ती तर आदितीचे प्रत्यक्ष रूप.
ती तर आदितीचे प्रत्यक्ष रूप. अनेक आदित्यांची जननी होण्याची आदी शक्ती तिच्याठाई. तसेच ते मोहक व निरागर स्मित म्हणून ती स्मिता पण. लहानपणी तिच्या चेहऱ्यावरील हे स्मित हरवत गेले नात्यातील राहू केतूं मुळे. नियती नसतेच मुळी. लोकांची नियत बदलली की अनेकांचे भाग्य खोल अंधाऱ्या गर्तेत जाते. भय नावाचा आक्राळ विक्राळ दैत्याचे राज्य त्या कोवळ्या जीवाच्या मनोराज्यावर आरूढ होते व त्याच्या आजन्म कैद्येत ती हतबल होऊन कैद होते. तिच्या कधी कधी पडणाऱ्या काळ्यासावळ्या चेहऱ्या मागे अनेक आक्राळ विक्राळ आकारांच्या दैत्यरूपी मेघांचे भय दडलेले असते म्हणून काय तिचे नाव मेघा ठेवले होते की काय कोण जाणे. त्या अस्वस्थ करणाऱ्या भूतकाळा मुळे तिला मेघांनी आच्छादित आदित्य आवडत नसेल का ? तिला असणार आस मोकळ्या निळाशार आकाशाची. तिला नक्कीच भावणार न तो उषेच्या कुशीतून अंशा अंशाने अवतीर्ण होणारा हिरण्यगर्भ. तो तेजो निधी लोह तीव्र दाहक उष्णतेचा अधिकारी. प्रातकाळी क्षितिजावरून विस्तीर्ण निळाशार आकाशात सौम्य रुपाने हळूहळू प्रकाशमय वसुंधरा करण्यासाठी अवतरीत होत असेल त्यावेळी त्याच्या त्या सौम्य प्रकाशमयी रुपाने तिलाही नक्कीच माझ्या मनाच्या अंधारात पण असा सुर्यादय नक्कीच होईल ही आस असणार न? म्हणून तिला आवडतो स्वच्छ, सौम्य व निरभ्र सूर्य व आकाश.
नेत्रचक्षु बंद करून ती तो उगवता आदित्य पाहाण्याचा प्रत्यत्न करते त्यावेळी अनेक रंगाचे, रूपाचे, आकाराचे मेघरूपी भूतकाळातील विचार तिच्या नित्तळ, निर्मळ मनाच्या विस्तीर्ण आकशात अवतरीत होत असतील न ? ती खूप प्रयत्न करते त्या मेघांना दूर करण्याचा व उगवता आदित्य पाहण्याचा पण ते इतक्या लवकर शक्य आहे का ? वयाच्या चार वर्षापासून मनाला तीव्र वेदना देणाऱ्या शब्दांच्या व अनुभवांच्या वातावरणात ती जगायला शिकली.
प्रेमाच्या चंद्राचे स्वप्न पाहण्याचे पण तिचे वय नव्हते तो त्या अवनी एका चंद्राशीबद्ध केली गेली. ती पण नियतीने नाही तर नियत नसलेल्या अनेक राहू केतुनी....तिच्या निरभ्र, निर्मळ जगण्यास नित्याने भावबदलाचे मनोविश्व असणाऱ्या चंद्राचे तिचे नाते जोडले गेले. तो कधी तिच्या आयुष्यात सौम्य प्रकाशित पौर्णिमा घेवून येई तर कधी काळी कुट्ट अमावस्या. भास्कर व अवनी मध्ये चंद्र आल्याने तिच्या भावविश्वाला एक वेगळेच ग्रहण लागले. तिच्या आयुष्यातील उगवत्या सूर्याची सौम्यता व शीतलता तिला कधी नीट अनुभवताच नाही आली.
ती हे विसरून गेली ती स्वतः आदिती आदिती आहे. आदित्याची जननी आहे. तिच्या स्वतः एक तेजोनिधी आहे. पण आयुष्यात तिच्या अनेक मेघ आले काही काळे कुट्ट आक्रळ विक्राळ, तरी कधी गुलाबी, मायावी पण काही क्षणांसाठीचे रोमांचित अनुभव देवून परत तप्त ग्रीष्मात मृगजळा मागे धावण्यास प्रवृत्त करणारे तर कधी पांढरे शुभ्र पण कुठे तरी आधीच आपल्यातील ओलावा संपून आलेल. तिला आता नको आहेत असे भासमान आभासी मेघ ....मेघाला आता आस आहे निरभ्र सूर्योदयाची ....हे अदिती तो उगवता नारायण तुझ्यातच आहे....स्वतःच्या आत खोल जाऊन ....अपानाच्या संपूर्ण प्राणशक्तीने आवाज दे स्वतःतील त्या आदित्याला ....तो नक्कीच आहे तुझ्यात आणि घेवून येईल तुला पाहिजे ती शांत सुंदर पहाट...निरभ्र