दुःखही येत असतात. चांगले-वाईट विचार मिळून जसं आपलं मन बनतं, तसंच सुख-दुःख मिळून आपलं आयुष्य बनतं.
मग माणसाचं आयुष्य सुखी असू नये का? नक्कीच असावं—शंभर टक्के सुखी असावं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते. ज्या गोष्टींमुळे दुःख निर्माण होतं, त्यांच्यामुळेच प्रश्न निर्माण होतात असं नाही; कधी कधी सुख देणाऱ्या गोष्टींमधूनही नवीन प्रश्न निर्माण होतात. सुख आणि दुःख समजून घेताना मला तीन शब्द फार महत्त्वाचे वाटतात—तीव्रता, वारंवारिता आणि कालावधी. एखादी गोष्ट किती तीव्र आहे, ती किती वेळा घडते आणि किती काळ टिकते, यावर त्या अनुभवाचं स्वरूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतं. कुठल्याही अनुभवाच्या बाबतीत हे तीन घटक महत्त्वाचे ठरतात.
सुखाच्या बाबतीत आपली सुरुवात अगदी साध्या गोष्टींपासून होते. छान झोप लागावी, चांगलं जेवायला मिळावं, चांगले कपडे घालता यावेत, आपल्या मनासारख्या गोष्टी घडाव्यात, त्रास होऊ नये, दुःख दूर राहावं आणि आनंद वाढत राहावा—ही माणसाची अगदी स्वाभाविक इच्छा आहे. आधुनिक मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर आनंददायी अनुभवांमधून मेंदूमध्ये विविध जैवरासायनिक प्रक्रिया घडतात आणि डोपामाइनसारख्या न्यूरोट्रान्समीटरची त्यामध्ये भूमिका असते. त्यामुळे पुन्हा पुन्हा आनंददायी अनुभव मिळावेत, अशी ओढ निर्माण होऊ शकते. यात काही चुकीचं नाही. सुख हवं असणं ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. पण सुखाकडे पाहण्याच्या दोन वेगळ्या मानसिकता असू शकतात. एक मानसिकता अशी की, “मला छान वाटणं हे बाहेरच्या जगावर अवलंबून आहे,” आणि दुसरी अशी की, “मला छान वाटणं हे काही प्रमाणात माझ्या अंतर्मनाच्या स्थितीवरही अवलंबून आहे.”
प्रश्न निर्माण होतात तेव्हा, जेव्हा सुखासाठी आपण पूर्णपणे बाह्य जगावर अवलंबून राहतो. कारण बाहेरच्या जगातील कितीतरी गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. लोकांचं वागणं, परिस्थिती, पैसा, प्रतिष्ठा, इतरांच्या अपेक्षा अशा अनेक गोष्टी आपण पूर्णपणे नियंत्रित करू शकत नाही. म्हणूनच एक महत्त्वाचा प्रश्न आहे—आपल्या नियंत्रणात काय आहे आणि आपल्या नियंत्रणाबाहेर काय आहे? आपल्या क्षमतेच्या आत असलेल्या गोष्टींसाठी प्रयत्न करणं आणि आपल्या क्षमतेबाहेर असलेल्या गोष्टींचा अट्टाहास न करणं, ही सुखाकडे पाहण्याची अधिक परिपक्व दिशा आहे. सुख मिळावं का? नक्कीच मिळावं. सुखाशिवाय आयुष्य असू शकतं का? अजिबात नाही. सुख मिळतं का? नक्कीच मिळतं. पण मग प्रश्न असा निर्माण होतो की, सुखाची तीव्रता अधिकाधिक वाढत जावी, सुखाची वारंवारिता वाढत जावी आणि सुखाचा कालावधीही वाढत जावा, यासाठीच आपण सतत धावत राहायचं का?
सुखातून आपल्याला समाधान मिळतं, तृप्ती मिळते, आनंद मिळतो. पण या सगळ्यापेक्षा एक मोठी अवस्था अशी असू शकते का, की आपली अंतःकरणाची स्थितीच अशी तयार व्हावी की प्रत्येक क्षण अधिक अर्थपूर्ण, समाधानकारक आणि तृप्त करणारा वाटावा? प्रत्येक क्षण आनंदाचा असण्याची गरज नाही; पण प्रत्येक क्षण सार्थक असू शकतो. आपलं संपूर्ण आयुष्यच जर तृप्तीच्या तीर्थोदकासारखं झालं, तर सुखाच्या मागे सतत धावण्याची गरज किती उरेल? इथे दोन मार्गांमधला फरक स्पष्ट होतो. पहिल्या मार्गात छोट्या-छोट्या गोष्टी करायच्या, त्यातून आनंद घ्यायचा आणि पुन्हा पुढच्या छोट्या सुखाच्या शोधात जायचं. दुसऱ्या मार्गात सुरुवातीला स्वतःवर काम करावं लागतं, थोडा प्रयत्न करावा लागतो, स्वतःचा विकास करावा लागतो आणि सुख-दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागतो. प्रयत्न न करता सुख मिळावं, ही अपेक्षा चुकीची आहे. प्रयत्न करावेच लागतात; पण ते प्रयत्न केवळ क्षणिक सुख मिळवण्यासाठी नसून दीर्घकाळ टिकणारी अंतःशांती, समाधान आणि तृप्ती निर्माण करण्यासाठी असतील, तर त्यांचा परिणाम वेगळा असतो.
आणि इथे सुखाची एक दुसरी बाजू समोर येते. सुखातून लालसा निर्माण होऊ शकते. पहिल्यांदा इच्छा निर्माण होते; इच्छेतून ओढ, ओढीतून अपेक्षा, अपेक्षेतून लालसा, लालसेतून वासना, वासनेतून आसक्ती आणि आसक्तीतून तृष्णा निर्माण होऊ शकते. इच्छा असणं चुकीचं नाही. पण इच्छेचं रूपांतर हळूहळू लालसा, वासना, आसक्ती आणि तृष्णेमध्ये होत गेलं, तर सुखच त्रासदायक होऊ लागतं. कारण तृष्णेला सीमा नसते. It is unending. महात्मा गांधींचं एक सुंदर वचन या संदर्भात आठवतं—“Nature can satisfy your need, not greed.” निसर्ग आपल्या गरजा पूर्ण करू शकतो; पण हव्यासाची पूर्तता करू शकत नाही. म्हणून सुखाची आत्यंतिक आसक्ती, सुखाची वासना आणि सुखाची तृष्णा माणसाला एका अस्वस्थ मानसिक अवस्थेकडे घेऊन जाऊ शकते.
याच ठिकाणी भगवद्गीतेतील एक अत्यंत सुंदर शब्द आपल्याला दिशा देतो—“सुखेषु विगतस्पृहः.” स्पृहा म्हणजे इच्छा, लालसा, अभिलाषा, आसक्ती, तृष्णा; आणि विगतस्पृहः म्हणजे या स्पृहेपासून मुक्त झालेला. याचा अर्थ सुख नको असा नाही. सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत; पण सुखाचा अट्टाहास करू नये. आपण सुख मिळवताना इतके हट्टी, आग्रही आणि आसक्त होऊ नये की योग्य मार्ग सोडून अयोग्य मार्ग स्वीकारावा. माझ्या सुखासाठी दुसऱ्याला त्रास होणार नाही ना? दुसऱ्याचं शोषण तर होणार नाही ना? समाजातील सामंजस्य बिघडणार नाही ना? निसर्गाचं शोषण तर होणार नाही ना? हे प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. सुख हवं—पण कोणत्याही किंमतीवर नको. सुख मिळावं; पण त्यासाठी अन्याय, शोषण, हिंसा किंवा असंतुलन निर्माण होऊ नये. हीच विगतस्पृहतेची दिशा आहे.
आणि मग भगवद्गीता पुढे तीन सुंदर शब्द सांगते—“वीतरागभयक्रोधः.” राग, भय आणि क्रोध. हे तीन शब्द वेगळे असले तरी त्यांच्यामध्ये एक मानसिक सलगता दिसते. राग म्हणजे एखाद्या गोष्टीशी निर्माण झालेली तीव्र आसक्ती. ती गोष्ट आपल्याला हवीच आहे, असा आग्रह निर्माण झाला आणि ती मिळाली नाही, तर भय निर्माण होऊ शकतं—“ही गोष्ट माझ्यापासून दूर जाईल का?” आणि ती मिळाली नाही किंवा हिरावली गेली, तर त्यातून क्रोध निर्माण होऊ शकतो. मग माणूस चिडतो, संतापतो, बळजबरी करतो, चुकीचे मार्ग स्वीकारतो. दुसऱ्याला हानी पोहोचवतो आणि शेवटी स्वतःचंही नुकसान करून घेतो. म्हणूनच गीता सांगते—“वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते.” ज्याच्या अंतःकरणात राग, भय आणि क्रोध यांचं अतिक्रमण झालं आहे, ज्याची बुद्धी स्थिर आहे, अशा व्यक्तीला मुनी म्हटलं जातं.
अशी व्यक्ती केवळ स्वतःसाठी चांगली नसते; तिच्या सहवासात इतरांनाही चांगलं वाटतं. तिच्या सहवासात मन शांत होतं, प्रेरणा मिळते, तृप्तीची भावना निर्माण होते. आपल्या मनातल्या अनेक अगतिकता तिच्या सहवासात कमी होतात. आपल्या जीवनाला दिशा मिळते, विचारांना दिशा मिळते आणि दृष्टिकोन बदलतो. अशी व्यक्ती म्हणजे स्थितप्रज्ञ. भगवद्गीतेतील हा संपूर्ण श्लोक म्हणूनच अत्यंत अर्थपूर्ण आहे—“दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥” दुःख आलं म्हणून मन उद्विग्न होऊ नये आणि सुख आलं म्हणून त्याची लालसा, आसक्ती, तृष्णा वाढू नये. राग, भय आणि क्रोध यांच्यापासून मन मुक्त होत जावं आणि बुद्धी स्थिर व्हावी. ही केवळ एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक साधना नाही; हा तर समाजाच्या परिवर्तनाचा विचार आहे.
असे एक-दोन माणसं होऊन भागणार नाही. अशी अनेक माणसं निर्माण झाली पाहिजेत आणि शेवटी संपूर्ण समाजाची मानसिकता अशा दिशेने विकसित झाली पाहिजे. याचा अर्थ सगळे लोक संन्यासी झाले पाहिजेत असा अजिबात नाही. उलट माणसं अतिशय गतिशील असली पाहिजेत, प्रचंड वेगाने काम करणारी असली पाहिजेत, सगळ्यांच्या भल्यासाठी काम करणारी असली पाहिजेत आणि सृष्टीच्या समत्वासाठी प्रयत्न करणारी असली पाहिजेत. पण हे सगळं करताना अंतर्मनात संतुलन आणि बाहेरच्या जगाशी सामंजस्य असलं पाहिजे. व्यक्तीमधली हार्मोनी आणि समाजामधली हार्मोनी एका सुंदर लयीमध्ये आली पाहिजे.
कदाचित सुखाची खरी मीमांसा इथेच आहे. सुख म्हणजे केवळ आपल्याला हवं तसं घडणं नव्हे; तर जे घडतं त्याकडे पाहण्याची आपली अंतःस्थिती अशी विकसित होणं, की सुखात आसक्ती नको आणि दुःखात उद्वेग नको. सुख मिळावं, पण त्याची तृष्णा नको. प्रगती व्हावी, पण तिच्यासाठी अन्याय नको. यश मिळावं, पण त्यासाठी दुसऱ्याचं नुकसान नको. आनंद मिळावा, पण तो केवळ बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून नसावा. आणि शेवटी आपण सुखाच्या मागे धावणारे न राहता तृप्ती निर्माण करणारे व्हावं.
हीच भगवद्गीतेची दिशा आहे. ही दिशा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आपण सगळे भगवद्गीतेचे प्रतिनिधी बनूया, भगवद्गीतेच्या विचारांचे प्रतिनिधी बनूया. स्वतःच्या जीवनात हा विचार जगूया आणि अनेकांपर्यंत पोहोचवूया. दुःखात उद्वेग नाही, सुखात स्पृहा नाही; राग, भय आणि क्रोधापासून मुक्त होत स्थिर बुद्धीने, सामंजस्याने आणि तृप्तीने जगणं—हीच स्थितप्रज्ञतेकडे जाणारी वाट आहे.
शुभ-अशुभाच्या पलीकडे : समत्वातून स्थितप्रज्ञतेकडे
गीता दर्शन : श्रीमद्भगवद्गीता – दुसरा अध्याय, सांख्य योग
भाग ७९ | १७ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
व्यक्तीला स्वतःचे एक स्वतंत्र अस्तित्व आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या बाह्य जगाचेही एक स्वतंत्र अस्तित्व आहे. व्यक्तीचे स्वतःशी असलेले नाते आणि बाह्य जगाशी असलेले नाते—या दोन्ही नात्यांमध्ये समतोल असणे आवश्यक आहे. हा समतोल बिघडला की जीवनात गडबड सुरू होते.
व्यक्तीच्या मनात निर्माण होणाऱ्या कामना, इच्छा आणि अपेक्षा यांचेही स्वतःशी एक नाते असते. या कामना जेव्हा प्रमाणाबाहेर जातात, तेव्हा माणसाचा अंतर्गत तोल ढासळू लागतो. कारण या कामनाच माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख निर्माण करतात.
मात्र सुख-दुःख निर्माण होणे ही एक गोष्ट आहे आणि त्यांच्याकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, ही त्याहून महत्त्वाची गोष्ट आहे. सुख-दुःखाकडे पाहताना आपली बुद्धी कशी आहे? आपले विचार कसे आहेत? आपण त्यांच्यामुळे वाहवत जातो की त्यांच्याकडे समत्वाने पाहतो? स्थितप्रज्ञतेच्या दिशेने वाटचाल करताना हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे ठरतात.
मागील काही लेखांमध्ये आपण दुःखात उद्वेग न होणे आणि सुखात स्पृहा न ठेवणे, या स्थितप्रज्ञाच्या लक्षणांचा विचार केला. आज श्रीकृष्ण आपल्याला त्याच विचाराचा पुढचा टप्पा समजावून सांगतात.
यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् ।
नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥
— श्रीमद्भगवद्गीता २.५७
या श्लोकाचा साधा अर्थ असा आहे की, जो मनुष्य सर्वत्र अति-आसक्तीपासून मुक्त असतो आणि त्याला शुभ-अशुभ गोष्टी प्राप्त झाल्या तरी तो त्यांचा अति आनंदाने स्वीकार करत नाही किंवा त्यांचा द्वेषही करत नाही, त्याची प्रज्ञा स्थिर झालेली असते.
या श्लोकातील प्रत्येक शब्द आपल्याला जीवनाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देतो.
अनभिस्नेह : आसक्तीपासून मुक्त होणे
श्रीकृष्ण म्हणतात, 'यः सर्वत्रानभिस्नेहः'—जो मनुष्य सर्वत्र अनभिस्नेह असलेला आहे.
'अभिस्नेह' म्हणजे एखाद्या व्यक्तीशी, वस्तूशी किंवा परिस्थितीशी असलेली अति-आसक्ती, अंध मोह किंवा तीव्र मानसिक चिकटून राहण्याची वृत्ती. 'अनभिस्नेह' म्हणजे या अति-आसक्तीपासून मुक्त असणे.
याचा अर्थ असा नाही की माणसाने कोणावर प्रेम करू नये, कोणाशी आपुलकी ठेवू नये किंवा बाह्य जगाशी संबंध तोडून घ्यावेत. उलट, प्रेम, आपुलकी आणि जबाबदारी या मानवी जीवनाच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. परंतु प्रेमाच्या नावाखाली अति-आसक्ती निर्माण झाली, एखादी व्यक्ती किंवा वस्तू आपल्या सुखाचे एकमेव साधन बनली, तर आपला मानसिक समतोल धोक्यात येतो.
माणसाला स्वतःचे अस्तित्व आहे आणि बाह्य जगाचेही अस्तित्व आहे. बाह्य जगाकडून मिळणाऱ्या सुविधा, अनुभव आणि संधी यांचा उपयोग आपल्या विकासासाठी करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्या क्षमतेनुसार बाह्य जगात सकारात्मक योगदानही द्यायचे आहे.
घेणे आणि देणे या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी संतुलित चालल्या पाहिजेत. परंतु कामना केवळ घेण्याच्या असतील आणि देण्याची वृत्ती नसेल, तर बाह्य जगाला आपण आपल्या अस्तित्वापेक्षा अधिक महत्त्व देऊ लागतो. तिथून आसक्ती वाढते आणि समत्व ढासळते.
म्हणून अनभिस्नेह म्हणजे नात्यांपासून पळून जाणे नव्हे; तर नात्यांमध्ये राहूनही आपल्या अंतःकरणाचा समतोल टिकवून ठेवणे.
शुभ आणि अशुभ : जीवनातील अनुकूल आणि प्रतिकूल प्रसंग
श्रीकृष्ण पुढे म्हणतात, 'तत्तत्प्राप्य शुभाशुभम्'—जीवनात शुभ आणि अशुभ गोष्टी प्राप्त झाल्या तरी.
आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. काही घटना आपल्याला अनुकूल वाटतात, तर काही प्रतिकूल.
शुभ म्हणजे सुख, लाभ, विजय, मान-सन्मान, आरोग्य, साथ आणि मनाला आवडणाऱ्या इतर गोष्टी. अशुभ म्हणजे दुःख, तोटा, पराभव, अपमान, आजारपण आणि मनाला नकोशा वाटणाऱ्या गोष्टी.
या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतच राहणार आहेत. कोणाचेही जीवन केवळ शुभ घटनांनी भरलेले नसते आणि कोणाचेही जीवन केवळ अशुभ घटनांनी व्यापलेले नसते. सुख-दुःख, लाभ-हानी, यश-अपयश यांचा अनुभव प्रत्येकाला येत असतो.
प्रश्न असा आहे की, या घटनांमुळे आपल्या मनाची अवस्था काय होते?
शुभ घडले की आपण अतिशय आनंदित होतो, हरखून जातो, त्या आनंदात वाहवत जातो. अशुभ घडले की आपण दुःखी होतो, संतापतो, द्वेष करतो किंवा मन कलुषित करून घेतो. या दोन्ही प्रतिक्रिया आपल्या अंतर्गत समतोलावर परिणाम करतात.
नाभिनन्दति न द्वेष्टि : ना अति-हर्ष, ना द्वेष
श्रीकृष्ण म्हणतात, 'नाभिनन्दति न द्वेष्टि'—शुभ प्राप्त झाले म्हणून अति हर्ष व्यक्त करत नाही आणि अशुभ प्राप्त झाले म्हणून द्वेष करत नाही.
याचा अर्थ सुख मिळाले तरी आनंद मानू नये किंवा दुःख आले तरी त्याची जाणीव ठेवू नये, असा अजिबात नाही. जीवनातील सुखाचा आनंद घेणे स्वाभाविक आहे. दुःख झाले तर दुःख जाणवणेही स्वाभाविक आहे. परंतु या अनुभवांमुळे आपली बुद्धीच अस्थिर होऊ नये, हा या शिकवणीचा गाभा आहे.
शुभ गोष्टी घडल्या म्हणून अति-उल्हासात वाहून जायचे नाही. कारण त्या गोष्टी कायमस्वरूपी राहतीलच असे नाही. त्याचप्रमाणे अशुभ गोष्टी घडल्या म्हणून संताप, द्वेष किंवा निराशेच्या गर्तेत बुडून जायचे नाही. कारण कोणतीही प्रतिकूल परिस्थिती कायमस्वरूपी राहत नाही.
स्थितप्रज्ञ मनुष्य सुख-दुःख अनुभवतो; परंतु त्यांची गुलामगिरी स्वीकारत नाही. तो बाह्य परिस्थितीशी व्यवहार करतो, पण त्याच्या अंतःकरणाची दिशा केवळ बाह्य परिस्थिती ठरवत नाही.
कामना, सुख-दुःख आणि बाह्य जगाशी असलेला समतोल
आपण यापूर्वी 'प्रजहाति यदा कामान्' या श्लोकातून मनातील कामनांचा विचार केला. सर्व दुःखांचे मूळ अवास्तव, अनियंत्रित आणि प्रमाणाबाहेर गेलेल्या कामनांमध्ये असते, हे आपण समजून घेतले.
माणसाला स्वतःच्या विकासासाठी बाह्य जगाची गरज आहे. बाह्य जगातून मिळणाऱ्या सुविधा, ज्ञान, अनुभव आणि संधी यांचा उपयोग करून आपल्याला स्वतःचा विकास करायचा आहे. पण त्याचबरोबर बाह्य जगात काहीतरी सकारात्मक योगदान देण्यासाठीही आपला जन्म झाला आहे.
म्हणजेच, बाह्य जगाकडून केवळ घेत राहणे हा जीवनाचा उद्देश नाही. आपल्या क्षमतेनुसार देणे, निर्माण करणे, सेवा करणे आणि योगदान देणे, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
जेव्हा घेण्याची वृत्ती आणि देण्याची वृत्ती यांच्यात समतोल राहतो, तेव्हा जीवन समृद्ध होत जाते. पण जेव्हा कामना केवळ घेण्याच्या राहतात, तेव्हा बाह्य जगाशी असलेले आपले नाते असंतुलित होते.
अशा वेळी बाह्य जगातील एखादी व्यक्ती, वस्तू, परिस्थिती किंवा घटना आपल्या सुखाचे कारण बनते. ती आपल्या अपेक्षेप्रमाणे घडली तर आपण आनंदित होतो आणि तशी घडली नाही तर दुःखी होतो. अशा प्रकारे आपली मनःशांती बाह्य परिस्थितीच्या ताब्यात जाते.
म्हणूनच श्रीकृष्ण आपल्याला अनभिस्नेहाचा मार्ग सांगतात. बाह्य जगाशी संबंध ठेवायचा, त्याचा उपयोग आपल्या विकासासाठी करून घ्यायचा, त्यात योगदान द्यायचे; पण त्याच्याशी अति-आसक्त होऊन स्वतःचा अंतर्गत समतोल गमवायचा नाही.
स्थितप्रज्ञतेकडे जाणारी वाटचाल
स्थितप्रज्ञता ही एका दिवसात प्राप्त होणारी अवस्था नाही. ही एक क्रमाक्रमाने विकसित होणारी अंतर्गत शक्ती आहे.
पहिल्या टप्प्यात आपण मनातील अनावश्यक आणि अवास्तव कामनांकडे पाहायला शिकतो. त्यानंतर सुख-दुःख निर्माण करणाऱ्या आपल्या अपेक्षा आणि आसक्ती समजून घेतो. पुढे बाह्य जगातील शुभ-अशुभ घटनांमुळे आपली बुद्धी कशी प्रभावित होते, हे पाहतो.
या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट स्पष्ट होते—बाह्य जग बदलत राहणार आहे. परिस्थिती बदलणार आहे. लोकांचे वर्तन बदलणार आहे. लाभ-हानी, यश-अपयश, सुख-दुःख हे जीवनाचा भाग आहेत. परंतु या बदलत्या परिस्थितींमध्येही आपल्या अंतःकरणाचा समतोल टिकवून ठेवणे, हीच खरी साधना आहे.
शुभ गोष्टी घडल्या तर त्यांचा आनंद घ्यावा, कृतज्ञ राहावे; पण त्या आनंदात स्वतःला हरवून बसू नये. अशुभ गोष्टी घडल्या तर त्यातून शिकावे, आवश्यक कृती करावी; पण द्वेष आणि संतापाने मन व्यापून टाकू नये. ज्यावेळी माणूस बाह्य जगाशी व्यवहार करताना प्रेम, जबाबदारी आणि योगदान यांना स्थान देतो, पण अति-आसक्तीपासून स्वतःला मुक्त ठेवतो, त्यावेळी त्याची बुद्धी स्थिर होऊ लागते.
आणि म्हणूनच श्रीकृष्ण शेवटी म्हणतात—
तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता—त्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे.
स्थितप्रज्ञता म्हणजे जीवनातील सुख-दुःख नष्ट होणे नव्हे. तर सुख-दुःखांच्या अनुभवांमध्येही आपली बुद्धी, विवेक आणि अंतर्गत समतोल टिकून राहणे होय.
आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया—माझ्या आयुष्यातील कोणत्या व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थितीशी माझी आसक्ती इतकी वाढली आहे की तिच्यामुळे माझे सुख-दुःख ठरते? आणि त्या आसक्तीच्या पलीकडे जाऊन, बाह्य जगाशी समतोल राखत मी स्वतःचा विकास आणि योगदान कसे वाढवू शकतो?
या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर शोधण्यापासून स्थितप्रज्ञतेच्या दिशेने आपली खरी वाटचाल सुरू होते.
इंद्रियांचे स्वामी की इंद्रियांचे गुलाम?
गीता दर्शन : श्रीमद्भगवद्गीता – दुसरा अध्याय, सांख्य योग
भाग ८० | १८ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
संध्याकाळची वेळ आहे. निसर्ग शांत होत आहे. शांत हवेची झुळूक अंगावरून जात आहे. अशा परिस्थितीत संथ आणि निर्मळ वाहणाऱ्या नदीच्या किनारी असणाऱ्या मंदिरामध्ये देवदर्शन करून आपण मंदिराच्या समोरच्या ओट्यावर बसलेलो आहोत. कशी स्थिती असेल आपली? डोक्यातले विचार कसे असतील?
दुसरी कल्पना करूया. अतिशय गाढ झोप झालेली आहे. पूर्ण विश्रांती झालेली आहे. सकाळी उठलो, मस्त तोंड धुऊन शांतपणे ध्यानाला बसलो. कशी परिस्थिती असेल आपली?
आता कन्याकुमारीचा तो अफाट समुद्र आठवूया. शिलास्मारकावर जाण्यासाठी त्या अफाट समुद्रातून नावेतून हळूहळू जात आहोत. श्रीपाद शिलेचं दर्शन घेतलं, स्वामीजींचं दर्शन घेतलं आणि हळूच त्या शिलेवरच्या ध्यानमंडपामध्ये जाऊन बसलो. तिथे ते ओंकाराचं चित्र आहे आणि आतमध्ये बरीच शांतता आहे. कशी स्थिती असेल आपली?
आपण सहज असा विचार करू शकतो की, या वरच्या तीन स्थितींमध्ये आपल्या इंद्रियांची स्थिती कशी असेल?
आता याच्या अगदी विरुद्ध परिस्थितीची कल्पना करूया. आपण महानगरातल्या एका मस्त मॉलमध्ये गेलेलो आहोत. तिथली रंगबिरंगी दुनिया, कानाला ऐकू येणारं संगीत, विविध प्रकारच्या आकर्षक पद्धतीने ठेवलेल्या वस्तू, शॉपिंग करत करत जवळच्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तयार होणाऱ्या पदार्थांचा खमंग, चमचमीत वास—कशी असेल आपली परिस्थिती?
गरम गरम भजी होत आहेत आणि नाकासमोर त्यांचा छान वास येतोय. तोंडाला पाणी सुटायला लागतं. आपण खात नाही, पण केवळ वासामुळेच तोंडाला पाणी सुटतं.
आपण रस्त्यावरून चालत असतो आणि अचानक कानावर एक घाणेरडी शिवी येते. आणि जर ती आपल्याला दिलेली असेल, तर आपल्या मनाची अवस्था काय होईल?
अशा अनेक घटना आपण विचारात घेतल्या, तर लक्षात येतं की जिथे आपल्या इंद्रियांचा विषयांशी फारसा संपर्क येत नाही—रंग,रूप, रस, गंध, स्पर्श अशा पंचविषयांशी इंद्रियांचा फार संपर्क येत नाही—अशा ठिकाणी मनाचं सैरभैर होणं तुलनेने कमी असतं. ज्यावेळी विषयांशी संपर्क येतो, त्यावेळी मनाचं सैरभैर होणं वाढू शकतं.
मुळातच इंद्रियं आपल्याला ओढून नेणारी असावीत, खेचून नेणारी असावीत? ती आपले स्वामी असावेत, आपले मास्टर असावेत, आपले मालक असावेत? की इंद्रियांना आपल्याला पाहिजे त्यावेळी, आपल्याला पाहिजे त्या गोष्टींसाठी, त्या विषयासाठी मोकळं ठेवणं हे जास्त संयुक्तिक असेल?
मी लहान होतो, त्यावेळी बाजारात जायचो. त्या वेळी कपड्यांची दुकानं फार कमी होती. हॉटेल्सची संख्या खूप कमी होती. चित्रपटगृहं नावाला होती. जाहिरातींचा प्रकार जवळपास नव्हता. मोबाइल, टेलिव्हिजन अशा इंद्रियांना सतत माहिती देणाऱ्या गोष्टी फारच कमी होत्या.
आज परिस्थिती खूप बदललेली आहे. हे सगळं प्रचंड वाढलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नको असणाऱ्या गोष्टींकडेही आपण आकर्षित होतो. आपली इच्छा नसते; पण ज्यावेळी ही इंद्रियं विषयांच्या संपर्कात येतात, त्यावेळी ती आपल्याला खेचतात.
खरी परीक्षा इथेच असते.
इंद्रियं विषयांकडे खेचतात. विषयांच्या संपर्कामध्ये इंद्रियं येतात, त्यावेळी ती सैरभैर होतात. परिणामी मनामध्ये उलथापालथ तयार होते. ही उलथापालथ अस्वस्थता निर्माण करते. कधीकधी ती टेम्पटेशन निर्माण करते. ती आपल्याला ड्राईव्ह करते. कधीकधी ती आपल्याला प्रलोभनांकडे नेते.
हे नेहमीच होतं असं नाही. कधीकधी इंद्रियं विषयांच्या संपर्कात येतात, पण तो विषय वेगळा असतो. एखादा अंध माणूस रस्त्यावरून चालतोय, तर आपल्याला सहजच त्याला मदत करावी वाटते. एखादा लहान मुलगा रडायला लागला आहे, तर त्याला सहज शांत करावं वाटतं. ज्यावेळी आपण मंदिरात जातो, त्यावेळी आपण सहजच आपले डोळे बंद करतो आणि शांत होतो.
मुळात ठरवून एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर इंद्रियं शांत होतात; आणि ठरवून एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर इंद्रियं उद्दीपित होतात.
परंतु आजची परिस्थिती खूप बदललेली आहे. ‘दुनिया रंग रंगीली बाबा, दुनिया रंग रंगीली!’ आपल्याला मनामध्ये इच्छा नसते एखादी गोष्ट करण्याची, पण इंद्रियं आपल्याला खेचून नेतात.
आपल्या मनाच्या विरुद्ध एखादी गोष्ट आपण करतो, याचा अर्थ आपण इंद्रियांचे गुलाम बनतो. आपल्याला माहीत असतं की एखादी गोष्ट चुकीची आहे, अयोग्य आहे, गरजेची नाहीये आणि तिचा परिणाम वाईट होणार आहे; तरीही आपण ती करतो. इतकी इंद्रियं आपल्यावर हावी झालेली असतात.
यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे—बाह्य जगातील काही विषयांच्या संपर्कातच आपली इंद्रियं येऊ द्यायची नाहीत.
दुसरी पद्धत अशी आहे की आपल्याला कळलं पाहिजे की कुठल्या विषयांशी संपर्कात आल्यानंतर आपली इंद्रियं स्वैर होतात. आणि मग मार्ग आहे—त्या विषयांपासून दूर जाणं.आपल्या मनाची अशी गोष्ट आहे की इंद्रियांना एखाद्या विषयापासून थोडा काळ दूर ठेवल्यानंतर त्या विषयाबद्दलची आपली आसक्ती कमी होऊ शकते.
ही प्रक्रिया ठरवून करता यायला लागली, आपण स्वतःचा अभ्यास केला, विचार केला, स्वतःला समजून घेतलं, की कुठल्या गोष्टीपासून आपण डिस्टर्ब होतो, कुठल्या गोष्टी आपल्याला प्रलोभित करतात, टेम्पट करतात, ड्राईव्ह करतात, हे समजायला लागलं; तर त्या विषयांच्या संपर्कात आल्याबरोबर आपल्या इंद्रियांना त्यांच्यापासून दूर नेणं ही एक खूप चांगली पद्धत आहे.
भगवद्गीतेमध्ये याचंच उदाहरण स्थितप्रज्ञाचं देताना श्रीकृष्ण म्हणतात—
यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥
कासव जसं भय किंवा बाह्य विचलित करणाऱ्या गोष्टी जाणवल्यावर आपले सर्व अवयव कवचाच्या आत सुरक्षित ओढून घेतं, तसा जो साधक बाह्य विषयांपासून आपले चित्त आणि इंद्रियं आत ओढून आत्मस्वरूपात स्थिर करतो, त्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे.
समोरून साप चालला आहे, तर काय करतो आपण? थबकतो, आपल्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर सावध होतो. घाणेरडा वास येतोय, काय करतो आपण? नाक बंद करतो. कर्णकर्कश, विचित्र आवाज येतोय, काय करतो आपण? मोठमोठ्याने कान बंद करतो. एखादी विचित्र घटना घडते, काय करतो आपण? डोळे बंद करतो.
आपण हे करत असतो. पण टेम्पटेशन असणाऱ्या गोष्टींपेक्षा भय असणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला दूर करणं आपल्याला सहज जमतं. ज्यामुळे स्वतःला त्रास होतो, स्वतःला डिस्टर्ब होतं, स्वतःला वाईट वाटतं, अशा गोष्टींपासून आपण लवकर दूर होतो.
परंतु टेम्पटेशन देणाऱ्या, आपल्याला ड्राईव्ह करणाऱ्या, उद्दीपित करणाऱ्या, स्टिम्युलेट करणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत आपली खरी परीक्षा असते. अशा गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावर वाईट होत असेल आणि त्यातून आपण सुख-दुःखाच्या, शुभ-अशुभाच्या फेऱ्यामध्ये अडकत असू, तर आपण आपल्यामध्ये मस्त राहण्याऐवजी स्वतःमध्येच एक अराजकता निर्माण करतो.
अशी अराजकता निर्माण होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने इथे एक सुंदर उदाहरण, एक प्रभावी प्रतीक दिलं आहे—कासवाचं.
‘कूर्मोऽङ्गानीव’—कासव जसं आपल्या अवयवांना, हात, पाय, मान, सर्व बाजूंनी ओढून घेतं, मागे खेचतं.
‘इन्द्रियाणि’—डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा.
‘इन्द्रियार्थेभ्यः’—इंद्रियांच्या विषयांपासून; रूप, रस, गंध, स्पर्श अशा भोगांच्या विषयांपासून.
या गोष्टींपासून ज्यावेळी आपण स्वतःला असं मागे खेचतो आणि हे ठरवून करायला लागतो, ही प्रक्रिया आपल्या जीवनात व्यवस्थितपणे घडायला लागते आणि इंद्रियं आपले स्वामी न होता आपण इंद्रियांचे स्वामी होतो, त्यावेळी आपली प्रज्ञा आपल्यामध्ये प्रतिष्ठित झालेली आहे, असं म्हणायला काही हरकत नाही.
हे एक-दोन दिवसांत होत नसतं. यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. निदिध्यास, अभ्यास करावा लागतो. असा अभ्यास करत राहिलो की मन शांत व्हायला लागतं.
सुख-दुःखाच्या फेऱ्यात आपण अडकत नाही. शुभ-अशुभाच्या फेऱ्यात अडकत नाही. आपल्यासाठी काय भलं आणि काय वाईट, काय योग्य आणि काय अयोग्य, हे कळायला लागतं.
असंच सगळं आपल्या बाबतीत व्हावं.
या रंगरंगीली दुनियेमध्ये आपण हरवून न जाता, आपण एका वेगळ्या उंचीवर जावं, यासाठीचा हा श्लोक आहे.
अवघड आहे; पण करूया.
जास्तीत जास्त लोकांना भगवद्गीतेचा अभ्यास करू द्या. गौरी-गणपतीचा सण आहे. अवघड आहे थोडंसं अभ्यास करणं; पण या काळात निदान जिभेवर नियंत्रण ठेवता येतं का, ते बघा!
धन्यवाद.
जास्तीत जास्त लोकांना हा श्लोक द्या, पाठवा.
इंद्रियांचे आपण इतके गुलाम का आहोत?
गीता दर्शन : श्रीमद्भगवद्गीता – दुसरा अध्याय, सांख्य योग
भाग ८१ | १९ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
यततो ह्यपि कौन्तेय
पुरुषस्य विपश्चितः ।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥
या श्लोकात श्रीकृष्ण इंद्रियांची अफाट शक्ती आणि साधनामार्गातील सर्वात मोठा धोका स्पष्ट करतात. हे अर्जुना! मोक्षासाठी किंवा आत्मसंयमासाठी झटणाऱ्या बुद्धिमान, विवेकी साधकाचे मनसुद्धा ही चंचल, खळबळ माजवणारी इंद्रिये जबरदस्तीने विषयामागे खेचून नेतात.
इथे एक शब्द विशेष लक्षात घेण्यासारखा आहे—‘प्रमाथीनि’. इंद्रियांना श्रीकृष्णांनी ‘प्रमाथी’ म्हटलं आहे; कारण ती मनाला अस्वस्थ आणि विचलित करणारी असतात. अनुकूल विषय दिसताच ती उसळून येतात. इंद्रियांचा वेग इतका जबरदस्त असतो की केवळ सामान्य मनुष्यच नाही, तर जो विवेकी, ज्ञानी आणि इंद्रियांवर ताबा मिळवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे, अशा साधकाचे मनही इंद्रियबळाने आपल्या मागे खेचून नेतात.
जोपर्यंत मन आणि इंद्रिये परमात्म्याच्या ध्यानात पूर्णपणे लीन होत नाहीत, तोपर्यंत केवळ बुद्धीच्या बळावर स्वतःला सुरक्षित समजणं ही चूक ठरू शकते. साधकाने अखंड सजग राहणं गरजेचं आहे. इंद्रियसंयम इतका महत्त्वाचा का आहे आणि त्यामागची कारणं नेमकी काय आहेत, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे.
हे सगळं समजून घेताना पहिल्यांदा आपल्या मेंदूची रचना आणि त्याची कार्यपद्धती समजून घ्यावी लागते. इंद्रियं ही माहिती स्वीकारणारी केंद्रं आहेत. डोळे पाहतात, कान ऐकतात, नाक वास घेतं, जीभ चव घेते आणि त्वचा स्पर्श जाणवते. इंद्रियांना स्वतःचं स्वतंत्र निर्णयक्षम स्थान नसतं. इंद्रियांमधून जी माहिती मिळते, ती मज्जासंस्थेच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पोहोचते.
आणि आपण जर आदिमानवापासून आजपर्यंतचा विचार केला, तर स्वतःचं अस्तित्व टिकवणं हे मानवी मेंदूचं एक अत्यंत महत्त्वाचं काम राहिलेलं आहे. हे अस्तित्व टिकवण्यासाठी मेंदू इंद्रियांची मदत घेतो.
समजा, अचानक आपल्या समोर साप आला. डोळ्यांनी साप पाहिला की माणूस थबकतो. बरेचसे लोक घाबरतात किंवा पळून जातात. म्हणजे डोळ्यांनी पाहिल्याबरोबरच शरीराची प्रतिक्रिया सुरू होते; भावनाही जागृत होतात. या भावना आणि मेंदूतील अनेक प्रक्रिया मुख्यतः सर्व्हायव्हल—अस्तित्व टिकवणं— यासाठी काम करतात.
म्हणून मेंदूची रचनाच अशी आहे की, ज्यावेळी एखादा विषय, एखादी गोष्ट, एखादं टेम्पटेशन किंवा एखादी इन्फॉर्मेशन इंद्रियांसमोर येते, तेव्हा त्यातून मिळालेली माहिती मेंदूपर्यंत पोहोचते आणि त्यानंतर त्या माहितीशी संबंधित भावनिक प्रक्रिया सक्रिय होऊ शकतात.
विवेक आणि बुद्धी हा मेंदूचा तुलनेने अधिक विकसित झालेला भाग आहे. अनुभवाच्या आधारे, ज्ञानाच्या आधारे काही संचित माणूस करत जातो. कारण अनुभवाच्या आधारेच हळूहळू ज्ञान, आकलन आणि निर्णयक्षमता विकसित होत जाते.
दुसरी गोष्ट अशी आहे की, मानवी अस्तित्वाबरोबरच माणसाचा एक मूलभूत स्वभाव आहे—खुश राहण्याचा, आनंदी राहण्याचा, मस्त राहण्याचा. इंद्रियांनी एखादी गोष्ट अनुभवल्यानंतर, त्यातून भावना निर्माण झाल्यानंतर आणि त्या अनुभवातून एखादी कृती केल्यानंतर माणसाला आनंद किंवा समाधान मिळतं. अशा अनुभवांची मेंदूमध्ये पुन्हा पुन्हा जोडणी होत जाते. याच प्रक्रियेला व्यापक अर्थाने न्यूरल पाथवे तयार होणं असं म्हणता येईल.
म्हणजे आपण असा विचार केला, तर मानवी अस्तित्व टिकवण्यासाठी भय ही महत्त्वाची भावना आहे आणि मानवी अस्तित्व अधिक सुखकर करण्यासाठी खुश राहणं, आनंदी राहणं, समाधान मिळवणं हीदेखील महत्त्वाची प्रेरणा आहे. या माणसाच्या मूलभूत भावनांवर अनेक वर्तनपद्धती विकसित होत जातात.
या दोन्ही प्रक्रियांबरोबर माणसामध्ये हळूहळू ज्ञान, विवेक आणि बुद्धीचा विकास होतो. कोणत्या गोष्टी आपल्याला सुरक्षित ठेवतात, कोणत्या गोष्टी आपल्याला आनंद देतात, कोणत्या गोष्टींचे परिणाम चांगले आहेत आणि कोणत्या गोष्टींचे परिणाम वाईट आहेत, हे अनुभवातून समजू लागतं.
सुरुवातीला एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद मिळतो; नंतर त्या आनंदाचे परिणाम काय होत आहेत, हे लक्षात येतं. आधी भीती वाटते; त्यानंतर आपण स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या भीतीतून नेमके काय परिणाम होतात, हे नंतर समजतं. म्हणजे अनुभवाच्या आधारे ज्ञान हळूहळू विकसित होत जातं.
परंतु मेंदूची रचनाच अशी आहे की, इंद्रियांकडून माहिती मिळाल्यानंतर पूर्वी तयार झालेले अनुभवांचे साचे, आठवणी आणि सवयी तात्काळ सक्रिय होऊ शकतात. भय, आनंद, सुख, समाधान यांच्याशी संबंधित जुने अनुभव पटकन जागे होतात. त्यामुळे एखादा विषय समोर आला की त्याच्याशी संबंधित पूर्वानुभव आपल्याला लगेच प्रतिक्रिया देण्यास प्रवृत्त करू शकतो.
समजा, एखादा गंभीर मधुमेहाचा रुग्ण आहे आणि त्याच्यासमोर अतिशय मस्त अशी रसमलाई आली आहे. रसमलाई पाहिल्याबरोबर त्याच्याशी संबंधित पूर्वीचे आनंददायी अनुभव जागे होऊ शकतात. तिची चव, वास, गोडवा आणि त्यातून मिळालेलं सुख याच्या आठवणी सक्रिय होतात आणि त्याला तीव्र खाण्याची इच्छा निर्माण होते.
इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या व्यक्तीला रसमलाई खाण्याचे संभाव्य नुकसान माहीत असू शकतं. तरीही इच्छा निर्माण होऊ शकते. कारण पहिली प्रतिक्रिया अनेकदा भावनिक आणि सवयीवर आधारित असते; त्यानंतर विवेक प्रश्न विचारतो—‘हे माझ्यासाठी योग्य आहे का?’
ही इच्छा काही सेकंदांची असू शकते आणि त्या काही सेकंदांमध्ये आपण कृती करून टाकतो. किंवा एखादा विषय जास्त वेळ आपल्यासमोर राहिला, तर त्याच्याशी संबंधित आकर्षण पुन्हा पुन्हा सक्रिय होऊ शकतं. म्हणजे पहिल्यांदा भावना सक्रिय होतात आणि त्यानंतर विवेकाला हस्तक्षेप करण्याची संधी मिळते.
दुसरी गोष्ट अशी आहे की, मेंदू नैसर्गिकरित्या कमी श्रमात काम करण्याच्या सवयीचा असतो. विचार करणं, एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करणं, विवेकाने निर्णय घेणं यासाठी लक्ष आणि मानसिक ऊर्जा लागते. त्यामानाने इंद्रियांनी दिलेल्या संकेतांवर पूर्वीच्या सवयीप्रमाणे पटकन प्रतिक्रिया देणं तुलनेने सोपं असतं.
तुम्हाला माहीत असलेला रस्ता तुम्ही सहज चालता. तुम्हाला सवयीचं झालेलं एखादं काम तुम्ही जवळजवळ सहजपणे करता. पण एखादा अनोळखी पत्ता शोधताना, अनोळखी मार्गावर चालताना किंवा नवीन अनुभवाला सामोरं जाताना मेंदू अधिक सतर्क असतो. कारण तिथे पूर्वीच्या साच्यांवर पूर्णपणे अवलंबून राहता येत नाही. नवीन माहिती घ्यावी लागते, तिचं विश्लेषण करावं लागतं आणि निर्णय घ्यावा लागतो.
म्हणून साहजिकच मेंदूची एक प्रवृत्ती असते—परिचित मार्गाने, कमी मानसिक श्रमात काम करणं. यामुळेच सवयी इतक्या प्रभावी असतात.
या सगळ्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे इंद्रियांच्या संपर्कात आलेले विषय माणसाला उत्तेजित करतात आणि माणूस पटकन कृती करू शकतो. अनुभवाच्या संचितातून काही नकारात्मक गोष्टीही घडू शकतात. एखाद्या गोष्टीमधून आधी आनंद किंवा सुख मिळालं असेल, तर त्याच अनुभवाकडे पुन्हा जाण्याची इच्छा निर्माण होण्याची शक्यता वाढते.
परंतु त्या सुखामुळे निर्माण झालेला त्रास, त्यातून झालेलं नुकसान किंवा एखाद्या कृतीचे दीर्घकालीन परिणाम हे स्मृतीमध्ये साठलेले असतात. त्यांचं विश्लेषण करून प्रत्यक्ष कृती करण्यापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी थोडा वेळ लागतो.
आणि हाच तो टाइम लॅग!
इंद्रियांकडून आलेल्या संवेगापासून विवेकपूर्ण निर्णयापर्यंतचा हा छोटासा अवकाश खूप महत्त्वाचा आहे. कारण या टाइम लॅगमध्येच अनेक वेळा कृती होऊन जाते. अनेक लोकांच्या बाबतीत हे घडतं. अगदी विवेकप्रधान, अतिशय बुद्धिमान किंवा योगसाधना करणाऱ्या लोकांच्याही बाबतीत अशा प्रसंगांचा उल्लेख परंपरेत आढळतो. विश्वामित्रांच्या कथेतूनही हेच दाखवलं जातं.
कारण शेवटी हे मानवी अस्तित्व आहे. आणि भगवद्गीता नेमक्या याच मानवी वास्तवाकडे आपलं लक्ष वेधते. हा श्लोक मुळात याच सगळ्या प्रक्रियेचा विचार करतो.
इंद्रियांकडे एक्स्प्रेस ट्रेन आहे, तर बुद्धीकडे थोडी लोकल ट्रेन आहे, असं म्हटलं तर काही हरकत नाही! तात्काळ सुखाच्या आणि अस्तित्व टिकवण्याच्या विरुद्ध दूरचा विचार करणं अनेक वेळा कठीण ठरतं.
आपण असंही म्हणू शकतो की मेंदू प्रत्येक क्षणी शून्यातून नवीन विचार करत नाही. पूर्वीचे अनुभव, सवयी, आठवणी आणि तयार झालेले मानसिक नमुने नवीन परिस्थितीचा अर्थ लावण्यासाठी मोठी भूमिका बजावतात. न्यूरोसायन्सच्या भाषेत मेंदूला एक प्रकारचं ‘प्रिडिक्टिव्ह इंजिन’ म्हणूनही समजावलं जातं—म्हणजे आधीच्या अनुभवांच्या आधारे पुढे काय घडू शकतं याचा अंदाज बांधण्याची त्याची प्रवृत्ती असते.
याच्या तुलनेत बुद्धीची भूमिका वेगळी आहे. ती थांबते, विचार करते, तुलना करते, तर्क लावते, परिणामांचा विचार करते आणि गरज असेल तर जुन्या साच्याला प्रश्न विचारते. म्हणून बुद्धीची तुलना आपण एका अर्थाने न्यायाधीशाशी करू शकतो.
इंद्रियांकडून येणाऱ्या संवेगावर जुन्या स्मृती आणि भावना अतिशय वेगाने प्रक्रिया करू शकतात; त्यानंतर बुद्धीला शांतपणे विचार करायला, तर्क लावायला, जुना साचा मोडून नवीन निर्णय घ्यायला वेळ आणि सजगता लागते.
म्हणूनच श्रीकृष्ण इथे आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची जाणीव करून देतात—‘मी विवेकी आहे, मला सगळं कळतं, त्यामुळे माझ्यावर इंद्रियांचा परिणाम होणार नाही,’ असा अहंकार बाळगू नका.
कारण इंद्रियांची शक्ती प्रचंड आहे.
प्रश्न इंद्रिये वाईट आहेत की चांगली आहेत, हा नाही. प्रश्न असा आहे की इंद्रिये आपल्या नियंत्रणात आहेत की आपण इंद्रियांच्या नियंत्रणात आहोत?
आपल्याला राग येतो—पण राग आला म्हणून लगेच बोलायचं का? इच्छा निर्माण होते—पण इच्छा झाली म्हणून लगेच ती पूर्ण करायची का? एखादा आकर्षक विषय समोर आला—म्हणून त्याच्यामागे जायचंच का? भीती वाटली—म्हणून लगेच पळायचंच का?
या ‘उत्तेजना’ आणि ‘कृती’ यांच्या मध्ये जर आपण काही क्षणांचं अंतर निर्माण करू शकलो, तर तिथेच साधनेची सुरुवात होते.
एक क्षण थांबणं, एक दीर्घ श्वास घेणं, स्वतःला विचारणं—‘मला हे खरंच हवं आहे का, की माझी सवय मला खेचून नेत आहे?’—हा छोटासा प्रश्न अनेकदा संपूर्ण कृतीची दिशा बदलू शकतो.
इंद्रियसंयम म्हणजे इंद्रियांना दाबून टाकणं नाही. इंद्रियांपासून पळून जाणं नाही. विषयांपासून जग तोडून घेणंही नाही.
इंद्रियसंयम म्हणजे विषय समोर असूनही त्यांचा गुलाम न होणं.
सुंदर दृश्य दिसेल. चविष्ट पदार्थ दिसेल. कौतुक मिळेल. टीका होईल. पैसा दिसेल. मान-सन्मान मिळेल. एखादी व्यक्ती आवडेल. एखाद्या गोष्टीचा मोह होईल. हे सगळं जीवनात असणारच.
पण प्रश्न असा आहे—विषय माझ्यावर राज्य करतात की मी विषयांकडे सजगपणे पाहतो?
याच ठिकाणी शीर्षक पुन्हा आपल्याला प्रश्न विचारतं—
इंद्रियांचे आपण इतके गुलाम का आहोत?
कारण इंद्रिये फक्त बाहेरची माहिती आणत नाहीत; त्या माहितीला आपल्या जुन्या अनुभवांची, भावनांची आणि सवयींची जोड मिळते. त्यातून इच्छा निर्माण होते आणि इच्छा कृतीकडे ढकलते. विवेक त्या प्रक्रियेत हस्तक्षेप करतो; पण त्यासाठी त्याला सजगतेचा आधार लागतो.
म्हणून केवळ ज्ञान पुरेसं नाही.
ज्ञानाला विवेकाची साथ हवी.
विवेकाला सजगतेची साथ हवी.
आणि सजगतेला सातत्यपूर्ण साधनेची साथ हवी.
श्रीकृष्णांचा हा श्लोक आपल्याला घाबरवत नाही; तो आपल्याला सावध करतो. तो सांगतो—तू कितीही बुद्धिमान असलास, कितीही विवेकी असलास, साधनेत कितीही पुढे गेला असलास, तरी इंद्रियांच्या शक्तीला कमी लेखू नकोस.
कारण इंद्रिये विषयांकडे धावतील. मन त्या विषयांकडे आकर्षित होईल. जुन्या आठवणी जाग्या होतील. इच्छा निर्माण होईल. आणि त्या क्षणी आपल्या हातात एक अतिशय मौल्यवान गोष्ट असेल—निवडीचा तो छोटासा अवकाश.
इंद्रियांनी संदेश दिला म्हणून कृती करायचीच असते, असं नाही. मनात इच्छा निर्माण झाली म्हणजे ती पूर्ण करायचीच असते, असं नाही. राग आला म्हणजे बोलायचंच असतं, असं नाही. लोभ निर्माण झाला म्हणजे मिळवायचंच असतं, असं नाही. भीती वाटली म्हणजे पळायचंच असतं, असं नाही.
इंद्रिय आणि कृती यांच्या मध्ये बुद्धीचा दिवा पेटवता येतो.
हीच साधना.
आणि म्हणूनच पुढे गीता केवळ इंद्रियसंयम सांगून थांबत नाही. ती मन, बुद्धी, ध्यान, आसक्ती आणि अखेरीस स्थितप्रज्ञतेपर्यंत आपल्याला घेऊन जाते.
कारण अंतिम ध्येय इंद्रियांशी युद्ध करणं नाही; इंद्रियांवर प्रभुत्व मिळवणं आहे.
म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारूया—मी माझ्या इंद्रियांचा स्वामी आहे की त्यांचा गुलाम?
आज दिवसभरात एखादी इच्छा निर्माण झाली, एखादा मोह समोर आला, एखादा राग उफाळला किंवा एखादी प्रतिक्रिया द्यावीशी वाटली, तर फक्त काही क्षण थांबून पाहूया—
‘आत्ता माझं मन निर्णय घेतंय की माझी सवय?’
कदाचित त्या एका प्रश्नातूनच साधनेचा एक नवा दरवाजा उघडेल.
कारण श्रीकृष्ण आपल्याला सांगतात—इंद्रिये कितीही शक्तिशाली असली, तरी अंतिम स्वामित्व त्यांचं नसावं. मनावर इंद्रियांचं राज्य नको; मनावर विवेकाचं राज्य हवं.
आणि इथूनच खरी सुरुवात होते—
इंद्रियांचा गुलाम होण्यापासून
इंद्रियांचा स्वामी होण्याकडे!
भगवद्गीता : माणसाच्या संपूर्ण परिवर्तनाचा मार्ग
गीता दर्शन : श्रीमद्भगवद्गीता – दुसरा अध्याय, सांख्य योग
भाग ८२ | २० सप्टेंबर २०२६
नमस्कार.
आपण अर्जुनाचा विषाद पाहिला. त्याचा त्याच्या शरीरावर, प्राणावर, मनावर, बुद्धीवर आणि अगदी त्याच्या अंतःकरणावर झालेला परिणामही आपण पाहिला. त्यानंतर श्रीकृष्णाचं त्याला सांगणं सुरू झालं. सुरुवातीला श्रीकृष्ण अक्षरशः चुरून बोलले; प्रसंगी त्यांनी त्याला कठोर शब्दही सुनावले. पण अर्जुनाची ही अवस्था केवळ मानसिक दोष नाही, केवळ बौद्धिक दोष नाही किंवा केवळ शारीरिक समस्या नाही, हे श्रीकृष्णाला जाणवतं. या सगळ्याच्या मुळाशी आणखी काहीतरी खोल आहे. आजूबाजूचं जे वातावरण आहे, त्या वातावरणाची जी मूल्यव्यवस्था आहे, तीच जर ढासळलेली असेल, तर त्यातून दुर्योधनही तयार होतो आणि विषादग्रस्त अर्जुनही तयार होतो.
म्हणून हा केवळ अर्जुनाचा दोष नाही; हा त्याच्या भोवतालचाही दोष आहे. त्यामुळे श्रीकृष्ण फक्त अर्जुनाला सांगत आहेत, एवढाच भगवद्गीतेचा विषय नाही. अशी मूल्यव्यवस्था असणाऱ्या व्यक्तींचा समाज घडावा आणि त्या व्यक्तींबरोबर त्या समाजाचीही मूल्यव्यवस्था तशीच असावी, ही श्रीकृष्णांची व्यापक दृष्टी आहे. व्यक्ती आणि समाज हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. व्यक्ती जशी घडते, तसा समाज घडतो आणि समाजाची मूल्यव्यवस्था जशी असते, त्यातून पुढच्या पिढीतील व्यक्तिमत्त्वं घडत जातात.
मला ज्या ज्या वेळी गीतेचा अभ्यास सुरू करतो किंवा पुन्हा पुन्हा करतो, त्या त्या वेळी भारत, भारतीय संस्कृती आणि अध्यात्म यांच्याबद्दलचा माझा विश्वास अधिक दांडगा होत जातो. त्याहीपेक्षा मनात एक वेगळीच भावना निर्माण होते—“अरे, क्या जबरदस्त आहे! कसलं जबरदस्त आहे हे सगळं!” मी खास करून या सगळ्या गोष्टी आधुनिक मानसशास्त्राच्या आधारे, आधुनिक विज्ञानाच्या आधारे ताडून पाहण्याचा, क्रॉस-चेक करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळी मला जाणवतं की, माणसाच्या आयुष्यातले इतके बारकावे आपल्या भारतीय ऋषींना, त्या महान माणसांना कसे समजले असतील? त्यासाठी त्यांनी स्वतःवर किती प्रयत्न केले असतील, स्वतःवर किती प्रयोग केले असतील, स्वतःच्या मनाचा, बुद्धीचा आणि अंतःकरणाचा किती सूक्ष्म अभ्यास केला असेल! हे सगळं खरंच अफलातून आहे.
भगवद्गीतेचा जर आपण विचार केला, तर तिचा क्रमच किती सुंदर आहे! सुरुवातच होते—“क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते। क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप॥” म्हणजे किती ताकदवान असलं पाहिजे आपण! आपलं फक्त शरीर ताकदवान असणं पुरेसं नाही; आपण मनाने, बुद्धीने आणि अंतःकरणानेही ताकदवान असलं पाहिजे. “क्लैब्यं” म्हणजे फक्त शरीराचं क्लैब्य नाही. हे मनाचं क्लैब्य आहे, बुद्धीचं क्लैब्य आहे, अंतःकरणाचं क्लैब्य आहे. हे वैचारिक क्लैब्य आहे, हे मानसिक क्लैब्य आहे आणि माणसाच्या संपूर्ण अस्तित्वामध्ये निर्माण झालेली दुर्बलता आहे. म्हणून गीतेची सुरुवातच माणसाला या दुर्बलतेतून बाहेर काढण्यापासून होते.
तिथून पुढे माणसाच्या अस्तित्वाचं परम सत्य जे आहे, ते उलगडलं जातं. मनुष्य मरतो म्हणजे नेमकं काय होतं? शरीर जातं, शरीर बदलतं. बालपण, तारुण्य, वार्धक्य—शरीर बदलत राहतं; पण या बदलाच्या पलीकडे काय आहे, हा प्रश्न श्रीकृष्ण उपस्थित करतात. आत्म्याचं शाश्वतत्व आणि शरीराची क्षणभंगुरता ही संकल्पना किती अफलातून आहे! माणसाला जर “मृत्यूनंतर काहीच नाही”, किंवा “मृत्यू म्हणजे माणसाचा शेवट—डॉट” असं वाटलं, तर जीवनाकडे पाहण्याची त्याची दृष्टी एका विशिष्ट चौकटीत अडकू शकते. पण कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म यामुळे माणसाच्या कृतींना अधिक व्यापक संदर्भ मिळतो. आपण जे करतो त्याचा परिणाम केवळ आत्तापुरता नाही, तर त्याला एक मोठी सातत्याची चौकट आहे, अशी दृष्टी निर्माण होते. त्यामुळे लोकव्यवस्था, लोकसंग्रह आणि एकमेकांशी असलेली बांधिलकी यांचा विचार निर्माण होऊ शकतो. भारतामध्ये इतकं वैविध्य असतानादेखील सामाजिक जीवनामध्ये एक प्रकारची हार्मनी निर्माण होण्यामागे या व्यापक जीवनदृष्टीचाही काही वाटा असू शकेल, असं मला अनेकदा वाटतं.
आत्म्याचं शाश्वतत्व आणि जीवनाची क्षणभंगुरता सांगत असतानाच श्रीकृष्ण व्यवहारापासून दूर जात नाहीत. ते फायद्या-तोट्याचाही विचार करायला सांगतात. युद्ध केलंस तर काय फायदा होणार आहे, काय नुकसान होणार आहे; युद्ध केलं नाहीस तर काय फायदा होणार आहे, काय नुकसान होणार आहे—या सगळ्याचा विचार करतात. म्हणजे अध्यात्म म्हणजे वास्तवापासून पळून जाणं नाही. उलट वास्तवाकडे अधिक स्पष्टपणे पाहण्याची क्षमता म्हणजे अध्यात्म. आत्मतत्त्व समजून घेताना व्यवहार समजून घेणं आणि व्यवहार करताना व्यापक जीवनतत्त्व विसरू न देणं, ही भगवद्गीतेची खासियत आहे.
त्यापुढे गीता ज्ञानाकडून कर्माकडे येते. ज्ञानाने आपल्या सत्य स्वरूपाची जाणीव झाल्यानंतर, हे जगणं अधिक सुंदर महोत्सव करण्यासाठी काय करावं लागतं, हा प्रश्न उभा राहतो. आपण म्हणतो, आपल्यावर संस्कार करायचे असतात. पण भगवद्गीता आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर आणि आपल्या अंतःकरणावर संस्कार करते. आणि हे संस्कार संकुचित नाहीत, अशुद्ध नाहीत; ते शुद्ध आहेत आणि विस्तारित स्वरूपाचे आहेत. त्यामुळे माणसाचं आयुष्य विस्तारत जाऊन अधिक सुंदर आणि समृद्ध होण्यासाठी कर्म कसं असलं पाहिजे, कर्मामागची भावना कशी असली पाहिजे आणि कर्मामागची बुद्धिमत्ता कशी असली पाहिजे, हे गीता आपल्याला समजावून सांगते.
मला सगळ्यात आवडलेला अजून एक क्रम भगवद्गीतेमध्ये दिसतो. तो मनापासून सुरू होतो आणि विवेकाकडे जातो. विवेकातून निश्चयात्मक बुद्धीकडे—“व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह”—आणि त्यानंतर अढळ, एकाग्र बुद्धीकडे प्रवास होतो. या प्रवासातून पुढे स्थितप्रज्ञतेची संकल्पना समोर येते. म्हणजे विषादग्रस्त मनापासून सुरुवात करून माणूस हळूहळू विवेक, निश्चय, स्थिरता आणि अखेरीस स्थितप्रज्ञतेकडे जाऊ शकतो. हा एका क्षणात घडणारा बदल नाही; ही माणसाच्या अंतर्गत परिवर्तनाची प्रक्रिया आहे.
पण स्थितप्रज्ञतेचा विचार करत असताना श्रीकृष्ण आपल्याला आपल्या शरीराला वगळा असं सांगत नाहीत. ते शरीराचं महत्त्व काय, इंद्रियांचं महत्त्व काय आणि इंद्रियं किती ताकदवान आहेत, हेही सांगतात. म्हणजे एका बाजूला बुद्धीचा आयाम सांगितला आहे आणि दुसऱ्या बाजूला इंद्रियांचं खरंखुरं स्वरूप काय आहे, हेही स्पष्ट केलं आहे. इंद्रियं मनाला कशी खेचून नेतात, विषयांशी संपर्कातून आसक्ती कशी निर्माण होते आणि त्या प्रक्रियेतून माणूस कसा भरकटू शकतो, याचाही अत्यंत बारकाईने विचार गीता करते. त्यामुळे स्थितप्रज्ञ होणं म्हणजे शरीर किंवा इंद्रियांचा निषेध करणं नाही; तर त्यांच्या सामर्थ्याला समजून घेऊन त्यांच्यावर प्रभुत्व मिळवणं आहे.
भगवद्गीता गुडी-गुडी बोलत नाही. म्हणजे “भगवद्गीतेचा अभ्यास केल्यानंतर हे हे मिळेल, ते ते मिळेल, हा हा लाभ होईल, तो तो लाभ होईल” असं ती सांगत नाही. उलट असं सांगणाऱ्या लोकांवरच ती प्रहार करते—“यामिमां पुष्पितां वाचं...” आकर्षक शब्दांनी, फळांच्या आश्वासनांनी आणि विविध लाभांच्या अपेक्षांनी भरलेल्या विचारांमध्ये अडकून राहू नका, असा तिचा स्पष्ट इशारा आहे.
भगवद्गीतेचा विचार अधिक नेमका आहे, अधिक सूक्ष्म आहे, स्पष्ट आहे आणि अतिशय क्लिअर आहे. हे गणित आहे—हे असं आहे, त्यामुळे त्याचं उत्तर तसं येतं. किंवा हे उत्तर आलं, म्हणजे त्याची सुरुवात अशी अशी असणार आहे. ही जी सूत्रं आहेत, ती प्रिन्सिपल्स आहेत, त्या संकल्पना आहेत. म्हणूनच गीता वाचताना आपल्याला केवळ काही विचार ऐकायला मिळत नाहीत; तर माणसाच्या वर्तनामागच्या प्रक्रिया समजायला लागतात. इंद्रियांचा विषयांशी संबंध, त्यातून निर्माण होणारी आसक्ती, आसक्तीतून निर्माण होणारी कामना आणि कामनेतून पुढे निर्माण होणारा क्रोध—या सगळ्या प्रक्रिया गीता एका अत्यंत स्पष्ट साखळीमध्ये आपल्यासमोर ठेवते.
आज इतकं स्पष्ट, छान, व्यवस्थित आणि नेमकं बोलणं फारसं दिसत नाही. पण गीता ते सांगते. गीता आपल्याला सांगते—अरे, तुझ्यामधलं असणारं एनलार्ज रूप ओळख. तुझ्यामध्ये असणारं अफाट सामर्थ्य ओळख. स्वतःला बदलण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे, हे समजून घे. आणि तू बदलत असताना तुझ्या भोवतालचं जगही बदलू शकतोस, हा प्रचंड आत्मविश्वास भगवद्गीता देते.
प्रयत्न केले तर तुझ्या शरीराचं रूपांतरही होऊ शकतं, तुझ्या मनामध्ये परिवर्तन होऊ शकतं, तुझी बुद्धी अधिक स्पष्ट होऊ शकते आणि तुझं अंतःकरण अधिक व्यापक होऊ शकतं. दुसऱ्याचं शरीर घेणारा ययाती नको आहे आपल्याला; पण स्वतःचं शरीर, स्वतःचं मन, स्वतःची बुद्धी आणि स्वतःचं अंतःकरण अधिक समृद्ध करणारा कृष्णाचा मार्गदर्शनाचा मार्ग आपल्याला हवा आहे.
अशी ही भगवद्गीता आणि तिचा आपण करत असलेला अभ्यास—हा खूप महत्त्वाचा आहे. कारण हा केवळ एखादा ग्रंथ समजून घेण्याचा अभ्यास नाही; हा स्वतःला समजून घेण्याचा अभ्यास आहे. अर्जुनाच्या विषादापासून सुरू झालेला हा प्रवास आपल्यालाही आपल्या जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवतो. माझ्या शरीराची अवस्था काय आहे? माझं मन कुठे आहे? माझी बुद्धी किती स्पष्ट आहे? माझ्या अंतःकरणामध्ये कोणत्या मूल्यांचा प्रभाव आहे? माझ्या कर्मामागची भावना काय आहे? आणि या सगळ्याचा माझ्या भोवतालच्या समाजावर काय परिणाम होतो? हे प्रश्न गीता आपल्यासमोर उभे करते.
म्हणून भगवद्गीता ही केवळ अर्जुनासाठीची शिकवण नाही. ती प्रत्येक त्या माणसासाठी आहे, जो आपल्या जीवनाच्या एखाद्या टप्प्यावर उभा राहून विचारतो—“आता मी काय करू?” आणि कृष्णाचा संदेश त्याला केवळ उत्तर देत नाही; तर योग्य उत्तर शोधण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धी, विवेक, निश्चय आणि अंतर्गत शक्ती निर्माण करण्याचा मार्ग दाखवतो.
आज आपण आपल्या या गीता-अभ्यासाचा एक छोटासा आढावा घेतला. अर्जुनाच्या विषादापासून सुरू झालेला हा प्रवास शरीर, प्राण, मन, बुद्धी, अंतःकरण, आत्मतत्त्व, कर्म, कर्मामागची भावना, निश्चयात्मक बुद्धी, इंद्रियसंयम आणि स्थितप्रज्ञता असा पुढे पुढे विस्तारत जातो. आणि शेवटी हा प्रवास एका व्यक्तीच्या परिवर्तनापासून समाजाच्या परिवर्तनापर्यंत पोहोचतो.
आपण हा अभ्यास करत आहोत, हेच मोठं भाग्य आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे या अभ्यासातून “माझ्यात काय बदलतं आहे?” हा प्रश्न सतत स्वतःला विचारणं.
आज जस्ट एक आढावा घेतला. उद्या पुन्हा आपण भगवद्गीतेच्या पुढच्या श्लोकाकडे वळूया.
इंद्रियसंयम : कोरड्या विवेकापासून मत्परायणतेकडे
गीता दर्शन : श्रीमद्भगवद्गीता – दुसरा अध्याय, सांख्य योग
भाग ८३ | २० सप्टेंबर २०२६
नमस्कार.
इंद्रियांतील पाच इंद्रियांना आपण ज्ञानेंद्रिये म्हणतो आणि पाच इंद्रियांना कर्मेंद्रिये म्हणतो. माणसासाठी ज्ञान आणि कर्म या दोन अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. माणसाचे अस्तित्व टिकवण्यासाठी, ते वाढवण्यासाठी, जीवन अधिक समृद्ध, सुखी, समाधानी आणि आनंदी करण्यासाठी ज्ञान आणि कर्म आवश्यक आहेत. आणि ज्ञान व कर्म यांचे द्वार म्हणजे इंद्रिये.
पण हे द्वार इतके स्वयंचलित आणि प्रबळ आहे, की बाहेरच्या अनेक गोष्टी ते आत खेचण्याचा प्रयत्न करते. इंद्रिये माणसासाठी आवश्यक आहेतच; परंतु त्यांच्याबरोबर चांगल्या गोष्टी येतात, त्याचप्रमाणे अनेक चुकीच्या गोष्टीही आपल्या जीवनात प्रवेश करतात. काही गोष्टींचा तात्पुरता फायदा होतो; परंतु त्यांचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते.
म्हणून प्रश्न असा नाही की इंद्रिये नकोत का? इंद्रिये तर माणसासाठी अत्यंत आवश्यक आहेत. प्रश्न असा आहे की, इंद्रियांमधून येणाऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टींमधला फरक कसा करायचा आणि चुकीच्या गोष्टींवर संयम कसा ठेवायचा?
मागच्या श्लोकात आपण पाहिले की ज्ञानी पुरुष, विवेकी पुरुष, तपस्या करणारा पुरुष—अशा व्यक्तीलाही इंद्रिये संयमित करणे कठीण जाते. इंद्रिये इतकी प्रबल आहेत, की ती त्याच्या निग्रहालाही तोडू शकतात. म्हणजेच इंद्रियांच्या प्रबलतेपुढे विवेक कोलमडून पडतो. निश्चयात्मक बुद्धी कोलमडून पडते. अढळ आणि एकाग्र बुद्धीही कोलमडून पडते.
म्हणजे इंद्रिये इतकी प्रबल आहेत.
तर पहिला मुद्दा असा की, इंद्रिये आवश्यक आहेत का? ती ज्ञान आणि कर्माची द्वारे आहेत; त्यामुळे ती गरजेचीच आहेत. पण ज्ञान आणि कर्मामध्ये चांगल्या गोष्टी जशा असतात, तशाच वाईट गोष्टीही येणारच. त्या पूर्णपणे रोखता येत नाहीत.
दुसरी गोष्ट म्हणजे, चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टी येऊ लागल्या, तर त्या वाईट गोष्टींवर संयम ठेवणे मोठ्या विवेकी आणि निश्चयात्मक बुद्धी असणाऱ्या व्यक्तीलाही अशक्यप्राय होते. इतक्या ताकदीने इंद्रिये त्या गोष्टी स्वीकारतात.
याचा अर्थ असा होतो की, केवळ विवेक आणि निश्चयात्मक बुद्धी इंद्रियांच्या समोर अपुरी पडते.
मग काय करायचे?
इंद्रिये आवश्यक आहेत. त्यांच्यामधून ज्ञान आणि कर्मासाठी लागणाऱ्या असंख्य गोष्टींचे ग्रहण होते. परंतु त्या ग्रहण करत असताना अनेक चुकीच्या गोष्टीही आत खेचल्या जातात. आणि त्या चुकीच्या गोष्टी खेचताना विवेकी माणूस, ज्याची व्यवसायात्मिका बुद्धी आहे असा माणूसदेखील हरतो.
हे वास्तव आहे.
म्हणजे केवळ निश्चयात्मक बुद्धी आणि विवेक यांच्या आधारावर आपली प्रज्ञा प्रतिष्ठित होणार नाही. यासाठी आणखी काहीतरी अधिक महत्त्वाचे आवश्यक आहे. अजून काहीतरी करावे लागेल.
आणि ते अधिक महत्त्वाचे काय आहे, ते श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकामध्ये सांगतात—
तानि सर्वाणि संयम्य
युक्त आसीत मत्परः ।
वशे हि यस्येन्द्रियाणि
तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥
त्या सर्व इंद्रियांना पूर्णपणे संयमित करून साधकाने माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून स्थिर राहावे; कारण ज्याची सर्व इंद्रिये पूर्णपणे स्वाधीन असतात, त्याचीच बुद्धी स्थिर आणि प्रतिष्ठित मानली जाते.
‘तानि सर्वाणि संयम्य’—या वाक्यात ‘संयम्य’ हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. संयमित करणे म्हणजे इंद्रिये दाबून टाकणे नव्हे. त्यांची तीव्रता कमी करणे, त्यांच्यावर येणारी हावी होण्याची प्रवृत्ती नियंत्रित करणे, त्यांच्या वेगाला योग्य दिशा देणे म्हणजे संयम.
पण ते कसे करायचे?
इंद्रिये इतकी प्रबल आणि ताकदवान आहेत, तर त्यांना संयमित करायचे कसे?
भारतीय तत्त्वज्ञान आणि अध्यात्मशास्त्र सांगते की, हे शक्य आहे. मात्र दमन करायचे नाही. Suppress करायचे नाही. संयमित करायचे.
यासाठी एक प्रतीकात्मक उदाहरण घेऊया. अणुऊर्जेमध्ये प्रचंड ताकद असते. तिचा विध्वंसक उपयोग काय असू शकतो, हे आपण हिरोशिमामध्ये पाहिले आहे. पण तीच अणुऊर्जा संयमित केली, तर तिच्यापासून विद्युत ऊर्जा निर्माण होऊ शकते.
हे प्रतीक आपल्यासाठी खूप उपयोगी आहे.
अफाट ताकद असणारी ऊर्जा नष्ट करण्यासाठी नव्हे, तर मोठ्या उद्दिष्टासाठी संयमित करता येते. माणसाला विध्वंसक ऊर्जेची आवश्यकता नाही; विकासासाठी ऊर्जेची आवश्यकता आहे. त्यामुळे इंद्रियांची ताकद नष्ट करायची नाही, तर ती माणसाच्या विकासासाठी उपयोगी आणायची आहे.
फक्त कोरड्या बुद्धीने, केवळ विवेकाच्या आधारावर हे होऊ शकते का?
आणि मग श्रीकृष्ण पुढे सांगतात—
‘युक्त आसीत मत्परः।’
आपले चित्त स्थिर करून, शांत करून, आपण जे काही करतो आहोत, जे काही ज्ञान ग्रहण करतो आहोत, ते एखाद्या उदात्त कार्यासाठी करायचे आहे. क्षणिक आनंदाच्या मागे धावण्यापेक्षा आपले संपूर्ण जीवन आनंदी व्हावे; आनंदाचे छोटे-छोटे इम्पल्स येण्यापेक्षा आपण अशा मनःस्थितीत असावे, की आपण आतून तृप्त आणि समाधानी असावे.
पोट भरलेल्या माणसासमोर त्याचा आवडता पदार्थ कितीही आणून ठेवला, तरी तो संयमानेच खाईल. तो अस्ताव्यस्तपणे खाणार नाही. त्याचप्रमाणे ज्यांचे आयुष्य तृप्ततेने भरलेले आहे, त्यांच्या समोर इंद्रियांचे अनेक विषय ठेवले, तरी ते त्यांचा उपयोग संयमाने करतील.
आता ही तृप्तता येण्यासाठी श्रीकृष्णांनी ‘मत्परः’ हा शब्द वापरला आहे.
‘मत्परः’ या शब्दाचा मी दोन-तीन पद्धतीने अर्थ घेतो.
पहिला अर्थ असा की, केवळ रूक्ष बुद्धीने इंद्रिये संयमित होऊ शकत नाहीत. त्यासाठी भक्तीची गरज असते, प्रेमाची गरज असते, शुद्ध भावनेची गरज असते. ‘मत्पर’ म्हणजे आपल्या भावना शुद्ध करणे आणि त्या माझ्यामध्ये लीन करणे. कृष्ण हा शुद्धतेचे आणि पावित्र्याचे प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या भावना पावित्र्यामध्ये विलीन करणे, हा ‘मत्पर’ होण्याचा एक मार्ग आहे.
दुसरा अर्थ मला असा वाटतो की, श्रीकृष्ण हे एका परंपरेचे प्रतीक आहेत. Accumulation of good learning outcomes—चांगल्या अनुभवातून, चांगल्या ज्ञानातून आणि प्रयोगातून निर्माण झालेल्या जीवनदृष्टीचे ते प्रतीक आहेत. अनेक संत-महंतांनी आपल्या प्रयोगांनी आणि प्रयत्नांनी हे सिद्ध केले आहे की, क्षणिक, impulsive happiness पेक्षा संपूर्ण जीवन समाधानी, आनंदी आणि तृप्त होऊ शकते.
या परंपरेच्या प्रक्रियेमध्ये मत्परायण होणे म्हणजे त्यांनी सांगितलेल्या प्रक्रियेने पुढे-पुढे चालत राहणे. ती प्रक्रिया विश्वासार्ह, आदर्श आणि वंदनीय मानून तिच्या दिशेने पुढे जात राहणे.
भक्तिमार्गाने आपण शरण जाऊ शकतो. कृष्ण नावाच्या एका सगुण रूपाला श्रद्धेने, भक्तीने, पवित्रतेने आणि प्रेमाने आपण जे काही करणार आहोत ते अर्पण करू शकतो. त्याच्यामध्ये लीन होऊ शकतो. आपले ज्ञानग्रहण आणि कर्म भगवंतासाठी आणि भगवंताला अर्पण करू शकतो.
दुसरा मार्ग म्हणजे, परंपरेने जे सांगितले आहे, त्या परंपरेला आदर्श मानून, तिच्यावर श्रद्धा ठेवून आणि त्या परंपरेला विकसित करण्यासाठी आपले आयुष्य अर्पण करणे.
आणि तिसरा अर्थ मला नेहमी जाणवतो—‘अहं’पासून ‘वयम्’पर्यंतचा प्रवास; ‘I’ पासून ‘We’ पर्यंतचा प्रवास; ‘मी’पासून ‘आपण’पर्यंतचा प्रवास.
हा प्रवास सुरू झाला, की आपल्या इंद्रियांवर संयम ठेवणे शक्य होते.
दोन छोटे भाऊ-बहिणी आहेत. मोठी बहीण आणि तिचा छोटा भाऊ दोघेही अतिशय आवडता पदार्थ खात आहेत. दोघांच्या समोर तो पदार्थ ठेवलेला आहे. छोटा भाऊ पटापट आपला आवडता पदार्थ खातो; मोठी बहीण मात्र हळूहळू, त्याचा आनंद घेत खात असते.
तो छोटा भाऊ आपला पदार्थ संपवतो आणि बहिणीला म्हणतो, “मला तुझ्या ताटातला पदार्थ दे.”
आता बहिणीने काय करावे?
हे ऐकून ती रागावू शकते, चिडू शकते, त्याला मारू शकते. किंवा उरलेला पदार्थ पटकन स्वतः खाऊन टाकू शकते. बाहेरून आता तो पदार्थ येणे शक्य नाही. मग तिने काय करावे?
तिने जर उरलेल्या पदार्थाचे दोन भाग केले, एक स्वतः खाल्ला आणि दुसरा आपल्या भावाला दिला, तर तो देताना तिच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो, तो मत्परायण अवस्थेतून आलेला आनंद असतो.
‘मी’ नाही, ‘आम्ही’.
ही प्रक्रिया सुरू झाली, की इंद्रियसंयमाची एक वेगळीच शक्ती निर्माण होते.
आई-वडील स्वतःवर संयम ठेवू शकतात, कारण त्यांना आपल्या लेकरांसमोर एक आदर्श ठेवायचा असतो. ते स्वतःच्या अनेक इच्छांवर निग्रह ठेवू शकतात, कारण त्यांना मुलांवर एक वेगळा संस्कार करायचा असतो.
त्याचप्रमाणे समाजामध्ये आपण एखाद्या greater cause साठी काम करू लागलो, ‘मी एकटा’ या भावनेऐवजी ‘आपण सगळे मिळून’ काम करू लागलो आणि सगळ्यांसाठी काम करू लागलो, तर ‘मी’ माझ्यामध्ये राहत नाही; मी ‘आपल्या’मध्ये जातो.
ही greater identity स्वीकारणे, स्वतःला तिच्यामध्ये समर्पित करणे, तिच्यामध्ये विलीन करणे म्हणजेच एका अर्थाने मत्परायण होणे.
मला कधी कधी सगुण-साकार ईश्वरामध्ये समर्पित होणे अवघड जाते; पण परंपरेच्या आणि विस्तारित जीवनाच्या प्रक्रियेमध्ये मी मत्परायण होऊ शकतो. ‘मी-माझे’ म्हणत असताना ‘आपले-आमचे’ असा प्रवास सुरू झाला, ‘I’ पासून ‘We’ पर्यंतचा प्रवास सुरू झाला, की सहजपणे आपल्या इंद्रियांवर संयम ठेवता येतो. हे मला माझ्या स्वतःच्या प्रयत्नांतून जाणवले आहे आणि अनेकांना ते करता येते.
म्हणून श्रीकृष्ण म्हणतात—
तानि सर्वाणि संयम्य
युक्त आसीत मत्परः ।
वशे हि यस्येन्द्रियाणि
तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥
त्या सर्व इंद्रियांना परिपूर्णपणे संयमित करून—आणि येथे संयम हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे—साधकाने ‘मत्परायण’ व्हावे. ‘मत्परायण’ या शब्दाचा आपण आपल्या जीवनानुभवातून अर्थ निर्माण करायचा. त्यामध्ये मन एकाग्र करायचे, स्थिर करायचे.
ज्याची सर्व इंद्रिये पूर्णपणे स्वाधीन आहेत, समर्पित आहेत, greater cause साठी काम करतात, त्याच्याकडे जे वाईट येते ते तो संयमित करतो आणि जे चांगले येते ते अधिक मोठ्या उद्दिष्टासाठी समर्पित करतो. आणि हे तो कोरड्या बुद्धीने किंवा कोरड्या भावनेने करत नाही, तर अतिशय पवित्र, समृद्ध आणि प्रेमपूर्ण भावनेने करतो.
त्यामुळे माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे—विवेकाने भगवद्गीता समजून घेत असताना केवळ बुद्धीच्या पातळीवर गीता पूर्ण समजणार नाही. भावनेनेही गीता समजून घ्या. भावनेने तिच्याकडे पाहा. तेव्हा तुम्हाला स्वतःच्या आत्मसन्मानाची एक विलक्षण अनुभूती येईल.
काय कमाल आहे ना या सगळ्या गोष्टींमध्ये!
आपल्या ज्ञानार्जनाची एवढी मोठी आणि मूलभूत साधने पूर्वी उपलब्ध नव्हती. तरीही आपल्या पूर्वजांनी, संतांनी आणि ऋषींनी मानवी मनाच्या इतक्या बारीक-सारीक गोष्टींचा अभ्यास कसा केला! त्यांनी माणसाच्या अंतर्मनाचा, इंद्रियांचा, बुद्धीचा आणि भावनांचा किती सूक्ष्म अभ्यास केला!
भगवद्गीता केवळ आपल्यापुरती ठेवायची नाही. मी सारखे-सारखे सांगतो—आपण सगळे त्या कृष्णाचे वंशज आहोत, त्या कृष्णाचे अनुयायी आहोत. हा विचार संक्रमित करणे, प्रसवित करणे, लोकांपर्यंत पोहोचवत राहणे ही काळाची गरज आहे.
थोडे भावनेने याकडे पाहा.
मी सारखे-सारखे तुम्हाला जे आवाहन करतो, ते माझी लोकप्रियता वाढवण्यासाठी नाही. आपण जे पुष्प अर्पण करतो, ते समाजरूपी, समाजव्यापी ईश्वराला अर्पण करायचे आहे. आणि ते त्या समाजरूपी ईश्वरापर्यंत पोहोचवायचे आहे.
म्हणून हे जरूर पोहोचवा. आपण जे कुणी वाचाल, ऐकाल, त्यांनी निदान एका व्यक्तीपर्यंत तरी हे पोहोचवावे. त्याला प्रोत्साहित करावे.
औषध नको वाटते?
गीता हे औषध आहे. औषधच नाही—अमृत आहे.
बरबादीची साखळी : पतनाची सुरुवात कुठून होते?
गीता दर्शन : श्रीमद्भगवद्गीता – दुसरा अध्याय, सांख्य योग
भाग ८४ | २२ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
तुम्ही कधी ‘बरबादी’ हा शब्द ऐकला आहे का? माणूस बरबाद होणे, माणसाचा सर्वनाश होणे—पण माणूस नेमका बरबाद कसा होतो? त्याच्या आयुष्यात अशी कोणती प्रक्रिया घडते, की एखादी छोटीशी गोष्ट पुढे जाऊन त्याच्या संपूर्ण आयुष्याचा विध्वंस करते? भारतीय अध्यात्मशास्त्राने माणसाच्या या पतनाची प्रक्रिया अतिशय नेमकेपणाने मांडली आहे.
ज्ञानेश्वर माऊली या प्रक्रियेला ‘चित्ताचा वणवा’ म्हणतात—चित्ताचा वणवा आणि त्यातून बुद्धीचा लोप. स्वामी विवेकानंद या अवस्थेकडे मनाची गुलामगिरी आणि पतन म्हणून पाहतात. महर्षी अरविंद याला ‘निम्न प्रकृतीचा अधोगामी आवर्त’, म्हणजेच Downward Spiral, असे म्हणतात. गांधीजींनी याला ‘पतनाची शिडी’ — Ladder of Fall म्हटले आहे. विनोबा भावे यांनी ‘पतनाची घसरगुंडी’ किंवा ‘बुद्धीची आत्महत्या’ अशी भाषा वापरली आहे. स्वामी चिन्मयानंदांनी याला ‘आत्मविनाशाची साखळी’ — Chain Reaction असे म्हटले आहे.
आपल्या आयुष्यामध्ये अशा Chain Reactions घडत असतात आणि या साखळीची सुरुवात अनेकदा अगदी छोट्या गोष्टीपासून होते. सुरुवातीला ती गोष्ट साधी वाटते; पण तिच्याशी मन जोडले जाते, तिची इच्छा निर्माण होते, इच्छा तीव्र होत जाते आणि पुढे त्याचे रूपांतर अशा कृतीत होऊ शकते, जी माणसाच्या संपूर्ण आयुष्याला वेगळ्याच दिशेने घेऊन जाते.
माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये ही पतनाची शिडी मी एका प्रसंगातून अनुभवली आहे. तो प्रसंग माझ्या लहानपणीचा आहे.
गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही शेगावला निघालो होतो. माझ्यासोबत माझी छोटी बहीण, माझी आई, सुरेखा ताई आणि आमच्या शेजारी राहणाऱ्या काकांची ज्योती ताई होत्या. म्हणजे आमच्या गटामध्ये जवळपास सगळ्याच महिला होत्या आणि त्यात मी एकटाच पुरुष होतो. त्यावेळी मी पाचवी-सहावीमध्ये शिकत होतो.
गाडी परळीच्या बसस्थानकावर आली. तिथे मला एक पुस्तक दिसले. ते ब्रूस लीच्या कराटेचे पुस्तक होते. मला ते पुस्तक खूप आवडले. मला ते घ्यायचे होते. मी आईला म्हणालो, “मला ते पुस्तक घ्यायचे आहे.” आई तयार नव्हती. मी थोडा हट्ट केला; पण आई काही तयार होईना. बस लागलेली होती आणि वेळ निघून जात होता. शेवटी वेळ काढण्याच्या उद्देशाने आई म्हणाली, “आपण परतीच्या प्रवासात घेऊ. बघू, आपण बघू.”
पण ते पुस्तक माझ्या मनातून काही जात नव्हते. ते सतत माझ्या डोळ्यांसमोर येत होते. मला ते हवेच होते. ते मिळवण्यासाठी काय काय करता येईल, याचा मी विचार करू लागलो. जणू काही त्या पुस्तकाने मला मोहित केले होते. आम्ही शेगावला पोहोचलो. गजानन महाराजांचे दर्शन घेतले. आणि मी महाराजांकडेही मागणे मागितले—“मला ते पुस्तक द्या, पुस्तक मिळवून द्या.” एवढेच नव्हे, तर मी चक्क ५१ प्रदक्षिणा मारल्या.
दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. बसस्थानकावर आल्यानंतर आम्हाला थेट परळीची गाडी मिळाली. पण माझ्या डोक्यात पुस्तकच होते. मी आईला सांगत होतो, “आपण परभणीची गाडी घेऊ. परभणीला उतरून मला ते पुस्तक घ्यायचे आहे.” माझा हट्ट आता शिगेला पोहोचला होता. मी आरडाओरडा करत होतो. शेवटी मी बसमध्ये बसलो. पण बसमध्ये बसतानाच मी आईला म्हणालो, “ही बस फेल होणार आहे.” आणि योगायोगाने तसेच झाले. नेमकी बस फेल झाली.
रात्री बारा-बारा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास आम्ही हिंगोलीला पोहोचलो. हिंगोलीमध्ये माझ्या काकांचे घर होते. मी आईला पुन्हा पुन्हा म्हणत होतो, “तू मला पुस्तक देत नाहीस ना, तुम्हाला त्रास होणार.” मध्यरात्री एक छोटी मुलगी, दोन तरुण मुली आणि एक मध्यमवयीन महिला—आम्ही सगळे रिक्षाने काकांकडे निघालो. पण मध्येच माझ्या मनात पुन्हा एक हट्ट आला—“मी रिक्षामध्ये बसणार नाही. तुम्ही मला पुस्तक देत नाहीत ना?”
आज मागे वळून पाहताना मला जाणवते की माझे ते वागणे किती विचित्र होते. परिस्थितीचे मला भान नव्हते. रात्र झाली आहे, आपण प्रवासात आहोत, आपल्यासोबत घरातील महिला आहेत, आपल्याला कुठे जायचे आहे—या कोणत्याही गोष्टीचा त्या क्षणी माझ्या मनावर परिणाम होत नव्हता. एका पुस्तकाची इच्छा इतकी तीव्र झाली होती की त्या इच्छेने माझ्या विचारशक्तीवरच ताबा मिळवला होता. एक छोटीशी इच्छा कुठे घेऊन जाऊ शकते, याचा हा माझ्या बालपणातील अनुभव होता.
इंजिनिअरिंग कॉलेजमधला असाच एक प्रसंग माझ्या आयुष्यात आला. आम्ही मराठवाड्यातून आलेली अतिशय बुद्धिमान, हुशार मुलं होतो. हॉस्टेलमध्ये काही गोष्टींची एक प्रकारची परंपराच तयार झालेली होती. त्यापैकी एक म्हणजे अश्लील चित्रफिती एकत्र पाहण्याची सवय. हा प्रकार अतिशय गुपचूपपणे चालायचा. कॉलेजचा वेळ कॉलेजसाठी आणि हॉस्टेलचा वेळ हॉस्टेलसाठी; पण अशा कार्यक्रमासाठी आम्ही सगळे एकत्र जमायचो. सुरुवातीला ही गोष्ट सहज गंमत म्हणून सुरू झाली. कुणालाही त्याचे पुढे काय परिणाम होऊ शकतात, याचा फारसा विचार नव्हता.
पहिल्या वर्षी हा प्रकार यशस्वीपणे झाला. दुसऱ्या वर्षीही झाला. दोन वर्षे सगळे सुरळीत चालले. त्यामुळे आमच्या मनामध्ये एक प्रकारची बेफिकिरी निर्माण झाली. “काहीच होत नाही” असा एक चुकीचा आत्मविश्वास तयार झाला. पण तिसऱ्या वर्षी आमच्यातीलच एक-दोन मुलांमध्ये भांडण झाले. त्यातून हा प्रकार बाहेर गेला आणि पोलिसांपर्यंत माहिती पोहोचली. पोलिसांनी हॉस्टेलवर छापा टाकला आणि जवळपास तीनशे विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात गेले.
आज त्या घटनेकडे मागे वळून पाहताना मला जाणवते की, हीसुद्धा एका प्रकारची पतनाची साखळी होती. सुरुवात एका विषयापासून झाली. त्या विषयाकडे पुन्हा पुन्हा वळण्याची सवय लागली. त्या सवयीला समूहाची साथ मिळाली. दोन वर्षे काही परिणाम झाला नाही, त्यामुळे सावधगिरी कमी झाली. आणि शेवटी एका छोट्याशा संघर्षातून संपूर्ण गोष्ट उघडकीस आली. विषयाकडे सतत लक्ष गेले की मन त्याच्याशी जोडले जाते आणि पुढे त्या जोडणीचे परिणाम आपल्याला आपल्या नियंत्रणाबाहेर घेऊन जाऊ शकतात.
प्रेमात पडल्यानंतरही अशाच प्रकारच्या तीव्र अपेक्षांचा अनुभव मी घेतलेला आहे. एखाद्या व्यक्तीकडून आपल्या मनाप्रमाणे प्रतिसाद मिळावा, एखादी गोष्ट आपल्या अपेक्षेप्रमाणे घडावी, अशी अपेक्षा जेव्हा अत्यंत तीव्र होते, तेव्हा त्या अपेक्षेवर आपले मन केंद्रित होते. अपेक्षा वाढत जाते, आसक्ती वाढते आणि मग समोरची परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे घडली नाही की निराशा, अस्वस्थता, क्रोध आणि मोह निर्माण होऊ शकतो. त्या क्षणी बाहेरची परिस्थिती आपल्याला चालवत असते आणि आपली बुद्धी मागे पडत जाते.
असाच अनुभव मला कॉलेजमध्ये निवडणूक लढवत असतानाही आला. अपेक्षा होत्या, काहीतरी मिळवण्याची इच्छा होती आणि त्या इच्छेची तीव्रता वाढत गेली की मनावर तिचे वर्चस्व निर्माण झाले. त्या काळातील अनुभवांनी मला एक गोष्ट शिकवली—माणसाला नेहमी मोठ्या संकटामुळेच धोका निर्माण होत नाही; अनेकदा एखादी छोटी इच्छा, तीव्र अपेक्षा किंवा बाह्य विषय मनावर हळूहळू इतका ताबा मिळवतो की त्यानंतर माणसाची विचार करण्याची क्षमता कमी होत जाते.
प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग असतात. कधी पैसा, कधी सत्ता, कधी एखादी व्यक्ती, कधी प्रतिष्ठा, कधी एखादी वस्तू, कधी व्यसन, तर कधी स्वतःच्या अपेक्षा—बाहेरची एखादी गोष्ट आपल्या बुद्धीवर हावी होते. आपण तिचा सतत विचार करू लागतो. तिच्याशी जोडले जातो. तिची इच्छा तीव्र होते. आणि मग हळूहळू आपण विषयाकडे पाहत नाही; उलट विषयच आपल्याला चालवू लागतो.
हीच ती अवस्था आहे, जिथे श्रीकृष्ण म्हणतात—“सम्मोहः”. माणूस सम्मोहित होतो. त्याचे विवेकाचे भान कमी होते. काय योग्य, काय अयोग्य, काय करावे आणि काय करू नये, याचा शांतपणे विचार करण्याची क्षमता कमी होते. पुढे स्मृतीचा विभ्रम होतो, बुद्धीचा नाश होतो आणि शेवटी “बुद्धिनाशात् प्रणश्यति”—माणसाची घसरण सुरू होते.
म्हणून गीतेचा हा श्लोक माझ्यासाठी केवळ वाचण्याचा किंवा पाठ करण्याचा श्लोक नाही. माझ्या स्वतःच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांकडे पाहिल्यावर त्याचा अर्थ अधिक स्पष्ट होतो. विषय बाहेर असतो; पण त्याला आपल्या मनात किती जागा द्यायची, याचा निर्णय आपण घेतो. त्या निर्णयाची जागा हरवली की बाहेरची गोष्ट आपल्या बुद्धीवर हावी होते.
म्हणूनच या साखळीला सुरुवातीलाच ओळखणे महत्त्वाचे आहे. मन एखाद्या विषयाकडे वारंवार खेचले जात आहे, एखाद्या व्यक्तीबद्दलची अपेक्षा वाढत आहे, एखादी इच्छा आपल्याला सतत अस्वस्थ करत आहे, किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपण स्वतःचे विवेकभान गमावत आहोत—हे जाणवले, तर तिथेच थांबले पाहिजे. कारण बरबादी शेवटच्या टप्प्यावर सुरू होत नाही; तिची सुरुवात त्याआधीच झालेली असते.
गीता आपल्याला नेमके हेच सावध करते—आपली बुद्धी बाह्य विषयांच्या ताब्यात जाऊ देऊ नका. कारण बुद्धी आपल्या हातात राहिली, तर आपण परिस्थितीचे स्वामी राहतो; पण बुद्धीच विषयांच्या ताब्यात गेली, तर माणूस स्वतःच्या घसरगुंडीचा प्रवासी बनतो.
माझ्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग आले आहेत, जिथे मी हा Downfall, ही घसरण, हा चित्ताचा वणवा अनुभवला आहे. कदाचित आपणही आपल्या आयुष्यात असे प्रसंग अनुभवले असतील. एखादी गोष्ट आपल्याला हवी असते. सुरुवातीला ती इच्छा अगदी सामान्य वाटते. पण आपण तिच्यावर सतत विचार करू लागतो, तिच्याशी मन जोडले जाते, तिची आसक्ती निर्माण होते आणि मग त्या इच्छेसाठी आपण काय करतो आहोत, याचे भानच राहत नाही. याच प्रक्रियेतून बरबादीची सुरुवात होते.
काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये पेपरफुटीची घटना घडली होती. मोटेगावकर सरांनी पेपर फोडला आणि त्यांच्या मित्रांनी मिळून तो पेपर फोडला, असे त्या घटनेबाबत सांगितले गेले. मी सहज त्या प्रकरणातील व्यक्तीच्या आयुष्याकडे पाहतो, तेव्हा मला हा Downfall दिसतो—पतनाची प्रक्रिया कशी सुरू झाली असेल, याचा विचार मनात येतो. अशा कितीतरी घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. सुरुवात एका छोट्या निर्णयापासून होते आणि पुढे त्याचे रूपांतर मोठ्या संकटामध्ये होते.
मी मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार घेत असताना अनेक रुग्णांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. त्यांच्या आयुष्यातील ही घसरगुंडी, हा vicious circle किती प्रभावी असतो, याचा मला अनुभव आला. माझे स्वतःचे काही मित्र मी पाहिले आहेत—अतिशय हुशार, अत्यंत बुद्धिमान, जबरदस्त क्षमता असलेले; पण या बरबादीच्या चक्रात अडकले. विध्वंसाच्या या साखळीमध्ये अडकत गेले आणि त्यांचे आयुष्य जवळजवळ संपून गेले.
या बरबादीच्या साखळीमुळे अनेक गुन्हे घडतात, अनेक खून होतात, अनेक दंगे होतात, अनेक विध्वंस घडतात, अनेक चोऱ्या होतात आणि अनेक चुकीच्या गोष्टी घडतात. आपण तुरुंगात गेलेल्या व्यक्तींकडे पाहिले, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अडकलेल्या व्यक्तींकडे पाहिले, अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींकडे पाहिले, व्यसनाधीन व्यक्तींकडे पाहिले किंवा गंभीर मानसिक संघर्षातून जाणाऱ्या व्यक्तींकडे पाहिले, तर त्यांच्या आयुष्यात एखाद्या टप्प्यावर सुरू झालेली ही घसरगुंडी अनेकदा पुढे पुढे जात गेलेली दिसते.
आणि म्हणूनच श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये या प्रक्रियेचे केलेले विश्लेषण अत्यंत महत्त्वाचे आहे.
ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते ।
सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥
क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥
श्रीकृष्ण एका मागोमाग एक पायरी सांगतात. प्रथम विषयांचे ध्यान होते. एखाद्या विषयाचा आपण सतत विचार करू लागतो. त्यातून संग, म्हणजे आसक्ती निर्माण होते. संगातून कामना निर्माण होते. कामना पूर्ण झाली नाही की क्रोध निर्माण होतो. क्रोधातून सम्मोह—विवेक झाकोळला जाण्याची अवस्था—निर्माण होते. सम्मोहामुळे स्मृतीचा विभ्रम होतो. योग्य-अयोग्याचे, आपले ध्येय काय आहे याचे भान ढळते. त्यातून बुद्धिनाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यानंतर श्रीकृष्ण शेवटी सांगतात—“बुद्धिनाशात् प्रणश्यति”—माणसाचा विनाश होतो.
विनोबा भावे यांनी या प्रक्रियेचे समश्लोकीमध्ये अतिशय सुंदर विवेचन केले आहे. “विषयांचे करी ध्यान, त्यास तो संग लागला; संगातुनी जडे काम...” या शब्दांतून गीतेने सांगितलेली ही साखळी अधिक सहजपणे आपल्या लक्षात येते.
इथे विषय म्हणजे केवळ एखादी वाईट गोष्ट नव्हे. एखादी वस्तू, व्यक्ती, इच्छा, आकर्षण, मोह, टेम्पटेशन किंवा काहीतरी मिळवण्याची तीव्र आकांक्षा—काहीही विषय होऊ शकतो. सुरुवातीला ती गोष्ट चुकीची असेलच असे नाही. पण तिच्याविषयीचा सततचा विचार मनाला तिच्याशी जोडतो. त्यातून आसक्ती निर्माण होते. आसक्ती तीव्र झाली की इच्छा आपल्याला चालवू लागते. आणि इच्छा आपल्या बुद्धीवर राज्य करू लागली की पुढची घसरण सुरू होते.
माझ्या बालपणातील त्या ब्रूस लीच्या पुस्तकाच्या प्रसंगातही मला आज हीच प्रक्रिया दिसते. पुस्तक स्वतः चुकीचे नव्हते. ते मला आवडले, एवढीच सुरुवात होती. पण त्या विषयाचा सतत विचार, त्याच्याशी निर्माण झालेली आसक्ती, ते मिळवण्याची तीव्र इच्छा आणि त्यासाठी परिस्थितीचे भान विसरणे—ही त्या छोट्या प्रसंगातील माझी पतनाची शिडी होती.
आपल्या आयुष्यातही अशी अनेक उदाहरणे दिसतात. एखादी व्यक्ती काहीतरी मिळवण्याच्या नादात स्वतःला हरवते. एखाद्या नात्याचा मोह इतका वाढतो की विवेक बाजूला पडतो. पैशाची इच्छा इतकी तीव्र होते की प्रामाणिकपणा सोडला जातो. व्यसनाची सुरुवात छोटी असते; पण हळूहळू तेच जीवनाचे केंद्र बनते. क्रोधाच्या एका क्षणातून नातेसंबंध तुटतात. एका चुकीच्या निर्णयातून पुढचा निर्णय घ्यावा लागतो आणि मग त्या निर्णयांचे ओझे वाढतच जाते. एक पायरी दुसऱ्या पायरीला जन्म देते.
म्हणूनच गीतेचा हा श्लोक केवळ अध्यात्माचा विषय नाही; तो मानवी मानसशास्त्राचे अत्यंत सूक्ष्म विश्लेषण आहे. माणसाचा विनाश एका क्षणात होत नाही. त्याआधी मनामध्ये अनेक छोट्या प्रक्रिया घडलेल्या असतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे—ही साखळी कुठल्याही एका टप्प्यावर तोडता येते.
विषयांचे ध्यान सुरू झाले आहे, हे लक्षात आले तर तिथे थांबता येते. एखाद्या गोष्टीशी आपली आसक्ती वाढते आहे, हे जाणवले तर त्या आसक्तीपासून अंतर घेता येते. कामना तीव्र होत आहे, हे लक्षात आले तर तिच्याकडे विवेकाने पाहता येते. क्रोध निर्माण झाला तर त्याच क्षणी प्रतिक्रिया न देता थांबता येते. आपण सम्मोहित होत आहोत, आपले भान ढळत आहे, हे लक्षात आले तर स्वतःला सावरता येते. स्मृतीचा, म्हणजेच आपल्या मूल्यांचा आणि ध्येयाचा विसर पडतो आहे, हे लक्षात आले तर पुन्हा विवेकाकडे वळता येते. बुद्धीवर संकट आले आहे, हे लक्षात येणे हीच बुद्धी वाचवण्याची सुरुवात आहे.
आज आपण मुलांना अनेक गोष्टी शिकवतो. शिक्षण, कौशल्ये, स्पर्धा, करिअर, तंत्रज्ञान—सगळे काही शिकवतो. पण माणूस स्वतःच्या मनाचा गुलाम कसा बनतो आणि स्वतःच्या पतनाला कसा सुरुवात करतो, हे आपण त्यांना शिकवतो का? ही घसरगुंडी कुठून सुरू होते, हे त्यांना सांगतो का? निदान घरामध्ये तरी या प्रक्रियेची जाणीव करून देतो का?
मला वाटते, ही जाणीव लहानपणापासून निर्माण झाली पाहिजे. कारण बरबादीपासून वाचण्यासाठी फक्त बाहेरचे नियम पुरेसे नाहीत; स्वतःच्या मनामध्ये काय घडते आहे, हे ओळखण्याची क्षमता आवश्यक आहे. गीता आपल्याला नेमके हेच शिकवते.
म्हणून माझी आपल्याला विनंती आहे—ही बरबादीची साखळी अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना, आपल्या मुलांना, आपल्या मित्रांना आणि स्वतःलाही ही प्रक्रिया समजून घेऊ द्या. कारण बरबादी झाल्यानंतर थांबण्यापेक्षा बरबादीची सुरुवात होत असतानाच ती ओळखणे अधिक महत्त्वाचे आहे.
एक तर विषयांचे ध्यान थांबवावे लागते. मोह झाला तर तो तोडावा लागतो. क्रोध आला तर तिथेच थांबावे लागते. सम्मोहाची अवस्था जाणवली तर सावध व्हावे लागते. बुद्धी भ्रष्ट होते आहे, हे लक्षात आले तर विवेकाने विचार करावा लागतो.
ही साखळी कुठेतरी ब्रेक करावी लागते. कारण ती ब्रेक केली नाही, तर श्रीकृष्णांचा शेवटचा शब्द आहे—“प्रणश्यति”.
बरबादी निश्चित होण्याआधी तिची सुरुवात ओळखणे, हीच खरी साधना आहे. स्वतःची बरबादी होऊ नये आणि आपल्या भोवतीच्या माणसांचीही बरबादी होऊ नये, म्हणून भगवद्गीतेने हा श्लोक सांगितला आहे.
गीता आपल्याला केवळ मोक्षाचा मार्ग सांगत नाही; ती माणूस बरबाद होऊ नये, याचाही मार्ग दाखवते.
राग आणि द्वेष : आयुष्याची बरबादी करणारे दोन शब्द
गीता दर्शन : श्रीमद्भगवद्गीता – दुसरा अध्याय, सांख्य योग
भाग ८५ | २३ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
आपण आपल्या अवतीभवती आणि आपल्या स्वतःच्या वागण्याकडे नीट निरीक्षणपूर्वक पाहिले, तर आपल्या लक्षात येते की आपले आयुष्य या दोन शब्दांमध्ये खूप अडकलेले आहे. एक शब्द आहे राग आणि दुसरा आहे द्वेष. बाह्य कामांमध्ये, बाह्य गोष्टींमध्ये ज्यावेळी आपण असतो, लिप्त असतो, त्यावेळी राग आणि द्वेष येणारच. ते अपरिहार्य आहेत. पण ते नियंत्रणात असतील, तर ठीक आहे. ते अनियंत्रित झाले, की मग आपण आधी पाहिलेल्या “ध्यायतो विषयान् पुंसः” या दुष्टचक्राची सुरुवात होते. पण पुन्हा एकदा स्थितप्रज्ञाचा विचार करता, ही प्रक्रिया कशी घडते आणि राग-द्वेषापासून मुक्ती किंवा निदान त्यांना नियंत्रणात ठेवणे कसे शक्य होऊ शकते, हे आपण पाहणार आहोत.
स्वतःच्या आत्मस्वरूपात तुष्ट राहणे, आत्मतुष्ट होणे, हे स्थितप्रज्ञाचे पहिले लक्षण, म्हणजेच इंडिकेटर आहे. स्वतःमध्येच खूश असणे. बाह्य घटकांनी, बाह्य गोष्टींनी खूश असण्यापेक्षा स्वतःमुळे खूश असणे. पण माणूस स्वतःमुळे खूश असू शकतो का? अगदी असू शकतो. स्वतःचे मन आहे, कल्पकता आहे, स्वतःची बुद्धी आहे. मन आणि बुद्धीचा उपयोग करून माणसाला खूप साऱ्या गोष्टी करता येतात. छान लेखन करता येते, स्वतःचे विचार समजून घेता येतात, स्वतःच्या भावना समजून घेता येतात, निसर्गाच्या बाबतीत विचार करता येतो आणि स्वतःचा अभ्यास करता येतो. थोडक्यात सांगायचे झाले, तर स्वरूपाचा अभ्यास—म्हणजे त्या अभ्यासामध्ये लीन होणे. मी कसा आहे, हे समजून घेणे आणि माझे अधिक उन्नत रूप कसे असेल, ते समजून घेणे.
आता हे आत्मस्वरूपात लीन होण्यासाठी पहिल्यांदा बाह्य गोष्टींमध्ये रमणे कमी करायचे आणि हळूहळू बाह्य गोष्टींत रमण्यापेक्षा आपल्यामध्ये रमायचे. बाह्य गोष्टी खूपदा आपल्या अनुकूल नसतात. बाह्य गोष्टींच्या बाबतीत आपल्याला कारणे सांगता येतात; आपल्या स्वतःच्या बाबतीत कारणे सांगणे थोडेसे अवघड जाते. त्यामुळे आत्मस्वरूपामध्ये आपण स्वतःला गुंतवून घेतले, तर खूप काही गोष्टी घडू शकतात.
पण हे होण्यासाठी काय करावे लागेल? सुख-दुःख हे अपरिहार्य आहेत. जरी आपण बाह्य गोष्टी एकदमच कमी करू शकत नसलो आणि आत्मस्वरूपामध्ये एकदमच तृप्त होऊ शकत नसलो, तरी या प्रक्रियेमध्ये एक मधली अवस्था आहे. त्या मधल्या अवस्थेमध्ये सुख-दुःखांमध्ये समत्व ठेवायचे. सुखाने हुरळून जायचे नाही आणि दुःखाने गलितगात्र व्हायचे नाही. हे करत असताना राग, भय आणि क्रोध या तिन्हींपासून मुक्त व्हायचे.
म्हणजे पहिले द्वंद्व आले सुख-दुःख आणि त्यामध्ये समत्व. त्याचबरोबर राग, भय आणि क्रोध यांपासून मुक्ती. दुसरे द्वंद्व आले शुभ-अशुभ. बाह्य गोष्टींमध्ये आपण हळूहळू गुंतणे कमी करत असलो, तरी अनुभव काय येतात? काही गोष्टी प्रतिकूल घडणार आहेत, अशुभ घडणार आहेत; काही शुभ घडणार आहेत. त्याबाबतीत थोडी अलिप्तता पाहिजे. मुख्यतः एखादी प्रतिकूल गोष्ट घडली, तर तिच्याबाबतीत द्वेष निर्माण करायचा नाही.त्यामुळे इथे आले शुभ आणि अशुभ.
पहिले द्वंद्व आले सुख-दुःख ही जोडी आणि दुसरी जोडी आली शुभ-अशुभ. पहिल्या श्लोकामधला राग आणि दुसऱ्या श्लोकामधला द्वेष घेतला आणि त्यातून पुढचा श्लोक येतो—
रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥
आता ‘राग’ म्हणजे काय, हे पहिल्यांदा समजून घेऊया. शब्द समजले, की आपल्याला त्याचा विचार करता येतो. संस्कृतमध्ये “रञ्जयति इति रागः”—जे चित्ताला रमवते किंवा त्यात गुंतवून ठेवते, अशी त्याची व्याख्या केली जाते. पतंजली योगसूत्रात म्हटले आहे—“सुखानुशयी रागः”—म्हणजे ज्या ज्या गोष्टीतून आपल्याला सुख मिळते, त्याविषयी निर्माण होणारी तीव्र ओढ म्हणजे राग.
माणसाला राग प्रामुख्याने कोणत्या गोष्टींचा असतो? इंद्रियांच्या माध्यमातून जो राग निर्माण होतो, तो समजून घेऊया.
रूप हा विषय आला आणि डोळे हे इंद्रिय आले. सुंदर वस्तू, दृश्य किंवा व्यक्ती पाहण्याची तीव्र ओढ निर्माण होते. आपल्याला अनेक ठिकाणी फिरावेसे वाटते, काही ठराविक दृश्ये पुन्हा पुन्हा पाहावीशी वाटतात, विशिष्ट व्यक्ती आपल्याला पुन्हा पुन्हा पाहाव्याशा वाटतात आणि सुंदर वस्तू आपल्या घरात असाव्यात असे वाटते. वस्तू, व्यक्ती आणि दृश्य यांना पाहण्याची तीव्र ओढ निर्माण होते.
रस हा दुसरा विषय आला आणि इंद्रिय आले जीभ. चविष्ट, गोड किंवा विशिष्ट प्रकारच्या खाण्या-पिण्याची आसक्ती निर्माण होते. म्हणजे, “हे मला आवडले, तर हे पाहिजेच आहे मला,” असे वाटणे.
गंध हा विषय आला आणि नाक हे इंद्रिय आले, की सुगंधी द्रव्यांचा मोह, मस्त वास आला पाहिजे, आपल्याला छान वाटले पाहिजे, अशी इच्छा निर्माण होते.
स्पर्श हा विषय आला आणि त्वचा हे इंद्रिय आले, की शारीरिक सुख, मऊ वस्त्र किंवा सुखावह स्पर्शाची ओढ निर्माण होते. मस्त वाटले पाहिजे, अशी अपेक्षा असते.
शब्द हा विषय आला आणि कान हे इंद्रिय आले, की स्वतःचे कौतुक ऐकणे किंवा प्रिय संगीत, आवडता आवाज ऐकण्याची आसक्ती निर्माण होते.
आता हे इंद्रियजन्य झाले. त्यानंतर
व्यक्तींचा राग—किंवा मोह, ममता, असेही त्याला म्हणता येईल. आपली मुले, कुटुंबीय, मित्र, प्रिय व्यक्ती यांच्याबद्दलची अति-आसक्ती; “हे माझे आहे” ही भावना—यालाही आपण राग म्हणतो.
संपत्ती किंवा सत्तेचा राग—त्याला लोभ असेही म्हटले जाते. पैसा, स्थावर मालमत्ता, अधिकार, पद, सामाजिक प्रतिष्ठा टिकवून ठेवण्याची किंवा वाढवण्याची ओढ.
अहंकाराचा राग—माझे मत, माझी प्रतिष्ठा, माझी विचारसरणी, माझा धर्म, माझी जात याबद्दलची अतीव पकड.
आपण हे सगळे पाहिले, तर लक्षात येते की या गोष्टींच्या बाबतीत आपल्याला राग असतो. म्हणजे पहिले, विषयांच्या बाबतीत आसक्ती निर्माण होणे. दुसरे, व्यक्तींबद्दल मोह आणि ममता निर्माण होणे. संपत्ती आणि सत्तेच्या बाबतीत लोभ निर्माण होणे. आणि स्वतःचा अहंकार सुखवण्याची अहंता निर्माण होणे. हे सगळे रागाचे दर्शक आहेत.
आता आपले जीवन सुंदर करण्यासाठी या सगळ्या गोष्टी लागतातच की! मग त्यांना सोडून कसे चालेल? पण या गोष्टी सहज, साध्या मार्गाने आपल्याला मिळाल्या, त्यांच्याबाबतीत फार तीव्र भावना नसल्या, त्या चुकीच्या मार्गाने मिळवल्या नसतील आणि त्या मिळाल्या नाहीत किंवा कमी-जास्त झाल्या, तरी त्यातून अस्वस्थता निर्माण होत नसेल, तर त्याला आपण सीमित राग म्हणू शकतो. सीमित राग म्हणजे नियंत्रणात असणारा राग. जर तो नियंत्रणात असेल, संयमित असेल, तर ठीक आहे.
पण तो संयम तुटला आणि अतिरेक सुरू झाला, तर प्रश्न निर्माण होतो. एक मर्यादा असते. त्या मर्यादेच्या आत असेल, तर ठीक आहे; पण त्या मर्यादेच्या पुढे गेले, तर मात्र अवघड जाते. त्यामुळे मर्यादा आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक आहेत; पण मर्यादेबाहेर गेल्या, की अडचण सुरू होते.
असेच द्वेषाचे आहे. पतंजली योगसूत्रामध्ये द्वेषाची अतिशय अचूक आणि शास्त्रीय व्याख्या दिली आहे—“दुःखानुशयी द्वेषः”. सुखातून राग निर्माण होतो आणि दुःखातून द्वेष निर्माण होतो. ज्या ज्या अनुभवातून पूर्वी दुःख, त्रास किंवा वेदना मिळाल्या, त्याविषयी मनामध्ये निर्माण होणारी तिरस्काराची, अस्वस्थतेची आणि प्रतिकाराची वृत्ती म्हणजे द्वेष.
राग म्हणजे अनुकूल गोष्टींना स्वतःकडे खेचणे—“मला हे हवे आहे.” द्वेष म्हणजे प्रतिकूल, त्रासदायक आणि नकोशा वाटणाऱ्या गोष्टींना स्वतःपासून लांब ढकलणे—“हे मला नको आहे” किंवा “हे नष्ट व्हावे.”
द्वेष कशाकशाचा असतो? ज्याप्रमाणे सुख देणाऱ्या गोष्टींबद्दल आसक्ती निर्माण होते, त्याप्रमाणे दुःख, असुविधा किंवा असुरक्षितता निर्माण करणाऱ्या घटकांबद्दल माणसाच्या मनात द्वेष उत्पन्न होतो. प्रामुख्याने प्रतिकूल संवेदनांच्या बाबतीत तिरस्कार निर्माण होतो.
रस हा विषय घेतला आणि जीभ हे इंद्रिय घेतले, तर कडू, बेचव किंवा आजारी असताना घ्यावी लागणारी औषधे, काही पदार्थ यांचा तिटकारा निर्माण होतो. काहीतरी पदार्थ नकोसे वाटतात. आपण म्हणतो, “मला हे आवडत नाही.”
गंध हा विषय आणि नाक हे इंद्रिय घेतले, तर दुर्गंधी, घाण किंवा मनाविरुद्धचा वास याबाबतीत तिटकारा असतो.
स्पर्श आणि शरीर यांचा विचार केला, तर तीव्र ऊन, अतिथंडी, शारीरिक वेदना, जखम, रोग आणि वार्धक्य याबाबतीत वाटणारा द्वेष लक्षात येतो.
शब्द आणि कान यांचा विचार केला, तर स्वतःची निंदा, टोमणे, कर्कश आवाज, विरोधी विचार ऐकण्याचा तिटकारा, शिव्या खाणे—या सगळ्या गोष्टींबद्दल असणारा द्वेष लक्षात येतो.
दृश्य आणि डोळे यांचा विचार केला, तर कुरूपता, अस्वच्छता, न आवडणाऱ्या गोष्टी पाहण्याचा संताप जाणवतो.
आता काही व्यक्तींच्या बाबतीतही द्वेष असतो. ज्यांनी कधी आपला अपमान केला आहे, फसवणूक केली आहे, आर्थिक किंवा मानसिक हानी पोहोचवली आहे, त्यांच्याबद्दल मनामध्ये कायम राहणारी आढी असते. स्पर्धकांविषयीही द्वेष निर्माण होतो. आपल्यापेक्षा पुढे गेलेल्या, यशस्वी, श्रीमंत किंवा अधिक लोकप्रिय असलेल्या व्यक्तींविषयी मनात निर्माण होणारा एक सूक्ष्म द्वेष असतो. त्याला आपण मत्सर असेही म्हणतो.
समोरच्या व्यक्तीचा अहंकार, खोटेपणा, संथपणा किंवा दुराग्रह पाहून त्याच्या अस्तित्वाचाच येणारा तिटकारा—ह्यालाही आपण द्वेष म्हणतो. परिस्थिती किंवा कर्माचा द्वेष म्हणजे अस्वीकार. गरिबी, अपयश, बेरोजगारी किंवा मनाविरुद्ध होणाऱ्या घटनांबाबत संताप निर्माण होणे. कष्टाचा द्वेषही असतो. शिस्त, अभ्यास, कठोर परिश्रम, शारीरिक कष्ट, व्यायाम करण्याची टाळाटाळ आणि त्याबद्दल असणारा कंटाळा—हा कष्टाचा द्वेष आहे.
परिवर्तनाचा द्वेष म्हणजे जुने सोडून नवीन स्वीकारताना होणारा त्रास, बदलाचा मानसिक त्रास आणि त्याला होणारा विरोध. विरोधी मतांचा द्वेष म्हणजे आपली श्रद्धा, विचारसरणी, राजकीय मत किंवा मूल्ये यांपेक्षा वेगळा विचार मांडणाऱ्यांबद्दलची तीव्र असहिष्णुता. आणि जात, धर्म, देश किंवा प्रांताच्या आधारावर निर्माण होणारा पूर्वग्रहयुक्त सामूहिक तिरस्कारही द्वेषाचाच एक प्रकार आहे. “हा या जातीचा आहे ना, हा या धर्माचा आहे ना, हा या देशाचा आहे ना, हा या प्रांताचा आहे ना—मग हा असाच आहे,” असा निष्कर्ष काढणे ही त्याचीच उदाहरणे आहेत.
अध्यात्मशास्त्रात, भारतीय मानसशास्त्रामध्ये राग आणि द्वेष या दोन्हींचा अतिशय सूक्ष्म विचार केला आहे. जिथे अति-आसक्ती असते, तिथे द्वेषाची शक्यताही निर्माण होते. एखाद्या वस्तूबाबत तीव्र आवड असली, की ती न मिळवून देणाऱ्या परिस्थितीबद्दल द्वेष निर्माण होतो. आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीवर कोणी टीका केली, की त्या टीकाकाराचा द्वेष वाटू लागतो.
म्हणूनच राग आणि द्वेष हे केवळ दोन स्वतंत्र भाव नाहीत; अनेकदा ते एकमेकांशी जोडलेले असतात. जिथे “मला हे हवेच” ही तीव्रता वाढते, तिथे “हे मला नकोच” याचीही तीव्रता वाढू शकते. त्यामुळे या दोघांकडे अतिशय जागरूकतेने पाहणे गरजेचे आहे.
आता पुन्हा श्रीकृष्णांच्या श्लोकाकडे येऊया—
रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥
“रागद्वेषवियुक्तैस्तु”—राग आणि द्वेष यांपासून मुक्त असावे, असे या श्लोकात सांगितले आहे. पूर्णपणे मुक्त होणे प्रत्येक क्षणी शक्य होईलच असे नाही. पण त्यांना सीमित ठेवणे, नियंत्रणात ठेवणे आणि त्यांच्यामुळे आपल्या बुद्धीवर ताबा जाऊ न देणे, हे नक्कीच साधता येऊ शकते.
हे दोन शब्द समजून घेणे खूप गरजेचे आहे—राग आणि द्वेष. आपल्या स्वतःच्या भावना आणि विचारांचे विश्लेषण करताना आपण या दोन सब-हेडखाली आपल्या मनाचा अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येते की आपल्या आयुष्यातील कितीतरी समस्या याच्याशी जोडलेल्या आहेत. मला काय खूप आवडते? मला काय अजिबात आवडत नाही? काय मिळाले नाही, तर मी अस्वस्थ होतो? काय घडले, की माझ्या मनात तीव्र प्रतिकार निर्माण होतो? कोणत्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात अति-मोह आहे? कोणत्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात द्वेष आहे? कोणत्या गोष्टी गमावण्याची मला भीती वाटते? कोणत्या गोष्टी स्वीकारण्यास मी तयार नाही? असे प्रश्न आपण स्वतःला विचारायला सुरुवात केली, तर आपल्या अंतर्मनाचा एक वेगळाच नकाशा आपल्या समोर उभा राहतो.
आणि याच ठिकाणी भगवद्गीता आपल्याला सावध करते. राग आणि द्वेष असणे ही समस्या नाही; त्यांच्या ताब्यात जाणे ही समस्या आहे. आवड असणे चुकीचे नाही. पण आवड इतकी वाढली, की ती पूर्ण झाली नाही तर मन अस्थिर झाले, तर प्रश्न आहे. एखादी गोष्ट न आवडणे चुकीचे नाही. पण ती गोष्ट समोर आली, की बुद्धीचा ताबा सुटला, मन अस्वस्थ झाले आणि आपण चुकीची कृती करू लागलो, तर प्रश्न आहे.
म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात—“रागद्वेषवियुक्तैस्तु
राग आणि द्वेष पूर्णपणे नाहीसे होतीलच असे नाही. पण ते आपल्या बुद्धीचे मालक होऊ नयेत. आपण त्यांचे निरीक्षक व्हावे. त्यांना ओळखावे. त्यांची तीव्रता समजून घ्यावी आणि योग्य वेळी त्यांना मर्यादेत आणावे. म्हणून पुन्हा एकदा श्रीकृष्णांच्या शब्दांकडे पाहूया—“रागद्वेषवियुक्तैस्तु...” राग आणि द्वेष यांना ओळखा. त्यांचे स्वरूप समजा. ते आपल्या मनात कुठे आणि कसे निर्माण होतात, हे पाहा. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे—त्यांच्या ताब्यात जाऊ नका.
याच मार्गाने पुढे प्रसाद, म्हणजेच अंतःकरणाची प्रसन्नता आणि शांतता प्राप्त होते.
परत तुम्हाला विनंती करतो—हा विचार अनेक लोकांपर्यंत पोहोचवा, अनेक लोकांपर्यंत न्या.
प्रसादावस्था : स्थितप्रज्ञतेची खरी ओळख
गीता दर्शन : श्रीमद्भगवद्गीता – दुसरा अध्याय, सांख्य योग
भाग ८६ | २४ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
रागद्वेषवियुक्तैस्तु विषयान्विषयैश्चरन् ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ ६४ ॥
पदच्छेद:
राग-द्वेष-वियुक्तैः तु विषयान् इन्द्रियैः चरन् ।
आत्म-वश्यैः विधेयात्मा प्रसादम् अधिगच्छति ॥
मराठीत अर्थ:
परंतु ज्याचे मन त्याच्या स्वतःच्या नियंत्रणात आहे, असा साधक (विधेयात्मा) राग (आसक्ती/प्रेम) आणि द्वेष यांपासून मुक्त असलेल्या, स्वतःच्या वशमध्ये राहिलेल्या इंद्रियांद्वारे विषयांचा उपभोग घेत असतानाही चित्ताच्या प्रसन्नतेला (शांततेला) प्राप्त होतो.
“मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण” — तुकाराम महाराजांचा हा अभंग खूप काही सांगून जातो. मनाची प्रसन्नता किती महत्त्वाची आहे, हे या एका वाक्यातून लक्षात येतं.
“मन चंगा तो कठौती में गंगा” असंही म्हटलं जातं. गंगा म्हणजे निर्मळतेचं, पवित्रतेचं आणि पापमुक्तीचं एक वेगळं स्थान. आपलं मन जर निर्मळ असेल, तर जणू आपण गंगेत स्नान केल्यासारखंच आहे. बाहेरची गंगा जितकी पवित्र मानली जाते, तितकीच आतली निर्मळता ही माणसाच्या जीवनासाठी महत्त्वाची आहे.
साहिर लुधियानवी यांचं एक खूप सुंदर गाणं आहे —त्यामध्ये ते म्हणतात,
“मन ही देवता, मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई।
जग से चाहे भाग ले कोई, मन से भाग न पाए।
तोरा मन दर्पण कहलाए.”
म्हणजे माणूस जगापासून दूर पळू शकतो; पण स्वतःच्या मनापासून मात्र पळता येत नाही.
अटलबिहारी वाजपेयींचं एक वाक्य मला खूप आवडतं —
“मन की फकीरी पर कुबेर की संपदा भी रोती है.”
ही सगळी वाक्यं ऐकल्यानंतर असं वाटतं की मनाची अशी अवस्था, मनाची अशी स्थिती आपल्याला प्राप्त झाली तर किती सुंदर होईल! कुणाला नको असते अशी अवस्था?
पण सारासार विचार केला तर वर जी ‘मन’ ही संकल्पना आपण पाहतो, ती केवळ मन या शब्दापुरती मर्यादित नाही. इथे मनाचा अधिक व्यापक विचार केलेला आहे. त्याला आपण अंतःकरण म्हणतो — मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांची एकत्रित अवस्था म्हणजे अंतःकरण.
या अंतःकरणाची जर अशी प्रसन्न, निर्मळ, स्थिर आणि निर्भय अवस्था निर्माण झाली, तर किती छान होईल! पण मूळ प्रश्न असा आहे की माणसाला नेमकं काय हवं आहे आणि काय नको आहे? गंमत अशी आहे की ‘मला काय हवं?’ या प्रश्नाच्या उत्तरातच माणूस अनेकदा द्वंद्वात असतो. त्याला नेमकं काय हवं आहे, हेच त्याला माहीत नसतं. आपल्या कानावर अशी कितीतरी सुंदर वाक्यं वारंवार पडतात; आपण ती ऐकतोही, पण त्यांचा आपल्या जीवनाशी संबंध जोडून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न मात्र करत नाही.
भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण आतापर्यंत प्रज्ञेची स्थिरता म्हणजे काय, स्थितप्रज्ञता म्हणजे काय आणि त्या दिशेने जाण्यासाठी कोणता मार्ग सांगितला आहे, हे समजून घेत आलो आहोत.
कामनांचा सतत विचार न करता, त्यांना अनावश्यक बळ न देता; सुख-दुःखामध्ये समत्व ठेवून; शुभ-अशुभाच्या बाबतीत समजून-उमजून भूमिका घेत; आणि माणसाला हळूहळू खाली खेचणाऱ्या त्या दुष्टचक्रामध्ये अडकत असताना ते चक्र भेदण्याची ताकद ज्ञानाच्या माध्यमातून निर्माण करून — आपण पुढे जातो.
इंद्रियांच्या माध्यमातून सतत येणाऱ्या इनपुटमुळे वाहवत न जाता, भोगाच्या, आनंदाच्या आणि विविध उत्तेजनांच्या गर्दीमध्ये न अडकता, आपल्यासाठी योग्य काय आहे आणि कुठे थांबायचं आहे, हे जर आपल्याला कळलं, तर नकळतपणे आपण पुढे जातो. राग आणि द्वेष निर्माण झाले तरी त्यांच्याशी समजूतदारपणे वागण्याची ताकद आपल्यामध्ये येते.
इंद्रियांकडून ज्ञानग्रहण आणि आनंदग्रहण होणं ही अगदी नैसर्गिक आणि गरजेची गोष्ट आहे. प्रश्न इंद्रियांचा नाही; प्रश्न आहे इंद्रियांच्या माध्यमातून येणाऱ्या अनुभवांशी आपण कसे वागतो याचा. त्या सगळ्या चक्रामध्ये असतानादेखील आपण संयमाने वागलो, आपल्या दीर्घकालीन हिताचा विचार केला, तर आपल्या मनाची एक विलक्षण अवस्था निर्माण होते. भगवद्गीता या अवस्थेला म्हणते — प्रसादावस्था.
ही प्रसादावस्था म्हणजे काय?
ही मनाची प्रसन्नता आहे. मनाची निर्मळता आहे. मनाची स्थिरता आहे. मनाची एक अपूर्व अवस्था आहे. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे — हे एक निर्धास्त मन आहे.
म्हणून स्थितप्रज्ञतेमुळे काय मिळतं? स्थितप्रज्ञतेच्या सरावामुळे काय मिळतं? द्वंद्वांकडे तटस्थपणे, समजून-उमजून पाहिल्यामुळे काय मिळतं? इंद्रियांच्या बाबतीत संयम राखल्यामुळे काय मिळतं?
तर मिळते — मनाची, म्हणजेच अंतःकरणाची प्रसादावस्था.
आणि ही काही केवळ कल्पना नाही. ही काही अशक्य गोष्ट नाही. ही अवस्था प्राप्त होऊ शकते. आपल्या ऋषी-मुनींनी, संतांनी आणि जीवनात अंतर्मुख प्रवास केलेल्या असंख्य व्यक्तींनी हा मार्ग जगून दाखवला आहे.
म्हणूनच अंतःकरणाची प्रसादावस्था हे स्थितप्रज्ञतेचं एक फार मोठं निदर्शक आहे. स्थितप्रज्ञतेपर्यंत पोहोचण्यासाठी आपण कामना, सुख-दुःख, शुभ-अशुभ, इंद्रियसंयम, राग-द्वेष अशा अनेक गोष्टींचा विचार करतो. पण या सगळ्या साधनेचा परिणाम कुठे दिसतो? तो आपल्या अंतःकरणाच्या अवस्थेत दिसतो.
एकदा ही प्रसादावस्था आली की प्रसन्नता येते; प्रसन्नतेतून निर्मळता येते; निर्मळतेतून स्थिरता येते; आणि या सगळ्यांतून एक प्रकारची निर्भयता निर्माण होते.
अशी निर्भयता असलेला समाज, असा प्रसन्न समाज, असं प्रसन्न कुटुंब आणि असा प्रसन्न कार्यक्षेत्रातील परिसर असेल, तर किती सुंदर जग निर्माण होईल!
पण प्रश्न असा आहे की ही प्रसन्न अवस्था निर्माण करण्यासाठी ईश्वराने आपल्याला स्वयंपूर्ण केलं आहे, हे आपल्याला लक्षात येत नाही. आपल्यामध्येच त्याची बीजं आहेत. हो, परस्पर सहकार्याने ही प्रसादावस्था अधिक लवकर समजून घेता आणि साधता येते.
म्हणून आपण संत-महंतांचा अभ्यास का करायचा? कारण ते या मार्गावर आपल्यापेक्षा अनेक पायऱ्या पुढे गेलेले असतात. त्यांनी घेतलेले अनुभव आपल्याला अक्षरशः अनुभवावेच लागतील असं नाही; पण त्यांचे अनुभव आपल्यासाठी प्रमाण बनतात. ते आपल्याला दिशा देतात, ठोकताळे देतात आणि मार्गावर आपण कुठे आहोत, हे तपासण्याची संधी देतात.
म्हणून प्रसन्न समाज निर्माण करणं, प्रसन्न कुटुंब निर्माण करणं, आपल्या कार्यक्षेत्रात प्रसन्न वातावरण निर्माण करणं — म्हणजेच आपल्या अंतःकरणात प्रसादावस्था निर्माण करण्याची ही एक चळवळ आहे.
गीतेचा अभ्यास मुळात याच परिवर्तनाचा अभ्यास आहे.
पण मला एक प्रश्न पडतो — युद्ध करत असताना अशी प्रसादावस्था येऊ शकते का?
किती अवघड वाटतं ना!
एका बाजूला युद्ध, संघर्ष, जबाबदारी आणि कर्तव्य; आणि दुसऱ्या बाजूला मनाची प्रसन्नता, स्थिरता आणि निर्मळता! या दोन्ही गोष्टी एकत्र कशा शक्य आहेत?
पण भगवद्गीता याच ठिकाणी आपल्याला एक फार मोठा जीवनसत्याचा अनुभव देऊ पाहते. प्रसन्नता म्हणजे संघर्षापासून पळून जाणं नव्हे. प्रसादावस्था म्हणजे जीवनातील आव्हानं नाहीशी होणं नव्हे. आव्हानांच्या मध्यभागी राहूनही अंतःकरणाची समतोल अवस्था टिकवता येणं — हीच खरी कसोटी आहे.
आणि पुढच्या श्लोकामध्ये या प्रसादावस्थेमुळे नेमकं काय होतं, अंतःकरण प्रसन्न झाल्यानंतर माणसाच्या जीवनात कोणता बदल घडतो, याचं अतिशय सुंदर विवेचन श्रीकृष्ण करतात.
भगवद्गीतेने आपल्याला भरपूर ज्ञान दिलं आहे. भरपूर काही सांगितलं आहे. पण हे ज्ञान केवळ आपल्यापुरतं मर्यादित राहू नये. अनेकांपर्यंत हे पोहोचवा. अनेकांना सांगा.
कारण माहिती नसणं हीदेखील एक मोठी अडचण आहे. आपला समाज या विचारांपासून कितीतरी वर्षं, कितीतरी कोसो दूर राहिला आहे. म्हणूनच भगवद्गीतेचा हा जीवनदायी विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे.
प्रसन्न मनापासून प्रसन्न अंतःकरणाकडे, आणि प्रसन्न अंतःकरणापासून प्रसन्न समाजाकडे — हा भगवद्गीतेचा प्रवास आहे.
प्रसादावस्था : बाह्य जग नाही, आपण बदलतो
गीता दर्शन : श्रीमद्भगवद्गीता – दुसरा अध्याय, सांख्य योग
भाग ८७ | २५ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥
हा श्लोक कितीतरी वर्षांपासून वेगवेगळ्या संदर्भांत ऐकत आलो आहे. माझ्या बाबतीत तर या श्लोकाचा माझ्या नावाशीही एक सुंदर संबंध आहे. विवेकानंद केंद्रामध्ये गेल्यानंतर अरुणाचलमध्ये माझी पोस्टिंग झाली आणि त्यानंतर मी दिब्रूगडला गेलो. त्या काळात विवेकानंद विद्यालयाच्या कामकाजाची जबाबदारी पाहणारे भानूदाजी मला भेटले की आवर्जून हा श्लोक म्हणायचे. त्याआधी कन्याकुमारीमध्ये विवेकानंद केंद्राच्या तत्कालीन अध्यक्षा लक्ष्मीकुमारी दीदी आम्हाला दररोज एका श्लोकाचे जवळजवळ तासभर निरूपण करून सांगायच्या. या श्लोकाचा अर्थ त्यांनी सांगितला, तेव्हा पहिल्यांदाच माझ्या स्वतःच्या नावाकडे एका वेगळ्या अर्थाने पाहायला सुरुवात झाली.
मला सहज माझ्या आजोबांची आठवण झाली आणि मी त्यांना माझ्या नावाबद्दल लिहून पाठवायला सांगितले. त्यांनी जवळजवळ पाच पत्रे लिहिली; प्रत्येक पत्र साधारण चार-पाच पानांचे होते. ती पत्रे आजही माझ्याकडे आहेत. त्या निमित्ताने मला माझ्या अस्तित्वाकडेही एका वेगळ्या पद्धतीने पाहता आले. मी स्वतःचे दोन अवस्थांमध्ये वर्गीकरण केले—एक म्हणजे मी खरोखर ‘प्रसाद’ असतो ती अवस्था आणि दुसरी म्हणजे केवळ नावापुरता प्रसाद असतो ती अवस्था.
मी खरोखर प्रसाद नसतो, तेव्हा अगदी छोट्या-छोट्या गोष्टी मला अस्वस्थ करतात. उदाहरणार्थ, मुलं प्रार्थनेच्या वेळी लवकर गोलात उभी राहिली नाहीत, एकमेकांशी बोलू लागली, गडबड करू लागली किंवा हट्ट करू लागली, तरी माझी चिडचिड होते. मी रिअॅक्ट होतो, कधी भांडतो, अस्वस्थ होतो. त्याचा परिणाम माझ्या डोक्यावर, झोपेवर, पचनावरही होतो. मनामध्ये निगेटिव्हिटी भरत जाते. गंमत म्हणजे यामागे एखादे फार मोठे संकट असतेच असे नाही. माझ्यावर फार मोठा अन्याय झाला आहे, कोणीतरी माझ्यावर अत्याचार केला आहे, असे काहीही नसते. कधी एखादी व्यक्ती वेळेवर आली नाही, कुणाचे वारंवार त्रासदायक फोन येत राहिले किंवा कुणी दिलेला शब्द पाळला नाही, एवढेसे कारणही माझ्या अस्वस्थतेला पुरेसे ठरते.
अशा वेळी मी चिडतो, अस्वस्थ होतो, बेधडक बोलतो, माझा सेल्फ-टॉक वाढतो आणि कधी कधी घाईघाईने निर्णयही घेतो. ही माझी व्यावहारिक जगातली दुःखी अवस्था असते. बाहेरची परिस्थिती मला त्रास देत असते आणि त्या परिस्थितीचा परिणाम माझ्या शरीरावर, मनावर, बुद्धीवर आणि अहंकारावरही होत असतो. म्हणजेच बाह्य जगातील एखादी छोटीशी घटना माझ्या अंतर्गत अवस्थेला सहज हलवून टाकते.
पण याच परिस्थितीत माझी दुसरी अवस्था असते. त्यावेळी बाहेरचे जग काहीच बदललेले नसते; बदललेला असतो तो मी. प्रार्थना सुरू असताना दोन मुलं एकमेकांशी बोलत असतील, तर त्यांच्यावर चिडण्याऐवजी मी एखादी गंमत करतो. ती मुलंही हसतात आणि मीही हसतो. मुलं हट्ट करू लागली, तरी त्या हट्टाचा मला राग येत नाही; उलट तो अनुभव घेता येतो. कुणी उशिरा येणार असेल, तर त्या गोष्टीत अडकून न पडता मी माझे दुसरे काम करत राहतो. मनात एखादी नवीन कल्पना असते, काहीतरी लिहावेसे वाटते, काहीतरी नवीन करावेसे वाटते. लोकांशी बोलावेसे वाटते, रील्स तयार कराव्याशा वाटतात, सर्जनशीलतेचा आनंद घ्यावासा वाटतो. जग तेच असते; परिस्थिती तीच असते; माणसं तीच असतात—फक्त माझा त्यांच्याकडे पाहण्याचा आणि त्यांना प्रतिसाद देण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो.
मग एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो—जर बाह्य जग तेच आहे, माझे डोळे तेच आहेत, माझी इंद्रिये तीच आहेत, माझ्या शरीराची रचना तीच आहे, माझा आवाज तोच आहे आणि माझे ‘हार्डवेअर’ही तेच आहे, तर हा फरक निर्माण कुठे होतो? तो माझ्या ‘सॉफ्टवेअर’मध्ये होतो. माणसाचे हे सॉफ्टवेअर म्हणजे त्याचे अंतःकरण. भारतीय चिंतनपरंपरेत अंतःकरणाचे चार भाग सांगितले आहेत—मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या चौघांची अवस्था संतुलित, प्रसन्न आणि सुसंवादी असेल, तर बाह्य जग कसेही वागले तरी आपण त्याचे अयोग्य प्रतिसाद स्वतःवर लादून घेत नाही.
उलट, बाहेर काही चुकीचे घडत असेल, तर त्यात योग्य ते ‘करेक्शन’ही आपण शांतपणे, आनंदाने आणि कधी विनोदातून करू शकतो. मात्र अंतःकरणाची ही प्रसादावस्था नसेल, तर अगदी योग्य गोष्ट सांगतानाही आपल्याला प्रचंड त्रास होतो. इतरांच्या वागण्यामुळे आपण अस्वस्थ होतो आणि आपल्या आक्रमक प्रतिक्रियांमुळे इतरांनाही त्रास होतो. त्यामुळे समस्या केवळ बाहेरच्या जगात नसते; समस्या आपल्या आणि बाह्य जगाच्या संबंधात निर्माण झालेल्या विसंवादात असते.
मला असे वाटते की या दोन अवस्थांमध्ये प्रत्येक माणूस सतत ये-जा करत असतो. कधी आपण भगवद्गीतेने सांगितलेल्या प्रसादावस्थेत असतो, तर कधी व्यवहारातील सुख-दुःखांनी हेलकावे खात असतो. कधी मन प्रसन्न असते, तर कधी एखाद्या छोट्याशा घटनेने ते अस्वस्थ होते. म्हणजे आपल्या मनाच्या अवस्थांमध्ये एक प्रकारच्या ‘वेव्ह्ज’ तयार होतात—कधी सुख, कधी दुःख; कधी प्रसन्नता, कधी अस्वस्थता. यापेक्षाही वेगळी एक अवस्था असू शकते, जिथे माणसाचे मन दीर्घकाळ अस्वस्थ आणि दुःखी राहते. बाहेर आनंदाची अनेक कारणे असूनही ती अनुभवण्याची अंतर्गत क्षमता कमी झालेली असते. अंतःकरणातील हार्मनी इतकी बिघडलेली असते की आनंद आणि शांतता असूनही त्यांचा अनुभव घेता येत नाही.
म्हणूनच भगवद्गीतेचा हा श्लोक केवळ ‘प्रसन्न राहा’ एवढेच सांगत नाही. तो अंतःकरणाच्या एका सखोल अवस्थेकडे निर्देश करतो—‘प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते।’ मनाची प्रसादावस्था निर्माण झाली की दुःखांची हानी होऊ लागते. येथे दुःख म्हणजे केवळ बाहेरून आलेली एखादी घटना नव्हे; तर त्या घटनेमुळे आपल्या अंतःकरणात निर्माण होणारा विसंवादही आहे. प्रसन्नता, निर्मलता, निर्भयता आणि अंतर्गत समतोल यांमुळे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांच्यात एक प्रकारची हार्मनी निर्माण होते. कुठलाही अतिरेक राहत नाही. अंतःकरण स्थिर होते.
आणि म्हणून पुढचा चरण अधिक महत्त्वाचा आहे—‘प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते।’ अंतःकरण प्रसन्न झाले की बुद्धी स्थिर होते. मनाची अस्वस्थता कमी झाली की निर्णयक्षमता अधिक स्वच्छ होते. भावनांच्या भरात घेतलेले निर्णय आणि प्रसन्न अंतःकरणातून घेतलेले निर्णय यांच्यामध्ये मोठा फरक असतो. मन शांत असेल, तर परिस्थिती तशीच असूनही तिच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते आणि त्यातून योग्य प्रतिसादाची शक्यता वाढते.
म्हणून प्रश्न असा आहे की आपण कोणत्या अवस्थेत अधिकाधिक वेळ राहण्याचा प्रयत्न करणार? मनाच्या या प्रसादावस्थेचे सातत्य वाढवता येईल का? दिवसातील काही क्षणच नव्हे, तर हळूहळू संपूर्ण दिवस अशी प्रसन्नता आणि अंतर्गत स्थिरता टिकवता येईल का? आपले मन सतत सुख-दुःखाच्या हेलकाव्यांमध्ये राहण्याऐवजी अधिक स्थिर, संतुलित आणि प्रसन्न होईल का? आणि जर आपल्याला आपल्या मनाची अस्वस्थता दीर्घकाळ जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता ठरवून शांततेचे, आनंदाचे आणि संतुलनाचे क्षण आपल्या जीवनात निर्माण करता येतील का?
ही साधना केवळ स्वतःपुरती मर्यादित ठेवण्याची गोष्ट नाही. एखादा माणूस स्वतःमध्ये ही प्रसादावस्था निर्माण करू शकतो, तर अनेक माणसे एकमेकांच्या मदतीने ती विकसित करू शकतात. आणि अनेक माणसे अशी झाली, तर त्याचा परिणाम त्यांच्या भवतालावरही होतो. एक प्रसन्न माणूस दुसऱ्याला प्रसन्न करू शकतो; एक संतुलित मन दुसऱ्याच्या अस्वस्थतेला शांत करू शकते. अशा रीतीने आपले घर, आपले कुटुंब, आपला मित्रपरिवार आणि हळूहळू आपला समाजही अधिक ‘प्रसादमय’ होऊ शकतो.
म्हणून हा विचार फक्त स्वतःपुरता ठेवू नका. आपल्या कुटुंबातल्या माणसांबरोबर यावर बोला. मित्रांना त्यांच्या भाषेत हा अनुभव समजावून सांगा. कारण ज्ञान हे माजघरात, गोदामात किंवा स्टोअररूममध्ये ठेवून देण्याची गोष्ट नाही; ज्ञानाला मुक्त करण्याची गोष्ट आहे. जे आपल्याला समजले, जे आपल्या जगण्यात उपयोगी पडले, ते इतरांपर्यंत पोहोचवणे हीही एक प्रकारची साधनाच आहे.
बाह्य जग बदलण्यापूर्वी अंतःकरण बदलले, तर त्याच जगाचा अनुभव बदलतो. आणि अंतःकरण प्रसन्न झाले की भगवद्गीतेचा ‘प्रसाद’ केवळ नावात राहत नाही—तो आपल्या जगण्यात उतरतो.
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥
शांतीपासून सुखाकडे : भगवद्गीतेने दाखवलेलं सुखाचं चक्र
गीता दर्शन : श्रीमद्भगवद्गीता – दुसरा अध्याय, सांख्य योग
भाग ८८ | २६ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
नास्ति बुद्धिरयुक्तस्य
न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयतः शान्तिः
अशान्तस्य कुतः सुखम् ॥
भगवद्गीतेतील हा श्लोक मानवी जीवनातील सुख आणि दुःखाचा एक अतिशय सुंदर आणि मार्मिक प्रवास आपल्यासमोर ठेवतो.
ज्या माणसाचे मन आणि इंद्रिये त्याच्या ताब्यात नाहीत, त्याची बुद्धी एकाग्र आणि स्थिर होऊ शकत नाही. ज्याची बुद्धी स्थिर नाही, त्याच्यामध्ये योग्य चिंतन आणि योग्य भावना विकसित होत नाहीत. ज्याच्यामध्ये योग्य आणि सात्त्विक भावना नाहीत, त्याला खरी मनःशांती लाभत नाही. आणि ज्याच्याकडे शांतीच नाही, त्याला खरे सुख कसे मिळणार?
म्हणून श्रीकृष्ण या एका श्लोकातून जणू एक संपूर्ण साखळीच आपल्यासमोर ठेवतात—अयुक्ततेपासून अशांतीकडे आणि अशांतीपासून असुखाकडे जाणारी साखळी. पण याच श्लोकामध्ये या साखळीच्या उलट दिशेने जाणारा सुखाचा मार्गही दडलेला आहे.
आपण थोडं आपल्या मानवी शरीराकडे आणि त्याच्या अदृश्य कार्यपद्धतीकडे पाहिलं, तर इंद्रिये, मन, भावना आणि बुद्धी यांच्यातील संबंध आपल्याला समजू लागतो. आपल्या इंद्रियांमधून सतत वेगवेगळ्या संवेदना येत असतात. त्या मेंदूपर्यंत पोहोचतात आणि त्यातून आपल्यामध्ये सुख-दुःखाच्या, आवड-निवडीच्या भावना निर्माण होतात. काही अनुभव आपल्याला आवडतात, काही नकोसे वाटतात. काही गोष्टी आपण पुन्हा पुन्हा करतो, तर काही गोष्टींपासून दूर राहतो.
या अनुभवांमधून आपल्या मेंदूमध्ये वेगवेगळे न्यूरॉन पाथवे म्हणजेच जणू काही मानसिक रस्ते तयार होत जातात. आपल्याला काय आवडतं, काय नकोसं वाटतं, काय सहज करावंसं वाटतं आणि कोणत्या गोष्टींपासून आपण पळ काढतो, यावर या अनुभवांचा परिणाम होत असतो.
लहानपणी आपल्या बुद्धीचा पूर्ण विकास झालेला नसतो. त्यामुळे त्या काळात निर्माण होणाऱ्या अनेक जोडण्या आणि सवयी भावनांच्या आणि इंद्रियांच्या पातळीवर अधिक मजबूत होत जातात. आपल्या आध्यात्मिक परंपरेत तर काही संस्कार आणि काही जोडण्या पूर्वजन्माच्या कर्माशीही जोडल्या जातात. हा श्रद्धेचा विषय आहे; पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे—आपले अनुभव, आपले संस्कार आणि आपली संगत यांचा आपल्या मनावर आणि बुद्धीवर खोल परिणाम होत असतो.
आपल्याला एखादा अनुभव सुखद वाटला की तो पुन्हा घ्यावासा वाटतो. एखादा अनुभव दुःखद वाटला की आपण त्याला टाळतो. सोपी गोष्ट करायला मन पटकन तयार होतं; पण अवघड गोष्ट करायला मन तयार होत नाही. कारण मेंदू सतत कार्यरत असतो आणि शरीरातील मोठ्या प्रमाणावर ऊर्जा तो वापरत असतो. म्हणूनच मेंदूला अनेकदा परिचित, सोपे आणि कमी मानसिक प्रयत्नांचे मार्ग निवडणे सहज वाटते.
यातून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो—आपण आपल्या आवडी-निवडींचे गुलाम होणार की त्यांच्यावर बुद्धीचा प्रकाश टाकणार?
इंद्रियांकडून संवेदना आल्या, मनाने त्यांची नोंद घेतली आणि त्या भावनांच्या रूपाने आपल्यामध्ये उमटल्या, तर त्या भावनांवर बुद्धीने विचार करणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक आवड योग्य असेलच असं नाही आणि प्रत्येक नावड अयोग्य असेलच असंही नाही.
मला हे आवडतं म्हणून ते करायचं का? मला हे नकोसं वाटतं म्हणून ते टाळायचं का? चांगलं काय? वाईट काय? हिताचं काय? अहिताचं काय? माझ्यासाठी योग्य काय? समाजासाठी योग्य काय? याचा विचार कोण करणार?
इथे बुद्धीची भूमिका सुरू होते.
श्रीकृष्ण म्हणतात—“नास्ति बुद्धिरयुक्तस्य”—जो युक्त नाही, त्याच्यामध्ये स्थिर आणि निश्चयात्मक बुद्धी निर्माण होत नाही.
‘युक्त’ म्हणजे केवळ संयमी असा नाही. युक्त म्हणजे जीवनामध्ये एक प्रकारची हार्मनी, संतुलन, शिस्त, संयम, विवेक आणि योग्य प्रमाण असलेला. इंद्रियांचा वापर करायचा, पण त्यांचा गुलाम व्हायचं नाही. मनाच्या भावना समजून घ्यायच्या, पण प्रत्येक भावनेच्या मागे धावत जायचं नाही. आवड-निवड असायची, पण तिच्यामागे विवेकही असायचा.
याच्या उलट ‘अयुक्त’ म्हणजे अतिरेकी, असंयमी, अविवेकी, विचार न करता वागणारा. फक्त मला काय हवं, मला काय आवडतं, माझा फायदा काय, माझा अहंकार कसा सुखावेल—याचाच विचार करणारा.
अशा अवस्थेत निश्चयात्मक बुद्धी कशी विकसित होणार?
आपल्या भावनांचा आणि बुद्धीचा संपर्क नसेल, तर काय करायचं आणि काय करू नये, याचा निर्णय कसा होणार? आवडतं म्हणून करायचं आणि न आवडणारं म्हणून टाळायचं, एवढ्यावरच जीवन थांबून राहिलं, तर माणूस हळूहळू आपल्या स्वतःच्या आवडी-निवडींचा गुलाम बनतो.
म्हणूनच बुद्धी आणि भावना यांच्यामध्ये संवाद आणि समन्वय आवश्यक आहे.
आपण अनुभव घेत जातो, योग्य लोकांच्या संपर्कात राहतो, चांगलं वाचतो, चिंतन करतो, अभ्यास करतो, प्रयोग करतो आणि आपल्या जीवनाकडे प्रामाणिकपणे पाहतो, तसतशी बुद्धी प्रगल्भ होत जाते.
आपल्या परंपरेने दिलेलं ज्ञान, भगवद्गीता, संतांचे साहित्य, ऋषींचे चिंतन, स्वानुभव आणि जीवनातील प्रयोग—या सगळ्यांच्या आधारे आपण बुद्धीला संस्कारित करू शकतो.
आणि जेव्हा बुद्धी इंद्रिय आणि मनाच्या प्रवाहावर प्रकाश टाकायला लागते, तेव्हा आपल्याला आपल्या भावनाही ओळखता येतात. कोणती भावना आपल्याला उन्नत करते आणि कोणती भावना आपल्याला खाली घेऊन जाते, याचा विवेक निर्माण होतो.
याच ठिकाणी श्रीकृष्ण म्हणतात—“न चायुक्तस्य भावना.”
इथे ‘भावना’ म्हणजे केवळ भावनिक होणं नव्हे. तर योग्य चिंतनातून निर्माण होणारी अंतर्मुख, शुद्ध आणि सात्त्विक भावना. आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारी भावना.
आपल्यामध्ये चुकीच्या भावना असतील तर त्या ओळखून त्यांच्यावर काम करावं लागतं. योग्य भावना वाढवाव्या लागतात. स्वार्थी वृत्तीपासून निःस्वार्थ वृत्तीकडे, अस्वस्थतेपासून प्रसन्नतेकडे, संकुचितपणापासून विस्ताराकडे जाण्याचा हा प्रवास आहे.
आणि जेव्हा भावना शुद्ध होऊ लागतात, तेव्हा मन शुद्ध होऊ लागतं.
“न चाभावयतः शान्तिः”—ज्याच्यामध्ये योग्य भावना आणि योग्य चिंतन नाही, त्याला शांती कशी मिळणार?
असा माणूस बाहेरून कितीही यशस्वी असला, कितीही संपत्ती त्याच्याकडे असली, कितीही सुविधा त्याच्याकडे असल्या, तरी आतून तो चलबिचल राहू शकतो.
शांती नसेल तर प्रसन्नता कशी येणार? मन निर्मळ कसं होणार? विचारांमध्ये व्यापकता कशी येणार? बुद्धीचा विस्तार कसा होणार? दुसऱ्याचा विचार करण्याची क्षमता कशी निर्माण होणार?
संकुचित मनाला शांती मिळत नाही आणि अशांत मनाला सुखाचा अनुभवही घेता येत नाही.
म्हणूनच श्रीकृष्णांचा शेवटचा प्रश्न अत्यंत मार्मिक आहे—
“अशान्तस्य कुतः सुखम्?”
ज्याच्याकडे शांतीच नाही, त्याला सुख कुठून मिळणार?
आपण आतापर्यंत भगवद्गीतेमध्ये अनेक साखळ्या पाहिल्या. “ध्यायतो विषयान् पुंसः…” पासून सुरू होऊन “प्रणश्यति” पर्यंत जाणारी पतनाची साखळी आपण पाहिली. आपण बरबादीचं चक्र पाहिलं. एखाद्या विचारापासून सुरुवात होते, त्यातून आसक्ती निर्माण होते, आसक्तीतून कामना, कामनेतून क्रोध आणि शेवटी माणूस पतनाकडे जातो.
पण आजचा श्लोक आपल्याला त्याच्या अगदी उलट दिशेचं एक सुंदर चक्र दाखवतो.
मन आणि इंद्रियांचा संयम → निश्चयात्मक बुद्धी → योग्य भावना → शुद्ध आणि प्रसन्न मन → शांती → सुख.
हेच तर सुखाचं चक्र आहे.
इंद्रियांना संयमित ठेवा. मनाला समजून घ्या. बुद्धीला जागृत ठेवा. योग्य-अयोग्याचा विचार करा. भगवद्गीतेच्या, संत-महंतांच्या आणि ऋषींच्या ज्ञानाचा अभ्यास करा. त्या ज्ञानाचे जीवनात प्रयोग करा. आपल्या अनुभवातून शिका. हळूहळू आपल्या भावना शुद्ध करा.
भावना शुद्ध झाल्या की मन प्रसन्न होईल. मन प्रसन्न झालं की शांती निर्माण होईल. आणि जिथे शांती आहे, तिथे सुख, समाधान आणि समृद्धीचा अनुभव निर्माण होऊ शकतो.
म्हणून आजच्या श्लोकाचा साधा संदेश आपण लक्षात ठेवूया—
अयुक्तता आपल्याला अशांतीकडे घेऊन जाते;
युक्तता आपल्याला शांतीकडे घेऊन जाते.
अशांतीतून सुख मिळत नाही;
शांतीतूनच सुखाचा मार्ग खुलतो.
आपण दुष्टचक्र दूर करूया. बरबादीचं चक्र थांबवूया. आणि त्याऐवजी शांतीचं, समृद्धीचं आणि सुखाचं चक्र आपल्या जीवनात सुरू करूया.
हा विचार केवळ स्वतःपुरता ठेवायचा नाही. नेहमीप्रमाणे हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया.
मन आणि इंद्रिय संयमित ठेवा.
निश्चयात्मक बुद्धी विकसित करा.
भावना शुद्ध करा.
शांती निर्माण करा.
आणि सुखाचा अनुभव घ्या.
“नास्ति बुद्धिरयुक्तस्य
न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयतः शान्तिः
अशान्तस्य कुतः सुखम् ॥”
मानवी अस्तित्वाच्या अवस्थांपासून समत्वाकडे : शरीर, मन आणि बुद्धीचा प्रवास
गीता दर्शन : श्रीमद्भगवद्गीता – दुसरा अध्याय, सांख्य योग
भाग ८९ | २७ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
आपण मानवी अस्तित्व समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या शरीरापासून सुरुवात करावी लागेल. आपल्या ज्ञानेन्द्रिय आणि कर्मेंद्रियांचा मिळून इंद्रियांचा एक संच तयार होतो. या इंद्रियांचा मेंदूशी सतत संवाद सुरू असतो. इंद्रियांकडून मिळणारे संकेत मेंदूपर्यंत पोहोचतात आणि त्यावर मेंदूमध्ये विविध प्रक्रिया घडतात. या प्रक्रियांमध्ये न्यूरोट्रान्समीटर्सची भूमिका असते. मेंदूकडून मिळणाऱ्या संकेतांनुसार शरीरातील विविध ग्रंथी सक्रिय होतात आणि त्यातून वेगवेगळी हार्मोन्स निर्माण होतात. त्या हार्मोन्समुळे शरीरामध्ये वेगवेगळ्या अवस्था निर्माण होतात. त्या अवस्था आपण अनुभवतो आणि त्या अनुभवांच्या आधारे आपल्या मनामध्ये एक प्रकारचं संचित तयार होत जातं—कुठली अवस्था आपल्यासाठी पोषक आहे, कुठली अवस्था त्रासदायक आहे, कुठली अवस्था आपल्याला पुन्हा पुन्हा हवी आहे आणि कुठली अवस्था टाळायची आहे.
म्हणून आपण पहिल्यांदा मानवी अस्तित्व समजून घेऊया. मानवी अस्तित्व हे एका स्थिर अवस्थेत नसतं. माणूस सतत वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असतो. या अवस्था आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. एकदा त्या अवस्था लक्षात आल्या की, एखादी अवस्था आपल्याला का निर्माण होते, ती अवस्था आपल्यासाठी हिताची आहे की अहिताची आहे आणि एखादी अवस्था निर्माण व्हावी किंवा निर्माण होऊ नये यासाठी नेमके काय प्रयत्न करायचे आहेत, हे आपल्याला समजू शकतं.
दीर्घकाळाच्या अनुभवातून, प्रयोगातून आणि निरीक्षणातून माणूस हळूहळू शिकत जातो की दीर्घकाळासाठी कुठली अवस्था हिताची आहे आणि कुठली अवस्था अहिताची आहे. सुरुवातीला आपल्याला जे सुखद वाटतं तेच आपल्याला चांगलं वाटतं. पण अनुभव वाढत गेल्यावर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते—जे सुखद आहे ते नेहमीच हिताचं असेल असं नाही आणि जे क्षणभर कठीण आहे ते नेहमीच अहिताचं असेल असंही नाही.
आपल्या मानवी जीवनात अशा अनेक अवस्था आहेत. त्यातील काही अवस्था आपण समजून घेऊया.
सर्वप्रथम येते आनंदाची अवस्था. काहीतरी चांगलं घडल्याचा अनुभव, एखादं महत्त्वाचं उद्दिष्ट साध्य झालं, आपल्या प्रयत्नांना यश मिळालं, एखादी प्रिय व्यक्ती भेटली किंवा एखादी चांगली बातमी मिळाली, तर आपल्याला आनंद होतो. अशा वेळी मेंदूमध्ये बक्षीस, प्रेरणा, लक्ष्य आणि भावनिक प्रक्रियांशी संबंधित अनेक यंत्रणा सक्रिय होतात. शरीरामध्ये उत्साह जाणवतो, चेहऱ्यावर हसू येतं, हालचाली वाढू शकतात आणि आपल्याकडे अधिक ऊर्जा असल्यासारखं वाटू शकतं. ही आनंदाची अवस्था आहे.
याच्याशी संबंधित पण थोडी वेगळी अवस्था म्हणजे सुख. एखादा अनुभव सुखद किंवा समाधानकारक वाटणं म्हणजे सुख. चांगलं अन्न खाणं, आरामदायी झोप घेणं, प्रिय व्यक्तीची जवळीक, सुंदर संगीत ऐकणं किंवा एखाद्या कामातून मिळणारं समाधान—यातून आपल्याला सुखाचा अनुभव येऊ शकतो. सुखाच्या वेळी शरीरामध्ये आराम आणि सुरक्षिततेची अनुभूती वाढू शकते.
मात्र इथे सुख आणि आनंद यांच्यामधला सूक्ष्म फरक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आपण रोजच्या भाषेत सुख आणि आनंद हे शब्द अनेकदा समान अर्थाने वापरतो. पण मानवी अनुभव समजून घेताना त्यांच्यातला फरक उपयोगी ठरतो. सुख म्हणजे एखादा अनुभव आपल्याला सुखद, आरामदायी किंवा समाधान देणारा वाटणं. गरम चहा पिताना आपल्याला सुख मिळू शकतं, आरामदायी खुर्चीत बसताना सुख मिळू शकतं किंवा थंड वाऱ्याची झुळूक अंगावर येताना सुख मिळू शकतं. म्हणजे शरीराला किंवा मनाला ‘हे मला चांगलं वाटत आहे’ अशी अनुभूती मिळते.
आनंद मात्र केवळ सुखद संवेदनांपुरता मर्यादित नसतो. एखादं मोठं उद्दिष्ट साध्य झालं, आपल्या प्रयत्नांना अर्थ मिळाला, आपल्या प्रिय व्यक्तीला यश मिळालं किंवा एखाद्या गोष्टीत खोल समाधान मिळालं, तर त्यातून आनंद निर्माण होतो. त्यामुळे सुख अधिक तात्कालिक आणि एखाद्या अनुभवाशी जोडलेलं असू शकतं, तर आनंदामध्ये अर्थ, समाधान, उपलब्धी किंवा भावनिक महत्त्वाचा मोठा भाग असतो. अर्थात, हा कठोर वैज्ञानिक वर्गीकरणाचा नियम नाही. रोजच्या भाषेत हे दोन्ही शब्द एकमेकांच्या जागी वापरले जातात. पण मानवी अनुभव समजून घेण्यासाठी हा सूक्ष्म फरक आपल्याला उपयोगी पडतो.
यानंतर येते दुःखाची अवस्था. काहीतरी गमावणं, हानी होणं, नकार मिळणं, अपयश येणं, वियोग होणं किंवा अपेक्षाभंग होणं—यातून दुःख निर्माण होऊ शकतं. मेंदू त्या घटनेचा अर्थ लावतो आणि त्यानुसार भावनिक, विचारात्मक आणि शारीरिक प्रतिक्रिया निर्माण होतात. शरीर जड वाटणं, ऊर्जा कमी जाणवणं, रडू येणं, भूक किंवा झोप बदलणं अशा प्रतिक्रिया काही व्यक्तींमध्ये दिसू शकतात. मात्र प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया वेगळी असू शकते. दुःख ही शरीरातील एखाद्या एकाच रसायनाची कमतरता नाही. ती व्यक्ती, परिस्थिती, आठवणी, शरीर आणि मेंदू यांच्या परस्परसंवादातून निर्माण होणारी अनुभूती आहे.
आता तणावाची अवस्था. शरीर एखाद्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी तयार होतं, ती तणावाची अवस्था. तणाव म्हणजे नेहमीच दुःख नसतं. परीक्षा, महत्त्वाचं भाषण, धावण्याची स्पर्धा, एखादं महत्त्वाचं काम किंवा अचानक आलेली अडचण—या सगळ्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. अशा वेळी हृदयाची गती वाढू शकते, श्वास बदलू शकतो, लक्ष एखाद्या गोष्टीवर अधिक केंद्रित होऊ शकतं आणि शरीर कृतीसाठी तयार होऊ शकतं. एड्रिनालीन आणि कॉर्टिसॉलसारख्या हार्मोन्सची यात भूमिका असते. त्यामुळे तणाव नेहमीच वाईट असतो असं नाही. अल्पकाळाचा तणाव आपल्याला आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी मदत करू शकतो. समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा ही सक्रियता खूप काळ टिकते आणि शरीराला पुन्हा संतुलित अवस्थेत परतता येत नाही.
याच्या विरुद्ध बाजूला आपण शांततेची अवस्था पाहू शकतो. शांतता म्हणजे मेंदू बंद होणं किंवा शरीरामध्ये काहीही घडत नसणं नव्हे. मेंदू सक्रिय असतो, हृदय काम करत असतं, श्वास सुरू असतो आणि शरीरातील असंख्य प्रक्रिया सतत चालू असतात. पण त्या क्षणी शरीर-मनाला मोठ्या धोक्याला किंवा तातडीच्या आव्हानाला प्रतिसाद देण्याची गरज नसते. श्वास सहज असतो, स्नायूंमधील अनावश्यक ताण कमी असतो आणि तणावानंतर शरीर पुन्हा स्थिर अवस्थेत येतं. म्हणून शांतता म्हणजे निष्क्रियता नाही; ती नियमन आणि पुनर्प्राप्तीची अवस्था आहे.
यानंतर येते भीती. धोका जाणवल्यानंतर शरीराची संरक्षणात्मक तयारी म्हणजे भीतीची अवस्था. तो धोका प्रत्यक्ष असू शकतो किंवा पूर्वीच्या अनुभवांमुळे निर्माण झालेला अंदाजही असू शकतो. हृदयाची गती वाढणं, श्वास बदलणं, स्नायू ताणले जाणं आणि लक्ष धोक्याकडे केंद्रित होणं अशा प्रतिक्रिया होऊ शकतात. शरीर आपली ऊर्जा ‘आता काय करायचं?’ यासाठी उपलब्ध करून देतं. म्हणजे भीती ही मूलतः संरक्षणासाठी तयार होण्याची प्रक्रिया आहे. परंतु सारखी-सारखी भीती निर्माण होत राहिली, तर त्यातून त्रासदायक परिणाम होऊ शकतात आणि आपल्या वर्तनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
राग हीदेखील एक महत्त्वाची अवस्था आहे. अडथळा, अन्याय किंवा आपल्या महत्त्वाच्या उद्दिष्टाला निर्माण झालेला धोका यावर सक्रिय प्रतिक्रिया म्हणून राग निर्माण होऊ शकतो. आपल्याला कोणी अडवलं, अन्याय केला किंवा आपल्या उद्दिष्टामध्ये अडथळा निर्माण झाला, तर आपलं लक्ष त्या समस्येकडे तीव्रतेने केंद्रित होऊ शकतं. शरीर अधिक सक्रिय होऊ शकतं आणि कृती करण्याची प्रेरणा वाढू शकते. त्यामुळे राग म्हणजे केवळ ‘वाईट रसायन’ नाही; तो शरीर-मेंदूला कृतीकडे ढकलणारी प्रक्रिया असू शकतो. मात्र त्या रागातून पुढे काय वर्तन घडतं, हा अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे.
याचबरोबर उत्सुकता ही एक वेगळी अवस्था आहे. नवीन माहिती किंवा अनुभवाकडे असलेली ओढ म्हणजे उत्सुकता. एखादी नवीन गोष्ट दिसली, एखादा प्रश्न पडला किंवा काहीतरी जाणून घेण्याची इच्छा झाली, की उत्सुकता निर्माण होते. या अवस्थेत लक्ष त्या गोष्टीकडे केंद्रित होतं आणि माहिती मिळवण्याची प्रेरणा वाढते. शिकण्याच्या प्रक्रियेत उत्सुकतेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्याला काहीतरी माहीत नाही आणि ते जाणून घेण्याची ओढ निर्माण झाली, की ती उत्सुकता.
कंटाळा हीदेखील मानवी अस्तित्वातील एक अवस्था आहे. पुरेसं आव्हान, अर्थपूर्ण गुंतवणूक किंवा आवश्यक उत्तेजन नसल्याची अनुभूती म्हणजे कंटाळा. कंटाळा आला म्हणजे शरीर नेहमी तणावात असतं असं नाही. उलट आपलं लक्ष टिकवून ठेवण्यासाठी पुरेसं आव्हान किंवा अर्थपूर्ण उत्तेजन मिळत नसल्याचा अनुभव असू शकतो. त्यामुळे कंटाळा हा केवळ आनंदाचा अभाव नसून लक्ष आणि प्रेरणा यांच्यातील विसंगतीचा अनुभव असू शकतो.
यानंतर येते समाधानाची अवस्था. ‘आता पुरेसं झालं’ अशी अनुभूती म्हणजे समाधान. आनंदामध्ये उत्साह असू शकतो; पण समाधानामध्ये एक वेगळी शांतता असते. एखादं काम पूर्ण झालं, उद्दिष्ट साध्य झालं किंवा ‘जे मिळालं ते पुरेसं आहे’ अशी अनुभूती आली, तर समाधान निर्माण होऊ शकतं. आनंद आपल्याला एखाद्या गोष्टीकडे खेचू शकतो; समाधान काही काळासाठी त्या शोधाला विराम देऊ शकतं.
अपेक्षा ही घटना घडण्यापूर्वीची अवस्था आहे. आपल्या मेंदूला भविष्याचा अंदाज बांधण्याची विलक्षण क्षमता आहे. उद्या काय होईल? कोण भेटेल? काय मिळेल? काय घडू शकेल? काय करता येईल? याचा अंदाज आपण सतत बांधत असतो. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव येण्यापूर्वीच शरीर आणि मन त्यासाठी तयार होऊ शकतात. अपेक्षा आनंददायक असू शकते; पण ती पूर्ण झाली नाही तर निराशाही निर्माण होऊ शकते.
म्हणूनच निराशा ही अपेक्षा आणि प्रत्यक्ष परिणाम यांच्यातील अंतरातून निर्माण होणारी अवस्था आहे. आपण काहीतरी अपेक्षित केलं आणि प्रत्यक्षात ते मिळालं नाही, तर निराशा निर्माण होऊ शकते. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते—आपल्या भावनिक प्रक्रियेमध्ये केवळ घटना महत्त्वाची नसते; त्या घटनेकडून आपण काय अपेक्षा केली होती, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणूनच एकाच घटनेचा परिणाम दोन व्यक्तींवर वेगवेगळा होऊ शकतो.
या सगळ्या अवस्था एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या आहेत का? नाही. प्रत्यक्ष आयुष्यात त्या अनेकदा एकत्र मिसळलेल्या असतात. एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेपूर्वी तणाव, उत्सुकता आणि भीती एकाच वेळी जाणवू शकते. चांगली बातमी मिळाल्यानंतर आनंद आणि उत्साह एकत्र येऊ शकतो. एखादं मोठं उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर आनंद, समाधान आणि शांतता एकत्र अनुभवता येऊ शकतात. प्रिय व्यक्तीपासून दूर जावं लागलं, तर दुःख, चिंता आणि तणाव एकत्र असू शकतात. त्यामुळे मानवी अनुभव हा एका वेळी एका भावनेचा सरळ प्रवास नसतो; तो अनेक शारीरिक आणि मानसिक अवस्थांचा परस्परसंवाद असतो.
आणि इथे एक अत्यंत महत्त्वाचा फरक समजून घ्यायला हवा—शरीर काय करतं आणि आपल्याला काय जाणवतं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शरीराची अवस्था म्हणजे हृदयाची गती, श्वास, रक्तदाब, स्नायूंचा ताण, पचन, हार्मोनल सक्रियता आणि मेंदूमधील विविध प्रणालींची सक्रियता. तर आपली अनुभूती म्हणजे ‘मला आनंद वाटतोय’, ‘मला दुःख झालंय’, ‘मला भीती वाटतेय’, ‘मला शांत वाटतंय’, ‘मला छान वाटतंय’ किंवा ‘मला काहीतरी हवं आहे’ अशी आतून येणारी जाणीव. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत; पण त्या एकच गोष्ट नाहीत.
हे सगळं समजून घेतल्यानंतर एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते—आनंद, सुख, दुःख, भीती, राग, तणाव, उत्सुकता, समाधान आणि शांतता या केवळ मनात घडणाऱ्या गोष्टी नाहीत. त्या मेंदू, शरीर, स्मृती, अपेक्षा आणि बाह्य परिस्थिती यांच्या सततच्या संवादातून निर्माण होणाऱ्या गतिशील अवस्था आहेत.
या अवस्था आपण अनुभवतो आणि त्या अनुभवांच्या आधारे आपलं व्यक्तिमत्त्व तयार होत जातं. अनुभव वाढतो, प्रयोग वाढतात, मॅच्युरिटी वाढते आणि मग आपल्याला हळूहळू जाणवायला लागतं की काही अवस्था आपल्यासाठी पोषक आहेत, काही अवस्था त्रासदायक आहेत. चांगल्या अवस्था दीर्घकाळ टिकाव्यात, त्या अधिक नियमितपणे अनुभवता याव्यात आणि त्रासदायक अवस्था कमी वेळा निर्माण व्हाव्यात, त्यांची तीव्रता कमी असावी आणि त्या कमी काळासाठी टिकाव्यात, यासाठी आपले प्रयत्न सुरू होतात.
आणि इथेच भगवद्गीतेचा विचार अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
गीता आपल्याला सांगते की इंद्रियांना जे जाणवतं, शरीर आणि मेंदूच्या प्रक्रियांमधून जे अनुभव निर्माण होतात, त्यांच्या मागे जर मन सतत धावत राहिलं आणि बुद्धीला त्या प्रक्रियेत सहभागीच केलं नाही, तर अडचण निर्माण होऊ शकते. कारण माणसाचं वेगळेपण केवळ इंद्रियांमध्ये नाही; माणसाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बुद्धी.
बुद्धी ही जन्मतः पूर्ण विकसित झालेली व्यवस्था नसते. ती स्वतःच्या अनुभवातून, इतरांच्या अनुभवातून, अनेक प्रयोगांतून, निरीक्षणातून आणि थोरामोठ्यांच्या विचारांतून विकसित होत जाते. म्हणूनच बुद्धी म्हणजे केवळ माहितीचा साठा नाही; योग्य-अयोग्याचा विचार करण्याची, दीर्घकालीन परिणामांचा विचार करण्याची आणि निवड करण्याची क्षमता आहे.
फक्त इंद्रियांनी जे अनुभवलं आणि शरीर-मेंदूमधून जे सुखद वाटलं, त्याच्या मागे मन धावत राहिलं, तर क्षणिक सुख आणि दीर्घकालीन हित यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो. एखादी गोष्ट आत्ता सुखद वाटते म्हणून ती दीर्घकाळासाठी हिताची असेलच असं नाही. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट आत्ता कठीण वाटते म्हणून ती अहिताची असेलच असं नाही. म्हणून अनुभवाच्या पलीकडे जाऊन विवेकाची प्रक्रिया आवश्यक आहे.
मनाने बुद्धीशी दोस्ती केली पाहिजे. इंद्रिय आणि शरीर-मेंदूच्या प्रक्रियांमधून निर्माण होणाऱ्या अनुभवांना मनाने ओळखलं पाहिजे, त्यांचं निरीक्षण केलं पाहिजे आणि बुद्धीच्या मदतीने त्यांचं योग्य-अयोग्य मूल्यमापन केलं पाहिजे. मगच इंद्रियांवर संयम येऊ शकतो. संयम म्हणजे इंद्रियांचा नकार नव्हे; तर इंद्रियांकडून येणाऱ्या अनुभवांवर योग्य प्रकारे प्रक्रिया करण्याची क्षमता.
जर मनाने बुद्धीशी दोस्ती केली नाही आणि ते केवळ इंद्रिय, शरीर आणि प्राण यांच्या जोडीने निर्माण होणाऱ्या अनुभवांच्या मागे धावत राहिलं, तर गडबड होऊ शकते. ही गडबड कधी कधी आपल्या बरबादीच्या चक्राकडे घेऊन जाऊ शकते. पण त्याच अनुभवांकडे मनाने बुद्धीच्या साहाय्याने पाहिलं, शरीर आणि प्राणाच्या प्रक्रियांचा उपयोग समजून घेतला, योग्य-अयोग्याचा विचार केला आणि समत्व विकसित केलं, तर आपण अधिक स्थिर, आनंदी, शांत आणि सकारात्मक अवस्थांकडे जाऊ शकतो.
म्हणूनच मानवी विकासाचा मार्ग केवळ शरीराच्या विकासात नाही, केवळ इंद्रियांच्या सुखात नाही आणि केवळ मनाला चांगलं वाटण्यातही नाही. शरीर आणि प्राण यांच्या अनुभवांना समजून घेणं, मनाला संयमित करणं, बुद्धीला जागृत ठेवणं आणि या सगळ्यांमध्ये समत्व निर्माण करणं—हा मानवी विकासाचा अधिक व्यापक मार्ग आहे.
भगवद्गीता आपल्याला याच दिशेने घेऊन जाते. इंद्रियांमधून येणारे अनुभव थांबवायचे नाहीत; त्यांच्यावर गुलामासारखं जगायचंही नाही. मनाला दाबायचं नाही; पण त्याला बुद्धीपासून वेगळंही ठेवायचं नाही. बुद्धीला कोरडं विवेकाचं साधन बनवायचं नाही; तर शरीर, प्राण, मन आणि अनुभव यांच्या संपूर्ण प्रक्रियेशी तिची मैत्री घडवायची.
आणि मग हळूहळू एक वेगळा प्रवास सुरू होतो—इंद्रियांच्या अनुभवांपासून समत्वाकडे, समत्वातून स्थिर बुद्धीकडे आणि स्थिर बुद्धीतून शाश्वत विकासाकडे.
कदाचित म्हणूनच भगवद्गीता आपल्याला केवळ ‘काय करावं?’ एवढंच सांगत नाही; ती आपल्याला आधी ‘आपल्यामध्ये नेमकं काय घडतं?’ हे समजून घ्यायला शिकवते. कारण स्वतःमध्ये काय घडतं हे समजलं, तरच काय बदलायचं आणि कसं बदलायचं हे आपल्याला समजू शकतं.
मन इंद्रियांच्या मागे धावत गेले की… प्रज्ञा कशी हरवते?
गीता दर्शन : श्रीमद्भगवद्गीता – दुसरा अध्याय, सांख्य योग
भाग ९० | २८ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
एखादे पूर्णपणे नवीन आणि सुंदर फळ आपण आयुष्यात पहिल्यांदाच पाहतो, तेव्हा आपला मेंदू एका अत्यंत वेगळ्या आणि कुतूहलाने भरलेल्या प्रक्रियेतून जात असतो. आधीच्या आंब्याच्या उदाहरणात मेंदूला आधीच चव माहीत असते; पण नवीन फळाच्या बाबतीत मेंदू ‘शोध आणि शिकण्याच्या’ (Exploration and Learning) मोडमध्ये असतो.
नवीन फळ पाहण्यापासून ते ते खाणे, त्याचा अनुभव लक्षात ठेवणे, पुन्हा ते दिसल्यावर त्याची आठवण होणे, त्याची ओढ निर्माण होणे आणि ते मिळाले नाही तर अस्वस्थता किंवा राग निर्माण होणे—ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत रंजक आहे.
१. दृश्य ओळख आणि व्हिज्युअल प्रोसेसिंग (Visual Processing)
जेव्हा डोळ्यांना ते सुंदर फळ दिसते, तेव्हा डोळ्यांमधील दृष्टिपटल (Retina) प्रकाश आणि रंगांचा सिग्नल मेंदूच्या ‘व्हिज्युअल कॉर्टेक्स’ (Visual Cortex) कडे पाठवते. मेंदूचे न्यूरॉन्स त्याचा आकार, रंग—उदा. लाल, पिवळा किंवा जांभळा—आणि चमक यांची माहिती प्रक्रिया करतात. मनात पहिला प्रश्न निर्माण होतो—“हे फळ मी यापूर्वी कधीही पाहिलेले नाही.”
२. उत्सुकतेचा स्फोट आणि डोपामाइन (Curiosity & Dopamine Spike)
नवीन फळ पाहिल्यावर मेंदूतील डोपामिनर्जिक मार्ग (Dopaminergic Pathway) सक्रिय होतो. येथे डोपामाइन केवळ ‘खाण्याच्या सुखासाठी’ नव्हे, तर ‘नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी’ (Novelty and Curiosity) असलेल्या प्रेरणेशीही संबंधित असते.
मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्समध्ये याला ‘नवेपण शोधण्याची प्रेरणा’ (Novelty-Seeking Behavior) असे म्हटले जाते. हे आपल्याला त्या फळाकडे जवळ जाण्यासाठी, त्याला स्पर्श करण्यासाठी किंवा त्याचा गंध घेण्यासाठी प्रवृत्त करते.
३. हिप्पोकॅम्पसची जुन्या माहितीशी पडताळणी (Memory Check)
मेंदूचा ‘हिप्पोकॅम्पस’ (Hippocampus) आपल्या जुन्या अनुभवांशी तुलना करतो—“याच्याशी मिळतेजुळते कोणते फळ किंवा वस्तू आहे का? हे खाण्यायोग्य आहे का? सुरक्षित आहे का?”
फळ खूप आकर्षक असेल, तर त्याच्याबद्दलचे पूर्वीचे अनुभव, सुरक्षिततेचे संकेत आणि अपेक्षा यांची पडताळणी सुरू होते.
४. प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स आणि विचार प्रक्रिया (Decision Making)
मेंदूचा पुढचा भाग, म्हणजे Prefrontal Cortex, विचार करू लागतो—“हे फळ कसे लागत असेल? याची चव गोड असेल की आंबट? हे मी खाऊ शकतो का?”
इथेच त्या फळाबद्दल मनात एक ‘अपेक्षा’ (Expectation) तयार होऊ लागते.
नवीन फळ पहिल्यांदा खाल्ल्यानंतर…
जेव्हा ते नवीन आणि सुंदर फळ पहिल्यांदाच तोंडात जाते, तेव्हा मेंदू आणि शरीरामध्ये आणखी एक अतिशय रंजक शिकण्याची प्रक्रिया सुरू होते. परिचित फळांपेक्षा ही प्रक्रिया थोडी वेगळी असते, कारण इथे मेंदू प्रत्येक क्षणी नवीन अनुभवाची नोंद करत असतो.
१. जिभेचा स्पर्श आणि पहिला सिग्नल (Sensory & Taste Input)
जेव्हा आपण ते नवीन फळ तोंडात टाकतो, तेव्हा जिभेवरील ‘टेस्ट बड्स’ (Taste Buds) आणि नाकातील गंधसंवेदक (Olfactory Receptors) त्याची चव आणि सुवास टिपतात. हे सिग्नल मेंदूतील चव आणि गंधाशी संबंधित भागांकडे पाठवले जातात.
२. मेंदूचा निर्णय : ‘हे खाण्यायोग्य आहे की नाही?’ (Evaluation & Surprise)
नवीन चव जिभेवर पडताच मेंदू सुरक्षिततेशी संबंधित संकेतांकडे लक्ष देतो—“हे फळ सुरक्षित आहे का? विषारी तर नाही ना?”
आणि जर त्या फळाची चव आपल्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगली निघाली, तर मेंदूला एक सुखद धक्का बसतो. न्यूरोसायन्समध्ये याला ‘Reward Prediction Error’ म्हटले जाते—म्हणजे अपेक्षित अनुभव आणि प्रत्यक्ष मिळालेला अनुभव यांच्यातील फरक.
अपेक्षेपेक्षा जास्त आनंद मिळाला, तर बक्षीस-प्रक्रियेशी संबंधित डोपामाइन संकेत अधिक सक्रिय होऊ शकतात.
३. आनंदाची आणि तृप्तीची अनुभूती
चव अप्रतिम असल्यास शरीर आणि मेंदूमध्ये आनंद, समाधान आणि तृप्तीशी संबंधित विविध प्रक्रिया सक्रिय होतात. चेहऱ्यावर हसू येते आणि मनाला एक सुखद अनुभूती मिळते.
मात्र चव खूप कडू किंवा खराब निघाली, तर शरीराची संरक्षणात्मक प्रतिक्रिया सक्रिय होऊ शकते आणि मेंदू त्या अनुभवाची नकारात्मक नोंद ठेवतो.
४. नवीन फाईल तयार होणे (Memory Storing)
मेंदूचा हिप्पोकॅम्पस आणि इतर स्मृती-प्रक्रिया त्या नवीन फळाची चव, रंग, गंध आणि त्यापासून मिळालेला अनुभव लक्षात ठेवतात.
आजवर जी फाईल ‘अनोळखी फळ’ म्हणून कोरी होती, ती आता ‘आवडते किंवा गोड फळ’ म्हणून अपडेट होते.
दुसऱ्यांदा तेच फळ दिसते तेव्हा…
आता प्रक्रिया पहिल्या वेळेपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. मेंदू ‘नवीन काय आहे?’ हे शोधत नसतो; तो ‘ओळख आणि जुन्या अनुभवाची आठवण’ (Recognition & Memory Recall) या मोडमध्ये काम करतो.
डोळ्यांना ते फळ दिसताच त्याची ओळख पटते. जुन्या अनुभवाची फाईल उघडते—“अरे, हे तेच फळ आहे जे आपण मागच्या वेळी खाल्ले होते आणि ते खूप गोड व छान होते!”
आधीच्या अनुभवामुळे मेंदूला त्या फळापासून सुखद अनुभव मिळण्याची अपेक्षा निर्माण होते. त्यामुळे प्रत्यक्ष फळ तोंडात जाण्याआधीच त्याच्याशी संबंधित अपेक्षा, प्रेरणा आणि ओढ निर्माण होऊ शकते.
यातूनच पुढची अवस्था सुरू होते—Craving किंवा आसक्ती.
डोपामाइन आणि इतर न्यूरल प्रक्रियांच्या प्रभावामुळे शरीरात तयारी सुरू होते—तोंडाला पाणी सुटणे, मन त्या विषयाकडे खेचले जाणे आणि ते फळ मिळवण्याची तीव्र इच्छा निर्माण होणे.
फळ समोर नसते, पण आठवण मात्र येते…
जेव्हा ते फळ प्रत्यक्ष समोर नसते, पण फक्त त्याची आठवण येते, तेव्हा मेंदूमध्ये ‘Memory Retrieval and Mental Simulation’ म्हणजे आठवण पुन्हा जागी करणे आणि मनात त्या अनुभवाची पुनर्रचना करणे, अशी प्रक्रिया घडते.
आपण शांत बसलो असताना किंवा एखादा विचार मनात आला असताना हिप्पोकॅम्पस आणि Default Mode Network (DMN) यांसारख्या मेंदूतील प्रणाली भूतकाळातील अनुभव पुन्हा जागा करू शकतात.
त्या फळाची चव, रंग, गंध आणि त्यातून मिळालेला आनंद मनात पुन्हा उभा राहतो.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, केवळ आठवण किंवा कल्पनाही आपल्या मेंदूतील प्रेरणा आणि अपेक्षेशी संबंधित प्रक्रिया सक्रिय करू शकते. त्यामुळे प्रत्यक्ष फळ समोर नसतानाही उत्कंठा, ओढ आणि Craving निर्माण होऊ शकते.
मग विचार सुरू होतो—“हे फळ कुठे मिळेल? आता मी ते कसे मिळवू शकतो?”
आणि इच्छा तीव्र झाली, तर विचार कृतीकडे नेतो.
________________________________________
मिळत नाही तेव्हा काय होते?
जेव्हा एखादे फळ आपल्याला हवे असते, पण ते मिळत नाही किंवा कोणीतरी ते खाण्यास विरोध करतो, तेव्हा आपल्या शरीर आणि मेंदूमध्ये एक वेगळाच संघर्ष सुरू होतो.
आपल्या मेंदूने आधीच त्या फळाची गोड चव आठवून सुखद अनुभवाची अपेक्षा तयार केलेली असते. अचानक तो अनुभव मिळाला नाही, तर निराशा आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
इच्छा आणि प्रत्यक्ष अनुभव यामध्ये अडथळा आल्यावर शरीराची Stress Response सक्रिय होऊ शकते. कॉर्टिसॉल आणि एड्रिनलीन यांसारख्या ताणाशी संबंधित प्रक्रिया वाढू शकतात. हृदयाची धडधड वाढणे, अस्वस्थ वाटणे अशा शारीरिक प्रतिक्रिया होऊ शकतात.
आणि मग पुढची पायरी—
संताप किंवा राग.
हवी असलेली गोष्ट रोखली गेली की त्या व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर राग येऊ शकतो. आपले लक्ष पूर्णपणे त्या अडथळ्यावर केंद्रित होते.
या संपूर्ण प्रक्रियेत ‘मन’ कुठे आहे?
पाहण्यापासून, आठवणीपासून, इच्छेपासून ते इच्छा पूर्ण किंवा अपूर्ण होण्यापर्यंत ‘मन’ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.
वैज्ञानिक भाषेत मेंदूमध्ये विविध संवेदनांचे, स्मृतींचे, बक्षीस-प्रक्रियेचे आणि भावनिक प्रतिक्रियांचे जाळे काम करत असते. पण आपल्या अनुभवाच्या पातळीवर आपण त्याला अर्थ देतो—“मला हे आवडते”, “मला हे हवे आहे”, “हे मला मिळालेच पाहिजे.”
यातूनच ओढीची वीण अधिक घट्ट होत जाते.
जेव्हा एखाद्या विषयाचा वारंवार विचार होतो, तेव्हा मन त्याच विषयाभोवती फिरत राहते.
भगवद्गीता याच प्रक्रियेचे अत्यंत सूक्ष्म वर्णन करते—
“ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते।
सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते॥”
विषयाचे चिंतन → संग → कामना → आणि कामना अडली की क्रोध.
आधुनिक न्यूरोसायन्स आपल्याला या प्रक्रियेतील जैविक बाजू दाखवते; भगवद्गीता तिच्या मानवी आणि अंतर्मनाच्या प्रवासाकडे पाहते.
आणि इथेच खरी गोष्ट सुरू होते…
जर मन संयमी राहिले नाही आणि ते बुद्धीची साथ न घेता केवळ इंद्रिये, मेंदू आणि त्यांच्या परस्पर प्रक्रियांच्या आहारी गेले, तर माणूस तात्कालिक इच्छांच्या मागे धावू लागतो.
अविचारांचे चक्र सुरू होते.
तात्कालिक सुखाचा किंवा लाभाचा माणूस गुलाम बनू शकतो.
खाणे, मोबाईल वापरणे किंवा इतर भौतिक सुखांच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढू शकते. इच्छा पुन्हा पुन्हा जागी होते आणि तिची पूर्तता करण्याची गरज अधिक तीव्र वाटू शकते.
इच्छा पूर्ण झाली नाही की निराशा, अस्वस्थता आणि क्रोध वाढू शकतो.
आणि या सगळ्यात सर्वांत मोठे नुकसान कुठे होते?
विवेकबुद्धीचे.
भगवद्गीता सांगते की, विषयांच्या मागे धावणारे मन जर इंद्रियांच्या प्रवाहात वाहून गेले, तर माणसाची प्रज्ञा ढळते.
याच ठिकाणी श्रीकृष्ण म्हणतात—
इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि॥ २.६७॥
अर्थ :
विषयांमध्ये संचार करणाऱ्या इंद्रियांपैकी ज्या इंद्रियामागे मन जाते, ते मन त्या इंद्रियाच्या मागे वाहत गेले की, वारा जसा पाण्यातील नावेला भरकटवून नेतो, तशी त्या मनाची प्रज्ञा हरवून जाते.
किती विलक्षण प्रतिमा आहे!
वारा नावेला कुठे घेऊन जाईल, हे नाव ठरवत नाही.
तसंच इंद्रियांच्या मागे गेलेलं मनही आपली दिशा स्वतः ठरवत नाही.
दृष्टीने एखादा विषय पाहिला.
मन त्याच्यामागे गेले.
आठवण झाली.
आठवणीने इच्छा जागी केली.
इच्छेने ओढ निर्माण झाली.
ओढ अडवली गेली.
क्रोध निर्माण झाला.
आणि मग…
प्रज्ञा हरवली.
याच अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी श्रीकृष्ण पुढच्याच श्लोकात दिशा देतात—
तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥ २.६८॥
अर्थ :
म्हणून हे महाबाहो! ज्याची इंद्रिये सर्व प्रकारे इंद्रियांच्या विषयांपासून आवरलेली आहेत, त्याची प्रज्ञा स्थिर झालेली असते.
इथे गीतेचा मुद्दा इंद्रिये नष्ट करण्याचा नाही.
फळ पाहणे चुकीचे नाही.
त्याची चव आवडणे चुकीचे नाही.
आठवण होणेही चुकीचे नाही.
इच्छा निर्माण होणेही मानवी आहे.
पण प्रश्न आहे—
मन त्या इच्छेच्या मागे किती दूरपर्यंत जाणार?
इंद्रिये विषयांकडे जातीलच.
मेंदू अनुभवांची नोंद करेलच.
आठवणी जाग्या होतीलच.
डोपामाइनशी संबंधित प्रेरणा निर्माण होतीलच.
पण त्या सगळ्यांच्या प्रवाहात मन बुद्धीला सोबत घेऊन चालते की इंद्रियांच्या मागे वाहत जाते, हा निर्णायक प्रश्न आहे.
कारण इंद्रिये विषयांकडे जातात.
मन इंद्रियांच्या मागे जाते.
मन इंद्रियांच्या मागे गेले की प्रज्ञा हरवू शकते.
आणि मन बुद्धीच्या सोबत उभे राहिले की—
त्याच इंद्रियांमधून अनुभव येतो, पण माणूस अनुभवाचा गुलाम होत नाही.
कदाचित म्हणूनच श्रीकृष्णांनी आधी “तदस्य हरति प्रज्ञाम्” असे सांगितले आणि लगेच पुढे “तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता” असेही सांगितले.
एकीकडे—
इंद्रियांच्या मागे गेलेले मन → हरवलेली प्रज्ञा.
आणि दुसरीकडे—
आवरलेले इंद्रियप्रवाह → प्रतिष्ठित झालेली प्रज्ञा.
याच दोन अवस्थांमध्ये माणसाच्या अंतर्मनाचा संपूर्ण संघर्ष दडलेला आहे.
मन इंद्रियांच्या मागे धावते की बुद्धीच्या प्रकाशात स्वतःची दिशा ठरवते—
यावरच पुढचा प्रवास ठरतो.
ज्याला जग जागृती मानतं, ते ज्ञानी माणसाला अंधार वाटतो
गीता दर्शन : श्रीमद्भगवद्गीता – दुसरा अध्याय, सांख्य योग
भाग ९१ | २९ सप्टेंबर २०२६
नमस्कार.
प्रकाश आणि अंधार या दोन गोष्टी केवळ बाह्य जगापुरत्या मर्यादित नाहीत. अध्यात्माच्या आणि भारतीय मानसशास्त्राच्या दृष्टीने त्या मानवी जीवनातील दोन वेगवेगळ्या अवस्थांचे प्रतीक आहेत. आपण आतापर्यंत मानवी मनाच्या अनेक अवस्था पाहिल्या आहेत. भीती, अस्वस्थता, कामना, अपेक्षा, दुःख, ताणतणाव, राग, क्रोध, चिडचिड, कंटाळा आणि निराशा या मनाला अंधाराकडे नेणाऱ्या अवस्था आहेत. याउलट आनंद, सुख, शांतता, समाधान, उत्सुकता, सर्जनशीलता आणि अंतर्मनातील प्रसन्नता या प्रकाशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अवस्था आहेत.
पण भगवद्गीता आपल्याला याही पुढे जाऊन एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारते—आपण ज्याला जागृत अवस्था समजतो, ती खरोखर जागृती आहे का? आणि ज्याला आपण अंधार किंवा रात्र समजतो, ती खरोखरच अज्ञानाची अवस्था आहे का?
श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात—
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥
सर्वसामान्य माणसांसाठी जी आत्मज्ञानाची अवस्था रात्रीसारखी आहे, त्या अवस्थेत संयमी मनुष्य जागृत असतो. आणि ज्या विषयांमध्ये सामान्य माणसे पूर्णपणे जागृत असतात, त्याच विषयांकडे आत्मज्ञानी मुनी रात्रीसारखे पाहतो.
हा श्लोक केवळ दिवस आणि रात्र यांची उपमा देत नाही. तो जागृती म्हणजे नेमकं काय आणि निद्रा म्हणजे नेमकं काय, याची आपली संपूर्ण व्याख्याच बदलून टाकतो.
आपली बुद्धी खरोखर जागी असते, मन त्या बुद्धीशी सुसंवादाने वागत असते, इंद्रियांवर संयम असतो आणि शरीर, प्राण, मन आणि बुद्धी यांच्यामध्ये सुंदर समन्वय निर्माण झालेला असतो, तेव्हा ती खरी जागृत अवस्था आहे. अशा अवस्थेत सुख मिळालं तरी माणूस त्यात अडकत नाही आणि दुःख आलं तरी त्यात बुडून जात नाही. आनंद मिळतो, पण त्याची आसक्ती निर्माण होत नाही. शांतता मिळते आणि ती बाह्य परिस्थितीवर अवलंबून राहत नाही. उत्सुकता असते, पण ती केवळ भोगासाठी नसते; ती शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि निर्माण करण्यासाठी असते.
याच्या अगदी उलट अवस्था म्हणजे अज्ञानाची रात्र. बुद्धीचा वापर योग्य दिशेने होत नाही. मन इंद्रियांच्या मागे धावत राहतं. इंद्रियांना जे आवडतं, त्याच्यामागे मन जातं आणि त्यातून इच्छा, अपेक्षा, राग, द्वेष, अस्वस्थता, चिडचिड आणि दुःख यांची साखळी सुरू होते. शरीर, प्राण, मन आणि बुद्धी यांच्यातील समन्वय बिघडतो. माणूस बाहेरून कितीही सक्रिय असला, तरी आतून तो निद्रिस्त असू शकतो.
आपण याआधी पाहिलं आहे की, मानवी अस्तित्वातील शरीर, प्राण, मन आणि बुद्धी या सगळ्या स्तरांमध्ये एक सुंदर हार्मनी—सुसंवाद—आवश्यक आहे. ही हार्मनी निर्माण झाली की माणसाचा विकास होतो. पण हा समन्वय बिघडला, बुद्धीला बाजूला सारलं आणि मन इंद्रियांच्या मागे धावू लागलं, तर नकळत माणूस बरबादीच्या चक्राकडे जाऊ लागतो. बाहेरून त्याला वाटत असतं की आपण खूप जागृत आहोत; पण प्रत्यक्षात तो आपल्या वासनांचा, इच्छांचा आणि प्रतिक्रियांचा गुलाम झालेला असतो.
सामान्यतः आपल्याला असं वाटतं की इंद्रिय, मन आणि मेंदू यांची सांगड म्हणजेच आनंद. जे दिसतं, जे ऐकू येतं, जे चाखता येतं, जे अनुभवता येतं आणि जे मिळवता येतं, त्यातून सुख मिळतं, म्हणून त्याच्यामागे धावत राहणं म्हणजे आयुष्य. बुद्धीचा उपयोगही अनेकदा स्वतःचा स्वार्थ, फायदा, सुरक्षितता आणि अपेक्षा पूर्ण करण्यापुरताच केला जातो. पण या सगळ्याचा दीर्घकालीन परिणाम काय होतो? शरीरावर काय परिणाम होतो? मनावर काय परिणाम होतो? आपल्या नात्यांवर काय परिणाम होतो? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे—या मार्गाने मानवी अस्तित्व स्थिर शांततेकडे आणि शाश्वत आनंदाकडे जातं का? हा प्रश्न विचारण्याची जागृतीच नसते.
तात्पुरतं सुख म्हणजेच अंतिम सुख, असा गैरसमज झाला की माणूस सुख-दुःख, आशा-निराशा, शुभ-अशुभ आणि राग-द्वेष यांच्या चक्रात अडकतो. एका अनुभवातून दुसऱ्या अनुभवाकडे, एका इच्छेतून दुसऱ्या इच्छेकडे आणि एका अपेक्षेतून दुसऱ्या अपेक्षेकडे त्याची धाव सुरू राहते. बाहेरून ही धावपळ म्हणजे जागृत जीवन दिसतं; पण गीतेच्या दृष्टीने ती जागृती नसून एक प्रकारची निद्रा आहे.
ज्याची विवेकबुद्धी जागृत आहे, ज्याने निश्चयात्मक आणि अढळ बुद्धी निर्माण केली आहे, ज्याची बुद्धी शुद्ध आहे आणि ज्याचं मन संयमित आहे, त्याच्या जीवनात मात्र एक वेगळीच हार्मनी निर्माण होते. तो बाह्य जगापासून पळत नाही; उलट बाह्य जगात राहून त्याच्याकडे विवेकाच्या नजरेने पाहतो. तो सुखाचा अनुभव घेतो, पण सुखाचा गुलाम होत नाही. तो दुःखाचा अनुभव घेतो, पण दुःखामध्ये स्वतःला हरवून बसत नाही. त्याची जागृती त्याला हळूहळू टिकाऊ शांतता, समाधान, आनंद आणि अंतर्मुख उत्सुकतेकडे घेऊन जाते.
सामान्य माणसाला वाटतं की सुख-दुःखाचा हा खेळ म्हणजेच आयुष्य. इंद्रियांनी काय अनुभवलं, मनाला काय वाटलं आणि मेंदूने त्याची काय प्रतिक्रिया दिली, याभोवतीच त्याचं जगणं फिरत राहतं. बुद्धीचा वापरही प्रामुख्याने स्वतःचा फायदा आणि सुरक्षितता यासाठी केला जातो. त्यामुळे दीर्घकालीन शांतता, नवीन काही शिकण्याची उत्सुकता, सर्जनशीलता, इतरांचा विचार, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि जीवनाचा व्यापक अर्थ यांच्यासाठी फारशी जागा उरत नाही.
अशा माणसासाठी रात्र म्हणजे या सगळ्यापासून काही काळ मुक्त होणं—झोपणं, शरीराला आणि मेंदूला विश्रांती देणं. पण जागृत माणसाची अवस्था यापेक्षा वेगळी असते. तो दिवसाच्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये शांतता अनुभवायला शिकतो. इंद्रिय, मन आणि मेंदू यांच्याकडे तो विवेकाच्या नजरेने पाहतो. त्यामुळे त्याच्यासाठी जागृत अवस्थेतही विश्रांती असते. काम करताना तो शांत असतो, निर्णय घेताना तो शांत असतो, संघर्षाच्या परिस्थितीतही तो स्वतःला हरवून बसत नाही.
आणि इथेच श्रीकृष्णाचा हा श्लोक विलक्षण अर्थपूर्ण होतो.
ज्या गोष्टींमध्ये सामान्य माणूस जागा आहे, त्याच गोष्टींमध्ये संयमी माणूस झोपलेला आहे. आणि ज्या गोष्टींमध्ये सामान्य माणूस झोपलेला आहे, तिथे संयमी माणूस जागा आहे.
सामान्य माणूस बाह्य सुख, भोग, पदार्थ, प्रतिष्ठा, मान्यता, अपेक्षा आणि इंद्रियानुभव यांच्या मागे अहोरात्र धावत असतो. त्याला त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या वाटतात. त्यासाठी तो वेळ देतो, कष्ट करतो, चिंता करतो आणि कधी कधी स्वतःचं संपूर्ण आयुष्य त्यासाठी खर्च करतो. या बाबतीत तो पूर्णपणे जागृत असतो. पण संयमी, स्थितप्रज्ञ माणसाला हे सगळं अंतिम सत्य वाटत नाही. त्याला या गोष्टींचं तात्पुरतं स्वरूप माहीत असतं. म्हणून त्या त्याच्यासाठी जीवनाचा केंद्रबिंदू नसतात.
याउलट आत्मज्ञान, संयम, विवेक, अंतःशांती, स्व-अवलोकन, आत्मपरिवर्तन, इतरांचा विचार, नवीन काही शिकण्याची उत्सुकता, सर्जनशीलता आणि दीर्घकाळ टिकणारा आनंद—या गोष्टी सामान्य माणसाला अनेकदा फारशा महत्त्वाच्या वाटत नाहीत. या बाबतीत तो जणू झोपलेला असतो. पण स्थितप्रज्ञ माणूस याच क्षेत्रात अत्यंत जागृत असतो.
म्हणूनच प्रकाश आणि अंधार यांची व्याख्या बाहेरच्या जगात शोधायची नसते; ती आपल्या चेतनेच्या अवस्थेत शोधायची असते.
अज्ञानामध्ये जगणं म्हणजे दिवस असं सामान्य माणसाला वाटू शकतं आणि ज्ञानामध्ये जगणं म्हणजे त्याला अंधारासारखं वाटू शकतं. पण संयमी माणसासाठी समीकरण उलटं आहे. त्याच्यासाठी विवेकाचा प्रकाश म्हणजे जागृती आणि अज्ञानाचा अंधार म्हणजे निद्रा.
खरी जागृती म्हणजे सतत बाहेर धावत राहणं नाही. खरी जागृती म्हणजे आपण कुठे धावत आहोत, का धावत आहोत आणि त्या धावण्याचा शेवट कुठे होणार आहे, हे पाहण्याची बुद्धी जागी असणं.
म्हणून या श्लोकाचा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा—
ज्या गोष्टींमध्ये जग मला जागृत समजतं, त्या गोष्टींमध्ये मी खरंच जागा आहे का?
आणि ज्या गोष्टींकडे जग दुर्लक्ष करतं, त्या माझ्या जीवनातील खऱ्या प्रकाशाच्या दिशा तर नाहीत ना?
कारण कदाचित आपण जागे आहोत असं समजून जगत असू; पण गीता आपल्याला सांगते—खरी जागृती म्हणजे बाहेरचे डोळे उघडे असणे नव्हे, तर आतली बुद्धी जागी असणे.
समुद्रासारखं व्हायचं : इच्छा येऊ देत, पण मनाची शांतता ढळू नये
गीता दर्शन : श्रीमद्भगवद्गीता – दुसरा अध्याय, सांख्य योग
भाग ९२ | ३० सप्टेंबर २०२६
नमस्कार.
श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्णांनी स्थितप्रज्ञ माणसाच्या जीवनाचं एक अतिशय सुंदर प्रतीक आपल्यासमोर ठेवलं आहे. हे प्रतीक आहे समुद्राचं. समुद्र आणि त्यामध्ये येऊन मिळणाऱ्या असंख्य नद्या यांचं नातं पाहिलं, तर त्यामध्ये मानवी जीवनाचं एक विलक्षण तत्त्वज्ञान दडलेलं दिसतं.
श्रीकृष्ण म्हणतात—
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं
समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे
स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥
अर्थ :
ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी वाहणाऱ्या नद्या सतत समुद्रात येऊन मिळत असतात, तरीही समुद्र आपली स्थिरता आणि स्वरूप सोडत नाही; त्याचप्रमाणे ज्याच्या मनात अनेक इच्छा येऊन प्रवेश करतात, पण जो त्या इच्छांनी अस्वस्थ, अस्थिर किंवा वाहवत जात नाही, तोच खऱ्या शांततेला प्राप्त होतो. जो सतत इच्छांच्या मागे धावत राहतो, त्याला मात्र शांती मिळत नाही.
या श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी केवळ समुद्राचं वर्णन केलेलं नाही; त्यांनी मानवी जीवन कसं असावं, याचं एक सुंदर चित्र आपल्यासमोर उभं केलं आहे.
समुद्राकडे सहज पाहिलं तरी त्याची काही वैशिष्ट्यं लगेच लक्षात येतात. तो अथांग आहे, प्रचंड विस्तीर्ण आहे. त्याच्यामध्ये प्रचंड जलसाठा आहे. त्याच्या पृष्ठभागावर लाटा आहेत, त्याच्या आत असंख्य अंतःप्रवाह आहेत, प्रचंड गतिमानता आहे; पण या सगळ्या गतिमानतेच्या मध्यभागी एक विलक्षण शांतताही आहे.
समुद्र स्वतःमध्ये प्रचंड आहे; पण त्याच वेळी तो जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचं स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे; पण त्याचं जगणं इतर अनेक नैसर्गिक प्रक्रियांशी जोडलेलं आहे.
आता त्याच्याशी नद्यांची तुलना करा.
नद्या समुद्रापेक्षा मर्यादित असतात. त्या आपल्या मार्गाने धावत असतात. कधी खळखळत, कधी वेगाने, कधी शांतपणे त्या पुढे जातात. पावसाळ्यात त्यांना महापूर येतो. कधी त्यांचा प्रवाह वाढतो, कधी कमी होतो. पण शेवटी त्या कुठे जातात?
समुद्राकडे. आणि समुद्र त्यांना नाकारत नाही. नदीचं पाणी आलं म्हणून समुद्र म्हणत नाही, “तू माझ्यात येऊ नकोस.” उलट नदी ज्या अवस्थेत येते, त्या अवस्थेत तो तिला सामावून घेतो. पण त्याच वेळी समुद्र स्वतःचं स्वरूप सोडत नाही. नद्यांना महापूर आला म्हणून समुद्राने आपली स्थिरता सोडली, असं होत नाही. एखाद्या नदीमध्ये पाणी कमी झालं म्हणून समुद्राचं अस्तित्व संपत नाही. अनेक नद्या त्याच्यामध्ये येऊन मिळतात; पण समुद्र प्रत्येक नदीच्या प्रवाहाने स्वतःची ओळख गमावत नाही.
हीच गोष्ट स्थितप्रज्ञ माणसाच्या जीवनाला लागू होते.
आपल्या आयुष्यातही असंख्य नद्या सतत येत असतात.
पैसा येतो. संपत्ती येते. मान-सन्मान येतो. प्रतिष्ठा येते. सत्ता येते. वासना येतात. प्रलोभनं येतात. अपेक्षा येतात. सुखाचे प्रसंग येतात. दुःखाचे प्रसंग येतात. यश येतं. अपयश येतं. स्तुती येते. टीका येते. नवीन संधी येतात. नवीन अनुभव येतात.
हे सगळं आपल्या आयुष्याच्या अवतीभोवती सतत घडत असतं.
पण आजच्या जगात या बाह्य जगाचा आपल्या मनावर होणारा प्रभाव पूर्वीपेक्षा कितीतरी वेगाने वाढला आहे. कारण एक मूलभूत बदल घडला आहे.
पूर्वी माणूस विषयांकडे जायचा; आता विषयच माणसाकडे येतात.
पूर्वी एखादं गाणं ऐकायचं असेल तर रेडिओ लावावा लागायचा, एखादा कार्यक्रम पाहायचा असेल तर ठरावीक वेळ साधावा लागायचा, एखादं पुस्तक वाचायचं असेल तर ते शोधावं लागायचं, एखादं ज्ञान मिळवायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागायचे. आज मात्र मोबाईलच्या एका स्पर्शाने संपूर्ण जग आपल्या हातात आलं आहे.
कधी सुंदर गाणी ऐकायला मिळतात. कधी अभंग ऐकायला मिळतात. कधी चांगल्या ऋचा, श्लोक, प्रार्थना, पसायदान किंवा भगवद्गीतेचे विचार सहज समोर येतात. एखादा सुंदर व्याख्यानाचा अंश, एखादा विचार, एखादं पुस्तक, एखादी प्रेरणादायी व्यक्ती—हे सगळं काही क्षणांत आपल्या समोर येऊ शकतं.
पण त्याच माध्यमातून विविध प्रकारची विचित्र गाणी, भडक मनोरंजन, एकमेकांची भांडणं, आरोप-प्रत्यारोप, आंदोलने, आक्रोश, एकमेकांचे हेवेदावे, संघर्ष आणि नकोशा वाटणाऱ्या असंख्य गोष्टीही तितक्याच सहजपणे आपल्या मनापर्यंत पोहोचतात.
म्हणजे विषयांची नदी आता आपल्या दारापर्यंत येते आहे.
यासाठी आपल्याला कुठे जायची गरज नाही.
आपण घरात बसलो आहोत आणि जग आपल्या हातात आहे.
आपण शांत बसलो आहोत आणि असंख्य आवाज आपल्या मनात प्रवेश करत आहेत.
आपण काही शोधत नसतो, तरी काहीतरी आपल्याला शोधत येत असतं.
आणि याचा सर्वांत मोठा परिणाम लहान मुलांवर होतो. पूर्वी एखाद्या विषयाकडे जाण्यासाठी मुलाला घराबाहेर पडावं लागायचं, एखादं पुस्तक घ्यावं लागायचं, कोणाशी संवाद साधावा लागायचा. आज मोबाईल हातात दिला की काही क्षणांत जगातील असंख्य विषय त्याच्यासमोर येतात. त्याला काय पाहायचं आहे यापेक्षा काय दाखवलं जात आहे, हेही त्याच्या अनुभवाचा भाग बनतं.
ही केवळ तंत्रज्ञानाची गोष्ट नाही; ही मानवी मनासमोर निर्माण झालेल्या नव्या आव्हानाची गोष्ट आहे.
कारण माणूस विषयांकडे गेला तर त्याच्याकडे निवडीची प्रक्रिया असते. पण विषयच सतत माणसाकडे येत असतील, तर निवड करण्याची बुद्धी अधिक सजग असावी लागते.
आज AI आहे. YouTube आहे. Facebook आहे. Instagram आहे. विविध डिजिटल माध्यमं आहेत. जगाच्या एका टोकाला काय घडतंय, हे काही क्षणांत आपल्याला समजू शकतं. पूर्वी दूर असलेल्या व्यक्ती, घटना, विचार आणि अनुभव आता आपल्या हातात आले आहेत.
ही मोठी संधी आहे.
पण त्याच वेळी ही मोठी जबाबदारीही आहे.
कारण तंत्रज्ञान आपल्याला समृद्ध करू शकतं आणि त्याच तंत्रज्ञानामुळे आपलं मन सतत उत्तेजितही राहू शकतं.
एकाच मोबाईलमधून गीतेचा श्लोकही येऊ शकतो आणि मनाला अस्वस्थ करणारा विषयही येऊ शकतो. पसायदानही ऐकता येतं आणि आक्रोशही ऐकता येतो. सुंदर संगीतही ऐकता येतं आणि मनाला अस्थिर करणारा आवाजही.
म्हणून प्रश्न असा नाही की—
“जगात काय काय उपलब्ध आहे?”
ते तर असणारच.
प्रश्न असा आहे—
“या सगळ्यातून मी माझ्या जीवनासाठी काय स्वीकारणार?”
आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न—
“जे माझ्याकडे स्वतःहून येत आहे, त्याला माझ्या मनात किती जागा द्यायची?”
याच ठिकाणी समुद्राचं प्रतीक आपल्याला मार्गदर्शन करतं.
समुद्र नद्यांना थांबवत नाही.
तो त्यांच्यापासून दूरही पळत नाही.
तो त्यांना स्वीकारतो; पण स्वतःची स्थिरता सोडत नाही.
तसंच आपणही जगापासून दूर पळायचं नाही. तंत्रज्ञानापासून पळायचं नाही. डिजिटल माध्यमांपासून पूर्णपणे दूर जाणं हा उपाय नाही. पण त्यांच्यामुळे आपल्या मनाची दिशा कोण ठरवणार—हे आपण ठरवायला हवं.
कारण आज आपल्या विकासासाठी ज्ञान सहज उपलब्ध आहे. जगभरातील उत्तम विचार आपल्यापर्यंत येऊ शकतात. चांगलं संगीत, अभंग, श्लोक, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, अनुभव आणि ज्ञानाच्या असंख्य दिशा आपल्या हातात आहेत.
मग या व्यवस्थेचा उपयोग आपण स्वतःला समृद्ध करण्यासाठी का करू नये?
आपल्याला अधिक शांत करणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी.
आपल्याला अधिक सजग करणारे विचार समजून घेण्यासाठी.
आपल्या बुद्धीचा विस्तार करण्यासाठी.
आपल्या मनाला स्थैर्य देण्यासाठी.
आपल्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी.
आणि आपल्या जीवनाला अधिक व्यापक अर्थ देण्यासाठी.
जग बदलणं आपल्या हातात नाही; पण जगातून आपल्या मनात काय प्रवेश करू द्यायचं, याची निवड करण्याची क्षमता आपल्या हातात आहे.
माझ्याकडे हे नाही, मला ते मिळालं नाही, त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही, त्याला मान मिळाला आणि मला मिळाला नाही—या विचारांनी आपण स्वतःला सतत त्रास देत राहू शकतो.
किंवा दुसरा मार्ग निवडू शकतो—
“माझ्याकडे जे आहे, त्यामध्ये मला किती आनंद अनुभवता येईल?”
हा प्रश्न विचारू शकतो.
कारण इच्छा असणं ही समस्या नाही.
इच्छेच्या मागे स्वतःला हरवून बसणं ही समस्या आहे.
सुख मिळणं ही समस्या नाही.
सुखाचा गुलाम होणं ही समस्या आहे.
दुःख येणं ही समस्या नाही.
दुःख आलं की आपली अंतर्गत स्थिरता गमावणं ही समस्या आहे.
जगात प्रलोभनं असणारच. आकर्षणं असणारच. संधी असणारच. मान-सन्मान असणारच. टीका असणारच. पैसा, संपत्ती, सत्ता, वासना आणि असंख्य अनुभव आपल्या आयुष्यात येत राहणारच.
प्रश्न एवढाच आहे—
या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात येऊ शकतात; पण त्या माझ्या मनावर राज्य करतील का?
समुद्रासारख्या मनाचा माणूस म्हणतो—
“येऊ देत!”
पण त्याच वेळी तो स्वतःला सांगतो—
“मी माझं स्वरूप सोडणार नाही.”
यालाच गीतेतील समत्व म्हणता येईल.
ज्याची बुद्धी सजग आहे, ज्याची इंद्रियं संयमित आहेत आणि ज्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आहे, त्याच्यावर बाह्य जगाचा परिणाम होत नाही असं नाही; पण तो त्या परिणामाचा गुलाम होत नाही.
स्थितप्रज्ञ माणूस दगडासारखा भावनाशून्य नसतो. उलट तो जीवन अधिक खोलवर अनुभवतो. त्याला आनंद होतो, दुःखही होतं. तो लोकांशी जोडला जातो, समाजासाठी काम करतो, नवीन गोष्टी शिकतो, निर्माण करतो; पण या सगळ्या अनुभवांमुळे त्याच्या अंतर्मनाचा तोल सतत ढळत नाही.
त्याचं अस्तित्व समुद्रासारखं विस्तीर्ण होत जातं.
समुद्र अनेक नद्या स्वीकारतो, पण प्रत्येक नदी त्याला बदलून टाकत नाही.
तसंच जीवनात अनेक अनुभव येतात; पण प्रत्येक अनुभवाने आपली ओळख बदलून जाऊ नये.
आपण इतके मोठे व्हायला हवं की आपल्याकडे येणाऱ्या गोष्टींना सामावून घेता येईल.
इतके व्यापक व्हायला हवं की मतभेदांनाही जागा देता येईल.
इतके शांत व्हायला हवं की परिस्थिती बदलली तरी विवेक टिकून राहील.
इतके सजग व्हायला हवं की इच्छा मनात आली तरी आपण तिच्यामागे अंधपणे धावणार नाही.
आणि इतके गतिमानही व्हायला हवं की आपल्या अस्तित्वामुळे समाजामध्ये काहीतरी चांगली हालचाल निर्माण होईल.
कारण समुद्र शांत आहे, पण निष्क्रिय नाही.
त्याच्यामध्ये प्रचंड गतिमानता आहे. त्याच्या पृष्ठभागावर लाटा आहेत, आत अंतःप्रवाह आहेत; तरीही त्याचं विशाल अस्तित्व स्थिर आहे.
मानवी जीवनही असंच असावं—बाहेरून गतिमान, आतून स्थिर.
बाहेरून सक्रिय, आतून शांत.
जगाशी जोडलेलं, पण जगाच्या मोहात हरवलेलं नाही.
अनेकांकडून घेणारं, पण स्वतःचं स्वरूप न गमावणारं.
Attached पण Detached.
जगाशी जोडलेलं, पण जगाच्या प्रत्येक अनुभवाला स्वतःवर राज्य करू न देणारं.
आपण मानवी शरीराचा आणि मानवी अस्तित्वाचा विचार केला, तर आपल्यामध्येच किती विलक्षण क्षमता आहे, हे जाणवतं. शरीर, प्राण, मन आणि बुद्धी यांचा योग्य समन्वय झाला, तर माणूस किती काही करू शकतो! स्वतःच्या जीवनात परिवर्तन घडवू शकतो, समाजामध्ये परिवर्तन घडवू शकतो आणि आपल्या अस्तित्वाला इतरांसाठी उपयुक्त बनवू शकतो.
म्हणूनच समुद्राचं हे प्रतीक केवळ शांत बसण्याचं प्रतीक नाही.
हे विशाल होण्याचं प्रतीक आहे.
आपलं मन विशाल होण्याचं.
आपलं चित्त व्यापक होण्याचं.
आपली बुद्धी स्थिर आणि सजग होण्याचं.
आपलं अस्तित्व इतरांना सामावून घेण्याइतकं मोठं होण्याचं.
समुद्राचं अस्तित्व संपूर्ण जीवसृष्टीच्या जीवनचक्रासाठी महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनाचं अंतिम मूल्य केवळ “मला काय मिळालं?” यामध्ये नसतं; तर “माझ्या अस्तित्वामुळे इतरांच्या जीवनात काय निर्माण झालं?” यामध्येही असतं.
म्हणूनच श्रीकृष्ण आपल्याला समुद्रासारखं होण्याची दिशा दाखवतात.
इच्छा येऊ देत.
प्रलोभनं येऊ देत.
सुख-दुःख येऊ देत.
यश-अपयश येऊ देत.
मान-सन्मान येऊ देत.
डिजिटल जगातून असंख्य विषय आपल्या दारात येऊ देत.
पण या सगळ्यांच्या मध्यभागी आपली बुद्धी जागी राहू दे.
आपलं मन शांत राहू दे.
आपलं अस्तित्व समृद्ध होत राहू दे.
आणि सर्वांत महत्त्वाचं—
आपली अंतःशांती बाहेरच्या जगाच्या हाती जाऊ देऊ नका.
कारण गीता आपल्याला सांगते—
समुद्रासारखं व्हा.
असं विशाल व्हा की नद्या येत राहतील, पण तुमची स्थिरता ढळणार नाही.
असं व्यापक व्हा की जग तुमच्यामध्ये सामावेल, पण जगामुळे तुमचं स्वस्वरूप हरवणार नाही.
असं शांत व्हा की इच्छा येतील, पण तुम्ही इच्छांचे गुलाम होणार नाही.
आणि असं सजग व्हा की डिजिटल जगातून तुमच्याकडे येणाऱ्या असंख्य विषयांमधून तुम्ही स्वतःच्या विकासासाठी, समृद्धीसाठी, शांततेसाठी आणि जागृतीसाठी आवश्यक तेच स्वीकाराल.
कारण समुद्र होणं म्हणजे जगापासून दूर जाणं नव्हे;
तर जगाला सामावून घेतानाही स्वतःमध्ये स्थिर राहणं.
आणि म्हणूनच—
“स शान्तिमाप्नोति न कामकामी”—
जो सतत इच्छांच्या मागे धावत राहतो, त्याला शांती मिळत नाही; पण जो इच्छा येऊ देतो आणि तरीही त्यांच्यामुळे आपली अंतःस्थिरता ढळू देत नाही, तोच खऱ्या शांततेकडे वाटचाल करतो.
आपल्यालाही असं समुद्रासारखं विस्तीर्ण आयुष्य जगता येईल का?
असं विशाल मन, व्यापक चित्त आणि स्थिर बुद्धी निर्माण करता येईल का?
गीतेचा हा श्लोक आपल्याला त्याच दिशेने चालायला सांगतो.
परम शांती
गीता दर्शन :
श्रीमद्भगवद्गीता – दुसरा अध्याय, सांख्य योग
भाग ९३ | १ ऑक्टोबर २०२६
नमस्कार.
“विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः ।
निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ॥”
सर्व कामनांचा त्याग करून, निःस्पृहपणे जगणारा, ‘माझे’पण आणि ‘मी’पण सोडणारा मनुष्यच शांती प्राप्त करतो.
श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सर्वप्रथम मानवी अस्तित्वाची क्षणभंगुरता आणि त्यामागे असलेले शाश्वत अस्तित्व समजावून सांगतात. शरीर बदलणारे आहे, नश्वर आहे; परंतु आत्मतत्त्व शाश्वत आहे. अर्जुन ज्यांना मारण्याबद्दल विचार करत आहे, ते शरीराच्या पातळीवरचे अस्तित्व आहे, आणि त्या शरीराच्या नाशाला आत्म्याचा नाश समजणे चुकीचे आहे, हे श्रीकृष्ण स्पष्ट करतात.
पण अर्जुनाची अडचण केवळ एवढीच नाही. युद्ध समोर उभे आहे आणि त्याच्या मनामध्ये अस्वस्थता आहे, ताण आहे, संभ्रम आहे. भविष्यात काय होईल, कोण मरेल, त्याचे परिणाम काय होतील, या सगळ्या विचारांनी त्याचे मन व्यापलेले आहे. त्यामुळे अर्जुनाचा प्रश्न आता अधिक खोल जातो—बाह्य जग क्षणभंगुर आहे, हे समजले; पण माझ्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या या भावनांचे काय? त्या भावनांना कसे हाताळायचे? प्रत्यक्ष परिस्थितीला कसे सामोरे जायचे?
म्हणूनच अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो—
“स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव?”
स्थितप्रज्ञ माणसाची ओळख काय? तो कसा बोलतो, कसा वागतो, कसा जगतो?
श्रीकृष्ण त्यानंतर स्थितप्रज्ञाच्या अवस्थेचे वर्णन करायला सुरुवात करतात. कारण बाह्य जग बदलणारे आहे, हे समजणे एक गोष्ट आहे; पण त्या बदलत्या जगामध्ये स्वतःची अंतःस्थिती कशी स्थिर ठेवायची, हे समजणे ही त्यापेक्षा मोठी गोष्ट आहे.
आपण आपल्या आयुष्याकडे पाहिले तर एक साधी गोष्ट लक्षात येते. आपण सतत दुःखी राहिलेलो नाही आणि सतत सुखीही राहिलेलो नाही. प्रत्येक क्षणी शुभच घडलेले नाही आणि प्रत्येक क्षणी अशुभही घडलेले नाही. आपण सतत रागाच्या अवस्थेतही नसतो आणि सतत द्वेषाच्या अवस्थेतही नसतो. भावना बदलत राहतात.
जर एखादीच भावना आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी राहिली असती, तर आपले मानसिक जग स्थिर न राहता विकृत झाले असते. पण माणसाचे मन तसे नसते. भावना येतात, काही काळ राहतात आणि निघून जातात. त्या अस्थिर असतात, अशाश्वत असतात, क्षणभंगुर असतात.
मग या बदलणाऱ्या भावनांच्या मुळाशी काय आहे?
त्यांच्या मुळाशी असतात कामना, इच्छा आणि अपेक्षा.
“मला अशी अवस्था हवी आहे”, “मला हे मिळाले पाहिजे”, “माझ्याबरोबर असेच घडले पाहिजे”—या इच्छांमधून आपल्या मनामध्ये विविध भावना निर्माण होतात.
पण गंमत अशी आहे की आपल्या इच्छा देखील स्थिर नसतात. एकच इच्छा घेऊन माणूस संपूर्ण आयुष्य जगत नाही. स्थळ, काळ, वेळ आणि परिस्थिती बदलली की इच्छा बदलतात. आज जे हवेसे वाटते, ते काही वर्षांनी कदाचित नकोसे वाटू शकते. आज ज्यासाठी आपण अस्वस्थ होतो, त्याच गोष्टीकडे काही काळानंतर आपण शांतपणे पाहू शकतो.
म्हणजेच भावना बदलणाऱ्या आहेत आणि त्या भावनांना जन्म देणाऱ्या इच्छा-कामनाही बदलणाऱ्या आहेत.
मग प्रश्न निर्माण होतो—जर हे सगळे बदलणारे आहे, तर शाश्वत काय आहे?
जसे आत्मतत्त्व शाश्वत आहे, तसेच माणसाच्या जीवनामध्ये एक अशी अवस्था निर्माण होऊ शकते जी बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते. ती म्हणजे शांतीची अवस्था.
म्हणूनच भगवद्गीतेत पुन्हा पुन्हा शांती हा शब्द येतो. उपनिषदांच्या मंत्रांच्या शेवटी आपण म्हणतो—
“ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।”
कारण माणसाच्या संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाचा अंतिम उद्देश केवळ बाह्य सुख मिळवणे नाही; तर अंतर्मनात स्थिर शांती निर्माण करणे हा आहे.
आपल्या इच्छा आणि कामना निर्माण होण्याची प्रक्रिया देखील आपण समजून घेतली पाहिजे. इंद्रियांमधून आपल्याला अनुभव मिळतात. त्या अनुभवांचा संबंध मेंदूशी येतो. आधीचे अनुभव, त्यातून तयार झालेले न्यूरल पाथवे आणि स्मृती यांच्यामुळे एखादी गोष्ट पुन्हा समोर आली की शरीर आणि मनामध्ये विशिष्ट प्रतिक्रिया निर्माण होतात.
मग प्रश्न उभा राहतो—हे सगळे घडते आहे, हे समजल्यानंतर आपण प्रत्येक अनुभवाच्या मागे पुन्हा पुन्हा धावत राहायचे का? प्रत्येक गोष्ट मिळवण्याची इच्छा सतत वाढवत राहायची का? प्रत्येक आकर्षणामध्ये स्वतःला झोकून द्यायचे का?
इथे मनाची भूमिका महत्त्वाची ठरते.
इंद्रिये अनुभव घेतात. मेंदू त्या अनुभवांची प्रक्रिया करतो. मन त्यांना प्रतिसाद देते. पण एखाद्या गोष्टीचा अंतिम परिणाम काय होईल, हे ठरवण्याची क्षमता बुद्धीमध्ये आहे.
आपल्या चित्तातील संस्कार, स्वतःचे अनुभव, इतर श्रेष्ठ व्यक्तींचे अनुभव, निरीक्षण आणि विवेक यांच्या आधारे बुद्धी ठरवते—हे माझ्यासाठी योग्य आहे की अयोग्य? याच्या मागे किती जावे? कुठे थांबावे?
जिथे अशी सतर्क बुद्धी आहे, जिथे विवेक आहे, जिथे निश्चयात्मक बुद्धी आहे, जिथे अढळ बुद्धी आहे, तिथे मन हळूहळू शुद्ध आणि स्थिर होऊ लागते. मग इंद्रिये, मेंदू, मन आणि बुद्धी यांच्यामध्ये एक सुंदर हार्मनी निर्माण होऊ लागते.
याचा परिणाम शरीरावरही होतो. शरीरातील विविध प्रक्रिया अधिक संतुलित होतात. स्थूल शरीर आणि आपल्या अंतरंगातील सूक्ष्म प्रक्रिया यांच्यामध्ये एक सुंदर नाते तयार होते.
ही अवस्था आपोआप तयार होत नाही. ती प्रयत्नाने तयार करावी लागते.
आणि प्रयत्नाने तयार झालेली ही स्थिरता जर जीवनाचा स्वभाव बनली, तर तिला आपण परम शांतीची अवस्था म्हणू शकतो.
मग प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो.
“हेही जाणार आहे.”
ही एक साधी जाणीव मनामध्ये दृढ झाली की त्रासाची तीव्रता कमी होऊ लागते. दुःख आले तर आपण दुःख नाकारत नाही; पण त्यामध्ये पूर्णपणे बुडूनही जात नाही. आपल्याला हळूहळू समजू लागते—या त्रासाचे कारण काय आहे? यामध्ये माझ्या इच्छा आणि अपेक्षांचा किती वाटा आहे? आणि यातून बाहेर पडण्यासाठी मला काय करायला हवे?
अनेक वेळा आपण त्रासाला फक्त त्रास म्हणून पाहतो. पण नंतर लक्षात येते की त्या त्रासाच्या मुळाशी एखादी अपूर्ण इच्छा, अवाजवी अपेक्षा किंवा परिस्थितीने आपल्या मनाप्रमाणेच घडले पाहिजे, असा अट्टाहास होता.
म्हणूनच स्थिर प्रज्ञा असलेल्या माणसाला आपल्या अस्वस्थतेची मुळे हळूहळू दिसू लागतात.
मग त्याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजते—सर्व इच्छा वाईट नसतात.
मानवी विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी, स्वतःच्या शरीर-मन-बुद्धीच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या इच्छा असायलाच हव्यात. पण त्या आपले स्वामी नसाव्यात; त्या आपल्या साधनेची साधने असाव्यात.
चांगले अन्न मिळावे, शरीर निरोगी राहावे, सुरक्षित आणि स्वच्छ घर असावे, कुटुंब व्यवस्थित राहावे—या गोष्टी जीवनाला सुखद आणि सक्षम बनवतात. समाजातील इतर घटकांचे जीवनही अधिक चांगले व्हावे, यासाठी आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात.
पण त्या गोष्टींसाठी आपण जगायचे की त्या गोष्टींचा उपयोग करून चांगले जीवन जगायचे, यामध्ये मोठा फरक आहे.
इच्छा ही साधन झाली पाहिजे; ती जीवनाचे अंतिम ध्येय बनता कामा नये.
काटा पायात रुतला तर तो काढण्यासाठी दुसऱ्या काट्याचा उपयोग करतो. पण काटा निघाल्यानंतर तो काटा आपण जपून ठेवत नाही. त्याचप्रमाणे जीवनाला पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेल्या इच्छा असाव्यात; पण काम पूर्ण झाल्यानंतर त्या इच्छेला चिकटून राहण्याची गरज नाही.
इथे आणखी एक महत्त्वाचा नियम समजतो—आनंद बाह्य वस्तूमध्ये कायमस्वरूपी नसतो.
एखादा आवडता पदार्थ पहिल्यांदा खाल्ल्यावर मिळणारा आनंद आणि तोच पदार्थ वारंवार, अति प्रमाणात खाल्ल्यावर मिळणारा अनुभव सारखा राहत नाही. उदाहरणार्थ, एक गुलाबजाम खाल्ल्यानंतर मिळणारा आनंद आणि पन्नासावा गुलाबजाम खाल्ल्यानंतरची अवस्था सारखी असणार नाही. उलट, एका मर्यादेनंतर आनंदाचे रूपांतर त्रासामध्ये होऊ शकते.
यालाच आपण diminishing returns या संकल्पनेतून समजू शकतो—एखादी गोष्ट वाढवत गेलो म्हणून त्यातून मिळणारा आनंद त्याच प्रमाणात वाढतच राहतो असे नाही.
ही गोष्ट समजली की माणूस अवास्तव, अमर्याद आणि अनावश्यक इच्छांपासून हळूहळू मुक्त होऊ लागतो.
त्याची एखादी वस्तू मिळवण्याची तीव्र ओढ कमी होते. “हे मिळालेच पाहिजे”, “हे माझेच असले पाहिजे”, “माझ्याशिवाय हे होऊच शकत नाही”—असा अट्टाहास कमी होतो.
तो निस्पृह होतो.
निस्पृह म्हणजे जीवन सोडून देणे नाही. उलट, जीवन अधिक सुंदरपणे जगणे. पण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मालकीची, स्वतःच्या अहंकाराची किंवा स्वतःच्या प्रतिष्ठेची बनवून न घेणे.
मग “हे माझे घर”, “ही माझी संपत्ती”, “हे माझे कुटुंब”, “हे माझे लोक”, “मी हे केले”, “मी इतके मिळवले”—या ‘माझेपणा’ आणि ‘मीपणा’ यांची पकड सैल होऊ लागते.
जबाबदारी मात्र संपत नाही.
कर्तव्य पूर्ण होते. काळजी घेतली जाते. प्रयत्न केले जातात. पण त्यामागे अट्टाहास नसतो.
“मी करतोय, म्हणून मी मोठा” हे सिद्ध करण्यासाठी तो जगत नाही.
“हे माझे कर्तव्य आहे, म्हणून मला ते पूर्ण करायचे आहे” या भावनेने तो जगतो.
आणि म्हणूनच त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू केवळ स्वतःचा आनंद राहत नाही. त्यातून एक व्यापक भावना निर्माण होते—
“सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः।”
सगळ्यांचे कल्याण व्हावे. सगळ्यांना शांती मिळावी. सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद असावा.
आणि म्हणूनच श्रीकृष्ण स्थितप्रज्ञाच्या या अवस्थेचे वर्णन करताना म्हणतात—
“विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः ।
निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ॥”
सर्व कामनांचा त्याग करून, निःस्पृहपणे जगणारा, ‘माझे’पण आणि ‘मी’पण सोडणारा मनुष्यच शांती प्राप्त करतो.
ही अवस्था सोपी नाही. कारण आपण अनेकदा तात्पुरत्या गोष्टींनाच संपूर्ण आयुष्य समजतो. क्षणिक सुख, तात्कालिक यश, एखादी वस्तू, एखादे नाते, एखादी प्रतिष्ठा—हेच आयुष्याचे अंतिम सत्य आहे असे आपल्याला वाटू लागते.
पण आयुष्याची गुणवत्ता क्षणिक गोष्टींनी नाही, तर स्थिर गोष्टींनी निर्माण होते.
घर बांधताना आपण ते सुरक्षित, मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारे असावे, असा विचार करतो. मग आपल्या आयुष्याबद्दलही आपण असाच विचार करायला नको का?
आपले शरीर सुदृढ असावे.
इंद्रिये संयमित असावीत.
मेंदू सजग असावा.
मन प्रसन्न आणि स्थिर असावे.
बुद्धी विवेकी आणि निश्चयात्मक असावी.
या सगळ्यांमध्ये एक सुंदर हार्मनी निर्माण झाली आणि तिच्या आधारावर आपल्या जीवनात स्थिर शांती निर्माण झाली, तर त्यापेक्षा मोठी समृद्धी कोणती?
म्हणून स्थितप्रज्ञ होणे म्हणजे जग सोडणे नाही. इच्छा संपवणेही नाही. तर अनावश्यक इच्छांचे गुलाम होणे थांबवणे होय.
आवश्यक ते स्वीकारायचे.
कर्तव्य पूर्ण करायचे.
समाजासाठी जगायचे.
सर्वांच्या कल्याणाचा विचार करायचा.
पण कोणत्याही गोष्टीला आपल्या मनाची शांतता विकायची नाही.
शेवटी आपल्याला एक प्रश्न स्वतःला विचारायचा आहे—
माझ्या आयुष्यातील कोणत्या इच्छा मला पुढे नेत आहेत आणि कोणत्या इच्छा मला माझ्याच मनाच्या गुलाम बनवत आहेत?
ज्या इच्छा माझ्या विकासासाठी, माझ्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि व्यापक कल्याणासाठी आवश्यक आहेत, त्या साधन म्हणून ठेवायच्या.
पण ज्या इच्छा मर्यादेच्या पलीकडे गेल्या आहेत, ज्या वासना मनाला अस्वस्थ करतात, ज्या अपेक्षा सतत ताण निर्माण करतात, ज्या गोष्टी मिळाल्याशिवाय मी शांत राहू शकत नाही—त्यांच्याकडे पुन्हा एकदा पाहायचे.
कदाचित शांती बाहेर कुठेतरी मिळवायची नसते.
शांतीच्या आड उभ्या असलेल्या अनावश्यक कामना बाजूला करायच्या असतात.
आणि जेव्हा ‘मी’ आणि ‘माझे’ यांची पकड सैल होते, इच्छा साधन बनतात, बुद्धी स्थिर होते आणि मन निस्पृह होते, तेव्हा माणूस बाह्य जग बदलले नाही तरी स्वतःच्या आत एक अशी जागा निर्माण करतो जिथे शांतता टिकून राहू शकते.
हीच स्थितप्रज्ञतेची दिशा.
हीच निस्पृहतेची दिशा.
आणि हीच—
परम शांतीची दिशा.
*ब्राह्मी स्थिती : आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर पुन्हा उभं राहण्याची शक्ती*
गीता दर्शन : श्रीमद्भगवद्गीता – दुसरा अध्याय, सांख्य योग
भाग ९४ | २ ऑक्टोबर २०२६
नमस्कार.
श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकाकडे आपण आता येतो आहोत. दुसरा अध्याय म्हणजे सांख्य योग. या संपूर्ण अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला स्थिर बुद्धी, समत्व, इंद्रियसंयम, राग-द्वेषापासून मुक्तता, प्रसन्नता, शांती आणि स्थितप्रज्ञतेकडे जाणारा मार्ग समजावून सांगितला. आणि या सगळ्या प्रवासाचा शेवट करताना श्रीकृष्ण एक अत्यंत सुंदर आणि आश्वासक विधान करतात—
“एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वाऽस्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥”
या श्लोकाचा साधा अर्थ असा—हे पृथापुत्र अर्जुना, हीच ब्राह्मी स्थिती आहे. या स्थितीला प्राप्त झालेला मनुष्य पुन्हा मोहात पडत नाही, भ्रमित होत नाही. आणि या स्थितीमध्ये स्थिर राहून, अगदी अंतकाळीही तो ब्रह्मनिर्वाण म्हणजेच परमशांतीची अवस्था प्राप्त करू शकतो.
या श्लोकामध्ये मला चार शब्द अत्यंत महत्त्वाचे वाटतात—‘ब्राह्मी स्थिती’, ‘विमुह्यति’, ‘अन्तकालेऽपि’ आणि ‘ब्रह्मनिर्वाण’. या चार शब्दांमधून या संपूर्ण अध्यायाचा सार आपल्यासमोर उभा राहतो.
ब्राह्मी स्थिती म्हणजे काय?
‘ब्राह्मी स्थिती’ म्हणजे मानवी अस्तित्वाची सर्वोच्च, परम आणि संतुलित अवस्था. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण ज्या अवस्थेला स्थितप्रज्ञता म्हटलं, ज्या अवस्थेला समत्व म्हटलं, ज्या अवस्थेमध्ये मन प्रसन्न होतं, बुद्धी स्थिर होते आणि माणूस सुख-दुःख, राग-द्वेष, शुभ-अशुभ यांच्या पलीकडे जाऊन जीवनाकडे पाहू लागतो—तीच अवस्था श्रीकृष्ण इथे ब्राह्मी स्थिती म्हणून सांगतात.
ही एखादी कल्पना नाही. ही केवळ मृत्यूनंतर मिळणारी अवस्था आहे, असंही मला वाटत नाही. उलट, माणूस जिवंत असतानाच आपल्या शरीरात, मनात आणि बुद्धीत एक वेगळा समतोल निर्माण करू शकतो, अशी या संकल्पनेची दिशा आहे.
शरीर व्यवस्थित आहे, मन शांत आहे, बुद्धी स्वच्छपणे निर्णय घेत आहे, भावनांवर आपलं नियंत्रण आहे, अनावश्यक ताणतणावाने आपण वाहवत जात नाही, स्वतःपुरतं जगण्याऐवजी इतरांशी जोडलेपणाची जाणीव आहे आणि शरीर, मन, बुद्धी यांच्यामध्ये एक सुंदर समन्वय आहे—अशी अवस्था आपण ब्राह्मी स्थितीच्या दिशेने जाणारी अवस्था म्हणू शकतो.
विमुह्यति : मोह म्हणजे केवळ भ्रम नाही
दुसरा महत्त्वाचा शब्द आहे—‘विमुह्यति’.
मोह म्हणजे केवळ एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या प्रेमात पडणं नव्हे. मोह म्हणजे आपल्या मनावर एखाद्या भावनेचं, इच्छेचं, भीतीचं, रागाचं किंवा द्वेषाचं इतकं वर्चस्व निर्माण होणं की आपली निर्णयक्षमता ढळते.
माणूस मग सुख-दुःखाच्या चक्रामध्ये अडकतो. राग-द्वेषाच्या चक्रामध्ये अडकतो. चांगलं-वाईट, शुभ-अशुभ, मला हवं-मला नको, माझं-तुझं अशा संकुचित चौकटींमध्ये त्याचं जगणं अडकत जातं.
मोहात असलेला माणूस अनेकदा स्वतःपुरता केंद्रित होतो. त्याचा संबंध इतरांशी कमी होतो. शरीर, मन आणि बुद्धी यांच्यामध्ये समन्वय राहत नाही. आयुष्याचा एक नैसर्गिक रिदम बिघडतो.
म्हणूनच ‘नैनां प्राप्य विमुह्यति’ म्हणजे या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर माणूस पुन्हा मोहाच्या ताब्यात जात नाही. आयुष्यात मोहाचे प्रसंग येणार नाहीत, असं नाही. प्रसंग येतील; भावना निर्माण होतील; सुख-दुःख येईल; रागही येऊ शकतो. पण त्या भावनांनी आपल्याला पूर्णपणे व्यापून टाकू नये, ही ब्राह्मी स्थितीची ओळख आहे.
मानवी अस्तित्वाचा रिदम आणि मोह
आपल्या मानवी अस्तित्वामध्ये एक नैसर्गिक रिदम आहे. शरीराचा रिदम आहे, श्वासाचा रिदम आहे, झोप-जागरणाचा रिदम आहे, मनाच्या भावनांचा रिदम आहे आणि विचारांचा देखील एक रिदम आहे.
हा समतोल बिघडला की ताण निर्माण होतो. मन अस्थिर होतं. निर्णयक्षमता कमी होते. शरीरावरही त्याचे परिणाम होतात.
पण साधना, जागरूकता, योग्य विचार आणि सततचा आत्मअभ्यास यामुळे हा रिदम पुन्हा पकडता येतो. आयुष्यात एकदा तो बिघडला म्हणून तो कायमचा बिघडलेलाच राहतो, असं नाही.
याच ठिकाणी गीतेचा हा श्लोक आपल्याला एक मोठी आशा देतो—माणूस पुन्हा संतुलित होऊ शकतो.
अन्तकालेऽपि : अंतकाळ म्हणजे फक्त मृत्यू?
या श्लोकातील तिसरा शब्द आहे—‘अन्तकालेऽपि’.
परंपरेने याचा अर्थ आयुष्याच्या शेवटच्या काळाशी, मृत्यूच्या वेळी, असा घेतला जातो. तो अर्थ नक्कीच महत्त्वाचा आहे. परंतु मला या शब्दाकडे आणखी एका व्यावहारिक अर्थाने पाहावंसं वाटतं.
अंतकाळ म्हणजे एखाद्या अवस्थेचा अंतिम टप्पाही असू शकतो.
माणूस एखाद्या अत्यंत वाईट अवस्थेमध्ये गेला आहे. मानसिकदृष्ट्या तो खचला आहे. आयुष्यातील एखादा टप्पा पूर्णपणे कोसळला आहे. त्याला वाटतंय की आता काही उरलेलं नाही. तरीही तिथेच सगळं संपत नाही.
एका अवस्थेचा अंत म्हणजे दुसऱ्या अवस्थेची सुरुवात असू शकते.
वाईट सवयींचा अंत होऊन चांगल्या सवयींची निर्मिती होऊ शकते. नकारात्मक विचारांचा अंत होऊन सकारात्मक विचारांची सुरुवात होऊ शकते. अस्वस्थतेचा अंत होऊन शांततेचा जन्म होऊ शकतो. जुन्या पॅटर्न्सचा अंत होऊन नवीन जीवनपद्धती तयार होऊ शकते.
म्हणून अन्तकालेऽपि हा शब्द मला एक मोठं आश्वासन देतो—उशीर कधीच झालेला नसतो.
ब्रह्मनिर्वाण : परमशांतीचा अनुभव
आणि शेवटचा शब्द आहे—‘ब्रह्मनिर्वाण’.
याचा पारंपरिक अर्थ ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, मोक्ष किंवा परमशांती असा घेतला जातो. मला या शब्दाकडे पाहताना संत ज्ञानेश्वरांच्या अनुभवाची आठवण होते—
“या देही, याची डोळा
पाहीन मुक्तीचा सोहळा.”
म्हणजे मुक्ती ही केवळ मृत्यूनंतरची गोष्ट नाही; या जीवनातही तिचा अनुभव घेता येऊ शकतो, अशी भारतीय अध्यात्मपरंपरेची एक महत्त्वाची धारणा आहे.
भृगू ऋषींच्या संदर्भात उपनिषदांमध्ये वर्णिलेली साधना असो किंवा भारतीय ऋषी-मुनींची परंपरा असो, त्यांनी या अवस्थेकडे केवळ बौद्धिक कल्पना म्हणून पाहिलं नाही. ती अनुभवण्याचा प्रयत्न केला.
म्हणूनच ‘ब्रह्मनिर्वाण’ म्हणजे माझ्यासाठी या जीवनापासून पळून जाणं नव्हे; उलट, या जीवनामध्ये अधिक शांत, अधिक व्यापक, अधिक सजग आणि अधिक संतुलित होऊन जगण्याची अवस्था आहे.
हे खरंच शक्य आहे का?
आता प्रश्न असा पडतो—हे सगळं खरंच शक्य आहे का?
माणसाचा मेंदू बदलू शकतो का? मनाचे पॅटर्न बदलू शकतात का? ताणतणावातून बाहेर पडून माणूस अधिक शांत आणि संतुलित होऊ शकतो का?
आज आधुनिक विज्ञान या प्रश्नांचा वेगवेगळ्या पातळ्यांवर अभ्यास करत आहे.
न्यूरोसायन्समध्ये ध्यान, मानसिक प्रशिक्षण, भावना आणि मेंदूतील बदल यांचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर होत आहे. रिचर्ड डेव्हिडसन यांच्यासारख्या संशोधकांनी ध्यान आणि सकारात्मक भावनिक अवस्थांचा मेंदूवर होणारा परिणाम अभ्यासला आहे. त्यांच्या संशोधनामुळे affective neuroscience म्हणजे भावनिक अनुभवांच्या न्यूरोसायन्सकडे लक्ष वेधलं गेलं.
ध्यान आणि मानसिक प्रशिक्षणामुळे मेंदूमध्ये बदल घडू शकतात, या क्षमतेला neuroplasticity म्हटलं जातं. म्हणजेच मेंदू हा एकदा तयार झाला आणि कायम तसाच राहिला, असं नाही. अनुभव, शिकणं आणि मानसिक प्रशिक्षण यामुळे त्याच्या कार्यपद्धतीत आणि काही बाबतींत त्याच्या रचनेतही बदल होऊ शकतात.
ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे.
कारण गीता आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगते—माणूस स्वतःमध्ये परिवर्तन करू शकतो.
आणि आधुनिक विज्ञान आज वेगळ्या भाषेत विचारत आहे—माणसाचा मेंदू आणि त्याचे मानसिक पॅटर्न कितपत बदलू शकतात?
दोन्हींची भाषा एकच आहे असं म्हणणं योग्य होणार नाही. अध्यात्म आणि न्यूरोसायन्स यांची उद्दिष्टं, पद्धती आणि संकल्पना वेगळ्या आहेत. पण मानवी मन आणि वर्तनामध्ये परिवर्तनाची क्षमता आहे, या व्यापक प्रश्नावर दोन्ही क्षेत्रांमध्ये गंभीर अभ्यास होत आहे.
एलिझाबेथ ब्लॅकबर्न आणि टेलोमिअर्स
याच संदर्भात एलिझाबेथ ब्लॅकबर्न यांचं संशोधनही महत्त्वाचं आहे. त्यांनी टेलोमिअर्स आणि टेलोमेरेस या जैविक प्रक्रियांवर महत्त्वपूर्ण संशोधन केलं आणि त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं.
आपल्या गुणसूत्रांच्या टोकांना असलेले टेलोमिअर्स पेशींच्या संरक्षणाशी संबंधित असतात. वय वाढत असताना त्यांच्यात बदल होतात. दीर्घकाळचा ताण आणि काही प्रतिकूल जीवनशैली घटकांचा टेलोमिअर्सशी संबंध असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे.
इथेही एक महत्त्वाचा धडा मिळतो—मानसिक आणि शारीरिक अवस्था एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या नाहीत.
आपण कसं जगतो, आपल्यावर किती ताण आहे, आपली जीवनशैली कशी आहे, याचा शरीरावर परिणाम होतो.
एरिक कँडेल : शिकण्याने मेंदू बदलतो
एरिक कँडेल यांच्या संशोधनानेही एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली—शिकण्यामुळे मेंदूमध्ये बदल होतात.
नवीन अनुभव, नवीन ज्ञान, नवीन कौशल्यं आणि सातत्याने शिकण्याची प्रक्रिया यामुळे मेंदूमध्ये नवीन जोडण्या आणि कार्यात्मक बदल घडू शकतात.
म्हणजेच आपण आपल्या जुन्या मानसिक पॅटर्न्सचे कायमचे गुलाम नाही.
आज जे आहे ते उद्याही तसंच राहील, असं नाही.
हा विचारच अत्यंत आशादायी आहे.
ब्राह्मी स्थिती : एक जिवंत प्रयोग
म्हणून ‘एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ’ या वाक्याकडे पुन्हा एकदा पाहूया.
ब्राह्मी स्थिती म्हणजे मानवी अस्तित्वामध्ये एक सुंदर समन्वय निर्माण होणे.
शरीर आपल्या क्षमतेनुसार निरोगी आणि संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करणे. मनामध्ये अनावश्यक ताण आणि नकारात्मकतेचा ताबा राहू न देणे. बुद्धीला स्वच्छ आणि विवेकपूर्ण ठेवणे. स्वतःपुरतं न राहता इतरांशी जोडलेपणाची जाणीव निर्माण करणे. आणि या सगळ्यांमध्ये एक सुंदर रिदम निर्माण करणे.
याच्या विरुद्ध अवस्था म्हणजे मोह.
मोहामध्ये मन संकुचित होतं. आपण परिस्थितीला व्यापकपणे पाहू शकत नाही. राग-द्वेष, सुख-दुःख, भीती, अपेक्षा आणि असुरक्षितता आपल्याला खेचत राहतात. शरीर, मन आणि बुद्धी यांचा समन्वय बिघडतो.
पण ही अवस्था कायमची असण्याची गरज नाही.
आपण पुन्हा उभे राहू शकतो.
आपण पुन्हा बदलू शकतो.
आपण पुन्हा शिकू शकतो.
आपण पुन्हा शांत होऊ शकतो.
आणि कदाचित हाच या श्लोकाचा सर्वात मोठा आशावादी संदेश आहे.
गीतेचा दुसरा अध्याय : एका प्रवासाचा शेवट की नव्या प्रवासाची सुरुवात?
दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन विषादामध्ये आहे. त्याची बुद्धी गोंधळलेली आहे. तो निर्णय घेऊ शकत नाही. शरीर, मन आणि बुद्धी यांच्यामध्ये एक प्रकारचा संघर्ष निर्माण झाला आहे.
आणि दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण त्याला ब्राह्मी स्थिती दाखवतात.
हा प्रवास केवळ अर्जुनाचा नाही.
हा प्रत्येक माणसाचा प्रवास आहे.
विषादातून समत्वाकडे.
अस्थिरतेतून स्थिरतेकडे.
मोहातून विवेकाकडे.
राग-द्वेषातून प्रसन्नतेकडे.
अव्यवस्थेतून रिदमकडे.
आणि शेवटी—परमशांतीकडे.
म्हणूनच ‘अन्तकालेऽपि’ हा शब्द मला विशेष आश्वासक वाटतो. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आपण असलो, कितीही खाली गेलो असलो, कितीही जुन्या पॅटर्न्समध्ये अडकलो असलो, तरी परिवर्तनाची शक्यता संपत नाही.
एका अवस्थेचा अंत म्हणजे दुसऱ्या अवस्थेचा जन्म असू शकतो.
जुनं संपतं.
नवं निर्माण होतं.
नकारात्मकतेचा अंत होतो.
सकारात्मकतेचा जन्म होतो.
अस्वस्थतेचा अंत होतो.
शांतीचा जन्म होतो.
आणि कदाचित हीच आपल्या जीवनातील सतत घडणारी ‘अन्तकाळातून ब्रह्मनिर्वाणाकडे जाण्याची प्रक्रिया’ आहे.
आज विज्ञान मेंदूतील बदलांचा अभ्यास करत आहे. ध्यानाचा अभ्यास करत आहे. ताणतणावाचा अभ्यास करत आहे. भावना, स्मरणशक्ती, शिकणं आणि मानवी वर्तनाचा अभ्यास करत आहे. या सगळ्या संशोधनाला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. अध्यात्मातील संकल्पना आणि वैज्ञानिक निष्कर्ष यांना एकच समजणेही योग्य ठरणार नाही.
पण एक महत्त्वाची शक्यता स्पष्ट होत आहे—मानवी अस्तित्वामध्ये परिवर्तनाची क्षमता आहे.
म्हणूनच भारतीय अध्यात्माने हजारो वर्षांपूर्वी विचारलेला प्रश्न आजही अत्यंत महत्त्वाचा आहे—
माणूस स्वतःला किती बदलू शकतो?
आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची जबाबदारी केवळ काही साधकांची, काही संतांची किंवा काही शास्त्रज्ञांची नाही.
आपल्या पूर्वजांनी जे ज्ञान आपल्याला दिलं, त्याचा अभ्यास वैज्ञानिक दृष्टिकोनातून, चिकित्सक बुद्धीने आणि प्रत्यक्ष जीवनाशी जोडून आपण का करू नये?
गीता केवळ वाचण्यासाठी नाही.
ती समजून घेण्यासाठी आहे.
ती तपासण्यासाठी आहे.
ती जगण्यासाठी आहे.
आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे—आपल्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आहे.
म्हणूनच श्रीकृष्ण शेवटी म्हणतात—
“एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वाऽस्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥”
ही ब्राह्मी स्थिती आहे.
ही अवस्था प्राप्त झाल्यावर माणूस मोहात पडत नाही.
आणि जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर, अगदी अंतकाळीही, या अवस्थेत स्थिर राहून परमशांतीचा अनुभव घेण्याची शक्यता त्याच्यासमोर उघडी असते.
कदाचित म्हणूनच गीतेचा दुसरा अध्याय संपत असताना श्रीकृष्ण आपल्याला केवळ स्थितप्रज्ञ होण्याचा मार्ग सांगत नाहीत; ते आपल्याला एक विश्वास देतात—
“तुम्ही बदलू शकता.”
धन्यवाद.
कृष्ण जागा करा....!!
श्रीमद्भगवद्गीता!!
भाग भाग ९५ दिनांक ३ ऑक्टोबर २०२६
भगवद्गीतेकडे केवळ एक धार्मिक ग्रंथ म्हणून पाहिले, तर तिचा अर्थ एका विशिष्ट ऐतिहासिक प्रसंगापुरता मर्यादित राहतो. परंतु गीतेकडे मानवी जीवन, समाज आणि व्यक्तिमत्त्व समजून घेण्याच्या दृष्टीने पाहिले, तर महाभारतातील धृतराष्ट्र, संजय, अर्जुन आणि श्रीकृष्ण ही केवळ चार पात्रे राहत नाहीत. ती चार विचारपद्धती, चार मानसिक अवस्था आणि चार प्रकारच्या मानवी प्रवृत्तींची प्रतीके बनतात.
या चार पात्रांकडे समाजाचे आणि त्याच वेळी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब म्हणून पाहता येते.
धृतराष्ट्र : डोळे असूनही न पाहण्याची अवस्था
धृतराष्ट्र शारीरिकदृष्ट्या अंध आहे; पण त्याचा अंधत्वाचा प्रश्न केवळ डोळ्यांपुरता नाही. पुत्रमोह, सत्तामोह आणि स्वार्थ यांच्या प्रभावामुळे त्याची बुद्धीही अंध होते.
त्याला परिस्थितीची जाणीव आहे. युद्धाचे परिणाम काय होऊ शकतात, सर्वनाश होऊ शकतो, याची कल्पना त्याला आहे. तरीही त्या जाणिवेचा कृतीवर परिणाम होत नाही. मोह बुद्धीवर इतका प्रभाव टाकतो की माणूस स्वतःच्या विवेकाचाच गुलाम होतो.
समाजात अशी माणसे असतात. त्यांना चुकीचे काय आहे, हे कळते. पण ते चुकीकडे डोळेझाक करतात. चुकीच्या व्यक्तींच्या, चुकीच्या व्यवस्थेच्या किंवा चुकीच्या प्रवृत्तींच्या मोहात अडकतात. कारणे शोधतात आणि स्वतःला समजावतात.
हा धृतराष्ट्र केवळ महाभारतात नाही; तो आपल्यामध्येही असतो.
आपल्याला एखादी गोष्ट आपल्या हिताची नाही, हे माहीत असते. तरी आपण ती करत राहतो. एखादी व्यक्ती चुकीची आहे, हे माहीत असते; तरी तिच्या मोहातून बाहेर पडता येत नाही. काही गोष्टी समाजासाठी चुकीच्या आहेत, हे माहीत असते; पण त्यांच्याविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य होत नाही.
हा आपल्यामधला धृतराष्ट्राचा कप्पा आहे.
संजय : डोळसपणा आहे, पण कृतीची क्षमता नाही
संजय धृतराष्ट्रासारखा अंध नाही. त्याला परिस्थिती दिसते. काय घडते आहे, याचे आकलन आहे. तो सत्य पाहतो आणि सांगतोही.
म्हणजेच संजय हा डोळस माणूस आहे; पण कृतीच्या केंद्रस्थानी असलेला माणूस नाही.
त्याच्याकडे विवेक आहे, निरीक्षण आहे, सत्य सांगण्याची क्षमता आहे. पण परिस्थिती बदलण्याची प्रत्यक्ष शक्ती त्याच्याकडे नाही.
समाजातही असा एक मोठा वर्ग असतो. त्यांना समस्या माहीत असतात. त्यांना काय चुकीचे आहे हे कळते. ते त्यावर बोलतात, चर्चा करतात, विश्लेषण करतात. परंतु स्वतः कृतीच्या मैदानात उतरू शकत नाहीत.
आपल्या आयुष्यातही असा संजय असतो.
आपल्याला माहीत असते की एखादी गोष्ट करणे गरजेचे आहे. ती आपल्या हिताची आहे, समाजाच्या हिताची आहे. पण आपण म्हणतो—
“मला सगळं कळतं; पण माझी परिस्थिती तशी नाही.”
“मी संसारात इतका अडकलेलो आहे.”
“मला करायचं आहे; पण मला जमत नाही.”
ही जाणीव खरी असू शकते; पण केवळ जाणीव परिवर्तन घडवत नाही.
म्हणून धृतराष्ट्रानंतर संजय जागा होणे ही पहिली पायरी आहे; पण तिथेच थांबणे पुरेसे नाही.
अर्जुन : क्षमता आहे, पण मोहाने अडवलेला
अर्जुनाची अवस्था यापेक्षा वेगळी आहे.
अर्जुन डोळस आहे. तो अत्यंत संवेदनशील आहे. युद्धाचे परिणाम किती भयंकर असू शकतात, याची त्याला जाणीव आहे. तो प्रश्न विचारतो. तो स्वतःच्या निर्णयाची नैतिक चिकित्सा करतो.
पण त्याच्याकडे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे—क्षमता.
तो युद्ध करू शकतो. विजय मिळवू शकतो. अन्याय आणि असत्याविरुद्ध उभा राहू शकतो.
मात्र आपल्या माणसांचा मोह त्याला अडवतो.
त्याला आपल्या लोकांची काळजी आहे. त्यांचे दुःख त्याला दिसते. परंतु हा स्नेह इतका संकुचित होतो की त्याच्या व्यापक कर्तव्यावर पडदा पडतो.
ही अर्जुनाची समस्या आहे.
आणि म्हणून अर्जुन म्हणजे केवळ दुर्बलता नाही. उलट, क्षमता असूनही मोहामुळे कृतीपासून दूर राहणारी अवस्था म्हणजे अर्जुन.
आपल्यामध्येही अशी अनेक क्षेत्रे असतात.
आपल्याकडे क्षमता असते, साधने असतात, अनुभव असतो, बुद्धी असते; पण एखाद्या व्यक्तीचा, नात्याचा, स्वार्थाचा किंवा भावनेचा मोह आपल्याला पुढे जाऊ देत नाही.
आपण आपल्या क्षमतेपेक्षा आपल्या मोहाला मोठे करून पाहतो.
म्हणून अर्जुनाला नष्ट करायचे नाही; अर्जुनाला जागे करायचे आहे.
पण अर्जुन जागा झाला की त्याला कृष्णाची गरज भासते.
श्रीकृष्ण : जागृत विवेक आणि परिपक्व कृती
श्रीकृष्ण म्हणजे केवळ बाहेर उभे असलेले एक पात्र नाही. श्रीकृष्ण म्हणजे परिपक्व विवेक, अनुभव, व्यापक दृष्टी, योग आणि योग्य कृतीची दिशा.
कृष्णाने केवळ योगाचा अभ्यास केलेला नाही; त्यांनी योग जगलेला आहे. म्हणून त्यांचे ज्ञान पुस्तकी पांडित्य नाही. ते अनुभवातून आलेले आहे.
अर्जुनाकडे शक्ती आहे; कृष्णाकडे त्या शक्तीला योग्य दिशा देणारा विवेक आहे.
अर्जुन युद्ध करू शकतो; कृष्ण त्याला कशासाठी, कोणत्या मानसिकतेने आणि कोणत्या अंतःकरणाने युद्ध करायचे, हे समजावून सांगतो.
म्हणून कृष्ण म्हणजे केवळ बाह्य रणनीती नाही.
कृष्णनीती म्हणजे अंतःकरणाचीही नीती आहे.
आपले मन कसे असावे?
आपली बुद्धी कशी असावी?
आपले चित्त कसे असावे?
आपले अंतःकरण कसे असावे?
या प्रश्नांची उत्तरे भगवद्गीता देते.
म्हणूनच भगवद्गीता म्हणजे आपल्यामधला कृष्ण जागा करण्याची प्रक्रिया आहे.
समाजातले चार वर्ग
या चार प्रतीकांकडे समाजाच्या दृष्टीने पाहिले, तर समाजातही चार प्रकारची माणसे दिसतात.
पहिला वर्ग — धृतराष्ट्र.
ज्यांना सत्य दिसत नाही किंवा दिसत असूनही मोहामुळे ते स्वीकारत नाहीत. ज्यांची बुद्धी स्वार्थ, सत्ता किंवा व्यक्तिमोहाने झाकली जाते.
दुसरा वर्ग — संजय.
ज्यांना सत्य दिसते, परिस्थितीचे भान आहे, ते बोलतातही; पण प्रत्यक्ष परिवर्तन घडवण्याची क्षमता किंवा भूमिका त्यांच्याकडे नसते.
तिसरा वर्ग — अर्जुन.
ज्यांच्याकडे क्षमता, सामर्थ्य आणि कर्तृत्व आहे; पण मोह, भावनिक गुंतवणूक किंवा अंतर्गत द्वंद्वामुळे ते कृती करू शकत नाहीत.
चौथा वर्ग — श्रीकृष्ण.
ज्यांच्याकडे व्यापक दृष्टी, अनुभव, विवेक, परिपक्वता आणि योग्य कृतीची दिशा आहे. जे स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाच्या व्यापक हिताचा विचार करू शकतात आणि इतरांच्या क्षमतेला योग्य दिशा देऊ शकतात.
समाजपरिवर्तनासाठी या चारही प्रकारांकडे समजून पाहावे लागते.
धृतराष्ट्राला जागे करण्यासाठी संजयाची गरज आहे.
संजयाच्या जाणीवेला कृतीची दिशा देण्यासाठी अर्जुनाची गरज आहे.
आणि अर्जुनाच्या क्षमतेला योग्य दिशा देण्यासाठी कृष्णाची गरज आहे.
म्हणून समाजात केवळ अर्जुन निर्माण करून चालणार नाहीत. समाजातले कृष्णही जागे करावे लागतील.
आणि हे चारही आपल्यामध्ये आहेत
या संपूर्ण विचाराचा सर्वांत महत्त्वाचा भाग समाजाबाहेर नसून आपल्या आत आहे.
आपल्या व्यक्तिमत्त्वातही चार कप्पे आहेत.
कधी आपण धृतराष्ट्र असतो.
कधी संजय असतो.
कधी अर्जुन असतो.
आणि कधी श्रीकृष्ण होण्याची क्षमता आपल्यात प्रकट होते.
आपल्या अस्तित्वात या चार मानसिक अवस्था आहेत.
कधी आपल्याला सत्य माहीत असूनही आपण त्याकडे डोळेझाक करतो—तो धृतराष्ट्र.
कधी आपल्याला सत्य दिसते, आपण बोलतो; पण कृती करता येत नाही—तो संजय.
कधी आपल्याकडे क्षमता असते, पण मोहामुळे आपण कर्तव्यापासून मागे हटतो—तो अर्जुन.
आणि कधी व्यापक दृष्टी, विवेक, अनुभव आणि परिपक्वता जागी होते आणि आपण योग्य कृतीची दिशा स्वतःला देऊ शकतो—तो श्रीकृष्ण.
म्हणून भगवद्गीतेचा प्रवास बाहेरच्या युद्धाचा प्रवास नसून स्वतःच्या अंतर्गत अवस्थांच्या परिवर्तनाचा प्रवासही आहे.
पहिली पायरी : धृतराष्ट्रातून संजयाकडे
आपल्यामध्ये धृतराष्ट्र जागा झाला—म्हणजे मोह, स्वार्थ, अंधत्व किंवा स्वतःची फसवणूक जाणवली—तर पुढची पायरी आहे संजयाला जागे करणे.
स्वतःकडे डोळसपणे पाहणे.
चूक म्हणजे चूक म्हणणे.
परिस्थितीचे वस्तुनिष्ठ आकलन करणे.
स्वतःला कारणे देणे थांबवणे.
ही संजयाची जागृती आहे.
दुसरी पायरी : अर्जुनातून कृष्णाकडे
पण डोळसपणा पुरेसा नाही.
आपल्यामध्ये अर्जुन जागा झाला, आपली क्षमता आपल्याला जाणवली, तरी मोह आपल्याला अडवत असेल तर आपल्यामधला कृष्ण जागा करावा लागतो.
अर्जुनाकडे सामर्थ्य होते; पण कृष्णाच्या मार्गदर्शनाशिवाय त्याला त्या सामर्थ्याचा योग्य उपयोग करता येत नव्हता.
तसेच आपल्या आयुष्यातही बाह्य कृष्णाची गरज भासते—गुरू, विचार, अनुभव, मार्गदर्शन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भगवद्गीता.
पण अंतिम उद्दिष्ट बाहेरच्या कृष्णावर कायम अवलंबून राहणे नाही.
आपल्यामधला कृष्ण विकसित करणे हे अंतिम उद्दिष्ट आहे.
गीतेतील कृष्ण जे सांगतो, तेच एक दिवस आपल्यामधला जागृत कृष्ण आपल्याला सांगू लागला पाहिजे.
कारण ज्ञान शाश्वत आहे.
युद्ध : शेवटचा उपाय, पहिला नाही
महाभारताच्या प्रतीकात्मक अर्थाकडे पाहताना युद्धाचा अर्थ केवळ हिंसक संघर्ष असा घेता कामा नये.
जेव्हा असत्याची पातळी इतकी वाढते की मूल्यव्यवस्थेची पुनर्स्थापना आवश्यक होते, तेव्हा संघर्ष अटळ होऊ शकतो. पण युद्ध हा पहिला उपाय नाही; तो शेवटचा उपाय आहे.
महत्त्वाचा प्रश्न हा आहे की संघर्ष करावाच लागला, तर तो कोणत्या मानसिकतेने करायचा?
द्वेषाने?
मोहाने?
स्वार्थाने?
की व्यापक कल्याणाच्या दृष्टीने, परिपक्व विवेकाने आणि योग्य अंतःकरणाने?
भगवद्गीता आपल्याला याच अंतर्गत तयारीची शिकवण देते.
समाजाची पुनर्स्थापना करायची असेल, नवीन मूल्यव्यवस्था उभी करायची असेल, सत्य आणि धर्माची स्थापना करायची असेल, तर बाहेरची व्यवस्था बदलण्याबरोबर आपली मानसिकताही बदलावी लागेल.
भगवद्गीता : आपल्यामधला कृष्ण जागा करण्याची प्रक्रिया
म्हणून भगवद्गीता ही केवळ युद्धभूमीवर अर्जुनाला दिलेली शिकवण नाही.
ती आपल्यामधल्या चार अवस्थांना ओळखण्याची प्रक्रिया आहे.
धृतराष्ट्राला ओळखणे.
संजयाला जागे करणे.
अर्जुनाला उभे करणे.
आणि कृष्णाला विकसित करणे.
आपल्यामधला धृतराष्ट्र जागा झाला, तर संजयाने त्याला प्रश्न विचारला पाहिजे.
आपल्यामधला अर्जुन जागा झाला, तर त्याच्या सोबत कृष्ण जागा झाला पाहिजे.
आणि जेव्हा कृष्ण जागा होतो, तेव्हा अर्जुनाची क्षमता योग्य दिशेने प्रवाहित होऊ लागते.
याच अर्थाने भगवद्गीतेचे सार म्हणजे आपल्यामधला श्रीकृष्ण जागा करणे.
दुसऱ्या अध्यायात आपण अर्जुनाचे अंतर्द्वंद्व आणि श्रीकृष्णाचे स्वरूप पाहिले. आता या अंतर्गत जागृतीचा पुढचा प्रवास तिसऱ्या अध्यायात—कर्मयोगाच्या दिशेने—सुरू होतो.
कारण जागृत कृष्णाची पुढची खूण एकच—
योग्य जाणिवेतून योग्य कृती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा