दुष्काळी बीडचा हवालदार अविनाश साबळे थेट ऑलिंपिक मध्ये......
(सियाचीन रणक्षेत्र ते ऑलिंपिकचे मैदान एक अनोखा प्रवास )
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका म्हणजे दुष्काळाचे माहेरघर. कोरडवाहू शेती करतच मुकुंद व वैशाली आपले आयुष्य जगत होते. अविनाश त्यांचा लहानगा त्यांचे लहानपणा पासूनचे कष्ट पाहात होता. शाळा शिकायला त्याला लैच लांब जावं लागे.सहा किलोमीटर पायी जायचे व परत सहा किलोमीटर. त्यात जर थोडा उशीर झाला तर गड्याला पळतच सुटावं लागायचे. त्याचं हे पळणे आणि आयुष्यात येणारे अडथळे त्याच्या आयुष्याला वेगळ्याच उंचीवर नेतील याची कल्पना पण त्याला नव्हती.
२०१९ मध्ये इंग्रजी वर्तमान पत्रातून अचानक बीड जिल्हा परत झळकायला लागला होता. तसा यावर्षी दुष्काळ पण नव्हता आणि काही इपरीत पण नव्हत घडलं. काय काय ते जबरदस्त मथळे झळकत होते. "Meteoric rise of Avinash Sable in Fed Cup", "Avinash Sable's long and winding road to worlds", मार्च मध्ये सुरवात झाली आणि अगदीच पूर्ण वर्षभर या अविनाश नावाच्या वेगाचे वेगळेच रूप आम्हाला पाहायला मिळाले.
रस्त्यावरून शाळेसाठी धावणारं इवलेशे हे पोर आज जगातील मोठे मोठे मैदान गाजवत होते. त्याच्या यशोगाथानी भारत भरून पावला होता मात्र आमच्या बीडातील भरतीसाठी अखंड परिश्रम करण्याऱ्या पोरांच्या पासून हे सगळे फार दूर होते.
आई वडिलांच्या वाट्याला आलेलं दारिद्र्य दूर करण्यासाठी बीड जिल्ह्यातील अनेक तरुण सैनिक भरतीसाठी जीवाचं रान करतात. त्यातील एक चेहरा म्हणजे अविनाश साबळे. भारतीय सैन्यात जाण्यासाठीचे अचाट बळ त्यांला त्याच्या परिस्थितीमुळेच लाभलेलं होतं. केवळ अठरावर्ष आणि काही दिवस होताच हा तरुण सैन्यात भरती झाला आणि पहिली पोस्टिंग थेट सियाचीनच्या रणक्षेत्रात. उन्हाळ्यात काय ते मिटक्या मारील खाल्लेलं गारेगारच्या रंगीबेरंगी बर्फाची केवळ त्याची ओळख. समोर अखंड -४० अंश तापमानातील पांढऱ्या शुभ्र पण जीवघेण्या बर्फाच्या अस्तित्वात तो हवालदिल झाला पण त्यातून एक तगडा हवालदार अविनाश साबळे जन्मात आला.
जगातील सर्वात उंचीवरच्या रणक्षेत्रातून व भारताच्या अतिशीत भागातून त्याची बदली झाली ती अतिउष्ण राजस्थान मध्ये. बर्फाच्या वादळांशी मुकाबला करण्यात सरावलेला हा वीर आता वाळूंच्या वादळाशी दोन हात करत होता. भुकेची तीव्र कळ अनुभवणाऱ्या अविनाशला भरल्या पोटाने या सगळ्या अडथळ्यांना सामोरे जाणे सहजच शक्य होते. आता तो स्वप्न पाहू लागला होता. भूक माणसाच्या विचारांना गोठवते. तिचे जबर चटके सहन करून जो स्वप्न पाहु लागतो त्यावेळी त्याच्यासमोर यशश्री दासी म्हणून उभा असते. आयुष्याचा शर्यतीत भूक भागवण्यासाठी धावण्याच्या प्रेमात पडलेला अविनाश आता मैदानावर लांबपल्याच्या धावण्याच्या शर्यतीत भाग घेऊ लागला. मोकळ्या मैदानावर असाच सुस्तावलेला असताना स्टीपलचेस क्रीडाप्रकाराचा सराव करणारे खेळाडू पाहून त्याला राहवले नाही. धावण्यासोबतच अडथळे हा त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता मग मैदानावर सुद्धा का नसावे ? तुफान धावत अडथळे एका पाठोपाठ एक मागे टाकणारा तो तरुण अमरीश कुमार या हाडाच्या प्रशिक्षकाच्या नजरेतून थोडाच चुकणार होता. त्यांनी त्याला हेरले व ३००० मीटर स्टीपलचेस धावणे हे अविनाशचे यापुढील आयुष्यच बनले.
याच काळात तो थोडा स्थिरावला होता. भरपेट खाताना त्याचे वजन चांगलेच वाढले. तशातच तो धावत होता व जखमी होत होता. त्याही पेक्षा मोठी जखम त्याला मनाला झाली जेव्हा इतर लोक म्हणू लागले की तू नाही धावू शकणार आता. नशीब म्हणून भूकेलेपण सोसणाऱ्या अविनाशला आता ध्येयासाठी फास्ट करणे अशक्यच नव्हते. काही महिन्यातच त्यांनी नुसते वजनच कमी नाही केले तर आपला धावण्याचा वेग प्रचंड वाढवला.
स्वतःतील बदल,क्रीडाप्रकारातील बदल अविनाशच्या भविष्यात एक सुखद व यशस्वी बदल ठरला. त्यानंतर तो अनेक स्पर्धा जिंकला. भुवनेश्वरच्या मैदानात मात्र तो जो सुसाट धावत सुटला व सरते शेवटी त्याने ३७ वर्षे जुना गोपाळ सैन्नीचे राष्ट्रीय रेकॉर्ड तोडले.आता त्याला स्वतःचेच नवीन रेकॉर्ड तोडण्याची उर्मी निर्माण झाली. वेगाच्या सोबतच त्याला सामना करावा लागला अतिशय अवघड परिस्थितीला. आशियायी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याच्या वेगाने तो धावत होता. अचानक अपघात झाला व तो जखमी झाला. त्याचे स्वप्न चोळामोळा झाले. निराशेच्या खोल गर्तेत जाऊन खेळ सोडून देण्याची भाषा तो करू लागला.त्याचे गृरू यावेळी मात्र त्यासाठी धावून आले. त्यांनी अविनाश मधील अविनाशी सैनिक जागा केला व तो परत वेगाने धावायला लागला.
वयाच्या पंचेवीशीत २०१९ च्या जागतिक मैदानी क्रीडास्पर्धेत त्याने आपले आधीचे रेकॉर्ड तोडत जागतिक पाळतीवर १३ वा क्रमांक मिळवत जपान मध्ये होणाऱ्या 2020 Summer Olympics मध्ये त्यांनी निर्विवाद प्रवेश मिळवला. आता त्याला अजून वेग वाढवावा लागणार आहे. त्याला आता विश्वास आहे की देशासाठी जगाच्या सर्वोच्य रणभूमीत लढणारा तो लढवय्या जगाच्या सर्वोच्य क्रीडास्पर्धेत जीवतोडून धावणारं तिरंगा उंचावण्यासाठी.