शुक्रवार, २७ एप्रिल, २०१२

ती आई होती म्हणुनी......अरुणाचल २


दिब्रुगड येथे महालयामध्ये आमची निवासाची व्यवस्था होती. सतत पडणारा पाऊस त्यामुळे बाहेर फिरणे जवळपास अशक्य. वाचन खूप करत होतो. या काळात सर्वात मोठी साथ होती माझा मित्र योगेश झोपेनी दिलेल्या मस्त गाण्याच्या कॅसेट्स व माझ्या आईने घेऊन दिलेल्या कॅसेट प्लेयरनी.


ग्रेसच्या कविता आणि जगजितसिंगांच्या गझला ह्या माझ्या नित्याच्या साथीदार बनल्या.


माँ सुनाओ मुझे वो कहानी,
जिसमें राजा न हो न हो रानी,
जो हमारी तुम्हारी कथा हो,
जो सभी के ह्रदय की व्यथा हो.

गंध जिसमें भरी हो धरा की,
बात जिसमें न हो अप्सरा की, 
हो न परियां जहाँ आसमानी,
माँ सुनाओ मुझे वो कहानी.


दिब्रुगडच्या ब्रह्मपुत्रच्या घाटावरून काही प्रवास जीपने ब्रम्हपुत्रच्या पात्रातून तर काही प्रवास बोटीने( फेरी) करत सकाळी ७ वाजता निघालेलो आपण नक्की कधी शिलापथारला पोहोंचू हे सांगता येणे कठीणच. माझ्या अनुभवानुसार कमीत कमी तीन तास तरी नक्की लागतात. शिलापथारला पोहोंचले की पहिले काम दापोरीजोला जाणाऱ्या बसचे तिकीट आरक्षित करणे. शिलापथार अरुणाचल व आसामच्या सीमेवरील एक छोटेसे गाव. दापोरीजोला जाणाऱ्या तशा दोन बस. एक अरुणाचल राज्य परिवहन निगमची, त्याला ट्रान्सपोर्टची बस म्हणतात तर दुसरी खाजगी वाहतुकीची आराम बस. ज्याच्यात जागा असेल त्यात बसायचे. सकाळी दापोरीजोहून जी बस असायची त्या बसने जायचे. कधीकधी बस येतच नसे मग शिलापथारच्या एखाद्या लॉज मध्ये राहायचे. त्यावेळी स्वच्छता,आरोग्य ह्या गोष्टी आमच्या विचार कक्षेच्या बाहेर.

दुपारी मस्त DBS (दाल,भात,सब्जी)वर ताव मारायचा, इकडे तिकडे फिरत बसायचे. सायंकाळी ५ वाजता शिलापथारहून बस निघायची. बसमध्ये कोंबड्या,मासे,वेगवेगळे सामान सगळे काही असायचे. 

बस ८ किलोमीटर पुढे गेली की लिकाबाली चेकपोस्ट. इथून अरुणाचल सुरु होणार. चेकपोस्ट म्हटल्यावर मला पहिल्यांदा थोडं आश्चर्य वाटले. एखादा पोलीस मग बसमध्ये चढून आतील  अरुणाचली बंधू सोडून इतरांचे इनरलाइन परमिट तपासणार. अरुणाचलमध्ये जाण्यासाठी आपल्याला रीतसर अरुणाचल शासनाची परवानगी घ्यावी लागते. ईशान्य भारतातील नागालँड,मिझोरम व अरुणाचल या तीन राज्यात प्रवेश करण्यासाठी (ILP) ही परवानगी लागते.इंग्रजांनी हा सुरु केलेला कायदा आपण पुढे चालूच ठेवला. या बद्दल बरेच वादविवाद आहेत.


एकदा इनरलाइन परमिट तपासणी झाली की बस अरुणाचलच्या डोंगररांगातून जाऊ लागते नागमोडी वळणाने. सरळ रस्ता क्वचितच.
 डोंगरातून खूप परिश्रमाने निर्माण केलेले हे रस्ते म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे देशासाठी एक खूप मोठे योगदान आहे. पावसाळ्यात मात्र हाल होतात. डोंगरच्या डोंगर कोसळतात. रस्ते पूर्ण बंद. वायुमार्गाने फक्त रसद पुरवठा आणि बऱ्याच वेळा तो पण बंद असे. एका पावसाळ्यात जवळपास एक महिना रस्ते बंद होते. फक्त भात कधी तर कधी फक्त बटाटे हे आमचे जेवण असे.

निसर्गाचा एक वेगळाच सुगंध आपल्याला इथे अनुभवता येतो. खोल दऱ्या, उंच पर्वत आपली साथ कधीच सोडत नाहीत. अरुणाचलमधील लिकाबाली हे पहिले गाव. मालिनीथान (Malinithan) मंदिर इथून एक किलोमीटर वर. इथे काही पुरातनकालीन (महाभारत) अवशेष पहावयास मिळतात. अशी आख्यायिका आहे की मालिनीथान येथे भीष्मकनगरहून  द्वारकेला जाताना  नवीन लग्न झालेल्या श्रीकृष्ण व रुक्मिणीने पार्वती मातेची प्रार्थना केली. पार्वती मातेनी त्यांनी एक हार दिला. तो श्रीकृष्णाला खूप आवडला. श्रीकृष्णाने पार्वती मातेची सुचारू मालिनी (Sucharu Malini", or a lady who strings garlands beautifully ) म्हणून स्तुती केली. त्यावेळी पासून या स्थानाचे नाव  मालिनीथान असे पडले.

लिकाबालीनंतर पुढचा थांबा येतो व सगळे लोक बस मधून खाली उतरतात. मी पहिल्यांदा गेलो त्यावेळी वाटले एखादा धाबा असेल पण खाली  उतरून पाहतो तो समोर एक मंदिर होते. अरुणाचलमध्ये असे अनेक स्वयंभू शिवलिंगाचे मंदिर आहेत. दापोरीजो जवळचे मंगामंदिर तर खुपच अप्रतिम आहे. हिमालयात निवास असणाऱ्या भोलेनाथाचा आशिर्वाद घेऊन.पुढची अवघड यात्रा सुरक्षित व्हावी म्हणून सर्वांनी प्रार्थना केली व आमचा प्रवास पुढे सुरु झाला.

असे खुपदा अनुभवायास मिळते की उत्तरेकडून दक्षिण टोकापर्यंतचा भारत रामाने जोडला. पूर्वेकडून पश्चिमेपर्यंतचा भारत कृष्णाने जोडला तर समुद्रसपाटी पासून ते उंच हिमालयाच्या पर्वतशिखरांपर्यंतचा भारत शिवशंकराने जोडला.

अरुणाचलच्या या पर्वतीय रस्त्यावरून बस चालवणे खुपच जिकीरीचे काम. खुपच सतर्क रहावे लागते. वळणावर समोरून येणाऱ्या गाडीचा वेध तिच्या प्रकाशाने घ्यावा लागतो. अरुणाचलचे क्षेत्रफळ ८४ हजार वर्ग किलोमीटर व लोकसंख्या १४ लाखाच्या आसपास. मनुष्यवस्ती खुपच तुरळक व खूप अंतरावर. त्यामुळे दहा तासाच्या प्रवासात काहीच गाव दिसतात. बसार हे त्यातल्या त्यात मोठे गाव. सकाळी सहाच्या आसपास आपण दापोरीजोमध्ये पोहोचतो. मारो हे छोटेसे गाव सोडल्यानंतर काही अंतरापासून आपला प्रवास सुबांशिरीन सोबत सुरु होतो. 

अरुणाचलच्या बहुतेक जिल्ह्यांची नावे त्या भूभागातून नद्यांच्या नावावरून दिले आहेत. त्याच प्रमाणे इथल्या गावाची नावे म्हणजे इथल्या बंधूंची आडनावे. मारो बस्ती मध्ये राहणाऱ्या सर्व बांधवांची आडनावे मारो. 
मुलांची व पुरुषांची नावे मुख्यतः त किवा म पासून सुरु होतात उदा.ताके,तामो,तानिया,तागे, मार्को,मालार इत्यादी  तर मुलींची व महिलांची नावे मुख्यतः य पासून. याबी, यांनी, याकब, यादे इत्यादी. वडिलांचे नाव लावण्याची पद्धत इथे नाही.
गावातील मुलं मुली एकमेकांची बहिण भाऊ व गावातील प्रत्येक आईच्या (आने) वयाच्या महिलेला मुलं आईच म्हणतात. 

आबो म्हणजे वडील तर आबोतानी हा त्यांचा  आद्य पिता. सर्वं अबोतानीच्या वंशजांचे दोनि (सूर्य ) व पोलो (चंद्र) हे देवता. दोनि आई आहे तर पोलो वडील आहे. निसर्गाच्या सहवासात राहणारे हे बांधव निसर्गाचेच पूजक असणार.



आदित्यांत महा-विष्णु ज्यातिष्मंतांत सूर्य मी । मरीचि मुख्य वायूंत मी नक्षत्रांत चंद्रमागीत्ताई २१॥
मी एकाक्षर वाणींत महर्षींत असे भृगु । जप मी सर्व यज्ञांत मी स्थिरांत हिमालय गीत्ताई २५ ॥






भारतवर्षात एकूणच आई व मुलाचे नाते फारच वेगळे.  तिच्या शरीराचा आपण एक भाग असतो. भारतात्तील आई मुलांच्या जोड्या पहिल्यातर आपल्याला लक्षात येईल की आईचे स्थान भारतीय अध्यात्मात तर महत्वाचे आहे पण इतिहासात ते खुपच उठून दिसते. गणपती -पार्वती, हनुमान-अंजनी, कृष्ण-यशोदा, शंकराचार्य व त्यांची आई,जिजाऊ-शिवबा, शाम व त्याची आई, विनोबा व त्यांची आई. अशा आई मुलांच्या जोड्यांनी सर्वच क्षेत्रात एक नवीन आदर्श ठेवला. मी काही माझ्या पंजाबी मित्रांना विचारले की खरे कशा मुळे पंजाबातील दहशतवाद संपला? त्यांचे उत्तर होते, “ पंजाबातील आईंमुळे!!!”

मला कधी कधी वाटते आपल्या देशातील आईंमुळे देश एकसंघ राहिला व कुटुंबे एकसंघ राहिली. आई जर दुर्बल झाली तर घर व देश पण दुर्बल होईल.
अरुणाचली आई पण याला कशी अपवाद असेल. अरुणाचली घराचा कणा म्हणजे आई.

गम्मत म्हणजे अरुणाचलात लग्नपद्धती पण खूप वेगळी आहे. पुराणकाळात आपल्याकडे सर्वात श्रेष्ठ गोधन समजले जायचे. 

अरुणाचलमध्ये श्रीमंती ठरते ती त्यांच्याकडे असण्याऱ्या मिथुनच्या संख्येवर. मिथुनचे अरुणाचली बांधवांच्या आयुष्यातील स्थान खूप महत्वाचे. एका मिथुनची किंमत काही दश सहस्त्रात. एखाद्या मुलीशी आपल्या मुलाचे किवा मुलीचे लग्न लाऊन द्यायचे असेल तर त्या मुलीचे वडील मागतील तेवढे मिथुन लग्नात त्यांना द्यावे लागतात ही अरुणाचली रीत.

एक गंमतीदार किस्सा ऐकिवात आहे. पंडित नेहरू व इंदिराजी अरुणाचल मधील झिरो या गावी गेले होते. त्यांचे तिथे खूप जोरदार स्वागत झाले. झिरो गावच्या गावप्रमुखाला इंदिराजी खूप आवडल्या. गावप्रमुखाचे वय साठीच्या आसपास असेल. त्यांनी पंडितजींना विचारले,


“इंदिराजींचे लग्न माझ्याशी लाऊन द्याल का?”


त्याबदल्यात गाव प्रमुख पंडितजींना शंभर मिथुन देण्यासाठी तयार होते.

मी दापोरीजो मध्ये रहात असताना खूप जवळून अनुभव घेता आला या सर्व लोकांचा. एकदा काही बांधवांना आमचे कार्यकर्ते बंगाल मध्ये घेऊन गेले. कोलकत्याच्या रेल्वेस्टेशन वर एका बांधवाची बॅग चोरीला गेली.
“कुठे ठेवली होती?” असे विचारल्यावर त्याने सांगितले,
“वहाँ कोने मे रखी थी”
“आपका ध्यान नही था क्या?”
“हमने यह सोचा भी नही था न, की कोई बॅग उठायेगा.” 

अगदी निरागसपणे त्याने उत्तर दिले.

त्याच्या बस्ती मध्ये कुठल्याच घरांना कुलूप नसतात. चोरी हा प्रकार बस्तीतल्या लोकांना माहित पण नव्हता.



कुपोरीजो मधील विवेकानंद केंद्राच्या प्राथमिक शाळेतील मुले खुपच गोड दिसायची. त्यांचे हिंदी बोलणे पण फार भारी. तशी फार इरसाल ही पोरं. साप, पक्षी, विंचू हे सहज पकडायची. जंगलाचे ते राजेच होते. साठच्या दशकात रामकृष्ण मिशनच्या शाळांमध्ये अरुणाचलच्या विविध व खूप अंतर्गत भागातून मुलांना सरळ हेलीकॉप्टरने आणले जायचे. त्यातील काही मुले पुढे अरुणाचलचे मंत्री, मुख्यमंत्री व खासदार झाली. असेच अप्पर सुभांशिरीनच्या अतिअंतर्गत भागातून मुलांना शिकण्यासाठी कुपोरीजोच्या शाळेत आणले जायचे.

मारो ही एक अशीच दुरस्थ बस्ती. जवळपास ३० किलोमीटर दूर.
तिथला तागे हा शिकण्यासाठी कुपोरीजो मध्ये होता. तागेचे वडील तो काही महिन्याचा असतानाच देवाघरी गेले होते. त्याच्या आनेची (आईची) इच्छा होती तागेनी खूप मोठे व्हावे. दिसायला तागे अगदी बाल हनुमानाचे रूप. खुपच मस्त दिसायचा.

विवेकानंद केंद्राच्या शाळांच्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा होत असत. ओयानच्या शाळेत झालेल्या लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिलीतील तागे मारा एक स्पर्धक होता. त्याची स्पर्धा होती त्याच्या पेक्षा वयानी खूप मोठया मुलांशी. स्पर्धा सुरु झाली तागे मारा मात्र शेवट पर्यंत धावला व शर्यतीचे सहा किलोमीटरचे अंतर त्याने न थांबता पूर्ण केले. तागे मारा त्या दिवसा पासून सर्वं विवेकांनद केंद्रांच्या शाळेत हिरो झाला होता. दापोरीजोची अनेक मुले ओयानच्या शाळेत शिकत होती. त्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.पांडे होते. मुलांनी तागेला सांगितले की मुख्याध्यापकांशी ओळख करून देताना त्यांनी त्याचे स्वतःचे नाव सांगायचे पांडे म्हणून.

मुख्याध्यापकांनी तागेला नाव विचारले. त्याने सांगितले पांडे मारा !!! आणि त्या दिवसापासून सगळे त्याला पांडे म्हणू लागले. मी कुपोरीजो मध्ये अधूनमधून राहायला जायचो. नेत्रतपासणी शिबिरानंतर मला आता प्रवासासाठी मोटारसायकल पण मिळाली होती. पांडे व त्याच्या तीन मित्रांशी माझी पण खूप मस्त मैत्री झाली होती. ताई गंगो,मित्ती गंगो,डॅनी मार्दे हे पांडेचे जिगरी दोस्त. ताई गंगो,मित्ती गंगो दोघे भाऊ दापोरीजोचे तर  डॅनी मार्दे दुम्पोरीजोचा. या तिघांचा जन्म थोडया सुधारलेल्या भागातील. फार जंगली जीवनाचा अनुभव नाही. घरचे जीवन पण सुशिक्षित व समृद्ध होते. एकनाथ वसतिगृहात दुसरीचे मुले रहात. या चौघा जणांचे कॉट एक सलग. मी कुपोरीजो मध्ये असल्यावर या चौघांशी निदान अर्धा एक तास तरी रात्रीच्या जेवणानंतर गप्पा मारत असे. ते मला प्रसादजी सर म्हणायचे. त्यांच्यामुळे मला शाळेतील व अरुणाचलातील  बऱ्याच गोष्टी पण कळायच्या.

“पांडे, आप इतना तगडा कैसे है? बहोत दुध, मक्खन, घी खाता होंगा?”

“नही न सर, हमलोग मे, दुध सिर्फ माँ का ही पिते है. जिसका दुध पियेंगे वो माँ बन जाती है. इस वास्ते तो हम गाय का दुध नही पिते.”

सृष्टीशी या भागातील बांधवांचे नाते पण फार वेंगळे. गाय व मिथुनचे हे लोक दुध पीत नाहीत कारण जिचे आपण दुध पितो ती आपली आई होते मग तिचे मांस नाही खाता येणार, त्यांचा बळी नाही देता येणार कुठल्याही पूजेत किंवा सण-समारंभात.एक झाड जर जंगलातील तोडले तर एक तरी नवीन झाड लावले पाहिजे हा नियम.

९ मार्च १९९७, पूर्ण खग्रास सूर्यग्रहण ईशान्य भागात दिसणार होते. मला सूर्यग्रहणा बद्दल प्रचंड आकर्षण होते. पूर्ण खग्रास सूर्यग्रहण आणि ते ही अरुणाचल मधून पहायला मिळणार या मुळे मी खूप खुश होतो. तसे दोन दिवसांपासून मी कुपोरीजी मध्ये ठाण मांडून बसलो होतो. संध्याकाळी जेवण झाल्यावर मी सर्व मुलांना ग्रहणाबद्दल माहिती देत असे. पिन होल कॅमेरा, ग्रहण पाहण्यासाठी खास प्रकारच्या चष्मे पण मी मागून घेतले होते. ग्रहणात उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे पहायचे नाही, नाहीतर डोळे खराब होतील. शिक्षक हे सगळे सर्वं विद्यार्थ्यांना बजावून सांगत होते. आदल्या दिवशी दुपारी सूर्यग्रहणावर खूप छान माहिती दूरदर्शनवर दाखवण्यात आली होती. मुलं प्राथमिक शाळेतील असले तरी त्यांना एकूण बऱ्यापैकी संपूर्ण सूर्यग्रहणा बद्दल माहिती झाली होती. दुसऱ्या दिवशी मी माझ्या मदतीला थांबण्यास पांडे व त्याच्या मित्रांना सांगितले. मुख्याध्यापक तामिळनाडूच्या कुमारवेल सरांनी झोपण्याआधी सर्वं मुलांना परत एकदा सूचना दिल्या.

मी पण माझ्या निवासकक्षात जाऊन शांत झोपी गेलो. अचानक रात्री कुमारवेल सरांनी माझ्या खोलीचा दरवाजा जोरात ठोठावला. काही क्षण मला काही कळलेच नाही. स्वप्न आहे की भास.

“प्रसादजी उठो ...जल्दी उठो”  कुमारवेल सर जोरात हाक मारत होते.

“क्या हुआ सर ?” मी दरवाजा उघडत विचारले.

“चार बच्चे होस्टेल मे नही है”

“क्या ?”

“सेकंड के चार बच्चे होस्टेल मे नही है”

लंबोदरजीनां (वार्डन) रात्री १२ वाजता, झोपण्या पूर्वीची शेवटची तपासणी करताना लक्षात आले की 
चार मुले नाहीत. आम्ही सर्वांना जागे केले. शाळेच्या सर्व भागात तपासणी सुरु केली. कुठही मुलांचा ठिकाणां नाही.

“कौन कौन बच्चे नही है ?” मी वार्डनला विचारले.
“पांडे मारा, ताई गंगो,मित्ती गंगो,डॅनी मार्दे”
“क्या, ये सब लोग नही है ?”
“हा सर वो ही लोग है”

बराच वेळ शोधल्या नंतर आम्ही शाळेबाहेर शोधण्याचा निर्णय घेतला. तीन दिशांना तीन गटानी जायचे ठरले. मी पण एका मोठया मुलाला घेऊन मोटारसायकलहून दापोरीजोच्या दिशेनी निघालो. मध्यरात्रीचा एक वाजला होता. मी सावकाश झाडांमध्ये मोटारसायकलचा प्रकाशझोत टाकत हळूहळू पुढे जात होतो. साधारण ४/५ किलोमीटर गेल्यावर अचानक मागे बसलेला मुलगा ओरडला,

“ सर , वो देखो वो लोग भाग रहे है.”
“कहा है? .....ठीकसे देखो”
“वो देखो न सर, नीला शर्ट है और वे भाग रहे है”

अरुणाचली मुलांची नजर फारच जबरदस्त. मी गाडी थांबवली. मागे बसलेला मुलगा उतरला व सरळ झाडांमध्ये घुसला. ही मुलं प्रचंड निर्भीड, कशाची भीती अशी नाही. मी गाडी लावून त्याच्या मागे धावत निघालो. मी जोरात ओरडलो,

“पांडे रुको ...भागो मत.”

तोपर्यंत माझ्याबरोबर आलेल्या मुलाने पांडेला पकडले होते. पांडेला पकडले हे पाहताच ताई गंगो,मित्ती गंगो,डॅनी मार्दे हे पण पळायचे थांबले.

“अरे कहा भाग रहे थे इतनी रात मे? सब लोग परेशान हो गये ना”

माझ्या या बोलण्याला फक्त माना खाली करून त्यांनी प्रतिसाद दिला. मी अनेक प्रश्न विचारत होतो पण एक जण पण तोंड उघडायला तयार नाही. शेवटी आम्ही पाच जण गाडीवर बसलो. ताई गंगो,मित्ती गंगो फारच लहान होते त्यांना पेट्रोलच्या टाकीवर बसवले तर डॅनी,पांडे यांना मागे. माझ्या बरोबर आलेल्या मुलाला तिथेच एका घरात थांबायला सांगितले. गाडीवर पण मी त्यांना अनेक प्रश्न विचारत होतो पण एक शब्द बोलत नव्हते. शाळेत कित्येक तास गप्पा मारणारे हेच का? हा प्रश्न मनात पडत होता.
एकदाचे शाळेत पोहोंचलो. कुमारवेल सर प्रेयर हॉल समोर काही मुलांसोबत उभे होते. गेल्या तासाभरा पासून ते खुपच अस्वस्थ होते. मुलांना पाहताच ते जवळ आले. पांडेला जवळ घेऊन विचारले,

“क्यू गया था ?”

मुलं चूप. एक दोनदा सरांनी विचारले पण पोर शांत. ताई गंगो मात्र जोरात रडायला लागला.
सर खुपच चिडले होते त्यांनी चांगला प्रसाद चारी जणांना दिला. पण बहाद्दर काही बोलायला तयार नाहीत. जोरजोरात मात्र रडायला सुरुवात केली. सर अजून चिडले. मग अजून प्रसाद. मग अजून रडणे.

शेवटी मी ताई गंगोला बाजूला नेले. शांतपणे त्याला विचारले,

“अभि आपको कोई भी नही मारेगा और डाँटेगा भी, सिर्फ बताओ क्यू भाग गये थे.”  

ताई व माझी जास्त दोस्ती होती. तो थोडा वेळ शांत होता व मग बोलू लागला,

“सर कल तो सूर्य ग्रहण है ना? पांडे की मां बस्ती मे रहती है. उसको तो यह मालूम नही है न? अगर उसने सुरज की तरफ देखा तो उसकी आँखे खराब हो जायेगी न सर ? पांडे ने हमलोग को ये बताया. फिर मित्ती बोला रात मे भागते भागते बस्ती मे जायेंगे और उसे ये बताके फिर वापस आयेंगे. फिर हम सब लोग तैयार हुये और पांडे के माँ को बताने के लिये बस्ती जाने के लिये भाग निकले.”

माझे डोके सुन्न झाले. मी ताईला माझ्या मिठीत घेतले. उठलो व लंबोदरजींना मुलांना पाणी व साखर द्यायला सांगून कुमारवेल सरांना घेऊन माझ्या खोलीत आलो. सरांना मुलांच्या पळून जाण्याचे कारण सांगितले. सरांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले.

दोन वर्षांनी मला केंद्राच्या सर्व शाळांच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी दिली. त्यामुळे दापोरीजो सोडून दिब्रुगड माझे मुख्यालय झाले पण महिन्यातून २४ दिवस अरुणाचल मध्येच प्रवास असायचा. मुख्यतः माध्यमिक शाळांची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे दापोरीजोला जाणे थोडे कमीच म्हणजे वर्षातून एकदा. पांडेनी चवथीची परीक्षा दिली होती व तो सुट्टीत घरी गेला होता. मी नेमका सुट्ट्यांमध्येच कुपोरीजोच्या शाळेच्या भेटीसाठी आलो होतो. मी सरांकडे पांडेची विचारपूस केली.

“क्या बताये सर बहोत दुःख की बात है. गये साल, एक दिन पांडे की मां स्कूल मे आई. वो बोलने लगी मेरे बेटे के साथ मुझे आज की रात सोने दो. आपने यहा तो ये नही चलता है न ? मैने बताया स्कूल का नियम है,ऐसा नही करने देते. वो बहोत रोने लगी.”

कुमारवेलसर खुपच भावूक व्यक्तिमत्व. ते सांगतांना त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले.

“क्या करता सर बहोत समझाया पर वो बहोत रिक्वेस्ट करने लगी. मुझे तो बहुत दीकदारी थी. मेरा मन कहने लगा एक रात की तो बात है, सोने देंगे. फिर मैने भय्या को बताया की पांडे को नीचे लाओ. पांडे आने के बाद उसके माँ की और उसके सोने की व्यवस्था एक quarter मे की. सुबह उठकर उसकी माँ स्कूलसे चली गयी.”

आता मात्र सर चांगलेच रडत होते.

“दुसरे दिन पांडे का मामा आया और उसने कहा कल रात पांडे की मां का निधन हुआ.....मुझे तो बहोत अस्वस्थ होने लगा.पांडे को लेके वो लोग चले गये. रात भर मुझे नींद नही आई प्रसादजी.”

ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो

त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे

खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता




३ टिप्पण्या:

Charudatta म्हणाले...

khupach bhavnik goshta ahe...
Arunachalchi mansa kharach khup changli aahet dada!!!!

Aradhana... Living for God म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Aradhana... Living for God म्हणाले...

खुप छान वाटल प्रत्येक प्रसंग आणि माहिती वाचताना.... धन्यवाद दादा ....!