शनिवार, २० ऑक्टोबर, २०१८

पाण्याची गोष्ट १




१.               पाण्याची गोष्ट ....

आकाशबाबा व धरणीमायची मुलं म्हणजे झाडं
माणूस नावाच्या महाभयंकर राक्षसाने त्या निरागस झाडांची कत्लेआम केली......
आपली घरे सजवली ......
सुरवातीस आकाशबाबा नाराज झाले..
त्यांनी पाऊस पाडणेच कमी केले .....
पण तो राक्षस खूप हुशार होता ....
त्याने महाभयंकर यंत्राच्या सहाय्याने धरणीमायला भोक पाडन्यास सुरुवात केली....
पाहता पाहता धरणी माता सच्छिद्र झाली .....
तिच्या पोटातील पाणी खूप खोल गेले .....
मग तर आकाशबाबा खूपच चिडले ...त्यांनी एकदम पाऊस कमी केला ......
आणि सगळ्या राक्षसांच्या तोंडचे पाणीच पळाले.....दुष्काळ ...दुष्काळ....
मग विवेकवाडीतील छोटी मुलं आकाशाला प्रार्थना करू लागली ....
लहान मुलांची काळजी आकाशबाबाला होती ...
तो आपल्या झाडां एवढेच प्रेम मुलांवर करतो न !
आकाशबाबा म्हणाले मुलांना ..."बाळानो तुम्ही माझ्या बाळांना जपा ....मी तुम्हाला पाणी देतो ..."
मग प्रत्येक मुलं एक एका झाडाचे आई बाबा झाले ...... व त्यांची काळजी घेऊ लागले ....."
मग आम्ही पण ठरवले ....
येणाऱ्या वर्षी आम्ही विवेकवाडीत पाण्याची (पानभरत नाही ) शेती करणार ...विवेकवाडील उत्पन्न ....."शून्य".... कोण भागीदार होणार का ? पण परिसरातील प्रत्येक माणसाला,पक्षाला,गुरांना नक्की पाणी मिळेल .....
आपले विनीत,
झाडांचे आई -बाबा
मुक्काम पोस्ट विवेकवाडी



२.               मौजे चनई शिवार ...विवेकवाडी प्रकल्प 

मागील लेखनात विवेकवाडी हा शब्द येतो. नेमके हे विवेकवाडी हे गाव आहे का ? असे अनेक जण विचारतात. प्रबोधिनीच्या काही सदस्यांनी भविष्यात प्रबोधिनीला जागा लागेल म्हणून स्वखर्चानी एकर जमीन विकत घेतली होती. अतिशय निर्जन असणारा माळावरील हा भाग भुताचे माळ म्हणून पण ओळखला जायचा. प्रत्यक्षात विवेकवाडी हा ज्ञान प्रबोधिनीचा प्रकल्प आहे. लातूर -केज रस्ता व अंबाजोगाई -केज रस्ता या दोन रस्त्यानां जोडणारा एक शिव रस्ता आहे. विवेकवाडी प्रकल्प चनई गावच्या शिवेवर येतो व त्या समोरील रस्ता ओलांडला की लोखंडी सावरगाव. या शिव रस्त्याचे काम प्रबोधिनीच्या पुढाकाराने झाले. या रस्त्या मुळे हंगेवाडी,चतुरवाडीही गावे पण जोडल्या गेली. गावकऱ्यांची सोय झाली. या भागातील गावकऱ्यांनी या रस्त्याच्या अवती भोवतीच्या परिसराला नाव दिले विवेकवाडी.

काय करणार त्या जागेत? कुणी विचारले की वैद्य काका ऊर भरून आपल्या खमक्या आवाजात म्हणायचे, “जंगल करणार इथे.” अगदी शेतातील दगड वेचणे,पाण्याचा हौद, झाडांची खड्डे ते शेततळे तयार करण्यापर्यंत स्वतःच्या मेहनतीने काय काय केल नसेल आमच्या या KG to PG च्या टीम ने. झाड लावण फार सोप पण वाढवण खूप अवघड. त्यात त्या भुताच्या माळावर तर पाण्याची खूपच वानवड. रात्री वाजे पर्यंत कधी कधी पाणी दिले 
.
उन्हाळा बहरत होता आणि आमच्या समोर पाण्याचे अनेक प्रश्न. मग एक नवीन युक्ती शोधून काढली इंची प्लास्टिक पाईप झाडाच्या जवळ इंच खोचायचा त्यावर एक लिटरची बिसलरीची पाण्याची बाटली पाणी भरून पाईपात उलटी करून सोडायची. असे एक लिटर पाण्यात आम्ही उन्हाळ्यात झाडं जगवत होतोत. आम्ही अनेक झाडे तयार केली लावली त्यात वड, पिंपळ गुलमोहर हे विशेष होती 
.
विवेकवाडी  मस्त हिरवी होत होती, बहरत होती. या सर्वं कामात अनेक विद्यार्थी, अभियंता मित्र, शिक्षक मित्र,छायाचित्रकार यांचा खूप भरीव सहभाग होता. आज विवेकवाडी प्रकल्प दुष्काळ निवारणासाठी एक अनुकरणीय प्रयोग झाला आहे. अनेक वृक्षमित्रांनी येथे प्रयोग करून मस्त वनराई उभी होत आहे.

माणसांपेक्षा झाडं लवकर वाढतात फक्त सुरुवातीला थोडी काळजी घ्यावी लागते. एकदा मूळ धरली की मग पाणी पण तेच शोधतात ते सुरू झाले की त्यांच्या वाढीच्या वेग वाढतो. मग फुल, फळ धरण्याची प्रक्रिया सुरु होते ते थोडया दिवसां मध्ये ते झाड छाया पण दयायला लागते. शिक्षण पण अशीच प्रक्रिया असली पाहिजे. मुलांना आपली मूळ लवकरात लवकर ज्ञान ग्रहणाच्या शाश्वत निर्झराशी लागली की मग त्यांच्या विकासाचा वेग वाढतो. पण आपण त्यांना सतत शिकवणी, अभ्यासवर्ग अश्या अनेक बाह्य माहितीच्या दवबिंदून वर ठेवतो त्यामुळे ते उठून दिसतात पण स्वावलंबी होत नाहीत.या शिक्षण प्रक्रियातून निर्माण होणाऱ्या मनुष्य जीवनाला फुले, फळे येतातही भरपूर पण ते केवळ त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा भाग होतो. कोण्या आगंतुकाला ते तृप्त ही करू शकत नाहीत आणि तप्त ग्रीष्मात आल्हाददायक सावली पण देऊ शकत नाहीत .......

निसर्गचक्रा मध्ये अश्या ह्या मूळ धरलेल्या छाया देणाऱ्या झाडांचे खूप मोठे स्थान असते तर समाज जीवन समृद्ध करण्यासाठी असे मूळ धरलेली मनुष्य जीवने निर्मितीचे परिवर्तनाची केंद्र बनतात. पण आता जागेला आलेल्या किमती मुळे बोनसाय तयार करण्यात सुख मानतो आपण 
.
पुढे या गावातील पाण्याची परिस्थिती पाहता प्रबोधिनीने या भागात पाणलोटाचे,वनीकरणाचे काम केले व या भागात बऱ्या पैकी सुबत्ता आली. या भागात भूजलपातळी ४०० फुटाच्या खाली होती. विवेकवाडी प्रकल्पातील कामामुळे प्रकल्पातील कुपनलीकेला केवळ ८० फुटाला पाणी लागले व ती केवळ १८० फुट खोल आहे. आजही ३ अश्वशक्तीची मोटार सतत चालते. आज पाच हजार लिटरची पाण्याची टाकी ३ तासात मोटर कमी शक्तीने चालूनही सहज भरते. या कामा मुळे सभोतालच्या चार गावातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या गुरांसाठी पाणी उपलब्ध झाले. परिसरातील पक्षी वाढले. अनेक हरणे पाणी पिण्यासाठी येथे येतात.

मार्च महिन्यात अवती भोवती बंद पडण्याऱ्या कूपनलिका पाहिल्यावर व लोडशेडींगची कल्पना आल्यावर प्रबोधिनीच्या पुढाकाराने सिंगल फेजचे काम या भागात करून घेतले. सर्वं गावकऱ्यांनी प्रेमाने तेथील जनित्राचे नाव "ज्ञान प्रबोधिनी DP" असे ठेवले.
परिसरातील १५० गुरांच्या पाण्याची व्यवस्था येथे केली आहे. मे व जून पर्यंत ही ३०० पर्यंत पोहचेल. या भागातून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पण केली आहे .पाणी,शेतीचे व मुक्त शिक्षणाचे प्रयोग पण चालू आहेत.


३. दुष्काळाच्या झळा काळीज पण जाळून खाक करतात ....

नितीन एक मस्त तरुण.दहावी नंतर शाळा सोडून शेतीत पडला. जबरी मेहनत....कुठलेही काम सांगा सहज करणार. पिळदार शरीर यष्टी. वडील रघु दुसऱ्याच्या शेतात काम करायचे. प्रचंड कष्ट करून त्यांनी स्वतःचे शेत पण चांगले केले. मागच्या वर्षी शेताचा एक तुकडा विकून २५ लाख रुपये आले. नितीनचा मोठा भाऊ संतोष, कृषीचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून कुठे शासकीय नोकरी मिळते का ते पाहू लागला. दहा वीस लाख द्यायला पण वडील तयार होते. संतोषला काही शासकीय नोकरी मिळाली नाही. शेवटी तो पण शेती करू लागला.

शेत विकल्या नंतर २५ लाख रुपये खर्चून झेंडू, शेवगा याची शेती तो करू लागला. ठिबक, मलचींग सगळे काही केले. मस्त बाग फुलायला लागली. एक विहीर, दोन बोरवेल त्यामुळे नितीन म्हणायचा आपल्याला पाणी कमी पडणार नाही. त्यांनी एक ट्रक्टर, फुलांची ने आण करण्यासाठी एक पिकअप व गरज पडली तर पाणी आणण्यासाठी एक टँकर पण विकत घेतले.फेब्रुवारी मध्ये फुलांचा पहिला बहार आला. ३८ रुपये किलोपट्टी लागली. २०० किलो माल झाला. सगळ कसे मस्त होते.
मार्च महिना उजाडला. दोन्ही बोरचे पाणी आटले. पाण्याचे टँकर सुरू केले. चालकाचा खर्च, इंधनाचा खर्च परत प्रत्येक टेंकर मागे १५० रुपये पाण्याचे ते काही परवडणारे नव्हते. शेवटी नवीन बोर घेण्याचा निर्णय घेतला. ४१० फुटला चांगले पाणी लागले. आता सगळे आलबेल होईल असे वाटले चांगला लाख भर खर्च केला होता.
 
आज सकाळी विवेकवाडी त पंचायतन प्रशिक्षण केंद्राचा भूमीपूजनाचा मस्त कार्यक्रम झाला. केदार आपला हा आपला कार्यकर्ता त्याला गुरांसाठीचा हौद भरून टाकण्यासाठी सांगून अंबाजोगाईला पाहुण्यांना सोडायला निघालो. वाटेतच केदारचा फोन, “दादा पाण्याची मोटार चालू होत नाही.” मनात ना ना शंका. मन सुन्न झाले. काय झाले असेल.

विवेकवाडीत पोहोंचलो सगळी वायरिंग तपासून पाहिली. सगळे व्यवस्थित होते. वीज ११ वाजता गेलेली ती आता रात्री २.३० येणार. त्यामुळे वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. नितीनला फोन लाऊन त्याची मोटार चालली का ते विचारावे म्हणून फोन लावला. फोन काही लागलं नाही. पाच मिनिटात नितीनच आला

दादा, आपली डी.पी उडाली हो. इंजिनिअर साहेबाना फोन करा की.”

मी लगेच फोन लावला. “दादा सगळ्या शेतकऱ्यांनी वीज भरणा केला आहे त्याच्या पावत्या जमा केल्या की दुसऱ्या दिवशी डी.पी लावतो मी.” साहेब बोलले.
 
आता प्रश्न असा की, आमच्या डी.पी वर १५ जण आहेत त्याच्या पैकी बोरवेलला पाणी नितीनच्या व प्रबोधिनीच्या आहे. आम्ही वीज बिल भरले आहे. उरलेल्या लोकांनी वीज बिल भरणे थोडे अवघडच आहे.......नितीनचा चेहरा पार उतरून गेला होता. आता काय करणार ? एक तर जनरेटर आणावे लागेले किंवा सर्व उरलेला शेतकऱ्यांचे बिल स्वतः भरून .....डी.पी नवीन आणणे ......परत लाख भर रुपये खर्चच करावा लागेल....... दुष्काळाच्या झळा उन्हाच्या झळापेक्षाही लई पावरबाज ....उन्हाच्या झळा फक्त शरीर जाळतात तर दुष्काळाच्या काळीज पण जाळून खाक करतात ...

४. पण खर सांगू ....

मी तुला खूप खूप मिस केलं .......काल
 
थोडा तरी पाऊसमामा पडावा असे वाटत होते...
पण तो काय बटन दाबलाकी थोडाच पडणार ..
उत्तराखंड मधील कॉपी करून अंबाजोगाईत पेस्ट पण नाही न करता येत तो ....
आमची पण देवभूमी आहेच की ही ...
नाही वाटले म्हणून मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी जावे ...
आपणच फोडलेल्या नारळातील पाणी तीर्थ म्हणून प्यावे ...
अजून एवढाही वयानी मोठा नाही झालो की प्रारब्धाची भाषा बोलायला
वा गीतावाचून कर्मयोगी....म्हणून नाही वाटत
आभाळ बाबा तुझ्या उरातील ओलावा कमी नसेल झाला आमच्या प्रारब्धाने ....
नाहीतर एकीकडे तू इतके ओले केलेस तर एकीकडे गळे कोरडे पाडलेस ...
नाही वाटत तुझ्या विस्तीर्ण आणि विशाल अंतकरणाकडे पाहून तू कोप केलास म्हणून ...
बाप शिक्षा देतो ....पण मारून नाही न रे टाकत
आदित्याच्या दाहकतेने तू पण कोरडा झालास
त्यावेळी या धरणीमातेने थोडे ठेवलेले आपल्या लेकरांसाठीचे पाणी पण तुला दिले की भरून येण्यासाठी
म्हणून का तिच्या लेकरांना थंडावा दिलास फक्त ...
वाढदिवसाच्या दिवसापुरता शुभेच्छाचा असतो तसा ...
सर्वत्र रिता हो न सारखा ....
अरे प्रत्येकाला थोडीच तहान आहे अन् थोडी भूक
तू पण आमच्यातील राज्यकर्त्यांसारखे आपलीच पार्टी आपले कार्यकर्ते असे करू लागलास ?
मला आईने लहानपणी सांगितले होते ...
जे खूप छान छान व चांगले असतात न त्यांना आभाळ बाबा आपल्या मदतीसाठी घेऊन जातो ...
जसं तू माझ्या बाबांना व मामाला नेलंस...पाऊस मामांना आपल्याकडे आणण्यासाठी
पण मी पण आता प्रौढ झालो आहे ....तू सगळ्यांनाच नेतो कधी लवकर कधी आधी
मला असे वाटू लागले की जसे आमच्या मातेवर राज्य करण्यासाठी .
राजकारणी जशा युत्या करतात तशा युत्या तर तुझ्याकडे आलेल्यांनी तुझ्यावर राज्य करण्यासाठी तर केल्या नाहीत न ..... ?
प्रश्नांनी फक्त प्रश्न निर्माण होतात ....पैशानी पैसा तर विचारांनी नवे विचार
पण बाबा तुझ्यातील ओलावा धरणीमातेकडे आला की जीवन निर्माण होते ....
तू पण काय म्हणतात ते "लिव्ह इन रिलेशन" सुरू केलंस आमच्या धरणी माते  बरोबर ....
पण ते सगळे तात्पुरते शिंतोडे ....cool cool करणारे ....
अरे गर्जने आणि बिनधास्त बरसणे यातच अभय पण आहे आणि सत्व आणि शुद्धी ...
बाबा खरंच सांगतो दर दोन मिनिटाला एक मेसेज दर पाच मिनिटाला एक कॉल होता शुभेच्छाचा ....
पण फक्त माझाच नव्हता तर शेतकऱ्यांचा पण वाढदिवस होता ना  रे काल
त्याच्या साठीतर पाऊस हीच मोठी शुभेच्छा !!!
मी नाही पहिले तुझ्याकडे काल दिवसभर....
कारण विश्वास होता तू तुझं अस्तित्व दाखवशील खूप चिंब करणारा आशीर्वाद देवून ....
मी नाही म्हणणार तू विश्वासघातकी आहेस म्हणून ....
पण खर सांगू ....
मी तुला खूप खूप मिस केलं .......
थोडा वेळ तरी पाऊस मामा यायला पाहिजे होता ..... तुझे आशीर्वाद घेऊन.

५. त्या फक्त इतिहासाच्या साक्षीदार किंवा फार फार तर साठवणीचे हौद

आडस मार्गे पांगरीला गेलो मस्त रोड,पण आजूबाजूला निळ्या रंगाचे पाण्याचे पिप व लालरंगाच्या घागरी. पाण्याचे हाल धारूर तालुक्यात पण
. पांगरी व कोळपिंप्री गावाला भेट दिल्यावर परत लाडेवडगावला जावे म्हटले.

मुख्य रस्त्याहून आत घुसल्यावर एकदम गाडीचा वेग
तासी ७० कि.मी वरून तासी २०कि.मी. वर आला. बाजूला घर दिसत होती. साहेबरावचे घर कुठे विचारले तर लोक म्हणाली पुढे गावात आहे.हळूहळू पुढे चाललो. थोडं पुढे गेले की विचारायचं,
”घर कुठे आहे ?”
पुढे गावात.”
मला थोडं आश्चर्य वाटायचे. शेवटी २.५ किलोमीटर नंतर गाव आले.मस्त पसरलंय गाव.गावात येताच मध्य भागी मोठे मंदिर व खूप मोठी विहीर. तिला चारी बाजूने रहाट.मस्त दगडात बांधलेली. पाहून खूप छान वाटले. पण विहिरीत टिपूस पाणी नाही.
साहेबरावच्या घरी गेलो.त्यांच्या कडून कळले.गावात सार्वजनिक एकच बोर चालू आहे तिचे पाणी विहिरीत टाकतो. मागच्या वर्षाच्या मानाने पाणी खूप कमी झाले.एप्रिल भर जाईल का या बद्दल शंका.

साहेबांनी व त्याच्या घरा जवळील ११ जणांनी एक ३४० फुट खोल बोर घेतले पाणी ४० फुटावर लागले पण सध्या दिवसभरातून ५०० लिटर पाणी मिळते.

गावातील ५० % लोक उसतोडणी सा
ठी ४ महिने गावाबाहेर असतात.पाणी व रस्त्या मुळे तर ७५ % लोक गाव सोडून शेतात राहायला गेले ,म्हणून गाव इतक पसरलं .पण पाणी नाही आपल्या गावातील शेतातील वडिलोपार्जित.मस्त दगडात बांधलेल्या विहिरी आता बांधणे कठीणच पण आपण त्यातील पाणी इतके आटवले की विहिरी केवळ इतिहासाच्या साक्षीदार होता येत किंवाफार फार तर साठवणीचे हौद.परस भर खांदाल की पाणी लागायचे ही आता स्वप्नातील गोष्ट वाटते .....?
 ६.                 कुरणवाडीत जे पहिले ...जे ऐकले ते ......

*दिसभर पाणी भरण्यात जातो....
*सकाळी आलात तर एकमेकीच्या झिंज्या उपटण्यापरी पाणी भरताना भांडण होत्यात .....
*लेकरांना लागणार पाणी लेकर भरत्यात......
*बघा आम्ही कस पाणी पित्यात ते ......
*डोक्यावर दोन घागरी काखेत लेकरू सकाळ पासन दहा चकरा मारल्या की ......
*
गावतील पाण्याचा टाक्या फुटल्या, पण कर्ज काढण,सोनं तारण ठेवण्याच्या जाहिरातीसाठी त्याचा चांगला वापर होतो ....
*चार दिस झाले आंब्याला
(अंबाजोगाई ) झाडं पडल्यात म्हणे. त्यामुळ जे मिळत ते पाणी ते बी नाही.आता इज येण्याची वाट पहायची......
*पाणी नाही त्यात वळीवाचा पाऊस.झा
डं पडली ....घराची छप्पर उडाली
विवेकवाडीतील एका खोलीचे पत्रे उडून गेले.शंकर पाटलांचा वळीवनावाचा धडा अभ्यासाला होता.पण प्रत्यक्ष निसर्गाचे तांडव पाहणे .....वाचण्याच्या अनुभवा पैक्षाही भयानकता अनुभवली .....
७.   आणि जमिनीचा भाव १०० पटीने वाढला पण .....
विवेकवाडी परिसर अंबाजोगाई पासून आठ किलोमीटरवर.सुरवातीस जमीन घेतली त्यावेळी एक्करी भाव होता चाळीस हजार रुपये.आज १२ वर्षांनी अंबाजोगाई वाढू लागली.वीज व वाहने यांची उपलब्धता वाढली.रस्ते खराब असले तरी नवीन गाड्या जोरदार विक्री होतात.आता दुचाकी जागी चार चाकी वाढत आहेत.अनेक घरातील फोन बिल महिन्याच्या किराण्या पेक्षा जास्त झाले आहेत.सध्या विवेकवाडीच्या जवळील मुख्य रस्त्यावरील जागा ३ लक्ष रुपये गुंठा म्हणजे १.२० कोटी रुपये प्रति एक्कर एवढ्या भावाने विकली चालली आहे.वडिलोपार्जित जमीन असणारे तरुण मुलं काही या जमिनीचे महत्व समजून स्वतः जमीन कसतात तर काही लोक दरवर्षी एक दोन गुंठा विकून मस्त जीवाची मुंबई करतात.जे स्वतः कसतात त्यांचे राहणीमान अत्यंत सामान्य तर जे विकतात त्याचे पंचतारांकित.हे बहुतेक प्रत्येक पिढीत होत असावे. नवीन जमीनदार फक्त बदलत जातात.कष्ट करणारे मात्र शेती कसत राहतात.अन्न निर्माणाची प्रक्रियेला या समाज व्यवस्थेत कधीच महत्व येणार नाही का ?

८.   त्याला यामुळे डिप्रेशन येवून थोडंच चालणार

खूप कष्ट करून एक एक म्हैस बालाजीने वाढवली. आता बर चालले होते पण आता थोडं स्थिरावे वाटत होते. शेती चांगली करावी. बोर घ्यावी म्हणजे दोन पिकं तरी घेता येतील. परमेश्वरनी बोर घेतलं होत आणि चांगल पाणी लागलं. त्याच गुरा मागे फिरणे पण बंद झाले होते. बालाजीला पण वाटले घेवून टाकू. अजून ताईच लग्न बाकी आहे. तोडा पैसा पण जमा होईल. जमीन नाही विकावी लागणार.

शेवटी चार म्हशी विकून टाकायच्या ठरवल्या. थोडा पैसा आला व बोर घेतली. ४०० फुटाला बर पाणी पण लागले. पण प्रश्न आता लाईटचा.अनेक हेलपाटे व चिरीमिरी देवून शेवटी सहामहिन्यांनी लाईट ओढली. आता थोडं बर वाटत होत. दुसऱ्या दिवशी टेस्ट करायला म्हणून मोटर घेवून तो आला तर त्याच्या काळजात धसकाच बसला. कुणीतरी कुपनलिकेत बरेच दगड टाकले होते. बऱ्यापेकी ती बंद केली होती. चूप चाप मनातल्या मनात रडण्यापेक्षा काहीच करता येत नव्हते. रीबोर करायचे तर तेवढाच खर्च आता पैसा पण नव्हता. शेती विकायची नाही कारण शेती विकण म्हणजे आईला विकण. परत आपले नेहमीचे काम सुरु.

एखाद्याच्या मदतीने एक म्हैस घावी व नित्य नियम सुरु. ताईच लग्न बाकीच होत आता त्याला पण सोयरिकी यायला लागल्या.

मागच्या वर्षापासून माझे विवेकवाडीत जाणे वाढले त्यामुळे बालाजीशी मैत्री पण. हळूहळू ही मैत्री आमच्या पारिवारिक नात्यात बदलली. यावर्षी आम्ही बालाजीलाच शेती करायला दिली. बालाजी, काका व ताईने खूप मेहनत पण घेतली. सोयाबीनची रास पण लागली. चांगला उतार आला. चांगलं वाळू देऊन खळ करावे व त्याधी काही पुढील मशागतीची कामे जमीन ओली आहे म्हणून करावेत म्हणून बालाजी त्याच्या मागे लागला. खालच्या शेतात जवळचा शेतकरी पाणी देतो म्हणाला म्हणून गहू पेरण्याची तयारी चालू केली.

समद चांगलं चालल होत. एक आपेगावची सोयरिक बालाजीला आल्याचे काकांनी मला सांगितले पण. दोन दिवसापूर्वी मी पुण्याला गेलो व परत अंबाजोगाईला आलो तर माझ्या बायकोने मला विचारले, “बालाजीचा काही फोन आला का रे ?”

नाही ग त्याचा फोन हरवला आहे.”

अरे काल केदारचा फोन आला होता तो म्हणाला बालाजीच्या शेतातील सोयाबीन कुणीतरी रात्री जाळून टाकले.”

एकदम बालाजीचा चेहरा डोळ्या समोर आला व त्याच्या समोर त्याच्या अपार मेहनतीने राख झालेले सोयाबीन व त्याबरोबरच त्याची स्वप्न ही ......
का,कुणी हे प्रश्न .....उत्तर मिळाले तरी काय उपयोग ....

त्याला यामुळे डिप्रेशन येवून थोडंच चालणार ...घरातील चार जणांच्या पोटांसाठी त्याला डोळ्यातील आसवानां गिळून अंगातून अजून घाम गाळावा लागणार हे कटुसत्य त्याच्या अंगवळणी पडले आहे.


९.   ‘स्मित’ एक प्रयत्न ‘स्मित’ आणण्यासाठी....
 
चेहऱ्यावरील ते तेजाळणारे ‘स्मित’ मात्र पार हरपून गेले.
तो सर्वांचा पोशिंदा आहे. लहरी निसर्गाने कधी कधी त्याच्यावर इतके आघात केले तर तो सहन करतो.पण कधी कधी तो इतका हताश होतो व त्याच्या चेहऱ्यावर त्याचे स्मित हरवते. तो निराश होतो, खचतो व आपल्या स्वतःला संपवायला निघतो. एक पोशिंदा किंवा जननी ज्यावेळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते किंवा करते त्यावेळी त्याला जबाबदार आपण सर्व पण असतो.
असाच एक सुशिक्षित शेतकरी, त्याच्या सोबत त्याचा एक भागीन एक मस्त स्वप्न रंगवत असतात. मे,जून मध्ये वाढलेल्या उन्हाची धग व उन्हाळी रोखण्यासाठी लागतो कांदा. त्या दोघांनी कांद्याचे पिक आपल्या चार एक्कर शेतात घायचे ठरवले. खर्च निम्मा निम्मा लाभ निम्मा निम्मा. तो शेतकरी तसा हरहुन्नर अनेकांना धीर देणारा. पण मध्यंतरी आपल्या दैनंदिन जीवनातील धाव पळ इतकी वाढली की त्याला दोनदा हृदयविकाराचे झटके आले. त्याच्या दुर्दम्य इच्छा शक्तीने तो उभा राहिला. एक नव स्वप्न घेवून कांद्याचे.

त्याचा भागीनदार पण तयार. एकूण खर्च येणार होता एक लक्ष पंचवीस हजार त्यापेकी पंचेवीस भागीनदाराने भरले व एक लक्ष शेतकऱ्याने. आधीच हृदयावरील शस्त्रक्रियेमुळे प्रचंड खर्च झालेला. दोन मुलांचे शिक्षण होऊन त्यांना अजून नोकरी नाही. यात एक लक्ष उभा करणे खूपच अवघड होते. त्याने धडपड केली व रक्कम जमा केली. खूप कष्ट केले दोघांनी. हिरवगार शेत पाहून लोक स्तिमित होत. निदान उत्पन्नाची अपेक्षा होती १० लाखाची. अनेक शेतकरी कांद्याचा मळा पाहण्यासाठी येत होते व आवाक होत होते.
भविष्य खूप सुंदर होते. चेहऱ्यावर एक तजेलदार स्मित होते. खूप आशादायक स्वप्न होती पुढील आयुष्याचे.त्या दोघांचे आयुष्यच बदलणार होते त्या हिरवाई ने !

पण ....अचानक एक दिवस. काय झाले हे कळलेच नाही. रखरखत्या उन्हात आभाळ काळवंडून गेले. जोरात वारा सुटला. पावसाचा अंदाज...थोडे सुखावले ते दोघंही...वाऱ्यासोबत जोरात पाऊस आला. तोच टपटप टपटप आवाज पण सुरु झाला. “आये बघ गारा पडायला लागल्या की.” ती छोटी भागीनदाराची मुलगी गारा वेचू लागली खूप आनंदाने. तशा तिने गारा पहिल्याच नव्हत्या. पण फार काळ तो आनंद त्यांना घेता नाही आला. गारांचा वेग वाढला. रपारपा एकदम त्या कोसळत होत्या. हिमवृष्टी होते तशी. काही काळातच आख्ये शेत त्या गारांच्या थरांनी भरून गेले. कांद्याची पात तुटून त्यात ही गारा गेल्या. काळ्या आईने जिने हिरवा शालू नेसला होता ती अचानक पांढरी विधवेची साडी घातली अशी वाटू लागली....

सगळं काही संपले होते क्षणात. रात्र भर गारांचा थर काही हटला नाही. पातीकडून पाणी व कांद्याकडून रात्र भर पाणी. आख्खा कांदा सडला दोन दिवसात. आता काढायचे तर एका बाईला ३०० रुपये द्यावे लागणार होते .पण काढणार कसे ? रानात पाण्याचा निचारच झाला नव्हता.
त्या दोघांच्या चेहऱ्यावरील स्मित हरवले. त्यांची नजर शून्यात पाहू लागली. काळीज करपून गेले. आता संपले सगळे का नाही आपणच संपून टाकावे आपल्याला दोघांचे मन सैरभैर ...अस्वस्थ, निराश ...शेतकरी स्वतःला संपवायला निघाला तर भागीनदाराने आपल्याला पूर्णपणे नशेच्या स्वाधीन केले. तो रात्रंदिवस दारूचा आश्रय घेवू लागला. १० लाख मिळणार तिथे फक्त तेरा हजार मिळाले. शेतकऱ्याच्या बायकोने अगदी चिडून त्यावर हातच उगारण्याचे बाकी होते, ती मात्र शक्ती सारखी उभी राहिली त्याच्या सोबत व त्याला ही सावरले व स्वतः ही ......

पण सगळ्यांच्या चेहऱ्यावरील ते तेजाळणारे ‘स्मित’ मात्र पार हरपून गेले.
हे फक्त एका बाबतीत व फक्त कांद्या बद्दलच नाही घडले तर तूर, ज्वारी, फळबागा अशा अनेक बाबतीत घडले. आपल्याच कर्तृत्वाने हे सगळे होत आहे.

ते स्मित आपण परत आणूं शकू का ? त्यांना नवीन उर्मी देवू शकूत का ?


१०.        तोंडात शब्द नव्हते चेहऱ्यावर फक्त होते ‘ स्मित’ एक दिव्य अनुभूती....

‘स्मित’ ची सुरुवात करताना का व कुणासाठी म्हणून हे काम करायचे हे समजून सांगण्यासाठी एक शेतकऱ्याचे उदाहरण मी फेसबुकवर लिहिले होते. दुसऱ्या दिवशी लातूरहून माझा मित्र डॉक्टर उमाकांत पाचेगावकरचा फोन आला. त्याने ते वाचले व त्याच्या वडिलांना त्यांना ते वाचायला दिले होते. काका पण माझ्याशी बोलले. ते पाणी पंचायतचे काम करतात. कै. विलासराव सोळुंके एक अफलातून व्यक्तिमत्व. ‘भगीरथाचे वारस’ हे वीणा गव्हाणकरांचे पुस्तक किंवा ‘उदक चालवावे युक्ती’ हे मिलिंद बोकीलांचे पुस्तक जर तुम्ही वाचाल तर त्यांच्या बद्दल व त्यांच्या कामाबद्दल एक जबरदस्त आदर निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

कांदा उत्पादक व गारपीट ग्रस्त शेतकऱ्याला भेटता येईल का रे ?”काकांनी मला विचारले. ते काल डीघोळ आंब्याला येणार होते व सोबत पाणी पंचायतचे लोक होते. मी ठीक आहे म्हणालो व तुम्ही या व मी पण येतो त्यांना घेवून असे सांगितले.काल संध्याकाळी सहाच्या दरम्यान काकांना मी माकेगाव फाट्यावर घेण्यासाठी गेलो तो त्यांच्या सोबत दोन मोठ्या गाड्या होत्या. त्यांना घेवून मी विवेकवाडीला आलो. शेतकरी आधिच येवून बसला होता. काका ओळख करून देवू लागले तोच माझे डोळे आणि मन स्तिमित झाले
.
“ह्या कल्पनाताई ....विलासराव साळुंकेच्या पत्नी.”मला खूप सुखद धक्का होता. ती एकदम साधी पण एक तेज असणारी पवित्र चेहऱ्याची माता समोर बसली होती.
शेतकरी आपले आक्रंदन सर्वाना सांगत होता. त्यांच्या व सोबतच्या सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते.. कल्पनाताईंचे डोळे पण पाणावले...सर्वत्र शांतता होती. त्याचे बोलणे झाल्यावर पाणी पंचायतच्या एक कार्यकर्ता शेतकऱ्याला म्हणाला, “आम्ही तुमचे दुख तर पूर्णतः कमी करू शकत नाहीत पण काही बियाण्यासाठीची मदत तुम्हाला नक्की करतो”
 
त्यांनी सरळ चेकबुक काढले व दहा हजार रुपयांचा चेक त्या शेतकऱ्याच्या स्वाधीन केला. कै. विलासराव व कल्पनाताईंचा कवचरूपी आशीवार्द त्या शेतकऱ्याने स्वीकारला एक ‘स्मित’ देवून. हे सगळे इतके सहज घडत होते की मला विश्वासच बसत नव्हता. कल्पनाताई विवेकवाडीत, “स्मित” ची पार्श्वभूमी माझ्या मनात निर्माण करणारा तो शेतकरी आणि त्याच्या अश्रू नंतर ....आम्ही जिथे थेंब थेंब जिरवून एक आदर्श निर्माण करण्यासाठीचा प्रबोधिनीचा विवेकवाडी प्रकल्प .....काय योग होता न ! एकदम सॉलिड म्हणतात न एकदम झाक ...जबरदस्त तसं काही फील होत होतं...खूप वेळ ध्यान करून, योग करून निर्माण होणारी मनाची अवस्था व त्यामुळे निर्माण होणारे चेहऱ्यावरील ‘स्मित’ मी अनुभवत होतो. कल्पनाताई मला म्हणाल्या उद्या हा प्रकल्प नीट समजून घेण्यासाठी येते ..मी तर काय म्हणू ....तोंडात शब्द नव्हते चेहऱ्यावर फक्त होते ‘स्मित’ एक दिव्य अनुभूती.

११.        भर उन्हाळ्यात मी न भिजताच चिंब भिजून गेलो होतो......

कोळकानडी एक छोटं गाव १२०० लोकसंखेचे व ६३७ हेक्टर क्षेत्र असलेले. कोळ कानडी व माकेगाव सीमेवर एक मस्त दत्तमंदिर आणि परिसरात देवस्थानची जमीन. मंदिराच्या समोरून एक छोटं नदी पात्र. तसे गाळाने पूर्ण भरलेले.

या भागात काही तरी पाण्यासाठी करावे म्हणून खूप मनात होते. मंदिरच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरी व कूपनलिका आटत चालल्या होत्या. पाण्याचे दुर्भिक्ष. एक तारखेला आम्ही जेसीबी यंत्र घेवून कोळकानडीला निघालो. परिसरातील शेतकऱ्यांनी नदीपात्रात थोडं जरी खोडले तरी पाषाण लागतो हे सांगतिले. मी पात्रात काही खड्डे घेवून पहिले. पहिल्या तीन ठिकाणी खरच पक्का खडक लागला. पात्ररुंद करणे व खोल करणे शक्य नव्हते.


पण चवथ्या जागी ज्यावेळी खड्डा घेतला त्यावेळी काळी माती लागली. थोडं खाली गेलो तर मुरमपण काढता येण्याजोगा. जेसीबी ने काम सुरु झाले. आम्ही तीन ते चार फुट खाली जाऊ शकलो. पुढे गेल्या नंतर ४ ते ५ फुट. पहिल्या दिवसाची सुरुवात झाली. दुपारी जेवण करून परत गेलो तर चक्क खोदलेल्या जागेतून पाणी बाहेर येत होते. थोडं पाणी असेल साठलेले म्हणून मी थोडं शांत होतो पण आजू बाजूचे शेतकरी एकदम खुश. त्याठिकाणी मी थोडा अधिक खोल खड्डा घायला सांगितला २ फुटाचा आणि हळूहळू तो भरू लागला.

सगळे शेतकरी मित्र एकदम अवाक. एक जून..कोणताही मोठा पाऊस नाही आणि चक्क काही फुटावर पाण्याचा झरा....मला काही विश्वास बसत नव्हता. “ हे पाणी काही १२ महिने हलत नाही आता.” जवळपासचे सोबतचे शेतकरी मित्र म्हणाले. एक दिवस थांबावे म्हणालो. आणि आज अगदी सकाळी गेलो. मशीन ने रात्रभर काम करून नदीपात्र १५ ते २० फुट रुंद व ३०० फुट लांब केले होते. खूप मस्त काम केले. पण माझे लक्ष मात्र होते मध्यावर व त्यात जमा झालेल्या पाण्यावर....
भर उन्हाळ्यात अगदी असे मस्त झऱ्याचे पाणी आणि त्याचा झालेला डोह पाहिल्यानंतर बच्चे कंपनी मधील उत्साह वाढणारच न ....त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड ख़ुशी होती व त्यांनी मस्त एकमेकांना चिंब भिजवायला सुरुवात केली .....भर उन्हाळ्यात...त्यांच्या चेहऱ्यावरील ‘स्मित’ हास्य पाहून मात्र मी न भिजताच चिंब भिजून गेलो होतो......



१२.        हा मेरे दोस्त वही बारीश ....

तापमापी ४५ अंश दाखवत होती. कमी जास्त म्हंटले तरी ४३ अंश ते ४५ अंशांपर्यंत नक्कीच तापमान असणार. आज वारा पण नव्हता. नेहमी फडकत असणारा भगवा ध्वज पण सूर्य देवाच्या प्रखरते समोर हार स्वीकारीत शांत होता. नेहमी शीतलता देणाऱ्या विवेकवाडीतील हवामहलात पण चांगलेच घामेजून गेलो होतो. जेवण झाल्यावर माझेच एक व्याखान मी एकत सतरंजीवर पहुडलो. कधी डुलकी लागली कळले नाही. आईने दिलेल्या बाटलीभर ताकाचा परिणाम असावा. 

“हल्या हु ....हल्या..” च्या आवाजाने जाग आली. बाहेर जाऊन पहिले तो आमचा मित्र. सोन्या म्हणजे आमच्या बाप्पाचा मुलगा व त्याचे मित्र आकाश, कैलास व संजू मस्त धुंदीत फिरत होते. सोन्या उर्फ सोनेराव वय १५ वर्ष. शाळा सोडली.आता जनवारे सांभाळतो घरची. त्याची मित्र त्यापेक्षा लहान सगळी १२ वर्षाच्या आतली.त्यांनी शाळा नाही सोडली पण आता सुट्टी म्हणून आई वडिलांना मदत करतात. त्यांची आई वडील वीट भट्टीवर काम करतात. त्यांना त्या कामात खूप मदत होते गाढवांची. त्या गाढवांना चरायला नेण्याचे काम संजू,आकाश व कैलास करतात.

चांदण्यात चालल्यासारखे मस्त धुंदीत सगळी मित्र कंपनी चाललेली होती. समोर हे दृश्य तर मागे झाडीत पाणी पिण्यासाठी ३५-४० हरणांचा कळप आलेला. मी हळूच बाहेर जावून त्यांचा व्हिडीओ व छायाचित्र हळूच घेत होतो. आदरणीय भैय्यू महाराज यांचा शिष्य रोहित देशमुख ( लोखंडी सावरगाव ) व ५० मातीचे पात्र पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी दिले आहेत तर अंबाजोगाईच्या निसर्ग मित्र मंडळाने १० विवेकवाडीत मातीचे पात्र पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी दिले आहेत. हौदातील पाणी थोडं गरम होते कि काय म्हणून हरीण महाराजांनी आपली तहान मातीच्या खापारातील थंड पाणी पिवून शांत केली. झाडाच्या खाली ठेवलेल्या माठातील व खापरी भांड्यातील पाणी नेहमी आपल्या आपल्या आवाजाच्या धुंदीत असलेले बुलबुल शांत पणे पिवून आपला कोरडा झालेला गळ्याला थंडावा देत होते. संजू आणि आकाशच्या बाटलीतील पाणी खूपच गरम झाले होते. त्यांनी शक्कल काढली. आम्ही पक्षी व प्राण्यांसाठी भरून ठेवलेल्या माठात त्यांनी आपली बाटली ठेवली व काही काळातच ती थंड पण झाली. एकदम लहर पेप्सी किंवा मिरांडा प्यावा तसे मस्तीत त्यांनी ते थंड पाणी पिले. गर्धभराज मात्र स्वच्छ पाणी पितात. यथेच्छ खावून झाल्यावर मात्र त्यांनी हौदावर जावून आपली तहान भागवली.

मी पण दिवसभरात चार लिटर पाणी प्यालो. घरी निघताना चेहऱ्यावर पाणी मारावे म्हणून नळ चालू केला तर एकदम मस्त गिझरच्या गरमा गरम पाण्याला लाजवेल असे हॉट वॉटर दिमतीस होते. मला एकदम नाना आठवला व त्याचा चित्रपट थोडासा रुमानी होजाये मधील त्याचे डायलॉग...
 
हां मेरे दोस्त,वही बारिश, वही बारिश जो आसमान से आती है

 १३. नवीन पर्व के लिये नवीन प्राण चाहिये   

तापमान ४६.५ अंश ..अंगातून घामाच्या धारा....करपून टाकणारे ऊन...
पार्थ मयेकर, वय २१ वर्ष, राहणार डोंबिवली, गोपाल शिंदे वय १८ वर्ष शिकतो पुण्यात राहणार हिंगोली, पर्जन्य जोशी, वय १६ वर्ष,कार्तिक पांडे वय १५, सुरज बलदोटा वय १४ हे तिघे राहणार निगडी. परीक्षा संपली आहे. मस्त ऐश करायची. खूप टीव्ही पहायचा. आराम करायचा. थंड हवेच्या ठिकाणी सहलीला जायचे. असेच काही तरी अनेक मुलांना सुट्टी एन्जोय करण्यासाठी वाटणे स्वाभाविक. वरची आमची दोस्तमंडळी मात्र थोडी विचित्रच बघा. यांनी काय केले असेल. 



मराठवाड्यातील दुष्काळाबद्दल यांना प्रबोधिनीतून माहिती मिळत होती. हे सर्व प्रबोधिनीचे विद्यार्थी. या सर्वांनी व त्यांच्या मित्रांनी,नातेवाईकांनी चक्क दुष्काळ मदत कार्यासाठी स्वतः निधी जमा केला. स्वतःच्या पैशांनी ते अंबाजोगाईला आले,स्वतःच्या जेवणाचा खर्च ते स्वतः करतात.इथलेच पाणी पितात.स्वतःचा नाष्टा स्वतः तयार करतात. त्यांनी कधीच ४० अंशाच्या वरील तापमान अनुभवले नाही. 

या सर्व परिस्थिती ते दुष्काळ मदत कार्यासाठी आले आहेत. पार्थ आणि गोपाल श्रीपतरायवाडी,चनई गावातील कुपनलिकांच्या पुनर्भरणासाठी शोष खड्डे घेत आहेत. तर पर्जन्य,कार्तिक आणि सुरज विवेकवाडीत छतावरील पाण्याचे व जमिनीवरून वाहून जाणाऱ्या पाण्याच्या पुनर्भरणाचे काम करत आहेत.


१३.        अपेक्षा 

विवेकवाडीत पाण्यासाठी येणाऱ्या गुरांची व हरणाची संख्या वाढत आहे म्हणून आज अजून दोन हौद दिमतीला जोडले. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत त्यांचे काम सुरू असते. एवढ्या उन्हातही त्यांचा उत्साह प्रचंड प्रेरणा देणारा आहे. आज तारळकर बंधूना गुरांसाठी पाणी पिण्याच्या हौद दिला. त्यांच्या चेहऱ्यावर खूप काही मिळाल्याचा आनंद होता.आज भर दुपारी एकदम म्हशींचा मोठाच्या मोठा ताफा विवेकवाडीकडे येताना दिसला.जवळपास १०० एक तरी म्हशी असतील.नक्कीच पाणी पिण्यासाठी त्यांना घेवून कुणी तरी आले असेल. त्यांच्या सोबत दोन स्त्रिया, एक वृद्ध मामा व एक वर्षाची छोटी मुलगी. कुरणवाडीतील फुंडकरांची ही सर्व गुरं होती.

त्या मुलीच्या आईला मी विचारले, “एवढ्या उन्हात एवढ्या छोट्या लेकराला घेवून का फिरताय?” .

“काय करणार लई रडती हाय, पण इलाज नाही. पोटा पाण्याचा इचार करावा लागत्तंय की.”

“काय नाव आहे हीच ?.”

“अपेक्षा”

एका हातात एका द्वाड म्हशीला सांभाळत तर अपेक्षाला आपल्या काखेत घेत ती आपल्या म्हशी कशी बशी पाण्याला लावत होती. त्यापण प्रचंड तहानेने व्याकूळ झालेल्या. १५ मिनिटात २००० लिटर पाणी पूर्ण संपले. म्हशीनी पाणी पिल्यावर त्यांना स्वतःच्या तहानेची जाणीव झाली. मी त्यांना संजू व आकाशनी माठात ठेवलेले थंड पाण्याच्या बाटल्या घायला सांगितल्या. ती आई झाडाची सावलीला बसून चिमुकल्या अपेक्षाला पाणी पाजू लागली.

 आज हल्या पण पाहिला. मला नेहमी म्हशीला “ए हल्या ओ...ऐक हल्या हो..” असं म्हणून का आवाज दिला जातो हे कधीच कळले नाही. आज पहिल्यांदाच एक हल्या विवेकवाडीत पाणी पिण्यासाठी आला होता.कुरणवाडी,अंबाजोगाई पासून केवळ ८ किलोमीटरवर. घाटाचा रस्ता उतरून मग थोडा चढाव व डोंगरात बसलेले हे गाव. आजू बाजूला छोटी छोटी लमाण तांडी. डोंगराळ भाग असल्याने पाण्याची सोय नाही. मग पाणीच नाही तर जगायचं कसं. पाण्यासाठी मग दाही दिशा फिरणे आले.शेती फक्त एक हंगामी मग जोड धंदा म्हणून दुधाचा व्यवसाय. काही जणानी खूप चांगल्या पद्धतीने वाढवला पण आज पाण्याची अवस्था पाहता दिवाळी झाली की ह्या लोकांना जनावरांना पाणी मिळावे म्हणून गाव सोडावे लागते.

१४.        तर माणूस अधिक चांगला माणूस होतो हे मात्र नक्की..
 
एकत्र नित्स्वार्थी वृतीने आपल्या देशबांधवांसाठी काम करण्याची मजा काही औरच असते. आपल्या दिनचर्येतील काही तास,वर्षातील काही दिवस व काही जणांना जमलेच तर आयुष्यातील काही वर्ष नक्कीच या पद्धतीने जगावेत. आपल्या जगण्याला एक वेगळीच दिशा व आयुष्याला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. खरं पाहता हे सांगण्या पेक्षा अनुभवणे मस्त असते.

सूरजची नववीतील परीक्षा झाली. दहावीचे उन्हाळ्याचे वर्ग सुरु झाले पण सूरजनी ठरवले होते मराठवाड्यातील दुष्काळ मदत कामासाठी काही काळ नक्की काढायचा. सूरज चक्क पाच दिवस सुट्टी काढून आला. निळोबा आमचा जेसीबी मशीनचा चालक वय २० वर्ष एकदम दिसायला बारका. जेसीबी सारखे अवाढव्य मशीन इतक्या शिताफीने चालवतो की आम्ही अवाक होतो. सुरज व निळोबाची मस्त मैत्री झाली. सूरजणे निळोबा कडून जेसीबी मशीन चालवायला शिकला.

पर्जन्यचा वाढदिवस. साहजिकच आपल्या मित्रांबरोबर,कुटुंबीयांबरोबर तो एखाद्या आलिशान हॉटेल मध्ये साजरा करण्याची आर्थिक सुस्थिती त्याच्या घरची आहे. निळोबा जेसीबी मशीन जवळ शेतात झोपतो. असे मोकळ्या रानात पर्जन्य व त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी निळोबा सोबत झोपायचे ठरवले. कार्तिक तसा थोडा अबोल. पार्थ व गोपाळनी त्याला चांगलेच मोकळे केले. तो पण मस्त गप्पा मारू लागला. गोपाळची आर्थिक स्थिती फार चांगली नाही. त्याला जिल्हाधिकारी व्हायचे आहे. मोठा चिवट मुलगा.छतावरील पाण्याचा वापर करण्यासाठी म्हणून तयार केलेल्या अवघड रचनेला पक्के करण्यासाठी अतिशय जोखमीचे काम तो करत होता. त्याला अनुपमची चांगलीच मदत होत होती.

पार्थ एक चांगला कलाकार. एकांत प्रिय. तो येवून दहा दिवस झाले. कामाच्या नियोजन पासून कार्यवाही,हिशोब तो छान शिकत गेला. त्याही पेक्षा सर्व मुलांचा दादा म्हणून वागत असताना तो इतका सर्वांना मध्ये मिसळून गेला की तो एकांडा किंवा गटात काम करण्याची इच्छा नसलेली कधीच वाटला नाही. अनुपम व पार्थने तर आपले जाणे पुढे ढकलले ...हा एक सुखद अनुभव होता !!!संजू,कैलास व विकास आपल्या गाढवांबरोबर त्यांच्या इच्छे नुसार येतात आणि ते ही भर उन्हात. प्रचंड उष्णतेमुळे गुरांना पिण्याच्या पाण्यालाच ते आपला स्विमिंगपूल करतात व मस्त एन्जॉय करतात. पाणी स्वच्छ आहे का ? संसर्ग होईल का ? हे माझे प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व मस्ती पाहून मनातल्या मनात विरघळतात.

शेतकरी सहसा स्वतःहून बोलायला येत नाही पण त्याला वाटले की समोरचा माणूस मोकळा बोलतो त्यावेळी तो अधिक मोकळा बोलतो. त्यांचे आतिथ्य जोरदार असते. मस्त गाईच्या दुधाचे ताक,पाडाचे आंबे, मसालेदार कालवण व सोबत गप्पा मारायला गावातील राजकारण. या गप्पात गाव पण कळतं व भारतीय राजकारण सुद्धा...श्रीमंत असो किंवा गरीब असो, शहरातील वा गावातील, कुठल्याही स्वभावाचा असो तो नकळत आपल्यावर संस्कार करून घेत असतो. त्यासाठी योग्य ते वातावरण मिळाले पाहिजे

निळोबा पण फार काही बोलत नव्हता. बऱ्यापैकी दूर दूर राहायचा. काल सोबत जेवताना एकदम मोकळा झाला. घरातील परिस्थिती सांगितली. माझ्या शेतात पण जर थोडं खोद काम केले तर आमच्याकडे पण पाण्याची चांगली सोय होईल. आमच्या शेतात असं काम करता येईल का म्हणून त्यांनी विचारणा केली. आज पार्थ,गोपाळ व अनुपम निळोबाच्या घरी जाणार आहेत जेसीबीसह त्याचा पाहुणचार घेणार आहेत व सोबत त्याच्या शेतातील नाला पण मोठा व खोल करणार आहेत.....नुसता संपर्क असून चालत नाही तर सहवास व सामुहिक कृती व ती जर निरपेक्ष असेल तर माणूस अधिक चांगला माणूस होतो हे मात्र नक्की..

१५.        बीड जिल्हाचे ....... वाळवंट होणार का ?

महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी अशा बातम्या दूरदर्शन वाहिन्यावरून एकूण अनेक मित्रांचे फोन व मेसेज आले. कसा झाला पाऊस ? माझं उत्तर असायचं फार नाही. त्यावर ते म्हणायचे की टीव्ही वर तर सांगतायेत खूप पाऊस. मी गेले दिवस बीड जिल्ह्यात व एकूण महाराष्ट्रात कसा पाऊस पडतो आहे व त्याच्या नोदी कशा होत आहेत त्याच्या अभ्यास करत आहे. आज पर्यंत राज्यात सर्वात कमी पाऊस बीड जिल्ह्यात झाला २९० मिलीमीटर. बीड जिल्ह्यात एकूण ६२ मंडल आहेत तिथे शासनाचे पर्जन्यमापक यंत्र आहेत. मी स्वतः ते पहिले आहेत आणि अगदी चांगल्या दर्जाचे आहेत. एका मंडलाच्या आसपास २० ते २५ गाव आणि वाड्या असतात. एकूण ६२ मंडलांपैकी ३४ ( ८५० गावे अंदाजे ) मंडलात ३०० मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडला. त्यातील २४ मंडलां मध्ये सरासरी सामान्य पावसाच्या ५० % पाऊस पण नाही झाला. यापेकी १४ मंडलात सरासरी २०० मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस आहे. भारतात सगळ्यात कमी पाऊस पडणारा भाग म्हणजे राजस्थान मधील जेसलमेर. तिथे वर्षा काठी २०९ मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणजे असेही म्हणता येईल की कमाल ३५० गावे/वाड्या तरी बीड जिल्ह्यात असे आहेत की जिथे भारतातील सर्वात कमी पाऊस पडला. यातील १० मंडले (कमाल २५० गावे ) असे आहेत की जिथे सरसरी १५० मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडला. यातील एक मंडल गेवराई तालुक्यातील मादळमोही असे आहे की तिथे फक्त ९७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सगळी आकडे १११ दिवसाच्या पावसाळ्याची आहेत. अजूनही बीड जिल्ह्यातील मधील दोन मोठ्या धरणात ० % साठा आहे. अजून किती पाऊस पडेल हे सांगणे अवघड आहे.

२ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

ब्लॉग मधून दुष्काळ जीवंत केलास. पुण्या मुंबई ला राहून कळणार नाही..काय असतो दुष्काळ..मी लासुरला असते.. औरंगाबाद पासून 40की.मी. वर.. 46.5...47.0 पर्यंत येथेही उन्हाळा असतो..fan cooler काम करत नाही..
शेताकर्याच्या जखमा फक्त पाऊस मामा देत नाही तर.. सावकार ही देतात..बिबियाणे वाले दुकानदारही देतात..खतावले ही देतात..पोशिन्द्यचा वाली कोणी नाही.

Unknown म्हणाले...

नीता ओसवाल प्रचीती मध्ये होते