अंबाजोगाईची आस असणारा ....आनंद कुलकर्णी !!
प्रत्येक लहान मुलांच्यात प्रचंड क्षमता असतात. फक्त त्या क्षमता व्यक्त झाल्या पाहिजेत. अभिजात असणाऱ्या ह्या क्षमता व्यक्त होण्यास पोषक वातावरण, संधी,उपक्रम आणि काही अंशी धक्के पण मुलांना द्यावे लागतात.काही घडणारे प्रसंग मुलांच्या मनात एवढे पक्के बसतात की त्यांची प्रगती पण होऊ शकते आणि अधोगती सुद्धा !! काही प्रसंग अगदीच साधे असतात तर काही प्रसंग प्रचंड धारदार. यातून स्वतःला बदलण्याचा मार्ग मिळाला की ते मुलं प्रगतीचा मार्ग सुसाट वेगाने धावू लागते. आपण त्याला टर्निंग पॉईंट पण म्हणतो. हा टर्निंग पॉईंट आपल्या आयुष्यात कधी येईल हे सांगता येत नाही.
आनंद असाच हरपन मौला असलेला धमाल पोरगा. आई वडील शिक्षक पण महाराज आपल्याच दुनियेत मग्न असायचे. कधी गृहपाठ पूर्ण नाही तर कधी वर्गात लक्ष नाही. त्यामुळे अगदीच सगळ्याच प्रकारच्या शिक्षा त्याला झाल्या. वर्गाच्या बाहेर उभे करणे हे तर अगदीच मामुली. यासर्व शिक्षांचा फारसा चांगला किंवा वाईट परिणाम स्वतःवर करून घेण्यास त्याला स्वारस्य नव्हतं. त्याला आवडत होते मैदानी खेळ. क्रिकेटचा भारी नाद. त्यामुळे वर्गापेक्षा मैदानावर स्वारी जास्त रमायची तिथे मात्र तो मुलखाचा तत्पर होता. त्याचा मोठा भाऊ प्रसाद मात्र हुशार अभ्यासात चांगला आणि त्याचा परिणाम चांगलाच झाला. बारावीच्या परीक्षेतील त्याच्या यशाने त्याला मेडिकलला प्रवेश मिळाला. घरात एकदम आनंदाचे वातावरण. आई वडील एकदम खुश. आयुष्याचे एक स्वप्न पूर्ण झाले होते. मस्त सामुहिक भोजनाचा बेत आखला. आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेकांना आमंत्रण दिले. एक वेगळाच माहोल घरात होता. असे कधी आनंदनी आधी पाहिलेले नव्हते. तो क्षण त्याच्या मनावर चांगलाच कोरला गेला. आयुष्याचा टर्निंग पॉईंट त्याला मिळाला.
आनंद आता झपाटून अभ्यास करू लागला. एका प्रसंगाने त्यांच्यातील असणाऱ्या अभिजात क्षमता तो मैदानात आधी व्यक्त करत होता आता अभ्यासातही ते सुरू झाले. परिणाम व्हायचा तो झाला. अशी स्वयंस्फूर्ती खरं तर आपल्या शिक्षण प्रक्रियेतून मुलांना मिळाली पाहिजे. आनंदला बारावीच्या नंतर इंजिनिअरिंग आणि मेडिकल दोन्हीलाही प्रवेश मिळू शकत होता. अगदीच साध्या इंजेक्शनच्या सुईला घाबरणार आनंद, आजारी व्यक्तींच्या वेदना न पाहू शकणारा आनंद अगदीच दवाखान्यात जाण्यास घाबरणारा आनंद मेडिकलला प्रवेश घेणं अवघडच होते. त्याला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला JNEC ला प्रवेश मिळाला. कॉलेज खासगी होते त्यामुळे फिस पण दांडगी. दुसरी फेरी नांदेडच्या कॉलेजला होती. शासकीय कॉलेज मिळाले तर सोन्याहून पिवळे असा काही भाव आनंदच्या मनात होता. तो नांदेडला निघाला.
प्रचंड पाऊस होता. गोदावरीला पूर आला होता. बस थांबली. नांदेडला कसेही पोहोंचने गरजेचे होते. पूर ओसरण्याचा वाट पाहत सर्व जण उभे होते. आनंद आणि त्याच्या मित्रांचा जीव मात्र कासावीस होत होता. आणीबाणीचा प्रसंग. असे प्रसंग माणसाची खरी ताकद पाहतात. शेवटी सर्वांनी ठरवले. आपली कागद पत्रकं शर्ट मध्ये बांधून ती डोक्यावर घेतली एका हाताने ती पकडून दुसरा हात मित्रांच्या हातात देत साखळी केली आणि वाहत्या पाण्यातून साहस मार्गस्थ झाले. दुसऱ्या फेरीत आनंदला शासकीय कॉलेज मिळाले आणि कॉम्प्युटर सायन्स ब्रँच मिळाली. GECA म्हणजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद. आता सुरू झाला वेगळा प्रवास.
चार वर्षे वेगाने गेले. आपण नौकरीसाठी कुठलाही सॉफ्टवेअर कोर्स करणार नाहीत हे आनंदने नक्की केलं. परिणाम व्हायचा तो झाला. नौकरी काही मिळेना. संघर्ष सुरू झाला.पुण्यात जाणे, बायोडाटा तयार करणे,वेगवेगळ्या कंपनी मध्ये जाणे तिथे तो देणे आणि नकार पचवून परत येणे. वडिलांच्याकडून आता पैसे घेणे आनंदला पटत नव्हते पण उपाय नव्हता. शेवटी ओळखीने एक नौकरी मिळाली. दोन वर्षांच्या संघर्षाच्या नंतर मिळलेली ही नौकरी. ते काम सॉफ्टवेअर टेस्टिंगचे होते. बरा पगार होता. पण आनंदचे मन काही यात रमेना. त्याने नौकरी सोडण्याचा निर्णय घेतला पण याच काळात त्याचे लग्न ठरले. साखरपुडा झाला व लग्नाची तारीख काढली 25 डिसेंबर. अशा परिस्थितीत जॉब सोडणे म्हणजे थोडं विचित्रच होते पण ज्या वाटेने आपल्याला जायचे नाही हे कळल्यावर त्याच वाटेवर चालत राहणे हे काही आनंद स्वीकारणारा नव्हता. नौकरी सोडून त्याने केलेल्या बचतीतून जावाचा कोर्स केला आणि नौकरी शोधणे सुरू.याच काळात पुण्यातील हिंजेवाडीला नवीन नवीन IT कंपन्या सुरू होत होत्या.त्यासर्वात आनंदने आपला बायोडाटा दिला पण सहज म्हणून गेलेल्या टाटा टेक्नॉलॉजीचा कॉल त्याला आला आणि त्यात त्याची निवड पण झाली. निवड पत्र त्याच्या हातात पडले आणि त्यावर तारीख होती लग्नाच्या दिवसाची. प्रसंग बाका होता. त्याने आपल्या बॅग मधून पत्रिका काढली आणि तेथील अधिकाऱ्याना दाखवली. त्यांना वाटले कुणाचे तरी लग्न आहे. आनंदनी सांगितले माझेच लग्न आहे. शेवटी त्याला जॉइनिंग date बदलून मिळाली. इकडे घरचे लोक परेशान होते. सगळंच काही नौरोबांच्या मुळे खोळंबून बसले होते. शेवटी लग्न पार पडले.
Tata नंतर त्याने Sungard जॉईन केलं त्यानंतर त्याला Optra आणि एका मोठ्या कंपनीत त्याला ऑफर आली. Optra ही छोटी कंपनी होती. पण तिथे शिकायला मिळणार होते. त्याला नेमके तेच हवे होते. पॅकेज पेक्षा शिकणे त्याला मोठे होते. आता त्याला खूप शिकायला मिळाले. त्यानंतर तो जॉईन झाला
Persistence मध्ये. तिथे तो चांगलाच रमला.प्रचंड मेहनत घेणे,आनंदाने काम करणे,कामात मस्त राहणे हे आनंदाचे खास गुण. त्याला कधीच आर्थिक असुरक्षितता वाटली नाही त्यामुळे तो शिकत राहिला,बदलत राहिला आणि प्रगती करत राहिला. देशविदेशाच्या वाऱ्या घडू लागल्या. बहुतांश माणसं अशा सर्व प्रवासात आपल्या गावाला विसरतात पण आनंदचे वेगळे पण यातच आहे. त्याला अंबाजोगाईची प्रचंड आस आहे. त्याच्या भावविश्वाचा एक मोठा कप्पा अंबाजोगाई आहे. कुठेही काही चांगले दिसले की ते अंबाजोगाईत कसे होईल याचा विचार तो करतो. आनंदचे गाव केज तालुक्यातील येवता. तिथं पण काही न काही करण्याचे प्रयत्न त्याचे चालू असतात. अंबाजोगाईचे पुणे,मुंबई आणि परदेशातील अनेक मित्रांच्या मदतीने त्याने अंबाजोगाई प्राईड ग्रुप सुरू केला. अंबाजोगाईच्या मुलांना नौकरी मिळवण्याच्या पहिल्या संघर्षात त्याने खूप मदत केली. अंबाजोगाईच्या लोकांचे हक्काचे घर म्हणजे आनंदचे आणि चैतालीचे घर. मध्यंतरी त्याने मोठा सौर ऊर्जा प्रकल्प येवत्याला उभा करण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील सर्व अंबाजोगाईकरांना तो एकत्र करू लागला. हे सर्व करताना त्याने आपल्या मुलींच्याकडे आणि बायकोकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही. चैतालीला शिकण्यास आणि नौकरी करण्यास त्याने प्रोत्साहन दिले आणि सगळी मुलींची जबाबदारी स्वतः घेतली. याला अर्थात सोबत होती महंमद रफीच्या गाण्याची. रफीची गाणे म्हणजे आनंदचे व्हिटॅमिन. तो नुसता ऐकतच नाही तर गातोपण. अनेक गाणे त्याला मुखोद्गत आहेत.
माणसे जोडण्यात त्याचा हातखंडा आहे. माझ्या एका वाढदिवसाला तो भेटायला आला आणि सोबत एक मस्त शर्ट घेऊन आला. मला थोडं नवलच वाटलं. काम,छंद आणि कुटुंब त्यातही आईवडील त्याच्यासाठी खूप काही आहेत.
तो खूप चांगला टीम लीडर पण आहे त्यांच्यातील प्रज्ञा पाहता प्रणव जोशी आणि योगेश दसपुते यांनी त्याला आपल्या Krios info मध्ये एक संचालक म्हणून सहभागी करून घेतले. सगळा काही अनुभव घेऊन मागच्या वर्षी त्याने स्वतःची आत्मन नावाची कंपनी सुरू केली. आनंदाची बाब म्हणजे यातील 70 % युवक अंबाजोगाईचे आहेत. खूप लोकांना त्याने प्रशिक्षण दिले आणि मोठ्या कंपनीत नौकरी मिळाली तर आनंदाने निरोप पण दिला कुठलाही हक्क न सांगता. अंबाजोगाईतीलच काय मराठवाड्यातील गुणी तरुण अभियंत्यांसाठी धडपडण्याचे व्यासपीठ आता उभे केले आहे. काही करोड मध्ये वाटचाल आहे. सर्वांच्यासाठी नवीन क्षितिज खुलं करणारा आनंद कुलकर्णी.
नवरात्रात चैतालीचा मला फोन आला. तिला काही तरी वस्तीवरील मुलींच्यासाठी करायचे आहे आणि खास करून धडपडणाऱ्या मुलींसाठी. तिने आनंदाने अकरा मुलींचे शैक्षणिक साहित्याचे पालकत्व घेतले. दोघांना नाते जोडायला खूप आवडते. जरूर संपर्कात राहा. फक्त नौकरी मिळावी म्हणून नाही तर अंबाजोगाईची आस असणारा आनंदच्या सोबत खूप काही शिकायला मिळेल !! खास करून आपल्यातील सुप्त असणाऱ्या क्षमता व्यक्त करायला शिकण्यासाठी. आनंदशी दोस्ती नक्कीच आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असू शकते !!
चैताली कुलकर्णी :- 9921968858
आनंद कुलकर्णी :-9850417098
