मंगळवार, १९ मार्च, २०१३

काजळी: दुष्काजळी-निष्काजळी ....संजय पाटील



काजळी: दुष्काजळी-निष्काजळी 

संजय पाटील

काल रात्री उशिरा सहजच मोबाईल वर फोटो बघत होतो आणि ह्या माझ्या बैल जोडीचा फोटो बघताना थबकलो. थोडा वेळ गंभीर विचारात पडलो. कारण ही तसेच होते. ही जोडी मी ९ एप्रिल २००७ ला श्रीपतरायवाडीच्या अनंत शिंदे कडून विकत घेतली होती. बैलाची पारख करण्यासाठी मी, माझा मोठा भाऊ अरुण पाटील व आमचे स्नेही कलाप्पा ढगे ला शिंदेच्या शेतात सोबत नेले होते. कलाप्पा दातावरून बैलाची पारख सहज करायचे. या जोडीवर मी चार वर्ष शेती केल्यावर बरोबर दोन वर्षापूर्वी याच मार्च महिन्यात २०११ ला ही जोडी मी रेणापूर च्या बाजारात विकून शेतीच्या बाहेर पडलो. माझा गडी प्रकाश ने यांना लेकरा सारखे सांभाळले होते. मी विचार करतच झोपलो कि आता हि जोडी कोठे आणि कोण्या अवस्थेत असेल की मला 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' याचा प्रत्यय आला. या जोडीतील काजळ नावाचा बैल माझ्या स्वप्नात आला व म्हणू लागला "काय मालक, काय चाललय? तब्येत फार सुधारलेली दिसते." मी म्हणालो "मज काय, मला चार खुटाची जहागिरी मिळालीय खादाडायला, तब्येत तर सुधारणारच ना. बर जाऊ दे, हे सांग तू ईतका खंग्लास कस काय?"

काजळ " हे बेस हं मालक, तुमी मंजी चंद्रया लोकांच्या नादाला लागून शेतीच्या बाहेर पडलात अन चार खुटाची जहागिरी गाजवायलात आन आमची मंजी चांगली खात्या गव्हाणीची एक खुटी तोडून दुष्काळयाच्या हवाली केल्यावर खंगनार नाय तर काय? माझा जोडीदार मागल्या सालातच खंगून मेला. मी बी उस्मानाबाद जिल्यातल्या चारा छावणीवर शेवटच्या घटका मोजत आहे."

मी हळहळत म्हणालो "अरेरे, लय वाईट झाल, कुठे फेडू मी हे पाप."

काजळ "जाऊ द्या मालक नशिबच फुटक आमच. नव्या धन्याच्या गावात दुष्काळान काई पिकल नाय अन वरून चारा-पाणी नाई म्हणून मला व त्याच्या दोन म्हशीला १७ कि.मी. लांब या छावणीवर आणल पण इथ बी आमच्या दुर्देवाचा फेर संपला नाही. आमाला इथ रोज १५ किलो उसाचे वाडे व प्यायला गढूळ पाणी मिळत. रोज रोज वाडे खाऊन ते वेटरन-याच्या भाषेत काय म्हणतात, हं आमच्या शरीरात ओक्झालेठच प्रमाण वाढून हाड पार ठिसूळ झालीत. म्हशीला दुग्ध ज्वर कवचाच झालाय. मला धन्याची लय कीव इतिया. हातच पिक बी गेल अन दुध बी बंद झाल. लय कुत्तरओढ झालीय बिचार्याची.

मी महनलो "अरेरे, लय वंगाळ झाल बग."

काजळ "मालक, तो तुमचा गाडी प्रकाश आता कुठे असतो? लय माया लावली हुती त्यासन आमाली" मी म्हणालो " अरे तो आता कुठे सालान राहात नाय. त्याच्या पोरांन, बाळू ने फायनान्स टाकलाय आंब्यात. मस्त गाडीवर वसुली करत फिरतो त्याचा पोरगा अन प्रकाश तुमच्या आशिर्वादान आरामात जगतूया."

काजळ "मालक एक सांगायचं राहिलाच की, ते शिंदेच्या शेतात आमच्या दाताची पारख करणारे ते तुमचे स्नेही आलते आमच्या छावणीवर परवाच्या दिशी. म्या लांबूनच ओळखल त्यास्नी." मी म्हणालो "अच्छा अच्छा, कलाप्पा होय मी वाचला होता त्यांच्या दौ-याच्या टाईम टेबल. वेळेचे फार पक्के आहेत ते. कुठेही अगदी १० वाजून १० मिनिट व ३५ सेकंदचा काटा न हलु देता म्हंजे आयडियल टाईम ला जातात." काजळ " मालक, म्या त्यास्नी लय हाक मारल्या हंबरून पण कश्याच काय ते आपल मश्गुल होत ब्यानरबाजी व फोटोबाजीत. म्या म्हणल आपल्या जुन्या मालकाचे स्नेही आलेत, जर लक्ष दिल असत तर वशिलेबाजी करून आपला चारा तर वाढवून घ्यावा. पण छे."

मी म्हणालो "अरे, ते आता फार मोठे पुढारी झालेत. थोरामोठ्याची वंश परंपरा आहे त्यांना. वरून ३-४ गॉड फादर १-२ गॉड मदर. ते कशा पाई लक्ष देतील तुझाकडे."

काजळ " म्हंजी सब घोडे बारा टक्के म्हण्याच तर."

मी म्हणालो "अरे तस काई नाय. काही मनस्वी लोक आहेत या दुनियेत. जस की हिंगोलीचे १०५ जनवार खाटकाच्या दारातून काढून आपल्या शेतात जगवणारे सुभाष मगर असोत की सिन्नर चे सुनील पोटे ज्यांनी कृषक मित्राच्या माध्यमातून गावात देव नदीवरली ब्रिटीश कालीन नाले बंधारे दुरुस्थ करून नंदनवन केल किंवा उस्मानाबाद जिल्हातील कवठ्याचे सेवाग्रामचे विनायक पाटील असोत. अरे आमच्या तालुक्यात प्यायला पाणी तरी आहे कारण या मागे खडतर परीश्रम आहेत गेल्या दोन तपात आदरणीय बाबूजींचे ज्यांनी कृषक पंचायतच्या माध्यमातून ८९ गावात पाणलोट व वाटर शेड च्या साह्याने जलस्तोत्र जिवंत ठेवले. आंब्यात प्यायला पाण्याची भीती नाही कारण स्वर्गीय डॉं.विमलताई मुंदडा यांनी त्यांची वटी काळवटी कायम स्वरूपी आमच्यासाठी भरून ठेवली आहे."

काजळ "मंग मालक हे कलाप्पा सारखे लोक असे का वागतात?

मी म्हणालो " अरे त्यांनीही बरेच प्रश्न मार्गी लावलेत तुमच्यासाठी. जस की छावानिचालकास आता अनामत भरायची गरज नाय. तुमच अनुदान ३२ वरून ५० रुपये केल." काजळ " मंजी आदी गर्दाड करायचं अन मग त्यात आमाली ढकलून वरून थोडी माती टाकायची, असच न. ही मंजी 'फुकटची कडी वाढायला पुढी पुढी, अन विकतचा भात आखडता हात' अस झालाय"

मी महनलो "अरे बाबा मी त्यांच्या वतीन तुझी माफी मागतो मंग तर झाल."

काजळ " माफी मागण्याचा प्रश्न नाही मालक. पण त्या दिशी पासून माणसाचा एक गुण कळला. तुमास्नी राग येणार नसाल तर सांगतो."

मी म्हणालो " सांग बाबा, हल्ली मला राग येत नाय कारण माझे सुध्धा तुझ्यासारखेच ठेचलेत परिस्थितीने."

काजळ "सांगतो तर नीट ऎका. अहंकार, सत्ता आणि स्पर्धा याची आग-धग माणसाच्या मनाल सतत तगमगत ठेवते. मानस माणसाला परावलंबी बनवतात जे लय भीषण असते.आमच्या सारखे पशु-पक्षी समूहान राहतात पण अहंकार, सत्ता किंवा पैसा याच्या जोरावर एकमेकाला एकमेकाचे गुलाम बनवत नाहीत.आमच हे समूह जीवन हे अध्यात्म-सत्तेच नैसर्गिक प्रकटीकरण असत. ही तुमची सरकारी व्यवस्था शेतक-याला कायम याचक बनवण्याचं दृष्ट षड्यंत्र रचते.कधी कर्जमाफीच्या नावाखाली तर कधी खात-बियाणाच्या अनुदानाच्या नावाखाली तर कधी चा-याच्या नावाखाली. त्यास्नी कायमच पंगुत्व आलय या मानसिकतेने. हे पराव्लम्बित्वच आपली नियती व या नियतीची कुत्तरओढ म्हणजेच या बळीराजाच जीवन. अहंकार, सत्ता आणि स्पर्धा या तीन घटकातून विषारी बनलेल्या या व्यवस्थेतून मधुरसच निघत नाय. कायम विखारी योजनाच बाहेर पडत आहेत. त्यामुळेच ७०-७० हजार कोटीचे सिंचनाच्या व कर्जमाफीच्या नावाखाली यांनी आमच शेण खाल्ल. सिंचनाच पाणी इंडिया बुल्सला, पण या खंगलेल्या देशी बुल्सच काय? हे मंजी 'सतीच्या घरी बत्ती अन शिंदळीच्या घरी हत्ती' अशी अवस्था हाय. शेतक-या बराबर आमचीही वाताहत झाली. मंग येतात छावणीवर, कलाप्पा सारखे आमचेच काही दात पारखी, थोरामोठ्यांचा वारसा घेऊन, याचं पापक्षालन करायला, यांनी शेण खाऊन हगलेल टोपल भर मैला घेऊन, गळफास लागलेल्या बळीराजाच अंगण सारवायला! या कलाप्पा सारख्या लोकांच वागण मंजी 'हिडग्याची व्याली गाय, खांद्यावर वासरू जत्रेला जाय' अशी झाली आहे. दुष्काळात यांचा दारात खितपत पडलेला हा बळीराजा एक न एक दिवस यांच्या पाठीत एटन घातल्याशिवाय राहणार नाही. महादेवाच्या दारातील नंदी मी, यांच्या दारात शेवटच्या घटका मोजताना गेल्या एक तपात आत्महत्या केलेल्या १०५६१ बळीराजाच्या आत्मशांती साठी एकच प्रार्थना करतो 'ओम नमो शिवाय!ओम नमो शिवाय!!२०१४ चे सरकार नसावे न.मो.शिवाय!!! जय हिंद जय गुजराथ!!!!"

असे म्हणून काजलने दम तोडला व माझ्या स्वप्नाचा सुध्दा दम तुटला!

तोपर्यंत सकाळ झाली होती, दारात अग्रोवन आला होता. मी रोजच्या सारखाच दुष्काळ गाथा वाचत बसलो.

काजळ खरोखरच काजळ होता! डोळ्यात ज्ञानांजन घालून गेला!! काळजात कायमची काजळी कुप्पी ठेवून गेला!!!