सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

“ दादा .....मला जगायचं आहे र दादा ....मला जगायचं आहे ......”

“ दादा .....मला जगायचं आहे र दादा ....मला जगायचं आहे ......”

विश्वनाथ शंकर सरवदे, मुक्काम पोस्ट आपेगाव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड.
शंकर सरवदे शेळ्या मेंढ्या राखायचे. थोडी जमीन ती पण कोरडवाहू. पांढऱ्या मातीने लिंपलेल्या दोन कुढाच्या खोल्या. विश्वनाथ ऊर्फ तात्या त्यांचा धाकला मुलगा.
ज्योतिबांचा "विद्ये विना मति गेली l मति विना नीती गेली ll नीती विना गति गेलीl गति विना वित्त गेले ll वित्ता विना क्षुद्र खचले l इतके अनर्थ एक अविद्येने केले ll हा विचार गावागावात पोहोंचला. त्यामुळे गावागावात शाळा निघाल्या. गावातील पोर शाळेत जाऊ लागले व शिकू लागले.

आमच्या तालुक्यातून पदमश्री पुरस्काराने सन्मानित शंकरबापू आपेगावकर,याच गावचे. गावात पूर्वापार चालत असलेली वारकरी संप्रदायाची भजन कीर्तनाची परंपरा. गाव तस भक्ती रसात भिजलेल. शंकरबापू मृदंग वाजवायचे. त्यांची ख्याती जगभर.

या सर्व पोषक वातावरणात तात्या शिकत होता. पण त्याच्या नशिबी फक्त शिकणं नव्हत त्या बरोबर त्याला, बा बरोबर शेतात राबाव पण लागायचं. शाळेतले चांगल्या घरचे पोर मित्र झाल्याने आपल्या घरची परिस्थिती सुधारली पाहिजे अस त्याला वाटू लागल. शाळेतील मास्तरांनी सांगितलेलं पाटी आणि पोळीच महत्व व समीकरणं पण त्यांनी चांगल ध्यानात ठेवल होत.कष्ट कितीही केलेतरी तो रात्री अभ्यासाला बसायचाच. एक वेगळ्या प्रकारची रग तात्या मध्ये आली होती. चांगला अभ्यास करून तात्या MA (इंग्रजी ) झाला.

एवढं शिकल तरी नौकरी कुठ मिळणार? एखाद्या सेवकाची नोकरी मिळणं पण फार कठीण त्यासाठी पण लाखांनी मोजावे लागतात . आपल्या घरची परिस्थिती तात्याला पूर्ण माहित होती. सुट्टीतला दिवसभर रानात सर्व कुटुंब राबायचं. सगळ्यांना राबण्या शिवाय पर्याय पण नव्हता, नाही तर रात्री चूल घरात पेटली नसती. सूर्य माथ्यावर येई पर्यंत रानात काळ्या आईची सेवा करायची, मग माईन केलली भाकर आणि कालवण मस्त खायचं. उन्हात राबल्या नंतर पाणी आणि अन्नाची चव पण लैच झ्याक लागते. घरच्या लोकांच्या ह्या जीवन संघर्षात व उत्पनाच्या परतेक गोष्टीत तात्याचा सहभाग लहान पणा पासूनच होता.
आज काल आमच्या शहरात कुटुंबातील हा सहअनुभव फारच दुर्मिळ झाला आहे.हॉटेलमध्ये जेवताना, चित्रपट गृहात चित्रपट पाहताना हा अनुभव विकत घ्यावा लागतो. त्यामुळे कुटुंबांसाठी सगळ्यांनी कष्ट करण्याचा सहअनुभव क्वचित मिळतो. आई व बाबा गरजा पुरवणाऱ्या ATM बनतात. त्यामुळे कुटुंब हे आपल्या आस्थेचा विषय रहात नाही. प्रत्येकाला रूम व space असते पण नात्यानात्यात भिंती तयार होतात.
महाविद्यालयात शिकायला आल्यावरच तात्याला लक्षात आलं आत्ता आपल्या भविष्याचे धनी आपणच. इथ काही माय नाही भाकर द्यायला आणि रान नाही ज्वारी पिकवायला. तात्या अभ्यासात बरा असल्यानी त्याने लहान पोरांची शिकवणी घ्यायला सुरु केली. त्याचा हा अनुभव पुढे त्याला फारच कामी आला. आपल्या मेहनतीने मिळवलेला एक एक पैश्याच मोल तो जाणत होता.

कुठलही कष्ट न करता बाप कमाईवर किवा कुठलाही घाम न गाळता मिळालेल्या पैशानी आपल्या चीभेचे चोचले पुरवत ताटात अन्न टाकणारे माजुरे लोक अवती भवती दिसले की मस्तक भनक्त.नको तिथे वाढलेली चरबी व वजन कमी करण्यासाठी ह्या लोकांना पैसे देऊन डॉक्टरकडे जाताना पाहिलं की तात्या सारखे लोक आपले सोयरे आहेत यात समाधान वाटत.

तात्यांनी अंबाजोगाईत “प्रगती कोचिंग क्लासेस” या नावानी शिकवणी वर्ग सुरु केले. लहान मुलांना शिकवण त्याला नवख नव्हत. गावातील कर्ते लोक व्यावसायिक व सामाजिक कामात व्यस्त असत.आपल्या व्यवसायामुळे व सामाजिक जिम्मेदारी मुळे त्यांना आपल्या निर्मिती साठी फारसा वेळ नसे. बड्या लोकांच्या या मुलानसाठी शाळेतील शिक्षक स्वतःच्या घरातच शिकवणी घेत असत. शिक्षकाला पैसे देऊन विद्या विकत घेता येते हे बाळकडू गावातील कर्त्या लोकांच्या मुलांना एकदा समजल की मग ते गावासाठी काय करणार? त्यातल्या त्यात पैसा न घेता. परीक्षेच्या ऐक दोन दिवस आधी गुरुजींनी दिलेला guess paper परीक्षेत जश्याचा तसा आला की मुलं खुश, शिक्षक popular व पालक मुलांचे मार्क पाहून आपण किती चांगल्या प्रकारे कर्तव्य पारपाडत आहेत हे समजात मिरवायला मोकळे.

अश्या या शैक्षणिक माहोल मध्ये इंग्रजी सारख्या विषयाचे शिकवणी वर्ग, त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील व बहुजन समाजातील एखादा तरुण ज्यावेळी यात उतरतो त्यावेळी त्याला थोडं अवघड जात. निसर्गाच्या सहवासात राबलेल्याना रासायनिक खतानी समृद्ध झालेल्या हायब्रीडच्या दुनियेशी जुळून घेण फारसं अवघड जात नसत. कारण त्याच्या रोमा रोमात लढाऊ पण मुरलेल असत. बाजारू समाजव्यवस्थेची प्रचार व आचार पद्धतीनची आता तात्याला चांगली ओळख झाली होती. थोड्या महिन्यात तात्याच्या क्लासेसला बऱ्या पेकी मुलं यायला लागली.

तो दरवर्षी वेगळ्या वेगळ्या स्पर्धांचे व परीक्षांचे आयोजन आपल्या क्लासेसच्या नावाने करत असे. मग यशस्वी झालेल्या पहिल्या ३ मुलांना रोख बक्षीस व पुढील एक वर्षाचा शिकवणी वर्ग मोफत. एकदा ही मुलं तात्याकडे क्लासला जातात म्हंटल की मग प्रत्येक फुकट मुला बरोबर पैसे देऊन दहा मुल यायची. अश्याच एका बक्षीस समारंभात तात्याची आणि माझी ओळख झाली.

ठेंगणा, आपल्या मातीचा पक्का रंग घेतला होता त्याने. मध्यम शरीरयष्टी, हसरे व बेरकी डोळे. अंगावर पांढरा सदरा व काळी विजार.सदा कुठल्या तरी लगबगीत. त्याच गतीन त्याच बोलणं थोड ग्रामीण ढंगाच. तो बोलयला लागला की वाटे त्याचे पूर्ण शरीरच बोलतंय.
“नमस्कार दादा”, तात्यांनी हसत अभिवादन केले.
तो लगबगीने माझ्या जवळ आला व हात हातात घेतला.
मी मजेत म्हणालो, “ काय तात्या क्लासेस जोरात का ? आता काय चाटे कोचिंग क्लासला मागे टाकणार तू.”
“नाहीर दादा ! आपलं थोडं फार चाललं आहे. मोठ्यांची गोष्टच लई न्यारी.” तात्या तोडा लाजत व मान खाली घालून बोलत होता.

तात्याचे “प्रगती कोचिंग क्लासेस” आमच्याच वसाहतीत पोखारीकरांच्या घरात चालत. तिथे त्यांनी दोन खोल्या भाड्यानी घेतल्या होत्या. दिवसा शिकवण्या व इतर वेळा मग घर म्हणून. हळूहळू खूप कष्टानी “प्रगती कोचिंग क्लासेस” ची चांगलीच प्रगती होत होती. शंभराच्या पुढे संख्या गेली. ज्ञान प्रबोधिनीचा व त्याचे चांगले नाते बनायला लागले. तो MPSC या परीक्षेचची तयारी करणाऱ्या गटाचा सदस्य पण झाला व त्याचे प्रबोधिनीत येण जाण वाढल. ज्ञान प्रबोधिनीची शिशुशाळा अंबाजोगाईत चांगल्या बालशिक्षणासाठी प्रसिद्ध होती. तात्याचा एक भाऊ शेती करायचा. त्याचा मुलगा वैजनाथ ऊर्फ वैजू ४ वर्षाचा व गावाकडे होता. तात्यांनी त्याला अंबाजोगाईत आणायचं ठरवलं.

वैजू.....रोडका पहिलवान, एका जागी बसने अवघड,थोड्या दिवसात त्यांनी केशवनगर मधील अबाल वृद्धांची मैत्री पूर्ण ओळख झाली.शिशुविहार मधील काही संस्कृत श्लोक तर वैजूच्या मागच्या कोणत्याच पिढ्यांनी उच्चारले पण नसतील पण काही दिवसातच वैजूला ते नीट उच्चारसह मुखपाठ पाठ झाले. खरच मला नेहमी प्रश्न पडतो अरुणाचल मधील वनवासी बंधू किवा वैजू सारखे आपल्या भागातील अनेक छोटे मुलं पाहून, का आपण हे मौल्यवान ज्ञान सर्व लोकांपासून दूर ठेवल? केवढा समृद्ध झाला असता आपला समाज व संस्कृत भाषा. स्वामी विवेकानंद म्हणतात,“Let New India arise in your place. Let her arise - out of the peasants' cottage, grasping the plough; out of the huts of the fisherman, the cobbler, and the sweeper. Let her spring from the grocer's shop, from beside the oven of the fritter-seller. Let her emanate from the factory, from marts, and from markets. Let her emerge from groves and forests, from hills and
mountains..” त्याची अनुभूती अशी नेहमी येते.

वैजू बरोबर, त्याची व तात्याच्या भाकरी व कालवणाची सोय करण्यासाठी तात्याची आई पण अंबाजोगाईत आली. अंगावर नऊवार पातळ,डोक्यावरून पदर, मोठ कुंकू, ठेगणी व अतिशय शिडशिडीत देहंयष्टी, पक्का ग्रामीण पण खमका आवाज. बोलण्यात स्पष्टपणा पण मनात खूप आपले पणा. वर्षात फक्त दोनच पातळ मी त्यांच्या अंगावर पहिले. चेहऱ्यावरच्या सुरुकुत्या, हात व पायावरी भेगानी, त्यांनी केलेल्या शरीर श्रमाचा अंदाज यायचा..

“अव परसाद दादा, आमच्या विशवनाथा कड व वैजनाथा कड लक्ष द्या”, आपुलकीने ती माऊली म्हणायची.

वैजू चा खास मित्र म्हणजे ओंकार. ओंकार आणि वैजूची जोडी म्हणजे गोऱ्या कुरुळ्या केसांच्या व बोबड बोलणाऱ्या गोपाल कृष्णाची व आमच्या सावल्या रंगाच्या पांडुरंगाची. दोघं मिळूनच शाळेत यायचे,बसणार जवळच, दिवस भर एकमेकाच्या घरी. संध्याकाळी प्रबोधिनीत उपासना व्हायची. हे दोघे मित्र बरोबर यायचे. त्यांना उपासनेतील मंत्रांचा अर्थ समजणे अशक्य. पण दोघंही ऐटीत असायचे. एक दिवस ओंकार विवेकानंदांचा एक विचार पाठ करून आला.
“दादा, मी एक स्वामीजींचा विचार पाठ कलून आलो आहे सांगू का ?”, ओंकार नेहमीच्या आपल्या बोबड्या स्वरात म्हणाला.
सांग म्हटल्यावर तो उठला व स्वामीजींची पोस घेत तो सर्वांच्या समोर म्हणाला, “उठा ! जागे व्हा ! आणि ध्येय प्राप्ती शिवाय थांबू नका.” व यानंतर तो थोडा वेळ थांबत जोशात म्हणाला, “ स्वामी विवेकानंद.”

सर्वानी त्याच जोशात ते वाक्य मागोमाग म्हंटल. त्या दिवसां पासून असे विवेकानंदांचे विचार उपासनेत म्हणण्याचा नित्यक्रम प्रबोधिनीत सुरु झाला.

कधी ओंकार तर कधी वैजू. स्वामीजींचे अवघड अवघड विचार मुलाना सहज पाठ होऊ लागले. वेगळाच जोश असे ह्या वेळी.

“प्रयत्नशील माणूस म्हणतो मी महासागर पिऊन टाकीन, माझ्या इच्छेने पर्वताचे चूर्ण विचूर्ण होऊन जाईल असेल बल व अदम्य इच्छाशक्ती शक्ती असू द्या कठोर परिश्रम करा म्हणजे ध्येय प्राप्ती निश्चितच !”.....स्वामी विवेकानंद.

ओंकार व वैजूची जोडी जशी जमली होती तशीच जोडी त्यांच्या आज्यांची पण जमली. जोशी आजी, गोऱ्या, चेहेऱ्या वर वार्धक्याच्या सर्व खुणा, थोडा घोगरा आवाज,नऊवारी पातळ, थोड्या स्थूल व ठेंगण्या. वैजूची आजी एकदम विरुद्ध दर्शन.पण दोघींची जोडी चांगलीच जमली. संसार करताना केलेले खूप कष्ट हे त्यांच्यातील साधर्म्य. आयुष्य जगताना, संकटांशी लढताना आलेले अनुभव जर सारखे असतील तर मैत्री होण्यासाठी जात, धर्म, भाषा, वय, पैसा या सारखे वरवरचे भेद शूद्र ठरतात .समान असणाऱ्या अभिनिवेशाच्या धाग्यान पेक्षा समान अनुभवाचे धागे हे मैत्री घट्ट होण्यासाठी अधिक कारणीभूत ठरतात. जीवन संघर्ष हा वेगवेगळया परिस्थितीतील असला तरी, तो करत असताना मनात निर्माण होणाऱ्या सुख दुःखाच्या भावना ह्या एकाच प्रकारचे रंग तरंग निर्माण करतात मनात. असे समान धागे असले की वेगवेगळे विचार, आचार, संस्कृती,वय हे सारे भेद असले तरी “मैत्र जीवांचे” होते आणि ते अधिक बळकट असते.

सर्दीशी तशी माझी चांगलीच मैत्री, इंजिनिअरिंग करत असल्या पासूनच झाली होती. कधी कधी तिच्यासोबत ताप पण असायचा. या दोघांचे सोबत आगमन झाले की मी औषधां पेक्षा आराम करणे पसंत करी. असाच एकदा सक्तीचा आराम व एकांत चालू होता. दुपारची ४ ची वेळ मी पहुडलेला होतो. खोलीच्या दाराबाहेर कुणाच्या तरी कुजबुजण्याचा आवाज आला. मी सुरुवातीस दुर्लक्ष केल पण नंतर उठून दार उघडल तर समोर आमच्या दोन्हीही आजी उभ्या. जोशीआजी आणि सरवदेआजी !
“काय म्हणताय आजी”, मी विचारले.
“बर नव्ह म्हणे तुम्हासली म्हणून भेटाया आलोत ” ,वैजूची आजी म्हणाली.
मी त्यांना आत बोलावले. त्यांनी काळजी घेण्याचे दोन, तीन आर्जवपूर्ण सल्ले दिले. १५/२० मिनिटांनी दोघी निघण्याच्या तयारीत होत्या. पण एकमेकान कडे त्या काही तरी खाणाखुणा करत होत्या. मी बोलणार इतक्यात जोशीआजीनी आपल्या मुठीत लपून ठेवलेली दहा रुपयाची नोट मला देऊ केली. थोडा वेळ मला काहीच समजले नाही.
“कश्यासाठी हे?” , मी विचारले.
“राहू द्या, बिस्कुत आणा खायाला. दुपारची येळ न आम्ही दोन चार दुकानी जाऊन पण आलो पण बंद होते .....बिमार माणसाला भेटायला जायचं तर मोकळ्या हातानी कस जाव ? मग म्याच म्हनले यांली १० रुपये देऊ दादाली ते आणून घेतील बिस्कुत” वैजूची आजी म्हणाली.
मला काय बोलावे हेच कळेना. शेवटी आमचा कार्यालय प्रमुख विजुदादा यांनी दुकानात जाऊन बिस्कीटपुडा आणला व आमच्या सर्वाना त्यांनी मस्त चहा करून दिला. लवकर बरे व्हा ....अस म्हणत आजींनी निरोप घेतला.

तात्यांनी कामाचा विस्तार केला त्याच प्रमाणे त्याचे दोनाचे चार हात पण झाले. तो नवीन जागेत राहायला गेला. वैजू बरोबर. आजी परत आपेगावला गेल्या. नवीन जागा म्हणजे एक प्रशस्त वाडा होता. आता सर्व काही चांगल चालल होत.

ऐके दिवशी संध्याकाळी तात्या भेटायला आला. खूप वेळ गप्पा मारल्या नंतर तो म्हणाला, “ दादा, पंचायत चे इलेक्शन लागलेत, सरपंचपद ओबीसी साठी राखीव आहे. गावातले सगळे जन म्हणतायेत उभ रहा म्हणून. काय कराव !”

“तात्या, आत्ता सर्व बर चालल आहे न कश्याला या भानगडीत पडायचं?” मी थोडं नकार युक्तच बोललो.

बराच वेळ या विषयाचा खल झाला. अनेक तरुण व शिकलेली युवक या वेळी निवडणुकीच्या मैदानात उतरणार होती. तात्याची पण मनातून इच्छा होतीच हे लगेचच माझ्या लक्षात आले.राजकारणाच्या या फडात तात्या सारखे लोक प्यादे म्हणून वापरतात हे जवळून पाहिलं होत. थोडी काळजी वाटत होती. माझ्या प्रत्येक शंकेच उत्तर तात्या कडे होत. शेवटी विचार करून काय करायचं ते ठरव अस म्हणत मी चर्चेचा शेवट केला.

शिकलेला तरुण त्यात सर्वाना मदतीसाठी पुढे असणारा त्यात कोरीपाटी व तालुक्याच्या ठिकाणी राहणारा निवडून येण्यासाठी लागणारे सगळे गुण तात्या जवळ होते नव्हता तो फक्त पैसा. तात्या आपल्या सर्व कष्टानी जमा केलेल्या पुंजीनी निवडणूक लढला व विजयी झाला. तात्या आपेगावचा सरपंच झाला. त्याच्या घरच्या इतिहासात गावाचे प्रमुख पद मिळवणारा तो पहिलाच होता. आम्ही पेढे खाल्ले व शुभेच्छा दिल्या.

तात्या धडाक्यात कामाला लागला. लहान असल्याने गावातील सर्वाना त्याला काम सांगणे, समस्या सांगणे सोयीचे होते. प्रबोधिनीच्या मदतीने त्याने मोठे आरोग्य शिबीर गावात घेतले. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, राष्ट्रीय सणाच्या दिवशी गावातील चांगले काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार असे अनेक उपक्रम त्यांनी विकास कामाबरोबर सुरु केले. आमचा दुसरा मित्र दत्ता खोगरे यांनी स्वामी विवेकानंद बहुदेशिय संस्था काढली होती व त्या माध्यमातून त्यांनी प.पू.पद्मश्री शंकरबापू आपेगावकर वाचनालय गावात सुरु केल. दत्ताचे चहा व फराळाचे छोटे हॉटेल होते. वाचनालयासाठी ग्रामपंचायतीने जागा देण्याचा ठराव पास पण केला. वाचनालयाच्या औपचारिक उदघाटनासाठी अनेक नेते मंडळी बरोबर मला पण दोघांनी बोलावले व सत्कार केला. तात्या, गावाच्या कामात रमत होता.

नातू फौन्डेशन, पुणेचे प्रमुख विश्वस्थ ब्रिगेडीयर प्रताप जोशी, ज्ञान प्रबोधिनी, अंबाजोगाईचे काम पाहण्यासाठी अंबाजोगाईला आले होते ७५ वर्षाच्या या तरुण सैनिकाचा उत्साह आम्हा सर्वाना लाजवणारा होता. रात्र भर प्रवास करून आल्यावर ह्या माणसांनी क्षणाची विश्रांती पण घेतली नाही. आल्या पासून त्यांनी अनेक प्रश्न विचारण्याच्या फैरी सुरु केल्या. ते भारतीय सैन्यात पुरवठा विभागात होते. “Not Check Not Done” हा त्यांचा मुल मंत्र. अगदी शिशुविहारच्या लहान मुलान पासून अनेक लोकांना ते भेटले. काहीतरी वेगळ व बदल दाखवणारे केले पाहिजे यावर त्यांचा भर. विवके गिरीधारी हा आमचा कार्यकर्ता मित्र त्यांचा सदैव साथीदार असे.

प्रबोधिनीतील अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना ते भेटले. तात्या पण त्यांना भेटायला आला होता. तात्याशी झालेल्या चर्चेच्या शेवटी मी त्यांना सरपंच सहलीची कल्पना सांगितली. त्यांना ती फारच आवडली व त्यासाठी नातू फौंडेशन तर्फे एक लक्ष रुपयाची मदत पण करायचे त्यांनी मान्य केले. तात्या आणि मी मग कामाला लागलो. तात्याच्या ओळखीचे आता अनेक तरुण सरपंच झाले होते. खूप उत्साह होता त्यांच्यात. आदर्श गाव हिवरेबाजार, राळेगणसिद्धी, पोपटराव पवार व अण्णासाहेब हजारे यांच्याशी भेट. गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्यात पहिले आलेले गाव, पुण्यातील प्रबोधिनीचे काही ग्रामविकासाचे कार्य हे या सहलीचे आकर्षण असल्यानी अनेकजण तयार झाले. तात्या, वैद्यकाका, राजेसाहेब किर्दंत व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे बलभीम शिंदे व महादेव किरवले हे सर्वजन कामाला लागले. सर्वात पहिल्यांदा सरपंच काय करू शकतो ही पुस्तिका प्रकाशित केली. त्याचा उपयोग तरुण सरपंचाना खूप झाला.

डिसेंबरमध्ये मध्ये अनेक गावांमध्ये जाऊन तरुण सरपंचाना भेटलो. २० गावातील २५ ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व काही धडपडणारे युवक यांची निवड सहलीसाठी करण्यात आली. या सर्वात तात्याचा पुढाकार फार मोठा. शेवटी जानेवारी ७ ते १० दरम्यान सहल ठरली. आमच्या भागातील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे देवळ्याचे लालासाहेब पवार ऊर्फ नाना यांच्या नेतृत्वा खाली प्रबोधिनीच्या उपासनेनी व चाकरवाडीच्या माऊलींच्या समाधीच्या दर्शनानी सहलीची सुरुवात झाली. पहिला मुक्काम सुदाम काका भोंडवे यांच्या सोनदरा गुरुकुलात. दुसऱ्या दिवशी सुदामकाकाशी गप्पा मारून हिवरेबाजार व पोपटराव पवारांशी गप्पा. दुसरा मुक्काम राळेगणसिद्धी पण अण्णासाहेब तिथे नसल्यानी थोडी हुरहूर वाटली. अण्णा पुण्यात होते व आजारी असल्यानी उपचार घेत होते. फिरोदिया वसतिगृहात त्यांचा मुक्काम. खूप प्रयत्न करून त्यांच्याशी संपर्क होत नव्हता.

दुसऱ्यादिवशी राळेगण पाहून व सरपंच आणि प्रशिक्षण केंद्राचे पाटील यांचे मार्गदर्शन घेऊन आम्ही पुण्याकडे निघालो. रांजणगाव गावच्या गणपतीच्या दर्शनाला थांबलो. एकदा परत प्रयत्न करू म्हणून अण्णाना फिरोदिया वसतिगृहात फोन लावला आणि अण्णाशी संपर्क झाला. आळंदीच्या भ्रष्टाचार विरोधी उपोषणाच्या वेळी मी त्यांचा स्वीय सहाय्यक होतो.त्यांनी मला लगेच ओळखले.त्यांना सरपंच सहलीचे प्रयोजन त्यांना सांगितले. त्यांनी तासाभरात यायला सांगितले. आमचा तीन सुमोचा ताफा सुसाट वेगानी पुण्याकडे निघाला. अण्णा आम्हा सर्वाना भेटले. दोन तास ते आमच्याशी बोलत होते. सर्व जण भारावून गेले होते. तात्या तर वेगळ्याच विश्वात होता. तो पूर्णवेळ अण्णाच्या बाजूला आणि त्यांना खेटून बसला होता. त्यांच्या बोलण्यातील भाव आणि शब्द नी शब्द तो टिपत होता. अण्णाचे आशिर्वाद घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरु केला. ९ जानेवारीच्या नातू फौन्डेशन च्या कार्यक्रमात तात्यांनी व मी सहलीसाठीच्या अर्थ सहाय्याचा धनादेश व सत्कार स्वीकारला. सहल सार्थ झाली.

सर्व जण गावाकडे आल्या नंतर कामाला लागली. सहा महिन्यांनी आढावा घेतला तर लक्षात आले की सर्वांनी मिळून ४.५ कोटींची विकासकामे गावात केली होती. गाव सहभागानी गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुक्यात आपेगावला दुसरा क्रमाक मिळाला. तात्या एका वेगळ्याच आनंदात होता.

आढाव घेण्यासाठी सरपंचानी केल्याला विकासकामांचे चित्रीकरणकरण्यात आले. कॅमेऱ्या समोर तात्या खूप आत्मविश्वासाने पण खूप भाऊक होऊन सर्व कामांची माहिती देत होता. चहा पिण्यासाठी आम्ही त्याच्या घरी गेलो. घराबाहेरच दर्शन झाले लाल पातळातील वैजूच्या आजी चे.
“वैजनाथ कसा हाय? त्याच्या कडे लक्ष द्या ....कुठ हायत परसाद दादा .....?”, तात्याच्या आईने अभिजीत जोंधळे ला विचारले.
“तात्या, सरपंच झाला आहे, कसे वाटे तुम्हाला?” , अभिजीत नी विचारले.
“हो झाला हाय म्हने...का केल ते माहित नाय” ,माय थोड्या नाराजीतूनच बोलली.
“चांगले काम करतो आहे न तो! पाणी, रस्ते, नाल्या, लाईट याची सोय केली की त्यांनी गावासाठी” , अभिजीत तात्याच्या कामात बदल कौतुकानी बोलला.
“ हो की करतू हाय पन आपल स्वतःच बी बघाव की”, गावच्या कामामुळे तात्याचे घराकडे व स्वतःच्या प्रकृती कडे दुर्लक्ष होत आहे अशी काळजी त्या माउलीच्या बोलण्यातून व्यक्त होत होती.

तात्या गावात जसा रमत होता तसा तो गावच्या व तालुक्याच्या राजकारणात ही रमू लागला. अश्या धडपडणाऱ्या पोरांना सुंदर व प्रभावी आयुष्याचे दिवास्वप्न राजकारणाच्या माध्यमातून लवकर साधता येते हे लवकर पटत. नेत्यांचा रुबाब, त्याचं समाजजीवनातील महत्वाचे स्थान, त्यांच्या कडे असलेला पैसा, अधिकार व लोकांनी त्यांना देऊ केलेल मोठेपण हे खुपच लोलुप करणारे असते. साहजिकच खेळ सुरु होतो मृगजळा मागे धावण्याचा. मग राजकारणी लोकात वावरता वावरता त्याचं बोलणं, वागणं शिकतो. हळूहळू नदीच्या बोहऱ्यात माणूस जसा अडकतो व बाहेर यायचा प्रयत्न केला तर तो अधिकच बुडत जातो तस या तरुण लोकांच होताना दिसत. हळूहळू ९८% समाजकारण व २ % राजकारण करणारे हे लोक २% समाजकारण व ९८ % राजकारण करायला लागतात. इथून सुरु होतो एक नवीन रस्ता. आपल्या नेत्याच्या नजरेस सतत दिसत राहण्यासाठीचा आटापिटा. त्यातून काही मेह्बानी झाली तर मग हे बरोबर राहणं मग नेत्याच्या हक्काचे बनते. मग तो समाजाचा कार्यकर्ता न राहता नेत्याचा कार्यकर्ता बनतो.

तात्याला एक गोंडसा व गुबगुबीत मुलगा झाला. त्याच नाव मोठया कौतुकाने अमर ठेवले. तात्याचा प्रगती कोचिंग क्लास मात्र बंद होण्याच्या मार्गावर होता. शेवटी तात्यांनी आपले शैक्षणिक कार्यक्षेत्र अंबाजोगाई सोडले व तो जवळच्या चनई गावात राहायला गेला. त्याच्याशी भेट दुर्मिळ होऊन गेली.

शंकर उबाळे असाच एक धडाडी चा सरपंच एक दिवस भेटला व तात्या खुपच आजरी असल्याचे त्यांनी सांगितले. घरी भेटायला गेलो तर सांगितले हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केल आहे. हॉस्पिटल मध्ये गेलो तर कळल मुबईला हलवल. निश्चित काही कळत नव्हत. शेवटी तात्याचे सासरे महाराष्ट्र परिवहन मंडळात चालकाचे काम करायचे. ते अंबाजोगाईला राहायचे त्यांना भेटायला गेलो. त्यांनी सांगितलं तात्याला रक्ताचा कर्करोग झाला आहे. सुन्न झालो .....जवळच अमर बसला होता. केवळ दीड वर्षांचा होता. उसण अवसान जमाकरून मी तात्याचा फोन नंबर मागितला व फोन लावला.

माझा आवाज एकताच तात्यांनी टाहो फोडला, “ दादा .....मला जगायचं आहे र दादा ....मला जगायचं आहे ......”
समजुतीचे दोन शब्द व काही मदतीचे आश्वासन देऊन मी सैरभैर अंतकरणाने मी घरी आलो. तात्याशी फोन वरून संवाद चालू होता तो टाटा कर्करोग रुग्णालयात उपचार घेत होता.

उन्हाळ्याचे दिवस, दुपारचे उन, प्रचंड गरमी, घराच्या बाहेर पडणे अशक्यच. भर दुपारी अचानक दरवाजा वाजला. मी दरवाजा उघडला तर समोर सिल्कचा अर्ध्या बाह्या घातलेला सदऱ्यातला, तात्या समोर उभा.
“तात्या, दादा म्हणत आम्ही एकमेकांना आलिंगन दिले” , तात्या बरोबर वाहिनी व अमर पण होता.
त्याची प्रकृती सुधारली होती. तो चांगला दिसत होता व थोडा जाड पण. खूप आनंद झाला. तात्या, रुग्णालयातील त्याचे एक एक अनुभव सांगत होता. वाहिनीने त्याची सावित्री बनून केलेली सेवा, सगळं सगळ तो भरभरून सांगत होता. तो ९५ % बरा झाला होता.

“दादा आत्ता भ्या नाही राहील बघ ! आता परत पूर्ण बरा होऊन आलो की आपल्या भागातील अश्या आजारी रोगांना मदत करायची. अगदी मानसिक व आर्थिक पण. आता मला या रोगांनी आजारी असणाऱ्याला आर्थिक मदत करणाऱ्या सर्व सामाजिक संस्था माहित पण झाल्यात आणि तिथले समदे लोक ओळखीचे झाले आहेत.” तात्या एका नवीन विश्वासानी बोलत होता.

त्यांनी एक कर्करोगाने आजारी असणाऱ्या रुग्णांना मदत करणाऱ्या धर्मदाय संस्थांची यादी पण दाखवली.एकदीड तास गप्पा मारून तात्या गावा कडे जायला निघाला.

१५ दिवस झाले असतील. रात्री घराच्या दाराची ग्रील जोरजोरात वाजल्याणी जाग आली. “दादा, दादा”, म्हणून कोणीतरी आवाज देत होते. अजून बाहेर अंधार होता. मी दरवाजा उघडण्यासाठी बाहेर पडलो तर समोर तात्याचा मेव्हणा.
“काय रे काय झाले ?” , मी विचारण्याच्या आतच तो रडत म्हणाला, “भाऊजी गेले रात्री”
खर कणी माझी झोप उडाली .....तात्याचे रात्री निधन झाले. काय कसे विचारण्याची भ्रांत पण राहिली नाही.
अंतिम संस्कार आपेगावला होणार होते अजून उजेड नव्हता सकाळ व्हायला बराच वेळ होता. मनात काय चाललं आहे हे पण समजत नव्हत शेवटी मी टेलीव्हिजन सुरु केला व चित्रपटातील गाणे पाहू लागलो सूर्य उगवण्याची वाट पहात.

डोळ्या समोरून तात्या काही हलत नव्हता. आपेगावला निघालो. तात्याचा देह सरणावर ठेवला होता. विषाणू संसर्गामुळे तात्याचा कर्करोग रोग अचानक बळावला व त्यात्तच तात्या नावच एक तारुण्य संपल अमर नावाची आपली खूण व कुंकू पुसलेली त्याची धर्माची पत्नी मागे ठेऊन.

“परसाद दादा, माझा विश्यवनाथ आम्हाली सोडून गेला”, माय धायमोकून रडत होती. मी तिचे हात हातात घेऊन माझ्या डोळ्यातल्या अश्रू ना वाट करून दिली ...

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

भर मध्यरात्री स्मशान शांततेत राहुलच्या चेहऱ्यावरची शांतता जास्त अस्वस्थ करणारी होती.

भर मध्यरात्री स्मशान शांततेत राहुलच्या चेहऱ्यावरची शांतता जास्त अस्वस्थ करणारी होती.

मी तीन वर्षाचा असेल त्यावेळी माझ्या वडिलांचे निधन झाले. मृत्यु म्हंजे काय ? आईच वैधव्य म्हंजे काय ? स्मशान, सरण,पिंडदान यांची त्या वयात माझ्याशी ओळख होणे किवा अनुभव घेणे हे शक्यच नव्हते. फक्त अंत्ययात्रेच थोडं स्मरण माझ्या लक्षात आहे. आई ने मात्र मला कधीही वडील नसल्याची पुसटशी कमी कधी वाटू दिली नाही अगदी सर्वार्थाने. पण एखादी प्रेतयात्रा पाहिली की अंगात कापरं भरायचं.

पुढे अगदी पदव्युत्तर शिक्षण होई पर्यंत या सर्वांचा काडी मात्र संबंध माझा आला नाही. विवेकानंद केंद्रात काम करत असताना अरुणाचल प्रदेशात असे अनुभव आले पण तेथील पद्धत वेगळी.......अंत्यविधी फक्त दर्शक म्हणून पहायचा व तसे फार आपुलकीचे नाते विकसित पण झालेले नव्हते.

अरुणाचल प्रदेशातुन अंबाजोगाईला परत आल्यावर अंबाजोगाईत लहान मुलांशी नाते जुळले . बहरणाऱ्या फुलांबरोबर राहण्याचा अनुभव मस्त असतो. खूप काही मिळाल्यावर देण्याचा अनुभव पण एक जबरदस्त उमेद जागवणारा असतो. त्यातल्या त्यात घेणारा जर मस्त ताकदीचा असेल तर मजा काही औरच असते . पण देणाऱ्याच व घेणाऱ्याच एक वेगळ नात व्हावं लागतं आणि ते फक्त पाठ्यपुस्तक शिकून होत नाही तर जीवनातील सुखादुःखाचे जिवंत सहअनुभव घ्यावे लागतात.हे अनुभव घेताना आपण एकमेकांना पहात असतो, अनुभवत असतो व त्यातून एक भावनिक बंध निर्माण होतो. तो जर शुद्ध आणि सात्विक असला तर दिव्यत्वाचा अनुभव आपल्याला नात्यात होतो.

संपर्क, सहवास आणि सामुहिक कृतीतून शिक्षण अस एक वेगळी जीवन शिक्षणाची पद्धती अनुभवण्याची धडपड आम्हा काही मित्रांची चालू होती.अगदी पदव्युत्तर शिक्षण घेतल्यान पासून शिशुविहार पर्यंतची एक छान टीम तयार झाली अगदी गमतीने लोक म्हणायची KG to PG.

पराग उपेन्द्र भालचंद्र आणि त्याची छोटी प्रतिमा म्हंजे राहुल राजीव सारणीकर. पराग पदव्युत्तर शिक्षण घेऊन UPSC ची तयारी करत होता तर राहुल ९ वीत स्पर्धा परीक्षांची तयारी करायचा. दोघे ही खूप हरहुन्नरी व्यक्तीमत्वे पण खूप हळवी,भावनिक पण बिनधास्त. पराग उंच, प्रचंड उपक्रमशील राहुल थोडा ठेंगणा रोडका. दोघेही सावळ्या रंगाचे. पण या दोघान मध्ये एक साम्य म्हंजे झाडान वरचे प्रेम. दोघेही वृक्ष मित्र आणि त्यांना आधार होता आमच्या चिरतरुण आणि सदा चरण तत्पर असणाऱ्या वैद्यकाकांचा( श्री. उमेश वैद्य ). परागनी अंबाजोगाईत १ लक्ष झाडे लावण्याचा संकल्प आमच्या समोर व्यक्त केला. एक घर निदान एक झाड ही त्याची घोषणा होती. मग राहुल कसा मागे राहणार? त्यांनी संकल्प केला मी १० लाख झाडे लावीन.निसर्गावर खूप प्रेम व नवीन गोष्टी शिकण्यावर दोघेही नेहमी आघाडीवर. मग सुरुवात आधी माझ्या पासून ही त्यांची वृत्ती. दोघांच्याही घरी त्यांनी छोटी रोपवाटिका तयार केली होती. आज अंबाजोगाईतील अनेक जागी हिरवळ ह्या दोघांनी केली.

प्रबोधिनीच्या काही सदस्यांनी भविष्यात प्रबोधिनीला जागा लागेल म्हणून स्वखर्चानी ६ एकर विकत घेतली होती. काय करणार त्या जागेत? कुणी विचारले की वैद्य काका ऊर भरून आपल्या खमक्या आवाजात म्हणायचे, “जंगल करणार इथे.” आम्ही त्या जागेला नाव दिल “विवेकवाडी”. अगदी शेतातील दगड वेचणे ,पाण्याचा हौद, झाडांची खड्डे ते शेततळे तयार करण्यापर्यंत स्वतःच्या मेहनतीने काय काय केल नसेल आमच्या या KG to PG च्या टीम ने. झाड लावण फार सोप पण वाढवण खूप अवघड. त्यात त्या भुताच्या माळावर तर पाण्याची खूपच वानवड. रात्री ३ वाजे पर्यंत कधी कधी पाणी दिले.

राहुलची दहावीची परीक्षा झाली होती. सुट्टी आणि मोकळा वेळ. संध्याकाळच्या उपासने नंतर आम्ही प्रबोधिनी च्या बाहेरील बाकान वर बसून गप्पा मारायचो.

“काय राहुल सेठ काय चालू आहे सध्या ? मग काय सध्या तुमच उगवण सूर्य डोक्यावर आल्यावरच होत असेल ”, मी राहुलला विचारले.

राहुलची आई आणि माझी आई एकाच शाळेत सहशिक्षिका. त्यामुळे बऱ्याच बातम्या मला माझ्या आई कडून कळायच्या.

राहुल काही बोलला नाही.

“काय राव तुम्ही फक्त झाड लावता पण त्यांना पाणी कुणी द्यायचं? येणार का माझ्या बरोबर दररोज
सकाळी वाडीवर झाडांना पाणी द्यायला?”, मी थोडं जोरातच राहुल समोर प्रस्ताव ठेवला.

शेत, झाडं म्हटल्यावर राहुल काहीही त्याग करायला तयार मग अगदी सकाळच्या सुट्टीतील गुलाबी झोपीचापण.

सुट्टी लागली की लहानपणी हे साहेब सरळ गावाकड पळायचे. शेत हा त्याचा आस्थेचा व प्रीतीचा विषय. शेतातील सर्व कामे तो करायचा. केकत सारणी हे त्यांचे गाव म्हणून ते सारणीकर. राहुलचे वडील राजीव सारणीकर एक खरच राजा माणूस! लोक त्यांना राजा या नावानीच ओळखायचे. अगदी भिक्षुकी, लोकांच्या गाई सांभाळणे, ६० फुट विहिरीतून दिवसभर देशपांडेन कडे पाणी भरणे. मध्यम उंची व शाररिक ठेवण असलेला हा माणूस ज्या वेळी अंबाजोगाईला आला त्या वेळची पहिली रात्र न जेवता अंबाजोगाईच्या बस स्थानकावरच काढली. अगदी रस्त्याच्या बाजूच्या नाल्या खोदण्याचे काम पण त्यांनी केले .

दररोजचा दिवस एक नवीन प्रश्न घेऊन यायचा व त्यावर विजयी होत जीवाचा राजा होणे हेच त्यांचे जीवित ध्येय बनले. अंगमेहनतीच काम करत असतांनाच त्यांना शिक्षण खात्यात सेवकाची नौकरी मिळाली. शिक्षणाचे महत्व त्यांना कळाले. स्वतः अल्प शिक्षित होते. लग्न झाल्यावर आपल्या पत्नीला पुढे शिकून शिक्षिका केले व स्वतःही सेवांतर्गत परीक्षा देत लेखनिक झाले.

कॉपी नाही करायची हा त्यांचा शब्द राहुल आज पर्यन्त पाळत आला.
“दादा, एक शब्द पाहून नाही लिहिला कधी, बाबानां दिलेला शब्द मी नेहमी पाळतो”, राहुल मोठ्या अभिमानाने नेहमी सांगायचा.

दुसऱ्या दिवसा पासून आमची रोजची शेत फेरी सुरु झाली. सकाळी ५ वाजता उठून राहुलच्या घरच्या फोनवर पाच रिंग द्यायच्या हा राहुल साठी उठण्याचा अलार्म, मग तो तयार झाला की त्यांनी माझ्या मोबाईल वर त्याच्या घरच्या फोन वरून मिस कॉल दयायचा. त्याच घर मुख्य रस्त्या पासून ५ मिनिटे. मला मिस कॉल आला की मी मोटरसायकलनी निघायचो, राहुल मुख्य रस्त्यावर येऊन उभा राहायचा. मग आम्ही दोघ मिळून ६ किमी वर असणाऱ्या विवेकवाडीला जायचो. हौदात पाणी आहे का ते बघणे. मग प्रत्येक झाडाला मोजून पाणी देणे. देखणा सूर्योदय पाहणे. व राहुलचे अनेक प्रश्न व त्याला माझ्या परीने उत्तर. एकदा सर्व झाडांना पाणी दिल की मन प्रफुल्लित व्हायचं. सकाळ फारच मस्त असायची.

सूर्य थोडा वर आला की आम्ही परतीच्या मार्गावर. शेत मुख्य रस्त्या पासून ५०० मी दूर व तो कच्चा रस्ता. तेवढ अंतर मी मोटरसायकल चालवायचो मग त्यानंतर राहुलचे शिकणे चालू. पहिले काही दिवस क्लच कसे सोडायचे,गेर कसे टाकायचे असे करत करत राहुल मोटरसायकल शिकत होता. सकाळी रस्त्यावर फारशी वर्दळ पण नसायची त्यामुळे त्याला लवकर शिकता आले आणि काहीही अपघात न होता.

उन्हाळा बहरत होता आणि आमच्या समोर पाण्याचे अनेक प्रश्न. मग एक नवीन युक्ती शोधून काढली १ इंची प्लास्टिक पाईप झाडाच्या जवळ ६ इंच खोचायचा व त्यावर एक लिटरची बिसलरी ची पाण्याची बाटली पाणी भरून पाईपात उलटी करून सोडायची. असे एक लिटर पाण्यात आम्ही उन्हाळ्यात झाडं जगवत होतोत. राहुलही मोटरसायकल चांगला शिकला. दोन महिन्याची सुट्टी मस्त एन्जोय केली आम्ही दोघांनी. राहुलनी अनेक झाडे तयार केली व लावली त्यात वड, पिंपळ गुलमोहर हे विशेष होती.

महाविद्यालयात गेल्यावर राहुलची भेट थोडी नित्याची राहिली नाही पण प्रबोधिनीच्या अनेक उपक्रमात त्याचा कर्ता सहभाग होता.भेट नित्याची नसली तरी तो दररोजच्या जाणीवेचा भाग मात्र होता कारण त्याच्याशी एक नात तयार झाले होते.

विवेकवाडी आत्ता मस्त हिरवी होत होती, बहरत होती.माणसान पेक्षा झाडं लवकर वाढतात फक्त सुरुवातीला थोडी काळजी घ्यावी लागते. एकदा मूळ धरली की मग पाणी पण तेच शोधतात व ते सुरू झाले की त्यांच्या वाढीच्या वेग वाढतो. मग फुल, फळ धरण्याची प्रक्रिया सुरु होते व ते थोडया दिवसां मध्ये ते झाड छाया पण दयायला लागते. शिक्षण पण अशीच प्रक्रिया असली पाहिजे. मुलांना आपली मूळ लवकरात लवकर ज्ञान ग्रहणाच्या शाश्वत निर्झराशी लागली की मग त्यांच्या विकासाचा वेग वाढतो. पण आपण त्यांना सतत शिकवणी, अभ्यासवर्ग अश्या अनेक बाह्य माहितीच्या दवबिंदून वर ठेवतो त्यामुळे ते उठून दिसतात पण स्वावलंबी होत नाहीत.या शिक्षण प्रक्रियातून निर्माण होणाऱ्या मनुष्य जीवनाला फुले, फळे येतातही भरपूर पण ते केवळ त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा भाग होतो. कोण्या आगंतुकाला ते तृप्त ही करू शकत नाहीत आणि तप्त ग्रीष्मात आल्हाददायक सावली पण देऊ शकत नाहीत .......

निसर्गचक्रा मध्ये अश्या ह्या मूळ धरलेल्या छाया देणाऱ्या झाडांचे खूप मोठे स्थान असते तर समाज जीवन समृद्ध करण्यासाठी असे मूळ धरलेली मनुष्य जीवने निर्मितीचे व परिवर्तनाची केंद्र बनतात. पण आता जागेला आलेल्या किमती मुळे बोनसाय तयार करण्यात सुख मानतो आपण.

सुभाष तळेकर असच एक अफलातून स्वावलंबी व्यक्तीमत्व. बाजारू विश्वात विकण्यासाठी असणाऱ्या बाह्य व्यक्तीमत्वाचा कुठलाही लवलेशही नाही. बुटकी व रोडकी ही आमची विठ्ठलाची मूर्ती. सकाळी ब्रेड, फुलांचे हार, वर्तमानपत्र विकण्यापासून दिवस सुरुवात होई त्याचा. आपल्या हाताची भाजी भाकर स्वतःच्या कमाईची असली की एक आपलंसं करणार स्मित नित्याच चेहेऱ्यावर येत, असा आमचा प्रबोधिनीचा तो कार्व्हर होता.

सुभाष बरोबर विवेकवाडीत गेलो होतो. संध्याकाळची वेळ,सूर्यास्त झाला की आम्ही परत अंबाजोगाई ला निघालो. चुकून मोबाईल आज घरीच विसरला होता. अंबाजोगाईच्या जवळ २ किमी आलो नसेल तोच जोरदार पावसाला सुरुवात झाली. शेतात जायला लागल्यापासून पाऊस आम्हाला खूप वाट पहावयास लावणारा पण आला की एक खोल शांतता देणारा मित्र झाला होता. सुरुवातीस टपोरे थेंब मोटारसायकल वर झेलताना मजा येत होती पण आज आमचा मित्र फारच बहरात होता थोड्यावेळात त्याने आपले रौद्र रूप दाखवायला सुरुवात केली. आम्हाला समोरचे काहीच दिसत नव्हते. आत्ता आमच्या मित्रांनी चांगलच झोडपायला सुरुवात केली. शेवटी त्याला शरण जाऊन एका ढाब्याचा निवारा आम्ही पकडला. पण पुढील पाच मिनिटात तो ढाबाच कोसळला.

शेवटी पुढे दुसरा निवारा शोधण आवश्यक होत. आत्ता भिजलेले कपड्यान पेक्षा किंचितस भयभीत मनाची अनुभूती जास्त होत होती. अंबाजोगाईत प्रवेश केला तर नाल्यातून प्रचंड वेगानी पाणी वहात होते रस्त्यावर पण आत्ता त्याचे साम्राज्य चांगलंच जाणवत होत. मोटारसायकल चालवण दुरापास्त झाल होत. शेवटी परत एक निवारा शोधला. एक उंच वाढलेलं अशोकाच झाड करकर आवाज करत धपकणी जमिनीवर पडल. का थैमान घालतोय हा आज एवढा? मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते.

पावसाचा वेग थोडा कमी झाला व आम्ही मग परतीला निघालो. मस्त चिंब भिजल्याने गरम गरम पकोडे, फापडा व मिठ लावलेली हिरवी मिरची हॉटेलात खाल्ली व गरम चहा घेऊन घरी निघालो. घरी येऊन पहिल्यांदा चिंब भरलेले कपडे काढले व गरम पाण्यानी स्नान केले.

आई म्हणाली, “अरे, फोन कितीदा वाजला घरीच विसरून गेलास.”

लगेच मोबाईल पहिला तर ३० मिस कॉल! बऱ्याच जणांचे होते पण वैद्य काकांचे जास्त होते. काकांना फोन लावला.

“काका, का हो इतके फोन केले?”, मी विचारले.

“अरे ! राहुल सारणीकरचे वडील गेले”, वैद्य काका थोड्या कापऱ्या आवाजातच बोलत होते.

“काय ?”, मी ओरडलोच.

“मी, किरण आणि राधेश इकडे लाकडे आणण्यासाठी आलोत तू लवकर तयार होऊन राहुल च्या घरी ये.” काका म्हणाले.

मी फोन बंद केला. अनेक प्रश्न मनात घेऊन राहुलच्या घरी निघालो. दोन वर्षांन पूर्वीच नवीन ऐसपैस घर बांधल होत. घरी पोहोंचलो तर राहुल च्या जवळ त्याचा छोटा भाऊ योगेश जो ९ वीत होता व त्यांचे सगळे मित्र. राहुलनी मला पाहिलं आणि टाहो फोडला. गळ्यात पडून तो धायमोकून रडत होता. आत्ता पर्यंत त्याच्या डोळ्यातून टिपूस पण आले नव्हते. खूप धीर देण्याचा प्रयत्न अवस्थ मनाने मी करत होतो. १०/१५ मिनिटांनी थोडं वातावरण शांत झाले.

वैद्यकाका परत आले होते. किरण व राधेश लाकडाची गाडी घेऊन स्मशानभूमीत निघाले. किरण राउतमारे खूप हुशार, त्याला प्राथमिक शिक्षक व्हायचे होते पण आपल्या शिक्षण पद्धतीतील प्रामाणिक(?) परीक्षकांनी १२ वीच्या परीक्षेत इंग्रजी मध्ये नापास केलं होत. बाकीच्या प्रत्येक विषयात त्याला ७० च्या वर गुण होते. तर राधेश त्याचाच वर्ग मित्र. राधेश म्हंजे जाड्या व किरण म्हंजे रोड्या. लॉरेल आणि हार्डी ची आमची ही जोडी. ते त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच रात्री १०.३० ला स्मशानभूमीत जात होते. काकांनी त्यांना लाकडे मारवाडी स्मशानभूमीत उतरवण्याचे स्थान सांगितले. छप्पर असलेली अंबाजोगाईतील एकमेव स्मशानभूमी.

राहुलच्या घरी त्याच्या वडिलाचा मृत देह post mortem करून पूर्ण कपड्यात गुंडाळून एका जीप मध्ये आणला होता. Post mortem? माझे विचारचक्र परत वेगानी सुरु झाले पण ही वेळ विचार करण्याची नव्हती व विचारण्याची पण नव्हती. वैद्यकाका नी सांगितले राहुल च्या वडिलांनी आपल्या आयुष्याचा स्वतः हून शेवट केला. शरीरातून एक जोरदार विजेचा प्रवाह गेल्या सारखे वाटले. नंतर कळले जीवनाच्या प्रत्येक समस्येला धैर्यांनी तोंड देणारा हा राजा एका अवघड व्याधीतून धैर्यानी बाहेर आला होता. पण गेल्या एक वर्षापासून परत त्या व्याधीने त्याला ग्रासले. जवळ पास वर्ष दीड वर्ष संघर्ष चालू होता स्वतःशी पण शरीर काही साथ देत नव्हत. औषध पण काम करेनासे झाले. सतत कार्यप्रवण असणाऱ्या माणसाला हे म्हंजे मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. असेच होते.....

पाऊस काही थांबत नव्हता. पांढरे कापडे गुंडाळून राहुलला व योगेशला तयार केले पाऊस असल्याने मृतदेह बाहेर पण काढता येत नव्हता त्या मुळे जीप मध्येच शेवटचे संस्कार केले व मी,राहुल आणि योगेश व बाजूला जीपचा ड्राईव्हर व मागे मृतदेह व बाकीचे सर्व माणसं दुसऱ्या टेम्पो मध्ये. माणसं कसली राहुलचे काही नातेवाईक व प्रबोधिनीचे युवक कार्यकर्ते सोडले तर लहान वयाचीच सगळी अमित, मंगेश, मुंजा, राधेश, किरण हे सर्व धीरांनी सगळ्या गोष्टी करत होती.

रात्री ११.३० ची वेळ प्रचंड पाऊस पडत होता. आमची जीप स्मशानभूमी कडे निघाली. मोठा टेम्पो थोडं हळूच मागून येत होता. आम्ही स्मशानभूमीत पोहोंचलो. बाहेर किट्ट अंधार, जीप मध्ये आम्ही चार जण. अजून मागचा टेम्पो यायचा होता. कुठे दहन करायचे याची कल्पना मला नव्हती त्यामुळे टेम्पो येण्याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हत. भर मध्यरात्री स्मशान शांततेत राहुलच्या चेहऱ्यावरची शांतता जास्त अस्वस्थ करणारी होती. लहान वयातच आलेल मोठेपण जाणवत होत. वडिलांनां शोधण्यासाठी त्यांनी गेली दोन दिवस जीवाच रान केलं होत पण शेवटी अंत्य दर्शन पण मिळाल नाही.

योगेश रडत म्हणाला होता, “दादा, आता आपले कसे होणार?”

राहुलनी धीरानी उत्तर दिल, “मी आहे न ?”

वेळ आल्यावरच एवढ प्रगल्भ आपण होतो की ती प्रगल्भता आपल्यामध्ये कोणत्याही जाणत्या वयात असतेच आणि परिस्थिती निर्माण झाली की ते आपल्या आत्त्मिक बलासह प्रगट होते.

१५ मिनिटात सर्व जण आलीच पण अश्यावेळी मिनिटांचे तास झाल्याचे अनुभवास येते. मारवाडी स्मशानभूमीत त्या परिस्थितीचा काहीच अनुभव नसलेले एकदम खूप अनुभव असल्या सारखे वागत होते. सरण रचणे, मृतदेह नीट त्यावर ठेवणे. शेवटचे विधी सर्व जण शांतपणे करत होते. भरपावसात भिजलेली लाकडे कशी पेटणार? मग त्या साठी मीठ आणि करडीचा भुसा कसा वापरतात हे सर्व ते अनुभवत होती आणि पाहिजे ती मदत ती आम्हा सर्व जाणत्या लोकांना करत होती.

धगधगनाऱ्या चितेचा लाल भडक प्रकाश सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांच्या मनात चाललेली खळबळ मात्र सर्वजन लपवत आहेत हे मात्र स्पष्ट दिसत होते. मातीचे छोटे मडके खांद्यावर खेऊन राहुलनी चिते भोवती तीन फेऱ्या मारल्या व शेवटच्या फेरीनंतर त्याला मडके पाटीमागे सोडून द्यायला सांगितले. मडके फुटले अंत्यविधी पूर्ण झाला. सर्व जण परत निघाले. आम्हाला घेऊन आलेली जीप निघून गेलेली. एका रिक्षात दोन्हीही मुलांना घेऊन आम्ही निघालो पण मध्येच रिक्षा बंद पडली. शेवटी एका दुचाकीने दोघांना घरी पोहोचते केले. टेम्पो नसल्यानी बाकी सर्व जण पाईच चालत निघाली. रात्रीचा पावून वाजला होता.

राहुलच्या आयुष्यातील हा काळ्या रात्रीचा प्रवास पुढे जवळ पास ६ वर्ष चालला. कधी एकांती रडत, तर कधी घंटोन घंटे हॉलीबॉलच्या मैदानात तर कधी मित्रांच्या सहवासात राहुल मनानी एकटाच निकरांनी लढत होता स्वतःशी व परिस्थितीशी.

त्यांनी परिस्थितीवर मात केली आज तो इंजिनिअर होऊन अंबाजोगाईला परत आला कुठलीही नौकरी करण्यापेक्षा अंबाजोगाईतील मुलांना तंत्रशिक्षण व धैर्याच जीवन शिक्षण देण्यासाठी....

पगोमे आँधिया भरे, प्रयाण गान चाहिये
नवीन पर्व के लिये नवीन प्राण चाहिये

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१२

AC मध्ये बसून PC वरच्या एखाद्या सुंदर कवितेला superlike करणाऱ्यातला मी

AC मध्ये बसून PC वरच्या एखाद्या सुंदर कवितेला superlike करणाऱ्यातला मी

बीड जिल्ह्या सारख्या अविकसित भागात राहून ही तश्या पाहता सर्व चांगल्या सुविधा मला माझ्या आई मुळे लहान पणापासून मिळालेल्या. पाहिजे ते सगळ सगळ मिळाल. त्यामुळे काही नसल्यानी काही सोडावं लागत. असतं त्यात भागवावं लागतं. नसण्याचा स्वीकार करत आपल्या जगण्याचा विजय करण्यासाठी भर तारुण्यातील जीवन काळ्या मातीत मळण्यात व उन्हात तळण्यात घालवण्याची वेळ माझ्या वर कधीच आली नव्हती.

लातूरच्या भूकंपाच्या पुनर्वसनाच्या कामात सहभागी होताना निसर्गाच्या कोपामुळे उद्वस्थ झालेले मनुष्यजीवन जवळून पाहता आले.

गावातले लोक कष्टकरी प्रेमानी सर्वाना आपलेसे करी.

मातीतून सोन पिकवण्याचा त्यांनी घेतला होता ध्यास.

मातेनीच मातृत्वाला आज दिली होती आग ........

काळजाचा ठोकाचुकला आणि गावाचा नक्शाच बदलला

झोपीत होता तो काळ झोपीत गेला.

सुंदर गावाची झाली स्मशानभूमीच आज

आपल्याच माणसांची प्रेत जाळताना दुखत होती त्यांची हात.

आणि माझं आयुष्य बन बदललं.

५ वर्ष विवेकानंद केंद्राचे काम करत असताना अनेक व्यथांनी आणि असुविधानी गांजलेले लोक पाहिले होते.१९९९ मध्ये मी भारत बलशाली राष्ट्र कसे होऊ शकते या डॉक्टर अब्दुल कलामांच्या अभ्यास गटाचे काम करून व ते स्वप्न उराशी बाळगून मी अंबाजोगाईला परतलो. आपल्या तालुक्याचा विकास झालाकी आपल्या देशाचाही होतो या भावनेनी. गावातील प्रज्ञावंत मुलं शोधायची व त्यांना नेतृत्व विकसनाच कृतीशील शिक्षण देणे व त्यातून उद्याच उमद नेतृत्व उभ राहील व आपला देश बलशाली होईल ही बौद्धिक दृढता होती. अनुभव अनेक ठिकाणचा घेतला होता तर आपल्या तालुक्याचा फारसा नव्हता त्यातल्या त्यात ग्रामीण अंबाजोगाईचा तर शून्यच........

तीन गावं निवडली .....पोखरी त्यातील एक. माझे अनेक मित्र तेथील माध्यमिक शाळेत शिक्षक होती. बालपणा पासूनची मित्र त्यामुळे काम करणे खुपच सोपे होते. ८ वीचा वर्ग,आठवडयातील एक दिवस,शनिवार आणि २ तास अस ठरलं.

सुरुवात खुपच छान झाली. मुलांशी एकरूप होऊन गेलो की ते आपली होतात जग विसरतात आणि आपली वर्ग खोली त्याचं विश्व बनत व त्यांना शिकवणारा त्याचं दैवत याचा अनुभव मी घेत होतो. आनंदानी चिंब करून टाकणाऱ्या या हृदयी ते त्या हृदयी चा अनुभव घेण्याच्या या प्रक्रियेतुन शिक्षक दुरावतात का याचा प्रश्न मात्र नकळत निर्माण व्हायचा. अगदी बोटावरची गणिते, सूक्ष्मदर्शीनी आपले रक्त पाहणे मग आपल्या नखातील व तोंडातील घाण पाहणे व त्यातील सूक्ष्मजंतू पाहून मुलं शाररिक स्वच्छते बद्दल जाणते झाले. गावातील गटारातील पाण्याचे निरीक्षण करून “स्वच्छ गावं स्वस्थ गावं” हे अभियान पण राबवले .....मी शनिवारी पोखारीत तर मुल रविवारी अंबाजोगाईत आपल्या खर्चाने, हे प्रवासाचे पैसे कुठून येतात हे मात्र मला त्यावेळी समजले नव्हते किवा त्याचा विचार ही माझ्या मनात कधी आला नव्हता. संगणक शिकणे....चांगले चित्रपट पाहणे .....अंबाजोगाईच्या पंचक्रोशीत खूप भटकंती करणे....... आपल्यावर निर्व्याज प्रेम करणाऱ्या पाखरांन बरोबर खूप विहार करता आला.

या मुलांनीही मला खूप काही शिकवलं .....कांद्याला फुल येत ......ऊस न कापता कसा खायचा .....बैलगाडी कशी चालवायची .....मी जे शिकलो होतो ते त्यांना शिकवत होतो ....आणि ते जे जगत होते ते मला शिकवत होते......शिक्षण ही प्रक्रिया खरं अशी देण्याघेण्याची का होत नाही ?

सलग दोन वर्ष न चुकता हे चालू होत .......अंबाजोगाईतील प्रज्ञावंत मुलांमधील काम वाढलं व माझ पोखरीला जाण्याच बंद झालं.

२००६ मध्ये खोलेश्वर महाविद्यालयातील मुलांचा राष्ट्रीय सेवा योजनेतील १० दिवसांच्या श्रमदानाचे शिबीर प्रबोधिनी च्या भावी कामा साठी घेतलेल्या शेत जमिनीत आयोजित केलं होत. ५०/६० मुल तंबूत राहून शेततळे खोदण्याचे काम करणार होती. २/३ दिवसात्त मुलांची चांगली ओळख झाली.

दुपारच्या जेवणा नंतरच्या विश्रांतीसाठी सर्व जन गेली होती. मी बाभळी च्या झाडाखाली मस्त पहुडलो होतो.....अचानक कुणीतर आल्याची जाणीव झाली व डोळे उघडले ....समोर एक काळासावळा ....गोल चेहऱ्याचा .....मळकट पांढरा सदरा ....पण थोडे आदरयुक्त पण खूप आपुलकीचे भाव .......मी हसलो ....आणि तो पण ....त्याने विचारले, “दादा ओळखल का मला ?” ......नव्हत ओळखता येत मला. तो म्हणाला, “दादा मी, रानबा ...पोखरीचा....तुम्ही येत होतात न आम्हाला शिकवायला.”

अरे किती बदलला आहेस रानबा ....

मुलं मोठी झाली की आपण त्यांना विसरतो ते आपल्याला नाही याचा अनेकदा अनुभव मला येतो .....

“दादा, BA च्या ३ ऱ्या वर्षाला आहे मी” रानबा म्हणाला.

जवळ पास तास भर आम्ही त्या जुन्या विश्वात वावरत होतो. रानबा सोडून सर्वांनी शिक्षण सोडलं ...सर्व जण काम करायला लागले ....वर्गातील अनेक मुलींचे लग्न झाले व काहीना मुलं पण ....एक खूप हुशार मुलगी तेवढी राहिली, एक छोटा पांढरा दाग होता शरीरावर म्हणून .....

“रानबा, तू खूप चांगल करतोयेस शिक्षण घेतोस .....चांगल वाटलं” मी रानबा ला म्हणालो, रानबा पण अभिमानाने हसला.

त्याशिबिरात सर्वात चांगला सहभाग व सर्वात चांगले काम करण्याचा पुरस्कार सर्व मुलांनी एक मतांनी रानबाला दिला. खूप छान वाटलं.

रानबाशी आत्ता चांगली मैत्री झाली. तो नियमित भेटीला येत होता. त्याला MA करायचं होत मग B Ed व त्या नंतर शिक्षक ....एक सुंदरस स्वप्न होत त्याच. त्याला मी म्हणाली अंबाजोगाईतच रहा मी करतो तुझ्या राहण्याची सोय कारण तो सध्या सायकली वरून दररोज १६ किमी जाणयेण करत होता.

मी थोडा आग्रह पण करत होतो. रानबा त्या दिवशी जो गेला तो परत महिना भर भेटलाच नाही.

महिन्यांनी तो परत आला ...मी थोडं रागानेच त्याला म्हणालो, “रानबा,शिक्षक व्हायचं आहे न ? कॉलेज का करत नाहीस ?”

“दादा, घरी आता कुणाला तरी एकाला रहावच लागत. बा रानात जातात आई ६० रुपये रोजानी जाते .....घरच भागात नाही म्हणून छोटा भाऊ किन्नर म्हणून गेला आहे ट्रक वर .....घरच पाणी भराव लागतं,पाण्याला लई मोठी रांग असते. एक घागर हात पंपा वरून मिळायला बारीत अर्धा तास जातो. पाण्याशिवाय कसं चालणार दिवस भर पाणी भरण्यातच जातो. आत्ता पर्यंत भाऊ करायचा कारण त्यान शिक्षण सोडल होत. पण तो कामावर गेल्या पासून मला रहाव लागतं घरी” रानबा बोलत होता.

दिवाळीच्या फराळाच निमंत्रण देऊन तो निघून गेला. हे निमंत्रण मी स्वीकारले कारण मला रानबाचे घर पहायचे होते त्याच्या कुटुंबियांना भेटायचे होते. दिवाळीत मी पोखरीला निघालो रानबाच्या घरी.

देवळाच्या बाजूच्या बोळीतून थोडं पुढ गेलं की उजव्या हाताला रानबाचे घर होते. तसा तो पारावरच माझी येण्याची वाट पहात होता. घर मातीच ....गेल्याबरोबर मोकळी जागा. एक बाजूला तुराठ्यांचा आडोसा करून तयार केलेल स्वयंपाक घर .....दोन पत्र्याच्या खोल्या, दगड माती ने बांधलेल्या. अंगणात एक विजेचा बल्ब लटकत होता.

“आई, दादा आले”, रानबा ने आई ला आवाज दिला.

आई लगबगी ने पाणी घेऊन आली हात पाय धुण्यासाठी. सहावार,काठापदराची पण थोडी जुनी झालेली साडी..... रानबा सारखाच रंग व चहेरा...४५ च्या आसपास वय असावं....

“या दादा लई ऐकल रानबा कडून तुमच्या इशई.....बर झाल आलात.ये रानबा अंथर की पोत बसायला” रानबाची आई खुपच आस्थेनी बोलत होत्या.

रानबा लगेच बाहेर गेला त्यांनी पोहे आणले. आई नी चूल पेटून भांड ठेवल ....कांदे, कोथिंबीर कापली ....शेंगदाणे, तेल....मस्त वास येत होता ... रानबानी पोहे भिजवले ....या दरम्यान माझे रानबाच्या आईला प्रश्न विचारने सुरु झाले. “दिवाळीत रोजंदारीच काम नसेल न ?”

“अस कसं होईल जावच लागतं ......आज तुम्ही येणार म्हणून नाही गेले.( “म्हणजे ६० रुपयाचे नुकसान”, मी मनातच म्हणालो.) याचे बा ला जाव लागल सालगडी ह्ययंत न ते ....धार काढायला गेलेत ....ये रानबा, बोलून आन त्यांली ....आज काल या लाईटच बी काही खरं नाही बघा दिस भर नसती आणि राती येते .....मग यांली रातच्याला उसाला पाणी दयायला जाव लागतं. आता बघा न आम्ही बिल नाही भरल. येण सणात कापली आमची लाईन ......अंधारातच दिवाळी झाली ....पैसे लई लागायलेत .किती राबल तरी भागत नाही. या आमच्या रानबाला शिकायची लई इच्छा ......अव दर इतवारी हा तुरी बडवायला जायचा ...कापूस काढाय जायचा ...त्यात मग फिया भरायचा लई कष्ट केले यान ....पण आत्ता काय करणार घरी बसूनच अभ्यास चालू हाय त्याचा ....मास्तर व्हायचं म्हणे .....या ईळीस नंबर नाही लागला ....त्या प्राईवेट काय असत्या त्याच्या फिया म्हंजे आमची सम्द्यांची सालाची कमाई....गरिबाला शिक्षण नाई,पाणी नाई, इज नाई.......पण गडी धीराच हाय लई अभ्यास करतंय.......आत्ता बघाकी या कालच्या अवकाळी पावसानी घराच लई नुकसान केलं आधीच इनमीन दोन घोल्या त्यातील एक ढासळली. माती दगड काढायला बी येळ मिळत नव्हता. सणासुदीला आवराव म्हणून हात घातला अन् एक भलं मोठ जनावर फणा काढूनच अंगावर आल. अंगात कापरच भरलं.जी पळत सुटले ते थेट पाराजवळ. अंग घामानी सरदुन गेलं. एक बाई दिसली सरळ गच्च पकडल तिला. काही बी कळणं. शेवटी जवळच्या बायांनी पाणी पाजल,कांदा लावला नाकाला. थोडं भानावर आले. दिसभर घरा बाहेरच काढला. रानबा चे बा येईस्तोर हिम्मत झाली नाही. आजकाल रात्री बेरात्री लई भ्याव वाटत.”

रानबाच्या आई चे बोलणे मी फक्त सुन्न होऊन ऐकत होतो.

इतक्यात रानबा आपल्या वडिलांना घेऊन आला. पांढरी टोपी, सदरा, धोतर, चांगला रापलेला रंग, प्रचंड काम करणाऱ्या शरीरावर ज्या काही खुणा असतात त्या सगळ्या. राम राम करत वडील खाली बसले. गरम गरम पोहे, चुरमुऱ्याचा चिवडा, शेव व नुक्ती चा चांगलाच पाहुणचार मी घेतला.

जवळची एक काडी घेऊन वडील आपले तळपाय खाजवत होते. मी पाहिलं तर त्यांच्या हाताला व पायाला चांगल्याच भेगा पडल्या होत्या थोडं रक्त पण येत होत.

“काय झाल काका ?” ,मी विचारले

“खात टाकून टाकून झालं हो .....चुना लावला पण बर काही होईना दवाखान्यात जायला येळच नाही भेटला.”

मन सुन्न झाल.

“थोडा वेळ काढावा काका स्वतः साठी” माझ्यातील समुपदेशक बोलला .

“हो न जायलाच लागेल. अव आपली दोन एक्कर हाय त्यात भागत नाही म्हणून सालगडी म्हणून हाय एका कड. सकाळी आपल्या रानात घंटे दोन घंटे नंतर दिस बर मालकाच्या रानात. दिस कधी जातंय समजतच नाय. रात्री दुखायल की ध्यानात येत.” रानबाचे वडील सांगत होते.

बऱ्याच गप्पा झाल्या. रानबाच्या कुटुंबाची चांगलीच ओळख होत चालली होती. AC मध्ये बसून PC वरच्या एखाद्या सुंदर कवितेला superlike करणाऱ्यातला मी होतो. पंचतारांकित व्यवस्थेत बसून देशाला बलशाली बनवण्याचे नियोजन करणाऱ्यातला मी. विचारांची चक्र भरभर फिरत होती. अश्या अनेक रानबानां शिक्षण सोडून देत पाणी भराव लागतं. तुरी बडवाव्या लागतात, कापूस वेचावा लागतो,ऊस तोडावे लागतात आणि मग आमच्या सारखे लोक विनासायास चांगल विद्यावेतन घेत चांगल्या महाविद्यालयात जाऊन उच्चविद्या विभूषित होतो......

त्याचं जीवन मी कसं समृद्ध करू हा विचार तिथे करत त्यांच्या दैनंदिन कामातील अडथळा आणण्या सारखे होते ....बराच वेळ घेतला होता.

जाण्यासाठी निघालो आई, वडिलांच्या पाया पडलो आणि टावेल टोपीचा आहेर पण घेतला ........

पारापर्यंत आलो तेच रानबाच्या आईचा आवाज आला.ती आम्हाला बोलावत होती. आम्ही परत घरात गेलो आईच्या हातात रंगीत करदोडा होता. तिने तो मला दिला मी तिला विचारल , “ हे कश्यासाठी ?”

आई म्हणाली, “दिवाळीच्या दिवशी आपल्या घरातील मोठयापोराला कंबरेला करदोडा बांधण्याची रीत हाय कसली इजा बिजा येवूनाये म्हणून. आत्ता रानबा तुम्हाला दादा म्हणतो मग तुम्ही माझ थोरलं पोर की आता तुम्हालाच द्यावा लागणार. फक्त या रानबा जरा थोडं समजून सांगत जा आम्हाला ते काय म्हणताय ते काय बी समजत नाही”

रानबाच्या आईच्या त्या शब्दान मध्ये व कृतीत मला सापडलं काय आपला भारत या जगाला देऊ शकतो ....आणि काय शिकऊ शकतो.

मी डोळे घट्ट मिटले व माउलीचे पाय धरले.........

मला आत्ता तिच्या हृदयाची भाषा शब्दां शिवाय समजत होती.

मला
आत्ता तिच्या हृदयाची भाषा शब्दां शिवाय समजत होती.


दर दोन महिन्यांनी शिशुविहार मधील मुलांनी काही तरी सादरीकरण करायचे आणि ते त्यांचे शिक्षक,पालक आणि आम्ही काही प्रबोधिनीचे शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मिळून अनुभवायचे अश्या उपक्रमाला आम्ही अभिव्यक्ती असे नाव दिले. मुलांच्या सादरीकरण नंतर पालक त्यांच्या भावना व्यक्त करतात व नंतर सर्व जन मिळून मुलांच्या प्रगती बाबतीत चर्चा करतात.

या उपक्रमाचा मुलांच्या विकासासाठी, शिक्षक पालक सुसंवादसाठी, आम्हा कार्यकर्त्यांना एकूण शिशुविहार मधील शिक्षण प्रक्रिया व आपण जे विचार करून उपक्रम करतो त्याचा लेखाजोखा घेण्यासाठी खुपच उपयोग झाला.

पालकांचे अनुभव कथन खुपच बोलके व प्रेरणा देणारे असते. अश्याच एका अभिव्यक्ती उपक्रमानंतर ऐक थोडीशी ठेंगणी, शिडशिडीत बांध्याचे, गव्हाळ वर्णाची आई उठली व ती बोलायला लागली. आहो बोलणं कसलं, तिने चक्क टाहोच फोडला. ती त्या रडण्याच्या अवस्थेतच म्हणाली, “माझी मुलगी या शाळेत शिकली. जी आज ती काही आहे ती या सहले मुळेच आहे.” थोडं आपल्याच विचारांच्या तंद्रीत असलेला मी तिच्या रडण्याने व त्या नंतरच्या वाक्यांनी खाडकण भानावर आलो व मी थोडं नीट पाहिलं कोण ही स्त्री ...........आणि मी चक्क ४ वर्ष मागे गेलो ........

सकाळची ११ ची वेळ आमच्या चिमण्याची आणि मोरांची शाळा भरली होती चिवचीवाट थांबून सामुहिक प्रार्थना सुरु झाली होती. राष्ट्रगीत सुरु झाले मी डोळे मिटून कार्यालयात उभा होतो. भारतमाता की जय झाले व मी डोळे उघडले. समोर एक आई आपल्या मुलीला घेऊन उभी. मी त्यांच्याकडे पहिल व हसलो ......शाळेचा पहिलाच आठवडा त्यामुळे मुलांची व पालकांची नीट ओळखपण झाली नव्हती. मी त्यांच्या कडे पाहून हसलो आणि ती आई जोरात रडायला लागली ...... “माझ्या मुलीला शाळेतून काढू नका हो ......मी नाही सांगितलं तुम्हाला पण माझ्या मुलीला शाळेतून काढू नक्का” ... तिच्या त्या रडण्यानी व त्यानंतर च्या वाक्यांनी मी फारच अस्वस्थ झालो होतो. तसा हा पहिलाच अनुभव ......मी स्वतःला सावरत त्यांना म्हणालो तुम्ही आधी बसा व मला नीट सांगा काय झालं.

थोडस सावरत आई म्हणाली, “ही माझी मुलगी.” .......गोरा व उभटसा चेहरा....बोलके व पाणीदार डोळे, थोडीशी अकल्पित भीती ...४ वर्षाचे ते लेकरू थोडं भेदरून गेलं होत. मी तिच्या कडे पाहिलं व विचारला, “आजी बाई नाव काय हो आपलं?” ती काहीच बोलली नाही मी परत विचारलं पण ती ....फक्त आपल्या आई कडे पहात होती ....आईच हुंदके देण चालूच होत. त्यातच ती म्हणाली, “नाही बोलता येत तिला पण तिला शाळेतून कडू नका. जन्मल्यापासून नाही बोलता येत, योगिता आहे तीच नाव ”

एक अबोल शांतता सर्वत्र पसरली ........मला काय बोलावं हेच समजत नव्हत.

योगिता आई हुंदके देतच बोलत होती, “ दादा , हिला लहान पणापासून खूप कमी ऐकू येत ....जवळ पास नाहीच आणि त्यातून मग हिला बोलता पण येईना....सगळ हातवारे करूनच बोलणं चालत. ऐक दोन शाळेत घातलं पण त्यांनी ठेवायला नाही म्हटलं......आत्ता काय करू सांगा खरं सांगून शाळेत घालायचं म्हणल तर कुणी शाळेतच घेत नाहीत .....त्यामुळ या वेळी न सांगताच प्रवेश घेतला. चूक झाली माझी ...पण करू तरी काय मी ? मुंबई पुण्याच्या डॉक्टर ला दाखवलं ते म्हंत्यात लहान मुलात खेळू द्या ...पण आमच्या घरात ही एकटी लहान बाकी मोठी माणस.”

मला काय बोलावं हेच समजेना. मी आमच्या शिशूविहारच्या ताईंना बोलून विचारलं काय कराव. त्या म्हणाल्या खुपच अवघड आहे. अस म्हणताच योगिताची आई परत रडायला लागली. मी त्यांना म्हणालो, “ताई, योगिताला विशेष शाळेत पाठवावे लागेल तिला वेगळ्या पद्धतीने शिकवावे लागेल.”

“आहो दादा, कुठ आहे अशी बालवाडी अंबाजोगाईत .......नाही म्हणून लेकरांनी घरीच राहायचं का ?” योगिताची आई म्हणाली.

त्याचं ही खरं होत. योगिता मात्र अनिमिष नेत्रांनी सर्व कावरंबावरं होऊन पहात होती. तिचे डोळे मधून मधून हसणाऱ्या आमच्या चिमण्यांकडे जायचे. मी ताईंच्या कडे पहिले त्यांच्या डोळ्यात ही अनिश्चितता....ऐक अनाहूत पोकळी माझ्या छातीत व पोटात ...ऐरवी कुणी मुलां बद्दल काही माहिती लपवली की पालकांना अद्वातद्वा बोलणारा मी मात्र .......काय निर्णय घ्यावा यातच अडकलो.

“चला पुढचे १५ दिवस आपण पाहू जर योगिता शिशूविहार च्या वातावरणात जुळून घेते का ? पण तिला जमले नाही तर मात्र मला माफ करा ताई” थोड्याफार अविश्वासानेच मी योगिताच्या आई ला माझा निर्णय सांगितला. थोडया केविलवाण्या आवाजात योगिताच्या आई हो म्हणाली.

योगिता वर्गात गेली .......पुढचे १५ दिवस ...तिला व आम्हालाही माहित नव्हते काय होईल.

दोन दिवसात योगिता हसायला लागली.....ताई तिला त्यांच्या समोर बसवायच्या ....चार पाच दिवसात ती नबोलता सामान्य कृती इतर मुलान सारख्या करू लागली आणि आठवडा भरातच योगिता आम्हा सर्वांची लाडकी झाली फक्त लाडकी नाही तर आमची झाली ....आज विचार करतो त्यावेळी आत्ता नक्की वाटत योगीतानीच आम्हाला आपलासं केलं होत. तिच्या शब्दात नव्हत तेवढ सामर्थ्य तिच्या डोळ्यात आणि धावूनी येत मिठी मारण्याच्या कृतीत होते. आम्हा सर्वाना तिने कामाला लावल ताई ओठांची व बोटाच्या हालचाली ची भाषा शिकु लागल्या. माझ्या अश्या मुलान साठी च्या शिक्षणाचा अभ्यास सुरु झाला.

१५ दिवस काय, अनेक महिने निघून गेले .....ऐक दिवस योगिताच्या वडिल पेढे घेऊन आले.त्यांना दुसरा मुलगा झाला आणि योगिताला भाऊ ....चला आत्ता भावाला पहायच्या निमित्याने योगिताच्या घरी जान झाल. घरी आमची आजीबाई (योगिताला मी आजी म्हण्याचो ) वाट पाहतच बसल्या होत्या ......आता दा..दा म्हणू शकत होती. ऐक तास बाळाशी खेळणं ....आणि त्यात सर्वात मला सामून घेणं आजी बाईन च चालू होत.तिच्या बाहुली पासून ते घरातील प्रत्येक गोष्टीना व व्यक्तीना ती माझी हसून ओळख करून देत होती. आपला उजवा हात डाव्या छातीला लाऊन .....आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी व “दा ..दा” शब्दांनी ती सर्वाना सांगत होती माझे दादा. दोन तासानी जायला निघालो आणि योगिता एकदम अस्वस्थ झाली व रडू लागली ती खूप प्रयत्न करून सांगत होती ...आणि मला ही ते आत्ता समजत होत ....नको न जाऊ दादा, तू माच्या घरीच रहा न .....मी समजून सांगत होतो पण तिच्या डोळ्यातील हट्ट मला जाऊ देण्यास तयार नव्हता. मला आत्ता तिच्या हृदयाची भाषा शब्दांन शिवाय समजत होती. जान भाग होत आश्वासन देऊन परत येण्याच .....

योगिता २ वर्ष आमच्या बरोबर होती .....ती ने खूप कमी बोलून सर्वान एवढच शिक्षण घेतलं होत. तिचा स्नेह्संमेलानातील सहभाग खुपच बोलका होता .....आणि त्या पेक्षा तिची प्रगती ....परीक्षेत कुठलही उत्तर न देता तिच्या प्रगती पुस्तकावर “ अ +” ची श्रेणी होती.......

सगळं सगळ कसं लखः डोळ्यासमोरून गेलं .... योगिताची आई म्हणाली, “माझी मुलगी आत्ता दुसरीत आहे. तिच्या कानाला आम्ही आत्ता यंत्र बसवले आहेत ......ती आत्ता थोडं थोड बोलू शकते ...आणि खूप चांगल लिहू शकते .....आता तिचा भाऊ शिशुविहार च्या चिमणी गटात आहे.”

आमच्या शाळेत ऐकमेकांना ज्या वेळी आम्ही भेटतो न आमचे दोस्त माझ्या हातावर जोरात टाळी देतात .....हीच आमच्या अभिवादनाची व निरोप देण्याची पद्धत ती सुरु झाली योगिता मुळेच .....योगिताची आई तिच्या मनोगतात म्हणाली, “योगिता व तिचा भाऊ एकमेकांना टाळी देतात व मोठ्यांनी हसत म्हणतात, प्रसाददादा” हे ऐकल आणि डोळ्यातील अश्रू लपवत हृदयानी रडण्याचा अनुभव मी घेत होतो.

सध्याच्या चिमणी गटात माझ्या मित्राचा असाच ऐक शाररिक दृष्ट्या अविकसित मुलगा आहे ....तो पण आपलं पूर्ण क्षमते अभिव्यक्त झाला होता. योगिताची आई त्याच्या आईला म्हणाली, “ ताई, मी तुम्हाला सांगते..खूप त्रास होतो पण आपण प्रयत्न करायचे बघा तुमचा मुलगा पण आमच्या योगिता सारखी प्रगती करेल ....फक्त धीर धरवा लागतो” आमच्या धीर देण्या पेक्षा..... योगिताची आईचा धीर माझ्या मित्राच्या बायकोच्या चेहेऱ्यावर ऐरवी न दिसणारे धीराचे भाव निर्माण करत होता. ह्याही पेक्षा योगितानी माझ्या शिक्षण विषयक दृष्टीकोनातच बदल केला “योग्य आणि निवडून घेऊन शिकवण्याची रीत बंद करून येतील त्यांच्यातील योग्य गुण शोधून त्यांना सुयोग्य शिक्षण देणं........

स्वामी विवेकानंदाच चे वाक्य नेहमी शिक्षणावर भाषण देताना मी सांगायचो ... “ प्रत्येक आत्मा हा ऐक अव्यक्त ब्रम्ह आहे. मनुष्यच्या सुप्तरूपात असणाऱ्या पूर्णत्वाचे प्रगटीकरण म्हणजे शिक्षण.” योगिताने मला ह्या वाक्याचे अनुभवासह स्पष्टीकरण दिले होते.