शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५

मराठवाड्यातील युवकाची स्फूर्ती गाथा ...व्यंकटराव भताने


  

अंबाजोगाई तालुक्याच्या पूर्वेला डोंगराळ पट्यात एक छोटे गाव ‘भतानवाडी’. गावातील सर्वांचे आडनाव भताने. मानाजीराव भताने आपल्या परिवारासह इथे आपला प्रपंच चालवत होते. आपल्या पत्नी सह कोरडवाहू शेतीत राब राब राबावे हा त्यांचा दिनक्रम होता. व्यंकट हा त्यांचा सर्वात लहान मुलगा. मानाजीरावांचा मोठा मुलगा आणि व्यंकट यांच्या वयात मोठे अंतर.शिक्षणाचे वारे भतानवाडीत आता सुरु झाले होते. गावातील प्राथमिक शाळेत व्यंकट जाऊ लागला. तो एक भारी  चुणचुणीत मुलगा. चौथी पर्यंतचे शिक्षण आनंदात झाले. पुढे शिकायचे असेल तर चार किलोमीटर लांब असणाऱ्या उजनीच्या शाळेत पायी जावे लागायचे. गावातील सर्वच मुलं शिकण्यासाठी उजनीला जाऊ लागली. शाळेतील शिक्षणाचे संस्कार उत्तम होते. व्यंकटची शिक्षणातील रुची आणि गती वाढली.शाळेच्या ओढीने उन्ह पावसात आठ किलोमीटर चालणे त्यामुळे फारसे जिकीरीचे वाटलेच नाही. आपल्याला पाहिजे ते साध्य करायचे असेल तर परिस्थितीशी निकराने लढावे लागते हे व्यंकट लहान वयातच शिकत होता.तसा तो जिद्दी आणि कष्टाळू होता.

 

निवडणुकीचे वारे सर्वत्र जोरदार वाहत होते. बीड लोकसभा मतदार संघातून क्रांतिसिंह नाना पाटील उभे होते. त्यांची एक सभा उजनीला आयोजित करण्यात आलेली होती. व्यंकट आणि मित्र शाळा सुटल्यावर परत गावी जायचे सोडून थेट सभेला गेले. रात्र झाली. गावात मुलं नाही परतली म्हणून काळजीचे वातावरण होते.सगळे पालक आपल्या मुलांना शोधण्यासाठी उजनीला निघाली. भरपूर शोधाशोध केल्यावर सभेच्या ठिकाणी मुलांचा ठावठिकाणा लागला. कातावलेल्या पालक मंडळीनी पोरांना चांगलाच दम भरला आणि फटके पण दिले. व्यंकटच्या मनात मात्र पत्री सरकारचे जनक क्रांतिसिंह नाना पाटीलांना पाहिल्याचे आणि ऐकल्याचे भारी समाधान होते. याच काळात त्याने हैदाबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थांचे चरित्र पण वाचून काढले. असे नकळतच राष्ट्रीयत्वाचे संस्कार व्यंकटवर होत होते.

 

दहावीच्या परीक्षेत पास झाल्यावर आता पुढेचे शिक्षण अंबाजोगाईला. अंबाजोगाई विद्येचे माहेरघर. अनेक मातब्बर मंडळींचा इथे राबता होता. संस्कार आणि संस्कृती याचा सुरेख संगम अंबाजोगाई झालेला पाहण्यास मिळतो. याच भूमीत हैदाबाद मुक्ती संग्राम चांगलाच लढला गेला त्यामुळे संघर्षाचा वसा अंबाजोगाईकरांसाठीची मोठी ठेव आहे. संस्कार,संस्कृती आणि संघर्ष यातून मनुष्य घडण अंबाजोगाईच्या वातावरणात होते. आता व्यंकटला स्वतः स्वयंपाक करावे लागायचे. सकाळी स्वयंपाक करून मराठवाडा कॉलेजमध्ये शिकण्यास जायचे आणि परतल्यावर रात्रीचा स्वयपाक करायचा. असे चांगलेच वर्षभर चालले. त्यानंतर मात्र त्यांनी खानावळ लावली. अंबाजोगाईचे सेलूकर गुरुजी भतानवाडीत शिक्षक होते. बऱ्याच वेळा त्यांचा मुक्काम शाळेत असायचा. त्यावेळी व्यंकटची आई त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायची. त्याचा परिणाम असा झाला की गुरुजींनी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या व्यंकटला सेलूकर वाड्यात राहायला बोलावले. भल्यामोठ्या सेलूकर वाड्यात व्यंकट चांगलाच रमला. उमेश सेलूकर व त्याची सर्व भावंडे व्यंकटची जिवाभावाची मित्र झाली. भरपूर शिकले पाहिजे याचा संस्कार त्याच्यावर याच काळात झाला. अंबाजोगाईतील मामा क्षीरसागर यांचा सहवास त्यांना याच काळात लाभला.त्यांचे मामाच्या घरी आणि खोलेश्वर विद्यालयात येणे जाणे वाढले. मामा खोलेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. चुणचुणीत तरुण व्यंकट मामाच्या मनात चांगलाच भरला. याच काळात व्यंकटचे पदवीचे शिक्षण पूर्ण होऊन पदव्युत्तर शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात सुरु झाले.

 

रात्री कॉलेज असल्याने दिवसा आपण काही तरी कमावले पाहिजे यासाठी श्री.लाला यांच्याकडे ते सुपरवायझर म्हणून काम करू लागले. पुढे उस्मान आणि पटेल यांच्याकडे ते कामाला लागले. हुतात्मा स्मारक बांधण्याचे काम तीन जिल्ह्यात चालू झाले होते.व्यंकटची फिरती वाढली आणि गावाकडे त्यांचे येणे कमी होऊ लागले. याचा परिणाम असा झाला की घरातील वडीलधार्यांनी व्यंकटचे लग्न ठरवले.ते सगळे केवळ दोन दिवसातच घडले. ३१ मे १९८२ ला व्यंकटचे लग्न झाले. काही दिवसाच्यासाठी तो अंबाजोगाईला आला.

 

इकडे अंबाजोगाईत मात्र वेगळेच काही घडत होते. श्री मामा क्षीरसागर यांच्याकडे ज्ञान प्रबोधिनीचे वामनराव अभ्यंकर आलेले होते. त्यांचे आणि मामाचे खूप स्नेहाचे आणि निरपेक्ष नाते होते. बोलता बोलता एक तरुण कार्यकर्ता त्यांना ज्ञान प्रबोधिनीच्या कामासाठी हवा आहे असे त्यांनी मामांना सांगितले. मामांच्या मनात लगेच व्यंकटचे नाव आले. प्रबोधिनीच्या कामाला आणि वामनरावांच्या साथीला व्यंकट अतिशय साजेसा आणि योग्य ताकदीचा युवक होता.मामानी काही दिवसात व्यंकटला आपल्याकडे बोलावले. त्यांनी पुण्यातील प्रबोधिनीच्या कामाच्या बद्दल त्यांना सांगितले. घडलेले लग्न आणि सध्या करत असलेले काम सांगून व्यंकटने जाण्याची असमर्थता व्यक्त केली. त्यावर मामानी चक्क हुकूमच दिला,“ मी सांगतोय न ......तुला जावेच लागेल.”

 

मामाची प्रेमाची आज्ञा व्यंकट मोडू शकला नाही. आता त्यांचा व्यंकट ते व्यंकटराव प्रवास सुरु झाला होता.थेट पुण्याची बस पकडून व्यंकटराव पुण्यात आले व तेथून सदाशिव पेठेतील ज्ञान प्रबोधिनीत.मामानी दिलेले पत्र त्यांनी वामनरावांन दाखवले.परांडे वाड्यात व्यंकटरावाना भाऊनी आवरून यायला सांगितले. ते एका शिबिरात व्यस्त होते. पुढच्या भेटीच्या वेळी वामनराव व्यंकटरावला म्हणाले, “ मी सांगतो ते नीट लक्ष देवून एका. मी फक्त एकच वेळ तुम्हाला ते सगळे सांगणार आहे. परत तुम्ही विचारायचे नाही आणि मी सांगणार नाही. मी सांगितलेली मोहिम तुम्ही यशस्वी केली तरच मला परत भेटायला या नसता मला नाही भेटला तरी चालेले. आपल्याला आपला मार्ग आहे.”

 

वामनरावांनी सलग न थांबतात निगडीला जाण्याचा मार्ग व्यंकटरावनां सांगितला व सोबत एक पत्र दिले. निगडीत पटवर्धनकाका आणि पांडेकाकांना भेटून ज्ञान प्रबोधिनीसाठी प्राधिकरणात मिळालेली जागा पाहून येण्याची मोहिम ती होती.जर तुम्ही ज्या घरात जाणार आहात त्या घरात चहा पिवून आलात तर मोहिम यशस्वी झाली असे समजा नसतात अपयशी !!” वामनरावांचे शेवटचे वाक्य !! व्यंकटराव पुण्यात पहिल्यांदाच येत होते. त्यांनी याआधी कुठल्याही महानगरात प्रवास केलेला नव्हता. सगळेच काही नवे होते. त्यात ओळखीचे असे कुणीच नाही. वामनरावांचे बोलणे व्यंकटरावने आपल्या मेंदूत पक्के केले आणि ते थेट निगडीला निघाले. अचूक मार्गक्रमण करत ते योग्य ठिकाणी पोहोंचले.पटवर्धन काका व पांडेकाकांना त्यांनी वामनरावांचे पत्र दाखवले. नवनगर विद्यालयाची जागा पाहून आले आणि खास म्हणजे काकांच्या घरी चहा पिवून आले. सर्व काही व्यवस्थित झाले होते. व्यंकटरावांना शिक्षक म्हणून घेणे अशी सूचना वामनरावांनी तसेच त्यांच्या निवासाची व्यवस्था पण करण्यास सांगितले. व्यंकटरावांची निगडीतील घोडदौड सुरु झाली.

 

निगडीत व्यंकटराव शिक्षक म्हणून रुजू झाले. बराच मोठा संघर्ष होता. प्रबोधिनीला न देता ती जागा अनेकांना हवी होती.त्यांना त्यांची शाळा सुरु करायची होती. त्यामुळे अनेक अवघड क्षण आले. गुंडगिरी झाली,हाणामारीचे क्षण आले. व्यंकटराव नेटाने सगळ्यांच्या बरोबर लढत होते. असे संघर्ष उद्दात्त ध्येयासाठी केल्याने व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झळाळी येते असे प्रबोधिनी मानते. संघर्षाच्या बरोबरच शिक्षणात पण प्रगती करण्याचा मानस व्यंकटरावांचा होता. परंतु तिकडे गावाकडे काही वेगळेच घडत होते. केवळ लग्न झाल्यावर दहा दिवस झाल्यावरच व्यंकटरावांनी निगडीत प्रबोधिनीचे काम सुरु केल्याने अनेक वावड्या उठायला लागल्या. त्यांच्या पत्नीच्या वडिलांना काळजी वाटायला लागली. मुलगा रुसून पळून गेला आहे का असे अनेकांना वाटत होते. पत्नीला सोबत आणावे तर राहण्यास जागा मिळत नव्हती. सगळीकडूनच अवघड प्रसंग होता. हे जवळपास दोन वर्षे झाले. शेवटी एक दुसऱ्या मजल्यावरील खोली वामनरावांच्या प्रयत्नांनी मिळाली व शेवटी आशाताई निगडीत आल्या.

 

व्यंकटरावांनी शिकवण्या बरोबरच शिकण्याचा धडाका लावला.त्यांनी अनेक पदव्या मिळवल्या. प्रबोधिनीत कार्यकर्त्यांना शिकण्यास खूप प्रेरणा दिली जाते. एकीकडे ते हिंदी सारख्या विषय शिकत होते तर दुसरीकडे खेळातील अतिशय उत्तम दर्ज्याच्या NIS मधून क्रीडा शिक्षण घेवून आले. अशी त्यांचे अभ्यास विश्व आणि कार्यविश्व वाढत जात होते. याच काळात अजून एक संकट आले. व्यंकटरावांना आपली असलेली खोली सोडावी लागली. आता काय करणार हा मोठा प्रश्न होता. वामनराव,व्यंकटराव आणि मनोजरावांन चक्क पत्र्याच्या खोल्या बांधून नवनगर विद्यालयाच्या जागेत राहायला आले. आजची भव्य दिव्य वास्तू पाहिल्यावर आपल्याला लक्षात येणार नाही की त्यामागे किती अथक परिश्रम आहेत.पुढे शाळा खूप मोठी झाली. शाळेला अनुदान मिळाले. आता सगळेकाही चांगले चालू होते.जवळपास दहा वर्षे व्यंकटरावांनी निगडीच्या शाळेत काम केले.

 

याच काळात मावळातील साळुंब्रे येथे ज्ञान प्रबोधिनीने शाळा काढावी असा प्रस्ताव पुढे आला. निगडी पासून काही किलोमीटर असणारे साळुंब्रे. आता या नवीन मोहिमेची जबाबदारी कोण घेणार हा मोठा प्रश्न होता. भाऊ (वामनरावांनी ) आपल्या सर्व शिक्षकांच्या समोर आव्हान ठेवले. ग्रामप्रबोधिनीची पहिले कार्यवाह कोण हा मोठा प्रश्न होता. शाळेला जागा नाही. अनुदान नाही विशेष म्हणजे मान्यता पण नव्हती. कोणीच जाण्यास तसे तयार नव्हते. भाऊनी व्यंकटरावांना बोलाऊन घेतले. भाऊ म्हणाले, “ तुम्हाला आयुष्यभर नौकरी करायची आहे की काम करायचे आहे ?”

व्यंकटरावांनी उत्तर दिले, “ काम करायचे आहे !!”

नौकरी तर तुम्हाला आहेच मग आता काम करायला लागा!  यापुढे ग्रामप्रबोधिनीचे कार्यवाह तुम्ही.” भाऊंचा आदेश. ग्राम प्रबोधिनीचे पहिले कार्यवाह व्यंकटराव झाले. मुख्याद्यापक म्हणून  मग दोन वर्षांनी त्यांनी जबाबदारी घेतली. एका वाड्यात केवळ तीन मुलांच्या वर ही शाळा सुरु झाली. प्रचंड परिश्रम घेवून आज ग्रामप्रबोधिनी डौलात उभी आहे. साळुंब्रे आणि परिसरातील मावळ भागातील अनेक मुलांना घडवणारी ही एक विलक्षण शाळा आहे. अनेक प्रयोग येथे चालतात. आज स्वतःची वास्तू आहे,अनुदान आहे आणि खास म्हणजे भरपूर मुलं आहेत. यासोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. यावरच न थांबता मुलांच्यासाठी तंत्रशिक्षणाची व्यवस्था पण करण्यात आलेली आहे.

 

शाळेच्या बरोबर परिसराचा विकास व्हावा यासाठी अनेक प्रकल्प इथे राबवले जातात. पवनामाईचा उत्सव त्यातील एक आहे. साळुंब्रे गाव आदर्श करण्यात ग्रामप्रबोधिनी आणि व्यंकटरावांचा कोठा वाटा आहे. यासोबतच शिक्षकांचे संघटन यासाठी खूप सारे प्रयत्न व्यंकटरावांनी केले. दुष्काळी मराठवाड्यातील भतानवाडी गावातील एक व्यंकट कर्तृत्ववान व्यंकटराव होतो याची ही स्फूर्ती गाथा आहे. ज्ञान प्रबोधिननीच्या शालेय संस्कारात न शिकता थेट तारुण्यात संपर्कात येणाऱ्या युवकाला उमदा नेता बनवण्याची ज्ञान प्रबोधिनीची प्रक्रिया अफलातून आहे !!

 


1 टिप्पणी:

pravin म्हणाले...

व्यंकट ते व्यंकटराव हा बदल छान टिपला आहे.
पण ग्राम प्रबोधिनीचे कार्यातील कसोटी पाहणारे प्रसंग मांडायला हवे होते असे वाटते