आज सकाळी पाच वाजताच उठलो. आंघोळ केली. गेल्या महिनाभर तळपायाचे हाड मोडल्याने
सकाळचे अग्निहोत्र माझ्या कडून होत नसे. आजचा सूर्योदय ६ वाजून १६ मिनिटांचा. घरात
डासांनी बरेच थैमान घातले असल्याने थोडं लवकरच अग्नि प्रदीप्त केला. आज गोवऱ्या
थोडया चोपुनच रचल्या होत्या. थोडा जास्त धूर होण्यासाठी. घरभर धूर झाला. बरोबर दोन
मिनिटे आधी फुंकर मारून परत अग्नीला जागविले.
सूर्याय स्वाहा.....सूर्याय इदं न मम.
प्रजापतये स्वाहा ... प्रजापतये इदं न मम.
आहुती दिली व
शांत बसलो. धूर खुपच झाला होता. बाहेर गच्चीवर जाऊन उगवता सूर्य पाहत बसलो. काही
मित्रांचे वाढदिवस होते त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. सूर्य थोडा वर आला. आता
त्याचे कोमल किरण थोडे उष्ण झाले होते.
सुधाकरमामा
सफाई करण्यासाठी आला होता. तो नगरपालिकेत कर्मचारी पण सकाळच्या मोकळ्या वेळात
आमच्याकडे कामाला येतो. एवढे मोठे घर ....जर सुधारकमामाने काम करणे बंद केले तर
कसे होणार? विचारचक्र चालू झाले. किती राबतात ही माणसं.खरंच आपल्याला त्यांच्या
कामाची किंमत आहे का? सुधाकरमामा सारखे आपल्या समोर काम करणारे अनेक आहेत.
त्यांच्या कामाला समाजात सन्मान नाही.
मोकळ्या
वातावरणात सूर्याच्या साक्षीने, माझ्या डोळ्यासमोर अनेक प्रकारचे काम करणारे लोक
दिसत होते, साहजिकच मी पाहिलेले. एका नंतर
एक येत होता आपली ओळख सांगत होता. मन शांत होते पण उघड्या डोळ्यांसमोर अनेक जण
येऊन गेले. मैला वाहणारा भंगी बराच वेळ डोळ्यासमोरून हालत नव्हता. या सर्वांचे
जीवन व जगणे मी थोडे तरी पाहिले आहे. असा कुणी राहिला का ज्याची ओळख अजून झालीच
नाही? लगेच लक्षात आले मृत्युदंडाची
शिक्षा झालेल्या व्यक्तीला फासावर लटकवणारा व्यक्ती. त्याची ओळख करून घेता येईल का
आज? पण ते शक्य नव्हते. मग अजून कुणाची ओळख नाही झाली आपली?
मन काही काळ सुन्न झाले. माझी बायको डॉक्टर, ती घरातून
बाहेर आली व गच्चीवरच्या बाजेत बसली. मी तिच्याकडे पाहून हसलो. पण मनात विचार
चालूच होते. कुणाला भेटायचे आज ? माझे विचार एकदम थांबले. मी १९ वर्षे मागे गेलो.
माझ्या एका मित्राने इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षी आत्महत्या केली होती. तो प्रसंग
डोळ्यासमोर ठाण मांडून उभा राहिला. एकदम माझ्या स्मृति पटलावर पोस्टमार्टम (शवविच्छेदन) करणारा उभा राहिला. विचार क्षणभर
थांबले.
पोस्टमार्टम नाव
जरी ऐकले तरी अंगावर काटा येतो. लहानपणी तर मृत्यूचे खूप भय पण त्यापेक्षा जास्त
भय होते मृतव्यक्तीच्या शरीराचे. माणूस अकाली मृत्यूमुखी पडला किंवा त्याचा
अपघाती, घातपाताने मृत्यू झाला किंवा त्याने आत्महत्या केली तर त्या व्यक्तीचे भूत
होते, अशा गप्पा आम्ही लहानपणी ऐकल्या होत्या. आता ती भीती राहिली नाही. पण दररोज
ज्यांचे मृतशरीराशी काम असते अशा शवविच्छेदन करणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य कसे असेल?
का करत असेल तो हे काम? काय वाटत असेल त्याला हे सर्व करताना? मनात आता विचारांचे
थैमान सुरु झाले. सूर्य चांगलाच वर आल्याने मी बैठकीच्या खोलीत येऊन बसलो. नुसता
बसलो होतो, मन मात्र विचारांच्या कोलाहलात चांगलेच फसले होते.
माझी
बायको चहा घेऊन आली. चहाचा पहिला घोट पिताच मी तिला विचारले,
“ तू कधी,
पोस्टमार्टम पहिले आहेस का ? कसे करतात गं ते? ते करणारे लोक कसे असतात?”
माझ्या
अचानक अशा प्रश्न विचारण्याने ती डोळे मोठे करत म्हणाली,
“प्रसाद..सकाळ सकाळी काय
हे?”
मी
माझ्या मनातील विचारांचे वादळ तिला सांगितले.
“खूप
चांगली असतात ही माणसं, त्यांना दारू पिण्याचे लाईसन्स असते म्हणे? आम्हाला दहा
पोस्टमार्टमचा अभ्यास करावा लागायचा. डॉक्टर फक्त पाहत असतात पण ही माणसं सगळं
करतात. आमच्या कॉलेज मध्ये एकाची ओळख होती माझी. डोळे नेहमी लाल असायचे. खूप
चांगला होता स्वभावाने”
तिच्या
बोलण्याने माझ्या मनात आदरयुक्त कुतूहल निर्माण झाले. खरंच कसे असतील हे लोक?
डॉक्टर
प्रसादला फोन लावला.
डॉक्टर प्रसाद कुलकर्णी |
“मला
पोस्टमार्टम करणाऱ्या व्यक्तींना भेटायचे आहे.”
“कशा
प्रकारच्या? अनेक प्रकारचे आहेत”
“ते
सतत नशेत असतात का ?”
“म्हणून
तर विचारले कोणत्या प्रकारच्या?”
“म्हणजे
काही लोक हे काम दारू न पिता करतात?”
“हो,
आहेत की दारू न पिणारे.”
“काय
म्हणतोस ?”
“म्हणून
तर विचारतोय, कुठल्या प्रकारच्या?”
मी
प्रसाद बरोबर चालणाऱ्या संभाषणाने विचारात पडलो. प्रचलित लोकांकडून जे ऐकत होतो
त्याला एकदम छेद
गेला होता. दारू न पिता पोस्टमार्टम करणारे लोक आहेत हे ऐकून अजून अस्वस्थ व अचंबित झालो. काय जबरदस्त माणसं
असतील ते !!! प्रचंड आत्मिक बळ असणार त्यांच्या ठाई.
“दारू
न पिता पोस्टमार्टम करणाऱ्या व्यक्तीला भेटायचंय”
“ठीक
आहे. मला सद्या अंबाजोगाईतील कुणी माहित नाही पण माझ्या जिल्हा रूग्णालयातील एकाशी
बोलणे करून देतो तुला. बीडला जात आहे.
तिथे गेलो की तुला त्यांचा फोन नंबर देतो. तुला जे बोलायचे आहे ते बोल” नेहमीच्या बिनधास्त सुरात डॉक्टर प्रसाद बोलला.
मी
सकाळी ७.४२ ला प्रसादला बोललो पण माझ्या मनातील अस्वस्थता मला काही शांत बसू देत
नव्हती. अनेक डॉक्टर मित्रांना मी फोनवर बोललो. काही माहिती मिळते का ते पाहिले.
गुगलवर मराठीतून पोस्टमार्टम किंवा शवविच्छेदन याबद्दल काही मिळते का ते पाहिले पण
माझी निराशा झाली. शेवटी पोस्टमार्टम बद्दलची इंग्रजीतील बरीच माहिती काढली.
मराठीत फक्त सध्या महाराष्ट्रातील शव-विच्छेदन केंद्रांच्या
बद्दलच्या बातम्या वाचायला मिळाल्या.
एका बातमीतील मजकूर ......
“निवडणुका शांततेत पार पडण्यासाठीच्या बंदोबस्तात पोलिस कर्मचारी आणि
अधिकारी गुंतले असल्याने कूपर रुग्णालयासह मुंबईतील इतर कॉरोनर कोर्टात बेवारस
मृतदेह नेण्यास पोलिस येत नसल्याने मॉर्गमधील मृतदेहांची संख्या वाढत असून , राज्य सरकार आणि
पालिकेच्या वादामध्ये इतर सोयी सुविधांची वानवा झाली आहे.
त्यातच कूपर शव-विच्छेदन केंदातील अपुरा कर्मचारीवर्ग , देखभालीकडे होणारं दुर्लक्ष , कचऱ्याचं साम्राज्य व त्यामुळे वावरणारे उंदीर व घुशी मृतदेह विदुप करीत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
मुंबईत कूपर , राजावाडी , भगवती आणि जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन केंदे आहेत. मात्र सर्वच शवविच्छेदन केंदाच्या समस्या सारख्याच असून , त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्यानं कर्मचारी , तसंच डॉक्टरवर्ग त्रासला आहे. शवविच्छेदन केंद राज्यसरकारच्या अखत्यारीत असल्याने सोयीसुविधा पुरविण्याबाबत पालिका आणि राज्यसरकार यांच्यात एकमत होत नसल्यानं, आहे त्याच स्थितीत केंदांचं काम सुरू आहे.
विलेपालेर् येथील कूपर रुग्णालयात वांदे ते गोरेगाव परिसरातील मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले जातात. शवविच्छेदन केंदात पूर्ण वातानुकुलित यंत्रणा असणं आवश्यक असतानाही 20वर्षांपूवीर्चेच एसी प्लॅण्ट त्याच अवस्थेत सुरू आहेत. नवीन प्लॅण्टसाठी सुमारे 50 लाख रुपये खर्च अपेक्षित असून , अद्ययावत व्यवस्थेसाठी एवढा निधी देण्यावर राज्याच्या आरोग्य खात्यात केवळ बैठकांपलीकडे काहीच होत नसल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 51 मृतदेह ठेवण्याची क्षमता असून दररोज 10 ते 15 मृतदेह हे जमिनीवरच अस्ताव्यस्त अवस्थेत टाकलेले असतात. मृतदेह चांगल्या स्थितीत राहण्यासाठी वापरण्यात येणारी रासायनिक दव्येही महिनोनमहिने मिळाली नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यातच शवविच्छेदन केंदाच्या मागे सर्वत्र मातीचे ढिगारे , रक्ताने माखलेले कपडे आणि कचऱ्याचा ढीग दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसतंय.
या समस्या कमी म्हणून की काय या शवविच्छेदन केंदात कर्मचाऱ्यांना प्यायला पाणीही नाही. पाण्यासाठी एक पाइपलाइन आहे , मात्र त्यातून वर्षापासून मृतदेहांचं रक्त मिसळल्यानं आणि बाहेरील टाकीत ते झिरपत असल्यानं कोणीही ते पाणी पीत नाहीत.
वारंवार पाठपुरावा करूनही पाण्याची स्वतंत्र लाइन देण्यात राज्य सरकार आणि पालिका प्रशासन तयार नाही. त्यांच्यातील दिरंगाईमुळे प्यायला पाणीही नाही. सामाजिक संस्था पाण्याचा कूलर देण्यास तयार असूनही आम्हाला प्यायला पाणी नाही अशी तक्रार केली जाते.
सर्वात महत्वाचं म्हणजे या शवविच्छेदन केंदात उंदीर आणि घुशी यांची संख्या वाढल्यानं मृतदेहांचे नाक , कान आणि शरीराचे भाग खाल्यानं मानवतेला काळीमा फासला जात आहे व त्याला जबाबदार पालिका आणि राज्य सरकार असल्याचं तो अधिकारी म्हणाला. दररोज सरासरी दहाहून अधिक मृतदेह येत असल्यानं 8 ते 10 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून , केवळ चार कर्मचाऱ्यांत हे काम केलं जातं.
लोकप्रतिनिधींचा संपर्क वारंवार होत असला तरी या समस्यांचा पाठपुरावा करण्याची कोणाचीही इच्छा नसल्यानं घरूनच हात धुण्यासाठी साबण आणावा लागतो. मृतदेह उचलण्यासाठी साधे ग्लोव्जही खात्यामार्फत देत नसल्याने केवळ पोटासाठीच असं काम करावं लागतं , असंही एका कर्मचाऱ्यानं डोळ्यांत अश्रू आणत सांगितलं.”

बातमी वाचली व मन प्रचंड उद्विग्न झाले. अशा
परिस्थितीत कसे काम करत असतील लोक ? मला काही काळ काहीच सुचत नव्हते.
“जेवायला चल” आवाज आला.
“मी शांतपणे जेवायला बसलो”
तिने वाढून घेतले. दोन घास तोंडात जाताच मी परत
माझ्या डॉक्टर बायकोला
शवविच्छेदनाच्या पद्धतीबद्दल विचारले.
“आता
जेवताना पण हे का ?”
मी
शांत ....काय बोलणार ...?
जेवणानंतर
मात्र मी थोडं फेसबुकवर मन रमवलं ......आज नेमके विद्युत मंडळांनी भर दुपारी काम
काढले होते. वीज नसल्याने प्रचंड घालमेल होत होती. त्या घालमेली पेक्षा माझ्या
मनातील घालमेल जास्त अस्वस्थ करणारी होती. मी उकाड्यात परत नेट सुरु केलं. तापमान
चांगलेच असल्याने माझा लॅपटॉप चांगलाच गरम झाला. बंद करण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
शेवटी मी घरातील थोडया थंड खोलीत जमिनीवर काही न टाकताच पहुडलो. कालच बालाजी
सुतारने दिलेले “रारंग ढंग” चे पहिले प्रकरण वाचले. त्यातही मृत्यू होता. मी पुस्तक
बाजूला ठेवलं व परत डॉक्टर प्रसादला फोन लावला.
“बोला.”
“तू
फोन नंबर देणार होतास न ?”
“घ्या
लिहून”
“काय
नाव आहे ?”
“नरेश”
“मराठी
बोलतो का?”
“एकदम
मस्त”
“आत्ता
फोन केलातर ठीक होईल का?”
“करा
की”
“तू
त्यांच्याशी बोललास का ?”
“हो”
“ठीक
आहे करतो फोन”
तितक्यात
वीज पण आली. मी बैठकीत येऊन पहिल्यांदा कुलर सुरु केले. मोबाईल चार्जिंगला लावला व
तसाच नरेशला फोन केला.
“नमस्कार,
नरेश का?”
थोडं
अनोळखी माणसाला बोलताना असणाऱ्या स्वरात समोरून आवाज आला,
“हो”
“मी
प्रसाद चिक्षे . डॉक्टर प्रसादचा मित्र. मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. तुम्हाला
कधी वेळ आहे?”
“हो,
हाय की बोला.”
मला
काय बोलावे हेच सुचेना.
“थोड्या
वेळाने बोललं तर चालेल का ?”
“हो,
थोडं मी बी बाजूला होतो”
मी
कागद पेन घेतला व काही प्रश्न काढावेत म्हणून काही लिहिले. इतक्यात नरेशचा मिस कॉल
आला.
मी
परत त्याला फोन लावला.
“नमस्कार
नरेश, बोलू का ?”
“बोला
सर”
“तुमचे
पूर्ण नाव काय ?”
“नरेश
धरमसिंग पिवाळ.”
“मूळ
राहणारे कुठले आपण ?”
“मूळ
रहिवासी, बीड”
“तुमचे
वय काय?”
“१-४-७२”
“म्हणजे
चाळीस.”
“हा
सर”
“शिक्षण
काय झालंय ?”
“दहावीपर्यंत”
“नौकरी
कधी लागली ?”
“पंधरा
वर्स झाले .......८८ ला.”
“कशी
लागली? कॉल आला होता का गव्हर्मेंटचा ?”
“हो
सर”
“पोस्टमार्टमच्या
कामाचा का ?”
“नाही
सर, सफाई कामगार म्हणून”
मी
अनेक प्रश्न विचारत होतो नरेश त्याचे उत्तरं देत होता.
बीड
मध्येच शिकलेला “नरेश धरमसिंग पिवाळ” बीडच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाचे काम
करतो. त्याआधी तो पोलीस स्टेशनमध्ये सफाई करायचा. विभागात त्याच्याबरोबर अजून
दोघेजण होते, पण चोवीस तासासाठीचे काम मात्र सर्वात अनुभवी नरेशचे. त्याला डॉक्टर
प्रसादने बोलावून घेऊन अंबाजोगाई हून माझा फोन येणार असल्याचे सांगितले होते.
त्याची नियुक्ती सफाई कामगार म्हणून झाली व तो पहिल्या दिवसापासूनच शवविच्छेदन
विभागात काम करतो. नौकरी लागण्याच्या पाच महिने आधीच त्याचा विवाह झाला होता. आता
त्याच्या घरी पत्नी, आई, त्याची तीन मुलं व एक मुलगी असतात. नऊ हजार मासिक वेतन.
“नौकरी आहे न सर ! काय करणार ? करावीच लागणार.”
बायकोपासून त्याने तो करत असलेले काम पाच महिने लपून ठेवलं होते.
“सांगितल्यावर चिडली असेल ना? नौकरी सोडा म्हणाली असेल ना?” मी विचारले.
हसत नरेश म्हणाला ...
“नाही सर ....कधीच नाही. सांगितलं
तिला नौकरी हाय,करावी लागणार.”
“तुम्हाला कधी वाटले का की, ही नौकरी सोडावी ?”
“नाही सर कधीच नाही”
खूप प्रामाणिकपणे, कधी भावूक होऊन तर कधी खूप आत्मविश्वासाने नरेश बोलत होता.
दररोज २ ते ५
शवविच्छेदन असतात. वर्षांत जवळपास सातशे साडे सातशे होतात.आता पर्यंत त्याने
दहाहजाराच्या वर शवविच्छेदने केले आहेत.
“पहिले “पीएम” कुणाचे केले?”
“कुर्ल्याजवळ, एक दिसाची पोरगी कुणी तरी टाकली होती ...जन्मताच टाकली होती
...जिवंत होती ...एक दिवस सिव्हील हॉस्पिटलला होती मग तिचा डेथ झाला. तिथूनच
सुरुवात झाली आमची ....पुढचे पाच सहा महिने सपनात येत होत सुरुवातीसला ....आपण
काही नशापाणी नाही न करत सर ...आता काही वाटत नाही. काम झालं की कुलूप लावलं की विसरतं सगळ .....” हसतच मला नरेशनी सांगितले.
“लहान लेकराचे पीएम केलं व घरी जाऊन आपल्या पोरास्नी पाहिलं की लई वाईट वाटतं
....” आपली दाहक व्यथा नरेश सांगतो. आपल्या पोरानी मात्र आता चांगल शिकावं असे त्याला
वाटते.
कोणत्याही दिवशी आणि कधीही जावे लागते. या नौकरीत बढती पण नाही. शवविच्छेदनाची
प्रक्रिया अगदी शांतपणे पण अगदी सराईतपणे त्यांनी आपल्या इंग्रजीमिश्रित मराठीतून
सांगितली. या प्रक्रियेतील बाह्य व अंतर्गत परीक्षणे सांगत त्यातून कसे निष्कर्ष
काढायचे हे अगदी शास्त्रशुद्धपणे नरेशने सांगितले. त्यानंतर अतिशय परिपक्वपणे तो म्हणाला,
“सोबत आलेल्या लोकांनां लवकर मोकळ करून दिलेले बरं असतं ....पुढ त्यांन्ली
अजुन किती वेळ लागल हे माहित नसत न सर ... घरात, पोरं बाळ जेवलेले नसत्यात न ...”
मनात खोल लागून गेले, हे वाक्य. हा इतका आपलेपणाचा विचारांचा संस्कार तो रोज पाहत
असलेला मृत्यू तर करत नाही न ?
“माणसाचे काही खरं नाही बघा सर ...इतक मी मी करायचं आणि एक दिस मातीत जायचं”
“एक दिस माझ्या चुलत भावाची मयत झाली. लोक येईस्तोपर्यंत वाट पाहत होतो.
इतक्यात दोन पीएम असल्याचा कॉल आला. जाव लागल सर ....असं लई वेळा अनुभव आले.”
आपल्या भावाचा अंत्यसंस्कार सोडून कुण्या अनोळखी व्यक्तीचा अंत्यसंस्कार वेळेवर व्हावा यासाठी जाणाऱ्या
नरेशला मी कोणती पदवी देणार ? त्याला
कधीही कुठल् पदक मिळणार नाही न कधी कुठे त्याच्या कामाचे कौतुक होणार.
“दारू प्यावीच लागते का, नरेश?”
“उगं नाटक करत्यात बघा सर..... काही बी बोलत्यात लोक, हे दारू पित्यात आणि
पोराबाळांच नुकसान ....म्हंत्यात असलं काम केलं म्हणून भ्याव वाटत ....असं काही बी
नाही. काही दिवसात सगळं न पीता करता येत, सर” कसे जमले असेल नरेशला प्रवाहाविरुद्ध
पोहणं ......
“बॉडी नीट स्टिचिंग करून प्लास्टिकच्या कपड्यात नीट बांधून द्यावी लागते न सर
...रक्त बाहेर येऊ नये म्हणून ....मग त्यावर नीट कपडा गुंडाळावा लागतो. बर्न
बॉडीचा फार वास येतो, स्टिचिंग बी अवघड
..” नरेश खूप सहज बोलतो.
“पीएम ला सगळ्यात जास्त कुणाच्या बॉडी येतात ...लहान लेकरं, बाया की पुरुषांच्या?”
“पुरुषांच्या येतात सर ...खात्यात, पित्यात आणि पडून मरत्यात बघा .....जास्त
तेच असतेत.” एक विदारक वास्तव
माझ्या समोर त्त्याने उभे केले .
“चीड चीड होते का रे कधी ?”
“होते की सर कधी कधी ....” अतिशय प्रांजळपणे नरेश हसत कबूल करतो.
सरकारकडून काही विशेष मदत किंवा सुविधा मिळतात का ? काय वाटत सरकारनी
तुमच्यासाठी काही करावे? या प्रश्नांची त्याच्याकडे उत्तरं नव्हती.
चाळीस मिनिटाच्या आमच्यातील संभाषणातून त्याने बरेच काही शिकवले होते मला
......
“सर, या एकदा भेटायला आमच्या सरबरोबर ....नक्की या ...” खूप आत्मियतेनी त्याने
दिलेले निमंत्रण मी स्वीकारतच सूर्यास्ताच्या अग्निहोत्राची तयारी सुरु केली ....
अग्नये स्वाहा,अग्नये इदं न मम
प्रजापतये स्वाहा ... प्रजापतये इदं न मम
प्रदीप्त अग्नीत, गाईच्या तुपाने माखलेले एकसंघ पूर्ण तांदूळ आहुती म्हणून
टाकले. त्या आहुतींमध्ये मी नरेश शोधत होतो .....कसा असेल तो ? एक अनाहूत भेटीची
ओढ ..............
“
1 टिप्पणी:
Respect !!!
टिप्पणी पोस्ट करा