रविवार, २३ नोव्हेंबर, २०१४

“Hari u r really very ambitious person. आणि तु यशस्वी होशील कारण तुझ्यात हरी आहे “


“Hari u r really very ambitious person. आणि तु यशस्वी होशील कारण तुझ्यात हरी आहे “


उभट चेहरा, थोडा नाकाच्या शेंड्याच्या जवळ सरकत येणारा चेष्मा सावरत आपल्या दाक्षिणात्य पद्धतीचा हेल काढत मराठी बोलणारा हरी एक प्रांजळ व्यक्तिमत्व. “I am a very ambitious person.” आपल्या स्वतःचे वर्णन आपल्या ब्लॉग वर लिहिणाऱ्या हरिहरन अय्यरची ओळख माझी गेल्या पाच सहा वर्षातील. प्रबोधिनीच्या कामानिमित्य ज्यावेळी मुंबईत जाऊ लागलो त्यावेळी मी खरोखर मुंबईकरांच्या प्रेमात पडलो. वर वर पाहता खूप एकांडी वाटणारी माणसे खूप मस्त सहजीवन जगायला शिकली. व्यस्त दिनक्रम,प्रवासाची दगदग हे सर्व असले तरी आपल्या या बिझी आयुष्यात पण माणुसकीचा ओलावा जपणारी अनेक माणसे मला भेटली त्यातील एक हरी.


दहावी पर्यंत हरी अभ्यासात फार विशेष मुलगा नव्हता. आपल्या सोसायटीचा गणेशोत्सव,मुबईकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे क्रिकेट व वेळ मिळाला की बुद्धिबळ हे हरीचे आनंद सोबती. पंचाचे निर्णय येण्याच्या आधीच आपला निर्णय सांगणारा हरी क्रिकेटचा जबरदस्त फ्यान आहे. क्रिकेटशी आयुष्यभराशी नाते रहावे म्हणून त्याने अठरावे वर्ष पूर्ण होताच पंच प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. या सर्वात व्हायचे हे होऊनच गेले. दहावीच्या शालान्त परीक्षेत त्याला हवे तसे गुण नाही पडले. याची परिणीती म्हणजे त्याला विज्ञान शाखेला प्रवेश मिळाला नाही.

गणित हा विषय त्याला खूप आवडायचा. वाणिज्य शाखा त्याला घ्यावी लागणार होती. त्याचा मोठा भाऊ वाणिज्य शाखेत शिकत होता. सकाळी महाविद्यालयात जाऊन दुपारी परत आला की त्याला फारसे काही काम नसायचे. हरीला असे मोकळे, निवांत आयुष्य नको होते. वाणिज्य शाखा घेण्याशिवाय दुसरा मार्ग पण नव्हता.सगळ्यात महत्वाचे त्याला आवडणाऱ्या गणिताला फार काही या शिक्षणात स्थान नव्हते.त्याने वास्तव स्वीकारले. महाविद्यालयात जाऊ लागला. सोबतची मित्र पण छान होती. खूप काही करायचे होते पण कुणासोबत करू हा मोठा प्रश्न होता.

प्रथम वर्षाला असतानाच त्याला एक लक्षात आले की जे आपल्याला येते ते दुसऱ्याला शिकवले पाहिजे. जे आपल्याला समजले ते दुसऱ्यांना समजून सांगितले पाहिजे. या प्रक्रियेत घेणारा व देणारा या दोघांचा पण चांगला विकास होतो हे त्याला आता पक्के होत जात होते. त्याला शिक्षकीपेशा बद्दल अतीव कुतूहल निर्माण होऊ लागले. यातूनच तो माध्यमिक शाळेतील मुलांना शिकवू लागला व त्यात मस्त रमू पण लागला.शिकवण्याचा विषय म्हणजे त्याला आवडणारे गणित.

अनेकांना सोबत घेवून काम करायचे तो आधीच शिकला होता.आता इतरांना गणितात रुची व गती निर्माण होण्यासाठी तो शिकवू लागला तसा तो वैदिक गणिता पासून आधुनिक गणिता पर्यंतचे सर्व क्षितिजे तो पादाक्रांत करत होता. कुठला अभ्यासक्रम नाही कुठली परीक्षा नाही कुठला निकाल पण नाही. आपनच ठरवायचे काय शिकायचे, कसे शिकायचे, किती शिकायचे आणि कुठपर्यंत आलो ते आपणच समजून घ्यायचे. हा गणिताचा प्रवास त्याचे आयुष्य अधिक समृद्ध करत होता आणि त्यासोबतच इतरांचे पण.

लोकांना वाटणाऱ्या या नसत्या गोष्टी करत असताना तो व्यावहारिक जगातील यशातही माग नाही पडला. तो याकाळातच Chartered Accountant पण झाला.एक मोठया पगाराची नौकरी मस्त बँकेत पण त्याला मिळाली. नौकरी सांभाळत शनिवार-रविवार मात्र तो आपण जे शिकलो ते शिकवायचा त्याच बरोबर गणित पण. फार काळ मात्र या कॉर्पोरेट जगात हरी रमला नाही. सहा महिन्यातच त्याला लक्षात आले की आपल्याला एका चक्रात अडकून ठेवणाऱ्या या चक्रव्युहातून लवकर बाहेर पडायचे. त्याने नौकरी सोडली व पूर्णवेळ शिक्षक होण्याचे ठरवले.

हरी नुसता हाडाचा शिक्षक नाही तर तो एक सामाजिक भान असणारा एक आत्मप्रेरीत कार्यकर्ता पण आहे. तो आता मुलांना नुसता Account शिकवत नव्हता तर आपल्या आयुष्याचे self audit, social audit करायला पण शिकवत होता. समाजाला भेडसावनाऱ्या अनेक प्रश्नांवर तो आपल्या विद्यार्थ्याशी चर्चा करायचा, अनेक विद्यार्थ्यांना असं काही करायला नक्कीच आवडायचे. मुलांचा एक चांगला घोळका हरी सरांच्या भोवती जमत होता. आता काही करायचे झाले तर माणसांची कमी नव्हती. शिक्षकाने ठरवले तर तो समाजातील अनेक प्रश्नाना आपल्या विद्यार्थ्यांसह कसे सोडवायचे हे गणित अगदी सोप्या पद्धतीने समाजाला समजून सांगू शकतो हे हरीला नेमके कळले होते.

याच पद्धतीने शिक्षक व त्यांचे विद्यार्थी यांच्यातील औपचारिक व अनौपचारिकरित्या शिक्षण घेत
देशप्रश्न सोडवण्याची संघटीत चळवळ म्हणजे ज्ञान प्रबोधिनीच्या संपर्कात हरी आला. गणपती विसर्जनात निर्माल्य जमा करण्याच्या मोहिमेत तो सहभागी झाला. पर्यावरणाला हानीकारक अशा पदार्थांना वेगळे करण्याचे व त्याची योग्य ते विल्हेवाट लावण्याचे काम हरी व हरीच्या मित्रांनी गणेशविसर्जनाच्या वेळी केले आणि कित्येक टन निर्माल्य त्यांनी योग्य पद्धतीने मार्गी लावले.

आपल्या विद्यार्थ्यांना मिळणारे विद्यावेतन अंशतः सामाजिक कामासाठी वापरायचे का ? असा प्रस्ताव त्याने मुलांसमोर ठेवला. बऱ्याच जणांनी यात सहभागी होऊन अनाथालयातील मुलांना काही गरजेच्या वस्तू घेवून देण्याचे काम हरी सह त्याच्या सवंगड्यानी सुरु केले. मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळाची माहिती माझ्या कडून समजताच हरी परत धावून आला व त्याने मोलाची मदत जलसंधारणाच्या कामासाठी केली. हे सगळ करत असताना हरी मात्र नेहमी सारखाच प्रांजळ,निगर्वी राहतो हे मात्र विशेष. यात कुठलाच बडेजाव पणा नाही न खूप काही केले अशी मर्दुमकीची भाषा पण नाही.

त्याचे गणित शिकवणे व शिकणे याकाळात काही थांबले नव्हते. एक चांगला गणित शिक्षक मित्र विनय नायरशी त्याची भेट झाली आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिता बद्दल रुची व गती वाढावी म्हणून काय करता येयील याबाबत त्यांनी चर्चा पण सुरु केले.मंदार भानुशे या गणित प्रेमी प्राध्यापकाशी त्यांनी भेट घेतली. एक फौंडेशन तयार करून त्यांनी चक्क भारतातील शंभर मुलांसाठी कुठलीही फीस न घेता निवासी अभ्यास वर्ग घेण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी पैसा जमा करणे, व्यवस्था लावणे फार सोपे काम नव्हते. म्हणतात न हरी जिथे आहे तिथे नक्कीच सगळी कोडे सुटतात. प्रयत्नांती परमेश्वर. अभ्यासवर्ग तर मस्त झाला पण यातून मुलांना मिळालेल्या ज्ञानामुळे पालक एवढे खुष झाले की त्यांनी स्वतःहूनच या कार्यासाठी देणगी दिली आणि पाच हजाराने तोट्यातील अर्थवृत्त एकदम ऐंशीहजारांनी फायद्यात आले. नेकीने आणि कष्टाने तोड्याचे रूपांतर फायद्यात होते हे गणित त्या सर्वांना शिकायला मिळाले.

देशपातळीवरील गणित परिषदेत हरी वं त्याचा नववीत शिकणाऱ्या मित्रांनी आपले मूळ संख्यांवरील संशोधन तर मांडलेच पण याच्या बरोबरीने हरीला जुनियर रिसर्च फेलोशिप पण मिळाली. हे सर्व करताना गणितात व सांखिकी शास्त्रात फार कमी संशोधन भारतात होत आहे हे त्याला लक्षात आले. यापुढे हरीला आता Phd करायची आहे. जगातील मान्यवर विद्यापीठातून. त्यासाठी त्याचे प्रयत्न पण सुरु आहेत.

“अरे दादा, आपल्या भारतातील मुलांना अगदी १३ व्या वर्षापासून वाटले पाहिजे की आपण कुठल्यातरी विषयात Phd केली पाहिजे आणि खरा खुरा अभ्यास करून ह् ..पण त्यांना माहीत नाही न याबद्दल.आता मी ते शिकेन आणि मग परत मुलांना सांगू शकेल.” हरीच्या Phd मागील गणित पण मला सहजच कळले.

“तुला काय सांगू दादा, एक जबदस्त अनुभव आला मला. काल पेपर मध्ये मी वाचले की एका रिक्षावाल्याने त्याच्या रिक्षेत विसरून राहिलेली दीड लाखाची रक्कम त्याने पोलिसांना दिली. चांगुलपणा हा सगळ्यातच असतो. मी माझ्या students ना घेवून त्या रिक्षेवाल्याला भेटणार आहे. त्यांना पण कळू देत न जगात अनेक चांगली माणसे आहेत.”

“फार सही अनुभव होता तो दादा, तो रिक्षावाला म्हणाला, मैने कोई बडा काम नही किया. जो हमारे
पवित्र कुराण मे लिखा है वो ही किया. काय सही न एक साधा माणूस पण किती सहज आणि सच्चा असतो न !”

हरीला डॉक्टर अब्दुल कलामांना भेटायची फार इच्छा आहे.

“काही तरी कर न दादा, आपण एकदा तरी त्यांना भेटू.”

मी त्याला विचारले, “कशा साठी रे.”

“काही नाही रे दादा फक्त त्यांच्या पायाला हात लावून त्यांचे दर्शन घ्यायचे आहे”

शांतपणे डोंबिवलीच्या रस्तावर चालुन दमल्या वर आम्ही दोघ कोपऱ्यावरील एका बाका वर बसलो.

“ एक सांगू का दादा, मला न नोबेल प्राईज मिळावयाचे आहे.खूप अभ्यास, संशोधन करायचे आहे खूप जणांना शिकावयाचे आहे” हरी आपल्या मनातील “GREAT AMBITION” सांगून गेला.

“Hari u r really very ambitious person. आणि तु यशस्वी होशील कारण तुझ्यात हरी आहे “

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०१४

“आपल्यासारखी काही वेडी माणसे आहेत न अजून, मग काय करू की काही तरी चांगलं.”



सकाळीच डॉ.महेंद्रचा फोन आला.
“दादा, माझ्या भावाशी थोडं बोलाल का ? त्याला त्याच्या परीक्षेत अपयश आले आहे”
“हो नक्की बोलेल. कधी भेटेल तो ? ”
त्या दिवशी त्याची न माझी पहिली भेट. उंच, गोरा, अगदी सात्विक चेहरा, वागण्यात एक वेगळीच अदब. तो खूप शांतपणे माझ्याशी बोलत होता. पहिल्याच भेटीत हा माणूस काही तरी हटके आहे याची जाणीव झाली. “बंदे मे दम है.”  त्याची प्रांजळता मला खूप भावली. तो अस्वस्थ नक्कीच होता पण पराभूत मानसिकतेचा नाही हे पण त्याच वेळी समजले. काहीतरी नक्की वेगळं करणार हा पोरगा कारण त्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता.

अमित तसा फार कमी भेटतो पण भेटल्यानंतर मला त्याच्या बद्दल व त्याला माझ्याबद्दल असणारी आपुलकी सहजच जाणवून जाते फक्त आम्हाला नाही तर सोबतच्या लोकांना पण. दोन आठवड्यापूर्वी अंबाजोगाईतील वैद्यकीय महाविद्यालयात ज्ञानसेतू हा उपक्रम घ्यायचा होता त्यासाठी अमितशी बोलावे वाटले. विचित्र म्हंजे माझ्याकडे त्याचा फोन नंबर पण नव्हता. मनाला इतकासा आपला वाटणाऱ्या माणसाचा फोननंबर आपल्याकडे नाही हे म्हणजे अतीच झाले. डॉक्टर महेंद्रकडून त्याचा फोननंबर घेतला. मी फोन करण्यापूर्वीच अमितचा फोन आला. त्याचे बोलणे कानावर पडताच लक्षात आले की अनेक महिने जरी आपण बोललो नाही या व्यक्तीशी तरी तिच आत्मीयता त्याच्यात आहे व माझ्यात आहे. नित्य संपर्क असून सुद्धा अनेक लोकांशी असे नाते होत नाही.
डॉक्टर अमित लोमटे .....आम्ही अमितला भेटायला वैद्यकीय महाविद्यालयात गेलो. प्रभारी अधिष्ठाता काही कामात असल्याने चहा घेण्यासाठी उपहार गृहात गेलो. अमित आता महाराष्ट्रातील मार्डचा प्रमुख आहे हे कळले. गेल्या अनेक दिवसात त्याने केलेला वेडेपणा मी समजून घेवू लागलो.

उपहारगृह चालवणाऱ्या स्वामी पासून ते सोलापूरच्या आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरसाठी काही क्षणात लाखाची मदत करण्याची करामत या वेड्या डॉक्टर मध्ये आहे. पोस्टमार्टम सारखे नको वाटणारा विभाग मुद्दाम अमितने स्वतः कडे घेतला व त्याला एक वेगळीच शिस्त लावली. आपले शेखी मिरवू पाहणाऱ्या एका राजकारण्याला फार मस्तपणे अमित ने वठणीवर आणले.

 “आपण चांगल करतोत न दादा मग घाबरायचे कशाला ?”

 त्याचे हे वाक्य एक वेगळी अनुभूती देत होते. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वस्तीगृह असो की परिसरातील उपहारगृह यांचा कायापालट करताना अतिशय धैर्याने अमितने केलेल काम खुपच कौतुकास्पद आहे.

महाविद्यालयाची व एकूणच दवाखान्याची स्थिती सध्या फार काही चांगली नाही.  

“मी त्याला म्हंटले की मग हे कसं रे नीट चालणार ?” त्यावर त्याचे उत्तर फारच मस्त होते.

“आपल्यासारखी काही वेडी माणसे आहेत न अजून, मग काय करू की काही तरी चांगलं.”

माझ्या मनातल अमितबाबतील कौतुकयुक्त अभिमान वाढतच होता. अमित खूप सर्वस्पर्शी आहे, अनेकांचे त्याचे स्नेहाचे नाते आहे. आपल्या सोबत अनेक महिने जेवण करणाऱ्या मित्राला अचानक छातीत दुखायला लागते व त्याचा फोन अमितला येतो. अमित लगेच त्याच्या मदतीला निघतो. मित्राला तो सांगतो काहीही शरीराला त्रास होईल अशा हालचाली करू नको. पण तो लिफ्टने जाण्याच्या एवजी जिन्याचा वापर करतो. जीना तो चढून जातो व सरळ समोरील मोकळ्या जागेवरच त्याचा तोल जातो. जागेवरच त्याचा मृत्य होतो.

अमित तिथे पोहोंचतो. आकस्मित मृत्यू मुळे पोस्टमार्टम करणे क्रमप्राप्त. नातेवाईक तयार नाहीत, अशी अवघड स्थिती अमितने खूप शांतपणे हाताळली. स्वतःच्या मित्राचे पोस्टमार्टम करतांच्या त्याच्या व्यथेची अनुभूती शब्दात नाही मांडता येणार.

अंबाजोगाई व आपल्या पेशाबद्दल अतिव आदर व श्रद्धा असणाऱ्या अमितने हौसेने जिथे तो काम करतो तिथे पण खूप रचनात्मक बदल करून रुग्णांचा होणारा अवाजवी खर्चपण खूप कमी केला व रुग्णालयाची पत पण वाढवली.

“यार इस बंदेमे साहिमे दम है”

अमित तु म्हणतोस ते खरच खूप खरं आहे      

“आपल्यासारखी काही वेडी माणसे आहेत न अजून, मग काय करू की काही तरी चांगलं.”   

मंगळवार, २२ जुलै, २०१४

माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्या शिवाय मी राहू शकत नाही !!!!


माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्या शिवाय मी राहू शकत नाही !!!! 

माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्या शिवाय मी राहू शकत नाही. तू अगर कहे तो मै कुछ भी कर सकता हुं.......असे वाक्य मी खूप वेळा चित्रपटात ऐकले. लहानपणी पण कधी कधी मोठ्या लोकांच्या तोंडातून ऐकले होते की त्या मुलाचे व मुलीचे प्रेमप्रकरण आहे. काही लोक त्याला भानगड म्हणायचे. मला प्रेम या शब्दचा अर्थ पण माहित नव्हता व भानगड या शब्दाचा पण.

आज वयाच्या चाळीशीत कळतय मला थोडं थोडं प्रेम म्हणजे काय व भानगड म्हणंजे काय ?
स्वतःच्या आयुष्याकडे थोडं परत वळून पाहतो त्यावेळी समजून घ्यायचा प्रयत्न करतो, प्रेम म्हणजे काय ?

सातवी पर्यंत माझे व अभ्यासाचे वाकडे, मस्त खेळणे, हुंदडत राहणे, मारामाऱ्या करणे म्हणजे हिरोगिरी... असे हिरो मुलींना आवडतात असा एक समज होता. साहजिकच परिणाम व्हायचा तो झाला. क्लास मिळाला. पण खोट बोललो आईला...त्याचा परिणाम आई रडायला लागली. पहिल्यांदा पोटात कालवा कालव म्हणतात न ती झाली. शाळा बदलली. नवीन शाळेत छान मुली होत्या हुशार मुलांशी त्या बोलायच्या. आपुन से कौन बात करेगा ? स्वतःची पण खूप लाज वाटायला लागली. आईच्या डोळ्यात परत आपल्या अभ्यासामुळे अश्रू येणार नाहीत व स्वतःची स्वतःला कधीच लाज वाटणार नाही असे काही करायचे नाही हे मनाशी पक्के ठरवले. मी आईवर व माझ्या स्वतःवर खर प्रेम करायला सुरुवात केली. माझी अभ्यासात जोरात प्रगती झाली सतत वर्गात, शाळेत पहिलाच येऊ लागलो. आज तागायत अभ्यासामुळे माझ्या आईच्या डोळ्यात पाणी नाही येऊ दिले. आपण ज्याच्यावर प्रेम करत्तो त्याच्यासाठी आपण आपल्यात सकारात्मक व चांगला बदल करतो त्या मुळे दोघांना पण आनंद होतो व मस्त वाटते.

महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला असताना तारुण्यसुलभ म्हणतात ना तसे भाव मनात निर्माण होऊ लागले. एक मुलगी खूप आवडू लागली. साहजिकच ती सुंदर होती. मित्रांना पण कळले. मग काय तू तिच्यावर प्रेम करतोस न मग करपलेली पोळी खा ....अशा प्रकारच्या शर्ती लागू लागल्या. फार काळ मी तसे प्रकार नाही करू शकलो. परत स्वतःची लाज वाटायची. आपण हे का करतो ? आणि मग सोडून दिले ते पण .....

साहजिकच पुढे मात्र मी खूप पुढे गेलो. आपल्या यशात नटल्यावर मग तासोंतास आरशात पाहण्याची गरज नसते आणि कुणा एखाद्या व्यक्तीवर आपल्या बाह्य गोष्टीनी प्रभाव टाकण्याची इच्छा पण रहात नाही. आपण स्वतःवर प्रेम करायला लागल्यावर उगी दुसऱ्यावर इम्प्रेशन टाकण्याची इच्छा पण होत नाही. त्यामुळे मी कुठल्या भानगडीत अडकलो नाही.

पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर मात्र वाटले आता आई सोबत रहावे. आईची इच्छा नव्हती. मग भांडणे. शेवटी खूप टोकाला गोष्टी गेल्या. पण यावेळी सोबत होती माझ्या माझी संघटना व माझे चांगले मित्र. त्यांनी मला खूप साथ दिली. दोन खूप छान अनुभव मिळाले व स्वतःतील मस्त बदल जाणवू लागला. अण्णासाहेब हजारे, प्रबोधिनीतील सर्व ज्येष्ठ सदस्य व मित्र यांच्या साथीने मी माझ्या भागातील प्रश्नान कडे सजकपणे पाहायला सुरुवात केली. किल्लारी भूकंपातील मदत कार्य व अण्णासाहेब हजारे यांच्या आंदोलनात त्यांचे स्वीयमदतगार म्हणून काम करण्याची संधी मला माझ्या संघटनेनी दिली. एक व्यक्ती म्हणून मी कितीही हुशार असलो तरी हे अनुभव मला माझ्या संघटनेमुळे मिळाले. आई सोबत आपल्या मातृभूमीवर पण प्रेम करण्याचे अनुभवशिक्षण मला मिळाले. खूप छान वाटत होतं स्वतः कडे पाहताना स्वतःलाच ......अपने धून में रहता था !!!! स्वतः असे काही शिकून घेऊ....अशा काही अवघड वातावरणात..प्रदेशात राहू ..खूप कष्ट करू मग आपल्या आईला नक्की वाटेल की आपला मुलगा अंबाजोगाईत राहिला सोबत तरी तो काही तरी चांगले नक्की करेल. आपल्या स्वतःच्या क्षमत्ता विकसित करायला लावते ते खरे प्रेम असते. आव्हाने स्वीकारायला शिकवते ते प्रेम असते. निडर पणे कुठल्याही समस्यांना तोंड द्यायला प्रेरणा देते ते प्रेम असते.

पुढील पाच वर्ष मला माझ्या प्रेमाने एक ध्येय धुंद आयुष्य जगायला शिकवले. सुंदर नट्यांची माझ्या खोलीतील जागा शूर वीर आणि देशप्रेमी वीरांनी घेतली. ओठावरील गाणे बदलली. वाचण्याची पुस्तके बदलली. आवडीचे चित्रपट बदलले ......एकदम सॅालिड बदल हो .....काय मस्ती असते अशा प्रेमाची... मात्रभूमीच्या अशा भागात काम करायचे की जिथे सैन्य पण तीन वर्षापेक्षा जास्त ठेवले जात नाही. खूप काही मिळाले......प्रेमात नेहमी द्यावेच लागते असे काही नाही. खरे प्रेम आपल्याला खूप काही देते. खूप मजबूत बनवते. आणि राहिले यशाचे एकदा तुम्ही मजबूत झालात न मग यश तुमच्या पाठीमागे धावते. खूप लहान वयात मोठ्या मोठ्या देशपातळीवरील कर्तृत्वाच्या संधी मला मिळत गेल्या. अभी तो मैने प्यार करना सिखा था !!!!

यशाच्या एका उच्च शिखरावर असताना मात्र मला नव्हता विसर पडला माझ्या आईचा, माझ्या मातृसंघटनेचा. मी परत अंबाजोगाईस यायचे ठरवले. आपण कितीही पुढे गेलो तरी व कितीही यश मिळत असले तरी आपले ज्यांच्यावर खरं प्रेम आहे न त्यांच्यासाठी आपण आपल्या त्या उपलब्धीचा त्याग करतो. असे त्याग करणे जमले म्हणजे खरं प्रेम करणे जमायला लागते. मग हे नाही. ते नाही ही कमी ती कमी असे काही उरत नाही. गम्मत म्हणजे जी काही कमी आपल्याला वाटते ती योग्य वेळी पूर्ण होते अगदी भौतिक पण याचा खूप वेळा अनुभव आला.

याच काळात अजून एक गोष्ट लक्षात आली की जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते न ती स्वतःत पण खूप बदल करून घेते आपल्यासाठी. आई, माझ्या कुटुंबातील व संघटनेतील ज्येष्ठांनी माझ्यासाठी खूप बदल करून घेतले स्वतःत आणि साहजिकच मी पण बदलायला लागलो. प्रेम हे दोघांमध्ये पण खूप चांगला बदल घडवून आणते. आणि त्या बदलातून समाजाला अधिक चांगल्या गोष्टी मिळू लागतात. आपल्याला तर नक्कीच.

पैसा,सत्ता, बाकी भोग खरच दुय्यम ठरवते प्रेम. एकमेकांचा आनंद व एकमेकांचा खरा विकास हाच खरा हेतू असतो प्रेमाचा.


मधल्या काळात एक मात्र मला थोडी विचित्र इच्छा मनात होती. आपण काही तरी करून दाखवले पाहिजे. आपण कुणी तरी आहोत हे जगाला कळल पाहिजे. एका व्यक्तीवर नाही पण लोकांनी आपल्याला दि ग्रेट म्हणावे असे मनातून वाटत असे. यामुळे मग दिनचर्या बिघडली. थोडे नको त्या गोष्टी मी करायला लागलो. नको ते लोक सोबत. साहजिकच परिणाम व्हायचा तो झाला. माझी प्रकृती ढासळली. माझ्याच्याने कुठलीच गोष्ट नियमित होत नसे. सुंदर पद्धतीने अभिव्यक्त होण्यापेक्षा दिखावू पणे अभिव्यक्त होण्याची सवय जुडली. मानसिक व शाररीक आरोग्य बिघडले. अशा वेळी खरं कळते आपली लोक कोण...आपल्यावर प्रेम करणारी लोक कोण ...तात्पुरते प्रेमाचा शिडकाव करणारे खूप असतात पण खरं आतून प्रेम करणारे लोक खूप काळजी घेतात आपली. आपल्याला वाऱ्यावर नाही सोडत. खूप छान जपले मला माझ्या आईने,कुटुंबाने, मित्रांनी व संघटनेतील माझ्या सहकाऱ्यांनी.


खरं प्रेम समजायला वेळ लागतो. Love at first sight हे समजायला आधी आयुष्य व जीवन समजायला पाहिजे. मी ठरवले आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांसाठी व आपल्या संघटनेसाठी स्वतःला परत मजबूत करायचे. मी नियमित व्यायाम सुरु केला. नवीन कामे सुरु केली. जुनी महत्वाची पण राहिलेली कामे पूर्ण करू लागलो. नियमित ध्यान व आहारावर खूप चांगले नियंत्रण आणले. याच काळात दोन अपघात होऊन माझे दोन पाय जवळपास सहा महिने जायबंदी झाले होते. पण त्या मुळे मी न डगमगता लिहायला शिकलो. भावना शब्दात मांडायला शिकलो. पाणी, प्राणी,वृक्ष आणि शेतकरी यांच्यासाठी मनातून प्रेमाने काम करायला सुरुवात केली. “ असे काही तरी कर की लोक तुझ्या व्यक्तिगत गोष्टींकडे न पाहता ...अभावा कडे न पाहता तुझ्या कामाकडे पाहतील” अशी साद एकू आली. माझी दिनचर्या बऱ्यापेकी स्थिर झाली. वजन कमी होऊन शरीर दणकट झाले. दिवसाचे १६ तास काम करण्याची शक्ती परत मिळाली. आपल्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी आपलं नेहमीच शाररिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असले पाहिजे हे पक्के पटले व तसा सक्षम परत झालो.

आयुष्यात चढउतार नेहमीच येत राहतात. कधी आपल्या लोकांकडून त्रास पण होतो पण आपण जर खर प्रेम केले असेल न तर आपल्या सोबत अशी माणसे येतात की ते आपल्याला परत ढवळून काढतात. परत आपल्याला उमेद देतात जीवनाकडे परत वेगळ्या दृष्टीने पहा असे सांगतात. अचानक आलेली माणसे आपल्यावर इतका खोल परिणाम करू शकतात का ? मला वाटते तुम्ही खरच आयुष्यावर प्रेम केले असेल तर असे आगंतुक लोक सहज येतात आपल्या आयुष्यात व परत आपण लागतो सृजनाच्या निर्मितीच्या प्रवासाला. मस्त छायाचित्र काढायला शिकलो मी. निसर्गावर प्रेम करायला शिकलो मी .....माझ्यातील “मी” जोपासलेला “मी” किती क्षुल्लक आहे याची जाणीव झाली त्यांच्या मुळे व थोडा “मी” विसरायला शिकलो मी ...शांत झोपायला शिकलो....जन्माला आलो तेव्हा पासून दूध पिणारा मी चक्क दूधच पचत नव्हते मला आणि आता मला दूध पचायला लागले.

प्रेम माणसाला विश्वास टाकायला शिकवते आणि योग्य व्यक्तीवर. प्रेम माणसाला सातत्य पूर्ण एखादी कृती करायला शिकवते. प्रेम माणसाला सृजनशील व निर्मितीक्षम बनवते. प्रेम माणसाला अवलंबित्व नाही तर परस्परावलंबनातून भावनिक व वैचारिक स्वावलंबन शिकवते. प्रेम आपल्याला ताकदवान बनवते. अस्वस्थता कमी करते..भीती कमी करते ..सहजता वाढवते ...आणि मग जाणवते

धुंधला जाएँ जो मंजिलें, इक पल को तू नज़र झुका
झुक जाये सर जहाँ वहीं, मिलता हैं रब का रास्ता
तेरी किस्मत तू बदल दे, रख हिम्मत बस चल दे
तेरा साथी, मेरे क़दमों के हैं निशां
तू न जाने आस पास हैं खुदा......
त्यातून आपण
" मन मस्त मगन,
मन मस्त मगन,
मन मस्त मगन"
परत जोरदार कामाला लागतो न थकता न चिडता न खचून जाता.

शुक्रवार, २ मे, २०१४

बाजी एक मर्द बाई आहे.....

ती तशी मुळची भोपाळची. २५ दिवसांपूर्वी मी तिला भेटलो. अगदी एखादा तिराईत व्यक्ती जसा पाहील तसा. विवेकवाडी मध्ये बांधकाम चालू झाले त्या दिवशी. दोन बांधकामाचे तरुण गवंडी आले होते त्यांच्या बरोबर ती आली होती. मला थोडी विचित्र वाटले की दोन गवंडी आणि एक बाई. मग माल कोण कालवणार. वाळू कोण भरणार. सिमेंटची पोती कोण उचलणार.
तिचे वय पण फारसे दिसत नव्हते. मी थोड उशीराच गेलो होतो. तिने चक्क आपल्या हातात खोरे घेतले व माल कालवायास सुरुवात केली. ती एकटी बाई विटा देणे, माल देणे या सर्व गोष्टी करत होती.

हळूहळू तिला दररोज काम करताना पहात होतो, सकाळी ८ वाजता ती कामावर यायची व संद्याकाळी ६ वाजता तिचे काम संपायचे. मध्ये फक्त १५ मिनिटांची जेवणाची सुट्टी.
दुसऱ्या मजल्याचे काम सुरु झाले. मी वाटरिंग करून खाली येत होतो तो जिन्यामध्ये ती चक्क सिमेंटचे पोते आपल्या खांद्यावर घेवून येत होती. मला प्रचंड कुतूहल निर्माण झाले तिच्या बद्दल. आमचा बप्पा त्या दिवशी भेटायला आला होता. तो एक जबरदस्त शेतकरी. त्याने तिला सिमेंटचे पोते आणताना पहिले तर तो अवाक होऊन म्हणाला,

“दादा, ये पोत निदान पन्नास किलोचे असणार. ही बाई कसे काय उचलते हो. नुसती उचलत नाही तर जिना चढुन चक्क पोते आपल्या खांद्यावर आणते.”

सोबतचे गवंडी तिला बाजी म्हणायचे. “बा” म्हणजे बहिण. बाजी म्हणजे बहनजी. जसे जसे दिवस जात होते तसे बाजी बद्दल अधिक माहिती मिळत होती. ती शाळेत शिकायला नाही गेली. लवकर लग्न झाले व पहिली मुलगी पण आणि त्यांनतर एक मुलगी व दोन मुलं. मला हे कळल्यावर तर मी अवाकच झालो की बाजीच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे व तिला दोन मुली आहेत.म्हणजे बाजी नानी आहे.

बाजीचे आयुष्य खूप कष्टाचे आहे पण दुर्दैवाने ते खूप अस्वस्थ करणारे पण आहे. तिचा नवरा हॉटेल चालवायचा भोपालला. चार मुलं झाल्यावर त्याने बाजीला सोडून दिले दोन वर्षांपूर्वी व दुसरे लग्न केले . बाजी अंबाजोगाईला आली. अंबाजोगाई तिचे मावशीचे गाव. दोन मुलं सोबत. काय करणार. तिचा मावसभाऊ गवंडी काम करायचा त्याच्या सोबत बाजी काम करायला लागली. काम करता करता ती बऱ्याच गोष्टी शिकली. बाजीला आता बाईचा रोज नाही तर गड्याचा रोज मिळतो, दिवसाचे तीनशे रुपये.

बांधकामाचा काल शेवटचा दिवस होता. बाजी चा मुलगा पण सोबत आला होता. त्याला अजून एक मोठा भाऊ. दोघ पण शाळेत जात नाहीत. मी विचारल्यावर बाजी म्हणाली, मी सकाळी ८ पर्यंत यांना तयार करते. जेवण करून ठेवते. पण मी कामावर गेले की हे पोर शाळा बुडवतात. काय करणार. काम तर करावेच लागणार.

मी गेल्या पंचेवीस दिवसात बाजीला एकदाही सुकलेल्या चेहऱ्याचे पाहिले नाही. थकलेले पाहिले नाही आणि फक्त एक दिवस सुट्टी. मी सहज तिचे वय विचारेल...असेल ३५- ४०. बाजी मर्द बाई आहे. तिच्या श्रमाने आपली प्रबोधिनीची इमारत उभारली याचे खूप समाधान वाटते. मी शेवटी जाताना बाजीचा फोटो घेतो म्हणालो. ती म्हणाली, “ काय या विचित्र अवतारात घेणार का ?”
ती कशी आहे या पेक्षा बाजी एक मर्द बाई आहे हे मात्र मनोमन पटले.

सोमवार, ७ एप्रिल, २०१४

“वो सानिया मिर्झा है ये हमारी सानिया पठाण है ”


दुपारची चांगलीच गर्मी जाणवत होती. गोविंद अकुस्कर या तरुण मित्राशी नेट वर बोलत होतो. त्याच काळात माझा मोबाईल वाजला. “नमस्कार दादा, मी रमा बोलतेय.” “रमा ? कोण रमा ?” माझ्या बोलण्यातून सहज विचारण्यात आले. “दादा,मी रमा हजारी, लहान असताना प्रबोधिनीत यायचे. सध्या ME करते आहे.” “ओह रमा तू का ? काय म्हणतेस ?” दादा, आमच्या घरी लहानपणी मला सांभाळणारी आजी होती. तिची नात चार वर्षाची आहे. तिला जन्मा पासूनच दोन्ही हात नाहीत आणि एक पाय नाही. तिला शाळेत घालायचे आहे. कोणत्या शाळेत घालावे हे विचारण्यासाठी फोन केला.” “अशी मुलगी अंबाजोगाईत आहे ?” मी प्रश्न केला. “हो दादा” रमा खूप शांतपणे म्हणाली. मी तिला अनेक प्रश्न विचारले शेवटी आम्ही मुलीला भेटायचे ठरवले. रमा भर दुपारी १ वाजता पण यायला तयार होती. मग मीच म्हंटले आता नको आपण थोड उन उतरल्यावर जाऊ. साडेचार वाजता त्या मुलीला भेटायला जायचे ठरले. तो पर्यंत मनात खूप प्रश्न निर्माण झाले. दुपारची वाम कुशी घेण्यासाठी पडलो पण डोळा काही लागला नाही. बरोबर सव्वाचार वाजता रमाचा फोन आला की ती घरातून निघतेय. मी पण तयार होतो. आम्ही दोघ प्रबोधिनीच्या कार्यालयात भेटलो. रमाला मी अनेक प्रश्न विचारले. ती खूप शांतपणे सगळी उत्तरं देत होती. तिच्या त्या शांत स्थिर स्वभावाचे मला कौतुक वाटले. “ते मुस्लिम आहेत दादा.” “अग मग त्यांना चालेले का प्रबोधिनी.” “काहीच प्रश्न नाही. त्यांना शाळेत प्रवेश मिळणार हे ऐकूनच ख़ुशी होईल.” आम्ही दोघंही मग सानियाला भेटण्यासाठी तिच्या घरी म्हणजे सदरबाजारातील पेन्शनपुरा या भागात गेलो. घर सापडणे थोडे अवघड होते, रमा ने फोन करून सानियाच्या आजीला बोलावून घेतले. आम्ही सानियाच्या घरी पोहोंचलो. गल्लीच्या टोकाला अगदी आत मध्ये दोन पत्र्याच्या खोल्या. आम्हाला घरात नेण्यात आले. उंचीला खूप खुजे असलेल्या घरात आम्ही चटईवर बसलो. आजी, आई,काकू व आजोबा खेरीस बरेच अनेक छोटे मुलं पण होती. त्या छोटीला आईने आमच्या समोर आणले. तिला दोन अगदी खांद्या पासून नव्हते. एक पाय नव्हता. ती अभावित पण आमच्याकडे पाहात होती. “आदाब कर सानिया सर को आदाब कर” तिची आजी सानियाला सांगत होती. सानियाचे डोळे खूप बोलके होते पण तिला आम्ही अपरिचित होतो. “अरे सानिया बेटा तू कितनी प्यारी है ..अरे हम तो एक चीज भूल ही गये, आपको हमने कुच्छ भी नही लाया...क्या खायेगी आप ...चॉकलेट बडा वाला चॉकलेट..” तीने लाजत मान डोलावली व तिच्या बहिणी करवी चॉकलेट आणून घेतले. त्याच दरम्यान तिच्या आजीने आमच्यासाठी शीतपेय मागवली. “वो सानिया मिर्झा है ये हमारी सानिया पठाण है ” गमतीने तिची आई म्हणाली. सानिया खूप गुणी लेकरू. ९० % अपंग पण तिला शाळेत काही कुणी प्रवेश देत नव्हते. घरातील सर्व मुले शाळेत जाताना पाहून तिला पण शाळेत जावे वाटते. पण तिची जबाबदारी घायला कोणतीच शाळा तयार नाही. तिची आजी एक चांगल्या शाळेत सेविकेचे काम करते. मी तिला म्हंटले की त्या शाळेत प्रवेश द्यायला मी सांगतो. पण ती सरळ नको म्हणाली. प्रबोधिनीचे शिशुविहार थोडे दूर आहे. तिला कसे घेवून येणार. “ उसका गाडा है न उसगाडे पे लेके आयेंगे ” उत्साहात तिच्या सगळे घरचे लोक म्हणाले. “दादा ते करतील सगळे.” रमा, जिचे लग्न केवल अजून काहीच दिवसांनी आहे ती भर उन्हात माझ्या सोबत येते व उत्साहाने मला हे सांगते. “बहोत प्यारी लडकी है ये ...मां को कहती है तुम काम पे जाओ मै नही रोयेगी.” सानियाचे वडील दिवस भर फक्त टीवी पहात झोपलेले असतात. काही काम नाही करत. थोड्या वेळातच सानिया एकदम खुलली. तिने तिच्या पायांनी स्वतः चॉकलेट खाले. ती खुदुखुदू हसू लागली. मी तिचा फोटो काढला तर एकदम खुश होऊन स्वारी ती पहात होती. घरातील वातावरण एकदम खुश होते. आजोबा गफार सायकल रिक्षा चालवायचे. मला त्यांना पाहिले की मला लहानपणी शाळेत सायकल रिक्शेत नेणाऱ्या खांसाहेबांची आठवण झाली. मन एकदम तरल अवस्थेत होत. आम्ही जायला निघालो. घरातील सर्व महिला, बच्चे कंपनी व आमची सानिया सोडायला आम्हाला बाहेर पर्यंत आली. “आदाब कर सानिया सर को.” तिने आपला छोटा पाय उचलला व डोक्यापर्यंत नेत आदाब केला. मी टाटा म्हंटल्यावर तिने आपल्या त्या छोट्या पायांनी मला टाटा केला. ती तिच्या एकमेव पायाचा चांगला वापर करायला शिकली होती. रमाशी काही गोष्टींबाबत चर्चा करून आम्ही एकमेकाचा निरोप घेतला. काही दिवसात मी तुला प्रवेशा बद्दल सांगतो असे तिला म्हणालो. काल मी प्रबोधिनीतील शिशुशाळा ताईंच्या प्रशिक्षण वर्गात ओळख करून घेण्यासाठी गेलो होतो. काही चर्चा पण केली व त्यांना विचारले सानियाला शाळेत प्रवेश दिला पाहिजे की नाही. सगळ्यांनी एक मुखांनी सांगितले दिला पाहिजे. अभिजितला विचारले .... “नक्कीच दिला पाहिजे..आपण देणार नाहीत तर कोण देईल मग कोण ?.....आपल्या मुलांवर याचा खूप चांगला परिणाम होईल...” आम्ही सर्वांनी सानियाला आपल्या शिशुविहार मध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. “सानिया” आम्हाला खूप काही शिकवेल यात आम्हा सर्वांचे आजीबात दुमत नाही

बुधवार, २ एप्रिल, २०१४

“मानूस लई उतावळा असतो तस देवाचे नाई...तो पक्की सजा देईल, त्यांची येळ आली की.”


सुधाकर भाऊ ....मामा अशा अनेक नावाने श्री सुधाकर निकम यांना आमच्या घरात हाक मारले जाते.सकाळी घरातील गजानन महाराजांच्या मंदिराची घंटी वाजली की समजायचे सुधाकर महाराज आले....बहुतेक वेळा मी त्यावेळी व्यायाम करत असतो. दरवाजा उघडून आत आले की आम्ही दोघंही मोठ्यांनी गर्जना करतो “गजानन महाराज की जय ” व त्यानंतर मी म्हणतो “सुधाकर महाराज की जय” एकमेकांना सकाळी अभिवादन करण्याची आमची ही रीत.

लहानपण खडकावर म्हणजे खडकपुऱ्यावर ...सुरुवातीस शेळ्या राखणे हा व्यवसाय ....सोबतच त्या परिसरातील नवीन बांधल्या जाणाऱ्या आमच्या घराची वॉटरिंग तो करायचा...त्याचा आणि आमच्या कुटुंबाचा ऋणानुबंध असा सुरु झाला.दिसताना थोडा भोळा वाटणारा सुधाकर भाऊ वागताना कमालीचा व्यवहारी आहे. सुधाकर भाऊचे एक अनोखे नाते अगदी लहानपणा पासून आमचे होते. त्यावेळी पासून ते आत्ता पर्यंत. मी व माझी बहिण आरतीला रात्री औरंगाबादला जाताना आमचा पेटारा आपल्या खांद्यावर घेवून येणारा व आम्हाला बसून देणारा..व निरोप देताना मान खाली घालून अश्रू लपवत टाटा करणारा आमचा मोठा भाऊ ...

मी अरुणाचल मध्ये असताना आरतीच्या मुलीचे बारसे सुधाकर भाऊच्या मांडीवर काढले....आईच्या तर आयुष्याचा तो एक अविभाग्य घटक आहे. तिला पण आता एकू येत नाही व भाऊला पण... खुपच गमतीदार पद्धतीने त्यांची जुगलबंदी चालू असते. एकमेकावर चिडत, ओरडत व शेवटी हसत. तो तिचा “ सुध्या ” तो “गजानन महाराज” कधी झाला हे कळलेच नाही. आई ने त्याला तिच्या आयुष्यात गजानन महाराजांचे स्थान दिले.

भाऊ तसा खूप भावूक आहे. माझ्या पायाला अपघात झाला. सकाळी त्याने माझा पाय बांधलेला पाहिल्यानंतर तो जवळ आला. माझ्या पाया जवळ बसला. हळूच आपले हात माझ्या उघड्या बोटांवर फिरवले. माझ्याकडे पाहिले व लगेच मान खाली घालून त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा धारा....तसा तो खुपच हळवा आहे आमच्या बाबत. नगरपालिकेतील बऱ्या पगाराची नौकरी असली तरी त्याने आमचे काम करणे सोडले नाही. त्याला तीन मुली व एक मुलगा. भाऊची बायको मात्र खमकी आहे. तिच्या मुळे त्याचा संसार चांगला चालू आहे.

तो कधी कधी खुपच वेगळा वागतो. दर रविवारी तो आपल्या मुलांना बेकरीतून खारी आणतो. घरी जाताना मग आमच्या कडे येतो व त्यातील एक पुढा आम्हाला देतो. नको म्हंटल तर त्याच्या विशिष्ठ आदाकारीत थोडं लाजत म्हणतो .. “ राहू द्या मोप आणलेत..”

दररोज सकाळी अंबाजोगाईतील इत्यभूत वार्ता तो मला सांगतो. त्याला नीट वाचता येत नाही पण वर्तमानपत्र मात्र तो पूर्ण चाळतो. त्यात प्रचंड ताकद आहे. वय पन्नाशीच्या आसपास असले तरी मोठ लोखंडी कपाट एकटा उचलू शकतो. आधी त्याच्या सोबत असायची त्याची सायकल व एक रेडिओ...त्याला गाणे समजते का ते माहित नाही पण त्याला सतत गाणे लागतात काम करताना. आत्ता रेडिओची जागा घेतील मोबाईल ने ...लावणी पासून इंदोरीकर महाराजांचे कीर्तने सगळे काही चालू असते.

सकाळी मामाचा मूड चांगला नव्हता. आज त्याच्या कडे कुठल्या राजकारण्याची खबर नव्हती. तो थोडं रडवेला होता... “ दादा अहो चोरी झाली. देवीचे दागिने चोरले कुणीतरी पाप्याने.” तो फार खिन्न होऊन सांगत होता. अस्वस्थ होत तो उठत म्हणाला, “मानूस लई उतावळा असतो, तस देवाचे नाई...तो पक्की सजा देईल, त्यांची येळ आली की.”
फार मोलाचे तो बोलला होता “ माणूस लई उतावळा आहे.” माझा पूर्ण दिवस त्या शब्दांचा विचार करण्यात गेला.

ज्ञान प्रबोधिनीच्या शिशुविहारची अगदी आरंभापासून त्याचे नाते. स्वच्छता करणे हे त्याचे काम. मुलांशी त्याचे वेगळेच नाते. लहान मुलांना त्याच्या टिपिकल आदाकारीत ती नाचून पण दाखवे. मुलं एकदम खुश. आरतीच्या लहान मुलीने एकदा त्याच्या अंगावर शी केली तर हा माणूस हसत हसत येत आईला म्हणतो, “बघा ,वाहिनी लेकरांनी प्रसाद दिला.”

माणसाचं मन इतक निर्मळ, निर्व्याज होऊ शकते अगदी लेकरांसारखे ?

आठ दिवसांना पूर्वी भाऊची एकच गडबड होती.

“ बाजारात हारं आलेत आता आनावं लागतील लेकरांसाठी.”

नवीन वर्षाचा गुडी पाडवा येणार होता. भाऊ त्याच्या मुलावर खूप प्रेम करतो. त्याला सायकल घेवून फिरायला जातो. शाळेत सोडायला जातो तर कधी शाळेतून आणायला जातो.मला वाटले गुडी पाडाव्यासाठी त्याच्या मुलांसाठी तो गाठी ( हार ) आणायचे म्हणतो आहे. दुसऱ्या दिवशी परत तो मला म्हणाला, “अव, दाद हारं आनावं लागतील न ? बाजार सजला बघा.लई बेस्ट हायत.”

“मग अनुकी त्यात काय.”

गुडी पाडव्याच्या दोन दिवस आधी सकाळी अकराच्या सुमारास भाऊ आपला हातात एक मोठे खोके घेवून आला.

“हे बघा लई झाक हार आणलेत.”

त्याने चक्क शिशुविहार मधील पन्नास मुलांसाठी गाठी आणल्या होत्या. मी ते पाहून तर अवाकच झालो. यार हा माणूस शिकलेला नाही. फार श्रीमंत पण नाही त्यातल्या त्यात त्याचा पोरगा पण शिशुविहार मध्ये नाही तरी याच्या जाणीवा एवढ्या व्यापक कशा ? पै पै साठी भाऊ बंधकी....संपत्तीसाठी व घरासाठी भाऊबंधकी सुधाकरभाऊ नी पण सोसासली होती.स्वतःच्या पैशातून त्यांनी बांधलेल्या राहत्या घरातून त्याच्या भावांनी त्याला बाहेर काढले होते.त्याच्या या विषारी अनुभवातून मात्र त्याच्या जाणीवा काही बोथट झाल्या नाहीत....


त्याची कृती ही त्याच्या नावा प्रमाणेच “सुधाकर” होती.

मी आईला विचारले सुधाकरचा अर्थ काय..... “अमृत”

सुधाकर मामाकडून गळ्यात हार घालून घेताना शिशुविहार मधील आपल्या लेकरांची चेहरे अमृतपान करतो आहेत अशीच खुलली होती. त्यांच्यासाठी साखरेची ती गाठी अमृता सारखीच गोड होती न....

मी मात्र सुधाकर भाऊच्या तृप्त चेहऱ्याकडे पाहून माझी तहान पण भागून घेत होतो.

सोमवार, ३१ मार्च, २०१४

तु ही तृप्त नाही व तुझ्या सोबतचे पण .....



मला खूप वेळा निसर्गाचे नियम आणि माणसांनी केलेले नियम यांचा होणारा संघर्ष पाहिल्यावर खूप काही समजते. गांधीजी म्हणायचे निसर्ग तुमच्या गरजा नक्की पूर्ण करतो हाव नाही. गांधीजींनी हा समजून घेतलेला व आचरणात आणलेला सिद्धांत समजून घेताना खूप काही कळते. काय हो काय निसर्ग नियमित आहे आणि काय मानव निर्मित आहे याची गणती मी करू लागतो
.
मानवजात (स्त्री व पुरुष) निर्माण केली निसर्गाने.वृक्ष, झाडी, फुले, फळे निर्माण केली निसर्गाने...पशु, पक्षी, जलचर निर्माण केले निसर्गाने....भूमी,पाणी, हवा, अग्नी,प्रकाश निर्माण केला निसर्गाने....गंमत पाहताना असे लक्षात येते  की ज्याला जे हवे असते ते सगळे निसर्गाने निर्माण केले. आपल्या उदरनिर्वाहासाठीच्या सर्व गोष्टी निसर्गाने निर्माण केल्या.....वृक्षाचा धर्म असतो फुले, फळे निर्माण करण्याचा. तसाच मनुष्य, पशु,पक्षी इतर जीव पण आपल्या सारखेच जीव निर्माण करतात....मनुष्य सोडला तर प्रत्येक जीव जी काही निर्मिती करतो त्या निर्मितीची जोपासनी करण्याचे दाइत्व विशिष्ठ काळा नंतर निर्मात्यावर असते. एकदा ती निर्मिती स्वयंपूर्ण झाली की ती स्वतःच आपल्या अस्तिवाची काळजी घेते...झाडाला अपेक्षा नसते परत फुला फळांनी त्याच्या आश्रित राहावे म्हणून. एकदा फळ पिकले की ते गळूनच पडणारा. झाडाला कितीही वाटले ते आपल्या सानिध्यात ठेवावे ते नाही रहात. हा निसर्गाचा नियम आहे.

मनुष्याच्या निर्मिती बाबत मात्र असे होताना दिसत नाही. मुळातच मला असे वाटते निसर्गाची सर्वात कमजोर निर्मिती म्हणजे म्हणजे मनुष्य...हे त्याला समजण्यासाठी निसर्गाने त्यांना मन व बुद्धी दिली. या मन व बुद्धी द्वारे मनुष्याने आपले स्वतःचे काही नियम निर्माण केले. आणि काही मग सुरु झाला मनुष्यातीलच आपसी संघर्ष...आई व वडील मुलाचे पालन पोषण करतात म्हणून त्यांची काही कर्तव्य व नंतर मुलांचे त्यांच्या साठी कर्तव्य ....कर्तव्य हे सहज भावनेने फुलण्या पेक्षा ते नियमाच्या आणि अपेक्षाच्या बंधनात अडकायला लागले. याव्यक्ती कडून मला हेच मिळाले पाहिजे हा अट्टाहास पुढे सुरु झाला. तो निर्माण होण्याचे कारण मला खुपदा अपेक्षा,भीती व त्यातून निर्माण झालेल्या आवडी निवडी. त्यातून मग संघर्ष, अस्वस्थता, अराजकता, रोग निर्माण झाले.

मुळातच मला वाटते प्रेम,आपुलकी,सोबत,मदत,मार्गदर्शन आपल्याला आमुक एका व्यक्ती पासूनच मिळायला पाहिजे म्हटल्यावर त्याव्यक्ती वर ते अवलंबून असते. मला स्वतःला असा अनुभव आहे की यासाऱ्या गोष्टी निसर्ग आपल्याला योग्य त्यावेळी योग्य त्या व्यक्ती कडून देतच असतो. पण आपण निसर्गाच्या या चिरंतन नियमावर विश्वास न ठेवता आपण आपल्या अपेक्षा वाढवत जातो. यातूनच मनुष्याची गोची होते. तो मग अयोग्य व्यक्ती कडून अपेक्षा करतो किंवा काही लोकां कडून जबरदस्तीने, स्वतः अस्वस्थ होत ते मिळवण्याचा हतबल प्रयत्न करत असतो. निसर्गाच्या चिरंतन नियमावर आपला विश्वास नसतो म्हणून आपल्या हातात येते केवळ असफलता, अस्वस्थता, त्रागा, त्रास, ताण ....त्यातून मग आपण घेरले जातो षड रीपुनी .....आपल्याला पाहिजे ते नव्हे तर आवश्यक ते नक्की मिळणार व ते योग्य वेळी मिळणार या वर विश्वास नाही ठेवला तर हे विषचक्र नक्कीच आपल्या मागे लागणार....म्हणूनच आपल्या अनुभव सिद्ध संतांनी म्हणतले अरे माणसा थोडं धीर धर...संयम ठेव ...थोडी वाट पहा ...थोडी तितिक्षा कर ...अरे कर्म करत रहा फळ तर नक्कीच मिळणार आहे....पण फळाची अपेक्षा ठेवून नको रे कर्म करू.... त्यामुळे तुझेच जीवन एक मृगजळ होऊन जाईल ...

तु ही तृप्त नाही व तुझ्या सोबतचे पण .....