रविवार, २३ नोव्हेंबर, २०१४

“Hari u r really very ambitious person. आणि तु यशस्वी होशील कारण तुझ्यात हरी आहे “


“Hari u r really very ambitious person. आणि तु यशस्वी होशील कारण तुझ्यात हरी आहे “


उभट चेहरा, थोडा नाकाच्या शेंड्याच्या जवळ सरकत येणारा चेष्मा सावरत आपल्या दाक्षिणात्य पद्धतीचा हेल काढत मराठी बोलणारा हरी एक प्रांजळ व्यक्तिमत्व. “I am a very ambitious person.” आपल्या स्वतःचे वर्णन आपल्या ब्लॉग वर लिहिणाऱ्या हरिहरन अय्यरची ओळख माझी गेल्या पाच सहा वर्षातील. प्रबोधिनीच्या कामानिमित्य ज्यावेळी मुंबईत जाऊ लागलो त्यावेळी मी खरोखर मुंबईकरांच्या प्रेमात पडलो. वर वर पाहता खूप एकांडी वाटणारी माणसे खूप मस्त सहजीवन जगायला शिकली. व्यस्त दिनक्रम,प्रवासाची दगदग हे सर्व असले तरी आपल्या या बिझी आयुष्यात पण माणुसकीचा ओलावा जपणारी अनेक माणसे मला भेटली त्यातील एक हरी.


दहावी पर्यंत हरी अभ्यासात फार विशेष मुलगा नव्हता. आपल्या सोसायटीचा गणेशोत्सव,मुबईकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे क्रिकेट व वेळ मिळाला की बुद्धिबळ हे हरीचे आनंद सोबती. पंचाचे निर्णय येण्याच्या आधीच आपला निर्णय सांगणारा हरी क्रिकेटचा जबरदस्त फ्यान आहे. क्रिकेटशी आयुष्यभराशी नाते रहावे म्हणून त्याने अठरावे वर्ष पूर्ण होताच पंच प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. या सर्वात व्हायचे हे होऊनच गेले. दहावीच्या शालान्त परीक्षेत त्याला हवे तसे गुण नाही पडले. याची परिणीती म्हणजे त्याला विज्ञान शाखेला प्रवेश मिळाला नाही.

गणित हा विषय त्याला खूप आवडायचा. वाणिज्य शाखा त्याला घ्यावी लागणार होती. त्याचा मोठा भाऊ वाणिज्य शाखेत शिकत होता. सकाळी महाविद्यालयात जाऊन दुपारी परत आला की त्याला फारसे काही काम नसायचे. हरीला असे मोकळे, निवांत आयुष्य नको होते. वाणिज्य शाखा घेण्याशिवाय दुसरा मार्ग पण नव्हता.सगळ्यात महत्वाचे त्याला आवडणाऱ्या गणिताला फार काही या शिक्षणात स्थान नव्हते.त्याने वास्तव स्वीकारले. महाविद्यालयात जाऊ लागला. सोबतची मित्र पण छान होती. खूप काही करायचे होते पण कुणासोबत करू हा मोठा प्रश्न होता.

प्रथम वर्षाला असतानाच त्याला एक लक्षात आले की जे आपल्याला येते ते दुसऱ्याला शिकवले पाहिजे. जे आपल्याला समजले ते दुसऱ्यांना समजून सांगितले पाहिजे. या प्रक्रियेत घेणारा व देणारा या दोघांचा पण चांगला विकास होतो हे त्याला आता पक्के होत जात होते. त्याला शिक्षकीपेशा बद्दल अतीव कुतूहल निर्माण होऊ लागले. यातूनच तो माध्यमिक शाळेतील मुलांना शिकवू लागला व त्यात मस्त रमू पण लागला.शिकवण्याचा विषय म्हणजे त्याला आवडणारे गणित.

अनेकांना सोबत घेवून काम करायचे तो आधीच शिकला होता.आता इतरांना गणितात रुची व गती निर्माण होण्यासाठी तो शिकवू लागला तसा तो वैदिक गणिता पासून आधुनिक गणिता पर्यंतचे सर्व क्षितिजे तो पादाक्रांत करत होता. कुठला अभ्यासक्रम नाही कुठली परीक्षा नाही कुठला निकाल पण नाही. आपनच ठरवायचे काय शिकायचे, कसे शिकायचे, किती शिकायचे आणि कुठपर्यंत आलो ते आपणच समजून घ्यायचे. हा गणिताचा प्रवास त्याचे आयुष्य अधिक समृद्ध करत होता आणि त्यासोबतच इतरांचे पण.

लोकांना वाटणाऱ्या या नसत्या गोष्टी करत असताना तो व्यावहारिक जगातील यशातही माग नाही पडला. तो याकाळातच Chartered Accountant पण झाला.एक मोठया पगाराची नौकरी मस्त बँकेत पण त्याला मिळाली. नौकरी सांभाळत शनिवार-रविवार मात्र तो आपण जे शिकलो ते शिकवायचा त्याच बरोबर गणित पण. फार काळ मात्र या कॉर्पोरेट जगात हरी रमला नाही. सहा महिन्यातच त्याला लक्षात आले की आपल्याला एका चक्रात अडकून ठेवणाऱ्या या चक्रव्युहातून लवकर बाहेर पडायचे. त्याने नौकरी सोडली व पूर्णवेळ शिक्षक होण्याचे ठरवले.

हरी नुसता हाडाचा शिक्षक नाही तर तो एक सामाजिक भान असणारा एक आत्मप्रेरीत कार्यकर्ता पण आहे. तो आता मुलांना नुसता Account शिकवत नव्हता तर आपल्या आयुष्याचे self audit, social audit करायला पण शिकवत होता. समाजाला भेडसावनाऱ्या अनेक प्रश्नांवर तो आपल्या विद्यार्थ्याशी चर्चा करायचा, अनेक विद्यार्थ्यांना असं काही करायला नक्कीच आवडायचे. मुलांचा एक चांगला घोळका हरी सरांच्या भोवती जमत होता. आता काही करायचे झाले तर माणसांची कमी नव्हती. शिक्षकाने ठरवले तर तो समाजातील अनेक प्रश्नाना आपल्या विद्यार्थ्यांसह कसे सोडवायचे हे गणित अगदी सोप्या पद्धतीने समाजाला समजून सांगू शकतो हे हरीला नेमके कळले होते.

याच पद्धतीने शिक्षक व त्यांचे विद्यार्थी यांच्यातील औपचारिक व अनौपचारिकरित्या शिक्षण घेत
देशप्रश्न सोडवण्याची संघटीत चळवळ म्हणजे ज्ञान प्रबोधिनीच्या संपर्कात हरी आला. गणपती विसर्जनात निर्माल्य जमा करण्याच्या मोहिमेत तो सहभागी झाला. पर्यावरणाला हानीकारक अशा पदार्थांना वेगळे करण्याचे व त्याची योग्य ते विल्हेवाट लावण्याचे काम हरी व हरीच्या मित्रांनी गणेशविसर्जनाच्या वेळी केले आणि कित्येक टन निर्माल्य त्यांनी योग्य पद्धतीने मार्गी लावले.

आपल्या विद्यार्थ्यांना मिळणारे विद्यावेतन अंशतः सामाजिक कामासाठी वापरायचे का ? असा प्रस्ताव त्याने मुलांसमोर ठेवला. बऱ्याच जणांनी यात सहभागी होऊन अनाथालयातील मुलांना काही गरजेच्या वस्तू घेवून देण्याचे काम हरी सह त्याच्या सवंगड्यानी सुरु केले. मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळाची माहिती माझ्या कडून समजताच हरी परत धावून आला व त्याने मोलाची मदत जलसंधारणाच्या कामासाठी केली. हे सगळ करत असताना हरी मात्र नेहमी सारखाच प्रांजळ,निगर्वी राहतो हे मात्र विशेष. यात कुठलाच बडेजाव पणा नाही न खूप काही केले अशी मर्दुमकीची भाषा पण नाही.

त्याचे गणित शिकवणे व शिकणे याकाळात काही थांबले नव्हते. एक चांगला गणित शिक्षक मित्र विनय नायरशी त्याची भेट झाली आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिता बद्दल रुची व गती वाढावी म्हणून काय करता येयील याबाबत त्यांनी चर्चा पण सुरु केले.मंदार भानुशे या गणित प्रेमी प्राध्यापकाशी त्यांनी भेट घेतली. एक फौंडेशन तयार करून त्यांनी चक्क भारतातील शंभर मुलांसाठी कुठलीही फीस न घेता निवासी अभ्यास वर्ग घेण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी पैसा जमा करणे, व्यवस्था लावणे फार सोपे काम नव्हते. म्हणतात न हरी जिथे आहे तिथे नक्कीच सगळी कोडे सुटतात. प्रयत्नांती परमेश्वर. अभ्यासवर्ग तर मस्त झाला पण यातून मुलांना मिळालेल्या ज्ञानामुळे पालक एवढे खुष झाले की त्यांनी स्वतःहूनच या कार्यासाठी देणगी दिली आणि पाच हजाराने तोट्यातील अर्थवृत्त एकदम ऐंशीहजारांनी फायद्यात आले. नेकीने आणि कष्टाने तोड्याचे रूपांतर फायद्यात होते हे गणित त्या सर्वांना शिकायला मिळाले.

देशपातळीवरील गणित परिषदेत हरी वं त्याचा नववीत शिकणाऱ्या मित्रांनी आपले मूळ संख्यांवरील संशोधन तर मांडलेच पण याच्या बरोबरीने हरीला जुनियर रिसर्च फेलोशिप पण मिळाली. हे सर्व करताना गणितात व सांखिकी शास्त्रात फार कमी संशोधन भारतात होत आहे हे त्याला लक्षात आले. यापुढे हरीला आता Phd करायची आहे. जगातील मान्यवर विद्यापीठातून. त्यासाठी त्याचे प्रयत्न पण सुरु आहेत.

“अरे दादा, आपल्या भारतातील मुलांना अगदी १३ व्या वर्षापासून वाटले पाहिजे की आपण कुठल्यातरी विषयात Phd केली पाहिजे आणि खरा खुरा अभ्यास करून ह् ..पण त्यांना माहीत नाही न याबद्दल.आता मी ते शिकेन आणि मग परत मुलांना सांगू शकेल.” हरीच्या Phd मागील गणित पण मला सहजच कळले.

“तुला काय सांगू दादा, एक जबदस्त अनुभव आला मला. काल पेपर मध्ये मी वाचले की एका रिक्षावाल्याने त्याच्या रिक्षेत विसरून राहिलेली दीड लाखाची रक्कम त्याने पोलिसांना दिली. चांगुलपणा हा सगळ्यातच असतो. मी माझ्या students ना घेवून त्या रिक्षेवाल्याला भेटणार आहे. त्यांना पण कळू देत न जगात अनेक चांगली माणसे आहेत.”

“फार सही अनुभव होता तो दादा, तो रिक्षावाला म्हणाला, मैने कोई बडा काम नही किया. जो हमारे
पवित्र कुराण मे लिखा है वो ही किया. काय सही न एक साधा माणूस पण किती सहज आणि सच्चा असतो न !”

हरीला डॉक्टर अब्दुल कलामांना भेटायची फार इच्छा आहे.

“काही तरी कर न दादा, आपण एकदा तरी त्यांना भेटू.”

मी त्याला विचारले, “कशा साठी रे.”

“काही नाही रे दादा फक्त त्यांच्या पायाला हात लावून त्यांचे दर्शन घ्यायचे आहे”

शांतपणे डोंबिवलीच्या रस्तावर चालुन दमल्या वर आम्ही दोघ कोपऱ्यावरील एका बाका वर बसलो.

“ एक सांगू का दादा, मला न नोबेल प्राईज मिळावयाचे आहे.खूप अभ्यास, संशोधन करायचे आहे खूप जणांना शिकावयाचे आहे” हरी आपल्या मनातील “GREAT AMBITION” सांगून गेला.

“Hari u r really very ambitious person. आणि तु यशस्वी होशील कारण तुझ्यात हरी आहे “

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: