शुक्रवार, १२ जून, २०२०

अक्षर विवेक ....विवेकराव कुलकर्णी


१९९३,ज्ञान प्रबोधिनीच्या पुण्याच्या वास्तूत माझा तो पहिलाच दिवस. सुबोध कुलकर्णीबरोबर प्रचीतीच्या
सदस्यांसाठीचे व्याख्यान ऐकण्यासाठी आलेलो होतो. व्याख्यानानंतर सुबोधने विवेक कुलकर्णीसरांची ओळख करून दिली. पुढील काही मिनिटात चालत चालतच सरांनी मला अनेक प्रश्न विचारले. त्यांची प्रश्न विचारण्याची लकब,त्यातील आपुलकी,सहजता वेगळे वाटत होते काही तरी. आवाजातील फारसे चढउतार नसताना संवादावरील त्यांची पकड व त्यातून माझे त्यांच्याशी निर्माण झालेले मैत्र हे मी आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होतो. त्याच्या विचारात माझे पुढील दोन दिवस गेले.

वेळ मिळेल तसे माझे प्रबोधिनीत येणे होत असे. गांधी वस्तीतील काम, प्रचीतीचे अभ्यास शिबीर यात थोडीफार प्रचीतीची व त्याच बरोबर सरांची ओळख होत होती. शाळेत व महाविद्यालयात मी चांगला खेळाडू होतो याची कल्पना सरांना येताच आमचा संवाद अधिकच वाढला. ते स्वतः पट्टीचे खेळाडू प्रबोधिनीच्या दलावर कबड्डी व खो खो प्रचंड Passion ने ते खेळायचे. खेळाचे कौशल्य व जिंकण्यासाठीच्या रणनीती ते वेगळ्याच पद्धतीने सर्वांना शिकवायचे. कब्बडीतील भौतिकशास्त्र अशा अकल्पित चर्चा पण व्हायच्या. दलानंतर चुरशीने लावलेल्या जोर बैठकांच्या स्पर्धातून अनेक जणांची आयुष्य सामर्थ्यवान बनली. अगदीच अलीकडचा काळ सोडला तर प्रबोधिनीच्या प्रशिक्षण वर्गातील संध्याकाळच्या दलावर चौरस धावा ( बेसबॉल) खेळणारे सर व त्यांनी झेप मारून पकडलेले चेंडू हे सगळेच डोळ्यासमोर सहज येतात. खेळातून जोपासली गेलेली त्यांची खिलाडूवृत्ती त्यांच्या सोबतच्या सर्वांना प्रचुर अनुभवायास मिळते. पायाचे दोन फ्रॅक्चर होऊन सुद्धा त्यांची जिकर मात्र कमी झाली नव्हती.

प्रबोधिनीचा विस्तार देशव्यापी व्हावा यासाठी विस्तार शिबिरांची रचना करण्यात आलेली होती. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच सांगलीच्या विस्तार शिबिरासाठी विवेकसर गेलेले होते. डॉ.संतोष काकडे व सांगलीतील इतरांशी त्याचे मैत्र घट्ट झाले. व्यक्तीची ओळख करून घेणे म्हणजे त्याच्या कुटुंबाशी ओळख, कुटुंबातील प्रत्येकाशी ओळख आणि त्या ओळखीचे सहजच घट्ट नात्यात रुपांतर ही सरांची खासियत. अनेक वर्षानंतर आपण जरी सरांना भेटलो तर आपल्या कुटुंबाची अगदी नावानिशी विचारपूस करणे हे सगळ्यांचा अनुभवयास येते. अफाट स्मरणशक्ती,वागण्यातील सहजता व आपलेपणा व न विसरता संपर्कात राहण्याची त्यांची हातोटी अजबच आहे. प्रबोधिनीतील माझे इतर गावातील सहकारी ,मित्र व ज्येष्ठ अंबाजोगाईला घरी आल्यावर माझी आई फारशी त्यांच्याशी बोलत नसे. विवेकसरांच्या बाबत मात्र खास अपवाद. तुमच्या सगळ्या प्रबोधिनीत विवेकसर मला आपला माणूस वाटतात हे मात्र ती सांगायला विसरत नाही. हा फक्त माझाच अनुभव नाही तर त्यांच्या सहवासातील प्रत्येकाला हे अनुभवायास येते.

मुंबईला IIT पदव्युत्तर शिक्षणासाठी गेल्यावर पण त्यांचे प्रबोधिनीचे व सांगलीचे नाते अतूट राहिले. शिक्षणातील सर्वोच्च म्हणजे विद्यावाचस्पती ही पदवी प्रबोधकांनी घेतली पाहिजे हा आ. आप्पासाहेबांचा आग्रह असे. सरांनी पण आपले Phd चे शिक्षण होताच मोठ्या पैशांची नोकरी, बहुराष्ट्रीय कंपनीतील आलिशान जीवन हे सगळे दूर सारत प्रबोधिनीचे व अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकवण्याचे काम सुरु केले. प्रशाला, दल व महाविद्यालयातील शिकवणे यात त्यांच्यासोबतच अनेक मुलं असत. सर्व वयोगटाशी संवाद साधण्याची कला हे त्यांचे अजून एक वेगळेपण. अंबाजोगाई आल्यावर येथील शिशुविहारच्या मुलांबरोबर,प्रबोध शाळेतील मुलांशी, स्पर्धा परीक्षेच्या युवकांशी त्याच बरोबर गीता प्रबोधिनीच्या आजी आजोबांशी सहज संवाद करत सर्वांना आपलेसे करणारे विवेकसर. अहंकाराशिवायचा आत्मविश्वास हे सरांचे खास वेगळेपण.

प्रबोधिनीचे नेतृत्व विकासाचे प्रयोग महाविद्यालयातील युवकांपर्यंत पोहोचावेत यासाठी प्रयत्न सुरु होते. विवेकसरांनी त्याला गती देण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यातून निर्माण झाली प्रचीती. माझ्यासोबत अनेकांना आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण होण्याचा तो काळ होता. पुण्यातील अनेक महाविद्यालयात प्रचीतीची सुरुवात झाली. व्याख्यानमाला, अभ्यास दौरे, अभ्यास शिबिरे सुरु झाले. अनेकांच्या आयुष्यात खूप मोठा बदल होण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. सर युवक विभागाच्या कामासोबतच प्रचीतीसाठी खूप वेळ देऊ लागले. दिवसाच्या प्रत्येक मिनिटाचे नियाजन करणे हा वेगळाच अनुभव त्यांच्या सोबत काम करताना आला. मी अरुणाचल प्रदेशातून अंबाजोगाईला परतलो. अंबाजोगाईत प्रबोधिनीच्या कामाची सुरुवात करण्याचा मानस होता. काही दिवसांतच सर अंबाजोगाईला आले. भरपूर चर्चा झाली. शेवटी कागद पेन घेऊन माझ्या पूर्ण दिवसाचे नियोजन त्यांनी करून दिले. त्यांच्या सहवासातील प्रत्येकाच्या अगदी छोट्यात छोट्या गोष्टी ध्यानात घेऊन त्यांचा दिनक्रम अधिक परिणामकारक होईल यासाठी सरांचा खास प्रयत्न असतो. कित्येकांच्या आयुष्यातील अगदी बारीकसारीक समस्या अगदी सायुज्यतेने ऐकून त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी अनेकांना सहाय्य केलेले आहे.

सोबतच्या व्यक्तीला सलगी देण्याचे अफाट सामर्थ्य त्यांच्या ठाई आहे. अनेकानी त्याचा अनुभव त्यांच्या सोबतच्या अनेक ट्रेक्स मधून यायचा. शहराच्या गोंगाटापासून दूर जायचे,स्वतःच्या क्षमता प्रचंड ताणायच्या, शरीराच्या प्रत्येक पेशीला पूर्ण क्षमतेने प्राणवायू मिळाला की मन व मेंदू एकदम स्वच्छ आणि मोकळे होते. त्यानंतर मग आपल्या स्वतः बद्दल खूप मोकळेपणाने सगळे बोलायचे. आपले स्वप्न, आपल्या इच्छा यांची देवाणघेवाण व्हायची. एकमेकांचे घट्ट नाते व्हायचे. विवेकसरांच्या सोबतच्या अनेक आठवणी व किस्से अनेकांच्या आठवणीत आहेत. सर अशा सर्व साहसांच्या मध्ये सगळ्यांची खूप काळजी घ्यायचे. सचिनचा पाय एकदा अचानक घसरला व तो खोल खाली जाऊन पडला. सरांनी सरळ खाली जाऊन त्याला आपल्या पाठीवर घेऊन अतिशय अवघड चढण पार केले. त्यांच्यातील वत्सलता अनुभवणे हा भावनेच्या सुंदर विश्वात नेणारा अनुभव असतो.

ते जसे साहसी व जोखीम घेणारे होते तसेच ते खूप विनोदी व मिश्कील पण आहेत. अशाच एका साहसात त्यांना काही अंडी दिसली. त्यांनी अतिशय गंभीरपणे मुलांना सांगितले हे सशाची अंडी. सगळे जण अपार कुतुहलाने ती अंडी पाहात होते व एकमेकांना सांगत होती सशाची अंडी. मजेदार वातावरण तयार झाले व सर हसून म्हणतात कारे ससा खरंच अंडी घालतो का ? आणि सगळ्यांच्यात एकदम हशा पिकतो.


उदात्त करुणा, समाजातील वंचितांसाठी काहीतरी करण्याची आणि परिणाम घडू शकतील अशा लोकांच्यावर समाजासाठी काहीतरी कृती करण्याचा संस्कार करण्याची तळमळ सरांच्यात प्रचंड आहे. पडसऱ्यातील शंभर दिवसांची शाळा, त्यातून पुढे उभे राहिलेले साखर शाळेचे मोठे जाळे, ग्रामीण भागातील प्रज्ञावंतांना शोधून त्याचा चौफेर विकास घडवून आणण्यासाठीच्या ग्रामीण प्रज्ञा विकास प्रकल्पाच्या नियोजनात, कार्यवाहीत व त्यावरील सम्रग चिंतनासाठी सरांनी खूप वेळ दिला. आज मी मराठवाड्यातील अनेक ऊसतोड कामगारांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत विचारतो त्यावेळी कुठल्यातरी आश्रमशाळेत, गावातील वस्तीगृहात आणि अगदीच शेवटी कारखान्यावरील साखर शाळेत मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था नक्की होते हे दिसून येते. यासाठीचे मुळातील प्रयत्न सरांनी व त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांनी केलेले आहे हे माहिती असल्याने नकळत खूप छान वाटून जाते. वंचितांसाठी काम करण्याऱ्या अनेक संस्थांशी, संघटनाशी सरांचा जवळचा संपर्क. त्याच्या सोबत मराठवाड्यातील असा अनेक संघटना व व्यक्तींशी जवळून परिचय झाला.याच सोबत माझ्यासारख्या अनेक सुखवस्तू मध्यमवर्गीयांचे वंचितांच्या वेदनेशी नाते जोडणारे विवेकसर हा मोठा प्रभावी दुवा आहेत.


समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जसे सामाजिक नेतृत्व विकसित झाले पाहिजे त्याचबरोबर प्रशासकीय नेतृत्व पण समाजकेंद्रित काम करणारे उभी राहिले पाहिजे. प्रबोधिनीचा हा विचार व त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी सरांचे प्रयत्न सुरु होते. अगदी सुरुवातीला गोडबोलेसरांची व्याख्याने, स्पर्धा परीक्षेचे अभ्यासिका व मुलांना व्यक्तिगत मार्गदर्शन व समुपदेशन प्रबोधिनीत सुरु झाले.सरांचा कामाचा झपाटा फारच भारी. त्याच बरोबर अनेक काम हाताळण्याचे त्यांचे कौशल्य. जगातील उत्तमात उत्तम व नवीन काय चालू आहे हे समजून घेण्याची त्यांची मोठी ताकद. हे सगळे करत असताना ते फक्त स्वतः पुरते न ठेवता इतरांच्या मध्ये संक्रमित करण्याचे त्यांचे प्रयत्न. या सगळ्याचे अनुभव घेताना तृप्त झालेलं मन. थोडे व्यक्तिगत होतंय पण हे अनुभव फक्त माझ्या एकट्याचेच नाहीत.


अंबाजोगाईत स्पर्धा परीक्षा केंद्राची सुरुवात करताना अगदी UPSC मुलांना शिकवणारे सर चक्क दोन दिवस आठवीतील मुलांचे NTSEचे शिबीर घेतात. कधी प्रशालेतील छोट्या मुलांना जोनाथनची गोष्ट सांगतात. त्यांचा विविध क्षेत्रातील वावर खूप समृद्ध करणारा असतो.

लातूरचा भूकंप झाला. प्रबोधिनीचे मदत कार्य सुरु झाले होते. मला पण मदतीसाठी जाण्याची इच्छा होती. माझ्या मनाची तयारी झाली व सरांनी माझ्यासमोर पुढील दोन महिन्यांचे नियोजन दिले. इतक्या सहजपणे फारशा अनुभवी नसणाऱ्या तरुणावर विश्वासाने जबाबदारी देणे मला अचंबित करत होते. योग्यवेळी योग्य मार्गदर्शन, भावनिक पाठिंबा, वैचारिक रसद याची योग्य ती दक्षता मात्र ते अगदीच काळजीने घेत होते. काही महिने होतात तोच अण्णासाहेब हजारेंचे आंदोलन सुरु होणार होते. त्यांच्या आंदोलनाला मदत करण्याचे सगळ्यांचे ठरले. अण्णाच्या सोबत राहायचे हा मानस मी सरांच्यासमोर व्यक्त करताच लगेच होकार देऊन पुढील कामाची दिशा व नियोजन यासाठी सोबत राहून धैर्य देण्याची त्यांची हुकुमत जबदस्त आहे. पुढील पंधरा दिवस खूप शिकायला मिळाले. सरांशी दररोज बोलणे व्हायचे. महाराष्ट्रभर आंदोलनाची भूमिका व तपशील सर्वाना कळावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. उपोषण संपले व सरांना भेटण्यासाठी मी व सुबोध प्रबोधिनीत आलोत. आमचा एकूण अनुभव त्यांनी तासभर शांतपणे ऐकूण घेतला. त्यानंतर त्यांनी आम्हाला आलेला अनुभव कसा समजून घ्यायचा ? तो आपल्या जगण्याचा भाग कसा करायचा ? त्यातील Learning Outcome नेमके काय ? हे खूप छान पद्धतीने समजून सांगितले. त्यांची विश्लेषण करण्याची पद्धत अफलातून आहे. ती खूप विवेकनिष्ठ,नेमकी, मुद्द्यांना धरून व आपल्याला खूप काही शिकवणारी असते. कधी कधी ते किती कीस पाडत आहेत असे वाटते परंतु काही काळानंतर त्या विश्लेषणाचे महत्व आपल्या कळते.


थोडा निवांत वेळ मिळाला होता बऱ्याच काळानंतर. ‘सिद्धार्थ’ हर्मन हेसेचे पुस्तक सरांनी मला वाचयला दिले. पुस्तक वाचायला घेतले आणि त्यात इतका गढून गेलो की काही तरी सापडतंय असे वाटायला लागले. दोन दिवसात पुस्तक संपून सरांना भेटायला परत प्रबोधिनीत. पुस्तकावरील चर्चा खूपच छान झाली. त्यांची पुस्तक समजून घेण्याची पद्धत समजली. त्या पद्धतीने परत एकदा पुस्तक वाचून पाहिले. पहिल्या वाचनात व दुसऱ्या वाचनातील फरक खूपच मोठा होता. जगण्याची कला व लय मिळाल्या सारखे वाटले. बहिणींच्या लग्नात थ्री पीस सूटसाठी रुसून बसणारा मी विवेकानंद केंद्राचा जीवनव्रत्ती होण्याच्या मार्गावर आलो. हा निर्णय ज्यावेळी मी त्यांना सांगितला त्यावेळी खूप नेमके प्रश्न व दिशा मिळावी यासाठी खूप स्पष्ट बोलणे, थोडे वाईट वाटले पण पुढच्या आयुष्यासाठी खूप महत्वाचे ठरले. असे कित्येकांच्या आयुष्याचा वाटा ठरल्या, बदलल्या व योग्य दिशेने प्रवास सुरु झाला ते सरांशी बोलून.

सरांचे वाचन अफाट आहे. रशियन मीर प्रकाशनाच्या पुस्तकांचे ते खास चाहते होते. अनुभव,साधना सारखी अनेक मासिके. ज्ञानाच्या प्रांतातील जवळपास सगळ्याच विषयांवरील सरांचा वाचन प्रपंच मोठा आहे. अनेकांना ते पुस्तक भेट म्हणून द्यायचे. त्यांच्या ठेवणीतील काही खास पुस्तके त्यांनी मला नेहमी करता दिली. जगाच्या पटलावर येणारे नवनवीन विचारप्रवाह समजून घ्यायला त्यांना आवडते. त्याच्याआधारे भविष्यातील परिस्थिती कशी असेल या अनुषंगाने भविष्यवेध (futurology) शास्त्राचा त्यांचा अभ्यास खूपच दांडगा होता. प्रबोधिनीतील मुलांना समजून सांगतानाचे त्यांचे तास खूप रंगायचे.भवितव्य लेख ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यपद्धतीचा खूप महत्वाचा भाग. त्यासाठीच्या बैठकी, तो लिहितांनाचा नेमकेपणा, एकदा साधनसूत्र व कार्यदिशा ठरल्यावर होणाऱ्या कामाचा घ्यावयाचा आढावा या सर्वात सरांचे योगदान खूप मोठे असते. ते खूप टिपणे काढतात, वेगेवगळे कोष्टक तयार करतात, अनेक फ्लोचार्ट आणि त्यांचे खूप व्यवस्थित documentation. कित्येक वर्षांच्या पूर्वीचे संदर्भ सहजच आपल्याला त्यांच्याकडे मिळतात. अर्थात प्रबोधिनीतील सर्वच ज्येष्ठ मंडळीची ही खासियत आहे. त्यांच्याकडे प्रचंड भांडार असते. आपण नुसते एखादा विषय त्यांच्या समोर माहितीसाठी घेऊन गेलोत की अगदी सगळेच काही आपल्या समोर ठेवले जाते. सगळे समजून घेत घेत सहजच आपल्या पुढ्यात चहा येतो व एकदम निवांतपणे समजून घेणे होते.


नाविन्याची जशी त्यांना ओढ आहे तशीच प्रबोधिनीच्या उपासनेवर त्यांची नितांत श्रद्धा आहे. त्यांची नियमित उपासना होते. त्यावरील त्यांचे चिंतन सर्वांच्यासाठी आत्मगत चिंतन असते. मानसशास्त्राचे, योगशास्त्राचे विवेचन व्यवहारातील अनेक दाखले देत ते समजून सांगतात. दर शनिवारचे त्यांचे उपासनेनंतरचे चिंतन मनातील तमस, अंधकार, दुर्बलता, अवस्थता कमी करून अधिक कार्यक्षम होण्यासाठी खूपच उपयोगी ठरते.
गेल्या काही वर्षात या सर्वांच्या सोबत विवेकसर व सविताताईनी खूप जास्त वेळ स्पर्धा परीक्षा केंद्राच्यासाठी दिला. आजच्या घडीला जगातील अनेक देशात,देशाच्या सगळ्याच राज्यात व महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रबोधिनीतील शिकलेला अधिकारी पाहायला मिळतो. फक्त मार्गदर्शन करून त्यांना यश मिळून देणे हे त्यांना कधीच अपेक्षित नव्हते. त्या सर्व अधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम करून देशाचे वैभव वाढवावे ही यामागील मुळातील भावना. अशा अनेक कार्यक्षम अधिकाऱ्यांचे एकमेकांशी साहचर्य असावे. त्यातून चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्यांचा एक मोठा संघ निर्माण व्हावा. त्यातून देशासमोरील प्रश्नांवर प्रभावी उत्तर मिळावे हे सर्व काही होते. सर व ताई विद्यार्थ्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे. माझ्यासारखा पूर्णवेळ समाजकार्य करणाऱ्यासाठी थोडे ते वेगळे वाटायचे. खूप वेळ जातोय सरांचा यात असे सहज रिमार्क पण आम्ही करायचो. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी मीटिंगचे सगळे आढावे ज्यावेळी माझ्यासमोर येत होते त्यावेळी सर व ताईंनी त्यासाठी घेतलेलं अथक परिश्रम त्यात ओतलेली भावनिक व वैचारिक उर्जा याचे महत्त्व समजून येते. एकीकडे अधिकारी मीटिंग चालू होत्या तर दुसरीकडे अनेक विद्यार्थ्यांना समुपदेशन व मार्गदर्शन चालू होते.
प्रबोधिनाच्या माजी विद्यार्थ्यांचे संघटन हा सरांच्यासाठी खूप महत्वाचा विषय. त्यांचा त्यासाठी सतत संवाद चालू असतो. प्रशालेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. त्यासाठी अनेक विद्यार्थ्यांशी संपर्क,संवाद सुरु झाले. त्यातून एक सुंदर कल्पना सुचली ‘विशेष उद्दिष्ट गट’. या सर्वांच्यासाठी सरांनी खूप प्रयत्न केले. त्या सर्वांचे सादरीकरण पाहात असताना त्याचे देशाच्या भविष्याच्या दृष्टीने महत्व सर्वांनाच समजत होते. या सर्वातील क्षपणकाचे काम सरांचे होते.

अनेक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना घडवणारे सर मुलखाचे साधे आहेत. प्रसिद्धी,पद,पैसा यात ते कधीच अडकले नाहीत. त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचे म्हणजे सगळ्यांनी सगळ्याच बाबतीत स्वावलंबी बनावे यासाठी त्यांचा खूप प्रयत्न असतो. त्यांना भावनिक, वैचारिक त्यांच्यावर कुणाचे अवलंबन फारसे रुचत नाही. ते सर्व प्रकारची मदत करून समोरील माणसाला स्वावलंबी बनवतात. या ही पुढे जाऊन तो इतरांच्यासाठी मार्गदर्शक व रोलमॉडेल बनतो.

२०२०,जवळपास सहा महिन्यापूर्वी सरांना भेटलो. प्रचीती बाबत चर्चा झाली. आम्ही प्रचीतीतील सर्वांनी एकमेकांच्याबाबत लिहावे असा काही चर्चेचा सूर होता. मी आपले मनाशीच म्हणालो सर तुमच्यावर कोण लिहील ?.....मी लिहू का ? यावर त्यांचे उत्तर काय असेल असा अंदाज बांधत होतो. ‘‘कुणी तुला हा चावटपणा करायला सांगितला.’’ ते असे म्हणतील हे पक्के वाटत होते. त्याही पुढे जाऊन दोन खास शिलकीतील शाब्दिक जोडे पण मारले असते. कुणी त्याचे गोडवे गावे हे त्यांना अजिबात न रुचणारी गोष्ट. गेले अनेक महिने भरपूर काम करून थोडे फार बळ मिळवले.लिहिताना मात्र प्रत्येक क्षणी जाणवत होते की शब्दात त्यांना मांडणे अवघडच. ते स्वतःच अक्षर आहेत त्यांना अक्षररूपात समजून घेण्याचा हा छोटा प्रयत्न.