सोमवार, २ डिसेंबर, २०१३

त्याला यामुळे डिप्रेशन येवून थोडंच चालणार ...


बालाजी भुजंगराव कदम वय वर्ष २६,राहणार चनई. शिक्षण ७ वी नंतर शाळा सोडली व सत्यकामासारखा गाई,म्हशी,बैल घेवून बाहेर पडला सत्याच्या शोधात नाही तरी वितभर पोटाची भूक भागवण्यासाठी. जसा तो बाहेर पडला तसा घरातील तेल,मिरची साखरेचा खर्च तोच करत असे. वडील भुजंगराव त्यांच्या भावात सर्वात धाकले. शिक्षणासाठी अंबाजोगाईत जाणे त्यामुळे शेतीची फार कामं नाही येत. अगदी औत धरणे किंवा बैलगाडी चालवणे. दहावी काही निघाली नाही मग परत शेतीत पण मोठे भाऊ होते त्यामुळे फार काही करावे लागले नाही.

बालाजीला मात्र भाऊ नाही त्यामुळे खेळण्याच्या वयातच त्याला सगळे शिकावे लागले. कदमांच्या वाटण्या झाल्या व बालाजीच्या कुटुंबाला आलेली वाटणीची मशागत आता बालाजीलाच करावी लागली. आपल्या विवेकवाडीच्या कामाची सुरुवात झाली व त्यावेळी पासूनच बालाजीची व माझी दोस्ती.

तो व त्याचा चुलत भाऊ परमेश्वर (प्रेम ) आपली गुरे चारण्यासाठी यायची. त्यांच्या बरोबर सहभोजन होई. बालाजी उंच,सावळा पण कष्ट करण्याची खूप तयारी खूप प्रेमळ. सकाळी ५ ला उठून धार काढणे, दुध वाटप करणे तेही सायकलवर दहा वाजायचे यातच. मग गुरांना घेवून शिवावर चालत यायचे त्यांना चारण्यासाठी. मग दिवसभर गुरांच्या मागेच. जेवण पण अगदी उठता बसता. चुकून एखाद्याच्या रानात गुरं गेली तर अवघडच...

बालाजी मला म्हणाला, “हे आम्हा लोकांच्या नशिबीच पहा..माग एकदा फकत कांबळे मामांच्या शेळ्या एका कदमच्या शेतात गेल्या तर त्यांना त्याने चाबकाने मारले.रानांत काहीबी नव्हत ...मग मीच मध्ये पडलो.”


खूप कष्ट करून एक एक म्हैस बालाजीने वाढवली. आता बर चालले होते पण आता थोडं स्थिरावे वाटत होते. शेती चांगली करावी. बोर घ्यावी म्हणजे दोन पिकं तरी घेता येतील. परमेश्वरनी बोर घेतलं होत आणि चांगल पाणी लागलं. त्याच गुरा मागे फिरणे पण बंद झाले होते. बालाजीला पण वाटले घेवून टाकू. अजून ताईच लग्न बाकी आहे. तोडा पैसा पण जमा होईल. जमीन नाही विकावी लागणार.

शेवटी चार म्हशी विकून टाकायच्या ठरवल्या. थोडा पैसा आला व बोर घेतली. ४०० फुटाला बर पाणी पण लागले. पण प्रश्न आता लाईटचा...अनेक हेलपाटे व चिरीमिरी देवून शेवटी सहामहिन्यांनी लाईट ओढली. आता थोडं बर वाटत होत. दुसऱ्या दिवशी टेस्ट करायला म्हणून मोटर घेवून तो आला तर त्याच्या काळजात धसकाच बसला...कुणीतरी कुपनलिकेत बरेच दगड टाकले होते. बऱ्यापेकी ती बंद केली होती. चूप चाप मनातल्या मनात रडण्यापेक्षा काहीच करता येत नव्हते. रीबोर करायचे तर तेवढाच खर्च आता पैसा पण नव्हता. शेती विकायची नाही कारण शेती विकण म्हणजे आईला विकण. परत आपले नेहमीचे काम सुरु.

एखाद्याच्या मदतीने एक म्हैस घावी व नित्य नियम सुरु. ताईच लग्न बाकीच होत आता त्याला पण सोयरिकी यायला लागल्या.

मागच्या वर्ष्यापासून माझे विवेकवाडीत जाणे वाढले त्यामुळे बालाजीशी मैत्री पण. हळूहळू ही मैत्री आमच्या पारिवारिक नात्यात बदलली. यावर्षी आम्ही बालाजीलाच शेती करायला दिली. पावसाने पण साथ दिले चांगले उत्पन्न आले. बालाजी, काका व ताईने खूप मेहनत पण घेतली. सोयाबीनची रास पण लागली. चांगला उतार आला. चांगलं वाळूदेऊन खळ करावे व त्याधी काही पुढील मशागतीची कामे जमीन ओली आहे म्हणून करावेत म्हणून बालाजी त्याच्या मागे लागला. खालच्या शेतात जवळचा शेतकरी पाणी देतो म्हणाला म्हणून गहू पेरण्याची तयारी चालू केली.

समद चांगलं चालल होत. एक आपेगावची सोयरिक बालाजीला आल्याचे काकांनी मला सांगितले पण. दोन दिवसापूर्वी मी पुण्याला गेलो व परत अंबाजोगाईला आलो तर माझ्या बायकोने मला विचारले, “बालाजीचा काही फोन आला का रे ?”

“नाही ग त्याचा फोन हरवला आहे.”

“अरे काल केदारचा फोन आला होता तो म्हणाला बालाजीच्या शेतातील सोयाबीन कुणीतरी रात्री जाळून टाकले.”

एकदम बालाजीचा चेहरा डोळ्या समोर आला व त्याच्या समोर त्याच्या अपार मेहनतीने राख झालेले सोयाबीन व त्याबरोबरच त्याची स्वप्न ही ......
का,कुणी हे प्रश्न .....उत्तर मिळाले तरी काय उपयोग ....

त्याला यामुळे डिप्रेशन येवून थोडंच चालणार ...घरातील चार जणांच्या पोटांसाठी त्याला डोळ्यातील आसवानां गिळून अंगातून अजून घाम गाळावा लागणार हे कटुसत्य त्याच्या अंगवळणी पडले आहे.

रविवार, १ डिसेंबर, २०१३

आज काल मी अभ्यासच थांबवला ....काय मिलते हो त्यातून ?



आपण अनुभवलेले व्यक्त करणे ही सहज प्रक्रिया आहे. व्यक्त करत असताना आपण बोलण्यातून, छायाचित्रातून व लेखनातून व्यक्त होत असतो. लेखनातून व्यक्त होणे थोडे अवघड असते. आपल्या भावना शब्दात लिहून व्यक्त करणे हे तसे अवघड जाते. पाहू वेळ मिळेल तसे लिहू. निवांत वेळ मिळाल्यावर लिहू. आता काय घाई आहे मग पाहू हे खरे तर दोन कारणानी होते १)म्हणजे असे लिहिण्याची सवय नसते २) आणि असेल तर आपल्यात खूप आळस असतो.

पहिली स्थिती असेल तर शिकणे ही प्रक्रिया असते. पण आपण आज काल शिकण्यासाठी खूप कमी वेळ देतो. आपले शिकणे काही कारणास्तव असते. मला स्वतःला जे आपण परीक्षेसाठी करतो किंवा पदवीसाठी करतो अथवा नौकरी मिळावी म्हणून करतो. खर पाहता अभ्यास करणे व शिकणे या दोन सारख्याच प्रकिया आहेत आपण त्यात थोडा भेद आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी शिकणे म्हणजे अभ्यास करणे नव्हे. आपल्या स्वतःला आजच्या आपल्या अवस्थेपेक्षा उन्नत किंवा अधिक विकसित अवस्थेत नेण्यासाठी शिकणे म्हणजे अभ्यास करणे. अशा प्रकारच्या अभ्यासाने आपले मन एकाग्र होण्यास मदत होते व आपल्या विकासाची प्रक्रिया सतत चालू राहते.

मुळात दुसऱ्या प्रकारचा आडथळा म्हणजे आळस हा केवळ आपण आपल्या शैक्षणिक काळात केवळ काही तरी मिळवण्यासाठी केलेले शिक्षण असते व आता ते मिळवल्यावर शिकण्याचा थोडा कंटाळा आलेला असतो.फार केले न आता बस आता निवांत जगू ...पण निवांत जगू म्हणजे काय ? खरच आपण निवांत जगत असतो का ? मला वाटते या निवांत जगू या मध्ये एक प्रकारचा आपण टाईमपास करत असतो. कारण आपल्याला आपल्या आयुष्याचे महत्वच कळलेले नसते. आयुष्य म्हणजे भोग घेणे होऊन बसते व आपण निखळ आनंदाला पारखे होतो. निखळ आनंदासाठी सतत अभ्यास करत राहणे गरजेचे असते. मनाची निरव शांतता म्हणजे आनंद. भोगा मुळे तो काही काळासाठी मिळतो पण तो तात्पुरता असतो. सतत आपल्या मनाला निखळ आनंदात ठेवण्यासाठी नियमित अभ्यास करत राहणे आवश्यक असते.

आपण अभ्यास करेन म्हणजे पाहणे, अनुभवणे,निरीक्षण करणे, समीक्षण करणे, मग त्यानतंर व्यक्त होणे. मी अगदी वर सांगितल्या प्रमाणे.

आपण अभ्यास करतो का याचे पाहिले दृश्य स्वरूप म्हणजे आपण ते लिखित स्वरुपात व्यक्त करतो. दुसरे ते लगेचच करतो म्हणजे अनुभव घेतल्यावर काही वेळात. कधी कधी आपला विचार पण पूर्ण झाला की नाही हे न पाहता पण. अर्थात पहिली गोष्ट होते ती म्हणजे आपण तत्पर होतो अर्थात आपण प्रतिसादी होतो. ही अभ्यासाची पहिली पायरी.

दुसरी पायरी आपण काय अनुभवले याचे वर्णन करणे. हे केवळ बाह्य स्वरूपाचे असते. यात आपण आपल्याला जाणवलेल्या त्यावेळच्या भावना पण व्यक्त करतो.

तिसरी पायरी आपण काही गोष्टी काही कारणास्तव व्यक्त करत नाहीत. दुसऱ्याचा राग येईल किंवा काही अनाहूत भीती. एकदा आपण याच्याही वर गेलोत की आपण पाहणे व त्याचे आपल्या मनावर बुद्धीवर झालेले परिणाम नेमक्या शब्दात व्यक्त करतो.

चवथी पायरी काही गोष्टी आपल्या मनाला इतक्या भिडतात की आपण नीट विचार करून त्या आपल्या जीवनाचा एक भाग बनवतो. हळूहळू त्या भिडलेल्या भावनाचे आपण प्रतिनिधी बनतो.

थोडक्यात आपण स्वतःला आपल्या नवनिर्मित अवस्थेत रुपांतरीत करतो.
ही प्रकिया सतत जगत राहणे म्हणजे अभ्यास करणे असे मला वाटते.....